मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “२० x २० इंच आकाराचा जीवनपट…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

 

☆ “२० x २० इंच आकाराचा जीवनपट…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

खेळता खेळता छोटी नात धावतच माझ्याकडे आली आणि साप-शिडीचा पट खाली आपटत म्हणाली….

बाबा, या दुष्ट सापाला मारून टाका… बघा ना… सारखा मला गिळतोय… 

तिची बालसुलभ तक्रार ऐकून हातातली काठी उगारत मी म्हणालो…

थांब हं थोडे…. आता त्या सापाला या काठीनं मारूनच टाकतो. 

मी दिलेल्या आश्वासनामुळे नात निश्चिंत झाली आणि तिनं पुन्हा आपल्या खेळाकडे धूम ठोकली. 

आता माझ्या समोर साप-शिडीचा पट होता. का कुणास ठाऊक पण त्यावरचा लांबलचक साप उगाचच माझ्याकडे बघून हसतोय अस मला वाटलं आणि माझ्या मनात एक प्रश्न डोकावून गेला…

कुणी शोधून काढला असेल हा साप-शिडीचा खेळ…

मग मोबाईल वर नुकताच डाऊनलोड केलेला चाट जीपीटी ओपन केला आणि टाईप केलं…

महोदय, कृपया साप-शिडी अर्थात स्नेक अँड लॅडर या खेळा सबंधीची माहिती द्या.

क्षणार्धात साप-शिडी संबंधी खूप सारी माहीती माहीती माझ्या मोबाईलवर दिसू लागली आणि सगळ्यात शेवटी लिहलं होत स्नेक अँड लॅडर या खेळाचा शोध १३ व्या शतकात भारतात लागला. 

बापरे! 

आता मात्र माझी उत्सुकता शिगेला पोहोचली आणि मी वेगवेगळे संदर्भ पाहू लागलो. आश्चर्य म्हणजे वाचता वाचता अस लक्षात आल की ज्याला आपण साप-शिडी किंवा स्नेक अँड लॅडर म्हणतो त्या खेळाचा शोध १३ व्या शतकात लागला हे खरंच होतं, पण या खेळाच्या शोधाच श्रेय संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे जातं.

हो.. तुम्ही अगदी बरोबर वाचताय, आपली ज्ञानेश्वर माऊली या साप-शिडी खेळाची जन्मदात्री आहे. 

कसं घडलं हे सारं…

हे ऐकणही खूप मनोरंजक आहे. म्हणजे त्याच अस झालं की….

एकदा मुक्ताबाई आणि तिची भावंड दुपारच्या प्रहरात अंगणात चेंडू खेळत होती. नेहमी प्रमाणे ज्ञानेश्वर माऊली आपल्या आध्यात्मिक लिखाणात गढून गेली होती. ऊन्ह खूपच वाढू लागलं तशी मुक्ताबाई अस्वस्थ झाली आणि धावतच ज्ञानेश्वर कडे येऊन म्हणाली…

दादा, अरे बघ तर बाहेर, सुर्य कसा आग ओढतोय…

आता तूच सांग असल्या उन्हात आम्ही कसे खेळणार?

त्यापेक्षा तूच अस काहीतर कर ना की ज्यामुळे आम्हाला घरातल्या घरातच खेळता येईल.

आपल्या लाडक्या बहिणीचा हट्ट पुरविण्यासाठी काहीही करायला तयार असणारे ज्ञानेश्वर क्षणभर विचार करतात आणि एक नविनच खेळ मांडून देतात ज्याच नाव होत साप आणि शिडी.. 

कधीही…कुठेही… खेळता येणाऱ्या या साध्या सुध्या खेळात मानवी जीवना सबंधी खूप काही सांगणार तत्त्वज्ञान भरून राहील आहे… 

साप-शिडीचा पट हाच मुळात प्रत्येकाचा जीवनपट आहे. २० X २० इंच आकाराच्या या पटात ५० चौकोनी घरे असतात……. 

पहिलं घर असतं जन्माचे आणि शेवटचे घर असतं मोक्षाचे. जीवनाचं सार्थक खऱ्या अर्थाने मोक्षातच असत, या मध्यवर्ती कल्पनेवर या पटाची मांडणी केलेली आहे. 

या खेळात, स्वतः तुम्ही, साप आणि शिडी ही पात्र केंद्र स्थानी असतात आणि तुम्ही प्रत्येक कवड्यांनी दिलेल्या दानाच्या अधीन असता. या कवड्या म्हणजे जणू काळाच स्वयंप्रेरित रूपच असत म्हणूनच त्या खेळाव्याच लागतात आणि जर तुम्ही खेळला नाही तर तुमचा जीवन प्रवास इथेच संपतो. 

जीवनातील विविध सुखाच्या वळणावर किंवा टप्प्यावर नेणाऱ्या प्रत्येक शिडीला ज्ञानदेवानी वेगवेगळी नावे दिलेली आहेत जशी की… सत्संग, सत्कर्म, दया, क्षमा, शांती, प्रेम, सद्बुद्धी तर यातील सापांना नावे आहेत काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. 

या खेळात कवड्या पूर्ण पालथ्या पडल्या तर बोनस दान मिळते म्हणजे तुमची कृती अर्थात कर्म उत्तम झाले तर तुम्हाला आयुष्यात पुन्हा एकदा संधी मिळते. 

नेहमीच्या साप-शिडी पेक्षा ज्ञानदेवांच्या साप-शिडीचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ही साप-शिडी चित्रांकित आहेच, परंतु शब्दांकितही आहे.. म्हणजे साप शिडीच्या पटाला संलग्न असणाऱ्या दुसर्‍या पटावर कोणती कवडी कोणत्या घरात पडली तर नेमक कस वागाव यासंबंधीच भावपूर्ण मार्गदर्शन अगदी सहज सुंदर ओव्या मधून केलेलं आढळत.

उदा. तुम्ही क्रोधाच्या घरात गेलात तर तिथे तुम्हाला संयमाच महत्व सांगणारी ओवी भेटेल. तुम्ही विद्येच्या घरात गेला तर विद्या विनयान कशी शोभते या संबंधीचा गुरुमंत्र भेटतो. 

समजा तुम्ही हा साप शिडीचा खेळ, खेळता-खेळता खेळतच राहिलात … तर याचा अर्थ तुम्ही जोपर्यंत शेवटच्या मोक्षाच्या घरासाठी पात्र होत नाही तोपर्यंत जन्म-मृत्यूच्या चौर्‍याऐशी लक्ष योनीत भरकटतच राहणार. 

जीवन प्रवासाचं वास्तविक दर्शन घडविणारा आणि खेळता खेळता नकळत अध्यात्माकडे प्रवाहीत करणारा हा साप शिडीचा खेळ खरोखर अद्भूत आहे याची प्रचिती येते. म्हणूनच ज्ञानेश्वरांनी या साप-शिडीच्या खेळाचं मोक्षपट असे समर्पक आणि अर्थपूर्ण नामकरण केलेले आहे. 

काळाच्या ओघात बरेचसे संदर्भ धुसर होत चाललेत हे खरंच आहे. डॉ. एरिक सँड यांचे एक विद्यार्थी सर जेकॉब हे मध्ययुगीन काळात भारतात खेळले जाणारे खेळ या विषया वर संशोधन करत होते त्यावेळी त्यांच्या ध्यानात अस आल की भारतात १३ व्या शतकात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी साप-शिडी खेळाची निर्मिती केली. या सबंधीचा संदर्भ पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात आजही उपलब्ध आहे. 

इंग्रजांच्या भारतातील वास्तव्यात त्यांना बुद्धीबळाप्रमाणेच साप-शिडी हा खेळ खूप आवडला. हळू हळू तो इंग्लंडपर्यंत पोहचला. मग इंग्लंडच्या राणीने त्यात काही बदल केले आणि त्याचं आधुनिक ‘स्नेक अँड लॅडर’ अस नामकरण करून टाकलं. 

माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यतचा प्रवास या मोक्षपटात सामावलेला आहे. जिज्ञासेपोटी माझ्या माहितीत आलेली ही रंजक माहिती मला खूपच उद्बोधक वाटली आणि ती आपल्यापर्यत पोहचावी यासाठीच हा लेख प्रपंच…

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाप गेल्यावर जेव्हा आई ‘बाप’ होते – लेखक : श्री सचिन साळुंके ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

सुश्री मीनल केळकर

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ बाप गेल्यावर जेव्हा आई ‘बाप’ होते – लेखक : श्री सचिन साळुंके ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

काही घरात वडील खूप लवकर जातात … अचानक… अकस्मात… नियतीच्या अनपेक्षित निर्णयामुळे.

त्यांच्या जाण्याने घर रिकामं होतं, मन कोसळतं, आणि जगणं उध्वस्त होतं.

पण त्या घरात एक व्यक्ती असते.. जी रडत नाही, थांबत नाही, आणि स्वतःसाठी काहीच मागत नाही. कारण तिचं संपूर्ण आयुष्य त्या क्षणापासून केवळ आपल्या मुलांसाठी समर्पित झालेलं असतं.

…… ती म्हणजे – आई … 

– जी त्या क्षणापासून फक्त आई राहत नाही… ती ‘बाप’ सुद्धा बनते.

– वडील गेल्यानंतर ती केवळ रडत बसणारी स्त्री राहत नाही,

– ती आपल्या मुलांसाठी दृढ बापाची जागा घेणारी योध्दा बनते.

– तिच्या हसण्यामागे दुःख लपलेलं असतं,

– तिच्या डोळ्यांत अश्रूंऐवजी संयम असतो,

– आणि तिच्या पायांखालच्या जमिनीवर पुन्हा उभं राहण्यासाठीची एक असामान्य ताकद असते.

 

अशा घरात आईची भूमिका दुहेरी असते

—ती चूल सांभाळते आणि वेळ पडल्यास मजुरी सुद्धा करते.

—ती डबा करते आणि फी सुद्धा भरते.

—ती रडत नाही, कारण तिला माहित असतं.. तिचं रडणं म्हणजे तिच्या लेकरांचं धैर्य ढासळणं.

 

आई म्हणजे अशी शक्ती असते, जी आपल्या लेकरांसाठी स्वतःचा शोक गिळते, आणि त्या वेदनेतून संघर्ष उभा करते.

आईला जेव्हा माणसं विचारतात – “कसं जमवतेस सगळं? ”

ती हसते…

कारण तिला सांगता येत नाही की –

— रात्री मुलांना झोपवल्यावर उशीवर तोंड लपवून ती किती वेळा रडलीये.

तिला सांगता येत नाही की –

— मुलांना दूध प्यायला द्यावं म्हणून ती स्वतः चहा न घेता झोपलीये.

तिला सांगता येत नाही की –

— मुलांच्या शाळेच्या फीसाठी तिनं आपली नवीन साडी घेण्याची इच्छा किती वेळा गिळलीये.

 

ती सांगत नाही — 

पण तिचा प्रत्येक श्वास, प्रत्येक कृती, फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी झिजलेली असते.

ती कधी “बाबा” म्हणून हाक मारून घेत नाही.

— पण ती “बाबा” होऊन जगते –

— ती पाठीवर थाप देते,

— ती अभ्यासाला बसवते,

— ती धपाटेही मारते,

— ती बाजूही घेते,

— आणि मुख्य म्हणजे – ती ” मी आहे ना ” असं म्हणत, बाबांची जागा भरते.

आईला माहीत असतं.. तिचं दुःख सांगायला ती मोकळी नाही, कारण तिच्या अश्रूंनी घराचं छप्पर गळायला लागेल. म्हणून ती भक्कम राहते…– लोहासारखी मजबूत, आणि तरीही आतून पूर्णपणे वितळलेली.

 

एकदा एक मुलगा मोठा झाल्यावर म्हणाला, —

— ” आई, तू मला कधीच बाबांची उणीव भासू दिली नाहीस! “

आई हसली… कारण तिचं खरं यश हे होतं – की तिचा मुलगा कधीच अपूर्ण वाटला नाही.

– ती कधी ‘अधुरी’ नव्हती, कारण तिचं प्रेम संपूर्ण होतं…आई म्हणून मायेचं, आणि बाप म्हणून पाठबळाचं.

… ती रडली, पण मुलांपुढे नाही.

… ती हरली, पण मुलांसाठी नाही.

… ती थकली, पण कधी दाखवलं नाही.

आज जर घरात मुलं डॉक्टर झाली, इंजिनिअर झाली, कोणाचंही नाव मोठं झालं तर त्यामागे ‘ ती ‘ एकच व्यक्ती असते.. “आई”, जिचं स्वतःचं नाव कुठेच गाजलं नाही.

— तीच ती, जिला बाप गेल्यावर संस्कारही द्यावे लागले, आणि संस्कारही शिकवावे लागले.

तिच्यामुळेच घरात देव अजूनही आहे,.. तिच्यामुळेच घराचं दार अजूनही उघडतं,.. तिच्यामुळेच मुलांचं मन अजूनही गाभाऱ्यात आहे.

 

आई हीच ‘वडीलांची जागा घेणारी’ एक अजरामर मूर्ती असते. तिला कधी कुठल्या पावलाने मोजता येत नाही,.. ती कुठल्याच मापात बसत नाही.

– कारण ती देव नसूनही देवाला शिकवणारी असते.

 

आज जर तुमच्या जीवनात वडील नसतील, आणि तरीही तुम्ही हसताय, शिकताय, प्रगती करताय

तर फक्त एकदा तिच्या पायाशी बसा… आणि पोटात साठवलेलं सगळं बोला…

…. कारण ती आई आहे – ती रडत नाही, पण तुमच्या शब्दांवरून समजते.

…. ती मागत नाही, ती तक्रार करत नाही, पण तुमच्या यशावर मनोमन फुलते.

” बाप गेल्यावर जी आई ‘बाप’ होते – तिचं नाव संपूर्ण देवपणाच्या पुढे असावं! “

तिला “आई” म्हणण्याआधी “माझा आधार, माझा शक्ति स्तंभ, माझा ‘बापसुद्धा'” म्हणावं…

कारण काही आई आज फक्त ‘आई’ राहिल्या नाहीत … तर त्या ‘आई-बाप’ झाल्या आहेत!

आई-बापाची दुहेरी भूमिका वठवणाऱ्या प्रत्येक आईला बाप पेज तर्फे समर्पित……..

 

लेखक : श्री सचिन साळुंके

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “चतुर्भुज राम मूर्ती…” – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

 

☆ “चतुर्भुज राम मूर्ती…” – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

बऱ्याच वर्षांपूर्वी घडलेली घटना……

मध्यप्रदेशातली मराठी संस्थाने म्हणजे ग्वाल्हेरचे शिंदे, इंदूरचे होळकर व धारचे पवार. धारच्या हद्दीत राम मंदिर येते. ज्यावेळी उत्तर हिंदुस्थानात मुसलमान सत्ता होती तेव्हा मंदिर व मूर्तीची तोडफोड होत असे. तेव्हा पुजारी व भक्त मंडळी देवाची मूर्ती अज्ञात ठिकाणी लपवून ठेवीत असत. पुण्याचे एक रामभक्त ब्राह्मण होते. त्यांना श्रीरामाचा दृष्टांत झाला की तू धारला ये व मला बाहेर काढ. सुरुवातीला त्यांनी लक्ष दिले नाही तेव्हा त्यांना चतुर्भुजरामाचे दर्शन झाले व मूर्ती डोळ्यासमोरून हालेना तेव्हा ते धारला गेले. त्यावेळी धारच्या राणीसाहेब तेथे कुलमुखत्यार म्हणून कारभार पहात होत्या. मोठे वैभव होते व गजांत लक्ष्मी होती. ते गृहस्थ राणीसाहेबांना भेटले व सर्व हकिगत सांगितली. राणीसाहेबांनी आपल्या अधिकाऱ्यांना चतुर्भुज-रामाबद्दल माहिती मिळते का ती चौकशी करण्यास सांगितले. पण माहिती कळेना. तो ब्राह्मण रडकुंडीला आला. तो पुण्यापासून धारपर्यंत खडतर प्रवास करीत आला होता. त्याने रामाचा धावा सुरू केला. तेव्हा त्याला दृष्टांत झाला की मी मांडवगण (मंडू) च्या जंगलात आहे. राणीच्या काही अधिकाऱ्याबरोबर ते गृहस्थ मंडूच्या जंगलात गेले. पण स्थान समजल्याशिवाय खणणार कोठे? तेव्हा पुन्हा श्रीरामालाच साकडे घातले. तेव्हा प्रेरणा झाली की संस्थानचा गजराजच ते स्थान दाखवेल. तेव्हा हत्तीला तेथे आणले. तो जंगलात मुक्त फिरू लागला. एका ठिकाणी तो थांबला व खाली बसला व तेथून तो हालेना. ब्राह्मणाने सांगितले की येथे खणा. येथपर्यंत बराच उपद्व्याप झाला होता.

राणी म्हणाली “समजा, येथे खणून काहीच हाताला लागले नाही “तर..? ” तेव्हा ब्राह्मण म्हणाला, “आपण माझा शिरच्छेद करा, समजा आपण मला मारले नाही तर मी स्वत:च देहांत प्रायश्चित्त घेईन. ” 

खणण्याचे काम सुरू झाले. एका विशिष्ट खोलीवर खणू असा आवाज ऐकू आला. ती एक मोठी फरशी होती. ती अलगद काढली तर, आत भुयार होते त्याला पायऱ्या होत्या. तेथून आत उतरल्यावर चतुर्भुज रामाची मूर्ती दिसली. भुयार स्वच्छ होते व तेथे रामापुढे नंदादीप तेवत होता असे सांगतात. “जानकीजीवनस्मरण जयजयराम अशी गर्जना करीत श्रीरामाला बाहेर काढले. त्याची षोडशोपचार पूजा, पुरुषसूक्त व पवमानयुक्त अभिषेक करून प्रतिष्ठापना केली. धारच्या राणीसरकारांनी तेथे सुंदर मंदिर बांधले. नित्य नैमित्तिक पूजा व उत्सवासाठी पुजारी नेमले व वतन नेमून दिले. मंदिराच्या वरच्या बाजूला दरबारासारखी बैठकीची व्यवस्था केली. भुयाराची जागा जशीच्या तशी व्यवस्थित करून ठेवली.

टीप – आजही ते भुयार आपणास पहावयाला मिळते व इतिहासाची साक्ष देते. तेथे चौकशी करता त्यावेळी एका वृद्ध तेज:पुंज साधूने सांगितले“यहाँ महान रामभक्त दख्खन के साधू आये थे ।” आणि ते दख्खन के साधू आणखी कोणी नसून आपले श्रीमहाराज, (श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज)

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “लाखो इथले गुरू…” – कवी : श्री. ग. दि. माडगूळकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ “लाखो इथले गुरू…” – कवी : श्री. ग. दि. माडगूळकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

 

बिन भिंतीची उघडी शाळा 

लाखो इथले गुरू…

झाडे, वेली, पशु, पाखरे 

यांशी गोष्टी करू!

 

बघू बंगला या मुंग्यांचा,

सूर ऐकुया या भुंग्यांचा

फुलाफुलांचे रंग दाखवील 

फिरते फुलपाखरू…

बिन भिंतीची उघडी शाळा 

लाखो इथले गुरू!

 

सुग्रण बांधी उलटा वाडा,

पाण्यावरती चाले घोडा

मासोळीसम बिन पायांचे 

बेडकिचे लेकरू…

बिन भिंतीची उघडी शाळा 

लाखो इथले गुरू!

 

कसा जोंधळा रानी रुजतो,

उंदीरमामा कोठे निजतो

खबदाडातील खजिना त्याचा 

फस्त खाऊनी करू

बिन भिंतीची उघडी शाळा 

लाखो इथले गुरू!

 

भल्या सकाळी उन्हात न्हाऊ,

कड्या कपारी पर्‍ह्यात पोहू

मिळेल तेथून घेऊन विद्या 

अखंड साठा करू

बिन भिंतीची उघडी शाळा 

लाखो इथले गुरू!

कवी : श्री. ग. दि. माडगूळकर

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “नांदत्या घराची किंमत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “नांदत्या घराची किंमत…” –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित 

दोन दिवसापूर्वी मी एका कंपनीचा सामाजिक उपक्रम म्हणून मेळावा आयोजित केला होता तो एका वृद्धाश्रमात.

त्या कार्यक्रमाचे फोटो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पेनड्राईव्ह मध्ये पाठवतो असे व्यवस्थापकांनी सांगितले. वाटलं.. कोणी ऑफिसबॉय येईल पेनड्राईव्ह घेऊन म्हणून मी दुसऱ्या दिवशी वाट बघत होते.

7.30 ला मोबाईल वरून फोन आला. जरा थकलेला.. पण मार्दवपूर्ण असा एका आजींचा आवाज होता.

“मी आलेय फोटो घेऊन. डेक्कनच्या बस स्टॉप वर उतरलेय. पत्ता समजावून सांगता का? ” 

अरे बाप रे.. एवढ्या वयस्क आजी. मी माझ्या लेकीला गाडीने पिटाळले त्यांना आणायला. झक्कपैकी टू व्हिलर वर बसून आजी आल्या. फिकटसं नऊवारी पातळ, सुपारीएवढा अंबाडा, हसतमुख चेहरा आणि हातात मोबाईल आणि पेनड्राईव्ह छोट्याशा बटव्यात.

ब्रेकफास्ट ची वेळ होती. नवरा ग्राऊंडवरून 10 मिनिटात येणार होता. मी बटाटे पोह्यांची तयारी केली होती. मला कंपनीत फोटो आणि न्यूज पाठवायची होती. लेक पसार झाली काहीतरी काम काढून.

शेवटी मी डाईनिंग टेबलवर लॅपटॉप घेतला नि गॅसवर कढई ठेवली. माझी धांदल पाहून आजी म्हणाल्या, ” मी करते ग पोहे, तू निश्चिन्तपणे फोटोचे काम हातावेगळे कर. ” मी जरा संकोचले पण पर्याय नव्हता म्हणून तेथून बाजूला झाले. माझे काम होईस्तोवर पोहे तय्यार.

भरपूर ओला खोबरं आणि कोथिंबीर घालून आजीनी मस्त पोहे केले होते. हक्कानी पापड मागून घेतले. मी भाजते म्हटलं तर म्हणाल्या ” थांब मी तळते की “.

एव्हाना लेक आणि नवरा घरी आले आणि आम्ही एकत्र ब्रेकफास्ट करायला घेतला. आजींच्या हातचे चविष्ट पोहे खाऊन घरातले खुश. जाते जाते म्हणत आजी जेवण करूनच निघाल्या इतका आग्रह माझ्या माणूसवेल्हाळ लेकीने आणि नवऱ्याने त्यांना केला. आणि आजीने पण खान्देशी भरीत करून त्यांच्या आग्रहाला पोच दिली.

निघताना मी जरा संकोचून आजींना म्हंटले, ” आजी खूप त्रास घेतलात हो. “

आजी जे उतरल्या त्यात समाधान होते आणि वेदनाही.

त्या म्हणाल्या “नांदत्या घरात खूप दिवसांनी वावरले, अगदी स्वयंपाकघरातही हक्क दाखवला… खूप छान वाटलं ग “

या एका वाक्यात मीच रडवेली झाले. ” पुन्हा याल ना? ” त्या उत्तरादाखल किंचित हसल्या अन म्हणाल्या 

” परमेश्वराची इच्छा “

खरा सांगू.. सणासुदीला पाव्हण्यारावळ्यांचा मर्यादेपेक्षा जास्त राबता झाला कि मी जरा वैतागायचे….. आजींच्या ” नांदत्या ” या एका शब्दाने मला ती किंमत कळली.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “अंत्यसंस्कारानंतर…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “अंत्यसंस्कारानंतर…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  ☆

थोड वाईट वाटेल पण हेच सत्य आहे आणि हेच सत्य राहील..

# काही तासांत रडण्याचा आवाज पूर्णपणे बंद होईल.

# तुमचे घरचे माणसं पहिले काही दिवस नातेवाईकांनी आणून दिलेले जेवण जेवतील व नंतर हळूहळू पुर्वस्थितीत येतील.

# नातवंडे धावत-खेळत राहतील.

# तुमच्या निघून जाण्यानंतर काही लोक तुमच्याबद्दल काही टिप्पणी करतील!

# दुसऱ्या दिवशी रात्रीच्या जेवणात काही नातेवाईक कमी होतील, तर काहीजण भाजीत पुरेसे मीठ नसल्याची तक्रार करतील.

# जमाव हळूहळू पांगू लागेल..

# काही दिवसांनंतर, तुमचे घरचे तुम्ही कमावलेली संपत्ती कशा रितीने वाटून घ्यायची याची चर्चा सुरू करतील.

# येत्या काही दिवसात, तुम्ही मेला आहात हे माहीत नसताना काही कॉल तुमच्या फोनवर येऊ शकतात.

# दोन आठवड्यांत तुमचा मुलगा आणि मुलगी त्यांची आणीबाणीची रजा संपल्यानंतर कामावर परत जातील.

# महिनाअखेरीस तुमचा जोडीदारही कॉमेडी शो पाहून हुळूहळू हसायला लागेल.

# तुम्ही ज्या पदावर होता त्या पदावर आता दुसरा कोणीतरी व्यक्ती असेल.

# प्रत्येकाचे जीवन सामान्य होईल. 

# आपण कशासाठी जगतो आणि मरतो यात काही फरक नसतो.

# हे सर्व इतक्या सहजतेने, इतक्या सहजपणे, कोणतीही हालचाल न करता घडते.

# या जगात विस्मयकारक गतीने तुमचे विस्मरण होईल.

# दरम्यान, तुमची प्रथम पुण्यतिथी, प्रथम वर्षश्राद्ध मोठ्या दिमाखात, दणक्यात केले जाईल, तुम्हाला न मिळालेले खाद्य पदार्थ लोकांना खायला मिळतील

# मोठमोठ्या महाराजांची किर्तने,प्रवचने ५/७ दिवस मोठ्या दिमाखात होतील 

# अतिवेगाने वर्षे उलटून जातील आणि आता तुमची कोणालाही आठवण येणार नाही.

 आता सांगा… 

# लोक तुम्हाला सहज विसरण्याची वाट पाहत आहेत.मग तुम्ही कशासाठी धावत आहात?

# तुम्हाला कशाची काळजी आहे ?…

 # योग्य आणि नैतिक मार्गाने संपत्ती कमवा, गरजेपेक्षा जास्त संपत्ती जमा करू नका.

# आयुष्य फक्त एकदाच मिळते, फक्त ते निस्वार्थी भावनेने व प्रेमळ मनाने जगा.

# इतरांपेक्षा स्वतः च स्वतः ला श्रेष्ठ समजवून इतरांना कमी लेखू नका, त्यांचा अपमान करू नका.

# इत्तरांचे प्रपंच मोडकळीस आणण्याचे पाप करु नका, त्याचा परिणाम आपल्याही कुटुंबांवर होऊ शकतो

# आयुष्यात पद, सत्ता एका विशिष्ट वयानंतर येते आणि एका विशिष्ट वयानंतर निघून जाते,….  

“होय, एक गोष्ट…”

# आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजूला निरपेक्ष प्रेमाने मदत करा,  तो तुमची नेहमी आठवण ठेवेल.

# आपल्या अस्तित्वाचा अहंकार सोडा.

# सत्कर्म करत रहा. हेच खरे जीवन आहे. 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “गेले मीच उद्धरून…” – कवी : केशवानंद ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

 ? वाचतांना वेचलेले ?

☆ “गेले मीच उद्धरून…” – कवी : केशवानंद ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

एके दिवशी तुकोबा 

असे तीरावरी आले..

अन् इंद्रायणीलागी थोडे 

हसून म्हणाले…

*

तुला द्यायचीच होती 

माझी गाथा परतुन..

मग पहिल्याच दिशी,

दिली का न तू आणून?

*
उगा मला तिष्ठविले असे 

तुझिया काठाला

दिस चवदा असा तू माझा

अंत का पाहिला.. ?

*

बोले इंद्रायणी मग..

तुम्ही भक्तांचे भूषण

अशा जगाच्या गुरुचा 

अंत मी कसा पाहीन.. ?

*

ऐका तुकोबा..

कधीच कोणा कळली न मात..

काय घडले सांगते 

खोल माझिया डोहात..

*

अशी गाथा त्या दिवशी 

आली डोहाच्या तळाशी..

जणू कुबेराचे धन 

आले माझिया हाताशी..

*

असा अमृताचा घट 

येता सहजी चालून..

कोणी देईल का ??

थोडी चव घेतल्या वाचून ?

*

तशी गाथा अवचित 

माझ्या हाताला लागली..

सारे विसरून जग 

मीही वाचाया घेतली..

*

पुरे चवदा दिवस केले 

तिचे पारायण

आणि मगच तुकोबा..

दिली तुम्हा परतून.. !

*

तुम्ही आभाळाएव्हढे..

अंत मी काय पाहीन..

गाथा तारी जगताला 

तिला मी काय तारीन ?

*

सारे जग शुद्ध होते..

बुडी माझ्यात घेऊन..

गाथा वाचून तुमची 

गेले मीच उद्धरून……

 

कवी : केशवानंद 

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “गुरू…!!!!!” – लेखक : श्री सलील कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “गुरू…!!!!!” – लेखक : श्री सलील कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

जी व्यक्ती चालायला शिकवते…

धावायला बळ देते आणि

उगाच धावण्यातला फोलपणा सजवून सांगते….

ते गुरु…!!

काहीही लिहिताना.. गाताना..बोलताना…चित्रपट करताना…

ज्यांचा धाक वाटतो…ह्यांना आवडायलाच हवं…ह्यांना पटायला हवं असं वाटतं..

ते गुरु…!!

काय अनुभवायला हवं आणि कुठे फिरकायचं सुद्धा नाही हे स्वतःच्या अनुभवातून सांगतात

ते गुरु…!!

मी सांगतो तेच करायला हवं… असं न म्हणता..

तू करून पाहा…

मी आहेच पाठीशी.. असं म्हणतात..

ते गुरु…!!

….. चांगल्या गोष्टीची गोडी लावतो तो गुरू…

….. १००% कशाला म्हणायचं… हे शिकवतो तो गुरु…

….. “मीपण” बाजूला ठेवून  काहीही अपेक्षा न ठेवता देऊ शकतो

तो गुरु…!! 

म्हणजेच…

जो आई होऊ शकतो तो गुरु ……!!

जो बाप होऊ शकतो तो गुरु……!!

लेखक : श्री सलील कुलकर्णी

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कहर व्हॉटसअपचा… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

 

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ कहर व्हॉटसअपचा… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

आमचे एक शेजारी होते… वय वर्षे पंच्याऐंशीं ते नव्वद….

मात्र कॉम्प्युटर अन स्मार्टफोन अगदी एखाद्या तरुणाला लाजवतील, इतक्या सफाईने वापरीत.

गेली पाच वर्षे काका अंथरूणावरच बेडरीडन होते.

(वाक्य खटकण्यासारखं आहे, रियल फॅक्ट सारखं)

 

पण काकांच्या अंथरुणावर त्यांचं एक

स्पेशल बेड होतं, म्हणून असा शब्दप्रयोग…

 

छंद फक्त एकच. स्मार्टफोन.

हल्ली त्यांना व्हाटसअपचा नाद लागला होता.

दर तासाला स्टेटस अपडेट करायचे.

स्टेटस तरी काय??

 

बीपी अमुक,.. शुगर तमुक,…

नुकतंच दोन दिवसानंतर पोट साफ झालं,

फीलिंग फिदरी. इत्यादी इत्यादी…

 

झोपल्या-झोपल्या काकांनी अनेक विविध क्षेत्रातले आभासी मित्र जोडले होते…

डॉक्टर, वकील, इंजिनियर, इतकंच काय तर

मृत-सामग्री केंद्राचे मालक, वैकुंठ रथाचे ड्रायवर,

तेरा दिवसांचे काँट्रॅक्ट घेणारे, सर्व उपयोगी क्षेत्रातले लोक काकांचे आभासी मित्र होते..

 

रोज सकाळी व्हाटसअप वर मेसेज यायचे..

 

“तैयारीकू लगू क्या?? ”

काका त्यांना, “वेट अँड वॉच.. ” चा सल्ला द्यायचे..

 

एक मात्र विशेष मैत्रीण भेटली होती काकांना..

त्यांच्या प्रत्येक स्टेटस वर कॉमेंट करणारी..

 

शब्द संपले की, ती एखाद्या पायाच्या नखाने जमीन कुरतडणाऱ्या मांजरीचा फोटो टाकायची..

उत्तरादाखल काका टाळ्या पिटणारं माकड टाकायचे..

 

काकुला वाटायचं, आपल्याला माकड म्हणतो हा थेरडा.

ती वस्सकन फेंदारलेल्या मिश्यांची मांजर टाकायची..

 

एकंदरीत काय, यमराजाची वाट पाहणं सुकर झालं होतं व्हाटसअप मुळे..

 

आणि एक दिवस..

साक्षात यामराजाची फ्रेंड रिक्वेस्ट आली.

रेड्याचा व्हाट्सअप वर मेसेज आला..

“कमिंग टुडे.. आवरतं घ्या.. ”

 

आदल्या रात्रीच काकांचं फोरजी बंद पडलं..

नियतीचे संकेत काकांना समजले..

रात्रभर बायको, मुलगा आणि सून..

गंगाजल घेऊन बाजूला बसले होते..

 

काका शेवटचं स्टेटस अपडेट करत होते..

“आम्ही जातो आमुच्या गावा.. ”

 

सकाळी सकाळी काका गेले…

क्रियाकर्म आटोपले….

 

पिंडदानाचा दिवस आला.

दोन कावळे हजर होते. पण पिंडाला एकही शिवेना…

 

काकांच्या सर्व इच्छा पुरवायचे वचन दिल्या गेले,

पण कावळे अगदी ढिम्म…

 

मुलांनी काकांच्या अंगवस्त्रांना अंतर न देण्याचं वचन दिलं, पण कावळे अगदी ढिम्म..

 

सुनांनी त्यांना “सासूबाईंचा दर्जा देऊ.. ” हे मान्य केलं,

पण कावळे आपले हूं नाही की चुं नाही..

सगळे वैतागले. इतक्या समृद्ध माणसाचं मन कशात अडकलं असेल, समजायला मार्ग नव्हता..

शेवटी काकांचा नातू आला आणि म्हणाला,

आजोबा, तुमच्या अंतिम पोस्टला एकशे साठ लाइक आले, आणि मुख्य म्हणजे तुमची

बेस्ट फ्रेंड आजीची कॉमेंट पण आली,

‘Coming Soon, B Happy‘

अशी…

आणि काय आश्चर्य???

…….. कावळ्यांचे अख्खे खानदान पिंडावर तुटून पडले हो..

– – – चला हसत हसत दिवस घालवू……

लेखक : अज्ञात 

संग्राहिका  : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वारी एका शिक्षकाची…” कवी – अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “वारी एका शिक्षकाची…” कवी – अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

नाही पंढरीशी जाणे, नाही केली कधी वारी। 

माझी कर्मभूमी हीच, माझी रोजची पंढरी ॥ 

*

माझा खडू-फळा माझे, टाळ, विणा नि मृदूंग। 

फुले ज्ञानाची घेवून, रोज रंगतो अभंग ॥ 

*

मन मोकळे कराया, जेव्हा येतात लेकरं । 

त्यांच्या डोळ्यातलं पाणी, माझं चंद्रभागा तीर ॥ 

*

त्यांचे दुःख निवारून, देतो दान आनंदाचे । 

काही वेगळे आहे का, पूण्य देव दर्शनाचे ॥ 

*

ज्ञानदानाचे हे व्रत, हीच माझी एकादशी। 

माझ्या लेकरांचे यश, माझे प्रयाग नि काशी ॥ 

*

जेव्हा येतात लेकरं सुख-दुःख वाटायला । 

त्यांच्या रूपाने विठ्ठल, रोज येतो भेटायला ॥

*

राम कृष्ण हरी!!!!!

कवी : अज्ञात

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares