☆ माझा कॅन्सर… भाग-२ – सुश्री मंगला नारळीकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
(पाश्चात्य वैद्यकीय पद्धतीला त्यावर पूर्ण यश मिळवता येत नसेल, तर आपल्याला पटणाऱ्या इतर औषधांचाही प्रयोग करावा, या मतावर मी आले.) इथून पुढे —-
आता मला अधिक जोरदार केमो दिली गेली. यावेळी ती इंजेक्शने घ्यायला ‘टीएमएच’मध्ये जाण्याचे ठरले. सुहास माझ्याबरोबर येत असे. प्रत्येक इंजेक्शननंतर चोवीस तास सतत उलट्या होत, मग पूर्ण थांबत. अशक्तपणा खूप असे. या वेळी मी दोन दिवस माहेरी राहून विश्रांती घेत असे. दुसऱ्या इंजेक्शननंतर खूप केस गळले, तिसऱ्यानंतर सगळेच केस गेले. एक लांब केसांचा टोप किंवा विग माझ्या भावाने कुणाकडून तरी करून आणला. एवढा मोठा विग मला फार जड होता, त्याने भारी उकडत असे. मग त्या विगचे केस कापून, आटोपशीर पोनी टेल बनवून घेतली. बाहेर जाताना मी तो लावत असे, घरात एक स्कार्फ पुरे. जानेवारी १९८९नंतर दुसरी केमो संपली, अशक्तपणा खूप होता; पण आता टामोक्सिफेनच्या गोळ्यांव्यतिरिक्त काही औषधे नव्हती. पुढे पाच-सहा महिन्यांनी बऱ्यापैकी केस आले.
आम्ही १९८९च्या जूनमध्ये पुण्यात राहायला गेलो. ‘आयुका’ची स्थापना होत होती. पुणे हे आयुर्वेद वैद्यकीचे माहेरघर. माझ्या आईचे वैद्यकीय शिक्षण आणि काम तिथेच झाले. पुण्यातील वैद्यांचे औषध घ्यावे, म्हणून मी आईचे सहकारी वैद्य भा. पु. नानल यांच्याकडे गेले. त्यांना स्पष्ट विचारले, ‘आयुर्वेदात कॅन्सरसाठी औषध दिले आहे का?’ त्यांनीही तेवढ्याच स्पष्टपणे सांगितले, की तसे औषध नाही. आयुर्वेदाची रचना झाली, तेव्हा या रोगाची आता आहे तशी माहिती नव्हती. ते म्हणाले, ‘मी कॅन्सरसाठी औषध देणार नाही; पण या रोगाचे भयावह रूप त्याच्या शरीरात इतरत्र पसरण्यात किंवा सेकंडरीजमध्ये असते. तुझ्या शरीरात अशा सेकंडरीजना थारा मिळू नये, महत्त्वाच्या अवयवांचे रक्षण व्हावे, म्हणून तुझे एकूण शरीर चांगले सुदृढ, टणक करण्याचा प्रयत्न करणार.’ मला त्यांचे म्हणणे पटले. मी त्यांची औषधे चार-पाच वर्षे घेतली, एकंदरीत प्रकृती चांगली झाली. नंतर त्यांच्या परवानगीने हळूहळू औषधे बंद केली. त्यानंतर २०२१च्या सप्टेंबरपर्यंत, म्हणजे १९८८च्या सेकंडरी प्रादुर्भावानंतर ३३ वर्षे मी निरोगी राहिले, त्याचे काही श्रेय मी स्ट्राँग केमोथेरपीला, काही आयुर्वेदिक औषधयोजनेला, काही माझ्या नैसर्गिक प्रकृतीला, तर थोडे श्रेय भाग्य या सर्वस्वी अज्ञात गोष्टीसाठी देते. कॅन्सरची प्रथम गाठ पडली, तेव्हा आणखी १५-२० वर्षे आयुष्य मिळेल तर बरे होईल, असे वाटत होते. नियती त्यापेक्षा बरीच दयाळू निघाली.
आपल्याला लवकरच मृत्यू येऊ शकतो, याची पहिल्या ऑपरेशननंतर जाणीव झाली. त्यानंतर माझ्या विचारांत आणि विविध गोष्टींचा अग्रक्रम लावण्यात फरक झाला. लोक काय म्हणतील, यापेक्षा मीच विचार करून काय अधिक महत्त्वाचे, अधिक चांगले ते ठरवू लागले. मनापासून आवडणाऱ्या गोष्टी आधी करण्याचे ठरवू लागले. आधीपासून बुद्धिवादी होतेच, आता अधिक बुद्धिवादी झाले. एखाद्या गोष्टीवर माझे मत वेगळे असले, तरी ते स्पष्टपणे मांडू लागले. इंग्रजीमधील ‘आय बेग टु डिफर’ हे विधान मला आवडते. त्याचा जास्त वेळा उपयोग करू लागले. एखाद्याने चांगली गोष्ट केली, तर वेळ न घालवता, शक्य तेवढ्या लवकर शाबासकी किंवा स्तुती पोहोचवू लागले. स्वत: बुद्धिवादी असले, तरी अनेक प्रेमाच्या माणसांच्या अंधश्रद्धांकडे जास्त सहानुभूतीने पाहू लागले. ही इतकी चांगली माणसे, अंधश्रद्धांवर विश्वास का ठेवत असतील, याचे मानसशास्त्रात उत्तर मिळते का, हे पाहू लागले. लहानशा गोष्टींचा फार बाऊ करू नये, असे वाटू लागले. पूर्वीपासून मी सूर्यनमस्कार व काही योगासने करीत होते, आता हे व्यायाम अधिक नियमित करू लागले; त्यामुळे शरीर लवचिक व निरोगी राहण्यास मदत झाली.
कॅन्सरच्या पहिल्या प्रादुर्भावानंतर ३५ वर्षांची मोठी लीज मिळाली, असे मी मानते. मागे वळून पाहताना, ती चांगली वापरली गेली याचे समाधान वाटते.
तिन्ही मुलींना मोठ्या होताना, जबाबदार नागरिक म्हणून काम करताना, आपापले संसार समर्थपणे सांभाळताना पाहिले. आता नातवंडांची प्रगती पाहत आहे. जयंतच्या आई-वडिलांना त्यांच्या वृद्धपणात आम्ही आधार देऊ शकलो. जयंतचे वडील त्यांच्या आयुष्याची अखेरची १८, तर आई २४ वर्षे आमच्या घरी निवास करीत होते. घरातील जबाबदाऱ्या कमी झाल्यावर मी जयंतबरोबर अनेक देशांचा प्रवास केला, तेथील संस्कृती पाहिल्या; त्यामुळे माझे जीवन अधिक समृद्ध, श्रीमंत झाले. विविध देशांच्या अनुभवावर लहानसे पुस्तक लिहिले. माझा आवडता विषय गणित, तो जमेल तेव्हा वेगवेगळ्या स्तरातील विद्यार्थ्यांना शिकवला. लोकांमध्ये त्याची आवड निर्माण व्हावी, निदान भीती कमी व्हावी, म्हणून लेखन केले. पुढे ‘बालभारती’च्या पाठ्यपुस्तकांवर काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा शाळेतील मुलांना गणित सोपे व रोचक वाटेल असा प्रयत्न केला. ही सगळी कामे आनंद आणि समाधान देणारी होती, म्हणून मिळालेली लीज चांगली वापरली गेली असे वाटते.
आता २०२१मध्ये दुसऱ्या स्तनातही लहानशी गाठ आली, बायोप्सीमध्ये ती कॅन्सरची निघाली. मग दुसऱ्या बाजूची मास्टॅक्टोमी ३५ वर्षांनी करावी लागली. त्या वेळी पेटस्कॅनमध्ये इतरत्र कॅन्सरचा प्रादुर्भाव नाही, असे समजले होते; पण २०२२च्या जूनमध्ये सतत बारीक ताप का येतो यासाठी चिकित्सा करताना, फुप्फुसाचा कॅन्सर दिसला. त्यासाठी अर्थात केमो चालू केली. एकूण पाच इंजेक्शने दिली. सुदैवाची गोष्ट म्हणजे, १३ डिसेंबरला केलेल्या पेट स्कॅनमध्ये, आता कॅन्सरचा शरीरात प्रादुर्भाव दिसत नाही, असा अभिप्राय आला. म्हणजे पुन्हा एकदा लीज मिळाली आहे. किती मोठी, हे माहीत नाही; पण हा रोग फसवा आहे, केव्हाही परत हल्ला करू शकतो, हे माहीत आहे. आयुष्य जेवढे आहे, तेवढे त्यातल्या त्यात सुखाचे, शांतीचे असावे, असा प्रयत्न करते. पुन्हा एकदा अग्रक्रम पाहते आहे. खरोखर काय जास्त महत्त्वाचे, ते ठरवते आहे.
आयुष्यात नेहमी काही ना काही आनंद वेचता येतो, आपल्याला आशा आणि उमेद देतो, असा माझा विश्वास आहे. मंगेश पाडगावकर यांची ‘कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी’ ही कविता आठवावी. निसर्गातील अनेक लहान लहान गोष्टींत कवीला ईश्वराची खूण दिसते, मला त्यातला जीवनानंद दिसतो. कधी कधी एखाद्या परिस्थितीत अनपेक्षित विनोद दिसतो, तो टिपला पाहिजे. विनोद हे ताण कमी करण्याचे, हसून आनंदी राहण्याचे चांगले साधन आहे. कोणी सजीव अमर नसतोच. अखेरच्या वेळी मला किंवा माझ्या जवळच्या लोकांना फार त्रास होऊ नये, ही मनापासून इच्छा आहे. माझ्या देहाचे काही भाग कुणा व्यक्तीचे जीवन सुखाचे करणार असतील, तर तसे जरूर व्हावे, मला त्यात आनंद आहे.
— समाप्त —
लेखिका : सुश्री मंगला नारळीकर
संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ माझा कॅन्सर… भाग-१ – सुश्री मंगला नारळीकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
मला १९८६मध्ये पहिल्यांदा कॅन्सर झाला. त्याचा सेकंडरी प्रादुर्भाव १९८८मध्ये झाला. आता २०२१ आणि पुन्हा २०२२मध्ये कॅन्सरने परत डोके वर काढले. पहिल्या वेळेपासून आतापर्यंत मोठा अवधी मिळाला, असे मला वाटते. या काळातील हे माझे अनुभव…माझा कॅन्सर
– मंगला नारळीकर
जून १९८६च्या शेवटच्या आठवड्यात माझ्या डाव्या स्तनात दोन-तीन लहान गाठी आढळल्या, तपासणीत त्या कॅन्सरच्या असाव्यात असे ठरले, म्हणून पाच जुलै रोजी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्या वेळचे उत्तम सर्जन डॉ. प्रफुल देसाई यांनी ऑपरेशन केले. फ्रोजन सेक्शनमध्ये कॅन्सरचा प्रादुर्भाव स्पष्ट होता. तसे असेल, तर पूर्ण स्तन काढावा, की फक्त त्यातील गाठी काढून उपचार करावेत, हे सर्जननी मला आधी विचारून ठेवले होते. माझे उत्तर होते, ‘आरोग्यासाठी जे अधिक सुरक्षित असेल ते करा, रूप किंवा बांधा यांना मी फार महत्त्व देत नाही.’ सर्जननी सर्व बाजूंचे मिळून १२ नोड्स काढून तपासले. काही कॅन्सरग्रस्त, तर काही निरोगी होते. त्या वेळच्या वैद्यकीय ज्ञानाप्रमाणे केमोथेरपी, रेडीएशन आणि पोटात घेण्याच्या गोळ्या असे तिन्ही उपाय करण्याचे ठरले. ऑपरेशनच्या वेळी जवळचे नातेवाइक काळजीने हॉस्पिटलमध्ये हजर होते. त्या वेळी माझ्या आईने जयंत आणि सर्वांना समजावले, की पेशंटसमोर कुणी धीर सोडायचा नाही, रडणे वगैरे करायचे नाही. पेशंट बरी होणारच, अशी धारणा ठेवायची. ती डॉक्टर आणि वैद्य होती. तिचा हा सल्ला सगळ्यांनी मानला.
हळूहळू माझ्या कॅन्सरची बातमी इतर नातेवाइकांत पसरली. नारळीकरांच्या घरी माझे सासरे तात्यासाहेबांनी बुद्धिवादी वातावरण जोपासले होते. माझ्या माहेरी, राजवाडेघरी किंवा आजोळच्या चितळेघरी अनेक लोक फलज्योतिषावर विश्वास ठेवत. कुणी तरी नारळीकरांच्या कुळात लघुरुद्राची पूजा करावी असे सुचवले. यावेळी माझी आई म्हणत होती, की हाही उपाय करावा. ज्यामुळे रोग बरा होऊ शकतो, तो कोणताही उपाय करावा, असे तिचे म्हणणे. तिचे समाधान व्हावे म्हणून मी सुचवले, की नारळीकरांच्या कोल्हापूरच्या घरी ही पूजा करता येईल, तिथले नातेवाइक अशा पूजा करतात. आता जयंत धर्मसंकटात पडला. त्याने तात्यासाहेबांना विचारले. ते शांतपणे म्हणाले, ‘आपण लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोन पाळायला सांगतो आणि आपणच असे अवैज्ञानिक उपाय करायचे, हे योग्य नाही.’ मलाही ते पटले. फलज्योतिष सांगणाऱ्या व्यक्तींकडे दुर्लक्ष केले. काही दिवसांनी पुण्याहून मामेभाऊ आला, त्याने एका पूजेचा नारळ व फुले आणली होती. ते सामान माझ्या हस्ते समुद्रात सोडायचे होते. मी त्याला सांगितले, ‘आम्ही असे उपाय करीत नाही. केवळ तुझ्या समाधानासाठी आपण आत्ता हे जवळच्या समुद्रात सोडू; पण असले उपाय पुन्हा सांगू नका.’ मी लवकर बरे व्हावे हे जसे माझ्या माहेरच्या लोकांना वाटत होते, तसे सासरच्या लोकांना वाटत नव्हते का? निश्चित तसे वाटत होते. तात्यासाहेबांनी त्या वेळी त्यांचे एक महिन्याचे पेन्शन, सुमारे ११०० रुपये, एका चेकने गरीब कॅन्सर पेशंटना मदत करणाऱ्या सेवाभावी संस्थेला दिले, ते मी बरी व्हावे या सदिच्छेनेच. ती सदिच्छा कशी फलद्रूप होऊ शकेल, यासाठी लोकांचे तर्क मात्र वेगवेगळे होते.
माझे वय होते ४३, मुलींची वये होती, गीता १६, गिरीजा १४ आणि लीलावती पाच वर्षे अशी. मला आणखी १५-२० वर्षांचे आयुष्य मिळाले, तर बरे होईल, मुली जबाबदार झालेल्या असतील, असे वाटत होते. घरचे सगळे लोक अगदी हादरून गेले होते. सन १९७७-७८मध्ये माझी नागपूरची मावशी लीला ठाकूर हिचे असेच ऑपरेशन झाले होते. वर्षभरात तिचा कॅन्सर लिव्हरपर्यंत पोहोचला आणि तिचे १९८०मध्ये निधन झाले. तिची नुकतीच पन्नाशी झाली होती. हा ताजा इतिहास सर्वांच्या लक्षात होता. तसाही कॅन्सर जीवघेणा असतो, हे माहीत होते, तरी आता काही जमेच्या बाजू होत्या. आम्ही मुंबईत राहत होतो आणि सगळ्या उपलब्ध वैद्यकीय उपायांचा फायदा घेता येत होता.
एकदा माझी वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी मैत्रीण भेटली, तिला माझा आजार समजला होता. ‘हे कसं तुला झालं बाई! तुझ्या एवढ्या हुशार आणि सज्जन नवऱ्यावर केवढी ही आफत!’ आजारी मी आणि सहानुभूती माझ्या नवऱ्याला! ती मैत्रीण चांगलीच होती; पण मनात आलेला विचार असा लगेच उघड करण्यातला विनोद मला जाणवला, तिचा राग नाही आला.माझी ‘टीआयएफआर’मध्ये राहणारी एक मैत्रीण कमला ही होमिओपॅथीची औषधे देत असे. माझ्या मुलींना आणि सासू-सासऱ्यांना तिच्या औषधांनी अनेकदा गुण आला होता. ऑपरेशननंतर काही दिवसांनी मी तिच्याकडे गेले. ती म्हणाली, की माझ्या आजाराबद्दल तिला ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशीच समजले; कारण माझ्या सासूबाई सकाळी तिच्याकडे गेल्या व म्हणाल्या, ‘मंगलाला कॅन्सर झालाय. आता आमचं कसं होणार, याची मला फार काळजी वाटतेय. मला बरं वाटावं म्हणून माझ्यासाठी औषध द्या.’ मी कमलाला विचारले, ‘होमिओपॅथीमध्ये कॅन्सरसाठी औषध आहे का?’ ती म्हणाली, ‘तशी औषधे सांगितलेली आहेत; पण होमिओपॅथीच्या औषधांनी अनेकदा आजार थोडा वाढतो, मग बरा होतो. तुझ्या एवढ्या गंभीर आजाराबाबत मला तो धोका पत्करायचा नाही. मी तुला कॅन्सरसाठी औषध देणार नाही.’ कमलाचा तिच्या शास्त्राबद्दल विश्वास आणि प्रामाणिकपणा, दोन्ही लक्षात राहिले.
केमोथेरपीचा शरीरावर फार परिणाम होतो, रक्तातील लाल व पांढऱ्या पेशी कमी होतात, हे ऐकले होते. अशक्तपणा येतो. पुढच्या केमोआधी रक्त भरून आले नाही, तर ती केमो देता येता नाही, पुढे ढकलावी लागते, म्हणून पेशंटला पौष्टिक अन्न दिले पाहिजे, हे समजले होते. माझी आई डॉक्टर असली, तरी तिचा जास्त अनुभव गरोदर स्त्री आणि बाळ-बाळंतीण यांचे आरोग्य सांभाळण्याचा होता. तिने मला पौष्टिक अन्न म्हणून केमोच्या दुसऱ्या दिवशी डिंकाचे लाडू दिले आणि माझे पोट बिघडले. केमोमधील औषधांचे पचनसंस्थेवर परिणाम होतात व ती एक-दोन दिवस चांगलीच बिघडलेली असते. त्या वेळी सरबत, नारळपाणी, ताक अशी पेये; त्यानंतर प्रथम मऊ भात, खिचडी अशा क्रमाने अन्नसेवन करावे. नंतर पचेल आणि रुचेल ते पौष्टिक अन्न खावे, हे मी अनुभवाने शिकले.
उपचार पूर्ण झाले. केमोची १२ इंजेक्शन झाली. मळमळणे आणि क्वचित उलटी, अशक्तपणा यांपेक्षा फार त्रास नव्हता. एक दिवस पूर्ण विश्रांतीची गरज असे. मी प्रत्येक केमोला नेव्हीनगरहून दादरला माहेरी जात असे. काकू आणि सुहासच्या देखरेखीखाली विश्रांती घेणे सुलभ होते. जवळच्या डॉ. श्रीखंडे यांच्या क्लिनिकमध्ये अनेकदा इंजेक्शन घेत असे. उपचार पूर्ण झाले, त्यानंतर चेकअपच्या वेळी डॉ. देसाई म्हणाले, ‘आता तुम्ही कॅन्सरला विसरून जा. त्याचा विचार करू नका. तुम्ही फ्री झालात गणिताचा अभ्यास करायला आणि तुमचे सगळे उद्योग करायला.’ पण, तसे व्हायचे नव्हते.
आम्ही १९८८मध्ये पॅरिस व केम्ब्रिजचा दोन महिने प्रवास करून आलो. परतल्यावर ऑगस्टमध्ये मला गळ्याच्या डाव्या बाजूला खाली, अन्ननलिकेवर हाताला दोन-तीन लहान गाठी जाणवल्या. त्यांचा गंभीरपणा जाणून लगेच मी ‘टीएमएच’मध्ये दाखवायला गेले. डॉ देसाईंच्या सहायकाने त्या लोकल भूल देऊन काढल्या व तपासायला दिल्या. त्या कॅन्सरग्रस्त होत्या. पुन्हा डॉ. देसाईंची भेट झाली, तेव्हा मी आठवण करून दिली, की त्यांनी मला कॅन्सरला विसरून जायला सांगितले होते. एवढा मोठा सर्जन खाली मान घालून म्हणाला, ‘सॉरी दॅट, अवर सायन्स इज नॉट एक्झॅक्ट लाइक युवर्स.’ मी मात्र धडा शिकले, की हा रोग फार फसवा आहे, अनेक दिवस लपून राहू शकतो आणि आपले गुणधर्म किंवा रूप बदलू शकतो. पाश्चात्य वैद्यकीय पद्धतीला त्यावर पूर्ण यश मिळवता येत नसेल, तर आपल्याला पटणाऱ्या इतर औषधांचाही प्रयोग करावा, या मतावर मी आले.
– क्रमशः भाग पहिला…
लेखिका : सुश्री मंगला नारळीकर
संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आपण जेवढी बडबड लोकांशी दिवसभर करतो ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त मनातल्या मनात करतो..
बघा हं…
(सकाळचा अलार्म झाल्यावर)
यार्रर्रऽऽऽ झाली लगेच सकाळ..
आत्ता तर डोळा लागला होता..
(ब्रश करताना)
काय भाजी बनवू आता..?
(गॅस जवळ आल्यावर)
एवढीच झाली भाजी…! पोरं खातील की नाही देव जाणे…
(आंघोळीला जाताना)
कोणता ड्रेस घालू याऽऽऽऽर… सापडत नाही एकही जागेवर… निळ्यानी गरम होईल.. काळा कालच घातला.. पांढरा पावसाने खराब होईल… जाऊ दे पिवळा अडकवते… (त्यात एखादा कपडा अंगावर पडतो… तेव्हा कपड्यांनाही आपण बोलतो..)
या… या.. आता माझ्या अंगावर, पडा एकदाचे.. नाही, या ना या.. कितीही आवरा… पुन्हा तेच!
(घरातून निघताना)
×××ला, काय घड्याळ पळतंय… कितीही लवकर उठा, तीच बोंब…
(रेडिओ बंद करताना, भीमसेन जोशींचा अभंग चालू असतो)
पंडितजी, तुम्ही कसलं भारी गाताय! पण माफ करा, मला जावं लागेल आता.. सात वाजलेत..
(गाडी चालवताना – एखादा ओव्हरटेक करत असेल तर..)
