☆ “आदिवासी लोकांची एक गोष्ट” – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लोकांची एक शिकण्यासारखी गोष्ट…
त्या भागात त्या वेळी नेमणुकीवर असलेल्या “सेंट्रल बँक ऑफ इंडिया”च्या मॅनेजरने दै. सकाळच्या मुक्तपीठमध्ये लिहिली होती.
तो दुर्गम भागात पोस्टिंग असल्याने एकटाच रहात होता. बॅंकांच्यावरच रहाण्याची जागा होती.
– –एका अपरात्री कोणीतरी दरवाजा जोरजोराने वाजवत असल्याने पाहिलं तर बाहेर आदिवासी लोकांचा जमाव जमला होता. काही ओळखीचे चेहरे पाहून घाबरतच दरवाजा उघडला तर त्या लोकांनी सांगितलं की त्यांच्यापैकी एकजण मरण पावला होता. याला कळेना की त्याचा याच्याशी काय संबंध? ते म्हणाले की त्या मृताचा अंत्यसंस्कार लगेच करायचा आहे कारण त्यांच्यात रात्रभर मृतदेह ठेवत नाहीत. तरीही याचा काय संबंध हे कळत नव्हतं.
…. पुढे ते लोक म्हणाले की त्याने बॅंकेचं कर्ज घेतलं होतं आणि ते समाज फेडणार आहे. हा म्हणाला, “ठीक आहे. उद्या सकाळी बॅंक उघडली की हिशोब करूया. ”
…. त्यावर त्यांच्यापैकी एका वृद्धाने सांगितलं की “ जोपर्यंत मृताच्या डोक्यावर कर्ज आहे तोपर्यंत अंत्यसंस्कार करता येत नाही आणि अंत्यसंस्कार तर लगेच करायचा आहे. तेव्हा बॅंक उघडून हिशोब करा आणि पैसे घेऊन मृताची कर्जाची कोणतीही थकबाकी नसल्याचं लिहून द्या म्हणजे आम्हाला त्याचे अंत्यसंस्कार करता येतील. ”
हे ऐकून बॅंक मॅनेजरची वाचाच खुंटली.
– – – कुठे कोट्यवधी रुपये बुडवणारे अब्जाधीश आणि कुठे समाजातील मृताची कर्जफेड स्वतःच्या पैशांतून करणारे आदिवासी!!!
लेखक : अनामिक
प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : sunil68deshpande@outlook.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ’वरणभात…’ – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ ☆
साधं-वरण-भाताच्या वासात आई शोधताना……
“आई, आज पण वरण-भात? ” – चिडून मी विचारलं.
कॉलेजातून नुकताच आलेलो. ताटात गरम मऊसूत भात आणि बाजूला साधं वरण त्यात हिंग आणि चिमूटभर साखर आणि वर एक चमचा साजूक तूप.
माझं चेहरा बघून आई थोडं हसली, म्हणाली, “झणझणीत पावभाजी हवी होती ना? किंवा मसालेदार रस्सा भाजी. पण आज पिठं नव्हतं रे, म्हणून वाटलं वरण-भात करावा. “
माझा मूड अजूनच खराब झाला. माझ्यासाठी साधं वरण-भात म्हणजे कंटाळवाणं जेवण. कॉलेजमधले मित्र सांगायचे – “आपल्याकडे पिझ्झा, पास्ता, बर्गर! “
आणि मी? रोज एकतर पोळी-भाजी, नाहीतर वरण-भात.
त्या दिवशी मी चिडून खाल्लंही नाही. बॅग घेतली आणि बाहेर पडलो.
वर्षं उलटली……
मी आता पुण्यात मोठ्या कंपनीत कामाला होतो.
रोज वेगवेगळ्या हॉटेलमध्ये खाणं, झणझणीत चव, परदेशी पदार्थ……
पण मन काही भरत नव्हतं.
एका रविवारची गोष्ट –
खूप दमून घरी आलो. भाड्याचं घर, ओव्हरटाईम संपवून आलेलो.
पोटात कावळे ओरडत होते. डबा मेसवाल्याने आज दिला नव्हता.
फ्रिजमध्ये पाहिलं – काहीच नव्हतं. शेवटी थोडी तांदूळ आणि तुरीची डाळ डब्यात दिसली. मग काय! डाळ तांदूळ धुऊन घेतले. आणि कुकरला लावले.
तेच शिजवलं… एका छोट्या बाउलमध्ये वरण गरम केलं भात गरम होता. वर साजूक तूप नव्हतं – पण आठवण मात्र होती.
पहिला घास तोंडात गेला… आणि अचानक डोळे भरून आले.
– – त्या साध्या वरण-भातात मला आईचा पदर दिसला… तिचा तो स्वयंपाकघरात उभा असलेला आकृतीपणा…
तिचं ते “खाल्लंस ना नीट? ” असं विचारणं, आणि माझं “हे काय, पुन्हा वरण-भात? ” असं उत्तर.
आज ते वरण-भात “राजभोगासारखं” वाटत होतं.
आई गेली दोन वर्षांपूर्वी.
तिच्या हसऱ्या चेहऱ्याच्या फोटोसमोर ठेवलेली फुलं कोमेजली होती… पण आठवणी ताज्या होत्या.
त्या दिवशी ठरवलं –
रविवारी जेवायला मी वरण-भात करणार. घरचं साजूक तूप कढवून..
आईला आठवण म्हणून नाही… तर स्वतःला आठवण करून देण्यासाठी –
“सुख हे वरण-भातासारखं असतं – घरगुती, साधं, पण प्रेमानं भरलेलं! “
“मी आजही पिझ्झा, बर्गर, इटालियन, पास्ता थाई करी, चायनीज घरी खातो हॉटेलचं जेवणही खातो परदेशात राहिलो, पाश्चात्य चविष्ट खाल्लं, पण घरच्या वरण-भाताच्या घमघमाटानेच मन खरंच परत घरी येतं. “… पण पोट भरलं तरी मन वरण-भात शोधतं! “
फ्युजन फूडने जिभेला आनंद दिला,
पण वरण-भाताने मनाला निवांत केलं. “मॉडर्न स्वयंपाकघरात स्पेशल डिशेस शिजतात,
पण वरण-भात अजूनही घरपणाची ओळख करून देतो. “
काय जादू आहे ना वरणभातात आणि आईच्या हातात!
जग फिरलंत, पदार्थ बदलले, थाळी वाढली, पण मनाचा घास तोच राहिला – वरणभात.
जेव्हा आयुष्याच्या गर्दीत दम लागतो, तेव्हा सगळ्या रेस्टॉरंट मेन्यूज डोळ्यांसमोर नुसते फिरतात, पण मन मात्र शोधतं एक साधंसं वरण – आणि आईचा हात.
आईच्या हातात जादू असते का?
कदाचित नाही – ती फक्त भात शिजवते, वरण फोडते, तुपाची धार टाकते… आणि एक प्रेमळ नजर देते –
ही नजरच असेल ती जादू…
सगळ्या मसाल्यांच्या, चविष्ट पदार्थांच्या गर्दीत
वरणभात गप्प असतो – साधा, शांत पण मनावर राज्य करणारा.
आईनं भरवलेला पहिला घास म्हणजे जगातला पहिला safe space.
तोंडात वरणभात आणि कानात –
“हळू खा, गिळू नको, तोंड पुस… “
या वाक्यांमध्ये जादू आहे का?
हो… कारण त्यामागे मायेचा हात आहे.
आज स्वतः आई-बाबा झालो,
स्वतः मुलांना बर्गर-पास्ता बनवतो,
पण जेव्हा स्वयंपाकघरात वरणाचा वास येतो, तेव्हा अचानक मन परत पंधरा वर्षांनी मागं जातं – आईच्या हाताखाली.
आई कुठं गेली?
ती आजही आहे – आठवणीत, चवीत आणि त्या वरणभातात.
मनातलं दुःख, डोळ्यांतलं पाणी आणि ओठांवरचं हास्य –
सगळं सावरण्याची ताकद जर कोणाच्या हातात असेल,
तर ती केवळ आईच्या हातात असते… आणि तिच्या वरणभातातही.
जिवाला हवा असतो आपुलकीचा घास, टेबलवरच्या मेनूचा फोटो नाही! “
आई शिजवत असते तेव्हा म्हणते, “आज काही नाही गं, फक्त वरण-भात. “
पण तो “फक्त” मध्ये तिचं प्रेम, काळजी, थकवा विसरणारी ऊब असते.
हा वरणभात सांगतो –
“जेवण हे पोटासाठी नसतं फक्त, ते माणसांमध्ये जोडणारा एक धागा असतो. “
जेव्हा आपण खूप मोठं जग पाहतो, तेव्हा परत याच वरण-भातासारखं घरटं आठवतं –
शांत, मृदू आणि आपलंसं.
तो शिकवतो –
“सर्वसाधारण गोष्टी कधी-कधी सर्वात खास असतात! “
प्रत्येकाच्या घरात शिरणारा हा वरण-भात… पण मनात शिरतो तो आपुलकीनं! ” अगदी लहान पासून तर मोठ्यांपर्यंत.
☆ “जीवनसाथी…” – मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात – मराठी अनुवादक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
एकदा एक मित्र आमच्या घरी आला होता.
चहा, नाश्त्यासोबत गप्पाही चांगल्या रंगल्या होत्या.
बोलता बोलता मी मधेच उठून उभा राहिलो.
“मी प्लेट्स धुवून लगेच परत येतो.”
मी असं म्हणताच तो माझ्याकडे अशा काही विचित्र नजरेने पाहत होता जणू मी त्याला सांगितलंय की
‘मी रॉकेट बनवायला चाललोय.’
मग तो काहीसा गोंधळून कौतुकाच्या स्वरात बोलला.
“मला आनंद वाटला की तू तुझ्या बायकोला कामात मदत करतोस. मी नाही करत मदत. कारण माझ्या बायकोला त्याचं काही कौतुकच नसतं. आता हेच बघ ना, मागच्या आठवड्यात मी किती मेहनतीने फरशी धुतली…
तर तिने साधं छान ही म्हटलं नाही…”
मी किचनमधून परत आलो.
“मी बायकोला ‘मदत’ करत नाही. खरं तर तिला मदतीची गरजच नसते. तिला हवा असतो ‘पार्टनर’. आणि घरात, समाजात मी तिचा पार्टनर आहे.
पण मी काही घरतल्या कामात तिची मदत करत नाही.
घर स्वच्छ करण्यात मी तिला ‘मदत’ करत नाही,
कारण मीही याच घरात राहतो आणि त्याची स्वच्छता माझीही गरज आहे.
स्वैपाकात मी तिला ‘मदत’ करत नाही,
कारण जेवण ही माझीही गरज आहे आणि म्हणून स्वैपाक करणं माझंही काम आहे.
जेवणानंतर मी ताटं धुतो,
कारण ती ताटं मीही वापरत असतो.
मी मुलांना सांभाळण्यात तिला मदत करत नाही.
कारण ती माझीही मुलं आहेत आणि मुख्य म्हणजे एक बाप म्हणून ते माझंही काम आहे.
कपडे धुणे, वाळवणे, घड्या घालून ठेवणे या कामात मी तिला मदत करत नाही.
कारण ते कपडे माझे अन माझ्या मुलांचे असतात.
मी घरात तिला ‘मदत’ करत नाही,
कारण मीही या घराचा एक हिस्सा आहे.
अन् मुद्दा राहिला तो तिने तुझं कौतुक करण्याचा तर आठवून बघ, तिने जेव्हा घर स्वच्छ केलं, कपडे धुतले, स्वैपाक केला, मुलांना संभाळलं तेव्हा तू तिला साधं ‘थँक्यू’ तर बोललास का?
बोलायला हवं.
अगदी कोणत्याही मर्यादांचा बाऊ न करता बोलायला हवं.
मी बोलतो.
पण थोडं वेगळ्या स्टाईलने.
जसं, “थँक्यू डार्लिंग…!!
तुझी खरंच कमाल आहे!!”
तुला हे मूर्खपणाचे वाटेल कदाचित.
जणू एखादी नवलाची गोष्ट मी तुला सांगतोय,
असे तुझे डोळे मोठ्ठे मोठ्ठे झालेत.
पण खरं तर असं काहीही नाही,
आयुष्यात एकदाच फारशी पुसून तू एका मोठ्या कौतुकाची अपेक्षा करत होतास. पण, खरं सांग तिच्यासाठी तू असा कधी विचार केला आहेस का?
तुझ्यासाठी म्हणून सांगतो,
या कामांसाठी फार मेहनत अन संयम लागतो.
जो आपल्यात नसतो.
आपल्याकडे कष्टाच्या कामांना मर्दानी काम म्हणतात. पण आपली आई, बायको जे काम करत असतात ते मर्दानी कामाहून मुळीच कमी नसते.
कदाचित आपल्याला हेच शिकवलं जातं की हे काम तितकं मेहनतीचं नसतं.
साधं बोटही फिरवावं लागत नाही.
खरं तर हे काम केल्यावर समजतं.
जर तू तिच्याकडून कौतुकाची अपेक्षा करत असशील तर तिच्याही कामाचं कौतुक कर. अगदी मनापासून.
तिला हात दे, तिच्या ‘पार्टनर’सारखा.
एखाद्या पाहुण्यासारखा नको जो फक्त जेवण्यासाठी, झोपण्यासाठी, अंघोळीसाठी किंवा केवळ इतर गरजा पूर्ण करण्यासाठी घरात येतो.
आपल्याला हे बदल आपल्या घरापासून सुरु करावे लागतील. आपण आपल्या मुलींना अन मुलांना ‘मैत्रीचं खरं मर्म’ शिकवायला हवं. तेव्हा ते एकमेकांचं कौतुक करतील अन त्याहून अधिक एकमेकांच्या कामाचा आदर करतील.
(‘The Bookoholics’ या इंग्रजी लेखाचा मराठी स्वैर अनुवाद. )
मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात
अनुवादक : अज्ञात
प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : sunil68deshpande@outlook.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मन शहाणं ठेऊन वाचा… लेखक : श्री संजय आवटे ☆ सुश्री नीलांबरी शिर्के☆
☆
मन शहाणं ठेऊन वाचा – –
‘जगन रेप कर’ असं जगनला कोणी शिकवत नाही, हे खरं.
… पण, ‘तुला काय अक्कलय! गप्प बस’, असं बाप आईला चार-चौघात म्हणतो, तेव्हा पहिलीतल्या जगनला कळतं की बाईला काही सन्मान वगैरे नसतो.
बहिणीला ‘बघायला’ पाहुणे येतात. तेव्हा तिला शोरुमसारखं पाटावर बसवलं जातं. पाय दाखव. चालून दाखव, वगैरे सुरू असतं, तेव्हा तिसरीतल्या जगनला कळतं की गाडी वा टीव्ही विकत घेणं आणि लग्नासाठी बायको घेणं (आणि, इथं पैसे आपल्यालाच मिळतात! ) यात काही फरक नाही.
मैत्रिणींच्या गराड्यात रमलेल्या मावशीचा एकदा पदर पडतो आणि जगनलाही काहीतरी दिसू लागतं. मग, सहावीत असलेला जगनचा मावसभाऊ म्हणतो, ‘आई, पदर नीट घे. ‘ तेव्हा, मावशीच्या सगळ्या मैत्रिणी त्याचं कौतुक करायला लागतात. ‘पोरगं मोठं झालं बघ’, असं मावशीला सांगू लागतात. तेव्हा आपला मोठेपणीचा ‘रोल’ जगनच्या लक्षात येतो.
शाळेतल्या बाई चांगल्या शिकवतात, असं सातवीतला जगन आईला सांगतो, तेव्हा आई म्हणते, ‘नटवी मेली! दंड मोकळे ठेवते. बेंबीखाली साडी नेसते. ती रे कसली चांगली? ‘ तेव्हा, बाई म्हणजे शरीर हे जगनच्या लक्षात येतं.
मग तोही रस्त्यावरच्या पोरींकडं असंच बघत बसतो.
वर्गातल्या बाई असोत की त्याला तपासणार्या डॉक्टर, त्याला हे आधी दिसतं. मग कळतं की हे ‘शरीर’ शिक्षिका आहे किंवा डॉक्टर!
मूल होत नाही म्हणून त्याच्या मावशीला काकानं सोडल्यावर, ‘हीच कमनशिबी’ असं आजी म्हणते, तेव्हा ‘बायको म्हणजे पोरं जन्माला घालायची मशिन’ हे जगनला समजत जातं.
एके दिवशी शेजारच्या मालतीकाकू रात्री कोणाच्या तरी बाइकवर घरी येतात, त्यावर आई आणि इतर बायका करत असलेलं गॉसिप जगन ऐकत असतो. बाई पुरुषाच्या जवळ आली म्हणजे तसलंच काहीतरी घडतं, हे तर जगनला समजतंच, पण त्यात चूक फक्त बाईची असते. पुरुष तर मजा मारत असतात. हेही जगनला समजून चुकतं.
आठवीतल्या जगनला पहिल्यांदा हस्तमैथुन करावं वाटतं. आणि, आपण चूक केलं का बरोबर, हेही त्याला माहीत नसतं. पण, ते विचारायला कोणी नसतं. त्यामुळं अशा गोष्टी लपूनछपूनच करायच्या असतात, याची त्याला खात्री पटते.
एकदा रात्री धाकटी बहीण उशिरा येते. जगन नेहमीच त्याहून उशिरा घरी येत असतो. बहिणीला आई बडवते आणि म्हणते, ‘बाई म्हणजे काचेचं भांडं. पुरुषाला काय, तो काहीही करेल! ‘ तेव्हा, जगनला समजतंः बाईनं आपलं चारित्र्य जपायचं असतं आणि पुरुषानं पौरुष सिद्ध करायचं असतं.
‘आज तीन *** मारले. बायको घायल. नको, नको असं ती किंचाळतेय. मी थोडाच गप्प बसतोय’, असं नुकतंच लग्न झालेला त्याचा दादा मित्रांच्या कोंडाळ्यात सांगत असतो, तेव्हा पौरुष म्हणजे काय, हे जगनला समजतं.
काकू शेजारणीला सांगत असते, ‘ती प्रिया उगीच नाही झाली मेंबर. अण्णांपुढं दहादा पदर पाडल्यावर मग ते काय सोडतील का तिला? पुरेपूर किंमत वसूल केली तिनं. अण्णांना पाहिजे, ते त्यांनी मिळवलं. आपण नाही बाई असलं काही करणार. नाहीतर मीच झाले असते मेंबर! ‘ मग जगनला हा ‘व्यवहार’ समजतो.
गणेशोत्सवाच्या रांगेत किती पोरी दाबल्या, यावर गल्लीत पोरांची चर्चा सुरू असते, तेव्हा नववीतल्या जगनचे हात सळसळू लागतात.
☆ “स्लो लिव्हिंग : थांबून श्वास घेण्याची कला…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
दररोज सकाळी अलार्म वाजतो, आपण डोळे चोळत उठतो आणि धावपळ सुरू होते — नोकरी, फोन, ई-मेल, मीटिंग्स, ट्रॅफिक, सोशल मीडिया… आणि रात्री थकून कोसळताना आपल्यालाच प्रश्न पडतो.
… “आज दिवसभर धावलो, पण खरंच *जगणं* झालं का?”
याच ठिकाणी सुरू होते “स्लो लिव्हिंग” ही सुंदर संकल्पना —
थोडं थांबणं, शांत श्वास घेणं आणि *आता* या क्षणात जगणं.
*स्लो लिव्हिंग म्हणजे काय नाही? *
हे “आळशीपणा” नाही, “काम टाळणं” नाही आणि “सगळं सोडून डोंगरात जाऊन बसणं” तर मुळीच नाही.
स्लो लिव्हिंग म्हणजे — आयुष्य थांबवणं नाही, तर *त्याचा वेग स्वतः ठरवणं. *
*स्लो लिव्हिंग म्हणजे काय आहे? *
स्लो लिव्हिंग म्हणजे —
जाणीवपूर्वक जगणं.
महत्वाच्या गोष्टींसाठी वेळ राखणं.
प्रत्येक क्षणातलं सौंदर्य ओळखणं.
उदाहरणार्थ –
सकाळी ऑफिसला जायचं आहे, म्हणून घाईत गाडी दामटतो. कारण उठायला उशीर झाला, रात्री मोबाईलवर स्क्रोल करत बसलो… पण जर थोडं लवकर झोपलो आणि सकाळी शांततेने उठलो, तर गाडीही हळू चालवता येते, मनही प्रसन्न राहतं. एवढं साधं आहे हे!
आपल्याला सगळं हवं असतं — नवी गाडी, नवा फोन, नवे कपडे…
पण एकदा मनाला विचारलं की, “खरंच ही गरज आहे का?”
उत्तर बहुतेक वेळा “नाही” असतं.
जसं ऑनलाइन शॉपिंग करताना अनेक वस्तू कार्टमध्ये टाकतो, आणि शेवटी विचार करतो — “खरंच हे आवश्यक आहे का? ”
तो विचार आला की विषय संपतो.
… गरजा मर्यादित केल्या की मन मोकळं होतं, आणि तेव्हाच शांत श्वास घेता येतो.
*स्लो लिव्हिंगचा मजेशीर भाग*
कधी कधी हे खूप साधं असतं —
* सकाळी चहाच्या कपातून येणाऱ्या वाफेकडे बघत पावसाचा सुगंध अनुभवणं.
* मुलांनी विचारलेल्या निरागस प्रश्नाचं उत्तर प्रेमाने देणं.
* मित्राला भेटताना मोबाईल बाजूला ठेवून मनमोकळ्या गप्पा मारणं.
– – या छोट्या क्षणांमध्येच आयुष्याचा खरा गोडवा आहे —
आणि त्यासाठी *एकही रुपया खर्च नाही. *
स्लो लिव्हिंग म्हणजे फक्त मंद गती नाही, तर *उद्देशपूर्ण गती* आहे.
आपल्याला का जगायचं आहे, काय महत्वाचं आहे — हे उमजलं की धावपळसुद्धा शांत वाटते.
जर तुमचा उद्देश आरोग्य राखणं असेल —
तर तुम्ही जेवण, झोप, व्यायाम यांना वेळ द्याल.
जर उद्देश मन:शांती असेल —
तर तुम्ही कामापेक्षा स्वतःकडे लक्ष द्याल.
आजच्या जगात स्लो लिव्हिंग का आवश्यक?
आज “फास्ट” जगणं म्हणजे “स्मार्ट” समजलं जातं. “मला वेळ नाही” असं सांगणं म्हणजे प्रतिष्ठा वाटते.
लोक सतत व्यग्र दिसतात, पण आतून थकलेली असतात.
फास्ट लाईफ देतं यशाचं बाह्य रूप, पण घेऊन जातं मन:शांतीचं मर्म.
त्याउलट, स्लो लिव्हिंग करणारा माणूस बाहेरून शांत दिसतो, पण आतून समाधानी असतो.
तो प्रत्येक क्षणात जगतो, आणि म्हणूनच त्याचं जगणं पूर्ण वाटतं.
स्लो लिव्हिंग म्हणजे आयुष्याचा वेग कमी करणं नव्हे,.. तर मनाचा वेग कमी करणं.
स्लो लिव्हिंग म्हणजे झाडासारखं — शांत, स्थिर, पण तरीही सतत वाढत राहणारं.
स्लो लिव्हिंग म्हणजे — पावसाच्या थेंबात, मुलाच्या हसण्यात, आणि गप्पांच्या ओघात आनंद शोधणं.
आणि सर्वात महत्त्वाचं —
स्लो लिव्हिंग म्हणजे स्वतःसाठी थांबून श्वास घेणं.
थोडं थांबा… डोळे मिटा… आणि श्वास घ्या.
कदाचित तुम्हाला जाणवेल —
याच क्षणात संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे.
… Think about it.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “तुम्हाला विनोदबुद्धी कुठून मिळाली?” – लेखक : पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
ह्या प्रश्नाचे उत्तर मला सुचवणाऱ्याला मी इष्टेट लिहून देईन. मला वाडवडिलार्जित फक्त आजपर्यंत संधिवात मिळाला आहे. आजीला दमा होता, त्या वाटणीची मी अत्यंत आतुरतेने वाट पाहात आहे. विनोदबुद्धी कोण देणार?
ज्याने मला डोळे दिले (चष्मा वगळून- तो मी विकत घेतला.) त्याखेरीज ते दातृत्व मी आणखी कुणाच्या वाट्यावर जमा करू?
गणितातला कच्चेपणा, मी माझ्या एका मामाकडून मिळवला.
चित्रकलेतील अधोगतीला एक दूरचा चुलता जिम्मेदार आहे.
सिग्रेटी फुंकायचे व्यसन माझ्या एका आतेभावाने लावले.
इतिहासाचा तिटकारा इतिहासाच्याच गुरूजींनी निर्माण केला! त्यामुळे शिवाजीचा गुढगी रोग मी औरंगजेबापर्यंत नेऊन पोचवला आहे, आणि इंग्लंडच्या गादीवरच्या चार्लसबरोबर अनेक हेन्री मंडळींची मुंडकी तिमाही – सहामाहीत ह्या हाताने उडवली आहेत.
संगीताची आवड ही शेजारच्या घरात वेळीअवेळी पेटी बडवणाऱ्या एका इसमावर सूड म्हणून उत्पन्न करून घेऊन त्याची पेटी बंद पाडली.
नाटकात पहिली भूमिका मिळाली, ती ‘नरवीर तानाजी मालुसरे’ ह्या नाटकाच्या सोनावणे मास्तरांनी ‘डायरेक्शन’ केलेल्या प्रयोगात!
तानाजी मेल्यावर जे मावळे पळतात त्यांतला आघाडीवरचा मावळा म्हणून मराठी रंगभूमीला माझा चिमुकला पदस्पर्श झाला.
-“मूर्खांनो! तो दोर मी केव्हाच कापला आहे, ”
हे सूर्याजीचे भाषण ज्या मूर्खांना उद्देशून होते त्यातला मी आघाडीचा मूर्ख!
तिथे देखील उजव्या विंगेत कड्याच्या दिशेला न पळता उदेभानाच्या महालाच्या दिशेला पळाल्यामुळे डाव्या विंगेत उभ्या असलेल्या सोनावणे मास्तरांनी उजव्या हाताने माझ्या डाव्या गालफडावर एक सणसणीत ‘डायरेक्शण’केलेले स्मरते.
सुटलेला कल्ला आणि जीव बालमुठीत धरून मी पुन्हा एकदा तलवार आणि मावळी पागोटे सांभाळीत उजव्या विंगेत पळताना वाटेत आडव्या पडलेल्या तानाजीच्या छातीवर पाय देऊन पळालो होतो. त्या आघाताने तो मेलेला तानाजी कोकलत जिवंत झाला.
असो; हे विषयांतर झाले.
विनोदबुद्धीचा उगम माझ्या मानेवरील चामखिळीप्रमाणे केव्हा झाला हे अजिबात स्मरत नाही.
लेखक : श्री. पु. ल. देशपांडे.
प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : sunil68deshpande@outlook.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “दहा रुपयांच्या बदल्यात १३ लाख” – लेखक – अज्ञात☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
शेठने नुकतंच दुकान उघडलं होतं. इतक्यात एक बाई आली आणि म्हणाली,
“शेठजी, हे घ्या तुमचे दहा रुपये. “
…. शेठ त्या गरीब बाईकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागला, जणू विचारत होता, “मी तुम्हाला दहा रुपये कधी दिले होते?”
बाई म्हणाली,
“काल संध्याकाळी मी तुमच्याकडून ७० रुपयांचं सामान घेतलं. मी तुम्हाला १०० रुपये दिले होते. पण तुम्ही ३० रुपयांच्या ऐवजी ४० रुपये परत दिलेत. हेच दहा रुपये घेऊन आले आहे. “
शेठने त्या दहा रुपयांच्या नोटेला कपाळाशी लावलं आणि गल्ल्यात ठेवत म्हणाला,
“एक गोष्ट सांगा ताई, तुम्ही सामान घेताना पाच रुपये कमी व्हावेत म्हणून किती घासाघिस करत होता! पण आता हे दहा रुपये परत देण्यासाठी आलात?”
बाई सहजपणे म्हणाली,
“घासाघिस करणं माझा हक्क आहे, पण एकदा भाव झाल्यावर कोणाचे पैसे खाणं पाप आहे. “
शेठ थोडा गोंधळला आणि म्हणाला,
“पण तुम्ही कमी पैसे दिलेच नव्हते. माझ्या चुकीमुळे तुमच्याकडे दहा रुपये जास्त गेले होते. तुम्ही ते पैसे ठेवले असते तरी मला काय फरक पडणार होता? असे दहा वीस रुपये किती वेळा जातात ओ!”
बाई शांतपणे म्हणाली,
“तुम्हाला फरक नाही पडला तरी माझ्या मनावर ओझं राहील शेठ. मी जाणूनबुजून तुमचे पैसे खाल्ले असं वाटले असते. म्हणून मी रात्रीच पैसे परत द्यायला आले होते, पण दुकान बंद होतं. “
शेठने विचारलं —
“तुम्ही कुठे राहता?”
बाई म्हणाली —
“मी स्टेशन जवळ राहते. “
हे ऐकताच सेठ थक्क झाला. तो म्हणाला —
“७ किलोमीटर दूरून फक्त हे दहा रुपये देण्यासाठी दोनदा आला आहात?”
बाई सहज म्हणाली —
“हो. कारण मनशांती हवी असेल तर असं करावं लागतं. माझा नवरा आता जिवंत नाहीये पण त्यांनी एकच शिकवलं — दुसऱ्याच्या हक्काचा एक पैसाही खाऊ नका. कारण माणूस गप्प राहू शकतो, पण वरचा देव कधीही हिशोब मागू शकतो. आणि त्या हिशोबाची शिक्षा माझ्या मुलांनाही मिळू शकते. “
इतकं बोलून बाई गेली.
बाई गेल्यावर शेठने लगेच गल्ल्यातून ३०० रुपये काढले आणि स्कूटीवर बसून दुसऱ्या दुकानात जातो. तो म्हणतो —
“प्रकाशजी, हे तुमचे ३०० रुपये घ्या. काल सामान घेताना हिशोबात जास्त झाले होते. “
प्रकाश हसत म्हणतो —
“जास्त झाले होते तर पुढच्या वेळी मी आलो असतो तेव्हा दिले असते. एवढ्या सकाळी पैसे द्यायला आलात?”
शेठ म्हणतो —
“पुढच्या वेळी तुम्ही आलात, तोपर्यंत मी मेलो असतो तर? तुम्हाला कधी कळलंच नसतं की माझ्याकडे तुमचे ३०० रुपये निघतात. म्हणून लगेच द्यायला हवे. देव कधी हिशोब मागेल सांगता येत नाही. त्या हिशोबाची शिक्षा माझ्या मुलांनाही मिळू शकते. “
शेठ निघून गेला, पण प्रकाशच्या मनात खळबळ उडाली.
कारण १० वर्षांपूर्वी त्याने एका मित्राकडून ३ लाख रुपये घेतले होते. पण पैसे दिल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी मित्र मेला. त्याच्या कुटुंबाला पैशांबद्दल माहितीच नव्हती. त्यामुळे प्रकाशने कधी परत दिले नाहीत. मनात लोभ आला आणि तो शांत राहिला.
आता मात्र शेठचे शब्द — “देव कधी हिशोब मागेल सांगता येत नाही आणि त्याची शिक्षा मुलांनाही मिळू शकते” — हे त्याच्या अंतःकरणाला हादरवून गेले.
दोन-तीन दिवस प्रकाश खूप तणावात होता. शेवटी त्याचा अंतरात्मा जागा झाला. त्याने बँकेतून १३ लाख रुपये काढले आणि मित्राच्या घरी गेला.
मित्राची बायको घरातच होती. ती मुलांबरोबर बसली होती. प्रकाश तिच्या पायावर पडला आणि पैसे तिच्या हाती दिले.
जी बाई घरकाम करून, झाडू-पोछा करून मुलांना वाढवत होती, तिला हे १३ लाख खूप मोठं वरदान होतं. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिने प्रकाशला मनापासून आशीर्वाद दिले.
आणि ही बाई दुसरी कोणी नव्हे, तर तीच होती जी शेठकडे दहा रुपये परत देण्यासाठी दोनदा आली होती.
.. मेहनत आणि प्रामाणिकपणाने खाणाऱ्यांची देव परीक्षा घेतो, पण कधीही त्यांना एकटे सोडत नाही.
.. देवाच्या घरात उशीर असतो पण अंधार कधीच नसतो.
तुम्हाला काय वाटते ?? जरूर कळवा..
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
काल वर्तमानपत्रात एक बातमी वाचली आणि मनात तो विषय दिवसभर सतत घोळत होता. त्या बातमीत सांगितले होते की संवादाला आसुसलेली एक सिनियर सिटीझन व्यक्ती कुठलेही आकडे जुळवत फोनवर डायल करीत कुठलाही अनोळखी नंबर वर फोन करीत संभाषण वाढवून बोलणे वाढवत बसायचे. त्यातील बरेच जण उद्वेगाने फोन ठेऊन द्यायचे पण काही जण मात्र आत्मीयतपूर्वक संवाद साधायचे. हे एवढे एकच टॉनिक ह्या व्यक्तीसाठी तो दिवस घालवायचा एक नामी उपाय होता.
बरेच जण म्हणतील त्या व्यक्ती मध्ये दोष असेल त्याने माणसे जोडून ठेवली नाही. पण वस्तुस्थिती अगदी वेगळी होती. खूप जास्त दीर्घायुष्य त्या व्यक्तिला शाप वाटत होतं. त्यांची आपली जवळची माणसे, जवळचे नातेवाईक आपापल्या कामात व्यस्त असायचे, वयोमानामुळे डोळे काम करीत असल्याने वाचन, टीव्ही पण बराच कमी झाला होता. ह्यावरून ही समस्या किती मोठी आहे हे लगेच लक्षात आले. ह्यावरून मला ह्या विषयावरची एक पोस्ट आठवली आज तीच पोस्ट परत एकदा.
काही पुस्तके ही कितीदाही वाचली, किंवा काही चित्रपट, शॉर्ट फिल्म ह्या कितीदाही बघितल्या तरी परत परत वाचावेसे वा बघावेसे वाटतात. युगंधर, मृत्युंजय, श्रीमानयोगी, ययाती ह्यासारखी पुस्तकं तरं कायम जवळ हवी अशी वाटतात, जेव्हां वेळ मिळेल तेव्हा हवे ते पान काढून वाचत बसावं. अंगुर हेराफेरी ह्या सारखे विनोदी चित्रपट केव्हाही फ्रेश करुन टाकतात.
अशीच एक शार्टफिल्म परत बघावीशी वाटली. यु ट्यूब. वर “काँल हीम एडी” नावाची ही एक खूप छान शाँर्टफिल्म परत काल बघितली. आजकाल एकापेक्षा एक उत्कृष्ट शाँर्टफिल्म बघायला मिळतात, आणि ते पण अगदी घरबसल्या. आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल.
ह्या फिल्ममध्ये मध्यवर्ती भुमिकेत संजय सुरी आणि ईशा चोप्रा हे दोघेही कसलेले कलाकार चमकले आहेत. संजय सुरी ह्यांचा अभिनय नेहमीसारखाच दर्जेदार परंतु नवोदित ईशा त्यांच्यापुढे कुठेही कमी किंवा फिकी पडली नाही हे ह्या फिल्मचे वैशिष्ट्यं.
ह्या फिल्मची संपूर्ण संकल्पना “टू कडल्” म्हणजे “कुशीत घेणे”ह्यावर आधारलेली आहे. संपूर्ण फिल्मचा भर हा भावनांचा निचरा होणे किती अत्यावश्यक आहे हे समजविण्यावर बेतलेला आहे.
संजय सूरी हा एका मोठ्या पदावरील अतिशय मानाच्या नोकरीमधून निवृत्ती घेतो आणि कडलिंग म्हणजेच समोरच्या व्यक्तीचा भावनात्मक ताबा घेऊन त्याला कुशीत घेऊन त्याच्या मनात साठलेल्या भावनांना मोकळी वाट करून देऊन समोरच्या व्यक्तीच्या दुःखाचा निचरा करणे हाच त्याचा प्रमुख उद्देश असतो. अर्थात हे काम तो पूर्णपणे व्यावसायिक तत्वावर करतो आणि ह्या कामात तो प्रचंड यशस्वीपण होतो. हा त्याचा एक उपचारांचाच भाग असतो. तो समोरच्याला विश्वासात घेऊन समजावून सांगतो की ह्या मागे त्याच्या मनात कुठलीही वैषयिक भावना अजिबातच नसणार.
आपल्याकडे जुन्या परंपरांचा बराच पगडा असल्याने कोणत्याही एका स्त्री पुरुषाची जवळीक, मिठी, हस्तांदोलन, मैत्री ही फक्त आणि फक्त वैषयिकदृष्टीकोनातूनच त्या विशिष्ट नजरेने बघितली जाते. प्रत्येक देशात, प्रातांत काही चांगले, काही वांगले ह्याची सरमिसळ असते. त्या मुळे स्त्रीपुरुष मैत्रत्वाचे संबंध ह्या बाबीवर पाश्चात्य देशामध्ये बराच अभ्यास झालेला असल्या कारणाने तिकडे ह्याकडे निव्वळ वैषयिक भावनेने न बघता सहानुभूती, प्रेम, मनाशी जुळलेले मनाचे चिवट धागे ह्याचा विचार करून मग कुठल्याही निष्कर्षाप्रत ती मंडळी पोहोचतात.
ह्या फिल्ममध्ये संजय सूरी हा वयाची तरुणाईचा भर ओसरल्यावर ह्या व्यवसायात पूर्ण अभ्यासाच्या ताकदीने उतरल्याने तो मनात कुठलेही विकल्प न धरता प्रामाणिकपणे उपचाराचा हा टप्पा तो यशस्वीरित्या पार पाडीत असतो.
“जहाँ न बुलबुल नगमे गाये जहा न फसले बहारा” ह्या ओळींप्रमाणे आयुष्यातील एक सुरवातीच्या वयाचा टप्पा ओलांडल्यानंतर वैषयिक भावना जाऊन त्याची जागा फक्त मानसिक, भावनिक प्रेम, सहानुभूती घेतं ह्यावर दुर्दैवाने आपल्याकडे विचारच होत नाही, कदाचित झापड लावल्यासारखी सब घोडे बारा टक्के ह्या नुसार त्याकडे ह्याच नजरेने बघण्याची आपल्याला सवय लागलेली असते. असो तर ह्या उपचारांवर विशेष विश्वास नसलेली एक पत्रकार म्हणजेच ईशा चोप्रा ही सुरींची मुलाखत घेण्यासाठी येते. ह्या थेरपीवर विश्वास नसल्याने तिची सुरवातीची स्थिती ही खूप अवघडल्यासारखी असते. नंतर हळूहळू एडी तिला विश्वासात घेउन तिच्याशी मनमोकळं बोलून आणि तीला मनमोकळं बोलायला लावून आपल्या भावना उलगडवायला कुशीत मिठीत घेऊन, सहानुभूती, प्रेम ह्या जोरावर कसे आश्वस्त करतो हे खरतर प्रत्यक्ष बघण्यासारखेच. हेच ह्या फिल्मच्या यशाचे गमक आहे. अप्रतिम. रंगवलाय हा प्रसंग दोघांनीही. उपचारांमध्ये ईशा स्वतःच्या वडीलांचा केलेला रागराग आणि त्यांच्याकडे एकाच अँगलने बघून वडीलांना कायम दोषी, अपराधी मानत आलेली ईशा त्यांच्या मृत्यू नंतर मात्र स्वतः ला दोषी मानायला लागते. आणि हे गिल्ट च तिला भावनांचा निचरा न झाल्याने नीट जगूही देत नाही आणि मरु ही देत नाही. मात्र मुलाखती बरोबरच चाललेला हा उपचारांचा प्रयोग कमालीचा यशस्वी होऊन ईशा आपल्या भावनांना वाट करुन देऊन मोकळी होते.
दुर्दैवाने संजय सूरी जे ह्या उपचारांनी सगळ्यांना ह्या मानसिक नैराश्यातून बाहेर काढत असतात त्यांना स्वतः ला हा भावनांचा निचरा करायला जवळच कोणीही नसतं. ते शेवटी आपल्या मृत पत्नी व मुलाच्या कबरीपाशी जाऊन स्तब्ध होतात असा शेवट होतो.
म्हणजेच काय तर प्रत्येकाच्या मानसिक गरजा ह्या खूपच वेगवेगळ्या असतात. कोणाला मानसिक आधाराची खूप गरज असते तर काही एकटे पण हा प्रसंग कोणाच्याही मदतीशिवाय तोलू शकतात. पण एक नक्कीच अशी सरसकट अभ्यासपूर्ण मदत आपल्याकडे सर्रास मिळेल तेव्हा आत्ता सारख्या आत्महत्या करण्याचे प्रमाण बरेच कमी होईल.
लेखिका : सुश्री कल्याणी बापट (केळकर)
बडनेरा, अमरावती
प्रस्तुती : सुश्री प्राची जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