मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ खरं सुख ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ खरं सुख ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

अलार्म बंद केल्यानंतर जी पुन्हा डुलकी लागले ती खरी झोप!

महिनाअखेर अचानक कपड्यांच्या घडीतून मिळालेले पैसे म्हणजे खरा धनलाभ!

कडकडून भूक लागली असता मस्त जमून आलेली पिठलं-भाताची पंगत म्हणजे खरी मेजवानी!

कोणत्याही गोष्टीचे अप्रूप असतांना अलगद ओंजळीत पडलेली ती गोष्ट म्हणजे खरे सुदैव!

आपल्याला काय मिळाले यापेक्षा आपल्याला खूप काही मिळाले ह्याची जाणीव म्हणजे खरी तृप्ती!

रात्री गादीवर पाठ टेकताच लागलेला डोळा म्हणजे खरे सुख!

ह्या जगण्यावर, ह्या जन्मावर शतदा प्रेम करावे!

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पक्ष्यांपासून शिकण्यासारखे… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ पक्ष्यांपासून शिकण्यासारखे… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

पक्ष्यांपासून बरेच काही शिकण्यासारखे आहे :

१. ते रात्री काही  खात नाहीत.

२. रात्री फिरत नाहीत.

३. आपल्या पिलांना स्वतः ट्रेनिंग देतात, दुसऱ्या ठिकाणी पाठवत नाहीत.

४. हावरटासारखे ठोसून कधी खात नाहीत.तुम्ही त्यांच्यापुढे मूठभर दाणे टाका, ते थोडे खाऊन उडून जातात….बरोबर घेऊन जात नाहीत..!

५. अंधार पडल्यावर झोपून जातात आणि पहाटेच गाणी  गात उठतात.

६. ते आपला आहार कधीही बदलत नाहीत.

७. आपल्या प्रजातीतच सोबती निवडतात.  बदक आणि हंसाची जोडी कधी होत नाही.

८. आपल्या शरीराकडून सतत काम करवून घेतात,स्वतःला ऍक्टिव्ह ठेवतात, रात्रीशिवाय विश्रांती घेत नाहीत.

९. आजारी पडले तर काही खात नाहीत, बरे झाल्यावरच खातात.

१०. आपल्या मुलांवर प्रचंड प्रेम करतात व त्यांची काळजी घेतात.

११. आपापसात मिळूनमिसळून राहतात. अन्नावरून भांडणे झाली, तरी परत एकत्र येतात.

१२. निसर्गनियमांचे न कुरकुरता शांतपणे पालन करतात.

१३. आपलं घर इको-फ्रेंडलीच बनवतात.

१४. मुलं स्वतःच्या कष्टाने पोट भरण्याइतकी मोठी झाली की त्यांच्या जीवनात हस्तक्षेप करीत नाहीत.

 

खरोखर त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे की नाही..!

त्यांच्या या सवयी अंगीकारून आपल्याला आपलं जीवन पण

सुखी व निरोगी ठेवता येईल…

 

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शुद्ध अंतःकरण… ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ शुद्ध अंतःकरण… ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ⭐

एकदा स्वामी विवेकानंद बोटीने प्रवास करण्यासाठी बोटीत चढले. बोट सुटायला अजून अवकाश होता, तोच त्यांना त्यांच्या गुरू रामकृष्णांचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू आला. ते विवेकानंदाना सांगत होते की “तू लगेच खाली उतर. ह्या बोटीने जावू नकोस .”

गुरूचीच आज्ञा ती, विवेकानंद लगेच खाली उतरले आणि बोट सुटली. त्यांना समजेना,गुरूजींनी त्यांना कां उतरवलं त्या बोटीतून? पुढे जाऊन ती बोट त्या प्रवासात बुडाली व सर्व प्रवाशांचा अंत झाला. विवेकानंदाना अतिशय वाईट वाटले. प्रवास संपवून ते जेव्हा रामकृष्णाना परत भेटले तेव्हा ते म्हणाले, “गुरुजी, तुम्ही मला वेळीच सावध करून माझे प्राण वाचवलेत खरे, पण ते इतर प्रवासीही माणसंच होती की. तुम्ही तर विश्वरूप आहात.

मग तेच प्रेम सर्व प्रवासी व तो बोटवाला ह्यांच्या बाबतीत का नाही दाखवलेत…?   का नाही त्याना हाक मारलीत…?    का नाही त्यांना सावध केलंत आणि वाचवलंत… ? “

रामकृष्ण म्हणाले,  “अरे मी असं करीन का..?   तेही माझेच होते. मी त्यांना पण ओरडून सांगत होतो, पण त्यांना माझा आवाज ऐकू आला नाही. ते आपल्या अहंकारात मदमस्त होते. तुझं अंत:करण शुद्ध आहे, म्हणून तुला माझा आवाज ऐकू आला.’ “

परमेश्वर काय किंवा सद्गुरू काय, आपल्या हृदयातच असतात. ते सतत आपल्याला योग्य काय, अयोग्य काय सांगत असतात. पण आपण आपल्याच मस्तीत एवढे दंग असतो, ह्या विषयवस्तूंच्या संसारात एवढे व्यस्त असतो, की त्यांचा आवाज ऐकूच येत नाही व मग त्याची बरीवाईट फळंही भोगावीच लागतात.

आपल्या अंत:करणशुद्धीसाठीच तर सेवा, सत्संग व साधना असते.

हे ऐकताच विवेकानंदांनी रामकृष्णांना साष्टांग प्रणाम केला.

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दृष्टीकोन… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ दृष्टिकोन… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

तिच्या लग्नाला पंचवीस वर्षे होऊन गेली. न्याहारीकरता एक दिवस तिने शिरा केला. शिरा करता करता तिच्या मनात विचार आला, ‘‘गेल्या पंचवीस वर्षांत आपण सर्वांना गरम गरम शिरा दिला आणि स्वतः मात्र खरवडीसह उरलेला शिराच खाल्ला. आज गरम गरम शिरा आपण घ्यायचा आणि उरलेला शिरा व खरवड नवऱ्याला द्यायची.’’ कारण तिला खरवड मुळीच आवडत नसे. शिरा खाता खाता नवरा तिला म्हणाला, ‘‘आज खरा आनंद येतोय. लहानपणापासून खरवड मला खूप आवडते. आम्ही त्याकरता भांडायचो. पण, खरवड नेहमी तूच घ्यायची. तुलाही आवडत असल्यामुळे मी कधी मागितली नाही.’’

बायकोच्या डोळ्यांत नकळत पाणी आले. प्रसंग खूपच साधा. आपण आपल्या दृष्टिकोनातून विचार करत असतो.पण, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते.एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा, विचार करण्याचा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा असतो…

अनेकदा तो आपल्या अनुभवामुळे, विशिष्ट परिस्थितीमुळे बनलेला असतो… त्यावर माणसे ठाम असतात… खरे तर त्यात बदल करण्याची गरज असते… विभिन्न दृष्टिकोनातून पाहायला शिकले पाहिजे… म्हणजे मग तो विकसित होतो… जाणिवा व्यापक आणि समृद्ध होतात… ‘माणूस समजणे सोपे जाते…दृष्टिकोन म्हणजे नकाशा.

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बोलणं… ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ बोलणं… ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

‘बोलण्याची शक्ती’ हे निसर्गाने फक्त मानवालाच दिलेलं वरदान आहे. आपल्या इच्छा, भावना, विचार, गरजा व्यक्त करण्याचे ते एक साधन आहे. तुम्ही बोलायला सुरुवात केली की, तुम्ही कसे आहात याचा परिचय होतो. तुमच्या आवाजाची पट्टी, शब्दांची निवड, बोलण्यातला खरेपणा, प्रामाणिकपणा, समोरच्याबद्दल आदर, आपुलकी सारं काही बोलण्यातून कळतं. आपली नाती, व्यवसाय, सामाजिक व्यवहार या बोलण्यावरच अवलंबून आहेत!  हे इतके महत्त्वाचे असूनही आपण ते अधिक चांगले करण्यासाठी प्रयत्न करत नाही.

‘आहे हे असं आहे’,

‘माझा आवाजच मोठा आहे’,

‘मला अशीच सवय आहे’

असं म्हणत आपण स्वतःचं समर्थन करतो.

बोलणं शिकावं लागतं आयुष्यभर.

‘कौन बनेगा करोडपती’ मी फक्त अमिताभ बच्चन यांचे बोलणे ऐकण्यासाठी पाहिले आहे. शब्दोच्चार, आवाजाचा चढ – उतार शिकायचं असेल तर हा आवाज अभ्यासायलाच हवा. आवाजाची, बोलण्याची साधना, तपस्या म्हणजे अमिताभ बच्चन! काही शब्द त्यांच्या तोंडून ऐकले, की मग तसा उच्चार दुसरं कोणी करू शकत नाही, हे हळूहळू कळत जातं.

शब्द जगलेला माणूस तो शब्द उच्चारतो, त्यावेळेस शब्दांचा उच्चार ज्या ताकदीने येतो, त्यावरून त्याचा खरेपणा ओळखता येतो.

बोलण्याचा आवाज हा आतून येतो!  माणसाच्या चेतनेला स्पर्श करून, त्यामुळे शेवटी माणूस म्हणून आपण जितके घडत जातो, तितका आवाजही सुंदर होत जातो.

आशाताईंचं बोलणं गाण्याइतकंच सुश्राव्य आहे. जगण्याची लढाई हसत लढलेल्या शक्तीची ती अभिव्यक्ती आहे.

एक प्रयोग केला होता.,

सुंदर शब्दांची यादी वाचणं. प्रामाणिक, सत्य, अद्भुत, शक्ती… अशा सकारात्मक शब्दांची यादी लिहायची आणि वेळ मिळेल तशी मोठ्याने वाचायची. वाढवत जायचे हे शब्द. हळूहळू आपल्या बोलण्यात ते शब्द येऊ लागतात. बोलणं चांगलं होतंच, पण सवयीने या विरुद्ध काही ऐकावंसं वाटत नाही, इतका अभिरुचीचा दर्जा वाढत जातो! संगत बदलते.

आयुष्य बदलून टाकणारी ही शब्दांची साधना आहे. शब्द जसे असतील, तशा घटना, तशा व्यक्ती आपण आकर्षित करत असतो. मग शब्द बदलून आयुष्य बदलता येईल, हेही तितकंच खरं!

सावकाश बोलणं, स्पष्ट बोलणं, शक्यतो हळू बोलणं या सवयी मुद्दाम लावून घ्याव्या लागतात.

वाचनाने विचार स्पष्ट, मुद्देसूद होतात. नेमकं मोजकं बोलता येतं. कविता वाचत शब्द समजून घेता घेता बोलण्याची लय सुधारते. बोलण्यातला रुक्षपणा जातो आणि हृदयाशी संवाद साधण्याची कला साध्य होते. यासाठी वाचन, काव्यवाचन महत्त्वाचं ठरतं .

कानात प्राण आणून ऐकावं अशी माणसं या जगात आहेत! फक्त शोधता – ऐकता आली पाहिजेत.

या बोलण्यातली सर्वांत टाळायची गोष्ट, म्हणजे पाल्हाळ लावणे, संथ लयीत, समोरच्या व्यक्तीच्या सहनशक्तीची परीक्षा घेत रटाळ बोलणे. वेळ ही संपत्ती  असेल, तर अशा लोकांना वेळचोर का म्हणू नये?

फोन, मोबाईलवर बोलण्याचे नियम हा तर एक स्वतंत्र विषय होऊ शकेल.

आपल्या माणसांशी बोलण्याने ताण हलका होतो.

बोलणं म्हणजे निव्वळ शब्द थोडेच असतात? न बोलता शांत सोबतही बोलणंच असतं.

वेळात वेळ काढून घराघरात संवाद झाले पाहिजेत. माणसामाणसातले अंतर बोलण्यानेच दूर होऊ शकते.  मनातले गैरसमज बोलून दूर करता येतात; पण त्याआधी कसं बोलायचं, ते या जगाच्या शाळेत शिकावंच लागतं.

बाकी हा जगण्याचा प्रवास अवघड आहे. शेजारी कोणी बोलणारं मिळालं, की प्रवास सोपा होतो.

तात्पर्य :  ज्याच्या वाचेमध्ये माधुर्य व गोडवा आहे, जो सदैव संयमित व विनयशील बोलतो, दुनिया त्याच्या प्रेमात पडते व अशा व्यक्तीस  अशक्य गोष्टी शक्य होतात..

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “भांडणाचे नियम…” – लेखिका :सौ. मुक्ता पुणतांबेकर ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “भांडणाचे नियम…” – लेखिका :सौ. मुक्ता पुणतांबेकर ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

‘घर म्हटलं म्हणजे भांड्याला भांडं लागायचंच,’ हे वाक्य आपण नेहमी ऐकतो.

आमच्याकडे व्यसनाधीनतेच्या काउंसेलिंगसाठी मुख्यतः फोन येतात. पण काही वेगळ्या कारणांसाठीही येत आहेत. ‘घरातली भांडणं’ हा देखील महत्वाचा विषय झाला आहे.

परवाच पत्नीबरोबरच्या सततच्या  भांडणाला वैतागलेल्या एका गृहस्थांचा फोन आला. ते म्हणाले “तुम्ही काउंसेलर आहात तर ही भांडणं थांबवण्याचा उपाय सांगा”.

मी त्यांना म्हटलं, “भांडणं पूर्ण थांबवता तर येणार नाहीत. पण तुम्ही भांडणाचे नियम पाळले, तर त्यांची तीव्रता नक्कीच कमी होईल”.

‘भांडणाचे नियम’ हे माझे शब्द ऐकताच त्यांना आश्चर्य वाटलं. पण हे नियम समजून घेण्याची त्यांना उत्सुकता होती.

म्हणून मी त्यांना विचारलं, “नुकत्याच झालेल्या भांडणाविषयी सांगा”.

ते म्हणाले, “कालच हिने मला अजिबात न आवडणारी भाजी केली. माझी चिडचिड झाली. मी तिला बोललो. ती ही बोलली आणि आमचं मोठं भांडण झालं.”

हे ऐकताच मी त्यांना म्हटलं, “भांडणाचा पहिला नियम आहे भांडणाचा विषय बदलायचा नाही. ज्या विषयावर भांडण सुरू होतं, त्याच विषयावर भांडायचं. म्हणजे भांडण पराकोटीला जात नाही.”

त्यांना हे फारच पटलं. ते म्हणाले, ” भाजी वरून भांडण सुरू झालं. मग ती चिडली. माझ्या घरचे लोक, आईने मला कसं लाडावून ठेवलं वगैरे बोलायला लागली. मग मीही तिच्या घरच्या पद्धतींवर बोलायला लागलो. लग्नात जेवायचा मेनू त्यांनी चांगला ठरवला नव्हता. ती आठवण करून दिली. मूळ विषयापासून आम्ही फारच भरकटलो. पण आता मात्र आम्ही तुमचा हा भांडणाचा नियम पाळणार”.

त्या गृहस्थांची बोलल्यावर मला हे नियम सगळ्यांनाच सांगावेसे वाटायला लागले. आपण सगळ्यांनी हे नियम पाळले तर भांडणं झाली तरी नातेसंबंध बिघडणार नाहीत.

१) भांडणाचा विषय बदलू नका. ज्या विषयावर भांडण सुरू झाले, त्याच विषयावर भांडा. विशेषतः पती-पत्नींनी भांडतांना ‘सासर- माहेर’ मुळीच मध्ये आणू नका.

२) भांडणाला टाईम लिमिट ठेवा. काही घरांमध्ये भांडण झालं की  २-३ दिवस ते सुरू रहातं. नंतर अबोला असतोच. सर्वांनी मिळून एक वेळेची मर्यादा ठरवता येईल. अर्धा तासाची ठरवली तर अर्धा तास झाल्यावर स्टॉप म्हणून लगेच सर्वांनी गप्प बसायचं. (खरंतर पहिला नियम पाळून विषय बदलला नाही. तर जास्त वेळ भांडता येतच नाही. एकाच विषयावर काय काय बोलणार !)

३) तिसऱ्या व्यक्तीसमोर भांडू नका. दोघंच असताना भांडा. तिसरी व्यक्ती समोर असेल तर अपमान वाटतो. मनं दुखावतात. मुलांसमोर तर भांडण अजिबात नको. त्यांना असुरक्षित वाटतं.

४) एक व्यक्ती चिडली असेल तर दुसऱ्याने गप्प बसा. दोघंही एकदम चिडले तर भांडण विकोपाला जाऊ शकतं. त्यामुळे आपली जवळची व्यक्ती चिडली असेल तर तिला समजून घ्यायला हरकत नाही.

५) स्वतःच्या भावना ओळखा. शांतपणे व्यक्त करा. थकवा, भूक, टेन्शन अशी रागाची वेगवेगळी कारणं असतात. चिडचिड होत असेल तर ती कशामुळे हे शोधून काढून, लोकांवर चिडण्यापेक्षा त्यांना आपण कारण सांगू शकतो. आमच्या घरात ज्याची चिडचिड होत असेल,तो सांगतो की मला थोडा वेळ माझी स्पेस हवी आहे आणि आतल्या खोलीत जाऊन बसतो. अशावेळी त्याच्या मागे लागण्यापेक्षा आम्ही त्याच्या स्पेसचा आदर राखतो.

६) टोमणे मारु नका. टोमणे मारणे, उपहासात्मक बोलणे हे नातेसंबंधावर वाईट परिणाम करतात. त्यामुळे या गोष्टी संवादातून काढून टाकलेल्याच बर्‍या.

७) भडकू नका. काही वेळा मुद्दाम आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न केला जातो. आपण चिडावं, असा त्या व्यक्तीचा उद्देश असतो. तो सफल होऊ देऊ नका. शांत रहा. आपल्या परवानगीशिवाय कोणीच आपल्याला भडकवू शकत नाही. सोशल मीडियावर ट्रोलिंग होत असेल तर हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. आपण बिचारे म्हणून गप्प बसणार नाही. तर आपण त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहोत म्हणून गप्प बसणार आहोत. कारण बोलण्यापेक्षा गप्प बसायला जास्त शक्ती लागते.

८) मध्यस्थाची मदत घ्या. भांडणं कमी होतच नसतील तर जवळच्या मित्र-मैत्रिणी किंवा काउंसेलरची मदत घेता येईल.

मला आठवतील तेवढे नियम मी लिहिले. तुम्ही यात भर घालू शकता.

चला तर मग…

भांडा सौख्यभरे!

लेखिका :सौ.मुक्ता पुणतांबेकर

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “घोडं दिसलं की पायी चालू वाटत नाही—” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “घोडं दिसलं की पायी चालू वाटत नाही—” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर

” फ्लाईटनेच जायचं गं आई , ट्रेन मधे बोअर होतं मला “

आता सुट्टीत काकाकडे दिल्लीला जायचं अन् सिमला मनाली ट्रिप करून यायचं , असं ठरवत असताना , दुसरीतल्या सईने ठणकावून आपलं मत सांगितलं. “ अगं आज्जी आजोबांना ट्रेन बरी वाटते अन् राजधानी आहे ती चांगली .. एका रात्रीत पोचूही ..”  चारूता सारं सांगत राहिली तरी काही पटले नाही सईला .. 

“ मागे केरळला मग फ्लाईटने का गेलो ? ते  रेल्वे स्टेशन किती घाण असतं .. नाही म्हणजे नाहीच , फ्लाईटनेच जायचय मला .. “

“ओरडायला हवं होतं मी तेंव्हाच खरं .. ” रात्री चैतन्यला चारू सांगत होती.  “ ओरडायला हवं होतं का रे ? पण खरं सांगू , कळतच नाहीये , चूक तिची कि आपली ? मागण्या आता वाढतच चालल्या आहेत तिच्या ..  फ्लाईटने जाणं किती सहज साध्य वाटतय तिला .. बोर्नव्हिटा नसेल तर दूध नको , गाडी नसेल तर प्रवास नको , हाँटेलात गेलो तर चायनिजच हवं अन् माँलमधलं सारं काही घरी यायलाच हवं.. एक ना दोन .. जास्तच लाड करतोय का आपण ?” चारूताच्या विचारांनी परत एकदा उचल खाल्ली. 

“ हमम .. खरंय तुझं  ..” नेहमीप्रमाणे  कुस बदलत एवढच म्हणत चैतन्य झोपून गेला. 

पन्नास पैशाच्या लिमलेटच्या गोळीचं आकर्षण असायचं आपल्याला .. कोणी कधी शाळेत वाढदिवसाचं वगैरे म्हणून चाँकलेट दिलंच तर घरी येऊन अर्ध अर्ध करून खायचो .. गरीब वगैरे काही कधी नव्हती परिस्थिती, पण पैसा असा इतका सहज संपवत नव्हतो  , आता मध्यमवर्ग असा काही राहिलाच नाही की काय ..?. .. मुबलकता आली .. पगार वाढले .. जाहिरात क्षेत्राने व्यापूनच टाकलंय आयुष्य अवघं .. जाहिरातींचा मारा होत राहतोय .. पगार त्याकडे वळत राहतोय .. 

आधी दिवाळीलाच कपडे घ्यायचो नवे .. आणि एखादा वाढदिवसाला .. जुने झालेले ड्रेस आधी घरात वापरले जायचे अन् मग पायपुसणं बनून पायाखाली यायचे..

— आणि परवा साडेसातशे रूपयांचा नाईट ड्रेस घेतला आपण .. सहज ..  आवडला म्हणून ..  आणि मग.. सईला काय म्हणा .. आपणच बदललो नाहीयोत का ? 

संध्याकाळी  खेळून आल्यावर भूक लागली तर केळं, दूध पोहे, गेला बाजार पोळीचा लाडू, असंच काहीसं हातावर ठेवायची आई .. सई पाहतही नाही अशा खाण्याकडे आता .. ह्या सवयी तिला कुणी लावल्या ? बिस्किटं , वेफर्स नी तत्सम खाण्याने भरून वाहतायत डबे आता .. 

आत्ता आठवतय की …आत्याचं घर किती लांबं होतं..  पण चालतच न्यायचे आजोबा .. त्यांचं काय नातीवर प्रेम का नव्हतं ? पण चालणं हेच फार स्वाभाविक होतं…..पुढे सायकल हातात आल्यावर चालत जायला कंटाळायला लागले मी तेव्हा आजी म्हणत असे ..”  घोडं दिसलं कि पायी चालू वाटत नाही !!!”

— पण सुरवात सारी इथुनच झाली का ? पुढे शिक्षण झालं ,  नोकरी लागली तशा मागण्या वाढल्या  माझ्या .. ड्रेसचा कप्पा वाढला ..चपलेचे जोड वाढले .. “ अगं राखून ठेव पैसा हाताशी,आहे म्हणून संपवू नये ..” आई म्हणायची तेंव्हा ‘ हो गं ‘ …म्हणत फणकाऱ्याणे  निघून जायचे मीही .. यथावकाश लग्न झालं , नवरा IT तला .. सहा आकडी पगार त्याचा .. मोठ्ठं घर हवं म्हणून कर्ज काढलं, तेंव्हाही आजोबा म्हणाले होते ..” अगं प्रायव्हेट नोकऱ्या तुमच्या, एवढालं ते लोन काढताय .. अंथरूण पाहून पाय पसरावेत बयो ! “

पण कुठेसं ऐकलेला डायलाँग घोळवायचे मी तेंव्हा .. “ तोकडं पडलं तर अंथरूण वाढवा ना .. सदा पायच का आखडून घ्यायचे आपण ? “

स्टीलची ताटं नको म्हणून डिनर सेट आणले ..एकेक करत नॉनस्टिकच्या भांड्यांचे सेट झाले ..  फ्रिज , टिव्ही लहान वाटायला लागला .. सोफ्यावाचून हाँल सुनासुना भासायला लागला … दिरानं अन् ताईने घेतली गाडी तशी मग आपणही घेतलीच .. बसचा प्रवास अगदीच दुर्मिळ झाला मग .. उपभोगत आलो सारं .. आमचा स्तर आम्हीच वाढवला …. आणि मागची पिढी  खर्चिकच  म्हणत आली आम्हांला ..

कोकणातल्या मूळ गावी जायला लाल डब्ब्याखेरीज दुसरी सोय नव्हती .. गाडी अजून घेतलेली नव्हती .. तेंव्हा जाणारच नाही म्हंटलं नाही, पण तरी नाकं मुरडायचेच मी जाताना .. सासरे म्हणतच मग .. “ तुम्हांला थेट गाडी आहे आता. किती बरय .. आम्ही  ST , बोट , पायी असं करीत करीत पोहोचत असू  कित्येक तासांनी ..”– मला एशियाड हवीशी वाटे .. तसंचं लेकीला विमान हवं आहे आता …. आपल्याच विचारांची धारा पुढे चालवतेय लेक .. काय ओरडणार आहोत आपण तिला ..

असेच विचार करता करता कधीतरी झोप लागली .. दुसऱ्या दिवशी रविवार .. जरासं आळसावतच चारू बसली तोवर कामवाल्या मावशी आल्या .. चांगल्या कपबशा नि चांगल्या चांगल्या बेडशिट्सनी भरलेली पिशवी त्यांच्या हातात .. म्हंटलं “ काय हो हे .. आत्ता कसली केलीत खरेदी ? “.. तर म्हणाल्या .. “ अहो खालच्या मजल्यावरच्या ताईंनी दिलं .. जास्तीचं सामान सगळं काढून टाकून गरजेपूरतच ठेवायचं ठरवलंय त्यांनी म्हणे  ..”  

— खालच्या ताई म्हणजे चारूची मैत्रीणच –  मेधा .. चारूला हे समजेना तेंव्हा तिने मेधाला फोन लावला .. 

“अगं मिनिमलीझमच्या मुव्हमेंटबद्दल वाचलं मधे नेटवर .. म्हणजे आवश्यक त्या वस्तूंचाच फक्त संचय करायचा .. अनावश्यक फाफटपसारा टाळायचा .. काय काय उगाचच जमवत राहतो आपण .. मला फारच पटलं ते .. म्हणून ठरवलय जमेल तितकं करूया .. त्याची ही सुरवात .. “

कुठेतरी उत्तर मिळाल्यासारखं वाटलं चारूला .. ‘ आज रविवार आहेच तर आपणही आज हे निवांत वाचूया .. आणि बघुया आपल्याला पटतय अन् जमतय  किती नि कसं ..’  असं ठरवत ती स्वयंपाकघराकडे वळली .. तशी मावशी म्हणाल्या ..” बरं झालं की हो , खालच्या ताईंनी कपबश्या दिल्या ते .. पोरांना आता स्टीलचं  भांडं चालत नाही .. रंगीत डिझाईनचा कपच लागतो .. आम्ही तर करवंटीतून प्यायचो चहा  .. पण तक्रार नाही केली बघा कधी .. काय करावं .. जनरीतच आहे झालं  …… 

“ घोडं दिसलं की चालू वाटत न्हाई माणसाला .. !!! ” 

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ स्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा… ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

आयुष्यातील प्रत्येक स्टेजचा आपण आनंद घ्यायला हवा. आयुष्य तसं म्हटलं तर खूप सोपं आहे, आपणच विनाकारण किचकट करून ठेवतो. लोक काय म्हणतील या विचाराने आपणच आपल्या मार्गात आपणच स्पीड ब्रेकर घालून घेतो.

कोणाला भेटावेसे वाटले तर भेटा, बोलावेसे वाटले तर बोला. एखाद्या विषयी काही आवडले तर स्तुती करा, नाही आवडले तर स्पष्टपणे पण न दुखावता सांगा. हेच दिसण्याच्याही बाबतीत लागू होते.

पिकले केस आवडत नाहीत, कलर करावेसे वाटतात?

– तर करा. वाढलेली ढेरी कमी करायची आहे?

– जिम सुरू करा, नसेल जमत तर रोज किमान तासभर चाला.

नव्या पिढी सोबत स्वतःला अपग्रेड करायचंय?

– तर लोकांचा विचार न करता खुश्शाल नव्या स्टाईलचे कपडे घाला.

लहान मुलांमध्ये मूल होऊन आपले शैषव पुन्हा जगावेसे वाटतंय?

-तर जागा ना ! कुणी अडवलंय?

सर्वात आधी आरश्यात दिसणाऱ्या स्वतःला आहे तसे स्वीकारायला शिका…

वय वाढत चाललंय, हे स्वीकारलं तरच आपण तणावमुक्त जीवनाचा आनंद मनमुराद लुटू शकतो. वाढत्या वयासोबत येणारी वेगवेगळी फेज स्वतःसोबत नवनवीन क्षण घेऊन येते त्या त्या फेजचा मनसोक्त आनंद घेता आला पाहिजे. कुमार वयातील आठवणीत हरवून बसलात तर प्रौढ वयात येणाऱ्या क्षणांना आणि आनंदाला मुकाल,

  • कोणतही क्रिम किंवा फेसपॅक तुम्हाला गोरं करणार नाही
  • कोणताही शॅम्पू तुमची केस गळती रोखू ० शकणार नाही
  • कोणतेही तेल टकलावर केस उगवु शकणार नाही
  • कोणताही साबण बच्चों जैसी कोमल स्कीन देणार नाही.
  • लक्षात ठेवा, कोणत्याही टुथ पेस्टमध्ये नमक नसतं, व कोणत्याही साबणामध्ये निम नसतो.

सगळेच जण आपआपली दुकानं थाटुन तुम्हाला मूर्ख बनवायला बसलेत. तेव्हा दिखावे पर न जाओ, अपनी अक्ल लगाओ.

तुम्ही विसाव्या वर्षी जसे दिसत होतात तसेच चाळीशीत आणि साठीत दिसाल अशी अपेक्षा ठेवणे मूर्खपणाचे आहे. कोणत्याही वयात फिट राहणे मात्र महत्वाचे आहे.

पोट सुटलंय तर सुटू दे, त्यासाठी लाज वाटून घेऊ नका, आपलं शरीर वयोमानानुसार बदलत राहातं. वजन पण त्याप्रमाणे कमी जास्त होत राहतं. हे सगळे नैसर्गिक आहे.

आलेली परिस्थिती सर्वप्रथम स्विकारा आणि ती बदलण्यासाठी स्वतःला तयार करा.

जन्म, बालपण, तारुण्य, म्हातारपण आणि मृत्यू हा तर निसर्गाचा नियमच आहे. आजपर्यंत कोणीही हे टाळू शकले नाही, हे स्वतःला आधी पटवून द्या.

जुन्या मशीनचा मेन्टेनन्स करून अपटुडेट करता येते, पण नवीन नाही करता येत. आपल्या शरीराचेही तसेच आहे. ऑरगॅनिक धान्य, एलोविरा, कारले, मेथी, जिरे,ओवा वगैरेचे घरगुती उपाय यावरील व्हिडीओ यु ट्यूबवर धुमाकूळ घालत आहेत. इंटरनेट, सोशल मीडियावर वेगवेगळ्या उपदेशांनी नुसता उच्छाद मांडलाय….. 

… “अमुक खा, तमुक खा, हे खाऊ नका, ते खाऊ नका, गरम खा. थंड पिऊ नका, कपाल भारती करा, सकाळी निंबुपाणी, दुपारी ताक आणि रात्री गाईचं दुध घ्या. दिर्घ श्वास घ्या, डाव्या कुशीवर झोपा, ऊजव्या कुशीवरून ऊठा, हिरव्या पालेभाज्या खा, डाळीत प्रोटीन असतात. ज्वारी खा, नाचणी खा, वगैरे वगैरे…”

वरील सारे उपदेश वाचले की, डोके गरगरू लागते, काय योग्य काय अयोग्य तेच कळत नाही. डिप्रेशनची भर पडते ती वेगळी….

पतंजली, प्रॉक्टर अँड गॅम्बल, आशीर्वाद, नेस्ले, हिंदुस्तान लिव्हर, आई.टी.सी. अशा अनेक देशी विदेशी कंपन्या जाहिरातींचा भडिमार करून डोक्याचा नुसता भुगा करतात. कोणते उत्पादन चांगले हेच कळत नाही.

आपण सर्वचजण कधीतरी मरणार आहोत.  पण मरण्याआधी खऱ्या अर्थाने जगणंच विसरून चाललो आहोत असं तुम्हाला नाही वाटत का? खरं सांगा..

सर्वात महत्वाचे म्हणजे मजेत रहा. कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप करू नका. चुका सर्वांकडून होतात, तुम्ही काही देव नाही. स्वतःवर प्रेम करा. दोष देण्याचे काम करण्यासाठी आसपास भरपूर लोक आहेत. नकारात्मक लोकांकडे दुर्लक्ष करा. सकारात्मक विचारसरणीची लोकं जोडा, त्रासदायक लोकांपासून दूर राहा. आवडेल ते खा, पण प्रमाणात.  थोडा का होईना पण रोज नियमित व्यायाम करा. आनंदात रहा. शरीराला त्याचं कार्य करू द्या…

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पिंपळ आणि आंबा…लेखक – श्री सतीश मोघे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पिंपळ आणि आंबालेखक – श्री सतीश मोघे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

आपले दु:ख, तेवढ्या मोठ्या मात्रेचे नसतांना अचानक कुणीतरी मोठ्या मात्रेने सांत्वन करायला पुढे आले की, थोडे गोंधळायला होते. हे  सात्वंन झिडकारावे की त्यामागचा आपलेपणा पाहून नम्रपणे  स्वीकारावे ? अशा संभ्रमात पडायला होते खरे… बागेतल्या पिंपळाला असेच काहीसे त्यादिवशी झाले.

बागेतले आंब्याचे झाड त्याला सांगत होते, “बघवत नाही रे तुला पिंपळा.. शिशिर ऋतूने तुला अगदीच पर्णहीन, निस्तेज करून टाकलय. पण धीर धर. काही दिवसाच वसंत सुरू होईल आणि येईल पुन्हा पालवी…. होईल पुन्हा पूर्वीसारख रूप … होशील माझ्यासारखा…” 

शिशिरात पर्णहीन अवस्थेत नीरव शांततेतली आनंददायी ध्यानावस्था अनुभवणाऱ्या पिंपळाला यावर काय बोलावे, हे क्षणभर समजेना. अनेकदा दुसऱ्याचे सांत्वन करतांना त्याचा दुःखभार हलका करण्याच्या हेतुपेक्षा, आपण खूप सुखात आहोत याचा काकणभर का होईना अभिमान दाखविण्याचा हेतू सांत्वन करणाऱ्याच्या मुखावर झळकत असतो. पण हा हेतू दिसला तरी त्यावेळी तसे बोलता येत नाही, याची समज आणि उमज पिंपळाला होती.

मंद स्मित करून पिंपळ आब्यांला म्हणाला, “तुझ्या प्रेमळ शब्दांसाठी खूप आभार. पण एक सांगू.. मी अजिबात दु:खात नाही. सृष्टीने सहाही ऋतूत आपले प्रारब्ध आधीच लिहून ठेवले आहे. कोणत्या झाडाने केव्हा फुलावे, बहरावे, कोमजावे सगळे सगळे. आपल्या हातात फक्त मूळं आहेत आणि त्यांच्या व्दारे जमिनीतून जीवनरस घेणे आहे.हे एकदा उमगले की दुःखाचा लवलेश नाही”

“आपली मूळं आत सारखीच आहेत. फरक दिसतो, तो  फक्त बाहेर.. जमिनीवर… पाने, फळे, फुले, खोड, उंची यात फक्त फरक. विविधता आणि सौंदयासाठी केलेला… हे एकदा कळलं की, आहे त्यात आनंद.

सुखदुःखापलीकडील समाधानाचा, आनंदाचा अनुभव. आपल्या बाहयरूपातल्या बदलांकडे पहाण्याची एक वेगळीच दृष्टी येते… एक समाधानी अवस्था येते. जिथे कुणाशीही तुलना नाही, तक्रार नाही. ठेविले अनंते तैसेचि रहावे। चित्ती असो द्यावे समाधान।”

पिंपळाच्या या बोलण्याने आंब्याचे समाधान झाले नाही. त्याने पिंपळाला विचारले, “खरे खरे सांग! पर्णहीन झाल्याने तुझं रूप कुरूप झालय, पक्षी येईनासे झालेत, पानांची सळसळ नाही… याचे खरेच तुला दुःख नाही?”

धीरगंभीर आवाजात पिंपळ उत्तरला, ” नाही. अजिबात नाही. बाहेरच्या बदलणाऱ्या गोष्टींशी आपल्या सुखाला जोडून घ्यायचं आणि त्या गोष्टी बदलल्या की दुःखी व्हायचं, ही माणूसं करीत असलेली चूक आपण का करायची! माझं सद्‌भाग्य की, तथागताचा सहवास मला लाभला आणि पानं, फुलं, फळ 

यापलीकडे जाऊन कायम मूळाकडेच पाहण्याची खोड मला जागली. ‘घट्ट मूळ’ आणि ही ‘खोड’ असली की आनंदाला बाधा नाही. बाह्य बदलांकडे पाहण्याची दुष्टीच बदलून जाते”

“‘तू म्हणतोस पाने नाहीत त्याचं दुःख. पण खरं सांगू शिशिर ऋतू माझा ५-६ हजार पानांचा भार हलका करतो. ते २-३ महिने खुप हलकं हलकं वाटत! तू हे सुख नाही अनुभवू शकत.. पानांचा भार नाही. 

सळसळ नाही, पक्षांचे आवाज नाही. त्यामुळे ध्यान समाधीही दीर्घकाळ लावता येते. अधिक मूळाकडे जाऊन चैतन्याचा स्रोत देहभर भरून घेता येतो. वसंताला सामोरे जाण्याची ही पूर्व तयारी असते. म्हणूनच वसंत आला रे आला की अवघ्या सात दिवसात माझ्या देहभर पालवी फुललेली दिसते “

आंब्याला हळूहळू पिंपळाचे विचार पटत होते. पिंपळ पुढे बोलू लागला.” कुणाला आपण किती प्रिय आहोत, यावर आपण आपली प्रियता ठरवू नये. तुझाही मोहोर कधी जळतो.. कधी गळतो.. फळं नाही येत तेवढी… लोकं नाराज होतात..  फळांच्या अपेक्षेने प्रियता, जवळीकता असली की ती कधीतरी लोप पावते. पण फळाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष प्रेम केलं की प्रियता कायम रहाते. अशा निरपेक्ष प्रेम करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या प्रेमाची आठवण म्हणून त्यांच्या वहीत, पुस्तकात पिंपळपान कायमचं ठेवतात. शिशिरात देहावरची पाने गळाली तरी ती वह्या-पुस्तकातील पाने तशीच असतात. त्यांना बघून मी धन्य होत असतो.”

आपल्या फळाला बाजारात मोठा भाव / प्रसिध्दी आहे, अशा समजूतीत असणाऱ्या आंब्याला पिंपळ आपल्याहून जाणीवेने, विचाराने खूप मोठा आहे, हे एव्हाना जाणवले होते. पिंपळाप्रती आदरभाव, कौतुक व्यक्त करावं म्हणून आंबा पिंपळाकडे वळला तर काय? पिंपळ डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. पर्णहीन पिंपळाचं झाड आंब्याला त्याच्याहून सुंदर दिसलं..समाधानी जाणवलं…आणि  मूळाकडे जायची खोड लावून घेण्याचा निश्चय त्याने मनोमन केला.

लेखक – श्री सतीश मोघे

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पलायन…” लेखक : रस्किन बाॅन्ड – अनुवाद – सुश्री निलिमा भावे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “पलायन…” लेखक : रस्किन बाॅन्ड – अनुवाद – सुश्री निलिमा भावे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

आकाश उजळत होतं, तसतसे पाईन  आणि  देवदार  वृक्ष  स्पष्ट दिसायला  लागले  आणि पक्ष्यांची हालचाल सुरू झाली. सुरुवात दयाळ पक्ष्याने केली. त्याने एक सौम्य, मंद शीळ घातली. त्यानंतर साळुंक्या झुडुपांमध्ये कलकल करायला लागल्या. एक तांबट एका उंच झाडावर बसून कर्कश्यपणे ठक् ठक् आवाज करायला लागला. आकाश जरा आणखी पांढुरकं झाल्यानंतर तजेलदार हिरव्या रंगाचा पोपटांचा थवा झाडाच्या शेंड्यावरून उडत गेला.

पावसाची भुरभुर चालूच राहिली. पूर्वेकडच्या आकाशात तांबूस रंगाचा चमकदार प्रकाश पसरला आणि मग, अगदी अचानकपणे ढगांमधल्या फटीतून सूर्य बाहेर आला. हिरवंगार पावसाचं गवत एकदम उठून दिसायला लागलं. मी आणि दलजीत दोघेही चकित होऊन हे दृश्य पहात होतो. आत्तापर्यंत कधीच आम्ही इतक्या लवकर उठलो नव्हतो. झाडं, झुडुपं, गवत यांच्यामध्ये विणलेल्या एरवी लक्षात न येणार्‍या कोळ्यांची शेकडो जाळी सोनेरी आणि रुपेरी जलबिंदूंनी नटून लक्ष वेधून घ्यायला लागली. जाळ्याच्या नाजूक रेशमी तंतूंनी सूर्यप्रकाश आणि जलबिंदू यांना तोलून धरलं होतं. प्रत्येक जलबिंदू लहानशा रत्नासारखा चमचमत होता.

पावसात भिजून ओला आणि जड झालेला एक जांभळ्या फुलांचा जंगली डेलिया टेकडीच्या उतारावर पसरला होता आणि पाचूसारखा चमकदार हिरवा गवती किडा त्याच्या एका पाकळीवर पाय पसरून ऊन खात पहुडला होता.

पुस्तक – वावटळ आणि सात कथा

लेखक – रस्किन बॉँड 

अनुवाद – सुश्री नीलिमा भावे 

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares