स्वयंपाकघरातील नळ पुन्हा एकदा गळत होता. कंटाळून मी प्लंबरला फोन केला.
थोड्याच वेळात एक मध्यमवयीन गृहस्थ आले — शांत, स्थिर, हातात जुनी, झिजलेली टूलबॅग.
मी त्यांना काम करताना पाहत होतो. त्यांनी पाना काढला — हँडलजवळ तो तुटलेला होता.
“अशा साधनांनी हा काय काम करणार? ” असा विचार माझ्या मनात आला.
पण त्यांना काहीच फरक पडलेला दिसला नाही. शांतपणे त्यांनी पाइप सैल केला. एक गंजलेला भाग कापावा लागणार होता. त्यांनी पुन्हा बॅगेत हात घातला आणि एक छोटी करवत काढली — तिचा अर्धा भागच नव्हता!
आता मला खात्री वाटली — मी चुकीच्या माणसाला बोलावलं आहे. पण अवघ्या दहा मिनिटांत गळती थांबली. नळ चमकत होता आणि थेंबही गळत नव्हता.
मी त्यांना शंभर रुपयांची नोट दिली. त्यांनी नकार दिला. “नको साहेब. यातील अर्धेच पुरेसे आहेत. ”
मी आश्चर्याने पाहिलं. “आजकाल जास्त पैसे कोण नाकारतं? ”
ते हसले — शांत, स्थिर हास्य.
– – “साहेब, प्रत्येक कामाची एक ठरलेली किंमत असते. आज जास्त घेतलं, तर उद्या जास्त अपेक्षा राहील. तेव्हा मिळालं नाही, तर मन अस्वस्थ होईल. म्हणून जे योग्य आहे तेवढंच घेणं मला समाधान देतं. ”
मी हळूच मान डोलावली. “किमान स्वतःसाठी नवा पाना आणि करवत घ्या. काम सोपं होईल. ”
ते हलकेच हसले. “अहो साहेब… साधनं झिजण्यासाठीच असतात. तेच त्यांचं नशीब. पण तुटलेली, ओरबाडलेली असली तरी ती आपलं काम करतात. ज्येष्ठ माणसांसारखीच — काही जखमा आल्या म्हणून ते निरुपयोगी ठरत नाहीत. ”
… क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले, “तुम्ही ऑफिसमध्ये लिहिता तेव्हा कोणता पेन वापरता याने फरक पडतो का? महाग किंवा साधा — लिहिता येत असेल तर कुठल्याही पेनाने चांगलं लिहिता येतं. पण लिहिताच येत नसेल, तर सर्वात महाग पेनही उपयोगाचं नाही. कौशल्य हातात असतं, साधनात नाही. ”
मी नि:शब्द उभा राहिलो. त्यांचे शब्द खोलवर मनात उतरले. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान दुर्मिळ होतं — जे पैसा कधीच देऊ शकत नाही.
एक जपण्यासारखा विचार –
संपत्ती आणि सुखाच्या अखंड शर्यतीत…
.. आपण जीवनातील खरी “साधने” विसरतो —
*प्रामाणिकपणा, *
*मेहनत, *
*कृतज्ञता, *
*जाणीव*
*आणि समाधान*.
ही जर टिकून असतील, तर तुटकी साधनंही चमत्कार घडवू शकतात.
– – पण तीच नसतील, तर जगभरची संपत्तीही आपल्या आतली गळती थांबवू शकत नाही.
*
लेखक : अज्ञात
संग्रहिका : सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “वो फिर नहीं आते” – लेखक – अज्ञात☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
काय समर्पक लिहिलंय ना गुलजार यांनी…. *वो फिर नहीं आते…. * आयुष्यभर अगदी कशीही, कुठेही आपल्याला अनेक माणसं भेटतात, आपलीशी वाटतात, मनात घर करतात, आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. काळ आपली गती स्विकारतो आणि या रामरगाड्यात ती एकाएकी हरवून जातात.
आयुष्याचा सुवर्णकाळ आपण ज्यांच्यासोबत घालवला ती माणसं आता कदाचित् संपर्का पलिकडे पोहोचली असतात. मोबाईलमधे त्यांचा नंबर असूनही *“मीच का? ”* या आपल्या अहंकाराला बळी पडलेली असतात. कोणे ऐकेकाळी आपल्या प्रत्येक क्षणावर आपलेपणाचा अधिकार गाजवणारी, आपल्या आनंदात आनंद मानणारी, मनातलं सगळंच आपल्याला सांगणारी, काहीही बोललं तरीही आपल्यालाच येऊन बिलगणारी हिच माणसं आता नजरेलाही दिसेनाशी झालेली असतात. त्यांना आपण कायम आपल्या चालू वर्तमानकाळात ठेवायला हवं…. संपर्कात रहायला हवं.
अहो वाद घालायलाही संवादाची गरज असतेच ना? …. तो संवाद अविरत चालू रहायला हवा. कधी आपल्या नावाचा एखादा फोन… एखादा मेसेज… नाहीतर स्व-लिखित पत्रच त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं.
ही माणसं काळी का गोरी, श्रीमंत का गरीब, आपली का परकी अशी नसतात. त्या सुवर्ण मुद्रा असतात. नियतीने दिलेला आशिर्वाद अन् प्रसाद म्हणून भरभरुन वाटलेला…
त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेला तो सुवर्ण काळ तुम्ही आजही जगताय का? ती माणसं आजही संपर्कात असतील आणि तो काळही तुम्ही उपभोगत असाल, तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. कारण तो काळ किंवा ती माणसं ….. परत येत नाहीत हो ….. *“वो फिर नहीं आते……”* हि अशी अवचित माणसं भेटण्यापेक्षा ती लाभणंच जास्त महत्वाचं. आयुष्याची गाडी वेगाने पुढे हाकताना अशीच लाभलेली काही जीवाभावाची माणसं *“मी”* पणाचा पडदा थोडा बाजूला करून वेळ काढून, पुन्हा निरखून पाहायला हवीत … त्यांची विचारपूस करायला हवी, त्यांना समजून उमजून आपल्या आयुष्यात ठरवून आणायला हवं. एकदा का ती काळाच्या पडद्याआड गेली कि ती परत येत नाहीत हो.
गगनाला भिडलेल्या, फुलांनी लगडलेल्या झाडाखाली उभं राहिलं कि ते झाड आपल्यावर न सांगता त्या फुलांचा वर्षाव करतं. तशीच आनंदवर्षाव करणारी हि माणसं फुलाची पाकळी नि पाकळी वेचावीत अगदी तशीच वेचायला हवीत.
*फूल खिलते हैं, लोग मिलते हैं मगर*
*पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं*
*वो बहारों के आने से खिलते नहीं*
*कुछ लोग एक रोज़ जो बिछड़ जाते हैं*
*वो हजारों के आने से मिलते नहीं*
*उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम*
*वो फिर नहीं आते…*
माणसं हि अत्यंत महत्त्वाची असतात. त्यांना मनापासून जपायला हवं. भावनाशून्य या जगात जगताना आपण थोडं भावनाप्रधान व्हायला हवं.
ओळख जितकी जूनी तितकी मैत्री घट्ट होत जाते. नात्यात सहजता येते. या मनापासून जपलेल्या नात्याला जेव्हा आपण बुद्धीच्या जोरावर तोलून पाहतो तेव्हा काहीतरी खटकतं, अनेक तर्क-वितर्क निघतात, शंका उत्पन्न होतात, राईचा पर्वत होतो, गुंतागुंत वाढवणारे गैरसमज निर्माण होतात आणि…
ही मैत्री नावाची नाव अनेक विचारांच्या सागरात हेलकावे खाताना दिसते. वेळीच हे सगळे विचार पुसून टाकून मनाची पाटी ज्याला कोरी करता आली तो तरलाच म्हणायचं. डोळ्यांना दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतातच असं नाही ना. अहो आपणहून घट्ट धरुन ठेवलं तर कदाचित् थोडंसं गळेल, पण तुटणं मात्र टळेल.
*आँख धोखा है, क्या भरोसा है*
*दोस्तों शक दोस्ती का दुश्मन है*
*अपने दिल में इसे घर बनाने न दो*
*कल तड़पना पड़े याद में जिनकी*
*रोक लो रूठ कर उनको जाने न दो*
*बाद में प्यार के चाहे भेजो हजारों सलाम*
*वो फिर नहीं आते…*
आपल्या सगळ्यांचच आयुष्य फार गजबजलेलं आहे. कुणालाही जराही उसंत नाही. आपल्याला सगळ्यांनाच यशस्वी व्हायचंय… पुढे जायचंय … ठरवलेलं धेय गाठायचंय. आपल्या भोवती शोभेल अशी एक महागडी चौकट उभी करायचीय. पण ती उभी करताना… पुढे जाताना गवसलेली हि आपली माणसं … आपल्या जवळची ही माणसंच नसतील तर…यशाचं शिखर गाठल्यावर मिळालेलं यश साजरं करायला, तोंडभरुन कौतुक करायला, शाबासकी म्हणून पाठीवर थाप द्यायला जवळ आपलं असं कुणीतरी हवं ना…. नसेल तर…. खूप प्रयत्न करून मिळालेलं हे यश, त्या सोबत आलेली सुबत्ता सगळंच मातीमोल ठरेल… नाही का?
आयुष्य खरंच खुप सुंदर आहे. न मागता भरभरून मिळालेलं फक्त थोडे कष्ट घेऊन जपता आलं पाहिजे. अगदी माणसं सुद्धा… कायमची आपल्याशी बांधता आली पाहीजेत. आपल्या मनापासून त्यांच्या मनापर्यंत..
शरीरावरच्या जखमा दिसतात हो, मनावरच्या दिसत नाहीत एवढंच.
उत्तरार्धात मागे वळून पाहताना तो पुढे येणार्या प्रत्येक टप्यावर दिसली पाहिजेत हीच ती सुंदर माणसं… तुमच्या पाठीशी वटवृक्षासारखी अगदी खंबीर उभी.. सुंदर, निखळ, हसऱ्या चेहऱ्याची…
सच कहा है किसी ने…
*… वो फिर नही आते… *
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “वरिष्ठता…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
★★★
वरिष्ठता –
– – वयपरत्वे शांती पूजा – –
कोणीतरी मला विचारले –
“आपण ६०, ७०, ८०, ९० आणि १०० या वयांचा इतका मोठा उत्सव का करतो? हे आकडे आध्यात्मिक आहेत की फक्त सांस्कृतिक परंपरा? ”
– – याचे उत्तर आपल्याला महाभारतातील राजा ययाती यांच्या प्रभावी कथेत सापडते.
ययातीने आयुष्य मनसोक्त जगले — सत्ता, भोग, यश, सर्व काही. पण जेव्हा अचानक वृद्धत्व आले, तेव्हा तो हादरला. खोल चिंतनानंतर त्याला एक अत्यंत प्रामाणिक सत्य उमगले – –
“ भोगाला मर्यादा आहे, पण इच्छा कधीच संपत नाही. ”
– – या एका जाणिवेने त्याचे जीवन बदलले. त्याने वृद्धत्व स्वीकारले आणि सांगितले की *आयुष्यात पाच अंतर्गत वळणे (inner turning points) असतात* — ती वयावर नाही, तर समजुतीवर आधारित असतात.
विशेष म्हणजे, ही पाच वळणे आपल्या भारतीय परंपरेतील ६०, ७०, ८०, ९० आणि १०० या टप्प्यांशी जुळतात. हे सर्व आपल्याला समजेल अशा शब्दांत पाहूया.
६० – षष्ठी (Shashti)
संचयातून समजुतीकडे मन वळते – ६० च्या आसपास काहीतरी बदलते — शरीरात नाही, तर प्राधान्यक्रमात.
“आणखी किती मिळवता येईल? ” हा प्रश्न मागे पडतो आणि
“आता खरंच महत्त्वाचे काय आहे? ” असा प्रश्न पुढे येतो.
– हळूहळू अंतर्मुखता सुरू होते. आवाज, कौतुक, टाळ्या यांची गरज उरत नाही. स्पष्टता हवी असते.
– – हे वार्धक्य नाही — महत्त्वाकांक्षेला गाठणारी प्रगल्भता आहे.
७० – भीमरथ शांती (Bheemaratha Shanthi)
शांतता सिद्ध करण्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान वाटते
– ४० आणि ५० मध्ये आपण जगाला स्वतःबद्दल सांगत असतो.
– ७० व्या वर्षी मात्र एक आश्चर्यकारक बदल होतो.
– तुम्ही लगेच प्रतिक्रिया देत नाही. वाद आकर्षित करत नाहीत. भांडण जिंकण्यापेक्षा नाती टिकवणे महत्त्वाचे वाटते.
– – तेव्हा उमगते —
बरोबर असण्यापेक्षा शांत असणे अधिक मोलाचे आहे.
म्हणूनच ७० व्या वर्षाचा उत्सव केला जातो.
८० – शताभिषेकम् (Sathabhishekam)
*तुमची उपस्थितीच औषध बनते. *
– – ८० व्या वर्षी लोक सल्ल्यासाठी येत नाहीत. ते काहीतरी खोल शोधायला येतात —
ही खात्री की आयुष्य जगता येते, पचवता येते आणि समजून घेता येते.
– या वयात तुमची उपस्थितीच आशीर्वाद ठरते. जास्त बोलण्याची गरज नसते.
– तुमचे अस्तित्वच सांगते —
“सगळं ठीक होतं. आयुष्य मार्ग काढतंच. ”
– – म्हणूनच ८० हा टप्पा पवित्र मानला जातो.
९० – नवती (Navathi)
अहंकार शांतपणे निवृत्त होतो.
९० व्या वर्षी एक दुर्मिळ गोष्ट घडते.
– लोकांना दुरुस्त करावेसे वाटत नाही. मतांवर चिकटून राहावेसे वाटत नाही. गोष्टी वैयक्तिक घेतल्या जात नाहीत. लवकर दुखावले जात नाही.
– – कमकुवतपणामुळे नाही — तर आयुष्य खूप काही दाखवून गेलेले असते, म्हणून किरकोळ गोष्टींवर ऊर्जा वाया घालवावीशी वाटत नाही.
– – एक सौम्य शांतता येते.
ही नम्रताच खरी आध्यात्मिकता असते.
१०० – शतमानम् (Shatamanam)
आयुष्य वैयक्तिक कथांपलीकडे जाते.. १०० गाठणे म्हणजे केवळ वर्षांची संख्या नाही… ते एक अशी अवस्था आहे जिथे मोठे चित्र दिसू लागते.
– ज्या गोष्टींची काळजी केली, त्या बहुतेक अनावश्यक होत्या, हे कळते.
– ज्यांना प्रेम दिले, तेच खरे महत्त्वाचे होते.
– आणि आयुष्य नेहमीच एखाद्या गूढ, दयाळू शक्तीने धरून ठेवलेले होते, याची जाणीव होते.
१०० व्या वर्षी माणूस “व्यक्ती” कमी आणि “उपस्थिती” अधिक बनतो.
सारांश (Essence)
*आपल्या ऋषींनी वय साजरे केले नाही. वयामुळे होणारे अंतर्गत परिवर्तन त्यांनी साजरे केले. *
६० – प्राधान्यक्रम बदलतात
७० – शांतता हीच शक्ती ठरते
८० – उपस्थिती उपचारक होते
९० – अहंकार शांत होतो
१०० – आयुष्य पूर्णत्वाला पोहोचते
– वय म्हणजे अधःपतन नाही.
– – वय म्हणजे गाळण — ज्यातून शहाणपण, कोमलता आणि कृपा शुद्ध होऊन उरते.
*आजचा विचार.. *
वय वाढणे म्हणजे आयुष्य कमी होणे नाही; तर – –
ते अधिक शुद्ध, सुज्ञ आणि सौम्य होत जाणे आहे
– – – -ही जर अवस्था आणि कृती घडत नसेल तर तुमचं वय आकड्याने वाढले आहे, तुम्ही प्रगल्भ व परिपक्व झालेले नाहीत…
★★★
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “आईचा स्पर्श…” लेखक : डॉ. सुजीत पाटील ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆
☆
इंजेक्शन भरलेलं हातात होतं, पण मन धजावत नव्हतं…
– ऑक्सिजन ८२… ८०… मॉनिटरचा तो लाल आकडा आणि अलार्मचा कर्कश बीप बीप आवाज!
NICU मध्ये काम करताना आम्हाला या आवाजांची सवय असते, पण कालची रात्र वेगळी होती.
२२ दिवसांचं बाळ. फुफ्फुसात संसर्ग (Sepsis). श्वासासाठी आम्ही त्याला बबल CPAP (कृत्रिम श्वास) मशीन लावलं होतं. आमची टीम पूर्ण ताकदीने लढत होती. अँटीबायोटिक्स, सलाईन, नेब्युलायझर… सगळं सुरू होतं… पण बाळ मशीनला ‘रिस्पॉन्स‘ देत नव्हतं. ते चिडचिड करत होतं, मशीनच्या नळ्यांशी झगडत होतं. ते जेवढं रडायचं, तेवढं ऑक्सिजन लेव्हल खाली पडायचं.
माझ्या सहकारी डॉक्टरांनी माझ्याकडे पाहिलं,
“बाळ खूप ‘रेस्टलेस‘ आहे. सिडेटिव्ह (झोपेचं इंजेक्शन) द्यायचं का? “
… इंजेक्शन देऊन त्याला शांत करणं सोपं होतं, पण ते तितकंच धोक्याचंही होतं. अशा औषधांमुळे बाळाचा स्वतःहून श्वास घेण्याचा प्रयत्न (Respiratory Drive) मंदावण्याची भीती होती. आधीच बाळ श्वासासाठी धडपडत होतं, त्यात जर श्वास आणखी मंदावला असता, तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती.
ती रिस्क घ्यायला माझं मन धजावत नव्हतं.
मी बाहेर पाहिलं. काचेच्या पलीकडे त्याची आई उभी होती. डोळे सुजलेले, जीव कासावीस.
मी टीमला म्हणालो, “इंजेक्शन नको, आधी आईला आत घ्या. “
… तिला आम्ही पूर्ण गाउन-मास्क घालून आत घेतलं. तिने थरथरत्या हाताने त्या इन्क्युबेटरमध्ये हात घातला. बाळाच्या इवल्याशा, सुया टोचलेल्या हातावर तिने आपलं बोट ठेवलं आणि कानात फक्त एकच शब्द उच्चारला…
“बाळा… “
– – पुढच्या ३० सेकंदात जे झालं, ते बघून आम्ही डॉक्टर्स असूनही अवाक झालो.
जे बाळ औषधांनी शांत होत नव्हतं, ते आईचा स्पर्श होताच एकदम शांत झालं.
त्याच्या हृदयाची धडधड नॉर्मल झाली.
श्वास लयीत आला.
– – आणि मॉनिटर?
जे ऑक्सिजन ८० वर अडकलं होतं, ते बघता बघता ८८… ९२… ९५… ९८% वर गेलं!
हे कुठलंही ‘मॅजिक‘ नव्हतं. हे सायन्स होतं.
.. आईच्या स्पर्शाने बाळाच्या शरीरात ‘ऑक्सिटोसिन‘ (Love Hormone) तयार होतं, जे जगातलं बेस्ट पेन-किलर आणि स्ट्रेस-बस्टर आहे.
– – जेव्हा बाळ रिलॅक्स होतं, तेव्हा आमची औषधं सुद्धा १००% काम करतात.
बाळ आता धोक्याबाहेर आहे.
जाताना ती आई हात जोडत होती. मी तिला थांबवून म्हणालो,
“ताई, आभार आमचे नका मानू. आम्ही फक्त प्रयत्न केले, पण त्याला ‘बरं‘ तुमच्या स्पर्शाने केलंय. “
– – कधीकधी स्टेथस्कोप ला जिंकायला ‘आईच्या स्पर्शाची’ही साथ लागते.
* * * *
लेखक : डॉ. सुजित भरत पाटील
बालरोगतज्ज्ञ, पुणे
प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
☆ “भविष्याने शिकलेला सर्वात मोठा धडा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
महाभारत युद्ध संपले. योद्ध्यांचे फाटलेले कपडे, मुकुट, तुटलेली शस्त्रे, तुटलेली रथाची चाके, आणि वातावरणात एक खोल दुःख पसरले होते.
त्या उजाड भूमीत, गिधाडे, कुत्रे आणि कोल्हे यांच्या दुःखद आणि भयावह हाकांमध्ये, द्वापरचा महान योद्धा देवव्रत भीष्म, मृत्युशय्येवर झोपलेला होता, सूर्य उगवण्याची वाट पाहत होता. एकटाच… तेव्हा त्याच्या कानावर एक परिचित आवाज आला, “प्रणाम (नमस्कार) आजोबा. “
भीष्मांच्या कोरड्या ओठांवर एक मंद हास्य उमटले. तो म्हणाला, “देवकीच्या पुत्रा, ये… स्वागत आहे! मी खूप दिवसांपासून तुमचा विचार करत आहे. “
कृष्ण म्हणाला, “मी काय बोलू, आजोबा? आता मी विचारूही शकत नाही की तुम्ही कसे आहात. “
भीष्म गप्प राहिले. काही क्षणांनी तो म्हणाला, “केशव, तू तुझ्या युधिष्ठिराचा राज्याभिषेक केलास का? त्याची काळजी घे. त्याला आता तुझी सर्वात जास्त गरज आहे, आता या राजवाड्यात, कुटुंबातील वडीलधारी लोक नाहीत. “
कृष्ण गप्प राहिला.
भीष्म पुन्हा म्हणाले, “केशव, मी तुला काही विचारू शकतो का? तू खूप चांगल्या वेळी आला आहेस. कदाचित मी ही पृथ्वी सोडून जाण्यापूर्वी माझ्या अनेक शंका दूर होतील. “
कृष्ण म्हणाला, “कृपया मला सांगा, आजोबा! “
मला एक गोष्ट सांगा, प्रभू! तुम्ही देव आहात, नाही का?
कृष्णाने मध्येच सांगितले, “नाही, आजोबा! मी देव नाही. मी तुमचा नातू आहे, आजोबा, देव नाही.”
भीष्म त्याच्या तीव्र वेदनांमध्येही हसले. तो म्हणाला, “कृष्णा, मी माझ्या आयुष्याचे कधीच मूल्यांकन करू शकलो नाही, म्हणून ते चांगले होते की वाईट हे मला माहित नाही. पण आता मी ही पृथ्वी सोडून जात आहे, कन्हैया, कृपया मला फसवणे थांबवा… “
कसे तरी, कृष्ण भीष्मांच्या जवळ गेला, त्याचा हात धरला आणि म्हणाला, “कृपया मला सांगा, आजोबा! “
भीष्म म्हणाला, “मला एक गोष्ट सांग, कन्हैया! या युद्धात जे घडले ते बरोबर होते का? “
“आजोबा, कोणाच्या बाजूने? पांडवांच्या बाजूने? “
“कनहैया, आता कौरवांच्या कृतींवर चर्चा करण्यात काही अर्थ नाही, पण पांडवांच्या बाजूने जे घडले ते बरोबर होते का? आचार्य द्रोणाचा वध, दुर्योधनाच्या मांडीखाली हल्ला, दुशासनाची छाती कापणे, जयद्रथाची फसवणूक, निःशस्त्र कर्णाचा वध – हे सर्व बरोबर होते का? हे सर्व न्याय्य होते का? “
– आजोबा, मी याचे उत्तर कसे देऊ? ज्यांनी ते केले त्यांनी हे उत्तर द्यावे. दुर्योधनाचा वध करणाऱ्या भीमाला उत्तर देऊ द्या; कर्ण आणि जयद्रथाचा वध करणाऱ्या अर्जुनाला उत्तर देऊ द्या. मी या युद्धात अजिबात नव्हतो, आजोबा! “
“कृष्णा, तू मला फसवणं थांबवणार नाहीस का? जग म्हणेल की अर्जुन आणि भीमाने महाभारत जिंकला, पण मला माहिती आहे, कन्हैया, हा विजय तुझा आहे आणि फक्त तुझाच आहे. मी तुला विचारेन, कृष्णा! “
-“तर ऐका, आजोबा! काहीही वाईट घडले नाही, काहीही अनैतिक घडले नाही. जे घडले तेच घडले पाहिजे होते. “
-केशव, तू हे म्हणत आहेस का? सर्वात प्रतिष्ठित पुरुष रामाचा अवतार असलेला कृष्ण हे म्हणत आहे? ही क्रूरता कोणत्याही युगात आपल्या शाश्वत परंपरेचा भाग नव्हती, मग ते कसे न्याय्य आहे? “
-इतिहासातून शिकायला मिळते, आजोबा, पण निर्णय सध्याच्या परिस्थितीनुसार घ्यावे लागतात. प्रत्येक युग स्वतःच्या तर्क आणि गरजांनुसार आपला नेता निवडतो. राम त्रेता युगाचा नायक होता, द्वापर युग माझे भाग्य होते. “आम्हा दोघांचा निर्णय सारखा असू शकत नाही, आजोबा. “
-मला समजले नाही, कृष्णा! कृपया समजावून सांगा…
-राम आणि कृष्णाच्या परिस्थितीत खूप फरक आहे, आजोबा! रामाच्या काळात, रावणसारखा खलनायक देखील शिवभक्त होता. रावणसारख्या नकारात्मक शक्तीच्या कुटुंबातही विभीषण आणि कुंभकर्णसारखे संत होते. बालीसारख्या खलनायकाच्या कुटुंबातही तारासारख्या विद्वान स्त्रिया आणि अंगदसारखे उदात्त पुत्र होते. त्या काळात, खलनायकांनाही धर्माचे ज्ञान होते. म्हणूनच रामाने त्यांना कधीही फसवले नाही. पण माझ्या काळात कंस, जरासंध, दुर्योधन, दुशासन, शकुनी आणि जयद्रथ सारखे गंभीर पापी पाहिले आहेत. त्यांना संपवण्यासाठी प्रत्येक फसवणूक न्याय्य आहे, आजोबा. पापाचा अंत करणे आवश्यक आहे, आजोबा, पद्धत काहीही असो.
-तर, तुमच्या या निर्णयांमुळे केशव, चुकीची परंपरा सुरू होणार नाही का? भविष्य तुमच्या फसवणुकीचे अनुसरण करणार नाही का? आणि जर तो असे करेल तर ते योग्य असेल का? “
– भविष्य आणखी नकारात्मक दिसत आहे, आजोबा. कलियुगात, हे देखील पुरेसे नाही. तिथे, मानवांना कृष्णापेक्षाही अधिक निर्दयी व्हावे लागेल, नाहीतर धर्माचा नाश होईल. जेव्हा क्रूर आणि अनैतिक शक्ती धर्म पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आक्रमण करत असतात, तेव्हा नैतिकता निरर्थक बनते, आजोबा! मग जे महत्त्वाचे आहे ते विजय आहे, फक्त विजय. भविष्याने हे शिकले पाहिजे, आजोबा. “
-“धर्माचा नाश देखील होऊ शकतो का, केशव? आणि जर धर्माचा नाश होणारच असेल, तर मानव ते थांबवू शकतो का? “
-“सर्वकाही देवाच्या दयेवर सोपवणे मूर्खपणाचे आहे, आजोबा! देव स्वतः काहीही करत नाही; मानवांना सर्व काही करावे लागते. तुम्ही मलाही देव म्हणता! तर मला सांगा, आजोबा, मी या युद्धात वैयक्तिकरित्या काही केले का? सर्व पांडवांना ते करावे लागले, बरोबर? हा निसर्गाचा नियम आहे. युद्धाच्या पहिल्या दिवशी मी अर्जुनाला हेच सांगितले होते. हेच अंतिम सत्य आहे. “
भीष्म आता समाधानी दिसत होता. त्याचे डोळे हळूहळू बंद होत होते. तो म्हणाला, “चला कृष्णा! ही माझी पृथ्वीवरील शेवटची रात्र आहे. ” उद्या मला निघून जावे लागू शकते… तुमच्या या दुर्दैवी भक्तावर दया करा, कृष्ण! ”
कृष्णाने स्वतःशी काहीतरी बडबड केली, भीष्मांना नमस्कार केला आणि मागे वळले. पण युद्धभूमीच्या त्या भयानक अंधारात, भविष्याने जीवनाचा सर्वात मोठा धडा शिकला होता.
जेव्हा अनैतिक आणि क्रूर शक्ती धर्माचा नाश करण्यासाठी आक्रमण करत असतात, तेव्हा नैतिकतेचा धडा आत्मघातकी असतो.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती: सौ. शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