मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बेबी स्टेप्स… लेखिका : सुश्री प्राजक्ता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

सुश्री मीनल केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ बेबी स्टेप्स… लेखिका : सुश्री प्राजक्ता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

परवा रात्री सगळीकडे सामसूम झाली आणि बारा वाजता स्वयंपाक घरात खुडबुड सुरू झाली.

बेडरुमच्या दारातून आत स्वयंपाकघरात पाहिले तर बेबी स्टेप्स टाकत आमची दोन बाळं स्वयंपाकघरात कारभार करताना दिसली. एक बाळ पाणी गरम करत होतं. दुसरं दूध हळद गरम करत होतं. नेहमीचा नजारा बघून मी डोक्यावर पांघरूण घेतले आणि झोपी गेले.

… तुम्ही म्हणाल यांची बाळं घरात कारभार करतात, यांना झोप तरी कशी येते. तर यातलं एक बाळ आहे वय वर्षे 88 माझ्या सासूबाई आणि दुसरे बाळ आहे वय वर्षे 81 माझी आई.

– – एकमेकीला सांभाळत गुण्यागोविंदाने राहतात. यांचं आयुष्य कधी सुखासीन नव्हतंच. पण चांगले समाधानाचे थोडे दिवस पण बघितले आणि आयुष्याचे दशावतारपण बघितले.

.. पण आनंदात सामील व्हायची त्यांची धडपड(हो धडपडच. आपल्या गेलेल्या तरण्याताठ्या पोरांच्या आठवणी मागे टाकून, कटू स्मृती मागे टाकून, छोट्या गोष्टीत आमच्या आनंदात सामील व्हायचा प्रयत्न करणं ही मला खूप समजूतदार, शहाण्या बाळांची धडपडच वाटते) बघून कधी मन भरून येतं कणवेनं.

दोघींचे स्वभाव टोकाचे. एकीला टीव्ही मालिका, वाचन, शब्द कोडी आणि आता मोबाईलवर मालिकांची उजळणी करणे हे वेड. तर दुसरीला अखंड जुनी गाणी ऐकणे, बसवणे, त्याच्यावर चर्चा करणे, स्वयंपाक घरात ओट्यापाशी लुडबुड करणे याचं वेड.

दिवसाचं स्वागतच सकाळी लवकर टाळ्यांनी करतात. मग दिवस चांगला जाणारच. छोटे-मोठे व्यायाम, आरोग्यदायी काढे, मितस्थ जेवण, आपले छंद, ठराविक वेळेस स्तोत्र पठण. आयुष्यात इतकी उलथापालथ घडली. इतकी श्रद्धा आणि पाय रोवून उभं राहायचं बळ येतं कुठून.

दोघींचेही आयुष्य सण, रीतीरिवाज पारंपारिक पद्धतीने जपण्यात गेलं. माझ्याकडे आल्या. वाढत्या जबाबदाऱ्या आणि वयामुळे कामाचा कमी झालेला आवाका यामुळे हे सगळं करताना मी एक पथ्य पाळायचा प्रयत्न केला. रीतिरिवाज पाळताना घरातल्यांची हेळसांड होऊ नये. माझी चिडचिड होऊ नये. दुसऱ्याकडून कामाची अपेक्षा न करता माझ्या हातून जेवढं होईल तेवढेच कटाक्षाने करणे. त्यासाठी जितके जमतील तितके शाॅर्टकट्स केले. सगळ्याच गोष्टी त्यांना पटणार्‍या होत्या असं नाही. पण ही शहाणी बाळं इथे ही समजूतदारपणे वागली.

… एकाही शब्दाने नाराजी नाही. तक्रार नाही. त्या दिवशी काहीतरी चांगलं हॅपनिंग आहे यातच त्यांनी आनंद मानला. बदललेलं रुटीन स्वीकारताना त्यांना त्रास झाला नसेल का! मुळातून उपटलेलं रोपटे सुद्धा नवीन ठिकाणी रुजताना पहिल्यांदा मान टाकतं.

ही बाळं थोडी खोडसाळपण आहेत हां. छोटी आहेत ना. मग कधी तरी रागावून घेतात. रुसवे-फुगवे, समजूत घालणं, सगळं होतं. पण तसंही त्यांना त्या मूडमध्ये जास्त वेळ राहण्याचा कंटाळाच येतो.

– – एका बाळाचा स्वभाव अति काळजी करण्याचा. सतत व्यक्त होण्याचा. दुसऱ्या बाळाला व्यक्त व्हायचंच कळत नाही. आपल्याबद्दल याच्या भावना काय आहे याचं कोडं पडावं. ना चेहऱ्यावर दिसतं. ना बोलण्यात येतं.

… पण सणावाराला पाया पडताना पायाला हात लावला की सगळ्या भावना मनाला न जुमानता बाहेर येतात. बाळं कुशीत शिरतात. पाठीवरून हात फिरवून घेतात.

तापानं फणफणल्यावर एक बाळ सतत येऊन येऊन अंगाखांद्यावर हात फिरवतं आणि दुसरं बेडरूमचं दार किलकिले करून हळूच येता-जाता डोकावून बघतं. मग मात्र जाणवतं या बाळांची घालमेल जास्त वेळ होता कामा नये. लवकर बरं व्हायला हवं.

… यांच्या बेबी स्टेप्स आमच्या घरातून पडत राहणं हीच आम्ही आमची समृद्धी मानतो. आम्ही खरंच श्रीमंत आहोत.

लेखिका : सुश्री प्राजक्ता कुलकर्णी 

प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खरंच!! “स्वर माणिक” ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

? मनमंजुषेतून ?

खरंच!! “स्वर माणिक” डॉ. माधुरी जोशी 

१९६४/६५चा काळ… आमची अकरा साडेअकरा ही शाळेत जायची रोजची वेळ.. मैत्रिणींना गोळा करत, वाड्यांमध्ये, दुकानांच्या खुणेच्या जागी जात जात जमून दोन चौक पुढच्या शाळेत जाणं… रोजचंच… जुन्या पुण्यातला रस्ता… दुतर्फा घरं, वाण्याची, भाजीची, टेलरची दुकानं…. सगळीकडे रेडिओ वाजत रहात आणि कानावर पडतं अमृताहुनी गोड, घननीळा, त्या सावळ्या तनुचे… एकापेक्षा एक अवीट गोडीची मधुर गाणी, भावगीतं भक्तीगीतं अभंग… अन् अनेकदा माणिकबाईंचाच मधाळ स्वर…. तो खोल मनावर ठसला, कानात रेंगाळत राहिला… फार फार आवडला… शाळकरी वयात त्या मधाळ स्वरानं नकळत संस्कार केला… असं हवं गाणं! ! ! घरात आई पण ती गाणी अतिशय मधुर आवाजात गुणगुणत राही… माणिक बाईं बद्दल सगळ्यांच्या मनात जिव्हाळा… आपलेपणा… तीन पिढ्यांवर ठसा उमटत होता.

 ” माणिक” तेजस्वी श्रीमंत रत्न… त्याला दैवी स्वरांचा गंध.. आशीर्वाद… तो स्वर भावनेनं ओथंबलेला… सहजपणे ऐकणाऱ्याच्या ह्रदयातंच ठाण मांडणारा… तिथे निवांत राहणारा… सुखद… आणि शेवटी काय तुम्ही कितीही विद्वान, अभ्यासू, नावारूपाचे, मोठे, तयार कलावंत असाल तरी तुमचा भाव जोपर्यंत श्रोत्यांच्या ह्रदयात वसत नाही तोवर तुम्ही रसिकांचे होत नाही. माणिकबाई इतक्या गोड, लाघवी, सहज गाणाऱ्या… त्यांनी तर राज्य केलं मनामनावर…. त्या आमच्या झाल्या… घराघरांच्या झाल्या… इतक्या जवळच्या की त्यांना कुणी कधी विसरलोच नाही… आज जन्मशताब्दीच्या निमित्तानं लिहीत्येय मनातलं.. इतकंच….

 १६ मे १९२६ चा जन्म त्यांचा…. १० नोव्हेंबर १९९६ ला त्या गेल्या. आमच्या आधीच्या पिढीनं तो स्वर ऐकला… आम्ही आणि पुढच्या पिढ्यांनी पण… आजवर ती गाणी सोबत आहेत… अत्तराच्या सुगंधा सारखी… रेंगाळतात मनात स्वर, शब्द…. तो लक्ष्मी सारखा गोड, प्रसन्न, सात्विक चेहरा….

कुणीही विसरलोच नाही तर शताब्दी म्हणून वेगळं स्मरण कशाला… रोज भेटतात त्या.

 मी पिंपळखरे गुरूजींकडे गाणं शिकणारी… स्वरात रमलेली… लहान वयापासून आजतागायत माणिक बाईंची गाणी केवळ आनंदासाठी नाही तर अभ्यास म्हणून ऐकते तेव्हा दरवेळी थक्क होते अचंबित होते त्या स्वरातली आर्तता, मार्दव, माया तयारीचा हात धरूनही सतत जागं असतं सगळं…

अनेक गुरूंकडची ऊत्तम डोळस तालीम, आवाज, स्वर, लय सारं सर्व दिशांनी तय्यार.. आणि त्याला भावनेच्या ओलाव्याचा पदर…. अस्तर… सोबत शब्दांची सुंदर जाण, तानेचा अचूक योग्य वापर, देखण्या मिंडचा गोलावा… किती तरी संगीतकारांकडे गायल्या त्या. आपल्या रचना माणिकबाई गायल्या याचाही गौरव वाटला असेल त्यांना… आज असं वाटतं त्या प्रत्येकाची आपली शैली होती, ताकद होती, कल्पना होत्या…. पण माणिकबाईंनी ते गाणं आपलं केलं… जीव ओतून गायल्या अक्षरशः आणि प्रत्येक गाणं माणिकबाईंचं होऊनच समोर आलं…. इतकं एकरूप, एकजीव होणं दुर्मिळ…

 त्या वयात ऐकलेलं दुर्वांची जुडीतलं “लाविते मी निरांजन”साधं ओवीच्या छंदाचं चालीचं गाणं गाताना वाटलं “वाटलं तितकं सोपं नाही हं हे”

या साधेपणातही पिलुची गोडी, भाव किती जपलंय… ती ओवी, कविता श्रीमंत केली त्यांनी…. मग अनेक गाणी समोर येत गेली आणि प्रत्येकाचं वेगळेपण भावतंच गेलं. वाटलं हे काही ” सुगम” नाही. फार फार मिती, पैलू आहेत सतत…

माजघरातल्या शांत प्रकाशातली मायाळू ओवी, देव घरातली शांत तेवणारी समई, कधी जाळीमंदीमधे लावणीचा ठसका, भिंगरीची वेगवान तान कधी त्या चित्त चोरट्याला मधे लग्गीला उचललेल्या ओळीत का आपुले म्हणू मी असा प्रश्न.. चांदण्या रात्रीतले ते मधलं वैफल्य अन् सर्व तू विसरून जा अशी वैफल्यातली समजूत…. सारं स्वरातून व्यक्त होत राहतं… आणि गोकुळीचा राजा, येऊ कशी घनशाम, घननीळा…. भक्तीच्या अनेकविध छटा… किती रस भेटत राहतात. किती किती गाणी… नुसत्या यादीनं एका लेखाचा ऐवज होईल इतकी गाणी…. वेगळी… मधुर… भावपूर्ण! ! !

गायकीची तर किती अंग भेटतात. १३ व्या वर्षी त्या गायल्या आणि त्या नासिकायुक्त

गोड वजनदार आवाजानं अक्षरशः राज्य केलं अनेक दशकं संगीत क्षेत्रात… सुगम संगीताला अमुकच जातीचा आवाज हवा हे विधानंच मोडीत गेलं जणू……..

शास्त्रीय संगीताची प्रचंड जाण, संस्कार, अभ्यास यामुळे त्यांनी कोणत्याही वळणाचं गाणं गायलंय… समर्थपणे. त्यांची ही ताकद, आत्मविश्वास जाणून संगीतकारांनी चाली बांधल्या असणार आणि आपल्याला एक अनमोल खजिना मिळाला हे भाग्यच आपलं….

 अगदी शाळकरी वयापासून मोठं होईपर्यंत स्पर्धेसाठी, कार्यक्रमासाठी गाणी बसवताना जाणवलं ऐकायला सोपी वाटणारी गाणी गायला किती अवघड आहेत हे… गाण्यांच्या अगणित जागांमधली सहजता थक्क करतं राहिली तर बारकावे साधतांना अक्षरशः धावपळ झाली. खरं तर प्रांजळपणे सांगते आजही काही जागा त्याच वजनानी, नोटेशन बरहुकूम नाही येत…. असलं हे समर्थ गाणं सुगम कसं? याला सहज सोप्पं कुणी ठरवलं?

 इथे भेटला आत्यंतिक प्रेमळ सुरेलपणा…. भक्ती भावाची सचैल भिजवणारी गंगा…. ठुमरी तली उठान… बनारस बाजाची तयारी… पण तसूभरही पदर ढळू न देणारी…. काही लग्गी किंवा ओळींनंतर सहज मूळ ठेक्यात नेण्याची हुकूमत…. किंवा ॲडलीफ ओळीतले अचूक लय, भाव, कहन जपणारे शब्द… कारण गाणं परत कुठे, कधी, कसं उचलायचंय या जाणिवेची प्रचंड ताकद आहे मागे…. कल्पना संगीतकारांच्या पण सोनं केलं माणिकबाईंनी सगळ्या सगळ्या रचनांचं, बंदिशींचं…..

प्रत्येक गाणं वेगळं, भाव छटा, गायकीचा ढंग सगळ्यांची जाण भेटतच राहते. शब्द स्वच्छ, स्पष्ट, थेट भेटत राहतात. “ळ” अक्षर देखील घननीळाइतकंच लडीवाळ होतं. इतकं रूक्ष अक्षर छळत नाही तर गोड होतं…. बारकावे इतके जपत त्या… सगळे आत्यंतिक सुरेल, लयबद्ध, मोजकं… पण लघूमात्राभरही सरकत नाही कुठे… जाळी मधली फिरकी रानातल्या खट्याळ वाऱ्यासारखी तर नाथ हा माझामधली कसदार तान गंधर्व युगाच्या मखमली मुलायम पडद्याची धूपाच्या मंद वलयांची याद देणारी…

किती उदाहरणं द्यावीत. त्या खरंच कमाल होत्या. त्यांचा भटीयार ऐकताना शास्त्रीय संगीताचा कसं, अभ्यास, विचार, रियाज, ज्ञान, गुरू निष्ठा सारं जाणवतं…. आणि प्रचंड सहजता, सात्विकता लाविते मी निरांजन या भाबड्या भावपूर्ण ओळीतही…. सुगम संगीताच्या जितक्या म्हणून गुणवत्ता असतील त्या सगळ्या त्यांनी भेटवल्या….

कारण सुगम संगीताच्या त्या भरजरी वस्त्राला भावनेच्या, सुरेलतेच्या, शब्दोच्चाराच्या कशीदाकारीचा पदर होता… किनार होती.. अनमोल नाजुक पण सशक्त रंगीत अन् जरीच्या धाग्यांचा कशीदाच तो…. माणिकबाई आजही आम्ही त्या वस्त्राच्या श्रीमंतीची ऊब अनुभवतोय!!!

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संध्याछाया भिवविती ???? ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ संध्याछाया भिवविती ???? ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“आयुष्याच्या सांजवेळी ‘संध्याछाया भिवविती ‘अस न वाटता,

‘संध्याछाया सुखविती ‘. असं वाटलं तर आयुष्य किती सुखकर होईल. “••••

काल ताईकड़े गेले होते. आज ताईला जेष्ठ नागरिक संघात या विषयावर बोलायचे होते. ताई म्हणजे मुद्दे सूद बोलणार, अभ्यासपूर्ण तयारीने मैदानात उतरणार. आपल्या ड्रेसिंग वर, बॉडी लँग्वेज वर, आवाजावर ती व्यवस्थित लक्ष देते. शंभर दोनशे ज्येष्ठांसमोर बोलणे म्हणजे काही थट्टा नाही. सर्वच विचारांनी परिपक्व, अनुभवाने श्रीमंत असणारा हा वर्ग, आपले मत मांडण्यात समर्थ असतो. त्यांना पटलं तर ठीक, नाहीतर स्पष्ट सांगणार, असा हा वर्ग समोर असणार, म्हणजे तयारी पण त्याला साजेशीच असायला हवी. भाषण आणि तेही पुण्यात, जेथे चुकीला माफी नसते. ••••

ताई म्हणजे भरपूर आत्मविश्वास. , जपून शब्द वापरणार, दुसऱ्यांच्या मताचाही मान ठेवणार व पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार. मग ते भाषण देणे असो, कोणाला घरी जेवायला बोलविणे असो, नाहीतर कोणाशी फोनवर बोलणे असो. ती पूर्ण विचार करते. स्पष्ट विचार, दुसऱ्यांचे पण ऐकणे, त्यांच्या घरच्या चांगल्या वाईट घडलेल्या गोष्टी लक्षात ठेवून, ती आपल्या बोलण्यात त्यांचा उल्लेख करते. तिच्या अशा वागण्याने आपोआपच एक छान बॉन्ड तिचा तयार होतो. माणसे जमविणे व जपणे, दोन्ही जमते तिला. देवाने रूप देताना थोडी कंजुषी केली असली, तरी व्यक्तिमत्त्व प्रभावी असण्यासाठी आवश्यक गुण मात्र भरभरून दिले आहेत. सर्व जण ताई कडे आदराने बघतात. ••••

प्रत्त्येक वेळेस मी ताईकडून काही तरी नवीन चांगले शिकतेच. ••••

ताई म्हणाली, •••आजचा विषय थोडा वेगळाच आहे. आयुष्याची संध्याकाळ आनंदी होण्यासाठी सुरवातीपासूनच आदर्श जीवन जगलो तरच शक्य आहे ते. पण असं कुठे होतं का ?? हे कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. आयुष्यात आपली गाडी खूप पूढे गेलेली असते. चूका होऊन गेलेल्या असतात. काही अनावधानाने, तर काही दूरदृष्टी नसल्याने, तर काही सळसळत्या रक्तामुळे. ••

वयही कमी असतं. या वयात ज्या गोष्टी समजतात, कळतात त्या पुर्वी कुठे समजायच्या. ?? आपल्याच नादात होतो. वाऱ्यासारखे बेभान. ••••

म्हणतात ना, ••••

घरच्या ज्येष्ठां सोबत रोज दहा मिनिटे जरी बसलं तरी आयुष्याची समीकरण सहज समजतात. पण कुठे?? कोणाजवळ वेळ असतो का तेंव्हा ? वयाप्रमाणे अनुभव येत गेले. ठोकर/ टक्के टोणपे खाल्ले, त्या बरोबर धुंदी उतरत गेली. तसतसे आठवत गेले, •••

अरे !! खरंच ! आजोबा बरोबर म्हणत होते. हेच तर सांगयचे नेहमी ते. बरे असो, •••

जेष्ठ झाल्यावर नोकरीतुन निवृत्त झाल्यावर जेंव्हा वेळ मिळतो, स्वतः कडे बघायला, मागे वळून बघायला. तेंव्हा खूप गोष्टी लक्षात येतात. त्याचवेळी दार उघडून बघावं, तर म्हातारपण दारातच उभे असल्याचे लक्षात येते. म्हणजे संध्याछाया फेज सुरू झालेला असतो तर. •••

रिकामा वेळ म्हणजे नको नको ते आठवत. कितीदा चूकलो, किती दा बळी पडलो, तेंव्हा का स्टंड घेतला नाही ?? तेंव्हा रागवायलाच हवं होतं. , स्पष्ट ‘नाही ‘ म्हणायलाच हवं होतं. तेथे घर घेणे चुकलेच, तेथे पैशाची गुंतवणूक ही चुकली. ज्यांना भाव दिला, आपलं मानलं ते तर काम झाल्यावर सहज दुर्लक्ष करून निघून गेले.

गरज संपली तसं नातंही संपलं. व्यायाम तर कधी केलाच नाही. ••••

” ढल जाती हैं हर चीज, अपने वक्त पर,

बस एक व्यवहार और लगाव ही हैं जो कभी बूढ़ा नहीं होता. “••••

हे सर्व कळत असत पण वळत नसतं. •••

 मधल्या फेज मध्ये अनेक गोष्टींची उलाढाल चालू असते. नोकरी, पैसा, मुलं, शिक्षण यांची गुंतागुंत होत असते. आवश्यक व अनावश्यक गोष्टी समजण्यात गफलत होत असते. विचारांत स्पष्टता नसते. पैसे जोडण्याच्या नादात नात्यांची सर्व्हिसिंग राहुन जाते. व्यक्तिगत अडचणी आणि त्या ओलांडत पूढे जाताना काही गोष्टी मागे सुटतात. हे करू? की ते करू? यात खूपदा काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येत नाही. नोकरी, घर परिवार, आप्त, मित्र मंडळ म्हणजे work- life- balance यांचा समन्वय साधताना गडबड झालीच. खूप दूरचे बघण्यात एवढे बिझी होतो, की समोर दिसणाऱ्या गोष्टींचा आनंद घ्यायचा राहूनच गेला. ••••

आता असं वाटत,

” We were Growing old but we were not growing up. “••••

असं बहुतेक प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असावं. ••••

हे सत्य कळत, तेंव्हा मात्र खूप उशिर झालेला असतो. •••••

आता स्वतः वरच हसावं का रडाव?? कळत नाही. खरंच एवढी धावाधाव करायची गरज होती का ?? एवढं जमवायला जीवाचे रान केले. खरतर गरजच नव्हती. नाती सांभाळताना माझ्या वागण्याने माझी मुलं सुद्धा नाराज झाली. चुकलंच माझं. •••

आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे होती. एकतर विचार न करता कृती केली किंवा फक्त विचारच करत बसलो, कृती करायचे राहूनच गेले. ••••

खूपदा निर्णय घेताना तात्पुरता विचार केला गेला. त्याचा ‘long term effect ‘ काय होऊ शकतो ??हा विचारच केला नाही. ••••

आता विचार करून काय उपयोग ?? जे झाले ते होऊन गेल. •••

पण आता पूढे काय ?? आयुष्याची संध्याकाळ आनंदी जायला आता तरी व्यवस्थित ठरवू या. •••

आता वेळही आहे व समजही आहे. तरी चूका होणारच नाही, याची शाश्वती मात्र आजही देता येणार नाहीच. ••••

आता ठरवलंय घरातल्या जमलेल्या वस्तूंचा किंवा मनातल्या विचारांचा योग्य विनियोग करायचा. आता पर्यंत आपल्या ‘ईगोमुळे’ म्हणा किंवा ‘संकुचित वृत्ती’ मुळे म्हणा काही गोष्टी राहुनच गेल्या. आता जमेल तेवढा मनातला’ emotional account clear ‘करायचा. प्रत्येक दिवस ‘occasion ‘ समजून साजरा करायचा. •••

आयुष्याच्या या फेज मध्ये आपले ज्येष्ठत्व, श्रेष्ठत्व सांभाळून येणाऱ्या कोणत्याही कठीण प्रसंगाला शांत राहून तोंड देणे. हेच आपण करू शकतो. थोडा संयम, थोडी सहनशीलता व थोडे दुर्लक्ष करणे हे नियम मात्र पाळावे लागतील. •••

सुख आणि यशाच्या मागे धावताना अर्ध अधिक आयुष्य तर संपलं. परंतु अपयश आणि मिळणाऱ्या दुःखाने जगायच कस ?? याच मार्गदर्शन उत्तम केले. तरी बरं आपल्या सारखे सामान्य परिवारातील देवभीरू लोक बऱ्यापैकी नियमानुसारच वागतात. ••••

ताई म्हणाली, ••••अग !! किती बोलत बसलेय मी. भाषणाची तयारी करायची आहे ना मला. ••••

मी म्हंटल, ••••अग ! आत्ता जे बोललीस तेच सांग ना. झाली की तयारी. ••••

प्रत्येकाची जीवन कहाणीच सांगितली की तू. थोड्या फार फरकाने असंच घडतं प्रत्येकाच्या आयुष्यात. युगानुयुगे हे असंच तर चक्र चालू आहे. ••••

खरं आहे. यालाच जीवन ऐसे नाव. •••

म्हणतात ना, ••• 

“पछतावा अतीत नहीं बदल सकता,

और चिंता••• भविष्य नहीं सँवार सकती । 

इसलिए वर्तमान का आनंद लेना ही जीवन का सच्चा सुख हैं।” •••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बाप बापच असतो…” ☆ सुश्री स्नेहा देशपांडे पतकी ☆

सुश्री स्नेहा देशपांडे पतकी

? मनमंजुषेतून ?

☆ “बाप बापच असतो…” ☆ सुश्री स्नेहा देशपांडे पतकी 

गोष्ट म्हटले तर काल्पनिक म्हटले तर खरी. डोळ्यांच्या दवाखान्यातला प्रसंग.

मोतीबिंदू ऑपरेशनचे पेशंट त्यामुळे साहजिक साठीच्या वरचेच होते.

कुणी मुलगा सून बायको याच्यासोबत, कोणी मुली बरोबर, कोणी दोघच नवरा बायको, कोणी जावई आणि मुली, मुलगा असे सगळेच दिसत होते.

त्या सगळ्यांच्या मनात किती वेगवेगळे विचार येत असतील.

 कुणाला वाटत असेल मुलगा असता तर bre झाले असते. कुणाला मुलगी सोबत असल्याचा आधार वाटत असेल. कुणाला मुलाला आणि सुनेला करावे लागतंय याचे दडपण येत असेल. तर ज्यांची मुले परदेशात होती त्यांना तर वाटत असेल अशा वेळी दोघेही जवळ नाहीत काय उपयोग.

असो अशा विविध विचारांनी ते गोंधळलेले होते. शिवाय ऑपरेशन कितीही सोपे असेल तरी त्यांच्या भीती मनात होतीच. नर्स consent घेण्यासाठी एकेक नाव पुकारत होती. एक क्ष नावाचे काका काकू त्यांचा मुलगा आणि सून असे आले होते. त्यांचा नंबर येताच ते उठले, तसा मुलगा जोरात खेकसला, बसा ना गप मी बघतोय, ते जागेवर बसले. पुन्हा कायतरी झाले पुन्हा तो तसाच ओरडला.

त्या काकांना काकूंना खूप ओशाळ्यासारखे झाले.

काकू कसेनुसे हसल्या. अहो तुम्ही बसा इथे शांतपणे, तो बघतोय ना सगळे. असे काकांना समजावणीच्या सुरात म्हणाल्या. नेहमी व्हीलन ठेवली जाणारी सून मात्र तुलनेने शांत होती. स्वतःच्याच आईवडिलांचे करताना मुलांना एवढे ओझे का वाटत असेल. एकूणच तो मुलगा फार वस वस करत होता. तो सीन बघून मला वाटले इतका वेळ या लोकांच्या मनात घोळणारे विचार क्षणात बदलले असतील बहुतेक.

 कुणाला वाटले असेल माझा मुलगा किती चांगला आहे. कुणाला वाटले असेल मुलगा आलाच नाही ते बरे झाले. कुणाला वाटेल मुलगीच आपली असते. तर कुणाला वाटले असेल परदेशांत आहेत ते बरे आहे…

 त्या काकांचे ऑपरेशन झाले. ते बाहेर येऊन बसले. काकूही तिथेच होत्या. मुलगा आणि सून नाश्ता करायला बाहेर गेले होते. मी त्यांच्याकडे बघत आहे म्हंटल्यावर त्यांना कस्तरीच वाटले.

त्यांचे अवघडलेपण दूर करायचे म्हणून मग मीच त्यांची औपचारिक चौकशी केली. मग त्या थोड्या नॉर्मल झाल्या. त्या आपणहूनच मुलाची बाजू सावरत म्हणाल्या, त्याला खूप tension असते हो कामाचे. म्हणून त्याची फार चिडचिड होते. तसा तो खूप चांगला आहे. आमची काळजी घेतो……… त्यांची ती केविलवाणी धडपड मला कळत होती. मी विचारले पण चारचौघात असे बोलले की वाईट वाटतच. एवढा वेळ शांत ऐकत बसलेले काका बोलायला लागले, आणि ते जे काय बोलले ते थक्क करणारे होते, ते म्हणाले होय वाईट तर वाटतच. आम्ही दुखावलेही जातो. पण दुखवले जाण्यापेक्षा मला त्याची काळजी जास्त वाटते हो.

काळजी? मला थोडे आश्चर्य वाटले.

हो ना गर्दीतला एकटेपणा तेवढा त्रासदायक नसतो पण एकांतातले एकटेपण माणसाला जगू देत नाही.

या मुलांना नेमके काय हवं ते कळत नाही.

त्याचा या स्वभावापाई तो जेव्हा असा एकटा पडेल तेव्हा कदाचित आम्ही दोघेही नसू त्याला सांभाळायला.

मी निशब्द झाले, आईला फक्त मुलाच्या वर्तमानाची चिंता असते पण बापाला त्याच्या भविष्याचीही काळजी असते ती कुणालाही दिसत नाही.

आईप्रमाणे बापाच्या दुःखाला ग्लॅमर नसते.

कदाचित, म्हणूनच बाप बापच असतो.

© सुश्री स्नेहा देशपांडे पतकी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ निर्णय… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ निर्णय… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सध्या रोजच ढगफुटीच्या बातम्या ऐकू येतायेत. म्हणजे Gunnison Book मध्ये World record register होईल की काय ? अस वाटतय. वर्तमानपत्रात वाचले, TV वर हा सर्व विनाश मी बघत होते.

कार वाहून जातानाचे दृष्य बघताना.. मला माझा नवराच आठवला. माझ्या नवर्याचे पहिल प्रेम म्हणजे त्याची कार.

ऑफिसमध्ये जाताना कडक इस्त्रीचे कपडे आणि चकचकणारी कार म्हणजे He is all set to leave home happily for office. आज आमच्या कारला एक scratch आला. खर तर यांना disturb होण्यासाठी हे कारण खूप मोठ होत. पण आज महाराज एकदम शांत, काहीच बडबड चिडचिड वगैरे काहीच नाही. थोड आश्चर्यच वाटल. कदाचित TV वर बघीतलेल्या बातम्यांचा असर असावा हा. घर पडताना, कार बूडताना, माणस पडताना त्यांना वाचवताना च्या घटना डोळ्यासमोर आल्या असाव्यात, आणि त्यामुळेच आपल दुःख बरच कमी आहे. अस वाटल असाव. असा आपला माझा अंदाज.

आज अजय, बाबा एकत्र च घरी आले. असही होत कधी कधी.

अजय आमचा एकुलता एक मुलगा बाबांचा लाडका, हुशार smart आणि बाबांच्या सेवेत नेहमी हजर. सर्व लाड बाबांकडे पूर्ण होणार. सर्व गोष्टी बाबांबरोबर शेअर करणार.

कंपनी मध्ये जायच्या आधी तो बाबांची कार स्वःता बघणार, पूसणार.

अजय अनिताच चार वर्षांपूर्वी love marriage ला बाबांचा पूर्ण suppport होता.

पहिल्यांदा अजय अनिताला घेऊन बाबांच्या office मध्येच गेला होता. नंतर तिघे घरी आले आणि ताईला आयुष्याच सर्वात मोठ *surprise gift* दिल होत. ताईबाई खुश होत्या. लगेचच आपल्या स्वभावामुळे, नेहमी प्रसन्न राहणारी अनिता सर्वांची लाडकी झाली. साधा कोणाला थोडा खोकला जरी आला तरी धावत जाऊन पाणी आणून देणार. Loving n caring अनिता देशमुखांच्या घरी लवकरच adjust झाली.

आज नेहमीप्रमाणेच ताई ची आपली बडबड सुरू होती. ऑफिस मधून आल्यावर दिवसभराच्या बातम्या सांगण. कोणाचा फोन आला, कोणाला केला वगैरे वगैरे. हे अस रोजच होत असत. पण आज Response as such कोणाकडून काही येत नव्हताच. कदाचित कार scratch च्या दुःखात असावे बहुतेक…

अस generally कधी होत नाही. अजयची तर सतत बडबड असतेच. आफिस मध्ये गेल्यापासून ते येतपर्यंतचे सवीस्तर वर्णन सुरू असते.

आज सगळे एकदम शांत.

अनिताची पण ऑफिस मधून यायची वेळ झालीच होती.

ताई तशी स्वभावाने शांत खूप खोदून विचारण्यापेक्षा, वाट बघणारी. त्यामुळे काय झाल असाव ? याचा विचार करत होती.

अनिता आल्यावर जेवण झाली. बाबांनी सर्वांना हाॅलमध्ये बोलविले. तशा सगळ्यांच्या हाॅलमध्ये गप्पा खूप रंगतात, पण आज बाबांचा सूर वेगळाच लागलेला दिसतोय.

बाबा म्हणाले….

आज अजय ऑफिस मध्ये आला आणि त्याने एक मोठे surprise दिले.

अजयचे *promotion* वगैरे झाले की काय ? अस सहजच दोघी एकदम बोलून गेल्या.

बाबांना अंदाज आला…. दोघींना काहीच माहित नाही, हे लक्षात आल.

बाबा म्हणाले… तस असत तर मी पेढे घेऊन आलो असतो.

आजची बातमी काही आनंदाची नाही. खरतर shocking आहे.

बाबा बोलत होते….

अजयने आज ऑफिस मध्ये येऊन मला सांगितल की तो एका मुलीच्या प्रेमात पडला आहे, आणि दुसर लग्न करण्याच्या तयारीत आहे.

त्याला कदाचित मी नेहमीप्रमाणेच त्याला साथ देईन अस वाटल असाव.

पण या गोष्टींला माझ समर्थन नाही.

चूक निर्णयावर मी कधी सहमत होणार नाहीच.

चार वर्षांपूर्वी अनिताला घेऊन आला होता, तेंव्हा मी आनंदाने सम्मती दिली होती. आज नाही. ती मुलगी कोण आहे ? तिचे नाव गाव याबद्दलही मी चौकशी केली नाही. मला तिला बघायचेही नाही, भेटायचे तर नक्कीच नाही.

नाटकात एकत्र काम करताना एका नामी अभिनेत्री बरोबर ओळख झाली. आणि त्या ओळखीत तो भरकटत गेलेला दिसतोय. इतक्यात घरी उशीरा येत होता, आपल्याला वाटायच नाटकाची प्रक्टीस चालू आहे.

अनिता बरोबर ही love marriage झाल. पुन्हा तेच. ही काय सवय झाली आहे का ? मनावर कंट्रोल नाही बहुतेक. मोठ्या मोठ्या सेलीब्रेटींना follow करतोय बहुतेक. स्वतःला सेलीब्रेटी समजायला लागला आहे का ? 

एका सेलीब्रेटीच्या प्रभावाखाली येऊन आपल्याच माणसाना खाली पाडायला निघाला आहे का ?

अरे !उद्या तीच सोडेल तुला, एखादा सेलीब्रेटी हिरो मिळाल्यावर.

याचा what’s app DP बघीतला का ? अनिताच्या खांद्यावर हात ठेवून दोघांचा छान हसरा फोटो आहे.

काय खर आहे ? कोण जाणे ? 

आणि अनिताच काय ? तिचा काय विचार केलाय ? ती काय परीक्षा द्यायला आली होती का ? Temporary arrangement होती का ती ?

मागे लग्नानंतर अनिताला आॉफिस मधून आल्यावर स्वयंपाक करावा लागू नये म्हणून अजयने आईला सांगून स्टैंड घेतला होता. कामाला मावशी येऊ लागल्या. आई आणि बायकोला, दोघींना बघायची जबाबदारी माझीच आहे. दोघींना न्याय मिळावा म्हणून घेतलेला तो स्टैंड बघून मला आनंद झाला होता. आता अजयची काळजी नाही अस वाटल होत.

आता अस काय झाल अचानक की दुसर लग्न?

अरे! डोक्यातून निघणार्या प्रत्त्येक इच्छेला /अनावश्यक विचाराला प्रतिक्रिया/प्रतिसाद द्यायचा नसतो. तू तुझ्या विचाराचा मालक आहेस की गुलाम ? 

माझच चूकल. खूप लाड केले. प्रत्त्येक गोष्टीत हो म्हंटल, कधी कशाला 

 नाही म्हंटल नाही.

म्हणतात ना,…

जिंदगी में किंमत दोनो की चूकानी पडती है… बोलने की और चूप रहने की.

बाबा अनिताला म्हणाले… अजिबात रडू नकोस अनिता. आम्ही दोघ तुझ्या बाजूने आहोत. आजपासून तू आमची सून नाही मुलगी आहेस. या माणसासाठी रडायची गरज नाही तुला.

ताई आणि अनिताला अश्रु आवरत नव्हते. तुम्ही दोघी रडू नका.

बाबा रागाने लाल झाले होते.

आज अजयच काही खर नाही. हे त्याच्याही लक्षात आल. तो कोणाच्याच नजरेला नजर देत नव्हता.

आपल्या खोलीत जायला लागला, तेंव्हा बाबा म्हणाले आता या घरात रहायची तुला परमिशन नाही.

बाबाच हे रूप सर्वांना नवीनच होत. आजपर्यंत त्यांच प्रेम बघीतल होत, आज रौद्र रूप.

ताई म्हणाली,…

अहो! लोक काय म्हणतील ? 

तुला लोकांची काळजी आहे ? अनिताची नाही ?

बाबा ओरडलेच.

या अशा गोष्टी ऐकल्यावर अस वाटत,…

प्रगती एवढी झाली आहे की हजारो किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तीला आपण बघू शकतो, त्याच्या बरोबर बोलू शकतो.

 पतन एवढ झालय का ? हा विचारही मनात येत नाही का? 

की आपल्या निर्णयामुळे आपल्या बरोबर राहणार्या माणसांवर त्याचा काय प्रभाव पडेल ? 

त्याचे दुःख, त्रास कशाचाच विचार मनात येत नाही. 

आता तर अस म्हणावस वाटत क,….

*कोई जरूरी तो नही की हर बार शरीर की जांच में खून, कैल्शियम, विटामिन ही घटते हो, कभी व्यक्तित्व की भी टेस्ट करवाकर देखनी चाहिऐ. क्या पता दया, मानवता, करूणा इंसानियत, व्यवहारिकता, सामाजिक अनुशासन/ बंधन, भी घट रहा हो ।

एक तो आपला काळ होता. सातजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून व्रत-उपवास करत असत.

आधी कधी कधी ऐकू येणार्या घटना, आजकाल सर्व साधारण मध्यम वर्गीय परिवारातही घडतायेत.

हे अस वागण चूकच आहे. अशा वागण्याला माफी नसावी.

Never re-family anyone back into your life after they have tried to ruin your relationship.

लेखिका : संध्या बेडेकर.

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ छंद माझा वेगळा!!… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ छंद माझा वेगळा!!… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

काव्य, संगीत, चित्र, साहित्य, पर्यटन इ. विषय सोडून आज काही व्यवहाराचे बोलावे असे वाटले म्हणून नम्रपणे केलेले हे कथन.

माझ्या अनेक मैत्रणींनीही आणि विशेषतः माहितीच्या महिलांनीही, मी माझ्या या वेगळ्या छंदाबद्दल कुठेतरी बोलावे, लिहावे असे अनेक वेळा आग्रहाने सांगितले. मी त्या सूचनेकडे हसून दुर्लक्ष करीत आलो आहे आजपर्यंत.

काल काय झालं, सुलूनं सहज कुशलमंगल विचारण्यासाठी मला फोन केला. सुलू ही माझी बालमैत्रीण. बासष्ट सालापासूनची आमची मैत्री. तर फोन आला त्यावेळी मी मिक्सरवर डोश्याचं पीठ दळत होतो. तिनं विचारलं, “काय चाललंय सध्या? काही नवीन उपद्व्याप? म्हणजे लेखन, चित्रं, कविता, नाटक, भटकंती असं काही तरी? तू काय नुसता गप्प बसणारा आहेस का? ” त्यावर मी म्हणालो, ” नाही गं, काही नाही. पूर्ण निवृती भोगतोय! हां, पण आत्ता या क्षणी मात्र ऋद्धीसाठी डोसा करायची पूर्वतयारी करतोय. ” त्यावर ती म्हणाली, ” अरे, तू घरकामं करतोस हे मी कैक वर्षे पहात आल्येय. त्यावर काही लिहावंस असं मी कितीदा सुचवलंय. तू लिही ना काही तरी. कळू तरी दे इतरांना. त्यातून कुणाच्या डोक्यात काही प्रकाश पडला तर बरंच होईल. निदान एखादी गृहिणी तरी सुखावेल त्यानं. ” त्यावर मी हसंत म्हणालो, ” कुणा नवरा-बायकोत भांडणं होण्याचीच शक्यता अधिक. तरी बघतो”. इतरही गप्पा झाल्या आणि मी फोन ठेऊन पुढच्या कामाला लागलो. पण डोक्यात तिची सूचना घोळत राहिली दिवसभर.

तिच्या सूचनेला दिलेला प्रतिसाद म्हणून आज लिहितोय. माझा हा छोटासा लेख समस्त गृहिणींना अर्पण करतोय. (बाप्यांनी सहानुभूतीने विचार करावा… माझा!)

मी निवृत्त होऊन पंधरा वर्षे लोटली. ही सेवानिवृत्ती मी कशी साजरी करत असेन?

निवृत्तीच्या दिवशीच मी पत्नीला सांगितलं की, “उद्यापासून मी किचन सांभाळीन. दोन्ही वेळचा स्वयंपाक मी करत जाईन. चाळीस वर्षं तू जे करत आलीस त्यातून तुलाही निवृत्ती नको का मिळायला? “

दुसऱ्या दिवशी मॕडम उठल्या तोच समोर चहाचा कप हजर होता. ती संकोचली असेल. भाज्या निवडून, धुऊन तयार. तांदूळ, डाळ, भिजत पडलेली. थोड्याच वेळात कुकर गॕसवर चढला. कणीक तिंबून ‘रेस्ट’ करत्येय हे पाहून पत्नी कमालीची अस्वस्थ, अवघडलेली. संकोचून अखेर तीच म्हणाली, ” पोळ्या तेवढ्या मी करीन हो. “

आज वीस वर्षे होत आली. स्वयंपाक बहुतेक वेळा मी करतोय. नातीच्या आवडीचे खाऊ, दक्षिणी पदार्थ, पंजाबी भाज्या, काही काॕन्टिनेन्टल पदार्थ, पुलाव व भाताचे विविध प्रकार यथामती करतो. त्यात प्रयोगशीलता असते. नाविन्य आणण्याचा प्रयत्न असतो. या छंदात माझा वेळ मजेत जातो आहे. असलेल्या अल्पशा प्रतिभेला विधायक वाट मिळते. पोळ्या मात्र पत्नीच करते. (कदाचित माझ्या पोळ्याबाबत, त्याच्या गुणवत्तेबाबत तिला संशय असावा.)

वर्षाची उन्हाळी कामं, हळद, तिखट, मसाले, लोणची, मुरंबे करतो. निदान हे करायला पत्नीला मदत करतोच करतो.

लेकीचे पहिले (आणि नवीन प्रथेप्रमाणे अखेरचे, – हम दो, हमारा एक! ) बाळंतपण माहेरी झाले. बाळ-बाळंतीण घरी आल्या दिवसापासून ते आपल्या घरी जाईपर्यंतची सर्व कामं मी केली आहेत. डिंक लाडू, अळीव लाडू, शेपा लाडू, सुगंधी सुपारी, बाळ घुटीचा डबा, इ. इ. सर्व काही स्वहस्ते केलं. त्याची तयारी म्हणून अनुभवी जेष्ठ महिला, मावश्या, आत्या, काक्या, बहिणी यांच्याकडून माहिती घेतली. त्यांच्या नोंदी केल्या. त्याप्रमाणे सगळं केलं.

रोजच्या जेवणानंतरची साफसफाई, उरलेले अन्नपदार्थ काढून ठेवणं, स्वयंपाकाचा ओटा व गॕस धुणं ही सहसा बिनडोकपणाची समजली जाणारी कामं हौसेनं, उत्साहानं, प्रेमानं व कल्पकतेनं अगदी न कंटाळता करतो हे सांगताना मला यत्किंचितही संकोच वाटत नाही, उलट अभिमान वाटतो! उरलेला पदार्थ ठेवण्यासाठी योग्य आकाराचं आणि मापाचं पात्र निवडणं हे या कामातलं कौशल्य आहे. उत्तम स्वयंपाक आणि नंतरची आवराआवर करण्यासाठी उत्तम बुद्धिमत्ता आणि कल्पकता लागते असं स्वानुभवातून मी ठामपणे सांगू शकतो.

सण-वार, श्राद्ध-पक्ष, भिश्या-संम्मेलनं काहिही असो, मला प्रसंग निभावून नेता येतात. अर्थात मला पत्नी बरोबरीनं साथ देते, माझ्या हाताखाली कामही करते हे आवर्जून सांगायलाच हवं.

इथंच हे ही सांगतो, मित्र कौतुकानं म्हणतात, “आयला, तुला सैपाक करता येतो? आम्हाला साधा चहाही नाही जमत. ” पण हे सांगताना त्यांना जराही संकोच वाटत नाही. आपल्याला येत नाही याची लाज वाटत नाही! पुरुष प्रधान संस्कृतीचं लक्षण! असो.

वर जे सांगितलं त्यामागे आत्मगौरवाचा यत्किंचितही भाव नाही, उद्देश नाही हे मात्र वाचकांनी समजून घ्यावं. घरच्या स्त्रियांचा आदर – आपल्या प्रत्यक्ष क्रियेतून – करणारा कोणी पुरुष असू शकतो!

माझ्या या करण्याविषयी माझ्या पत्नीला व कुटुंबियांना काय वाटतं हे मात्र ना मी तिला विचारलं ना कुटुंबियांना. तिनं किंवा त्यांनीही मला कधी सांगितले नाही. पत्नी “बस करा तुमचं” असं म्हणत नाही तोपर्यंत असंच चालू ठेवायचं मी तरी ठरवलंय.

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मैत्री… लेख क्र. २१ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

 ☆ मैत्री… लेख क्र. २१ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

चौथीच्या वर्गावरच्या शिक्षिका पेपर तपासायला गेल्यामुळे मी त्यांच्या वर्गावर जरा डोकावले, तर ऋजुता मोरे (नाव बदललेले) जोरात किंचाळत होती.

तिला म्हटलं, “बाईंनी दिलेला अभ्यास घेऊन माझ्या वर्गात ये. ” 

ती जागेवरून उठायला तयार नव्हती. दुसरी मुलं तिला उठवायला गेली तर ती त्यांना मारायला लागली, एकाला चावली. तिची तक्रार घेऊन मुलं माझ्या वर्गात आली.

मी तिला बोलवलं, समजावून सांगितलं, “तू खूप चांगली आहेस, मला आवडतेस, म्हणून तुला माझ्या वर्गात बोलावलं. “

ती खूप खुश होऊन आनंदाने वर्गात गेली पण लगेच दुसऱ्या मुलीसोबत परत आली, म्हणाली, “ही मला चिडवते. “

मी म्हटलं, “अगं, ही तुझी मैत्रीण आहे ना? मग भांडता काय अशा? “

त्यावर ती म्हणाली, “बाई, हिने त्या मुलाला मारले. हे हिच्या वडिलांना समजले तर ते तिला मारतील, आणि हे मला सहन होणार नाही. हिला मारलं, तर मला दुःख होईल, ही मी तिला समजावून सांगत होते. पण ती ऐकतच नाही. बाई, आम्ही दोघी मैत्रिणी आहोत. कितीही भांडलो, तरी एकत्र येतो, आमचं भांडण पाच मिनिटंही टिकत नाही. “

हे सांगताना तिचे डोळे भरून आले होते. एवढ्या लहान वयात मैत्रीचे उदात्त भाव तिच्या निरागस चेहऱ्यावर दिसत होते.

लहान मुलं ती – क्षणात भांडणार, क्षणात एक होणार. परंतु, आपल्या मैत्रिणीच्या चुका दाखवून तिला चांगलं वागायला प्रवृत्त करणाऱ्या या चिमुरडीचा मला खूप अभिमान वाटला. तिचा हा युक्तीवाद माझ्या मनाला स्पर्शून गेला.

खरंच आम्ही मोठ्यांनी यातून बरेच शिकण्यासारखे आहे, नाही का?

क्रमशः दर गुरुवारी… 

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ A small step every day… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ A small step every day… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“Take a small step every day for self-improvement.”

काल आमची ‘ post ‘ दिवाळी ‘श्रम परिहार’  पार्टी झाली. ताई कडे आम्ही  चौघे बहिण भाऊ व आमचे  परिवार  जे भारतात आहेत, ते सर्व  दरवर्षी एकत्र जमतात. साधारण तीन पिढ्या एकत्र असतात. नेहमीप्रमाणेच मस्त मेन्यू असतोच,. त्या पेक्षाही जास्त गम्मत गप्पा टप्प्यांमध्ये येते. नवीन जनरेशनच्या गप्पा माझ्याकरिता नेहमी नवीनच असतात. खूपदा नवीन काही ऐकले तर… हो!! का??  असं का?? बापरे !!!   अशीच माझी प्रतिक्रिया असते. ••••

मागच्या  पंधरा वर्षांपासून आम्ही दोघे ज्येष्ठच  घरात आहोत. नवीन फॅशन, टेक्नॉलॉजी, IT क्षेत्रातील नवीन work culture, नवीन मुलांचे काम / गोष्टी/ त्यांचे टेंशन याबद्दल  माहिती कळते, आपले त्यांच्या बद्दल चे मत बदलते. खरं काय ते कळत. सध्या काय ‘ In ‘ आणि काय ‘Out’ आहे. हे तरुण मुलांकडून  कळत. आपलंही वय कमी झाल्यासारखे वाटत. बरे असो, ••••

अजयची  availability बघूनच आजचे  get together ठरले होते. आम्ही अजयची वाट बघतच होतो. अजय आमच्या सगळ्यांत  सर्वात लहान. फोनवर बोलणं होतं असतंच, पण प्रत्यक्ष भेट  बर्याच दिवसांनी आज  होणार होती. त्यांची मजा वेगळीच असते. ••••

अजय  एका मोठ्या कंपनीचा मालक आहे. बरोबर सपोर्टिंग दोन कंपन्या पण आहेतच. लहान वयात त्याची प्रगती  बघून  आम्हा  सर्वांना  त्याचा नेहमीच  अभिमान  व कौतुक वाटतं. ••••

थोड्याच वेळात अजय अनिता व त्याचा मुलगा अनय, सून अपूर्वा   नवीनच घेतलेल्या ‘BMW ‘ मधून आले. •••

अजय बद्दल सांगायचे म्हणजे, ••••

आज त्याचा स्वतः चां बिझनेस आहे. दोन माणसांना घेऊन सुरू केलेल्या बिझनेस मधे आज अनेक लोक काम करतात. किती तरी परिवार चालतात. बिझनेस करणारा हा आमच्या मिडिल क्लास  फॉमिलीतला  पहिलाच. कोणाचाही ‘guidance ‘नसताना, हातात काही ही ‘भांडवल’ नसताना, लग्न झालेला, पदरात एक मुलगा असताना, स्वतः च्या हिम्मतीवर स्वतः चा बिझनेस सुरू करायचा म्हणजे सोप्पी गोष्ट नाही. तेंव्हा आम्ही सर्वच थोडे अचंबित होतो. काळजीही वाटत होती. निर्णय बरोबर घेतलाय का?? असे  विचार ही मनात येत होतेच. परंतु अनिताच्या भरपूर सपोर्ट होता. ••••

आमची अनिता ‘पंजाबी’ आहे (होती)   आता पूर्णपणे मराठी आहे. मराठी सून आणली आहे  तिने. तिने मात्र पूर्ण सपोर्ट केला. ••••

” आप शुरू करो।  मैं हुं ना । मैं परिवार का खर्च संभाल लुंगी। आप अपने काम पर ध्यान दो ।”•••••

 इतक्या आत्मविश्वासाने जर कोणी तुमच्या पाठीशी असले तर बळ मिळते. उमेद वाढते. परिस्थितीशी  दोन हात करायची  हिम्मत येते. •••

”  मैं हुं ना  । ” खरंच जादुई शब्द आहेत. •••

आपला बिझनेस सुरू करावा, असा विचार  मनात येणारे बरेच लोक असतात, पण ते करायला  हिम्मत असणे म्हणजे खरंच खूप कौतुकास्पद आहे. ••••

आज आम्ही  अजयला एक जिंकलेला बिझनेस मॅन म्हणून बघत असलो, तरी इथं पर्यंत पोचायचा  प्रवास अगदी सहज  नक्कीच झाला नसेल. किती तरी टक्के टोमणे, उतार चढाव त्याने नक्कीच बघीतले असतील. पैशाचा प्रश्न तर येतच असेल. कधी इच्छा असूनही  तारूण्याचे शौक पूर्ण करणे जमले नसेल.. म्हणजे मानसिक, शारिरीक  सांपत्तिक अडचणींना तोंड देत, न घाबरता, न डगमगता  आपल्या निर्णयावर ठामपणे जगता आले पाहिजे. हे तेंव्हाच शक्य आहे, जेंव्हा घरचे पण इतर सदस्य साथ देतात. ••••

“म्हणजे करायचे ठरविले तर बिझनेस  करता येतो  हे सिद्ध झाले. ”  याकरिता अगदी  अंबानी, अडानी कडेच जन्म झाला  पाहिजे असे नाही. ••••

‘Self-Employment ‘ कल्पना चांगली आहे. यशस्वी होण्यासाठी प्रचंड कष्ट,, योग्य नियोजन व अपयशातून शिकण्याची व जिंकण्याची  जिद्द असावी लागते. हेच यशामागचे  रहस्य आहे. •••• 

अजय म्हणजे, •••  एक सामान्य घरातील सामान्य  मुलगा, पण खूप  systematic, disciplined, विचारांची clarity असलेला, खूप विचारपूर्वक  planning and execution  करणारा. याबरोबरच रोज एका नवीन विचाराने, ••••

“अजून काय करू शकतो?? “कशी सुधारणा होऊ शकते?? ” दिवसाची सुरुवात करणारा •••

पैशाचा वापर, workers, factory ची safety, scrap  ची विल्हेवाट कशी लावायची???  रोजचा  पैशाचा हिशोब देणे घेणे, याकडे काटेकोरपणे लक्ष ठेवणे. यासर्व गोष्टींकडे लक्ष  ठेवताना, आपला  बिझनेस वाढवायचा ही  विचार करणे. उत्पन्न कसं वाढवता येईल?? आपल्या बरोबर काम करणाऱ्या लोकांचा  विचार करणे. त्यांना अनुनासित ठेवणे, प्रत्येकाच्या क्षमतेचा maximum उपयोग करून घेणे. वेळप्रसंगी त्यांना  मदत करणे, गरज पडल्यास रागविणे. या सर्व गोष्टींचा बॅलन्स ठेवणे. नवीन क्लायेंटस  जोडणे, आपल्या  फिल्डच्या स्पर्धेत टिकून राहणे, अशी अनेक  कामे. ••• 

या सर्व गोष्टी सांभाळून आपली फॅमिली  लाइफ, आपल्या स्वतः साठी वेळ काढणे, स्वतः चे  मनोरंजन, व्यायाम, आठवड्यात  एक दिवस   सुट्टी घेणे. म्हणजे फॅक्टरी व फॅमिली दोन्ही महत्वाचे, त्यात बॅलन्स सांभाळणे, हे वेळेवर समजणे. ही एका बिझनेसमॅनच्या  सुखी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. ••••

हे सर्व करताना अनेक गोष्टींचा विचार, त्यांचे systematic व्यवस्थापन, योग्य वेळेस योग्य गोष्टीला वेळ देणे, वेळेवर योग्य निर्णय घेणे. हे जमायला तुमचे  स्वतः चे  अनुशासन चांगले असावेच लागेल. ••••

म्हणजे खूपदा मला असे वाटते हा  माझा लहान भाऊ माझ्यापेक्षा   मोठा असायला हवा होता, माझी  पण प्रगती झाली असती असो, •••••••

आज त्याच्या शी गप्पा मारताना बऱ्याच गोष्टी कळल्या. दहा पंधरा वर्षांत कंपनी ला एका उंचीवर पोहोचविण्याचे  रहस्य  काय?? मी  विचारलं?? ••••

What is basic principle/ base line, you followed in your system/ your work?? ••••

त्याने दिलेले उत्तर. •••••

तो म्हणाला, हे सर्व करताना मी एकच नियम पाळला. ••••••

Take small step every day. प्रत्येक दिवशी नवीन विचार / कल्पना /improvement यांचा विचार करायचा व ते अमलात आणायचे. थोडक्यात स्वतः शीच रोज स्पर्धा करायची. ••••

म्हणतात ना, •••••

” न्युनतम से शुरू करो, सरलतम का अभ्यास करो ।•••

Start with the smallest, practice the easiest. ••••

Just do that, You will find tremendous difference in your achievements / personality. ••••

अजय पुढे म्हणाला, ••••

आपले  मन कोणताही  छोटा चेंज करायला  सहज तयार होते. जसे, ••••

आपल्याला हात वर करा म्हंटल तर आपण करतो, अजून वर करा म्हंटल तर पुन्हा वर करायचा प्रयत्न करतो. म्हणजेच  आपल्यात अजून  क्षमता असते. म्हणजेच maximum possible extent पर्यंत पोहचायला आपली क्षमता दररोज वाढवायची असते. ••••

एकदम मोठा चेंज / काम करायला आपले मन  सहज तयार  होत नाही. आपल्याला जमेल का?? बहुतेक नाही जमणार  असेच विचार जास्त येतात. ••••

हा नियम आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात लागू पडतो मग तो अभ्यास  असो, स्वयंपाक करणे असो, एखादी कला शिकणे असो नाही तर स्वभावात बदल करणे असो. ••••

आयुष्याच्या प्रगतीचा  अगदी सरळ सोप्पा साधा उपाय, जो कोणीही  सहज करू शकतो.

” Just Take One Small Step ” 

मला आवडला. ••••

आज अजय व नवीन पिढीचा उच्च शिक्षित अनय मिळुन कंपनी चे काम बघतात. अनुभव व नवीन टेक्नॉलॉजी/ energy  चां positive  प्रभाव दिसतोय. ••••

म्हणतात ना, ••••

“एक शांत  अनुशासित मन चुनौतियों के खिलाफ एक प्रभावी हथियार होता हैं।

परेशानी में जो अनुभव सीख मिलती है उससे जीवन समृद्ध होता है. “।••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… बुटीबाई – भाग – ६४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… बुटीबाई – भाग – ६४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

बुटीबाई

आई (माझ्या सासूबाई) त्यांच्या एके काळच्या एकत्र कुटुंबाविषयी नेहमीच मला सांगत. सांगताना अगदी रंगून जात. त्यांच्या सांगण्यामध्ये अनेक भावनांचा ओघ असायचा. भांडारकर कुटुंबांच्या ज्ञात वैभवाविषयी बोलताना त्या अभिमानाने फुलून जायच्या. कधी त्यांच्या हकीकतीत आनंद अभिमानासोबतही काहीशा यातना, वेदनाही मला जाणवत. कधी समाधान, संतोष तर कधी तितकाच रोषही. त्यांच्या मुखातून कुटुंबाच्या या सुरस कथा ऐकताना मला मात्र वाटायचं की एक जाडजूड अशी कादंबरीच आपण वाचत आहोत. अनेक व्यक्ती, अनेक रंगरूपांच्या, स्वभावांच्या पात्रांभोवती सारंच काही पद्धतशीरपणे गुंफलेलं असं एक भलंमोठं कथानक मला त्यात जाणवायचं. सासूबाईंच्या मनात तर भावनांचं मोहोळ उठलेलं असायचं. त्यांच्या मुखी अनेकांची नावे असत त्यात त्यांच्या जावा, नणंदा, दीर, त्यांची मुलं, भाऊ, वहिनी, बहिणी, भाचे, अनेक माधुकरे, शिक्षणासाठी, नोकरीनिमीत्त राहणारे अशा विविध व्यक्ती असत. तसं पाहिलं तर मी कुटुंबातल्या अनेकांना भेटलेली नव्हते. अगदी आजही मला कित्येक अनोळखीच आहेत. शिवाय कधीतरी झालेली ओळख मनात असली तरी या व्यक्तीशी माझं किंवा विलासचं नेमकं नातं काय याविषयी मी नेहमीच घोटाळ्यात पडते.

समोरची व्यक्ती मला विचारत असते, ”अग! तू आबाची सून ना? विलासची बायको ना? ”

समोरच्या व्यक्तीचा जिव्हाळा जाणवत असला तरी आपण यांना ओळखले नाही म्हणून होणारा माझा त्यावेळचा चेहरा जसाचा तसा टिपणं कुठल्याही प्रख्यात छायाचित्रकारालाही जमणं केवळ अशक्य!

पण कधी कधी एखादी व्यक्ती मात्र माझ्या मनात रेंगाळायची. उगीचच मला त्या व्यक्तीबद्दल प्रचंड कुतूहुल वाटायचं. त्यातलं एक नाव म्हणजे “बुटी बाई” आईंच्या बोलण्यात “बुटी बाईंचा” बऱ्याच वेळा उल्लेख असायचा. आईंचं एक मात्र असायचं की त्या कुणाही विषयी बोलताना अनादर व्यक्त करायच्या नाहीत पण बऱ्याच वेळा त्यांच्या मनात असलेला एखादा आकस मात्र हळूच सांडायचा.

माझं लग्न होऊन फार दिवस नव्हते झाले. विलास व्यवसायाच्या निमित्ताने जळगाव अमळनेर अपडाऊन करायचा. मी नाईलाजाने माझी “सिकलीव्ह” वाढवत ठेवायची आणि अमळनेरस्थित आमच्या कुटुंबात नव्याने सारीच नाती जोडण्याचा मनापासून प्रयत्न करायचे. प्रचंड मोठ्या घरात कधीकधी तर सारीच माणसं कुठे ना कुठे विखुरलेली असायची. अशावेळी मी कुठेतरी अधांतरी एखादा कोपरा शोधून एकटीच काहीतरी वाचत बसायची. किचन मधून पायऱ्या उतरून दिवाणखान्यात जाताना लागणाऱ्या एका चौकात एक ऐसपैस लाकडाचा सुंदर बाक होता आणि त्या बाकावर कधी रिकामं, कधी हलकंफुलकंं वाचन करत बसायला मला खूप आवडायचं. अशीच एक दिवस मी बाकावर बसलेली असताना एक अगदीच छोटीशी आकृती थेट बैठकीच्या खोलीतून तुरुतुरु स्वयंपाक घरापर्यंत आली आणि कुणीच नाही घरात समजून तशीच तुरुतुरु घरातून निघूनही गेली. माझ्याकडे त्या आकृतीने ढुंकून पाहिलंही नाही. जेमतेम तीन फुटाची ती आकृती पाहून मी किंचित गोंधळले. गोंधळ अशासाठी होता की ज्या पद्धतीने ती व्यक्ती आली आणि गेली म्हणून. मनाशी अंदाज लावत असतानाच माझ्या मनात एकदम तेच नाव आले.. “बुटीबाई” नक्कीच “बुटीबाई”

आई जेव्हा वरच्या मजल्यावरून खाली आल्या तेव्हा त्यांनी मला सहज विचारले, ” कुणी आलं होतं का गं? ”

मी पटकन म्हणाले! ” बुटीबाई”

आईंना त्या क्षणी मात्र माझं हे “बुटीबाई” म्हणून संबोधणं आवडलं नसावं. त्या जरा फटकारूनच मला म्हणाल्या, ” अगं! त्या सर्वात थोरल्या सासूबाई आहेत तुझ्या. मानानं, आदराने उच्चार करावा की. ”

चुकलं होतं माझं! मान्य आहे मला पण याच “बुटीबाईं” विषयी आईंच्या मनात सूक्ष्मपणे लपून बसलेला कधीतरीचा राग त्यांनी कित्येकदा मला सांगितला होता की. तरीही माझ्याकडून नकळत का होईना “बुटीबाई” विषयीच्या उच्चारात असा अनादरी मिस्कीलपणा असावा हे मात्र त्यांना आवडले नव्हते.

“ समझनेवालों को इशारा काफी होता है! ” अशी जरी माझी अवस्था तेव्हा झाली असली तरी मला प्रकर्षाने एक जाणवलं होतं की आईंसारख्या स्त्रियांच्या ठाई कुटुंबाविषयी किती आपलेपणा होता! कुटुंब धरून राहणं, कुटुंब टिकवणं, माजघरातले वाद शक्यतो ओसरीवर न आणता नाती दुभंगू नयेत म्हणून धडपडणं हे त्या काळातल्या स्त्रियांना कसं जमलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर जेव्हा मी “बुटीबई”नावाची एक व्यक्ती त्रयस्थपणे पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र माझ्या मनात दया, करुणा, काहीसे अन्यायी ओघळ टपटपले.

पाच भावांचं हे कुटुंब. आप्पा, नाना बाबा आण्णा आणि आबा. (आबा- माझे सासरे) आबा सर्वात धाकटे. आप्पा, नाना मोठे पण बाबा, आण्णा आणि आबांचे सावत्रभाऊ. आप्पा सर्वात मोठे. संयुक्त हिंदू परिवारातले कर्ता करविता आणि “बुटीबाई” हे आप्पांचं अर्धांग. लग्न लहानपणीच, नकळत्या वयात जमलेलं आणि झालेलंही. काळाबरोबर आप्पांचं एक भव्य पहाडी व्यक्तिमत्व विकसित झालं. आप्पांची नजरेत भरणारी उंची आणि जेमतेम कमरेपर्यंत त्यांच्या या अर्धांगिनीचं अस्तित्व म्हणून “बुटीबाई” हेच नाव त्यांच्या “लक्ष्मी” या मूळ नावापेक्षा प्रचलित झालं असावं. अर्थात काहीही असलं तरी “बुटीबाई”ने तिचं स्त्रीत्व सिद्ध केलं होतं. तिची कूस भरली, तिला मातृत्व लाभलं. तिने वंशासाठी दिवे ही दिले पण एक असतो शरीरधर्म आणि एक असते अंतर्मनातली ओढ. आप्पांनी दुसरा विवाह करून ही दरी सांधली. मला माहीत नाही हे सारं त्यावेळी “बुटीबाई”ने कुठल्या मनोवस्थेत स्वीकारलं असेल. एक असहाय्यता, एक नाईलाज, समाजाचं भय की स्वीकृत समाजरीत, विरोधाची शस्त्रंच हाती नाहीत म्हणून नि:शस्त्र शरणागती?

पण ते काहीही असलं तरी “बुटीबाई”ने कुटुंबातलं तिचं त्या वेळेचं संयुक्त कुटुंबातील “फर्स्ट लेडी” हे कायदेशीर पद मात्र टिकवलं होतं. त्या पदाच्या अनुशंगाने एक प्रकारचं कुटुंबातील समस्त स्त्री वर्गावर वर्चस्व गाजवण्याचं शस्त्र मात्र तिने हातातून सोडलं नव्हतं आणि याबाबतीत आप्पा तिच्या वाटेत गेलेच नसावेत. हा त्यांचा मोठेपणा की त्यांना वाटणारा अपराधीपणा हे सांगता येणार नाही आणि याच पार्श्वभूमीवर आणखी एक स्त्री व्यक्तीमत्वही तितक्याच समर्थपणे नकळत उजळलं जिने “बुटीबाई”च्या हक्कावर कधीच गदा आणली नाही. ती व्यक्ती म्हणजे आप्पांची दुसरी पत्नी सीतामाई. सीतामाईं बद्दल मात्र आई भरभरून बोलायच्या.

“ एक दिवस चुलीजवळून उठवलंच की त्यांनी मला. म्हणाल्या, ” अगं जा तुझ्या बाळाला आधी पदराखाली घे, चुलीजवळचं काय होतच राहील गं माय, ” माझ्या सासूबाईंनी सांगितलेल्या अशा कितीतरी कथा आज जेव्हा मला आठवतात तेव्हा माझं मन संभ्रमित होतं. कधीही न अनुभवलेल्या एका वेगळ्याच काळाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या साऱ्या स्त्रिया मग “बुटीबाई” असो सीतामाई असो किंवा माझ्या सासुबाई असोत कोण चूक कोण बरोबर हे कसं ठरवायचं?

कदाचित मी लिहिलेलं हे सगळं जर विलासने वाचलं तर तो एखादी टिपणी अजूनही देईल. घटनांचा साक्षीदार म्हणून म्हणेल” माझी आई कधीच कुणाशी भांडली नाही पण एक दिवस साखर संपली असताना “बुटीबाई”ने तिला ती नाकारली. म्हणाली, ” परवाच तर डबाभर साखर तुला दिली होती ना? इतक्यात कशी संपली? ” आई म्हणून दुखावली. अगं! भांडारकरांच्या घरात साखरेची काही कमतरता होती का?

नक्कीच नव्हती. पण स्त्री मनाला जाणवणार्‍या कमतरता, उणीवा हा एक महान संशोधनाचा विषय आहेहेच खरं…

 क्रमशः भाग ६४.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पहिला सलाम – – ☆ श्री विश्वास दाते ☆

श्री विश्वास दाते

? मनमंजुषेतून ?

☆ पहिला सलाम – – ☆ श्री विश्वास दाते ☆

“बरं आहे साहेब, लवकर PUC करून घ्या, नमस्कार! ” असे म्हणत त्या रुबाबदार इन्स्पेक्टरने मला खाडकन सलाम केला. मी तर चक्क उडालोच. पोलीस या जमातीला सर्वसाधारणपणे घाबरून असणाऱ्या सामान्य जनतेचा मी एक भाग. पोलीसच काय, कुठल्याही सरकारी ऑफिस मध्ये जाण्याचा प्रसंग आला तरी माझ्या छातीत धडधड वाढते. आणि हे पोलीसाचाच मला सलाम म्हणजे फारच झाले. हो सांगतो ना काय झाले ते.

मी, माझी बायको, मुलगी आणि आमचा चालक असे चार जण आमच्या गाडीने काही कार्यक्रमासाठी पुण्याहून ठाण्याला चाललो होतो. ऐरोलीपर्यन्तचा प्रवास गप्पा मारत मारत अगदी मजेत झाला आणि अचानक एका हवालदाराने आम्हाला गाडी थांबविण्याचा इशारा केला. वेळ भर उन्हाची होती. गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केल्यावर, हवालदाराने गाडीच्या कागदपत्रांची तपासणीसाठी मागणी केली. मी रीतसरपणे सर्व कागदपत्रांचा गठ्ठा त्याच्याकडे सुपूर्द केला. चिंता करण्याचे मला तरी काही कारण दिसत नव्हते.

अचानक त्या हवालदाराचा चेहरा उजळला आणि माझ्या पोटात धस्स झाले. त्याने माझ्या कारच्या चालकाचे लायसेन्स मागून घेतले आणि खिशात ठेवले. “ साहेब, हे काय, PUC ची मुदत संपली आहे. ” मला तर अगदी आत्ता आत्ता PUC केल्यासारखे वाटत होते. काही वेळा दिवस कसे चटकन सरतात याचा अनुभव आला कारण PUC ची मुदत खरोखरच चार दिवसांपूर्वी संपली होती. मी जरा ओशाळे हसत विनती केली, “ जाउदे ना साहेब, चुकून विसरलो आहे. आत्तापर्यंत असे कधी झाले नाही. आज जरा ठाण्याला पोहोचायची घाई आहे. पुढे लगेच PUC करून घेतो. ”

त्याचे निर्विकार उत्तर आले, “PUC न करणे हा गंभीर गुन्हा आहे. तुम्हाला ८०० रु दंड पडेल. ” चूक माझी होती. मी ८०० रु काढून त्याला विनंती केली की ही दंडाची रक्कम घ्या, त्याची पावती आणि चालकाचे लायसेन्स परत द्या म्हणजे आम्ही पुढे जायला मोकळे होऊ”

त्यापेक्षा साहेंब असे कराना. मला ५०० रु तसेच द्या आणि निघा. हा प्रकार मला जराही मान्य नसल्याने, मी त्याला पुन्हा विनन्ती केली की चूक माझी आहे. तरी योग्य तो दंड घेउन मला कृपया पावती द्या आणि मोकळे करा.

“ साहेब, पावती पुस्तक इथे नाही आहे. ८०० रु कमविण्यासाठी तुम्हालापण खूप कष्ट करावे लागतात. त्यापेक्षा निदान ४०० रु देऊन मिटवा आणि जा. तुम्हाला घाई पण आहे ” मागे नजर टाकत त्याने मला सुनावले. आमच्या गाडीतील महिला समाज तिरक्या कटाक्षातून लवकर निघण्याची अपेक्षा करत होता आणि चालक गोंधळून हा सर्व प्रकार बघत होता.

माझ्या प्रथमच लक्षात आले की मागच्या बाजूस साधारण १५-२० मीटर अंतरावर झाडाच्या सावलीत, एका बुलेट गाडीवर गुढगा टेकून रेबान काळा चष्मा लावून एक इन्स्पेक्टर टेचात उभा आहे. मी त्याच्यापर्यंत चालत जावून पुन्हा एकदा पैसे घेवून पावती देण्याची विनंती केली. त्याला हे ही सांगितले की मी लाच दिल्यास मला शांत झोप लागणार नाही.

काळ्या काचेतून गालात हसत हसत त्याने मला सांगितले की ऐरोली पोलीस चौकी मध्ये पावती पुस्तक आहे. तेथे जावून पैसे भरा आणि मग लायसेन्स परत मिळेल. थोडक्यात काय माझी सत्व परीक्षा घेत होते.

आम्ही होतो तेथून ऐरोली पोलीस चौकी अंदाजे ५ किलोमीटर अंतरावर असल्याने आणखी अर्धा तास वाया जाणार हे नक्की होते तरी पण नाईलाजाने आमची वरात ऐरोली पोलीस चौकीवर पोहोचली. तेथे एक पोलीस नुसत्या बनिअनवर पंख्याखाली दात कोरत बसला होता. मी त्याला कशाकरता आलो आहे ते सांगितले आणि ८०० रु पुढे केले. तो माझ्याकडे कुठलातरी विचित्र प्राणी बघितल्यासारखा बधत राहिला. पुन्हा तोच सल्ला. “साहेब, ४०० रुपयात मिटवून टाकाना. ” पुन्हा एकदा मी माझा प्रोब्लेम त्याला सांगितला.

अजून थोडावेळ अळमटळम केल्यावर आणि मी बधत नाही हे लक्षात आल्यावर, अचानक त्याचे हावभाव बदलले. अत्यंत नम्र आवाजात मला म्हणाला, “साहेब, कस सांगू पण तुम्हाला दंड करणे माझ्या जीवावर आले आहे. पण गुन्हा झाला आहे म्हणून मी १०० रु ची पावती करतो. अहो रोज दिवसभर आमचा संबंध फक्त लाच देवून स्वस्तात व्यवहार मिटवणाऱ्याशी येतो. तुमच्यासारखे फार विरळ. आज रात्री घरी सांगायला एक चांगला अनुभव मिळाला. ” त्याने मग साहेबांना फोन करून काय झालेय ते सांगितले आणि मला सोडायला गाडी पर्यंत आला.

पुन्हा आमची वारी हायवे वर आली. मी घाबरत घाबरत इन्स्पेक्टरला दाखवली. पण आता नूर एकदम बदलला होता. काळा चष्मा खिशाला लावून दिलखुलास पणे हसत त्याने मला आमच्या चालकाचा लायसेन्स परत दिला. मला म्हणाला, “भेटून फार आनंद झाला. तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल क्षमा असावी. बर आहे साहेब, लवकर PUC करून घ्या, नमस्कार! ”

मी ‘जाऊद्या हो’ असे काहीतरी मोघम बोलत निघालो तेंव्हा त्याने चक्क मला खाडकन सलाम केला. यानंतरही बऱ्याच वेळा पोलिसांच्या चांगुलपणाचे अनुभव आले पण हा सलाम पहिलावहिला असल्याने, त्याचीच ही गोष्ट.

माझा चालक आदराने तर आमचा महिला समाज कौतुकाने माझ्याकडे बघत होता आणि मी लोकांच्या हृदयातील लपलेल्या झऱ्याच्या ओघात चिंब झालो होतो.

 

© श्री विश्वास दाते 

संपर्क –  चिन्मय अपार्टमेंट, 54, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे 411038 मो +९१ ९८५००३५३६२, vishwasdatye@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares