गेले काही दिवस पुण्यामध्ये छान पाऊस सुरू आहे. मधेच कधी पाऊस थांबतो, छान ऊन पडतं आणि पुन्हा बारीक पाऊस सुरू होतो.
आणि बऱ्याच वेळेला पुण्यामधल्याच मित्र-मैत्रिणीशी फोन करताना असं समजतं की त्यांच्या भागात पाऊस सुरू आहे आणि आपल्याकडे ऊन असतं.
काल रविवार होता. सकाळी अगदी बारीक पाऊस सुरू होता. सकाळचा चहा पाणी आटोपलं, आणि बाहेर बघतो तर मस्त ऊन पडलं होतं. विचार केला कर्वेनगर कडे वनदेवी मंदिरापर्यंत मस्त उन्हामध्ये फिरून यावं. चालण्याचा व्यायाम होईल, भरपूर प्राणवायू मिळेल आणि छान डी व्हिटॅमिन पण मिळेल.
उन्हातून चालताना मस्त फ्रेश वाटत होतं. इकडे तिकडे बघत बघत वनदेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळलो. आणि बघतो तर वनदेवी मंदिराच्या पलीकडे मुसळधार पाऊस पडत होता, आणि मंदिराचे अलीकडे मी चालत होतो तिथे ऊन होतं. अजून थोडे पुढे गेलो, तर मंदिराच्या बरोबर समोर एका साईडला जोरदार पाऊस आणि एका साईडला उन.
मी बरोबर बॉर्डरवर दोन्ही हात बाजूला आडवे करून मंदिरासमोर उभा राहिलो. मंदिराच्या अर्ध्या भागावर पाऊस पडत होता आणि अर्ध्या भागावर चक्क ऊन होतं. आणि मी उभा होतो तिथे माझ्या एका हातावर पाऊस पडत होता आणि ती बाजू पूर्ण ओली झाली होती आणि एका हातावर उन होतं आणि तो भाग पूर्ण कोरडा होता. एक वेगळाच आणि कधी न घेतलेला अनुभव घेताना मजा येत होती.
मला बघून रस्त्यावरचे काही लोक हा आगळावेगळा आनंद घेण्याकरता माझ्या मागेपुढे आडवे हात करून बॉर्डरवर उभे राहिले. काही लोक स्कूटर वरून खाली उतरले आणि उभे राहिले. काहीजण कार थांबवून खाली उतरले. वारजे साईडचे पण लोक आले आणि उभे राहिले पण ते आधीच पूर्ण ओले झालेले होते.
हा ऊन पाऊस आनंद घेत सगळेचजण मोठमोठ्याने हसत होतो आणि आरडाओरडी करत एन्जॉय करत होतो.
उन्हाकडे असलेल्या काही लोकांनी फोटो पण काढले.
इव्हिनिंग इन पॅरिस या सिनेमा मधलं गाणं आठवलं –
अजी ऐसा मौका फिर कहा मिलेगा—
पुन्हा असा चान्स मिळाला आणि तुम्हाला बोलावलं तर येणार का ?
“अरे वाटीने दिल तर पाटीने गोळा करशील. ” हे आमच्या आजीचे दातृत्वाचे माप! मोलाचा विचार! ! आज आपल्यातील थोडं जे आहे त्यातलं लोकांना दिलं तर पुढे जाऊन त्या पुण्य कर्मामुळे आपल्याला खूप काही मिळतं… साधी गोष्ट पण एका ओळीत सुंदर सांगितलेली.
वाटी हे आपल्या भोजनपात्रातले सर्वात लहान भांडे वाटीचे अनेक प्रकार आहेत. नैवेद्याची वाटी, आमटीची वाटी, भाताची मुद पाडायची वाटी, तुपाची वाटी, आमरसाची वाटी, श्रीखंडाची वाटी, दह्याची वाटी, या अशा अनेक वाट्यांना त्यातल्या पदार्थ प्रमाणे मानाचे स्थान असे. त्यांचाही थाट असायचा.. काही वाट्या चांदीच्या काही पितळेच्या नंतरच्या काळात स्टीलच्या जर्मनच्या पण वाट्या असायच्या पण त्या वापरत नव्हते. जगावर राज्य करायला निघालेल्या जर्मन च्या वाटीची अवस्था फारच वाईट होती. कुत्र्या मांजराला खाऊ घालण्याचे पदार्थ त्या वाटीत ठेवले जायचे ती जरा आकाराने मोठी असायची. मला त्या धातूला जर्मन असे का म्हणतात हेच कळत नाही त्या काळात जर्मन ची भांडी हलकी म्हणून प्रसिद्ध होती पण ती घरात वापरायला कोणी तयार नसे. हमालाच काम करतानाही जगावर राज्य करण्याची महत्त्वकांक्षा बाळगणारा क्रूर माणूस म्हणजे हिटलर… किंबहुना क्रूरतेला हिटलर हा शब्द पर्यायी म्हणून दिला आहे. असो एकूण जर्मनच्या वाट्या फारशा वापरल्या जात नव्हत्या नैवेद्याच्या वाटीचे नशीब जोरदार… ती चांदीची, देवापुढे रोज ठुमकत जाऊन बसण्याचा मान तिला! तिच्यामध्ये असलेले पदार्थ म्हणजे केशर काजू बदाम मिश्रित शिरा, केशर घातलेल श्रीखंड तर कधी मस्त घट्ट बासुंदी कधी बेसनाचा लाडू, डिंकाचा लाडू, साखरभात अशा भारदस्त पक्वान्नाना त्या वाटीत सामावून घेण्याचा मान मिळायचा. बाकीच्या वाट्या आमटी भाजी इत्यादीसाठी असायच्या आम- रसाच्या वाटीचे मात्र वैशिष्ट्य ती खास असायची तिला आपला हा मध्यम आकार चालायचाच नाही. हाताची बोटे पसरल्यावर जेवढा आकार होईल त्यात मावणारी ती वाटी.. ही चांदीची वापरायची आता मात्र ती स्टीलची असते चांदीच्या वाटीतला तो आमरसाचा रंग मोठा देखणा दिसायचा ते उत्तम मॅचिंग होतं. वाटी पाहिल्यानंतर माणसाच्या जिव्हेला आवर घालणे अवघड असायचे. तसेच आमटीच्या वाटीचा आकार ही थोडा मोठाच असायचा कारण त्यामध्ये कधी चिंच गुळाची आमटी कधी शेवग्याच्या शेंगाची आमटी कधी कांद्याची आमटी उपवासाची शेंगाची आमटी नवीन मसाला केल्यावर उखळ धुतल्यावर केलेल्या पाण्याची.. मसाला आमटी, वड्याची आमटी, आणि हल्ली प्रसिद्ध असलेली बाजार आमटी आमटीचा भुरका मारला की त्या आमटीने माणसाचे मेंदू तरतरीत होत होता.
उसनवारी चा व्यवसाय केला तो वाटीनेच… वाटीभर साखर वाटीभर डाळीचे पीठ वाटीभर डाळ वाटीभर तांदूळ वाटीभर तेल ही सगळी उसनवारी या वाट्याच्या माध्यमातून होत असे.
लहान मुलांना तरी वाटीत काहीतरी घालून बसवले.. अगदी चुरमुरे वगैरे कि ती खात निवांत बसायची आणि आईचे काम व्हायचे..! शाळेतून आल्यानंतर आईने वाटीत काहीतरी खायला दिले की आनंद व्हायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत केली जाणारी भेळ वाटी वाटीतूनच वर्तमानपत्राच्या कागदावर वाटली जायची. चाळ आणि वाडे यांच्यातील घराघरा मधील स्नेह वाढवण्याचे काम या वाटीनेच केले आहे. भाजी आमटी चांगली झाली की शेजाऱ्याकडे ती वाटी जायची किंवा काही खास वेगळे केले तरी वाट्यांची देवाण-घेवाण व्हायची शेजाऱ्याकडे दिलेली वाटी कधीही रिकामी परत येत नसे, आणि आता सारखे चार दाणे साखर टाकून देण्याचा जमानाही नव्हता त्यामध्ये पुन्हा घसघशीत पदार्थ घालून ती वाटी परत केली जात असे. माझ्या शेजारी असणार्या एका कुटुंबातील मुलगी माझ्या आईच्या हातच्या आमटीसाठी हट्ट धरून बसायची तिच्या आईला संकोच वाटायचं की रोज काय त्यांच्याकडून आमटी आणायची माझी आई म्हणायची अगं नेत जा मला नाती सारखी आहे ती पण त्यांनी एक युक्तीच केली आमच्या घरची वाटी घेऊन जाऊन त्यात ते त्यांच्या घरची आमटी घालून ठेवत आणि मग ती आमटी बाईंनी तुला दिली आहे असे सांगितले की ती खुश व्हायची आणि आईला म्हणायची, ” बघ बाईच्या हाताची आमटी किती सुंदर होते “ही फसवा फसवी तिच्या आईने किती तरी दिवस केली होती अशी ही गंमत या वाटीने सकाळी नळावर झालेली कडाक्याची भांडणे क्षणात विसरून जाऊन बायका पुन्हा चार वाजता गप्पा मारण्यासाठी एकत्र यायच्या. हे वैशिष्ट्य चाळ आणि वाड्यातच पाहायला मिळणार. नळावरची भांडण त्या वाटीतून कधी बादली, घागरी पर्यंत पोहोचली नाहीत. ते सगळे विचार नाराजी वाटी मध्ये विरून जायची!
लग्नात या वाटीचे महत्त्व फार मोठे मधुपर्कच्या एका विधीला जावयाला चांदीची वाटी देत असत. तसेच संक्रांतीला चांदीच्या वाटीत हलवा घालून जावयाला आहेर करायची पद्धत होती.
भाच्याला पहिला दात समोरचा आला तर चांदीची वाटी मामाने आणून मारायची अशी पद्धत होती मारायची म्हणजे त्याला आहेरच करायचा
पूर्वी चांदीच्या वाटीचा आहेर करीत असत बारशाला वाटी चमचा असा आहेर व्हायचा आहेरात चांदीची वाटी देणे याला खूप महत्त्व होते बायका हिंगाच्या डबीत पैसे साठवून एक एक चांदीची वाटी जमा करीत असत चांदीची वाटी, चांदीची ताट, चांदीचे ताम्हण हे त्या घराचं वैभव बायकांच्या हिंगाच्या बचत गटाच्या डबीतून आलेला आहे. आहेरात चांदीची वाटी दिली तर देणाऱ्याचा मान वाढत असे “अग बाई चांदीची वाटी का दिली… ” असे कौतुकही होत असे
माणसांच्या संभाषणात सुद्धा वाटीला अनन्यसाधारण महत्त्व होतं उदाहरण पहा… “वाटीभर रक्त आटवलं याच्यासाठी पण काही उपयोग झाला नाही” यासारख्या वाक्याने वाटीला एक साहित्यिक महत्त्व आल आहे तिला ताटाची जोड मिळाली ना की मग तिचं सौभाग्य फुलते पूर्वी ताटवाटीचा आहेर करायचे एकूण आपल्या संस्कृतीत जोडी असणे याला खूप महत्त्व आहे… वाटीतलं ताटात सांडले तर काय बिघडतं… वाटीतलं ताटात काय आणि ताटातलं वाटत काय… इत्यादी म्हणजे थोडक्यात आपल्या माणसासाठी हे सगळं आहे असं सांगण्याचा तो उद्देश आहे त्याला दिले तर काही बिघडत नाही अशा अनेक साहित्यिक वाक्यांनमध्ये वाटीला स्थान आहे.
सर्वांना समान वाटणी करण्याची पूर्वी पद्धत होती म्हणजे अगदी द्राक्ष आणली तरी प्रत्येक मुलाला सहा- सहा आठ आठ अशी मोजून द्राक्ष वाट्यात घालून द्राक्ष दिली जात असत. (पूर्वी द्राक्ष दुर्मिळ होती) वाटीत कोणाला तरी गुपचूप काढून ठेवून देणे हे त्याच्यावर असलेल्या मायेच प्रतीक होतं. सुनबाई जर सासूबाईंना म्हणाल्या, ” आई आहो तुम्ही देवळात गेला होता ना म्हणून यांनी आणलेली बर्फी मी तुमच्यासाठी वेगळी काढून वाटीत ठेवली आहे “… सासुबाई सुखावून जातात…! गपचूप काढून ठेवलेल्या वस्तूंचे महत्त्व विरोधी गटातही प्रेम वाढवण्यासाठी उपयोगी ठरले आहे. चांदीच्या वाट्या कपाटात असतात पितळेच्या वाट्या आता कालबाह्य झालेल्या आहेत स्टीलच्या वाट्यांची चलती जोरात आहे पण त्यांनाही मागे टाकून आता प्लास्टिकच्या वाट्या येऊ लागल्यात पण या वाट्यांना चांदीच्या आणि पितळेच्या वाट्यांचे शाहीपण नाही पण सगळ्याच वाटी प्रकाराला जे बाईपण लाभल आहे ना ते वाखाणण्याजोग आहे. बाई पण यासाठी कि हा संसारातला स्नेह समजूतदारपणा, भांडणे मिटवून टाकणं, आपल्यातलं थोडं दुसऱ्याला देणं, हे गुण घरातल्या बाईजवळ असतात तेच गुण या वाट्यामध्ये आहेत. वाटी हे वाडे आणि चाळीचे स्नेह वाढवणारे घटक आहेत. बंगल्यात ती देवघेव होत नाही आणि तो स्नेह ही निर्माण होत नाही. “एक वाटी आमटी भाजी की कीमत तुम क्या जानो बंगले वालो… ” आता हा लेख वाचल्यानंतर शेजारच्या पाजारच्या बंगल्यातून मला वाट्या येतील असं वाटतंय… बघूया एक छोट भांड वाटी यावर मी माझे विचार प्रकट केले आहेत आवडले असले तर वाटीभर अभिप्राय द्या आणि ही वाटी पुढच्या घरी पाठवा माझे काही बंधन नाही…!
” पोरांनो, आता जरा पडा दुपारचं “… आया.. मावश्या.. माम्यांच्या दटावण्याला न जुमानता सगळ्या ढेरपोट्यांनी अंगणात धूम ठोकलेली असायची…
लपंडाव, विषामृत, डबाऐसपैस… या मंतरलेल्या विश्वात सूर्यदेव कधीचे आपल्या घरी परतलेले…
मागे मिट्ट काळोख सोडून.. नि थंडीला आवतण देऊन..
पुढे आलेली पोटं आपापल्या जागी परत गेलेली नि सकाळच्या जेवणानं झोपी गेलेल्या कावळ्यांना आता जाग आलेली असायची..
सगळा पोरवडा ” भूक.. भूक ” करत त्या भल्या थोरल्या स्वयंपाकघरात शिरायचा
नि
फक्त “नाक” या एकमेव इंद्रियाची जाणीव रहायची…
थंडीमुळे बंद दारं-खिडक्या नि पेटलेल्या चुलीच्या आश्वासक उबेनं भरलेलं ते स्वयंपाकघर स्वर्गीय गंध लेवून बसायचं…
चुलीवरच्या मोठ्या पितळी पातेल्यात रटरट शिजणा-या खिचडीचा दरवळ सारा भवताल भारून टाकायचा..
आंबेमोहर तांदुळ, गावरान मूगडाळ, माम्यांनी नुकताच केलेला ताजा ताजा गोडा मसाला, परसातला हिरवागार कढीपत्ता नि आजीचं सिग्नेचर म्हणून तिने स्वत: पाट्यावर वरवंट्यानं वाटलेलं जिरं-खोबरं…! !
विश्वातली सारी अत्तरे फिकी पाडणारा हा सुगंध..! !
त्या पाठोपाठ कढीवर नाहीतर टोमॅटोच्या किंवा आमसुलाच्या सारावर “चर्र.. ” आवाज करत मादक गंधनिर्मिती करणारी.. तूप, जिरे, हिंग, मिरचीची जिवंत फोडणी..
☆ “वेगळी सकाळ आणि नव्या मैत्रिणी… भाग – २” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
(अशी दुसऱ्यांनी दिलेली धडक मला आवडेल का ? नक्कीच नाही. मग, मी दिलेली धडक इतर कुणाला आवडेल का ? तर नाही. ‘इस हाथ दे – उस हाथ ले’. व्हेरी सिम्पल. म्हणून गाडी चालवतांना ‘नो मोबाईल’) इथून पुढे – – .
आम्ही रस्त्यावर नजर टाकली, तर, खरोखरच हेल्मेट, सीटबेल्ट वापरतांना सगळेच दिसत होते. आम्ही दोघींनी एकमेकीला चिमटा काढून शुद्धीवर असल्याची खात्री करून घेतली.
मेघना : इथे चौकात कुठेच ट्रॅफिक पोलीस दिसत नाहीत. स्पीड लिमिट न पाळणे, झेब्रा क्रॉसिंग वर गाडी उभी करणे, नो एंट्रीतून येणे, वगैरे कोण बघतं ?, कोण पकडतो ?
परदेशी माणूस : इथे सगळेच लोक सुशिक्षित आहेत, सगळ्यांना वाचता येतं. रस्त्यावर स्पीड लिमिटचे बोर्ड कां लावले आहेत ? रस्त्यावर लेन कां मार्क केल्या आहेत ? झेब्रा क्रॉसिंग कां मार्क केले आहेत ? याचा अर्थ सगळ्यांना समजतो. इथे फक्त वाहतूक आणि सुरक्षितता यांच्याशी संबंध असलेलेच बोर्ड रस्त्यावर लावता येतात.
मेघना : अहो आमच्या कडे पण सगळ्यांना वाचता येतं, आमच्याकडे पण रस्त्यावर असे बोर्ड असतात. पण जास्त बोर्ड चा भरणा वाढदिवसांचे बोर्ड आणि जाहिराती यांचा असतो. त्यामुळे सुरक्षितता संबंधी बोर्ड कुणालाच दिसत नाहीत, आणि कुणी बघितले – तरी ते पाळत नाहीत. याला आम्ही, ‘कळतं पण वळत नाही’ असं म्हणतो.
मनवानी मेघनाला हळूच चिमटा काढला, अगं, मराठी माणसांनाच ही सवय आहे, म्हणूनच ही म्हण फक्त मराठीत आहे. इंग्रजीत तू ‘अंडरस्टॅण्डिंग बट नॉट टर्निंग’ अशी म्हण कधी ऐकली आहेस का ?
मनवा : अहो, इथे स्पीड ब्रेकर दिसत नाहीत, जिथे फोर व्हीलर ला एंट्री नाही, तिथे खांब दिसत नाहीत, फुटपाथवर टू व्हीलर नेऊ नये म्हणून तिथे खांब नाहीत.
फुटपाथवर खांब हा काय प्रकार आहे, हे परदेशी माणसाला बम्पर गेले असावे, त्यामुळे तो, ‘वॉट, वॉट, वॉट इज दॅट’ असं विचारायला लागला. आमच्या लक्षात आलं, की, जे बोर्ड वाचून तसं वागत नाहीत, त्यांच्याकरताच स्पीड ब्रेकर आणि खांब लागतात. आणि यांचा शोध आपल्या कडेच लागला असणार.
हे सगळं ऐकल्यावर सगळ्यांच्याच मनात एक शंका नक्कीच येणार, तीच मनवाच्या पण मनात आली. विचारू का नको, असं करत, तिनी विचारलंच —
मनवा : इथे सगळे लोक नियम पाळतात, त्यामुळे कुणालाच अडवायचे नाही, कुणाचं लायसन्स बघायचं नाही, कुणाच्या पावत्या फाडायच्या नाहीत, मग इथे ट्रॅफिक पोलीस असतात का नाही ? आणि असले, तर ते करतात काय ?
परदेशी माणूस : अहो, इथे पोलीस आहेत. ते सगळ्या ट्रॅफिक वर नजर ठेवून असतात. कुठल्याही कारणामुळे कुठेही काहीही अडचण असेल, तर ते लगेच मदतीला पोहोचतात. सगळे रस्ते, फुटपाथ यांची स्वच्छता, वेळच्या वेळी दुरुस्ती, रस्त्यावरचे मार्किंग – पट्टे, या सगळ्या गोष्टी तेच पाहत असतात. इथे तुम्हाला रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही, कचरा दिसणार नाही, एकही सिग्नल बंद दिसणार नाही.
मेघना : तुमचं हे सगळं ऐकून आणि बघून, असं वाटतं, की, आम्ही एखाद्या काल्पनिक दुनियेत आहोत. अजूनही काही विचारलं तर चालेल का ?
परदेशी माणूस : हो, पण छोट्याश्या ब्रेक नंतर —
परदेशी माणसानी बाजूच्या व्हेंडिंग मशीन मधून ३ कोक आणले, आणि म्हणाला, चियर्स . एक एक घोट घ्या आणि विचारा.
मेघना : आमच्या कडे लोक रस्त्यावर कचरा जाळतात, खूप धूर सोडणारे आणि कर्कश्य आवाज करणारे फटाके फोडतात. सण साजरे करण्याकरता, मोठमोठया मिरवणूक काढतात, ट्रॅफिक जॅम होतो. कर्कश्य आवाजात गाणी लावलेली असतात. ही यादी खूप मोठी होईल. तुमच्या कडे असे प्रकार असतात का ?
परदेशी माणूस : तुम्ही सांगता एवढी वाईट परिस्थिती इथे कधीच नव्हती. पण थोड्याफार प्रमाणात काही गोष्टी असायच्या. आता यातले काहीच इथे बघायला मिळणार नाही. इथल्या सामाजिक संस्था, लोकांच्या सभा घेऊन, वर्तमानपत्रांमधून, व इतर उपक्रमांमधून, हे केल्यामुळे होणारे दुष्परिणाम, लोकांना वेळोवेळी समजावून सांगतात. राजकीय विरोधी पक्ष पण, आपले नाव विरोधी, म्हणून सरकारच्या सगळ्याच धोरणांना विरोध करत नाहीत. चांगले असेल त्याला सगळेच मनापासून पाठिंबा देतात. इथे लोकांना एकदा कळलं, की, लगेच ते वळतं. ज्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडेल किंवा ज्यामुळे देशाच्या संपत्तीला हानी पोहोचेल, अशा गोष्टी इथे कुणीच करणार नाही. सगळेच राजकीय पक्ष याबाबतीत एकत्र काम करतात. विरोधी पक्ष म्हणून कायम विरोधीच भूमिका घ्यायची, हा प्रकार इथे नाही. लोकांचे हित, हेच सगळ्या पक्षांचे उद्दिष्ट असते.
मनवा : वा, तुमच्याकडून आज खूपच शिकायला मिळालं. आमच्याकडे असा बदल झाला तर काय मजा येईल !
(अशा ठिकाणी आता ३ महिने राहायला मिळणार, या कल्पनेनीच आम्ही सुखावलो). आम्ही परदेशी माणसाचे नाव विचारले, त्यांचे आभार मानले आणि त्यांना बाय – बाय केले – – –
मी : वा, म्हणजे तुम्ही ३ महिने प्रदूषण मुक्त हवा आणि पाणी यांचा आस्वाद घेतला. तिथले अन्नपदार्थ पण केमिकल विरहित आणि भेसळ विरहित असणार ! मस्तच ! आपल्याकडे फक्त नारळ हाच एकमेव असेल, की, ज्यात केमिकल नाहीत आणि भेसळ नाही.
मनवा आणि मेघना : काका, तिकडे अन्न आणि औषधे यात भेसळ करणाऱ्याला नक्कीच फाशी असणार. काका, तुम्ही आता ड्राय – डे कधी सुरु करताय ?
मी : मॅडम, तुम्ही स्वीडन ला जाऊन आला, आणि तुमचा स्टॉप शंकराच्या मंदिराजवळ आहे, म्हणून तुम्ही सोमवारी ड्राय – डे सुरु केला. मॅडम, मी दोनदा स्वीडनला जाऊन आलो, आणि माझ्या रोजच्या फिरण्याच्या रस्त्यावर शंकर, देवी, दत्त, बालाजी, मारुती, नवग्रह, अशी सगळीच देवळे आहेत, म्हणून मी रोजच ड्राय – डे पाळतो. फिरायला जातांना नो मोबाईल, गाडी चालवतांना नो मोबाईल, लिफ्ट मध्ये – जिने चढ/ उतरतांना नो मोबाईल, कुणाशी बोलतांना – गप्पा मारतांना नो मोबाईल, जेवतांना नो मोबाईल.
मनवा : काका, ग्रेट. तुम्ही आमच्याही पुढे आहात.
मी : आज तुमचा स्वीडन चा अनुभव ऐकायला मिळाला, खूप मजा आली. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी, जर आपण सगळ्यांनीच आचरणात आणल्या, म्हणजे कळत्याला वळते केले, तर सगळ्यांचच जगणं खूप खूप सुखकर होई, यात शंकाच नाही. अर्थात हे कुत्र्याची शेपूट सरळ करण्यासारखे आहे.
मेघना : आपण सगळ्यांनीच जर नेपोलियन वर विश्वास ठेवला, तर अशक्य असं काहीच नाही, काका. शेपूट पण सरळ होईल. आम्ही आता निघतो. लेट अस ऑल बी पॉझिटीव्ह अँड होप फॉर द बेस्ट .
मी : यस मॅडम. नक्कीच. माहिती आणि चहा बद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू . मी माझे नाव त्यांना सांगितले आणि त्यांची नावे विचारली.
☆ “थेटरांचं गाव… सोलापूर” – लेखक श्री चंद्रकांत कुलकर्णी ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
श्री चंद्रकांत कुलकर्णी
सोलापूरचे नाव काढले की सगळ्यांना चादर आठवते..
पण सोलापूर हे सिनेमा थेटरांचे पण गाव आहे. त्याला ” थेटरच “म्हटले जायचे. गरीबाचे गाव.. त्याच्यामुळे तिकीट दर कमी. सर्वांना परवडणारे.
आम्ही नव्या पेठेत राहत होतो. उजव्या हाताला पाच सात मिनिटे चालले की लगेच “लक्ष्मी” थेटर…
हे साधारण 58 /59 साल. तिथे सिनेमा एकाच मशीन वरती दाखवायचे. रील बदलताना ब्रेक असायचा. सिनेमा सुरू असताना मध्येच फिल्म तुटायची. पुन्हा ब्रेक. त्या ब्रेक मध्ये थेटरातच
“ए पापड पापड ” अशी घोषणा करत मोठ्या आकाराचे तळलेले पापड एका टोपलीमध्ये घेऊन काही मुलं विकायला यायची. एक पैशाला एक पापड.
तिकीट एक आणा .. सहा पैसे. अशीच अजून दोन थेटर होती. त्यांना “गिन्नी गिन्नी” थिएटर म्हणत. या लक्ष्मी टॉकीज मध्ये तिकीट खिडकीतलाच माणूस बाहेरच्या माणसाकडून दहा पैसे देऊन तिकीट घ्या असे सांगायचा .लोक आनंदाने चार पैसे जास्ती द्यायचे.
मी इथे जुना सिंहगड, रामराज्य, संत तुकाराम, आणि आफ्रिका हे सिनेमे बघितले.
लक्ष्मी थेटर च्या पुढे सरळ चालू लागले की तीन मिनिटात “चित्रा” टॉकीज… त्यामध्ये जास्ती करून मराठी सिनेमे लागायचे. मी इथे राजा गोसावीची गोष्ट, दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव, आधी कळस मग पाया हे सिनेमे पाहिलेले चांगले आठवतेय.
सरळ पुढे गेलं की “मेकॅनिकी” चौक. हा सिनेमाचा चौक.
समोरच “मीना” टॉकीज. त्याच्या मागे डाव्या कोपऱ्यात ” आशा” टॉकीज. त्याच्या आणखी पुढे डाव्या कोपऱ्यात “श्री” टॉकीज.
मीना टॉकीज च्या उजव्या बाजूला रस्त्यावर भागवतांची एका जागी चार थिएटर्स. …
भागवत चित्रमंदिर, उमा चित्रमंदिर, कला चित्र मंदिर आणि छायाचित्र मंदिर. कला आणि छाया एकावर एक होती. कदाचित देशातले पहिले मल्टिप्लेक्स थिएटर हेच असावे.
उमाचित्र मंदिराचे उद्घाटन राज कपूर यांच्या हस्ते त्यांच्या संगम चित्रपटाने झाले. त्यावेळेस भागवत बंधूंनी राज कपूर आणि इतर कलाकारांची सोलापुरात उघड्या मोटारीतून मिरवणूक काढली होती, राज कपूरला बघण्यास आतुर झालेले सगळे सोलापूरकर रस्त्याच्या कडेला , दुकानात आणि सज्जामध्ये जमले होते.
नवी वेस पोलीस चौकीच्या पुढे डावीकडे पाटलांचे प्रशस्त “प्रभात” टॉकीज होते. तिथे मराठी पण सिनेमे लागत.
सरस्वती मंदिर शाळेच्या समोर ” सेंट्रल टॉकीज” होते .मंडईच्या जवळ ” उमा टॉकीज” माणिक चौकात
“विणा” टॉकीज होते.
सेंट्रल आणि विणा टॉकीज मध्ये सेकंड रन चे पिक्चर लागायचे. दर 19 पैसे. विणा टॉकीज ने एकदा
“राज कपूर महोत्सव” केला होता. तिथे आग, आवारा,
आह, बरसात, श्री 420 हे सिनेमे आम्ही कॉलेजचे मित्र मिळून खुर्च्याची पूर्ण लाईन पकडून बघितले होते.
पूर्व भागामध्ये तेलगू भाषिक लोक खूप असल्यामुळे तेथे “पद्मा” थेटर होते .तेथे कायम तेलगू सिनेमे लागत असत.
एकदा एका टॉकीज मध्ये इन्सानियत सिनेमा चालू असताना एका देवानंद प्रेमी ने दिलीप कुमार वर मोठ्याने काही भाष्य केले. त्यानंतर लगेचच दिलीप कुमारच्या चाहत्यांनी त्यांच्यावर काही भाष्य केले. सिनेमा चालू असताना दोघात वादावादी सुरू झाली. त्यांचे समर्थक उठून बोलायला लागले. मारामारीचीच वेळ यायला लागली होती. शेवटी मॅनेजरने येऊन मध्यस्थी केली भांडण मिटवले.
असे प्रसंग थेटरात अधून मधून घडायचे.
इंटरवेलमध्ये सोडा पिण्याचे प्रस्थ फार होते. थेटरच्या दाराच्या बाहेर टेबला वरती सोड्याच्या बाटल्या ठेवून त्याच्यावरती ओपनर फिरवून सरररर्र आवाज काढायचा… काहीजण सिगरेट ओढायचे..देवानंद स्टाईलने….
कला, छाया च्या खाली असणाऱ्या हॉटेलमध्ये गर्दीत जाऊन काही लोक घाईघाईत उकळता चहा पिऊन परत अंधारात येऊन थेटरातून आपली खुर्ची शोधायचे .
लक्ष्मी थिएटर मध्ये तर इंटरवेल नंतर परत आल्यावर आपली खुर्ची जागेवर असेल याची गॅरंटी नसायची. तिथल्या लाकडी सीट काढता घालता यायच्या.ज्याची सीट तुटली आहे तो दुसऱ्याची सीट उचलून आपल्या खुर्चीला लावून बसायचा .मग सिनेमा सुरू असताना भांडण.
“खाली बसा” “भांडण बाहेर जाऊन करा” “आम्हाला सिनेमा बघू द्या” “आवाज बंद करा” असा गदारोळ थोडा वेळ चालायचा.
इंटरवेल मध्ये चहा पिणे, सोडा पिणे, सिगरेट ओढणे हे सोलापुरात त्याकाळी कॉमन होते.
या कलाछायाचे वैशिष्ट्य म्हणजे याच इमारतीमध्ये सोलापूरची जुनी शाळा “न्यू हायस्कूल” होती. शिकत असताना सिनेमाची गाणी ऐकून सुध्दा ईथली मुलं खूप हुशार झाली.
प्रसिद्ध सिने रसिक , “गीतयात्री” या पुस्तकाचे लेखक आणि मुंबईच्या इस्माईल युसूफ आजाद कॉलेजचे माजी प्राचार्य कैलासवासी श्री. माधव मोहोळकर याच शाळेचे विद्यार्थी. सोलापुरात नवी पेठेतल्या ज्या
“जिक्रिया “हॉटेलमध्ये ते गाणी ऐकायला जात त्याच हॉटेलमध्ये मी पण गाणी ऐकायला जात असे.
भागवतांच्या थिएटरमध्ये मॅटीनीला जुने इंग्लिश सिनेमे लागायचे. मोठ्या कापडी बोर्ड वरती निळ्या रंगात सिनेमाची स्टोरी मराठीत लिहिलेली असायची . कडेला एक आकर्षक पोस्टर चिकटवलेले…. ते बघूनच आम्ही सिनेमा बघायला जात होतो.
आम्हाला त्या वयात या इंग्लिश सिनेमाचे आकर्षण होते. तिथेच आम्ही क्लिओपात्रा, रोमन हॉलिडे, द ग्रेट एस्केप, बेनहर असे गाजलेले सिनेमे बघितले. तिथेच आमची ग्रेगरी पेक , कर्क डग्लस , अॅथनी कॉइल, एलिझाबेथ टेलर, एल्विस प्रिसले,मर्लिन मनरो, यांची पडद्यावरती ओळख झाली.
काही दिवसांनी श्री टॉकीज च्या मागे डाव्या कोपऱ्यात मोठे “कल्पना” टॉकीज सुरू झाले. येथे फक्त करंट इंग्लिश सिनेमाच लागायचे. नंतर हिंदी सुरू झाले.
रेग्युलर सिनेमाचे तिकीट दर… पाच
आणे आणि साडेआठ आणे . तिकीट खिडकीवर थोडीशी तिकीटं दिली की खिडकी बंद. मग बाहेर लगेच पाच आण्याचे आठ आण्यात. विक्री सुरू.
किशोर कुमारच्या पहिली तारीख या गाण्यात “पाच आनेका दस आना” ” पाच आनेका दस आना” हे शब्द बहुतेक सोलापूरच्या थेटर मधूनच घेतले असावेत….
ह्या विक्रेत्याकडे तिकिटांचे गठ्ठे असायचे. पुन्हा आत जाण्यासाठी वेगळी लाईन. ती लांब पर्यंत वाकडीतिकडी पसरलेलली असायची. थिएटर मालकांनी धिप्पाड माणसे कमाला ठेवली होती. ही माणसे दोन्ही हात लांब पसरून जोर लावून पूर्ण रांग मागे ढकलायचे आणि सरळ करायचे.
लाईनीतले लोक हे मूकाटपणे सहन करायचे.
या ढकलाढकली चा आणि काळ्या बाजाराचा राग काही प्रेक्षक प्रेक्षागृहात मालकाचा उद्धार करून काढायचे . तर काही प्रेक्षक या अन्यायाचे उट्ट काढण्यासाठी . पुढच्या वेळेस येताना ब्लेड घेऊन यायचे आणि सिनेमा संपताना खुर्च्यावरती फिरवून जायचे.
“कसा आहे सिनेमा ?चांगला आहे का? तो दुसरा सांगायचा..
“हाय्येस (हायक्लास) आहे… बेस्ट आहे सिनेमा” हॉलमध्ये ज्यांनी आधी सिनेमा पाहिला आहे ते पडद्यावर चालू असलेल्या सिनची कॉमेंट्री करत, पुढे काय होणार आहे ते आधीच सांगत.
सोलापुरात आंबट शौकीन होते. फर्स्ट डे फर्स्ट शो ची क्रेझ खूप होती. शो बघायला हे लोक बँड लावून थिएटरला जायचे.
देवानंद सारखे दात दिसावे म्हणून आपला एक दात पाडून घेतलेला एक रसिक होता.
इस्माईल लस्सी वाले हे दिलीप कुमार चे प्रचंड फॅन होते. त्यांच्या लस्सीच्या छोट्या गाडीवर सगळीकडे दिलीप कुमार चे फोटो असायचे. आणि दिलीप कुमारचे आलेले सिनेमे आणि येणारे सिनेमे यांची यादी टांगलेली असे. दिलीप कुमार बद्दल काही माहिती देणारा त्यांच्याजवळ आला तर त्याच्याशी ते खूप आस्थेने बोलायचे. खुश होऊन त्याला म्हणायचे
“लेव थोडी लस्सी पिओ.” अणि लस्सी द्यायचे.
ते दिलीप कुमार च्या लग्नाला गेले होते. तिथे त्यानी दिलिपकुमार अणि ते दिसतील असे खूप फोटो काढून घेतले. आणि परत आल्यावर गाडीवरती लग्नाची फोटो गॅलरी लावली.
त्यावेळी बऱ्याच थिएटरमध्ये स्त्रियांसाठी सिनेमा हॉलमध्ये मागच्या बाजूला वेगळी व्यवस्था असायची. स्त्रियांसाठी तिकीट दर कमी असायचे .आणि ते जाहिरातीमध्ये लिहायचे” स्त्रिया पाच आणे ” फॅमिली साठी काही थेटरामध्ये केबिन केलेल्या असत. चोरून सिनेमाला येणाऱ्या प्रियकर प्रेयसी साठी ही खास सोय…..
आम्हाला कधी हा चान्स मिळाला नाही…
सिनेमा पाहून परत येताना बाहेर सिनेमाच्या गाण्याचे पुस्तक एक आण्यात मिळायचे. अशी पुस्तकं मी घेत असे . बरीचशी गाणी सिनेमा पाहून आणि ऐकूनच पाठ होत असत.
सिनेमा बघून आल्यावरती रात्री नवी पेठेत दुकानाच्या कट्ट्यावरती बसून मित्रांना सिनेमाची स्टोरी सांगण्याचा कार्यक्रम रंगत असे. साधारण असे शब्द असायचे.
“काल कोहिनुर बघीतलो रे…दिलीप कुमार हिरो असतय आणि मीनाकुमारी हिरोईन अस्तीय. त्याचं प्रेम अस्तय.जीवन कप्टी अस्तय बघ…. त्येला मीनाकुमारी पाहिजे असतिय. दोघांची मारा मारी होतिय. दिलीप कुमार जिंकतय. मग त्यन आणि मीनाकुमारी गाण म्हनतेत “कोई प्यार की देखे जादू गरी” लय मस्त गाणय. एक दासी पण असतिय. मूक्रिबी लै हसवतय . कुमकुम चा डान्स मस्तय. डायरेक्शन बी बरय. डायलग तर एक से एक हैत.तू बघ बे शिनेमा.”
ह्या स्टोरी कथनातच समोर येणाऱ्या तिन चाकी गाडी वरचा गोटी सोडा हातात बाटली घेऊन प्यायचा असे. सोडेवाला डाव्या हातात बाटली धरून उजव्या हाताच्या बोटाने वरुन दाबून गोटी खाली ढकलायचा..
त्यावेळी येणारा “चुइंग” असा आवाज अजुनही कानात आहे.
थेटर मध्ये बाहेर काचेच्या शोकेसमध्ये सिनेमातले ठराविक फोटो लावलेले असत. हे फोटो आम्ही खूप आनंदाने बघत असू. सिनेमाचे पोस्टर बघायला जाणे हा एक कार्यक्रमच…
काहीजण पोस्टर बघून सिनेमाला जायचे की नाही हे ठरवायचे . आम्ही मात्र सगळ्याच सिनेमाला जायचो .
जॉन कवस ,रंजन , बाबुराव मजनू यांचे पण सिनेमे बघितले. ” तुम जो आओ तो प्यार आ जाये” या मन्ना डे च्या गाण्यासाठी “सखी रॉबिन” हा थर्ड ग्रेड सिनेमा बघितला होता.
आत्ता लेख लिहिताना या सोनेरी आठवणी जाग्या झाल्या …
या सगळ्या थेटरांनी मला भरपूर आनंद दिला .
माझे जीवन” सिने समृद्ध” केले. आजही सोलापुरात नवी पेठेत , मेकॅनिकी चौकात गेलो की ती जुनी थेटरं आणि तिथे लावलेले मोठे पोस्टर्स ….डोळ्यासमोर येतात.
☆ “वेगळी सकाळ आणि नव्या मैत्रिणी… भाग – १” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
खरंतर सकाळ ही रोजच वेगळी असते, पण, आजची सकाळ जरा हटके, म्हणजे वेगळ्यातली वेगळी होती – –
आम्ही सकाळी साधारण ७ – ७. १५ ला बाहेर पडतो. ही वेळ ऑफिसची असल्यामुळे, रस्त्यावर निरनिराळ्या ठिकाणी कंपन्यांच्या बसचे पिक – अप पॉईंट्स आहेत. काही ठिकाणी कॅब चे पिक – अप पॉईंट्स आहेत. त्यामुळे फिरण्याच्या पूर्ण रस्त्यावर, या वेळेला, फुटपाथवर थोड्या थोड्या अंतरावर मुले – मुली – स्त्री – पुरुष ग्रुपनी गाडीची वाट बघत उभे असतात.
काही ठिकाणी २ -३ जण असतात, तर काही ठिकाणी ६ – ७ जण असतात. रोजचे द्रुश्य म्हणजे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. एकतर ही मंडळी फोनवर बोलत असते किंवा चॅट करत असते. काहींच्या कानाला मशीन लावलेले असते. सकाळी सकाळी भेट होते आहे, तर एकमेकांना हाय – हॅलो करणे, एकमेकांची विचारपूस करणे, काही गप्पा मारणे, हा प्रकार कधीच बघायला मिळत नाही.
आज बायकोला सकाळी एका लग्नाला जायचे होते, म्हणून मी नेहेमीच्या वेळेलाच, पण एकटाच फिरायला बाहेर पडलो.
मृत्युंजय मंदिराच्या जवळच, एका स्टॉप जवळ, दोन मुली उभ्या होत्या आणि चक्क मोठमोठयांनी हसत गप्पा मारत होत्या. एकीच्याही हातात मोबाईल नव्हता. दोघींच्या हातात बाजूच्या चहाच्या स्टॉल वरून घेतलेल्या चहाचे ग्लास होते. मुलींनाच असे नाही, पण कुणालाही असे मनमोकळं हसतांना बघितलं, की प्रसन्न वाटतं, मस्त वाटतं.
रस्त्यानी जातांना, असं काही वेगळं दिसलं, की आपोआपच आपली पावलं तिथे थांबतात. माझं पण असंच झालं. या रस्त्यानी मी इतके दिवस फिरतो आहे, पण मोबाईल नसणारी आणि एकमेकांशी बोलणारी माणसं, मी पहिल्यांदाच बघत होतो. आणि ती पण विथ स्माइलींग फेस! काय कारण असेल? ही माझी जिज्ञासा जागी झाली.
कारण समजण्याकरता, त्यांनाच विचारणे, हा एकच पर्याय होता.
मी : मॅडम, एक विचारू का?
(त्यांची नावे समजेपर्यंत त्यांना मेघना आणि मनवा म्हणूया)
मेघना : विचारा काका, काहीही विचारा, आम्ही आज एकदम खुश आहोत
मी माझी शंका त्यांना विचारली
मनवा : काका, तुम्हाला आश्चर्य वाटणं साहजिक आहे. आज आम्ही एकमेकींना मोबाईल शिवाय बघतो, तेव्हा आम्हाला पण आश्चर्य वाटतं.
मेघना : काका, आज ड्राय-डे आहे
मी : महाराष्ट्रात ड्राय-डे कुठे पाळतात? आणि आता तर सकाळ आहे
मेघना : आमच्या ड्राय-डे चा दारूशी काहीही संबंध नाही. ड्राय-डे ला दारू नसते, आमच्या ड्राय-डे ला मोबाईल नसतो. मृत्युंजय मंदिराजवळ आमचा स्टॉप आहे, श्री शंकराचा वार सोमवार, म्हणून सोमवारी आमचा ड्राय-डे असतो. आज मोबाईलची जागा, हातात नसून आमच्या पर्स मध्ये असते. आणि वापर फक्त आलेला फोन घेण्याकरता किंवा काही फोन करण्याकरता.
मी : वा! काय मस्त आयडिया आहे! तुम्हाला ही कल्पना आली कशी?
मनवा : काका, नुकतेच, आम्ही दोघी युरोपमध्ये स्वीडनला होतो, तीन महिने. तिथे आम्हाला खूप शिकायला मिळाले. ही कल्पना पण त्यातूनच मिळाली. आमच्या ड्राय-डे बद्दल विचारणारे तुम्ही पहिलेच आहात. तुम्हाला ऐकायचे असेल, तर, आमच्या बरोबर चहा घ्यावा लागेल. मी काही उत्तर द्यायच्या आत, तिनी बाजूच्या चहावाल्यांना खूण केली, आणि माझ्या हातात चहाचा ग्लास आला.
मी : मॅडम, तुमची बस किती वाजता आहे? नाहीतर बोलण्याच्या नादात – —
मेघना : कॅब आलेली आहे. ही काय आमची कार उभी आहे. आमचं फ्लेक्सी टायमिंग असतं, उशिरा गेलो, तर तेवढं नंतर थांबायचं! नो प्रॉब्लेम.
आता, ड्राय-डे ची कल्पना कशी आली – – -? त्याचं असं झालं – –
स्वीडनमध्ये टू व्हीलर किंवा फोर व्हीलर चालवणारा एकही जण, आम्हाला मोबाईलवर बोलतांना दिसला नाही. आम्हालाही तुमच्यासारखचं आश्चर्य वाटलं. दुसऱ्याच दिवशी, आम्ही तिथल्या एकाला गाठलं, जसं शंका विचारायला तुम्ही आम्हाला गाठलं. तिथे सगळ्यांनाच इंग्रजी येतं.
मी : मॅडम, थोडा फरक आहे. मी दोघींना गाठलं, आणि तुम्ही दोघींनी एकाला गाठलं. त्यांनी पण तुम्हाला चहा ऑफर केला होता का? बरं, गाठल्यावर पुढे काय झालं?
त्या दोघी मला भूतकाळात घेऊन गेल्या ——
मेघना : आम्ही त्यांना विचारलं, की, इथे कोणीच गाडी चालवतांना मोबाईल वर बोलतांना दिसत नाही. पोलीस पकडतात का? दंड जास्त असतो का? लायसन्स जप्त करतात का?
परदेशी माणूस : अहो, गाडी चालवतांना मोबाईल वापरणे, स्वतः करताच धोकादायक असते, हे आम्हाला समजतं नाही का? ते पोलीसानी कशाला सांगायला पाहिजे! उन्हाळ्यात आपण डोक्यावर टोपी घेतो, पावसाळ्यात छत्री घेतो. छत्री नाही घेतली, तर पोलिसांनी आपल्याला पकडायला पाहिजे कां? मॅडम, पाऊस पडतोय, तुम्ही छत्री नाही घेतली – भिजल्यामुळे तुम्हाला ताप येईल – सर्दी होईल. द्या १० युरो दंड.
मी टू व्हीलर चालवतांना हेल्मेट घातले नाही, आणि काही कारणामुळे, रस्त्यावर गाडी घसरून पडलो, तर माझं डोकं फुटल्याशिवाय राहणार नाही, हे मला नक्कीच समजतं. त्यामुळे माझ्या सुरक्षिततेकरता मी हेल्मेट घालतोच. याच्या करता नियम आणि पोलीस कशाला पाहिजेत? कार चालवतांना आम्ही सीट बेल्ट लावतोच, त्याचं कारण हेच. अर्थात ज्याला मानेचा त्रास असेल, वयस्कर माणसांना हेल्मेट मुळे त्रास होत असेल, तर ते हेल्मेट वापरत नाहीत. हेल्मेट हे व्ययक्तिक सुरक्षिततेकरताच आहे..
मनवा : अहो, पण कार चालवणारे मोबाईल वर का बोलत नाहीत? अपघात झाला तर त्यांना काहीच होणार नसते! चालणाऱ्याचे बारा वाजतात! मग, याकरता काही नियम आहे का? दंड आहे का?
परदेशी माणूस : मॅडम, नियम आला, की, बघायला यंत्रणा आली. दंड आला, की, गैरव्यवहार आला. आणि मॅडम, समजा, माझ्या कारनी, ‘अ ‘, ‘ब’, ‘क ‘, ‘ड’, लोकांना धडक दिली, तर, मला काहीच होणार नाही, हे बरोबर आहे. आता, इतर कुणी असेच ४ -५ लोकांना उडवले आणि त्या ‘अ ‘, ‘ब’, ‘क ‘, ‘ड’, मध्ये माझे आई – वडील असले तर? बायको असू शकते! मुले असू शकतात! मित्र असू शकतात! अशी दुसऱ्यांनी दिलेली धडक मला आवडेल का? नक्कीच नाही. मग, मी दिलेली धडक इतर कुणाला आवडेल का? तर नाही.
‘इस हाथ दे – उस हाथ ले’. व्हेरी सिम्पल. म्हणून गाडी चालवतांना ‘नो मोबाईल’.
☆ “अव्वल पढतमूर्ख होऊ नका… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
“तू खरोखरच मेडिकल सायन्सचा विद्यार्थी आहेस? ”
“कोई शक? “
“बेशक शक है”
“का? ”
“तुझ्या एका हातात सिगारेट आणि दुसऱ्या हातात कागदी कपातला चहा आहे. अलिकडच्या काळात मेडिकल सायन्स आणि हेल्थ सायन्स ही दोन शास्त्रं वेगवेगळी झालीत की काय? असं वाटलं रे.. ”
एक क्षणभर त्याचा चेहरा अत्यंत त्रासिक झाला. ऐन थंडीत सकाळी सकाळी रामाच्या पारी तळजाईच्या टेकडीवर मी त्याला धरला होता. पंधराच दिवसांपूर्वी तो मला भेटून गेला होता. वजन नव्वद किलोच्या वर गेलं होतं, hba1c टेस्ट वर 7. 0+ स्कोअर आला होता. आठवड्यातून कमीतकमी पाच दिवस येथेच्छ मांसाहार आणि दारू ही त्याची आवड होती. थोडक्यात म्हणजे, मधुमेही होण्याकडे त्याचा सुपरफास्ट वेगानं प्रवास सुरु होता.
“अरे, ही आयुर्वेदिक सिगारेट आहे. ह्यात लवंग आहे. ” तो म्हणाला.
“पण माझ्या माहितीनुसार, आयुर्वेदतज्ज्ञ असली कुठलीच उत्पादनं बनवत नाहीत. तसं असतं तर, किमान एक तरी आयुर्वेद तज्ज्ञ रिलमध्ये किंवा पॉडकास्टमध्ये त्याविषयी काहीतरी बोलला असता की नाही? पण मला तरी तसं कुठं दिसलं नाही. ” मी त्याला विचारलं. गप्प बसण्यापलीकडे तो काहीही प्रतिक्रिया देऊ शकला नाही. कागदी कपातून गरम पेय घेणं आरोग्यासाठी किती धोकादायक आहे, हे वैद्यकशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्याला माहिती नसेल का? धुम्रपान करण्याचे धोके त्याला माहिती नसतील का?
आपली पचनसंस्था कशी काम करते, जठर कसं काम करतं, स्वादुपिंडाचं कार्य काय असतं, हे सगळं आठवी- नववीपासूनच अभ्यासक्रमात आहे. कुठल्या अन्नघटकातून आपल्या शरीराचं पोषण कसं होतं, हेही शालेय अभ्यासक्रमात आहे. शिवाय ज्या सर्च इंजिनवर ही सगळी gen z मुलंमुली दिवसभर पडीक असतात, त्यावर तर आरोग्यविषयक माहितीचा महापूर आहे.
मग दहावीच्या परीक्षेत विद्यान विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून अकरावी-बारावी शास्त्र शाखेत प्रवेश घेऊन, लाखो रुपयांचा कोचिंग क्लास मेडिकल एन्ट्रन्स एक्झामसाठी लावून आणि त्यातून मेडिकल सायन्सला प्रवेश घेऊन दोन वर्षे शिक्षण घेईपर्यंत स्वतःच्याच आरोग्याविषयी एवढी साधी काळजीसुद्धा घेता येऊ नये? याला काय म्हणावं? अज्ञानी म्हणावं की पढतमूर्ख म्हणावं?
दिवसातले दहा-दहा तास सीए कोर्सच्या फायनल अभ्यासक्रमाचा अभ्यास करणारा विद्यार्थी – पण त्याला पीपीएफ चे फायदे सांगता आले नाहीत, सोन्याचांदीचे भाव अचानक का वाढायला लागले हे सांगता आलं नाही. क्रेडिट कार्ड कुणी वापरावं आणि कुणी वापरु नये, हे सांगता आलं नाही. हे तर सोडाच पण, ऑनलाईन फ्रॉड पासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी हेसुद्धा त्याला सांगता आलं नाही. मग इयत्ता अकरावीपासून जवळपास नऊ दहा वर्षं कॉमर्सचा रोजच्या रोज दहा तास अभ्यास करुन तो नेमकं काय शिकतो आहे? आजतागायत एकही चार्टर्ड अकाऊंटन्ट ची मुलाखत त्यानं ऐकली नाही, तो अर्थसंकल्प बघत नाही, आर्थिक घडामोडी बघत नाही. मग ज्याला कॉमर्समधलं सामान्य ज्ञानसुद्धा नाही, असा मुलगा सीए फायनल पर्यंत गेला तरी कसा?
मराठीमध्ये एम. ए. करत असलेल्या दोन मुली मला भेटायला आल्या होत्या. दोघीही पुण्यातल्या नामवंत कॉलेजमध्ये शिकतात. त्या कॉलेजची लायब्ररी अत्यंत उत्कृष्ट आहे, हे मलाच काय, सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण मागच्या सहा वर्षांत त्या दोघीही एकदाही कॉलेजच्या लायब्ररीची पायरीसुद्धा चढलेल्या नव्हत्या. सहा वर्षात त्यांनी मृत्युंजय, महाश्वेता, सूर्य पाहिलेला माणूस वगैरे तर सोडाच, पण गणगोत वाचलेलं नाही. कृष्णकिनारा वाचलेलं नाही. एक होता कार्व्हर वाचलेलं नाही. साधं पंचतंत्रसुद्धा वाचलेलं नाही. त्यांना बोरकरांची कविता ठाऊक नव्हती. तिथं ग्रेस, आरती प्रभू वगैरे तर सोडाच. मला आश्चर्य वाटलं, त्यांना “मन तुझं जलतरंग” माहिती होतं, पण त्याच कवीनं लिहिलेलं “कैवल्यगान” मात्र माहिती नव्हतं. याला काय म्हणावं?
स्वरगंधर्व, मी वसंतराव, हरिश्चंद्राची फॅक्टरी यांच्यासारखे प्रेरक चित्रपट पाहण्याची अभिरुची नाही, त्यातून आपण काही शिकावं असं वाटत नाही. चांगलं काव्य, चांगलं नाट्य, चांगलं संगीत यांचा सहवास नाही. तो मिळवावा अशी इच्छाही नाही. एखाद्या क्षेत्रात, एखाद्या विषयात अभ्यास करण्यासाठी झोकून द्यावं, दिवसरात्र साधना करावी, अहोरात्र त्या विषयाचा ध्यास घ्यावा, असं स्वप्नातसुद्धा येत नाही. अशी शंभरातल्या ९५ जणांची अवस्था आहे. मग कागदोपत्री उच्चशिक्षित होऊन ही पिढी नेमकं काय साध्य करतेय, याचा विचार कुणी करतंय का?
गडकिल्ल्यांवर फिरण्याची आवड असणाऱ्यांनी अनेकांनी गोनिदा वाचलेलेच नसतात, समाजशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या मुलामुलींनी महर्षी कर्वे वाचलेले नसतात, बालशिक्षण आणि बालविकासाचा कोर्स करणाऱ्यांना अनुताई वाघ आणि ताराबाई मोडक माहितीच नसतात. पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्याने लोकमान्यांचे अग्रलेख वाचलेले नसतात. कारण काय? कारण एकच आहे – आम्हाला या सगळ्याची गरजच वाटत नाही..!
“मोटिव्हेशन फॉर स्टार्टअप” या विषयावर प्रोजेक्ट करणारा विद्यार्थ्यांचा एक गट मला भेटायला आला होता. सगळे गूगल मास्टर होते. मी त्यांना शंतनुराव किर्लोस्करांचं “कालापुढती चार पाऊले” हे पुस्तक वाचायला दिलं आणि पंधरा दिवसांनी पुन्हा बोलावलं. आठ जणांपैकी फक्त एकानं ते पुस्तक वाचलं होतं..!
बाकीचे सगळे आम्ही किती बिझी होतो आणि आम्हाला कसा वेळच मिळाला नाही हे मला पटवून देण्याचे शर्थीचे प्रयत्न करत होते..! त्यांनी ते पुस्तक न वाचल्याचं कारण मला कळलं होतं – “आम्हाला गरज नाही! “
आपण पदवी प्रमाणपत्र आणि मार्कलिस्ट मिळवली की, सगळं झालं असं नसतं. कागदावरचं प्रमाणपत्र पुरेसं नसतं. आपण आयुष्यात नेमकं काय करतो आहोत, नेमकं कसं जगतो आहोत, कशासाठी जगतो आहोत, आपली नैतिकता कशी आहे, आपलं आपल्या कामाच्या क्षेत्रातलं योगदान कुठल्या दर्जाचं आहे, अशा अनेक गोष्टींना अत्यंत महत्त्व असतं.
विद्यार्थी मित्रांनो, “आधी केले मग सांगितले” या तत्वाला आयुष्यात खूप किंमत आहे. अतिशय प्रामाणिकपणे आणि खरोखर तन्मय होऊन केलेले कष्टच उत्तम फळाला येतात. नुसत्या पाट्या टाकून काहीही हाती लागत नाही, उलट नुकसान मात्र नक्की होतं. उथळपणापासून स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवणं, आजच्या काळात फार कठीण आहे. आपण जितके आपल्या ध्येयाशी आणि तत्त्वांशी घट्ट चिकटून राहू, तितकं आपलं करिअर उज्ज्वल आहे. वरवरचा अभ्यासाचा आभास शक्य तितक्या लवकर सोडा आणि तुम्ही ठरवलेलं तुमचं करिअर प्रत्यक्षात जगायला सुरुवात करा. स्वतःच स्वतःला शिस्त लावून घ्या. आपापल्या क्षेत्रातली अतिशय कष्टानं नावारूपाला आलेली माणसं, त्यांची चरित्रं शोधून काढा. ज्या ज्या माणसांमधलं जे जे काही चांगलं असेल, ते स्वतःमध्ये उतरवण्याचा ध्यास घ्या.
आणि पालक मित्रांनो, तुमच्या सोयीनं तुम्ही तुमच्या मुलांकडे पाहू नका. पटकन आणि इन्स्टंट यश मिळावं म्हणून त्यांना शॉर्टकट्स मारायला शिकवू नका. तुमच्या कमावलेल्या पैशाच्या जोरावर आज तुमच्या कुटुंबापुरते शॉर्टकट्स खपून जातील. पण खऱ्या जगात ते अजिबात खपवून घेतलं जात नाही आणि अशा मुलामुलींना कुणी फुकटसुद्धा कामावर घेत नाही. “लाखो रुपये खर्च करूनही आमच्या मुलाचं काही धड होईना”, असं जेव्हा वाटतं, तेव्हा आपण त्याच्या बाबतीत किती शॉर्टकट्स कसे कसे मारले आणि त्यालाही मारायला शिकवलं, हे आठवून पहा. त्याची यादी खूप मोठी होईल. म्हणूनच खात्रीनं सांगतो, जे जे चकाकते ते सोने नसते, हे खरंय. पण शुद्ध सोने चकाकतेच, हेही तितकंच खरंय. तुमची मुलं उत्तम घडवण्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. जगात बाकी काहीही उलथापालथ झाली तरीही उत्तम चारित्र्यवान, प्रामाणिक, तत्वनिष्ठ आणि कष्टाळू माणसांची प्रगती कधीही थांबणार नाही, हे सत्य मात्र नेहमी ध्यानी धरा.. कारण, तुमची मुलंमुली अव्वल दर्जाची पढतमूर्ख न होणं ही आपल्या देशाची गरज आहे.
☆ ट्युलिप्स आणि रानफुले: ‘जीवनाची दोन प्रतीके’ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
परवा टीव्ही पाहत असताना ‘ सिलसिला ‘ या चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यावर चित्रित केलेलं ‘ देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए ‘ हे गाणं लागलं होतं. त्यातील नयनरम्य ट्युलिप्सचा फुलांनी लक्ष वेधून घेतलं. यश चोप्रा निर्मित या चित्रपटाचं चित्रीकरण नेदरलॅंड्स मध्ये झालं आहे. पूर्वी तो चित्रपट पाहिला तेव्हा असं वाटलं होतं की अशी सुंदर फुलं आणि बागा केवळ परदेशातच आहेत. पण नंतर जेव्हा काश्मीरला जाण्याचा योग आला, तेव्हा श्रीनगरमधील दल सरोवराजवळील इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप्स गार्डन पाहण्याचे भाग्य लाभले.
ट्युलिप्सची फुलं त्यांच्या तेजस्वी रंगछटा आणि नाजूक पाकळ्यांनी आपल्याला आकर्षित करतात. या देखण्या बागा आणि फुले पाहण्यासाठी दरवर्षी मार्च, एप्रिलच्या महिन्यात इथे गर्दी करतात. खरंतर ट्युलिप्स बागा ही पूर्वी फक्त युरोपची मक्तेदारी होती. पण भारताने त्याच्या वैविध्यपूर्ण हवामान, संशोधन आणि भौतिक समृद्धी याच्या जोरावर भारतातही या बागा यशस्वीरीत्या फुलवल्या आहेत. या बागा म्हणजे केवळ आकर्षक फुलांचे मळे नाहीत, तर ते निसर्ग, संस्कृती आणि पर्यटनाचे उत्सव साजरे करणारे जिवंत कॅनव्हास आहेत असे म्हणावे लागेल.
मी ट्युलिप्सही पाहिली आहेत आणि रानफुलेही. तुम्हीही पाहिली असणारच. पण सिलसिला चित्रपटातील या सुंदर ट्युलिप्सचा बागा पाहताना काही विचार मनात आले. तेच आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. रंगीबेरंगी लालभडक तर कधी पिवळी तर कधी हिरवी मनमोहक अशी ट्युलिप्स आपले लक्ष वेधून घेतात. त्यांचा दिमाख, तोरा काही औरच असतो. ट्युलिप्सच्या बागांतून मनाने का होईना फिरताना वाटतं – आयुष्य किती सुंदर आहे! सुगंधाने भरलेलं, रंगांनी नटलेलं. इथं सगळं काही आकर्षक आहे – झगमगती स्वप्नं, भौतिक समृद्धी, आणि सुखद अनुभव.
पण त्याच वेळी कुठेतरी रानात एखादं रानफुलं नक्कीच उमललेलं असतं – नजरेआड, पण निसर्गाशी एकरूप. त्याचं शांत पण लाजरंबुजरं सौंदर्य! आरडाओरड करत नाही, कुठलाही दिमाख मिरवत नाही, मिजास किंवा तोरा नाही. आडवाटेला रानात कुठेतरी त्याचं फुलणं हेच मोठं अप्रूप असतं. त्याची शांतता काहीतरी सांगून जाते. त्याचं फुलणं नीट पाहिलं तर जीवनाचं तत्वज्ञान सांगून जातं.
ट्युलिप्स आणि रानफुलं ही दोन्ही प्रतिकं आहेत…
…… दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ट्युलिप्स म्हणजे बाह्य सौंदर्य, तर रानफुलं म्हणजे अंतर्मनाचा प्रवास. ट्युलिप्स लक्ष वेधून घेतात तर रानफुलं मन! ट्युलिप्सकडे पाहताना नजर बाहेर जाणारी तर रानफुले पाहताना आतमध्ये डोकावणारी. रानफुलं म्हणजे अंतर्मनात उमलणारी शांतता!
तात्कालिक सुखाचं, सौंदर्याचं प्रतीक म्हणजे ट्युलिप्सची आकर्षक फुलं.
…. ट्युलिप्सच्या बागा म्हणजे आयुष्यातली ‘स्थिरता’ – उत्तम नोकरी, सुंदर घर किंवा बंगला, नोकर चाकर, आलिशान गाडी, ऐश्वर्य, चैन आणि आराम आणि सहज उपलब्ध होणारं हक्काचं समाधान. ह्या बागा सुखद वाटतात, आकर्षक असतात. पण त्या इतक्या परिपूर्ण वाटतात की आपल्याला स्वतःला शोधण्याची गरजच वाटत नाही. आपण हरवून जातो त्यात. स्वतःला विसरून जातो.
…. आपल्याला वाटतं आपण सुखी आहोत –बस, यापेक्षा स्वर्ग वेगळा तो काय असेल? पण तो आनंद बाहेरून आलेला असतो. तो थोडा परकाच वाटतो. या बागांमध्ये फिरताना आपण जणू स्वप्नांच्या रंगांत न्हालेलो असतो. चारही बाजूंनी रंग सुगंध आणि समृद्धी!
.. इथं सगळं उठावदार आहे, पण आतलं काही तरी गहिरं हरवतंय.
.. हे जीवन सुंदर आहे, पण कधी कधी बेगडीही वाटतं… कारण इथं फक्त पाहणं आहे — जाणणं नाही.
मला मात्र रानफुलं प्रतीक वाटतात – साधेपणा, संघर्ष, आणि आत्मसुख यांची.
…… रानफुलांना गंध नसतो. त्यांचं रंगसंगतीही ट्युलिप्सइतकी उठावदार नसते. पण रानफुलं जेव्हा एखाद्या दगडावर, किंवा वाऱ्याच्या जोरावर उभी राहतात – तेव्हा त्यांचं अस्तित्वच प्रेरणा ठरतं. विपरीत परिस्थितीलाही टक्कर देण्याची क्षमता ते राखून असतात. कारण विपरीत परिस्थितीतच ती फुललेली असतात. कोणी त्यांना पाणी घालत नाही. त्यांना खत देत नाही, त्यांची देखभाल करत नाही. मला इथे आठवते ती मंगेश पाडगावकर यांची एक सुंदर कविता. ‘ मी फुल तृणातील इवले… ‘
पाडगावकर खरोखरच एक सिद्धहस्त कवी. जीवनावर प्रेम करायला शिकवणारे, निसर्गावर प्रेम करायला शिकवणारे. त्यांच्या विविध कविता आपलं जीवन अन भावविश्व समृद्ध करतात. एक नवीन दृष्टिकोन देतात. थोड्याशा संकटांनी खचून जाणाऱ्या, निराश होणाऱ्यांना ‘ या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ‘ म्हणत जगण्याचा अर्थ अन महत्व ते समजावून सांगतात. तर ‘ श्रावणात घननीळा बरसला ‘ सारख्या कवितेतून निसर्गाकडे पाहण्याचा, त्याचं सौंदर्य टिपण्याचा एक सुंदर दृष्टिकोन बहाल करतात. ‘ मी फुल तृणातील इवले’ ही कविता तर कसं जगावं हे समजावून सांगते असं मला वाटतं. जे काही आपल्याजवळ आहे, त्याचा अभिमान बाळगावा, स्वत्व, स्वाभिमान कधीही विकू नये. समोरची व्यक्ती, शक्ती कितीही बलाढ्य असली तरीही!
‘ मी फुल तृणातील इवले ‘ या कवितेत ते फुलंच जणू आपल्याशी बोलतं आहे, आपलं मनोगत व्यक्त करतं आहे. त्याचं म्हणणं जरी सूर्याला उद्देशून असलं तरी ते आपल्यासाठीही आहेच. ते म्हणतं
जरी तुझीया सामर्थ्याने
ढळतील दिशाही दाही
मी फूल तृणातील इवले
उमलणार तरीही नाही…
…. जगाला प्रकाश आणि जीवन देणारा सूर्य. केवढा तेजस्वी आणि केवढा सामर्थ्यवान! त्याच्या पराक्रमाने जणू दशदिशा उजळून निघतात. पण त्याचा प्रकाश, त्याचा अंगार, उष्णता माझ्यासारख्या छोट्या, नाजूक गवतफुलाला सोसवणारा नाही. त्यामुळे चराचराला जीवन देणाऱ्या हे भास्करा, तुझ्या तेजाने मी उमलणार नाही. ते फुल पुढे त्याला म्हणते आहे….
शक्तीने तुझीया दिपुनी
तुज करतील सारे मुजरे
पण सांग कसे उमलावे
ओठातील गाणे हसरे?
पुढे तेच रानफुलं म्हणते —
रे तुझीया सामर्थ्याने
मी कसे मला विसरावे?
अन रंगांचे गंधांचे
गीत कसे गुंफावे?
…. मला मान्य आहे की तू अत्यंत सामर्थ्यवान आहेस, शक्तिशाली आहेस, तेजस्वी आहेस पण मला सांग की तुझ्या शक्तीपुढे, सामर्थ्यापुढे मी स्वतःला विसरून जाऊ का? मी जरी तुझ्यापुढे क्षुद्र असलो तरी माझे स्वत्व मला कसे विसरता येईल? मला परमेश्वराने, निसर्गाने जी काही शक्ती, सामर्थ्य अन वैशिष्ट्य दिले आहे त्याला मी दृष्टीआड कसे करू? मी जर तुझ्या शक्तीपुढे नतमस्तक होऊन स्वतःला विसरलो तर निसर्गानं मला बहाल केलेलं रंग अन गंधांचं गीत मी कसं गाऊ शकेन रे? ही तर माझीच माझ्याशी प्रतारणा होईल ना!
ही कविता खूप काही सांगून जाते. मला वाटतं गवतफुल हे प्रातिनिधिक आहे. आपल्या सर्वसामान्यांच्या भावना ते व्यक्त करतं. त्याचबरोबर नकळत आपल्याला शिकवणही देतं. कोणाच्या मोठेपणापुढे दबून जाऊन उगाचच नतमस्तक होऊ नका, आपलं स्वत्व, स्वाभिमान कोणत्याही परिस्थितीत गहाण ठेवू नका. लहान मुलांमध्ये लहान होऊन मिसळावे लागते. एखादी व्यक्ती कितीही मोठी असली, कोणत्याही अधिकारपदावर असली तरी जोपर्यंत ती स्वतःचा मोठेपणा बाजूला ठेवून त्या बालकांत सहभागी होत नाही, तोपर्यंत मुलं सुद्धा त्यांच्यात खेळणार नाही. आपण मंदिरात जाताना जशी पादत्राणं बाहेर काढून ठेवतो, तसाच आपला मोठेपणाही बाहेर काढून ठेवता यायला हवा, नम्र होता यायला हवे. तुकाराम महाराज म्हणतात, ‘ नम्र झाला भूतां, तेणें कोंडिले अनंता. ‘
…. स्वतःचा शोध घेणारा माणूस म्हणजे रानफुलच आहे – थोडा अनाकर्षक, थोडा वेगळा, पण खरा. तो माणूस जीवनाच्या प्रश्नांची उत्तरे झगमगाटात शोधत नाही – तो प्रश्नांची मजा घेतो, जीवनाचा आनंद घेतो आणि पडलेल्या प्रश्नांची उत्तरं स्वतः निर्माण करतो.
असं समजू नका की ट्युलिप्सची बाग नकोच किंवा ती चुकीची आहे आणि रानफुलं श्रेष्ठ आहेत. दोन्ही मार्ग योग्य आहेत, दोन्हीही वेगवेगळे पर्याय आहेत– फक्त त्यांच्या दिशा आणि अनुभव वेगळे! दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ‘ श्रेयस ‘ आणि ‘ प्रेयस ‘ मधला हा फरक आहे. प्रेयस गोष्टी आकर्षक असतात, सुख देणाऱ्या असतात परंतु अंतिम हिताच्या त्या असतीलच असे नाही तर श्रेयस गोष्टींचा मार्ग बऱ्याच वेळा खडतर असतो. परंतु अंतिम हित मात्र त्यातून नक्कीच जोपासले जाते. तो प्रगतीच्या उन्नतीचा आणि मुक्तीचा मार्ग असतो. आपण श्रेयस निवडायचे की प्रेयस याची अंतिम निवड आपलीच!
ट्युलिप्स आपल्याला दिलासा देतात. मन रिझवतात पण कधीतरी, जेव्हा आपण शांत एकटं बसतो, तेव्हा एक आवाज आतून हळूच ऐकू येतो –
.. “ही सुंदर बाग आहे खरी, पण मी कोण आहे? माझं अंतिम ध्येय हेच आहे का? “
त्याच प्रश्नाच्या शोधात आपण त्या रानात शिरतो – काट्यांतून, दगडांतून, आणि नकळत एक रानफुलं आपल्या आत उमलतं.
…. ट्युलिप्स आपल्या आयुष्याला सौंदर्य देतात, पण रानफुलं आपल्या आत्म्याला स्पर्श करतात.
आजच्या जगात, जेथे आपल्याकडे खूप काही भौतिक समृद्धी आहे, जिथे आपण हरवून गेलो आहोत – तिथेच आपल्याला स्वतःचं अस्तित्व शोधण्याची आवश्यकता जास्त आहे. अशी खूप उदाहरणं आहेत की ज्यांनी फुललेल्या ट्युलिप्सच्या बागा सोडून रानफुलांची वाट निवडणं श्रेयस्कर ठरवलं. तुकाराम महाराजांना त्यांच्या पिढीचा सावकारीचा व्यवसाय चालवून मजेत आरामात राहणं सहज शक्य होतं परंतु त्यांनी ते नाकारून आत्मशोधाची वाट निवडली. भक्तिमार्ग निवडला आणि अंतिमतः लोकांचेही आपल्या उपदेशाने कल्याण केले. बाबा आमटे आपल्या वकिलीच्या व्यवसायात भरपूर पैसा कमवून आरामात जीवन घालवू शकते असते परंतु त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचा खडतर मार्ग निवडला. तीच रानफुलांची वाट असते.
ज्यांना स्वतःला शोधायचं आहे, त्यांना ट्युलिप्स नव्हे — रानफुलंच बोलावतात.
.. एक वाट नेहमीच सरळ आणि सुंदर असते. पण एक सुंदर इंग्रजी वाक्य आहे…
“In the quiet bloom of wildflowers lies the strength to face the storms tulips cannot endure. “
.. दुसरी वाट असते वळणावळणाची, काट्यांनी भरलेली — पण त्या वाटेवरचं गाणं आपलं असतं.
म्हणून या रंगीबेरंगी आयुष्यात एखादं क्षणभर थांबावं,
यू ट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामवर न जाणो काय काय नित्य नवीन सामोरं येतं. अशीच ही समोर आलेली पोस्ट… त्यात मोठ्याशा लॉनवर तानपुरा, तबला, हार्मोनियम अशी वाद्यं आणि वादक गायक दिसले आणि मी थांबलेच त्या लॉनवर तिथे त्या सर्वांसाठी उत्सुक.. ऑनलाईन श्रोता होऊन… ते सर्व कलाकार लॉनवरच्या बैठकीवर वाद्य जुळवणीत, माईक टेस्टिंग मधे मग्न… समोर जरा उंचसं, शुभ्र आसन… मुलायम, साधं पण स्वच्छ, तलम, काळजीनं केलेलं आणि त्यावर विराजमान कुणी स्वामीजी.. तेजस्वी, तपस्वी, शांत, आतल्या स्वरांशी संवाद सुरू असणारे.. त्या खऱ्या खोट्या शिष्यगणांच्या गर्दीत असूनही एकटे… स्वतः स्वतःशी रमलेले… मला नाव, पंथ, धर्म कशाचीच उत्सुकता नाही… नसतेच… ओढ होती ते शब्द, स्वर ऐकायची…
ते बहुधा सत्संग शिबीर वगैरे असावं… एखाद्या निसर्गरम्य शांत जागी… गर्दी गडबडीपासून दूर कुठेतरी झालेलं… समारोपाकडे आलेलं… म्हणून ती आजची गायन सेवा…
स्वामीजी ती वाद्य जुळवणी पण ऐकत असतात… अचूक स्वराला मान डोलावंतात… ते उत्तम स्वर ज्ञान असणारे… ते मन लावून, डोळे मिटून ऐकतात… स्वरांशी एकरूप होऊन ध्यानात असावे असे… अगदी साधेसे स्वच्छ शुभ्र कपडे.. तेजासारखेच. कसला डामडौल नाही… आपल्या साधनेचा देखावा नाही… मी पणाचा तर लवलेशही नाही… त्यांच्याबद्दलच्या आदरानी मन भरून येतं माझं…
त्या हिरवळीवर अनेक भक्तजन… त्यांचे भारी कपडे, ऐटीत वावरणं, बसणं, महागडे फोन, अंगठ्या, कडेच्या रस्त्यावरच्या त्यांच्या महागड्या गाड्या… याचंच प्रदर्शन. आपण स्वामीजींच्या फार जवळचे आहोत हे ठसवण्याचा प्रयत्न… तर काही श्रद्धाळू, साधे भोळे… आधी त्या प्रवचनासाठी आणि आता स्वरांसाठी उत्सुक… जरा अंतरावर आपलं स्थान ओळखून बसलेले… ही शिष्यवर्गातली कॅटॅगरी चटकन जाणवतेच… त्या काहिंची दृष्टी फक्त स्वामीजींवर… काहिंची स्वामीजी आणि कॅमेऱ्यावर… आपण दिसतोय ना ही काळजी घेऊन जागा पकडलेली… एकूणच गाणं कळंत किती असेल शंकाच वाटावी अशी एक्सप्रेशन्स… तरीपण स्वामीजी दाद देतील तिथे दाद द्यायला हे तयार आणि हे सगळं स्वामीजी बघतायत ना याकडे एक डोळा ठेवून… कारण गाणं कळो ना कळो आपण स्वामीजींच्या गुड बुक्समधे पाहिजे… काही त्यांच्या आसनाच्या शेजारी चिकटून. मनानीच पट्ट शिष्य वगैरे ठरवणारे… हातात महागडा मोबाईल समोर आणि चारही बोटात रत्नांच्या अंगठ्या… ते दिसेल कॅमेऱ्यात असं सहजपणानं दिसणंही जमवलेले… सारं बेगडी, पोशाखी, आपण कुणी खास आहोत स्वामीजींचे असा आविर्भाव… असंच मनात असेल तर कशाला हवाय सत्संग, जप, शिबीर, ध्यान… आपण तिथे आहोत हेच तर जाणवून द्यायचंय ना? … आणि तेच तर हवंच आहे दिसायला… गाणं वगैरे दुय्यम आहे…
काही महाभाग तर आता शिबीर बिबीर संपलंय हे पाहून तिथेच व्यवसायाच्या मेसेजला लागलेले… आव मात्र गाणं ऐकण्याचा पण बोटं सरसर उद्याच्या १०च्या मिटिंगच्या योजनेत… कुणा मागे लपत… तर कुणी तरी चक्क जरा पलीकडे लॉनवर लोळलेले… आता हा किती वेळ गातो काय जाणे… मनात हॉटेल, सामान, परतीचं जेवण, उद्या जातांना पहायचे स्पॉट यांची मांडणी सुरु.. खरंतर केव्हाच सुरू झालेली… उगीच अडवायला झालंय खरं…
कुणी कुणी अगदी हलक्या आवाजात फोनवरच लागलेले. अगदी आपण बोलणंच नाहिये असा चेहरा करून.. त्या आलेल्या सर्वांच्यातच श्रद्धा नाही असं नक्कीच नाही… पण फारच थोडे अगदी पूर्णपणे खरे भक्तीमार्गाचे श्रद्धाळू… स्वामींचं अगदी तिथून निघेपर्यंत दर्शन घेत ते दृष्टी लावुन बसतात. स्वरही ऐकतात.. त्या भावात एकरूप होतात. सोबत काही तरी मनात कानात साठवूनच नेणार असतात… शिबीराचं फलित…
काहिंची तर फॅमिली ट्रीपंच असते… ऑन द वे हे शिबीर आणि मग थंड हवेचं ठिकाण… एन्जॉय करायचंय… बरं झालं सत्संग शिबीराच्या, ट्रीपच्या, सुट्टीच्या तारखा जुळल्या.. पुढे हॉटेलही मिळालं योग्य तारखांना ऊत्तम… हवं होतं ते… म्हणून तर मग शिबीरही पण झालं… त्यामुळे ते अगदीच कंपलसरी गाण्याला थांबलेले. कारण उद्या निघायचं पहाटेच्या फ्लाईटनी… इतरांच्या कानावर हे घालून झालंय आधीच… काही रसिक भक्त मात्र खरंच डोलतात… दाद देतात… स्वरात रमतात… गायक वादकांकडे कौतुकानं पाहतात तर काही जण इतर काय करतायत हेच पहात राहतात… ना गाण्यांशी घेणं ना स्वामीजींशी… आता एकदाचे लवकरच निघुया हीच एवढीच भावना…
. तो गायक, ते वादक मात्र भारावलेले त्या महान विभूतीची गायन सेवा करण्याच्या आनंदात… जीव ओतून, गुरूला स्मरून सुंदर गातात. वाजवतात. रंग, रस भरतात मैफलीत… स्वामीजी तृप्त… सुंदर प्रसन्न स्वरांनी चेहऱ्यावर कधी मंद हास्य… तर आर्त स्वरांनी कधी डोळ्यात तरळलेलं पाणी… अशी त्यांची स्थिती… जरी ते स्वरात रमले तरी ते पण जाणंत असतात कोण खरा रसिक, कोण जाणकार, कोण या मांडवाची फक्त शोभा… कोण उसने… कोण सच्चे… कुणासाठी सत्संग हा दिखावा, कुणासाठी अतीव श्रद्धा, कुणासाठी कंपलसरी… कुणासाठी एन्जॉयमेंट…
स्वामीजींना वाटतं, कशाला हे प्रदर्शन? बेगडी मोठेपण… माझ्या आसपास सतत वावरणं… करा ना व्यवसाय… कमवा पैसा… मला तुमची ऐट, पैसा, बडेजावकी नकोच आहे… मला हवी फक्त श्रद्धा, निर्मळ निर्भेळ मन.. हा असा सच्चा भावपूर्ण आर्त स्वर… परमेश्वराला घातलेली आर्त साद… कारण तिथेच भेटेल तो… हा भक्तीचा मार्ग नेईल तिकडे… खाली माना घालून मोबाईल मधे रमणारे महाभाग त्यांना विदीर्ण करतात. हे स्वर नाही का पोहोचत यांच्या कानात, मनात? नाही का ओलावत डोळे? याक्षणी पण हा मोबाईलच जवळचा असेल, व्यवसायच हावी असेल मन, बुद्धीवर तर तीन दिवस सत्संगात काय ऐकलं यांनी? काय ठसलं मनात? थोडावेळ अनेक विचार फेर धरतात… बेचैन, उद्विग्न करतात त्यांना… पण असेही असतातच भक्त जे अंतर्मनातला अमूर्त स्वरही बघतात, ऐकतात, साठवतात ह्रदयात आणि या व्यवहारी जगातही तरतातही…
स्वामीजींना आजवर ती सोबत करणारी तरूण वयातली ती मैफल आठवते… ती मैफल सांगतेकडे नेणाऱ्या भैरवीची… आर्त पण रडवी नाही… बाराही स्वरात नटलेली तरी उद्दाम नाही… जगण्याचं तत्वज्ञान सांगणारी तरी रटाळ नाही… पण साऱ्या श्रोत्यांचे कान, मनं, त्या आर्त सुरेल शब्दांकडे लागलेले… आकंठ तृप्त व्हायला उत्सुक… खरंच.. आज का नाही तसं वाटंत. तेव्हा ही आजची वेडी मशीन्स नव्हती म्हणून? … स्पर्धेचा अतिरेक नव्हता म्हणून? … पैशामागे ऊर फुटेस्तवर धावणं नव्हतं म्हणून? काही मूल्य होती सोबत म्हणून? … तसं तर हवंच असतं ना सारंच जगायला… पण तेव्हा बहुतेकांना स्वरही हवासा होता… शब्दही हवासा होता… बुडत होते ते त्या आनंद रंगात… आणि जगतांना लढंतही होतेच ना.. यशस्वी होते.. मग आता चित्र जरा गडद का? डोळे, मन कोरडे का?
स्वामीजींचा तर तेव्हाही मार्गंच अनोखाच.. ध्यानाचा… त्यांनी तरूणपणी ते स्वर आकंठ अनुभवले अन् संतवचनही… आज मात्र ते स्वर ऐकणारे जरा कमी भेटतात अन् असे काही तरी बेगडी दाखवणारे जास्त
देखावे विदीर्ण करतात त्यांना… विचारांना दूर सारंच अंतराळातून अचानक एक आर्त आलाप कानावर पडतो… थेट मनाच्या गाभ्यात पोहोचतो…
अन् हे विचारांच मळभंच दूर सरकवतो. मग ते त्या तरूण सुरेल भावपूर्ण गायकाच्या, लयदार तबलजीच्या आणि स्वर अलगद टिपणाऱ्या कुशल हार्मोनियम वादकाच्या स्वरात रंगून जातात… साऱ्या सच्चा रसिकांसोबत… जसा काही त्या क्षणी साऱ्यांचा सहज घडतो… सत्संग!!!
☆ माझी जडणघडण… – आबांचे आजारपण – भाग – ६८ ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)
आबांचे आजारपण
स्पाइनल इन्फेक्शन झाल्यामुळे आबांना(माझे सासरे) एका वेगळ्याच प्रकारचा लकवा(paralysis) झाला. सकाळी त्यांना गादीतून उठताच येईना. हातापायातली शक्ती हरवल्यासारखे झाले. आई त्यांच्याजवळ होत्याच. त्यांनी सुहास, श्री, विवेका यांना हाका मारताच सारे आबांभोवती जमले. आबांचे बोलणे अस्पष्ट वाटत होते. अशा परिस्थितीतह त्यांनी श्रीला सांगितले,” दादाला बोलाव. त्याला फोन लाव.”
विलास ने श्रीला” आबांना टॅक्सी किंवा ॲम्बुलन्स करून आहे त्या परिस्थितीत ताबडतोब जळगावला घेऊन ये. मी डॉक्टर सुभाष चौधरींशी बोलतो. ” असे सांगितले. ”
दरम्यान आबांचे नेहमीचे डॉ. कोठारी घरी येउन त्यांना तपासून गेले होते आणि त्यांनीही “यांना जळगावला घेऊन जा” असाच सल्ला दिला.
अमळनेरपेक्षा जळगावला वैद्यकीय सुविधा चांगल्या असल्यामुळे आणि तेथील डॉक्टरांशी आमचे चांगले स्नेहसंबंध असल्यामुळे विलासने दिलेला सल्ला सर्वांना पटला.
दोन तासाच्या आतच श्री एक खास टॅक्सी करून आबांना डॉक्टर सुभाषच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. आई सोबत होत्याच. आम्ही दोघे डॉक्टर सुभाषकडे आधीच पोहोचलो होतो. डॉक्टर सुभाष चौधरी जळगाव मधले एक नामांकित फिजिशियन आणि वैद्यकीय व्यवसायाशी पूर्णपणे समर्पित होते क्लिनीकमधून बाहेर येऊन गाडीतच आबांना तपासले आणि त्यांना ताबडतोब अॅडमिट करून घेतले.
आबांच्या निरनिराळ्या तपासण्या झाल्यावर सांगितले, ”ही न्युराॅलाॅजीची केस आहे. आपण आबांना माझ्या हॉस्पिटलमध्ये काही दिवस ठेवूया. मी संबंधित तज्ञांशी बोलून इथेच व्हिजिटसाठी बोलावतो. काळजी करू नकोस. वेळ लागेल पण यावर उपचार होऊन आबा संपूर्णपणे पूर्ववत होतील यावर विश्वास ठेव. आपल्याला फक्त काटेकोरपणे नियमित औषध उपाययोजना आणि फिजियोथेरेपी घ्यावी लागेल. ”
डॉक्टर सुभाष च्या हातात आबांची केस असल्यामुळे आम्ही तसे निर्धास्त होतो. शिवाय डॉक्टर अनिल कोतवाल, डॉक्टर सतीश गुप्ता या व्यावसायिक तज्ज्ञ आणि मित्रमंडळींकडूनही आम्हाला खूप नैतिक मानसिक पाठबळ मिळाले.
तीन-चार महिन्याचा हा काळ कठीण आणि लक्षात राहण्यासारखा गेला. विलासचा वाढता कामाचा व्याप, माझी नोकरी, मुलींच्या शाळा, अभ्यास, परीक्षा, इतर उपक्रम हे सर्व सांभाळून आबांवरच लक्ष केंद्रित करण्याची ंजबाबदारी पार पाडणे हे आमचं कर्तव्य होतं आणि त्यासाठी मानसिक धैर्य, संयम आणि संतुलन याचे आयुष्यात किती महत्त्व असते त्याची जाणीव त्या काळात झाली. टाईम मॅनेजमेंट- वेळेचे नियोजन एकदा जमले की सारं सुरळीत होऊ शकतं हे अनुभवलं. माझ्याकडे असणाऱ्या मदतनिसांनीही आम्हाला चांगली साथ दिली. मी ऑफिसात जाण्यासाठी थोडी वेळेच्या आधीच निघत असे आणि जाताना वाटेवरच्या हॉस्पीटलमध्ये आई आबांचा नाश्ता जेवण घेऊन जात असे. आई सकाळीच घरी येत आणि अंघोळ वगैरे उरकून पुन्हा दवाखान्यात जात. दिवस रात्र त्या
आबांजवळच असत. मधल्या काही वेळात विलास, माझे दीरही येऊन जाऊन असत.
आबांच्या प्रकृतीत अत्यंत धीम्या गतीने उतार पडत असला तरी सारे काही सकारात्मक होते आणि अक्षरशः युद्धपातळीवर आम्ही सारे आबांना बरं करण्यासाठी सज्ज होतो. या सर्व पार्श्वभूमीवर खोलवर कुठेतरी जाणवणारे प्रवाह मात्र काहीसे विचित्र, अनपेक्षित आणि अचंबित करणारे वाटत होते.
आई सकाळी सकाळीच घरी यायच्या. बऱ्याच वेळा विलास त्यांना आणायला जायचा. कधी कधी त्या रिक्षानेही घरी यायच्या. त्या घरी आल्या की माझा पहिला प्रश्न असे, ” कसे आहेत आबा? रात्री झोप लागली का त्यांना? ”
“ ते चांगले आहेत गं! तुम्ही सगळे आहात ना त्यांची व्यवस्था बघायला मग त्यांचं काय? ते बरेच आहेत. झोपतात ही छान बरं का? माझीच झोप होत नाही. ती लहानशी कॉट, एवढ्याशा जागेत सगळं काही, शेजारच्या खोलीतल्या रुग्णांचे विव्हळणे, औषधांचे वास.. जाऊ दे! ठीक आहे. काहीच विचारू नकोस. चहा करतेस का? दे जरा गरम गरम पटकन. स्नान करून घेते आणि जाते, उशीर नको व्हायला बाई! ”
मला कळायचं नाही आई अशा का कातावल्यात? त्यांचे वैतागलेले बोलणं ऐकून मी जजमेंटल न होण्यासाठी स्वतःला बजावत असे. कदाचित प्रेम काळजी आणि चिंता या भावनिक मिश्रणाचा तर हा परिणाम नसेल ना? असे मला वाटायचे. एकीकडे वाटायचे, ”कधी ना कधी असे प्रसंग कुणाकुणावर येतातच ना? करावं लागतं, यातून जावं लागतं. आणि आईंनी आजपर्यंत काही कमी केलंय का? मग आताच काय झालंय असं? ”पण तरीही याही विचाराच्या आत मला काहीतरी वेगळ्या भावनांची आकृती दिसायची.
एक दिवस मी त्यांना म्हणाले “आई-आबांसाठी रात्रीच्या वेळी आपण एखादा माणूस बघूया का? मी सुभाषला विचारते म्हणजे तुम्हाला घरी येऊन रात्रीची नीट झोप मिळू शकेल. ” तुमच्यासाठी ते जरुरीचे आहे”
“ भलतंच काहीतरी सांगतेस गं! आबांना मुळीच नाही चालणार? मलाच म्हणतील ते, ” कंटाळा आला का माझा तुला? ” जाऊ दे तिकडे. जे चाललंय ना ते बरं आहे आणि मी ठणठणीत आहे बरं का त्यांचं करायला. कुटुंबात आयुष्य गेलंय माझं. असं एवढ्या तेवढ्याला कुणा परक्याची काहून मदत घ्यायची? चहा दे लवकर. ”
आईंशी बोलण्यात, विरोध करण्यात, त्यांना समजावण्यात काहीच अर्थ नाही असे वाटून मी गप्पच राहायचे पण ऑफिसमध्ये काम करताना त्यांच्याशी होणारे हे सकाळचे संवाद माझ्या मनात ठणठणत राहायचे. ”
एक दिवस पोहे खाताना नेमका एक केस आला, त्यांचं लुगडं बाईने नीट झटकून, काठ सरळ करून वाळत घातलं नाही, कधी चहात साखरच कमी पडली, कधी डब्यातली पोळीच वातड झाली, भाजीला चवच लागली नाही वगैरे अनेक बारीक-सारीक गोष्टीवरून त्या नाराजी व्यक्त करायच्या. या साऱ्यांकडे मी पूर्णपणे दुर्लक्षच करायचं ठरवलं होतं. कदाचित माझ्यापाशी मन मोकळं करण्याचा हा मार्ग असेल त्यांचा.
विषय बदलावा म्हणून कधीतरी मी त्यांना विचारलं,” आजची कारल्याची भाजी आबांनी खाल्ली का? आवडली का त्यांना?”
“चाटून पुसून खाल्ली बरं का? तुझ्या हातचं कार्लसुद्धा त्यांना कडू लागलं नाही. भेटायला येणाऱ्या सगळ्यांना तुझं कौतुक किती करू नि किती नको असं होतं त्यांना. सर्वांना सांगतात,” माझी मुलगीच आहे हो ती! घरचं, बाहेरचं आणि आता हे माझं असं सांभाळून ती कशी हसतमुख असते!”
या क्षणी मला खदखदून हसू येत होतं. कुठेतरी एखादं हट्टी, रुसून बसलेलं एक लहान मूल मला त्यांच्यात दिसायचं. खरं म्हणजे अशा प्रसंगी आईंच्या काहीशा विक्षिप्त वागण्यामागची मानसिकता समजून घेण्याचा मी प्रयत्न करत होते.
रोज एक नवा प्रश्न आई माझ्यापुढे उभा करायच्या. एक दिवस म्हणाल्या आमच्या शेजारच्या रूममध्ये ना एक आजारी बाई आहे तिला काय व्याधी आहे कोण जाणे पण अख्खा दिवस तिचा नवरा तिच्या उषा पायथ्याशी असतो. परवा तर त्या माणसाने चक्क तिची वेणी घातली, पावडर कुंकूही केलं. मी म्हणते,” किती भाग्याची ना ती बाई.” उद्या मला काय झालं तर?”
“कशाला आई असं म्हणता? आबांचं खूप प्रेम आहे बरं तुमच्यावर, प्रत्येक क्षणी त्यांचं तुमच्या वाचून अडतं आणि म्हणूनच त्यांना सतत तुम्ही जवळ असावं असं वाटतं.”
महिना दीड महिना उलटून गेला असेल हळूहळू आम्हा सर्वांनाच या वेगळ्या रुटीनची ही सवय होऊन गेली. सुरुवातीला वाटणारी दमछाक अंगवळणी पडत गेली. आता आबांच्या प्रकृतीतही बरीच सुधारणा दिसू लागली. आई कधी शांत, अबोल, समंजस तर कधी चिडलेल्या, उसळलेल्या अशा मानसिक चढ-उतारात असत. बऱ्याच वेळा मला त्यांची कणव यायची. दिवस रात्र हॉस्पिटलची ती ऊर्जाहीन जागा, रात्रीची जागरणं, आमचं ब्रुक बाॅन्ड कॉलनीतलं घर- त्यांना हवी ती मोकळीक मिळायची नाही. मोठ मोठ्या खोल्यांतून वावरण्याची सवय असलेल्या त्यांची खूप कुचंबणा व्हायची. त्या होमसिक व्हायच्या. त्यांना अमळनेरचं घर, तिथला सारा त्यांच्या संसाराचा व्याप, गल्लीतल्या गावातल्या त्यांच्या आयाबाया, एकंदर ते सारंच वातावरण इथे नसल्यामुळे त्या बेचैन वाटायच्या. शिवाय यापुढे आबांची प्रकृती नक्की कितपत पूर्ववत राहील याची एक अदृश्य भीती स्वरूप काळजी त्यांच्या मनाला कुरतडत असणार.
एक दिवस हताशपणे त्या म्हणाल्या, “काय सांगू तुला? एकत्रात सारं आयुष्य याची त्याची उठबस करण्यात गेलं. आबा तर कामाच्या निमित्ताने फिरतीवरच असत. आता जरा कुठे आयुष्य निवांत होत चाललं होतं! म्हटलं! ” आता सुनांवर जबाबदारी टाकून गंगोत्री जन्मोत्रीला जाऊन येऊ. चारधाम यात्रा करू, खूप राहून गेलं गं जग पाहायचं!”
त्यावेळी मला असं मुळीच वाटलं नाही की एखाद्या बाईचा नवरा असा गादीवर असहाय्य असताना तिने असा विचार करणे हे बरोबर आहे का?
त्या क्षणी मला समोर बसलेल्या माझ्या सासूबाईंच्या पलीकडचं एक दबलेलं स्त्रीमन हुंदके देत असलेलं जाणवलं. खरंच त्यांचंही तर वय उताराला लागलं होतं. वरवर त्या कितीही बोलू देत पण आजारी आबांची सेवा करण्यात त्यांनी कुठलीही कसर ठेवली नव्हती. अनेक रात्री त्या शांत झोपल्याही नव्हत्या. त्यासाठी त्यांना दिलेले पर्यायही त्यांनी स्वीकारले नव्हते. एकाच वेळी त्यांनाच सर्व करायचं होतं आणि कर्तव्याचं हे ओझं त्यांना पेलवतही नव्हतं.
मी माझ्या अधिकारात एक दिवस एक निर्णय घेतला. आईंना म्हटलं, ” नटवर टॉकीजला खूप सुंदर मराठी चित्रपट लागला आहे. तुमची आवडती सुलोचनाही त्यात आहे. मी तिकीटं काढली आहेत. दुपारी दवाखान्यात तुम्हाला घ्यायला मी येईन. विलासच्या ऑफिसमधल्या शिपायाला मी आबांपाशी बसायला सांगितले आहे आणि हे बघा हे ठरलेलं आहे. आईंनीसुध्दा नाही, नको, लोक काय म्हणतील असं काहीच म्हतलं चित्रपट खूपच सुंदर होता मला आता नाव आठवत नाही पण चित्रपट कौटुंबिक अजिबात रडका नव्हता. गमतीदार वास्तविक आणि मनोरंजक होता. मध्यंतरात मी आईंसाठी कुल्फी आणि कागदाच्या पुडीतले भाजलेले शेंगदाणे घेतले. मोगऱ्याचा गजरा ही घेतला. आई या सर्वात मनापासून रमल्या होत्या. त्यांना असं रीलॅक्स्ड बघून मला बरं वाटलं.
चित्रपट सुटल्यानंतर आम्ही बाहेर आलो तेव्हा दिवस लहान असल्यामुळे अंधारलं होतं. आई लगेच म्हणाल्या, “काय ग बाई किती उशीर झाला! आबा बरे असतील ना? त्यांचं काही दुखलं खुपलं ना तर माझ्याशिवाय ते कुणाला सांगणार नाही बरं का? माझीच वाट पाहत राहतील. काहीतरीच बाई तुझं पिक्चरला जाणं वगैरे! चल लवकर, मला सोड तिकडे.. ”
आज हे सगळं लिहिताना माझं मन खूप भरून आलंय. “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे” या उक्तीचा अर्थ आता चांगलाच समजतो. ऐंशीच्या उंबरठ्यावर असताना, तेव्हा न कळलेले, न जाणवलेले, विचित्र वाटलेले अनेक अर्थ आता स्पष्टपणे उलगडतात आणि वाटतं “कोणी चुकीचं नसतं. परिस्थिती कारण असते. मनाच्या डोहात उंच लाटा उसळतात त्यांना नेहमीच कर्तव्याचे किनारे नाही रोखू शकत. आज आईंच्या जागी मी जेव्हा स्वतःला ठेवून बघते तेव्हा त्यांच्यातल्या घायाळ स्त्री मनाची मी काही अंशानी तरी दखल घेऊ शकते.