मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आई-वडील म्हणजे ‘शबरी’ नाहीत… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ आई-वडील म्हणजे ‘शबरी’ नाहीत… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

आई-वडील म्हणजे ‘शबरी’ नाहीत – –

“आई वडिलांना आपल्या मुलांबरोबर ‘शबरी’ सारख वागायची गरज नाही. ” •••••

काल ताईच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून आम्ही सर्व गेलो होतो. आम्हा सर्वांना एकत्र यायला, काही तरी कारणच लागत. कधी तिच्या घरी, कधी माझ्या कडे, नाही तर बाहेर जायचे. दोन चार तास सर्व एकत्र बसले, गप्पा मारल्या, जेवलो, की सर्व Recharge होतात. आमच्या सारख्या ज्येष्ठांसाठी तर ही करमुणकच आहे. या आमच्या जमावडयात चार लहान मुलेही असतात त्यांची हुशारी बघून, मोबाईल चे ज्ञान बघून तर आश्चर्य वाटत. आमचे मोबाईल चे प्रश्न ते सहज सोडवतात. त्यांचे मोबाईल संदर्भातील ज्ञान बघून त्यांची Tuition च लावावी का?? असं मला नेहमी वाटतं. कोणत्याही कारचे चित्र दाखवा लगेच ओळखतात. गम्मत वाटते. ••••

ताईचा नातू ‘अनय ‘ तिसऱ्या वर्गात आहे. ताईने अनयला आवाज दिला, •••• म्हणाली, ••• अरे अनय, आज लिंब आणायची राहूनच गेली. जाऊन आणतोस का??

“आणतो आजी.” असं म्हणून लगेच पिशवी घेऊन अनय तयार झाला. •••

आजी म्हणाली, ••••” अनय, लिंब, कोथींबीर व उदया तुझा डबा आहे ना, मग पाव किलो भेंडी घेऊन ये. ” ••••

अनयने बाबांकडून पैसे घेतले व थोड्यावेळातच सर्व घेऊन आला. •••

अनय म्हणाला, •••••आजी, दोन रुपयाचे एक लिंबू होत, पाच रुपयाला तीन देत होता. म्हणून मी तीन लिंब आणली. ••• भेंडी दुसऱ्या दुकानात चांगली दिसली, म्हणून तेथून अर्धा किलो घेतली. ••••लिंब, कोथिंबीर, भेंडीचा सगळा हिशोब सांगून शंभरातून उरलेले पंचेचाळीस रूपये त्याने बाबांना परत दिले. •••••

त्याचा असा चोख व्यवहार बघून सर्वांना नवलच वाटले. सर्वांनी कौतुक केले. अनय चे व त्याच्या आई बाबांचे. आजी आजोबांचे. •••

अरे व्वा!!! कौतुक आहे. पूर्ण काम अगदी चोख केले. व्यवहार ज्ञान छान आहे. •••••

अजय म्हणाला ••••हो!! आम्ही त्याला छोट्या मोठ्या कामांसाठी बाहेर पाठवतो. पैसे हातात देतो. सुरवातीला गडबड व्हायची. एकदा पैसे दिले, आणि भाजी घ्यायला विसरला. एकदा जास्त पैसे दिले व उरलेले पैसे घ्यायला विसरला. आता मात्र व्यवस्थित काम करतो. ••••

आम्ही त्याच्या फीस चे पैसे पण त्याला देतो. पैसे सांभाळून नेणे, जमा करणे, रसीद चेक करून घेणे म्हणजे रसीदवरील amount, date, सही सर्व चेक करणे व घरी येऊन फाईल मधे व्यवस्थित ठेवतो. ••••

वेगवेगळे अनुभव आले, घटना घडल्या. त्यावरून आम्ही त्याला शिकवत गेलो.. योग्य सरळ रस्ता दाखवत गेलो. अभ्यास नोकरी हे तर होईलच. परंतु सर्व साधारण काम करता आली पाहिजेत. व्यवहार ज्ञान असले पाहिजे. ••••

धोका लहानपणी मिळाला तर त्याचे प्रमाणही कमी राहील. पण अनुभव नेहमी साठी होईल. सतर्कता वाढेल. •••

सुरवातीला एकदा पन्नास रुपये त्याच्या हातुन पडले, हरवले. मी पुन्हा त्याला पन्नास रुपये दिले, व तेच काम करायला सांगितले. त्यानंतर मात्र त्याने कधीच पैसे हरविले नाही. पन्नास रुपयात ही शिकवण मिळाली त्याला. खूप झालं. ••••

पैशाचे व्यवहार आलेच पाहिजे. उगीच कोणाचे जास्तीचे पैसे ठेवायचे नाही. आपले पैसे बरोबर परत घ्यायचे. हे शिकणे गरजेचे आहे. हा सर्व सवयींचा भाग आहे. एकदा का चांगल्या सवयी लागल्या तर पूढे प्रोब्लेम्स येत नाही. घरातील सदस्यांचा आपापसात संवाद असला तर मुलं खूप गोष्टी सहज शिकतात. चांगल्या गोष्टी शिकविणे हे आपल्यावरच अवलंबून आहे. ••••

माझ्या मते अभ्यासात दोन मार्क्स कमी चालतील, पण जनरल स्मार्टनेस

पाहिजे. या जगात फूकट काहीच मिळत नाही. जेथे फूकट वस्तू दयायची लालच दाखविली जाते. म्हणजे कुठे तरी काही तरी शिजतंय. हे ही कळलच पाहिजे. फूकटच्या जाळ्यात अडकायचे नाही. कोणी कशाला तुम्हाला उगीच काही फ्री मधे देईल??

There is no free lunch anywhere. आणि दुसऱ्यांच्या पैशावर नजर का असावी?? जसा माझा पैसा महत्वाचा, तसाच त्याचा पण महत्त्वाचाच आहे. ही समज ठेवावी. फूकट मिळेल, लॉटरी लागेल, येथे पैसे ठेवले तर खूप जास्त intetest मिळेल. ही इच्छा जेंव्हा तुमच्या मनात येते, म्हणजेच तुम्ही भवऱ्यात फसत आहात. हे लक्षात ठेवायला पाहिजे. अशी किती तरी उदाहरण आपण रोज ऐकतो / बघतो. चांगली शिकलेली माणसं या जाळ्यात फसतात. •••

सवयी चांगल्या असल्या, तुमचे स्वतः चे काही प्रिंसिपल्स लहानपणापासून मनात कोरले गेले, तर तुम्ही उगीच भानगडीत पडत नाहीं. सरळ विचार करता येतो. ताठ मानेने जगता येत. काल मी मोबाईल विकत घ्यायला गेलो. महागडा मोबाईल त्याने दाखवला व म्हणाला साहेब लोनवर घेऊ शकता. लगेच अनय म्हणाला, ••••

” बाबा घ्या ना, ••••

मला चान्स मिळाला, त्याला लगेच समजाविले. अरे!! उगीच लोनवर कशाला घ्यायचे?? महागडा मोबाईल काही जरूरी वस्तू नाही. तेंव्हा लोन अगदी आवश्यक गरजेसाठी घ्यायचे असते. उगीच नाही?? •••••

पैसे कमविणे जसे महत्त्वाचे आहे, तसेच पैसे सांभाळणे, वाचविणे हेही महत्वाचे.

आपल्या मुलांचे पूढचे आयुष्य लक्षात घेऊन त्यांना तयार करायचे आहे. ••••

स्पून फिडींग नकोच. ••••

आई वडिलांनी ‘शबरी ‘सारखे वागायची गरज नाही. शबरी ने प्रत्त्येक बोर चेक करून रामाला खायला दिले होते. तसं करायची गरज नाही आपल्याला. त्यांना वेगवेगळे अनुभव यायलाच हवे. आंबट, खारट ची चवही मिळालीच पाहिजे. जेवढी लवकर मिळेल तेवढं चांगलं. ••••

असं केल्याने पूढे धोका होणारच नाही, असं नाही. पण तरी मुलं सावध राहतील. येणाऱ्या काळात धोका देण्याचे नवनवीन प्रकार निघतीलच. सतर्क राहणे. लक्ष देऊन काम करणे हे शिक्षण कामास येईल. ••••

म्हणतात ना, ••••

“सावधानी हटी दुर्घटना घटी ।” ••••

शारीरिक, मानसिक ताकद किती ही असली तरी महत्वाचा असतो तो लगाम. स्वतः वर. मग तो मानसिक असो नाही तर शारीरिक. वेळेवर लगाम लावता आला पाहिजे. शिक्षण म्हणजे एक डिग्रीचा कागद असतो. खरे शिक्षण तर अनुभवातूनच मिळते. ••••

आपली प्रतिमा निर्माण करणं हे तुमच्या हातात असतं. आपले व दुसऱ्यांचे अनुभव बघून /ऐकून चांगले व बरोबर निर्णय घेता येतात. ••••

म्हणतात ना, •••

“आपका शांत और स्थिर दिमाग, आपके जीवन की प्रत्येक लड़ाई का ब्रह्मास्त्र हैं।” ••••

“Quality of life is never an accident. It is the result of your thoughts, habits, intentions, hard work, choices, and most importantly your attitude.” ••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लंडनमध्ये जाम, आला घाम! ☆ श्री विश्वास दाते ☆

श्री विश्वास दाते

? मनमंजुषेतून ?

लंडनमध्ये जाम, आला घाम! ☆ श्री विश्वास दाते ☆

आता ३० वर्षे उलटली तरी अजूनही तो अनुभव स्पष्ट आठवतो. अर्थात आता मागे वळून पाहताना गम्मत वाटते हेही खरे.

गोष्ट आहे ऑक्टोबर १९८६ मधली. फिलीप्समधील कामासंबंधात हॉलंडमधील आईन्धोवेन या गावी दोन आठवड्यांसाठी जाण्याचा योग आला. माझी यूरोपची ही पहिलीच वारी होती. दोन आठवड्यांच्या मुक्कामामुळे मला मधल्या शनिवार रविवारची सुट्टी मिळणार होती.

माझा लहान भाऊ डॉक्टर असून आईसलंड या देशाचा रहिवासी आहे. कर्म धर्म संयोगाने, तो नेमका त्याच सुमारास वैद्यकीय परिषदेसाठी लंडनला येणार होता. मनात आले की मधल्या शनिवार रविवारच्या सुट्टीत लन्डनला जाऊन त्याला भेटावे. एक भाऊ पुण्याहून तर एक भाऊ आईसलंडहून एका तिसऱ्याच देशात भेटण्याचा योग आणायचा विचार ठरला. त्या काळात परदेश प्रवास तसा दुर्मिळ होता आणि त्यामुळे या भेटीचे जास्त अप्रूप वाटत होते.

आता आईन्धोवेन पासून लन्डनला जायचे म्हणजे आधी अडीच तास रेल्वेने आम्सटरडॅमला जायचे आणि तेथून विमानाने लन्डनला पोचायचे. आधी ठरविले नसल्याने लंडनचे तिकीट हॉलंडमधून काढणे भाग होते. हातखर्चाचा भत्ता अगदीच तुटपुंजा असे. तरीही घरून खाण्याचे पदार्थ भरपूर नेले होते त्यामुळे थोडे पैसे वाचत होते. त्याशिवाय मुंबई [त्यावेळीस बॉम्बे ] विमानतळावर भारत सरकारकडून परदेश प्रवासासाठी विकत घेतलेले ५० डॉलर होते. हो तेंव्हा दर डोई फक्त ५० डॉलर विकत घेता येत असत. धाडस करून सर्वात स्वस्त तिकीट काढले. ते तिकीट फक्त त्याच उड्डाणासाठी व त्याच तारखेला वापरता येणार होते. रात्री हॉटेलमधून फोन करून भावाला येत असल्याचे कळविले. मोबाईल फोन अजून अस्तित्वात आले नव्हते.

शेवटी आमची स्वारी शुक्रवारी संध्याकाळी निघून रात्री लंडन विमानतळावर दाखल झाली. मला आठवते त्याप्रमाणे त्यावेळी लंडनला वेगळा विसा लागला नव्हता. विमानतळावर परतीच्या अटीवर लंडनमध्ये शिरण्याची परवानगी मिळाली. काहीच माहिती नसल्याने विमानतळावरून एका स्वस्त हॉटेलची खोली निवडली. एजंट कडून हॉटेलचा पत्ता लिहून घेतला आणि भाड्याची गाडी [टॅक्सी] करून हॉटेलकडे निघालो. १९८६ च्या सुमारास डॉलर साधारण साडेबारा आणि पौंड एकोणवीस रुपयांना असल्याने [ आणि पहिलाच परदेश प्रवास असल्याने ] टॅक्सी मीटरच्या प्रत्येक उडीबरोबर माझी धडधड वाढत होती. हॉटेलवर पोहोचल्यावर हुश्श झाले.

शनिवार अख्खा दिवस आणि रविवार दुपारपर्यंतचा वेळ भावाच्या बरोबर आठवणींना उजाळा देत, गप्पा मारण्यात, फिरण्यात, खाण्यात आणि लंडन बघण्यात कधी गेला ते समजले पण नाही. दुपारी दोनच्या सुमारास परतीचे वेध लागले. भावालापण मित्राकडे जावून उद्याच्या परिषदेची तयारी करायची होती. परतीचे विमान संध्याकाळी साडेसातला होते. भावाने सुचवले की लंडनमधील बस सेवा अतिशय उत्तम आहे. हातात वेळ पण आहे तर तू बसने विमानतळावर जा. शिवाय जाताना अजून थोडे लंडन दर्शन पण होईल. येताना दिलेले घाम आणणारे टॅक्सी भाडेपण आठवत होते. त्याच्याशी सहमत झालो. गळाभेट केली आणि त्याने मला योग्यत्या बसमध्ये चढवून दिले. चांगले चार पाच तास हातात होते. सम्पूर्ण कार्यक्रम इतका छान पार पडला होता त्यामुळे पूर्णपणे निवांत होवून बाहेरील देखावा बघत बसलो. पुढे काय वाढून ठेवलं होते त्याची कल्पनाही नव्हती.

माझ्या अंदाजाप्रमाणे विमानतळापासून साधारण ३-४ किलोमीटर अंतरावर पोहोचल्यावर अचानक बस थांबली. सुरुवातीला मधुन मधुन थोडी पुढे जात होती. मी पण मनातल्यामनात हसत होतो की लंडनमध्येही ट्राफिक जाम होतात.

काही वेळाने मात्र वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अर्धा तास असाच गेल्यावर प्रथमच माझ्या मनात कुशन्केची पाल चुकचुकली. मिनिटा मिनिटा गणिक कधी समोर साचलेल्या वाहतुकीकडे तर कधी घड्याळाकडे बघत होतो. अशावेळी घड्याळ जास्त जोरात पुढे जात असल्याचा अनुभव येऊ लागला. साडेपाच वाजून गेल्यावर माझी धडधड अजूनच वाढली. जाम सुटायची काहीही लक्षणे नव्हती. सहा वाजले. साडेसहा वाजले. विमान सुटण्याआधी निदान एक तास आधी तेथे पोहोचणे आवश्यक असते. तीही वेळ टळून गेली. अचानक आठवले कि माझे परतीचे तिकीट फक्त त्याच उड्डाणासाठी व त्याच तारखेला वापरता येणार होते. शिवाय दुसरे तिकीट काढायला खिशात पैसे तरी कुठे होते. अखेरीस साधारण सव्वासात वाजता बस हळू हळू निघाली आणि घामाने थबथबलेला मी साडेसातला विमानतळावर उतरलो. मनातल्या मनात, कधी नव्हे, ते देवाची प्रार्थना केली की विमान सुटण्यास विलंब झालेला असूदे.

त्या काळात चेक इनची क्रिया आजप्रमाणे अजिबात अवघड नव्हती. घाबरत घाबरत चेक इन काउंटरवर तिकीट दाखवले. तेथील बाईने माझ्याकडे जरा विचित्र नजरेने पहात सांगितले की माझे विमान आधीच सुटले आहे. मला माहीत होते की रविवारी संध्याकाळी जवळजवळ दर अर्ध्या तासाने लंडनहून आम्सटरडॅमला विमाने जातात. मी जरा धीर करून तिला विचारले की याच तिकिटावर मी पुढच्या उड्डाणाने जावू शकतो का? आता मात्र त्या बाईने माझ्याकडे जास्तच विचित्र नजरेने पहात सांगितले की “तुझे तिकीट स्वस्तातले आहे आणि त्यामुळे ते आता वाया गेले आहे. तू नवीन तिकीट खरेदी कर आणि खुशाल प्रवास कर. ”

मी पुन्हा एकदा प्रयत्न म्हणून तिला मी किती लवकर निघालो होतो, रस्त्यात झालेला वाहतूक खोळंबा व त्यामुळे मला झालेला विलंब, माझी उद्याची मीटिंग, लंडनला कोणीही ओळखीचे नसणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझी आर्थिक चणचण याबद्दल सांगून तिच्या मदतीची अपेक्षा केली. मला वाटते काउंटरवर फारशी गर्दी नसल्याने किंवा कुतूहलापोटी तिने माझे रडगाणे ऐकून घेतले असावे. पुन्हा एकदा पण जास्त ठामपणे तिने मला ऐकवले की “तुझे तिकीट स्वस्तातले आहे आणि त्यामुळे ते आता वाया गेले आहे. तू नवीन तिकीट खरेदी कर आणि खुशाल प्रवास कर. तुला मदत करणे माझ्या अखत्यारीत नाही. ” 

मी पण तिला सांगितले की मी सांगितलेली सर्व परिस्थिती सत्य आहे आणि मला मदत न मिळाल्यास येथेच विमानतळावर झोपावे लागेल. तिला वाटले असावे की मी तीकिटाचे पैसे असूनही ते वाचवायचा प्रयत्न करतोय. माझ्याकडे पैसे तर नव्हतेच आणि क्रेडीट कार्ड तर माहित पण नव्हते. तिने माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून दुसरे काम सुरु केले.

पायाखालची जमीन सरकणे या म्हणीचा शाळेत असताना वाक्यात उपयोग केला होता पण प्रत्यक्ष प्रत्यय तेंव्हा आला. दुसरे दिवशी सोमवारी सकाळी नऊ वाजता आईन्धोवेनमध्ये असलेली महत्वाची मीटिंग आठवली. मी त्या मिटींगला उपस्थित असणे अत्यावश्यक होते. माझ्या अनुपस्थितीमुळे होणारा मीटिंगचा फज्जा डोळ्यासमोर आला. पहिल्याच परदेशवारीमध्ये कंपनीच्या मुख्य कार्यालयात होणाऱ्या नाचक्कीचे चित्र पुन्हा पुन्हा समोर येऊ लागले. “खिशात पुरेसे पैसे नसताना लंडनला जायचा आगावूपणा तुला कोणी सांगितला होता? ” असे सहकारी लोकांचे मानभावी प्रश्न ऐकू येऊ लागले. भाऊ त्याच्या मित्राकडे लंडन बाहेर गेल्याने त्याच्याशी संपर्क साधणेही अशक्य होते. लंडनमध्ये माझ्या ओळखीचे दुसरे कोणीही नव्हते. रविवार असल्याने कंपनीतील सर्व सहकारी त्यांच्या घरी असणार आणि माझ्याकडे कोणाचेही घरचे फोन नंबर नव्हते. ब्रम्हांड आठवणे म्हणजे काय असते त्याचे प्रत्यंतर आले. मती गुंग झाली. दरदरून घाम सुटला.

माझ्या कह्यात जे करणे शक्य होते ते करून झाले होते. आता तिला माझी परिस्थिती पटवण्यासाठी एकच गोष्ट माझ्या हातात होती. ठामपणे मी त्या काउंटरपासून समोर पण काही अंतरावर तिला दिसत राहील अशा एका खुर्चीत ठिय्या ठोकला. साधारण दर अर्धा तासाने आम्सटरडॅमला जाणाऱ्या पुढील विमानाची घोषणा होत होती. त्यागाणिक माझी निराशा, हतबलता आणि घाम वाढत होते पण निश्चयाने तेथेच बसून राहिलो. मी समोरच बसलेला असल्याने, ती बाई मधून मधून माझ्याकडे कटाक्ष टाकीत होती आणि लक्ष न दिल्यासारखे दाखवीत होती. साधारण अडीच तास मी देहधर्म विसरून एका जागी बसून होतो. घड्याळाचे काटे दहाच्या पुढे गेल्यावर मात्र माझ्या निश्चयाची सत्व परीक्षा सुरु झाली कारण आम्सटरडॅमला जाणारे शेवटचे उड्डाण साडेदहा वाजता होते.

अचानक माझे ग्रह पालटले असावेत आणि मी ज्या उद्देशाने तिच्या समोरच बैठक ठोकली होती त्याला फळ आले. अखेरीस त्या बाईला खात्री पटली असावी की हा इसम सांगतोय ते खरे असणार. अथवा तिला स्त्रीसुलभ दया आली असावी. तिने मला खूण करून बोलावून घेतले आणि म्हणाली की “बघते काही करता येते का. रविवार संध्याकाळी सर्व उड्डाणे पूर्ण भरून जातात. ” मला आशेचा किरण दिसू लागला आणि तिचे केविलवाणे आभार मानले.

पुढील पाच मिनिटामध्ये घड्याळ जणू फार फार हळू चालत होते. ती कोणालातरी फोन करत होती आणि माझी उत्कंठा वाढत होती. अखेरीस संध्याकाळपासून प्रथमच चांगले हसून तिने सांगितले की सुदैवाने शेवटच्या उड्डानात एक जागा मोकळी असल्याने मला घेउन जाण्याची परवानगी मिळाली आहे. मला तर ते शब्द देव वाणी सारखे वाटले व ती बाई एखाद्या कल्पनेतल्या देवी सारखी दिसू लागली. पुन्हा पुन्हा तिचे आभार मानत मी विमानाकडे धावत सुटलो आणि एकदाचा मिळालेल्या आसनावर जावून बसलो. कित्येक तासानंतर प्रथमच माझा घाम कमी होवू लागला.

मंडळी, त्यापुढची कहाणी सुलभ होती. रात्री अडीचच्या सुमारास आईन्धोवेन च्या हॉटेल वर पोहोचलो. सोमवार पासून सर्व कामे व्यवस्थित पार पडली. मात्र अजुनही आठवतो तो “लंडनला जाम [दोन्ही अर्थानी – ठप्प वाहतूक आणि भरपूर ] आला घाम!”

 

© श्री विश्वास दाते 

संपर्क –  चिन्मय अपार्टमेंट, 54, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे 411038 मो +९१ ९८५००३५३६२, vishwasdatye@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाबा… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

??

☆ बाबा… ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

प्रल्हाद दिगंबर पिंपुटकर – माझे बाबा.

मी शाळेत असतानापासून आठवतात ते कडक शिस्तीचे बाबा. संध्याकाळ झाली की देवासमोर दिवा प्रज्वलित करणारे आणि व्हरांड्यात फेऱ्या मारत शुभं करोति, रामरक्षा म्हणणारे, आणि त्यांच्याबरोबरीने मला म्हणायला लावणारे.

फार देव देव करायचे नाहीत ते खरंतर, पण नित्य पूजा आवर्जून करायचे, मालाडला बाबा बेलसरे यांच्याकडे अधून मधून जायचे, आईबरोबर पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या माधवबागेतही जाणं व्हायचं त्यांचं, पण नित्यनेम असा काही नसायचा, कोणते गुरू वगैरे केले नव्हते त्यांनी. पण धार्मिक नक्की होते ते. मला अथर्वशीर्ष त्यांनीच शिकवलं, त्यांच्या मित्रांकडे सहस्त्रावर्तनासाठी अनेकदा जायचो.

आपल्या आई वडिलांवर, गावावर निस्सीम प्रेम करणारे. आजी कॅन्सरमधून बरी होऊन घरी आली, गोरेगावच्या अरुंद जिन्यातून स्ट्रेचर येऊ शकतं नव्हता. कोणाची वाट न पहाता, अक्षरश: लहान बाळासारखं आजीला कडेवर उचलून घेऊन घरी आले होते ते.

तितकंच प्रेम होतं गावच्या जमीनीवर. आर्थिक कारणांनी त्यांना मुंबईत नोकरी करावी लागली, पण निदान मी तरी शिकून गावी जावं, शेती करावी हे त्यांचं स्वप्न. आणि म्हणूनच, मला शेतकी कॉलेजात – हॉस्टेलमध्ये पाठवण्याची जोखीम उचलली त्यांनी. दहावी, बारावी झालं तरीही तसा बालच होतो मी, कदाचित एकुलता एक असल्याने adjustment करणं मला माहित नव्हतं, तापट होतो. पण मी शेती विषय शिकलो तर आधुनिक शेती करू शकेन, या ध्येयाने त्यांनी मला शेतकी कॉलेजला धाडलं.

… पुढे मी शेती विषयातच MSc न करता, म्हैसूरला अन्न प्रक्रिया शिकायला जाणार म्हटल्यावर आधी खट्टू झाले ते, पण मग त्याच वेळी globalisation चे वाहणारे वारे, केंद्र सरकारमध्ये ministry of food processing ची झालेली स्थापना आदि गोष्टींनी ते सुखावले.

त्यानंतर त्यांच्या बँकेतील जीवलग सहकाऱ्याने इंग्लंडमध्ये शेती व अन्नप्रक्रिया क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षणासाठी रोटरीच्या शिष्यवृत्तीबद्दल माहिती आणली, आणि त्यांच्या स्वप्नांना नवीन पंख फुटले.

रुखरुख एवढीच की दापोली आणि म्हैसूरच्या कॉलेजप्रमाणे, आईबाबा इंग्लंडला माझ्या कॉलेजला नाही आले. इंग्लंडला शिक्षण पूर्ण केल्यावर माझ्यापेक्षा त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. आणि त्याहून जास्त खुश ते झाले जेव्हा मी उंबरगावला शेती करू लागलो तेव्हा.

… त्यांच्या हयातीत ती शेतजमीन विकून पैसा करण्याच्या अनेक ऑफर्स आल्या त्यांना, पण जी वस्तू मी विकत घेतली नाही, जी वस्तू माझ्याकडे वडिलोपार्जित चालत आली आहे, ती विकण्याचा मला हक्क नाही – असं साधंसोपं तत्वज्ञान अंगिकारलेल्या त्यांनी जमीन विकण्याचा विचारदेखील कधी केला नाही.

ते प्रचंड उद्यमशील होते. शनीवारी बँकेची नोकरी अर्धा दिवस असायची, घरी आले की काहीतरी खुडबुड करत रहायचे. आरामखुर्चीच्या जुन्या कापडाच्या पिशव्या करतील, पाण्याच्या गळक्या टाकीला रंग देऊन तिचा shoe rack म्हणून उपयोग करतील, ब्रासोने कडी कोयंड्यांना पॉलिश करत राहतील.

गावी आले तर अंगण झाडून काढतील, हे दुरुस्त कर, त्याला रंग दे, शेतावर चक्कर मार, तिथं तण काढत बस, रोपांना पाणी दे.. सतत काहीतरी काम करत रहायचं.

मी ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेत खजिनदार म्हणून काम केलं त्यांनी, पण त्यामुळे शिक्षकांनी माझ्या चुकांवर पांघरूण घालावं, हे ना त्यांना अपेक्षित होतं ना मंजूर होतं.

प्राथमिक शाळेत नलावडे बाई, कऱ्हाडकर काका, कापरेकर काका या सगळ्यांशी त्यांचं छान जमायचं. मग प्राथमिकच्या पाच पन्नास मुलांना, मुंबईपासून दीडशे किलोमीटर दूर उंबरगावला ते रेल्वेने शाळेची सहलही घेऊन आले होते, मुलांसाठी स्वयंपाकही करू लागले होते, आणि या सगळ्या वानरसेनेला समुद्रात मनसोक्त भिजूही दिलं होतं.

रिझर्व्ह बँकेत ऑफिसर होते ते, पण त्याचा ना कधी त्यांनी माज केला ना कधी गवगवा. कोणाला स्वतःहून कधी सांगितलंही नाही त्यांनी त्याबद्दल.

ते स्वतः संघ स्वयंसेवक होते, अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा मदतीचा हात असायचा, पण श्रेय घेण्याची वेळ आली की मात्र ते सोयीस्कररीत्या गायब झाली असायचे. त्यांच्या प्रोत्साहनाने शाळेतील एक शिपाई परीक्षा देऊन शिक्षक झाला, तेव्हा त्यांच्या डोळ्यातले हसू पाहण्यासारखे होते.

… नातेवाईकांकडच्या मंगलकार्यांपासून आजारपणापर्यंत “प्रल्हाद”चं असणं लोकांना आधार असायचं.

मनस्वी स्वभावाचे होते ते. एखाद्याची एखादी गोष्ट जर पटली नाही, किंवा एखाद्याबद्दल त्यांना वाईट अनुभव आला, की ते तुकडाच तोडायचे, त्या माणसाशी संबंधच तोडायचे.

त्यांच्या काही खोडी – सवयी मात्र अनाकलनीय होत्या. सणासमारंभाला, लग्न प्रसंगाना अथवा कोणाकडे जाताना ते नवे कपडे घालत नसत. “याच्याकडे चांगले कपडे नव्हते, म्हणून ऐनवेळी याला नवे कपडे घ्यावे लागले” असं लोकं म्हणतील, असं सांगून ते जुनेच कपडे घालून कार्यक्रमांना जायचे.

जेवणाखाण्याचे असे त्यांचे काही शौक नव्हते. कावीळ झाल्यानंतर तर मसालेदार, तेलकट खाणं ते कटाक्षाने टाळायचे. फक्त कधी फणसाची भाजी असेल, अथवा डाळिंब्यांची उसळ असेल तर आवर्जून लसणाची फोडणी दिलेलं तेल त्यात ओतून घ्यायचे.

माझं लग्न ठरलं त्या वेळची गोष्ट. जास्वंदीच्या आई बाबांना उंबरगाव, पिंपुटकर हे सर्वथा अपरिचित होतं. ज्या गावात, ज्याला मुलगी द्यायची त्याची नीट चौकशी करावी, म्हणून जास्वंदीच्या बाबांनी उंबरगावात संघाचे प्रचारक राहिलेल्या सुमंतराव “अण्णा” घायाळ यांना माहिती काढायला सांगितलं. त्यांनी गावातील जुने स्वयंसेवक बाबा भागवत यांच्याकडे पृच्छा केली… आणि पट्कन उत्तर आलं, “मकरंद कसा आहे हे माहीत नाही, शिक्षणामुळे तो फारसा उंबरगावला कधी आलाच नाही. पण त्याचा बाप – प्रल्हाद, तो मात्र अतिशय सज्जन आहे. त्याच्या मुलाला तुम्ही डोळे झाकून मुलगी द्या. ” 

माझं लग्न झालं, सूनबाई शेतीत आणि गावात रमणाऱ्या असल्याने सून आणि सासऱ्यांची छान गट्टी जमली. जास्वंदीला, माझ्या बायकोला M80 चालवता यायची, त्यामुळे, बाबा उंबरगावी आले की ती त्यांना रेल्वे स्टेशनवर घ्यायला जायची. मग बाबा, संकोचाने, M80 वर अंग चोरून बसायचे, सुनेला अहो जाहो संबोधायचे. सून आणि सासऱ्यांनी शेतात फुलबाग बहरवली होती.

कॉलेजात गेल्यावर, शिंगं फुटल्यावर अनेकदा वाद व्हायचे माझे त्यांच्याबरोबर. पण मग मी जसा मोठा होत गेलो, अनुभव येत गेले, त्यांच्या सांगण्याची प्रचिती येत गेली, तसे ते कसे माझे बेस्ट फ्रेंड आहेत हे जाणवू लागलं. आणि आता या फ्रेंडबरोबर जास्त मजा येईल अशी स्वप्नं मी पाहू लागलो.

… पण तसं होणार नव्हतं.

… आयुष्यभर नियम पाळणाऱ्या माझ्या वडिलांचा रेल्वे रूळ ओलांडताना अपघाती मृत्यू व्हावा हा दैवदुर्विलास. त्यांनी किती माणसं जोडली होती, हे त्यांच्या मृत्यूनंतर प्रकर्षानं जाणवलं. त्यांच्या संपर्कात आलेले असंख्यजण येऊन भेटून गेले, त्यांच्या आठवणी सांगून गेले.

“नोकरीच्या मागे लागू नकोस, स्वतःचा काहीतरी व्यवसाय कर, चार जणांना तू नोकरी दे, त्यांचा संसार उभा करायला हातभार लाव, ” ते नेहमी सांगायचे.

… आपण जे सांगतो, preach करतो ते आणि आपली प्रत्यक्ष वागणूक यात तफावत असली, तर लोकं ती पटकन् जाणतात, आणि त्यानुसार आपली किंमत करतात. बाबांना हा प्रश्न कधीच भेडसावला नाही. त्यांची उक्ती आणि कृती यात कधीच अंतर नव्हतं.

लेख खूप मोठा झालाय, पण बाबाही तसेच मोठे होते. मोजक्या चार शब्दांत त्यांना गवसणी घालणं अशक्य आहे.

… आजही कोणी फणसाच्या भाजीत लसणाच्या फोडणीचं तेल घालून खाताना पाहिलं की डोळे ओले होतात, फोडणी जास्तच उग्र झाली असते बहुधा. पण अशी प्रेमाची फोडणी मोजक्याच जणांच्या नशिबात असते. आणि मला अभिमान आहे, अशा भाग्यवंतांपैकी मी एक असल्याचा.

(१२/१२ हा ती. बाबांचा वाढदिवस, त्यानिमित्त आठवणींना उजाळा)

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आनंदडोह… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

??

☆ आनंदडोह ☆ श्री मकरंद पिंपुटकर  

भाच्याच्या शुभविवाहाचे निमित्त साधून मी बडोद्याला माझ्या मावसभावाकडे, अभयकडे आलो होतो… बालपणापासूनच्या कडू गोड आठवणी, आयुष्यातील चढ-उतार – सगळ्याची उजळणी झाली. डोहाळे पुरवल्यासारखं खाणंपिणं, कराओकेच्या सुरात गायलेली ती आठवणीतली गाणी आणि हार्मोनियमच्या पट्ट्यांतून उमटलेली ती हृदयाला भिडणारी मैफिल… आज तो आनंद.. आनंद!

ओघाओघाने बोलणं वळलं नाटक आणि चित्रपटांकडे. मी नुकताच योगेश सोमण यांचा “अभंग तुकाराम” हा चित्रपट पाहिला होता. त्याबद्दल बोलताना, माझ्या तोंडून सहजच एक वाक्य आलं, “खरं सांगायचं तर, मला चित्रपटापेक्षा सोमण यांचाच याच विषयावरचा एकपात्री प्रयोग, ‘आनंदडोह’, हा मनाला अधिक शांतता देणारा आणि अधिक भावला. ” आणि योगायोग बघा! लगेचच ७ डिसेंबरला, रविवारी संध्याकाळी ६:३० वाजता, चिंचवडला, श्रीमन महासाधू मोरया गोसावी यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त तोच प्रयोग सादर होणार होता.

मी क्षणाचाही विलंब न करता विचारलं, “अरे, तुम्ही दोघं येणार आहात का? हा कार्यक्रम आयुष्यात एकदा तरी अनुभवावा असा आहे! “

अभय आणि मीनल वहिनीने खात्री करून घेतली, “७ डिसेंबरला ना? ” आणि मग त्या दोघांचे डोळे एका वेगळ्याच आनंदाने चमकले. ते म्हणाले, “नाही जमणार रे मकरंद. त्या वेळी आमची लेक आणि नात आठवडाभरासाठी इथे बडोद्याला येत आहेत आणि खरं सांगायचं तर, आमच्यासाठी तोच खरा आनंदडोह आहे. “

हो, खरंच आहे त्यांचं! नातवंडांच्या इवल्याशा हातांचा स्पर्श, त्यांच्या निरागस हास्याचा किलबिलाट… कुटुंबाच्या प्रेमाचा आणि सहवासाचा तो अमूल्य अनुभव… याहून अधिक मोठा आनंद तो कोणता असू शकतो? …

… तोच खरा ‘आनंदडोह ‘, जो संत तुकारामांना अभंगात गवसला होता, तोच अभय – मीनलला त्यांच्या लेकीच्या – नातीच्या भेटीत गवसणार होता.

… आणि हा आनंद फक्त अनुभवायचा असतो, शब्दांच्या चौकटीत त्याला बांधण्याचा प्रयत्न करायचा नसतो.

— — — 

या आमच्या संभाषणावरून, विशेषत: भावाने त्यात दिलेल्या ‘ आनंदडोह ‘ या उपमेवरून, या पूर्वीच पाहिलेला, अभिनेते योगेश सोमण यांचा ” आनंदडोह “ हा अतिशय सुंदर एकपात्री प्रयोग नकळत माझ्या नजरेसमोर उभा राहिला.. खरं तर त्यांची ती “ आनंदयात्रा “ विसरणे शक्यच नव्हते. आज त्याबद्दल काही सांगायलाच हवे असे मनापासून वाटते आहे. – – – 

त्या वर्षी १० जूनला तुकोबारायांच्या पालखीचे श्री क्षेत्र देहू येथून प्रस्थान झाले आणि या वारीचे औचित्य साधत, तिचा सांगावा घेऊन प्रवास सुरू झाला तो श्री. योगेश सोमण यांच्या एकपात्री “आनंदडोह” या कार्यक्रमाचा. (आनंद सोमण म्हणजे तेच ते …. “उरी” चित्रपटातील मनोहर पर्रीकर आणि “दृश्यम्” चित्रपटातील इन्स्पेक्टर विनायक सावंत साकारणारे सशक्त अभिनेता.)…

… गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ या कार्यक्रमाचे प्रयोग होत आहेत आणि तीनशे प्रयोगांचा टप्पा ओलांडून पुढची वाटचाल सुरू आहे. या एकपात्री “ आनंदडोह “ नावाच्या आनंदयात्रेबद्दल थोडक्यात काही सांगायचे झाले तर – – – 

– – – – – 

सततच्या लोकनिंदेने व्यथित होऊन तुकोबा आपले अभंग इंद्रायणीत विसर्जित करतात आणि आपलीच श्रद्धा योग्य असल्याचं साधार दाखवून देण्याचं साकडं प्रत्यक्ष विठुरायालाच घालतात. तब्बल तेरा दिवस अन्न पाण्याविना ते इंद्रायणीकाठी ठाण मांडून बसतात.

या दिवसांतील त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या भावावस्थेचा आरसा म्हणजे “आनंदडोह”.

तुकोबांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी पांडुरंग दिसतो. ते त्याला जेवू घालतात, त्याच्याशी बोलतात, खेळतात, भांडतात, हट्टही धरतात.

आणि म्हणूनच मग मंदिरात जाऊन, ममत्व नसताना, केवळ स्वार्थासाठी तेथील मूर्तींना पूजणं, मनोवांच्छित फलप्राप्तीसाठी देवांना लालूच दाखवणं – त्यांना पटत नाही. प्रयत्न न करता, मेहनत न करता निव्वळ नवससायासांवर अवलंबून राहाणं त्यांना मंजूर नाही आणि हे सर्व आपल्या अभंगांतून ते ठामपणे मांडतात.

साधी सोपी ओघवती बोलीभाषा आणि त्यातील अनुभवसिद्ध सांगणं – लोकांना रूचतं, पटतं, मान्य होतं आणि परिणामी पूजापाठ, नवस यांच्याकडे श्रद्धा म्हणून न बघता त्याचा व्यवसाय करणारे भगत आणि पुरोहित दुखावले जातात. वैश्यवाणी असून धर्माबद्दल टिप्पणी करतात म्हणून ब्रम्हवृंद खवळलेला असतोच.

मग तुकोबांना नाउमेद करण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न सुरू होतात आणि सुरूच रहातात.

तुकोबांची पत्नी आवली हिचा विठ्ठलाशी उभा दावा असतो. काळतोंड्या, विठ्या, मुडद्या अशा शेलक्या विशेषणांनीच ती पांडुरंगाचा उल्लेख करायची. तुकोबांची पांडुरंग भक्ती आणि अभंग यांचा तिला मनापासून तिटकारा.

पण तुकोबांनी गाथा नदीत विसर्जित केल्याचे जेव्हा तिला कळतं, तेव्हा ती चवताळून उठते. घरातल्या सजीव, निर्जीव गोष्टी – विठूरायाचा मनापासून दुस्वास करणाऱ्या अगदी खुद्द आवलीचे हातसुद्धा – जेव्हा तुकोबांच्या “सततं अनुसंधानं”च्या प्रभावाने विठूनामाचा गजर करू लागतात, तेव्हा तर तिला तुकोबांच्या श्रेष्ठत्वाची ग्वाहीच मिळते.

आणि त्या भरात, तुकोबाच कसे योग्य आहेत हे पटवून देताना, ती तुकोबांचे पाच अभंग घडाघडा म्हणते. आणि गाथा बुडवल्या असल्या तरी आपल्याला काही अभंग तरी मुखोद्गत आहेत हे जाणवल्यावर हरखून जाते.

पंचक्रोशीतील ग्रामस्थांचीही तीच गत असते. जो तो आपल्याला लक्षात असलेले अभंग कागदांवर उतरवून काढतो, आणि जेव्हा हे सगळे एकत्र येतात, तेव्हा जनसागराकडूनच अशा रीतीने तुकोबांची गाथा पुनरुज्जीवित केली जाते.

पण गाथांना आणि स्वतः तुकोबांना अशा रीतीने मिळालेलं देवत्व तुकोबांना स्वतःलाच मंजूर नसते. तुकोबा काय सांगत आहेत, गाथा काय सांगत आहेत ते लोकांनी अंगिकारावं, अंमलात आणावं, अनुसरावं हीच त्यांची तीव्र इच्छा असते.

गाथांनुसार कृती – आचरण न करता तिचं नुसते स्तोम माजवणं, त्याला चमत्कार म्हणणं हे तुकोबांना सहन होत नाही आणि ते देह ठेवतात.

… असं या “आनंदडोहा”चं ढोबळ कथानक.

प्रत्यक्ष प्रयोगातून योगेशजी जे गारूड घालतात, जी मोहिनी घालतात, त्याची यथार्थता दर्शवण्यास निव्वळ शब्दांचं हे कोरडं वर्णन सर्वथा असमर्थ आहे.

त्यांची ती तंद्री, एकरूपता नुसती बघायला नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवायलाच हवी.

योगेशजींचे शब्दसामर्थ्य आणि अभिनय यांच्याविषयी नव्याने काही सांगायला नको. कोणतेही prop न वापरता, निव्वळ देहबोली व लकबींनी तुकोबा आणि आवली या दोघांनाही ते आपल्यासमोर लीलया सादर करतात.

अभिनयाच्या पलीकडे जाऊन, त्यांचे त्या भूमिकेत रममाण होणं आणि तुमच्यातील भक्ताला विठू माऊलीला साद घालायला भाग पाडणं ही एक अद्वितीय अनुभूती आहे.

जेव्हा शक्य होईल, जिथे शक्य होईल, तिथे हा “आनंदडोह” आवर्जून अनुभवाच अनुभवा.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गृहीत धरणे… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

 

??

☆ ✍️ गृहीत धरणे… ☆ सुश्री अपर्णा परांजपे

“न जायते म्रियते वा कदाचि-

न्नायं भूत्वा भविता वा न भूयः ।

अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो-

न हन्यते हन्यमाने शरीरे ॥

(वेदांचे वाचन मननाने घडलेले‌ काही चिंतन…)

गृहित धरणे अगदी सहज प्रक्रिया असते. जन्माच्या क्षणापासून ती सुरू असते. (आधीही ती असतेच हे नंतर लक्षात येतं!) सहजपणे व्यक्ती एक गोष्ट लक्षात ठेवून म्हणजेच गृहीत धरुन जीवन जगत असतो. उदाहरणार्थ आईशी आत्मीयता, तळमळ, प्रेम असते जे नंतर आपोआप त्याच्या सहज स्वभावात परिवर्तित होतं. शिक्षण हेच घ्यायचं असंच वागायचं हाच निर्णय योग्य हे करत असताना आधीच पेरून ठेवलेल्या कल्पना, वस्तू, व्यक्ती च त्याच्या आधार असतात. तसंच तो सहजतेने आपले कार्य करत असतो. सगळं सुरळीत असतं पण अचानक गृहित धरलेली एखादी साखळी कमी पडली, तुटली तर मात्र चिडतो व आक्रमक भूमिका घेतली जाते. आता मात्र संघर्ष अटळ असतो व या संघर्षातूनच खरे दुर्भाग्य, दुःख सुरू होते. ‌या दुःख संकल्पनेवर आधारीत दुःखांची न संपणारी मालिका सुरू होते.

कारण पाया हा तसेच विचार व कृती करण्यास भाग पाडतो. वेगळा काहीही विचार नसल्याने या संकटातून बाहेर पडणे व्यक्ती ला शक्य नसते. तळमळ, चिडचिड, क्रोध, संताप, असूया, द्वेष, तुलना हेच या पायाभूत दुःखाचे फलित असते, ज्यातून बाहेर पडणे केवळ अशक्य असते.

मीच का? मला च का? माझे काय चुकले ह्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत व तळमळ वाढते. ही अवस्था कशी संपेल असे सखोल चिंतन सुरू होते, ते ही अतिशय सहजतेने, नैसर्गिकरीत्या तेव्हा आपण काहीतरी गृहीत धरले जी आपलीच चूक आहे, असे लक्षात येते. मग त्याच क्षणी दोषारोप थांबून स्वतः चे अवलोकन केले असता आपला विचारांचा मार्ग वेगळा आहे, ज्यात या वस्तू, हे लोक, हे विचार अडथळा आहेत, त्यांना हे समजणे शक्य नाही, मला काहीतरी वेगळं हवंय जे ह्यातून मिळूच शकत नाही, हे जाणवलं की मग गृहीतकंच बदलतात. आपला मार्ग शोधण्यासाठी आपणच एकटे आहोत पण समर्थ आहोत. आपले संकल्प, इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप मोठा आधार आतच आहे ज्याला आत्मविश्वास म्हणतो, तो जागृत होतो व स्वतः ची स्वतः चा आधार, चांगल्या वाईट फळांचा स्वीकार इतरांवर दोषारोप न करता करतो.

गृहित धरणं ही आपली अपेक्षा इतरांवर न लादता आपली जबाबदारी आपणच घेतो व आत्मविश्वासाने पुढे जातो. हा जो प्रवास आहे ती परमेश्वराने दिलेली च सगळ्यात मोठी देणगी मुक्त इच्छा असते ज्याचा वापर आत्मविश्वास जागृत झाल्यावर करता येतो.

जमिनीच्या आत बीज दुभंगून रोपटे जसे डौलदार बाहेर पडते तद्वतच तो आनंदाने उल्हसित होतो स्वयंस्फूर्तीने!

बुध्दी ही मायिक आहे, मर्यादित आहे, देहासोबत तयार झाली आहे त्यामुळे तिच्या कक्षेप्रमाणे विचार होणे सहज शक्य आहे त्याप्रमाणे वागणे हे ही योग्य आहेच पण ते अंतिम सत्य नसल्याने निराशा पदरी पडते. ही निराशा म्हणजेच जमिनीतल्या बीचाचे फुटणे! निराशा, दुःख, व्याकुळतेतूनच खऱ्या सुखाचा शोध घेतला जातो, तोच “आतला” आत्मविश्वास असतो!

याला विचारांचे शुध्दीकरण म्हणता येईल! आत असलेले शाश्वत तत्व त्याचा मार्गदर्शक, आधार ठरतं! आतूनच कौतुक व आतूनच शिक्षा अनुभवत वरून मात्र डेरेदार वृक्ष तयार होतो जो काहीही गृहित न धरता इतरांना आधार देण्यात समाधान मानतो.

स्वधर्म म्हणजे हेच समाधान, जे तो धर्म समजतो त्यापेक्षा आमूलाग्र बदललेले पण तरीही आपलेसे भासलेले असते. सुख हे घेण्यात नसून देण्यात असते हे पारंपरिक गृहितक मोडल्याचे शाश्वत समाधान त्याला अर्थातच चिरकाल आनंददायी असते.

ह्यालाच वेदांत “मुक्ती”, “मोक्ष” म्हणत असेल, नाही का?

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य –  मनमंजुषेतून ☆ ‘लेकरू’  होण्याचा प्रयत्न” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “‘लेकरू’  होण्याचा प्रयत्न” ☆ सुश्री शीला पतकी 

‘लेकरू’  होण्याचा प्रयत्न – – 

“लेकरू झाल्याशिवाय माऊलीची माया मिळत नाही” – – 

– – एका कीर्तनात ऐकलेले हे वाक्य..! आता लेकरू व्हायचे म्हणजे काय? आपण लेकरू व्हायला तयारच नसतो. लहान लेकरू कसं निष्पाप असतं निस्वार्थी असतं कुणाबद्दल त्याच्या मनात द्वेष नसतो *मी* ही भावनाच नसते म्हणजे अहंकार नसतो मस्ती करतील पण मस्ती नसते मोह नसतो लोभ नाही. गरजेपुरता आपलं सगळं आटपलं की ते लेकरू शांत! आपल्या मुळात गरजाच संपत नाहीत…. अहंकार संपत नाही… उलट हे सगळे विकार वाढत जातात. माझं कोण काय करते बघू! अजून मला ओळखलं नाहीये तू.!! मी काय करतोय तुला ठाऊक नाहीये…!!! हे सगळं मी निर्माण केलेले आहे… माझ्यामुळे तू आहेस हे लक्षात ठेव…. मी नसतो तर तुमचं काय झालं असतं रे….?

अरे बापरे.. अशा अनेक वाक्याने लेकरूपणापासून आपण फार दूर जातो. मग ती माऊली भेटावी कशी? हे सगळं जेव्हा आपण सोडू आणि अहंकारविरहीत काया वाचा मनाने परमेश्वराला शरण जाऊ तेव्हा तो आपल्याला उचलून मांडीवर घेणारच. आशीर्वाद देणारच. त्याच आपल्यावर अगणित प्रेम असणारच…. कारण आपण लेकरू झालो की तो माऊली होतो. मग त्याला माऊली करण्यासाठी आपण लेकरू होणे गरजेचे नाही का? ..

बरं चला तर मग या वर्षात हे सगळे विकार सोडून देऊ आणि लेकरू होण्याचा प्रयत्न करू जेणेकरून परमेश्वराचा वरदहस्त आपल्यावर राहील त्याचं अफाट प्रेम मिळेल!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आणि लोणचे ग्लॅमरस झाले…” ☆ सौ. स्नेहा देशपांडे पतकी ☆

सौ. स्नेहा देशपांडे पतकी

? मनमंजुषेतून ?

☆ “आणि लोणचे ग्लॅमरस झाले…” ☆ सौ. स्नेहा देशपांडे पतकी 

आपल्या मराठी भाषेत विशेषणाची अगदी रेलचेल आहे. रंग असेल तर लाल भडक, पिवळा धमक,

पदार्थ असेल तर खमंग ढोकळा, खुसखुशीत चकली, चमचमीत भेळ वगैरे, यांनी काय बरे होते. उदा. भेळ म्हंटल्यावर नॉर्मल चिरमुऱ्यांची भेळ. चमचमीत भेळ म्हटले कागदात वरपर्यंत ढीग लावलेली वरून बारीक शेव त्यावर मिरची कैरीची फोड हे चित्र उभे करण्याची ताकद या विशेषणांमध्ये असते. पण काही शब्द हे स्वयंभू असावेत विशेषणांशिवाय परिणाम साधतात. लोणचे हे त्यापैकीच एक. लोणचे शब्द उच्चारला की तोंडाला पाणी सुटते. वेगळे विशेषण लावायची त्याला गरज नसते. तसे आंबट, गोड खारट, तिखट अशा सगळ्या चवीचे मिश्रण असले तरी त्यातली प्रत्येक चव स्वतंत्र अनुभवता येते. खरे तर या चवी लोणच्यात प्रमाणापेक्षा थोड्या जास्तच वापरल्या जातात. पण एकत्र मुरल्यावर त्या जी काय चव धारण करतात त्याला तोड नाही.

वर्षभर टिकणारे कैरी, लिंबू, आवळा, माईंमुळं, करवंद, मिरची, बाळ कैरीचे लोणचे.

 तात्पुरते भाज्यांचे लोणचे. उत्तरेकडे मोहरीच्या तेलातील लोणची, दक्षिणेकडील वेगळ्या मसाल्यातील लोणची असे अगणित प्रकार आपल्या भारतात पहायला मिळतील.

पानात मिठाच्या खालोखाल डाव्या बाजूला विराजमान होणारे लोणचे, चटणी आणि कोशिंबीर.

पण लोणच्यामुळे पान देखणे दिसायला लागते. वाढायला सुरुवात केल्यावर चटणी किंवा कोशिंबीर कोणी चाखून बघत नाहीत. तो मान लोणच्याचा. लोणचे बोटावर घेऊन चाखल्याशिवाय राहवत नाही.

लोणचे काय करते तर, सगळ्या चवी आपल्या मुखात स्त्रावयला लागतात आणि आपली जेवणाची इच्छा वाढवतात. हे झाले शास्त्र.

पण लौकिक अर्थी काय काय करते बघूया

एखादी भाजी चांगली झाली नसेल, तर बायकोला न दुखवता नवऱ्याच्या मदतीला धाऊन जाते.

मुलांच्या आवडीची भाजी नसेल तर उपयोगी येते. अचानक पाहुणे आले तर भाजी सोबत पुरवठा म्हणून येते.

शेजाऱ्यांची वाटी आली असेत तर त्यात काय घालून द्यायचे तर लोणचे.

शिवाय पराठे, धपाटे,

थालीपीठ, मुगाची खिचडी यां पदार्थांची रंगत लोणच्याशिवाय नाही, की लग्नाची पंगत ही नाही.

संध्याकाळी बरणीतून काढायचे नाही, तिन्ही सांजेला कुणाला देऊ नये, माहेरवाशिणीना लोणचे देऊ नये अशाही काही याच्या मान्यता आहेत.

भात, भाकरी खाऊन पोटाची भूक भागते पण जिभेची तृप्तता करण्याचे सामर्थ्य लोणच्यातच.

असे हे लोणचे इतके वर्ष घरगुती विषय होता. पण मध्यंतरी आपल्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन जी यांचा लोणचे घालतानाचा एक व्हिडिओ वायरल झाला. तोही छान भारतीय बैठकीत अगदी घरगुती साध्या कपड्यात. अगदी आपण घरी असतो तशा.

– – त्या व्हिडिओ मध्ये त्यांचा साधेपणा दिसत होताच पण त्याचसोबत एरवी घरात बरण्यामध्ये साठवलेले, गरजेपुरते बाहेर काढले जाणारे साधे लोणचे मात्र त्यादिवशी ग्लॅमरस झाले…

© सौ. स्नेहा देशपांडे पतकी

कोल्हापूर

मो. 9823390516

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भावनांचा तू भुकेला… लेख क्र. २४ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

 ☆ भावनांचा तू भुकेला… लेख क्र. २४ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

भावनांचा तू भुकेला – – 

इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी बसले होते, मुलांना दोन चार प्रश्न विचारून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते.

एक छोटी चुणचुणीत मुलगी तिच्या वडिलांबरोबर माझ्या ऑफिसमध्ये आली. वडील काहीतरी विसरले – ते आणायला बाहेर गेले.

मी तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. “घरी कोण कोण असतं? “

ती नॉन स्टॉप बोलायला लागली. “बाई, आमच्या घरी मी, आई, बाबा, दादा असतो. मी मस्ती करत नाही, भांडण करत नाही. तरी आई आम्हाला टाळं लावून कामाला जाते. काही केलं नाही तरी उगाचच मारते. आमचं काहीच ऐकून घेत नाही. “

हे सर्व सांगत असताना तिच्या चेहऱ्यावरच्या वेदना पाहून मला एकदम भरून आलं, म्हटलं, “थांब हं, आपण तुझ्या आईला बोलावू. मी तिला समजावून सांगेन. मग नाही मारणार ती तुम्हाला. “

तिचे वडील आल्यावर त्यांच्याशी यासंबंधी बोलले, तर मान खाली घालून अपराधी स्वरात म्हणाले, “बाई, आजूबाजूची वस्ती चांगली नाही. दुपारच्या वेळी ही मुलं बाहेर खेळायला गेली, तर त्यांच्यावर लक्ष कोण ठेवणार? हिची आई दुपारी घरकामाला जाते, म्हणून दोघांना आत ठेवून टाळं लावून जाते. काम करून कंटाळते, मग मुलांनी जरा मस्ती केली तर मारते. “

त्यांना म्हटलं, “सध्याच्या परिस्थितीत मुलांना आत ठेवतात, ते योग्यच आहे, पण त्यांना उगाच मारू तरी नका. किती गुणी बाळं आहेत तुमची! अहो, या वयात मुलांनी मस्ती नाही करायची तर कोणी करायची? तुमच्या प्रेमाला भुकेली आहेत ती. त्यांच्यासाठी कष्ट करता, पण अशा वागण्याने त्यांना तुमच्याबद्दल प्रेम वाटेल का? रागावू नका, पण रोज अर्धा तास मुलांशी गप्पा मारा, खेळा, मस्ती करा. तुमचा शिणवठाही निघून जाईल आणि मुलांना आनंदही मिळेल. बघा बरं हा प्रयोग करून. “

हसून मान डोलवत ते मुलीला घेऊन निघून गेले. ऑफिसबाहेर पडताना मागे वळून पुन्हा पुन्हा मला टाटा करणारी ती चिमुरडी माझ्या नजरेसमोरून जात नाही. इतके दिवस तिच्या मनात असलेली खंत बोलून ती मोकळी झाली होती. आणि तो आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वहात होता.

काही पालक मुलांवर सतत ओरडत असतात. त्यामुळे पालकांविषयी मुलांच्या मनात अढी निर्माण होते, त्यातून अनेक समस्या निर्माण होतात.

मुलांशी मूल होऊन वागा. आपले निरागस बालपण पुन्हा अनुभवा. यातून तुम्हाला आणि मुलांना निखळ आनंदच मिळणार आहे.

या छोट्या जीवांना समजून घ्यायला हल्ली पालकांना वेळच नसतो. प्रत्येकाचं स्वतंत्र विश्व असतं. सुसंवाद सोडा, साधा संवादही घडत नाही, मग मुलांची वाढ खुंटते, त्यातूनच अनेक विकृती निर्माण होतात. आणि आपण दोष मात्र नवीन पिढीला देतो.

असं न करता प्रत्येकाने आपल्या वागण्याचा विचार करावा.

(हा लेख किमान दहा वर्षांपूर्वी लिहिलेला आहे, परंतु त्यात वर्णलेल्या परिस्थितीत सुधारणा झालेली तर दिसत नाहीच, उलट कुटुंबातील संवाद आणखीनच नाहीसा झालेला दिसत आहे. आणि त्यातून अनेक कौटुंबिक आणि सामाजिक समस्या निर्माण झालेल्या दिसत आहेत.

…. हे दुष्टचक्र थांबवायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही – आम्ही – आपण काहीतरी सकारात्मक केले पाहिजे, नाही का?)

क्रमशः दर गुरुवारी… 

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मोड…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? मनमंजुषेतून ?

☆ “मोड…” ☆ प्रा. भरत खैरकर 

गावापासून उत्तरेला निघालेला रस्ता पुढे जाऊन दोन गावाकडे जायचा. त्या ठिकाणाला गावचे लोक मोड म्हणायचे! कुठे मोडी पर्यंत गेला होता कां? मोडीवर बसला होता कां? मोडीवर काय चालू आहे? वगैरे सारखी ह्या मोडीबाबत चौकशी असायची. गावच्या कारभारात ह्या मोडीचा खूप मोठा वाटा होता.

मला तर मोड खूप खूप आवडायची. साधारणतः दीड दोन किलोमीटर अंतरावर असलेली ही मोड आणि त्या पुढच्या पाचशे सहाशे मीटरवर असलेली नदी मला नेहमीच आकर्षून घ्यायची. ह्या नदीच्या पुलावर बसून मी कित्येक कविता केलेल्या आहेत. पुलाखालून वाहणाऱ्या पाण्याला बघून मी माझी ‘गुढतळे’ ही कविता लिहिलेली आहे. ह्या नदीकाठावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध कामे चाललेली असतात. नदीपासून थोडं लांब गेल्यावर पन्नासेक फुटावरून खालच्या दगडावर पडणारी पाण्याची धार हळूहळू घाटदार वळण घेत संथ होते. छोटासं नितळ पाण्याचं तळं तिथे होतं. ते वलयामुळे अजूनच उठून दिसतं. मनात भावनांचे तरंग उठावे तसे ह्या पाण्याचे तरंग धारेच्या केंद्रापासून दूरवर.. काठापर्यंत.. जाऊन हळूहळू संतरुप धारण करतात. पुढे हे नदीचे पाणी मार्ग काढीत काढीत गावात गेल्यावर एका नाल्याचं रूप धारण करतं. पुढे ही नदी तीन-चार गावातून जाऊन एका धरणामध्ये बंदिस्त झाली आहे!

सायंकाळी मोडीवर फिरायला जाणारी गावातील जेष्ठ मंडळी, कर्मचारी, बँकेचे लोक, शिक्षक, इत्यादी सगळे सरकारी कर्मचारी मोडी पर्यंत येऊन परतायचे.. मोडीवरील डांबरी रस्त्याच्या कडेला बसून हे सगळे ऑफिसच्या.. कुटुंबाच्या गप्पा तसेच सुखदुःखाचे विषय बोलायचे..

ह्या मोडीवर एक मारुतीचे मंदिर आहे. उत्तरेकडे गेलेली ही मोड पण मारुती मात्र दक्षिणेकडे असल्याने पठ्ठा गावाकडे लक्ष ठेवून आहे असं वाटायचं. ह्याच मोडीवर दोन्ही बाजूंकडून येणाऱ्या शेतातील गुरं, म्हशी, गाई शिवारातून परतायच्या.. संध्याकाळच्या वेळी गुराढोरांच्या धुळीने माखलेले आकाश आणि त्यात किरमिजी रंगाची सूर्याची किरणे.. त्यामुळे गावाचं सौंदर्य अजूनच उजळून निघायचं. मोडी वरून दिसणारं हे गावाचं हे दृश्य अद्भुत असायचं.

लहान मुले बराच वेळपर्यंत शेतातून येणाऱ्या आपल्या आईची ह्या मोडीजवळ येऊन वाट बघायचे.. आपापल्या घरट्याकडे निघालेली पाखरं.. विशेषतः बगळ्यांची रांग.. मोडीवरून अद्भुत दिसायची..

मारुती मंदिराच्या परिसरात एक भलं मोठं वडाचं झाड होतं.. त्या झाडांवर संध्याकाळी सर्व पक्षांची शाळा भरायची.. त्यांचा किलबिलाट संपूर्ण गावाचा आसमंत भरून टाकायचा.. साधारणत: सात वाजल्याच्या दरम्यान मंदिरामध्ये आरती व्हायची.. मोडीवर फिरायला गेलेले बहुतांश लोक ह्या आरतीमध्ये सामील व्हायचे.. लाऊड स्पीकरवर ह्या आरतीचा आवाज संपूर्ण गावापर्यंत पोहोचायचा.. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या बसेस, ट्रॅव्हल्स, खाजगी वाहने या ठिकाणी थांबायची.. लोक आग्रहास्तव एक ‘थांबा’ मोडीवर तयार झाला होता!

आता तर हळूहळू मोडी पासून गावापर्यंतच्या संपूर्ण रस्त्यावर दुतर्फा अतिक्रमण झाले आहे.. आणि मोठमोठाली दुकाने लागलेली आहेत.. एवढेच नाही तर आधुनिकतेची आवश्यकता म्हणून की काय तीन चार बियरबार व एक पेट्रोल पंप या ठिकाणी झालेले आहेत.. हळूहळू गावाचं गावपण जाऊन.. शहरीकरणामुळे ही मोड सुद्धा आता पहिल्यासारखी न राहता रस्ता रुंदीकरणामध्ये चार पदरी.. सहा पदरी करता करता सरळ होते की काय? अशी भीती वाटायला लागली आहे.. गावाला लागलेलं शहरीकरणाचं वेड एकूणच गावपण घालवील की काय? हा प्रश्न पडतो.

गावची ही मोड.. तिथून दिसणारी संध्याकाळ.. मारुतीचा पार.. तिथल्या वडावर असलेली बगळ्यांची शाळा.. आरतीचा मधुर ध्वनी.. फिरायला गेलेल्यांच्या गप्पा आणि विशेषतः पलीकडे असलेल्या नदीवर घालवलेला माझा बालपणीचा काळ मला अजूनही मोडी पर्यंत घेऊन जातो आणि तिथे गावाच्या कुशीत आपण किती सुरक्षित सुखी समाधानी होतो याचं भान जागवितो.

लेखक : प्रा. भरत खैरकर, चिंचवड, पुणे ३३.

 ९८८१६१५३२९.

मोड – – – 

गावापासून उत्तरेला निघालेला रस्ता पुढे जाऊन दोन गावाकडे जायचा. त्या ठिकाणाला गावचे लोक मोड म्हणायचे! कुठे मोडी पर्यंत गेला होता कां? मोडीवर बसला होता कां? मोडीवर काय चालू आहे? वगैरे सारखी ह्या मोडीबाबत चौकशी असायची. गावच्या कारभारात ह्या मोडीचा खूप मोठा वाटा होता.

मला तर मोड खूप खूप आवडायची. साधारणतः दीड दोन किलोमीटर अंतरावर असलेली ही मोड आणि त्या पुढच्या पाचशे सहाशे मीटरवर असलेली नदी मला नेहमीच आकर्षून घ्यायची. ह्या नदीच्या पुलावर बसून मी कित्येक कविता केलेल्या आहेत. पुलाखालून वाहणाऱ्या पाण्याला बघून मी माझी ‘गुढतळे’ ही कविता लिहिलेली आहे. ह्या नदीकाठावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध कामे चाललेली असतात. नदीपासून थोडं लांब गेल्यावर पन्नासेक फुटावरून खालच्या दगडावर पडणारी पाण्याची धार हळूहळू घाटदार वळण घेत संथ होते. छोटासं नितळ पाण्याचं तळं तिथे होतं. ते वलयामुळे अजूनच उठून दिसतं. मनात भावनांचे तरंग उठावे तसे ह्या पाण्याचे तरंग धारेच्या केंद्रापासून दूरवर.. काठापर्यंत.. जाऊन हळूहळू संतरुप धारण करतात. पुढे हे नदीचे पाणी मार्ग काढीत काढीत गावात गेल्यावर एका नाल्याचं रूप धारण करतं. पुढे ही नदी तीन-चार गावातून जाऊन एका धरणामध्ये बंदिस्त झाली आहे!

सायंकाळी मोडीवर फिरायला जाणारी गावातील जेष्ठ मंडळी, कर्मचारी, बँकेचे लोक, शिक्षक, इत्यादी सगळे सरकारी कर्मचारी मोडी पर्यंत येऊन परतायचे.. मोडीवरील डांबरी रस्त्याच्या कडेला बसून हे सगळे ऑफिसच्या.. कुटुंबाच्या गप्पा तसेच सुखदुःखाचे विषय बोलायचे..

ह्या मोडीवर एक मारुतीचे मंदिर आहे. उत्तरेकडे गेलेली ही मोड पण मारुती मात्र दक्षिणेकडे असल्याने पठ्ठा गावाकडे लक्ष ठेवून आहे असं वाटायचं. ह्याच मोडीवर दोन्ही बाजूंकडून येणाऱ्या शेतातील गुरं, म्हशी, गाई शिवारातून परतायच्या.. संध्याकाळच्या वेळी गुराढोरांच्या धुळीने माखलेले आकाश आणि त्यात किरमिजी रंगाची सूर्याची किरणे.. त्यामुळे गावाचं सौंदर्य अजूनच उजळून निघायचं. मोडी वरून दिसणारं हे गावाचं हे दृश्य अद्भुत असायचं.

लहान मुले बराच वेळपर्यंत शेतातून येणाऱ्या आपल्या आईची ह्या मोडीजवळ येऊन वाट बघायचे.. आपापल्या घरट्याकडे निघालेली पाखरं.. विशेषतः बगळ्यांची रांग.. मोडीवरून अद्भुत दिसायची..

मारुती मंदिराच्या परिसरात एक भलं मोठं वडाचं झाड होतं.. त्या झाडांवर संध्याकाळी सर्व पक्षांची शाळा भरायची.. त्यांचा किलबिलाट संपूर्ण गावाचा आसमंत भरून टाकायचा.. साधारणत: सात वाजल्याच्या दरम्यान मंदिरामध्ये आरती व्हायची.. मोडीवर फिरायला गेलेले बहुतांश लोक ह्या आरतीमध्ये सामील व्हायचे.. लाऊड स्पीकरवर ह्या आरतीचा आवाज संपूर्ण गावापर्यंत पोहोचायचा.. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या बसेस, ट्रॅव्हल्स, खाजगी वाहने या ठिकाणी थांबायची.. लोक आग्रहास्तव एक ‘थांबा’ मोडीवर तयार झाला होता!

आता तर हळूहळू मोडी पासून गावापर्यंतच्या संपूर्ण रस्त्यावर दुतर्फा अतिक्रमण झाले आहे.. आणि मोठमोठाली दुकाने लागलेली आहेत.. एवढेच नाही तर आधुनिकतेची आवश्यकता म्हणून की काय तीन चार बियरबार व एक पेट्रोल पंप या ठिकाणी झालेले आहेत.. हळूहळू गावाचं गावपण जाऊन.. शहरीकरणामुळे ही मोड सुद्धा आता पहिल्यासारखी न राहता रस्ता रुंदीकरणामध्ये चार पदरी.. सहा पदरी करता करता सरळ होते की काय? अशी भीती वाटायला लागली आहे.. गावाला लागलेलं शहरीकरणाचं वेड एकूणच गावपण घालवील की काय? हा प्रश्न पडतो.

गावची ही मोड.. तिथून दिसणारी संध्याकाळ.. मारुतीचा पार.. तिथल्या वडावर असलेली बगळ्यांची शाळा.. आरतीचा मधुर ध्वनी.. फिरायला गेलेल्यांच्या गप्पा आणि विशेषतः पलीकडे असलेल्या नदीवर घालवलेला माझा बालपणीचा काळ मला अजूनही मोडी पर्यंत घेऊन जातो आणि तिथे गावाच्या कुशीत आपण किती सुरक्षित सुखी समाधानी होतो याचं भान जागवितो.

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मिरजेची कर्तृत्ववान माहेरवाशीण… भाग – २ – लेखिका : डॉ. सुमेधा रानडे ☆ सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

??

☆ मिरजेची कर्तृत्ववान माहेरवाशीण… भाग – २ – लेखिका : डॉ. सुमेधा रानडे ☆ सौ. अंजली दिलीप गोखले

कु. शिल्पा मुकुंद मैंदर्गी 

  1. आव्हान तिसरे दैनंदिन जीवनातील अडचणी

 काही मिनिटे आपण डोळे झाकून राहू शकतो, पण कुणी डोळे मिटून एकजरी काम करायला सांगितले तर किती अवघड होईल? शिल्पाताईच्या बाबतीत तिच्या आईवडिलांनी पहिल्यांदाच ठरवले होते की तिला स्वयंपूर्ण करायचे. त्यांनी कधीच तिला पांढरी काठी देऊन ‘अंध ‘ नाही केले. परिणामी शिल्पाताई स्वतःची सगळी कामे स्वतः करतेच. आणि एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे 1988-2000 या काळात शिल्पाताईचे वडील हे विद्यामंदिरचे मुख्याध्यापक झाले. त्यांच्या काळात शाळेने शैक्षणिक क्षेत्रात कमालीची भरारी घेतली होती, 10वी आणि 12वी ला बोर्डात सर्वात जास्त मुले याच शाळेची असायची. महाराष्ट्र राज्यात 12वी मध्ये पहिला आलेली वेदिका सखदेव, ही शाळेसाठी आणि सरांसाठी सर्वात अभिमानाची गोष्ट. अशी मोठी जबाबदारी असताना सुद्धा सरांनी शिल्पाकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. पण नंतर सरांच्या आजारापणात याच शिल्पा ताईने आपल्या लाडक्या बाबांना रोज फिरवून आणणे, त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणे हे सर्व केले. डोळस असलेले आपण सुद्धा काहीवेळा कर्तव्यात कसूर करु पण तिने नाही केले. आज सुद्धा ती आईचे पथ्य पाणी सांभाळते, बँक, घरातील सर्व छोटी कामे ती स्वतः करते. सुई मध्ये दोरा ओवून छान छान गजरे करते, स्वतःच्या नृत्याच्या कार्यक्रमासाठी matching साडी, दागिने योजून ठेवते. अनेक फोन नंबर तिला तोंड पाठ आहेत. हिमालयाला न बघता सुद्धा त्यावर उत्तम कविता ती करते, पांडुरंगाची मानस पूजा ती कवितेतून करते. अनेक भावकविता, मुक्तछंद कविता ती करते. ती एकपाठी आहे, अनेक श्लोक, स्तोत्र तिला खूप कमी वेळात पाठ होतात. खरंच डोळस माणूस सुद्धा कमी पडेल अशी सर्व कामे शिल्पा लीलया करते.

  1. नवीन आव्हान-क्रोशा चा रुमाल विणायचेआव्हान तिने सध्या उचलले आहे.

ती सध्या गाणे पण शिकतीये, ‘गायन विशारद’ ही पदवी सुद्धा तिच्या खात्यात जमा होणार यात शंका नाही, आणि अजून एक उदाहरणं ती निर्माण करणार!

अश्या अनेक आव्हानांना सहज पार करणारी शिल्पाताई हसतमुख, लाघवी आणि अत्यंत प्रेमळ आहे. तिच्या या स्वभावाने तिने असंख्य लहान -मोठया मैत्रिणी बनवल्या आहेत. 4थी पासून तिला प्रत्येक परीक्षेला स्वतःपेक्षा छोट्या वयाची पेपर writer (लेखनिक)घेणे गरजेचे होते, त्या प्रत्येकीने तिला उत्तम साथ दिली. MA च्या परीक्षेवेळी BA करणाऱ्या कु. श्रद्धा म्हसकर हिने तर अतिशय उत्तम पद्धतीने शिल्पाताईला सहाय्य केले. त्या सर्वांची साथ तिच्यासाठी मोलाची ठरली. कुठेही शिल्पा ताईच्या बोलण्यात तक्रार, नकारात्मकता, अंधत्वाबद्दल नाराजी नाही..

तिला मी नेहमीचा प्रश्न विचारला, की मिरजेने तुला काय दिले? त्यावर शिल्पाताई अगदी आनंदाने म्हणाली, ‘मिरजेने माझे कुटुंब मला दिले, ज्यात माझ्या आई वडिलांनी मला इतके चांगले संस्कार दिले, मला कधीच माझ्यातील उणीव जाणवू दिली नाही, आणि माझ्या बहिणभावांनी सुद्धा मला कधी वेगळी वागणूक दिली नाही, उलट हास्यविनोद, चिडवाचिडवीने सर्वसामान्य मुलांप्रमाणे माझे बालपण गेले. माझा उत्तम आत्मविकास माझ्या घरातल्या सर्वांमुळे झाला. आमचे घर शिवनेरी चौकात, भर वस्तीत आजूबाजूला मंदिरे, मठ.. त्यामुळे मिरजेतील अध्यात्मिक वातावरणाने मला कायमच सकारात्मक ऊर्जा दिली. अनेक वर्ष माझ्या दोन्ही काकू घरातच संस्कार वर्ग घ्यायच्या, त्यामुळे सुद्धा घरातील वातावरण शांत आणि सात्विक राहिले.

मिरजेची सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे इथे ‘ व्यावहारिकता (professionalism)कधीच कुणाच्यात दिसले नाही रस्त्यातून जाताना अनेक लोकं मदत करत, अगदी कामवाल्या मावशींनी सुद्धा काळजीपूर्वक क्लासला सोडले आहे. आवर्जून उल्लेख करावा अश्या 3 स्त्रिया माझ्या आयुष्यात अत्यंत महत्वाच्या आहेत, ज्यांनी व्यवहारापेक्षा माणुसकी, भावना, प्रेम यांनाच महत्व दिले यातील पहिली स्त्री म्हणजे नृत्यगुरु ‘सौ. धनश्री आपटे ‘ज्यांच्या बरोबर 27 वर्षांचा माझा शिष्य म्हणून सहवास आहे, जो आता ऋणानुबंध बनला आहे.. दुसरी स्त्री म्हणजे सौ. अंजली गोखले, ज्या 2011 पासून माझ्या बरोबर आहेत, स्वतःचा संसार सांभाळत त्या कायमच माझ्या बरोबर एक मैत्रीण, एक वाचक, माझ्या कार्यक्रमाची निवेदक, मला माझ्या नृत्याच्या कार्यक्रमाना जपून घेऊन जाणारी अश्या अनेक भूमिका पार पाडतात. गेली 15 वर्षे त्या रोज दुपारी 2. 30 ते 4 येऊन विविध पुस्तके वाचून दाखवतात (कधी प्रत्यक्ष तर कधी ऑनलाईन). MA चा पूर्ण अभ्यासक्रम त्यांनी मला वाचून दाखवून अभ्यास करुन घेतला. अनेक विषयांवर आम्ही चर्चा करतो. मला कविता स्फुरली की मी त्यांना फोन करते, आहे ते काम सोडून त्या माझी कविता लिहून घेतात, सांगावे तेवढे कमीच त्यांच्या बद्दल. आणि तिसरी स्त्री म्हणजे अनिता खाडिलकर माझ्या बाहेरच्या कामांसाठी मला घेऊन जाणे, बँकेतील कामे यासाठी त्या निरपेक्ष वृत्तीने कायमच माझ्या हाकेला धावून येतात. आई आजारी असल्याने घरातील-बाहेरची कामे मी यांच्याच साथीने सहज पूर्ण करते. किती भाग्यवान आहे मी!

हे सगळे मिरजेनेच दिले.

शिल्पा ताईचे हे वाक्य ऐकताना मनात विचार आला की मिरजेच्या या माहेरवाशिणीला मिरजेच्या या खंबीर सासुरवाशिणींची साथ मिळतीये हे किती सुंदर आहे! एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा आधार बनली, निरपेक्ष वृत्तीने!!

आजपर्यंत शिल्पा ताईला असंख्य ठिकाणी मान -सन्मान मिळाले आहेत. त्यात ‘मिरज भूषण ‘, अपंग सेवा केंद्राचा ‘जीवन गौरव ‘, कन्या महाविद्यालयाचा ‘मातोश्री’ यांचा उल्लेख आवर्जून करावा वाटतो. आजही तिचा आणि तिच्या आईचा दिवस पहाटे 4 वाजता ॐकार आणि प्राणायामाने होतो, तिचा दिनक्रम अतिशय व्यस्त आहे, त्यातून ती नृत्याचे online वर्ग पण घेते. आपल्या सारख्या इतर अनेक जणींना तिला प्रोत्साहीत करायचे आहे. त्यादृष्टीने तिचे आणि धनश्री ताईंचे प्रयत्न सुरु आहेत. देव जेव्हा एखादा ज्ञानेंद्रीय कमी देतो ना, तेव्हा बाकी 4 ज्ञानेद्रियांची ताकद वाढवतो हे ऐकले होते, शिल्पा ताईला बघून ते मनोमन पटले. त्यापुढे जाऊन मी म्हणेन की अश्या विशेष लोकांचं *6वे ‘मन’ हे इंद्रिय देव अजून सुंदर बनवतो.

तिच्या वडिलांचे स्वप्न होते, की शिल्पाचा भरतनाट्यम dance शो परदेशात व्हावा. हे स्वप्न लवकरच पूर्ण होवो अशी आम्हा मिरजकरांकडून शुभेच्छा! आणि तुझ्या कार्याला, उत्साहाला, जिद्दीला मानाचा मुजरा!! तिच्यासाठी श्री रामदास स्वामींचा हा श्लोक म्हणावा वाटतो..

सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी।

सुखाची स्वयें सांडि जीवी करावी॥ 

देहेदु:ख ते सूख मानीत जावे। 

विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें॥१०॥

– समाप्त – 

लेखिका : डॉ. सुमेधा रानडे, मिरज

प्रस्तुती : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares