मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चहा… सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ चहा… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

ज्या कोणी चहा नावाचं हे उत्कट पेय शोधून काढलं त्यांचे मी प्रथम मनापासून आभार मानते. तसा चहाचा इतिहास काहीही असूदेत. चहाचं पहिलं रोप चीनमधून आलं आणि भारतात त्याचे मळे फुलले वगेरे वगैरे.. पण त्या चहा निर्मात्याला माझा सादर प्रणाम!

तसा चहा माझ्या आयुष्यात थोडा उशिराच आला. “लहानपणी मुलांनी चहा प्यायचा नाही” हा एक नियम पालकांनी घालून दिला होता. सकाळी खात्रीशीर गवळ्याने आणलेलं दूध उकळवून, त्या गरम दूधाचा ग्लास निरोगी रहाण्यासाठी पिण्यातच बालपण गेलं. मेंदू, हृदय, स्मरणशक्तीला मारक ठरणारा हा चहा तारक होऊन एक दिवस आयुष्यात आला मात्र. तो दिवस मी मनातल्या मनातच साजरा केला. कधी सायनस, कधी पचनसंस्थेचा असहकार, कधी ताण, सुस्ती या सर्वांसाठी हा गरमागरम वाफाळलेला सोनेरी रंगाचा सुगंधी चहा अतिशय उपयुक्त ठरत गेला आणि काळाबरोबर नंतर तो एक महत्त्वाचा साथी, सखा, मित्र सगळं काही बनून आयुष्यात व्यापून राहिला.

“पिया बिना” या शब्दा ऐवजी “चहाबिना” बाजेना बाजेना अशीच स्थिती झाली आणि अजूनही ती आहे.

मंगलमय प्रभात, वर्तमानपत्र, पाऊस आणि चहा यांचं एक घट्ट नातं आहे. सकाळी उठल्यावर मला प्रथम चहा लागतोच. त्यातूनही तो कुणी बनवला असेल(खास माझ्यासाठी) आणि असा गरमागरम चहा सुंदर, स्वच्छ कपबशीतून हातात आणून दिला तर ती सकाळ अवर्णनीय असते. अशा सकाळी त्यामानाने टक्केवारीत कमीच पण प्रभाते करदर्शनम् “पेक्षा “प्रभाते चहापेयम”ने जो दिवस सुरू होतो त्या सुखाचा आनंद काय वर्णावा! अशा अनेक सकाळी माझ्या आठवणीत आहेत.

चहाचा सुद्धा एक आकर्षक साज असतो बरं का? सुरेख तबकांत चिनी मातीचा रुंद गोलाकार, प्रसन्न नाजूक डिझाईन आणि हलकीशी सोनेरी कड असलेला कप आणि तशीच बशी आणि सोबत छान कमनीय किटली सुद्धा लागते बरं का मला! कपात डळमळत आणलेला चहा पिताना मी नाराज असते. दंवाने ओथंबलेल्या झाडांसोबत मोकळ्या आभाळाखालच्या मॉर्निंग शेडमध्ये झोपाळ्यावर बसून अशा गरमागरम चहाचे घुटके घेण्यातला आनंद काय वर्णावा! शिवाय चहा कधीच पिऊन टाकायचा नसतो. तो कसा हळूहळू घुटके घेत शरीरांतर्गत रिझवत रिचवायचा असतो यालाच मी म्हणते खऱ्या रसिकतेने चहा पिणे. आपल्या सोबत चहा पिणारा अथवा पिणारी जर याच पठडीतली असेल तर मग अशा कंपनीतल्या या चहापानाचा आनंद वेगळाच!

चहाचे निरनिराळे प्रहर असतात. त्यातले महत्त्वाचे प्रहर म्हणजे सकाळ आणि संध्याकाळकडे सरकत जाणारी दुपार. हा जो दुसऱ्या प्रहरचा चहा असतो ना त्याची मजा औरच आणि तो थोडा अधिक नटवलेला असतो. बाहेर धुंद पाऊस पडत असेल तर चहा सोबत गरमागरम कांदा भजी हवीतच. इतर वेळेला मग गरम कांदे पोहे, मक्याची उसळ किंवा बिस्किट्स, चविष्ट आणि अत्यंत नरम अशी सँडविचेस तरी हवीतच.

चहा पितानाचे माझे काही “नॉर्म्स”(नखरे म्हणूयात) आहेत म्हणजे चुकून जरी मला कुणी फुटक्या कपात चहा दिला तर आवडत नाही. बशीत सांडलेला चहा मला अजिबात चालत नाही किंवा एका कपातून जास्त झाला म्हणून दुसऱ्या कपात ओतलेला चहा मला आवडत नाही. कारण कपाच्या आजूबाजूला चहा ओघळतोच आणि असा ओंगळपणा मला चहा पिण्याचा आनंद देतच नाही पण तरीही अशी मी पुण्यात आल्यापासून मात्र जागोजाग दिसणाऱ्या अमृततुल्य चहाच्या टपरीवर अगदी आनंदाने चहा पिते. या टपरीतल्या छोट्या कपातला वेलदोडे, आलं, मसाला घातलेल्या चहाची गोडी काय सांगू? इथे गोडी दोन अर्थाने आहे. चहा पिण्यातली गोडी आणि दुसरी म्हणजे अक्षरशः साखरेची अतीव गोडी. खरं म्हणजे गोड चहा मला नाही आवडत पण “अमृततुल्य” चहाचा हा अनुभव घ्यायला मला फार आवडतं. त्याला एक महत्त्वाचे कारण म्हणजे वेळ आणि खरेदी किंवा इतर जरुरीच्या कामामुळे आलेला थकवा आणि मिळालेला असा विकतचा आयता चहा हे असेल. आणि असेही आनंदाचे क्षण वेचावेत की.. जीवन कसं चौफेर जगावं..

तर मंडळी आता इथेच थांबते कारण बाहेर बेभान पाऊस कोसळतोय. सैंयाभी घरमे है. तेव्हा अशा या धुंद पावसाळी संध्याकाळी एक चाय तो बनता है ना?

काय म्हणालात? आम्ही पण येतो.

“या ना” एक दिवस तुम्हीपण याच माझ्याकडे चहा प्यायला. मस्त आलं गवतीचहा, तुळस घालून केलेला माझ्या हातचा लज्जतदार चहा पिऊन तर बघा! तुम्हारे होश उड जायेंगे …

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आपली शाळा… लेख क्र. ८ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

 ☆ आपली शाळा… लेख क्र. ८ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

कितीतरी वर्षांनी विक्रांतची (नाव बदललेले) आई रस्त्यात भेटली. सोबत त्यांच्या विहीणबाई होत्या. त्यांनी माझी ओळख करून दिली, “या विक्रांतच्या प्राथमिकच्या बाई. ” 

त्यांचे वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच त्यांच्या विहीणबाई म्हणाल्या, “नलावडे बाई ना!”

विक्रांतच्या आई म्हणाल्या, “बघा बाई, मला ओळख करून द्यावी लागलीच नाही. आमच्या घरी सर्वांनाच तुम्ही माहीत आहात. “

मला चौथीतला विक्रांत आठवला. नाट्यवाचनासाठी आम्ही मुले घेऊन “जवाहर बालभवनाला” गेलो होतो. विक्रांतचे वाचन अप्रतिम होते. त्याला नक्की बक्षीस मिळेल असं मला आणि सोमण बाईंना वाटत होतं. या नाट्यवाचनाचं लेखन, दिग्दर्शन सोमण बाईंनी केलं होतं. पण बक्षीस मिळालं आमच्याच शाळेच्या ऋजुताला.

विक्रांतलासुद्धा बक्षीस मिळायला हवं होतं, असं आम्ही दोघी म्हणालो. तो माझ्या शेजारीच बसला होता, तो पटकन म्हणाला, “बाई, बक्षीस कोणालाही मिळू दे. पण नाव आपल्या शाळेचं आलं ना, हे महत्त्वाचं. “

त्याचं हे वाक्य ऐकून मी त्याला जवळ घेतलं, म्हटलं, “किती गुणाचं आहे बाळ माझं!”

या एका वाक्याने त्याने मला बरंच काही शिकवलं. किती निरागस असतात ही मुलं. असूया, मत्सर, द्वेष यांचा स्पर्शही झालेला नसतो.

अशा माझ्या अनेक शहाण्या बाळांकडून मी खूप काही शिकले.

आता विक्रांत अमेरिकेत असतो. भारतात आल्यावर तो मला भेटायला आला. “बाई, पहिल्या पगाराचे पैसे मला शाळेला द्यायचे आहेत, ” म्हणाला आणि “आपल्या शाळेच्या” नावाने चेक लिहून दिला.

किती प्रेम, किती विश्वास – मन भरून आलं.

माझे विद्यार्थी हीच माझी खरी संपत्ती आहे, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं.

क्रमशः दर गुरुवारी… 

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मायेची बोटे… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

सुश्री नीला महाबळ गोडबोले

??

☆ मायेची बोटे… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले

” माझं चार महिन्यांचं बाळ रडायला लागलं की माझ्या सासुबाई धावत येतात. त्याला उचलून घेतात.

मी कितीतरी वेळा त्यांना सांगितलय… बाळ रडत असेल तर त्याच्या जवळ जायचं नाही.. उचलून तर आजिबात घ्यायचं नाही..

बाळाला तशीच सवय लागते..

पण त्या ऐकतच नाहीत..

मी जाम वैतागलीय..

माझी नोकरी असल्याने बाळाला त्याच सांभाळतात, शिवाय स्वयंपाकही करतात. त्यामुळे त्यांना ठेवून घ्यावच लागतं…

मी काय करू? “

” माझा मुलगा अडीच वर्षाचा आहे.

माझे सासु-सासरे गावाकडे असतात.

इकडे येताना नातवासाठी गोळ्या, चॉकलेट, बिस्किटे आणतात.

माझा मुलगा आवडीने खातो.

मला हे आजिबात आवडत नाही.

मुलाच्या दातांचं काय होईल?

आमची भांडणं होतात यावरून…

मी काय करू? “

” सकाळी उठल्यावर दूध व ड्रायफ्रुट्स, मग व्यायाम, त्यानंतर अभ्यास, पोळी-भाजी जेवण, शाळा,..

शाळेच्या डब्यात पोळी-भाजी, उसळ, फ्रुट्स 

शाळेनंतर ट्यूशन, त्यानंतर स्पोर्ट्स, घरी आल्यावर अभ्यास.. जेवण.. जेवणात भाजी-भाकरी.

रात्री दहाला झोपणं..

मुलाचं वय सहा वर्षे..

असं अगदी व्यवस्थित मी वेळापत्रक बनवलेलं असताना..

सासुबाई मधेच त्याला फ्रुट्सच्या वेळी लाडू नाहीतर वड्या देतात..

सासरे कधीतरी बिस्कीट किंवा चॉकलेट देतात.

पोरगं कंटाळून एखादे दिवशी स्पोर्ट्सला कंटाळा करू लागलं की..

” राहूदे गं आज त्याला घरी ” म्हणत जवळ घेतात..

एखादे दिवशी शाळेला बुट्टी मारून नातवाला लग्नाला घेऊन जाते म्हणतात..

अन् रात्री कसल्यातरी राजा-राणीच्या गोष्टी सांगतात..

मला फार काळजी वाटतेय पोराची..

नि सासु-सास-यांचा भयंकर राग येतोय.

ते माझ्या मुलाला बिघडवतायत..

” मी काय करू? “

समाजमाध्यामांवरील लेडीज ग्रुपमधे वारंवार विचारले जाणारे हे प्रश्न..

सासुसास-यांपासून लांब रहा..

वेगळं रहा..

या उत्तरांकडे नेणारे..

न्युक्लीअर कुटुंबात वाढलेली ही पिढी..

शिक्षण, नोकरी व पैसा या त्रिदेवांना समोर ठेऊन वाढवली गेलेली..

माणसांपेक्षा पुस्तकांवर, समाजमाध्यमांवरील ज्ञानावर जास्त विश्वास असणारी..

सोळाव्या वर्षी आई-वडिलांपासून वेगळे होऊन स्वतंत्र जगायला लागलेल्या, मायेच्या माणसांचा अभाव असणा-या पाश्चिमात्य देशांचं अनुकरण करणारी…

म्हणूनच बाळाची चाहूल लागल्यावर “दोन-तीन पोरांना मोठं केलेल्या ” आईला, सासुला अडाणी समजत पालकत्त्वाच्या पुस्तकांना, समुपदेशनाला आपलेसे करणारी..

निरपेक्ष मायेच्या बावनकशी सोन्यापेक्षा जास्त झळाळी असणा-या व्यावसायिक बेन्टेक्सला भुलणारी..

चंगळवादाच्या रेट्यात आपल्याच माणसांना दूर लोटणारी..

मुलाला जन्म दिला तर महागाईच्या कल्लोळात त्यांचं संगोपन नीट होणार नाही म्हणत… नवजीवाला जन्मापासून रोखणारी..

नि स्वत:च्या भोगवादाला जपणारी..

आणि नवीन जीव जन्माला घातलाच तर

त्याला ” मशीन ” बनवू पाहणारी…!!

हे वाचून, पाहून का कुणास ठाऊक पण मी पन्नास-पंचावन्न वर्षे मागे जाते..

आमचं एकत्र कुटुंब..

आई-बाबा, दोन-दोन काका-काकु, आजोबा..

सख्खी चुलत मिळून आठ भावंडे..

अधून-मधून येणारी आत्या.. नि आतेभावंडे..

पंचक्रोशीत राहणारी आजी..

तीन मावश्या, तीन मामा..

नि हातापायाची बोटे मोजायला अपुरी पडतील.. इतकी मावस-मामे भावंडे..

अंबानींपेक्षाही जास्त असलेलं हे ऐश्वर्य…

रोज सकाळी मला नि चुलतभावाला श्रीकृष्णभुवनमधून आणलेलं इडली सांबार स्वत:च्या मांडीवर बसवून भरवणारे आमचे नाना.. म्हणजे आजोबा..

ताईला आवडतात म्हणून आवर्जून भजी करणारी नि तिला आग्रह करून खाऊ घालणारी थोरली काकू..

पहिला नंबर आला म्हणून अख्खा चॉकलेटचा डबा देणारे दादा म्हणजे थोरले काका..

डोसा मागवून गुपचूप आम्हा भावंडांना खाऊ घालणारे.. मधलेकाका..

नरसोबावाडीला जाताना स्वत:च्या मुलांना एकवेळ न नेणारी.. पण मला आवर्जून घेऊन जाणारी मधली काकू..

घरच्यांचा डोळा चुकवून गाडीवरचा ज्यूस पाजणारा आमचा आबा..

गोळ्याचं सांबार, पिठलं, शेवयाची खीर.. असे कित्येक सुग्रास पदार्थ रांधून आमचं आजोळपण सोन्याचं करणा-या आमच्या आजी नि माम्या..

चिंध्यांच्या बाहुल्या, मातीची चूल नि बोळकी

करायला शिकवणारी आमची आजी.. आईची आई..

सुरकुतल्या मऊशार हातांच्या मिठीत निजवून रंगवून रंगवून गोष्टी सांगत आमचं बालपण मंतरलेलं करणारी तीच आजी..!!

स्वत:चा पोरवडा असताना आम्हा भाचरांचे अतोनात लाड करणा-या आमच्या तीन्ही मावश्या…!!

सुट्टीला आलेल्या आम्हा भाचरांसाठी पहाटे उठून श्रीखंड-पुरीचा स्वयंपाक करून ठेऊन पुण्याहून चालत पिंपरीला जाणारी.. स्वत:चा कारखाना चालवणारी आमची आत्या..!!

आम्ही मुलेच काय आमचे आईवडील आजारी पडल्यावर रात्रीत किर्लोस्करवाडीहून धावत येणारे आमचे डॉक्टरमामा..!!

आपल्या लेकरांचा हा कौतुकसोहळा पहात धन्य होणारे माझे विठ्ठल -रखुमाई..

कदाचित फारशी संपत्ती नसेल..

पण आमच्या माघारी आमच्या पिल्लांच्यामागे भक्कम उभी राहणारी त्यांची मायेची माणसे आहेत… हा केवढा मोठा बॅंक बॅलन्स त्यांच्याकडे होता..

म्हणूनच ते निर्धास्त होते..!!

आम्ही भावंडे मोठी झालो..

फार मोठं शिकलो नाही की सुवर्णपदकांचे मानकरी झालो नाही..

पण या जगात खंबीरपणे जगण्याची क्षमता मात्रं मिळाली..

कदाचित मायेच्या माणसांमुळे मिळणा-या सुरक्षिततेच्या भावनेमुळे..

कोणताही प्रसंग आला तरी माझी माणसे माझ्याबरोबर आहेत, हा विश्वास फार मोठा आधार..!!

किरकोळ कारणांवरून स्वत:चं आयुष्य संपवणारी उच्चशिक्षित तरूण मंडळी पाहिली की आपल्या मायेच्या वैभवाची प्रकर्षाने जाणीव होते..

लग्न होऊन मी सासरी गेले..

थोड्या उशीराने संसारवेलीवर फुलणा-या कळीची चाहूल लागली..

डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली..

घरी आम्ही दोघचं..

सासुबाई नुकत्या वारलेल्या..

आई-बाबा धावत आले.. नि राहिले..

दीड वर्ष आमची काळजी घेत…

मोठे डॉक्टर असलेल्या सास-यांनी स्वत:च्या हातांनी होणा-या नातवंडाचा पाळणा रंगवला..

माझ्या ताईनं हौसेनं डोहाळेजेवण केलं..

बाळाच्या कपड्यापासून सगळी तयारी तिनेच करून पाठवली.

माझी जाऊ, दोन्ही चुलतसासवा यांनी नवनवीन नि पौष्टिक पदार्थांनी माझे डोहाळे पुरवले..

माझी लेक जन्मली तशी तिची मामी.. माझी वहिनी आणि माझी नागुमावशी धावत आल्या.. हॉस्पिटल वहिनीनं सांभाळलं..

” बाळाला गोडंतेल लावायचं “.. वयस्क मावशी म्हणाली..

मी शास्त्र पदवीधर.. बरीच बालसंगोपनाची पुस्तके वाचलेली..

गोडेतेलावर नाक मुरडलं..

” तुझं ज्ञान पुस्तकी.. मावशींनी सात मुलांना वाढवलय.. त्यांचं ऐकायचं. “

.. इंग्लंडहून पदवी मिळवलेल्या प्रतिथयश डॉक्टर असलेल्या सास-यांनी माझे वेळीच कान टोचले…

माझ्या बरोबरीने… माझ्यापेक्षा जास्तच आईने जागरणं केली..

रात्र रडून जागवणा-या माझ्या लेकीला मांडीवर घेऊन बसलेल्या माझ्यासोबतीला माझे बाबाही अहोरात्र जागले..

माझं चिमुकलं पिल्लू आजीचा हात पहिल्या दिवसापासून ओळखू लागलेलं.

तिच्याकडून माझ्या हातात येताना रडारड..

एका हाताने आजीचा मऊशार दंड नि दुस-या हाताने तिचच मंगळसूत्रं धरलं की त्या चिमुकल्या जीवाला सा-या विश्वातली सुरक्षा मिळत असावी..

पोरीची सगळी आजारपणं आम्ही नवराबायकोनी दुस-या क्षणी धावून येणा-या सास-यांच्या नि माझ्या आई-बाबांच्या भरवश्यावर निभावली..

खाण्यासाठी मला रडवणारी माझी लेक काकुच्या हातचं उप्पीट, मामीच्या हातचं इडली-सांबार, रगडा पॅटीस नि मावशीच्या हातचा बटाटेवडा, डोसा.. मात्रं.. मागून मागून खात असे..

सोनुताईनं आणलेले सुंदर कपडे, रोहनदादाने तासन्तास गाडी-गाडी करत तिला फिरवणं..

शेजारच्या शिवालीताईचं दिवसभर खेळवणं..

यांमुळे तिचं बालपण सुगंधी झालं..

मामीनं माझ्या भीतीला न जुमानता तिचे कान टोचून आणणं,

आप्पांनी.. तिच्या आजोबांनी तिला बालवाडीच्या पहिल्या दिवशी बुद्धिबळाचा सेट देणं..

मावशीनं तिला सुंदर कपडे आणून त्या कपड्यांत तिचे कितीतरी सुरेख फोटो काढणं..

काका-काकुंनी तिला स्वत:बरोबर ट्रीपला नेणं..

अशा कितीतरी तिच्या मर्मबंधातील ठेवी..

स्पर्धांमधल्या, परीक्षांमधल्या तिच्या यशांत तिचं कौतुक करणारे तिचे आजीआजोबा, मामा-मामी, काका-काकु 

 मावशी, आत्या, सगळी भावंडं..

यांनी तिच्या प्रत्येक यशाचा सोहळा केला..

माझी आई शेवटच्या काही दिवसांत सा-या जगाला विसरली होती.

पण अधून-मधून देवांगीचं.. माझ्या लेकीचं.. तिच्या नातीचं.. नाव मात्रं तिच्या मुखातून निघायचं..!!

” देवांगीला खूप शिकवा..” तिच्या दोन्ही आजोबांचे शेवटचे शब्द…

स्वत:च्या मुलांपेक्षा नातवंडांची काळजी करणारे..!!

दुधापेक्षा सायीची काळजी करणा-याला सायीपासूनच वेगळं करायचं..?

ते सायीची काळजी करतात म्हणून..?

एखादं कापड विणताना अनेक धागे लागतात.

उभे आडवे..

उबदार हवामान लागतं..

कापड टिकण्यासाठी..

अन् या कापडाला गुंफणारी बोटं 

मायेची असतील..

तर ते फक्त कापड न राहता..

त्याचं वस्त्रं होतं..

चिरंतन टिकणारं.. पवित्र.. शाश्वत..

देवाच्याही मूर्तीवर विराजमान होणारं…!!

– – अर्थात हे माझं वाटणं.. प्रत्येकाला हे पटेलच असं नाही

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रातराणी आणि लतिका…! ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? मनमंजुषेतून ?

☆ रातराणी आणि लतिका…! ☆ श्री संदीप काळे ☆

‘त्या’ दिवशी महाबळेश्वरची सकाळ काहीतरी वेगळंच वातावरण घेऊन आली होती. झाडाझुडपांतून थेंबासारखं सांडणारं धुकं, अंगाला गारवा देणारा मंद वारा आणि त्या शांततेत मिसळलेली निसर्गाची गूढ हाक, असं काहीसं वातावरण होतं. एखाद्या चित्रपटाच्या सेटवर आपण उभे आहोत, असं वाटत होतं. मी शाल अंगावर टाकून, त्या धुक्याला दोन्ही हातांनी अलगद बाजूला सारत एका पायवाटेने पुढे चालत होतो. काही अंतर चालून गेल्यावर एका मोठ्ठ्या दगडावर विसावलो. वाऱ्याच्या झुळुकीसोबत अनपेक्षितपणे आलेला ‘रातराणी’च्या फुलांचा दरवळ मनाला विलक्षण शांती देणारा ठरला. आजूबाजूला नजर फिरवली, तरी झाड कुठेच दिसलं नाही. वातावरण अधिकच गार वाटू लागलं. जणू काळानं क्षणभर थांबावं, असंच काहीसं! 

तितक्यात एका अपरिचित भाषेत एक साद ऐकू आली – गाण्याच्या रूपात. आवाजात काहीशी ओढ, काहीसं दुःख आणि कुठेतरी खोल रुतलेली शांतता होती. मी दबक्या पावलांनी त्या आवाजाच्या दिशेने चालू लागलो. पुढे एका झुडुपाजवळ एक महिला ‘रातराणी’ची फुलं वेचताना दिसली. तिला काही विचारणार, एवढ्यात दुसरी महिला धावत आली आणि म्हणाली, “अगं बघ ना, तो माणूस तुझ्याकडे बघतोय!”

पहिली महिला क्षणभर घाबरली. खाली पडलेला दुपट्टा तिने उचलला. स्वतःला सावरलं आणि तीही शांत उभी राहिली. आम्ही तिघंही –एकमेकांकडे बघत क्षणभर स्तब्ध.

ती शांतता भेदत मीच म्हणालो, “नमस्कार. मी संदीप. मुंबईवरून आलोय. पत्रकार आहे. बाजूच्या हॉटेलमध्ये थांबलो आहे. तुमच्या आवाजाने आणि फुलांच्या सुगंधाने इथवर आलो. कृपया गैरसमज नको. ”

दुसरी महिला म्हणाली, “नाही दादा, काही अडचण नाही. पण जंगलातून अचानक कुणी पुरुष पुढे आला, की धस्स होतं. ”

मी हसत म्हणालो, “ताई, झाडावर फुलं फारशी उरलेली नाहीत. थोडी मिळतील का? ”

ती पहिल्या महिलेनं एक क्षणही न गमावता, माझ्या हातात काही फुलं दिली. तिच्याकडे पाहताना, तिच्या डोळ्यांत न रडता आलेल्या वेदना दिसल्या. तिच्या देण्यातला उदारपणा कमालीचा होता.

मी त्यांना सहज विचारलं, “फुलं विकता का घरी नेताय? ”

ती म्हणाली, “दादा, दुपारपर्यंत फुलं वेचतो आणि हॉटेलमध्ये नेऊन देतो. तेवढ्यावर आमचं पोट चालतं. ”

गप्पांमध्ये दोघींची ओळख झाली. गाणारी महिला होती रजी मार्गो आणि दुसरी होती तिची मैत्रीण लतिका खत्री.

रजी नेपाळवरून लग्न करून महाबळेश्वरला आली होती. पण तिचं लग्न टिकलं नाही. नवरा भांडण करून नेपाळला निघून गेला. आईला शेवटच्या टप्प्यातला कॅन्सर आहे. “डॉक्टर म्हणाले होते, तुमच्या आईचे शेवटचे दिवस आहेत. ती केव्हाही जाऊ शकते. या सांगण्याला आता एक वर्ष झालं. पण आईला असं वाटतं की, मी एकटी आहे, म्हणून ती अजूनही जगते माझ्यासाठी. ” रजीचं बोलणं अचानक थांबलं आणि डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

रजी अनेक दिवसांपासून ‘रातराणी’चे फुलं विकण्याचं काम करते. म्हणून सारे तिला ‘रातराणी’ म्हणतात. महाबळेश्वरमध्ये ‘रातराणी’ची फुलं नेमकी कुठे मिळतात, हे रजीला माहिती असतं.

लतिका उत्तर प्रदेशची. तिचा नवरा सफाई कामगार होता. रात्रीच्या कामावरून आल्यावर झाडाखाली झोपलेला असताना ट्रकखाली चिरडून त्याचा मृत्यू झाला.

“नवऱ्याचे नातेवाईक म्हणतात, मीच कोणाला तरी पैसे देऊन नवऱ्याला मारायला लावलं. नवऱ्याच्या मृत्यूनंतर समाजानं मला वाईट नजरेनं बघायला सुरुवात केली. कोणाचाही आधार नाही, पण टोमणे मारणारे अनेक. नवरा नसलेल्या बाईकडे पाहणाऱ्या नजरा….. त्यावर मी काय बोलावं? ” लतिका सारं काही मला सांगत होती.

लतिकाला मी विचारलं, “मुलं नाहीत का? ”

ती म्हणाली, “दोन मुली होत्या. एके दिवशी दोघींनाही भयंकर ताप आला. आम्ही कामावर होतो. औषधासाठी पैसे नव्हते. माझ्या मुलींच्या डोळ्यांत प्रश्न होता, आई, दवाखान्याला जायचं का नाही? पण माझ्याकडे उत्तर नव्हतं…” या दोन्ही हातांनी पोटच्या मुलीला अग्नी दिलाय.

त्या शब्दांमागे दुःख नव्हतं, ते होतं पछाडलेलं शून्य.

या दोघी, रजी आणि लतिका फक्त मैत्रिणी नव्हेत, तर एकमेकींच्या जगण्याचा आधार होत्या. त्यांच्या बोलण्यात, चालण्यात, फुलं वेचण्यात, गाण्यात जगण्याची एक जिद्द होती.

रजी म्हणाली, “मी सकाळी येते, तेव्हा फुलं पडलेली नसतात. पण झाडाच्या जवळ आले आणि गाऊ लागले की सगळीकडे फुलांचा सडा होतो. हे झाडं, हे फुलं… आता माझा परिवारच झालाय. ”

त्यांच्या सोबत घडलेल्या अनेक घटना मी ऐकत होतो आणि माझ्या अंगावर शहारे येत होते. त्यांच्यासोबत जे काही घडले, ते मी शब्दात मांडू शकत नाही, असे होते.

शेवटी त्या दोघींचा निरोप घेऊन मी निघालो. त्या दोघींनी एक छोटी बॅग माझ्या हातात दिली. त्यात होती ‘रातराणी’ची फुलं. त्या जंगलात फुलणारी विविध फुले. त्या फुलांत एक दुर्मिळ गंध होता. एक होता निसर्गाचा आणि दुसरा मानवतेचा.

त्या दिवशी मला वाटलं… आपल्या भोवती अशा असंख्य ‘रातराणी’ आणि ‘लतिका’ असतात, सामाजिक तिरस्काराच्या सावलीत जगणाऱ्या, पण अंतर्मनाने अत्यंत समृद्ध. त्यांच्या हातांना आधाराची गरज आहे. हातात हात देणाऱ्या माणुसकीची गरज. बरोबर ना?

© श्री संदीप काळे

संस्थापक, व्हाईस ऑफ मेडिया, मुंबई 

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बाबू समझो इशारे…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? मनमंजुषेतून ?

☆ “बाबू समझो इशारे…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

बाबू समझो इशारे… हारन पुकारे.. पमपम..

जात्यावर बसलं की आपोआप दळायला जमतं; ते काही बाईच्या जातीला शिकावावं लागत नाही… तसं संसार कसा करावा हे सुद्धा कुठल्याही गृहिणीला सांगावं लागत नाही.. मुळातच स्त्रीची बुद्धिमत्ता अफाट असल्याने सर्व कला तिला अवगत असतातच.. मग तू तर पुरूष मुलगा आहेस तुला न जमायला काय झालं? … असे आमचे बाबा नेहमी मला मी लहान होतो त्यावेळी म्हणायचे.. सायकल चालवायला त्यांनी शिकवले.. म्हणजे उचलून एकदा सिटवर बसवले आणि म्हणाले, ‘आता स्वताचा तोल सांभाळत दोन्ही पायांनी पायडल मारत जाणे… वेग गती यावर स्वताला आवरता येईल असे ठेवलेस नि फार तर काय जास्त भीती वाटली तर करकचून ब्रेक मार… सायकल उभी… कुठलं काय तो सांभाळता सांभाळता पन्नास वेळा पडून झाले… कधी तोल सावरायचा तर तोवर पायडल न मारले गेल्याने सायकल आडवी.. दोन्ही सांभळले तर रस्ता मोकळा असल्याने जरा वेगात सायकल नेली तोच मांजर आडवे… झालं भीतीने अर्धे अवसान गळाले आणि करकचून ब्रेक आवळला तर मी खाली पडलो ते सायकल गळ्यात घेऊन.. अगणित खरचटण्याच्यां रांगोळी नक्षी दोन्ही हाता पायावर ज्या उमटल्या त्या आज ही सायकल चालविलेली साक्ष देताहेत… बाकी घरात दुचाकी आणि चार चाकी अद्याप अवतरलेल्या नव्हत्या… त्यामुळे चालविण्याच्या फंदात कोण कशाला पडतोय… यथावकाश बॅंकेत नोकरी लागली तो काळ ऐंशीच्या दशकांचा होता.. अन आमच्या बॅंकेची जाहीरात फार मोठी गंमतीशीर अशी होती… शिक्षण कर्ज, घर कर्ज, दुचाकी कर्ज देताना.. आता दुचाकीच्या मागच्या सीटवर लवकरच आपलं हक्काचं माणूस येणारं बरं…. मग आपल्या सगळ्या स्वप्नांच्या परिपूर्तीचा राजमार्ग आमच्या येथून जातो.. स्टाफ लोन मधून बजाज चेतक बुक केली ती वर्षभराने मिळाली… एका शामळू मित्राकडून स्कुटरचे बेसिक शिकून घेतले नि बसलो एकदमच तुटपुंज्या ज्ञानावर दुचाकी चालवायला… राणा भीमदेवी च्या थाटात बजाज च्या चेतक रूपी घोड्यावर…. नशीब कुठेही कसलाही अपघात त्या काळात झाला नाही,.. होणार कसा म्हणा.. अहो रस्तायावरून साधा सायकल वालाच काय पण साधी चालत जाणारी माणसं देखील मला ओव्हरटेक करून पुढे जायची. तरी मी बापडा एक दोन फर्लांग स्कुटर पुढे नेली की थरथरणारे पाय लगेचच खाली टेकवयाचो… स्कुटर वर पाय कमी ठेवून ते जास्त खाली सोडलेले असायचे… वळवताना तर त्रेधातिरपिट व्हायची.. हात दाखवयला गेलो कि स्कुटर आपली मान वळवयाची आणि तिला सरळ ठेवून निघावं म्हटलं तर ती बंद पडायची.. पंधरा विस मिनिटांच्या घराच्या अंतराला दोन अडीच तासाचा खोळंबा व्हायचा… घरी बायको मुलं वैतागून म्हणायची तुमच्या स्कुटर पेक्षा आम्ही रिक्षा बसने जाणं पसंत करतो.. पण काही झालं तरी मी उमेद सोडली नाही… आणि हळूहळू भीती चेपली स्कुटर वर हात चांगला साफ झाला मग घरात बायको मुलांची स्कुटर वरून जाण्यासाठी लठ्ठालठ्ठी सुरू होऊ लागली.. मुलं मोठ्ठी झाली तशी दुचाकी गैरसोयीची ठरली.. मग मोर्चा चारचाकी कडे वळला… कुठल्या कंपनीच़ कुठलं माॅडेल, किती किंमतीच़, बॅंक लोनचा हप्ता किती… वगैरे यावर घरात रोज रात्रीच्या जेवणानंतर शिखर परिषद भरली जायची… आणि हो ते वाहन कोण चालवणार यावर नुसता वादंग माजायचा… अर्थात माझ्या नावाने गाडी तर पहिला अग्रक्रम माझा असेल म्हणून मी जाहीर केले… आणि घरात सगळ्यांनी त्याला अनुमोदन दिले… आता खरी पंचायत माझी होती मला चारचाकी कुठे येत होती.. लायसन सुद्धा काढलेलं नव्हतं.. कर्जासाठी म्हणून नावाला कामचलाऊ लर्निंग लायसन काढून घेतले….. मी दोन्ही मुलं आणि बायको असा ताफा तिथं गाडी आणायला गेलो… बाबा तुम्हीच चालवा असं दोन्ही मुलं मला म्हणाली आणि माझं बिंग फुटलं… त्यावर बायकोनं सांगितलं ती चावी मला द्या मी चालवते गाडी.. मी आणि मुलं आवाकच झालो… आणि गंमत म्हणजे तिने चक्क गाडी सफाईदारपणे ड्रायव्हिंग करत घरी नेली… तिने हे शिक्षण कधी नि कसे घेतले हे शेवटपर्यंत गुलदस्त्यातच ठेवले… आता आईच गाडी चालवतेय त्या अर्थाने दोन्ही मुलांना देखील येत असणार हे ओघाने आलेच… मग घरी आलटून पालटून गाडीची सुत्रं त्या तिघांच्या भोवतीचं फिरत राहिली… आणि माझा मात्र गाडीचा नामधारी मालक म्हणून मागच्या सीटवर कायमची रवानगी केली… ती आज ही तशीच आहे.. अर्थात माझं गाडी न चालविणण्यानं अडत तर काही नव्हतं म्हणा… पण पण आजही कुठेतरी मन खट्टू होतचं असतं… घरात गाडी असूनही आपण स्वतः का ड्रायव्हिंग शिकलो नाही.. मला चारचाकीचं ड्रायव्हिंग येत नाही याचं बायकोला आयतचं कोलीत मिळालं कि, ति जिथं तिथं आमच्या ह्यांना काही म्हणजे काहीच कळत नाही या चालीवर ह्यांना साधं कार ड्रायव्हिंग सुद्धा येत नाही हे अती झालं नाही का असं ध्रुपद जोडून सांगत सुटली… आणि मी निदान एकाबाबतीत तरी तिच्यापुढे ढ राहीलो आहे याचा वरचष्मा माझ्यावर कायमच ठेवला… आता जे बायकोला जमलं ते मला का नाही जमणारं असं थोडंच होतं… पण खरी गोष्ट ही होती कि गाडी त्या तिघांना त्यांच्या साठीच हवी होती आणि मी फक्त त्यांचा सहप्रवासीच होतो… आणि आता या वयात खरं सांगू तर तेच बरं वाटतयं मला… हल्लीचं भयंकर ट्रॅफिक बघता तर माझा जीव दडपून जातो.. आणि मी मागे हटतो… खिशातलं ते कालबाह्य ठरलेलं चुरगाळेलं लर्निंग लायसन अजूनही मला चांगलच ढोसतयं काय कधी चालवयला शिकायची चारचाकी… साठी उलटून गेली म्हणून काही मागे हटण्याचा डरपोक पणा कशाला करतोस… अजूनही वेळ गेलेली नाही… माणूस हा जन्मभर विध्यार्थीच असतो हो कि नाही… असं खट्याळ नि मिस्किल हसत मला विचारतं राहतं.. ते शिकायचं मात्र तसचं राहून गेलं आणि आजही ते चुरगाळेलं लर्निंग लायसन मात्र मी चारचाकी कधीतरी शिकेन याची वाट पहात पाकीटात पडून आहे… पण पण आता बेशिस्त, बेसुमार, वेगाला बंधन नसलेल्या वाहतूकीच्या गर्दीला पाहूनच माझं मन नि तन गळपटून गेलयं.. स्व:ता चालवायची काय पण आता मागच्या सीटवर बसायलाही जीव फार कचरतो हो.. बेंबीच्या देढापासून बोंबलणाऱ्या त्या वाहनांच्या हाॅर्नला कुणीच धुप घालत नाही आणि जो तो वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून सूसाट जात असतो… घाईच असते प्रत्येकाला.. त्यात कधी कोण कसं चाटून तर जाईल नाहीतर चिरडून तरी टाकील. कुणाची कुणालाच इथं फिकीरच नसते त्या तसल्या गर्दीत… मग मला उगाचच वाटतं आपणच गाडी च्या टपावर बसावं आणि जोरजोराने गाणं म्हणत जावं…

बाबू समझो इशारे हारन पुकारे पम पम.. यहां चलती को गाडी कहते है प्यारे… पम पम..

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ५१ – विवाह बंधन ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… – भाग – ५१ – विवाह बंधन ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

विवाह बंधन

१९६८ ते १९७४ चा माझ्या आयुष्यातला काळ हा अत्यंत संमिश्र भावनांचा होता. रसायनशास्त्र क्षेत्रातील पदवी प्राप्त झाल्यानंतर नोकरी करण्याचा निर्णय मी स्वतंत्रपणे घेतला आणि बँक ऑफ इंडियाच्या नोकरीत मी हळूहळू स्थिरावतही गेले. माझ्या शैक्षणिक अनुभवाचा इथे कसलाही संबंध नसला तरी मी याही क्षेत्रात रमू लागले होते. शाळा कॉलेजच्या वातावरणापेक्षा संपूर्ण वेगळ्या भवतालाशी माझे सूर जुळू लागले होते. आमचा सहकर्मचाऱ्यांचा एक छान गृपही जमला होता. पुन्हा इथे बालपणीच्या, शालेय, महाविद्यालयीन मैत्रीच्या ही व्याख्या बदललेल्या जाणवत असल्या तरीही अशा प्रकारचे स्नेह संबंधही समाधानकारक होते. नोकरीमुळे मिळालेले आर्थिक स्वातंत्र्य आणि मनासारखे पैसे खर्च करण्याचेही एक सुख अनुभवता येत होते. खरं म्हणजे छानच होता हा काळ! मुक्त, आनंदाचा, काहीसा स्वैरही पण “पुढे काय? ” हा प्रश्न मात्र आयुष्यात कधीच मिटत नसावा. वयाच्या या विशिष्ट टप्प्यावर “विवाह बंधन” हा एक मोठा विषय असतो. मी स्वतः कुणाशी जमवलेले नाही याची खात्री झाल्यावर आई- पप्पा आणि जीजी यांनी माझे लग्न जुळवण्याचा ध्यास आणि धसका दोन्हीही घेतले होते. जवळजवळ सगळ्याच मैत्रिणींची लग्न जुळली आणि झालीही होती. हळूहळू मलाही आयुष्य काहीसं एकसूरी आणि एकटेपणाचं वाटू लागलं होतं.

शिवाय पार्श्वभूमीवर चिंताजनक भाष्ये असायची. “सारं काही वेळेतच व्हावं. जास्त उशीर नको. ”

“चापू चापू दगड लापू” असे नको घडायला.”

“घोडनवरीचा नाहीतर प्रौढ कुमारिकेचा शिक्का नको बसायला.” वगैरे वगैरे..

जोडीदाराचे अगदी काव्यमय स्वप्न वगैरे मी पहात नव्हते पण विवाह करावा या विचारापर्यंत येऊन ठेपले होते.

 मात्र “वधू पाहिजे” या सदरातल्या काही ओळींनी माझं मन कधी कधी उसळून जायचं.

“ गोरी, सुस्वरूप, सुशिक्षित, उच्च वर्णीय, नोकरी करणारी, शालीन, गृहकृत्यदक्ष वधू पाहिजे” अशी जाहिरात वाचल्यावर मला प्रचंड हसू यायचं. यातला फक्त एकच मुद्दा आपल्या व्यक्तिमत्वाशी जुळतो. “नोकरी करणारी. ” 

शिवाय पत्रिकेत सातव्या स्थानात मंगळाचे आरामशीर वास्तव्य होतेच. त्यामुळे एकूण मामला कठीणच संभवत होता. एखादा होकार आला तर माझ्याकडून घोर निराशाच असायची. पप्पा मात्र फारसे त्यांच्या तत्त्वानुसार विचलित झालेले नसायचे. निदान ते तसं दाखवायचे तरी नाहीत. एके दिवशी त्यांनी मला विचारले, ” तुझ्या जोडीदाराबद्दल काय कल्पना आहेत? नक्की कसा असायला हवा तो? ” 

मी त्यांना पटकन सांगितलं, ” ताटात स्वच्छ, व्यवस्थित जेवणारा, जेवताना आवाज न करणारा, भुरके न मारणारा असा तो असावा. ”

यावर आम्ही दोघंही मनसोक्त हसलो होतो.

असो. पण १९७४ साली माझं, पुण्यात शिकणार्‍या आणि गावात राहणार्‍या एका संपूर्ण अनोळखी व्यक्तीशी विवाह जमला.

होकार देताना त्या व्यक्तीचं नाव, गाव, शिक्षण काहीही मला माहीत नव्हते.

जीजी एव्हढंच म्हणाली,

“आमच्यावर विश्वास ठेव. मुलगा आणि त्याचे कुटुंब, घराणे अतिशय चांगले आहे. आता तू नाही म्हणू नकोस. ”

पुढे जाऊन थोड्या रागाने ती म्हणाली, “यानंतर आम्ही तुझ्यासाठी स्थळं पाहणार नाही. ”

अगदी पहाटे पहाटेच तीन व्यक्ती कुठल्याशा गावावरून आमच्याकडे आल्या होत्या. मीच त्यांना दार उघडले होते. ”या! बसा.” म्हटले होते आणि आईला सांगून माझ्या रूम मध्ये पसार झाले होते. ऑफिसला जाण्याची तयारी करत होते. विचित्रपणे माझ्या धाकट्या बहिणी माझ्याभोवती घुटमळत होत्या. “आज जाऊ नकोस ना! सुट्टी घे. सगळ्यांनी मिळून नाटकाला जायचं ठरलंय.”

पाहुण्यांबरोबर जेवणं वगैरे झाली पण वेगळं असं काही जाणवलंच नाही कारण आमच्याकडे अशी अनेक माणसं नेहमीच येत असत. बहुतेक पप्पांच्या वर्तुळातली असत.

पण जेव्हा जीजीने दुपारी माझ्याशी हा संवाद साधला त्यावरून समजले की हे माझ्यासाठी आलेले स्थळ होते. मागचा पुढचा कसलाही विचार न करता, जीजीकडे पाहूनच मीही “हो” म्हटले.

“लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात” हे नक्की खरे असावे.

थोडक्यात “विलास भांडारकर” नावाच्या एका सुशील, सुसंस्कारी, सभ्य, देखण्या, सुद्धृढ, शांत, मितभाषी, वास्तुविशारदाशी माझे लग्न जमले.

“तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला.” अशी विवाह जमण्यापूर्वीची कायदेशीर परवानगी मिळाल्यानंतर केवळ काहीतरी संवाद घडावा म्हणून मीच प्रथम विचारले, ” खरोखरच तुम्हाला हे लग्न पसंत आहे का?

तेव्हा त्यांचं उत्तर.. “मी माझ्या आई-वडिलांना आधीच सांगून ठेवलं होतं.. मी सतरा मुली बघणार नाही जी पहिली पाहीन तिला संमत असेल तर तिच्याशीच लग्न करेन. तुम्ही “हो” म्हणालात विषय संपला.”

म्हणजे “ती पाहताच बाला कलीजा खलास झाला” किंवा “प्रथम तुज पाहता” वगैरे कसलंही काव्य या विवाह ठरण्यामागे अजिबात नव्हते पण का कोण जाणे त्यांच्या या उत्तराने मी काहीशी प्रभावित नक्कीच झाले. ”हा युवक मला फसवणार तर नक्कीच नाही अशी कुठेतरी खात्री वाटली.”

दरम्यान माझ्या आजोबांनी माझ्यासमोर महाराष्ट्राचा नकाशा ठेवला. ”हे बघ, हा उत्तर महाराष्ट्र. यातला हा जळगाव जिल्हा आणि हे अमळनेर. कृषीप्रधान लोकाचं, शेतकर्‍यांचं गाव. या गावाला स्वातंत्र्यलढ्याचाही मोठा इतिहास आहे. स्वर्गीय साने गुरुजींची ही कर्मभूमी. बोरी नदीच्या काठावर वसलेलं हे एक प्रति पंढरपूरच मानलं जातं. इथे सखाराम महाराजांचं प्रस्थ आणि महात्म्य आहे. प्रताप शेठ सारख्या समाजभूषणाने या गावाला प्रतिष्ठा आणि शान मिळवून दिली. अमळनेर येथील या समाजकार्यात मोलाचा वाटा असणारे हे “भांडारकर कुटुंब”. असं म्हणतात की अमळनेर शहरात कुठेही खडा टाकला तरी तो भांडारकरांच्या जमिनीवरच पडणार.”

जेव्हा माझं पहिलं पाऊल या गावात पडलं तेव्हा घ्राणेंद्रियाला जाणवला तो शेणामुताचा, ओल्या गवताचा, गाईगुरांचा वास, चुलीवरच्या खरपूस भाकर्‍यांचा सुगंध आणि घराघरात भरलेली धान्याची समृद्धी..

तीन मजली वाडा सदृश इमारतीच्या उंबरठ्यावरचं माप ओलांडून “नातिचरामी” शपथ घेऊन मी विलासच्या आश्वासक हातात हात घालून जेव्हा गृहप्रवेश केला तेव्हा माझ्या आत्तापर्यंतच्या संपूर्ण आयुष्यात घडणारं एक परिवर्तनच मी अनुभवत होते. मी भाषाप्रेमी. त्यामुळे सुरुवातीलाच जाणवला तो इथला कवयित्री बहिणाबाईच्या अहिराणी भाषेचा लहेजा, दुहेरी क्रियापदांची काहीशी संगीतमय भाषा, त्यातला गोडवा आणि आतिथ्यशीलता. घरात जुन्या नव्या संस्कृतीची झालेली सुरेख सरमिसळ. परसदारीचा पाणी तापवायचा तांब्याचा सुरेख घाटदार बंब, तळघरातली विहीर, ओसरीवरचं उखळ आणि दगडी जातं, मधल्या मोकळ्या जागेतील बंगळी. पाहिलंत ना? तेव्हा नवा अपरिचित वाटलेला झोपाळ्यासाठीचा “बंगळी” हा शब्द किती मनात बसलाय माझ्या! असे अनेक शब्द. तगारी, भगुणं, चाटू, सराटा, झोट, करजो, घेजो, जमीजा. या बोलीभाषेतील शब्दांशी आता ओळख आणि मैत्री करायची.

अमळनेरमधलं प्रतिष्ठित भांडारकरांचं मोठं एकत्र कुटुंब, कितीतरी स्वभावांची, वयांची लहानथोर माणसं.

गोऱ्यापान, सडसडीत, उंच, ताठ बांधा, चापूनचोपून नेसलेलं काठपदरांचं काष्ट्याचं नउवारी लुगडं, गोंदण असलेल्या कपाळावरचं कुंकू, अंगभर घातलेले रोजचेच सुवर्णालंकार, करारीपणा आणि माधुर्याचं

सुंदर मिश्रण म्हणजे माझ्या सासुबाई. त्यांनी माझा प्रेमाने हात धरला, “म्हणाल्या ही सारी आपली माणसं! ये आत ये”

“ये कहाँ आ गये हम?” असे वाटत असतानाच मनाच्या आतल्या गाभाऱ्यात जाणवले- माझ्या आयुष्यातला जडणघडणीचा एक नवा टप्पा सुरू झालाय. बिंबा ढगे ही व्यक्ती राधिका भांडारकर या नावात आता सामावत जाणार. कसा असेल हा प्रवास?

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अंधार… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

??

☆ अंधार… ☆ श्री मंगेश मधुकर

उन्हाळ्यातली संध्याकाळ फारच आल्हाददायक असते. दिवसभर आग ओकणारा सूर्य अस्ताला गेल्यावर वाहणारा वारा जीवाला फार सुखावतो. अशाच एका संध्याकाळी, सात-साडे सातच्या सुमारास लाइट गेले. काही क्षणांपूरता गडद अंधार. ताबडतोब मोबाइल टॉर्च सुरू झाल्या. अंधार एकदम फिका पडला.

लाइट जाणं ही काही विशेष बाब नाही. उन्हाळा–पावसाळ्यात ये-जा सुरू असते पण अर्धा तास झाला तरी लाईटचा पत्ता नव्हता. असह्य उकडत होतं. मोबाइलमध्ये तोंड खुपसलेल्या लेकीकड पाहत बायको कडाडली 

“जरा ठेव की बाजूला तो डबा. ” 

“एक मिनिट, काहीतरी महत्वाचं चाललंय” मोबाइलवरची नजर न हटवता लेकीचं उत्तर. बायकोच्या ओरडण्याचा शून्य परिणाम.

“निदान अंधारात तरी फोन बाजूला ठेव. आत्ता रील्स पाहिल्या नाहीत तर काही बिघडणार नाही. जरा डोळ्यांचा विचार कर” बायकोच्या बोलण्याकडं लेकीनं दुर्लक्ष केलं तेव्हा मला मधे पडावं लागलं. मोबाइल टीपॉयवर ठेवत जाहीर केलं “लाइट येईपर्यंत कोणीही मोबाईलला हात लावायचा नाही सगळ्यांनी फोन इथं ठेवा”

“बाबा, काहीही काय”लेक वैतागली.

“मोबाइल नाही मग करायचं काय”चिरंजीव 

“शांत बसायचं”बायको.

“म्हणजे” लेक आणि चिरंजीवांनी एकदमच विचारलं.

“निवांत बसा. आधी तो टॉर्च बंद करा. जरा अंधारच असू द्या. रोजच्यापेक्षा वेगळा अनुभव. ”

“आता आपण इनव्हरटर घेऊ. ”लेक 

“काही गरज नाही. लाइट नेहमी जात नाहीत आणि गेलीच तर मोबाइल, मेणबत्ती आहेत. उगीच फालतूचा खर्च नको. ” माय-लेकीत वादावादी सुरू झाली.

“एक मिनिट. दोघी गप्प बसा. मस्त अंधार आहे. खूप दिवसांनी सगळे निवांत आहोत. गप्पा मारू. ”

“कोणाशी? ”चिरंजीव

“एकमेकांशी”मी 

“कसं शक्यय. नॉट पॉसिबल”लेक 

“इट्स हॉरीबल”चिरंजीव.

“त्यात हॉरीबल काय?? आम्ही इतकेही आऊटडेटेड नाही की तुमच्याशी गप्पा मारू शकणार नाही. ”बायको.

“बघितलत. मातोश्री लगेच सेल्फ पिटी मोडवर गेल्या. ”

“बरोबरयं. तुम्ही ओव्हर रिएक्ट करताय. ”

“ओके, सॉरी!! सांगा कोणत्या विषयावर गप्पा मारायच्या. ” चिरंजीव.

“ अंधार ”

“त्यावर काय बोलणार”

“खूप काही आहे. अंधार म्हटलं की काय वाटतं”

“त्यात काय वाटायचं. लाइट गेले की टॉर्च सुरू करायचा. अंधार गायब. एवढंच आहे. ”

“म्हणजे अंधार माहितीच नाहीये. ” 

“तुमची चूक नाहीये. दिवस-रात्र असलेल्या उजेडामुळं अंधार त्यातही गडद अंधार तुम्ही अनुभवलाच नाही. ”बायको.

“गडद अंधार, व्हॉट इज दॅट” इंग्लिश मिडियमचे चिरंजीव वदले.

“टोटल डार्क, काहीच दिसत नाही. ब्लॅक आउट”लेकीचा खुलासा.

“आमच्या लहानपणी असा अंधार झाला की आकाशतलं चांदणं दिसायचं आणि आता फक्त एक चंद्र अन थोड्याफार चांदण्या दिसतात. “बायको.

“पूर्वी लाइट गेले की बराच वेळ येत नसतं. दिवसा काही वाटायचं नाही पण संध्याकाळी लाइट गेले की रॉकेलचा दिवा लावला जायचा नंतर त्याची जागा मेणबत्तीनं घेतली आणि मग एकेक नवीन प्रकार येत गेले. मोबाइल नसल्यामुळे मोठी माणसं गप्पांमध्ये हरवायची आणि मुलं!!! . ”बायको.

“आणि अंधार म्हणजे मुलांसाठी लॉटरी. स्पेशल खेळ सुरू व्हायचे. ”बोलताना माझं मन जुन्या काळात गेलं.

“स्पेशल खेळ???? ”लेक 

“हो, अंधार स्पेशल”

“ लपाछपी तेही अंधारात खेळताना जी मजा येते ती इतर कशात नाही. ज्याच्यावर राज्य आजच्या भाषेत ‘डेन’ त्याचे सगळयात जास्त हाल. अंधारात चेहरा ओळखणं अवघड त्यात आम्ही मुलं शर्टची अदलाबदल करायचो त्यामुळे फार धमाल यायची. अजून एक खेळ म्हणजे डब्बा ऐसपैस. ”

“अशा नावाचा खेळ असतो”चिरंजीव.

“हो, रिकामा डब्बा लांब फेकायचा. ज्याच्यावर राज्य तो डब्बा आणून एका जागेवर ठेवतो आणि लपलेल्यांना शोधतो. त्याच्या नजरेस न पडता डब्बा लाथेनं उडवला मग पुन्हा राज्य. खेळताना आरडाओरडा, मस्ती, भांडणं सगळा गोंधळ. ज्याच्यावर राज्य तो पार रडकुंडीला यायचा. ”

“बाबा, हे इंटरेस्टिंग आहे”

“अजून एका गंमत म्हणजे अंधारात हमखास भुतांच्या गोष्टी सुरू व्हायच्या. हडळ, वेताळ, खवीस मंडळीबद्दल भीती वाटायची पण खूप उत्सुकता असायची. भान हरपून ऐकलं जायचं. जास्त घाबरलेले काही ना काही कारणं सांगून घरी पळायचे. आजूबाजूला किवा झाडावर कोणीतरी आहे असले भास व्हायचे त्यावरून एकमेकांना घाबरवणं सुरू व्हायचं. भूत आणि कंपनी यांचा अंधाराशी जवळचा संबंध असल्यानं गप्पांमध्ये भारी एक्साईटमेंट असायची. ”बोलताना मला लहानपणीचे दिवस आठवले.

“आता असं काहीच नाही. यू आर सो लकी. ”लेक.

“काळाबरोबर सगळं पार बदललं. आता अंधारच नाही आणि मुलं मोबाइलवर बिझी असतात. ” 

“किर्रsssर्र काळाकुट्ट अंधार आता फक्त स्क्रीनवर पहायला मिळतो. अनुभवता येत नाही. गावाकडं थोड्याफार प्रमाणात शिल्लकयं पण शहरात तर अजिबात नाही. ”बायको.

“आणि आजकाल अंधाराची सवयच नाही. लाइट गेले की लगेच टॉर्च लाइट ऑन. नेहमी कामापुरतं बोलणारे आपण आज गप्पा मारतोय. इतक्या वेळेत मोबाइलची आठवण सुद्धा झाली नाही. ”

“थॅंक्स आई-बाबा आणि नवीन माहितीय मिळाली. आता एक भुताची स्टोरी सांगा. ” चिरंजीव उत्साहानं म्हणाले.

“नक्की सांगतो. ऐक, मी नववीत असतानाची गोष्ट… होळीसाठी मित्राच्या गावी गेलेलो. एकदम खेडेगाव. अशा ठिकाणी राहण्याचा पहिलाच प्रसंग, दिवस मावळला. लाइट नाही. संध्याकाळी जोरात पाऊस सुरू झाला. अनोळखी गांव, गडद अंधार, विजांचा कडकडाट, कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज, मिणमिणता दिवा, ओसरीवर कोपऱ्यात गोधडी लपेटलेली मित्राची जख्ख म्हातारी आजी, तिचे भीतीदायक मोठाले डोळे पाहून नेमकं भुतांचे सिनेमे आठवले. जाम घाबरलो आणि….. ” इतक्यात घरातले लाइट आले पण चिरंजीवांनी धावत जाऊन पटापट सगळी बटनं बंद केली. पुन्हा अंधार. मी गोष्ट पुढे सुरू केली.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ श्रावणाच्या उंबरठ्यावर… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? मनमंजुषेतून ?

श्रावणाच्या उंबरठ्यावर… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

हिरवाई पानातून ठिबकावी असा श्रावण.. झाडे गच्च पानांनी लगडून एकमेकांशी हितगुज करतात असा श्रावण..

वसुंधरेचे काय विचारावे? ती तर हिरवा, धानी शालू नेसून अशी काही मुरकते की बघत रहावे. पान न् पान गच्च हिरवे! त्यात लपलेले चोचीत चोच घालून गुलूगुलू करणारे पारवे, पक्षी, बुलबुल, शिंपी, आपल्या पिलांच्या डोक्यावर पंखांचे छत्र धरून बसलेले, त्यांना चिमणचारा भरवणारे, मायाळू, पिलांसाठी घरट्यातून बाहेर न पडणारे.. असा झुलवणारा लडिवाळ श्रावण, पिलांना झोका देणारा व महिलांनाही झुलवणारा…

जिकडे तिकडे फुले फुलपांखरे उडतांना पाहून दृष्टी सुखावणारा हा श्रावण नजर ठरू देत नाही इतका फुललेला असतो. पारिजातकाचे सडे, सदाफुलीचे रंग, गणेश वेलाची रंग बहार आणि ती ब्रह्मकमळे, शेकड्यांनी ह्याच दिवसात एक रात्र फक्त उमलणारी पण मन वेडं करणारी अशी बघून समाधानच होत नाही. पारिजात तर नुसता सड्यावर सडे घालतो आहे, आवरला जात नाही. कर्दळी कण्हेर गुलाब गुलछडी मोगरा कोरांटी बटमोगरा बकुळ जास्वंदी किती नावे घ्यावी? इतक्या या फुलांचा गजरा माळून बसल्यावर ही वसु रमणी दिसणार नाही तर काय?

सक्काळी पडणाऱ्या पावसात व उतरणाऱ्या धुक्यात तिचे रूपडे बघून तर कुणी अरसिकानेही वेडे व्हावे अशा तिच्या रूपावर नजर ठरत नाही. धुके उतरत असते व या धुक्याचा पडदा, घुंघट घेऊन वसु अशी काही लाजते की मुखडा दाखवायलाही तयार नसते. काही बघू देत नाही ती! सारे झाकून टाकते, लुप्त होते नि मग प्रियकर सोनेरी किरणांचा रथ घेऊन दौडत येताच अशी काही आरक्त होते की तिचे लालगुलाबी गाल बघतच रहावे. किरणांचा साज लेवून हिरव्याकंच झाडावरील तिचा पिवळा पितांबर बघतंच रहावा, त्यातून तिने माळलेले विविधांगी गजरे अशी काही बहार आणतात की तिचे रूपडे बघावे की डोळ्यात साठवून ठेवावे हेच समजत नाही.

त्यातून मधून येणारे श्रावणातले उन्हातले शिडकावे ऊनपावसात इंद्रधनूचे रिंगण फिरवून धरणीला व्यापतात व पश्चिमेला रंगांचा खजिना फुटतो. श्रीरंग हजारो रंगांच्या घागरी अशा काही सांडतो की ते रंगकाम नजरेतून उतरतच नाही व त्यात जर बगळ्यांची माळ उडत असेल तर तो चंद्रहार पाहून माणूस वेडा व्हायचाच बाकी रहातो.

सणवार तर एकामागे एक धडका मारतात नि महिलांची व्रतवैकल्यांची व नटण्या मुरडण्याची एकच झुंबड उडून त्या नऊवारीतल्या व खचाखच दागिन्यांनी नटलेल्या महिला पाहिल्या तर स्वर्गातील अप्सरागण कधी खाली उतरला हेच समजत नाही नि त्या जेव्हा आमराईत झोका खेळतात तेव्हा मोठमोठ्या कवींची मती ही कुंठित होते. कालच कोकिळ तारस्वरात ओरडतांना प्रियेला हाक घालतांना ऐकला व कळले की हिरवाईत यांचे ही प्रियराधन सुरू झाले वाटते. उपासतापास नटणे मुरडणे, देवधर्म मंगळागौर आता फेर धरणार व पायातल्या पैंजण व जोडव्यांसह नववधुंच्या लाजऱ्या फुगड्या सुरू होणार. पारंपरिक सण व खेळांना उत येणार. महिला आपली हौस पुरेपुर भागवून घेणार.गाणी गाणार फुगड्या घालणार पिंगा घालत वन्संना जावांना चिडवणार व शब्दहारात नवऱ्याचे नाव गुंफत इश्य! म्हणून लाजणार नि तो ही माजघरातील कोपऱ्यातून डोकावत आपल्या लाडक्या हरिणीला डोळ्यात साठवणार…

एकूणच हे सणवार म्हणजे स्रियांचा विरंगुळा तर होताच पण त्यातून मनोमिलन, ओळखीपाळखी होऊन सुखदु:खाची देवाणघेवाण होत महिलांना बाहेर पडण्याची ती संधी असे. काही महिलातर महिनोन्महिने घरातच असत त्यांना जरा सुटका व मोकळिक मिळे. विचारांची देवाणघेवाण होत असे.एरव्ही कामाच्या धबडग्यात गुंतून पडलेल्या महिलांना आनंदाचे क्षण मिळत ते इथूनच. सणवारांची तयारी करतांना चेहऱ्यावर फुलणारा आनंद ह्याच काळात दिसे. दुसरा एक महत्वाचा फायदा म्हणजे या निमित्ताने होणारा भरपूर व्यायाम व मोकळी हवा ही महिलांना मिळत असे.

एकूणच बारामासांचा राजा श्रावण आता कधी टपकेल याचा नेम नाही. महिलांचे, नववधुंचे मनसुबे तयार आहेत, बस्स्! तो येण्याचाच अवकाश आहे आता.. जय्यत तयारी झाली आहे म्हणाना! ये बाबा ये.. धरणी सुखावून तुडुंब तृप्त झालीच आहे, आता घराघरातील रमणी सुखावू दे! रांधा वाढा उष्टी काढा चुकणार नसले तरी दिवस कसे कापरासारखे उडून जाणार आहेत यात जरा ही शंका नाही..

चला तर मग.. भरल्या अंत:करणाने सजलेला श्रावण पदरात झेलत…. 

‘पिंगा ग पोरी पिंगा‘ म्हणत घागरी फुंकू या…

© प्रा. सौ. सुमती पवार 

नाशिक – ९७६३६०५६४२, email: svpawar6249@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणींचे हंडे… ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

??

☆ आठवणींचे हंडे  ☆ श्री सुहास सोहोनी

 

आठवणींसाठी हंडेच हवेत

तपेली नि पातेली पुरणार कशी

अलिबाबाच्या खजिन्याला गुहाच हवी

अडकुली बुडकुली चालणार कशी

१) १९५२ साली मी रत्नागिरीच्या मराठी प्राथमिक शाळा क्रमांक १ मध्ये पहिलीत दाखल झालो. तेव्हाच कुंदा तिसरीत आणि पुष्पा सातवीत गेली होती. त्या वर्षी आम्ही तिन्ही भावंडं एकाच शाळेत होतो. शाळेच्या उंच जिन्याच्या पायऱ्या धाड धाड चढून, बाजूच्या गुळगुळीत लाकडी कठड्यावरून घसरत काही सेकंदात खाली येणं, हा आम्हा मित्रांचा आवडता छंद होता! एकदा माझ्यासह आणखी एक-दोनजणं धप्पकन् खाली पडल्याचं पाहून पुष्पानं माझं मुटकुळं उचललं आणि माझ्या पहिलीच्या वर्गात नेऊन केळकर बाईंसमोर बसवलं आणि माझ्या घसरगुंडीवर बंदी आली!

२) तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून चार-पाच वर्षंच झाली होती. स्वातंत्र्याचा उत्साह, उन्माद अजूनही तसाच होता. स्वातंत्र्य मिळालं होतं, तरीही लेंगे स्वराज्य लेंगे सारखी गाणी अजूनही कानावर पडत असत. भारतमाता, तिरंगा, झंडा यासारखे शब्द असलेली गाणी तर वेळी अवेळी ऐकू येत असत. महात्माजींची हत्या सुद्धा नुकतीच झाली होती. त्यामुळे त्यांच्या विचारांचा पगडा संपूर्ण समाजमनावर पडलेला होता. सूतकताई हा कंटाळवाणा विषय तसा कोणाच्याही आवडीचा नाही. पण आम्ही सलग सात वर्षं नेटाने हा उद्योग केला. दर आठवड्याला वीस तोळे कचरायुक्त कापूस दिला जायचा. तो साफ करणे, पिंजणे, पेळू करणे, टकळीवर/चरख्यावर सूत कातणे, त्यांच्या लड्या करणे, ते सूत हातमागावर टाकून कापड विणणे, अशी कामं. त्या लहान वयात ही कामं करण कठीणच होतं. हातमागाच्या धोट्यापर्यंत हातही पोचत नसे. पण तो जोराने सटासट खेचून त्याची पुंगळी डावी/उजवीकडे धावडवायचं काम आम्ही कसं करत होतो कुणास ठाऊक! त्या हातमागावरून काही शेले विणले जात नव्हते. त्या जाडजूड भरड कापडाची फक्त बसकटं केली जायची. ती मात्र फाटता फाटत नसत!

३) शाळेच्या रोजच्या कामकाजाची सुरुवात प्रार्थनेनं व्हायची. सर्वधर्मसमभावाचा विलक्षण पगडा असल्यामुळे आठवड्यातून चार दिवस हिंदू प्रार्थना, एक दिवस ख्रिश्चन प्रार्थना आणि एक दिवस मुस्लिम धार्मिक गद्यवचने म्हटली जायची.

श्रीदेवी शारदे वंदन करितो तुजला,, .

देवा मानस मंदिरि या,, .

ध्याउ मनी प्रभू सदा जीविचा विसावा,, .

अशा काही हिंदू धर्मीय प्रार्थना होत्या.

*

मेंढपाळ हा प्रभू कधी ने हिरव्या कुरणी मला,, .

दयाळा कृपाळा येइ प्रेषिता,, .

हे दयाघना देवा तारि तू आम्हा,, .

अशा काही ख्रिस्ती प्रार्थना होत्या.

*

मुस्लिम धार्मिक गद्य वचने आता लक्षांत राहिली नाहीत.

पुढे आम्ही सहावी सातवीत जाईपर्यंत ख्रिस्ती/मुस्लिम प्रार्थना हळूहळू बंद झाल्या आणि सर्व दिवशी हिंदू प्रार्थनाच म्हटल्या जाऊ लागल्या.

४) त्या वेळच्या परंपरेप्रमाणे, सर्व मराठी शाळांतून दसऱ्याच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. नाच, गाणी, वेशभूषा, संवाद, नाट्यछटा वगैरे. नेहरू, गांधी, सुभाषबाबू, झाशीची राणी यांचा पेहराव करून गाणी म्हटली जायची, संवाद म्हटले जायचे. माझा मित्र विजय भाटे सुभाषबाबू खूप चांगले साकारायचा.

“ऐसे करण्याला,

ऐसे लढण्याला

गेला गेला सुभाष आपुला

या गाण्यावर तो छान अभिनय करायचा. सलग चार-पाच वर्षे त्याने सुभाष उभा केला.

आणि नंतर काय झालं नकळे. पुढच्याच वर्षी सर्व कार्यक्रमातून “सुभाष” हे नांवच नाहीसं झालं! अभ्यासातून – सांस्कृतिक कार्यक्रमांतून.

काळाचा महिमा,, . दुसरं काय?

५) आमच्या घरी लाईट आले १९५३-५४ च्या दरम्यान. तोपर्यंत रॉकेलचे दिवे होते. प्रभाकर कंदील, पत्र्याच्या छोट्या टिमक्या, असले मिणमिणते दिवे! तेही संख्येने मोजकेच. अशाच दिव्यांच्या काळोखात नानांचं ऑफिसचं काम, आईचा स्वयंपाक, पोरांचा अभ्यास चालायचा. संध्याकाळचा पहिला दिवा काडेपेटीच्या काडीने लावला जायचा. नंतर “ज्योतसे ज्योत जलाते चलो”! त्यासाठी नाना ‘सनकाड्या’ नांवाच्या एक प्रकारच्या गवताच्या काड्या घरी आणून ठेवायचे. या साऱ्यामागचा उद्देश एकच – काडेपेटी बरेच दिवस पुरते!!

लाइट आल्यावर मजा वाटली. तेव्हा बरेच दिवे २५ वॅटचे असायचे. व्होल्टेज अगदी कमी. बल्बला “ग्लोब” नाही तर “बल्प” म्हणायचे. त्यांचा प्रकाश पिवळा असायचा. इलेक्ट्रिकशिटीचा शॉक कसा असतो याचाही धक्कादायक अनुभव अनेकांनी घेतला! बल्बच्या होल्डरमध्ये बोट घालून बघणे, उपकरणे खोलून आत स्पर्श करून पहाणे, असले चाळे अंगाशी येत!!

६) आणि हेही आठवतंय की तेव्हा पाहुणे मंडळी खूप यायची-खूप रहायची. घरातलीच व्हायची. आपल्या घरी परत जातांना, “पुन्हा यायला नक्कीच आवडेल” असं आवर्जून सांगून जायची. बरं वाटायचं! अर्थात याच सारं श्रेय आई-नानांचं.

आणि हेही आठवतंय की वारावर जेवणारा कोणी ना कोणी गरीब विद्यार्थी सदैव जेवायला असायचा. माधुकरी मागायला येणाराही कधी विन्मुख परत गेला नाही. याचं सारं श्रेय आई-नानांचं. आई-नानांच्या पश्चात यापैकी अनेक जण घरी येऊन त्यांची आठवण काढायचे.

बरं वाटायचं!

आणि हेही आठवतंय की नानांना धोतराऐवजी पॅंटमध्ये ऑफिसमध्ये पहिल्यानेच पाठवलं ते उत्तमकाकांनी!

आणि हेही आठवतंय की गाण्याच्या स्पर्धेत पहिल्यानेच भाग घेऊन प्रथम पारितोषिक पटकावणारी सतरा-अठरा वर्षांची पुष्पा घरी आली ती एका हातातला बक्षिसाचा चांदीचा बिल्ला उंचावत आणि दुसऱ्या हाताने दहा रुपयांची कोरी करकरीत नोट एखाद्या पताकेसारखी फडकवत!!

त्या काळात दहा रुपये म्हणजे चेष्टा नव्हती महाराजा!!

तेव्हाच्या रत्नागिरीत पुष्पाचं गाणं म्हणजे Talk of the town झालं होतं.

वर्गातले मुलगे-मुली मला “पुष्पा सोहोनीचा भाऊ” म्हणून ओळखायला लागले. पुष्पाच्या नांवावर मी बराच भाव खाऊन होतो!

अशा आल्या आठवणी की,, .

हंड्यातलं पाणी थिरकतं,, .!

लेखक :  श्री रवि वाळेकर

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ पासवर्ड ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “पासवर्ड☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

आर्थिक नियोजन कसे असावे, यावर काही दिवसांपूर्वी एका सद्गृहस्थांचे विचार कानी आले. त्यांनी वा” अशी चतु:सूत्री सांगितली. 

— आयुष्याच्या सुरुवातीला पैसे प्रथम वाचवा – त्यानंतर ते वाढवा – काही भाग स्वतःच्या आनंदासाठी वापरा – आणि त्यानंतर आयुष्याच्या उत्तरार्धात ते वाटा. 

…… अशी ही चतु:सूत्री…! 

नात्यांचंही  असंच… 

नातं मग ते कोणतंही असो, एखादं नातं तयार झाल्यानंतर ते नातं “वाचवण्यासाठी” जे काही करता येईल ते करायचं…

नात्यातला गोडवा “वाढवण्यासाठी” दोन पावलं मागे यायची तयारी ठेवायची… 

निर्माण झालेला गोडवा एकमेकांच्या सुखदुःखात “वापरायचा”…

नात्यांमधली ही संपत्ती, पुढच्या पिढीने वाचवावी म्हणून, जाताना त्यांना “वाटून” टाकायची…! 

मी माझ्या परीने मांडलेली आयुष्याची ही चतु:सूत्री…!!! 

संपूर्ण आयुष्य असंच जगणाऱ्या श्रीमती मंगल ताई कुलकर्णी, उर्फ आई, वय अवघे 95 वर्षे…! त्यांच्या सूनबाई सौ. गौरीताई कुलकर्णी आणि चिरंजीव श्री. निलेश कुलकर्णी यांनी आईंचा 95 वा वाढदिवस साजरा करायचे ठरवले, आईंच्या जिव्हाळ्याच्या शे-पाचशे मंडळींना निमंत्रणं गेली. 

आम्हालाही होतं, गौरीताई म्हणाल्या, ‘तुमच्या रोजगार केंद्रावर नुकतेच काम सुरू केलेल्या दिव्यांग मंडळींना सुद्धा कार्यक्रमाला घेऊन या…’

अत्यंत देखणे पणे सजलेल्या या कार्यक्रमात आम्ही दिव्यांग अंध मंडळी आलो, दारातच यजमान निलेश सर यांनी “आम्हा” सर्वांचे हात जोडून स्वागत केले, आल्याबद्दल मनापासून आनंद व्यक्त केला. 

अशा एखाद्या समारंभाच्या गेटवर नुसते “आम्ही” उभे जरी राहिलो; तरी आम्हाला हुसकावून लावले जाते… आज “आम्हाला” अगत्याने, सन्मानाने आत बोलावले गेले… आयुष्यातली ही पहिलीच वेळ ! न दिसणारं, परंतु एक काटेरी कुंपण आखलं गेलंय… कुंपणाच्या आत जे आहेत ते “गावकरी” आहेत, कुंपणाच्या बाहेर आहेत, ते आम्ही “भिक्षेकरी”…! 

आम्हालाही कुंपणाच्या आत यायचं आहे… गावकरी व्हायचं आहे, परंतु हे काटेरी कुंपण आम्हाला आत येऊ देत नाही, गावकरी होऊ देत नाही. अभेद्य अशा या तारेच्या कुंपणाचं कुलूप कोणत्या चावीनं खोलायचं ??? 

हे काटेरी कुंपण तोडण्यासाठी आम्ही मग इथे धडका घेतो, परंतु आम्हीच पुन्हा रक्तबंबाळ होतो… मग जगण्या आणि जगवण्याच्या खेळामध्ये भीक मागण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरत नाही ! भिक्षेकरी म्हणून जगत असलो, तरी गावकरी म्हणून मरायचं आहे, पण हे कुंपण भेदायचं कसं…? 

इतक्या वर्षात एक गोष्ट मात्र लक्षात आली, छोटं का असेना, परंतु काम करणाऱ्या – कष्ट करणाऱ्या माणसाला सन्मान मिळतो…! इतकी वर्षे भीक मागितली, आता थोडं काम करून बघूया का ? कष्ट करून बघूया का ?आपलं “कष्टकरी” होणं हीच त्या काटेरी कुंपणाच्या गेटची चावी तर नसेल ?? “खुल जा सिम सिम” हा Password जर अलीबाबाला आठवला असता, तर तो गुहेत अडकला नसता. 

काटेरी तारांचे कुंपण उघडणाऱ्या कुलुपासाठी “कष्टकरी” हा एकच Password आहे, हा पासवर्ड आजपर्यंत आपल्याला आठवला नाही, यामुळेच तर आजपर्यंत आपण या गुहेत अडकलो आहे… हे इतक्या वर्षात आपल्या कसं लक्षात आलं नाही ?

बस्स, त्याच क्षणी भिक्षेकरी म्हणून अंगावर असलेली लक्तरं फेकून दिली, हात नसतील तर पायाने काम सुरु केले, पाय नसतील तर हाताने सुरू केले… आता आम्ही “कष्टकरी” झालो…!

अरे… अरे… काय जादू झाली…? “कष्टकरी” या  Password मुळे वर्षानुवर्षे बंद असलेले तारेच्या कुंपणाचे गेट आपोआप उघडले…! पहा ना.. श्री निलेश कुलकर्णी यांच्यासारखा मोठा माणूस, आज अगत्याने आणि सन्मानाने आम्हाला कुंपणाच्या आत बोलवत आहे…! 

“आता आमी बी गावकरी झालो…!!! या.. याना, या.. मंडळी…” निलेश सरांच्या आवाजाने विचारांच्या तंद्रीतून बाहेर आलो. कुंपणाच्या आत येण्याची ही पहिलीच वेळ, त्यात हा भरजरी समारंभ… आम्ही बावरून गेलो, कोपऱ्यावरच्या खुर्च्यांवर गुपचूप जाऊन बसलो. 

श्रीमती मंगलताईंनी, म्हणजेच आईंनी हे दुरून पाहिले असावे, निलेश सरांना त्यांनी डोळ्यांनी खूण केली असावी… कारण यानंतर निलेश सरांनी स्वतः आम्हा सर्वांना घेऊन पाहुण्यांसाठी ठेवलेल्या खुर्च्यांवर बसवले…! हि जादू “कष्टकरी” नावाच्या Password ची…! 

आईंना भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी अलोट गर्दी उसळली होती. आम्ही त्यांची प्रसन्न आणि कृतार्थ मुद्रा मनात साठवून घेण्याचा प्रयत्न करत होतो. अनेकांनी आईंना आवडतील अशा अनेक बाबी भेट स्वरूपात आणल्या होत्या, एकेक गोष्टीला नमस्कार करून त्यांनी त्या नम्रपणे नाकारल्या…! कधीकाळी आम्ही आधाशीपणाने कसं घेत होतो… याचीही आठवण क्षणभर झाली. 

आलेल्या लोकांनी आईंकडे प्रेमाने तक्रार केली, ‘आई आम्ही एवढ्या प्रेमाने आणलंय तर घ्या की…’ आई प्रसन्न चेहऱ्याने हसून म्हणाल्या, ‘बाळांनो हे प्रेम असंच राहू द्या, माझं संपूर्ण आयुष्य नाती जपण्यात वाचवण्यात – वाढवण्यात – मी वापरलं. आयुष्यातले तीन ‘वा’ वापरून झाले… आता वेळ आली आहे चौथा ‘वा’ वापरायची… आता जे आहे ते दुसऱ्याला “वाटायचं” आणि स्वतःकडेच त्रयस्थाप्रमाणे पाहून “व्वा” म्हणायचं आणि नामानिराळं व्हायचं…! 

तुम्ही जे प्रेम आणलंय ते मी पदरात घेतलंय… याव्यतिरिक्त आणखी काही द्यायचं असेल ; तर त्यांना द्या, मला काही नको….’ त्या आमच्याकडे बोट दाखवत म्हणाल्या. “….तर त्यांना द्या मला काही नको…..”

त्यांच्या या वाक्यांनी गहिवरून आले… आई, आमच्या कपाळी चंदन लावून आज तुम्ही सुगंधित झालात…. सुख शोधण्याच्या नादामध्ये आम्ही मिळेल ते ओरबाडत गेलो, आणि सर्व काही वाटून तुम्ही आनंदाचा सोहळा केलात… आमच्या पोटासाठी आम्ही झुरत राहिलो, दुसऱ्याला घास भरवून तुम्ही तृप्त झालात…. सर्व काही मलाच मिळावे म्हणत आम्ही वांझोटेच राहिलो,

आमच्या अंगावर मायेचा पदर टाकून, तुम्ही मात्र आई झालात…!!!

आता उपस्थित सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं… आमच्याही… हो… डोळे नसले म्हणून काय झालं ? दगडावर सुद्धा एखादा अंकुर फुलतोच की…! 

या समारंभात सर्व काही मिळालं… मान सन्मान, कौतुक, आशीर्वाद, मदत, सर्व सर्व… Thank You गौरीताई आणि निलेश सर, आम्हाला, आम्ही सुद्धा माणसं आहोत याची जाणीव करून दिल्याबद्दल… माणूस म्हणून केलेल्या आदर सत्काराबद्दल…. ऋणी आहे…. ऋणी आहे…!!! बस्स, एकच हुरहुर आहे, आईचे “वाटणारे” हात घ्यायचे राहूनच गेलं की…!!! 

आपले स्नेहांकित,

डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे,

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares