मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कर्मा रिटर्न्स” – लेखक : श्री केदार सोमण ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “कर्मा रिटर्न्स… – लेखक : श्री केदार सोमण ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

★★★

आजकाल खूपवेळा वाचायला मिळते की “कर्मा is बिच” 

“कर्मा रिटर्न्स” 

आपल्याकडे सुद्धा म्हण आहे…. पेरावे तसे उगवते, किंवा करावे तसे भरावे.

पण हे अर्धसत्य वाटते मला, जगात वावरताना अनुभव घेताना, वरील म्हणींचा प्रत्यय नेहमी येतोच सर्वांना, असे नाही वाटत.

कितीतरी, सुस्वभावी, पापभिरू संकटात लोकांना मदत करणारी माणसे, दुर्दैवाचे दशावतार अनुभवताना दिसतात.

कित्येक फ्रॉड लोक, लोभी व्यक्ती कित्येक लाखो कोटींचे घोटाळे करून, मस्त जगत असतात.

आणि कितीतरी साधीसरळ माणसे स्वतःच्या मुलांना पैश्याअभावी उच्चशिक्षण सुद्धा देऊ शकत नाहीत.

किंवा घरात कोणीतरी असाध्य रोगाने आजारी असते, कोणाचे एकुलत्याएक अपत्याचा अकाली मृत्य होतो.

असे काय मोठे कुकर्म केलेले असते की त्यांना पुत्रवियोगाचे जगातील सर्वात मोठे दुःख भोगावे लागते?

मला स्वतःला तरी असे वाटते, नियतीला चांगलं वाईट असे काहीही कळत नाही.

विजे सारखी ती कधी कोणावर कोसळून उध्वस्त करेल आयुष्य, हे सांगू शकत नाही.

मी माणुसकीने वागतोय कारण मग माझ्यापण वाट्याला चांगली वागणूक येईल, असा विचार करत जगणे हे फोल आहे.

आपण माणुसकीने वागावे कारण ते केल्याने मला समाधान लाभते. मला स्वतःची लाज वाटणार नाही. इतकेच फक्त असावे.

या लहरी नियतीच्या फटकाऱ्याला, आपण सगळेच मनातून घाबरत असतो, ती सुप्त भीती प्रत्येकाच्या मनात असते.

ह्या सुप्तभीतीला जो व्यवस्थित सांभाळू शकला, त्याचे आयुष्य खऱ्या अर्थाने आनंदी असते.

ही मनातील सुप्तभीती, हेच उगमस्थान आहे देवाचे, भक्तीचे, श्रद्धेचे.

मन सुदृढ करण्याचे अनेक मार्ग म्हणजे हे सर्व.

आणि ज्याला स्वतःचे मन सुदृढ करण्यात यश आले, तो सुखी.

#असेच_एक_मुक्तचिंतन…

★★★

लेखक : श्री केदार सोमण

संकलन व प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “टीचर… ते फटिचर…!” – संकलक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “टीचर… ते फटिचर…!” – संकलक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाने प्रसिद्धीस आलेले प्रख्यात नाट्यकलावंत डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचा एक किस्सा शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज तुमच्यासोबत शेअर करतेय. ते व त्यांची पत्नी विजया जर्मनीला नाटकाच्या दौऱ्यानिमित्त गेले होते. दौरा आटोपून पुढच्या शहरात जाण्यासाठी ते फ्रँकफुर्ट विमानतळावर आले. तेथून त्यांना पुढच्या प्रवासाला जायचे होते. नेमका गडबडीत त्यांचा पासपोर्ट बॅगमध्ये सापडत नव्हता. खूप शोधाशोध सुरु होती. दोन-तीन वेळेस अनाउन्समेंट झाली. शेवटी विमानतळाचे काही अधिकारी त्यांना तुम्हाला जाता येणार नाही, असे म्हणू लागले.

त्यांच्यातील एका अधिकाऱ्याने त्यांना एक फॉर्म भरायला दिला. जर तुम्ही खोटा प्रवास केला असे सिद्ध झाले तर तुमच्याकडून दंड वसूल केला जाईल, अशा आशयाचा तो फॉर्म होता. त्या फॉर्मवर तुमच्या व्यवसायाचे स्वरूप लिहायचे होते. त्या जागी त्यांनी ‘Teacher’ असा उल्लेख केला.

तो पाहताच क्षणार्धात तेथील वातावरण बदलले. तो अधिकारी कमरेत वाकून म्हणाला, “We Germans, Believe in two things. One is God… Another is Teacher ! ते दोघेही खोटं बोलत नसतात… मी परमेश्वराला दुखावले आहे. तुम्ही तुमच्या वतीने माझ्यासाठी प्रार्थना करा. म्हणजे मी पापमुक्त होईन… ” अशी आॕपॉलॉजी व्यक्त करीत त्या अधिकाऱ्यांने देशपांडे दाम्पत्याला थेट विमानात नेऊन बसविले.

प्रवासाच्या शेवटी देशपांडे दाम्पत्य मुंबईत आले. विमानतळावरील ग्रीन बेल्टमधून बाहेर पडण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. तेंव्हा एका अधिकाऱ्याने त्यांना टोकले.

तर दुसऱ्या अधिकाऱ्याने ते काय करतात, त्यांना विचार, असे फर्मान हाताखालच्या अधिकाऱ्यावर बजावले. यांच्या मनात टीचरची प्रतिमा उजळ झाली होती. त्यांनी ताठ मानेने ‘आम्ही टीचर आहोत, असे सांगितले. त्याच्या दुसऱ्याच क्षणाला तो वरिष्ठ अधिकारी ओरडून म्हणाला, ‘अरे वो फटिचर के पास क्या होगा ? जाने दो उसे… ‘

वऱ्हाडकरांचे टीचर नांवाचे विमान झटक्यात जमिनीवर आले.

कालांतराने ते औरंगाबादला गेले. काही दिवसांनी त्यांच्या घरी फ्रैंकफर्ट एअरपोर्टवरून एक टपाल आले. ज्यात ‘आपण टीचर असतानाही आम्ही आपल्याला त्रास दिला, ‘ त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणारे पत्र होते. देशपांडे यांना ते पाहून हसावे की रडावे ते कळेना…

शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

संकलक / लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “रोजचा दिवस तिचाच…!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “रोजचा दिवस तिचाच…! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

★★★

जेव्हा मी पावसातून भिजत घरी आलो…

बाबा ओरडले, “अरे गाढवा, छत्री का नेली नाहीस?”

बहीण म्हणाली, “आजारी पडल्यावरच मग ह्याला कळेल!”

आजोबा ओरडले, “पाऊस थांबेपर्यंत तुला थांबता नाही आले? एव्हढं भिजत यायची काय गरज होती?”

पण…

आई माझे केस पुसत म्हणाली, “मूर्ख आहे हा पाऊस! माझा मुलगा घरी येईपर्यंत याला थांबायला काय झालं होतं?”

★★★

बाहेर मुसळधार पाऊस पडतोय. मी बाहेरुन आलेलो असतो. बाहेरच्या दाराच्या कोपऱ्यात भिजलेली छत्री ठेवतो आणि मागे वळतो. मधल्या दारात आई उभी असते, “उजव्या बाजूने पूर्ण भिजलायस… तिला उद्या घरी यायला सांग… मला भेटायचेय…”

★★★

मित्रांमधे खेळता खेळता उंबरठ्यावर बसलेल्या आपल्या आईला बघत तो दुडूदुडू धावत येतो आणि तिच्या कुशीत घुसतो. 

“आई, तुझ्या पोटात येण्याआधी मी कुठे होतो गं?”

“तू ना… कुठे बरं होतास? हां… तू ना माझ्या स्वप्नात होतास… माझ्या डोळ्यात होतास… माझ्यातच माझ्यातला थेंब होतास…” (टागोरांच्या एका कवितेवर आधारित)

★★★

संध्याकाळची वेळ. गाडी चालवत घरी येतोय. समोर काचेवर पाऊस. बाहेर अंधार होत चाललाय. फोन वाजतो, “अरे कुठे आहेस? पाऊस पडतोय… सावकाश ये… लवकर ये… मी वाट बघतेय….”

डोळ्यात निरांजनं घेऊन दारात वाट बघत उभी असलेली आई….

★★★

“गाढवा, अक्कल कधी येणारेय तुला? बाबा इथं मर मर मरतायत आणि तुला शिकवतायत. तर तू गणितात वीस पैकी दोन मार्क आणून मला न दाखवता पेपर फाडून टाकलास? तुला काय वाटलं मला समजणार नाही? आयतं मिळतंय ना म्हणून हे सुचतेय…

जा स्टॅण्डवर जाऊन हमाली करून पाच रुपये कमवून आण. मग कळेल तुला कमावणं काय असतंय ते…

बाबा बोलत नाहीत म्हणून तुझी थेरं वाढलीत…

पण आता नाही चालणारेय हे…

जोवर तू आपण होऊन बाबांना हे सांगत नाहीस तोवर तू उपाशी बसायचं…

काही मिळणार नाही तुला…

भूक लागली तर बाहेर जाऊन भीक मागून खा…

पण घरातलं मी देणार नाही…”

रात्री न बोलता तसाच झोपलो. आई बाबा दोघंही बोलले नाहीत.

दुसरे दिवशी सकाळी उठून बाबा अ़ॉफिसला जायच्या वेळी धाडस करून त्यांना सांगितले. एक दणका पाठीत आणि एक गालावर बसला आणि न बोलता ते ताडताड निघून गेले.

आतून आई आली. पदराला हात पुसत होती. माझ्या रडक्या चेहऱ्याकडे बघत मला जवळ घेतले. केसातून हात फिरवत, “राजा, अभ्यास कर रे. अभ्यासाशिवाय काही खरं नाही रे! अरे बाबा एव्हढं कुणासाठी करतायत? आपल्यासाठी, तुझ्यासाठीच ना! मग, त्यांना बरं वाटायला तू अभ्यास करायला हवास, मार्क चांगले पाडायला हवेत. चल, आता रडणं बंद. आता अभ्यास करायचा आणि मार्क चांगले पाडायचे, हं!”

तोवर बाबा परत येतात, “जा, गाढवा. जा… ते रडकं तोंड धुवून घे आणि जेवण कर… कालपासून ती पण उपाशीच आहे… तुझ्यासाठी !”

★★★

पार्टीत बसलोय. वेळ झालाय. साडेबारा वाजलेत. पार्टी संपते. बाहेर येऊन मोबाईल बघतो. तेरा मिस कॉल्स. परत कॉल करायचा धाडस नसते.

गाडी अंगणात आत घेतो. मधला लाईट सुरूच असतो. गाडीचा आवाज ऐकून दार उघडले जाते. पेंगुळल्या डोळ्यांनी, दिवसभराच्या शिणवट्याने थकलेली ती दारात. “अरे, किती फोन करायचे रे. काळजी वाटते. एक फोन घ्यायला काय होतंय रे. म्हातारं झाल्यावर कळेल तुम्हाला… चल, ये आता आत. आत कट्ट्यावर थंड ताक ठेवलेय ते पी आणि झोप… नंतर सकाळी ॲसिडिटी झाली म्हणून जेलुसिल खात बसशील आणि आता हे जरा कमी कर… तूही पन्नाशी पार केलीयस आता. काळजी घे रे आता जरा स्वतःची.”

★★★

मुलाचं लग्न ठरलेलं. एक दिवस आईचा फोन. येऊन जा. मी जातो. आई बाबा समोर बसवून घेतात आणि हातामधे एक पाकिट कोंबतात. मी उघडून बघतो. मुलाच्या नावाने अडीच लाखाचा चेक!

“आम्ही तुला काही दिले नाही. पण नातवाला देऊ शकतोय आज. हे त्याच्यासाठी…!”

★★★

घराची थोडी दुरुस्ती करायचीय. पैसे असतात  पण गंमत करायची म्हणून मी विचारतो, “तुम्ही किती देणार?”

ताडकन् आई बोलते, “द्यायचं ते सगळं दिलेय. आता फक्त सईसाठीचे पाच लाख आहेत ते मी मोडणार नाही. ते तिलाच तिचं लग्न ठरलं की देणार. इथे जे करायचेय ते तूच करायचेस. तुला एक पैसा देणार नाही. हां पण कैरीचं लोणचं देणारेय…”

★★★

शनिवारी संध्याकाळी अंगणातल्या मारुतीसमोर भीमरुपी, रामरक्षा, करुणाष्टके म्हणून झाली की आम्हाला सगळ्यांना एकत्र बसवून मीठ मोहऱ्या ओवाळून टाकत ‘ईडापिडा टळो’ म्हणत दृष्ट काढणारी… आई !

★★★

अशी आई असल्यावर आपल्याला दृष्ट लावायची कुणाची टाप आहे… 

आणि म्हणूनच – – 

आईचा दिवस वर्षातला फक्त एकच नसतो, तर सगळं आयुष्यच तिचं असतं… रोजचा दिवस तिचाच…!

★★★

लेखक : अज्ञात 

संकलन व प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जिवंत आईचे श्राद्ध…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “जिवंत आईचे श्राद्ध…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

जिवंतपणीच आई-वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करणे म्हणजेच खरे श्राध्द!!

मिठाईच्या दुकानात एक मित्र भेटला. मला म्हणाला आज आईच श्राध्द आहे, आईला लाडू खूप आवडायचे म्हणून लाडू घ्यायला आलो.

मला आश्चर्याचा धक्काच बसला, पाच मिनिटा पुर्वीच मी त्याच्या आईला मार्केटमध्ये भेटलो होतो. मी काही बोलणार तेवढ्यात, मित्राची आई हातात पिशवी घेवून इथे स्वत: येवून पोहचली.

मित्राला एक जोरदार थाप मारत मी विचारलं, “भल्या माणसा, ही कसली चेष्टा करतोयस वेड्या, आई तर आहे तुझ्या बाजूला..”

मित्र आईच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत जोर जोरात हसत म्हटला, अरे भाऊ,.आईच्या मरणानंतर गायी वासरे नी कावळ्यांना लाडू खाऊ घालण्याऐवजी मी आईला जिवंतपणीच तृप्त करू इच्छितो. त्याचे असे मत होते कि, “जिवंतपणीच आई- वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करणे म्हणजेच खरे श्राध्द”.

तो पुढे म्हणाला, “आईला मधुमेह आहे, पण गोड खायला आवडते. म्हणून मी नेहमी फ्रीज मध्ये काही न काही ठेवून जातो, जे जे तिला आवडतं, ते ते सर्व आणून ठेवतो, श्रद्धेनी लोक मंदिरात जातात, अगरबत्ती लावतात. मी पण लावतो ‘कासव छाप’, आई झोपायला जायच्या आधी, मच्छर हाकलायला.

सकाळी आई “दासबोध” वाचायला बसते नियमित, मी तिचा चष्मा साफ करून देतो, माझा असा समज आहे की, देवाचे फोटो साफ करत बसण्यापेक्षा, आईचा चष्मा साफ करण्याने अधिकच पुण्य मिळेल” आणि मित्र त्याच्या आईसोबत निघून गेला.

मी घरी येउन सुन्न मनाने पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करत बसलो. मित्राच्या भक्तीत मला जरा जास्तच तथ्य वाटलं. रिती रिवाज म्हणून आपण श्राध्द करतो, पूर्वजांच्या नावानी पोटभर गोड धोड खातो, पण खरच ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, एवढे निश्चित.

अमेरिका आणि जपान सारख्या प्रगत देशात पण अशी टिफिन सेवा अजून तरी सुरु झालेली नाही. त्यांच्या जिवंतपणी, त्यांच्यावर दुर्लक्ष करणे, म्हणजे डोळे असून आंधळे होणे असे वाटते. खरे तर त्यांच्या उतार वयात आई वडिल, पैश्यापेक्षा प्रेम, आणि एक सच्चा आधार फक्त तुमच्यामध्ये शोधतात.

आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांवर खूप जबादारी आणि वेगवेगळ्या प्रकारचे तणाव असतात, याची त्यांनाही पुरेपूर जाणीव असते. पण तरीही जी मुले आई वडिलांची काळजी घेवू शकत नाहीत, त्यांना देवही माफ करणार नाही. आज कितीतरी वृद्ध माता पिता, कुटुंबियांकडून अवहेलना झेलतांना आपण पाहत असतो यावर कवी धर्मेश ची ओळ आहे…

आधी माता मग पिता.. मग घेईन प्रभू नाम… मला नकोय दुसरे तीर्थधाम”!!

संत कबीर असे म्हणतात,

जीते बाप को रोटी नां दे

मरे बाद क्यो पछतांये ॥

मुठभर चावल धाबेपर झोककर

कव्वे को बाप बनाये॥

संत तुकोबाराय असे म्हणतात…

भुके नाही अन्न ।

मेल्यावरी पिंडदान ॥

हे तो चाळवा चाळवि ।

केले आपणची ठेवी ॥

प्रिय मित्र-मैत्रिणीनो, मेल्यानंतर अन्न वाया घालवण्यापेक्षा आपण आपल्या आईवडिलांना जिवंतपणी काहीच कमी पडू देऊ नका… जिवंतपणी आपण आपल्या आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास आणि मेल्यानंतर अनेक पूजा- अर्चा आणि पिंडदान केल्यास काय उपयोग त्याचा?

* * * *

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुख पर्वताएवढं – लेखक: श्री प्रवीण दवणे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ सुख पर्वताएवढं – लेखक: श्री प्रवीण दवणे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

सुख! सुख! सुख!

सर्व बाजूंनी सुखाचा नुसता पाऊस!

सुखाचा म्हणजे सुखी असल्याच्या आभासाचा!

कारण समाधानाचा तरंग अंतरंगापर्यंत पोचण्याआधीच— सुखाचं नवं रुप— नव्या ढंगात निमंत्रण देतच असतं.

मग ते पूर्ण करण्यासाठी आटापिटा.

आपण जे सोसलं ते आपल्या पुढच्या पिढीला ‘अगदी काहीही सोसावं’लागू नये म्हणून बिचारी धावाधाव!

एखाद्या गोष्टीची अधीरतेनं वाट पाहणं, तिच्या अनिश्चिततेबद्दल झोके अनुभवणं…अनपेक्षिततेच्या काठावर जीवाचं काहूर उठणं आणि प्रतीक्षा मिसळलेल्या अश्रूंमध्ये सुखाचं अवचित येणं—यातली गंमत ही केवढी मजेशीर श्रीमंती असं हे सांगणं आवाक्याबाहेरचं आहे.

आता दिवाळीआधीच करंजी, होळीआधीच कुठेही पुरणपोळी— मोहोर येण्याआधीच ताजा आमरस गल्लोगल्ली कुठेही हात जोडून तयार असतो.त्या—:त्या सणाची, रुचीची, गंधाची वाटच पाहावी लागत नाही. सगळं कसं रेडी—मेड!

वस्तूंबाबतचं जे तेच भावनांबाबत. पटकन कुणाशीही संवाद— कधीही, कुठेही दृष्टभेट— आवडतं गाणंही व्याकूळ न करता एका बटनात कानात गुंजतंय— यातून अंत:करणाचे तगमग संघर्ष हरपले न् त्याचा गंधही!

तीच मानसिकता नव्या पालकांची. मुलांच्या भविष्यातील सारा जीवनसंघर्ष आततायी प्रेमानं पालकांनीच संपवून टाकणं यासारखा दुसरा कुठला गुन्हा असेल असं वाटत नाही. भविष्याची काळजी याचा अर्थ जगण्याचा गड चढण्याचे त्याचे मार्ग आपणच चढणं, हा नाही.

त्याला हेलिकाॅप्टरनं किल्ल्यावर सोडलं, तर रानवाटांचा अनवटपणा, खडकांचा रांगडेपणा आणि मधूनच वाहणार्‍या निर्झरणीची शीतलता त्याला कळणार कशी?

अतिदारिद्र्याने काही पिढ्या संपल्या, आता अतिअति ऐश्वर्याचं नवंच दारिद्र्य दारात आलंय. ते दारिद्र्य प्रयत्नानं दुर्दम्य ध्यासानं संपवति तरी येत होतं, हे रत्नजडीत दारिद्र्य लाखो आयुष्याचा उष्ण कोवळा घास घेऊन संपणार,असं दिसतंय.

केवळ लग्न झालं न् मूल झालं म्हणून’पालक’झालो, असं समजणार्‍या कोट्यवधी घरांत पुढे जिद्द हरवलेल्या तरुणाईचं मन ही मोठीच समस्या असणार आहे. अतिसुखाच्या ओल्या दुष्काळाचं सावट वेळीच कळलं तर…..

अनेक घरांत’मागितलं की द्या!’ हा एककलमी कार्यक्रम असतो आणि मग ते नाही मिळालं की क्रौर्य कुठल्या थराला जाईल याचा नेम नसतो.

केवळ’बाईक’एवढ्यात नको;अठरा वर्षे पूर्ण होऊ दे,’ असं सांगणार्‍या आजीला सतरा वर्षांचा नातू संपवतो,अशी बातमी येते तेव्हा दरदरुन घामच फुटतो. गायत्री मंत्र वहीत लिहीत बसलेली ती मी न पाहिलेली आजी माझ्या डोळ्यांसमोर येते.या आजीनं या नातवासाठी किती वेळा ऊन—ऊन जेवण केलं असेल, त्याची वाट पाहत ती जेवणासाठी थांबली असेल,आजारपणात रात्र रात्रभर जपमाळ घेऊन नातवाजवळ जागली असेल… त्या आजीला जीवे मारताना या सतरा वर्षांच्या मुलाला हे काहीच आठवलं नसेल?

एवढी हिंस्त्रता एकाएकी येत नाही. आज नव्वद पंच्याण्णव टक्के घरांत या हिंस्त्रतेचा रियाज साग्रसंगीत करुन घेतला जात आहे. *ना घरात प्रार्थना! ना घरात एखाद्या सामाजिक सेवेची साधना! ना घरात ग्रंथवाचन! ना पुस्तकाचं समृध्द कपाट! ना व्याख्यानांना जाणं! ना उत्तम संगीत! फक्त संगणक, मोबाईल, व्हाँटसअप ते एसएमएस आणि रस्त्याच्या कडेला उभं राहून खाणं आणि हीसुध्दा नशा कमी म्हणून की काय, मैत्रीची सरहद्द ओलांडणार्‍या मजेनं सर्वनाशाची पूर्वतयारी करणं!

जीवनाची ओढ नाही म्हणून मरणाचं भय नाही!

जगलो काय न् मेलो काय, इतका बेफिकीरपणा वाढत चालला तर कुठली कर्माची महासत्ता येणार?

आधी प्रतिष्ठापना हवी सुसंस्कृततेची, मानव्याची!

संपूर्ण विकसित माणूसपणाची!

मुलांना त्यांचा झरा स्वत:हून शोधू द्या! त्यांचे पंख त्यांना उघडू द्या! तुमच्या पैशाची हेलिकाॅप्टर्स त्यांचे पंख दुबळे करतील! उड्डाण तर ज्याचं त्यानंच करायचं असतं! त्यांच्या जीवनात तहानेची चव मिसळू द्या!

त्यांच्या पंखात आकाशाची साद उसळू द्या! त्यांच्या मुळातल्या कणखरतेनं — त्यांच्या फांदीवर त्यांचं फूल त्यांच्या गंधानं उमलू द्या!

 

लेखक: श्री प्रवीण दवणे

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फुले.. फुले.. अन् फुले… ☆ प्रस्तुती – सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ फुले.. फुले.. अन् फुले… ☆प्रस्तुती – सौ. जयश्री पाटील ☆

किती छान लिहिले आहे, फुलांविषयी.. केवढी क्रियापदे.. केवढी विशेषणे…. कमाल आहे आणि प्रत्येक गोष्ट मनाला पटते!

फुले माळावी मोगर्‍याची

फुले वेचावी पारिजातकाची

फुले जपावी बकुळीची

फुले दरवळावी चाफ्याची

फुले खुलावी गुलाबाची

फुले वाहावी अनंताची

फुले बहरावी बहाव्याची

फुले घमघमावी रातराणीची

फुले फुलावी कमळाची

फुले रंगावी जास्वंदाची

फुले झुलावी मधुमालतीची

फुले भरावी केळ्याची

फुले मोहरावी आंब्याची

फुले ओघळावी बुट्ट्याची

फुले दिखावी बोगनवेलीची

फुले स्मरावी बाभळीची

फुले लाघवी अबोलीची

फुले निगर्वी गोकर्णीची

फुले उधळावी झेंडूची

फुले तोलावी केशराची

फुले उमलावी ब्रम्हकमळाची

फुले निरखावी कृष्णकमळाची!

 

लेखक: श्री. पु.ल.देशपांडे

संग्राहिका –  सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “शोध स्वतःचा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ “शोध स्वतःचा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

दोन माणसे प्रवासाला निघाली. दोघांचेही स्थान एकच असल्याने त्यांनी एकत्र प्रवास केला.

सात दिवसांनंतर त्यांना वेगळे होण्याची वेळ आली.

पहिला प्रवासी: भाऊ, आपण आठवडाभर एकत्र राहिलो. तुम्ही मला ओळखलंस का?

दुसरा प्रवासी: नाही, मी तुम्हाला ओळखत नाही, परंतु आपण एकत्रच प्रवासात होतो, एवढं मात्र खरं….

पहिला प्रवासी: सर, मी एक प्रसिद्ध ठग आहे पण तुम्ही नक्कीच महान ठग आहात…

तुम्ही तर माझे गुरु निघालात….!

दुसरा प्रवासी: कसे काय?

पहिला प्रवासी: काहीतरी चोरी होईल या आशेने मी सतत सात दिवस तुमच्या वस्तूंचा शोध घेतला, पण काहीच सापडले नाही. तुम्ही एवढ्या लांबच्या प्रवासाला निघालात आणि तुमच्याकडे काहीच नाही!

तुम्ही पूर्णपणे रिकाम्या हाताने आला होतात काय?

दुसरा प्रवासी: माझ्याकडे एक मौल्यवान हिरा आणि काही सोन्याची नाणी आणि खर्चापाण्यासाठी काही पैसे होते.

पहिला प्रवासी: मग खूप प्रयत्न करूनही मला ते का सापडले नाहीत?

दुसरा प्रवासी: मी जेव्हा कधी बाहेर जायचो, तेंव्हा मी हिरे, नाणी आणि पैसे तुमच्या पिशवीत ठेवत असे,

इतके दिवस तुम्ही माझी पिशवी शोधत राहिलात!

तुम्ही  तुमचे स्वतःचं गाठोडं शोधण्याची तसदी घेतली नाही,

तर मग तुम्हाला काहीही सापडेल, अशी अपेक्षा कशी करायची?

तात्पर्य: ईश्वर नेहमी आपल्या झोळीत आनंद ठेवतो, पण आपल्या गाठोड्याकडं बघायला आपल्याला वेळच नाही!  ज्या दिवशी आपण इतरत्र सुख शोधणे बंद करू, तेव्हाच आपण आपले सर्व प्रश्न सोडवू.

जीवनातील सर्वात मोठा गूढ मंत्र म्हणजे स्वतःचा शोध घेणे आणि जीवनाच्या मार्गावर पुढे पुढे जाणे!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एक उघडं कटू सत्य…” – लेखक: श्री श्रीरंग खटावकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “एक उघडं कटू सत्य…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

“IITs भारत घडवत नाहीत, USA घडवत आहेत – हे उघडं सत्य”

IIT मधील विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून झटत असतात, पण भारतासाठी नाही. आपल्या कराच्या पैशावर ते अमेरिका/युरोपची साम्राज्ये मजबूत करत आहेत.

१९४७ पूर्वी आपण East India Company ची सेवा केली. आज आपण West Coast Company समोर नतमस्तक आहोत.

.

हे कुणी सांगत नाही, पण सत्य आहे—

सरकार एका IIT विद्यार्थ्यावर ४ वर्षांच्या B.Tech कार्यक्रमा दरम्यान ₹.१०–१५ लाख खर्च करते.

२०२४–२५ या आर्थिक वर्षासाठी IIT चा एकूण बजेट आहे ₹.९,६६० कोटी.

त्यातील फक्त थोडाच भाग विद्यार्थी भरतात. अनेकांना शिष्यवृत्तीमुळे अजिबात फी द्यावी लागत नाही. उरलेला पैसा कोण भरतो?  तुम्ही/आम्ही.

.

मग सुरुवात होते विश्वासघाताची—

३०–३६% IIT पदवीधर परदेशात स्थलांतर करतात.

JEE मधील पहिल्या १०० विद्यार्थ्यांपैकी ६२% शेवटी US किंवा युरोपमध्ये स्थायिक होतात.

जे भारतात राहतात त्यातील ७०% परदेशी MNC मध्ये काम करतात: Google, Amazon, Microsoft, McKinsey इ.

पण, DRDO, ISRO किंवा BARC मध्ये काम करणारे फक्त २–३%.

.

राष्ट्रनिर्मिती? कुणाला पर्वा नाही.

.

IIT चे स्वप्न आज “जागतिक मजूर निर्यात” बनलं आहे.

आणि दर प्रजासत्ताक दिनी आपण IIT ला भारताचा मुकुटमणी म्हणून मिरवतो.

पण कुणी विचारत नाही—

हेच का अब्दुल कलाम, होमी भाभा, विक्रम साराभाई यांचे स्वप्न होते?

.

ही संस्था atomic research साठी, ग्रामीण वीजपुरवठ्यासाठी, भारताच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी उभारल्या गेल्या होत्या.

आज त्या कॅलिफोर्नियातील शेयर होल्डर्सचे नफे वाचवतात.

एक आकडा ऐका—

अमेरिकेतला एक software engineer वर्षाला ₹.१.५ कोटी कमावतो.

ISRO मधला एक entry level शास्त्रज्ञ वर्षाला ₹.१२ लाख कमावतो.

हे brain drain नाही.

हे राज्य प्रायोजित cognitive asset laundering आहे.

आपण खर्च करून त्यांना घडवतो. पाश्चात्य देश ते “मन” विकत घेतात.

आणि आपल्याला मिळतं काय?

सुंदर पिचाईसोबत एक सेल्फी.

किंवा एखाद्या भारतीय CEO वर LinkedIn वर टाळ्या.

जर हे तेजस्वी मेंदू HAL, BHEL, Bharat Electronics चालवायला गेले असते तर?

आपण हा प्रश्न विचारत नाही.

कारण आतून आतून आपण अजूनही गुलाम आहोत—फक्त आता जास्त पगार मिळतो.

.

१९४७ पूर्वी आपण कापूस आणि हिरे निर्यात करत होतो.

आता आपण बुद्धिमत्ता निर्यात करतो.

आणि त्याचा उत्सव साजरा करतो.

.

का?

कारण आपण व्यक्तिगत यशाला राष्ट्रीय अभिमान समजतो.

.

मग धोरण कुठं आहे?

सरकारी पैशावर शिकणाऱ्यांसाठी ५ वर्षांची national service bond का नाही?

विदेशी MNC ना आपल्या राष्ट्रीय संस्थांतून भरती करायला परवानगी का?

जर त्यांनी भारताच्या मूलभूत क्षेत्रांत गुंतवणूक केली नाही तर?

का कुणी हे म्हणत नाही—बस्स!

.

एक National Brain Retention Plan तयार करा.

IIT नंतर भारताची सेवा करणं हा सन्मान बनवा, शिक्षा नाही.

.

हे Viksit Bharat नाही.

हे Outsourced Bharat आहे.

.
तुम्ही कर भरता.

तुम्ही त्यांची स्वप्नं घडवता.

ते दुसऱ्या देशाला घडवतात.

आणि जन्मभूमी टाळ्या वाजवत उभी राहते.

.

कुणी लिहलंय माहिती नाही, पण १००% बरोबर लिहलंय.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “प्रारब्ध…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “प्रारब्ध…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

केलेली कर्म ही केंव्हा ना केंव्हा भोगल्या शिवाय त्यातून सुटका नाही. म्हणून उगाच असं झालं, तसं झालं,असं करायला हवं होतं. मग असं झालं असतं. वगैरे, वगैरे  सगळं विसरा.

– –  कारण जे झालं  ते तसंच  होणार होतं. ते आपलंच पूर्वीचं  केलेलं कर्म आहे.

*

कंसाचा वध केल्यानंतर जेव्हा, श्री कृष्णाने, वसुदेव- देवकीची कारागृहातून सुटका केली तेव्हा देवकी त्याला म्हणाली,

“हे कृष्णा!! अरे तू स्वतः साक्षात् परमेश्वराचं रूप आहेस ना? तर मग तू कधीच कंसाचा वध करू शकत होतास…! मग कंसाला मारून आमची त्याच्या कैदेतून सुटका करायला तू चौदा वर्ष॔ का थांबलास?

यावर श्रीकृष्ण म्हणाले.

“माते, गेल्या जन्मात तू मला चौदा वर्षे वनवासात कां बरं पाठवलं होतंस?”

श्रीकृष्णांचं उत्तर ऐकून देवकीला धक्काच बसला.

देवकी म्हणाली मी?….अरे मी कधी तुला चौदा  वर्षं वनवासात पाठवलं  होतं….?_हे काय बोलतो आहेस तू….?

त्यावर कृष्ण भगवान म्हणाले,_

“माते  ही घटना  गतजन्मातली असल्यामुळे आता तुला त्यातलं काहीच आठवत नाही. पण गेल्या जन्मात तू कैकयी होतीस…आणि तूच मला चौदा वर्षांसाठी वनवासात पाठवलं होतंस.

हे ऐकून देवकीला धक्काच बसला, आणि तिने आश्चर्याने विचारलं,

“कृष्णा मी गेल्या जन्मातली कैकयी..? तर मग त्या जन्मातली कौसल्या कोण…?”

यावर श्रीकृष्ण हसून वदले,__

माता यशोदा म्हणजे गेल्या जन्मीची कौसल्या होय. जिला गेल्या जन्मात, माझी आई असूनही चौदा वर्षं पुत्रप्रेमाला पारखं व्हावं लागलं होतं.  तेच प्रेम तिला माझी माता म्हणून या जन्मी लाभलं…..आणि तुला पुत्र प्रेमाला पारख व्हावं लागलं.

“माते, प्रत्येकाला आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मांची फळं ही भोगावीच लागतात…..त्यातून देवांचीही सुटका होत नाही….!”

– – विचार करा मग आपण कां वाईट वाटून घ्यावं.? जे आहे ते भोगूनच संपवणे हे योग्य. कारण सुटका नाही….. ‘ गत जन्माची पापे. ती येती भोगरुपे…’

– – आणि भोग हे सोडूनच संपवावे लागतात.

श्रीकृष्ण:शरणं मम् ॥

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पण काहीतरी हरवलंय…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ “पण काहीतरी हरवलंय…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

(५ सप्टेंबर शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.. त्या निमित्ताने….)

कुणी लिहिलंय माहित नाही परंतु मनाला भिडलं आतून पोखरलं आणि एक अदृश्य कळ हृदयातून उठली.

तुम्हाला काय वाटतं?

नवीन मुलांना जाणवेल की नाही माहित नाही परंतु आम्हा वयस्कर लोकांना मात्र याचं वैशम्य नक्की वाटतं.

समजत नाही; पण काहीतरी हरवलंय…

साधंसं धोतर, नेहरू शर्ट, डोक्‍यावर टोपी…

नेहरू शर्टच्या खिशात पॉकेट डायरी, साधंसं पेन…

अशा व्यक्तिमत्त्वाचे गुरुजी दिसले की गावातली माणसं त्यांना आदरानं नमस्कार करायची.

“कसे आहात गुरुजी?’ वगैरे वास्तपुस्त व्हायची.

पोरं गुरुजींना पाहून धूम पळायची.

विटी-दांडू, गोट्या, रपाधपीचा कापडी चेंडू, गाडी गाडी करत फिरवले जात असलेले सायकलीचे जुने टायर अशा खेळांच्या साऱ्या जिनसा जागीच सोडून!

त्या वेळी सातवी पास असलं की गुरुजी म्हणून नोकरी लागायची.

काही शिक्षक तर कुग्राम म्हणावं अशा खेड्यात जाऊन शाळा सुरू करायचे.

गुरुजींची उपजीविका गावावर अवलंबून असायची.

नंतर जेमतेम पगार सुरू झाला. खर्च असा नव्हताच.

अगदी गावात असलेला एखादा मोकळा वाडाही गुरुजींना मोकळ्या मनानं उघडून दिला जायचा.

सांज-सकाळी कुणाच्याही मळ्यातून हिरव्या पालेभाज्या यायच्या.

गुरुजींच्या घराचा कोपरा कडधान्यांनी भरून जायचा.

निरशा दुधाचा मोफत रतीब असायचा.

गुरुजी ग्रामव्यवस्थेचे अविभाज्य घटक असायचे.

कुणाच्या घरी पत्र आलं की त्या घराला गुरुजींची आठवण व्हायची.

पोरगं विजार सावरत पळायचं आणि गुरुजींना घेऊन यायचं.

तोपर्यंत घरातला बाप्या अंगणात गोधडी टाकायचा.

कारभारीण चुलीत तुराट्या घालून चहाचं आधण ठेवायची.

गुरुजी येऊन पत्र वाचायचे.

थाळाभर चहा समोर यायचा.

मग अंधार पडेपर्यंत शिवारगप्पा सुरू व्हायच्या.

त्यातच जेवणाची वेळ व्हायची. गुरुजी उठू लागल्यावर बाप्याचा आग्रह सुरू व्हायचा.

कारभारीण दाराच्या आतून पदर सावरत आदरानं म्हणायची: “आता दोन घास खाऊनच जावा की गुरुजी!’ ते ‘नको नको’ म्हणत असतानाच काठवटीत भाकरीची थपथप सुरू व्हायची कंदिलाच्या गढूळ प्रकाशात…

खरपूस पापुद्रा आलेली बाजरीची गरमागरम भाकरी, खापराच्या तवलीतलं झणझणीत कोरड्यास, लसूण, मीठ, लाल मिरची घालून पाट्यावर रगडलेला भेळा, गाडग्यात मुरलेलं खारट लोणचं…या अन्नाला मायेची चव असायची.

तृप्त पोटानं गुरुजी उठायचे.

झोपेनं पेंगुळलेल्या पोराच्या डोक्‍यावर हात फिरवायचे.

बाप्या कंदील घेऊन उठत म्हणायचा: “अंधार हाय…गरमासाचे किरकुडे निघत्यात…चला घरला सोडून येतो.’

कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडासारखं ते स्निग्ध प्रेम पाहून गुरुजी भारावून जायचे.

***

गावात मुलीला पाहायला पाहुणे येण्यापासून तिचं लग्न लागेपर्यंत गुरुजींची महत्त्वाची भूमिका असायची.

दुखणं-पाखणं, अंत्यविधी, सणवार, प्रवचनं-कीर्तनं अशा प्रत्येक ठिकाणी सूत्रं गुरुजींकडंच असायची.

त्या काळी शाळा ही देवळात, एखाद्या मोकळ्या घरात, नाहीतर झाडाखाली भरायची.

खोडाला खिळा ठोकून त्याला लाकडी फळा लटकवला जायचा.

फळ्यावर पुसट उमटलेली अक्षरं विद्यार्थ्यांच्या मनावर मात्र गडदपणे उमटायची.

गावभर पाढ्यांचा, बाराखडीचा आवाज घुमायचा.

नंतर पत्र्याच्या, कौलाच्या इमारती झाल्या.

गुरुजींना शाळेच्या खर्चासाठी दोन रुपये “सादिल’ म्हणून मिळायचा.

डुगूडुगू हलणारं लाकडी टेबल, लांब बाकडं, रेकॉर्ड ठेवायला लाकडाची मोठी पेटी…

गुरुजी तीच पेटी खुर्ची म्हणून वापरायचे.

पालक तर ठार अडाणी.

पोरगं पहिलीत घालायचं तर जन्मतारीख माहीत नाही.

मग मुलगा सहा वर्षांचा झाला आहे किंवा कसं हे तपासण्यासाठी गुरुजी त्याचा एक हात डोक्‍यावरून विरुद्ध बाजूच्या कानाला लावायला सांगायचे.

हात कानाला लागला तरच पहिलीत प्रवेश!

नावाची-आडनावाची अशीच बोंब असायची.

शिंपी, लोहार, सुतार, कुंभार असे व्यवसाय असतील तर तेच आडनाव हजेरीवर लावलं जायचं.

आईनं पोराचं नाव दगड्या सांगितलं तर ते तसंच लिहावं लागायचं.

लिहिताना गुरुजींनी “दगड्या’चा उच्चार “दगडू’ असा केला तर त्याची आई म्हणायची: “दगड्याच लिवा. दगडू म्हणल्यावर त्यो भोकाड वाशितो’!

शाळेची घंटा म्हणजे रुळाचा तुटलेला तुकडा असायचा.

घणघण असा ओळखीचा आवाज गावभर घुमायचा.

वर्गात फरशी नसायची.

साधी जमीन.

आठवड्यातून एक दिवस वर्ग शेणानं सारवावा लागायचा.

गुरुजींचा आदेश आल्यावर आम्ही विद्यार्थी शेण गोळा करायला निघायचो.

नदीवरून बादल्या भरून आणण्याचं काम थोराड शरीराच्या मुलांकडं असायचं.

तोपर्यंत मुली परकरांचे ओचे-कोचे खोवून सारवण्याच्या तयारीत वर्गाच्या चारही कोपऱ्यांत बसलेल्या असायच्या.

एकंदर वर्ग सारवून घेणं हा आमच्यासाठी सोहळाच असायचा.

शाळा सुरू असताना काही पोरं गायब झाल्यावर ती पोरं कुठं गेली असतील ते गुरुजी अचूक ओळखायचे.

शर्ट-विजार ओली असेल तर मासे धरायला ओढ्याला…

करदोरा ओला असेल तर मुलगा नदीवर पोहून आलेला…

हाता-पायांवर ओरखडे असतील तर बोरीच्या झाडावर चढून बोरं खाऊन आलेला…

तोतरं बोलला तर बिबीची फुलं खाऊन आलेला…

हाता-पायांवर मोठाल्या लाल रेषा असतील तर कुणाच्या तरी शेतात शिरून ऊस तोडून खाऊन आलेला…

जीभ लालसर जांभळी असेल तर जांभळं खाऊन आलेला…

बोटात बारीक काटे असतील तर सबरीची बोंडं खाऊन आलेला…

तोंडाभोवती चिकटपणा असेल तर गुऱ्हाळात जाऊन गूळ खाऊन आलेला, हाता-पायांवर पांढुरका चिकटा असेल तर कुणाच्या तरी शेतात जाऊन हरभरा खाऊन आलेला…

अशा निरनिराळ्या खुणांवरून गुरुजी विद्यार्थ्यांची चोरी नेमकी पकडायचे.

गुरुजींनी बरोबर कसं ओळखलं म्हणून त्या वयात आम्हा विद्यार्थ्यांना अतोनात आश्‍चर्य वाटे.

शाळा अशा मजेत चालायच्या!

आम्हाला खाकी चड्डी आणि पांढरा सदरा असायचा.

अनेकांच्या चड्डीच्या मागच्या बाजूला कमी-जास्त मोठी असलेली आयताकृती ठिगळं असायची.

सदऱ्याचा पुढचा भाग फाटलेला म्हणून ते फाटलेलं झाकण्यासाठी पुढून शर्टिंग आणि मागचं चड्डीचं ठिगळ झाकण्यासाठी सदऱ्याचा मागचा भाग शर्टिंग न करता तसाच राहू दिला जायचा.

खतांच्या गोण्यांपासून दप्तराच्या पिशव्या शिवलेल्या असायच्या.

त्या खतांच्या कंपनीचे आम्ही विद्यार्थी चालते-बोलते प्रचारक होतो म्हणा ना!

अडचणी होत्या…

संकटं होती…

पण शिक्षण मात्र सकस होतं.

गुणवत्तापूर्ण होतं.

मात्र, गुणवत्तेच्या मूल्यमापनासाठी तेव्हा खंडीभर साधनं नव्हती.

डोक्‍यावर व्यवस्थेची जीवघेणी उतरंड नव्हती.

गुरुजींवर विश्वास होता.

***

काळ बदलला. समाज बदलला.

विद्यार्थी बदलले. गुरुजी बदलले.

सारवणाच्या जमिनी जाऊन फरश्‍या आल्या.

भिंती रंगल्या.

शाळा मेकअप केल्यासारख्या सजल्या…

देखण्या झाल्या!

संगणक आले.

शाळा डिजिटल झाल्या.

तंत्रज्ञानानं शिक्षण व्यापलं.

गुरुजींच्या खिशात डायरीऐवजी मोबाईल आले.

प्रोजेक्‍टरवर अभ्यासक्रम आला.

साऱ्याच कवितांना एकच सरकारी चाल पाहून मुलं बावरली.

हेडमास्तरांना बसायला देखणी खुर्ची आली; पण तिला असलेल्या अदृश्‍य काट्यांनी ते अस्वस्थ झाले.

मोठं टेबल आलं; पण ते अहवालाच्या कागदांनी गुदमरून गेलं.

पोरांच्या अंगावर इंग्लिश धाटणीचे ड्रेस आले.

शाळेला कंपाउंड आलं आणि गाव शाळेपासून दुरावत चाललं.

***

आता गावाचं गुरुजींवाचून काही अडत नाही.

वरून अफाट अनुदान येतं.

शाळेत पैसा आला: त्यामागं राजकारण आलं.

राजकारणामागं गाव आलं.

गावपुढारी शाळेत लक्ष घालू लागले.

आठवीपर्यंत कुणाला नापास करायचं नाही…

मुलांना मारलं तर गुरुजींना तुरुंगात टाकण्याच्या धमक्‍या सुरू झाल्या.

धाक, दरारा, भीती नष्ट झाली.

“आनंददायी’च्या नावाखाली जणू स्वैराचारच सुरू झाला.

कृतीपेक्षा प्रशिक्षणं जास्त झाली.

गुणवत्तेपेक्षा मूल्यमापनाची साधनं जास्त झाली,

शिक्षकांपेक्षा शिक्षणतज्ज्ञ जास्त झाले.

सारं काही जास्त झालं; पण नेमकं काहीतरी कमी असल्याचं जाणवू लागलं…

साऱ्या सुविधा असूनही शिक्षणव्यवस्थेत रितेपणा असल्याची भावना दाटून आली आहे…

भरल्या घरात एकटेपणा वाटावा तशी.

काय ते समजत नाही; पण काहीतरी हरवलंय…!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares