मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बडी बेंच (Buddy Bench)… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ बडी बेंच (Buddy Bench)… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

माझ्या घराजवळ पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा आहे. त्या शाळेच्या पटांगणावर मी कधी कधी चालायला जाते. त्या पटांगणात निरागसतेच्या लहरी पसरलेल्या असतात, म्हणून की काय कोण जाणे, पण तिथे गेल्यावर अगदी प्रसन्न वाटतं.

काल त्या शाळेच्या पटांगणात एक बेंच दिसला. त्यावरचा मजकूर बघून माझे पाय थबकले.  “Buddy Bench” असे शब्द लिहिले होते. त्याच्या खाली अजून दोन ओळी होत्या. हा काय प्रकार आहे असा विचार करत मी उभी असताना एक नऊ वर्षाची, पोनिटेल उडवत पळणारी चुणचुणीत मुलगी दिसली.

मी तिला विचारलं, “ हा नवा आहे का ग बेंच?”

ती  म्हणाली, “ नाही. ‘बडी बेंच’ नवा नाही. मागच्या बाजूला होता तो फक्त पुढे आणलाय.”

‘बडी बेंच’?माझी उत्सुकता वाढली. buddy म्हणजे मित्र पण buddy bench म्हणजे नक्की काय असावं?

माझा प्रश्नार्थक चेहरा बघून ती म्हणाली, “आम्हाला जर कधी एकटं वाटत असेल, वाईट वाटत असेल, कुणी खेळायला घेत नसेल ना, तर मधल्या सुट्टीत या बेंचवर जाऊन बसायचं. मग इतर मुलांना समजतं आणि कुणीतरी येतं बोलायला, खेळात घ्यायला, मैत्री करायला आणि मग एकदम बरं वाटतं,” तिनं उलगडा केला.

“अगबाई! हो का?” मी चकित होऊन म्हणाले.  किती सुरेख कल्पना आहे!  केवढाली ओझी असतात या लहान जिवांच्या पाठीवर. अभ्यास, परीक्षा, रुसवे, फुगवे,एकटेपणा आणि त्या चिमुकल्या जगातले इतर अनेक ताण-तणाव!

“पण कुणी आलंच नाही बोलायला तर?” आयुष्यातल्या अनुभवाने मला विचारण्यास भाग पाडले.

तिनं आश्चर्याने माझ्याकडे बघत कपाळावरच्या बटा उलट्या हाताने मागे केल्या व ती म्हणाली, “का नाही येणार?एकजण तरी येतंच. कारण त्यासाठीच तर आहे ना हा बेंच.” या बाईला इतके साधे कसे कळत नाही, असा भाव तिच्या चेहऱ्यावर होता.

एकटं वाटणं, वाईट वाटणं, राग येणं या नैसर्गिक भावना आहेत. त्या भोळ्याभाबड्या जगातसुद्धा काळज्या असतात. अपेक्षांचं ओझं असतं. एखाद्याला खेळात न घेणं असतं. एखादीला नावं ठेवणं असतं. आई-बाबांकडून रागवून घेणं असतं. आणि त्यावर Buddy Bench हा एक सोपा पर्याय आहे. मला कौतुक वाटलं. 

“किती छान माहिती सांगितलीस ग! तू कधी बसली आहेस बडी बेंचवर?” माझ्या तोंडून गेलंच.

“होऽऽऽ. नवी होते तेव्हा खूप वेळा. त्यानंतर कित्तीऽऽ मैत्रिणी मिळाल्या.” तिच्या मोकळेपणाने मोहित होऊन मी पुढे चालू लागले.

मनात येत राहिलं…फक्त लहान मुलांसाठीच बडी बेंच का? मोठ्यांसाठी का नाही? ऑफिसमधे,डॉक्टरकडे,वकिलाकडे, कॉलेजमधे, परीक्षा गृहात, लग्नाच्या कार्यालयात असे ठिकठिकाणी बडी बेंच ठेवले तर? त्यामुळे अनेक दबलेल्या भावना बाहेर पडून माणसांचं आरोग्य सुधारेल का? जगातील एकटेपणा कमी होईल का? काहीवेळा त्रयस्थापुढे मोकळं होणं सोपं असतं. नाहीतरी थेरपिस्टशी बोलणे आणि काय असते?

कदाचित एखाद्या नव्या आवाजाशी,समदुःखी असणाऱ्याशी, चार पावसाळे जास्त बघितलेल्या व्यक्तीबरोबर मैत्रीचा नवा रेशमी धागा निर्माण होईल. त्यामुळे जड झालेले ओझे थोडेसे हलके होईल. नाही का?

त्या बेंचवर खाली दोन ओळी लिहिल्या होत्या..

चल..बसू, बोलू, गप्पा मारू, विचारू एकमेका काही प्रश्न

उदात्त हेतू  मनी  ठेवूनी होऊ buddy, यार, सखा, मित्र!

लेखिका : सुश्री ज्योती रानडे

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पाऊस वेगवेगळ्या प्रदेशातला…” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “पाऊस वेगवेगळ्या प्रदेशातला…” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

गोव्याचा पाऊस गोव्याच्या दारूसारखा आहे.

जशी गोव्याची दारू भरपूर पितात, पण चढतच नाही.

तसा पाऊस भरपूर पडतो पण  दिसतच नाही.

 

कोल्हापूरचा पाऊस. घरजावयासारखा.

घुसला की मुक्कामच.

राहा म्हणायची पंचाईत आणि

जा म्हणायचीपण पंचाईत…

 

अन मुंबईचा पाऊस

प्रेयसीच्या बापा व भावा सारखा ..

कधी येऊन टपकेल

धो धो आपल्याला धुऊन निघून जाईल सांगता येत नाही.

 

पुण्याचा पाऊस बायकांसारखा.

त्या चिडल्या की धड स्पष्ट बोलत नाहीत.

नुसती दिवसभर पिरपिर चालू .

पाऊस पण धड रपरपा पडत नाही. दिवसभर पिरपिर रिप रिप भुरभुर चालू असते. नुसता वैताग!

 

कोकण चा पाऊस

लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा

एकदा सुरवात झाली की शेवटपर्यंत धो धो धो धो धो धो पडतो …

 

खानदेशातील पाऊस म्हणजे लफडं!

जमलं तर जमलं नाहीतर सारंच  हुकलं !     

 

बेळगावचा पाऊस सात जन्म मिळालेल्या अनुभविक बायको सारखा…!

प्रेमाची रिमझिम, आपुलकीच्या धारा

व वरून वर्षाव करत असतात मायेच्या गारा..

 

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पसारा आवरू या…” – ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “पसारा आवरू या…” – प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

आज स्वयंपाकघर आवरायला काढलं होतं. आवरायच्या आधीच ठरवलं होतं की ज्या गोष्टी गेल्या वर्षभरात लागल्याच नाहीत, वापरल्या गेल्याच नाहीत, त्या सरळ काढून टाकायच्या आणि देऊनच टाकायच्या. अशा बर्‍याच निघाल्या पाहता पाहता. केवढा पसारा. विस्मृतीत गेलेल्या बर्‍याच गोष्टी.

कधीतरी त्या हव्या होत्या, पण वेळेवर कुठे ठेवल्या तेच आठवलं नाही. म्हणून ती वेळ भागवायला लगेच बाजार गाठला.

सगळं उरकल्यावर ती वस्तु सापडली. पण मग काय उपयोग?

आखीव, रेखीव, आटोपतं असं असावं ना सगळंच, असं वाटायला लागलंय हल्ली. माझी आजी म्हणायची दोन लुगडी हवीत. एक अंगावर आणि एक दांडीवर…

आता भांडी ढीगभर, कपडे कपाटातून उतू जाताहेत, खाद्यपदार्थांची रेलचेल. कशाचंच नावीन्य नाही राहिलं.

माझ्या ओळखीतली, नात्यातली, अशी उदाहरणे आहेत.

 पेशंट असलेली, आजारी असलेली, त्यांनी जाण्याआधी आपलं सगळं सामान वाटून टाकलं. काहीजणांनी तर कुणाला काय द्यायचं, ते लिहून ठेवलं. खरंच नवल वाटलं मला. आपण काहीतरी शिकायला हवं, असं वाटून गेलं.

ह्या वस्तूंचा मोह सुटत नाही. शेवटपर्यंत माणसाला खाण्याचा मोह सोडवत नाही.

खाण्याची इच्छा आणि ह्या गोष्टीतली इच्छा संपली की माणूस जाणार, हे समजायला लागतं.

एक ओळखीच्या आजी होत्या, मुलं-बाळं काही नव्हती. एकट्या राहायच्या. एका वाड्यात.

पुतणे वगैरे होते, पण कुणाजवळ गेल्या नाहीत.आपली पेन्शन कुणी घेईल ह्या भितीने लपवून ठेवत असाव्यात.

गेल्या तेव्हा उशीमधे पण पैसे सापडले. जातांना म्हणत होत्या, ‘नवी नऊवार साडी कुणालातरी पिको करायला दिलीय. तिच्याकडेच आहे. आणा म्हणून.’ असंही उदाहरण आहे.

एक ओळखीच्या बाई गेल्या. कॕन्सर झाला होता, पण गेल्या तेव्हा एका वहीत सगळं लिहून ठेवलं होतं.

जी बाई जाईपर्यंत  त्यांची सेवा सुश्रुषा  करत होती, तिला स्वतःची सोन्याची चेन आणि वीस हजार रुपयाचं पाकीट ठेवून गेल्या. मुलींना काय द्यायचं, सुनेला काय द्यायचं सगळं लिहून गेल्या.

साड्या, बाकी सामान कोणत्या अनाथाश्रमाला द्यायच्या ते पण लिहून गेल्या. ह्याला म्हणतात प्लानिंग.

देवही तेवढा वेळ देतो आणि हे लोक पण आपल्याला जायचंय हे मान्य करतात. ह्याला हिंमतच लागते.

नाहीतर आपण एक गोष्ट सोडत नाही हातातून. कायमचा मुक्काम आहे पृथ्वीवर ह्या थाटातच वावरत असतो आपण.

तीन-तीन महिन्यांचा नेट पॕक किती कॉन्फिडन्सने मारुन येतो आपण. नवलच वाटतं माझंच मला.

चार प्रकारचे वेगवेगळे झारे, चार वेगवेगळ्या किसण्या, आलं किसायची, खोबरं किसायची, बटाट्याचा किस करायची जाड अशी.

असं बरंच काही. सामानातलं खोबरं आणल्यावर किसणं होत नाही लवकर.

खूप पाहुणे येतील कधी, म्हणून पंचवीसच्या वर ताटं, वाट्या, पेले. पण पाहुणे येतच नाहीत. आले तरी एक दिवस मुक्काम.

घरी एक नाश्ता आणि एक जेवण बाहेर. घरी जेवणं झाली तरी भांडीवाली बाई सुट्टी मारेल, खूप भांडी पडली तर, म्हणून युज अॕण्ड थ्रो प्लेट्स. कुणालाच घासायला नको.

पाहुणे मुक्काम करत नाहीत सहसा. कारण एक सतरंजी पसरवून सगळे झोपलेत असं होत नाही.

 कुणाचे गुडघे दुखतात, कुणाला कमोड लागतो. तेव्हा प्रत्येकाला  आपआपल्या घरी परतण्याची घाई. घरची बाई पण आग्रह करत नाही कारण तिच्या हातून काम होत नाही.

पाहुणी आलेली बाई मदत करत नाही. सगळ्यांच्या हातात नेऊन द्यावं लागतं. अशा तक्रारी ऐकू येतात.

असं खूप काही आठवत बसतं, पसारा पाहून.

एवढाच पसारा हवा की वरच्याचं बोलावणं आलं, चल म्हणाला की लगेच उठून जाता आलं पाहिजे.

पण तसं होत नाही. दिवसेंदिवस जीव गुंततच जातो. वस्तूंमध्ये, दागिने, पैसा, नाती आणि स्वतःमध्ये पण.

रोज कुणीतरी गेल्याच्या बातम्या येतात. पण तरी नाही.आपण काही सुधारणार नाही.

दरवर्षी घरातला पसारा काढायचा आवरायला. त्याच त्या वस्तु पुन्हा काढायच्या, पुन्हा ठेवायच्या असं चाललेलं असतं आपलं. देऊन टाकलं तरी पुन्हा नवीन आणायचं.

खरंतर जितक्या गरजा कमी, तितका माणूस सुखी …

पण मन ऐकत नाही..

ये मोह मोह के धागे…….

मग त्या धाग्यांचा कोष, मग गुंता, मग गाठ आणि मग पीळ…आणि मग सुंभ जळला तरी पीळ जात नाही.

निसर्गाकडून शिकायला हवं, आपल्या जवळ आहे ते देऊन टाकायचं आणि रितं व्हायचं. फळं, फुलं, सावली, लाकडं सगळं सगळं देण्याच्याच कामाचं.

पण आम्ही नाही शिकत .

थोडक्यात काय तर पसारा करु नये, आटोपशीर ठेवावं सगळं. आणि पसारा करायचाच असेल तर तो करावा दुसऱ्यांच्या मनात.आपल्या चांगल्या आठवणींचा, सहवासाचा, आपल्या दानतीचा. दिसू द्यावा तो आपल्या माघारी. आपण परतीच्या प्रवासाला निघाल्यावर लोकांच्या मनात, डोळ्यात, अश्रुंच्या बांधात.

जातांना आपण मागे बघितलं तर दिसावा खूप पसारा आपल्या माणसांचा, जिव्हाळ्याचा, गोतावळ्याचा.

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गुरुपौर्णिमा… लेखिका :डॉ. युगंधरा रणदिवे ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆  गुरुपौर्णिमा… लेखिका :डॉ. युगंधरा रणदिवे ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

आज सोसायटीच्या हॉलमध्ये “गुरुपौर्णिमा”साजरी करायला लेडीज स्पेशल जमल्या होत्या.

साहजिकच देवांचे फोटो, समई, बॅनर—-सगळं तयार होतं.”गुरुब्रम्हां गुरू विष्णू”म्हणत सुरवात झाली.थोडीफार टिपिकल भाषणं झाली.

आज सगळ्यात जेष्ठ अशा गोखले काकू प्रमुख पाहुण्या म्हणून बोलणार होत्या.सगळ्या सो कॉल्ड मॉडर्न मुली,बायका जरा चुळबुळतच होत्या.

काकू उठल्या, म्हणाल्या, मी आज तुम्हाला माझ्या गुरुबद्दल सांगणार आहे.

माझं लग्न अगदी कांदेपोहे पद्धतीने झालं. कोकणातून इथे मुंबईत आले.माहेरी सर्व कामांची सवय होती,पण इथे चाळीत दोन खोल्यात आठ माणसं ,हे गणित काही पचनी पडत नव्हतं. टॉयलेट घरातच होतं ही जमेची बाजू.पहिल्या दिवसापासून सासूबाई कमी बोलून पण मला निरखून काही सूचना करायच्या.कोकणातला अघळपघळपणा इथे का चालणार नाही हे त्यांनी समजावून सांगितलं. नारळ घालून रसभाज्या करणारी मी,डब्यासाठी कोरडी भाजी करायला शिकले.कोणतेही व्रत वैकल्य त्यांनी लादले नाही.जे पटते,जे झेपते आणि खिशाला परवडते ते करावं असं त्यांचं स्पष्ट मत होतं.त्यांनीच बीएड करायला लावलं, शाळेत नोकरी घ्यायला लावली.बाईने स्वतःच्या पायावर उभे राहिलेच पाहिजे.

माझ्या मिस्टरांना त्या स्वतःच मागे लागून नाटक-सिनेमाची तिकिटं काढायला लावायच्या.त्या काळात पण आम्हाला क्वालिटी टाइम मिळावा हे त्या बघायच्या.

माझे दीर वेगळे झाले,आम्ही दोघे, आमची दोन मुले आणि सासूबाई असेच राहिलो.

चाळीची रिडेवलपमेंट होणार म्हंटल्यावर मीच धाय मोकलून रडले.पण त्या म्हणाल्या,”बदल हे होणारच,कशात गुंतून पडायचं नाही”

नऊवारीतून पाचवारीत आणि पुढे चक्क गाऊन मध्ये माझ्या सासूबाईंचं स्थित्यंतर झालं.केस सुध्दा स्वतःहून छोटे केले,मला त्रास नको म्हणून!

जातानाही प्रसन्नपणे गेल्या.नातसुनेला म्हणाल्या,”ही चांगली सासू होते की नाही,ती परीक्षा तू घे हो.”

परिस्थितीचं भान ठेवा,काटकसर करा पण सतत सर्वांची मनं मारून नाही,पैसे कमवा पण पाय जमिनीवर ठेवा, काळानुसार बदला, जे बदल पचणार नाहीत, त्याबद्दल मोकळेपणी बोला,transparancy महत्वाची.लोकांना हक्क दाखवत,धाक दाखवत बांधून ठेवू नका.प्रेमाने दुसऱ्यापर्यंत पूल बांधा, त्याने त्याच पुलावरून तुमच्याकडे यायचं का नाही हे त्याला ठरवू द्या.एकावेळी तुम्ही सर्वांना खुश नाही ठेवू शकत;पण म्हणून स्वतः खूश होणं विसरू नका.नियमांवर जास्त बोट ठेवलं की वर्मावर लागतं. आपल्या वागणुकीतून दुसऱ्याला आदर्श घालून द्या.पतंगाचा मांजा ढील दिल्यावरच पतंगाला उंच नेऊ शकतो.

नवीन पिढीला टोचून दूषणं देण्यापेक्षा नवीन शिकून घ्यावं. घरात भांडणं होणारच,पण”रात गई बात गई”. एक वेळचे जेवण तरी सर्वांनी एकत्र केले पाहिजे. बाहेरचं frustration, चिडचिड घरात बोलून शांत झाली पाहिजे.प्रत्येकाने आपला दिवस कसा गेला सांगितलं तरी खूप संवाद घडेल.

विश्वास,प्रेम घरात मिळालं तर बाहेरच्या चुकीच्या व्यक्तीकडून फसवणूक होणार नाही.

जेमतेम अक्षरओळख असणाऱ्या माझ्या सासूबाई टॉप कॉलेजातल्या MBA लाही लाजवतील अशा काटेकोर होत्या.त्या माझ्या गुरू,माझी मैत्रीण होत्या.

आज मुद्दाम हे सांगण्याचं कारण की गुरू म्हणजे कोणी फेमस व्यक्ती असायची गरज नसते.तिने सतत बरोबर राहून हात धरून चालवायचीही गरज नसते.ती आपल्या आजूबाजूच्या माणसांमधीलच एक असते.तिला सन्मान, फोटो, गिफ्ट याची अपेक्षा नसते.तिच्यातल्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण झाले,पुढे नेले गेले की बास!

माझ्यातले चांगले माझ्या सुनेपर्यंत पोचवू शकले की माझ्या सासूबाईंना गुरुदक्षिणा मिळेल.

तुम्ही काही यातून घेतलं तर काही प्रमाणात आनंदाची शिंपडणी तुमच्याही घरात होईल

धन्यवाद!

एकमेकांच्या कागाळ्या करणाऱ्या, गॉसिप करत पराचा कावळा करणाऱ्या आणि खोटे फॉरवर्ड असल्याचे मुखवटे घालणाऱ्या आणि कुरघोडी करत राहणाऱ्या ,आम्हा सर्वांसाठी हे अंतर्मुख करणारं होतं, हे नक्की!

लेखिका :डॉ युगंधरा रणदिवे

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ थोडं जगलं पाहिजे… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

☆  थोडं जगलं पाहिजे…  ☆ प्रस्तुती – सुश्री प्रफुल्ला शेणॉय ☆

आयुष्याच्या अल्बममध्ये

आठवणींचे फोटो असतात,

आणखी एक कॉपी काढायला

निगेटिव्हज् मात्र शिल्लक नसतात.

 

गजर तर रोजचाच आहे

आळसाने झोपले पाहिजे,

गोडसर चहाचा घोट घेत

Tom & Jerry पाहिलं पाहिजे.

 

आंघोळ फक्त दहा मिनिटे?

एखाद्या दिवशी तास घ्या,

आरशासमोर स्वतःला

सुंदर म्हणता आलं पाहिजे.

 

भसाडा का असेना

आपल्याच सुरात रमलं पाहिजे,

वेडेवाकडे अंग हलवत

नाचण सुध्दा जमलं पाहिजे.

 

गीतेचा रस्ता योग्यच आहे

पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,

रामायण मालिका नैतिक थोर

“बेवॉच” सुध्दा एन्जॉय करता आली पाहिजे.

 

कधी तरी एकटे

उगाचच फिरले पाहिजे,

तलावाच्या काठावर

उताणे पडले पाहिजे.

 

संध्याकाळी मंदिराबरोबरच

बागेत सुध्दा फिरलं पाहिजे,

“फुलपाखराच्या” सौंदर्याला

कधीतरी भुललं पाहिजे.

 

द्यायला कोणी नसलं

म्हणून काय झालं?

एक गजरा विकत घ्या

ओंजळ भरुन फुलांचा नुसता श्वास घ्या.

 

रात्री झोपताना मात्र

दोन मिनिटे देवाला द्या,

एवढया सुंदर जगण्यासाठी

नुसतं थँक्स तरी म्हणा..!!

प्रस्तुती : सुश्री प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समाधान… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆  समाधान…  ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

बसायला आरामखुर्ची आहे,

हातामध्ये पुस्तक आहे….

डोळ्यावर चष्मा आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

निसर्गामध्ये सौंदर्य आहे,

निळे आकाश, हिरवी झाडी आहे….

सूर्योदय, पाऊस, इंद्रधनुष्य आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

जगामध्ये संगीत आहे,

स्वरांचे कलाकार आहेत…

कानाला सुरांची जाण आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

बागांमध्ये फुले आहेत,

फुलांना सुवास आहे….

तो घ्यायला श्वास आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

साधे चवदार जेवण आहे,

सुमधुर फळे आहेत….

ती चाखायला रसना आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

जवळचे नातेवाईक, मित्र आहेत,

मोबाईल वर संपर्कात आहेत…

कधीतरी भेटत आहेत,

इतके मला पुरेसे आहे !

 

डोक्यावरती छत आहे,

कष्टाचे दोन पैसे आहेत….

दोन वेळा, दोन घास आहेत,

इतके मला पुरेसे आहे !

 

दोन गोड लेकी आहेत,

त्यांच्या क्षेत्रात व्यग्र आहेत,

नित्य आमच्या मनात आहेत,

इतके मला पुरेसे आहे…!!

 

देहामध्ये प्राण आहे,

चालायला त्राण आहे…

शांत झोप लागत आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

याहून आपल्याला काय हवे ?

जगातील चांगले घेण्याचा….

आनंदी, आशावादी राहण्याचा विवेक आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

विधात्याचे स्मरण आहे,

प्रार्थनेत मनःशांती आहे…

परमेश्वराची कृपा आहे,

इतके मला पुरेसे आहे !        

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चंद्रयान प्रक्षेपणानिमित्त… ☆ श्री प्रमोद जोशी ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ चंद्रयान प्रक्षेपणानिमित्त… ☆ श्री प्रमोद जोशी ☆

चंद्र आणखी भारत यांचे,

गुण जुळले छत्तीस!

देव काढतो मुहूर्त त्याचा,

आज दोन पस्तीस!

 

अग्नीपिसारा फुलवित घेईल,

झेप अंतराळात!

आणिक त्याचा धूर खुशीचा,

भरे अंतरंगात!

 

त्रिदेव आता आतुरलेले,

करावया रक्षा!

भेदतील ते सहजपणाने,

पृथ्वीची कक्षा!

 

भारतभूच्या शास्त्रज्ञांची,

मनिषा दुर्दम्य!

दोन वाजूनी पस्तीस होता,

दृश्य दिसे रम्य!

 

रामही म्हणती,”पुष्पकाहुनी,

यान मला हे हवे!

प्राणच होती जिथे शुभेच्छा,

शब्द कशाला नवे!

 

अभिमान वा गर्व वगैरे,

मिळमिळीत वाटे!

आणि उरातून राष्ट्र प्रितीचा,

माज फार दाटे!

 

प्रेयसीचीही वाट मुळी ना,

अशी पाहिली कधी!

उसळी घेतो उरात माझ्या,

फेसाळुन जलधी!

 

काऊंटडाऊन सहन होईना,

जीव होई कापूर!

उत्सुकता तर स्वतःच झाली,

मरणाची आतूर!

 

चंद्र पहातो वाट कधीची,

वेशीवर येऊन!

आणि चांदणे मऊ मखमली,

ओंजळीत घेऊन!

 

© श्री प्रमोद जोशी

देवगड.

9423513604

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “म्हातारपणचा आधार कोण ? ” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “म्हातारपणचा आधार कोण ? ” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

म्हातारपणाचा आधार कोण??? —- मुलगा की मुलगी??

आम्ही सर्वजण मुख्य सभागृहात बसून चर्चा करत होतो, तेव्हा माझ्या बहिणीने मला प्रश्न विचारला, “भाऊ! मला सांगा, माणसाची मुलगी आहे की त्याचा मुलगा त्याच्या म्हातारपणाचा आधार आहे?”

मी म्हणालो- “बहिणी ! हा प्रश्न न विचारलेलेच बरे. कारण काही सुखी होतील, तर काही दुःखी.

म्हणून इतर सर्व लोक आग्रह करू लागले की नाही, ही गोष्ट सविस्तर सांगावी लागेल…

मी म्हणालो तर ऐका… म्हातारपणाचा आधार मुलगा किंवा मुलगी नसून “सून” असते.

मुलगा किंवा मुलगी ही म्हातारपणाची काठी असते असे आपण अनेकदा लोकांकडून ऐकले आहे, म्हणूनच लोक आपल्या आयुष्यात “मुलगा आणि मुलगी” हवेत, जेणेकरून म्हातारपण चांगले पार पडावे.

ही गोष्ट सुद्धा खरी आहे कारण घरात फक्त मुलगाच सून आणतो. सून आल्यानंतर मुलगा आपल्या पत्नीच्या खांद्यावर जवळजवळ सर्व जबाबदारी टाकतो.

आणि मग सून ही सासरच्या म्हातारपणाची काठी बनते.

होय! माझा विश्वास आहे की ती सून आहे जिच्या पाठिंब्याने वृद्ध सासू आणि सासरे आपले आयुष्य चांगले घालवतात.

सुनेला तिच्या सासू आणि सासऱ्यांची संपूर्ण दिनचर्या माहीत असते.

कोण कधी आणि कोणता चहा प्यायचा, काय शिजवायचा, संध्याकाळी नाश्त्याला काय द्यायचे, कोणत्याही परिस्थितीत जेवण रात्री नऊच्या आधी शिजवावे लागते.

सासू-सासरे आजारी पडले, तर सून मनापासून किंवा अनिच्छेने त्यांची काळजी घेते.

सून एक दिवस आजारी पडली किंवा निघून गेली तर सगळं घर हादरून जातं. पण मुलगा पंधरा दिवसांच्या प्रवासाला गेला तरी सुनेच्या भरवशावर घर सुरळीत चालते.

सून नसताना सासू-सासरे यांना कोणीतरी आपली काठी हिसकावून घेतल्यासारखे वाटते. त्याला दुसरे कोणी विचारायचे नव्हते.

कारण मुलाकडे वेळ नाही आणि मुलाला वेळ मिळाला तरी तो काहीच करू शकणार नाही कारण त्याला सकाळपासून रात्रीपर्यंत आई बाबांना काय द्यावे हेच कळत नाही? कारण मुलाचे काही प्रश्न आहेत आणि त्याची जबाबदारी  संपली.

जसे “आई बाबांनी जेवण केले आहे का?” “चहा प्यायला?” “नाश्ता केला?” पण ते काय खातात? कोणता चहा पितात हे शोधण्याचा प्रयत्न कधीच केला नाही? ही जवळपास सगळ्या घरांची गोष्ट आहे.

सासूची मनापासून सेवा करणाऱ्या अशा सून मी बहुतेक पाहिल्या आहेत.. म्हणूनच सून हीच म्हातारपणाची खरी काठी आहे असे मी मानतो.

पण अजून एक गोष्ट खरी आहे की तुम्हाला सुद्धा बुद्धी असायला हवी की सदैव “माझ्या राजा बेटा!” “माझी राणी मुलगी!”  चा जप सोडा. “माझी चांगली सून!” सुद्धा अंतर्भूत केले पाहिजे.

म्हणून, आपल्या सुनेमध्ये फक्त दोष शोधू नका, तिच्या चांगल्या गुणांची प्रशंसा करा.

“दिवसाचा संदेश”

सुनेचा त्याग आणि सेवा ओळखा

मुलगा आणि मुलीच्या आधी सुनेला स्वतःचे समजा

आणि “माझी मुलगी – माझा अभिमान” “माझा मुलगा – माझा अभिमान” म्हणणे थांबवा…

अभिमानाने म्हणा माझी सून, माझा अभिमान…… 

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी आहे आनंदी कावळा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ मी आहे आनंदी कावळा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

एका राज्यात एक कावळा असतो. नेहमी आनंदी , हसत ! कुठल्याच प्रकारचे दु:ख, कष्ट त्याच्या चेह-यावरचा आनंद हिरावून घेवू शकत नसतात. एकदा त्या राज्याच्या राजाला ही बातमी कळते .त्याला खूप आश्चर्य वाटते, हे अशक्य आहे, त्याचे मन खात्री देते. मग तो आपल्या शिपायांना त्या कावळ्याला पकडून आणण्याची आज्ञा देतो . कैदेत ठेवल्यावर कसा आनंदी राहील पठ्ठ्या ! राजा मनोमन आपल्या विचारावर खूश होतो …..  कावळ्याला कैद करून महीना लोटतो तरी तो हसतच ! 

राजा बेचैन होतो. ” प्रधानजी, त्या कावळ्याला दु:खी करण्यासाठी काय करता येईल?” 

” महाराज, आपण त्याला काट्यात टाकू या” प्रधान तत्परतेने उपाय सुचवतो.

लगेच राजाच्या आदेशाप्रमाणे शिपाई त्याला काट्यात टाकतात . तिथेही हा आपला आनंदाने शीळ घालतोय….. 

“महाराज, आपण त्याला तापलेल्या तव्यावर टाकू या” राणी दुसरा मार्ग  सुचवते.

दुस-या दिवशी त्याला तापलेल्या तव्यावर टाकले जाते ,पण कितीही चटके बसले तरी त्याच्या चेह-यावरचे हसू काही मावळत नाही….. 

“ते काही नाही महाराज, आपण त्याला उकळत्या तेलात टाकू ” सेनापती पुढची शिक्षा सुचवतात. . 

दुस-या दिवशी भल्यामोठ्या कढईत तेल उकळवून त्यात त्याला टाकले जाते. तरीही कावळा हसतोच आहे.

राजाला भयंकरच राग येतो. मग तो शेवटचा जालीम उपाय करायचे ठरवतो आणि त्या कावळ्याचे पंखच छाटून टाकतो. पंख छाटलेला कावळा क्षीण हसतो आणि कायमचे डोळे मिटतो …

— लहानपणी ही गोष्ट वाचताना खूप गंमत वाटायची. पण आता तिच्यातले मर्म काय ते कळते. आपण आनंदी आहोत , सुखी आहोत, हसत आहोत ही बाबच् नापसंत असणारे किती ‘राजे’ आपल्या अवतीभोवती असतात ना ! कधी आपले जवळचे आप्त, स्वकीय, तर कधी परकीय. तुम्हाला कोणत्या गोष्टीनी त्रास होईल, कशाने यातना होतील, दु:ख होईल ? या गोष्टींचा विचार करण्यात आपली स्वत:ची शक्ती अकारण खर्ची पाडणारे आणि त्यासाठी  विविध युक्त्या योजून त्या अमलात आणणारे  ‘ प्रधान’, ‘सेनापती’ यांची कमतरता नाही. गंमत म्हणजे या अशा योजना अंमलात आणण्यासाठी आवश्यक शिपायांची भाऊगर्दीही कमी नाही आणि अशाही सगळ्या परिस्थितीतही आपल्या चेह-यावरचे हसू टवटवीत ठेवणारे ‘आनंदी कावळे’ ही आहेतच !

वास्तविक या जगात प्रत्येकचजण सुखाच्या, आनंदाच्या मागे धावत असतो. जगण्याची ही सगळी धडपड तो एक ‘सुखी माणसाचा’ सदरा मिळवण्यासाठीच चालू असते. तरीही दुस-याचा आनंद का सहन होत नाही आपल्याला ? आनंदाची इतकी संकुचित संकल्पना घेवून जगत असतो आपण की, फक्त मला स्वत:ला मिळाला तरच तो ‘आनंद’; नाही तर नाही. त्या दुस-या व्यक्तीनेही तो क्षणिक आनंद, ते यश मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतलेले असतात, अनेक त्रास सहन केलेले असतात, दु:ख भोगलेलं असतं; तेव्हा कुठे त्याच्या वाट्याला तो आनंदाचा छोटासा ‘कवडसा’ आलेला असतो, हा विचारच आपल्या मनाला शिवत नाही. 

इतरांच्या आयुष्यातील असे अनेक छोटे छोटे कवडसे आपणही तितक्याच आनंदाने उपभोगू शकलो तर आपल्या मनाच्या अंगणभर सुखाचे ऊन सदा हसत राहील, तिथे दु:खाच्या सावलीला जागाच राहणार नाही. सगळ्या जगाचं सोडा हो, आपल्या जवळच्या माणसांच्या बाबतीत तरी हे करून बघायला काय हरकत आहे ?

कोणाचा आनंद कसा हिरावून घेता येईल याचा विचार करत बसण्यापेक्षा त्याच्यासोबत आपल्यालाही आनंदी होता येतंय का, हसता येतंय का ते पहायला काय हरकत आहे ?

सुदैवाने भेटलाच एखादा ‘आनंदी कावळा’ तर त्याच्यासोबत चार मुक्त गिरक्या घेऊन बघूया आकाशात.. 

त्याचे पंख छाटून त्याला संपवण्यापेक्षा आपल्या हृदयाच्या खोल खोल कप्प्यात त्याला कायमचा जपून ठेवू या !

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पक्ष्यांपासून शिकण्यासारखे… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

📖 वाचताना वेचलेले 📖

🦜 पक्ष्यांपासून शिकण्यासारखे…🦜 ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

(पक्षी आणि मानव यांच्यातील महत्वाचे विषय आणि फरक ???) 

  १. पक्षी रात्री काही खात नाहीत.

  २. रात्री फिरत नाहीत

  ३. आपल्या पिलांना स्वतः  ट्रेनिंग देतात, 

             दुसऱ्या ठिकाणी पाठवत नाहीत. 

 ४. हावरटासारखे  ठोसून कधी खात नाहीत.

             तुम्ही त्यांच्यापुढे मूठभर दाणे टाका,

             ते थोडे खाऊन उडून जातात 

             बरोबर घेऊन जात नाहीत …

 ५. अंधार पडल्यावर झोपून जातात,

             आणि पहाटेच उठून, गाणी  गात उठतात.

  ६. ते आपला आहार कधीही बदलत नाहीत.

  ७.आपल्या प्रजातीतच सोबती निवडतात ( एकत्र राहतात )

              बदक आणि हंसाची जोडी कधी होत नाही. 

  ८.आपल्या शरीराकडून सतत काम करवून घेतात, 

             स्वतःला ऍक्टिव्ह ठेवतात,

             रात्रीशिवाय विश्रांती करत नाहीत.

  ९.आजारी पडले तर काही खात नाहीत, 

             बरे झाल्यावरच खातात.

   १०. आपल्या मुलांवर प्रचंड प्रेम करतात व काळजी घेतात.

   ११. आपापसात मिळून मिसळून राहतात.

              अन्नावरून भांडणे झाली, तरी परत एकत्र येतात.

   १२. निसर्ग नियमांचे न कुरकुरता शांतपणे पालन करतात.

   १३. आपलं घर इको फ्रेंडलीच बनवतात.

   १४. मुलं स्वतःच्या कष्टाने पोटभरण्याइतके झाले की 

               त्यांच्या जीवनात हस्तक्षेप करीत नाहीत.

…… खरोखर त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे की नाही..??!! 

       त्यांच्या या सवयी अंगिकरून आपल्याला आपलं जीवन पण सुखी व निरोगी ठेवता येईल…

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares