मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ Empathy… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ Empathy… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

एका दुकानदाराने आपल्या दुकानाच्या बाहेर पाटी लावली होती –

“कुत्र्याची पिल्ले विकणे आहेत. “

लहान मुलांना अशा पाट्या लगेच आकर्षित करतात.

थोड्याच वेळात एक लहान मुलगा दुकानात आला आणि विचारले,

“काका, या पिल्लांची किंमत काय आहे…? “

दुकानदार म्हणाला,

“बाळा, ही पिल्ले खूप चांगल्या जातीची आहेत. साधारण ३००० ते ५००० रुपयांपर्यंत आहेत. “

त्या लहान मुलाने खिशात हात घातला,

काही चिल्लर नाणी बाहेर काढली आणि मोजली.

तो हिरमुसला होऊन म्हणाला,

“काका, माझ्याकडे फक्त ५० रुपये आहेत. पण… पण मी फक्त ती पिल्ले बघू शकतो का…? “

दुकानदार हसला आणि त्याने शीळ घातली.

दुकानाच्या आतल्या खोलीतून एक कुत्री बाहेर आली आणि तिच्या मागे पाच गोंडस,

कापसाच्या गोळ्यासारखी पिल्ले धावत बाहेर आली.

ती पिल्ले एकमेकांशी खेळत होती,

उड्या मारत होती.

पण…

त्या मुलाचे लक्ष त्या धावणाऱ्या पाच पिल्लांकडे नव्हते.

त्याचे लक्ष मागे हळूहळू,

लंगडत चालत येणाऱ्या सहाव्या पिल्लाकडे गेले.

ते पिल्लू इतर पिल्लांच्या वेगाने धावू शकत नव्हते,

ते फरफटत चालले होते.

मुलाने उत्साहाने विचारले,

“काका, त्या छोट्या पिल्लाला काय झालंय…?

ते का लंगडतंय…? “

दुकानदार म्हणाला,

 “अरे, ते जन्मतःच तसं आहे.

डॉक्टरांनी सांगितलंय की त्याच्या पायाचं हाड नीट नाहीये.

ते कधीच नीट चालू शकणार नाही.

ते आयुष्यभर असंच लंगडत राहणार. “

 

हे ऐकून तो मुलगा आनंदाने ओरडला,

“काका, मला तेच पिल्लू हवंय…!

मी तेच विकत घेणार…! “

दुकानदार आश्चर्यचकित झाला.

तो म्हणाला,

“बाळा, तू वेडा झाला आहेस का…?

जर तुला तेच पिल्लू हवं असेल,

तर मी तुला ते फुकट देईन.

कारण त्या लंगड्या पिल्लाची काहीच किंमत नाही.

ते कोणालाच नको असतं. “

हे ऐकताच तो लहान मुलगा एकदम शांत झाला.

त्याचा चेहरा रागाने लाल झाला.

त्याने दुकानदाराच्या डोळ्यात बघून बोट दाखवत ठामपणे सांगितले,

“तुम्ही मला ते पिल्लू फुकट देऊ नका.

त्या पिल्लाची किंमत तितकीच आहे,

जेवढी त्या इतर चांगल्या पिल्लांची आहे.

आणि मी तुम्हाला त्याचे पूर्ण पैसे देईन.

आता ५० रुपये घ्या,

आणि उरलेले पैसे मी तुम्हाला रोज थोडे-थोडे जमा करून आणून देईन. “

दुकानदार म्हणाला,

“पण बाळा, तुला हेच लंगडं पिल्लू का हवंय…?

ते तुझ्यासोबत धावू शकणार नाही,

खेळू शकणार नाही… “

 

त्यावर त्या मुलाने काहीच उत्तर दिले नाही.

त्याने फक्त हळूच आपली पॅन्ट वर केली.

त्याचा एक पाय पूर्णपणे वाकडा होता आणि त्याला ‘स्टीलचा सपोर्ट’ (कॅलिपर) लावलेला होता.

त्याला स्वतःलाही नीट चालता येत नव्हते.

 

मुलाने मान वर केली आणि दुकानदाराला म्हणाला,

“काका, मलासुद्धा कुठे नीट धावता येतं…?

आणि त्या पिल्लाला अशा कोणाची तरी गरज आहे…

जो त्याची वेदना समजून घेईल…! “

दुकानदार निःशब्द झाला.

त्याच्या डोळ्यात पाणी आले.

त्याने काउंटरवरून उतरून त्या मुलाला मिठी मारली.

जगाला अशा लोकांची गरज नाही, जे एकमेकांची ‘लायकी’ किंवा ‘किंमत’ ठरवतात.

जगाला अशा लोकांची गरज आहे,

जे दुसऱ्याचं दुःख स्वतःचं समजून स्वीकारतात.

सहानुभूती (Empathy) ही सर्वात मोठी शक्ती आहे.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकr

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “गाथा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “गाथा” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

एके दिवशी तुकोबा

असे तीरावरी आले..

अन् इंद्रायणीलागी थोडे

हसून म्हणाले…

*

तुला द्यायचीच होती

माझी गाथा परतून..

मग पहिल्याच दिशी,

दिली का न तू आणून?

*

उगा मला तिष्ठविले असे

तुझिया काठाला

दिस चवदा असा तू माझा

अंत का पाहिला..?

*

बोले इंद्रायणी मग..

तुम्ही भक्तांचे भूषण

अशा जगाच्या गुरुचा

 अंत मी कसा पाहीन..?

*

ऐका तुकोबा.. कधीच

कोणा कळली न मात..

काय घडले सांगते

खोल माझिया डोहात..

*

अशी गाथा त्या दिवशी

आली डोहाच्या तळाशी..

जणू कुबेराचे धन

आले माझिया हाताशी..

*

असा अमृताचा घट

येता सहजी चालून..

कोणी देईल का

थोडी चव घेतल्यावाचून?

*

तशी गाथा अवचित

माझ्या हाताला लागली..

सारे विसरून जग

मीही वाचाया घेतली..

*

पुरे चवदा दिवस

 केले तिचे पारायण

आणि मगच तुकोबा..

दिली तुम्हा परतून..!

*

तुम्ही आभाळाएव्हढे..

अंत मी काय पाहीन..

गाथा तारी जगताला

तिला मी काय तारीन?

*

सारे जग शुद्ध होते..

बुडी माझ्यात घेऊन..

गाथा वाचून तुमची

गेले मीच उद्धरून

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: सौ. शोभा जोशी 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “माझी पूजा अपूर्ण आहे!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “माझी पूजा अपूर्ण आहे!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

पूजेसाठी रोज मी उपकरणं स्वच्छ करतो! पण जोपर्यंत विकारांच्या मलिनतेपासून मन स्वच्छ होत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवासमोर पांढरी रांगोळी काढतो! पण त्या पांढर्‍या रंगाप्रमाणे माझे मन धवल, निर्मळ होत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज ताम्हनात देवांवर मी पाणी घालतो! पण मनातल्या आसक्तीवर मी जोपर्यंत पाणी सोडत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवाजवळ दिवा लावतो!

पण जोपर्यंत समाधानी वृत्तीचा नंदादीप मी मनात लावत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवाजवळ उदबत्ती लावतो!

पण संसारतापाने मंदपणे जळत असताना चित्तशुद्धीचा अंगारा जोपर्यंत मला लाभत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवाजवळ कापूर जाळतो!

पण त्या कापराच्या वडीप्रमाणे मनातले कुविचार क्षणात जळून जात नाहीत,

तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज आरती करताना मी देवाचा गुणगौरव करतो!

पण माझ्या आजूबाजूच्या माणसांमधले गुण जोपर्यंत मी शोधत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवासमोर स्थिर बसुन तासभर ध्यान करतो!

पण जोपर्यंत माझ्या चंचल चित्तवृत्ती स्थिर होत नाहीत, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

वृक्षवेलींनी प्रयत्नपूर्वक निर्मिलेली फुले मी देवाला रोज वाहतो!

पण माझ्या कष्टसाध्य सत्कर्माची फुले मी जोपर्यंत समाजाला वाटत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

देवासमोर मी रोज प्रसाद ठेवतो!

पण त्याने मला दिलेला हा जीवनरूपी प्रसाद परोपकारी वृत्तीने मी इतरांना देत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

** बघ तुला जमतं का **

  • तू उपवास कर किंवा नको करूस. मर्जी तुझी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहांवर मात्र मिळव विजय, बघ तुला जमतं का…
  • तू मठात रोज जा किंवा नको जाऊस. इच्छा तुझी. तिथे नतमस्तक झाला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र कर मात, बघ तुला जमतं का…
  • तू सोवळं ओवळं मान किंवा नको मानूस, हक्क तुझा. ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र, बघ तुला जमतं का…
  • तू ११ माळा जप, स्वाध्याय कर, शास्त्र वाच किंवा नको वाचूस. निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मनं जरूर वाच, बघ तुला जमतं का…
  • तू मंदिरात सेवेला ये किंवा नको येऊस. आवड तुझी, त्यासाठी सवड नसली तरी चालेल. पण सेवेत असलेल्या भक्तांमधे देव पाहायला नक्की शिक. बघ तुला जमतं का…

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भक्तीचा उद्गार – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ भक्तीचा उद्गार – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

सुधीर गाडगीळ यांनी सांगितलेला हा प्रसंग अतिशय हृदयस्पर्शी आहे.

ते सांगतात—पुण्यातील मंडईत संतवाणीचा कार्यक्रम संपत आला होता. शेवटचा अभंग झाला होता. पेटी, तबला आवरले जात होते. कलाकार उठू लागले होते. भीमसेन जोशीही शांतपणे उभे राहून स्टेजवरून उतरण्याच्या तयारीत होते. सभागृहात ‘कार्यक्रम संपला’ अशीच भावना होती.

तेवढ्यात, प्रेक्षकांमधून एक हमाल पुढे आला. साधा, घामेजलेला, काम करून आलेला. हात जोडून, थोड्या संकोचाने तो म्हणाला—

“जोशीबुवा… ‘तीर्थ विठ्ठल’ म्हणाल का? ”

क्षणभर सगळे थांबले. कार्यक्रम संपलाच होता. साथीदारांनी वाद्यं आवरली होती. अशा वेळी अभंग म्हणणं म्हणजे पुन्हा सगळं उलगडणं. काहींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं.

पण भीमसेन जोशी थांबले. त्यांनी त्या हमालाकडे नीट पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर आग्रह नव्हता, हट्ट नव्हता—फक्त भक्ती होती. जोशीबुवांनी क्षणाचाही विचार न करता मागे वळून म्हटलं, “अहो, पेटी-तबला ठेवू नका… तीर्थ विठ्ठल म्हणूया. ”

सगळे स्तब्ध झाले.

पुन्हा पेटी उघडली गेली. तबल्यावर हात बसला. आणि मग भीमसेन जोशींनी

“तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल…”

सुरू केलं.

सुधीर गाडगीळ सांगतात—तो अभंग मैफिलीचा भाग नव्हता; तो करुणेचा, माणुसकीचा आणि भक्तीचा उद्गार होता. आवाजात विलक्षण आर्तता होती. जणू त्या हमालाच्या आयुष्याचं ओझं त्या स्वरांत उतरलं होतं. हमाल रडत उभा होता. प्रेक्षक नुसते ऐकत नव्हते—ते अनुभवत होते.

अभंग संपल्यावर टाळ्या नव्हत्या. फक्त गहिरं मौन होतं.

गाडगीळ शेवटी म्हणतात—

“त्या दिवशी कळलं, भीमसेन जोशी हे मोठे गायक होतेच; पण त्याहून मोठं होतं त्यांचं मन. कार्यक्रम संपला होता, पण भक्ती संपलेली नव्हती—आणि जोशीबुवांनी ती ओळखली.”

हा प्रसंग, संतवाणी म्हणजे नेमकं काय, हे कायमचं समजावून जातो.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :  श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कृष्णस्पर्श…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.राधा पै ☆

सौ.राधा पै

? वाचताना वेचलेले ?

☆ “कृष्णस्पर्श…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.राधा पै ☆

‘कुब्जा’ हे नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर येते ती मथुरेतील कंसाची दासी. कुरुप, कुबड असलेली एक वृद्धा. कंसासाठी ती चंदन घेऊन जात असते. वाटेत कृष्ण भेटतो. म्हणतो, ‘सुंदरी, मला देशील चंदन? ’

कुणी तरी तिला प्रथमच ‘सुंदरी’ म्हणाले होते. तिने कृष्णाला चंदनाचा लेप लावला. कृष्ण कुणाकडून तसेच काही कसे घेईल? त्याने कुब्जेच्या हनुवटीला धरून ती वर उचलली आणि कुब्जा खरेच सुंदर झाली.

भक्तांना हे सहजच पटते. चिकित्सकांना ही निव्वळ कल्पित कहाणी वाटते. मला या कथेतून वेगळाच आनंद मिळतो.

 कुणी असुंदर असेल तर मान उंचावून कसे वावरेल? त्यात दासी असल्याने तिला ‘तोंड वर करायचा’ अधिकार तरी कसा असेल? कृष्णाने कुब्जेची हनुवटी उंचावली. तिला ताठ व्हायला शिकवले. कुरूप असो की दासी असो; मान वर करूनच जगले पाहिजे, हे भान कृष्णाने तिला दिले.

 ‘दिसण्या-असण्यातून’ न्यूनगंड निर्माण होऊ न देता आपणही दिमाखात जगू शकतो, हे दाखवण्याची संधी ईश्वराने किती विश्वासाने आपल्याला दिली आहे. कुब्जा सुंदर झाली की नाही हे मला ठाऊक नाही; पण तिच्या मनातली असुंदरतेची जाणीव कृष्णाने दूर केली, असे मला वाटते.

 

इकडे विठुरायानेही कंबरेवर हात ठेवून, थाटात उभे राहत हे दाखवून दिले की, सौंदर्य नाही तर औदार्य महत्त्वाचे. सौंदर्य येते आणि वयोमानाने ओसरतेही.

औदार्य अठ्ठावीस युगे टवटवीतच राहते.

 

खूपदा भक्ती करणारेही जेव्हा म्हणतात की, देवा-धर्माचे इतके आम्ही करतो; पण ईश्वराची कृपा काही होत नाही.

 पण, पारमार्थिक साधना म्हणजे जग बदलणे नाही, तर आपला दृष्टिकोन बदलणे. हे समजले की आपल्या वृत्तीच्या कुब्जेला सुंदर व्हायला वेळच लागत नाही.

 

रखरखत्या उन्हात कुठून कोकीळ कुजन ऐकू आले की मनाला निवलेपण जाणवते ना?

 पहिल्या पावसाने आसमंतभर दरवळणाऱ्या मातीच्या गंधाने चित्ताला हरखून जायला होते की नाही?

 तान्हे मूल कुणाचेही असो; गर्दी-गोंधळातही आपल्याकडे बघून गोड हसते, तेव्हा आपल्याही ओठांवर स्मितरेषा दरवळते की नाही?

 आपल्याबाबत हे घडते तेव्हा निश्चित मानावे की आपल्याला कृष्णस्पर्श झाला आहे.

अंतरीची ही निरपेक्ष संवेदनशीलता हाच कृष्णाचा साक्षात्कार.

 

 मनातली असुंदरतेची, अपूर्णतेची जाणीव संपली की सारे सुंदरच आहे. हे जाणवते.

 माझ्या कृष्णाने निर्माण केलेले काहीही असुंदर असूच शकत नाही, ही श्रद्धा दृढ असली की झाले!

 

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी` |

कर कटिवरी ठेवूनीया ||

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती:सौ.राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘तंत्रज्ञानाचा असाही उपयोग…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

श्री मनोहर जांबोटकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘तंत्रज्ञानाचा असाही उपयोग…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

अक्षय हा एक आयटी इंजिनिअर. पुण्याच्या हिंजवडी भागात राहायचा. त्याचा स्वभाव असा होता की, कुठेही अन्याय झाला की त्याला राग यायचा.

अक्षयच्या ऑफिसच्या खाली एक म्हातारी आजी, ‘सकुबाई’, भाजी विकायला बसायच्या. त्यांचं वय ७० च्या घरात होतं, पण तरीही त्या ताजी भाजी विकायच्या.

अक्षय नेहमी त्यांच्याकडून भाजी घ्यायचा. पण त्याला एक गोष्ट खटकायची.

जेव्हा कधी अक्षय पेमेंट करायला फोन काढायचा, तेव्हा आजी गळ्यात लटकवलेला एक ‘QR Code’ पुढे करायच्या.

अक्षयने स्कॅन केल्यावर त्यावर नाव यायचं – “जीवन हॉस्पिटल ट्रस्ट”.

अक्षयला शंका यायची. ‘एखाद्या भाजीवालीच्या खात्याचं नाव हॉस्पिटलच्या नावाने कसं असू शकतं? ‘

त्याला वाटलं, नक्कीच एखादा दलाल किंवा एजंट या आजीला फसवतोय. तिच्या कमाईचे पैसे परस्पर हॉस्पिटल किंवा ट्रस्टच्या नावाखाली लाटतोय आणि या अडाणी म्हातारीला काहीच समजत नाहीये.

एका संध्याकाळी अक्षयला राहवलं नाही. त्याने भाजी घेतली आणि स्कॅन करताना पुन्हा तेच नाव आलं.

अक्षय चिडला. तो आजींना म्हणाला, “आजी, तुम्हाला समजतं का? हा कोड तुमचा नाहीये. तुमचे पैसे कोणा दुसऱ्यालाच जातायत. कोण आहे हा एजंट? का त्याला पैसे देताय? “

सकुबाई घाबरल्या. त्या म्हणाल्या, “नाही बाळा… एजंट नाहीये कोणी. तू पेमेंट कर ना बाबा. “

अक्षय म्हणाला, “नाही, मी करणार नाही. जोपर्यंत तुम्ही मला खरं सांगत नाही, की हा ‘घोटाळा’ काय आहे, तोपर्यंत मी तुम्हाला एक रुपया देणार नाही. आणि उद्या पोलिसात तक्रार करेन की एक म्हातारी फसवली जातेय. “

‘पोलीस’ शब्द ऐकताच सकुबाईंच्या हातातली भाजी खाली पडली. त्या रडू लागल्या.

त्या म्हणाल्या, “नको रे बाबा… पोलिसात नको जाऊस. सांगते तुला खरं. “

सकुबाईंनी पदराने डोळे पुसले आणि म्हणाल्या,

“बाळा, हा कोड माझा नाही, आणि पैसे मला मिळतही नाहीत. हा कोड समोरच्या ‘जीवन हॉस्पिटल’ च्या अकाउंटचा आहे. “

अक्षय गोंधळला. “पण का? तुम्ही दिवसभर उन्हात बसून कष्ट करता, आणि पैसे हॉस्पिटलला का? “

सकुबाई म्हणाल्या, “माझा ६ वर्षांचा नातू आहे, ‘मनू’. त्याचे आई-बाप कोरोनात वारले. तेव्हापासून तो माझ्याच जवळ आहे.

सहा महिन्यांपूर्वी त्याचे दोन्ही किडनी निकामी (Kidney Fail) झाल्या. त्याला आठवड्यातून दोनदा डायलिसिस करावं लागतं.

माझ्याकडे पैसे नाहीत रे बाळा. मी डॉक्टरांच्या पाया पडले.

तेव्हा तिथल्या एका चांगल्या डॉक्टरने सांगितलं की, ‘आजी, उपचाराचा खर्च ट्रस्ट करेल, पण औषधांचा खर्च तुला करावा लागेल. ‘

त्यांनीच मला हा बोर्ड बनवून दिला. मी गिऱ्हाईकाला सांगते की यावर पैसे टाका. जेवढे पैसे या कोडवर जमा होतात, ते थेट हॉस्पिटलला जातात आणि त्यातून माझ्या नातवाची औषधं येतात.

माझं काय रे? मी दिवसभर एक वडापाव खाऊन जगू शकते. पण जर मी रोख पैसे घेतले, तर कदाचित मला भुकेचा मोह होईल आणि मी ते पैसे खाण्यावर खर्च करेन. म्हणून मी ठरवलंय… हातात पैसा घ्यायचाच नाही. जे येईल ते थेट नातवाच्या जिवासाठी जाईल. “

हे ऐकून अक्षय सुन्न झाला.

त्याला वाटत होतं की आजी फसवल्या जात आहेत, पण इथे तर त्या एखाद्या ‘योद्ध्यासारख्या’ लढत होत्या. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन, पैशाला स्पर्शही न करता त्या फक्त एका QR कोडच्या भरवशावर नातवाचा जीव वाचवत होत्या.

अक्षयने शांतपणे आपला फोन खिशात ठेवला.

त्याने आजींना विचारलं, “आजी, नातवाचं पूर्ण ऑपरेशन करायला किती खर्च येईल? “

आजी म्हणाल्या, “डॉक्टर म्हणालेत ५ लाख लागतील. आतापर्यंत १० हजार जमा झालेत. मरेपर्यंत जमवेन, पण नातवाला वाचवेन. “

अक्षयने त्याच क्षणी आपल्या ऑफिसच्या ग्रुपवर आणि मित्रांना हा प्रसंग मेसेज केला. आजींचा फोटो आणि तो QR कोड व्हायरल केला.

पुढच्या २४ तासांत, त्या QR कोडवर ५ लाख नाही, तर १५ लाख रुपये जमा झाले.

दुसऱ्या दिवशी अक्षय जेव्हा भाजी घ्यायला गेला, तेव्हा आजी तिथे नव्हत्या.

त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. मनूच्या ऑपरेशनची तयारी चालू होती. अक्षय तिथे गेला. त्याला बघताच सकुबाईंनी त्याचे पाय धरले.

“बाळा, तू देवदूत बनून आलास. आज माझ्या नातवाला नवीन आयुष्य मिळालं. “

अक्षयने आजींना उठवलं आणि म्हणाला, “आजी, देवदूत मी नाही, तुम्ही आहात. ज्यांनी शिकवलं की, तंत्रज्ञान (Technology) फक्त चॅटिंगसाठी नाही, तर कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी सुद्धा वापरता येतं. “

आपण अनेकदा समोरच्या गोष्टी बघून चुकीचे अंदाज (Judge) लावतो. पण त्यामागे एक मोठं सत्य असू शकतं. तंत्रज्ञानाचा वापर जर चांगल्या मनाने केला, तर एका क्लिकवर कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. मदत करायला खिसा नाही, मन श्रीमंत असावं लागतं.

*

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘चिरंजीवी भव.. की एक्झिट ऑन टाईम?’ –- लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

सौ. शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘चिरंजीवी भव.. की एक्झिट ऑन टाईम?’ –– लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

नुकतेच KBC Junior 2025 संपले. आजकालच्या मुलांचे सर्व विषयांवरील व्यापक ज्ञान पाहून आपण थक्क होतोच; पण ज्ञानापेक्षा अधिक भावून जातो तो त्यांचा confidence, बिनधास्त बोलणे, खदखदून हसणे आणि तो निरागस innocence. सरळसोट, कुठलाही आडपडदा नाही… खूप छान वाटतं.

अशाच एका भागात एक दहा- बारा वर्षांची चिमुरडी आली होती. काही प्रश्नांनंतर गप्पा मारताना अमिताभ बच्चन तिच्यावर खूश झाले आणि त्यांनी प्रेमाने आशीर्वाद दिला, “चिरंजीवी भव. ”

ती चिमुरडी आधी नम्रपणे “Thank you, sir” म्हणाली. पण मग… कथेमध्ये ट्विस्ट आला.

ती अगदी बिनधास्तपणे म्हणाली,

“Thank you, sir! लेकिन मैं चिरंजीवी नहीं बनना चाहती. म्हातारपणी हात-पाय दुखतात, कंबर दुखते, नीट चालता येत नाही, काठी लागते. काही लोक bedridden होतात, तर काहींना कायम मदतनीस लागतो. त्यापेक्षा मला वेळेवर exit घ्यायला आवडेल. आज नाही तर उद्या exit घ्यायचंच आहे, तो मुझे time पे exit लेना हैं”. अमिताभ बच्चन पण ह्या उत्तराने थक्क झाले.

इतक्यावरच ती थांबली नाही. पुढे ती अमिताभ बच्चन यांना म्हणाली,

“आप हो जाओ चिरंजीव. आपके पास इलाज करने के लिये पैसा है. आप चिरंजीव हो गये, तो भी ठीक. ”

क्षणभर सगळेच स्तब्ध झाले. कदाचित तिने कुणाचंतरी आजारपण अगदी जवळून पाहिलं असेल. आजारपणातली हतबलता बघितली असेल – आजारी व्यक्तीची अणि कुटुंबाचीसुद्धा.

पण तरीही… ही Gen Alpha काहीतरी वेगळीच आहे, हे नक्की.

तिच्या या बोलण्याने मला ‘इच्छा मरण’ या संकल्पनेची आठवण झाली. नाव ऐकतानादेखील आपल्याला ती संकल्पना अजूनही विचित्र, अस्वस्थ करणारी वाटते. पण प्रत्यक्षात काही देशांमध्ये euthanasia कायदेशीर आहे—ठरावीक नियम आणि अटींसह. नेदरलॅंड, बेल्जियम, लक्झेम्बर्ग, कॅनडा, कोलंबिया स्पेन, न्यूझीलंड, पोर्तुगाल तसेच ऑस्ट्रेलिया आणि यूएसमधील काही states मध्ये terminal illness असलेल्या रुग्णांसाठी हा पर्याय उपलब्ध आहे. आपल्या देशात अरुणा शानबागच्या वेळी हा मुद्दा उठला होता. आयुष्यातली बेचाळीस वर्ष… बेचाळीस वर्ष ……

पण आज ह्या चिमुरडीच्या बोलण्याने मनात एक विचार आला. किमान इतकं तरी करता आलं पाहिजे की आपण स्वतःच आधीच जाहीर करू शकू—

एका ठरावीक वयानंतर किंवा ठरावीक परिस्थितीत मला ventilator वर ठेवू नका किंवा कृत्रिमरीत्या जगवू नका.

असं एखादं will किंवा living directive असणं किती दिलासादायक ठरेल!

यामुळे आपल्या पुढच्या पिढीला निर्णय घ्यायला सोपं जाईल…

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे—

त्यांच्या मनावर कधीही guiltचं ओझं राहणार नाही.

आपण नेहमी “आई-वडिलांसाठी काहीही करायला तयार आहोत, ” असं म्हणतो. पण कधी कधी काहीही न करणे हाच सर्वात मोठा करुणेचा निर्णय असू शकतो, हे स्वीकारायला आपल्याला अजून वेळ लागेल. आज वैद्यकीय प्रगतीमुळे आयुष्य वाढवता येतंय, पण प्रश्न असा आहे की—फक्त श्वास चालू ठेवणं म्हणजे जगणं का?

जगणं म्हणजे आठवणी, संवाद, स्वाभिमान, स्वतःच्या शरीरावर आणि निर्णयांवरचा अधिकार. ते सगळं हरवल्यावर फक्त मशीनवर अवलंबून असलेलं अस्तित्व आपण “जीवन” म्हणू शकतो का? कदाचित हीच पिढी हा प्रश्न निर्भीडपणे विचारेल.

त्या चिमुरडीने ‘इच्छा मरण’ हा शब्द वापरला नाही. तिने फक्त वेळेवर exit घ्यायची इच्छा व्यक्त केली. किती साधं, किती स्पष्ट आणि तरीही किती खोल! मृत्यूची भीती नसून, वेदनांची आणि परावलंबित्वाची भीती तिने मांडली होती.

उद्या हीच पिढी policy बनवेल, कायदे ठरवेल, आणि “जगण्याचा अर्थ” नव्याने define करेल. तेव्हा कदाचित ‘इच्छा मरण’ ही संकल्पना भीतीदायक न वाटता, करुणेची, समजुतीची आणि सन्मानाची भाषा वाटेल.

आणि तेव्हा कदाचित ह्या वाक्याचा खरा अर्थ आपण लावू…

 “बाबू मोशाय! ज़िंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं! ”

 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बायकोच्या शब्दकोशातले सप्तसूर…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ बायकोच्या शब्दकोशातले सप्तसूर…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ ☆

सा रे ग म प ध नि सा

संगीतातले हे सप्तसूर

आणि

बायकोच्या शब्दकोशातले नवऱ्याच्या बाबतीतले हे ‘सप्तसूर’..

 

सा धं कळत नाही या माणसाला

रे देवा, कधी सुधारणार हा माणूस..

 

ग प्प बसा, मला शिकवू नका..

म लाच सर्व करावं लागतं..

प टपट आवरणं, ह्यांना कधी जमतच नाही..

ध ड एक काम करत नाही, हा माणूस..

 

नि दान एक काम मी करीन, म्हणेल, तर शपथ..

सा री कामं बायकोवर टाकून, गावभर उंडारायला हा मोकळा..

लेखक:अज्ञात

प्रस्तुती :श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्याच्या संध्याकाळी मुलं आणि आपण… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आयुष्याच्या संध्याकाळी मुलं आणि आपण… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

आयुष्याच्या संध्याकाळी

आपली मुले जेव्हा आपली काळजी घेतात, तेव्हा

खूप छान वाटतंय..

 

बालपणी ज्यांना चिऊकाऊचे घास भरवले,

आज ते मला, “आई, खाऊन बघ छान आहे, ” म्हणून

आपल्या घासातला घास भरवतात..

खूप छान वाटतंय..

 

इवल्याशा पाठीवरचं दप्तर मी उचलून घेई,

आज माझ्या हातातले ओझे उचलायला धावत येतात..

खूप छान वाटतंय..

 

ज्यांची बोटं धरुन अक्षरांशी ओळख करून दिली,

आज ते माझी नवीन टेक्नोलॉजीशी ओळख करुन देतात..

किती मजा वाटते आहे..

 

ज्यांना हात धरून रस्ता ओलांडला,

आज ते माझा हात धरुन रस्ता ओलांडतात.

हातांची अदलाबदल कधी झाली, कळलंच नाही..

पण खूप छान वाटतंय..

 

“चालताना उड्या मारु नकोस रे. पडशील, ” असं म्हणणारी मी..

आणि आज, “आई, हळू पुढे खड्डा आहे, ” म्हणणारे ते.

एवढा प्रवास कधी झाला कळलंच नाही..

पण खूप छान वाटतंय..

 

रिक्षाने जाताना त्यांना आतल्या बाजूला बसवणारी मी..

आज जागा केव्हा बदलल्या समजलंच नाही..

पण खूप छान वाटतंय..

 

“प्रयत्न करून बघ. शिकवलंय ना मी तुला, ” असे म्हणणारी मी आणि आज… “सोपंय ग, एकदा शिकलीस की येईल तुला, ” असं सांगणारे ते….

किती गंमत वाटते आहे..

 

ज्यांच्याबरोबर बडबड गीते आणि छान छान गोष्टी ऐकल्या, आज ते “आई, हे गाणं ऐकलंस का! बीट्स आवडतील बघ तुला, ” असं म्हणतात, तेव्हा काय सांगू काय वाटतं….?

लय भारी वाटतंय..

 

शाळेच्या पिकनिकला जाताना, बस मध्ये बसवून देणारी मी आणि आज मी प्रवासाला जाताना मला बसमध्ये बसवणारे ते..

शब्द तेच, काळजी तीच, भूमिका बदलल्या.

किती मस्त वाटतंय…

 

त्यांना काही होत असेल तर, घाबरणारी मी आणि मला जरा बरं नसलं तर, कासावीस होणारे ते..

किती कृतकृत्य वाटतंय..

 

लहानपणी त्यांचा अनाठायी हट्ट कसा चुकीचा आहे, हे सांगणारी मी,

आज माझे एखादे मत कसे चुकीचे आहे, हे माझे मन न दुखावता मला पटवण्याचा प्रयत्न करतात..

किती अभिमान वाटतो..

 

मुले घरात दिसली नाहीत तर, कासावीस होणारे बाबा आणि आज, “हे काय, बाबा अजून आले नाहीत? ” म्हणणारी मुलं..

परत शब्द तेच, काळजी तीच. भूमिका कधी बदलल्या समजलंच नाही..

 

इवलेसे गळ्यात पडणारे हात, आज आधार द्यायला खंबीर झाले..

खूप छान वाटतंय..

 

नकळत संस्कार घडले,

नकळत भूमिका बदलल्या,

नकळत त्यांच्यात एक संवेदनशील पती आणि हळूवार पिता आकार घेऊ लागला..

खूप धन्य वाटतंय…

 

काहींच्या बाबतीत हे आता फोनवर आणि व्हॉट्सपवर होतंय. पण तेही छान वाटतंय…

लेखक : अज्ञात

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकर 

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘वडिलांचा नकार…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆

श्री ब्रह्मानंद पै

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘वडिलांचा नकार…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै 

“मॅडम, तुमची फ्लाईट दोन तासात आहे… ” पीएने आठवण करून दिली. ईशाने डोळ्यावरचा चष्मा काढला. लंडनच्या ५० व्या मजल्यावरून खाली बघताना तिला आज खूप रिकामं वाटत होतं. तिच्या वडिलांचं, सदाशिवरावांचं काल रात्री पुण्यात निधन झालं होतं.

​ईशा एक यशस्वी बिझनेस वूमन होती. पण गेल्या १० वर्षांत ती एकदाही वडिलांना भेटायला भारतात आली नव्हती. कारण? कारण होता १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ दिवस.

​ईशाला अमेरिकेतल्या मोठ्या युनिव्हर्सिटीत ऍडमिशन मिळाली होती. फी होती २५ लाख रुपये. सदाशिवराव एक साधे कारकून. ईशाने हट्ट धरला होता, “बाबा, लोन काढा, घर गहाण ठेवा, पण मला अमेरिकेला जायचंच आहे. “

सदाशिवरावांनी स्पष्ट नकार दिला होता.

“ईशा, आपली ऐपत नाही ग. मी घर गहाण ठेवू शकत नाही. तुझं लग्न, तुझा भाऊ, म्हातारपण… मी रिस्क घेऊ शकत नाही. “

​ईशा संतापली होती.

“तुम्ही भित्रे आहात! तुम्हाला माझ्या प्रगतीची जळजळ होते. मला तुमची मुलगी म्हणवून घ्यायची लाज वाटते. “

असं म्हणून ईशाने घर सोडलं होतं.

तिने रागाच्या भरात एका ट्रस्टकडून स्कॉलरशिप मिळवली आणि ती अमेरिकेला निघून गेली. जाताना तिने बापाच्या तोंडाकडे पाहिलंही नव्हतं.

गेल्या १० वर्षात तिने स्वतःला सिद्ध केलं, करोडो रुपये कमावले, पण बापाला एक फोनही केला नाही.

​वर्तमान:

ईशा पुण्यात पोहोचली. जुनाट वाडा तसाच होता. दारात मोजकी लोकं होती. सदाशिवरावांचा देह अंगणात ठेवला होता. ईशाने पाहिलं, बापाच्या अंगावरचा सदरा जुनाच होता, जो १० वर्षांपूर्वी तिने पाहिला होता.

तिला रडू आलं नाही, फक्त एक विचित्र ओझं वाटलं. विधी उरकले. लोकं पांगली. शेवटी घरात ईशा आणि सदाशिवरावांचे जुने मित्र, वकील देशपांडे काका उरले. देशपांडे काकांनी ईशाच्या हातात एक जुनी, फाटकी डायरी आणि एक पासबूक दिलं.

“ईशा, सदाने हे तुझ्यासाठी ठेवलंय. “

​ईशाने उपहासाने विचारले, “काय असणार यात? हिशोब? की मी किती वाईट वागले याच्या तक्रारी?”

​काका गंभीर झाले. “वाच तू. तुला काही प्रश्नांची उत्तरं मिळतील. “

​ईशाने डायरी उघडली. हळूहळू वाचू लागली.

काहीवेळाने आलं ते पान – तारीख १० वर्षांपूर्वीची.

“आज ईशा रागावून गेली. ती मला भित्रा म्हणाली. पण तिला कसं सांगू, की ज्या घराला गहाण ठेवायला ती सांगत होती, ते घर तर मी तिच्या इंजिनिअरिंगच्या वेळीच विकलं होतं. आता आम्ही भाड्याच्या घरात राहतोय, हे तिला कळलं असतं तर तिला गिल्ट (अपराधीपणा) वाटला असता. म्हणून मी खोटं बोललो. “

​ईशाच्या हाताला कंप सुटला. तिने पुढचं पान उलटलं. “आज ईशाला अमेरिकेच्या ‘ज्ञानदीप ट्रस्ट’ ची २० लाखांची स्कॉलरशिप मिळाली. ती खूप खूश आहे. तिला वाटतंय, तिच्या हुशारीवर मिळाली. बरंच झालं. तिला हे कधीच कळू नये की ‘ज्ञानदीप ट्रस्ट’ मध्ये मी माझ्या PF चे सगळे पैसे, आणि गावी असलेली वडिलोपार्जित जमीन विकून आलेले पैसे जमा केलेत. तिला वाटेल, बापाने मदत नाही केली. ती माझा तिरस्कार करेल… पण चालेल. माझा तिरस्कार करून का होईना, पण ती जिद्दीने शिकेल. ती माझ्या उपकाराखाली दबली असती तर आकाशात उडू शकली नसती. “

​ईशाच्या पायाखालची जमीन सरकली. ती ज्याला ‘स्कॉलरशिप’ समजत होती, ते तिच्या बापाचं रक्त आणि घाम होतं?

ज्या बापाला तिने ‘भित्रा’ आणि ‘कंजूस’ म्हटलं होतं, त्याने स्वतःचं म्हातारपण विकून तिचं भविष्य विकत घेतलं होतं?

​ती रडत रडत शेवटच्या पानावर आली. तारीख – २ दिवसांपूर्वीची.

​”ईशा, आज डॉक्टर म्हणाले- माझ्याकडे २ दिवस आहेत. तू खूप मोठी झाली आहेस. टीव्हीवर तुझा फोटो बघतो तेव्हा छाती अभिमानाने फुलून येते. बाळा, तुझा राग अजून गेला नसेल, पण एक सांगतो… मी तुला पैसे दिले नाहीत, असं नाटक केलं, कारण तुला ‘बापाच्या पैशावर जगणारी मुलगी’ नाही, तर ‘स्वतःच्या हिंमतीवर उभी राहिलेली स्त्री’ व्हायचं होतं. तू जिंकलीस बाळा. मी हरलो, पण मी आनंदाने हरलो.

फक्त एक खंत आहे… मरताना एकदा तुला डोळे भरून बघायचं होतं.

​तुझा ‘कंजूस’ बाबा. “

​ईशाने डायरी छातीशी कवटाळली. ती जमिनीवर कोसळली आणि ओक्साबोक्शी रडू लागली.

“बाबा… बाबा उठा ना… मला माफ करा… मी चुकले… “

तिचा आक्रोश त्या रिकाम्या घरात घुमत होता. ​आज तिच्याकडे करोडो रुपये होते, जगातल कुठलंही सुख ती विकत घेऊ शकत होती.

पण ज्या माणसाने स्वतःची राख करून तिला प्रकाश दिला होता, त्या बापाची एक ‘भेट’ आता ती जगातल्या कुठल्याच दौलतीने विकत घेऊ शकत नव्हती. ​बाहेर देशपांडे काका डोळे पुसत होते.

त्यांना माहिती होतं, सदाशिवरावांनी शेवटचे १० वर्षे फक्त ‘चटणी-भाकरी’ खाऊन दिवस काढले होते, जेणेकरून ईशाला परदेशात कधी पैशाची कमी पडू नये म्हणून ते गुपचूप तिच्या खात्यात पैसे पाठवत होते.

​ईशाला आता कळलं होतं…

बाप कधीच गरीब नसतो, फक्त त्याची श्रीमंती मोजायची ताकद आपल्याकडे नसते.

आई-वडिलांच्या नकारामागे अनेकदा असा त्याग लपलेला असतो, जो आपल्याला उशिरा समजतो. जोवर ते आहेत, तोवर त्यांची कदर करा. कारण एकदा वेळ निघून गेली, की पश्चातापाशिवाय हाती काहीच उरत नाही.

लेखक: अज्ञात 

प्रस्तुती: श्री. ब्रह्मानंद पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares