मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अमरावतीचा आलुबोंडा… लेखक – अज्ञात विदर्भीय ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ अमरावतीचा आलुबोंडा… लेखक – अज्ञात विदर्भीय ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

☆

देशी चण्यांच्या सनान लालभडक मसालेदार तर्रीत आलिशानपणे डुंबणारा गलेलठ्ठ आलुबोण्डा बघताक्षणीच वैदर्भीय अंतःकरणाला घळाघळा पाझर फुटल्याशिवाय राहात नाही.

या रुबाबदार आलुबोण्डयाला वरून शेवकांद्याचा मुकुट चढवला की ते लोभस रुपडं काही केल्या हॉटेलसमोरून पाय उचलू देत नाही.

म्हणूनच आपल्या विदर्भातले आजोबा गुटगुटीत नातवाला मोठ्या लाडाने “काहून बे आलुबोण्डया!” अशी प्रेमळ विचारणा करतात की नाही?

भगवदगीतेत वर्णिल्याप्रमाणे अगदी “मुखं च परिशुष्यते” अशी अवस्था झालेल्या गलितगात्र योद्ध्याला सुद्धा आलुबोण्डा दाखवला तर त्याच्या तोंडाला पाणी सुटून त्याची हिम्मत वाढेल.

अमरावतीच्या पहाटे डायटिंगचा संकल्प करून निघालेल्या फिगर कॉन्शस पब्लिकचा मॉर्निंग वॉक आलुबोण्डयाच्या टपरीवर समाप्त होतो.

चष्मा घरी विसरले तरी टपरीवर रचून ठेवलेला आलुबोण्डयाचा पहाड खूप लांबूनही बरोब्बर दृष्टीला पडतोच.

१२० च्या स्पीडने सुसाट पळणाऱ्या बाईकला करकचून ब्रेक लावण्याची ताकद आहे आलुबोण्डयाच्या मायावी सुगंधात महाराजा!

प्रारंभी भीत भीत सिंगल आलुबोण्डा ऑर्डर करणाऱ्या नवख्या पाहुण्याचा आवाज तो पोटात गेल्यावर एकदम दणदणीत होतो. मग भारदस्तपणे “एक और लगाना भाऊ! ” अशी दमदार ऑर्डर आपोआप निघते.

याउलट लहान आकाराचा, चपटा, बहिर्वक्र आणि फिकट पिवळा पुणेरी ‘बटाटावडा’ बघून अशी कुठलीही प्रेरणा अमरावतीच्या पोटयना होत नाही. कारण कुठल्याही वयाचे असले तरी पोट्टेशाही जात नाही म्हणून ‘पोट्टेच’ ते.

तर मंडळी, हा बटाटावडा अत्यंत फिक्कट, निस्तेज आणि ऍनिमिया झालेल्या रुग्णासारखा पावाच्या गादीवर निपचित झोपलेला असतो. स्वतंत्रपणे तर्रीबिर्रित पोहण्याचं त्राणच नसतं बिचाऱ्यात. आधीच मिळमिळीत, वरून सुक्या पावाच्या कुबड्या घेऊन येणारा हा बटाटावडा कशीबशी गरजू माणसाची भूक शमवत असेलही कदाचित. पण भरपेट जेवलेल्या टग्यांच्याही पोटात भूक उत्पन्न करण्याचं सामर्थ्य त्याच्यात बिलकुल नसतं.

जातिवंत आलुबोण्डयाला ब्रेडपावाच्या कुबड्यांची बिलकुल गरज नसते भाऊ!  त्याला पाहिजे असतो लालेलाल तर्रीचा स्विमिंग टॅंक!  ज्यांना धारोष्ण तर्री सहन होत नाही, त्यांच्यासाठी आलं लसणाची झणझणीत कढी हा पण एक सुंदर विकल्प असतो.

मात्र साखर घातलेलं गुळचट ताक वगैरे दिसलं की स्वतः आलुबोण्डयालाच मळमळल्यासारखं होत असेल. या जीवलग आलुबोण्डयाला “नको” म्हणणारे कॅलरी कॉन्शस पांढरपेशे वरवर नाकं मुरडत असलेत तरी अंतःकरणातून मात्र हळहळत जिभल्या चाटतात. त्यांचा आत्मा कढईभोवती घुटमळत राहतो, असं म्हणतात.

आजकाल मात्र ठिकठिकाणी नाश्त्यासाठी समोश्याचं प्रस्थ बोकाळलेलं आहे. याचं कारण मैदा हा बेसनापेक्षा स्वस्त पडतो आणि समोसा दीर्घकाळ गरम राहतो हे आहे. बहुतांश अड्ड्यांवर आलुबोण्डे तळण्याची सकाळी एक निश्चित वेळ असते. शौकीन खाऊगुल्ले बरोबर त्यावेळी हजेरी लावतात. त्यांचा ‘अमरावतीचा वक्तशीरपणा’ अगदी वाखाणण्यासारखा असतो. ठराविक गिऱ्हाइकांसाठी स्टॉक तयार होतोच आणि हाहा म्हणता लंपाससुद्धा होतो. “सोल्ड लाईक हॉट केक” हा इंग्रजी वाक्प्रचार पण स्लो वाटेल त्या वेगापुढे. मग पुढे दिवसभर त्यांचं समोश्यांचं गुऱ्हाळ चालत राहतं.

“आलुबोण्डा संपला. ” हे काळजात चिरा मारणारं कठोर वाक्य कधीकधी कानावर आघात करतंच.

अशा बिकट प्रसंगी “आजचा आपला दिवस कसा जाईल? ” याची चिंता त्या भाऊला घेरते. ठरल्या ठिकाणी, ठरल्या वेळी, ठरलेली वस्तु न मिळणं म्हणजे मुहूर्त चुकवल्यासारखं वाटतं त्याला. मग या आकस्मिक मानसिक धक्क्यातून कसाबसा सावरत तो शांतपणे आलुबोण्डा मिळण्याचं दुसरं ठिकाण आठवू लागतो. वेळप्रसंगी लोखंडाचे चणे खाण्याची हिम्मत असणाऱ्या अमरावतीत चे भाऊ देशी चण्यातला ‘आलुबोण्डा’ हा मात्र एकदम विक पॉईंट आहे.

काही ठिकाणी संध्याकाळी आलुबोण्डयांचा दुसरा घाणा काढण्याचा रिवाज आहे. संध्याकाळी शिफ्ट संपवून बाहेर पडणाऱ्या कामगारांसाठी बहुधा कारखान्यांच्या तोंडावरच हे अड्डे असतात. बघताक्षणीच पोटात दंगल उसळावी अन मन रसाळ रसाळ व्हावं अशीच या गुटगुटीत बाळाची ख्याती आहे.

अशाच एका उघड्या टपरीवर, महाकाय कढईत, मावळत्या सूर्यप्रकाशात, खळखळत्या तेलात विहार करणारे चैतन्यमयी सोनेरी आलुबोण्डे माझ्या स्मृतीत अजरामर झालेले आहेत.

☆

लेखक : अज्ञात विदर्भिय…

प्रस्तुती : श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘तो कृष्ण आहे…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘तो कृष्ण आहे…‘ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

कृष्णाला बर्‍याच गोष्टी मिळाल्या नाहीत.

त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलांपासून वेगळा झाला,

नंतर नंद-यशोदा भेटले, पण आयुष्यातून ते ही गेले.

राधा गेली. गोकुळ गेलं. मथुरा गेली.

त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतचं गेलं.

कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, तो पण अगदी आनंदाने.

ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला.

आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं रहायचं? हे कृष्ण शिकवतो.

 

…. कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात.

…. आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी, कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा, क्षणांचा, स्वप्नांचा, आठवणींचा सोहळा करता आला पाहिजे….

 

.. पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील नव्व्याण्णव आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे,

.. सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे,

.. द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे तर तो कृष्ण आहे,

.. मृत्यूच्या फण्यावर उभारलेला असून देखील जो नृत्य करतो तो कृष्ण आहे,

.. सर्वसामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। मुक्ताई ।। ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ ।। मुक्ताई ।। ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

मुक्ताई,

अनेक आशिर्वाद.

खरंतर माझी स्थिती त्या चांगदेवांसारखीच झाली आहे…! मायना काय लिहावा, याबद्दल मी थोडा गोंधळलो आहे…!

… कारण, तू फक्त वयाने लहान, आणि ज्ञानाने मात्र मोठी… आणि मी फक्त वयाने मोठा…!

तू म्हणशील लोकं तुला ‘माउली’ म्हणतात…!

पण खरं सांगू यात माझे असे काय आहे……?

गीता भगवंताने सांगितली म्हणजे यात माझे काही नाही….!

माझ्या सद्गुरूंनी, आपल्या निवृत्तीदादांनी माझ्याकडून ती लिहून घेतली…!

दादाचे आपण आजपर्यंत ऐकतोच, मग यात माझे ‘कर्तृत्व’ ते काय..?

आईबाबा गेल्यावर लहान असूनही तूच आम्हाला आधार दिलास….!

‘…… ……… …… ‘

हा असे का बोलत आहे? असा तुला प्रश्न पडला असेल ना?

अग आज तुझी पुण्यतिथी!! म्हणून तुझ्याबद्दल चार शब्द सांगावे, असे निवृत्तीदादाने मला सांगितले…! .

अग, मला मांडे भाजून दिलेस ना? … तेव्हा तू माझी ‘आई’ झालीस…..!

मला ‘ताटी ‘उघडायला लावलीस तेव्हा तू माझी समजूत काढणारी ‘ताई’ झालीस…..!

…. हे दोन प्रसंग सर्वांना माहीत आहेतच…..! पण असे अनेक प्रसंग…!

मला नेहमी प्रश्न पडतो की तुम्ही मुली, प्रसंग आला की लगेच मोठ्या कशा होता….?

मला तुझा खूप आदर वाटतो, मोठा आधार वाटतो आणि कौतुकही वाटतं….!

आपण चार भावंडे! सर्वात शेवटी तुझं नाव घेतलं जातं… पण तूच सर्वश्रेष्ठ आहेस असे मला नेहमी वाटतं आले आहे…! कारण आजही या जगात ‘मातृत्व’भावच सर्वश्रेष्ठ आहे..

सदगुरुकृपेने लोकं मला ‘माउली’ म्हणतात पण आईनंतर तूच माझी ‘माउली’ झालेली आहेस, त्यामुळे तूच सर्वश्रेष्ठ आहेस…! मला तुझा अभिमान वाटतो….! माझी मुक्तेश्वरी!!

तुझं कौतुक केले तर तुला कदाचित आवडणार नाही, पण आज तरी मला माझ्या लाडक्या मुक्तेचं मन भरस्तोवर कौतुक करू दे….!

मुक्ते!! आज सामान्य जनांना नुसतं ‘मुक्त’ करून चालणार नाही तर आपला ‘नरेंद्र’ (स्वामी विवेकानंद) म्हणतो तसे लोकांनी गोरगरिबांची सेवा करायला हवी….! आपल्या ‘भारतमाते’ला आज त्याचीच गरज आहे असे मला वाटते.

तू आदिमायेचा अवतार आहेस, मुक्त होण्यासाठी सर्वजण तुझ्याच चरणी येतील, तेव्हा तू हे सर्वांना सांग, सांगशील न….?

चल मुक्ते, थांबतो…!

तुझ्याशी बोलून आज मला खूप आनंद झाला…!

तुझा,

ज्ञानादादा.

 (वैशाख वद्य दशमी, शके १९४७…. संत मुक्ताबाईंची पुण्यतिथी…. त्यानिमित्त त्यांचे पुण्यस्मरण….! ) 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ठेविले अनंते तैसेचि रहावे??? – भाग – ३ ☆ डॉ गोपाळकृष्ण गावडे ☆

डॉ गोपाळकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆ ठेविले अनंते तैसेचि रहावे??? – भाग – ३  ☆ डॉ गोपाळकृष्ण गावडे ☆

(२) समाधानाचे यशप्राप्ती मधील महत्व – (मिळालेल्या गोष्टी पूर्णपणे स्वीकारल्याने समाधान शोधणे सध्या लहानपणापासून होणाऱ्या संस्काराच्या एकदम विरुद्ध आहे. त्यामुळे त्याचा स्वीकार सर्वांनाच जरा अवघड जातो.)—- इथून पुढे 

आपण अतिशय चतुरपणे यश आणि यशाचा आनंद मिळवण्याचे समर्थन करत राहतो. पण यशाच्या मागे धावल्याने कर्म मार्गात भय, चिंता, ताणाचे काटे आणि शेवटी अपयश पदरी पडणार असेल तर अशा समर्थनात कसलीही चतुराई नाही. मिळणाऱ्या यशापयशाचे प्रामाणिक आत्मपरीक्षण केल्यास मनुष्यास हळूहळू त्याची उपरती होऊ लागते. मग यशप्राप्तीसाठी तुकाराम महाराजांच्या बोलांची महती पटू लागते. परमेश्वराकडून मिळालेल्या गोष्टीतून आयुष्यात समाधानाचा संतोष इतका यावा की त्यानंतर यशाच्या आनंदाची गरज पडू नये. यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, “ठेविले अनंती तैसेचि रहावे चित्ती असू द्यावे समाधान.”

३) समाधानाचा शोध – 

घडून गेलेल्या गोष्टीत समाधान दडलेले असतेच. फक्त ते आपल्याला दिसत नाही. असे समाधान आपल्याला शोधावे लागते. मनुष्याच्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश आदींमध्ये चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजू असतात. मनुष्याने त्या पैकी वाईट बाजू पाहिल्या तर आपल्याला मिळालेल्या या सर्व गोष्टी खराब आहेत असे त्यास वाटू लागते. अशा खराब गोष्टी स्वीकारायला मनुष्याचे मन तयार होत नाही. त्यातून असमाधानाची भावना निर्माण होते. याउलट मनुष्याने आपल्या वाट्याला आलेल्या या सर्व गोष्टीमधील केवळ चांगली बाजू पाहिली तर आपल्याला मिळालेल्या या सर्व गोष्टी उत्तम आहेत असे त्यास वाटू लागते. अशा चांगल्या गोष्टी स्वीकारायला मनुष्याचे मन सहज तयार होत नाही. त्यातून समाधानाची भावना निर्माण होते. मनुष्याच्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश आदींमध्ये चांगल्या आणि वाईट पैकी कुठली बाजू पाहायची याचे संपूर्ण स्वातंत्र्य मनुष्यास असते. गरज असते ती जागरुकतेची. आयुष्यातील नकारात्मकता पाहणे हा अपयशाकडे घेऊन जाणारा निर्बुद्धपणा आहे. या बाबत जागरूकता निर्माण झाल्यावर मनुष्य यशाकडे घेऊन जाणाऱ्या सकारात्मकतेचा कास धरतो.

परिणामांमध्ये सकारात्मकता आणि नकारात्मकता शोधता येते. त्यामुळे घडून गेलेल्या गोष्टीमध्ये खात्रीपूर्वक चांगले आणि वाईट परिणाम शोधता येतात. जी गोष्ट अजून घडलेलीच नाही त्यात चांगले वाईट परिणाम शोधणे अवघड असते. कुणी तसा प्रयत्न केला तरी सर्व गणिते जर तर मध्ये असल्याने त्याचा सुख दुःखावर फारसा परिणाम होत नाही. भविष्यात घडू शकणाऱ्या चांगली गोष्टींचा कुणी विचार करत बसले तरी अशा शेख चिल्ली विचारामधील फोलपणा बुद्धीला लगेच जाणवतो.

त्यामुळे सत्ता, संपत्ती, संपत्ती, प्रतिष्ठा, आरोग्य आणि नातेसंबंध या बाबतीत जे यश आधीच मिळालेले आहे त्यामध्ये सकारात्मकता आणि नकारात्मकता शोधता येते. पण जी सत्ता, संपत्ती, संपत्ती, प्रतिष्ठा, आरोग्य आणि नातेसंबंध याबाबतीतील जे यश अजून मिळालेच नाही त्यात सकारात्मकता आणि नकारात्मकता शोधणे कठीण आहे.

सकारात्मक आणि नकारात्मक विचारांचा मनावर होणारा परिणाम – 

मनुष्याच्या मनाची आनंदी किंवा दुःखी अवस्था हा केवळ त्याच्या विचारांचा खेळ आहे. प्रत्येक मनुष्याच्या वाट्याला काही व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था आणि यश येते. यापैकी काहीही परिपूर्ण नसते. त्यात चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी असतात. शोधले तर अगदी रामाच्या चरित्रात सुद्धा नकारात्मक गोष्टी सापडतात. शोधले तर रावणाच्या चरित्रात सुद्धा काही सकारात्मक गोष्टी सापडतात. सामान्य मनुष्याचे चरित्र तर सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टीचे मिश्रण असते. विचार मनुष्याला आनंदी किंवा दुःखी कसे करतात हे एका नवरा बायकोच्या उदाहरणातून समजून घेऊ. जर एका बायकोने आपल्या नवऱ्यातील सर्व सद् गुण पाहायचे ठरवले तर थोड्या वेळातच तिला असे जाणवेल की तिला अगदी देवासारखा नवरा मिळालेला आहे. ज्या स्त्रीला असे मनापासून वाटेल की आपल्याला खूप चांगला नवरा मिळालेला आहे ती श्री आनंदी होईल. देवासारखा चांगला नवरा मिळाला. आता याच्यापेक्षा आणखी चांगले काय मिळणार? या विचाराने ती स्त्री समाधानी होईल. नवऱ्यातील सकारात्मक गोष्टी पाहिल्याने म्हणजे सकारात्मक विचार केल्याने तिचे मन आनंदी आणि समाधानी झाले. अशाच प्रकारे आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश, इत्यादी मधील केवळ सकारात्मक गोष्टी पाहिल्या तर मनुष्याचे मन आनंदी आणि समाधानी होते. आता त्या स्त्रीने त्याच नवऱ्यातले सगळे दुर्गुण पाहायला सुरुवात केली. नवऱ्याचे सगळे दुर्गुण समोर आल्यावर काही काळातच तिला जाणवले की आपल्याला अतिशय खराब नवरा मिळालेला आहे. अशी स्त्री दुःखी आणि असमाधानी होणार. अशा प्रकारे आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश, इत्यादी मधील केवळ नकारात्मक गोष्टी पाहिल्या तर मनुष्याचे मन दुखी आणि असमाधानी होते.

प्रत्येक मनुष्याच्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश, इत्यादी मध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू असतात. यातले काय पाहायचे आहे याचा पर्यायही मनुष्यासमोर उपलब्ध असतो. तुकाराम महाराज म्हणतात की परमेश्वराने आपल्याला दिलेले व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश, इत्यादी मधील केवळ सकारात्मक गोष्टी पाहून स्वतःला आतून इतके आनंदी आणि समाधानी करा की बाहेरच्या जगातून भय, चिंता, ताण आणि एकाग्रतेचा नाश करणाऱ्या अपेक्षा निर्माणच होणार नाहीत. मग अशा समाधानातून उत्पन्न होणाऱ्या तीव्र एकाग्रतेतून उच्च दर्जाचे काम वेगाने आणि सातत्याने होऊ लागेल. अशा कामाच्या संचयातून असाधारण यश मिळते.

यश संकलनाच्या अपेक्षा नष्ट झाल्या तर मनुष्याची कर्म प्रेरणा संपून तो आळशी आणि निष्क्रिय होईल अशी भीती काही लोकांना वाटते. पण याच्या अगदी उलटे घडते. संकलनाच्या अपेक्षेच्या नशासोबत भय-चिंतेचा नाश होतो. भय-चिंतेच्या नाशासोबत मनुष्याला तीव्र एकाग्रता प्राप्त होते. तीव्र एकाग्रतेतून उत्तम दर्जाचे काम वेगात घडू लागले की सर्व वेळापत्रक वेळेआधी पूर्ण होऊ लागतात. त्यातून येते, जमतंय, होते अशी भावना वाढीला लागते. ही भावना अतिशय उत्साहवर्धक असते. अशा उत्साहामुळे कामात सहज सातत्य निर्माण होते. याउलट यशाच्या अपेक्षा ठेऊन काम करत असताना अपयश मिळण्याच्या शक्यता समोर दिसू लागल्यास मनुष्य हातोत्साही होतो. त्यातून कामातील सातत्य आपोआप नष्ट होते. अशा प्रकारे यश संकलनाच्या अपेक्षा ठेवल्यास कामात सातत्य निर्माण होण्याऐवजी कामातील सातत्य नष्ट होते. या उलट यश संकलनाच्या अपेक्षा नष्ट झाल्यास कामातील सातत्य नष्ट होण्याऐवजी कामात सातत्य निर्माण होते.

आयुष्यातील सकारात्मक गोष्टी पाहून मनुष्याने मन प्रसन्न केले की त्याला बाहेरच्या जगातून यशाचा आनंद शोधायची आवश्यकता भासत नाही. तोच मनुष्य त्याच्या यशाच्या आनंदाच्या अपेक्षेवर नियंत्रण ठेऊ शकतो. त्याचीच भीती चिंता कमी राहते. तोच तीव्र एकाग्रतेने सातत्याने काम करू शकतो. त्यालाच असाधारण यशाची प्राप्ती होते. एखाद्या मनुष्याला असाधारण यश वारंवार मिळू लागल्यास सामान्य लोक अशा मनुष्यास असाधारण सिद्ध व्यक्ती समजू लागतात.

म्हणून तुकाराम महाराज त्यांच्या आणखी एका अभंगात म्हणतात “मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.” 

काही उथळ विचार करणाऱ्या लोकांना हा अभंग अतिशय नकारात्मक आणि प्रगतीच्या आड येणारा आहे असे वाटते. पण तुकाराम महाराजांनी या अभंगातून असाधारण यश मिळवण्याचा साधा सोपा मार्ग सांगितला आहे.

मनुष्य योनीत भानावर नसलेल्या मनुष्याची विकसित बुद्धीच त्याची सर्वात मोठी शत्रू ठरू शकते. मनुष्य सोडून इतर जीवांमध्ये बुद्धीचा फारसा विकास झालेला नसल्याने त्यांच्यात फारसे यश संकलन पण होत नाही आणि यश संकलनातून निर्माण होणारे अहंकारशुद्ध निर्माण होत नाहीत. ते केवळ शरीर हा एकमेव अहंकार घेऊन जगत असतात. जीवात्मा मनुष्येतर प्राण्याच्या रुपाने जन्माला येतो, शरीरात आत्मभाव ठेवून आयुष्यभर शरीर संगोपन आणि प्रजननाच्या कामात स्वतःला जुंपून घेतो आणि अशा अज्ञानी अवस्तेतच एक दिवस शरीर सोडून पुढील प्रवासाला निघून जातो. पण अशा योनीत बुद्धीच्या अभावामुळे त्यांना शरीराच्या पलीकडे असलेल्या आपल्या खऱ्या अस्तित्वाचे म्हणजे अनादी अनंत आत्म्याचे भान निर्माण होणे केवळ अशक्य असते. उत्क्रांतीच्या काळात संकलनाच्या गरजेपोटी विकसित झालेल्या मनुष्य बुद्धीमुळेच जीवात्म्याला स्वतःच्या अस्तित्वाची खरी ओळख करून घेणे शक्य असते. मनुष्याला आपल्या अस्तित्वाचे यथार्थ स्वरूप समजले आणि त्याच्या बुद्धीने ते स्वीकारून त्याप्रमाणे आचरण सुरू केले की जीवात्म्याच्या मुक्तीचा मार्ग खुला होतो. असा मनुष्य तीव्र एकाग्रतेच्या जोरावर भौतिक जीवनात सुद्धा असाधारण यश मिळवतो. म्हणून मनुष्य जन्म श्रेष्ठ समजला जातो.

वहिल्या उद्वेग दुःखची केवळ। 

भोगणे ते फळ संचिताचे।।

मनुष्य प्रयत्नपूर्वक प्रकृती दत्त शरीर संगोपन आणि बुद्धी दत्त यश संकलन कर्म करतो. त्याची चांगले वाईट फळे जमा होत जाते. ज्याप्रमाणे एखाद्या गुन्ह्याची शिक्षा भोगल्याशिवाय त्या गुन्ह्याचा दोष नष्ट होत नाही त्याप्रमाणे संचितकर्माची चांगले वाईट फळे भोगल्याशिवाय ते संचित कर्म नष्ट होत नाही. अशा प्रकारे आपल्या वाट्याला आलेली परिस्थिती ही आपल्याच कर्माचे फळ असते. मनुष्य तितक्या लवकर तिचा स्वीकार करेल तितक्या लवकर ते कर्मफळ भोगून कर्म नष्ट करता येते.

मनुष्याच्या वाट्याला येणाऱ्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश, आदी गोष्टी या त्याच्या पूर्व आयुष्यातील संचित कर्माचे फळ असतात. मनुष्याला ही संचित कर्मांची फळे भोगूनच ती करणे नष्ट करावी लागतात. आपल्याच कर्माचे फळ आहे याचा विचार करून मनुष्याला आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश, आदी सोबत निभावून न्यावे लागते. अशा वेळी प्राप्त परिस्थितीतील फक्त नकारात्मक गोष्टीबद्दल विचार करून उद्वेग निर्माण करून घेतल्यास केवळ दुःख पदरी पडते. त्यापेक्षा प्रकृती आणि बुद्धीच्या प्रभावामुळे घडलेल्या आपल्याच संचित कर्माचे प्राप्त परिस्थिती रुपी फळ भोगून नष्ट करणे अपरिहार्यता आहे हा विचार सुज्ञपणाचा ठरतो. तुकाराम महाराज सांगतात की अशा विचारामुळे प्राप्त परिस्थिती स्वीकारणे सोपे जाते. मनातील उद्वेग आणि दुःख कमी होतात.

तुका म्हणे घालू तयावर भार। 

वाहू हा संसार देवापायी।।

कुठलीही प्रजाती ही परमेश्वराच्या शक्तीचे सृजन आहे. परमेश्वरी शक्ती आपल्या सृजनाचे काही काळ तरी संवर्धन करू इच्छिते. ही परमेश्वरी शक्ती कुठल्याही प्रजातीच्या संवर्धनाचे कार्य त्या प्रजातीतील जीवां कडूनच करून घेते. परमेश्वरी शक्तीच्या प्रेरणेतून प्रत्येक जीवामध्ये शरीर संगोपन आणि प्रजनन करणारी प्रकृती स्थापित केली गेलेली असते. प्रजातीच्या संवर्धनासाठी ही प्रत्येक जीवाची प्रकृती त्या जिवा मार्फत शरीरसंगोपण आणि प्रजननाचे काम करून घेते. इतर प्राण्यांच्या विपरीत मनुष्यामध्ये निर्माण झालेली बुद्धी ही याच प्रकृतीचे काम सोपे व्हावे म्हणून सत्ता, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा, आरोग्य आणि नातेसंबंध रुपी यशा संकलनाचे कार्य करत असते. म्हणजे मनुष्य बुद्धीच्या आदेशाने काम करतो, बुद्धी प्रकृतीसाठी काम करते आणि प्रकृती परमेश्वराच्या शक्तीसाठी काम करते. याचा अर्थ असा होतो की मनुष्य ईश्वरी शक्तीच्या प्रेरणेने काम करतो. मनुष्याच्या प्रकृतीदत्त वा बुद्धीदत्त संसार कार्यामागे तो स्वतः नाहीच. सृजन संवर्धनाच्या एका मोठ्या योजनेचा तो एक छोटासा भाग आहे. परमेश्वरी शक्तीने तिचे सृजन संवर्धित करण्यासाठी केलेला खटाटोप आहे. मग यश किंवा अपयश याचा भार कुणी मनुष्यावर कसा असू शकेल? मनुष्याने स्वतः तरी या यशापयशाला जबाबदार का धरावे? सुज्ञ मनुष्याने देवासाठी चाललेल्या आपल्या संसारकार्याच्या यशापयशाचा पूर्ण भार देवावर टाकून निर्भय आणि निश्चिंत व्हावे. या निर्भय आणि निश्चिंत अवस्थेतून निर्माण होणाऱ्या एकाग्रतेचा उपयोग करून आपले दैनंदिन काम समर्थपणे पूर्ण करावे. उगाच स्वतःकडे मोठेपणा घेत कामाच्या यशा अपयशाची जबाबदारी स्वीकारू नये. यशाची जबाबदारी स्वीकारली तर त्यातून निर्माण होणारी भय-चिंता ही एकाग्रतेचा नाश करून मनुष्याचे प्रकृतीदत्त व बुद्धिदत्त काम खराबच करणार आहे. हा एक प्रकारे दैवी योजनेच्या विरुद्ध अपयशाकडे घेऊन जाणारा आत्मघातच ठरेल.

– समाप्त –

© डॉ गोपाळकृष्ण गावडे

(वंध्यत्वनिवारण आणि दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ञ)

सिटी फर्टिलिटी सेंटर, पाटिल हॉस्पिटल, सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ठेविले अनंते तैसेचि रहावे??? – भाग – २ ☆ डॉ गोपाळकृष्ण गावडे ☆

डॉ गोपाळकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆ ठेविले अनंते तैसेचि रहावे??? – भाग – २  ☆ डॉ गोपाळकृष्ण गावडे ☆

(या भागामुळे परिस्थितीचे पूर्ण आकलन करून संकलनासाठी योग्य निर्णय घेण्याची क्षमता मनुष्यामध्ये निर्माण झाली. या क्षमतेला बुद्धी असे म्हटले गेले. मनुष्यामध्ये बुद्धीचे मुख्य कार्य प्रकृतीदत्त कर्तव्य सोपे व्हावे म्हणून गोष्टींचे संकलन करणे आहे.) – इथून पुढे —- 

विचार करू शकणाऱ्या मेंदूच्या या नव्या भागामुळे मनुष्याला लिंबिक सिस्टिम (Lymbic system) मधून निर्माण होणाऱ्या प्रकृतीच्या मूलभूत अंतः प्रेरणा म्हणजे basic Survival instinct च्या वरती जाऊन वागण्याचे थोडे स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे कुठल्याही कामाची कर्मप्रेरण ठरवण्याचा अधिकारी मनुष्याला मिळाला. अर्थात एका पॉईंट नंतर शरीर रक्षणासाठी मनुष्याला प्रकृतीदत्त कर्तव्य करावेच लागते. अन्यथा प्रकृती तहान, भूक, आदीची तीव्रता वाढवत जाते. एका पॉईंटला मनुष्य इतका व्याकुळ होतो की त्याला प्रकृतीदत्त कर्तव्य करावेच लागतात.

योगाच्या भाषेत आपण लिंबिक सिस्टिम (Lymbic system) ला आपण आज्ञाचक्र म्हटले तर या नियोकॉर्टेक्स (Neocortex) ला सहस्त्रार चक्र असे म्हणता येईल.

हळूहळू बुद्धीच्या विकासासोबत संकलित केल्या जाणाऱ्या गोष्टींचे स्वरूप बदलत गेले. अन्नाच्या संकलनापासून सुरू झालेला प्रवास आज सत्ता, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा, आरोग्य आणि नातेसंबंध संकलनापर्यंत पोहचला आहे. या सहा गोष्टीच्या संकलनालाच आज यश असे म्हणतात. असे यश जमा झाल्यास भविष्य सुरक्षित झाल्याची सुखद भावना मनुष्यामध्ये निर्माण होते. शरीर संगोपन अथवा यशसंकलन करताना आपण अनेक भूमिका किंवा रोल स्वीकारतो.

कुठल्याही रोल (उदा डॉक्टर, नवरा, वडील, इत्यादी) च्या यशापयशानुसार त्या रोल बद्दल आपल्या मनात स्वतःचीच एक प्रतिमा तयार होते. डॉक्टर म्हणून, नवरा म्हणून किंवा बाप म्हणून मी कसा आहे? याबाबत आत्मपरीक्षण करून अशी प्रतिमा तयार होते. या प्रतिमेच्या आकाराला अहं आकार अर्थात अहंकार असे म्हणतात. जसे मनुष्याच्या आयुष्यात यश संकलित होत जाते तसे त्याचे अहंकार मोठे होऊ लागतात. नोकरी लागत नसलेला एखादा नवीन इंजिनीयर कंपनीत लागल्यावर कुठल्याही पगारावर काम करायला तयार असतो. पण हळूहळू तो काम शिकतो आणि कंपनीला त्याच्या सेवेचा फायदा होऊ लागतो. त्याच्या कामाची त्याला वरिष्ठांकडून वारंवार शाब्बासकी मिळू मिळते. मग उपयुक्त इंजिनीयर म्हणून त्याची स्वतःच्या मनातील प्रतिमा वाढू लागते. या वाढलेल्या अहंकाराच्या प्रमाणात आपल्याला पगारवाढ, बढती आणि मानसन्मान मिळावा अशी इच्छा त्याच्या मनात निर्माण होते. अशा प्रकारे अहंकार वाढल्यावर मनुष्याला आपल्या वाढलेल्या अहंकाराच्या प्रमाणात यश हवे असते. अशात स्पर्धाभाव हा अहंकाराचा मूळ स्वभाव असतो. आम्ही दोघे एकच वेळी नोकरीला लागलो असताना त्याला इतकी पगारवाढ आणि मला इतकीच पगारवाढ? अशी स्पर्धा लागते. स्पर्धा जिंकल्यास अहंकाराला सुखावतो. उलट स्पर्धेत अपयश पदरी आल्यास अहंकार दुखावतो. या सगळ्यात यशाच्या संकलनाचा मूळ उद्देश्य काय होता हे मनुष्य सोईस्कर रित्या विसरून जातो. आता मनुष्य केवळ स्पर्धाभावाने यश संकलन करू लागतो. अशा यश संकलनाला कुठल्याही वरच्या मर्यादा नसतात. यश संकलनाच्या मूळ उद्देश्याचे भान हरपलेल्या माणसामध्ये स्पर्धाभावातून यश संकलन आणि यश संकलनातून अहंकार वाढणे हे चक्र चालू राहते. वाढत्या अहंकारासोबत यश संकलनाच्या अपेक्षा हळूहळू वाढत जाऊन शेवटी त्या मनुष्याच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांना ओलांडून पुढे जातात. अशा आवाक्या बाहेरच्या यशाच्या अपेक्षांमधून अपयशाचे भय आणि कर्म सिद्धीची चिंता निर्माण होते. तणाव निर्माण करणाऱ्या या भय-चिंतेचे प्राथमिकतेने निवारण करण्यासाठी चित्त सतत तिकडेच आकर्षित होते. मनुष्याच्या दैनंदिन कामातील एकाग्रतेचा नाश होऊन कर्महानी करते. काम खराब झाल्याने मनासारखे यश मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होते. मनाविरुद्ध घडेल अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर मनाची जी हबलता आणि असहाय्य अवस्था निर्माण होते त्याला ताण म्हणतात. मनुष्याच्या दैनंदिन कामाचा दर्जा, वेग आणि सातत्य ढासळल्याने त्यामुळे असा मनुष्य अपयशाचा धनी होतो.

अपयश मिळाले की मनुष्य दुःखी होतो. दुःखी झालेला मनुष्य सुख समाधान शोधण्यासाठी बाहेरच्या जगाकडे पाहू लागतो. बाहेरच्या जगातून केवळ यश या संकलनातून सुख मिळते. तसे संस्कार मनुष्याच्या मनावर लहानपणापासून झालेले असतात. मनुष्याला जितके मोठे दुःख होईल मनुष्य तितके मोठ्या यशाची तो अपेक्षा करू लागतो. अनेकदा असे अपेक्षित यश तात्कालिक मानसिक आणि शारीरिक क्षमतेपेक्षा मोठे असते. असे यश मिळण्यास आपण लायक आहोत असे दर्शवण्यासाठी अहंकारात जाणिवपूर्वक हवा भरली जाते. यातली तफावत बुद्धीला जाणवल्यावर ती अशी अवास्तव अपेक्षा स्वीकारत नाही. क्षमतांचे अंथरुण पाहून अपेक्षांचे हातपाय पसरावे असा सल्ला बुद्धी अहंकाराला देते. बुद्धीने एखादी अपेक्षा स्वीकारली नाही तर ती पूर्ण करण्यासाठी कधीही काम होत नाही. अहंकाराची अवस्था अगतिक होते. अशा अगतिक अवस्थेत अहंकार अप्रामाणिक होण्याचा निर्णय घेतात. आपले क्षमतांचे अंथरुण मोठे असल्याचा भास निर्माण करतात. बुद्धीने ऐकले नाही तर थयथयाट करून मनात ताण उत्पन्न करतात. त्याला कंटाळून एकदा बुद्धीने अहंकाराच्या मोठे यश मिळवण्याच्या अपेक्षेचे समर्थन केले की मग त्यावर काम चालू होते. पण चालू क्षमता आणि अपेक्षांमधील तफावत बुद्धीला वारंवार जाणवत राहतो. अपेक्षित मोठे यश चालू क्षमतांनी मिळणार नाही अशी परिस्थिती बुद्धीसमोर आल्यास अपयशाचे भय आणि कर्मसिद्धीची चिंता आणखी मोठी होते. त्यातून एकाग्रतेचा आणखी नाश होतो. एकाग्रता नष्ट झाल्यास कर्मनाश होऊन आणखी मोठे अपयश पदरी पडते.

अपयशातून मोठे दुःख, अशा दुःखी मनातून आनंदाची मोठी अपेक्षा, आनंदाच्या मोठ्या अपेक्षेतून क्षमतेपेक्षा मोठ्या यशाची अपेक्षा, अवास्तव यशाच्या अपेक्षांच्या समर्थनार्थ अहंकारात हवा भरली जाणे, अवास्तव अपेक्षांचे सर्मथन झाल्यावर भय-चिंता, भय-चिंतेमुळे एकाग्रतेचा नाश, एकाग्रतेच्या नाशातून कर्मनाश, कर्मनाशातून अपयश आणि अपयशातून आणखी मोठे दुःख. हे दुष्टचक्र फिरत राहून मनुष्य पूर्णपणे रसातळाला जातो.

अशा दारूण अवस्थेत मनुष्याची एकाग्रता आणि मनस्थिती इतकी खराब असते की त्याला त्याला यश संकलनाच्या मूळ उद्देशाचे भान राहणे जवळपास अशक्य असते.

हे दुष्टचक्र तोडण्याचा दोन उपाय आहेत.

१) मनुष्याने उपाय करून स्वतःला आतून इतके आनंदी करावे की बाह्य जगातून मिळणाऱ्या यशापयशाचा त्याच्या मनावर कमीत कमी काही परिणाम व्हावा. मनुष्य आतून आनंदाने इतका तृप्त व्हावा की बाहेरून यशाचा आनंद मिळवण्याची त्याला गरजच वाटू नये. मग हळूहळू अपयशाची भिती कमी होऊन मनस्थिती आणि एकाग्रता सुधारत जाते.

२) मनस्थिती जागेवर येऊ लागल्यावर आपल्या अस्तित्वाच्या मूळ स्वरूपाचा शोध घ्यावा. मग शरीर संगोपन करणारी प्रकृती आणि यश संकलन करणाऱ्या बुद्धीच्या निर्मितीचा मूळ उद्देश्य तटस्थपणे समजून घ्यावा. यश संकलनाच्या मूळ उद्देश्याचे सतत स्मरण ठेऊन स्वतःच्या यश मिळवण्याच्या अपेक्षांवर प्रयत्नपूर्वक नियंत्रण मिळवणे.

स्वतःला आतून आनंदी कसे करावे?

तुकाराम महाराज ११९१ व्या अभंगातून त्याचे निरूपण करतात.

मनुष्याची दुःखी मनस्थिती त्याला जय वरील दुष्ट चक्रात खेचून घेत असेल तर मनुष्याची आनंदी मनस्थितीच त्याला या दुष्ट चक्रातून बाहेर काढू शकते. मनुष्याने स्वतःला आनंदी अवस्थेत कसे न्यावे हा खरा प्रश्न आहे. त्याचे उत्तर तुकाराम महाराज देतात.

मनुष्याला दोन प्रकारचे सुख-दुःख भोगावे लागतात.

१) भविष्यात यश मिळवण्यासाठी कर्ममार्गावर चालताना वर्तमानात मिळणारे सुखदुःख – सत्ता, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा, आरोग्य आणि नातेसंबंध याबाबतीत आपल्या यशाच्या अपेक्षा असतात. असे इच्छीत यश मिळवण्याच्या मार्गावर चालताना अमनुष्याला सुखदुःख मिळते. अपेक्षित यश अजून मिळालेले नसते. भविष्यात ते मिळू शकते. असे यश मिळणे केवळ प्रयत्नावर अवलंबून नसते. प्रयत्न दैव आणि काळ तिन्ही गोष्टी जुळून आल्यावर असे यश मिळते. त्यामुळे भविष्यातील यशप्राप्ती बाबत आणि म्हणून त्यातून मिळणाऱ्या सुखाबाबत अनिश्चितता असते. सीमित काळात सर्व कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांचे नियोजन केले जाते. मोठ्या कार्याचे तुकडे करून रोज किती काम करायचे हे ठरवले जाते. त्यातून वेळापत्रक तयार होते. वेळापत्रक पूर्ण होत असेल तर मनुष्याला इच्छित यशप्राप्तीची खात्री वाटू लागते आणि ते आनंदी होतो. वेळापत्रक कोलमडले तर मनुष्याला इच्छित यशप्राप्तीची होणार नाही असे वाटू लागते. मग तो आनंदी होतो.

२) भूतकाळात प्राप्त झालेल्या यशप्राप्तीचे वर्तमानात होणारे सुखदुःख – सत्ता, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा, आरोग्य आणि नातेसंबंध याबाबतीत आपल्या यशाच्या अपेक्षा असतात.

हे आधीच प्राप्त झालेल्या यशाचे सुख-दुःख असते. येथे प्रयत्न, दैव आणि काळ आपले काम आधीच करून बसलेले असतात. त्यामुळे येथे कसलीही अनिश्चितता नसते. प्राप्त झालेले यश अपेक्षे प्रमाणे वा त्यापेक्षा जास्त असेल तर ते सुखकारक ठरते. प्राप्त झालेले यश अपेक्षेपेक्षा कमी असेल तर ते दुःखास कारणीभूत ठरते.

दोन्ही सुख-दुःख हे त्या मनुष्याच्या अपेक्षांना सापेक्ष असतात. यापैकी भविष्यातील यशापयशाचा शक्यतेने निर्माण होणाऱ्या सुखदुःखावर मनुष्याचे फारसे नियंत्रण नसते. मनुष्याच्या प्रयत्ना सोबत दैव आणि काळ असे यश मिळण्यासाठी कारणीभूत असते. त्यामुळे त्यात एक अनिश्चितता असते. परंतु भूतकाळतील यशापयश ही घडून गेलेली घटना असते. त्यात एक निश्चितता असते.

भूतकाळात मिळालेले यशाविषयी मनुष्याची भावना आणि भविष्यकाळात मिळू घातलेले यश यात वरवर काही संबंध जाणवत नसला तरी त्यात अगदी जवळचा संबंध असतो. भूतकाळात मिळालेले यश मनुष्याच्या अपेक्षांना सापेक्ष असल्याने ते अपेक्षेपेक्षा मोठे असेल तरच बुद्धीकडून यश म्हणून स्वीकारले जाते. मिळालेल्या यशाचा बुद्धीकडून संपूर्ण स्वीकार होण्याला समाधान (सम – संपूर्ण, अधान – धरण करणे किंवा स्वीकारणे) असे म्हणतात. प्राप्त यशा बद्दल जो पर्यंत मनात समाधान निर्माण झालेले असेल तो पर्यंत आणखी यश मिळवण्याची अपेक्षा तिथे जन्म घेत नाही. अशा अवस्थेत जर यशासाठी काम ही कर्म प्रेरणा त्यागून सृजनाच्या आनंदासाठी काम किंवा परमेश्वरी योजनेसाठी काम अशा कल्याणकारी कर्म प्रेरणा शोधल्या तर मनुष्य अतिशय निर्भय आणि निश्चिंतपणे आपले काम करू शकतो. अशा अवस्थेत अपयशाचे भय आणि कर्मसिद्धीची चिंता नसल्याने मन अतिशय एकाग्रपणे सृजन करते. या एकाग्रतेतून उत्तम दर्जाचे सृजन वेगात होऊ लागते. आपले काम आपल्याला चांगले जमते आहे हा विचार मनुष्याच्या मनात कामाचा उत्साह वाढवतो. या उत्साहातून कामात सातत्य साधले जाते. उत्तम दर्जाचे काम वेगात आणि सातत्याने होऊ लागले की कामाचा डोंगर उभा राहतो. त्यातून मनुष्याला असाधारण यश मिळते. अशा प्रकारे भूतकाळात मिळालेल्या यशाबद्दल समाधान असेल तर भविष्यकाळात असाधारण यश मिळते. या उलट भूतकाळात मिळालेल्या यशाबद्दल निर्माण झालेल्या असमाधानातून मोठ्या यशाची अपेक्षा, अपयशाची भिती, कर्मसिद्धीची चिंता, चित्तविक्षेप, कर्मनाश आणि अपयश निर्माण होते.

मनुष्य आयुष्यभर आनंदाच्या मागे धावत असतो. मनुष्याला दोन प्रकारचे आनंद मिळू शकतात.

१) यशाचा आनंद – यश मिळवण्याचा बाह्य आनंद (success pleasure)

२) समाधानाचा संतोष – मिळालेल्या गोष्टी पूर्णपणे स्वीकारल्याने समाधान उत्पन्न होऊन निर्माण झालेला आंतरिक आनंद. यालाच समाधानाचा संतोष किंवा Joy of contentment असे म्हणतात.

[समाधान = सम् (पूर्णपणे) + आधान (धारण करणे/स्वीकारणे)]

[संतोष = सम् (पूर्णपणे) + तुष् (तृप्त होणे)]

आता मनुष्याच्या मनात समाधान निर्माण होण्याच्या पायऱ्या आहेत. ते कसे निर्माण होते ते पाहू.

१) समाधान म्हणजे काय – 

मनुष्याच्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश आदीं गोष्टी मनुष्याने जशा आहेत तशा पूर्णपणे स्वीकारल्या तर मनात जी भावना निर्माण होते तिला समाधान असे म्हणतात. अशा प्रकारे पहिल्या पाहिरीत मनुष्याला समाधानाचे म्हणजे काय ते समजते.

२) समाधानाचे यशप्राप्ती मधील महत्व – 

यशाच्या बाह्य आनंदाच्या मागे लागल्यास ना यश मिळते ना यशाचा आनंद. कर्म मार्गात भय, चिंता आणि ताणाचे काटे पेरून ठेवलेले असतात आणि एकाग्रतेचा अभावामुळे कर्म मार्गाचा शेवट नेहमी अपयशात किंवा साधारण यशात होतो. यशाच्या मोठ्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर साधारण यश हे अपयशा समान वाटते. याउलट मनुष्य समाधानाच्या संतोष रुपी आंतरिक आनंदाच्या मागे लागल्यास त्यास समाधान, संतोष, तीव्र एकग्रता, असाधारण यश आणि अनपेक्षित असाधारण यशाचा मोठा आनंद मिळतो. मिळालेल्या गोष्टी पूर्णपणे स्वीकारल्याने समाधान शोधणे सध्या लहानपणापासून होणाऱ्या संस्काराच्या एकदम विरुद्ध आहे. त्यामुळे त्याचा स्वीकार सर्वांनाच जरा अवघड जातो.

– क्रमशः भाग दुसरा 

© डॉ गोपाळकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर, पाटिल हॉस्पिटल, सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मी रोज फक्त बटाटे उकडते…– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ मी रोज फक्त बटाटे उकडते… – लेखक :  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

पैसे कमवायला फार मोठ्ठ्या आयडियाची गरज नसते हे आता पुरतं लक्षात आलंय माझ्या..

झालं असं की पुण्याला मला एक ताई भेटल्या.

त्या म्हणाल्या “ तुम्ही रिटायर दिसताय.. “

मी म्हटलं “ हो, मी रिटायर झालेलो आहे “

मग मीही लगेच विचारलं “ तुम्ही काय करता? “

तर त्या म्हणाल्या “ मी रोज बटाटे उकडते! “

“बटाटे उकडणं हा काय व्यवसाय आहे? ” 

“ हो, तोच तर व्यवसाय आहे माझा? “ 

“ म्हणजे नेमकं काय? “ 

त्या म्हणाल्या “ अहो, आमच्या पिंपरी -चिंचवड भागात ३५०/४०० वडापावच्या गाड्या आहेत. मी बटाटे उकडते आणि कुस्करून पुरवते आणि यातल्या बर्‍याचशा गाड्यांना पुरवते. माझा दिवसाला १५०० किलोचा सप्लाय आहे. चार बायका माझ्याकडे काम करतात. सकाळी ४ ते ७ आणि दुपारी २ ते ५ अशा दोन शिफ्ट आहेत. वडापाव वाल्यांना बटाटे आणून, स्वच्छ करून, उकडून, सालं काढून, कुस्करणं ही डोकेदुखी वाटते. रस्त्यावर हे काम सहज होत नाही. दोन माणसं त्यातच गुंतून राहतात. गॅसच्या टाक्या आणाव्या लागतात. मी एकाच वेळी दोन टन बटाटे आणते -त्यात माझं एक होलसेल मार्जिन असतंय.

आणि वडापाव वाल्यांना कुस्करलेला बटाटा पुरवते ते दुसरं सर्विस मार्जिन … “

असं म्हणून त्या बोलायच्या थांबल्या..

मी अंदाजाने त्यांना विचारलं “ म्हणजे आणखी काही मार्जिन आहे का? ”

त्या म्हणाल्या “ हो, आहे ना.. मी पुरवते तो बटाटा उकडलेला म्हणजे ओला असतो. त्यातल्या पाण्याचे पैसे … आणि तेही बटाट्याच्या भावानेच विकलं जातं! नाही का? ”

– – मला एका सेकंदात कळलं की मी चाळीस वर्षं नोकरी केली कारण माझ्या डोक्यातच बटाटे भरले आहेत.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “डॉक्टर जयंत नारळीकर समजून घेताना…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “डॉक्टर जयंत नारळीकर समजून घेताना…” ☆ श्री जगदीश काबरे ☆  

‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’, असे म्हणतात ते जयंत नारळीकर यांच्या बाबतीत काही खोटे नव्हते. शालेय जीवनात त्यांचे गणित आणि विज्ञान अत्यंत उत्कृष्ट होते, तर त्यांना मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषांची आवड होती. कारण त्यांचे वडील गणितज्ञ होते, तर आई संस्कृत तज्ञ. त्यांच्या घरात त्यांना लहानपणापासून प्रश्न विचारण्यास मुभा दिली होती आणि उत्तरे शोधण्याचा प्रयत्न कसा करावा याचे दिग्दर्शन केले जात असे. त्यांचे संपूर्ण शालेय शिक्षण हिंदीतून झाले तरी त्यांना कुठल्याही न्यूनगंडाने ग्रासले नाही. (आजच्या काळात इंग्रजी माध्यमात मुलगा शिकला नाही तर तो मागे पडेल असे समजणाऱ्या पालकांसाठी हे महत्त्वाचे आहे. ) लहानपणापासूनच त्यांचे गणितज्ञ असलेले वडील रँगलर विष्णुपंत नारळीकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते वाटचाल करू लागले होते. उच्च शिक्षणासाठी केंब्रिजला गेल्यावर त्यांनी 1963 मध्ये पीएचडी प्राप्त केली. या काळात त्यांना स्मिथ पुरस्कार, ॲडम पुरस्कार आणि रँगलर ही पदवी तसेच खगोलशास्त्राचे टायसन पदक, असे अनेक सन्मान मिळाले.

डॉ. जयंत नारळीकर यांचा पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या निर्मितीला अंतराळातून आलेले जीवाणू कारणीभूत आहेत का, याचा शोध घेणारा वैज्ञानिक प्रयोग प्रचंड गाजला. “कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिएरी” अर्थात “स्थिर स्थिती सिद्धांत” हे त्यांचे विज्ञानातील महत्त्वाचे योगदान. हा सिद्धांत ‘फ्रेड हॉएल-नारळीकर सिद्धांत’ म्हणून जगभर ओळखला जातो. त्यांचे मराठी माणसासाठी असलेले आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी विज्ञानाला मराठी भाषेत सन्मान मिळवून दिला. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे देशातील अनेक तरुणांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होण्यास मदत झाली. त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी लोक अभूतपूर्व गर्दी करायचे. बव्हंशी अंधश्रद्धाळू असलेल्या भारतात एखाद्या शास्त्रज्ञाला अशी लोकप्रियता मिळणे हे खरोखरच आश्चर्याची बाब म्हणावी लागेल.

इंदिरा गांधी यांच्या सांगण्यावरून 1972 ला भारतात आले. मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) खगोलशास्त्र विभागात प्रमुख पद स्वीकारले. त्यानंतर त्यांनी वैज्ञानिक संशोधनाबरोबरच पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA / आयुका) सारख्या संस्थांच्या उभारणीत महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांमध्ये विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या विज्ञान कथा, कादंबऱ्या आणि वैज्ञानिक माहिती लिहिलेली पुस्तके मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली. विज्ञानासंबंधी वस्तुनिष्ठ मांडणीबरोबरच विज्ञानातील बुवाबाजी विरोधात त्यांची स्पष्ट भूमिका होती. त्यासाठी त्यांनी प्रसंगी काही जणांचा रोषही पत्करला. फलज्योतिष हे शास्त्र नसून थोतांड आहे किंवा फार तर त्याला समोरच्या माणसाच्या मनाचा ठाव घेत अंदाजपंचे केलेली भाकिते एवढेच महत्त्व द्यायला हवे, असे त्यांचे मत होते.

भारत सरकारचे पद्मभूषण, पद्मविभूषण हे पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा “महाराष्ट्र भूषण”, विज्ञानातील कामगिरीबद्दल शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार तसेच इतरही अनेक मानाचे पुरस्कार त्यांना लाभले. २०२१ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते‌. त्या निमित्ताने त्यांनी “आयुका”च्या आवारात “भवताल”ला खास मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी जीवसृष्टीची निर्मिती अंतराळातून आलेल्या जिवाणूंपासून झाली का, त्याबाबतचा प्रयोग, मातृभाषेतून शिक्षण, आपली शिक्षणपद्धती, विज्ञानाचा प्रसार, पर्यावरण, अवकाशातील कचरा अशा अनेक विषयांवर स्पष्टपणे मते मांडली होती.

सामाजिक भान सदैव जागृत असलेल्या जयंत नारळीकर यांची देव, धर्म आणि अंधश्रद्धा याविषयी अत्यंत स्पष्ट मते होती आणि ही मते नेहमी ते व्याख्यानातून आपल्या मृदू भाषेत ठामपणे मांडत. त्याची ही काही उदाहरणे…

१. “देव या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. “

२. “विज्ञानात प्रश्न विचारणं महत्त्वाचं असतं. धर्मात प्रश्न विचारायची मुभा नसते. “

३. “आपण आपल्या बुद्धीचा वापर न करता काही गोष्टी केवळ परंपरेने करत असतो. हे चुकीचं आहे. “

४. “मी विज्ञानप्रसारासाठी लिहितो कारण मला वाटतं की समाजात अंधश्रद्धा खूप आहे. “

५. “धर्म म्हणजे माणसाच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचं एक साधन आहे. “

अशा स्पष्टवक्त्या पण मृदूभाषी असलेल्या भारताचा नावलौकिक जगभरात पोहोचवणाऱ्या जयंत नारळीकरांनी निर्माण केलेली विज्ञान यात्रा त्यांच्या निधनानंतरही वारीसारखी पुढे चालत रहाणार. त्यांच्या तीनही कन्या या शास्त्रज्ञ असून नारळीकर घराण्याचा विज्ञानाच्या प्रगतीचा वारसा पुढे नेत आहेत.

त्यांचा जन्मदिवस १९ जुलै हा ‘राष्ट्रीय विज्ञानकथा दिन’ म्हणून संपन्न होत असतो.. देशात प्रत्येक पिढीत वैज्ञानिक निर्माण होत रहावेत, देशाची वैज्ञानिक क्षेत्रात प्रगतीची कायम घोडदौड व्हावी यासाठी जन्मभर कार्य करणाऱ्या या महान खगोल शास्त्रज्ञाचे वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगणारा समाज निर्माण करण्याचे ध्येय होते. त्या ध्येयाला अनुसरून जरी आपण प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगायचे ठरवले तर ती त्यांना खऱ्या अर्थाने वाहिलेली आदरांजली असेल.

©  श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ठेविले अनंते तैसेचि रहावे??? – भाग – १ ☆ डॉ गोपाळकृष्ण गावडे ☆

डॉ गोपाळकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆ ठेविले अनंते तैसेचि रहावे??? – भाग – १  ☆ डॉ गोपाळकृष्ण गावडे ☆

ठेविले अनंते तैसेचि रहावे? – हा कसला निराशावाद?

कसला निराशावादी आणि निष्क्रियता आणणारा विचार आहे हा! म्हणजे मनुष्याने कसली प्रगती करायचीच नाही की काय? तुकाराम महाराजांनी अभंग लिहला म्हणून काय झाले? त्यानुसार चालले तर संपूर्ण समाज आळशी होईल.

तुकाराम महाराजांच्या या अभंगावर समाजातील महत्त्वाकांक्षी लोकांमधून असा सूर उठताना दिसतो.

आजच्या इंजिनिअरला पहिली औद्योगिक क्रांती आणणाऱ्या वाफेच्या इंजिनची आकृती सुद्धा काढता येणार नाही. कारण निरोपयोगी ज्ञान लगेच नष्ट होते. तुकाराम महाराजांनी तिनशे वर्षांपूर्वी एका अभंगात लिहून ठेवलेले हे ज्ञान मनुष्य जातीसाठी इतके निरूपयोगी असताना अजून नष्ट कसे झाले नाही? मला मोठा प्रश्न पडे.

त्याची आज मिमांसा करू. आधी पूर्ण अभंग वाचू —- (गाथा – अभंग क्रमांक 1191)

*

हेचि थोर भक्ती आवडती देवा| 

संकल्पावी माया संसाराची ||

*

ठेविले अनंते तैसेचि रहावे| 

चित्ती असू द्यावे समाधान||

*

वहिल्या उद्वेग दुःखची केवळ| 

भोगणे ते फळ संचिताचे ||

*

तुका म्हणे घालू तयावर भार| 

वाहू हा संसार देवापायी ||

*

आता अर्थ समजून घेऊ.

हेचि थोर भक्ती आवडती देवा| 

संकल्पावी माया संसाराची ||

आधी संसार म्हणजे काय ते समजून घेऊ.

संसार म्हणजे ही जगत. प्रत्येक जीव आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी देणे घेणे व्यवहार करत असतो. या व्यवहाराद्वारे प्रत्येक जीव आपला निर्वाह करतो. ज्या वातावरण आणि परिस्थिती मध्ये जीवांचा जन्म, वावर, व्यवहार आणि मृत्यू होतो त्याला संसार असे म्हणतात. असे म्हणतात की हे संपूर्ण संसार ही मायेची उत्पत्ती आहे.

आता माया म्हणजे काय ते समजून घेऊ.

माया हे ईश्वरी शक्तीपासून निर्माण झालेले तत्व असून ते प्रत्येक जीवाच्या बुद्धीत अविद्या रूपी भ्रम निर्माण करते.

अविद्या रुपी भ्रम काय आहे? तो भ्रम कशा बाबतीत होतो?

जीवाच्या अस्तित्वाच्या नेमके स्वरूप समजून घेण्याच्या प्रक्रियेत हा भ्रम निर्माण केला जातो.

हे ब्रम्हांड एक ऊर्जेने भरलेल्या एका बिंदू मधून निर्माण झालेले आहे. म्हणून सर्व जगात ऊर्जमय आहे.

1) जड निर्जीव ऊर्जा – निर्जीव पदार्थांच्या अणू मध्ये वास करणारी ऊर्जा. अणू जरी वर वर पदार्थ (matter) भासत असला तरी अणू ज्या मूलभूत कणांपासून बनलेला आहे त्यांचे स्वरूप फक्त ऊर्जा आहे.

2) जड सजीव ऊर्जा – सजीव शरीरीतील अणू मध्ये वास करणारी ऊर्जा. शरीर हे एक जटिल मशीन आहे. उत्क्रांतीच्या हजारो वर्षांच्या काळात जीवांचे शरीर एक जटिल मशीन मध्ये बदलले आहे. तरी हे मशीन स्वतः चालू शकत नाही. त्याला कुणी तरी एक चालक लागतो. म्हणून या शरीर रुपी मशीनला जड (चालवली जाणारी) ऊर्जा असे म्हणतात.

3) चेतन ऊर्जा- सजीव शरीराच्या जन्म, स्थिती, मृत्यू आणि पुनर्जन्म यासाठी कारणीभूत असलेली ऊर्जा. ही ऊर्जा शरीर नावाच्या जटिल यंत्राला चालवते. म्हणून या ऊर्जेला चेतन ऊर्जा असे म्हणतात. या ऊर्जेला जीवात्मा असे म्हणतात.

सत् म्हणजे जी आपले स्वरूप कधीही बदलत नाही अशी स्थायी ऊर्जा. चेतन ऊर्जा कधीही आपले स्वरूप बदलत नाही. म्हणून चेतन ऊर्जा सत् ठरते. सत् अर्थात चेतन ऊर्जा हे प्रत्येक जीवाच्या अस्तित्वाचे स्थायी स्वरूप आहे.

जी ऊर्जा आपले स्वरूप सतत बदलत राहते तिला असत् असे म्हणतात. जड सजीव ऊर्जा अर्थात शरीर आणि जड निर्जीव ऊर्जा अर्थात पाच महाभूते यांच्या मध्ये सतत स्थित्यंतर होत असते. चेतन ऊर्जेच्या प्रभावाखाली पंच महाभूते एकत्र येऊन शरीर नावाचे जटिल यंत्र निर्माण करतात. चेतन ऊर्जेने शरीर या जड सजीव ऊर्जेची साथ सोडली म्हणजे शरीर मृत होते. मृत शरीर अल्पावधीत विघटित होऊन परत पंच तत्वात सामील होते. अशा प्रकारे शरीर असत् ठरते.

शरीर असत् असले तरी ते व्यक्त स्वरूपात असते. सत् आत्मा मनुष्य बुद्धीला अनुभवायला मिळत नाही. त्यामुळे आत्मा ही केवळ कल्पना असून शरीर हेच माझ्या अस्तित्वाचे खरे स्वरूप आहे असे भ्रम निर्माण होतो. बुद्धीने स्वीकारलेले अनुभवसिद्ध सत्य ज्ञान म्हणजे विद्या. स्वतःच्या अस्तित्वाचे खरे स्वरूप (आत्मा) बुद्धीला मान्य असणे म्हणजे विद्या.

स्वतःच्या अस्तित्वाचे खरे स्वरूप बुद्धीला मान्य नसणे आणि त्या ऐवजी भलत्याच तत्वात (शरीरा) स्वत्व शोधणे या प्रकाराला अविद्या असे म्हणतात.

स्वतःच्या अस्तित्वाचे खरे स्वरूप समजून घेताना परमेश्वरी शक्ती प्रमाणांचे मायाजाल मांडून मनुष्य बुद्धीला भ्रमित करते. असा भ्रमित मनुष्य अविदया स्विकारून शरीरामध्ये आत्मभाव ठेवायला लागतो. जीवाच्या बुद्धीने शरीरात आत्मभाव शोधला की शरीराच्या गरजा म्हणजे शरीराचे संवर्धन (पालन, पोषण, रक्षण) आणि प्रजनन याची जबाबदारी मनुष्यावर पडते. शरीरा संवर्धन आणि प्रजनन करण्याची प्रकृती मनुष्यामध्ये निर्माण होते. प्रत्येक जीवाच्या हातून शरीर संवर्धन आणि प्रजनन यासारख्या मूलभूत गोष्टी घडल्या तर प्रजातीचे संवर्धन होते. मनुष्य सोडून इतर प्राण्यांमध्ये बुद्धीचा विकास फारसा झालेला नसल्यामुळे ते अविद्येला सहज बळी पडतात आणि आपल्या अल्पमतीप्रमाणे शरीरामध्येच आत्मभाव ठेवतात. मनुष्य जन्मात बुद्धीचा विकास झालेला असल्यामुळे विचारांचे स्वातंत्र्य येते आणि ही अविद्या दूर करण्याची संधी मिळते. पण मायेच्या प्रभावामुळे बहुतेक मनुष्यांच्या आयुष्यातून ही संधी चुकते.

मायेच्या प्रभावाखालील मनुष्यबुद्धी शरीरामध्ये आत्मभाव ठेवते. विकसित झालेली मनुष्यबद्धी विविध गोष्टींचे संकलन करून शरीर संगोपन आणि प्रजनन सोपे करण्याची धडपड करत राहते. किंबहुना उत्क्रांतीच्या काळात मनुष्य बुद्धीचा विकासच संकलनासाठी झालेला आहे. आज मनुष्य बुद्धीचा उपयोग करून सत्ता, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा, आरोग्य आणि नातेसंबंधांचे संकलन करतो. मनुष्यबुद्धी सत्ता, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा, आरोग्य आणि नातेसंबंधांचे संकलन करताना काही रोल अथवा भूमिका स्वीकारते. मनुष्य निभावत असलेल्या प्रत्येक भूमिकेची त्याच्या मनात एक प्रतिमा निर्माण होते. या प्रतिमेच्या आकारालाच अहं आकार अर्थात अहंकार असे म्हटले जाते. मायेच्या भ्रमातून निर्माण होणाऱ्या अविद्येच्या प्रभावाखाली असलेली मनुष्यबुद्धी हळूहळू या बाह्य अहंकारातही आत्मभाव शोधू लागते. अशा प्रकारे शरीराच्या निर्वाहासाठी चाललेल्या धडपडीतून अहंकार निर्माण होतात. मनुष्य आपले प्रकृतीदत्त आणि बुद्धीदत्त कर्तव्य करताना शरीर आणि इतर बाह्य अहंकारात आत्मभाव ठेऊन जगाशी देवाण-घेवाण व्यवहार करत असतो. त्यातून त्याच्या भोवती जे विश्व निर्माण होते त्यालाच संसार असे म्हटले आहे. मनुष्य स्वतःचे खरे अस्तित्व विसरून नातेसंबंध किंवा व्यावसायिक भूमिकेतून निर्माण झालेले अहंकार हेच आपण आहोत असे मानू लागते. अशा बाह्य अहंकारामध्ये आत्मभाव निर्माण झाल्यास त्या अहंकारातून निर्माण होणाऱ्या अपेक्षा आणि कर्तव्य पूर्ण करण्याची जबाबदारी मनुष्यावर येऊन पडते. नातेसंबंध किंवा व्यावसायिक भूमिकेतून निर्माण झालेले बाह्य अहंकार तर शरीरापेक्षाही कमी वेळ टिकत असल्याने ते तर पूर्णतः असत् असतात.

परमेश्वरी शक्तीच्या मायेतून अविद्या जन्माला येते. जीवाच्या अस्तित्वाचे खरे स्वरूप सत् अर्थात अनादी-अनंत आत्मा असते. पण मायेमुळे मनुष्य बुद्धी असत् ला सत् मानू लागते. असे अज्ञान स्वीकारणे हिच ती बुद्धीची अविद्या.

शिव आणि शक्ती मिळून अर्धनारी नटेश्वर परमेश्वर तयार होतो. शिव-शक्ती परम आत्मा असून जगत त्यांचे भौतिक शरीर आहे. शिव मध्ये सृष्टीच्या निर्वाहाचे संपूर्ण ज्ञान असूनही तो निसर्ग असतो. शिवाची शक्ती शिवाच्या त्या ज्ञानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून सृष्टीचा निर्वाह चालवणारी क्रियाशील ऊर्जा असते. अशा प्रकारे शक्ती परमेश्वरी शरीराचा निर्वाह चालवते. या परमेश्वरी शरीराच्या निर्वाहासाठी या शरीरात म्हणजे सृष्टीत सतत सृजन, स्थिती आणि नाश चालू असतो. ज्या गोष्टी जीर्ण होऊन नष्ट झालेल्या असतात त्यांच्या जागी नवीन गोष्टी जन्म घेत असतात. पण ऊर्जेच्या संवर्धनाच्या नियमानुसार कुठलीही ऊर्जा नष्ट करणे शक्य नसल्याने गोष्टींचा जन्म, स्थिती आणि मृत्यू म्हणजे केवळ ऊर्जेचे स्थित्यंतर असते. गरजेनुसार जन्म, स्थिती आणि नाश करण्याची जबाबदारी शक्तीवर असते. शक्ती जीवांच्या माध्यमातून हे काम करून घेते. जीवांनी आपल्या अस्तित्वाचे खरे स्वरूप विसरून शक्तिच्या या कामासाठी स्वतःला झोकुन द्यावे यासाठी शक्ती मायेचा निर्माण करते. जर सामान्य जीवाने शरीर आणि इतर अहंकारात आत्मभाव शोधला नाही तर शरीर संगोपण, प्रजनन आणि यश संकलन सारखे कार्य करण्यात उदासीनता निर्माण होते. तसे झाल्यास त्या जीवाच्या शरीराचा, त्या प्रजातीचा आणि पर्यायाने सृष्टीचा निर्वाह होणे अवघड होईल. म्हणून परमेश्वरी शक्तीने माया निर्माण केली गेली. सर्व जीवनामध्ये केवळ मनुष्य आपल्या विकसित बुद्धीने हे मायाजाल समजून घेऊन त्याच्या वर उठू शकतो.

प्रत्येक प्रजाती ही शक्तीचे सृजन असून ते ठराविक काळ टिकणे तिच्यासाठी आवश्यक असते. त्यासाठी प्रत्येक जीवाने शरीर संगोपण आणि प्रजनन करणे आवश्यक असते. जीवाला तशी प्रेरणा मिळत रहावी म्हणून माया जीवाच्या बुद्धीत अविद्या निर्माण करते. मग प्रत्येक जीवाच्या बुद्धीला शरीर आणि अन्य बाह्य अहंकार म्हणजेच मी स्वतः आहे असे वाटू लागते. मग ती बुद्धी स्वतःचे (शरीर आणि इतर बाह्य अहंकारांचे) अस्तित्व टिकवण्यासाठी शरीर संगोपण आणि प्रजननाचे मुलभुत कार्य तसेच यश संकलनाचे वाढीव कार्य करू लागते. त्यातून जीवाचे आणि पर्यायाने प्रजातीचे संवर्धन होते.

अशा प्रकारे माया संसाराच्या निर्वाहासाठी आवश्यक असल्याने तिचा पूर्णतः त्याग करणे शक्य नाही. पण तिच्या निर्मितीच्या उद्देशाकडे तटस्थपणे पाहत मनुष्याने स्वतःला तिच्या वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करावा. शरीरात आत्मभाव जरी ठेवला नाही तरी शरीराचा निर्वाह संसाराच्या निर्वाहासाठी गरजेचा आहे याचे भान ठेऊन भ्रमात राहून नव्हे तर जागरूक राहून शरीर संगोपन करावे. परमेश्वरावर भक्ती ठेऊन परमेश्वराचे सृजन टिकवण्यासाठी जबाबदारी म्हणून शरीर संगोपन करावे. शरीर संगोपन सोपे व्हावे आणि योगमार्गला प्रतिष्ठा मिळावी म्हणून यश संकलन सुद्धा करावे. जगरहाटी चालवण्यासाठी परमेश्वराची माया उपयुक्त आहे असे मानणारे भक्त परमेश्वराला आवडतात.

ठेविले अनंते तैसेचि रहावे| 

चित्ती असू द्यावे समाधान||

मायेच्या प्रभावाने सर्व जीव शरीर या अहंकारात म्हणजे असत् मध्ये आत्मभाव ठेवतात. मग जीवनामध्ये शरीर संगोपन आणि प्रजनन करणारी प्रकृती निर्माण होते. या प्रकृतीच्या प्रभावाने असा जीव स्वतःच्या म्हणजे या शरीराच्या गरजा पुर्ण करण्यासाठी धडपड करतो. शरीराचे पालन, पोषण, रक्षण आणि प्रजनन अशा प्रकृतीदत्त कर्तव्य करण्याच्या बदल्यात प्रकृती जीवाच्या आदिम मेंदू (lymbic system) मध्ये अशी संप्रेरके तयार करते की जीवाला अशा कृतीतून सुख मिळू लागतो. अन्न, पाणी, निवारा, शरीरसंबंध या क्रियांमधून मिळणारा हाच तो आनंद आहे. या प्रकृतीदत्त कर्तव्याच्या विरुद्ध वर्तन केल्यास जीवाच्या मनात आधी अनुभवलेले हे सुख मिळवण्यासाठी व्याकुळता निर्माण होते. त्यामुळे कुठलाही जीव अन्न, पाणी, निवारा, शरीरसंबंध यापासून फार काळ लांब राहू शकत नाही. या प्रकृतीदत्त कर्तव्याची वेळोवेळी पूर्ती झाल्याने जीवाचे शरीर संगोपन आणि प्रजनन होते. प्रजातीच्या सर्व जीवांनी असे प्रकृत्तीदत्त कर्तव्यपूर्ती केल्यामुळे प्रजातीचे संवर्धन होते.

मनुष्य सोडून इतर प्रत्येक जीव केवळ प्रकृतीच्या शरीर संगोपण आणि प्रजनन या दोन नियमांनी बांधलेला आहे. पण उत्क्रांतीच्या काळात मनुष्य प्राण्यांमध्ये बुद्धीचा विकास झाला. त्यामुळे मनुष्याला प्रकृती सोबत बुद्धीच्या अधीन राहून काम करावे लागते. आता हे बुद्धी काय प्रकरण आहे ते पाहू.

मनुष्यप्राण्याच्या उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात मनुष्याचा व्यवहार सुद्धा इतर प्राण्यांप्रमाणे शरीर संगोपन आणि प्रजनन करणाऱ्या प्रकृतीदत्त इच्छेने (lymbic system) नियंत्रित होत असे. या लिम्बिक सिस्टीम मध्येच शरीराचे पालन, पोषण, रक्षण आणि प्रजनन करण्याची मूलभूत अंत:प्रेरणा निर्माण होते. ही लिम्बिक सिस्टीम मनुष्य प्राण्यामध्येही असते. उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळातच मनुष्य प्राण्याला जाणवले की शरीर संगोपन आणि प्रजननासाठी पूरक गोष्टींचे संकलन करून ठेवले तर हे प्रकृतीदत्त कार्य सोपे होते. मग गोष्टींचे संकलन करण्यासाठी आवश्यक असा विचार करू शकणारा मेंदूचा भाग हळूहळू विकसित होऊ लागला. या भागाला आम्ही डॉक्टर नियोकॉर्टेक्स (Neocortex) असे म्हणतो. या भागामुळे परिस्थितीचे पूर्ण आकलन करून संकलनासाठी योग्य निर्णय घेण्याची क्षमता मनुष्यामध्ये निर्माण झाली. या क्षमतेला बुद्धी असे म्हटले गेले. मनुष्यामध्ये बुद्धीचे मुख्य कार्य प्रकृतीदत्त कर्तव्य सोपे व्हावे म्हणून गोष्टींचे संकलन करणे आहे.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ गोपाळकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर, पाटिल हॉस्पिटल, सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘‘डॉ. जयंत नारळीकर…… अत्यंत साध्या जगण्याची गोष्ट!’’ – लेखिका : सुश्री कल्याणी गाडगीळ ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी  ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘‘डॉ. जयंत नारळीकर…… अत्यंत साध्या जगण्याची गोष्ट!’’ – लेखिका : सुश्री कल्याणी गाडगीळ ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

आकाशगंगा या आयुकाच्या (म्हणजे Inter University Centre for Astronomy and Astrophysics – IUCAA) हाउसिंग कॉलनीमध्ये राहायला गेले तेव्हा डॉ. जयंत नारळीकर व सौ. मंगला नारळीकर यांच्या समोरचेच घर माझ्या भाग्याने मला मिळाले. असा दुर्मिळ शेजार आम्हाला लाभला होता. डॉ. नारळीकरांची एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी म्हणून सुमारे दहा वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांचे शेजारी म्हणून राहण्याचीही. सरांचे नाव आणि कीर्ती इतकी मोठी की नव्याने कामाला सुरुवात केली तेव्हा त्याचे दडपणच मनावर अधिक होते. पण सर वागायला इतके साधे की कित्येकदा त्यावर विश्वासच बसत नसे.

ऑफिसमध्ये ते वेळेआधी दहा मिनिटे पोहचलेले असत. घड्याळाच्या काट्याबरहुकूम मेल पहाणे, मेलला उत्तरे म्हणून डिक्टेशन, पत्रे टाइप झाली की सह्या, रोज कोणत्यावेळी कोण येणार यासंबंधीचा दिवसाचा आराखडा त्यांच्यासमोर दिला जाई. त्यानुसार ते त्या त्या संबंधीचे कागदपत्र मागवून स्वत:जवळ ठेवून घेत.

सरांच्या भेटीला येणार्‍या लोकांमध्ये देशोदेशीचे शास्त्रज्ञ, सरकारी अधिकारी, विद्यापीठातील मान्यवर, देशी- परदेशी विद्यार्थी, त्यांच्या हाताखाली शिकणारे विद्यार्थी, आयुकातील अधिकारी यांच्याबरोबरच खेडेगावातून आलेले विद्यार्थी व त्यांचे पालक अशी विविधता असे. पण सर्वाना सारख्याच सन्मानाने वागविले जाई.

एकदा एका खेडेगावातल्या विद्यार्थ्याला भेटायला पाच मिनिटे उशीर झाल्याने अस्वस्थ होऊन एक एक पायरी गाळून भराभर वर आलेले सर मला अजून आठवतात.

विविध वर्तमानपत्रे, मासिके इत्यादि ठिकाणी त्यांचे लेख छापून येत. त्यांनी लेख देण्याचे कबूल केले की ठरलेल्या तारखेच्या आधी सुमारे 15 दिवस लेख पूर्ण झालेला असे व तो हस्तलिखित लेख पाठविण्यासाठी मजकडे येई. अक्षर इतके सुंदर आणि लेखात एकाही ठिकाणी – अक्षरश: एकाही ठिकाणी- कधीही खाडाखोड नसे. खरे तर कित्येकदा वाटे लेख मराठी असो वा इंग्रजी – टाइप करण्याऐवजी त्यांच्या अक्षरातच छापावा!

उत्तरे डिक्टेट करताना त्यांचे बारकाव्यांकडे असलेले लक्ष मला चकित करीत असे. एकदा त्यांनी मला सांगितले कोणताही शब्द संक्षिप्त स्वरूपात वापरण्यासंबंधीचा एक नियम आहे. उदा. Professor या शब्दाचे संक्षिप्त रूप Prof. करताना त्याच्यापुढे पूर्णविराम दिलाच पाहिजे कारण त्या संक्षिप्त रूपात त्या शब्दाची पहिली काही अक्षरेच घेतली आहेत; पण Doctor या शब्दाचे संक्षिप्त रूप Dr करताना पुढे पूर्ण विरामाची गरज नसते कारण त्यात Doctor या शब्दातील पहिले D शेवटचे r हे अक्षर वापरलेले आहे. हे मी शाळेत किंवा पुढे विद्यापीठातही कधीच शिकले नव्हते.

सरांना कामासाठी देशी-विदेशी दौरे करावे लागत. त्यावेळी त्यांचे संपूर्ण वेळापत्रक तारखेनुसार व त्या त्या दिवसाच्या वेळेनुसार टाइप केले जात असे. त्यातही त्यांनी केलेली एक अप्रतिम सोयीची गोष्ट विसरणे केवळ अशक्य. जिथे जिथे भेट ठरलेली आहे त्या त्या संस्थेचा पत्ता, फोन क्रमांक, इ-मेल पत्ता, गावाचे पूर्ण नाव व पिनकोड तसेच ज्या व्यक्तीला भेटायचे आहे त्या व्यक्तीचेही पूर्ण नाव, अधिकारपद, कार्यालयाचा तसेच असल्यास घरचा फोन क्रमांक, इ-मेल इत्यादी गोष्टी टाइप करून ते सर्व कागद एका आकारात कापून त्याला जरासे जाड कागदाचे कव्हर करून त्याचे शर्टाच्या खिशात किंवा पाकिटात सहजपणे मावेल अशा आकाराचे लहानसे पुस्तक त्यांनी मला करायला सांगितले होते. त्याची नंतर सवयच होऊन गेली. कोणताही पत्ता, फोन शोधण्यात विलंब लागू नये म्हणून ही खबरदारी. गंमत म्हणजे ते प्रवासाहून परत आले की पत्त्याच्या संदर्भातील काही बदल असेल तर त्यांच्या छोटेखानी पुस्तकात तो टिपलेला असे व त्यामुळे माझ्याजवळ असलेल्या पत्त्यात त्यानुसार बदल करणेही सोपे जाई व सर्व माहिती अद्ययावत राहात असे.

प्रवासाच्या वेळी कधी विमान किंवा ट्रेन उशिरा निघणार आहे म्हटले तर सर त्यांच्याकडे असलेल्या पोस्टकार्डावर किंवा आंतर्देशीय पत्रांवर त्यांना आलेल्या विद्यार्थ्याच्या प्रश्नांना उत्तरे लिहायला सुरुवात करीत.

विद्यार्थी सरांना भेटले की त्यांची स्वाक्षरी मागत. सर त्यांना सांगत ” नुसती सही देण्यापेक्षा तुम्ही पत्राने एखादा प्रश्न विचारा. त्याचे उत्तर मी तुम्हाला पाठवीन आणि त्यावर माझी सही असेल ” हा शास्त्रशुद्ध विचारांचे बीज लहानपणापासून रुजविण्या संदर्भात केलेला सततचा आग्रहच!

आयुकासारख्या संस्थेचे डायरेक्टर म्हणून काम करणे, सकाळी दणकून टेनिस खेळणे, शिकविणे, विविध ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून जाणे, स्वत:ची पुस्तके लिहिणे, लेख लिहिणे, मराठी विज्ञान परिषदेचे काम पहाणे, समाजात विज्ञानदृष्टी यावी यासाठीचे अव्याहत प्रयत्न, – पंचमहाभूते – यांसारख्या विषयावर आयुकात शिबिर घेणे, व्याख्याने देणे. सतत इतके बिझी असूनही सर कधी ‘ओव्हर टाइम’ करत ऑफिसात थांबल्याचे मला आठवतच नाही. क्वचित कधी इतर आलेल्या अधिकार्‍यांमुळे विलंब झाला तरच!

आयुकामध्ये असताना आमच्या ‘आकाशगंगे’त होळी, दिवाळी असे सण साजरे होत. सरांना गुलाल माखताना संकोचल्यासारखे होई पण ते मात्र एकदम शांतपणे उभे रहात असत. दिवाळीचे जेवण आयुकाच्या कॅण्टीनमधून तयार होऊन येई. पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच ते असल्यामुळे ताटे-वाटी-पेले ज्याचे त्याचे घरून आणणे आवश्यक होई. कारण भांडी धुवायला कॅण्टीनमधली मुले नसत. 8 वाजता जेवणाची वेळ ठरलेली असेल तर 8ला पाच कमी असतानाच सर हातात ताट-वाटी घेऊन इतर सर्वासारखे हजर.

आयुकात काम करणार्‍या लोकांच्या व्यक्तिगत छंदांविषयीसुद्धा ते जागरूक असत. त्यांना देशोदेशीहून येणार्‍या पत्रांवर परदेशी तिकिटे असत. त्यातील तिकिटे ते न विसरता कापून आणून माझ्याकडे देत व ‘अमुक अमुक व्यक्तीला हे द्या’ असे आवर्जून सांगत. एखाद्याचे एखाद्या वाचनासंबंधीचे वेड त्यांना ठाऊक असे व त्यासंबंधी काही लेख, माहिती आल्यास ते ती त्या व्यक्तीपर्यंत न विसरता पोहचवीत.

एकदा त्यांच्या घरी निरोप सांगायला गेले तेव्हा सर किंवा मंगलाताई दोघेही घरी नव्हते. सरांच्या सासूबाई स्वयंपाकघरात होत्या. त्यांच्याकडे निरोप दिला. तेव्हा त्या भांडी जागेवर लावण्यात गुंतल्या होत्या. मला म्हणाल्या, ‘पाहिलीत का आमच्या जावईबापूंची करामत? ’ म्हटले, ‘काय झाले? ’ तर त्या म्हणाल्या, ‘काल आमच्या घरी 15-20 माणसे जेवायला होती. सरांना कामानिमित्त बाहेर जावे लागल्यामुळे त्यांना मंगलाला कोणतीच मदत करता आली नाही. म्हणून रात्री जेवणे उरकल्यानंतर त्यांनी ही सगळी काचेची नाजूक भांडी, प्लेट्स धुवून ठेवली आहेत. ’ ‘एल’ आकाराच्या दोन ओट्यावर केवढी मोठी भांडी, प्लेट्स इत्यादी धुवून ठेवलेली होती! आपला कामाचा वाटा चुकवू नये हे त्यांच्या रक्तातच भिनलेले! आपला कामाचा काही वाटा घरकामातही असतो हे मन:पूर्वक मानणारे सरांसारखे किती मान्यवर पुरुष तुम्हाला भेटतील?

सरांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांना कोणतीही शंका – अगदी कोणतीही शंका विचारली तर त्यासंबंधी उपहास न करता ते अत्यंत सोप्या पद्धतीने त्याचे उत्तर देत. गणपतीने म्हणजे गणेशमूर्तीने दूध प्यायल्याची अफवा देशभर पसरली होती तेव्हाचा प्रसंग. सरांना यासंबंधी प्रश्न विचारण्यासाठी आयुकामध्ये एकावर एक फोन येऊ लागले. शेवटी सरांनी मूर्तीच्या सोंडेने प्रत्यक्ष दूध कसे खेचले जाऊ शकते यासंबंधीची शास्त्रोक्त माहिती सांगणारे छोटेखानी भाषण केले व ते लोकांर्पयत पोचवले. वैज्ञानिक विचारांचा अखंड पाठपुरावा जणू रक्तात भिनलेला!

आयुकाच्या इमारतीचे बांधकाम चालू असताना आयुकाच्या आवारात न्यूटन, आइनस्टाइन, आर्यभट्ट, गॅलिलिओ इत्यादी पुतळे ठेवण्यात आले. फूको पेंडय़ूलम (foucault pendulum) सौरघड्याळ इत्यादी शास्त्रीय माहिती देणारी उपकरणेही ठेवली गेली. अनेक विद्यार्थ्याच्या ज्ञानात या गोष्टी पाहण्यानेसुद्धा भर पडते. या सर्वांमध्ये सरांनी दाखवलेली खरी रसिकता म्हणजे आयुकाच्या कॅण्टीनमध्ये लावलेला एक बोर्ड – ‘The discovery of a new dish does more for human happiness than the discovery of a star! ’ – by Brillat Savarin – हे ते वाक्य, जीवनाबाबतीतले सत्य सांगणारे!

कॅण्टीनमध्ये लावण्यासाठी हे वाक्य निवडणारा माणूस स्वत: आंतरराष्ट्रीय ख्यातीचा शास्त्रज्ञ आहे, हे विशेष!

अंतराळ विज्ञानातल्या सरांच्या अजोड कामगिरी खेरीजचे हे किती विविध गुण!

माणसे मोठी होतात ती उगीच नाही!!

लेखिका : सुश्री कल्याणी गाडगीळ

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ We are extremely sorry, officer! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

☆ We are extremely sorry, officer! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

लेफ्टनंट किरण शेखावत madam, जय हिंद!

 खरं तर to be sorry म्हणजे एखाद्या घटनेबद्दल, गोष्टीबद्दल मनातून वाईट वाटणे, दिलगीर वाटणे, सहानुभूती वाटणे इत्यादी अर्थ असतो. Sorry म्हणणे म्हणजे माफ करा असा अर्थ अजिबात होत नाही. त्यासाठी to beg (somebody’s) pardon, to apologise अशी क्रियापदे आहेत! म्हणून किरण madam, we beg your pardon!

 तुम्ही या आपल्या प्राणप्रिय हिंदुस्तान देशासाठी प्राणार्पण करून आज मितीला सुमारे दहा वर्षे आणि दोनेक महिने झाले आहेत. काल अचानक तुम्ही हुतात्मा झाल्याच्या फेसबुक पोस्ट्स मोठ्या संख्येने दिसू लागल्या! आपल्याकडे एकतर प्रत्यक्ष युद्धात (म्हणजे आजपर्यंत सुरु असलेल्या युद्धासारख्या) सैनिक मृत्यू पावल्याशिवाय त्याला फारसे महत्त्व देण्याची सर्वसाधारण पद्धत नाही. काही लोक हुतात्मा सैनिक, त्यांचे कुटुंबीय यांचेविषयी, संबंधित सैनिकाच्या बलिदान दिवशी काही लिहित असतात, हे ही खरे आहे.. पण हे प्रमाण अत्यल्प म्हणावे इतके थोडे आहे! असो.

त्यामुळे काल आणि आज तुमचे फोटो आणि तुम्हांला वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजलीच्या फेसबुक पोस्ट्स दिसल्या तेंव्हा लगेच तुमच्या बलिदानाची तारीख पाहिली… २५ मार्च २०१५! शिवाय तुमचा जन्मदिन सुद्धा १ मे रोजीच होऊन गेला होता!

भारतीय नौसेनेत कर्तव्यावर असताना मृत्यू पावलेल्या तुम्ही पहिल्या महिला सैनिक अधिकारी ठरल्याचे त्यावेळी मुद्दाम नमूद करण्यात आले होते, हे आठवले! २०१५ मध्ये सोशल मिडिया आजच्या इतका फैलावलेला आणि मुख्य म्हणजे पैसे देणारा नसावा… म्हणून तुमची ही बातमी देशभर फारशी चर्चिली गेली नसावी!

पण या वर्षी ऑपरेशन सिंदूर दरम्यान अचानक तुमचे छायाचित्र आणि तुमच्या हौतात्म्याची बातमी दिसू लागली. उगम कुठे झाला हे नाही समजले.. पण अनेक देशप्रेमी नागरीकांनी ही बातमी शेअर केली, हजारो लोकांनी comments केल्या… संपूर्ण देशभरात अशा हजारो पोस्ट्स प्रसिद्ध झाल्या असतील! पण या कुठल्याही पोस्ट मध्ये तुमचे बलिदान २०१५ मध्ये झाल्याचा उल्लेख नाही. काही comments कर्त्यांनी या बाबीचा उल्लेख केला.. पण त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले गेले. अनेक लोकांनी वरची comment आहे तशी copy करून paste केली आणि इतरांच्या comments त्यांनी वाचल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली नाही! ऑपरेशन सिंदूर मध्येच हे बलिदान झाल्याचा समज झाल्या असण्याची दाट शक्यता आहे!

तुमच्या बलिदानाविषयी कुणी पोस्ट करत असेल, तर त्याला आक्षेप घेण्याचे काहीही कारण नाही! परंतु सध्याच्या गंभीर परिस्थितीत २०१५ मध्ये झालेल्या दुर्घटनेबाबत संदिग्ध पोस्ट करण्यामागे सरळ उद्देश असण्याबाबत शंका घेण्यास वाव आहे! पोस्ट वर जितक्या comments, जितके shares तितका पोस्ट करणा-यास followers, आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता अधिक हे आता लोकांना ठाऊक झालेले आहे… तुमचे बलिदान वापरून जर अशा पोस्ट केल्या असतील तर, यासारखे दुर्दैव आणि हरामखोरी दुसरी नसावी!

Madam, तुमचे पती सुद्धा नौसेनेतच अधिकारी आहेत. त्यादिवशी तुम्ही डॉर्नियर जातीच्या विमानात Flight Observer म्हणून उड्डाण केले होते… आणि हे एक प्रशिक्षण उड्डाण होते. तुमच्यासोबत लेफ्ट. अभिनव नागोरी साहेब आणि कमांडर निखील जोशी साहेबही होते. तुम्ही मुळच्या राजस्थानी, पण जन्म मुंबईतला. वडील सुद्धा नौसेनेत असल्याने तुम्ही त्यांच्या नेमणुकीच्या शहरात अर्थात विशाखापट्टनम मध्ये शास्त्र शाखेची पदवी मिळवून नंतर तुम्ही काही काळ एका बँकेत नोकरी केली आणि पुढे २०१० मध्ये भारतीय नौसेनेत दाखल झालात… लेफ्टनंट बनलात. Intelligence Warfare अर्थात हेरगिरीवर आधारीत/हेरगिरी विरोधी युद्धकौशल्यात तुम्ही निपुण होतात. २०१५ मध्ये प्रजासत्ताक दिनी केवळ महिलांचा समावेश असलेल्या पहिल्याच सैनिकी पथकात तुम्ही शानदार संचलनही करण्याचा मान मिळवला होता. तुमचे ते विमान दुर्घटनाग्रस्त झाले… समुद्रात कोसळले… लेफ्ट. नागोरी साहेब आणि तुम्ही मृत्युमुखी पडलात… कमांडर जोशी साहेबांना समुद्रातील मच्छिमारांनी वाचवले. तुमचा मृतदेह मात्र खोल समुद्रात विमानाच्या अवशेषांमध्ये सापडला. तुमच्या बलिदानाला सल्यूट! तुमच्या विषयीची पोस्ट अशा प्रकारे आणि ती देखील आजच्या परिस्थितीमध्ये केवळ विशिष्ट हेतूसाठी वापरली जाणे, हे खूप चुकीचे आहे. याबद्दल आम्ही तुमची क्षमा मागतो…! (यामुळे तुमच्याविषयी अधिक लोकांना समजले हे खरे असले तरी तुमच्या बलिदानाची सविस्तर माहितीही या अधिकच्या लोकांना समजणे गरजेचे होते!)

गेल्या काही दिवसांत सोशल मिडीयावर नतद्रष्ट आणि अतिउत्साही लोकांनी Artificial Intelligence च्या साहाय्याने बनवलेले विडीओस ‘टाकून’ काय मिळवलं असेल ते सांगण्याची गरज नाही. तिकडे पाकिस्तानात सुद्धा असाच digital खेळ सुरूच आहे. हे झाले सामान्य लोकांच्या सोशल मिडीयाच्या वापराचे. राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांचा तर full season सुरु असल्याचे चिन्ह आहे. काही वाहिन्या उत्तम काम करताना दिसतात, मात्र त्यांनाही स्फोटक, रोमांचकारी वातावरण निर्माण करण्यावाचून राहवत नाही. एखादी ब्रेकिंग न्यूज दाखवण्याआधी सायरनचा आवाज ऐकवण्याची काय गरज? आणि बातमी ती काय? … अमकी अमकी बैठक सुरु होणार आहे! म्हणजे कुठेही जाऊ नका.. आमचे(च) channel पाहत रहा.. असा आग्रह! अनेक वाहिन्या आज तक असेच करीत आलेल्या आहेत, नको तेवढे एक पाऊल पुढे जात आहेत, प्रेक्षकांना नको एवढे डोळे उघडे ठेवायला भाग पाडत आहेत. यापेक्षा आकाशवाणी, वर्तमानपत्रे यांचा जमाना बरा होता, असे म्हणायची वेळ आली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे memes, विनोदी वाक्यरचना करणा-या ‘सर्जनशील’ लोकांना तर ऊत आलेला आहे. आय. पी. एल. सामना पहिल्यासारखी काहींची त-हा आहे. फटाके वाजवले तर लोकांमध्ये विनाकारण घबराट निर्माण होऊ शकते, हा साधा विचारही लोकांच्या मेंदूत येत नाही. यासाठी पोलिसांना आदेश जारी करावे लागतात… आपण कसे लढणार आहोत शत्रूशी? असे?

(पाकिस्तानी सैन्य आणि अतिरेकी संघटना तिथल्या सरकारचे ऐकत नाही, हे आताच (पुन्हा एकदा) सिद्ध झाले आहे. रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग यापुढे भारतापुढे असणार आहे… हे वास्तव आहे. म्हणून सामान्य लोकांनी जबाबदारी ओळखून वागणे हिताचे आहे!)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares