मराठी साहित्य – विविधा ☆ सुधीर रसाळ यांची वाङ्मयीन भूमिका ☆ डाॅ. विष्णू वासमकर ☆

डाॅ. विष्णू वासमकर

? विविधा ?

☆ सुधीर रसाळ यांची वाङ्मयीन भूमिका ☆ डाॅ. विष्णू वासमकर☆ 

☆

सुधीर रसाळ हे मराठी साहित्य आणि समीक्षाविश्वातील एक महत्त्वाचे नाव. सुमारे 60 वर्षे त्यांनी मराठी साहित्यव्यवहारात आपल्या समीक्षात्मक लेखनाने मोलाची भर घातली आहे. ‘कविता आणि प्रतिमा’ हा त्यांचा पहिला समीक्षात्मक ग्रंथ 1982मध्ये प्रसिद्ध झाला. या ग्रंथाने साहित्याचा गांभीर्यपूर्वक विचार करणारा एक समीक्षक म्हणून ते ओळखले जाऊ लागले.   ‘काही मराठी कवी जाणिवा आणि शैली’, ‘वाङ्मयीन संस्कृती’, ‘मर्ढेकरांची कविता : जाणिवांचे अंतःस्वरूप’, ‘मर्ढेकरांचे कथात्म आणि नाट्यात्मक वाङ्मय’, ‘भालचंद्र नेमाडे यांची समीक्षा’, ‘पार्थिवपूजक पु‌. शि. रेगे, ‘समीक्षा आणि समीक्षक’, ‘कवितायन : विंदा करंदीकर यांची कविता’, ‘नव्या वाटा शोधणारे कवी’ इत्यादी अनेक समीक्षा ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. आजही त्यांचे लेखन चालू आहे. किंबहुना वयाच्या नव्वदीनंतरही ते तितक्याच निष्ठेने समीक्षालेखन करत आहेत. ‘संवादातून साहित्यशोध’  हा त्यांच्या मुलाखतींचा संग्रह प्रा.बाळकृष्ण कवठेकर आणि लता मोहरीर यांनी नुकताच पद्मगंधा प्रकाशनाच्या वतीने संपादित केला आहे. या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने सुधीर रसाळ यांच्या वाङ्मयीन भूमिकेचा आपल्याला विचार करायचा आहे.

डॉ. सुधीर रसाळ

सुधीर रसाळ हे मर्मग्राही स्वायत्ततावादी समीक्षक आहेत . मराठी समीक्षेची सुरुवात 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात झाली. मराठीतील इतर आधुनिक साहित्यप्रकारांप्रमाणेच  समीक्षेची बीजे प्राचीन काळात सापडत असली तरी 1872 नंतर मराठी समीक्षेने आधुनिक रूप धरायला सुरुवात केली, असे म्हणता येईल. मराठी समीक्षेच्या क्षेत्रात साहित्याचा विचार प्रामुख्याने जीवनवादी आणि कलावादी दृष्टिकोनातून होत राहिला आहे. जीवनवादी समीक्षक साहित्याचा मानवी जीवनाच्या संदर्भात विचार करतात.  तर कलावादी समीक्षक साहित्याचा कलेच्या दृष्टीने विचार करतात. कलावादी समीक्षकांची मराठीमध्ये एक परंपरा दिसून येते. या परंपरेचे मर्ढेकरपूर्व आणि मर्ढेकरोत्तर असे दोन भाग होतात. मर्ढेकरपूर्व कालखंडात काही समीक्षक साहित्याचा कलावादी  दृष्टिकोनातून विचार करत असले तरी मर्ढेकरांच्यापासून साहित्याचा विचार निखळ कलावादी दृष्टिकोनातून होऊ लागला. मर्ढेकरोत्तर कालखंडात स्वतः मर्ढेकर, पु.शि.रेगे, वा. ल.कुळकर्णी, गंगाधर गाडगीळ, माधव आचवल, प्रभाकर पाध्ये आणि सुधीर रसाळ यांसारखे समीक्षक साहित्याचा कालावादी दृष्टिकोनातून गंभीरपणे विचार करू लागले. मराठीतील कलावादी समीक्षकांवर पाश्चात्त्य साहित्यशास्त्रातील इमॅन्युअल कांट आणि विश्वचैतन्यवादी विचारवंत यांचा प्रामुख्याने प्रभाव दिसतो.

डॉ. सुधीर रसाळ यांच्या वाङ्मयीन भूमिकेवर सुरुवातीच्या काळात मराठीतील गंगाधर गाडगीळ आणि वा.ल. कुळकर्णी यांच्या विचारांचा प्रभाव जाणवतो. नंतर अमेरिकेत विसाव्या शतकाच्या मध्यावधी कालखंडात उदयास आलेल्या ‘न्यू क्रिटीसिझम’ (नवी टीका) या  रूपवादी चळवळीचा प्रभाव पडलेला दिसून येतो.  न्यू क्रिटिसिझम या चळवळीचे नाव जॉन क्रो  रॅन्सम यांच्या 1941 च्या ‘द न्यू क्रिटिक्स’ या पुस्तकावरून पडले आहे. आय. ए. रिचर्ड्स, क्लींथ ब्रुक्स, जॉन क्रो, डब्ल्यू के विमसॅट आणि मोनरो ब्रियर्डस्ली हे न्यू क्रिटीसिझमच्या चळवळीतील  प्रमुख विचारवंत होते.  साहित्याचे कार्य एक स्वयंपूर्ण एक सौंदर्यात्म वस्तू म्हणून कसे करते हे शोधण्यासाठी त्यांनी कवितेचे बारकाईने वाचन करण्यावर भर दिला. ही समीक्षापद्धती साहित्यकृतीचा अर्थ समजून घेण्यासाठी केवळ ग्रंथाच्या अंतर्गत रचनेवर लक्ष केंद्रित करते. लेखक, इतिहास, समाज यांसारख्या बाह्य घटकांना ती महत्त्व देत नाही. भाषेतील गुंतागुंत, विरोधाभास आणि संदिग्धता यांचा ती बारकाईने अभ्यास करते. या पद्धतीचा मुख उद्देश साहित्यकृतीला एक स्वयंपूर्ण स्वतंत्र कलाकृती मानून तिचे विश्लेषण करणे  हा होता. या सर्वांच्या संस्कारातून सुधीर रसाळ यांची वाङ्मयीन भूमिका तयार झाली आहे.

1950 च्या दशकाच्या अखेरीस रसाळ यांचा पहिला समीक्षालेख प्रसिद्ध झाला. या लेखातून प्रकट झालेली त्यांची साहित्य विषयक सिद्धान्ताधिष्ठित भूमिका अधिक प्रगल्भ होत गेली ती जानेवारी 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘सांस्कृतिक आक्रमण आणि मराठी कादंबरी’ या ग्रंथातील समीक्षालेखनापर्यंत टिकून राहिलेली दिसते. सैद्धान्तिक लेखनाचे सातत्य त्यांच्या सर्व ग्रंथातून प्रत्ययाला येते. एखाद्या व्यक्तीच्या मनोभूमिकेत कालांतराने बदल होण्याची शक्यता असते. मात्र सुधीर रसाळ यांची भूमिका अविचल राहिली. सुधीर रसाळ यांचे महाविद्यालयीन शिक्षक हे बहुतांशी जीवनवादी होते. मात्र सुधीर रसाळ यांच्यावर स्वातंत्र्योत्तर काळातील नवकथा आणि गंगाधर गाडगीळ यांची समीक्षा यांचा प्रभाव अधिक राहिला. कलावादी भूमिकेत काही उणिवा असल्या तरी वाङ्मय व कला यांचा विचार सौंदर्यमूल्याच्या संदर्भातच केला गेला पाहिजे आणि कलाकृती म्हणूनच कलाकृतीला स्वीकारले पाहिजे, असे त्यांचे स्पष्ट मत आहे . कलाकृती ही सौंदर्यनिर्मिती आणि सौंदर्यप्रत्यय देत असली तरी तिला इतर अंगेही असू शकतात आणि त्यांचे संस्कार आपल्यावर होऊ शकतात. परंतु हे संस्कार करणं हे त्या कलाकृतीचे उद्दिष्ट असू शकत नाही असे ते आग्रहाने आजही मांडतात. समीक्षेची निर्मितिप्रक्रिया सांगताना ते म्हणतात, “माझा विचार अंतर्गतदृष्ट्या सुसंगत असतो त्याचा  तात्त्विक समीक्षेकडून वाङ्मयाकडे नव्हे तर वाङ्मयाकडून तात्त्विक समीक्षेकडे प्रवास होत असतो. किंबहुना हा प्रवास दुहेरी असतो. एकीकडे तात्त्विक समीक्षा तुम्हाला मदत करीत असते. तर दुसरीकडे तिला आव्हान देणारी कलाकृती तुमच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवून आणत असते. या पद्धतीने प्रत्येक समीक्षकाचा समीक्षाविचार सिद्ध होत असतो. ही प्रक्रिया ज्या समीक्षाकाबाबत थांबते तो समीक्षक म्हणूनही थांबलेला असतो”. यातून समीक्षेतून निकष जसे सिद्ध होतात तसेच श्रेष्ठ दर्जाची साहित्यकृती चांगल्या साहित्यकृतीचे  निकष समीक्षेला देत असते, हे डॉ.रसाळ सुचवितात. गंगाधर गाडगीळ यांच्या संदर्भात लिहिताना स्वायत्ततावाद आणि कलावाद या दोन वेगळ्या संकल्पना ते मांडतात. त्यांच्या मते स्वायत्ततावादामध्ये अशी भूमिका घेतली जाऊ शकते की, वाङ्मय हे एकप्रकारचं सत्य असतं, वाड्मयामध्ये नैतिकता असू शकते. वाड्मयामध्ये जीवनाचा अर्थपूर्ण असे दर्शन घडवलं जाऊ शकतं आणि तरीही वाङ्मय हे स्वायत्त असतं. अमेरिकेतील न्यू क्रिटिसिझमच्या चळवळीतील साहित्यविचार जसा रसाळ यांना योग्य वाटतो तसाच गंगाधर गाडगीळांचा आशयाला महत्त्व देऊन मांडलेला कलावादी विचारही त्यांना योग्य वाटतो. अशी भूमिका स्वीकारून रसाळांनी केलेले समीक्षालेखन आपल्या वेगळेपणाने नजरेस भरते. डॉ. रसाळ यांची भूमिका जिला ते स्वायत्ततावादी भूमिका म्हणतात तिचे वेगळेपण असे की सामाजिकता आणि कलावाद या भूमिका तिला परस्परविरोधी वाटत नाहीत. डॉ. सुधीर रसाळ यांची ही भूमिका ललित साहित्याला योग्य न्याय देणारी भूमिका आहे, याचा प्रत्यय येत राहतो.

—-*—–

‘संवादातून साहित्यशोध’ या प्रा.बाळकृष्ण कवठेकर आणि लता मोहरीर यांनी संपादित केलेल्या डॉ. सुधीर रसाळ यांच्या मुलाखतींच्या संग्रहाचा प्रकाशन समारंभ छ. संभाजीनगर येथे रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्त डॉ. सुधीर रसाळ यांच्या वाङ्मयीन भूमिकेचा डॉ. वि.दा. वासमकर यांनी घेतलेला शोध.

