मराठी साहित्य – विविधा ☆ हसणं ते हशा आणि टाळी ते टाळ्या! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

🤣 हसणं ते हशा आणि टाळी ते टाळ्या!👏 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

लेखाच शीर्षक जरी साधसं आणि सोपसं असलं आणि शीर्षकात हसण्यासारखं काही नसलं तरी, आधी हसावं का आधी टाळी वाजवावी या बाबतीत जर आपण संभ्रमित झाला असाल मंडळी, तर थोडं थांबा. लेख आधी पूर्ण वाचा आणि मगच ठरवा की लेख वाचून झाल्यावर हसायचं का फक्त टाळ्या वाजवायच्या आणि ह्या दोन्ही क्रिया करतांना, प्रथम टाळ्या वाजवायच्या का प्रथम हसायचं ? का हसता हसता टाळ्या वाजवायच्या ? का आधी पोटभर हसून जर तोंड दुखायला लागलं की मग टाळ्या वाजवायच्या ? का यातलं काहीच न करता, “अभिजात मराठी” फक्त त्यांच्याच घरी चोवीस तास पाणी भरत्ये, असा ज्यांनी स्वतःच स्वतःचा गैरसमज गेली शतकानुशतके करून घेतला आहे, त्या पुराणकाळातल्या विद्येच्या माहेरघरात रहात असलेल्या लोकांप्रमाणे मख्ख चेहरा ठेवून, ना हसायचं, ना टाळ्या वाजवायच्या! कारण लेखक(?) मुंबईचा म्हटला की पगडीवाल्यांचा अर्धा अधिक वाचायचा मूड, मुळा मुठेत पाणी नसलं तरी आधीच विसर्जित होतो, त्याला नां तुमचा नां माझा ईलाज!

अर्थात आपण पडलो सारे मुंबईकर, फार त फार ‘उपनगरकर’! आता नगरकर हे आडनाव आपण ऐकलं असेलच पण ‘उपनगरकर’ हे मी आत्ताच केलेलं एका नवीन आडनावाचं संशोधन आहे बरं का मंडळी! आणि त्याचं पेटंट फक्त माझ्याजवळ असल्यामुळे ते कुणीही वापरायच्या भानगडीत पडू नये, हा आपला जाता जाता दिलेला अनाहूत सल्ला! म्हणून ते कुठल्याही आडनावांच्या वंशावळीच्या जाडजूड पुस्तकात शोधायच्या भानगडीत, कुठल्याही पेठेतल्या स्वतःला विचारवंत समजणाऱ्या अभ्यासकांनी पडू नये, असा वैधनिक इशारा मी आत्ताच देऊन ठेवतो. नाहीतर काय होईल, आपण जर आपल्या तमाम महाराष्ट्रात असलेल्या अनोख्या आणि तिरपागड्या आडनावांच्या परंपरे बाबत काही संशोधन करून, PhD मिळवायच्या विचारात असाल तर ‘उपनगरकर’ हे आडनांव कसं जन्माला आलं, हे शोधता शोधता आपला अख्खा जन्म वाया जाईल, पण या आडनावाची उत्पत्ती आपल्याला मिळणार नाही याची हमी, मी एक ‘उपनगरकर’ म्हणून आपल्याला देणे हे मी न हसता माझं कर्तव्य समजतो! त्यामुळे उगाच असं संशोधन करून, आपला चितळयांच्या दुकानाबाहेर लाईन लावण्यासाठी लागणारा अमूल्य वेळ नाहक खर्च करू नये ही नम्र विनंती! आणि हॊ, आम्हां मुबंईकरांची किंवा उपनगरकरांची विनंती ही कायमच नम्र असते हे सुद्धा एक त्रिकालबाधित सत्य आहे! पण नम्र हा शब्द अजून तरी पुण्यनगरीत जन्मालाच यायचा असल्यामुळे त्यांची एखादी विनंतीवजा सूचना, जर कधी चुकून माकून त्यांच्या कायम रागीष्ट किंवा निर्वीकार तोंडातून कोणा पुण्यलोकीच्या बाहेरच्या माणसाला ऐकायला मिळाली, तर त्या माणसाने त्या दिवशी आपला जणू पुनर्जन्मच झाला, असं समजून, लोकं काय म्हणतील याचा विचार न करता स्वतःशीच हसायला किंवा हसता हसता आनंदाने टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही!

हां तर काय सांगत होतो, आपण सारे उर्वरित पडलो मुंबईकर, अथवा ‘उपनगरकर’, त्यामुळे आपलं सारच कसं गगनचुंबी! याच कारण आपल्याला ठाऊक आहेच आणि ते म्हणजे आता नवीन सरकारी GR प्रमाणे ‘सातमजली’ ही कन्सेप्ट बांधकामाच्या बाबतीत जशी कधीच जमीनदोस्त झाली आहे, तीथे ती हसण्याच्या जुन्या पुराण्या परिमाणात तरी कशी शिल्लक असणार ? या एकाच qualificationमुळे आपण लेख वाचून झाल्यावर मुंबईतून किंवा उपनगरातून, कुठूनही टाळ्या वाजवल्यात किंवा नुसतं हसलात, तरी ते मला ठाण्यासारख्या उपनगरात असलेल्या फोर्टिन फ्लोअरवरच्या माझ्या घरी नक्कीच ऐकू येईल, याची आपण खात्री बाळगा!

मला कोणी स्वतःचा चेहरा हसरा न ठेवता जर कधी विचारलं, की “तुमच्या मते हसणं कसं असावं?” तर मी त्याला लगेच उत्तर देईन, की “पाळण्यात झोपलेल्या निरागस बाळाच्या मुखावर विलसतं तसं!” मंडळी, आपण आपल्या उभ्या आयुष्यात असं झोपेत हसणाऱ्या बाळाचं मुखावलोकन एकदा तरी नक्कीच केलं असेल. बाळाच्या त्या निरागस हास्यात ते हास्य पहात असतांना, आपण त्याचा चेहरा नीट बघितलात तर त्यावर आपल्याला एक सात्विकभाव दिसतो. अर्थात तो किंवा ती मोठं झाल्यावर किंवा मोठं होता होता हळू-हळू त्यांच्या त्या निरागस हास्यातील निरागसता जिथे लोप पावत जाते, तिथे त्यातील सात्विकभाव शिल्लक असायचा प्रश्नच येत नाही! पण अशा प्रकारचे सात्विकभाव लहानपणी त्या निरागस हसण्यात कुठून किंवा कशामुळे येतात, हा विषय खरंतर एखाद्याची चेहरापट्टी पाहून त्याच्या किंवा तिच्या मनांत काय चालले आहे ते ओळखणाऱ्या, म्हणजेच फेस रिडींग करणाऱ्या लोकांसाठी संशोधनाचाच विषय ठरावा. इतकंच कशाला हा एखाद्या PhDसाठीच्या प्रबंधासाठी सुद्धा नक्कीच आगळा वेगळा विषय ठरेल, या माझ्या मताशी आपण आपला चेहरा हसरा ठेवून सहमत व्हायला हरकत नाही! पुढे जस जसं वय वाढत जातं आणि जीवनातले अनेक टक्के टोणपे खायला मिळाल्यावर, प्रत्येकजण प्रसंगानुरूप आपापल्या चेहऱ्यावरचे हास्याचे निरनिराळे भाव कसे ठेवायचे, ते कुणीही न शिकवता आपोआप शिकत जातो. जसं, खोटं कधी हसायचं ? कुत्सित कधी हसायचं ? छद्मीपणे कधी हसायचं ? अर्थात हे सारे हास्य प्रकार शिकवणारे अजून तरी आमच्या मुबंईत किंवा उपनगरात, स्वतःला “हास्य सम्राट” म्हणवणाऱ्याने कुठेही वर्ग सुरु केलेले नाहीत, हे मी तुम्हाला तुम्ही हसायच्या आत सांगू इच्छितो. पण हां, त्या ‘पुण्यश्लोकीच्या पुण्य नगरीतल्या’ एखाद्या पेठेतल्या गल्ली बोळात जरा मुबंईकरांच्या किंवा उपनगरकरांच्या उपजत चौकसबुद्धीने कोणी चौकशी केली, तर असा ‘हास्य(?) अभ्यासवर्ग’ नक्कीच सापडेल याची मी मुंबईचा एक उपनगरकर म्हणून आपल्याला खात्री देतो. कारण त्या पुण्यश्लोकीच्या रयतेच सगळंच ‘जगात भारी आणि हटके’ असतं, असा त्यांचा स्वतःच्या बाबतीतला जो पेशवेकालीन गैरसमज आहे, तो आपण उगाच कशाला खोडून काढायच्या भानगडीत पडा आणि आपला जात्याच हसरा चेहरा त्यांच्या सारखा आंबट करा?

 पु. लं. च कथाकथन ज्याने आयुष्यात कधीच ऐकलं नाही किंवा प्रत्यक्ष पाहिलं नाही, असा अस्सल मराठी माणूस शोधून सापडणार नाही! आणि जर असे काही लोकं असतील तर त्यांच आयुष्य, जरी ते त्यांच्या जीवनात इतर कारणांनी भरपूर हसले असले तरी, ती लोकं ‘मनापासून कसं हसायचं’ या बाबतीत कायमच वंचित राहिले असं मी न हसता म्हणतो. माझ्या या विचाराशी आपल्यापैकी जे अस्सल मराठी पु. ल. प्रेमी आहेत, ते न हसता सहमत होतील याची मला 100% खात्री आहे. तर पु. लं. च कथाकथन ऐकतांना प्रेक्षागृहात जो हशा उत्स्फूर्तपणे निर्माण व्हायचा त्याला या जगात तोड नाही आणि असा हशा निर्माण करायची ताकद आजकालच्या कुठल्याच रंगमंचीय कला प्रकारात मला अजून तरी आढळली नाही. इतकंच कशाला त्याच्या पुढे जाऊन मला असं देखील म्हणावंसं वाटत, की आणखी पुढील किती वर्ष आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकांना, श्रोत्यांना उत्स्फूर्त असा छप्परफाड हशा पुन्हा एकदा एखाद्या सभागृहात ऐकायला मिळेल, ते तो एक नटेश्वरच जाणे!

“दे टाळी!” असं म्हणत आपल्या समोर कुणी हात पसरून टाळी मागितली तरी आपण ती बरेच वेळा नाईलाजास्तव का होईना पण देतो. नाईलाजास्तव अशासाठी की त्यांन मागितलेली टाळी ही त्यावेळी खरोखरच टाळी देण्याच्या लायकीची नसते किंवा प्रसंगी संयुक्तिक नसते. उगाच “दे टाळी” म्हणण्याची काहीजणांना सवयच असते आणि त्यातलाच तो एक असतो म्हणा नां!

टाळी हा शब्द आपल्या लहानपणापासून आपल्याला माहित असावा (असं मी मनांतल्या मनांत गृहीत धरतो) त्यामुळे त्याबाबत मी आपणाला आणखी नवीन काय सांगणार? अशी एक रास्त शंका आपल्या मनांत येवू शकते. किंवा टाळी कधी आणि कशी वाजवायची याची एखादी नवीन रीत तर मी आपल्याला शिकवणार नाही ना ? अशी दुसरी शंकासुद्धा आपल्या मनांत टाळी वाजवून जाऊ शकते. पण मंडळी, आपल्या या दोन्ही शंका कशा फोल आहेत, हे आपण माझा उर्वरित लेख वाचल्यावर आपल्याला नक्की कळेल. आणि लेख वाचून झाल्यावर आपण आपल्याच दोन्ही हातांनी नक्कीच एक तरी टाळी किंवा टाळ्या वाजवाल किंवा गेला बाजार अगदीच गडगडाटी नाही, पण मंदस तरी हसाल, याची मला एक उपनगरकर म्हणून मनोमन खात्री आहे!

टाळी किंवा टाळ्या वाजवण्याचे सुद्धा वेगवेगळे नाना प्रकार असतात, असं मी माझ्या बहात्तर वर्षाच्या आयुष्याच्या अनुभवानंतर, माझ्या दोन हातांनी टाळी किंवा टाळ्या न वाजवता बिनधास्त सांगू शकतो, कसं ते बघा!

“काकांना विठ्ठल, विठ्ठल करून दाखव!” अशी आदेशवजा प्रेमाची विनंती आपण आपल्या लहानपणी, थोडं समजायला लागल्यावर आपापल्या आईकडून किंवा वडिलांकडून नक्कीच ऐकली असेल आणि त्याबरहुकूम समोरचे काका कोणाचे कोण हे काहीच माहित नसतांना, आपल्या दोन चिमुकल्या हातांनी ‘न वाजणाऱ्या’ टाळीचे प्रात्यक्षिक हसऱ्या चेहऱ्याने नक्कीच करून दाखवले असेल. मला वाटतं, आपण कशासाठी टाळी वाजवायची, अशा त्या न-कळत्या वयात आपण माझ्या पिढीतील असाल तर, अशा टाळ्या नक्कीच वाजवल्या असतील आणि अशी टाळी आपल्या जीवनातली पाहिली ‘न वाजणारी टाळी’ असण्याची शक्यता पण नाकारता येत नाही, हो की नाही ?

लग्नानंतर दोन अडीच महिन्यांतच नवरा बायकोमधे काही वाजलं आणि दोघांचे आवाज जर भांडण होऊन टिपेला पोचले असतील आणि ते ऐकून त्यात, संथ लयीत टाळी वाजवत सासूची एन्ट्री झाली तर… तर त्या टाळी वाजवायच्या संथ लयीत एक प्रकारचा उपहास दडलेला असतो, असं आपल्या लक्षात येईल.

आपल्या समोर असलेल्या एखाद्या व्यक्तीच नांव जर आपल्याला माहित नसेल, तर त्याच लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी आपण जी टाळी वाजवतो, ती तशी माझ्यामते नाजूक प्रकारात मोडणारी असते. कारण अशी “लक्षवेधी” टाळी वाजवतांना काही काही लोकांच तोंडाने एकीकडे “शू क sss शू क” पण चालू असतं! अर्थात त्या शुकशुकाटाने ती व्यक्ती सोडून बाकीचे इतर लोकंच तुमच्याकडे बघायला लागतात, हा असा अनुभव बहुतेक आपल्या सर्वांच्या गाठीशी नक्कीच असतो. असा अनुभव येऊन सुद्धा आपण तिच चूक आठवणीने पुन्हा पुन्हा करतच राहतो, हे खरं तर त्या लक्षवेधी टाळीच दुर्दैवच. आपल्या भारतीय लोकांच्या काही जन्मजात सवयी निदान आपल्या इतक्या मानगुटीवर बसल्या आहेत की त्या बदलायच्या म्हटल्या, तरी त्या प्रत्यक्ष देवाने जरी एखादी जादूची टाळी वाजवली तरी सुद्धा नक्कीच सुटणार नाहीत, खरं की नाही ? पटलं असेल तर द्या टाळी!

“अर्धनारी-नटेश्वर” या प्रकारात मोडणाऱ्या “तिने”(?) किंवा “त्याने”(?) दर शनिवारी, दोन्ही हातांची दहा बोटं फाकवून आणि हातांचे तळवे एकमेकांवर जोरात आपटून निर्माण केलेला टाळीनाद, हा या पृथ्वीतलावर एकमेवाद्वितीय असावा, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. आता तर काही योग शिक्षक सुद्धा रोज प्रत्येकाने निदान ५० तरी टाळ्या, उगाचच म्हणजे कुठच्याही आनंदात न वाजवता एक व्यायाम प्रकार म्हणून वाजवाव्या असं सांगतात. अर्थात या अशा टाळी वादनाने कुणाला कसा फायदा होतो त्याबद्दल चर्चा करण्याची ही जागा नाही आणि वेळ ही नाही हे आपण मला टाळी न देताच मान्य कराल.

कुणा गायकाचा अथवा एखाद्या वादकाचा कार्यक्रम संपल्यावर, तो कार्यक्रम आवडल्याची पोच पावती म्हणून रसिक प्रेक्षक जी टाळ्या वाजवून कडकडीत दाद देतात, त्याची जातकुळीच वेगळी! पण एखाद्या राजकीय नेत्याच्या जाहीर सभेतील भाषणाला, भाड्याने आणलेल्या लोकांनी नको तिथे वाजवलेल्या टाळ्या, तुमच्या माझ्यासारख्या लोकांना हसायला भाग पाडतात, हे ही तितकंच खरं. अशावेळी त्यांच्या टाळ्या आणि आपलं हसणं यांचा एक अनोखा संगम आपण तेव्हा अनुभवतो.

नाटक किंवा सिनेमातील नायक अथवा नयिकेच्या तोंडातील एखाद पल्लेदार वाक्य किंवा दर्दभरा संवाद ऐकून, त्याला लोकांनी उत्स्फूर्तपणे वाजवलेल्या टाळ्या ऐकल्या की मंडळी मी थोडा कन्‍फ्युज्‍ड होतो! म्हणजे असं बघा, तो संवाद नायक अथवा नायिकेच्या तोंडातून ऐकल्यावर प्रेक्षकांनी वाजवलेल्या टाळ्या, ह्या त्या नायिकेच्या अथवा नायकाच्या संवादफेकीला आहेत की लेखकाच्या संवाद लिखाणाला, अशा द्विधा मनस्थितीत मी अडकतो आणि टाळी किंवा टाळ्या वाजवायचंच विसरून जातो मंडळी!

मंडळी, अजूनही माणसाच्या हसण्याचे आणि टाळी किंवा टाळ्या वाजवायचे नानाविध प्रकार असतील, हे मी न हसता किंवा कुठल्याही प्रकारची टाळी न वाजवता अथवा मागता आणि आपण या वाक्याला हसायच्या आतच म्हणून घेतो! पण लेख विस्तारभयास्तव आणि मी लेखाच्या सुरवातीलाच म्हटल्या प्रमाणे, लेख वाचून आपण टाळी वाजवायला किंवा हसायला किंवा दोन्ही क्रिया एकदम करायला विसरण्याआधीच लेख संपवतो!

 शुभं भवतु!

 © प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

ता. क. – आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात, दुसऱ्या लोकांना वारंवार हसवण्याचे आणि त्यासाठी त्यांनी दिलेली टाळी किंवा टाळ्यारुपी दाद मिळवण्याचे प्रसंग वारंवार येवोत, हीच त्या जगदीशाच्या चरणी दोन्ही हात जोडून प्रार्थना!

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ७९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ७९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- सहस्त्रबुद्धे आजोबांच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा मला जाणवला होता पण त्यामुळेच ‘प्रभूदेसाई यांच्याविरुद्ध लेखी तक्रार करण्यामागच्या त्यांच्या भूमिकेवर ते ठाम राहिले तर? ‘ हा प्रश्न मनाला त्रास देत होताच.)

कांहीही झालं तरी हा तिढा सुटायलाच हवा असं उत्कटतेनं मनात आलं आणि ‘त्या’ची आठवण झाली. ‘तो’ जे करेल तेच सर्वार्थाने योग्यच असेल असं वाटलं न् मन थोडं शांत झालं. आजोबांच्या तेव्हाच्या मन:स्थितीचा विचार करता आपण लगेचच घाईघाईने मुद्द्याला हात घालणं योग्य नाही हेही जाणवलं. जे करायचं ते आधी विचार करूनच ठरवायला हवं होतं. त्यामुळे आजच्यापुरता हा विषय इथंच थांबवणं ओघानं आलंच.

“आजोबा, आज तुमच्याशी बोललो, खूप बरं वाटलं ” मी म्हणालो. “तुम्ही मोकळेपणानं सगळं सांगितलंत म्हणून तुमची नेमकी बाजू तरी मला समजली. आणि पटलीही. त्यामुळे तुम्ही केलेल्या तक्रारीच्या बाबतीत काय करायचं, तुमच्यावर अन्याय न होता कसा मार्ग काढायचा हे मी पाहिन. याबाबत आधी आमच्या साहेबांशीही बोलेन. आपण भेटू लवकरच. येत्या एक-दोन दिवसातच मी आधी फोन करून तुमच्याकडे येईन. चालेल? “

त्यांनी होकारार्थी मान हलवली. माझ्या बोलण्यातली सकारात्मकता ही त्यांनी जे सांगितलं त्यावरची माझी त्याक्षणीची उस्फूर्त प्रतिक्रिया होती. माझ्या या प्रतिक्रियेनंतरचं आजोबांच्या नजरेत उमटलेलं समाधान माझी उमेद वाढवणारं होतं!

तरीही आपण नेमकं काय करायचं याबद्दल मात्र त्याक्षणी माझ्या मनात पुरेशी स्पष्टता नव्हती हे खरंच. प्रभूदेसाईंना जास्तीतजास्त कठोर शिक्षा करायची म्हणजे नेमकं काय करायचं की जेणेकरून सहस्त्रबुद्धे आजोबांचं समाधान होईल? शिक्षा कोणतीही असो बँकांच्या नियमात बसूनच करायला हवी. सहस्त्रबुद्धे आजोबांची बाजू मला पटणं पुरेसं नव्हतं. जे घडलं असं आजोबांनी सांगितलं त्याला कोणतेही सबळ पुरावे, साक्षीदार त्यांनी सादर केलेले नव्हते. केवळ ते म्हणतात म्हणून एका जबाबदार ब्रॅंच मॅनेजरला कठोर शिक्षा करण्याची कोणतीही तरतूद कोणत्याच बँकेच्या नियमात नाहीय. स्वतःची बाजू मांडताना प्रभूदेसाई मला म्हणाले होते त्यातला शब्द न् शब्द मला स्वच्छ आठवला. “एका यशस्वी ब्रॅंच मॅनेजरचं वीस वर्षांचं निर्दोष, चांगलं रेकॉर्ड पहायचं की एका य:कश्चित तक्रारदाराला अनावश्यक महत्व द्यायचं हे तुम्ही ठरवायला हवं सर.. ” असं

प्रभूदेसाई मला म्हणाले होते. त्यांचं तेव्हाचं बोलणं ऐकताना मला ते कांहीसं अति आत्मविश्वासाचं, अहंकाराचा दर्प असलेलं असंच वाटलं होतं. पण आज मी काय करायला हवं हे ठरवायची वेळ आली तेव्हा तेच बोलणं नकळत मला दिशा दाखवून गेलं. त्यामुळे आता सहस्त्रबुध्दे आजोबांबाबतची माझ्या मनातली सहानुभूती जपत असतानाच ग्राहक-सेवेच्या गुणात्मकतेबरोबरच बँक कर्मचाऱ्यांच्या बाबतीतले बॅंकेचे नियमही मला दुर्लक्षून चालणार नव्हतं. तरीही जे करायचं ते सहस्त्रबुद्धे आजोबांना न्याय मिळाल्याचं समाधान देणारंही असायला हवं असं मला मनापासून वाटत होतं!

त्यादिवशी सहस्त्रबुद्धे आजोबांचा निरोप घेऊन मी बाहेर पडल्यानंतर परस्पर आॅफिसला जाताच गेल्या दोन दिवसांपासूनचा सविस्तर वृतांत वखरेसाहेबांना सांगून त्यांच्याशी चर्चा करायला मी त्यांच्या केबिनमधे पोहोचेपर्यंतच्या तासाभरात माझ्या मनात येऊन गेलेल्या उलट-सुलट विचारांचा हा सगळा सारांश!

आज उद्या एवढ्यात हा प्रश्न मार्गी लागायची निकड असणारे वखरेसाहेब माझीच वाट पहात होते.

“भेटले कां ते तक्रारदार? झालं बोलणं? “

“हो सर.. “

“काय म्हणतायत? तक्रार मागं घ्यायला तयार झाले कीं अजूनही हटून बसलेत? “

आत्ता या घटकेला ती तक्रार मागे घेतली जाणं हेच वखरेसाहेबांइतकंच मलाही निकडीचं वाटत होतं.. पण…?

“त्यासंबंधीच सविस्तर बोलायचंय सर. तुम्ही बिझी असाल तर दुपारी लंचनंतर येऊ कां सर? ” त्यांचा अंदाज घेत मी विचारलं.

“छे छे.. नाही.. नको. हाच विषय आधी एकदाचा संपवायला हवा. आत्ताच सेंट्रल ऑफिसमधून याचसंबंधी फोन आला होता. मी एक-दोन दिवसात काम होऊन जाईल असं सांगितलंय. “

मी चमकून त्यांच्याकडे पाहिलं.

“कां? प्रॉब्लेम आहे कां कांही? ” त्यांनी उतावीळपणे विचारलं.

“प्रॉब्लेम आहेच सर. आणि आपल्यालाच तो सोडवायचाय. त्याबद्दलच बोलायचं होतं. “

“ठीकाय. बोला. “

“या तक्रारीला जी घटना निमित्त झाली ती नेमकी काय होती याबाबत प्रभूदेसाईंनी मला जो सांगितला होता तो आणि सहस्त्रबुद्धे आजोबांनी सांगितलेला असे दोन्ही घटनाक्रम पूर्णतः परस्परांच्या विरूध्द आहेत सर. ” मी म्हणालो.

“हो. हे अपेक्षितच होतं. प्रभूदेसाई बोललाय माझ्याशी. आणि ते सहस्त्रबुध्दे आजोबाही कसे तर्कटी, संतापी आणि तक्रारखोर आहेत हेही सांगितलंय त्यानं. “

मी सावध झालो. मी फक्त सहस्त्रबुद्धेंबद्दलची सहानुभूती आणि बँक कर्मचाऱ्यांबद्दलचे नियम याच दोन बाबींचा विचार केलेला होता. वखरेसाहेबांचं

प्रभूदेसाईंबद्दलचं अतिशय चांगलं मत मी गृहितच धरलं नव्हतं. पण खरं तर कोणताही निर्णय घेताना हे मतही अतिशय निर्णायक ठरायचीच शक्यता जास्त होती कारण वखरेसाहेब हेच स्वतः कोणत्याही निर्णयावर शिक्कामोर्तब करणारे अधिकारी होते!

‘डोण्ट वरी. प्रभूदेसाई माझाच माणूस आहे. स्टार परफॉर्मर आहे तो. त्याच्या विरुद्ध कुणी तक्रार करावी हेच आश्चर्य आहे ‘ असं याच संदर्भात प्रभूदेसाईंबद्दल बोलताना

वखरेसाहेब मला यापूर्वीही म्हणाले होते ते आठवलं. प्रभूदेसाई मला पूर्णतः अनोळखी असताना, अतिशय अल्पसहवासातल्या त्यांच्या बोलण्यावरून आणि सहस्त्रबुद्धे आजोबांनी सांगितलेल्या त्यांच्या अनुभवावरून तयार झालेलं प्रभूदेसाईंबद्दलचं माझं मत व्यक्त करायची घाई करणं अनेक वर्षांच्या अनुभवावरून तयार झालेल्या वखरेसाहेबांच्या मनातल्या प्रभूदेसाई या व्यक्तीच्या प्रतिमेला तडा देणारंच ठरणार होतं. ते मला नको होतं. कारण हे माझ्यासाठी योग्य निर्णय घेण्यातला फार मोठा अडसरच ठरायची शक्यता होती.

“हो सर. काल मी सहस्त्रबुध्देंना प्रथम भेटलो तेव्हा त्यांच्याबद्दलचा हाच पूर्वग्रह माझ्या मनात होता. ” गेल्या दोन दिवसात मी आणि सहस्त्रबुद्धे यांच्या भेटीत नेमकं जे जे बोलणं झालं ते सांगायला मी सुरुवात केली. वखरेसाहेब शांतपणे आणि उत्सुकतेने सगळं ऐकत होते. प्रभूदेसाईंबद्दलचं त्यांचं मत कलुषीत न करता सहस्त्रबुद्धे आजोबांबद्दलचा त्यांच्या मनातला पूर्वग्रह आणि गैरसमज दूर होणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं.

त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं ते सगळं सहस्त्रबुद्धेंच्याच शब्दात माझ्या तोंडून ऐकताना वखरेसाहेबांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता मला ठळकपणे जाणवली. माझं बोलणं संपलं तेव्हा नि:शब्दपणे ते क्षणभर स्तब्ध झाले.

“सर, या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रभूदेसाई काय किंवा सहस्त्रबुद्धे आजोबा काय कुणालाही झुकतं माप न देताही अन्याय झाल्याची भावना त्या दोघांच्याही मनात निर्माण होणार नाही याची काळजी घेणं आपल्यासाठी आवश्यक आहे असं मला वाटतं. “

“हे सगळं प्रकरण इतके दिवस दुर्लक्षित राहिलंच कसं पण? त्याला जबाबदार कोण हेही ठरवायला हवंच ना? ” ते उद्वेगाने म्हणाले.

“हे प्रकरण तडजोड न होता यापुढंही असंच लटकत राहिलं, तर तेही करावं लागेलच. पण ती नंतरची गोष्ट. आत्ता तडजोड होण्यासाठी तातडीनं काय करायचं ते आधी ठरवूया सर. “

“मी.. मी आज त्या प्रभूदेसाईला बोलावून घेतो ताबडतोब. आपण बोलू या त्याच्याशी. तशीच वेळ आली तर तो माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही खात्री आहे माझी. “

“नाही सर. नको. आत्ता नको. आता कोणत्याही परिस्थितीत जे करायचं ते आपणच ठरवायला हवं. शिवाय तुम्हाला प्रभूदेसाईंच्याबद्दल एवढी खात्री असेल तर तशीच वेळ आली तर त्यांची मदत तेव्हा घेता येईलच कीं.. ” शक्य तेवढं सौम्य शब्दांत त्यांचा अंदाज घेत मी म्हणालो.

“पण आपण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं..? ” त्यांनी उत्सुकतेने विचारलं.

“सर, मी माझं मत सांगेन आणि मार्गही सुचवेन. त्यात तुमच्या सल्ल्यानुसार बदलही करूया, मात्र जे कांही करायचं ते वेळेची निकड बघता आपण तातडीने करायला हवंय. “

“नो प्राॅब्लेम. बोला.. “

मला पटकन् काय बोलावं सुचेचना. मनाशी पुसटसंही कांहीच ठरवलेलं नसल्यामुळे जे आपल्या मनात आहे ते सगळं हातचं कांहीही राखून न ठेवता मोकळेपणानं व्यक्त होण्याखेरीज पर्यायच नव्हता. आणि मग दुसऱ्याच क्षणी, याच संदर्भात घडलेल्या सर्व प्रसंग, चर्चा आणि त्या त्या वेळी मनात उमटलेल्या माझ्या प्रतिक्रिया याच्याच गेले दोन रात्रंदिवस मनोमन सुरू असलेल्या मंथनाचं उत्स्फूर्त शब्दरूप माझ्याही नकळत मनाच्या तळातून उत्कटतेने व्यक्त होत राहिलं…!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “रस्ते आणि वाटा…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🌸 विविधा 🌸

☆ “रस्ते आणि वाटा…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

काल एक मुलाखत पाहत होते त्यात एक वाक्य सुंदर होत.. ” रस्ते गंभीर असतात आणि वाटा खट्याळ” ते वाक्य माझ्या मनामध्ये दिवसभर रेंगाळत राहिल, पुन्हा पुन्हा मनात ते मी वाक्य घोळवत राहिले. खरंच रस्ते गंभीर आणि वाटा खट्याळ…. किती सुंदर कल्पना.. !

माझ्या डोळ्यापुढे छान डांबरी सडक आली म्हणजे महामार्गावरील रस्ता… हे रस्ते कागदावर आम्ही आखून घेतलेले असतात. लोकांची सोय गाड्याचं जळणार कमी लागणारे पेट्रोल, भूमी संपादन करायला लागणारे पैसे, वाचणाऱा वेळ.. या सगळ्यांचे गणित मांडून बनवलेले असतात. आजूबाजूची झाडं झुडपं कापली जातात.. मध्ये डिव्हायडर टाकून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांसाठी दोन मार्ग बनवले जातात. का तर अपघात होऊ नयेत… डिव्हायडरवर रंगीबेरंगी दिसतील अशी फुलंझाड लावली जातात… रस्ता मजबूत कसा बनेल ह्याच इंजिनिअरिंग ठरलेलं असतं.. म्हणून रस्ता अतिशय गुळगुळीत सुंदर देखणा दिसतो. डांबराचा रंग त्यांना अगदी शोभून दिसतो. आमचे आफळे बुवा पन्नास वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या रस्त्याचे वर्णन करताना म्हणायचे तूप सांडल तर भरून घ्यावं नव्हे तर चाटून खावं इतके ते रस्ते स्वच्छ आणि गुळगुळीत. आपल्याकडचे रस्ते आता तसेच झाले आहेत. निदान नवीन असताना तरी तसं वाटायचं !

वाटा या मातीतून फुफाट्यातून एखादं ठिकाण शोधत निघालेल्या वाटसरूंच्या पाऊलखुणानी तयार झालेले असतात त्याला कुठलेही बांधिव पण नसते, दिशाही नसते, तिथे असतो तो फक्त शोध. आपल्या ठिकाणाला पोहोचण्याचा जवळचा मार्ग शोधणे हा त्याचा उद्देश असतो मग अनेक जण त्याच मार्गावर चालत राहतात आणि तयार होते वाट! ती खट्याळ का असते तर दर वेळेस तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जाईल असं नाही ती कुठेतरी मध्येच आडरानात गडप होते व तिथून तुम्हाला दुसरी पायवाट शोधावी लागते…

ही दुसरी पायवाट.. कधी ती वळणावळणाची असते कधी खबदाडीतन जाते, कधी पुढे नाले नद्यातून जाते, झाडीच्या जंगलातूनही जाते, काट्याकुट्यातून जाते म्हणून ती अवघड आहे तिला सरळ पण मान्यच नसतं.. !तिच्या वाटेवर आजूबाजूला नैसर्गिक रित्या तयार झालेली हिरवी रानं असतात त्या गवताच्या पात्या मधून रान फुले डोकावत असतात.. पिवळी, लाल, गुलबक्षी, जांभळी अनेक रंग छटातली.. कुठेतरी मध्येच वेली वाढलेल्या असतात.. एखाद सुंदर झाड असतं कधी वठलेलं तर कधी डवरलेलं… भरलेल्या झाडाखाली वाटसरुने खुशाल विसावा घ्यावा आणि पुढच्या मार्गाला निघावे. रस्त्यावर एखादा वेल सापडतो ज्याला एखादा फळ लागलेल असतं शेंगा लागलेल्या असतात चिंचेचा झाडावर चिंचा लटकत असतात. आंब्यावर कैऱ्या लटकत असतात दोन दगड मारले की दोन घोस हातात  पडावेत.. ती आंबट गोड चव  चाखत माखत पुढला प्रवास करावा. थंडगार वारा अंगावर घ्याव अंगाशी लगट करणाऱ्या वेलींनाअलगद बाजूला सरकवावं.. चालता चालता खसकन  मोडलेल्या काट्याला अलगद बाजूला करावा आणि पुढे निघावं. हे सगळे ही वाट करत असते म्हणून तर ती अवखळ आहे.. खट्याळ आहे. तिचं सौंदर्य हे जातिवंत आहे ब्युटी पार्लरवालं  नाही. नैसर्गिक देखणेपण, निसर्गाचे साज अंगावर चढवल्यासारखं!

पण रस्त्याचा तसं नाही. रस्ता मला नेहमी  आयटी क्षेत्रात कार्य करणाऱ्या थ्री पीस घातलेल्या टाय वगैरे लावलेल्या सुटा बुटातल्या माणसासारखा वाटतो. तो आपला वाटत नाही, तो फॉरेनर वाटतो. त्याच्याबद्दल दबदबा वाटतो कदाचित आदरही वाटतो पण आपलेपण वाटावं तसं नाही… वाट आपली वाटते अगदी आईसारखे हात धरून पुढे नेणारी… रस्त्याचं कसं आहे त्याचा थांबा ठरलेला आहे, जागोजागी दिशा दाखवणारे बाण आहेत, पांढऱ्या पिवळ्या दगडांवर किती अंतर राहिले हे सांगणारे आकडे आहेत, प्रवासाच्या काम काळाचे आणि वेगाचेही गणित आहे ते वाटाना नाही. त्या खटाळ आहेत नक्की कुठे नेते सांगता येत नाही पण त्यावरचा प्रवास आनंददायी आहे. तिथे खरच आपण आनंद यात्री असतो आणि रस्त्यावर आपण प्रवासी असतो. रस्त्यावर सोयी आहेत खाण्यापिण्याच्या, टॉयलेट, बाथरूमच्या, पेट्रोल भरण्याच्या आणि खरेदी करण्याच्याही.. तसं वाटेवर नाही रस्त्याला गुगल लावलेला असतो पण वाटेवर मात्र आपण आपल्या कौशल्याचा गुलाल उधळत जायचे असते. अहो कौशल्य म्हणजे वाट ओळखण्याचे.. वाट शोधून दाखवणाऱ्याला वाटाड्या उगीच म्हणत नाहीत. कधी या वाटा धुक्यात हरवतात कधी झाडात लपतात कधी पाण्यात गडप होतात… त्याचा बरोबर शोध घेणे म्हणजे पराक्रमच असतो. असला चकवा चकवीचा खट्याळपणा वाटा खूप करतात बर का…

रस्त्याच कसं आहे.. गर्दीची साथ असते. कधी ती गर्दी इतकी होते तिच्या गर्दीत तुम्ही गुदमरूनही जाता तसं वाटेचं नाही. वाटेवरून चालणारे चार दोन जण असतात. या प्रवासात भेटलाच कोणी तर तो सखा होतो आणि वाट लवकर सरते असं म्हणतात. हरवण्याचा खटाळपणा करणं हे वाटेच्या स्वभावातच आहे तसं रस्ते जबाबदार माणसासारखे असतात ते हरवू देत नाहीत. पण खरं सांगू मंडळी कुणीतरी आपल्याबरोबर खट्याळपणा करतोय आणि आपण त्यात हरवून जातोय यासारखा शृंगार नाही.. म्हणून वाटा चांगल्या अर्थाने शृंगारिक आहेत.

वाटा हुडकत निघालेल्या कोलंबसला अमेरिका सापडली हे उदाहरण माझ्यासाठी फार महत्त्वाचं नाही पण एक पाच सात वर्षाचा पोर आपल्या गावाला शाळा नाही म्हणून शेजारच्या गावात तीन चार किलोमीटर अंतरावर शाळेत पोहोचण्यासाठी स्मशानातल्या पायवाटेतून जातं.. रोज खूप घाबरत.. मनात नेहमी भीती असते.. स्मशान आलं की धडधड व्हायला लागते.. अशा मनाच्या रोजच्या अवस्थेत ते पोर शिकतं आणि राजकारणात पतंगराव कदम या नावाने उदयाला येतं आणि हा वाटेचा अनुभव लक्षात घेऊन बिनवाटेच्या गावासाठी शाळांचं जाळ पसरवतं भारती विद्यापीठ स्थापन करतं आणि संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करत हे उदाहरण शिक्षणाची वाट प्रशस्त करणाऱ्या एका शिक्षणप्रेमी मंत्र्याच आहे. लहान पोराला त्या स्मशानातून घाबरून सोडण्याचा खट्याळपणा करणाऱ्या त्या वाटेमुळेच ही वाट सापडली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही.

एकूण काय मंडळी वाटा खट्याळ आहेत आणि रस्ते गंभीर आहेत ते गंभीरपणे ठिकाणी पोहोचवतात आणि खट्याळवाट जीवनाची मजा घेत आपल्याला इच्छित स्थळी पोहोचवते, किंबहुना आपण ते स्थळ हुडकून काढतो. त्या डांबरी वाटांचं सरकारी दरबारी नामकरण होतं.. महामार्ग क्रमांक नऊ 11, 17, 12.. तसं वाटाना अजिबात नाव नाही त्या बेनाम असतात. जो यावरून चालत जातो त्याच्या मागून येणाऱ्याला त्या वाट दाखवतात आणि मग ती वाट वहीवाट होते. कधीकधी ती बिकटही असते. याच्यावरून जे प्रवास करून येतात ना ते खरा  पराक्रमांचा झेंडा लावतात!

…. मुलाखतीत ऐकलेल्या  या वाक्याने मला दोन दिवस विचार करायला भाग पाडला आणि रस्ते आणि वाटा यातला फरक जाणवला. खरंच रस्ते गंभीर असतात आणि  वाटा खट्याळ… ! आता त्या गंभीर रस्त्यांशी खट्याळपणा करणारे महाभाग आपल्याकडे आहेतच की जे म्हणतात बेसन भाकरी लेके डांबरी डांबरी से जायेंगे.. मला सांगा डांबरी से कोई बेसन भाकरी लेके जाता है क्या?  

…. असो पण सध्या महाराष्ट्रात काहीही चालतं.. आपण त्यात पडू नये. उगीच कशाला खट्याळपणा करायचा? नाही का? …… !

वाट आवडली असेल तर अनेक ठिकाणी पाठवून ती प्रशस्त करा माझी परवानगी आहे शक्यतो माझं नाव खोडू नका मला माहिती हा खाट्याळपणा तुम्ही करणार नाहीत.

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “.. परंपरेच्या गर्भात वसें समृद्धीचा वारसा..” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? विविधा  ?

☆ “.. परंपरेच्या गर्भात वसें समृद्धीचा वारसा..” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

संस्कृती, परंपरा आणि वारसा या तीनही खरंतर वेगवेगळ्या संकल्पना आहेत. बरेच जाणते लोक सुद्धा हे तीनही शब्द एकाच अर्थानं वापरत असतात. पण खरोखरच तीनही गोष्टींची त्यांची त्यांची विशेष अशी आभा आहे, प्रतिष्ठा आहे.

दिवाळीतलं लक्ष्मीपूजन हा आम्हां डंके कुटुंबियांचा कुळधर्मातला सण. जगाच्या पाठीवर जिथं जिथं डंके मंडळी आहेत, तिथं तिथं घरी लक्ष्मीपूजन होतंच. विशेष म्हणजे, लक्ष्मीची प्रतिमा किंवा विग्रह न मांडता पूजन होतं. भौतिक संपत्ती आणि समृद्धी यातला फरक आमच्या घराण्याच्या मूळ पुरुषानं कुळधर्मात इतका सुरेख बसवलेला आहे की, याबद्दल आम्हीच काय, आमच्या पुढच्या पिढ्यासुद्धा कायम त्यांच्या ऋणात राहतील.

पैसा हे साधनच जेव्हा अस्तित्वात नव्हतं, तेव्हापासून आपल्या संस्कृतीत लक्ष्मीपूजनाची परंपरा आहे. आजही अनेकजण अष्टलक्ष्मींचा उल्लेख केलेले दिवाळीचे शुभेच्छा संदेश पाठवतात ना, त्यातला आशय समजून घेण्यासारखा आहे. हिंदू परंपरेत, संपत्ती (लक्ष्मी) केवळ पैशापुरती मर्यादित नाही. खऱ्या समृद्धीमध्ये ज्ञान, शक्ती, चांगले आरोग्य, उत्तम संतती, आंतरिक शांती आणि यश यांचा समावेश होतो.

आपल्या संस्कृतीत लक्ष्मीचं वर्णन काय केलं आहे, तिचा निवास आपल्या घरी असावा म्हणजे नेमकं काय, हे नीट उमगलंच नाही तर लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ भौतिक संपत्तीची पूजा एवढंच मर्यादित राहील आणि त्याचा जो खरा लाभ व्हायला हवा, तो होणारच नाही.

आदिलक्ष्मी: देवी लक्ष्मीचे मूळ रूप. आध्यात्मिक संपत्ती, जीवनाच्या उद्देशाची स्पष्टता आणि त्यांच्या जीवन कर्तव्याचं निर्वहन करण्याची शक्ती देणारी.

धनलक्ष्मी: धन आणि संपत्ती प्रदान करणारी. आर्थिक विपुलता, सौभाग्य आणि सांसारिक जीवनात यश देणारी. नैतिक मार्गानं केलेल्या कठोर परिश्रमांनी मिळवलेली आणि योग्यरित्या वापरली जाणारी संपत्तीच्या स्थानी तिचा निवास असतो.

धान्यलक्ष्मी: पोषण, आरोग्य आणि कृषी समृद्धीची दात्री. दैनंदिन जीवनातील अन्नमय सुदृढता, सक्षमता, स्वयंपूर्णता आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची देवता. सुजल सुफळ समृद्धता प्रदान करणारी.

गजलक्ष्मी: शक्ती, आदर आणि सामाजिक प्रतिष्ठा देणारी.

सन्तानलक्ष्मी: उत्तम संतती आणि वारसांसाठी आशीर्वाद देणारी.

वीरलक्ष्मी (धैर्यलक्ष्मी): आंतरिक धैर्य आणि शौर्य देणारी.

विजयलक्ष्मी: विजयाचे प्रतीक असलेली आणि भौतिक किंवा आध्यात्मिक अडथळ्यांवर विजय मिळवणारी.

विद्यालक्ष्मी: बौद्धिक व आध्यात्मिक ज्ञान आणि शिक्षणाशी संबंधित. शैक्षणिक यश, विचारांची स्पष्टता आणि निर्णय घेण्याची शक्ती देणारी.

हे सगळं लक्ष्मीचं वर्णन आपल्याकडं हजारो वर्षांपूर्वीच करुन ठेवलेलं आहे आणि ते अजिबात लपवून-बिपवून ठेवलेलं नाही. लक्ष्मीचा आणि समृद्धीचा इतका व्यापक आणि आयुष्याच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा, ध्येयं सुस्पष्ट करणारा अर्थ जगातल्या दुसऱ्या कुठल्याच संस्कृतीत आपल्याला शोधून मिळणार नाही. अशी अत्यंत सखोल चिंतनाची आणि वैचारिक मांडणीची परंपरा आपल्याकडं असल्यामुळं टोमॅटिनो फेस्टीव्हल किंवा हॉलोविन फेस्टीव्हल सारख्या कार्यक्रमांची योजना आपल्या संस्कृतीत नाही.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आई लक्ष्मीच्या या सगळ्याच रूपांच्या प्रतीकांची पूजा केली पाहिजे आणि तीही अगदी कृतज्ञभावानं.. रोजच्या रोज नियमित व्यायाम करणं हीसुद्धा धैर्यलक्ष्मीची साधना आहे. अन्न, पाणी, इंधन, वीज यांचा कणभर सुद्धा अपव्यय होऊ न देणं हीसुद्धा धान्यलक्ष्मीची साधना आहे. नियमित अभ्यास, नियमित वाचन, नियमित लेखन, नियमित परिश्रम, नियमित नैतिकता, नियमित उपासना यासुद्धा आई लक्ष्मीच्या साधनाच आहेत. या अर्थानं पहायला गेलं तर, आपण सगळ्यांनीच रोजच्या रोज लक्ष्मीसाधना केली पाहिजे.

लक्ष्मीपूजन मोठं दणक्यात केलं अन् तोंडी रोज आई बहिणीवरून दिल्या जाणाऱ्या शिव्या ओसंडून वाहत असतील तर काय उपयोग? आपण धनलक्ष्मीचं पूजन मोठ्या थाटात केलं आणि प्रदूषण करणारे फटाके उडवले तर तो आदीलक्ष्मी आणि धान्यलक्ष्मीचा अपमानच आहे. देशाच्या सैन्यदलांवर शंका घेणं हा शौर्यलक्ष्मीचा अपमान आहे. पैसे घेऊन अजेंडा पत्रकारिता करणं हा विद्यालक्ष्मीचा अपमान आहे. म्हणूनच, लक्ष्मीपूजनाकडे केवळ रित म्हणून न पाहता, अर्थ समजून घेऊन पाहिलं पाहिजे.

ज्यांचं हातावर पोट आहे अशा रस्त्यावरच्या हंगामी विक्रेत्यांशी ताणून घासाघीस करुन फुलं, पूजा साहित्य किंवा आकाशदिवे, पणत्या आणल्या आणि आपल्या घरी पूजा केली तर त्या विक्रेत्याच्या घरी धनलक्ष्मी कशी जाईल, याचा विचार आपण करतो का? असा विचार करायला आपल्या मुलांना आपण शिकवतो का? जी घासाघीस आपण लाखो रुपयांचे दागिने, महागडे कपडे, वाहनं, हॉटेलमधली जेवणं अशा ठिकाणी करण्याचं धाडस करत नाही, ती घासाघीस आपण अत्यंत सामान्य विक्रेत्यांसोबत करुन त्यांची धनसंपदा अडवतो आहोत, हे उघड आहे. आपल्याला ज्यातलं काहीही माहिती नाही, अशा विषयात अत्यंत विखारी वक्तव्य करणं हा आपल्या वाणीवर वसलेल्या सरस्वतीचा अपमानच असतो. केवळ राजकीय स्वार्थापोटी किंवा पोकळ प्रसिद्धी मिळवण्यापोटी वाट्टेल तशी जाहीर वक्तव्यं करणं हा सुद्धा सरस्वतीचा अपमानच असतो. जिथं सरस्वतीचा अपमान होतो तिथं लक्ष्मी कशी थांबेल? गरिबी, उपासमारी, बेरोजगारी यांची मुळं आपण रोज नित्यनेमानं करत असलेल्या लक्ष्मीच्या अपमानात आहेत, हे ज्या दिवशी कळेल तो सुदिन.

दारी आलेल्या वासुदेवाच्या झोळीत तांदळाचं एक माप ओतणं ही जशी लक्ष्मीची साधना आहे तशीच आपल्या शिक्षकांविषयी, पालकांविषयी आदरानं बोलणं हीसुद्धा लक्ष्मीची साधनाच आहे. एखाद्या अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करणं हीसुद्धा लक्ष्मीची साधनाच आहे. भुकेल्या माणसाला अन्न देणं, तहानलेल्या माणसाला पाणी देणं, निरक्षराला साक्षर करणं, सामाजिक कार्यात सहभागी होणं ही सगळी लक्ष्मीसाधनेची रूपं आहेत. कृतज्ञता, प्रामाणिकपणा, राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी, स्वच्छ निर्मळ चारित्र्य, पर्यावरणाविषयीची आस्था या सगळ्यांचा लक्ष्मीच्या साधनेशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहे.

मला जशी माझ्या पोटाची, चरितार्थाची, संसाराची, बायकापोरांची, त्यांच्या भवितव्याची काळजी आहे, तशीच ती काळजी प्रत्येकालाच असणार. मग दहा रुपयांचा अळू असो किंवा दहा हजाराचा शालू असो, बाजारात खरेदी करताना आपण समोरच्याच्या पोटाची, चरितार्थाची, संसाराची, बायकापोरांची, त्यांच्या भवितव्याची काळजी समजून घेतली तर आपल्या प्रत्येक कृतीतून घरोघरी लक्ष्मीचा निवास होऊ लागेल. आपण प्रत्येकानं सहृदयतेनं आणि आपुलकीनं सहकार्यासाठी एक पाऊल पुढं टाकायचं ठरवलं तर या अष्टलक्ष्मी प्रत्येकाच्या घरी नांदतील. सरळ मार्गानं आलेली सुबत्ता, समृद्धी मनाला आणि वृत्तीला विशाल करते. सरळ मार्गानं आणि प्रामाणिक कष्टानं मोठी झालेली माणसं सहसा कद्रू किंवा टाळूवरचं लोणी खाणारी नसतात. त्यांना “देण्यातली” लक्ष्मीची साधना पुरती उमगलेली असते. त्यामुळंच, ती करत राहतात, केलेलं बोलून दाखवत नाहीत. अशा माणसांकडून कुणीही विन्मुख जात नाही.

श्रीसूक्त किंवा लक्ष्मी सूक्त अत्यंत उत्तम, निर्दोष उच्चारांसह, स्वच्छ स्पष्ट स्वरांत म्हणता आलंच पाहिजे. यथासांग पूजा करता आलीच पाहिजे. कारण, तो आपल्या धार्मिक संस्कृतीचा भाग आहे. पण आपली परंपरा कुणाची आहे, हेही ध्यानी घेतलं पाहिजे ना. शिबी राजा, हरिश्चंद्र, प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, संत ज्ञानोबाराय, तुकोबाराय, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परंपरेतले आपण.. डॉ. द्वारकानाथ कोटणीस, डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे, डॉ. जगदीशचंद्र बसू, डॉ. चंद्रशेखर रामन, खाशाबा जाधव, मेजर ध्यानचंद, फील्ड मार्शल मानेकशॉ यांच्या देशात आपला जन्म झालेला.. ही परंपरा विसरावी तर कृतघ्नपणाच आहे. अन् कृतघ्नपणाचा नुसता वारा जरी लागला तरी लक्ष्मी आपल्यापासून दूर निघून गेली असं गृहीत धरावं.

हे सगळं आपल्या मूळ संस्कृतीच्या गर्भात वसलेलं चिंतन कळायला लागलं की, दृष्टिकोन बदलतोच. मग मोदक तळणीचा की उकडीचा, अनारसा गुळाचा की साखरेचा, असले निरर्थक प्रश्न पडत नाहीत. त्याउलट आपलं मन प्रत्येक परंपरेच्या मूळ ध्येयाचा वेध घ्यायला लागतं. “जो जे वांछील तो ते लाहो” असं ज्ञानेश्वर महाराज का म्हणतात, ते कळायला लागतं. इच्छा, भावना, कामना, वासना, अभिलाषा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा यांच्यातले फरक लक्षात यायला लागतात. मग आयुष्याची दिशा, मार्ग, धोरणं सहसा चुकत नाहीत. माणसं भरकटत नाहीत.

आपण जे काही करतोय, त्यामागचा प्रामाणिक उद्देश कोणता आहे, हे आपण स्वतःच स्वतःला जरी ठणकावून विचारू शकलो आणि उद्देश चुकीचा असल्याचं जाणवल्यावर तो बदलण्याचं धाडस करु शकत असू, तर आजचं लक्ष्मीपूजन आपल्याला नक्की लाभणारच..! आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनासुद्धा ते लाभावं असं वाटत असेल तर त्यांनाही लक्ष्मीपूजनाचं हे खरं स्वरुप आपण समजावून सांगायला हवं.. नाही का?

(हा जो सोबत जोडलेला फोटो आहे, त्यात लक्ष्मी आणि सरस्वतीची चित्रं आहेत. जगप्रसिद्ध भारतीय चित्रकार राजा रविवर्मा यांनी केलेली मूळ तैलचित्रं नंतर मुंबई आणि मळवली इथं लिथोग्राफिक प्रेस मध्ये छापली गेली. त्याकाळी ही भारतातली एकमेव लिथोग्राफिक प्रेस होती. साधारण १९०१ मध्ये मुंबई मधून मळवली इथं हा छापखाना स्थलांतरित झाला. राजा रविवर्मा यांचं निधन १९०६ मध्ये झालं.

राजा रविवर्मा यांनी १८९४ मध्ये लक्ष्मीचे प्रसिद्ध चित्र काढलं. या चित्रातील लक्ष्मीसाठी मुंबईच्या राजीबाई मुळगावकर यांनी मॉडेल म्हणून काम केलं. नंतर या चित्राचे ओलियोग्राफ (lithograph) बनवण्यात आले आणि ते देशभरात कॅलेंडर, फटाक्यांसारख्या अनेक वस्तूंवर छापले गेले. राजा रविवर्मांनी १८८६ साली काढलेलं सरस्वतीचं चित्र हे त्यांच्या अत्यंत लोकप्रिय आणि सुंदर चित्रांपैकी एक आहे. हे चित्र अग्नि पुराणातील एका वर्णनावर आधारित आहे, ज्यात देवी सरस्वती एका लाकडी आसनावर बसून वीणा वाजवताना दाखवल्या आहेत.

ही दोन्ही ओरिजनल लिथोग्राफिक चित्रं आमच्या घरी साधारण १९०५ ते १९०६ च्या दरम्यान ली. पूर्वी ती वर्षभर भिंतीवर लावलेली असत. मात्र, नंतर वातावरणाचा प्रतिकूल परिणाम होऊ नये यासाठी व्यवस्थित जपण्याच्या दृष्टीनं आम्ही ती काढून ठेवली. काळाच्या नियमानुसार दोन तीन वेळा त्यांच्या फ्रेम्स, काचा बदलल्या. दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच ती बाहेर काढली जातात आणि नंतर पुन्हा सुरक्षित ठेवली जातात. आज या चित्रांचं वय जवळपास १३० वर्षांचं आहे. आज माझी चौथी पिढी हा अत्यंत दुर्मिळ वारसा जपते आहे आणि पाचवी पिढी हीच संस्कृती, परंपरा आणि वारसा जपण्याच्या मानसिकतेनं घडतेय.. आणखी काय हवं?)

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रुळानुबंध… लेखक : अज्ञात ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? विविधा ? 

☆ रुळानुबंध… लेखक : अज्ञात ☆ श्री अनिल वामोरकर ☆

☆

रेल्वेने भारतीयांना केवळ एका गावाहून दुसऱ्या गावात, शहरातच नेलं नसून त्यांच्या आयुष्याच्या कथा एकमेकांशी जोडल्या. गावातून शहरात नोकरीच्या शोधात येणारा तरुण, आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी गावाकडे परतणारी मुलगी, किंवा सणासुदीच्या आनंदासाठी सामानाची पिशवी घेऊन प्रवास करणारी कुटुंबं या सगळ्यांचा आधार रेल्वेचा होता. रेल्वेत बसलेले अनोळखी प्रवासी एकमेकांशी गप्पा मारायचे, आपल्या आयुष्याच्या गोष्टी सांगायचे आणि काही तासांतच एकमेकांचे मित्र बनायचे. “तुम्ही कोणत्या गावचे? ” हा प्रश्न आणि त्यानंतर सुरू होणारी मैत्री ही रेल्वेच्या प्रवासाची खासियत होती.

रेल्वेच्या या भावनिक नात्याला साहित्य, चित्रपट आणि गाण्यांनीही अमर केलं आहे. ‘पाकीजा’मधील मीनाकुमारीच्या डोळ्यांतून दिसणारी रेल्वे असो, किंवा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ मधील शाहरुख आणि काजोलचा रोमँटिक प्रवास असो! रेल्वेने नेहमीच भारतीयांच्या भावनांना साद घातली. ‘ट्रेन छुक-छुक गाडी’पासून ते ‘मेरे सपनों की रानी’पर्यंत, रेल्वे ही गाण्यांची प्रेरणा बनली. ‘शोले’सारख्या सिनेमामध्ये तर रेल्वे हे एक जिवंत पात्र झालेय! अगदी ओपनिंग सीनपासून ते एंडपर्यंत ‘शोले’मध्ये रेल्वेशी सोबत होते!

सत्यजित रे यांच्या ‘पथेर पांचाली’मधील रेल्वेचा तो चित्रमय सीन कोण विसरेल बरे! सीमेवर लढायला जाणाऱ्या फौजी बांधवांचे जिवलग जेव्हा त्याला निरोप द्यायला रेल्वे स्टेशनवर येतात तेव्हा माणसांच्या बरोबरीने रेल्वेचा अख्खा परिसर त्यावेळी व्याकुळ वाटतो! रेल्वे ही फक्त प्रवासाची कहाणी नसून प्रेम, विरह आणि आशेची कहाणी झालीय.

भारतात, रेल्वे ही लोखंडी रुळांवर धावणारी केवळ आगगाडी नाहीये; भारतीय जनतेच्या हृदयात रुजलेली ती एक भावना आहे. रेल्वेचा खडखडाट, तिच्या शिट्ट्यांचा तीक्ष्ण आवाज आणि खिडकीतून वाहणारा मंद वारा यात एक जादू आहे, जी प्रत्येक भारतीयाला आपल्या आठवणींच्या गल्लीत घेऊन जाते. रेल्वे, केवळ प्रवासाचे साधन नाहीये; माणसांच्या स्वप्नांना, नात्यांना आणि आकांक्षांना जोडणारा तो एक हृद्य पूल आहे. भारताच्या सांस्कृतिक आणि भावनिक ताण्याबाण्याचा तो अविभाज्य भाग आहे.

लहानपणी रेल्वेचा प्रवास म्हणजे एखाद्या साहसकथेपेक्षा कमी नसे. गावातल्या मातीत खेळणाऱ्या मुलाला शहरातल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी रेल्वेचा हात धरावा लागायचा. गाडीच्या खिडकीतून हिरवीगार शेतं, उंच डोंगर, खळखळणाऱ्या नद्या आणि लांबवर पसरलेलं निळं आकाश दिसायचं. हे सगळं दृश्य म्हणजे एखादी लाईव्ह फिल्मच होती. स्टेशनवरचा चहाचा स्टॉल, ‘चाय… गरम चाय’ची लडिवाळ हाक, आणि गाडीच्या डब्यातून येणारा मसाल्याच्या वड्यांचा वास यांनी मिळून एक अनोखी दुनिया तयार व्हायची. रेल्वे स्टेशन हा केवळ यांत्रिक थांबा नव्हता; ते भेटीगाठींचं, निरोपाचं आणि नव्या सुरुवातीचं ठिकाण होतं.

रेल्वेच्या डब्यातील प्रत्येक प्रवास हा एक छोटासा जीवनपट असतो. कोणीतरी आपल्या मुलीच्या लग्नासाठी साडी घेऊन चाललं असतं, कोणीतरी पहिल्या नोकरीच्या मुलाखतीला निघालेलं असतं, तर कोणीतरी आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी धडपडत असतं. या सगळ्या कहाण्या रेल्वेच्या डब्यात एकत्र येतात आणि एकमेकांत मिसळतात.

रात्रीच्या प्रवासात, जेव्हा गाडीच्या लयबद्ध खडखडाटात सगळे झोपतात, तेव्हा खिडकीबाहेर दिसणारा अंधार आणि त्यात चमकणारे लहानसे दिवे जणू आयुष्याच्या प्रवासाचं प्रतीक बनतात. आजच्या डिजिटल युगातही रेल्वेचं हे भावनिक नातं कायम आहे.

आता गाड्या आधुनिक झाल्या, वंदे भारतसारख्या जलद रेल्वे आल्या, पण रेल्वेच्या प्रवासातली ती जादू अजूनही तशीच आहे. स्टेशनवरची गजबज, चहाचा सुगंध, आणि अनोळखी माणसांशी गप्पांमधून निर्माण होणारी आपुलकी ही रेल्वेची खरी ओळख आहे. रेल्वे ही भारताच्या हृदयाची धडकन आहे, ती कधीच थांबत नाही, आणि तिचं सामान्य माणसाशी असलेलं नातं कधीच तुटत नाही. रेल्वेच्या या प्रवासात आपण सगळे एकमेकांशी बांधले गेलो आहोत. ती आपल्याला फक्त गंतव्यस्थानापर्यंत घेऊन जात नाही, तर आपल्या आठवणी, स्वप्नं आणि भावना यांना एकमेकांशी जोडते.

रेल्वेचा हा भावनिक बंध भारतीयांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, आणि तो कायम राहील, रुळांवर धावणारी ही गाडी जणू आपल्या सगळ्यांच्या हृदयातून धावत आहे. ‘गाडी बुला रही है सिटी बजा रही है.. ‘ हे गाणं प्रत्येक भारतीयाला खुणावतं कारण रेल्वेसोबत निर्माण झालेले भावनेचे, प्रेमाचे, आस्थेचे आणि स्नेहार्द्र आपुलकीचे नाते! हे नाते आपल्या साध्यासुध्या जीवनातील रोमॅंटिसिझमचा नकळत एक घटक बनून गेलेय! रेल्वेइजमचे हे ‘रुळानुबंध’ जपले पाहिजेत!

☆

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सुराचा जयघोष… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?विविधा ?

☆ सुराचा जयघोष… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

भारतीय सणांच्या पार्श्वभूमीमध्ये संघर्ष ही भावना अटळ आहे. आपले अनेक सण आहेत जे आपण साजरे करतो त्याच्या मागे कसल्या ना कसल्या युद्धाची, संघर्षाची निशाणी दिसते. कधी रणांगणावर झालेली मोठ्या स्वरूपातली किंवा लहान स्वरूपातली. संघर्ष आणि मग त्यानंतर मांगल्याचा, पावित्र्याचा विजय म्हणून सणांचा उत्सव केला जातो. आणि या पारंपारिक संघर्षातले नायक म्हणजे सुर (देव) आणि खलनायक असुर (राक्षस). यातला असुराचा पराजय हा आपल्या सणांच्या साजरीकरणासाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू. ‌

असुर हे नावच मोठं गमतीशीर. यातल्या असुरांचे समानार्थी शब्द राक्षस, दानव हे असले तरीसुद्धा मुळात मला ‘असुर’ या नावाबद्दल जास्त कुतूहल वाटतं.

निसर्गाचा, पृथ्वीचा आपला असा एक सूर असतो, त्याला कंप आहे, नाद आहे, आणि गती देखील आहे. त्या सुराशी, गतिशी, नादाशी जो जुळवून घेत नाही, जो त्यावर अतिक्रमण करतो, जो त्यात अडथळा आणतो तो असुर, या अर्थाने हे असुरत्व व्यापक असावं असं मला वाटतं. केवळ पारंपारिक प्रतिमा आणि प्रतीकांच्या रूपापुरतंच ते मर्यादित नसावं. कारण प्रतीकं, प्रतिमा नाहीशा होतात. बदलल्याही जातात. पण मूळ वृत्ती ही मात्र स्थिर राहते. फक्त तिच्या तीव्रतेचं प्रमाण काळानुसार कमी-जास्त होत राहतं. या दृष्टिकोनातून पाहिलं तर सुर वृत्ती आणि असुर वृत्ती या दोन्हीही पृथ्वीवर अखंड काल नांदत आलेल्या आहेत असंच दिसतं.

जिथे जिथे सुरळीतता, समीपता, सुंदरता, सुनियोजितता, समर्पितता, समरसता आहे तिथे तिथे विघ्न निर्माण करणारे त्याला विध्वंसक वळण देणारे असे असुरत्व आज आपल्याला जागोजागी सापडते. या विध्वंसाची भाषाच वेगळी असते. ती फक्त मद, मोह, अभिलाषा, अहंकार यांनीच व्यापलेली असते. तिला स्थळाकाळाचं कशाचंही बंधन नसतं. मुख्य म्हणजे ती वास्तवाचा विचार करत नाही. वास्तवाशी पूर्णपणे फारकत घेणे, नियतीशी लढणे हेच तिचं उद्दिष्ट असतं. स्वार्थ केंद्रित सत्तेचे अधिष्ठान हाच फक्त त्याचा पाया असतो आणि भवतालाचा अमर्याद, बेसुमार उपभोग, त्यासाठी इतरांची पिळवणूक ही त्याची वृत्ती असते.

सुरुवातीला सुप्त प्रमाणात दिसणाऱ्या या वृत्तीचं जेव्हा मोठ्या प्रमाणावर रूपांतर होतं तेव्हा संघर्षाची बीजं रोवली जातात. आणि सुरांचा जय होतो. जो नैसर्गिक व स्वाभाविक आहे. हा जयघोष आपल्या ध्यानीमनी सतत उमटत राहावा, आशेचा दीप तेवत राहावा म्हणून हे सण!

सध्याच्या जागोजागी आढळणाऱ्या असुरवृत्तीमध्ये आपल्यातलं सुरत्व जपण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात निर्माण होवो. आणि त्यात त्याला यश मिळो याच सदिच्छा!

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सोडा रेडी टू ईट, खा घरचेच नीट… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ सोडा रेडी टू ईट, खा घरचेच नीट… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

२काही दिवसांपूर्वी अमरावती येथील डॉक्टर अविनाश सावजी चाळीसगावला आमच्या शेठ ना बं वाचनालयात व्याख्यानासाठी आले होते. त्यांनी आपल्या व्याख्यानात दुकानात तयार मिळणारे खाद्यपदार्थ आपल्या आरोग्यासाठी कसे हानिकारक आहेत हे उदाहरणासहित समजून दिले. त्याचा श्रोत्यांवर मोठा प्रभाव पडला. सांगणारी व्यक्ती एक तज्ज्ञ डॉक्टर असल्यामुळे त्यांच्या बोलण्याला महत्त्व होते. रेडी टू इट पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांची बनवेगिरी अशी की ते आपल्या पदार्थांच्या वेष्टनावर जे काही लिहितील त्याचा समावेश त्यात असेलच असे सांगता येत नाही. दिसते तसे नसते. जे आपण पाहू नये किंवा वाचू नये असे त्यांना वाटते ते कुठेतरी बारीक अक्षरात लिहिलेले असते.

आपल्या घरच्या पदार्थांमध्ये जास्त तेल, जास्त मसाले आपण वापरत नाही. त्यात प्रिझर्वेटिव्ह चा वापर करत नाही. या पदार्थांची चव हॉटेलमधील पदार्थांसारखी लागली नाही तरी आरोग्यासाठी ते सर्वोत्तम असतात म्हणून आपल्या जिभेला घरात बनवलेले पदार्थ खाण्याची सवय लावून घ्यावी. स्वयंपाकात कुशल असणाऱ्या गृहिणींना घरातील सदस्यांना आवडतील असे अन्नपदार्थ कसे बनवायचे याची कला अवगत असते.

पूर्वी एकदा अशीच एक बातमी मी पेपरमध्ये वाचली होती. न्यूझीलंडमधील एक सुखवस्तू कुटुंब आहे. लिडिया ही पती व चार मुलांसोबत राहते. दोघेही नोकरी करीत असल्याने स्वयंपाक बनवण्यासाठी वेळ नव्हता. त्यामुळे नेहमी फास्टफूड किंवा रेडी टू ईट फूड घेत. काही दिवसांनी त्यांना आढळले की त्यांचा लहान मुलगा ॲस्टन हा खूप आजारी असून त्याला असह्य वेदना होत आहेत. आणि तो दोन घासही खाऊ शकत नाही. त्या डॉक्टरकडे त्याला घेऊन गेल्या. डॉक्टरांनी केमिकल अलर्जीचे निदान केले. अलर्जीतील रासायनिक घटक खाद्यपदार्थांमध्ये आढळत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तेव्हापासून त्यांनी आपल्याला कळत नसलेल्या घटकांची माहिती गुगल सर्चवरून शोधली. अनेक मंहिन्यांच्या प्रयत्नानंतर त्यांना धक्कादायक निष्कर्ष मिळाले. आपण जे पाकिटबंद अनेक पदार्थ खातो त्यामध्ये त्यांना अनेक धोकादायक रसायने आढळली. त्यांना असे आढळले की आपण जे खातो ते खाद्यपदार्थच नाहीत. तेव्हापासून त्यांनी बाहेरील खाद्यपदार्थ आणणे बंद केले. आपली नोकरी सोडली आणि घराजवळ शेती खरेदी केली. घरासाठी लागणाऱ्या भाज्या, फळे इ. तेथे लावण्यास सुरुवात केली. लिडिया व त्यांच्या पतीने हे काम आव्हान म्हणून स्वीकारले आहे. त्यांनी याला बॅक टू बेसिक्स असे नाव दिले असून या नावाचे त्यांचे फेसबुक पेजही आहे. (संदर्भ: दिव्य मराठी दि. ११/२/२०१७)

हे पाकिटबंद पदार्थांचे आणि रेडी टू ईट पदार्थांचे लोण आपल्याकडेही मोठ्या प्रमाणात पसरत चालले आहे. आज भारतातील मुंबई पुण्यासारख्या अनेक शहरांमध्ये नोकरी करणाऱ्या स्रियांना वेळ नसल्यामुळे असे पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे सध्या जी मॉल संस्कृती निर्माण झाली आहे ती पण काही अंशी याला कारणीभूत आहे. मॉलमध्ये जाणे आणि खरेदी करणे हे गरजेपेक्षा जास्त हौशीचे आणि प्रतिष्ठेचे लक्षण बनले आहे. मॉलमध्ये फिरत असताना आपण अशा अनेक पदार्थांची खरेदी करतो की जे आवश्यक नसतात. त्यामध्ये खाण्याच्या पाकिटबंद पदार्थांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्यात आपल्या आवडीचे अनेक पदार्थ असतात. काही तयार पदार्थ आणि काही रेडी टू कूक. जसे ढोकळे, बाकरवडी, गुलाबजाम इ. अनेक भाज्यांची पाकिटेही मिळतात. असे अनेक पदार्थ दुकानांमध्ये मिळतात. मंडळी, या पदार्थांचे शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी त्यात अनेक धोकादायक रसायने, म्हणजेच प्रिझर्वेटिव्हज वापरलेले असतात. तेव्हा भरमसाठ पैसे देऊन असले पदार्थ खरेदी करून आपण आपल्या आरोग्याची हानी करून घेत असतो.

आपल्या व्याख्यानात डॉ. अविनाश सावजी असे म्हणाले की या संदर्भात गांधीजींनी सांगितलेले एक साधे सोपे सूत्र आपण लक्षात ठेवू या. गांधीजी म्हणाले होते जे पदार्थ नाशिवंत असतात किंवा लवकर नासतात, कुजतात ते पदार्थ आरोग्यास चांगले असतात. मी जेव्हा हे प्रथम ऐकले तेव्हा मला सुरुवातीला त्यांचे विधान विचित्र वाटले. की नाशिवंत पदार्थ आरोग्याला चांगले कसे असतील? हा वरवर पाहता विरोधाभास वाटतो. पण ते खरे आहे. उदा. आपल्या घरी बनवलेली भाजी, पोळी, भाकरी लवकर खराब होते. दुसऱ्या दिवशी ते पदार्थ शिळे होतात. हे नाशिवंत पदार्थ आहेत. ते ताजे असतानाच आपण खातो आणि खाल्ले पाहिजेत. जेवढे आपण घरी बनवलेले ताजे पदार्थ खाऊ तेवढे आपले आरोग्य चांगले राहील.

शास्त्रज्ञानी आरोग्यासाठीच्या केलेल्या संशोधनात असे आढळून आले की ताजे आणि स्वच्छ पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. स्वच्छ म्हणजे पाकिटबंद पदार्थ नाहीत ही गोष्ट पुन्हा येथे लक्षात घेतली पाहिजे. पाकिटबंद पदार्थ जसे तेल, मीठ, साखर आपल्याला स्वच्छ दिसतात पण प्रत्यक्षात ते तयार करताना त्यात धोकादायक रसायनांचा वापर केलेला असल्याने ते आरोग्यास अपायकारक असतात. त्याऐवजी साधे मीठ, गूळ, घाण्यावर काढलेले तेल आरोग्यासाठी चांगले आहेत. तसेच घरातील फ्रिजमध्ये आपण अनेक पदार्थ साठवून ठेवतो. बऱ्याच वेळा आठवडभरासाठीच्या भाज्या आपण घेऊन ठेवतो. पण फ्रिजमध्ये ठेवल्या तरी त्यातील पोषक घटक नष्ट होतात, त्या शिळ्या होतात. म्हणून शक्यतो ताज्या भाज्या, फळे विकत घेऊन खाल्ली पाहिजेत. अशा पद्धतीचा ताजा आहार माणसाचे आरोग्य वाढविण्यास व तारुण्य टिकविण्यास मदत करतो.

 

 तेव्हा शक्य तो घरी बनवलेले पदार्थच खाऊ या. शिवाय ते पदार्थ मोठ्या प्रेमाने आपल्या आईने, पत्नीने बनवलेले असतात त्याची सर बाहेरच्या पदार्थाना कशी येणार?

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ७८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ७८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- सहस्त्रबुद्धे आजोबांना असं प्रसन्न हसताना मी प्रथमच पहात होतो. पण त्यांच्या चेहऱ्यावरचं ते स्मित क्षणभरच टिकलं. दुसऱ्याच क्षणी ते विरून गेलं. तो प्रसंग पुन्हा जगत असल्यासारखे ते एकटक समोर पहात राहिले. त्यांचा चेहरा विदीर्ण झाला. मनाला झालेल्या खोलवर जखमेला नकळत धक्का लागावा तशी ती जखम भळभळून वहात राहिली.)

हा कसा एक नंबरचा हट्टी आणि तक्रारखोर माणूस आहे हे मला पटवून देताना त्या दिवशी नेमकं काय घडलं हे प्रभुदेसाईंनीही आधी मला सांगितलेलं होतंच. त्यानुसार त्या सकाळी प्रभूदेसाई नुकतेच केबिनमधे येऊन बसले होते. तेवढ्यांत त्या ब्रँचचे एक अतिशय महत्त्वाचे ठेवीदार सपत्निक केबिनमधे आले. त्यांना मोठ्या रकमेची ठेव बँकेत ठेवायची होती. त्यांचं हसतमुखाने स्वागत करून त्यांना वेगवेगळ्या डिपॉझिट स्किम्सची माहिती देत असतानाच हे सहस्त्रबुद्धे केबिनमधे घुसले. त्यांच्या कामाबद्दल तावातावाने बोलू लागले. प्रभूदेसाईंनी त्यांना शांतपणे ‘माझ्या हातातलं काम संपलं कीं तुम्हाला बोलावून घेतो मग आपण बोलू. तोवर तुम्ही थोडावेळ बाहेर बसा.. ‘ असं सांगताच ते खवळले. त्यांना कसं शांत करावं प्रभूदेसाईंना समजेचना. तेवढ्यांत ब्रॅंचचे अकाऊंटंट घाईघाईने आत आले. आजोबांना समजावत बाहेर घेऊन गेले आणि त्यांचं जे काही काम होतं ते पूर्ण करून दिलं असं प्रभुदेसाई म्हणाले होते. यानुसार त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सारा दोष आततायी आणि विक्षिप्त असणाऱ्या सहस्त्रबुद्धे आजोबांचाच असूनही उलट त्यांनीच सूडबुद्धीने प्रभूदेसाईंबद्दल तक्रार केलेली होती.

या पार्श्वभूमीवर तीच घटना आज सहस्त्रबुद्धे आजोबा सांगत असताना हाच सगळा प्रसंग दुखावलेल्या अंतःकरणातून आपसूक झेपावत येणाऱ्या शब्दांतून उत्स्फूर्तपणे व्यक्त होत होता आणि बोलताना आजोबा दु:खातिरेकाने व्याकूळ झाले होते!

“त्यादिवशी मी महत्त्वाच्या कामासाठी लवकर बँकेत गेलो, तेव्हा सफाई करणाऱ्या शिपायाखेरीज दुसरं कुणीही आलेलं नव्हतं” सहस्त्रबुद्धे सांगू लागले.. *”* मी मुद्दामच लवकर गेलो होतो. कारण माझं काम तसंच महत्त्वाचं होतं. माझी बायको नुकतीच गेली होती. त्या धक्क्यातून मला सावरणं शक्यच नव्हतं. अचानक एक हात मोडलेल्या अपंगासारखी माझी अवस्था होऊन गेली. त्यातूनही कसंबसं सावरत मी माझी दैनंदिन कामं सुरू केली. आम्हा दोघांच्या जॉईंट नावाने असलेली बँक खाती, ठेवी यांच्यावरचं तिचं नाव कमी करून मुलीचं नाव वाढवून घेणं, त्यासाठी अधू मनाने दहा हेलपाटे घालणं.. माझ्या वयाचा विचार करता खूप दमवणारं आणि त्रासदायक होतं. माझी मुलगी मला प्रत्येक ठिकाणी जबाबदारीनं घेऊन जायची, माझी काळजी घ्यायची त्यामुळे दोन-तीन बँकांमधे विखुरलेली ही कामं हातावेगळी करणं मला शक्य झालं होतं. पण युनिट ट्रस्ट आॅफ इंडियाच्या एका युनिट स्कीम मधे गुंतवलेल्या मोठ्या रकमेचे पैसे परत मिळवणं या ना त्या कारणाने अवघड होऊन बसलं होतं. ते काम अखेरच्या टप्प्यावर असताना सर्व युनिटसच्या रिडम्शन फाॅर्मच्या मागं माझी सही करून व ती सही आमचं खातं ज्या बॅंकेत आहे त्या बँकेतील अधिकाऱ्याकडून अॅटेस्ट करून घेऊन प्रस्ताव त्वरित पाठवण्याची सूचना मला यूटीआयने दिली होती. त्यानुसार मी माझी सही करून अटेस्टेशन घेण्यासाठी त्या दिवशी सकाळी मुद्दामच लवकर बँकेत गेलो होतो. लगेचच बँकेतले कर्मचारीही एकेक करून ब्रॅंचमधे येत असतानाच ब्रँच मॅनेजर प्रभूदेसाईही आत आले. केबिनजवळ बाहेर ठेवलेल्या सोफ्यावरच मी त्यांची वाट पहात बसलो होतो. मी उठून त्यांना नमस्कार केला पण त्याची दखलही न घेता ते केबिनमधे निघून गेले. मला याबद्दलही काही वाटलं नाही कारण ते गडबडीत असणार हे मी गृहीत धरलं होतं. तरीही त्यांचं रोजचं रुटीन सुरू होण्यापूर्वी आपलं हे काम करून घ्यावं म्हणून मी त्यांच्या केबिनमध्ये गेलो. त्यांनी त्रासिकपणे माझ्याकडं पाहिलं. मला थोडावेळ बाहेर बसायला सांगितलं. मी त्यांच्या बोलावण्याची वाट पहात बाहेर येऊन बसलो. माझं लक्ष आत केबिनकडंच होतं. तेवढ्यांत त्यांचा फोन वाजला तेव्हा नाराजीने फोनकडे पहात त्यांनी उभ्या उभ्याच स्वतःचा ड्रॉवर उघडला. आत ठेवलेल्या उदबत्तीच्या पुड्यातून एक उदबत्ती आणि काडेपेटी काढून त्यांनी ती उदबत्ती पेटवली. मागेच भिंतीवर लटकवलेल्या देवांच्या फोटोंना ओवाळत राहिले, दोनदोनदा नमस्कार केला, मग टेबल आणि स्वतःच्या खुर्चीकडे पहात ती उदबत्ती ओवाळून मागच्या फळीजवळ खोचून ठेवली आणि स्वतःच्या खुर्चीवर स्थानापन्न झाले. आता तरी ते मला बोलावतील असं वाटलं तेवढ्यांत घाईघाईने बँकेत आलेलं एक जोडपं केबिनमधे गेलं. त्यांना पहाताच तत्परतेने उठून त्यांचं हसतमुखाने स्वागत करीत प्रभुदेसाईंनी अतिशय अदबीने त्यांना बसायला सांगितलं. दोन मिनिटांच्या माझ्या कामासाठी मी मनापासून त्यांच्या बोलावण्याची वाट पहात इथं ताटकळत बसलेलो आहे हे त्यांच्या गावीच नव्हतं. त्यांची अॅटॅस्टेशनची सही घेऊन मला पोस्टात जाऊन तिथेही रजिस्टर करण्यासाठी रांगेत तिष्ठत उभं रहावं लागणार होतं. आत जाऊन त्यांना सही करण्याची विनंती करण्याखेरीज दुसरा पर्यायच नव्हता. पण मी ‘आत येऊ कां? ‘ असं विचारून दारात क्षणभर उभा राहिलो तेव्हा मला त्यांनी आत बोलावून काय काम आहे एवढं विचारणंच मला अपेक्षित होतं. पण तेही त्यांनी केलं नाही.
“बाहेर बसा. महत्त्वाचं काम करतोय ना मी? मी बोलावलं की आत या असं सांगितलं होतं ना तुम्हाला? मी कामात आहे दिसत नाही कां? ” म्हणाले. एका वयोवृद्ध ग्राहकाशी हा माणूस या पद्धतीने वागूच कसा शकतो? .. या विचाराने मी अस्वस्थ झालो. कसाबसा राग आवरत मी त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो.

“तुम्ही बँकेत यायच्या आधीपासून गेला अर्धा तास मी तुम्ही बोलावण्याची वाट पहात बसून होतो. साधं माझी सही ऍटॅस्ट करून द्यायचं एक मिनिटाचं काम आहे फक्त. तेवढ्यासाठी एक तास बसून ठेवणार आहात कां मला? “

मी चिडून विचारलं आणि सोबतच्या एनव्हलपमधून मी मागे सही केलेला यूटीआयचा रिडम्शन फॉर्म काढून मी तो त्यांच्यासमोर ठेवला. त्यांनी चिडून माझ्याकडे पाहिलं, तो फॉर्म उचलला, त्यावरील डिपॉझिटर्सच्या नावांमधला मी आणि माझी बायको असा दोघांच्या नावाचा उल्लेख पाहिला आणि अतिशय उर्मटपणे तो फाॅर्म माझी सही अॅटेस्ट न करताच माझ्याकडे भिरकावला.

“जॉईंट आहे ना हो ही इन्व्हेस्टमेंट? मग? दोघांच्या सह्या नकोत कां? फक्त तुमची एकट्याचीच सही आहे यावर. बघाs नीट. बायकोचीही सही घेऊन या. त्याशिवाय अॅटॅस्टेशन करता येणार नाहीss” विजयी मुद्रेने ते म्हणाले. माझ्या तळपायाची आग मस्तकात जाऊन पोचली.

“बायकोची सही आणायला वर जाऊ कां आताss तिच्या मागं? ” मी ओरडलो. ” नीट वाचाs तोs रिडम्शन-फाॅsर्म. माझ्या बायकोची डेट आॅफ डेथ आहे त्यावर. आणि सोबत डेथ सर्टिफिकेटही. बायको मेलीsय माझीss. इथल्या माझ्या खात्यातच जमा होणाराय ही सगळी रक्कम नंतर. म्हणून आलोय तुमच्या दारात. खातं तुमच्या बँकेत आहे म्हणून भीक मागतोय तुमच्याकडं….. ” मी असंच किती वेळ बोलत होतो मला माहित नाही. नैराश्य आणि टोकाच्या संतापाने मी बेभान झालो होतो…. ”

ते बोलायचं थांबले तसं सुन्न होऊन ऐकत राहिलेला मी भानावर आलो. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं हे सांगताना संतापाने बेभान झालेल्या प्रभूदेसाईंनी सांगितलेली घटना आणि आज सहस्त्रबुद्धे आजोबांनी भावविवश होत सांगितलेली घटना या दोन्ही एकच होत्या पण दोघांच्या सांगण्यातले क्रम आणि संदर्भ यामधली तफावत लक्षणीय होती. आज ते सगळं या आजोबांच्या तोंडून ऐकल्यानंतर आधी न जाणवलेला प्रभुदेसाईंच्या सांगण्यामागचा त्यांचा स्वतःच्या बचावाचा पवित्रा मला ठळकपणे जाणवला आणि अर्थातच खटकलाही. या उलट आजोबांच्या प्रत्येक शब्दातून पाझरणारी त्यांच्या मनातली वेदना आणि सात्विक संताप माझ्या मनावर ओरखडे ओढून गेला!
‘सत्य’ माणसागणिक कसं रंग बदलणारं असू शकतं याचा मन अस्वस्थ करणारा अनुभव मी घेत होतो! त्यादिवशी नेमकं काय घडलं याच्या प्रभूदेसाईंनी आधी रेखाटलेल्या चित्रातले बेरंग मला आता अधिकच खुपू लागले. सहस्रबुद्धे हे अतिशय हेकेखोर, सतत तक्रारी करणारे, बँकेतल्या मॅनेजर व स्टाफशी बोलताना कसलाही विधिनिषेध न बाळगणारे असं प्रभूदेसाईंनी केलेलं सहस्त्रबुद्धे आजोबांचं वर्णन वस्तुस्थितीचा विपर्यास करणारं तर नसेल? कारण..

“हा एक नंबरचा हेकेखोर, हट्टी आणि तक्रारखोर माणूस आहे ” असं प्रभूदेसाई म्हणाले होते. याउलट आजोबांनी स्वतःची कैफियत मांडताना कुणावरही थेट दोषारोप न करता राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांकडून ग्राहक सेवेबाबत होणाऱ्या दुर्लक्षाबद्दलची वस्तुस्थिती अतिशय नेमक्या शब्दांत पोटतिडकीने मांडली होती आणि हे करीत असताना त्याबाबतचा त्यांच्या मनातला सात्विक संताप टोकदारपणे जाणवलाही होता!

त्यांच्या तक्रारखोर स्वभावाबद्द्लचा माझ्या मनातला संभ्रम दूर करण्यासाठी त्याबाबत सहज सहस्त्रबुद्धे आजोबांना बोलतं केलं तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते ऐकून तर त्यांच्याबद्दलचा माझ्या मनातला आदर अधिकच दुणावला….!!

तरीही या सगळ्यांत आपण भावनिक दृष्ट्या गुंतत चाललोय हे जाणवताच मी भानावर आलो. सहस्त्रबुद्धे आजोबांना समजून घेणं ठीक आहे, पण ते तक्रार करण्यामागच्या त्यांच्याच भूमिकेवर ठाम राहिले तर? त्यांनी तक्रार मागे नाही घेतली तर? नाही नाही.. असं होऊन चालणार नाही.. हा तिढा सुटायलाच हवा. तोही समाधानकारक आणि लवकरात लवकर. हे शक्य होईल?

मन असं शक्याशक्यतेच्या हिंदोळ्यावर झुलत असताना मला नेहमीच ‘त्या’ची आठवण येते. आत्ताही आलीच. ‘तो’आहे. पहातोय सगळं. मग काळजी कसली? या विचाराचा स्पर्श होताच मग थोडं शांत झालं.

या दोन दिवसात मनापासून केलेल्या प्रयत्नांती खूप कांही गवसलं होतं पण ते घट्ट धरून कसं ठेवायचं तेच समजत नव्हतं! अनिश्चितता या क्षणी तरी संपलेली नव्हती!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हुशारी… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ हुशारी… ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धा : विषयाचे बंधन / वयाची अट नाही… शब्दमर्यादा ६००-७०० शब्द.

—-ही ठळक जाहिरात वाचली, आणि मन एकदम शाळेत पोहोचलं. निबंधाचा प्रश्न मराठीच्या पेपरात हमखास पहिला असायचा, आणि हमखासच तो शेवटी लिहिण्यासाठी ठेवला जायचा. फार कष्ट घ्यावे लागायचे ना त्यासाठी. आणि तो पूर्ण होणारच नाही, या बेतानेच वेळ साधण्याची हुशारी केव्हाच जमलेली होती. —कारण मजकूर सुचायचाच नाही — मग लो. टिळकांवरचा निबंध, “त्यांचा मृत्यू १९२० साली झाला” या वाक्याने सुरु व्हायचा –कारण त्यांच्याबद्दल वाचलेलं ते शेवटचं वाक्य असायचं. अर्थात ‘ निबंध पूर्ण का झाला नाही ‘ या प्रश्नाला, ‘ बाकीचे सगळे प्रश्न अगदी व्यवस्थित लिहीत बसले, म्हणून पुरेसा वेळ उरला नाही’ हे उत्तर देतांना हुशारी पुन्हा उफाळून आल्याचा आनंद व्हायचा —————

“युरेका”——– स्पर्धेसाठी विषय सापडला –” हुशारीचे नाना प्रकार “. लगेच दीडशे रुपये भरून नाव नोंदवलंही.

दहा दिवसांची मुदत होती. पण पूर्वानुभवावरून शहाणं होत, लगेच लिहायला बसले.. { हेही हुशारीचे लक्षण }. सवयीने हातात मोबाईल होताच. लगेच गुगलकाकांना पाचारण केलं, कारण सगळी भिस्त त्यांच्यावरच तर होती. टाईप केलं–”हुशारीचे प्रकार”–पण १०-१५ वेळा पापणी लवली तरी स्क्रीन कोराच. -मग “प्रकार हुशारीचे”, “हुशारीचे विविध प्रकार”, “वेगवेगळ्या प्रकारची हुशारी” — असं कायकाय टाईप केलं, तरी तेच. इतकं गुगलून बघता बघता उत्साहही कमी होतोय अशी शंका वाटायला लागली. पण प्रश्न दीडशे रुपयांचा होता हो. —

“गुगलून बघण्यात “?– अरेच्चा– हा शब्द गुगलकाकांचा नक्कीच नाही. असे आगळेवेगळे वाक्प्रचार रूढ करणं ही तर जन्मजात भाषाप्रभूंच्या हुशारीची कमाल —

पुन्हा “ हुशारी”? — अचानक माझ्या अंगभूत {?} हुशारीला कोंब फुटायला लागले की काय … मी एकदम सरसावले —-” हुशारीचे नाना प्रकार “——–

 ‘अभ्यासातली हुशारी ‘ हा जगन्मान्य पहिला प्रकार. ज्ञानाशी त्याचा प्रत्यक्ष संबंध असावाच लागतो असे मुळीच नाही. पण याबद्दल इथे न लिहिणेच उत्तम. हुशारीचा याहून सरस प्रकार म्हणजे, खूप मन लावून अभ्यास करत असल्याचा बनाव रचण्यातली हुशारी—म्हणजे रात्री जागणे— {थर्मासात भरून ठेवलेला चहा संपेपर्यंत, किंवा बाकी सगळे गाढ झोपल्याची खात्री पटेपर्यंत-}—तरीही पहाटे लवकर उठून, कौतुक करून घेणे इ. इ. यात “ मन नक्की कुठे लागलं होतं “ हा प्रश्न निरागस पालकांना पडतच नाही. अपेक्षित मार्क मिळाले नाहीत की, “ सर कशी पार्शालिटी करतात ” हे पटवून देण्याची हुशारीही असतेच… पण हा वापरून गुळगुळीत झालेला प्रकार.

याहून परिणामकारक प्रकार, दुसऱ्याच्या वस्तूंवर डल्ला मारतांना वापरण्याचा —- भुरटी चोरी, पाकीटमारी, किंवा थेट दरोडा–. या कानाचे त्या कानाला कळू न देता चोरी करायला शिकवणारी हुशारी–डोळे मिटून दूध पिणारी— पण हा प्रकार तसा फशी पाडणाराही.

भीक मागणं हे तर अजिबातच हुशारीचं काम नाही असं कुणाला वाटत असेल तर असा समज साफ चुकीचा आहे. स्वतःची देहयष्टी लुळी पांगळी दाखवायची, की आपण आंधळा असल्याचं दाखवायचं, हे तर फार अक्कलहुशारीचं काम असावं.. ‘ सामाजिक मानसिकतेचा ‘ अभ्यास करावा लागताच असणार त्यासाठी.. सोंग बेमालूम जमावं लागतं… पण हे सगळं जमणं तुलनेनी तसं सोप्पं असावं.. आणि हिंदी चित्रपट असतात ना ट्रेनिंग द्यायला.. याची बरीच प्रॅक्टिकल्स शिकवतात ते..

आणखी एक प्रकार म्हणजे दुसऱ्याबद्दलच्या ऐकीव बातम्या तिसऱ्याला सांगतांना लागणाऱ्या हुशारीचा– त्रयस्थ वृत्तीने, केवळ दुसऱ्याच्या काळजीपोटी बोलत असल्याचे बेमालूम नाटक साधण्यासाठी हुशारी तर लागतेच. चहाड्या, काड्या, कागाळ्या, यासाठी हा प्रकार उपयोगी.. याचा उपप्रकार म्हणजे, स्वतःचा मोठेपणा इतरांना दाखवण्यासाठी प्रयत्न करतांनाची हुशारी. पण हाही तोंडघाशी पाडणाराच प्रकार.

तुलनेने सोपी हुशारी लागते –उंटावरून शेळ्या हाकण्यासाठी– यात स्वतःला फरक पडतच नाही— “ जनहो, खादी वापरा “ — सामाजिक पातळीवर वापरण्यासाठी उत्तम प्रकार –… याहून धूर्त हुशारी लागते ती दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारतांना- असो. याच पातळीवरून “ चोर तो चोर, वर शिरजोर “ असे वागतांनाही हुशारी लागते? बहुतेक नाहीच. पण काहींना मात्र तसे ठामपणे वाटते.

हुशारीचे मॉडर्न प्रकारही खूप आहेत सांगण्यासारखे. पण त्याबद्दल नंतर कधीतरी … एक मासला म्हणून सांगायचे तर…. प्रत्यक्षात ५०-६० रुपयाच्या वस्तूची किंमत १५० रु. सांगायची आणि मग ग्राहकाने घासाघीस केल्यावर त्याच्यावर उपकार करत असल्याचे दाखवत ती १०० रु. ला द्यायची. अर्थात हे अगदीच किरकोळ उदाहरण झाले. या प्रकारची हुशारी प्रत्यक्षात फार फार वरच्या पातळीवरच्या ‘धंद्यांसाठी’ अत्यावश्यक असते.

बाप रे; हुशारीचे किती प्रकार सांगितले ना मी — गुगलकाकांच्या ज्ञानात भर घालू का?– नकोच. — जगभरातून माहिती गोळा करून, ती आपल्याच नावावर खपवण्याची हुशारी, हेच तर त्यांचं भांडवल आहे. आणि त्यांना न कळवण्यातच माझी हुशारी cum शहाणपण——

 —बघा- असं होतं –” ज्ञानयुक्त शहाणपणमिश्रित हुशारी “ हा आजकाल दुर्मिळ म्हणावा असा विशेष प्रकार सांगायचाच राहिला… मला तो माहितीये. पण हा प्रकार आजकाल सर्रासपणे वापरतांना दिसत नाही ना कुणी, म्हणून नजरेआड झाला इतकंच — त्याबद्दलही नक्कीच लिहू शकते मी.. पण इथे आणखी काही नाही लिहू शकत ना हो.. स्पर्धेसाठीच्या लेखासाठी शब्द मर्यादा आहे. त्यामुळे या प्रकाराबद्दल पुन्हा कधीतरी..

– – – तर आज इतकंच —थांबायचं कुठे हे कळणं, हा तर हुशारीचा फार महत्वाचा आणि दुर्मिळ प्रकार … जो माझ्याकडे आहे… असो.

©️ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “वाचाल तर वाचाल…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “वाचाल तर वाचाल…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

वाचाल तर वाचाल, हे कुठेतरी माझ्या वाचण्यात आलं. पण त्याचा खरा अर्थ मला नंतर समजला. वाचाल तर वाचाल यात काय वाचायचं, ते बरोबर वाचलं आहे का, याचबरोबर जे वाचलं, त्याचा अर्थ काय, आणि ते वाचलेलं नक्की कुठे, कधी, आणि कसं वापरायचं हे समजून घेतलं पाहिजे. उगाचच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करून चालत नाही.

काय झालं, सुंदर अक्षर हा एक दागिना आहे, असं माझ्या वाचण्यात आलं. मी लगेच एका कागदावर एक चांगलं वाक्य लिहीलं. आणि कागद बायकोला म्हणालो बघ तुझ्यासाठी एक दागिना.

कागदाकडे बघत बायकोने एक तुच्छ कटाक्ष टाकला. तसेही आता लग्नाला बरीच वर्ष झाल्याने अशाच कटाक्षाची सवय झाली आहे. हल्ली पूर्वीसारखा… म्हणजे ‘ ‘तसा ‘… कटाक्ष टाकणे कटाक्षाने टाळलं जातं. तेव्हा जाणवणारे कटाक्ष असायचे. आता जाणीव करून देणारे कटाक्ष असतात.

काय लिहीलं आहे इतकं त्या कागदावर… काही अर्थ लागतोय का? … वाचणं आणि वाचलेलं बरोबर लिहीणं यात फरक आहे… एकतर तुम्ही धांदरटपणे वाचलंय, किंवा लिहितांना वाचलेलं दिसत नाही… काय म्हणते मी… काही फरक पडतोय का… या वाक्यात तीने मी काय वाचलंय, आणि काय लिहिलं आहे, यासह माझ्यात पडलेले फरक एका वाक्यात स्पष्ट केले.

शाळेत असतांना परीक्षेत थोडक्यात फरक स्पष्ट करा… असा एक प्रश्न असायचा. आज तोच प्रश्न आम्हाला दोघांनाही विचारला असता तर आम्ही आमच्याच बद्दल थोडक्यात पण विस्तृत स्वरुपात फरक जाणवेल इतके फरक सांगीतले असते.

काय लिहीलं आहे ते जाऊ दे… अक्षर बघ… सुंदर अक्षर हा एक दागिना आहे असं वाचलेलं आठवलं आणि म्हणूनच हा अक्षराचा दागिना खास तुझ्यासाठी… माझा केविलवाणा प्रयत्न…

हा… दागिना… काय करावं… अक्षर तेही सुंदर आणि तुमचं… काही संबंध आहे एकमेकांशी. तुुम्ही चार गोष्टी लिहीलेला कागद दुकानदाराला दिला तर तो कागद हातात धरतो, आणि शेेजारच्या मेडिकल स्टोअर मधल्या माणसाकडून वाचून घेतो. नाहीतर परत देत तुमच्याच कडून वाचून घेतो. तो मेडीकल स्टोअरवाला… त्याला सगळ्यांची अक्षरं समजतात. पण एकदातर तुमचाही कागद त्याने समजत नाही म्हणून परत केला होता… वर नवीनच औषध दिसतयं असा मिश्किल शेराही मारला…

शाळेत चुकीचं ऊत्तर लिहिल्यामुळे शिक्षकांनी काही जणांना गुण दिले नसतील. कारण लिहिलेलं चुकीचं आहे हे त्यांना समजलं असेल. पण तुमचं लिहीणं न समजल्याने व काहितरी बरोबर असेल असा (गैर) समज झाल्याने थोडेतरी गुण पडले असतील. यात माझ्या अक्षराचे सगळे दोष झाकून गुण तेवढे उघडे पडल्याचं लक्षात आलं.

आता मी एक वाक्य सांगते. नवरा हा सुध्दा एक दागिना असतो. आणि दागिना मिरवला जातो. आहे तुमच्यात काही तुम्हाला मिरवण्यासारखं… गणपतीच्या मिरवणूकीत सुध्दा तुम्हाला बोलवत नाही… काय तुमच्या अक्षराचा कागद मिरवायचा.

एकतर तुम्ही कागदावर लिहीलेलं वाक्य ग्रामीण भाषेतलं आहे. आणि चुकीच्या पध्दतीने लिहून तुम्ही त्याचा अर्थच बदलला आहे. काही अर्थ आहे का याला. मग मी तिच्या बोलण्याचा अर्थ लावायचा प्रयत्न केला.

वाक्य होतं “आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना” आणि मी लिहीलं होतं, “आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना” आता काय… सगळच बिघडलं होतं… पण वाचाल तर वाचाल याचा अर्थ समजला… आणि लिहीण्याचा सुध्दा.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares