एकदा एक तरुण मुलगी एका संत महात्म्याकडे गेली आणि त्यांना आर्जवानं विनंती करत म्हणाली, “माझे बाबा गेले अनेक महिने आजारी असल्यानं त्यांना स्वतःहून काहीही हालचाल तर करता येत नाहीच, परंतु ते रुग्णशय्येला खिळून आहेत. तुम्ही एकदा येऊन त्यांना भेटाल का?”
“का नाही… ? नक्कीच येईन मी… ” करुणासागर असलेले संत उद्गारले.
त्या घरी भेट दिली असता, त्या संतांना असं दिसलं की रुग्णशय्येला खिळून असलेल्या त्या वृद्ध व्यक्तीच्या पलंगाशेजारी एक रिकामी खुर्चीही ठेवलेली आहे.
“तुम्ही कदाचित् मी येण्याचीच वाट पहात होता असं दिसतंय?” त्या खुर्चीकडे पहात संत म्हणाले.
“नाही… नाही… तसं नाहीये. ” वृद्ध व्यक्ती उद्गारली.
त्यानंतर ती वृद्ध व्यक्ती विनंतीच्या स्वरात म्हणाली, “हे महाराज! कृपया खोलीचं दार लावून घ्याल का?”
संतांनी दार बंद केल्यावर, वृद्ध व्यक्ती पुन्हा बोलू लागली, “खरं सांगायचं तर, या क्षणापर्यंत, मी या रिकाम्या खुर्चीचं रहस्य कोणापुढेही उघड केलेलं नाही… अगदी माझ्या लाडक्या मुलीलाही ते ठाऊक नाहीये. तुम्हाला म्हणून सांगतो, संपूर्ण आयुष्यभर, प्रार्थना कशी करतात ते मला कधीच समजलं नाही. नित्यनियमानं देवळात जाण्याचा परिपाठ कटाक्षानं पाळूनही मला प्रार्थनेचा खरा अर्थ कधी समजला नाही.
परंतु चारएक वर्षांपूर्वी माझा एक मित्र मला भेटायला आला असता, त्यानं मला सांगितलं की मी माझी प्रार्थना थेट परमेश्वरालाच सांगू शकतो. त्या मित्रानं मला सांगितलं की आपल्यासमोर एक रिकामी खुर्ची ठेवायची आणि तिथे प्रत्यक्ष परमेश्वरच स्थानापन्न झालेला आहे असं समजून समोर कोणी असताना आपण जसं त्या व्यक्तीशी संवाद साधतो ना तसाच संवाद खुर्चीत बसलेल्या परमेश्वराशी साधायचा. परमेश्वर आपली प्रत्येक प्रार्थना अगदी काळजीपूर्वकपणे ऐकत असतो. माझ्या मित्राचा हा सल्ला मी जसा जसा न चुकता पाळू लागलो तसा तसा तो मला अधिकच आवडू लागला. “
“त्यानंतर आता रोज दोन तास मी परमेश्वराशी गप्पा मारत असतो. मात्र, माझा हा संवाद माझ्या लेकीच्या दृष्टीला पडू नये याची मी दक्षताही घेत असतो, कारण जर एका रिकाम्या खुर्चीकडे पाहून मी गप्पा मारतोय असं तिनं पाहिलं तर तिचा गैरसमज होईल की आजारामुळे माझ्या डोक्यावर परिणाम झालाय. ”
त्या वृद्ध व्यक्तीचे हे शब्द ऐकून संतमहात्मा हेलावून गेले. प्रेम आणि भावनांचं मिश्रण असणारे अश्रू त्यांच्या डोळ्यातून वाहू लागले. आपल्या आश्रमात परतण्यापूर्वी संतांनी त्या वृद्ध व्यक्तीच्या माथ्यावर आपला वरदहस्त ठेवला आणि म्हणाले, “तुम्ही सर्वोच्च पातळीची भक्ती करत आहात. तुमच्या या साध्याभोळ्या भक्तीमधे खंड पडू देऊ नका. ”
पाच दिवसांनी, त्या वृद्ध व्यक्तीची मुलगी संतांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात गेली आणि वंदन करुन तिने त्यांना सांगितलं, “त्या दिवशी तुमच्याशी भेट झाल्यानं माझ्या बाबांना अत्यानंद झाला… पण काल सकाळी ते देवाघरी गेले.
त्या दिवशी मी कामासाठी निघण्यापूर्वी त्यांनी मला हाक मारली आणि मोठ्या प्रेमानं त्यांनी माझ्या कपाळावर ओठ टेकवले. यापूर्वी कधीही न दिसलेल्या एक प्रकारच्या आत्मिक आनंदानं आणि शांततेनं त्यांचा चेहरा न्हाऊन गेला होता. परंतु त्यांच्या डोळ्यात मात्र अश्रू होते. संध्याकाळी मी जेंव्हा घरी परतले, तेंव्हा एका अद्भुत दृश्यानं मी थक्क झाले – गेले काही महिने ज्यांना मदतीशिवाय स्वतःला कोणतीही हालचाल करता येत नव्हती, ते माझे बाबा पलंगात उठून बसलेले होते, परंतु त्यांचं मस्तक मात्र त्यांच्या पलंगाशेजारी ठेवलेल्या खुर्चीवर होतं… जणूकाही त्यांनी कोणाच्यातरी मांडीवर डोकं ठेवलंय. नेहमीप्रमाणे खुर्ची रिकामीच होती. जगाचा निरोप घेताना बाबांनी खुर्चीवर डोकं का बरं ठेवलेलं होतं याचं कृपया उत्तर मला द्याल का?”
त्या वृद्ध व्यक्तीच्या मृत्युची वार्ता ऐकून संतमहात्मा ढसाढसा रडू लागले आणि आपले दोन्ही हात आकाशाकडे उंचावून ते कळवळून परमेश्वराची प्रार्थना करु लागले, “हे प्रभू! जेंव्हा या जगाचा निरोप घेण्याचा माझा क्षण येईल ना तेंव्हा मीदेखील या मुलीच्या बाबांसारखाच निरोप घ्यावा एवढी कृपा माझ्यावर करा. ”
प्रभूच्या मांडीवर मस्तक ठेऊन जगाचा निरोप घ्यायचा असेल तर प्रत्येक क्षणी ‘तो’ सर्वत्र आहे हा विश्वास आधी निर्माण करता यायला हवा. असं ज्याला जमलं त्याला परमेश्वराचं प्रेम प्राप्त करणं अशक्य नाहीच आणि मानवीजन्माची हीच तर इतिकर्तव्यता आहे.
लेखक : अज्ञात
संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ सपने…– लेखक – श्री रवीन्द्र भूरे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
पार्ल्याची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला निघाली. मुलीच्या आग्रहाखातर मालाडला पॉश कॉम्लेक्समध्ये भाड्याने जागा घेतली. 36 मजल्याचे तीन टॉवर. नवीनच होती. त्यामुळे कमी लोक शिफ्ट झाली होती.
सकाळी फिरून येताना एक मुलगा गाडी पुसत होता. सुरेश …. बहुतेक यूपीचा असावा. त्याला म्हटले “ माझी गाडी पुसशील का ?” तो हो म्हणाला.
“पैसे किती घेशील ?”
तो …”. तुम्ही द्याल ते.” … अश्या वेळेस आपण नेहमी जास्तच देतो.
आता खूप लोक शिफ्ट होऊ लागली. गाड्याही वाढल्या. गाडी पुसणारी खूप मुले दिसू लागली.
सुरेशला म्हणालो… “ तुला कॉम्पिटिशन वाढली. ”
तो म्हणाला “ नाही, ही मुले मीच आणली, मीच कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि ह्यांना पगार देतो. ”
त्या भागात कबुतरे जास्त होती. एक दिवस एक कबुतर गॅलरीत मरून पडले. काय करावे कळेना. शेवटी सुरेशला बोलावले. त्याने ते उचलून नेले. दुसऱ्या दिवशी तो जाळी लावणाऱ्या माणसाला घेऊन आला. जाळी लावून घेतली
US ला जाताना वरून बॅग्स काढणे, आल्यावर परत वर ठेवणे … सर्व सुरेश करत होता. पंखे पुसणे, काचा पुसणे ही कामे त्याचीच झाली. मला फ्रोझन शोल्डरचा त्रास सुरु झाला. ड्रायविंग जमेना. एक दिवस सुरेशला म्हणालो.. “ ड्राइवर शोध “.. त्याने खिशातून काढून ड्रायव्हिंग लायसन्स दाखवले, मग तो वेळ असेल तेव्हा माझा ड्राइवर झाला. सकाळी एका माणसाला घेऊन आला…
“साहेब… हा चांगला मसाज करतो. आपल्या बिल्डिंग मध्ये बऱ्याच जणांकडे करतो, चांगला आहे.”
एक दिवस फिरून येताना गेटसमोर भाजीची गाडी दिसली. घरी आलो तर घरात भाजीची पिशवी.
बायको म्हणाली सुरेशने आणून दिली. त्याच्या भावानेच ती गाडी लावली आहे.
पार्ल्याची जागा तयार झाली. सुरेशला म्हटले “ घर साफ करायला चल “… गाडी तोच चालवत होता.
मी …” सुरेश काय नवीन ?”
सुरेश …”.. चायनीज फूडची गाडी टाकतोय … रात्री 11 ते 2 म्युनिसिपालिटी, पोलीस सर्वांची सोय केली आहे. आपल्या बिल्डिंगमध्ये एक पोलिटिकल लीडर राहतो.. त्याने मदत केलीये. साहेब एक सांगू..
ये बम्बई शहरमे कुछ सपने लेके आया हुं, वो पुरे करकेही रहुंगा…. माझे प्रिंसिपल एकच… कोणत्याही कामाला नाही म्हणायचे नाही … “
मध्ये 1 -2 वर्ष गेली. मुलगी US हुन येणार होती. बायको म्हणाली घर साफ करून घ्या. चांगल्या प्रोफेशनल लोकांकडून. मग गूगल सर्च करून एका प्रोफेशनल क्लीनर्सला फोन केला. काम आणि रेट ठरला. दुसऱ्या दिवशी बेल वाजली. दोन मुले मस्त युनिफॉर्म मध्ये आली. मला धक्काच बसला …. त्यातला एक सुरेश होता.
सुरेश…” साहेब ही माझीच कंपनी. मीच फॉर्म केली आहे. काम वाटताना तुमचा पत्ता बघितला म्हणून मी स्वतः च आलो. कामाची सवय मोडायची नाही …”
मला त्याचे शब्द आठवले …. “ सपने पूरे करकेही रहूँगा…. ”
मला त्याचे स्वप्न पुरे होताना दिसू लागले….
नाहीतर आम्ही मुंबईकर… भूमिपुत्र… आमची स्वप्नं तरी काय …
ते 5 नोकरी….
ट्रेन मध्ये बसायला चवथी सीट.. फार फार तर विंडो सीट
नाहीतर
एखादी वडा पावची गाडी…
☆
लेखक : रवींद्र भुरे
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ बावन पत्ते… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆
५२ पत्ते … या बद्दल आजवर वाईट किंवा फार तर टाईमपास एवढेच आपण सर्वांनी ऐकले किंवा पाहिले असेल. पत्त्यांचा खेळ म्हटला, की तो जुगाराचा खेळ वाटतो आणि खेळणारा जुगारी वाटतो ह्या पलीकडे आपल्याकडे माहिती नाही… म्हणजे यापलीकडे आपण विचारही करत नाही. पण त्यापलीकडे पत्त्यांविषयी खूप काहीही जाणून घेण्यासारखे आहे………
पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुठ्ठ्याचे किंवा प्लॅस्टिकचे बनविलेले असतात.
बदाम, इस्पिक, किलवर (किल्वर) आणि चौकट. या चार प्रकारात प्रत्येकी 13 पत्ते मिळून 52 पत्त्याचा संच होतो. पत्त्याची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दशीपर्यन्त, गुलाम, राणी, राजा याशिवाय 2 जोकर असतात. तर…….
1) हे 52 पत्ते म्हणजे 52 आठवडे.
2) 4 प्रकारचे पत्ते म्हणजे 4 ऋतू….. प्रत्येक ऋतू चे 13 आठवडे.
3) या सर्व पत्त्याची बेरीज 364
4) एक जोकर धरला तर 365 म्हणजे 1 वर्ष.
5) 2 जोकर धरले तर 366 म्हणजे लीप वर्ष.
6) 52 पत्यातील 12 चित्र पत्ते. म्हणजे 12 महिने
7) लाल आणि काळा रंग म्हणजे दिवस आणि रात्र.
पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ
1) दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश.
2) तिर्री म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश
3) चौकी म्हणजे चार वेद (अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद)
4) पंजी म्हणजे पंच प्राण (प्राण, अपान, व्यान, उदान, समान)
मित्रांनो, लहानपणा पासून पत्ते बघितले असतील. काहींनी खेळले असतील; परंतु त्या पत्त्यांच्या संचाबद्दल माहिती होती का ?
त्याचे उत्तर बहुदा नाहीच असेल. आहे ना गंमतीशीर आणि ज्ञानदायी.
पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते!!!
नवरा बायको — पहिली पिढी
2) मुलं (सख्खी भावण्डं) — दुसरी पिढी —आई वडलांकडून 50%-50% chromosome मिळतात. 50% गुणसूत्रे share करतात.
3) तिसरी पिढी — नातवंडे — पहिली पिढी म्हणजे आजी आजोबांची 25% गुणसूत्रे share करतात.
4) चौथी पिढी — पहिल्या पिढीचे 12. 5% गुणसूत्रे share करतात.
5) पाचवी पिढी — पहिल्या पिढीचे 6. 25% गुणसूत्रे share करतात.
6) सहावी पिढी — पहिल्या पिढीचे 3. 12 % गुणसूत्रे share करतात.
7) सातवी पिढी — पहिल्या पिढीचे 1. 56% chromosome share करतात.
8) आठवी पिढी —पहिल्या पिढीचे < 1% share गुणसूत्रे करतात.
म्हणून मूळ पुरुष, जोडप्यापासून सातव्या पिढीपर्यंत नातं, भाऊबंदकी मानतात. नात्यात म्हणजे सातव्या पिढीपर्यंत विवाह निषिद्ध मानतात. विवाह केल्यास जन्यजात गुणसूत्रीय आजारांची शक्यता असते. अनेक समाजात मामाच्या मुलीशी विवाह करतात. पण धार्मिक/ वैज्ञानिक दृष्टीने निषिद्ध आहे.
आठव्या पिढीपासून नातं, भाऊबंदकी मानत नाहीत.
म्हणून पती-पत्नी चं नातं हे सातजन्मांचं मानतात. सात जन्मं हे नातं टिकतं.
तीन पिढ्या सपिंड मानतात. तीन ते सात पिढ्या सपिण्ड नव्हे पण भाऊबंदकी मानतात.
आणि सात पिढ्यांनंतर नातं संपुष्टात येतं, पण सगोत्र राहतात. !!!
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(‘थिंक पॉझिटिव्ह’ नावाचा एक दिवाळी अंक आज लायब्ररीत हाती आला.. आणि याची थीम आहे “एकटेपणा”. पूर्ण अंक याच विषयाला वाहिलेला आहे. या दिवाळी अंकातील “एकटेपणातून बाहेर येण्याचा रियाज!” हा श्री ऐश्वर्य पाटेकर यांचा लेख वाचनात आला. सदर लेखक हे पहिल्या युवा साहित्य अकादमी पुरस्काराचे मानकरी आहेत आणि त्यांची ‘भुईशास्त्र’ आणि ‘जू’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या लेखातील एक सुंदर भाग खाली देत आहे…)
“मला आमच्या इथं गावातील बियावाल्या बाईची गोष्ट आठवते. बियावाली बाई. सतत बिया गोळा करत असायची. म्हणजे तेच तिचं आयुष्यभराचं काम होऊन गेलं होतं. जिथे बी खोचली तिथं झाड उभं राहायचं. हा तिचा हात गुण होता की झाडा-कोडावरची माया? माहित नाही.
मी तिला माझ्या लहान वयापासून पहात आलो. ती सारखी बिया गोळा करायची. तिने पेरलेल्या बियांमधून किती झाडे उगवून आली, याची मोजदाद कशी करणार? अगणित झाडं. ज्या झाडाकडे बोट दाखवलं ते झाड बियावाल्या बाईनेच लावलेलं असायचं. म्हणजे तसं पाहायला गेलं तर उगवून आलेल्या एकूण एक झाडांवर तिची मालकी होती. पण तिने तशी कुठल्याच झाडावर मालकी सांगितली नाही.
बियावाल्या बाईला मूलबाळ काही झालं नाही. त्याचेही तिला कधी काही वाटलं नाही. तिला एकदा आई म्हणाली होती, “आत्याबाई, तुम्हाला मुलबाळ झाले असतं तर आता नातू-पणतू तुमच्या अंगाखांद्यावर खेळले असते!”
तेव्हा तिचे उत्तर होतं, “नाही झालं तेच बरं! नाहीतर ही झाडा-कोडाची पोरं कुणी सांभाळली असती ?”
“कसा जन्म जावा ओ आत्याबाई तुमचा ?”
तेव्हा ही बिया वाली बाई म्हणाली, “जसा तुझा भाकरी थापत थापत जाणार तसा माझी झाडे लावता लावता! हा आता मला सांग तुझ्या भाकरी कुणी मोजल्या का ? माझी झाडं मात्र मोजली जातात. तुला काय वाटलं मला मुलाची आस नव्हती ? होती गं.. पार झुरणीला लागले होते. त्यावेळेला माझी आत्या आली मदतीला धावून. तिलाही मूलबाळ नव्हतं. तिने मला एक बी दिली. म्हणाली, “आपली कूस आपण नाही उजवू शकत मात्र मातीची तर उजवू शकतो ना… !”
दिलेली बी जेव्हा मी आळ्यात लावली तर चौथ्या-पाचव्या दिवशी मातीवर आलेला हिरवा पोपटी कोंब पाहून मी हरकले. जणू मीच बाळंत झाले. मग नादच लागला.. अन् तसही, किती लेकरा बाळावाल्या आया बाया होत्या माझ्या भवतीच्या. पण आज त्या एकट्याच उरल्या. मी तरी माझ्या झाडांसोबत आहे. माझ्या या लेकरा बाळांना पाय नाहीत, हे एका अर्थी बरंच झालं. ! त्यामुळे ते मला एकटीला सोडून नाही जाऊ शकत. “
खूप अंतर्मुख केलं बियावाल्या बाईंच्या या छोट्याश्या कथेने. वर उल्लेखलेल्या बियावाल्या बाईंना अशिक्षित, अडाणी कसं म्हणायचं ? एकटेपणाच्या जाळ्यात सापडू नये यासाठी तीन सूत्र नकळत आपल्या वागण्यातून देऊन जातात त्या…
पाहिलं सूत्र म्हणजे, “आपल्यातील पॅशन ओळखा, त्यात व्यस्त रहा. ”
दुसरं, “आपलं दुःख कुरवाळणं थांबवून, जे आहे त्यातही माझ्या दृष्टीने कसं चांगलंच होतंय असा दृष्टिकोन ठेवा. “
आणि तिसरं, खूप महत्वाचे सूत्र म्हणजे, “आपण लावलेल्या झाडांवर कधीही आपली मालकी सांगू नका, थोडक्यात, detach राहायला शिका, दुसऱ्यांसाठी काही करण्याची सेवावृत्ती अंगी असू द्या. “
लेखक : ऐश्वर्य पाटकर
संग्राहक : अज्ञात
प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘सोनागाची’मधील दुर्गा – –… लेखक : श्री समीर गायकवाड ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे☆
कोलकता येथील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार हत्या प्रकरणी बंगालमधील वेश्यांनी घेतलेली भूमिका ऐतिहासिक आहे! किंबहुना सामान्यांचे डोळे उघडणारी आहे! कथित सभ्य सामान्य माणसं या स्त्रियांपासून अंतर राखतात मात्र जेव्हाही कुठला महत्वाचा सामाजिक प्रश्न उद्भवतो तेव्हा या स्त्रिया त्यात उडी घेतात हा आजवरचा अनुभव आहे.
पीडितेला न्याय मिळावा म्हणून बंगालमधील वेश्यांनी मोर्चात सहभाग नोंदवला! यावेळी त्यांच्या हातात काही घोषणाफलक होते त्यावर लिहिलं होतं की,
प्रयोजने आमादे काचे आशून, किंतू नारी के धारशन कोरबे ना!
প্রয়োজনে আমাদের কাছে আসুন, কিন্তু নারীকে ধর্ষণ করবেন না।
.. याचा अर्थ असा आहे – तुम्हाला जर इतकीच गरज पडत असेल तर आमच्याकडे या, परंतु कुठल्या स्त्रीवर बलात्कार करू नका!
याच अनुषंगाने या माता भगिनींनी त्यांच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे ज्याची वंगभूमीमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे! याची माहिती घेण्याआधी दुर्गापूजेचा इतिहास जाणून घेणं अनिवार्य ठरतं!
सोनागाची हा कोलकत्यातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठा रेड लाइट एरिया आहे. या परिसराला इतिहास आहे. याचा एक पैलू धार्मिक आहे जो थेट दुर्गामातेशी संबंधित आहे! कोलकत्यात दुर्गापूजा उत्सवास सुरु होण्याच्या विशिष्ठ तिथी आहेत. त्या त्या दिवशी ते ते विधी पार पाडले जातात, कुंभारवाड्यात (बंगाली भाषेत कुंमारतुली) दुर्गामूर्ती बनवण्यास प्रारंभ करण्याचा दिवस दरसाली जाहीर होतो, त्याच दिवशी मूर्तीच्या निर्मितीस प्रारंभ होतो. मूर्तीसाठी दहा ठिकाणाहुन माती आणली जाते, तिचे पुण्यमाटी आणि निषिद्ध माटी असे दोन भाग पडतात. पुण्यमाटी मध्ये शेण असलेली माती, गोमूत्र असलेली माती, गंगेच्या काठची माती, कुंभाराच्या अंगणातली माती, देवालयातली माती, पर्वतातली माती इत्यादींचा समावेश होतो तर निषिद्ध मातीमध्ये वेश्यांच्या अंगणातल्या मातीचा समावेश होतो. या मातीला निषिद्ध म्हटलं गेलं असलं तरीही जोवर ही माती आणली जात नाही तोवर मूर्तीच्या निर्मितीस प्रारंभ होत नाही. शस्त्रसज्ज दहा भुजा असलेली दुर्गेची मूर्ती वेश्येच्या अंगणातल्या मातीशिवाय बनत नाही हे सत्य आहे आणि तो तिथला रिवाज झाला आहे. या मागची धारणा काय असावी याचं विश्लेषण करताना जाणकारांत मतभेद आहेत. पैकीचे दोनच महत्वाचे मुद्दे येथे मांडतोय.
वेश्यांकडे पुरुष जातात तेंव्हा त्यांच्या मनात नेमकं काय वादळ उठत असावं यावर आधारित पहिला विचार आहे. यानुसार जेंव्हा एखादा पुरुष वेश्येकडे जातो तेंव्हा त्याच्या मनातले सर्व विचार, वलय त्याने बाहेर टाकलेले असतात, वासना आणि देहविचार यांच्या बळावर तो तिच्या घरात शिरतो. म्हणजेच तो जेंव्हा तिच्या घरात शिरतो तेंव्हा त्याच्या मनात शून्य विचार असतात. त्यामुळेच त्याची पावलं पडलेली माती घेतली जाते ज्यात पुरुषाच्या मनात अन्य भावना नसतात. हे मत मला मान्य नाही, पण या मताला दुजोरा देणारे अनेक बंगाली पंडीत आहेत.
दुसरं एक मत आहे त्यानुसार दुर्गा आणि महिषासुर यांचं जेंव्हा युद्ध झालं होतं तेंव्हा त्यानं तिचं चारित्र्यभंग करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात तो यशस्वी ठरला नाही आणि शिवाय तो तिच्याकडून हरला देखील. दुर्गेच्या सर्व रूपांची पूजा होते पण तिच्या मलिन होऊ घातलेल्या रूपाची पूजा होत नाही, भलेही हे स्वरूप निषिद्ध असले तरी त्यातही एक देवांश आहेच हे कसे नाकारता येईल? मग आज ज्या स्त्रियांच्या वाट्यास हे भोग आलेले आहेत त्यांच्या अंगणातली माती आणल्याशिवाय संपूर्णत्व कसे येईल! या धारणांना अनुसरून तिथली माती आणली जाते नि मगच पहिली दुर्गा साकारते मग अन्य मूर्तिकार त्यांच्या प्रांगणात दुर्गा मूर्तीच्या निर्मितीत गुंततात हा तिथला रिवाज आहे!
तर यंदाच्या वर्षी सोनागाचीमधील भगिनींनी दुर्गेच्या निर्मितीसाठी आपल्या अंगणातली माती देण्यास नकार दिला आहे! एकीकडे स्त्रियांचे शोषण होतेय, दुसरीकडे सरकारे आवश्यक ती पावले उचलत नाहीत आणि यांचे शोषण तर अहोरात्र जारी आहे! मग स्त्रियांना न्याय नसेल तर निव्वळ दुर्गापूजा करून काय साध्य होणार आहे हा त्यांचा सवाल आहे!
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवताः हा श्लोक आपल्याकडे लोकप्रिय समजला जातो! स्त्रिया केवळ या श्लोकापुरत्या उरल्या आहेत का? वास्तवात त्या शौकासाठी उरल्यात की काय असे वाटण्याजोगी स्थिती आहे! याच मुद्द्याला अनुसरून सोनागाचीतील स्त्रियांनी हा निर्णय घेतला आहे.
दरबार ही सोनागाचीमधली सर्वात मोठी एनजीओ आहे. वीस हजार वेश्या भगिनी या एनजीओच्या सदस्य आहेत. यांची स्वतंत्र बँक देखील आहे, वैद्यकीय सेवाही आहे. शाळा काढण्याचा त्यांचा मानस आहे. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे वेश्यांनी वेश्यांसाठी चालवलेली एनजीओ अशी याची व्याख्या करता येईल. कालच दरबार’ची बैठक बोलवण्यात आली होती नि त्यात हा निर्णय घेण्यात आलाय. विशेष बाब म्हणजे कालीघाट ते सोनागाची आणि खिदीरपूर या परिसरात अनेक घरगुती नृत्यशाळा आहेत. या पूर्ण परिसरात जितके दुर्गा पंडाल आहेत त्यांना सरकार अनुदान देतं. गतसाली हे अनुदान ७०००० रुपये होतं यंदा सरकारने ८५००० रुपये अनुदान देऊ केलंय. पण या झुंजार स्त्रियांनी ते नाकारले आहे आणि आपला आवाज बुलंद केला आहे!
या स्त्री सोशल मीडियावर नाहीत. यांना समाज तिरस्काराने पाहतो, समाज यांची हेटाळणी करतो! सामाजिक मांडणीच्या उतरंडीत या सर्वात खाली आहेत. यांचं अफाट शोषण होतं! तरीही त्या सामाजिक लढ्यात हिरिरीने उतरतात, त्या बदल्यात समाजाकडून त्यांची एकच अपेक्षा असते ती म्हणजे किमान माणूस म्हणून तरी त्यांच्याकडे पहिले जावे! ही अपेक्षाही त्या कधी समोर येऊन मांडत नाहीत! जिवंत कलेवरं असणाऱ्या शोषित स्त्रिया आपला आवाज बुलंद करतात. त्या उलट आपण काय करतो हा प्रश्न हरेकाने स्वतःला विचारला पाहिजे!
सोनागाचीमधील माता-भगिनींचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो ! 💐
त्यांच्यातल्या दुर्गेला अभिवादन करतो !🙏
लेखक : श्री समीर गायकवाड
संग्रहिका : डॉ. भारती माटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “OUTLET – –.” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
☆
… लाखो जीव घेणार्या क्रूर “हिटलरने” शेवटी आत्महत्या केली !.
सुंदर विचार देणारे साने गुरुजी आत्मघात करुन घेतात.
मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे “स्वामी विज्ञानानंद” मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात.
आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे “ भैय्युजी महाराज ” आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.
पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही “सुशांत सिंग राजपुतनं” नैराश्यातून आत्महत्या केली.
आणि आता सहा आठ महिन्यांपूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या “शीतल (आमटे) करजगी” आपलं जीवन संपवतात.
आजची नागपूरची बातमी उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरूच्या पत्नी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या केली.
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आपल्या डोक्यावर सुमारे १८० कोटी रुपयांचे कर्ज झाल्यामुळे नितीन देसाई यांनी आत्महत्या केली.
– – या काही सेलिब्रिटींच्या उदाहरणातून काय शिकायचं आपण?……..
पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरून शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी करावे लागणारे त्याचे कष्ट फक्त त्यालाच माहित असतात.
माणुस वर वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही. त्याच्या मनात वेगळी खळबळ असु शकते, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी काय.. ? वर सुंदर ताजमहाल असला तरी खाली कबरच आहे हे विसरुन चालणार नाही.
भय्यूजी महाराजांनीआत्महत्या केल्यानंतर ABP माझा चॅनलने एक परिचर्चा घडवून आणली होती. त्यात बोलताना भय्यूजी महाराजांचे मित्र – श्री. अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. “ भैय्यूजी महाराज ” स्वतः एक “ अध्यात्मिक गुरू होते.. परंतू ते एक व्यक्ती पण होते. आपल्या मनातील स्ट्रेस बाहेर काढायला त्याच्या जवळ outlet नव्हता. डॉ. शितल आमटे (बाबा आमटे यांची नात – त्याचंही अगदी भैय्यु महाराजासारखं झाले.)
इतकं महत्वाचं असतं का हे outlet? …. तर होय.
कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी विशाल धरण बांधलं आणि समजा त्याला outletच दिले नाही तर काय होईल? निश्चितच धरण फुटेल. इतकं महत्वाचं असते हे waste weir
… मानवी शरीर म्हणजे विविध पंचतत्वापासून सांधलेलं एक धरणच आहे. या शरीरात समस्यांची आवक अति प्रमाणात झाली तर हे शरीर रूपी धरण फुटेल की राहील?
मुंबई का तुंबते? कारण पुरेसे outlets राहिले नाहीत
म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचे outlet वापरून आपल्या समस्या आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंर्तमनाचं outlet open करण्यासाठी meditation चा अवलंब करा आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं outlet म्हणजे आपले डोळे, ते उघडा. फुटून जाऊ द्या अश्रूंचा बांध… वाहून जाऊ द्या.. स्ट्रेस, दुःख, उपेक्षा….. पिस्तुलाच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा.. हे केव्हाही सोपं नाही का?
म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. मन मोकळं करा. बेस्ट outlet परिवार आणि मित्र!