—-+—-

© डाॅ. विष्णू वासमकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पु. लं. चे एक अप्रतिम व्यक्तिचित्र… विनोददा… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ पु. लं. चे एक अप्रतिम व्यक्तिचित्र… विनोददा… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

पुलंचे एक अप्रतिम व्यक्तीचित्र – विनोद दा

पुलंच्या सिद्धहस्त लेखणीतून जे जे काही कागदावर उतरले, ते ते अजरामर झाले असेच म्हणावे लागेल. पुलंच्या अनेक व्यक्तीचित्रांशी आपण परिचित असतो. नारायण, हरीतात्या, सखाराम गटणे, अण्णा वडगावकर, चितळे मास्तर, नामू परिट यासारख्या त्यांच्या अनेक व्यक्तीचित्रांशी मराठी माणसाचे हृदयाचे नाते जुळले आहे. ही माणसे आपल्याला आपल्यातीलच एक वाटतात. हे त्यांचे शब्दचित्र रेखाटतानाचे कौशल्य आहे. त्या कथा वाचताना किंवा पुलंच्या तोंडून ऐकताना, ती माणसे अक्षरशः जिवंत होतात आणि आपल्या मनात कायमचे स्थान पटकावतात. पुलंच्या सिद्धहस्त लेखणीचा परिसस्पर्श ज्या ज्या विषयांना झाला, त्यांचे सोने झाले. त्यांचे असेच एक फारसे परिचित नसलेले व्यक्तीचित्र आज आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.

हे व्यक्तिचित्र आहे विनोद दांचे. ‘ वंगचित्रे ‘ हे त्यांचे पुस्तक वाचत असताना हे विनोद दा आपल्याला भेटतात आणि कायमचे आपल्या हृदयात स्थान मिळवतात. आपल्याकडे आपण आपल्यापेक्षा वयाने जेष्ठ असलेल्या व्यक्तीला दादा असे सर्वसाधारणपणे म्हणतो. परंतु बंगालमध्ये साधारणपणे ‘ दा ‘असे म्हणण्याचा प्रघात आहे. ‘ दा ‘ शब्दच कानाला किती गोड लागतो !

वयाची पन्नाशी उलटल्यानंतर पु ल देशपांडे १९७० मध्ये शांतिनिकेतनला गेले. तिथे अनेक दिवस राहिले आणि बंगाली भाषा त्यांनी उत्तम प्रकारे आत्मसात केली. रवींद्रनाथ टागोरांच्या ‘ गीतांजली’ चा अनुवाद करणारे वामन मंगेश दुभाषी उर्फ ‘ ऋग्वेदी ‘ हे पुलंचे आजोळचे आजोबा. त्यांच्याकडूनच रवींद्रनाथ टागोरांचे साहित्य आणि बंगाली भाषेची आवड पुलंकडे आली. कोणतीही भाषा शिकायची तर ती जिथे बोलली जात असते तिथे जाऊन अनुभवावी, तिच्या विविध रूपांचा आस्वाद घ्यावा आणि त्यातून ती शिकावी अशी त्यांची धारणा होती. त्याप्रमाणेच पुलं शांतिनिकेतनात राहिले. ते कोलकात्यासारख्या शहरात राहिले तसेच बंगालमधील खेड्यापाड्यांमधूनही हिंडले. त्यातूनच त्यांचे ‘ वंगचित्रे ‘ हे पुस्तक साकार झाले आहे. या पुस्तकातीलच एक प्रसंग आणि हे एक व्यक्तीचित्र आहे.

आपल्या शांतिनिकेतनमधील वास्तव्यात पुलंनी तिथली भाषा, संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एखाद्या ठिकाणी काही दिवस वास्तव्य केल्याशिवाय तेथील संस्कृती खऱ्या अर्थाने कळत नाही. पुलंनी शांतिनिकेतनमध्ये बराच काळ वास्तव्य केले. त्यातूनच त्यांची ‘ मुक्काम शांतिनिकेतन ‘ आणि ‘ वंगचित्रे ‘ ही पुस्तके जन्माला आली. अशाच एका प्रसंगी ते शांतीनिकेतनमध्ये हिंडत असताना कलाभवनातल्या बंगलीवजा वसतिगृहातल्या छतावर त्यांनी सुंदर म्युरल्स पाहिली. ती पाहिल्यानंतर त्यांच्याबरोबर असलेल्या सलील यांना त्यांनी त्याबद्दल विचारले. तेव्हा सलील यांनी ती म्युरल्स विनोद – दांनी काढली असे सांगितले. त्या उत्सुकतेपोटी पुलं आणि सलील विनोद दा यांना भेटायला गेले आणि मग त्या प्रसंगाचे सजीव चित्रणच पुलं यांनी केले आहे. तो प्रसंग आणि ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभे करण्याची ताकद पुलंच्या शब्दांमध्ये आहे.

विनोद दा ज्या वातावरणात बसले होते, त्याचं हे बोलकं चित्रण त्यांच्याच शब्दात…!

“अंधारातच दार उघडले गेले. हा चित्रकार अंधारात का बसला होता ते मला कळेना. तेवढ्यात एक मोलकरीण आली आणि तिने बटण ओढून दिवा लावला. काळोखातल्या रंगमंचावर प्रकाश पडावा आणि एकदम अनपेक्षित अशा प्रकारच्या देखाव्याने चकित व्हावे तसे मला झाले. एका ईझीचेअरवर काळा चष्मा घालून एक अतिशय सौम्यदर्शन वृद्ध गृहस्थ बसले होते. बराच वेळ ते तिथे बसलेले असावेत. समोर एक लहानशी तिपाई होती. तिच्यावर वीत सव्वावीत उंचीची एक मातीची मूर्ती घडत होती. बाजूला मातीचा गोळा होता. त्यामुळे अंधारातच ही शिल्पकलेची आराधना चाललेली असावी. भिंतीवर नाना प्रकारची चित्रे होती. आणि फडताळ पुस्तकांनी भरलेले होते…”

हे गृहस्थ म्हणजेच सुंदर म्युरल्स तयार करणारे सुंदर चित्रे काढणारे विनोद दा. त्यांनी सलील आणि पुलंची चौकशी केली. त्यांच्याबद्दल बोलताना पुढे पुलं लिहितात…

“मी त्याच्याकडे पाहण्यातच गर्क होतो. किती विलक्षण प्रसन्न व्यक्तिमत्व ! बोलणं तर खडीसाखरेसारखं.  तप: पूत चेहरा. डोक्यावर पांढरे शुभ्र केस, सडसडीत देहयष्टी. अंगात शुभ्र कुडता, पायजमा. दोन-चार मिनिटातच मला त्यांच्या अंधत्वाचा विसर पडला. मी सहज त्यांनी केलेल्या म्युरल्सविषयी बोलणे काढले.

विनोद दा म्हणाले, ‘ खूप वर्षे झाली त्या म्युरल्सला. त्यावेळी थोडे थोडे दिसत असे मला. ‘  मग मला कळले की चित्रकलेचे वेड आणि डोळ्यांचे अधूपण घेऊनच विनोद दांनी जगात प्रवेश केला. कागदाच्या अगदी जवळ डोळे नेल्याशिवाय त्यांना दिसत नव्हते. त्याकाळी कुठलीही चित्रशाळा त्यांना प्रवेश देत नव्हती. तसल्या त्या अधूदृष्टीच्या बालचित्रकाराला सरकारी चित्र शाळेचे दरवाजे बंद होते.”

येथे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची महानता आणि द्रष्टेपण आपल्याला कळते. ” गुरुदेवांनी या मुलाची प्रतिभा पाहिली आणि त्याला जवळ घेतले. चित्रशाळा फक्त नियम जाणत होत्या. टागोरांना या मुलाच्या अधू डोळ्यातले तेज दिसत होते. त्यांनी त्याला रंग आणून दिले, कुंचले दिले आणि सांगितले,’ काढ तुला हवी तेवढी चित्रे. ‘ गुरुदेवांचा आधार लाभला नसता तर कुठली चित्रे काढणार होतो मी…! असे भावपूर्ण उद्गार विनोद दांनी काढले. “

त्यांच्याबद्दल बोलताना पुढे पुलं लिहितात,” सत्तरीच्या घरातल्या वृद्धाकडून ते वाक्य ऐकताना काळजाचे पाणी झाले. सहा चौरस इंचाहून एका दमात अधिक पृष्ठभाग दिसू न शकणारे विनोद दा. त्यांनी मुकाबला घेतला तो विस्तीर्ण भिंतीशी त्या विस्ताराच्या इंचा इंचात डोळा घालून त्यांनी भव्य म्युरल्स उभे केले. सलीलच्या वडिलांनीच त्यांना लहानपणी गुरुदेवांपुढे आणल्यामुळे घोष कुटुंबावर त्यांचा विशेष लोभ. अनेक गोष्टी सांगत होते. मात्र गोष्टीवेल्हाळपणा नव्हता. बोलणे ही लोभस असून रेखीव. विनोद दा म्हणजे शांतिनिकेतनातल्या गेल्या ३०/४० वर्षातल्या कलासाधनेचा चालता बोलता इतिहास आहे. केवळ चित्रकलाच नव्हे तर महाभारत, रामायण या महाकाव्यांचा त्यांनी खूप बारकाईने अभ्यास केला आहे. शांतिनिकेतनातल्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आठवणी ऐकताना वाटत होते की केवळ कुंचल्यानेच नव्हे तर लेखणीने देखील हा माणूस काय सुरेख व्यक्तिचित्रे काढू शकला असता !”

“पूर्वी डोळे कागदाजवळ नेऊन का होईना पण दिसत होते. आता संपूर्ण अंधत्व. पण या अंधारात त्यांच्या प्रज्ञाचक्षुंपुढे आजही रंगरेषांचे विलास चालू असतात. आता त्यांनी शिल्पकलेशी मैत्री जमवली आहे. स्पर्शातून आकाराचा अंदाज घेत छोटी छोटी मृत्तिका शिल्पे घडवीत असत. दिवस आणि रात्र यांच्यात आता अभेद आहे. आता रात्र झाल्यावर झोपलेच पाहिजे ही सक्ती नाही आणि दिवसा काम केलेच पाहिजे ही देखील सक्ती नाही. आता मानू ती वेळ !”

पुढे एके दिवशी पुलंना कलाभवनाच्या वाटेवर विद्यार्थ्यांचा एक घोळका आढळला. ती मुले रंगसाहित्य घेऊन धावपळ करीत होती. पुलंनी थांबून पाहिले तर एका भिंतीपाशी विनोद दा उभे. भिंत हाताने चाचपीत म्हणायचे, ‘ इथे. ‘ बंगालीत विद्यार्थ्यांना छात्रच म्हणतात. मग एखादा छात्र किंवा छात्री तिथे वर्तमानपत्राचा एक कपटा चिकटवीत असे. पुन्हा विनोद दा भिंत चाचपीत म्हणायचे, ‘ इथे ‘. मग तिथे एक कपटा. असे काही कपटे चिकटवल्यावर विनोद दांनी हाताने त्या जागांना स्पर्श केला. एका शिष्याकडून खडू मागून घेतला आणि भिंतीवरच्या त्या कपट्यांना स्पर्श करीत सरसर सरसर रेखाकृती काढायला सुरुवात केली. केवळ स्पर्शाच्या आधाराने रेखली जाणारी ती चित्रे मुले मुली श्वास कोंडून पाहत होती. रेषा काढणाऱ्या त्या हातांना केवळ तपस्येतूनच मिळणाऱ्या आत्मविश्वासाचे वरदान होते. रेषा कुठे कापत नव्हती. थरथरत नव्हती. धीट रेषा, हातातले सामर्थ्य दाखवणाऱ्या रेषा. मनात रंगलेला चित्रपट इतका स्पष्ट होता की तो भिंतीवर रेखताना त्या भिंतीकडे डोळ्यांना दिसत असले तरी पाहण्याची गरज नसावी. तयार सतारियाची बोटे जशी पडद्याकडे न पाहता त्याच जागी पडतात त्याप्रमाणे त्या चित्राविषयी च्या चतु:सीमा स्पर्शून झाल्यावर प्रमाणबद्धतेत सुताइतकाही फरक नव्हता. लता मंगेशकरला जसे चेष्टेत सुद्धा बेसूर होणे अशक्य तसे विनोद दांच्या बोटांना प्रमाणहीन रेखाटन अशक्य. हाताच्या त्या हमखास हालचालीकडे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या त्या चित्रबंधाकडे मी अवाक् होऊन पाहत होतो. डोळ्यापुढे सदैव अंधाराचा पट असताना प्रकाशाची उपासना करणारा हा चित्रकार – चित्रकार कसला ? चित्रयोगी ! वार्धक्य, अंधत्व यांना परौते सरा असे म्हणणारा ! नव्या नव्या कल्पनांचे स्वागत करणारा ! पुढे पुलं म्हणतात, ” रवींद्रनाथांनी आपल्या बगीच्यात अशी ही अलौकिक रोपटी आणून लावली. त्याचे किती सुंदर वृक्ष झाले ! त्यातले आज काळाने काही नष्ट केले. पण जे काही आहेत त्यांच्या सावलीला मात्र पुन्हा पुन्हा जावेसे वाटते. “

धन्य आहेत ते अशी सुंदर शब्दचित्रे रेखाटणारे पुलं, सुंदर म्युरल्स आणि चित्रे काढणारे विनोद दा आणि अशा व्यक्तींच्या जीवनाला आकार देणारे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. या सर्वांना मनोमन प्रणाम !

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सौभाग्य…“☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? विविधा ?

☆ सौभाग्य… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

☆

“एका स्त्रीचं सौंदर्य म्हणजे सौभाग्य”…

आज काल सौभाग्यच लेणं म्हणजे डेड फॅशन मानलं जात…

“बंधन नको मोकळीक हवी असते… साडी सौभाग्याचं लेणं नको वाटतं…

“भारतीय परंपरा नको, वेस्टर्न फॅशन वाटतीय “…

पण, सौभाग्य म्हणजे काय हे तिला विचारा जे तिच्याकडून हिरवलं जात…

“स्त्रीचं सौंदर्य म्हणजे कपाळावरील कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या, पायात पैंजण, बोटात जोडवी “…

किती खुलेलं रूप असतं रंग कोणताही असो तिचं सौंदर्य उठून दिसतं…

“कसं कळेल आजच्या पिढीला. का पूर्वीच्या आई सारखं परंपरेच महत्व पटवल्या जात नाही “…

हातात बांगडी नसते, आई म्हणते माझ्या मुलीला बांगड्या आवडतं नाही. माझ्या मुलीला मी बंधनात अडकवलं नाही, तुझ्या इच्छेप्रमाणे तू जग असं शिकवलं, अग बाई पण,

हे बंधन नाही सौंदर्य आहे.

“शिकली मोठी झाली मोठ्या नोकरीला लागली म्हणजे तू स्त्री म्हणून बदलत नाही स्त्रीचं असते ना, मग सौभाग्य अलंकार घालून सौंदर्य वाढव ना…

ड्रेस मध्ये कंफर्टेबल वाटतं, हातात बंगडया असल्यामुळे काम सुचत नाही. हे ऐकायला मिळतं कारण खूप आहेत… मूर्ख आहेत स्वतःच सौंदर्य स्वतः खराब करून पुरुषां सारखं रहात आहेत..

असो, ” ज्या स्त्रीचं सौंदर्य गेलं तिला किती त्रास होतो.

“तिचा जेंव्हा पती जातो, तिला “विधवा” म्हणून हिणवलं जातं…

तिचा राग, राग केला जातो, तिला शुभकार्याला बोलवलं जातं नाही, , तिला किती वेदना होत असतील?

याचा विचार कुणी करत का?

“खरी ती विधवा नसते तर “अर्ध मेलेली असते”… कारण, तिचं हृदय मेलेलं असत तिने तिचं हृदय लग्नातच पतीला दिलेलं असतं, पती गेल्यावर ती मरते पतीचं हृदय तिच्यात धडधड करत असतं..

पतीच्या मातीच्या वेळी तिचं सौंदर्य काढून घेतल्या जातं यात तिचा काय दोष असतो…

किती वेदना होत असतील जेंव्हा मंगळसूत्र काढल्या जातं…

पायातील जोडवी काढले जातात…

हातातील बांगड्या वाढवल्या जातात…

आणि हे सौंदर्य काढून घेणारी स्त्रीचं असते…

आई, बहीण, नणंद किंवा अजून कोणी विधवा…

अशावेळी सौंदर्य काढून घेता ना मग सौभाग्य कशात आहे ते वेळेत का शिकवत नाही…

बांगडी ची किंमत कळते जेंव्हा स्मशानात हातातील बांगडी काढून घेतली जाते…

जोडव्याची किंमत कळते जेंव्हा जोडवी पतीच्या चितेत फेकली जातात.

मंगळसूत्रची किंमत कळते जेंव्हा एवढ्या गर्दीत ते काढून घेतलं जातं…

“तेंव्हाच स्त्रीची खूप मोठी हार असते जरी ती मोठी क्लासवन असली तरीही”

लाखो रुपये खर्चून लग्न लावून देता पण फॅशन च्या नावाखाली..

आभूषण नको असतात म्हणून आम्हाला आवडतं नाही सांगत बंधन नको असतं…

“त्याचं अभूषणांच महत्व आई ने पटवून दिले तर स्त्रीचं खरं सौंदर्य जपता येईल असं वाटत नाही का?

स्त्रीच सौंदर्य साडीतच आहे कशीही असली तरी सुदंर दिसते…

“पती आहे तोपर्यंत स्त्री जिवंत असते,,,, तेंव्हाच जगून घ्या नंतर काही उपयोग नाही….

हातात बांगड्या, पायात जोडवी, गळ्यात मंगळसूत्र, कपाळी कुंकू,,,,,

नंतर कितीही घालावं वाटलं तरी घालू शकणार नाही…

वेळीच महत्व समजून घ्या,,, शिक्षण परंपरा हिसकावून घेत आहे… वेळीच सावरा… तुमचं सौंदर्य जपा…

सरासरी हातात बांगडी घालायची नाही किंवा गोट घालायचे आम्हाला बांगडी आवडतं नाही असं म्हणतात,,,,, त्यावेळी सांगावं वाटतं अग बाई हीच बांगडी हातातून काढतात तेंव्हा कळतं,,, पण वेळ गेलेली असते….

जेंव्हा हळदी कुंकू कार्यक्रम असतो आपल्याचं घरातील सुवासिनी हळदी कुंकू करतात तेंव्हा हळदी कुंकवाच महत्व काय असतं ते कळतं…

“संक्रांतीला हळदी कुंकू देवाला ववसा देणं सुवासिनीच असत…

ते फक्त सुवासिनीने करायचं असं का?

विधवा स्त्रीच्या हृदयात तिच्या पतीचं हृदय धडधड करत असतं मग तिने का नाही तिच्या पतीच्या फोटोला वसा अर्पण करायचा? तिच्या हृदयात पती कायम जिवंत असतो मग तिला का नकारायचं…

“वेळीच सावरा फॅशन च्या नावाखाली सुवासिनी म्हणून जगायचं विसरून चालणार नाही…

बाहेरील सौंदर्यापेक्षा आतील सौंदर्यला महत्व दया परंपरा जपा,,,, सौंदर्य टिकवा….

☆

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जादू ssss तेरी नजर, खुशबू तेरा ssss बदन, तूं हां… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

🤠 जादू ssss तेरी नजर, खुशबू तेरा ssss बदन, तूं हां… 👀👁️💩 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“जादू ssss तेरी नजर, खुशबू तेरा ssss बदन, तूं हां… “

सॉरी, सॉरी, मंडळी, माफ करा मला! आपण म्हणाल यात माफी मागण्या सारखं तुम्ही काय केलंय, म्हणून माफी मागताय ?  सांगतो, सांगतो मंडळी. त्याचं काय आहे ना, मला खरं तर “जादू तेरी नजर” या मतकरींच्या एका नाटकाच्या नावाने आजच्या लेखाची सुरवात करायची होती. पण वरच्या गाण्याच्या ओळींची “जादू” आज इतक्यावर्षांनी देखील, माझ्यासकट तमाम रसिकांवर त्या गाण्यातील शब्दांचे असं काही गारुड करून बसली आहे, की त्याची पुढची ओळ माझ्या हातून आपोआपच लिहिली गेली हे मी मान्य करतो आणि त्यासाठी मी तुमची माफी मागितली! चला, म्हणजे एका अर्थाने लेखाच्या सुरवातीलाच एखाद्या गाण्याची अनेक तपानंतर सुद्धा आपल्यावर कशी “जादू” शिल्लक असते, हा एक मुद्दा निकालात निघाला! अर्थात ते गाणं त्यातील शब्दांमुळे, संगीतामुळे, का ज्या कलाकारांवर ते चित्रित झालं आहे त्यांच्यामुळे, कां अजून कोणत्या गोष्टींमुळे रसिकांच्या मनावर आजतागायत जादू करून आहे हा वादाचा विषय होऊ शकतो, यात वादच नाही. पण असं जरी असलं, तरी त्या गाण्याच्या जादूची मोहिनी आजच्या घडीपर्यंत टिकून आहे, हे आपण या लेखाद्वारे मी तुमच्यावर कुठल्याही प्रकारची शब्दांची जादू न करता सुद्धा मान्य कराल! असो!

वाचकहो आपली माफी मागितल्या मागितल्या, मला एका गोष्टीची मनांत मात्र नक्की खात्री वाटत्ये आणि ती म्हणजे, आपण सुद्धा वरील गाण्याची पाहिली ओळ वाचताच, लगेच दुसरी ओळ मनांत नक्कीच गुणगुणली असेल, हॊ का नाही ? खरं सांगा! बघा, मी जादूगार नसलो तरी “माझ्या” वाचकांच्या मनांत नक्की काय चाललं असेल ते ओळखण्याइतका मनकवडा जादूगार नक्कीच झालोय, असं लगेच माझं मीच म्हणून घेतो. दुसरं असं, की माझ्या मनावर अजून जरी जुन्या अनेकानेक अजरामर हिंदी गाण्यांची कितीही जादू असली आणि हिंदी आपली राष्ट्रभाषा असली तरी राष्ट्रभाषेत लेख लिहिण्याइतकी काही त्या भाषेची माझ्यावर जादू झालेली नाही, हे मी मान्य करतो! त्यामुळे आता या वयात अंगात नसलेली एखादी कला, कोणा जादूगाराच्या जादूने अंगी बाणेल मग मी आपल्या राष्ट्र भाषेत एखादा लेख लिहीन यावर माझा 101% विश्वास नाही! पण हां, स्टेजवरचे जादूचे प्रयोग पहात असतांना हे सगळं खोटं आहे हे मनांला ठामपणे माहित असतांना देखील, माझे डोळे (चष्मा लावून सुद्धा) मात्र त्यावर विश्वास ठेवतात हे मात्र १००% खरंय. म्हणजे असं बघा, रिकाम्या नळकांड्यातून फुलांचा गुच्छ काढणे, तर कधी पांढरे धोप कबुतर! तर कधी टेबलावर झोपलेल्या माणसाच्या शरीरारचे तीन तुकडे करणे, ते परत जोडणे, असे नाना खेळ करून तो जादूगार लोकांचे मनोरंजन करत असतो. मला असं वाटतं की “जादू” या शब्दातच एक प्रकारची अशी “जादू” आहे जी सानथोरांना तो खेळ बघताना, अक्षरशः देहभान विसरायला लावून खिळवून ठेवते. एवढच नाही तर ज्या व्यक्तीला जादूगाराने एखाद्या खेळात आपल्या इंद्रजालाने वश केले आहे, त्या व्यक्तीला तर ती इतकी कह्यात ठेवते की त्या जादूगाराने “आज्ञा” करताच, ती व्यक्ती सफरचंद समजून, कच्चा बटाटा पण साऱ्या प्रेक्षकांसमोर मिटक्या मारीत आनंदाने खाते, हे आपण सुद्धा कधीतरी बघितलं असेल!

या दुनियेत जादूचा उगम कधी झाला, जगात पाहिली जादू कोणी, कोणाला आणि कोठे दाखवली असे साधे सोपे प्रश्न घेवून त्या प्रश्नांची मी उत्तर देईन अशी अपेक्षा हा लेख वाचतांना कोणा वाचकाने (लेख पूर्ण वाचणार असाल तर) कृपया ठेवू नये. कारण त्याची उत्तर द्यायला सध्याच्या विज्ञानयुगातला जागतिक कीर्तीचा “गुगल” नामक विश्व विख्यात जादूगार आपल्या खिशातच तर आहे मंडळी! पण हां, माझ्या आयुष्यात मी पाहिलेल्या पाहिल्या दोन जादू कोणत्या या प्रश्नाचं उत्तर मात्र मी तुम्हांला नक्कीच सांगू शकतो. किंबहुना मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेल्या दोन जादू, आपल्या पैकी माझ्या पिढीतील लोकांनी पाहिलेल्या त्यांच्या आयुष्यातल्या सुद्धा त्यांनी पाहिलेल्या पहिल्या दोन जादू असू शकतात, (आधीच वाक्य वाचून तुम्हांला थोडं गोंधळायला झालं असेल, तर बहुतेक तो माझ्या लिखाणावर झालेला आजच्या विषयाचा परिणाम असू शकतो) यावर माझा ठाम विश्वास आहे!

मंडळी, त्यातील पाहिली जादू म्हणजे आपल्या दादाने किंवा ताईने त्याच्या किंवा तिच्या मुठीत राहणारी लहान वस्तू उजव्या हाताने दूर फेकल्याचा अभिनय करून ती वस्तू आपण सांगताच आपल्याला लगेच दाखवणे आणि दुसरी जादू म्हणजे डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने कापणे! काय, बरोबर नां मंडळी?

लहानपणी डेव्हिड कॉपरफिल्ड नामक एका विदेशी जादूगाराचे एका पेक्षा एक विलक्षण जादूच्या प्रयोगाचे विडिओ बघून डोळे आणि डोकं अक्षरशः गरगरायला लागायचं! त्याच पाण्यावर चालणं काय, हवेत उडणं काय किंवा नायगाऱ्याच्या प्रचंड धबधब्यात पिंपात बसून उडी मारून परत काठावर प्रकट होणं काय! बापरे, ते त्याचे सारे जादूचे खेळ आज नुसते आठवले तरी अंगावर काटा येतो मंडळी!

आपल्या देशातसुद्धा तसे अनेक छोटे मोठे जादूगार होऊन गेले पण डेव्हिडशी तुलना करायची झाल्यास, पी सी सरकार, सिनियर आणि पी सी सरकार, ज्युनियर ही कलकत्याच्या पिता पुत्रांची नांव या संदर्भात प्रकर्षाने लगेच आठवतात. हात चालाखी हा सुद्धा वेगळ्या अर्थाने जादूचाच एखादा प्रकार आहे असं या क्षेत्रातले काही जाणकार म्हणतात. अर्थात त्यांना कधीतरी ट्रेन मधून प्रवास करतांना, बहुदा पगाराच्या दिवशी त्यांचा खिसा कोणी सराईत चोराने त्याचे हस्तलाघव दाखवून रिकामा केल्यामुळे ते तसं म्हणत असावेत. कारण घरी आल्यावर आपलं पाकीट गेलं आहे किंवा खिसा कापला गेला हे त्या माणसाला कळतं हे त्रिवार सत्य आहे! त्यामुळे त्या अदृश्य चोराच्या हातचालाखीला (कां स्वतःच्या बावळटपणाला?) तो वेगळ्या अर्थाने हाताच्या जादूची अर्थात हातचालाखीची उपमा देत असावा. मला स्वतःला जादू मधली तर सोडाच, पण साधी सुधी सुद्धा चलाखी कधी बहात्तर वर्ष्याच्या आयुष्यात जमली नाही! म्हणून मी कधी कधी स्वतःच स्वतःला (अर्थात मनातल्या मनात) फक्त चलाख म्हणून घेतो आणि स्वतःची पाठ, पाठीला हात पोहचत नाही म्हणून पुन्हा मनातल्या मनात थोपटून स्वतःचे समाधान करून घेतो.

आजच्या विज्ञानाने प्रगती करून AI नामक जो महान सर्वशक्तिमान असा जादूगार जन्माला घातला आहे त्याचे एक एक सर्वच क्षेत्रातले जादूचे प्रयोग बघून, मला पुढच्या पिढीची खरंच काळजी वाटायला लागली आहे. अर्थात जसा प्रत्येक नवीन शोधाचा (उधा. अणुशक्ती) चांगला आणि वाईट उपयोग करता येतो, तसा या AIच्या जादूचा सगळे जग चांगला उपयोग करू लागेल तो सुदिन म्हणायचा! तसेच या AIच्या जादूच्या प्रयोगावर आपण किती विश्वास ठेवायचा हे ज्याच त्यानं स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून, डोळे आणि कान उघडे ठेवून ठरवावं असं मला वाटतं.

माझे जन्मापासूनचे आजतागायतचे आयुष्य शहरात गेल्यामुळे, “काळी जादू” किंवा “चेटुक” या विषयात एखाद्या “गाववाल्याचे” जेवढे “ज्ञान” (का अज्ञान ?) आहे, त्याच्या ते 0. 001% सुद्धा नाही. त्यामुळे या विषयावर मी काही बोलणं अथवा लिहिणं हा या विषयात स्वतःला तज्ञ समजणाऱ्या एखाद्या “गाववाल्याचा” अपमान होऊ शकतो. म्हणून उगाच त्या तथाकथीत जादूच्या उप शाखेला कोणत्याही तऱ्हेनं स्पर्श नं केलेलाच बरा. शिवाय माझा हा लेख अशा एखाद्या तज्ञ गाववाल्याने “चुकून” वाचलाच, तर त्याला आलेल्या रागापोटी तो माझ्यावर एखादं “लिंबू” फिरवायचा! उगाच नको ती रिस्क आता या वयात कशाला घ्या ?

मंडळी शेवटी एकच सांगतो, माझा सुद्धा जादूवर विश्वास आहे पण ती जादू करणारा सर्वशक्तिमान जादूगार हा वर बसलेला आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे! आपल्या आयुष्यात वेळोवेळी निरनिराळे खेळ करून “तो” आपल्याला दाखवत असतो! त्यातील त्याच्या कुठल्या खेळाला आपण टाळी वाजवायची, कुठला खेळ दाखवल्याबद्दल त्याचे मनापासून आभार मानायचे किंवा कुठल्या खेळातून काय बोध घेवून पुढे जायचं, हे ज्याचं त्यानं ठरवायचे! तर अशा त्या सर्व शक्तिमान जादूगाराने आपल्याला दाखवलेल्या नानाविध खेळांचे वेळोवेळी अन्वयार्थ लावायची शक्ती, तो जादूगारच आपल्या सगळ्यांना देवो हीच सदिच्छा!

शुभं भवतु!

 © प्रमोद वामन वर्तक

०८-१२-२०२५

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ८३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ८३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- दिवसभराची सगळी कामं मार्गी लावून खूप थकल्यानंतर संध्याकाळी उशीरा मी वखरेसाहेबांच्या केबिनमधे गेलो ते उद्या सकाळी सहस्त्रबुद्धेंना भेटायला जाईन तेव्हा तिथं जे सांगायचं ते मनाशी ठरवूनच. पण… मी जे ठरवलं होतं ते वखरेसाहेबांना योग्य वाटेल? कारण ते अंमलात आणायचं तर त्याची थोडी झळ प्रभूदेसाईनाही लागणार होतीच. ते वखरेसाहेबांना योग्य वाटलं नाही तर? …)

“सर, उद्या सकाळी सहस्त्रबुध्देंना ठरल्याप्रमाणे भेटायला जाईन तेव्हा त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन आपण प्रभूदेसाईंच्या विरुद्ध नेमकी काय कार्यवाही करणार आहोत हे त्यांना सांगावं लागेल, जेणेकरून त्यांच्या तक्रारीची आपण निदान दखल तरी घेतलीय असं होईल

त्याशिवाय… “

वखरेसाहेब विचारात पडल्याचे जाणवताच मी क्षणभर स्तब्ध झालो.

“तक्रारीबाबत प्रभूदेसाईंचं नेमकं काय म्हणणं आहे ते सांगायची निदान एक तरी संधी त्यांना द्यायला हवी ना पण? ” वखरेसाहेब म्हणाले.

” हो. हे मलाही मान्य आहे. पण आता ती वेळ निघून गेलीय. आपल्यापुरतं बोलायचं तर या न वर्षात त्यांना तशी संधीच दिली नसेल असं मला नाही वाटत. फाईलवर जरी तसं दिसत नसलं तरी त्यांना याची पूर्वकल्पना होती हे नक्की. शिवाय या संदर्भातलं सगळं प्रोसिजर तंतोतंत पूर्ण करण्याइतका वेळ, हा विषय तातडीने मिटवायचा तर आपल्याजवळ नाहीये. त्यातूनही आपण आत्ता त्यांना लेखी जाब विचारला तर ते त्याला आक्षेपही घेऊ शकतील. तक्रारीत नमूद केलेलं सगळं खोटं आहे असंही म्हणू शकतील. आणि मग तक्रार मागे घेण्यासंबंधीचे सगळेच मार्ग आपणच आपल्या हाताने बंद केल्यासारखे होईल. आज या क्षणी निकड आहे ती सहस्त्रबुद्धे आजोबांनी ती तक्रार लेखी मागे घेण्याची. “

“पण त्यामुळे ऑफिसर्स युनियनची यात इन्व्हाॅलमेंट झाली तर हे प्रकरण अधिकच चिघळेल त्याचं काय? “

“तुम्ही इथे डी. जी. एम् असताना प्रभूदेसाई युनियन मार्फत दाद मागतील असं मला नाही वाटत. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यापूर्वी तुम्ही त्यांना समजावून सांगितलंत तर प्रसंगाचं गांभीर्य ओळखून तरी ते तुमचं ऐकतील असं मला वाटतं. ” मी म्हणालो. ते थोडे विचारात पडले.

“ते तर आहेच. बरं मग तुम्ही सहस्त्रबुध्देंना काय सांगायचं ठरवलंय? ” त्यांनी विचारलं.

प्रश्न थेट होता. माझ्याजवळ उत्तरही होतं. पण तरीही सहस्त्रबुद्धेंचा अंदाज घेतल्याशिवाय आपली पानं आत्ताच उघड करायला नको असं मला वाटलं. कारण त्याला अनुसरून वखरेसाहेबांनी प्रभूदेसाईंना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि त्याला प्रभूदेसाईंनी नाराजी दाखवून विरोध केला तर? विषाची परीक्षा न बघता याक्षणी मौन पाळणंच मला योग्य वाटलं.

“सहस्त्रबुद्धेंचा कल पाहून जे प्रॅक्टिकल असेल तेच करायचं तरीही कुठल्याही परिस्थितीत टोकाची तडजोड करायची नाही एवढंच मी ठरवलंय. ” मी म्हणालो, “आपला हात दगडाखाली सापडल्याचं जाणवून न देता सहस्त्रबुध्देंना कसं समजवायचं ते मी पाहिन. ” मी आश्वासन दिलं. आता यापुढं सारासार विचार करून आपल्या अधिकारात जे शक्य आहे ते करून मोकळं व्हायचं हे मनोमन ठरवून टाकलं आणि हा विषय तिथंच संपवला.

आता उद्या सकाळी सहस्त्रबुद्धेंच्या घरी जाऊ तेव्हा ‘त्या’ला साक्षी ठेवून सारासार विचार करून जे योग्य वाटेल ते करायचे हे ठरवल्यामुळे त्या रात्री मन अस्वस्थ नव्हतं. तरीही शांत झोप लागली नाहीच.

दुसऱ्या दिवशी सकाळी सहस्त्रबुद्धे आजोबांनी माझं हसतमुखाने स्वागत केलं तेव्हा मात्र काल सहजसोपं वाटणारं सगळं अवघडच वाटलं क्षणभर.

“आजोबा,… ” मी शब्द जुळवू लागलो.. “काल साहेबांशी सगळी चर्चा करून मी आलोय. स्वत:शी प्रामाणिक राहून जे करणे शक्य आहे ते करायचं असं आम्ही ठरवलंय. ही तक्रार लेखी स्वरूपात करण्यामागची तुमची भावना मी समजू शकतो. प्रभूदेसाई यांच्याकडून झालेला तुमचा अपमान आणि अनादर माझ्यासाठी अतिशय क्लेशकारक आणि असमर्थनीय आहे. खरंतर या चुकीला क्षमा नाही असंच मला वाटतं. तरीही कोणताही निर्णय घेताना भावनेपेक्षा त्यासंबंधीचे नियम आणि व्यावहारिकता याच गोष्टींचा प्रामुख्याने विचार करणं आवश्यक आहे जे मला टाळता येणार नाही. निर्णय घ्यायची जबाबदारी पार पडताना आज मी या कात्रीत सापडलोय.

“मला कल्पना आहे याची. तुमच्या मर्यादेत राहून जे शक्य ते तुम्ही नक्की कराल याबद्दल मला खात्री आहे. तरीही माझी ही तक्रार तीन वर्षे दाबून कां ठेवली गेली होती? आणि याला जबाबदार कोण? या माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मात्र मला कधीच मिळणार नाहीयेत. ” आजोबा म्हणाले. त्यांचा आवाज भरून आला होता.

“याचं उत्तरही आहे माझ्याजवळ. पण त्याबाबतचे कोणतेही पुरावे माझ्याजवळ नसताना मी काही बोलणं कदाचित योग्य होणार नाही. तरीही तुमच्यासमोर याबाबतचे माझे विचार मोकळेपणाने व्यक्त करणं अनाठायी नाही असंच मला वाटतं. खरं सांगायचं तर प्रमोशननंतर मी इथं चार्ज घेऊन फक्त दोन आठवडेच तर होतायत. तुम्ही आणि प्रभूदेसाई दोघेही तोपर्यंत मला अनोळखीच होतात. यातली प्रभूदेसाईंची बाजू कोणत्याही अँगलने विचार केला तरी मला समर्थनीय वाटत नाही हे खरंच. तुम्ही गैरसमज नका करून घेऊ प्लीज पण

प्रभूदेसाई इथे तुम्हाला भेटायला आले असताना तुम्ही त्यांना आतही न घेता हाकलून लावलं होतंत. बँकेने तुम्हाला समक्ष भेटून तुमची बाजू समजून सांगण्याचं लेखी आवाहन केलेलं असूनसुद्धा तुम्ही त्याला प्रतिसाद दिला नव्हतात. या कम्युनिकेशन गॅपमुळे तुमच्याबाबत प्रभूदेसाईंकडून समजलेली माहितीच तत्कालीन अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरल्याने यातलं गांभीर्य त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकलेलं नसावं कदाचित. ”

“त्या प्रभूदेसाईला समोर पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. तरीही मी त्याला हुसकून नव्हतं लावलं. त्याने माझे पाय धरून माफी मागावी अशीही माझी अपेक्षा नव्हती. म्हणूनच ‘तुला जे कांही सांगायचं ते तुझ्या बँकेला सांग. ‘ असं म्हणून मी त्याला परत जायला सांगितलं. दुसरी गोष्ट मी बँकेत जाऊन माझी बाजू समजावून सांगण्याची. बँकेच्या कामाच्या पद्धतीनुसार ते योग्य असेलही कदाचित किंवा त्या लोकांनी शोधलेली ती तात्पुरती पळवाटही असेल. कारण माझी बाजू खरंच समजून घ्यायची त्यांची इच्छा असती तर तिथल्या एखाद्या अधिकाऱ्याने मला येऊन भेटणं आणि माझी बाजू समजून घेणं जास्त योग्य आणि आवश्यक होतं, कीं असे कागदी घोडे नाचवत राहून माझ्यासारख्या वृद्ध ग्राहकाला न्याय मिळवण्यासाठी बँकेत हेलपाटे घालायला लावणं संयुक्तिक होतं? तुम्ही गेले चार दिवस इथं येताच आहात ना? अतिशय समंजसपणे, पोटतिडकीने बोलता आहातच ना माझ्याशी? ”

एम्. डी. व्हिजिटमुळं हा विषय आज आलाय तसा ऐरणीवर आला नसता तर? मी आलो असतो इथं? आवर्जून भेटलो असतो यांना? … मलाच प्रश्न पडला. सहस्त्रबुद्धे आजोबांच्या रूपात समोर बसून इथं ‘तो’च मला प्रश्न विचारतोय असं वाटून गेलं. आता ‘त्या’च्यापासून काय लपवायचं?

“खरं सांगू? एरवी हा तुम्ही केलेल्या तक्रारीचा प्रश्न मी चार्ज घेतल्याबरोबर असा तातडीने माझ्या टेबलवर आलाच नसता कदाचित. पण याच दरम्यान एम्. डी. व्हिजिट झाली आणि त्यानिमित्ताने हाच नव्हे तर इतर अनेक विषय ऐरणीवर आले. योगायोगाने आमचे डी. जी. एम् पुढच्या आठवड्यात मीटिंगसाठी सेंट्रल ऑफिसला जाणार आहेत. त्यामुळेच त्यानिमित्ताने अशा प्रलंबित बाबीही तातडीने हातावेगळ्या करायचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच मी या गोष्टीला प्राधान्य देऊन गेले चार दिवस तुमच्याकडे येतोय. यात माझा मोठेपणा किंवा कर्तृत्त्व कांहीच नाहीय. हा फक्त माझ्या कर्तव्याचा भाग आहे एक. ते कर्तव्य मी मनापासून निभावतोय एवढंच. तरीही तुमच्याशी झालेल्या पहिल्या भेटीतच तुमच्याकडून जे समजलं त्यामुळे तुमच्यावरचा अन्याय दूर करण्याची निकड मला तीव्रतेने जाणवली हेही तितकंच खरं.. ” मी मोकळेपणानं, कोणताही आडपडदा न ठेवता सांगून टाकलं. आजोबा शांतपणे ऐकत होते. आता हा धागा असाच अधांतरी सोडावासा वाटेना.

“आता पुन्हा शून्यातून सुरुवात करून प्रभूदेसाईंकडून त्यांचं म्हणणं लेखी मागवायचं, त्याची शहानिशा करायची, त्यांचं म्हणणं पटलं नाही तर योग्य कारणं देऊन ते स्वीकारता येत नसल्याचं त्यांना कळवायचं आणि या सगळ्या सोपस्कारांत हे घोंगडं असंच प्रदीर्घकाळ आहे तसंच राहू द्यायचं कां? तसं जरी केलं तरी त्यातून निष्पन्न काय होणार? यात आर्थिक फसवणूक किंवा अपहार नसल्याने जास्तीत जास्त शिक्षा काय तर त्यांना योग्य वागणुकीबद्दल लेखी समज देणे. त्यानंतरही स्वतःची चूक नाकारून ते स्वतःचं खोटं समर्थनही करू शकतील ते वेगळंच. अशा परिस्थितीत त्यांनी तुम्हाला दिलेली वागणूक योग्य नसल्याची जाणीव त्यांना करून देऊन बँक ग्राहकांशी वागता बोलताना यापुढे योग्य दक्षता घेण्याची एक संधी देणारा ‘अॅडवायजरी मेमो’ त्यांना तातडीने देऊन प्रश्न इथेच संपवावा हा एकमेव मार्ग मला या परिस्थितीत योग्य वाटतो. हे अर्थातच तुमचं समाधान होणार असेल तरच. “

सहस्त्रबुद्धे आजोबांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं. उठून ते लगबगीने आत गेले. ते हे सगळं कसं स्वीकारतील हेच कळत नव्हतं. यापुढं करण्यासारखं माझ्या हातात आता कांही शिल्लकही नव्हतं. आता जे होईल ते स्वीकारायचं आणि इथून निघून जायचं असा विचार करून मी बसून होतो. तेवढ्यांत आजोबा बाहेर आले आणि त्यांच्या हातातली पत्राची घडी शांतपणे माझ्याकडे दिली.

“काय आहे हे? “

“तुम्ही काय करू शकाल ते तुमचं सांगून झालं, आता मी काय करायचं ठरवलंय ते सांगतो. हे माझं पत्र. वाचून तरी बघा ” ते म्हणाले. मी घडी उघडून पत्रावरून नजर फिरवली आणि आश्चर्याने आजोबांकडे अविश्वासाने पहातच राहिलो. मला काय बोलावं तेच सुचेना.

या अकल्पितावर माझा अजूनही विश्वासच बसत नव्हता. माझ्या दृष्टीने तरी तो त्या क्षणीच नव्हे तर आजही एक चमत्कारच वाटतोय मला!

“आजोबा, तुम्ही हे.. हे सगळं खरंच मनापासून करताय ना? “

“असा प्रश्न कां पडावा तुम्हाला? त्या पत्रावरची तारीख तरी बघा.. ” ते म्हणाले.

तारीख दोन दिवसांपूर्वीची होती!

“त्यादिवशी तुम्हीच म्हणाला होतात ना, प्रभूदेसाईना बँकेच्या नियमात बसेल तीच शिक्षा करणं आम्हाला शक्य होईल जे सर्वार्थाने तुम्हाला न्याय देणारं वाटेलंच असं नाही म्हणून? शिवाय या सर्व व्यवस्थेवरही सर्वाधिकार असलेली अशी एक अदृश्य यंत्रणा ‘वर’ कार्यरत असतेच. ती देवाची यंत्रणा! ‘तो’ पहात असतो सगळं आणि त्याच्या हातातल्या आवाज नसणाऱ्या काठीने तो योग्य न्यायही करत असतो असंही म्हणाला होतात तुम्ही. मला पटलं होतं ते. त्या प्रभूदेसाईला आता काय शिक्षा करायची ते मी त्या दिवशीच माझ्या देवावर सोपवून मोकळा झालोय. बँकेने उशीरा कां होईना माझ्या तक्रारीची योग्य दखल घेतल्याने माझी तक्रार मी मागे घेत असल्याचं हे पत्रही मी त्याच दिवशी लिहून ठेवलं होतं. आता तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करालच. बाकी सगळं दत्त महाराज पाहून घेतील.. ” ते शांतपणे म्हणाले.

माझा विश्वासच बसेना.

मी भारावलेल्या अवस्थेत थक्क होऊन पहात राहिलो फक्त…!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “गृहीत धरणे…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “गृहीत धरणे…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

गृहीत धरणे : नात्यांतील न दिसणारा परंतु हळूहळू वाढणारा तणाव –  श्री जगदीश काबरे

मानवी नातेसंबंध हे प्रामाणिक संवाद, परस्पर आदर आणि स्वातंत्र्याच्या मान्यतेवर आधारलेले असतात, परंतु अनेकदा हेच नाते नकळतपणे बिघडू लागते ते एका अतिशय सामान्य, कधी कधी नकळत पण सहज घडणाऱ्या प्रक्रियेने—गृहीत धरणे या वृत्तीने. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर गृहीत धरणे ही केवळ वर्तणूक नसून एक मानसिक पॅटर्न आहे, ज्यामध्ये व्यक्ती आपल्या सवयींना, आपल्याशी नातं असणाऱ्या लोकांच्या उपलब्धतेला किंवा त्यांच्या भावनिक व व्यक्तिगत मर्यादांना इतकी स्वाभाविक मानते की त्याबद्दल विचारणे, पुष्टी करणे किंवा त्यांची सहमती घेणे हे गौण ठरवते. परिणामी, संबंधांमध्ये असंतुलन, आंतरव्यक्तिगक दडपण, अप्रत्यक्ष भावनिक शोषण, आणि कालांतराने तुटलेपणा निर्माण होतो. या प्रक्रियेची सुरुवात इतकी सूक्ष्म असते की ती दिसत नाही, पण परिणाम मात्र मोठे आणि कधी कधी अपरिवर्तनीय असू शकतात.

गृहीत धरण्याचा पहिला आणि मुख्य प्रश्न आहे तो एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे तो आपल्या शब्दाबाहेर नाही असे समजणे. हे समजण्यासाठी आपल्याला मानवी मानसशास्त्रातील ‘इंटिमसी बायस’ (intimacy bias) तपासावे लागते. ज्या व्यक्तीशी आपण मानसिकदृष्ट्या जवळ असतो, त्या व्यक्तीला आपण स्वतःसारखेच समजण्याची प्रवृत्ती असते. म्हणजेच त्याच्या वेळेची, मनस्थितीची, प्राधान्यांची, परिस्थितीची वेगळी ओळख करून घेण्याची गरज आपल्याला वाटत नाही. आपण असे गृहीत धरतो की त्याला जे आपण सांगत आहोत ते त्याला मान्यच आहे. कारण आजवर त्याने तसेच केले आहे. हीच प्रवृत्ती सामाजिक मनोविज्ञानात ‘फॅमिलियारिटी एक्स्पेक्टेशन सिंड्रोम’ म्हणून ओळखली जाते. नातं जितकं जवळचं, तितक्या सहजतेने आपण त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर दावा गाजवू लागतो, आणि या दाव्याचा आवाजही आपल्याला ऐकू येत नाही. म्हणूनच सर्वात जास्त गृहीत धरणे जवळच्या नात्यांमध्ये होतं—मित्र, नवरा-बायको, भावंडं, पालक-मुलं किंवा नातेवाईक.

उदाहरणार्थ, एखाद्या मित्राने आपल्या ओळखीतील व्यक्ती आपल्याकडे राहायला पाठवण्याचा निर्णय घेऊन तो आपल्याला “तुमच्याकडे उद्या तो राहील” असे सांगणे. हा एक छोटेखानी प्रसंग असला तरी गृहीत धरण्याचा अत्यंत स्पष्ट दाखला आहे. इथे मूळ चूक निर्णय स्वतः घेण्याची नाही, तर तो दुसऱ्याच्या जागेचा, वेळेचा, भावनिक उपलब्धतेचा ‘हक्क’ असल्यासारखा वापरणे ही आहे. एक व्यक्ती दुसऱ्याच्या जीवनात अशा रीतीने प्रवेश करते, जणू त्या दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनाला किंवा गोपनीयतेला काही महत्त्वच नाही. हे केवळ अस्वस्थ करणारे नसते, तर दुसऱ्या व्यक्तीच्या वैयक्तिक खाजगी अवकाशात थेट दखल देणारे असते. सामाजिक दृष्टीने पाहिले तर ही गोष्ट ‘खाजगी क्षेत्रात हस्तक्षेप’ या नावाने ओळखली जाते आणि आधुनिक काळातील मानसिक आरोग्य तज्ञ त्याला संबंधांतील सूक्ष्म आक्रमणाचा (subtle invasion) एक प्रकार मानतात.

गृहीत धरण्यामागे एक मोठा सामाजिक घटक म्हणजे “उपलब्धतेचा मिथ्याभास” (illusion of availability). आपण एखाद्याला खूप जवळचा समजत असलो की तो आपल्यासाठी नेहमी उपलब्ध असतो असे आपण समजतो. पण ही उपलब्धता आपण गृहीत धरतो… ती प्रत्यक्षात असतेच असे नाही. लोकांचे स्वतःचे वेळापत्रक, कर्तव्ये, मानसिक अवस्था, कामाच्या जबाबदाऱ्या, आरोग्याच्या अडचणी या सर्व घटकांचा आपण विचार करत नाही. नात्यात महत्त्वाचा प्रश्न हा नसतो की एखादी व्यक्ती तुमच्यासाठी किती करते; महत्त्वाचा प्रश्न असतो की तुम्ही तिला तिच्या स्वातंत्र्याबद्दल किती सजग आहात. याला एक विरोधाभासही आहे. व्यक्ती जेवढ्या एकमेकांवर प्रेम करतात, तेवढीच गृहीत धरण्याची शक्यता वाढते. कारण प्रेमात किंवा जवळच्या नात्यात ‘तू सांगशील, विचारशील, मला कळवशील’ अशी अपेक्षा न ठेवता आपण प्रत्यक्षातच समोरच्याला ‘माझ्यासारखाच’ समजतो. हा भावनिक तर्क गोड वाटत असला तरी तो नात्याला हळूहळू तोडतो. कारण दोन व्यक्ती कधीच एकसारख्या स्वभावाच्या असू शकत नाहीत हे आपण विसरतो.

यावर उपाय काय? उपाय अत्यंत सोपा आहे, पण अंमलात आणणे तितकेच अवघड —संवाद, सहमती, आणि मर्यादा स्वीकारणे. कोणत्याही नात्यात कार्यक्रम आखण्यापूर्वी, कोणाचेही वेळापत्रक बिघडवण्यापूर्वी, कोणाला कोणतेही काम सांगण्यापूर्वी एक साधा प्रश्न विचारणे अत्यावश्यक असते— “तुला हे सोयीचे आहे का? ” या एका प्रश्नात आदर आहे, समजूत आहे, आणि नातं समतोल ठेवण्याचे भान आहे. मित्र असो, नवरा-बायको असो, नातेवाईक असो, प्रत्येकाने एकमेकांची विचारपूस करण्याची, त्यांचे स्वातंत्र्य जपण्याची, आणि त्यांच्या वेळेचा आदर करण्याची संस्कृती तयार करणे गरजेचे आहे. गृहीत धरणे ही केवळ वृत्ती नाही; ती एक न बोलता केली जाणारी अपेक्षा आहे. अपेक्षा जितक्या अव्यक्त, तितक्या धोकादायक. ज्या नात्यात व्यक्तींची ‘व्यक्ती’ म्हणून ओळख मिटत जाते आणि ‘आपलेपणा’ नावाचा मुखवटा सर्व मर्यादा झाकून टाकतो, त्या नात्यात बिघाड होणे अपरिहार्य असते. म्हणूनच गृहीत धरण्याच्या या वृत्तीला ओळखणे, तिच्याबद्दल चिंतन करणे, आणि जाणीवपूर्वक ही सवय बदलण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण नात्यांना अशा छोट्या, क्षणिक पण सतत घडणाऱ्या कारणामुळे तडे जातात.

शेवटी, नाती टिकतात ती संवादाने, समजुतीने आणि परस्पर आदराने — गृहीत धरण्याने नव्हे. जेव्हा आपण विचारायला शिकतो, तेव्हा आपण समजायला लागतो; आणि जेव्हा आपण समजायला लागतो, तेव्हा नाती अधिक सुंदर, समतोल आणि आरोग्यदायी बनतात. गृहीत धरणे सोडून देणे म्हणजेच दुसऱ्याला त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वासह स्वीकारणे आणि हाच कोणत्याही नात्यात सर्वात सुंदर पाया असतो.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “नांव, यादी, पुरावा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “नांव, यादी, पुरावा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

सध्या चर्चा, आरडाओरड सुरु आहे ती नावं वगळण्यावरुन. यात नांंव का वगळलं… असं विचारणारे आणि तसं सांगणारे दोघंंही आपली बाजू मांडतांना दिसतात.

पण माझ्याबाबतीत नांव असणं किंवा वगळणं हे काही विशेष नाही. पण नावाचा पुरावा देणं हे एक वेगळंच प्रकरण आहे. म्हणजे काहीवेळा नांव यावं म्हणून पुरावा द्यावा लागला, तर काही वेळा नांव वगळण्यासाठी.

हवं तिथून माझं नांव वगळलं जाण्याचा आणि नको तिथे असण्याचा माझा अनुभव बराच जुना आहे. म्हणजे बराच आहे, आणि जुनासुध्दा आहे. बर्‍याच चांगल्या ठिकाणी माझं नांव वगळलं गेलं आहे, तर नको त्या ठिकाणी आपलं नांव वगळलं जावं असं वाटत असतांना ते आलं आहे.

मी माझं नांव यावं म्हणून जिथेजिथे प्रयत्न केले तिथे ते आलंच नाही. आणि मी प्रयत्न करतोय असं वाटलंच नाही तिथे मात्र माझं नांव न देतासुध्दा आलं आहे. त्यामुळे नांव येण्यासाठी प्रयत्न करावेत का सोडून द्यावे यातच गोंधळ होतो. आणि अशा गोंधळामुळेच काही ठिकाणी माझं नांव वगळलं जातं.

बर्‍याच कार्यक्रमात, अगदी घरगुती कार्यक्रमात सुध्दा, जबाबदार माणसांच्या यादीतून माझं नांव वगळतात. वरवर या वयात तुला काय जबाबदारी द्यायची असं म्हणत असले तरी माझ्याकडून होणारा गोंधळ नको असतो.

लांबच्या प्रवासात सुध्दा मित्र अगोदर माझं नांव वगळतात. पण मग गाडीत एक जागा आहे असं लक्षात आल्यावर माझं नांव घेतात.

शाळेत स्कॉलरशिपची परीक्षा, दहावीची परीक्षा आणि नंतर अनेक परीक्षा अगदी नौकरी मिळवण्याच्या सुध्दा. यात विशेेष प्राविण्य मिळवणार्यांच्या यादीतून माझं नांव वगळलंच गेलं. पण मला त्यात काही विशेष वाटलच नाही. माझं नांव वगळलं म्हणूनच दुसर्‍याच आलं हिच भावना मनात होती.

एकदा तर पात्रता नाही म्हणून माझं नांव परीक्षा अर्ज भरतानांच वगळलं होतं. त्यामुळेच परीक्षेनंतर ऊत्तीर्ण होणाऱ्याच्या यादितूून माझं नांव वगळण्याचा त्यांचा त्रास कमी झाला.

पण शाळेत दंगा केला, घरचा अभ्यास केला नाही, यापासून नोकरीच्या ठिकाणी ऊशीरा येणं, जास्त रजा घेणं, काम वेळेत पूर्ण न करणं यासारख्या अनेक ठिकाणी अनेक वेळा नांव वगळलं म्हणून नाही, तर माझं नांव का घेतलं यासाठीच मला आरडाओरड करावीशी वाटत होती.

मोठेपणी शिधापत्रिका, मतदार यादी, गाडी चालवायचा परवाना या सारख्या ठिकाणी माझं नांव याव म्हणून वेगवेगळी कागदपत्र भरून मला त्याबद्दल काही पुरावे पण जोडावे लागले. आणि शाळेत दंगा करतांना मी खरंच नव्हतो, किंवा अभ्यास केला होता पण पाटी पुसली गेली याचे पुरावे देत नांव वगळण्यासाठी धडपड होती.

प्रवासाला जातांनासुध्दा रिझर्वेशनच्या यादित बर्‍याचदा माझं नांव सुरुवातीला प्रतिक्षा यादितच येतं. आणि मगच ते कन्फर्म करतात. माझ्या नावाच्या बाबतीत ते सुध्दा सावधपणे वागतात. आणि मग तिथेही नांव येणार का वगळणार याची प्रतिक्षा असते. पण तिथे सुरुवातीपासून नांव येतं मग ते प्रतीक्षा यादित का असेना यातच आनंद असतो.

त्यामुळे नांव येण्यासाठी किंवा वगळण्यासाठी पुरावा लागतो इतकेच समजलं. नांव येण्यासाठी किंवा वगळलं जाण्यासाठी काय करावं याचा एखादा झटपट (क्रॅश) कोर्स आहे का याचाही शोध घेतोय.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘सहजीवन संबंध’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘सहजीवन संबंध’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

(सहजीवन संबंध (लीव्ह-इन रिलेशनशिप))

सध्याच्या काळात, काही तरुण-तरुणी विवाहबंधनात अडकण्याऐवजी सहजीवन संबंध स्वीकारत आहेत.

सहजीवन संबंध म्हणजे काय?

सहजीवन संबंध म्हणजे दोन प्रौढ व्यक्ती विवाहित नसतानाही एकत्र राहून जीवन व्यतीत करतात. हे विवाहासारखेच आहे, जसे:

एकत्र राहणे,

जबाबदाऱ्या वाटून घेणे

भावनिक आणि शारीरिक संबंध ठेवणे

परंतु…

हा विधिसंमत विवाह नाही.

सामाजिक परिवर्तनामुळे, आधुनिक तरुणाई विवाहाच्या पारंपरिक चौकटीत अडकण्याऐवजी या नवीन जीवनपद्धतीकडे आकर्षित होत आहे.

सहजीवन संबंध स्वीकारण्याची कारणे

१. स्वातंत्र्य आणि वैयक्तिक नियंत्रण

आधुनिक तरुणाईला स्वतःचे निर्णय स्वतः घेणे महत्त्वाचे आहे.

विवाहानंतर येणाऱ्या सामाजिक आणि कौटुंबिक बंधनामुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर मर्यादा येते.

सहजीवन संबंधात प्रत्येकाला आपला वैयक्तिक अवकाश राखता येतो.

२. करिअर आणि आर्थिक स्थैर्य

शिक्षण पूर्ण करून नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्वावलंबन आणि करिअरच्या प्रगतीला अधिक प्राधान्य दिले जाते.

सहजीवन संबंधामुळे आर्थिक स्वातंत्र्य टिकवता येते आणि विवाहानंतरच्या जबाबदाऱ्यांचा ताण कमी होतो.

३. एकमेकांना समजून घेण्याची संधी

विवाह हे आयुष्यभर टिकणारे नाते मानले जाते, पण अनेक विवाह नीट ओळख नसल्यामुळे अपयशी ठरतात.

सहजीवन संबंधातून नात्यातील गुणदोष आणि स्वभाव समजून घेता येतो.

पुढे विवाह करायचा की नाही, हे परिपक्वतेने ठरवता येते.

४. विवाहसंस्थेविषयी बदललेली दृष्टी

विवाह हा जीवनातील अपरिहार्य टप्पा मानणे कमी झाले आहे.

प्रेम, सामंजस्य आणि सहजीवन महत्त्वाचे मानले जाते.

विवाहाविनाही नाते टिकवता येते, असे अनेक तरुण मानतात.

५. सामाजिक स्वीकार

समाज माध्यमे, चित्रपट, वेब सिरीज आणि जागतिक संपर्कामुळे सहजीवन संबंध अधिक स्वीकारले जात आहेत.

काही न्यायालयीन निर्णयांमध्ये याला वैधानिक मान्यता मिळाली आहे.

६. भावनिक आणि लैंगिक स्वातंत्र्य

नात्यात प्रामाणिकपणा, मोकळेपणा आणि लैंगिक समता महत्त्वाची आहे. सहजीवन संबंधामुळे हे साधता येते, कोणावरही जबरदस्ती नसते.

७. ताणमुक्त आणि समसमान नाते

विवाहानंतर कुटुंबाचा हस्तक्षेप आणि समाजाच्या अपेक्षांमुळे ताण येतो. सहजीवन संबंधात थेट संवाद साधता येतो आणि नाते समसमान राहते.

सहजीवन संबंधाचे समाज आणि कुटुंबावर परिणाम

लाभदायक पैलू

१. व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर

२. विवाहावरील दडपण कमी होणे

३. महिला स्वातंत्र्याला चालना

४. आधुनिक जीवनशैलीशी जुळवून घेणे

हानिकारक / नकारात्मक पैलू

१. कुटुंब संस्था दुर्बल होणे

२. भावनिक आणि सामाजिक असुरक्षितता

३. मुलांच्या अधिकारांचा आणि ओळखीचा प्रश्न

४. समाजातील विरोध आणि टीका

कायदेशीर दृष्टिकोन

भारतीय कायदे आणि न्यायालयीन निर्णय:

▪️पायल शर्मा विरुद्ध नरी निकेतन (२००१): प्रौढ व्यक्तींना लग्नाविनाही एकत्र राहण्याचा अधिकार आहे.

▪️लता सिंग विरुद्ध उ. प्र. शासन (२००६): प्रौढ व्यक्तींना त्यांचा जीवनसाथी निवडण्याचा मूलभूत अधिकार आहे.

▪️एस. खुशबू विरुद्ध कन्नियाम्मल (२०१०): सहजीवन संबंध अनैतिक असू शकतो पण अवैध नाही.

▪️इंद्र सर्मा विरुद्ध के. व्ही सर्मा (२०१३): स्त्रीच्या संरक्षणाचे अधिकार स्पष्ट केले.

नियम आणि अटी

१. दोघे प्रौढ (१८+) असावेत

२. दोघांची सहमती असावी

३. नाते स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारे असावे

४. दोघांपैकी कोणीही आधीपासून विवाहित नसावे

स्त्रियांचे संरक्षण

कौटुंबिक हिंसा कायदा (२००५) अंतर्गत आर्थिक सहाय्य, पोटगी, घरात राहण्याचा अधिकार

संपत्ती आणि संतती

लिव्ह-इन पार्टनरला आपोआप संपत्तीचा अधिकार नाही, तो इच्छापत्रामुळे मिळू शकतो.

सहजीवन संबंधातून जन्मलेल्या मुलांना वारसा अधिकार मिळतो

सहजीवन संबंध: संस्कृतीविकास की अधःपतन?

काहींसाठी, व्यक्तिस्वातंत्र्य, समानता आणि आधुनिकता याचे प्रतीक तर काहींसाठी, जबाबदारी, स्थैर्य आणि पारंपरिक कुटुंबसंस्थेवरील परिणाम याची चिंता

भविष्यातील परिणाम

संयुक्त कुटुंबाऐवजी कणकुटुंबे / अणुकुटुंबे वाढतील

नात्यांमध्ये स्वातंत्र्य आणि समता महत्त्वाची होईल

वृद्धांची काळजी आणि अनाथ बालकांची समस्या वाढू शकते.

निष्कर्ष

सहजीवन संबंध केवळ आधुनिक फॅशन नाही, तर बदलत्या काळाचा आणि समाजाच्या मानसिकतेचा परिणाम आहे.

प्रेम, विश्वास, आदर आणि जबाबदारी ही मूलभूत तत्त्वे टिकली तर नाते स्थिर राहते.

बदलत्या समाजातही जीवनमूल्ये टिकवणे हा खरा संस्कृतीविकास आहे.

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गाणी, अभिनय, संगीत आणि आपण… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ गाणी, अभिनय, संगीत आणि आपण… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

आज काही जुन्या हिंदी गीतांबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. तशी माझी आणि माझ्या बरोबर वाढलेल्या पिढीतील लोकांची बरीच हिंदी आणि मराठी सदाबहार गाणी आवडती आहेत. साठ ते सत्तर च्या दशकातील ही गीते आहेत. त्यातील पहिले गीत आहे साथी या चित्रपटातील. हा चित्रपट १९६८ मध्ये आला होता. त्यातील हे गीत आहे. ‘ये कौन आया, रोशन हो गई महफिल किस के नाम से…’ लता मंगेशकरांनी हे गीत अत्यंत अप्रतिम गायले आहे आणि तितकाच अप्रतिम अभिनय या गीताच्या वेळी सिमी गरेवालने केला आहे. पार्टी सुरु असते. आणि सिमी गात असते. त्याचवेळी राजेंद्रकुमार येतो. आणि मग गाताना सिमीचा चेहरा बघावा. आनंद अगदी ओसंडून वाहणे म्हणजे काय हे पहायचे असेल तर तिच्या चेहऱ्याकडे बघावे. एखाद्या फुलासारखा प्रसन्न फुललेला चेहरा. हे गाणे जेव्हा आपण पाहतो किंवा ऐकतो तेव्हा पाहणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला ते अगदी प्रसन्न करून जाते. जसे फुले वाटणाऱ्याच्या हाताला फुले सुगंध देऊन जातात. हे गीत लिहिले आहे मजरूह सुलतानपुरी यांनी आणि संगीतबद्ध केले आहे नौशाद यांनी.

दुसरे गीत आहे लव्ह इन टोकियो चित्रपटातील. हे गीत लता मंगेशकरांनी अप्रतिम तर गायिलेच आहे पण तेवढाच समर्थ अभिनय केला आहे आशा पारेख यांनी. या गीतातही पार्टीत आशा पारेख गात असते. चेहरा वर जसा सिमी गरेवालचा सांगितला आहे तसाच प्रसन्न. गीताचे बोल आहेत ‘ मुझे तुम मिल गये हमदम, सहारा हो तो ऐसा हो… ’ प्रेमात अशी अवस्था होते की जिकडे तिकडे प्रिय व्यक्तीच दिसू लागते. म्हणून पुढील ओळ आहे ‘ जिधर देखू उधर तुम हो, नजारा हो तो ऐसा हो तो ऐसा हो.. ’ असे सगळे आनंदाचे गीत सुरु असताना प्राण ज्याने त्या चित्रपटात खलनायकाचे काम केले आहे तो तिच्या लहान मुलाचे (की भावाचे) अपहरण करतो. त्यावेळी तिला त्याबद्दल फोन येतो. आणि एखादी हरिणी जशी पाडसाच्या ओढीने भयग्रस्त व्हावी तसे तिचे होते. काळजात धस्स होते. डोळ्यातून घळघळा अश्रू ओघळतात. पण दुसऱ्याच क्षणी ते सगळं लपवून ती गायला लागते. एक दोन क्षणातच हे सारे पडद्यावर घडते. पण त्या तेवढ्याच एक दोन सेकंदात आशा पारेखने अभिनयाची कमाल केली आहे. सगळे भाव आनंदाचे, दुःखाचे आणि भीतीचे चेहेऱ्यावर दाखवले आहेत. गाण्याचे बोल फार सुंदर आहेत. ती म्हणते ‘मेरी आंखों में आंसू है, मगर आंसू खुशीके है, किसे छोडू किसे पा लू, ये रिश्ते जिंदगीके है ‘ अप्रतिम शब्दरचना. शैलेंद्र यांची ही गीतरचना. शंकर जयकिशन यांचे तितकेच मधुर संगीत. आणि लता दीदींचा आवाज. या चौघांपैकी कोण श्रेष्ठ? नाही ठरवता येत. बस, एकाच वाक्यात सांगायचे तर Hats off to them!

तिसरे गीत आहे आम्रपाली या चित्रपटातले. हा चित्रपट सुद्धा १९६६ मधेच आला होता. या चित्रपटातील गाणी. संगीत, आणि पात्रांचा अभिनय केवळ अप्रतिम. गाणे आहे ‘ नील गगन की छांव में… ’ शैलेन्द्र यांच्याच या गीताला संगीत दिले आहे पुन्हा एकदा शंकर जयकिशन यांनी. आणि अभिनय केला आहे नृत्यात प्रवीण असलेली कसदार अभिनेत्री वैजयंती माला यांनी. ही जी तीनही गाणी आहेत यात नायक आहेतच. त्यांचा अभिनय आहेच. पण मुख्य अभिनय बघायचा तो नायिकेचाच. मला खात्री आहे की हा लेख वाचल्यानंतर काहींना नक्कीच ही गाणी पाहण्याची इच्छा होईल. तर जरूर बघा. ऑडीओ नको व्हिडीओ बघा. हे गीतही दरबारात मुजरा करताना वैजयंती माला म्हणते. चेहऱ्यावरून आनंद ओसंडतो आहे. गीतावर नृत्य करताना तिचे पदन्यास पाहण्यासारखे आहेत. शास्त्रीय नृत्याचा आणि गीताचा सुरेख संगम म्हणजे हे गीत. तर सांगायचे हे की जेव्हा सुनील दत्त तिथे येतो तेव्हा तिचे काही काळ थांबलेले नृत्य पुन्हा सुरु होते. आणि मग त्या नृत्यात वैजयंतीमाला जी नाचली आहे ते पाहण्यासारखे आहे. अक्षरशः त्यात तिने जान ओतली आहे. प्रचंड एनर्जी आणि उत्साह आहे. तो जो नृत्याचा छोटासा तुकडा आहे त्यात शब्द नाहीत फक्त संगीत आहे. मृदुंग, वीणा आणि तबल्याचा ठेका.

ही तीनही गाणी बघताना त्यातला काळ, अवकाश याचे जरूर निरीक्षण करा. काळ म्हणजे त्या वेळचे वातावरण या दृष्टीने ही तीनही गाणी दिग्दर्शकाने कशी चित्रित केली आहेत, ते वातावरण कसे जिवंत केले आहे हे पाहण्यासारखे आहे. ती गाणी गायिली जात असताना भोवतालची माणसे, त्यांचे हावभाव यांचे किती बारकाईने चित्रण केले आहे. आम्रपाली मधल्या गाण्यात तर हे जरूर पाहण्यासारखे आहे. आणि अवकाश म्हणजे space या अर्थाने. म्हणजे त्या दृश्याची व्यापकता, ती जागा त्याचे निरीक्षण करा. तो काळ, ते वातावरण त्या दिग्दर्शकाने, कलाकारांनी कसे जिवंत केले आहे हे पहा. आपण असे निरीक्षण फारसे करीत नाही. ती दृष्टी आपण हळूहळू विकसित केली तर आपण अशा अक्षर आणि अजरामर कलाकृतींचा आस्वाद घेऊ शकू.

पूर्वी ही गाणी, किंवा चित्रपट तयार करताना महिनोंमहिने मेहनत घेतली जायची. रियाज केला जायचा. त्यातून अशी सदाबहार गीते जन्माला यायची. गाण्यामध्ये वाद्यांचा ढणढणाट नसायचा, मोजकीच वाद्ये असायची. गाण्याचे बोल अर्थपूर्ण असायचे. मंद संगीत, सुरेख चाल इ. मुळे गाणी श्रवणीय व्हायची. गाणी गाताना नाचणाऱ्या अनावश्यक व्यक्तींचा ताफा किंवा पलटण नसायची. या पार्श्वभूमीवर आजच्या गाण्यांची आपण तुलना करू शकता. आजही काही चांगली गाणी निर्माण होतात. नाही असे नाही पण बोटावर मोजण्याएवढीच.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ श्रीकृष्णाची वाङ्मय मूर्ती…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ श्रीकृष्णाची वाङ्मय मूर्ती… ☆ सौ शालिनी जोशी ☆

मूर्ती ही एखाद्या व्यक्तीची प्रतिमा असते. तिला रंग, रूप, आकार असतो. त्यावरून त्या व्यक्तीचे बाह्य रूप समजू शकते. ती निर्जीव असते. आचार, विचार कळू शकत नाहीत. तेव्हा एखाद्या व्यक्तीने तिच्या वाणीने म्हणजे तिच्या शब्दांत सांगितलेले विचार म्हणजे त्या व्यक्तीची वाणीरूप मूर्ती. म्हणजे संत महात्म्यानी केलेला उपदेश, त्यांचे विचार ते गेले तरी ग्रंथ रूपाने लोकांपर्यंत पोहोचतात. म्हणून त्यांच्या ग्रंथांना त्यांची वाङ्मय मूर्ती म्हणतात. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांची, आत्माराम- दासबोध समर्थांची आणि गाथा ही तुकारामांची वाङ्मम मूर्ती होय. म्हणून समर्थ रामदास शिष्यांना सांगतात, ‘ आत्माराम दासबोधl माझे स्वरूप स्वतः सिद्धll असता न करावा खेदl भक्तजनीll’ तर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीच्या शेवटी म्हणतात, ‘ पुढती पुढती पुढतीl इया ग्रंथ पुण्य संपत्तीll सर्व सुखी सर्व भूतीl संपूर्ण होईजोll’ (ज्ञा. १८/१८०९)

तशीच गीता ही श्रीकृष्णाची वाङ्मयमूर्ती. त्याविषयी सांगण्याचा हा प्रयत्न.

श्रीकृष्ण कौरव पांडवांच्या युद्ध प्रसंगी अर्जुनाचा सारथी म्हणून रणांगणावरती उतरले. युद्धात भाग घेणार नाही अशी प्रतिज्ञा. पण पांडवांच्या बाजूने त्यांनीच प्रथम पांचजन्य शंख फुंकला. आणि ते ऋषिकेश (इंद्रीयांचा स्वामी, ऋषिक- इंद्रिय) अर्जुनाच्या इंद्रियांचा स्वामी झाले. रणांगणावर नातेवाईकांना व गुरुना पाहून अर्जुनाला त्यांच्याविषयीच्या मोहाने ग्रासले. पापा पासूनचे विचार धर्मनाशापर्यंत पोहोचले. तरीही श्रीकृष्ण शांत होते. त्यांनी अर्जुनाचे म्हणणे ऐकून घेतले. अर्जुनाच्या हातातील धनुष्य गळून पडले. तो संन्यासाची भाषा बोलू लागला आणि शेवटी श्रीकृष्णाचे शिष्यत्व पत्करले. तेव्हा श्रीकृष्णानी आपले प्रयत्न सुरू केले. अर्जुनाची वीरश्री जागृत करायचा प्रयत्न केला. पण अर्जुन मोहरूपी चिखलात अधिकच रुतत आहे असे पाहून, असा मोहरुप रोग त्याला कधीच होऊ नये या दृष्टीने उपदेशाला सुरुवात केली. विचार केला, आचरण केले आणि मग सांगितले असा हा उपदेश.

आत्म्याचे अविनाशित्व, देहाची क्षणभंगूरता, स्वधर्माची अपरिहार्यता, क्षत्रियांचे कर्तव्य व जबाबदारी, निष्कामकर्माची महती अशा वरच्या वरच्या श्रेणीत उपदेश सुरू केला. लोकसंग्रहाचा विचार, यज्ञाच्या व संन्याशाच्या जुन्या कल्पनात बदल, ज्येष्ठांचे आचरण, निष्काम कर्म सांगून मी स्वतः असे आचरण करतो, दृष्टांच्या नाशासाठी व सज्जनांच्या रक्षणासाठी अवतार घेतो. असे सांगून आपला आदर्श त्याच्या पुढे ठेवला. हळूहळू आपल्या भगवंत रूपाची जाणीव करून दिली. निर्गुण निराकार असून जगाची उत्पत्ती, स्थिती, लय करणारा, भक्तांचा योगक्षेम चालविणारा, सृष्टीचे चक्र चालवणारा, सर्वांचे गंतव्य स्थान मीच आहे. सर्व व्यापकत्व स्पष्ट केले. विश्वरुप दाखवले. दैवी गुणांचे श्रेष्ठत्व पटवून दिले. स्थितप्रज्ञ, जीवनमुक्त, ज्ञानी भक्त यांचे आदर्श त्याच्या समोर ठेवले. त्यामुळे मोहाच्या पलीकडे जाऊन अर्जुन युद्धाला तयार झाला. तशी कबुली त्याने दिली. गीतोपदेशाचे सार्थक झाले. सर्वांसाठी सर्वकाळी अमर असा हा उपदेश, युद्धभूमीवर केवळ ४० मिनिटात श्रीकृष्णाने अर्जुनाला केला. आणि ‘यथेच्छसि तथा कुरु’ असे स्वातंत्र्य ही त्याला दिले.

आपल्याही जीवनात असे मोहाचे प्रसंग येत असतात खरं पाहता आपण सारे अर्जुन आहोत. तेव्हा प्रत्यक्ष श्रीकृष्ण आपल्यासमोर नसले तरी हृदयात आहेत, मार्ग दाखवण्यास सज्ज आहेत, त्यांची गीता समोर आहे. तिचा आधार घेऊन जीवनाचे सूत्र त्या श्रीकृष्णाच्या हाती देवून संकट मुक्त व्हावे. अशी ही गीता म्हणून भगवंतांची वाङ्मय मूर्ती होते. साधकाने जीवन कसे जगावे सांगणारी जीवन गीता.

शंकराचार्य गीता महात्म्यात म्हणतात, ‘ सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन:l पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्ll उपनिषद या गायी, श्रीकृष्ण हा दोहन करणारा गवळी, अर्जुन गीतामृत पिणारे वासरू. हा दृष्टांतच गीता ही श्रीकृष्णाची वाङ्मयमूर्ती आहे सांगायला पुरेसा आहे. गीता ही श्रीविष्णूच्या मुखकमलातून निघालेले शास्त्र आहे. त्यामुळे इतर शास्त्रांच्या अभ्यासाची गरज नाही. हेच सर्व शास्त्रांचे शास्त्र. खचलेल्या मनाला उभारणी देणारं, मन बुद्धीचा समन्वय साधणार मानसशास्त्र आहे. योग्य सात्विक आहार व त्याचे फायदे सांगणार आहारशास्त्र आहे. युक्त आहार, विहार, झोप आणि जागृती यांचे फायदे सांगणारे आचरण शास्त्र आहे. नेत्यांची जबाबदारी आणि समाजातील सर्व घटकांना त्यांची कर्तव्य सांगणारं, सर्व जाती, धर्म, स्त्रिया यांना समान लेखणारं समाजशास्त्र आहे. पंचभूतात्मक सृष्टीचे ज्ञान करून देणारे विज्ञान शास्त्र, ‘उतिष्ठ, युद्धस्व’ सांगून प्रसंगाला धैर्याने तोंड देण्यास सांगणारे विवेक शास्त्र आहे. तसेच सर्वाभूती ईश्वर सांगणारे समत्व शास्त्र आहे आणि सर्वात मुख्य म्हणजे आत्मज्ञान करून देणारं आत्मशास्त्र आहे. सर्व योगही कर्म, ज्ञान, भक्ती येथे एकोप्याने नांदतात. कारण व परिणाम सूत्र पद्धतीने मांडले आहेत. कोणतीही सक्ती नाही. अंधश्रद्धा नाही. पण शास्त्राप्रमाणे कर्तव्य करायचा आग्रह आहे. अर्जुनाचे दोष सांगण्याचा स्पष्टपणा आहे आणि स्वतःचे कर्तव्य ही सांगितले आहे. स्वतः केले, आचारले मग सांगितले असा हा उपदेश. अर्जुनाच्या मनात कधीही परत संभ्रम होऊ नये असा रामबाण उपाय. सर्व द्वंद्वातून मुक्त करून नराचा नारायण करणारा हा संवाद. वरवर प्रासंगिक वाटला तरी तसा नाही. सर्वकाली, सर्व जगाच्या कल्याणाचा आहे. श्रीकृष्ण योगेश्वर अर्जुनाचे निमित्त्य करून सर्व जगाचे साकडे फेडतात. कर्म बंधनात न अडकता कर्म करण्याची वेगळी दृष्टी जगाला देतात. कर्म हीच पूजा झाली. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीत म्हणतात,

‘म्हणौनि मज काहीl समर्थनी आता विषो नाही l

गीता जाणा हे वाङ्मयीl श्रीमूर्ति प्रभूचीll

(ज्ञा. १८/१६८४)

अशी ही गीता ५००० वर्षे झाली तरी तिचे महत्त्व कमी झाले नाही. सर्व काळी सर्व लोकांना ती मार्गदर्शक आहे. सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी आहे. मानवाच्या आयुष्यातील कसोटीच्या वेळी योग्य मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ म्हणजे भारताची वैचारिक संपत्तीच आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य, धैर्य देणारी गीता हातात घेऊन अनेक क्रांतिकारकांनी प्राणांचे बलिदान केले. यशाची प्रेरणा देणारी तीच आहे. म्हणून अनेक खेळाडूही यशाचे कारण गीता सांगतात. कितीतरी विद्वान, तत्वज्ञानी, शास्त्रज्ञ गीतेचा अभ्यास करतात व केला आहे. देशी-परदेशी विद्वानांवर तिचा प्रभाव आहे. विविध भाषेत भाषांतर होत आहे. झाली आहेत. असे हे अध्यात्म प्रधान, नीतिशास्त्र भारताचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. अभिमानाने गीता ग्रंथ आपण परदेशी पाहुण्यांना भेट देतो. पंतप्रधान मोदींनी ही पद्धत सुरू केली. कारण गीता ही प्रत्यक्ष भगवंताची वाङ्मयमूर्ती!

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares