मराठी साहित्य – विविधा ☆ वाळवणाचा सोहळा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी

?  विविधा ?

☆ वाळवणाचा सोहळा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी

आमच्या पिढीनं पुरेपूर अनुभवला हा आनंदाचा सोहळा.

उन्हाळ्यात घरोघरी रंगायचा हा सोहळा.

कडकडीत उन्हात वाळवून ठेवलेले पदार्थ म्हणजे वाळवण.  हे वर्षभराचं तोंडीलावणं असायचं.

“बबर्जी फाजील झाले की स्वयंपाक बिघडतो” ह्या म्हणीला गुंडाळून ठेवून चार पिढ्यांनी एकत्र येऊन केलेले हे पदार्थ अवीट गोडीचे असत. पूर्वी अचानक पाहुणे येत अशावेळी” पान संजगतं ” असं आई म्हणायची. पूर्वी ठराविक मोसमात ठरावीक भाज्या मिळायच्या. त्यावेळी वाळवणाचे पदार्थ जेवणाची लज्जत वाढवायचे. सणावाराला हे तळण असल्याशिवाय नैवेद्य पुराच होऊ शकत नसे.

शकुनाच्या सांडग्यांनी सुरुवात व्हायची. उद्या कोणाकडे हे त्याच दिवशी ठरायचे. गव्हाच्या शेवया, कुरडया, बाजरीचे सांडगे, खारवड्या, पापड्या, तांदळाच्या सालपापड्या, खीच्चे, पापड, उडीद डाळीचे पापड, बटाटा चिप्स , वेफर्स कच्चा किंवा उकडून केलेला कीस, चकल्या, साबुदाण्याचे चीप्स, सांडगे, पापड्या, मूग डाळीचे सांडगे, वड्या, शिन्नी चे सांडगे, मिश्र डाळींचे सांडगे , कोहळा भेंडी कलिंगड यांचे सांडगे ” मिळून साऱ्याजणी” करत असत. वाळवण म्हणजे एक प्रकारचे गेट-टुगेदर असायचे. घरातील कर्त्या  बाई चे नियोजन, आजीचे सुपरव्हिजन असे. लग्नाळू किंवा नवी नवरी शिकाऊ उमेदवार असत. बच्चे कंपनी “हे दे  ते दे,” अशी हरहुन्नरी कामे करत. पुरुष मंडळी परीक्षक असत.

लग्न, मुंज असे मंगल कार्य ठरले की वाळवणाला वेगळे मांगल्य  यायचे. सवाष्णींना बोलावून सुरुवात व्हायची. आई वडील व सासू-सासरे असलेली मुलगी मानाने बोलावून तिला रवा मैद्याचा” गणपती” बनवायला सांगत. त्याला सगळ्यांनी हळद-कुंकू अक्षता घालत.मगच इतर कामांना सुरुवात व्हायची. गव्हले, मालत्या, बोटवे, नखुले, काकडीच्या बिया असे शकुना चे पदार्थ तयार करायचे. हातावरच्या शेवया निगुतीने केल्या जायच्या. रुखवतासाठी शेवयांच्या तिपेडी वेण्या, रंगीत गव्हले, कुरडईच्या पिठाचे द्राक्षाचे घोस, गुलाब फुले वगैरे सुगरणीचे पदार्थ तयार होत.

हे सारं करताना गप्पाटप्पा, गाणी, कोडी यातून  हास्य विनोद निर्माण होत. एकमेकींच्या सुखदुःखाचे वाटप होई. नवीन काही शिकायला मिळे.

आता सगळे विकत मिळते पण घरी केल्याचा आनंद व पुरवठा वेगळाच असतो.

उगारच्या चाळीतील अंगणात खाट टाकून त्यावर स्वच्छ पांढरे धोतर अंथरून घातलेले सांडगे, पापड , सांगलीला वेलणकर वाड्यात महिनाभर रंगलेला शेवयांचा सोहळा, सातारला तळवलकर वाड्यात अंगणात खेळीमेळीने केलेले वाळवण सारे सारे आठवले की मन भरून येते.

वाळवण वाळवण

वर्षभराची साठवण

उरली फक्त आठवण

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग – ११ वाचन – २ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग – ११ वाचन – २ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

एखाद्याच्या चरित्राच्या अभ्यासपूर्ण वाचनाने ती व्यक्ती खूप ओळखीची होऊन जाते, कळते.  जवळचीच वाटायला लागते, तसंच, अनेक रुपांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करणार्‍या आणि मृत्युच्या क्षणापर्यंत आपली प्रतिष्ठा जपणार्‍या, नेपोलियन बद्दल विवेकानंदांना वाटत होते. विवेकानंदांच्या दृष्टीने नेपोलियन हा गगनाला भिडणारे उत्तुंग शिखर होते. तरुण वयात केलेल्या या वाचनामुळे नरेन्द्रला नेपोलियन ची भुरळ पडली होती.

तत्वज्ञान आणि ललित वाड:मय यांचा अभ्यास तर नरेंन्द्रने महाविद्यालयात शिकत असताना केला होताच. विद्यार्थी दशेत असताना तर त्याने हर्बर्ट स्पेन्सरचे ग्रंथ वाचून त्यावर आपल्या शंका व्यक्त करणारं एक पत्रच, या जगतविख्यात तत्वज्ञाला पाठवलं, त्यांचं नरेंद्रला उत्तर पण आलं आणि त्याच्या बुद्धी सामर्थ्याबद्दल कौतुक मिश्रित आश्चर्य पण वाटलं त्यांना. एव्हढंच काय कॉलेजला शिकत असताना नरेन्द्रने स्पेन्सर यांच्या ‘शिक्षण: बौद्धिक,नैतिक आणि शारीरिक’ या पुस्तकाचा ‘शिक्षा’ हा बंगाली भाषेत स्वैर अनुवाद केला होता.

नरेंद्रला साहित्याची मुळातच आवड होती. त्याच्याकडे प्रखर प्रज्ञा आणि उज्ज्वल प्रतिभा होती. त्यामुळे वैचारिक ग्रंथांप्रमाणेच त्याला अभिजात साहित्यही आवडत असे. संस्कृत, इंग्रजी आणि बंगाली भाषेतले उत्तम ग्रंथ आणि साहित्यकृती त्याने वाचल्या होत्या.’रामायण’ आणि ‘महाभारत’ यांची बंगाली भाषांतरे वाचली होती. शेक्सपियरची नाटकं, वाचली होती. रोमियो आणि ज्युलिएट, मिडसमर नाईट ड्रीम यांचे संदर्भ त्यांच्या व्याख्यानात येत असत.

अमेरिकेतल्या एका व्याख्यानात त्यांनी मिल्टन चे ‘पॅराडाइज लॉस्ट’वाचले असल्याचा उल्लेख केला होता. त्यातली सॅटानची व्यक्तिरेखा खूप आवडायची कारण ते व्यक्तिमत्व सामर्थ्यशाली दाखवले होते म्हणून. दुर्बलता त्यांना आवडत नसे. साहित्यकृतीत सुद्धा. इंग्रजी कविंमध्ये कवी बायरन आणि वर्डस्वर्थ त्यांचे जास्त आवडते होते.

बंगाली मधले बंकीमचंद्र चटर्जी, दीनबंधु मित्र, यांच्या कादंबर्‍या, ईश्वरचंद्र गुप्त यांच्या कविता, मायकेल मधुसूदन दत्त यांच्या कविता यांचा समग्र अभ्यास केला होता. स्वामी विवेकानंद जेंव्हा जेंव्हा भारतीय अध्यात्मावर भाषणे देत असत, तेंव्हा त्याची तर्कशुद्ध मांडणी आणि लालित्य त्यात दिसत असे. एखाद्या विषयाचा वरवर अभ्यास किंवा वाचन न करता त्याच्या मुळाशी जायचं हा त्यांचा उद्देश असायचा. त्यामुळेच मित्र मंडळींमध्ये जेंव्हा जेंव्हा निरनिराळ्या विषयांवर चर्चा घडून येत असत, तेंव्हा तेंव्हा नरेंद्र युक्तिवाद करताना त्याच्यात ठामपणा आणि आत्मविश्वास असायचा. अशा चर्चेत त्यांच्या पुढे कुणी टिकत नसायचे. प्रतिपक्षाला तो नामोहरमच करून टाके. जेंव्हा तुमच्याकडे त्या विषयाचे समृद्ध ज्ञान असते तेंव्हाच तुमच्याकडे हा आत्मविश्वास येतो. आणि असे ज्ञान वाचनाने, मननाने, योग्य दिशेने विचार केल्याने मिळते. सार्‍या जगाला संदेश देणारे स्वामी विवेकानंद वाचनाने आणि अनुभवाने अतिशय समृद्ध होते. रविंद्रनाथ टागोर यांनी म्हटलंच होतं की, “तुम्हाला भारत जाणून घ्यायचा असेल तर विवेकानंदांकडे वळा” तेंव्हा सर्व वाचक आणि युवा पिढीने पण वाचनाने समृद्ध व्हावे, स्वामी विवेकानंद आणि भारतीय विचार समजून घ्यावेत आणि आयुष्याला दिशा द्यावी.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कचरा फाईली ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

 

? विविधा ?

☆ कचरा फाईली ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

मंडळी, अगदी काही दिवसापूर्वी आमच्या कार्यालयाच्या नुतनीकरणासाठी म्हणून काही कालावधीसाठी आम्हाला दुसरीकडे बसायला सांगितले. आजकाल बरीच कामे संगणकावर जरी होत असली तरी त्याच्या कित्येक आधीपासूनच्या अनेक फाइली या ठेवलेल्या होत्या. शिफ्टींग होताना एवढ्या प्रचंड प्रमाणात असणाऱ्या फाईलींचे काय करायचे हा मोठ्ठा प्रश्ण होता. ज्या अतिशय आवश्यक फाईली आहेत त्या घेऊन नवीन जागी जायचे, ज्या फाईली कदाचित पुढच्या काळात संदर्भासाठी लागतील त्यांना कार्यालयीन वास्तूचे नूतनीकरण होईपर्यंत ‘काँमन स्टोरेज’ मधे ठेवायचे असा निर्णय झाला. हे सोडून उरलेल्या जवळजवळ ८०% फाईली या तिथेच सोडण्याशिवाय गत्यंतर नव्हते. थोडक्यात त्या सगळ्या फाईली कचरा ठरवल्या जाऊन आता रद्दीच्या भावात जाणार हे पक्के झाले होते.

नुतनीकरणानंतर जेंव्हा आम्ही मुळ जागी परत येऊ तेंव्हा येताना ज्या अती आवश्यक / दैनंदिन लागणाऱ्या फाईली ज्या सोबत घेऊन गेलेलो त्या परत आणू.  पण इथे संदर्भासाठी लागतील म्हणून काँमन स्टोरेज मधे ठेवलेल्या किती फाईलीं वरची धुळ परत झटकली जाईल याबाबत मला तरी शंका वाटतीय. कारण जेंव्हा सगळं सुस्थितीत होतं तेंव्हाही फारशा त्या फाईलींना कुणी हात लावला नव्हता.

घर आवरताना हा नेहमीचा अनुभव.  आज आवश्यक म्हणून ठेवलेली वस्तू पुढल्यावेळी घर आवरताना मात्र हमखास कच-यात जाते. पण पहिल्यांदाच त्या कच-यात घालायला मन तयार होत नाही वरती जो संगणकाचा उल्लेख केला त्यातील कच-या कडे ही आपले फारसे लक्ष जात नाही. नकळत पणे अगणित फाईल्स तयार होत असतात. अनेक फोल्डर+ फाईल्स आपण तयार करत असतो. यातील असंख्य फोल्डर्स/ फाईल्स , इमेल्स काम झाल्यावर सहज उडवले जाऊ शकतात आणि अनावश्यक कच-याची विल्हेवाट लावली जाऊ शकते. पण जेंव्हा हार्ड डिस्क भरून डेटा वहायला लागतो, नवीन इमेल येणे बंद व्हायला लागतात तेंव्हा जाग येते.

आजकाल हीच गोष्ट ‘मोबाईल ‘उपकरणा बाबतीतही आढळते थोडक्यात वेळोवेळी कचरा साफ होणे आवश्यक. वर उल्लेख केलेल्या ठिकाणचा तर आवश्यकच पण अशी एक जागा आहे प्रत्येकाची वय्यक्तिक, जिथे अशा नको असलेल्या भरमसाठ फाईली अगदी कळायला लागल्यापासून विनाकारण पडून आहेत, ती जागा म्हणजे आपला ‘मेंदू’। 

तिथेही एकदा साफ-सफाई करायची का?

निसर्ग सुद्धा स्वतःत बदल दरवर्षी करतो. तो निसर्गचक्राला अनुसरून असला तरी आपल्याला दरवेळेला वेगळी अनुभूती देऊन जातो. झाडांची पानगळी होऊन नवनिर्मिती होत असताना आपण आपल्या मनाला हीच गोष्ट सांगितली तर?

जुने जाऊ द्या मरणालागुनी

जाळुनी किंवा पुरुनी टाका

सडत न एक्या ठायी ठाका

सावध!ऐका पुढल्या हाका

खांद्यास चला खांदा भिडवूनी

विक्रम संवत २०७८-२९७९ 🚩

शालिवाहन शक १९४४ 🚩

शुभकृत् नाम संवत्सर 🚩

 

तसेच गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 💐

 

अमोल 📝

poetrymazi.blogspot.com

© श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गुढीपाडवा…. ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ गुढी पाडवा… ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे 

चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस म्हणजे गुढीपाडवा. या दिवसापासून हिंदूंचे नवे वर्ष सुरू होते. शिशीर ऋतूत  झाडांची पाने गळून गेलेली असतात तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी फुटते, वृक्ष वेली टवटवीत दिसतात. ऋतूंचा राजा वसंत सुरू झालेला असतो. सर्व  पृथ्वी चित्रासारखी सुंदर दिसते म्हणून या महिन्याला चैत्र हे नाव दिले आहे.  गुढीपाडव्याच्या दिवशी आनंदाचे प्रतीक म्हणून घराघरांतून गुढी उभारली जाते.गुढीसाठी काठी, रेशमी वस्त्र,धातूचा गडू,साखरेची माळ वापरले जाते.या सर्व वस्तू मधून आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवतात म्हणून समृद्धी व आनंद या सर्वांचेप्रतीक म्हणूनच गुढी उभारली जाते. या दिवशी कडुलिंबाची गूळ व मीठ,हिंग घालून केलेली चटणी खाण्याची प्रथा आहे. कडुलिंब हा औषधी असल्याने आरोग्य चांगले राहते.

दुष्ट प्रवृत्तीच्या राक्षसांचा व रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र अयोध्येला परतले तोच हा दिवस.हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो.

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ☆ चैत्रांगण … ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?विविधा ?

चैत्रांगण … ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

‘चैत्रांगण’…

झुंजूमुंजू झालंय… पाखरांचा चिवचिवाट चालू झालाय… हवेत सुखद गारवा आहे. आणि वातावरणात एक शांत प्रसन्न नाद भरून राहिलाय. सगळीकडे सडासंमार्जन चालुये, लगबग चालू झालीय. मधुनच स्त्रोत्र पठणाचे स्वर ऐकु येतायत. काही स्त्रिया तुळशीवृंदावनापाशी वाकून एक सुरात प्रार्थना गुणगुणत रंगावली काढत आहेत. एक सारख्या लयीतल्या त्या मोहक वळणदार रेषा काही उगाच शोभेपुरत्या रेखाटल्या नाहीयेत. तर त्या रंगावल्या जणू साऱ्या विश्वाचं प्रतिक बनून या भुतलावर स्थानापन्न झाल्या आहेत. खरतरं तो आहे कृतज्ञता अर्पण करण्याचा एक नैसर्गिक सोहळा. अगदी चैत्राच्या आरंभापासून त्याच्या समाप्तीपर्यंत चालणारा.

अंगणाच्या मध्यभागी उभ्या असलेल्या त्या नक्षीदार तुळशी वृंदावनात हिरवा हिरवा शालू नेसलेली तुळस प्रसन्नतेनं डोलत उभी आहे. जणू काही वाऱ्याला सांगतेय पहा बरं ! आज माझ्या भोवतालचं वातावरण किती गंधित, किती विलोभनीय झालं आहे. वाराही त्या दर्शनानं क्षणभर थबकलाय. आणि रक्तवर्णीय पार्श्वभूमीवर रेखाटलेल्या त्या शुभ्र रेखीव आकृत्या आपल्या नजरेत सामावून घेतोय. इतक्यात त्या चैत्रांगणाला पाहण्यासाठी सूर्यदेखील आला आणि त्याच्या पदस्पर्शानं त्या चैत्रांगणातल्या सगळ्या प्रतिमा मोहरल्या, चैतन्यमय झाल्या. अखेर सोहळा संपन्न झाला.

हा सोहळा आहे मानवानं आपल्या नैसर्गिक संपदेला कृतज्ञता अर्पण करण्याचा. जे जे घटक त्याच्या जगण्याला, त्याच्या अस्तित्वाला सहाय्यक ठरतात, त्याचं जगणं सुसह्य करतात त्यांचं स्मरण करण्याचा. त्याचं जतन, संवर्धन करण्याचा म्हणूनच तर या चैत्रांगणाचं महत्त्व. त्यात रेखाटले जाणारे ग्रह, तारे, पानं, फुलं, पशु, पक्षी, सौरक्षक साधनं, रोजच्या वापरातली साधनं आणि… हे सगळं न मागता देणारी ती आदिशक्ती, या सगळ्यांचं स्मरण सातत्यानं व्हावं. त्यांचा लाभही सातत्यानं व्हावा,  म्हणूनच तर हा प्रतीकांचा सोहळा. अचेतनातून सचेतानाकडे नेणारा.

कृतज्ञता अर्पण करण्याचा एक नैसर्गिक सोहळा!

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तोरण… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ तोरण… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

चैत्र पाडवा! नवीन मराठी वर्षाचा पहिला दिवस! श्री राम वनवासाहून परत आले तो हा दिवस! त्यांच्या स्वागता प्रित्यर्थ गुढ्या तोरणे उभारून त्यांचे स्वागत  केले गेले. मराठी कालगणनेनुसार चैत्र वर्षाचा पहिला महिना! रोजच्या व्यवहारात आपण इंग्रजी कालगणनेनुसार वर्ष सुरू करतो. परंतु हिंदू कालगणनेनुसार चैत्र हा पहिला मराठी महिना आणि नवीन वर्षारंभ सुरू होतो.

तोरण म्हंटले कि सण आठवतात. तसेच कोणत्याही शुभकार्याचा आरंभ करताना आपण तोरण बांधतो. दसरा,दिवाळी, पाडवा, चैत्र पाडवा या दिवशी आपण आंब्याच्या पानाचे तोरण दाराला बांधतो. तोरण हे शुभ गोष्टींचे प्रतीक आहे.

तोरण म्हंटले की आणखी एक प्रचलित वाक्य आठवते. ‘शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले’ वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी पहिला किल्ला घेतला आणि स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली. आपल्या नवीन कामाची सुरुवात करतानाही आपण तोरण बांधतो. नवीन आॅफिस, नवीन घर, नवीन कामाची जागा घेतली की तोरण बांधून मगच नवीन जागेत प्रवेश केला जातो.

पण मला आत्ता वेगळेच तोरण डोळ्यासमोर आहे! आकाशात ढग जमून आले आहेत. पावसाचा थेंब फुटला  आहे. अशावेळी आकाशात सप्तरंगांची कमान दिसू लागते! जणू आभाळात सात रंगांचे सुंदर तोरण बांधले आहे असं वाटतं! ढगांचे पडघम वाजू लागतात. उंच उंच झाडे वाऱ्याबरोबर डोलू लागतात. चराचरामध्ये चैतन्याची चाहूल  लागते. दिवसभर होणारी काहिली जरा कमी होऊन दुपारनंतर आभाळ बदलू लागते. अतिशय गर्मी ओसरून एकदम कुठून तरी धुरळा उठतो. आभाळ मेघाच्छादित होते. ढगांच्या गडगडाटात पावसाची एखादी सर येते. मृदगंधा चे अत्तर  दरवळू लागते आणि अशावेळी ऊन-पावसाचा खेळ चालू होऊन आकाशात सप्तरंगी तोरण दिसू लागते. जणू नवचैतन्याची सुरुवात झालेली असते.

तसे तोरणाचे विविध प्रकार आहेत. आंब्याची पानं मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन सोडतात म्हणून दाराला  आंब्याच्या पानाचे तोरण बांधण्याची पूर्वापार पद्धत पडली असावी! झेंडूची फुले आणि आंब्याची पाने या दोन्हीचे एकत्र तोरण आपण बांधतो. अलीकडे प्लास्टिकची झेंडूची फुले किंवा पाने असलेली मण्यांची, टिकल्यांची अशी विविध प्रकारची तोरणे  मिळतात.

त्यात पानांवर स्वस्तिक, कलश, श्री, देवी अशी विविध चित्रे वापरून तोरणे बनवली जातात. लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीचे चित्र असलेले तोरण सगळीकडे दिसते. तर साहित्यिक कार्यक्रमात सरस्वतीचे चित्र तोरणावर दिसते. दसऱ्याला विशेष करून झेंडूच्या फुलाचे तोरण बांधले जाते.

नवीन लेखनाची सुरुवात करून लेखक साहित्यिक तोरण बांधतो. तर राजकीय पक्षाच्या प्रसारासाठी, प्रचारासाठी पक्ष कार्यालयाला तोरण बांधून सुरुवात केली जाते. तोरण शब्दावरून आज विविध प्रकारची तोरणे डोळ्यासमोर आली आणि माझ्या नवीन लेखनाचा शुभारंभ करताना मीही आज चैत्र पाडव्याला शब्द मण्यांचे, शब्द कळांचे तोरण बांधत आहे. 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावली.. ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆

सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ सावली.. ☆ सौ ज्योती विलास जोशी

लहान माझी बाहुली मोठी तिची सावली.या बालगीतानं लहानपणीच नकळत माझ्या बाल मनावर गारुड केलं होतं.बाहुली ही माझी प्रिय सखी! तिची सावली जणू मलाच छाया देणारी!आज मला जेव्हा हे बालगीत आठवते तेव्हा कवीचा हा केवळ यमक जुळवण्याचा प्रयत्न नसून बाहुलीची सावली कवीनं प्रतीकात्मक म्हणून वापरली असेल. असा विचार माझ्या मनात आला.माझ्या छोट्याशा निरागस मनविश्वात बाहुली आणि तिची सावली दोघी माझ्या सोबत होत्या.आईची सावली म्हणजेच मायेची सावली बाळासाठी!…..तसेच त्या बाहुलीची मोठी सावली म्हणजे प्रेमाची सावली माझ्यासाठी!….. मला लहानपणापासूनच सावल्यांचा अप्रूप होतं .आई बाबा भिंतीवर सावल्यांचे पक्षी,हरीण, ससा, उंट करून दाखवायचे आणि मला रिझवायचे. दुपारच्या वेळेला अंगणात आपल्याच सावली पासून लांब पळायचं… असा खेळ खेळण्यात ही मी रमून जायची.रात्रीच्या वेळी भिंतीवर चिऊ-काऊ, हम्मा, भू भू असे अनेक जण भेटायला यायचे.’ हा खेळ सावल्यांचा’ हे गूढ समजण्याचं ते वयच नव्हतं! मोठी झाले तशी सावली मोठी होत गेली. ती आपलीच सावली आहे हे ओळखता येऊ लागलं.कधी ठेंगणीठुसकी, कधी लांबलचक, कधी अस्ताव्यस्त पसरलेली, काळीसावळी अशी ही सावली!एक गुण असेल तर शप्पथ! पण तरीही ती माझीच प्रिय सखी. ती सतत माझ्याबरोबरच का असते?याचे उत्तर तिनच मला एकदा दिलं. “अगं तुझ्या सोबत दुसरं कोणी नसतं ना म्हणून मी असते.”           

प्रतिबिंब पेक्षाही आभासी असणाऱ्या या सावल्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पहिल्या की वेगवेगळी नावे धारण करतात.आपल्याला साथ सोबत करणारी अगदी आपलीच असणार्‍या आईला मायेची सावली म्हणतात. छोटा गंधर्व तर देवालाच ‘तू माझी माऊली तू माझी सावली’ असं म्हणून स्वतःला देवाजवळ नेतात. भयाची सावली,पाठीराख्यांची सावली, झाडाची सावली अशा अनेक सावल्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून निर्माण झाल्या आहेत.             

खरं म्हणजे सावली हे प्रकाशाचं अस्तित्व आहे. मग ते नैसर्गिक असो वा कृत्रिम! प्रकाश नसताना सावली दिसत नाही. सावलीही सत्य गोष्ट असूनही आभास वाटते. पण सावली या संकल्पनेला एक शास्त्रशुद्ध आधार आहे. सूर्यग्रहण चंद्रग्रहण तिच्यामुळेच होतात. आपण रोज रात्री पृथ्वीच्या सावलीत झोपतो.चंद्र झाकतो तेव्हा या महाकाय सावलीचे अस्तित्व जाणवते. पृथ्वीच्या सावलीतून चंद्र जातो तेव्हा चंद्रग्रहण होते.चंद्र स्वयंभू नाही त्याला सूर्याचं तेज आहे. त्यामुळेच सावल्यांचे खेळ चालतात.       

या काळ्यासावळ्या सावली वर कवींनी किती सुंदर गाणी रचली आहेत.’हा खेळ सावल्यांचा’ या गाण्यातील ‘हसतात सावलीला हा दोष आंधळ्याचा’ ही ओळ सावली बद्दल बरंच काही सांगून जाते.’वेळ झाली भर माध्यान्ह या गाण्यात, ‘माझी छाया माझ्याखाली तुजसाठी आसावली कशी करू तुज सावली’ हे एका श्रमिक कामगार स्त्रीने आपल्या तान्हुल्या साठी आपली दुपारची ठेंगणी ठुसकी सावली अपुरी आहे या अर्थाने म्हटले आहे   ‘मेरा साया साथ होगा’ म्हणत सावलीचे गुढ रहस्य प्रेक्षकांना चित्रपट भर खिळवून ठेवते ते निराळेच.

सत्य असूनही आभासी वाटणारी ही सावली माझी म्हणावी अशी!

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिनाअखेरचे पान – 3 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिनाअखेरचे पान – 3 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

महिनाअखेरचे  पान

काळाच्या ‘लाॅन्गमार्च’ मध्ये काळाचे तिसरे पाऊल पडते तो महिना म्हणजे मार्च महिना !भारतीय कालगणनेनुसार माघाचा शेवट होत,फाल्गुन महिना मुक्कामाला येतो आणि जाताना एक भारतीय वर्ष आपल्याबरोबर घेऊन जातो. फाल्गुन अमावस्या संपते आणि नवे भारतीय वर्ष चैत्र पाडव्याच्या मुहूर्ताने सुरू होते.

मार्च महिना खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे असे म्हणावे लागेल. वंदनीय व्यक्तिंच्या जयंती,पुण्यतिथी,अनेक प्रकारचे जागतिक दिन आणि आर्थिक वर्षाची अखेर असा भरगच्च कार्यक्रम या महिन्यात असतो.

देवांचा देव महादेव अशा शिवाची महाशिवरात्र याच माघ महिन्यात येते. फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच हुताशनि पौर्णिमा. होलिकोत्सव किंवा होळीपौर्णिमा. कुविचारांची होळी करून सद्विचारांची ज्योत तेवत ठेवण्याचा दिवस. त्याच्या दुसरे दिवशी धुलीवंदन किंवा धुळवड. नंतर फाल्गुन पंचमीला असते रंगपंचमी. भेदभाव विसरून ,विविध विचारांच्या रंगाना एक करून,एकाच रंगात न्हाऊन जाण्याचा दिवस. आयुष्यात रंग भरण्याचा दिवस. काही ठिकाणी धुलीवंदनाला तर काही ठिकाणी रंगपंचमीला रंगांची उधळण होत असते.

याच महिन्यात असते रामकृष्ण परमहंस यांची जयंती. तिथीनुसार याच महिन्यात शिवजयंती येते. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती असते बारा मार्चला. महाराष्ट्रात हा दिवस समता दिन म्हणून साजरा केला जातो .

ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथि असते दहा मार्चला तर फाल्गुन शुद्ध नवमी हा  धर्मवीर संभाजी महाराज यांचा बलिदान दिन.  फाल्गुन कृ. द्वितीया ही तुकाराम बीज म्हणजे तुकाराम महाराजांचा विठूमाऊली चरणी एकरूप होण्याचा दिवस. फाल्गुन कृ. षष्ठी हा संत एकनाथ महाराज यांचा जलसमाधी दिन.   छ. राजाराम महाराज पुण्यतिथीही याच महिन्यात असते.

या निमित्ताने इतिहास आणि संस्कृती,परंपरा यांचे पालन होते,थोरांच्या विचारांची उजळणी होते आणि तो वारसा पुढे जपण्याचे भानही आपल्याला येते.

राष्ट्रीय व जागतिक स्तरावरील अनेक महत्वपूर्ण  दिवसही या महिन्यात येतात.

चार मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिन आहे.  04मार्च 1972 ला नॅशनल सेफ्टी काउन्सिल ची स्थापना झाली. सामान्य लोकांमध्ये सुरक्षेसंबंधी जागरूकता यावी म्हणून हा दिवस साजरा होतो.

08 मार्च हा जागतिक महिला दिन आहे. 1921 पासून जगभर आणि 1975 पासून भारतात हा दिवस साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांचे रक्षण करून त्यांना सन्मान देणे व स्त्री पुरूष भेद नष्ट करणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

15 मार्च जागतिक ग्राहक दिन आहे. 15मार्च 1962 रोजी अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष जाॅन केनेडी यांनी प्रथम ग्राहकांच्या हक्काविषयी भाष्य केले. म्हणून ग्राहक चळवळीतर्फे 1983 पासून ग्राहक दिन साजरा होतो.

20मार्च हा दिवस आहे जागतिक विषुव दिन आणि चिमणी दिन. जगभरात सर्वत्र बारा बारा दिवसांचे दिवस रात्र 21मार्चला होत असल्याने 20 मार्च हा विषुव दिन आहे. तर सर्वत्र चिवचिवाट करणा-या चिमणांची होणारी  लक्षणीय घट लक्षात घेऊन त्याकडे लक्ष वेधण्यासाठी चिमणी दिन साजरा केला जातो.

21 मार्च हा जागतिक कविता दिनही आहे आणि जागतिक वन दिनही आहे. युनेस्कोच्या पॅरिस परिषदेने 21/03/1999पासून कविता दिनाला मान्यता दिली. ‘कविता हा एक झरोका असून याद्वारे मानवतेतील वैविध्य मनमोकळा श्वास घेऊ शकते’ असा कवितेचा गौरव युनेस्कोच्या त्यावेळच्या महासचिवांनी केला आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व शेती संघटनेतील देशांनी जागतिक वन दिनास सुरूवात केली. सर्वांना जंगलाचे फायदे समजावेत,जंगलातोड होऊ नये,वृक्ष लागवड वाढावी असे उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा दिवस साजरा  होतो.

22मार्च हा जागतिक जल दिन आहे. वापरण्यास योग्य अशा पाण्याचे महत्व पटवून देणे,जलस्त्रोतांचे जतन व संवर्धन करणे,पाणी काटकसरीने वापरण्यासाठी जागृती करणे हे यामागचे उद्देश आहेत. युनोच्या ठरावानुसार 1993 पासून जलदिन साजरा होतो.

23 मार्च हा जागतिक हवामान दिन. हवामानात होणारे बदल व त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम याची दखल घेतली जावी यासाठीचा हा दिवस.

23 मार्च हा भारतीयांच्या साठी एक काळा दिवस. याच दिवशी सरदार भगतसिंग,सुखदेव आणि राजगुरु यांना फाशी देण्यात आले. शहिदांच्या बलिदानाचे स्मरण रहावे म्हणून हा दिवस शहिद दिन या नावाने पाळला जातो.

24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन आहे. जागतिक शास्त्रज्ञ परिषदेत 1882 साली डाॅ. राॅबर्ट काॅक यांनी क्षयरोग जीवाणूंच्या शोधासंबंधीचा प्रबंध सादर केला व त्याला मान्यता मिळाली. क्षयरोग निर्मुलनासाठी जनजागृती व्हावी या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

असा हा विविध दिवसांनी सजलेला मार्च महिना. याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे आपले आर्थिक वर्ष याच महिनाअखेरला संपते. संपलेल्या आर्थिक वर्षाचा हिशेब मांडताना येणा-या नव्या आर्थिक वर्षाचे वैयक्तिक नियोजन प्रत्येकाने करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण वैयक्तिक नियोजन व त्याचे काटेकोर पालनच संपूर्ण समाजाला आर्थिक दृष्ट्या सशक्त बनवू शकते. सशक्त समाजच समर्थ राष्ट्र बनवू शकतो. आर्थिक नियोजनाचा  संकल्प करूनच इथे थांबूया आणि नववर्षाच्या संकल्पांची गुढी उभारायच्या तयारीला लागूया.

नूतन वर्षाभिनंदन !

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अजब कोकणातील गजब चालीरीती…अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ अजब कोकणातील गजब चालीरीती…अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

कोकणातील काही चमत्कारिक चालीरीतींचा हा अद्भुत मागोवा……

मालवण-कुडाळ रस्त्याला चौक्याच्या पुढे असलेल्या धामापूर गावाजवळ कासार टाका नावाचे एक विलक्षण ठिकाण आहे. अगदी रस्त्यालगत, निर्मनुष्य जागेत असलेल्या कासार टाक्याला माणसे वेगवेगळे नवस बोलतात. त्यामुळे भक्ताची कसलीही अडचण दूर होते. अडलेली कामे होतात, अशी अनेकांची श्रद्धा आहे. नवस फेडायचा असेल तर कोंबडा, दारू व सिगारेट यांचा नैवेद्य इथल्या ‘‘ठिकाणा’’ला  देण्याची प्रथा आहे. कारण पूर्वीच्या काळी गावोगाव फिरून बांगडया विकणाऱ्या कासाराला या आडवाटेवर गाठून वाटमारी करणाऱ्यांनी क्रूरपणे मारले. तेव्हापासून तो कासार इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मदतीला धावून येतो असा समज आहे.

सावंतवाडी तालुक्यात दाभील नावाचे एक गाव आहे. या गावात एकही विहीर नाही. किंबहुना विहीर मारली तर पाणीच लागत नाही. परंतु वरच्या भागात गुळगुळीत काळ्याशार दगडात सात (बावी) विहिरी आहेत. या निसर्गनिर्मित विहिरींचे पाणीच साऱ्या गावाची तहान भागवते. कोकणात नैसर्गिक चमत्कारांची अशी उदाहरणे आहेत तशीच चमत्कारिक रीती-रिवाजांचीसुद्धा कितीतरी ठिकाणे आहेत.

मातोंड हे एकही चहाचे दुकान नसलेले गाव. येथील जत्रेतसुद्धा चहाचे हॉटेल लावत नाहीत. गावात दारू प्यायला बंदी. पण डोंगरात भरणारी घोडेमुखची जत्रा हा देव ब्राह्मण असून त्याला शुद्ध शाकाहारी नैवेद्य दिला जातो आणि त्याच्या गणांना मात्र कोंबडय़ाचा नैवेद्य द्यावा लागतो. म्हणून या जत्रेला कोंब्याची जत्रा म्हणतात.

देवगड तालुक्यातील नारिंग्रे गावात कोणीही कोंबडी पाळीत नाहीत. अगर बाहेरून आणून खाऊ शकत नाही. गावाचे तसे कडक नियम आहेत. तर म्हापण गावात येसू आकाच्या देवळात नवस फेडायचा असेल तर सुक्या बांगडयाची चटणी आणि नाचण्याची भाकरी असा अस्सल मालवणी बेत करावा लागतो.

उभादांडा येथे मानसीचा चाळा नावाचे एक जागृत स्थळ आहे. तिथे नवस फेडायचा असेल तर खेकड्यांची माळ आणि गॅसची बत्ती देतात. या चाळ्याच्या जत्रेला बत्तेची जत्रा म्हणतात.

परुळे गावच्या येतोबाच्या देवळात म्हणे, भिंतीला लोखंडी खंजीर चिकटतो. या उत्सवाला बाक उत्सव म्हणतात तर आरवली गावात वेतोबाचे सुप्रसिद्ध देऊळ आहे. त्याचा नवस फेडण्यासाठी सोनकेळीचा घड आणि चामडयाची चप्पल भेट म्हणून देतात. वेताळाला दिलेली ही चप्पले ठेवल्या जागेवर आपोआप झिजतात. अशी झिजलेली चप्पले आजही पाहायला मिळतात.

मालवण तालुक्यातील पेंडुर गावचे मसणे-परब लग्न लावण्याआधी देवळाच्या आवारात स्मशानातले सगळी विधी करून मग लग्नाच्या बोहल्यावर उभे राहतात. याच तालुक्यातील कोईल गावातील रहिवासी हे लग्नपत्रिकेवर गणपती प्रतिमा छापत नाहीत. कोणाच्याच घरी गणपती पूजन करीत नाहीत. भिंतीवर गणपतीचे कॅलेंडरसुद्धा लावीत नाहीत.

कणकवली तालुक्यातील कुर्ली गावचे पाटील घराण्यातले लोक तुळशीच्या लग्नादिवशीच म्हाळ घालतात. तर वालावल गावातील एकही माणूस  पंढरपूरला जात नाही.

फोंडाघाट येथील वाघोबाचे मंदिर हे समस्त अनिष्ट शक्तींना रोखून धरणारे शक्तिस्थळ आहे असे मानतात. इथले मंदिर कोंबडा आरवायच्या आत फक्त एका रात्रीत बांधायचे अशी विचित्र अट होती. शेवटी गावकऱ्यांनी धाडस करून अतिशय नियोजनपूर्वक सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या वेळेत मंदिराचे बांधकाम पूर्ण केले.

पुराणात ज्याचा एकचक्रानगरी म्हणून उल्लेख आहे ते गाव वैभववाडी तालुक्यात सह्याद्रीच्या निबीड अरण्यात आहे. इथे मोठमोठ्या गुहा असून त्यात गाडाभर अन्न खाणाऱ्या बकासुराचे वास्तव्य होते असे सांगितले जाते. दगडात कोरलेला महाल आणि काळय़ा दगडाचा प्रशस्त पलंग आजही तेथे आहे. पांडवांना अन्न पुरवणाऱ्या ब्राह्मणाचा वाडाही जवळ आढळतो. या दुर्गम भागात प्रशस्त गुहा आहेत, पांडवांची लेणी आहेत आणि भरपूर पाण्याचे साठेही आहेत. अंगी खूप धाडस आणि चिकाटी असल्याशिवाय इथे पोहोचणे खूप अवघड आहे. अरण्यातील या विशिष्ट जागेला राकसमाळ असेही म्हणतात.

* कोकणातील अशा असंख्य ठिकाणच्या चालीरीती व गूढता समजून घेवून अश्या अद्भुत ठिकाणांना पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत

लेखक –  अज्ञात

संग्रहिका – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ इमोजी… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ इमोजी  🤔 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

काही  दिवसांपूर्वी मेघालयातल्या whistling village विषयी ऐकलं. या  Kongthong village मध्ये एकमेकांना बोलवायला शिट्ट्यांचा वापर करतात. इथं संवाद साधायला शब्द वापरले जात नाहीत. शिट्टी घालून संवाद साधला जातो. किती छान! बोलण्यासाठी जवळपास असणं गरजेचं नाही. काही अंतरावरुन देखील; आधुनिक तंत्रज्ञान न वापरता संपर्क साधता येतो.. . . . पण हो याकरिता शिट्टी घालता यायला हवी हं.

माणसाला बोलायला आवडतं. वेगवेगळ्या विषयांवर बोलता येणं ही एक कला आहे. ही कला तुम्हाला बहुश्रृत बनवते. समाजप्रिय बनवते. गप्पा मारणारी माणसं साळढाळ असतात. सहजपणानं कोणत्याही प्रकारच्या लोकांमध्ये मिसळून जातात. मनातलं सगळं सांगून टाकलं की कसं मोकळं मोकळं वाटतं. आपल्याला भावना, विचार व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात.मनातलं सगळं बकबक करुन सांगितल्या शिवाय चैनही पडत नाही आपल्याला. नुसत्या शिट्टीतून या माणसांना राग, लोभ, प्रेम कसं बरं व्यक्त करता येत असेल.शब्दाविना एकमेकांना समजून घेणं ही कला मात्र या लोकांना साधली असेल.  योग्य शब्द शोधून बोलायचा प्रयत्न केला तरी गैरसमज होऊ शकतात. Whistling village मध्ये अशा गैरसमजांना थाराच मिळत नसेल. दुधारी हत्यारासारखे शब्दच न वापरल्यानं हे व्हिलेज खऱ्या अर्थानं स्वर्ग तर ठरत नसावं?

आजकाल आपण न बोलता ही खूप बोलतो. मोबाईलवर येणाऱ्या मेसेजेस ना उत्तर देताना शब्द वापरायचे टाळतो. इमोजी. . . स्मायलीज पाठवून रिस्पाॅन्स देतो. या स्मायलीज आहेतही खूप गोडुल्या. सर्व भाव भावना व्यक्त करण्यास समर्थ आहेत. राग, द्वेष, आनंद अशा मनतरंगा बरोबर त्या थंडी, उष्णता, पाऊस असे हवेतील बदलही त्या दाखवतात. न शिंकता सर्दी – खोकल्याची वर्दी देतात. शाब्बासकी, सहमती, नाराजी,इ. सांगतात. केक, बूके, फूलं पाठवून स्पेशल डेज देखील आपण लांबूनच साजरे करु शकतो. स्टीकर्स पाठवून जास्त आपुलकी दाखवू शकतो. GIF द्वारा गंमतीदार, हलके-फुलके संदेश पाठवू शकतो. नुसते हसरे ईमोजी सुध्दा किती प्रकारचे आहेत. फक्त हसरा चेहरा पाठवून खुषी व्यक्त करता येते. हसरा चेहरा, हसरे डोळे आणि गुलाबी गाल आनंदाबरोबर किंचित लाजरा भाव

व्यक्त करतात. डोक्यावर गोलाकार मुकुट मिरवणारा इमोजी एखाद्या विषयी असलेला अभिमान सांगतो.

हे सगळे चेहरे न बोलता खूप काही बोलतात. कमी वेळात योग्य भावना सांगणारं हे अनोखं तंत्रज्ञान आज जास्तीत जास्त वापरलं जातं. आपल्याजवळ सांगण्यासारखं खूप असतं. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आकलनक्षमतेनुसार आलेल्या अनुभवांची अभिव्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे करता येते. भोवताली घडणाऱ्या घटनांचा अर्थही स्वतः च्या क्षमतेनुसार, संवेदनशीलतेनुसार लावता येतो. त्यासाठी कथा, कविता, कादंबरी असे साहित्य प्रकार हाताळले जातात. काळ बदलला. भावविश्व उलगडून दाखवणारी नवीन साधनं आली. नवीन पिढीची व्यक्त होण्याची साधनं बदलली. भाषा बदलली. सुपरफास्ट जमान्यात सुपरफास्ट पध्दतीनं व्यक्त होता आलं पाहिजे. त्यासाठी भाषेची गरज राहिली नाही. इमोजी हे काम अधिक सुलभ आणि सुपरडुपर फास्ट करतात. शब्दातून सांगितल्या जाणाऱ्या अर्थापेक्षा ही चित्रलिपी वेगवेगळे अर्थ प्रतीत करु शकते. जो हवा तो अर्थ घ्यावा. भाषेची अडचण नाही. भाषा येत नसल्याचा न्युनगंड नाही. कमी वेळात जास्त तसंच योग्य विचार मांडता येतो. पाल्हाळ न लावता मुद्दा सांगता येतो. लिहिणाऱ्याचा आणि वाचणाऱ्याचा दोघांचाही वेळ वाचतो. आता हे शब्दाविना व्यक्त होणाऱ्या पिढीचं जग झालंय.

म्हणजे आपण पुन्हा भाषा नव्हती त्या काळात चाललो आहोत की काय? . . आपण पुन्हा इमोजीतून. . . चित्रलिपीतून . . . भाषेचा शोध लागण्याच्या आधीच्या काळात जाऊन पोहोचणार आहोत की काय?

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print