“नाही, ये ना ये… घाल माझ्या अंगावर एकदाचा… तूच राहिला होतास.. कुठं झेंडे गाडायचेत देव जाणे…. तूही यमसदनी जा आणि मलाही ने….
(खूपजण बॅक मिरर मधून मागे बघत असतात…. तेव्हा)
अरे बाबा काय बघतोस मागे? दोन दोन पोरांची आई आहे मी… चल नीघ पुढं…
(शाळेत पोचल्यावर)
हुऽऽऽऽऽऽश्…. झालं एकदाचं टाईममधे इन.. झालं… देव पावला..
(लिफ्ट बंद असेल तर)
नाही बरोबर आहे देवा…. माझ्या वेळीच तू लिफ्ट बंद करणार… घे अजून काबाडकष्ट करुन घे माझ्याकडून… हाडं मोडून जाऊ देत माझी…
(जेवताना)
किती लवकर ब्रेक संपतो… भारत सरकारने निदान जेवायला तरी नीट वेळ द्यावा..
(दुपारी पाठ टेकवताना)
×××ला कंबरडं मोडतं का काय देव जाणे एखादं दिवशी…. टेकली एकदाची पाठ बाबा….. देवा..
(चहाच्या वेळी)
कोणी एखादा कप चहा करुन देईल तर शपथ….. वॉकिंग करावं लागेल.. ढिगभर वजन वाढतंय… या वजनाचं एक काय करावं.. देव जाणे…
(वॉक करताना)
आताच फोन उरकून घ्यावेत, वॉकिंग टाईम पण लवकर संपतो…..
एखादी बाई फास्ट वॉक करत असेल तर..
नाही जा अजून जोरात, करा वॉकिंग, मला काही फरक पडत नाही… कुणाकुणाला माधुरी दीक्षित बनायचंय? बना.. मला काही फरक पडत नाही..
(संध्याकाळी स्वयंपाक करताना)
एखाद्या दिवशी पण कुणी म्हणत नाही..
आज काऽऽऽऽऽऽऽही करु नको..
अजिबात भूक नाही…. एवढी भूक लागतेच कशी माणसाला?
(किचन आवरताना)
नाही आवरतेना… मीच आवरते… सगळं मीच करते…. कुण्णी काही करु नका.. बसा सगळे सोफावर….. सिंहासन आणून देऊ का…??
(झोपताना)
आता कुणीही माझ्या खोलीत टपकू नका तासभर….. जरा बघू द्या मोबाईल मला.. इतके मेसेज येतात, एक धड वाचून होत नाही….
(दुसऱ्याचे स्टेटस बघून)
यांना बरा भटकायला वेळ मिळतो.. इथं मला मरायला फुरसत नाही….
काय बाबा, हल्ली तर कुणी काही पण कपडे घालतं….
(झोप आली असताना)
झोपा बाबा आता…. पुन्हा पाचला उठायचं आहे….. सुट्टी नाहीये उद्या… परिक्षा चालू आहेत, वेळेच्या आधी तडमडावं लागेल..
(आणि मध्यरात्री जाग आल्यावर)
बापरे, तीन वाजले…? दोन तासात उठायचंय… झोपा पटकन् थोडा वेळ..
……..
लेखक : अज्ञात.
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
मो – 9421053591
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
जगातल्या तमाम लहान मोठ्या पोरांच्या आयांच गणित हे कच्चं असतं हे माझं ठाम मत आहे…मग ही आई ग्रामीण भागातील शेतकरी असो नाहीतर कॉर्पोरेट जगात मोठ्या हुद्द्यावर काम करणारी आई असो…दोघीही गणितात कच्च्या असतात हे मी सबळ पुराव्यानिशी सिध्द करू शकतो…
आता बघा परवाची गोष्ट…आमच्याचं घरातील हो…ही म्हाळसा एवढी इंजिनिअर झाली पण गणित कच्चं… परवा माझं बांगडू म्हणजे माझी कार्टी हो हॉस्टेलवर जायला निघाली… म्हाळसाने तिच्यासाठी सुक्यामेव्याचे पौष्टिक लाडू करून ठेवले होते …तो डबा तिच्या बॅगेत ठेवत ती पोरीला म्हणाली …” रोज एक लाडू सकाळी संपवायचाचं आहे, प्रत्येक दिवसाचा एक असे मोजून आठ लाडू दिलेत, ते रोज खाल्ले गेले पाहिजेत… ”
पोरगी तिचं आवरता आवरता फक्त ‘हो हो’ म्हणत होती…मी आपलं सहज लाडू कसे आहेत हे बघायला पोरीच्या बॅगेतला तो डबा बाहेर काढून उघडला तर त्या डब्यात जवळपास बारा तेरा लाडू होते…आता ‘मोजून आठ लाडू दिलेत’ असं म्हणून डब्यात बारा तेरा लाडू कसे?…आता मला सांगा आहे की नाही म्हाळसाईचं गणित कच्चं…?
अजून एक किस्सा सांगतो… आमच्या सोसायटीत एक आत्राप कार्ट बागेत खेळत होतं… त्याचा नुसता उधम चालला होता…IT मध्ये उच्च पदावर काम करणारी त्याची आई ऑफिसातून नुकतीच सोसायटीत आली होती…पोराला खेळताना बघून ती थबकली…आई पोराची गळाभेट झाली, मग जरावेळ पप्प्यापुप्प्या, शोन्यामोन्या, लाडेगोडे वगैरे झाले अन क्षणात ते पोरगं पुन्हा उच्छाद मांडायला पसार झाले आणि त्याच्या मागे ही आई उगाचंच आरडाओरडा करत त्याच्या मागे मागे गेली…’हे नको करू ते नको करू…असं नको करू, तसं नको करू’…अशा तिच्या हजार सूचना सुरू होत्या पण पोरगं काय ऐकेना… मग त्या पोराच्या आईने शेवटचं हत्यार काढलं…
” रोहन आता तू माझं ऐकलं नाहीतर तुला दोन सटके वाजवली हां…” त्या आईने दम भरला… बहुदा त्या पोराला आईच्या कच्च्या गणिताची कल्पना असावी…ते काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हतं…आता फटाके वाजलेले बघायला मिळणार म्हणून मी ही थबकलो, …पण ते पोरगं स्वतःच्याच धुंदीत मस्त खेळत होतं आणि इकडे त्याच्या आईने ‘ तू ऐकलं नाहीतर तुला चार सटके वाजवील’ हे वाक्य दहा बारा वेळा म्हंटल, एकदा हातही वर उचलला पण एक साधा सिंगल सटका काही वाजवला नाही…बघा आहे की नाही आईचं गणित कच्चं?…
अशा रोजच्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जाणवतं की आईचं गणित हे कच्चंच असतं…
“डब्यात दोन पोळ्या, भाजी, वरण भात दिलाय…चटणीही आहे, वेळेत डबा खाऊन घे ” असे आई म्हणत असताना कॉलेजला जाणाऱ्या पोराच्या डब्यात तीन पोळ्या कशा असतात यावरूनच कळतं त्या आईच गणित कच्चं असतं…
” तुझ्या पर्स मध्ये दोन हजार ठेवलेत ” कॉलेजात जाणाऱ्या पोरीला असे एक आई म्हणतं असताना पर्स मध्ये पाचशेची एक नोट जास्त का निघते यावरून कळतं आईचं गणित कच्चं असतं…
” सकाळी एकदाचं उठविल, पुन्हा उठवणार नाही तुला कॉलेजला जायला उशीर झाला तू जबाबदार ” रात्री झोपायला जाताना अशी तंबी देणारी आई सकाळी दहा वेळा पोराला उठवायला जाते तेंव्हा कळतं आईच गणित कच्चं असतं…
पोरीला शॉपिंगला नेताना ” पाच हजाराच्या वर एक रुपया देणार नाही…” अशी धमकी देणारी आई जेंव्हा पोरीवर दहा हजार उधळून घरी येते तेंव्हा कळतं आईचं गणितं खूपच कच्चं आहे…
” भूक नाही म्हणजे काय?…चल दोन पराठे खाऊन घे…” अशी दमदाटी करून दोन पराठे खायला घालून पुन्हा तिसरा पराठा बळेबळेचं वाढताना ” छोटे छोटेचं आहेत खाऊन घे गपचूप ” अशी बतावणी करते ना त्यावेळी त्या पराठ्याच्या आकारावरून कळतं आईचं गणितंचं नाही तर भूमितीही कच्चं आहे…
सकाळी शाळेत गेलेलं पोरगं रोज बरोबर अकराच्या ठोक्याला स्कुलबस मधुन घरी येतं हे माहीत असूनही ती आई दहा वाजल्यापासून बाल्कनीत चार चकरा मारते ना तेंव्हा कळतं आईचं गणित कच्चं आहे…
” जास्त आवाज केला तर अशा उलट्या हाताच्या चार झापडी ठेऊन देईल ना…” असं म्हणून एकही झापड न मारणारी आई जेंव्हा चुकून रागाने दोन चापटी पोराच्या पाठीवर मारते अन मग स्वतःच डोळ्यातून दोनशे अश्रू गाळते ना तेंव्हा कळतं आईच्या गणिताची अवस्था फारच बिकट आहे…
जगाच्या पाठीवर कोठेही जा आईचं गणित कायम कच्चचं असतं पण त्याचं आईचं प्रेम, माया, ममत्व हे मात्र अगणित असतं…ते मात्र पक्कं असतं…
जगातील सर्व मातांना समर्पित …
संग्रहिका : मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ चालणे म्हणजे दुसरे हृदय… ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले☆
आपल्या पायाच्या पोटरीच्या स्नायूंना जर आपले ” दुसरे हृदय ” म्हटले तर ती अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही.
सर्वांना हृदयाचे कार्य काय असते ते ठाऊक असेलच….. हृदय म्हणजे शरीरातील एक पंप आहे. हा पंप रक्ताला पुढे पुढे ढकलत राहतो आणि त्यामुळे रक्त शरीरात धमण्या आणि नीला याच्यातून गोल गोल फिरत राहते, ते एका ठिकाणी साचून राहत नाही.
पण शरीरात आणखीही एक पंप कार्यरत असतो. होय. खर आहे. आपले पोटरीचे स्नायू हेच आपले दुसरे हृदय आहे… हृदयाचे काम काय तर रक्त वाहिन्यांच्या जाळ्यातून सतत वाहते ठेवणे. यालाच रक्ताभिसरण असे म्हणतात. रक्त असे गोल गोल सतत वाहत ठेवणे अत्यंत जरुरी आहे. तसे न झाल्यास आणि जर रक्त एकाच ठिकाणी साचून राहिले, तर शरीरातील अवयवांना रक्त पुरवठा होणार नाही आणि रक्ताच्या गुठळ्या बनून त्या प्राणघातक ठरू शकतात. हृदयाला शरीरात रक्त फिरते ठेवण्यास पायाच्या पोटरीचे स्नायू मदत करतात. जेव्हा आपण चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात आणि स्नायूतील रक्तवाहिन्यांमध्ये असलेले रक्त हृदयाच्या दिशेने ढकलून दिले जाते. निसर्गाने आपल्या शरीराची रचनाच तशी केलेली आहे.
पायाच्या पोटरीमधील रक्त वाहिन्या ( नीला ) या एका प्रकारे रक्ताचा साठा करण्याचे काम करतात.
त्यांना ” मसल विनस सायनस असे ” म्हणतात. ज्यावेळी पायाचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी पायात साठलेले रक्त नीलांमधून वर, म्हणजे हृदयाच्या दिशेने ढकलले जाते. या पायांच्या रक्त वाहिन्यामध्ये विशेष प्रकारच्या झडपा असतात. या झडपा रक्त वाहण्याची दिशा ठरवितात. या झडपा, रक्ताला पायाकडून हृदयाकडे जाऊ देतात, परंतु हृदयाकडून पायाकडे जाऊ देत नाहीत. आपण उभे असताना गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे रक्त हे खालच्या दिशेनेच जाण्याचा प्रयत्न करणार हे साहजिकच आहे. या झडपा, गुरुत्वाकर्षणामुळे रक्त पायात साचू देत नाहीत आणि रक्ताला हृदयाच्या दिशेने जाण्यास भाग पाडतात. आपण जेव्हा चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात व हृदयास रक्ताभिसरण करण्यास मदत करतात.
घोट्याखालचा जो पाय असतो त्यात देखिल काही प्रमाणात रक्ताचा साठा केला जातो. आपण ज्यावेळी चालतो, त्यावेळी सर्वप्रथम तळपायातील स्नायू आकुंचन पावल्याने तेथील रक्त वर हृदयाच्या दिशेने ढकलले जाते, नंतर जेव्हा पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी सर्व रक्त गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने आणखी पुढे ढकलले जाते आणि हृदयापर्यत पोहोचते. रक्त वाहिण्यातील झडपा रक्ताला खाली येण्यापासून रोकतात. आपण एकाच ठिकाणी खूप वेळ स्तब्ध बसून राहिलो ( विमानात, कारमध्ये, खुर्चीत बरेच तास ) तर पोटरीचे स्नायू आकुंचन पावू शकत नाहीत. रक्त पायातच साचून राहते आणि रक्ताच्या गुठळ्या (DVT, Deep Vein Thrombosis) होण्याची शक्यता वाढते. म्हणून चालणे व पळणे किती महत्त्वाचे आहे ते कळते.
एखादा रुग्ण खूप दिवस अंथरुणात खिळून राहिला तर त्याला DVT होऊ शकते. याचा अर्थ त्याच्या पायाच्या रक्त वाहिन्यामध्ये रक्ताच्या गाठी होतात. त्यामुळे पायाच्या पोटऱ्या दुखतात, तसेच सूज देखिल येते. अश्या प्रकारच्या रक्ताच्या गाठी पायातून निसटून फुप्फुसात जाऊन फसू शकतात, ज्याने जीवाला धोका उद्भवू शकतो.
जर पोटरीतील झडपा कोणत्याही कारणाने खराब झाल्या तरी देखील पाय दुखू शकतात. झडपा खराब झाल्या की रक्त पायात साचून राहते. पाय जड होणे, थकवा, पाय ठसठसणे, घोट्यात सूज, फुगलेल्या पायाच्या नसा, पायात अचानक चमक येवून दुखणे, खाज येणे, चमडीचा रंग बदलणे, पायात बरी न होणारी जखम होणे, इत्यादी त्रास होऊ शकतो.
थोडक्यात काय –- हे सगळे त्रास टाळायचे असतील तर …. चालत रहा, शक्य असल्यास धावत रहा.
निरोगी आणि सुदृढ रहा.
संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “कपाळावर बुक्का लावलाय तो पुसून टाका”! ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆
तिरुपतीच्या देवळात विद्वान ब्राह्मण श्रीनाथशास्त्री नित्यनेमानं रोज विष्णूसहस्त्रनामाचं पठण करीत बसत असत. शास्त्रीबुवा अत्यंत गरीब होते.घरात अठरा विश्व दारिद्र्य नांदत होतं. मुलांच्या अंगावरचे कपडे फाटलेले असत.शास्त्रीबुवांची पतिव्रता पत्नी ठिकठिकाणी विरलेल्या,फाटलेल्या लुगडयाला गाठी मारून नेसायची.रोजचं दारिद्र्य ते कसंबसं सहन करायचे.पण सणवार आले, दिवाळी आली की दारिद्रयाचे हे कांटे त्याना अधिकच रक्तबंबाळ करू लागायचे !आस-पास,शेजारी-पाजारी दिवाळीची रोषणाई व्हायची. घरा-घरातली बायका-मुलं को-या कपडयांत वावरायची.पण शास्त्रीबुवांची बायको-मुलं मात्र फाटक्या कपडयात हिंडायची ! संस्कारित असल्यामुळे ती आपल्या पित्याला दोष देत नसत.पण त्यांच्या मूक नजरेतील आर्तता श्रीनाथशास्त्रींच्या हृदयाला पिळवटून,भेदून जात असे. त्यांची पत्नीही त्याना एका शब्दानं कधी बोलत नसे.पण आपल्या देहावर असलेल्या लुगडयाच्या गाठीकडे ती अतीव दयनीयतेनं पहात असे.त्यावेळीही शास्त्रीबुवाना अत्यंत अपराध्यासारखं होई.
आजचा दिवसही सणाचा,दिवाळीचा होता !
घरातल्या दारिद्र्याच्या दर्शनाला कंटाळून पहाटेपासूनच श्रीनाथशास्त्री तिरुपतीच्या मूर्तीसमोर बसून विष्णूसहस्त्रनामाचं एक एक नाम वाचत होते. वाचता वाचता हळू हळू त्यांचा कंठ दाटून आला.तिन्हीसांज व्हायला आली तरी पुढयातल्या पाटावर फक्त दोन तीन मूठ तांदूळ जमा झाले होते .मुलं सकाळपासून उपाशी होती.आणि रात्रीच्या जेवणासाठी हे जमलेले तांदूळ कुणाच्याही दाती-ओठी लागण्यासारखे मुळीच नव्हते.
शास्त्रीबुवांच्या मनात विचार आला,’इतकी वर्षं आपण उपाशीपोटीसुद्धा परमेश्वराच्या नामस्मरणात कधी ना खंड पडू दिला,ना कधीही आपलं चित्त विचलीत होऊ दिलं ! पण आज अस्वस्थ का वाटतंय ? परमेश्वर दयाळू असतो,असं म्हणतात.मग त्याला आपली परिस्थिती का कळू नये ?आपल्यावर दया दाखवावी, असं का वाटू नये ?की परमेश्वर दयाळू आहे ही अफवाच आहे ?होय.तसंच असलं पाहिजे.तसं नसतं तर अनेक वर्षं आपणास एवढे हलाखीचे दिवस पहावे लागले नसते.’
विचार करता करता शास्त्रीबुवांचे डोळे भरून आले.
पुढ्यातल्या पोथीवर अश्रुंचे थेंब टपटप पडत होते.त्यातला एक अश्रू पोथीतील एका शब्दावर नेमका पडला ! शास्त्रीबुवांनी डोळ्यातील पाण्याच्या पडद्याआडून त्या शब्दाकडे निरखून पाहिलं.तो शब्द होता ”दयाघन” !
त्या शब्दाकडे बघून श्रीनाथशास्त्री उपहासानं हसले.
जवळच एक कोळश्याचा तुकडा पडला होता.तो त्यांनी उचलला आणि त्या ”दयाघन” शब्दावर फुली मारली !
त्याचवेळी श्रीनाथशास्त्रींच्या घरी कोणती घटना घडत होती, याची त्यांना सूतरामही कल्पना नव्हती.
त्या तिन्हीसांजेला श्रीनाथशास्त्रींच्या घरासमोर डोक्यास काठेवाडी पद्धतीची पगडी बांधलेला,सतेज चेह-याचा तरूण येऊन उभा राहिला होता. त्यानं आपल्यासमवेत आठ-दहा बैलगाड्या भरभरून सामान आणलं होतं. ते सर्व सामान त्यानं शास्त्रीबुवांच्या घरासमोर उतरवलं. शास्त्रीबुवांच्या पत्नीजवळ त्यानं एक मखमली कापडाची थैली दिली.त्या थैलीत सुवर्णमुद्रा होत्या.निघताना त्या तरुणानं शास्त्रीबुवांच्या पत्नीजवळ कसलासा निरोप दिला.
श्रीनाथशास्त्री अजून तिरुपतीच्या देवळातच बसलेले होते. अश्रूंनी पुढ्यातील पोथी भिजत होती.
इतक्यात त्यांच्या डोळ्यांसमोर नव्या-को-या कपड्यांतील त्यांची मुलं येऊन उभी राहिलेली दिसली.शास्त्रीबुवांना आश्चर्यच वाटलं. आपल्या मुलांनी हे नवेकोरे कपडे कुठून आणले असतील ? ह्या प्रश्नानं ते साशंक होत,
मुलांच्या अंगावर ओरडले,
” काय रे ! कोणी दिले हे कपडे ? कुठून चोरून-बिरून आणलेत की काय ?”
दरिद्री माणसाला वैभव नेहमी पाप केल्याशिवाय मिळत नाही,असंच वाटत असतं ; त्यामुळे चोरी केल्याशिवाय आपली मुलं नवे कपडे घालणारच नाहीत,असं क्षणभर का होईना,पण गृहीत धरल्यामुळं श्रीनाथशास्त्री ओरडले होते. पण मुलं खुशीत असल्यामुळे पित्याच्या ओरडण्याला न घाबरता ती उत्तरली,
” बाबा,इथे काय बसून राहिलात ? लवकर घरी चला !
आपल्या घरी खूप मज्जा मज्जा झालीय !”
श्रीनाथशास्त्री घाईघाईनं निघाले.
घरी येऊन पहातात तर काय? घरभर दिवे तेजाळत होते.सर्वत्र उदबत्ती-धुपाचा सुवास दरवळत होता.एवढे दिवे लावायला तेल आलं कुठून ?विचार करत असतानाच, नवं कोरं रेशमी लुगडं नेसलेली त्यांची पत्नी त्यांच्या स्वागताला आली. सुवर्णालंकारांनी ती सजली होती.शास्त्रीबुवा तिच्याकडे पहातच राहिले. त्यांनी विस्फारित नजरेनंच तिला विचारलं,”एवढं सगळं वैभव अचानक आलं कोठून ?”
” काठेवाडहून बाराबंदी घातलेला एक व्यापारी आला होता.त्यानं आपल्या घराचा पत्ता विचारला.आणि आपल्याबरोबर आणलेलं हे सगळं सामान तो ठेवून गेला.जाताना तुम्हाला एक निरोप देऊन गेलाय.”
शास्त्रीबुवांच्या पत्नीनं जे घडलं ते सांगितलं.
” काय निरोप दिलाय ?”
श्रीनाथशास्त्रींनी अत्यंत उत्कंठतेनं विचारलं.
” त्यानं निरोप दिलाय की..
‘शास्त्रीबुवांना म्हणावं पोथी वाचता वाचता कोळशानं माझ्या कपाळावर त्यांनी जो बुक्का लावलाय तो पुसून टाका !’…
कुणाला बुक्का लावलाय तुम्ही ?”
पत्नीनं गोंधळून विचारलं.
क्षणार्धात श्रीनाथशास्त्री सदगदीत झाले.
पत्नीच्या प्रश्नाचं उत्तर न देता,कमालीच्या घाईघाईनं ते देवळात परत आले. त्यांनी पाटावरची पोथी उचलून घट्ट हृदयाशी धरली.हळूवार उघडली.आणि पानावरच्या ”दयाघन” या शब्दावर मारलेली कोळशाची फुली त्यांनी अलगद पुसून टाकली.