मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ मनातलं भावविश्व – लेखिका – सुश्री ज्योती जोशी ☆ परिचय – सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

 

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ मनातलं भावविश्व – लेखिका – सुश्री ज्योती जोशी ☆ परिचय – सौ. दीपा नारायण पुजारी ☆

पुस्तक परिचय

पुस्तक : मनातलं भावविश्व 

लेखिका – सौ. ज्योती जोशी

प्रकाशिका – विद्या अनिल फडके

मनोरमा प्रकाशन

पृष्ठे -२००

किंमत -३८०/-

लेखिका सौ. ज्योती जोशी यांचं हे पहिलंच पुस्तक. एका गृहिणीनं आपल्या मनात येणारे विचार कागदावर उतरवावेत, त्या विचारांना ललितलेखांचं रुप लाभावं आणि त्या ललितलेखांना पुस्तकाची बांधणी लाभावी ही एक सुंदर स्वप्नसाखळी आहे, नाही का? पण मनोरमा प्रकाशनानं हे स्वप्नं साकार केलं आणि संग्रही ठेवावं असं हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आलं. श्री. भरत जाधव यांच्या कुंचल्यातून साकारलेलं मुखपृष्ठ लक्षवेधक आहे. लेखिकेच्या मनातला साकुरासारखा बहरलेला वृक्ष, गुलाबी फुलांचे घोस, संथ वाहणारी नदी, उगवता सूर्य या पार्श्वभूमीवर स्वतःतच मग्न असणारी कुणी ‘ती’ – – हे चित्र तिच्या मनातलं विश्व या पुस्तकात उलगडलं आहे याची खात्री देते.

पन्नास लेखांचं हे तसं छोटेखानी पुस्तक. सहज हातात घ्यावं आणि मनात येईल ते पान उघडावं आणि वाचावं. सलग वाचण्याचं बंधन नसल्यानं कधीही, कसंही वाचता येतं. मनोगतात लेखिका म्हणते, “मनोगत म्हणजे सुखाचं प्रसरण आणि दु:खाचं नि:सरण. लेखिकेचं स्वतःचं एक परीघ आहे. सर्वसामान्य स्रियांप्रमाणे तिचं कुटुंब हे तिचं विश्व आहे. या विश्वातील भावभावना, यातील आनंद, दु:ख नाती या सगळ्यांनी तिच्या मनात फेर धरला आहे. हा भावनिक फेर शब्दबद्ध होऊन लेखात उतरलेला दिसतो. तसंच बाहेरच्या विश्वातील अनुभवही तिला बोलतं करतात, लिहितं करतात. या पुस्तकातील अनुभव काठावर उभं राहून घेतलेले नसून लेखिका ते अनुभव, ते क्षण सजगतेनं जगली आहे.

‘वटपौर्णिमा’ या पहिल्याच लेखात क्षणोक्षणी येणारे अनुभव लेखिकेला कशी चेतना देतात याचं वर्णन वाचकांच्या मनाचा ठाव घेतं. क्षण क्षणिक न राहता तिच्या मुठीत कसे सामावतात याची गंमत वाटते तसेच लेखिकेच्या विचारांची आंदोलनं आपल्यापर्यंत तितक्याचं तीव्रतेने पोचतात. शब्द लालित्यिबरोबर तिला असलेलं सामाजिक भानही वाचताना लक्षात आल्या वाचून रहात नाही. मोकळा श्वास या लेखात तिचं हे सामाजिक भान चांगलंच जाणवतं. श्रद्धा, अंधश्रद्धा या कल्पना झुगारून देऊन तिच्यातली माणुसकी तिला एका ट्युमर झालेल्या जोगतिणीला जटा कापून ऑपरेशनसाठी राजी करते तेव्हा तिच्या जाणिवा कशा सजग आहेत हे लक्षात येतं. निव्वळ शब्द वापरून जागे व्हा असं म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करणं जास्त आव्हानात्मक आहे. हे आव्हान ती सहजपणे पेलते.

‘सखा ग्रीष्म’ हा लेख वाचताना लेखिकेचं वेगळेपण लक्षात येतं. ग्रीष्म तिचा सखा आहे, तो तिला आवडतो, इथंच तिचा दृष्टिकोन समजतो. ग्रीष्म ऋतूतील नयनमनोहर निसर्ग तिला खुणावतो, ऋतुचक्रातील या ऋतुचं अनन्य साधारण महत्त्व सांगताना ती रणरणत्या दुपारकडं बघण्याची सकारात्मक दृष्टी देते.

बालपणाशी, आई वडिलांशी, आत्या, काकू अशा नातेवाईकांशी तिची जुळलेली नाळ सुद्धा या लेखातून जाणता येते. ’उंटावरचाशहाणा’, ‘गोदाक्का’ ही काही उदाहरणं देता येतील.

‘दिवाळी, होळी’, या सारख्या सणांच्या लेखातून आपलं आत्मभान कसं जागृत झालं याविषयी बोलते. स्वतःतल्या ‘मी’ ला शोधणं, षड्रिपुंना जिंकण्याचा प्रयत्न करणं, यांसारख्या प्रयत्नांविषयी वाचताना कौतुक वाटतं.

कर्तव्यदक्ष गृहिणी म्हणून वावरताना ती स्वतःतल्या कलाकारला जागं ठेवते. संगीत आणि चित्रकला या कलांची आवड जोपासणारी ही लेखिका तिच्या कलाकार रुपात लेखात भेटत राहते. ’रंगसंवेदना’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, ‘संगीत कला’ अशा काही लेखांचा उल्लेख येथे करावासा वाटतो. पण कलाकाराचं मन कमी अधिक प्रमाणात सगळ्याच लेखातून आपल्या भेटीला येतं. त्यामुळंच सर्जनशील, संवेदनक्षम व्यक्तिमत्त्व वेगवेगळ्या लेखातून व्यक्त झालेलं आढळतं. ‘कलाबाई कला शोधतेय’ म्हणत जीवनाचा आनंद देणारे सूर कोणते हे सहज सांगून जाते. संगीतामुळं संस्कार होतात. तसंच संगीत ही एक थेरपी आहे. शब्दांवर सुरांचे संस्कार झाले की गाणं बनतं. ते गाणं ह्रदयापासून गायलं की आत्मशोधाचा मार्ग सापडतो. विविध रंगांनी आयुष्याचं इंद्रधनु रंगवताना काळ्या रंगातलं रंग सौंदर्य उलगडून दाखवते. पांढऱ्या रंगाची शुभ्र फुलं आणि पांढरे पीस यातून विरक्तीचा रंग देखील सौंदर्यानं खुलू शकतो हे सांगते. रंगांचं महत्त्व सांगताना गाण्यांचे दाखले दिले आहेत. लेखिकेची गाण्यांबरोबरची मैत्री या सगळ्या लेखांमधून जाणवत राहते. सुरांप्रमाणेच शब्दही तरल, लयदार, ठेका घेत, विविध विषय आळवत गिरक्या घेत वाचकांपर्यंत पोहचतात. ’हे सुरांनो चंद्र व्हा’ या लेखात पुन्हा एकदा लेखिकेचे हे सुर आपल्याला भेटतात.

बायकांची खरेदी हा मुळातच थट्टेचा विषय. या विषयावर लिहिताना खरेदीचा टेम्पो आल्यावर बायका कशी टेम्पो भरून खरेदी करतात हे रंजक करून ‘गोडुला’ ‘वरकमाई’या लेखात मांडले आहे. परदेश प्रवासात सुद्धा बॅगा भरभरून, जास्तीची बॅग विकत घेऊन खरेदी करतील पण शॉपिंगचा हव्यास सुटणार नाही हे सत्य खुमासदार शैलीत विषय मांडणी करून सांगितले आहे.

मोती पोवळे सोडून ‘शाळीग्राम’ निवडणारी, मैत्रीचा ‘स्मृतीगंध’ जपणारी, भूतकाळात न रमता वर्तमानातलं वास्तव स्विकारणारी, भारतीय संस्कृतीचा सार्थ अभिमान असणारी, मोनालिसाच्या चित्रातलं तिचं सौंदर्यापेक्षा तिला तिच्या चेहऱ्यावरचं हास्य जास्त विचारप्रणव बनवतं. लडाखच्या पहाडी रागाचे सूर कानावर पडत असताना, ज्ञानेश्वरांच्या अभंगात, भक्तीरंगात रंगणारी अशी वेगवेगळ्या रुपात लेखिका भेटत राहते. आपण तिच्या भावविश्वाशी हळूहळू तद्रुप होत जातो.

– – असे हे भावस्पर्शी पुस्तक रसिकांनी आवर्जून वाचावे असेच आहे.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

फोन नं : 9665669148 ईमेल : deepapujari57@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “इतिहासातील प्राणिविश्व… (भाग १ व २)” – लेखक : श्री महेश तेंडुलकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “इतिहासातील प्राणिविश्व… (भाग १ व २)” – लेखक : श्री महेश तेंडुलकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : “इतिहासातील प्राणिविश्व…” (भाग १ व २)

लेखक : श्री महेश तेंडुलकर

पृष्ठे : अनुक्रमे ३४३ व ३३२

मूल्य : प्रत्येकी ३६०/- रुपये दोन्ही पुस्तकांचे एकूण मूल्य: ७२०/- रुपये

आगळेवेगळे ऐतिहासिक पुस्तक ☆

भाग – १

या भागात ७० लेख आहेत.

बादशहा-सुलतानांच्या राजे-रजवाड्यांच्या किंवा सत्तासंघर्षात, मोहिमांत आणि जीवनशैलीत प्राण्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे.

रणभूमीवरील लष्करी डावपेच असोत, प्रत्यक्ष लष्करी हालचाली असोत, शत्रूला गाठण्यासाठी लांबवरच्या मजला पार करायच्या असोत, नाहीतर युद्धाची गतिमानता वाढवणे असो-घोडदळाशिवाय हे शक्य नाही.

हजारो शत्रुसैनिकांची फळीच्या फळी उद्ध्वस्त करून निर्णायक विजय प्राप्त करण्यासाठी सोंडांना धारदार शस्त्रे लावलेल्या गजदळाशिवाय पर्याय नाही.

कच्छ व राजस्थानसारख्या उष्ण हवामान असलेल्या वाळवंटी प्रदेशातून जलदगतीने मजला पार करून शत्रुसैन्यावर अचानक हल्ला चढवण्यासाठी उंटांसारख्या वाळवंटातील जहाजांना पर्याय नाही.

प्रत्यक्ष रणभूमीवर दारूगोळ्याचे गाडे, अवजड तोफा ओढून आणून सैनिकांना मदत करणारी गाढवे-खेचरे किंवा सैन्यातील सरदारांचे सामानसुमान, कापडी तंबू, धान्य, गवत, जनानखाना वगैरे शेकडो कोस ओढत नेणारे ओझ्याचे बैल आणि प्रसंगी सैनिकांच्या पोटातील भूक भागवण्यासाठी प्राणार्पण करणारे कित्येक प्राणी यांचे इतिहासातील योगदान नाकारणे योग्य आहे का ?

या निष्पाप जीवांना स्वतःच्या स्वार्थासाठी वापरून घेणारे राज्यकर्ते व त्यांचे सरदार यांच्यावर ग्रंथ लिहिले गेले. परंतु अबुल फजलचा अपवाद वगळता असे किती ग्रंथकार होते की, ज्यांनी प्राण्यांच्या आयुष्यावर इतक्या तपशिलाने लिहिलेले आहे? ही कमतरता दूर करण्यासाठी व प्राण्यांच्यासंबंधी इतरही ऐतिहासिक माहिती मिळवण्यासाठी ‘इतिहासातील प्राणिविश्व’ हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

भाग – २

या भागात ७८ लेख आहेत.

राज्यकर्ते पशू-पक्ष्यांचा उपयोग फक्त रणभूमीपुरता मर्यादित ठेवत नव्हते. महत्त्वाच्या व मोठ्या व्यक्तींना ते भेट देणे व त्यांच्याकडून तशा भेटी घेणे ही एकेकाळची पद्धतच होती. मग त्यात तो प्राणी पाळीव असो किंवा जंगली असो देणाऱ्याला व घेणाऱ्याला त्याचा फारसा फरक पडत नसे.

त्यामुळे साताऱ्याचे शाहूमहाराज, पुण्याचे पेशवे, सांगलीचे पटवर्धन यांचे शिकारखाने निर्माण झाले. मुघल बादशहा अकबराचा शिकारखाना तर ‘महा’ हा शब्ददेखील तोकडा पडेल इतका मोठा व नानाविध जातींच्या, रंगांच्या व आकाराच्या पशू-पक्ष्यांनी समृद्ध होता. त्यात हजारो हत्ती, घोडे, चित्ते, उंट अन् शेकडो हरणे, पक्षी, बेडूक वगैरे होते. अकबराची हौस मोठी दांडगी होती. त्याने या प्राण्यांची उत्तम बडदास्त ठेवलेली होती. त्याकरिता हजारो लोक रात्रंदिवस राबत होते, करोडो रुपये खर्च केले जात होते, तरीसुद्धा अकबराची ‘आणखी’ची भावना काही केल्या जात नव्हती. अकबर पशू-पक्षी जसा बाळगायचा तसाच तो त्यांची शिकारही करायचा.

शाहू छत्रपती, पेशवे व पटवर्धन हेदेखील पशू-पक्ष्यांचा मोठा संग्रह बाळगायचे आणि त्या छंदातूनच शिकारखाने आकार घ्यायला सुरुवात करायचे. त्यांचे किस्से, व्यवस्था, नोंदी वगैरेंचा अंतर्भाव ‘इतिहासातील प्राणिविश्व’ या पुस्तकात आहे.

या पुस्तकात हत्तीपासून ते अगदी बेडूक-मुंगळ्यांपर्यंत सर्वांचे इतिहासात जिथे संदर्भमिळाले ते एकत्र करून ७० विषयांवर लेखन केलेले आहे. हत्ती हे श्रीमंतीचे लक्षण मानले जाई. तसेच राजेरजवाडे, सरदार, मुत्सद्दी, अमीर उमराव वगैरे धनाढ्य व मातब्बर लोकांचे ते वाहनही होते अन् करमणुकीचे साधनही होतेच. त्यामुळे या महाकाय प्राण्याची दखल अगदी सम्राट अकबरापासून ते सांगलीच्या अप्पासाहेब पटवर्धनांपर्यंत सर्वांना घ्यावी लागलेली होती. हत्ती हा प्राणी वाटतो तितका शांत, निरुपद्रवी वगैरे काही नाही, हे त्याच्या उपद्रवकथा वाचल्यानंतर लक्षात येते. त्याच्यात जसे गुण आहेत तसेच अवगुणही आहेत. पण मानवाने त्याच्यातील गुणदोषांचा उपयोग स्वतःच्या स्वार्थाकरिता कसा करून घेतला हे लढाऊ हत्तींच्या किश्शांवरून लक्षात येते. मराठ्यांच्या सैन्यात हत्ती होते, पण ज्याला गजदळ म्हणतात ते नव्हते. उलट मुघलांच्या फौजेत गजदळाला फार महत्त्व प्राप्त झाले होते, किंबहुना लढाऊ हत्ती शत्रुसैन्यावर सोडून त्यांची दाणादाण उडवण्याचा तो रामबाण उपाय होता. चोखंदळ वाचकांना सैन्यातील लढाऊ हत्तींचे गजदळ कसे होते, कशा पद्धतीने त्याचा वापर केला जात असे वगैरेची कल्पना यावी म्हणून इतिहासातील अनेक प्रसंग संदर्भासह या पुस्तकात दिलेले आहेत. घोडा व उंट यांच्यासारखे जलदगतीने धावणारे प्राणीसुद्धा माणसाने सोडलेले नाहीत. त्यांनाही त्याने आपली वाहने बनवली. वेगवेगळ्या प्राण्यांच्या शिकारीच्या पद्धती, गाढवाचा नांगर किंवा इतिहासातील घोरपड प्राणी की साधन याबद्दल विस्तृत विवेचन दिलेले आहे. तसेच हत्ती, उंट, चित्ते, शिकारखाने यांचा सरंजाम, सेवकवर्ग, आहार, वगैरे बाबींचाही या पुस्तकात समावेश केलेला आहे. वन्यजीवनाच्या रक्षणार्थ नानासाहेब पेशव्यांना लिहिलेली दोन पत्रेही यात समाविष्ट केली आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर माणसाच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याकरिता वेगवेगळ्या प्राण्यांनी दिलेल्या योगदानाचा हा आढावा आहे. तो माहितीपूर्ण आहे, त्यांत रंजकता आहे, नुसताच तलवारींचा खणखणाट अन् तोफा-बंदुकांचा दणदणाट नाही, तर त्याला लढाऊ हत्तीच्या आक्रमकतेची जोड लाभलेली आहे. सम्राट अकबरासारख्या राज्यकर्त्यांच्या कल्पकतेची साथ लाभलेली आहे, पेशवे व पटवर्धन यांच्या ऐश्वर्याची झलक दिसत आहे.

— — 

लेखक महेश तेंडुलकर यांचे मनोगत – – 

इतिहास व प्राणी यांचे एक वेगळेच नाते या पुस्तकाच्याद्वारे उलगडण्याचा मी प्रयत्न केला आहे. हा विषय नवा आहे, विषयाची मांडणीही नवी आहे आणि विषयातील माहितीसुद्धा बरीचशी नवीन आहे. त्यामुळे इतिहासप्रेमी, पक्षिप्रेमी, प्राणिमित्र इत्यादी प्रेमळ मंडळी या पुस्तकाचे जोरदार स्वागत करतील अशी अपेक्षा बाळगतो.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ रंग हळव्या मनाचे- लेखक – श्री दीपक तांबोळी ☆ परिचय – श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ रंग हळव्या मनाचे- लेखक – श्री दीपक तांबोळी ☆ परिचय – श्री मकरंद पिंपुटकर ☆

पुस्तक : रंग हळव्या मनाचे

लेखक : श्री दीपक तांबोळी

प्रकाशक : अथर्व पब्लिकेशन्स 

पृष्ठ: १३६ 

मूल्य: ₹ १६० 

दीपक तांबोळी या सिद्धहस्त लेखकाचा आणखी एक कथासंग्रह हाती आला – “रंग हळव्या मनाचे”. आणि त्यांच्या याच पुस्तकातील “बदल” या कथेत म्हटल्याप्रमाणे, एकापाठोपाठ एक – सगळ्याच कथा अधाश्यासारख्या वाचून काढल्या. काही कथा व्हॉट्सअप वा फेसबुकवर आधीच वाचलेल्या – आजही परत वाचताना तेवढ्याच फ्रेश, तेवढ्याच नितांतसुंदर पुन:प्रत्ययाचा आनंद देणाऱ्या, तर काही पहिल्यांदाच भेटीला आलेल्या.

दीपकजींच्या कथांचं वैशिष्ट्य हे की या कथा तुमच्या माझ्या घरात घडतात.

मुलांनी शिकून सवरून परदेशी जाणं – तिथेच स्थायिक होणं, वृद्ध आई वडिलांना परदेशात न करमणं, आणि मग त्यातून आई वडील आणि पुढच्या पिढीची होणारी तगमग हे सांगणारी कथा, स्वार्थी भावंडं, पत्नीच्या निधनानंतर पक्षाघाताने असहाय्य झालेले वडील आणि सज्जन भाऊ / मुलगा यांच्यातली मानसिक ओढाताण याची कथा, आपण भोगलेल्या हालअपेष्टा मुलांना सोसायला लागू नयेत, यासाठी खपणारे आई वडील, त्यासाठी प्रसंगी मुलांना थोडी जास्तच सूट देणारे आई वडील आणि ती मुलं यांचा प्रवास, घरात धुणीभांडी करणारी बाई, तिचा दारुडा नवरा, त्यांची चुणचुणीत हुशार मुलगी – आणि या मुलीने शिकावं म्हणून आग्रह धरणारा त्या मोलकरणीचा पोशिंदा, मध्यमवर्गीय घर, नेहमीचीच आर्थिक ओढाताण, त्यामुळे कायमच साध्या साध्या अपेक्षांवरतीही सोडावे लागणारे पाणी आणि त्यातून नवरा बायको मुलं यांच्यात होणारे वाद, विवाद आणि विसंवाद वंशाचा मतिमंद दिवा आणि दोन मुली, पत्नीच्या निधनानंतर मुलांची आबाळ होऊ नये म्हणून वडिलांचा दुसरा लग्न करायला नकार, काय होते या मुलांचे आणि वडिलांचे पुढे – त्याची कथा सुरेल आवाजाची देणगी लाभलेली परंतु शारीरिक व्यंग असणारी धाकटी बहीण, मतलबी आणि स्वार्थी मोठी बहीण, मध्यमवर्गीय आई वडील आणि त्यांचा आयुष्यातील चढउतार.

एका लग्नप्रसंगी शाळेतल्या बेंच पार्टनरची पुन्हा झालेली भेट, त्यातला एक जण यशाच्या पायऱ्या चढत गेलेला क्लास वन ऑफिसर म्हणून रिटायर झालेला, खाऊन पिऊन श्रीमंत आणि दुसरा “ए फॉर एप्पल, बी फॉर बाल” म्हणणारा शालेय शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेला. दोघेही शाळेनंतर पहिल्यांदाच भेटतात आणि आपापल्या जीवन प्रवासाची तुलना करतात ती कथा….

कथानकातील पात्रांच्या आयुष्यातील अडचणी दीपकजी खूप रंगवत नेतात, यातून त्यांची कशी सुटका होणार ही उत्कंठा आपल्याला लागून राहते, पण तितक्याच कौशल्याने, निरगाठ उकल तंत्राने ते कथेचा (बहुतेक वेळा) सुखान्त करतात, they live happily ever after, आणि आपलाही जीव भांड्यात पडतो.

माझी फिल्लमबाजी या स्टँड अप शोमध्ये शिरीष कणेकर म्हणायचे की भोवतालच्या आयुष्यात इतक्या कटकटी आहेत, इतके त्रास आहेत, इतका अंधकार दाटलेला आहे की निदान चित्रपटाच्या आभासी दुनियामध्येतरी सच्चाईचा विजय होताना, हिरो जिंकताना बघताना आपण आपल्या मनाचे समाधान करून घेतो, आपल्याला आनंद होतो.

दीपकजींच्या पुस्तकांचे तसंच आहे, त्यांची पुस्तकं वाचून आपल्या मनात एक आशावाद जिवंत राहतो की जसा या कथांमध्ये सत्याचा विजय होतो, तसंच आपल्याही आयुष्यात काहीतरी छान घडेल, आपण मेहनत मात्र घेतली पाहिजे.

मनाला उभारी देणाऱ्या “चिकन सूप फॉर सोल” च्या तोडीस तोड दीपकजींची “रंग हळव्या मनाचे” सहित सर्वच पुस्तकं आवर्जून वाचलीच पाहिजेत.

परिचय –  श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “इग्नाइट युअर इनर पॉवर” – इंग्रजी लेखिका : प्रीती पाठक – अनुवाद : आरती देवगावकर  ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “इग्नाइट युअर इनर पॉवर” – इंग्रजी लेखिका : प्रीती पाठक – अनुवाद : आरती देवगावकर  ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : इग्नाइट युवर इनर पॉवर

लेखिका : प्रीती पाठक 

अनुवाद : आरती देवगांवकर 

पृष्ठ: २४४

मूल्य: ३५०₹ 

“ इग्नाइट युवर इनर पॉवर “ या पुस्तकाचे वेगळेपण म्हणजे…. लेखिका प्रीतीचे 4A सजगता प्रारूप हे चार स्तंभांवर आधारित आहे :—

जागरूक राहा,

स्वीकारा,

कृती करा,

आणि सुधारणा करा.

आपण बहुतेक वेळा आपल्या भावना, संवेदना आणि दृष्टिकोनांकडे दुर्लक्ष करतो. भावनांबद्दल सजग राहणे ही गोष्ट आपल्याला आपण अनुभवत असलेल्या भावना आणि संवेदना किंवा आपण विकसित केलेल्या दृष्टिकोनांबद्दल जागरूक होण्यास मदत करते. जागरुकता आपले मन स्वीकारशील बनवते. आपल्याला काय, का आणि कसे वाटते, याचा स्वीकार करण्याऐवजी ते नाकारण्याकडे आपला कल असतो. त्यामुळे आपली नव्वद टक्के लढाई स्वतःशीच असते. पण आपल्या भावनांचा स्वीकार करून, आपण सकारात्मक त्वरित कृतीसह आपल्या समस्यांवर मात करण्यासाठी आणि आपले आयुष्य सुधारण्यासाठी स्वतला सक्षम कसे बनवू शकतो.. हे या पुस्तकातून सहजतेने समजू शकेल.

प्रीती त्यांच्या सोप्या आणि सुस्पष्ट शैलीत आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावनिक आरोग्यावरील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतात. जीवनाच्या विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींनी सांगितलेल्या प्रेरणादायी केस स्टडीजने या पुस्तकाचे वाचन मनोरंजक झाले आहे. त्याचे तपशील असे — 

१. अहंकार : व्यंकटेश श्रीनिवासन यांची केस स्टडी

२. संवाद : तारा वर्मा सेनगुप्ता यांची केस स्टडी

३. आत्मविश्वास किश्वर नेन्सी यांची केस स्टडी 

४. मूल्ये: व्यंकटेश श्रीनिवासन यांची केस स्टडी 

५. विश्वास : ग्रुप कॅप्टन डी. पी. आपटे (निवृत्त) यांची केस स्टडी 

६. आदर: डॉ. रचना यांची केस स्टडी 

७. धैर्य : रिषी वोहरा यांची केस स्टडी 

८. प्रेरणा : सुमिती टंडन यांची केस स्टडी

९. शिस्त : खुशबू जैन टिब्रेवाला यांची केस स्टडी 

१०. राग : खुशबू जैन टिब्रेवाला यांची केस स्टडी 

११. भीती : ग्रँडमास्टर विदित गुजराती यांची केस स्टडी

१२. टीका : तारा वर्मा सेनगुप्ता यांची केस स्टडी

१३. मत्सर: रजनी अरुणकुमार यांची केस स्टडी

१४. जजमेंटल असणे तारा वर्मा सेनगुप्ता यांची केस स्टडी

१५. स्वामित्वदर्शक स्वभाव रजनी अरुणकुमार यांची केस स्टडी

१६. प्रेम: रिषी वोहरा यांची केस स्टडी

१७. द्वेष : दिलीप आर्य यांची केस स्टडी

१८. असुरक्षितता : अनिल वोहरा यांची केस स्टडी

१९. करुणा: किरण मनरल यांची केस स्टडी

२०. क्षमा अनिल वोहरा यांची केस स्टडी

२१. अनुभूती: संगीता दासगुप्ता यांची केस स्टडी

२२. मदत : प्रमोद तानवडे यांची केस स्टडी

२३. अवलंबून असणे अमृता ए. वीर यांची केस स्टडी

२४. विकास : अनिल वोहरा यांची केस स्टडी

२५. समुपदेशन : प्रमोद तानवडे यांची केस स्टडी

२६. संतुलित भावना: ग्रँडमास्टर विदित गुजराती यांची केस स्टडी

२७. तणावमुक्त जगणे: ग्रँडमास्टर विदित गुजराती यांची केस स्टडी

२८. समग्र राहणीमान डॉ. कृती मरोळी यांची केस स्टडी

पुस्तकावरील अभिप्राय — 

१. इग्नाइट युवर इनर पॉवर : जागरूकतेने जगण्याची कला’ हा चार प्रभावी पाय-यांमध्ये जागरूकतेचा सराव करून सशक्त जीवन जगण्यासाठी अत्यंत उपयुक्त ग्रंथ आहे.

– शिवी वर्मा, संपादक, लाईफ पॉझिटिव्ह

२. इग्नाइट युवर इनर पॉवर : जागरूकतेने जगण्याची कला’ ही एक उत्कृष्ट कलाकृती आहे. प्रीती तिच्या अनोख्या शैलीत आनंदी आणि अर्थपूर्ण जीवनाचे साधे सार प्रकाशात आणते.

– दिलीप आर्य, अभिनेता

तुमची आंतरिक शक्ती प्रज्वलित करा… ही मनापासून जगण्याची कला आहे … तिचा रोजचा सराव मात्र करायला हवा 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “हुंकार काळजाचा” – (कविता-संग्रह) – कवयित्री : डॉ. शैलजा करोडे – परिचय : कवी / गझलकार अ. के. शेख ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “हुंकार काळजाचा” – (कविता-संग्रह) – कवयित्री : डॉ. शैलजा करोडे – परिचय : कवी / गझलकार अ. के. शेख ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

पुस्तक : हुंकार काळजाचा – (कविता-संग्रह) 

कवयित्री : डॉ शैलजा करोडे

प्रकाशक : अभिनंदन प्रकाशन कोल्हापूर

पृष्ठसंख्या 200

मूल्य ₹ 440

जेष्ठ कवयित्री शैलजा करोडे यांचा ” हुंकार काळजाचा ” या नावाचा कविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला. त्या नेरूळच्या आहेत. अभिनंदन प्रकाशन कोल्हापूरने हा संग्रह प्रकाशित केला आहे. या संग्रहात 100 कविता आहेत आणि 200 पानांच्या या संग्रहाचे मूल्य आहे रू. 440. मॅडमच्या नावावर पुष्कळशी ग्रंथसंपदा असून हे त्यांचे 21 वे पुस्तक आहे.

आपल्या पहिल्याच कवितेत त्या म्हणतात.

नभावरी खुलतसे इंद्रधनूची कमान

बांधियले कोणी असे नभी मंगल तोरण

अशा निसर्ग वर्णनाच्या कविता तर आहेतच त्याचबरोबर माणसाला आधार देणार्‍याही कविता आहेत, पाहा

जावे संकटा सामोरे मन करूनीया धीट

दुःखानेच कळत असे गोडी सुखाची अवीट

या संग्रहात अशा संस्कारी, प्रासादिक आणि मनाला भावणार्‍या कविता आहेत. जेव्हा उत्कट भावनांना त्यांचे विचार व विचारांना त्यांचे शब्द गवसतात तेव्हा कवितेचा जन्म होतो. या भावनांचे प्रकटीकरण जितक्या तीव्रतेने होते, तेवढा त्याचा कलात्मक आनंदही उंचीवरचा आणि वेगळा. केवळ दर्द नव्हे तर भावनांचा कल्लोळ व्यक्त करण्याची क्षमता कवीच्या ठायी असणे आणि त्यासाठी प्रज्ञेचीही जोड मिळणे, या गोष्टी निर्मिती प्रक्रीयेत महत्वाच्या ठरतात. मग लेखणीही लिहायला आतुर होते. पाहा—

“लेखणी माझी बनते कधी रसाळ मधुर

जणू ओघळते त्यातून दिव्य अमृताची धार”

कवितेचा भवतालाशी त्यातील घडामोडींशी, त्यातील अंतर्गत ताण तणावाशी संबंध असतोच. हे ताण तणावही निर्मिती प्रक्रीयेत महत्वाची भूमिका बजावतात. कवी लिहितांना कवी एका अद् भुताच्या प्रदेशातील सफरीवर निघतो. तिथे आधी कितीतरी वेळा जाऊन आलेले असतांनाही त्याला अनेकदा आधी अनुभवलेलेच पुन्हा गवसते, एका नव्या रूपाने. त्यामुळे व्यक्त होणार्‍या कवितेला अनेक पदर सुटतात. ज्याला जो भावेल तो त्याचा पदर. कोणाही रसिकाला कलेपासून मिळणारा आनंद घेण्याची क्षमता साध्य असावी लागते.

“कुणीतरी हवं असतं मन रितं करायला

हळव्या मनावरती फुंकर घालायला”

यातील सर्व कविता या अशाच आपल्या अवती भवतीच्या विषयांवरच्याच आहेत. त्यामुळे त्या आपल्या वाटतात. “आई कुठे काय करते” म्हटले की आपली आई आठवते. दिवसभर राब राबूनही तिला काय काम करते सांगता येत नाही. असेच सर्व विषय साध्या सोप्या शब्दात मांडलेले आहेत. विशेष म्हणजे या कविता सुबोध आहेत, दुर्बोध नाहीत. सहजच त्या सांगून जातात.

“दया करूणा मनी वसू द्या सफल होईल हा मानवजन्म

समाधान वसेल अंतःकरणी कशाला हवा पुनर्जन्म”

काळाच्या ओघात कविता ही कवीच्या जगण्याचा, सुखदुःखाचा किंवा त्याच्या अस्तित्वाचा एक अविभाज्य हिस्सा बनून जाते. कारण ती कवीच्या जीवनाच्या समृद्ध अनुभवातून, चिंतनातून निर्माण होत असते. हा संग्रह आणि त्यातील कविता अशाच आहेत. त्यामध्ये मानवी मनाच्या विविध पैलूंचे यथार्थ चित्रण प्रतिबिंबित होतांना दिसते. तसेच या कवयित्री नुसत्या कविता लिहिणार्‍या नव्हेत तर कविता जगणार्‍या कवयित्री आहेत. पाहा

“एक कप तो चहाचा वाढवी मैत्रीतील दृढता

गप्पा टप्पा समवेत आस्वाद चहाचा घेता” 

चहाची जशी त्यांना गोडी आहे, तशा त्या रसिकही आहेत.

“कमलदलासम उमलती 

अलगद तुझी ओठ कळी

रूप तुझे न्याहाळतो 

मम दोही नेत्रकमळी”

अशा या 101 कविता लयबद्ध आहेत. त्यात चाराक्षरी, पष्टाक्षरी, अष्टाक्षरी दशाक्षरी अशा रचना आहेत आणि त्या सर्व रसिकांना आवडतील अशाच आहेत. तर हा सग्रह घ्या, वाचा, आनंद लुटा.

“विश्वास ठेवण्यास शिका, विश्वासाने जगा

माणुसकी धर्म मोठा, विसरा सारा त्रागा”

परिचय : कवी / गझलकार अ. के. शेख, पनवेल

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “सेवा समर्पण” – संपादन : सुश्री निवेदिता भिडे – अनुवाद : सुश्री सुनीता करकरे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “सेवा समर्पण” – संपादन : सुश्री निवेदिता भिडे – अनुवाद : सुश्री सुनीता करकरे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : सेवा समर्पण

 (सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक पुस्तक)

संपादन : सुश्री निवेदिता भिडे 

अनुवाद : सुश्री सुनीता करकरे

प्रकाशक : विवेकानंद केंद्र

पृष्ठे : ४००

मूल्य : ३००/- रुपये

सेवा समर्पण आध्यात्मिक जीवनाची साधना – – – 

कन्याकुमारी येथे विवेकानंद शिला स्मारक बघण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण जाऊन आले असतील. त्या शिला स्मारकाचे सर्व काम विवेकानंद केंद्रातर्फे पाहिले जाते.

१९७२ मध्ये स्थापन झालेल्या विवेकानंद केंद्रातर्फे देशभरात संस्कारवर्ग, योग प्रशिक्षण, शाळा असे अनेक प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक कार्य केले जाते.

विवेकानंद केंद्राचे संस्थापक मा. एकनाथजी रानडे यांनी केंद्राच्या पूर्णकालीन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ४० दिवसांची व्याख्यान-माला घेतली होती. त्या व्याख्यानमालेचे हे पुस्तकरूपी संकलन आहे.

हे पुस्तक फक्त विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांनी वाचावे असे नाही, तर कोणत्याही सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाचावे, एवढे महत्त्वपूर्ण आहे.

या पुस्तकात चार भाग आहेत. या चार भागांमध्ये ३० लेखांचा समावेश आहे.

१) आध्यात्मिक जीवनासाठी तयारी या भागात दोन लेख आहेत.

२) जीवनाचा प्रवासः स्वार्थाकडून निःस्वार्थतेकडे: या भागात नऊ लेख आहेत.

३) अध्यात्मप्रेरित सेवा संघटना या भागात आठ लेख आहेत.

४) संघटकांची साधना या भागात ११ लेख आहेत.

जीवनाच्या उषःकाली आपल्या जीवनाची योजना बनवता येणे ही मोठीच दैवी देणगी होय. आपल्यासमोर काही उद्दिष्ट नसेल, गंतव्यस्थान निश्चित केलेले नसेल, ध्येय निश्चित नसेल, तर आपण क्षणिक जीवन जगत असतो.

आपण शेकडो गोष्टी करू शकतो, पण त्यातील फक्त एकाचीच निवड करून ती गोष्ट कार्यवाहीत आणण्यासाठी, त्याचा योग्य तो आराखडा तयार करावा लागेल. त्या उद्दिष्टाच्या रोखाने व्यवस्थित वाटचाल सुरू केली, की स्वतःमधील अनेक सुप्त गुण आपल्या लक्षात येतील.

आकलनशक्ती, विचारातील लवचिकता, स्वतःवरील विश्वास, आत्मविश्वास असेल, तर वाटेल ते अडथळे येवोत, त्या अडथळ्यांवर मात करून आपण आपल्या ध्येयाप्रत निश्चित पोहोचू शकू.

आपल्या आयुष्यातील केवळ काही वर्षांचा कृतिशील वेळ आपल्याला मिळतो. तेवढ्या अवधीत आपले नियोजित रचनात्मक कार्य पूर्ण करावयाचे आहे. सांघिक वृत्तीने कार्य करीत असताना संकुचित मनोवृत्तीचे कवच भेदून स्थिरपणे, भयरहित, अविचलपणे कार्यरत असताना जरी अपयश आल्यासारखे वाटले, तरी निराशा किंवा उदासीनता येण्याचे कारणच नाही.

स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘तेच फक्त जगतात, जे दुसऱ्यासाठी जगतात. इतर सारे जगत असूनही मृतप्राय होत. दुसऱ्यासाठी जगणं म्हणजे काय, तर आपला वेळ आणि शक्ती इतरांसाठी खर्ची टाकणं. ‘

…… म्हणजेच ‘सेवा समर्पण’!

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “कर्ता – करविता…. आधुनिक मेंदूसंशोधन व आपले जीवन” – लेखिका : सुश्री अनिता देशमुख / सुश्री राजश्री क्षीरसागर -परिचय : श्री रमेश पानसे ☆ प्रस्तुती –  श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “कर्ता – करविता…. आधुनिक मेंदूसंशोधन व आपले जीवन” – लेखिका : सुश्री अनिता देशमुख / सुश्री राजश्री क्षीरसागर –परिचय : श्री रमेश पानसे ☆ प्रस्तुती –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक :  कर्ता – करविता…. आधुनिक मेंदूसंशोधन व आपले जीवन

लेखिका : सुश्री अनिता देशमुख, सुश्री राजश्री क्षीरसागर.

प्रकाशक : अर्थविज्ञानवर्धिनी 

पृष्ठ:२४२

मूल्य: ५००₹ 

आधुनिक मेंदू संशोधन आणि त्याचा आपल्या जीवनाच्या विविध अंगांशी असलेला, शास्त्रांमध्ये नव्याने प्रस्थापित होत असलेला संबंध दाखवून देण्यासाठी ‘कर्ता-करविता’ या पुस्तकाची रचना केली. या अगदी नवीन अशा विषयाचे स्वागत मराठी वाचकांनी उत्तमरीत्या केले. पहिली आवृत्तीही खूप लवकर संपली. मध्यंतरी बराच काळ हवे असूनही, मागणी करणा-यांना हे पुस्तक उपलब्ध होत नव्हते. यामुळे, भारतीय अर्थविज्ञानवर्धिनीने याची दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला.

विसाव्या शतकाच्या अखेरचे दशक हे मेदूसंशोधन दशक म्हणून गौरविले गेले आहे. आता तर, मेंदूसंशोधनाचे दशक संपूनही दहा वर्षे होऊन गेली आहेत. या गेल्या दहा वर्षांमध्ये, मेंदूविषयक संशोधन वेगाने पुढे सरकले आहे. मेंदूची रचना आणि मेंदूची कार्ये अधिक खोलवरू न अभ्यासण्याचा प्रयत्न चालला आहे. या अभ्यासांचे निष्कर्ष आणि त्यावर आधारित अशी मानवी जीवनाची आणखी खोलवरचे पदर उलगडणारी भाकिते हा अलीकडच्या काळातील शास्त्रीय वाङ्मयातील वाढता पसारा आहे. मज्जाविषयक संशोधनांनी इतर अनेक सामाजिक शास्त्रांवर आणि त्यांमधील अभ्यासांवर प्रभाव टाकलेला आहे. मेंदू अधिकाधिक उलगडत चालल्यामुळे एका अर्थी माणूसच उलगडत चालला आहे. माणसाचे विचार, माणसाचे वर्तन, माणसाच्या भावना आणि माणसांचे परस्पर सामाजिक संबंध यांच्या संदर्भातील काही कारणमीमांसा मेंदूशास्त्राच्या आधारे करणे शक्य होत आहे. त्यामुळे या दिशेने सामाजिक शास्त्रांमध्ये नवे काही घडू लागले आहे.

या पुस्तकाच्या २००६ साली झालेल्या प्रकाशनानंतर दखल घ्यावी अशी एक गोष्ट शिक्षणाच्या क्षेत्रात घडून येत आहे. एकीकडे मेंदूआधारित शिक्षणाच्या तंत्र-मंत्राचा प्रसार होत असतानाच, शिक्षक घडविणा-या प्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये, आधुनिक मेंदूसंशोधन व त्याचे शैक्षणिक पर्यवसान सांगणा-या अभ्यास घटकाचा समावेश करण्यात आला आहे. शिक्षणाला योग्य दिशेने नेणारीच ही घटना आहे. जिज्ञासू वाचकांप्रमाणेच, या घटनेशी संबंधित असणा-या शिक्षण महाविद्यालयांना, त्यांमधील शिक्षक व विद्यार्थी यांना यामुळेच ‘कर्ता-करविता’ हे पुस्तक अधिक नेमकेपणाने उपयुक्त ठरणारे आहे.

अनुक्रमणिका :

  • आपण आणि आपला मेंदू डॉ. ह. वि सरदेसाई
  • क्रांतिकारक मेंदूसंशोधन : रमेश पानसे

इतिहास व उत्क्रांती

१. मेंदूची उत्क्रांती

२ असा आहे आपला मेंदू

३ व्यक्तिमत्व व जनुकांचे कार्य

जडणघडण

४ गर्भावस्थेतील जडणघडण

५ बालमेंदू संगोपन

६ भाषाशिक्षणाचा उगम

७ बुद्धिवर्धक आहार

विचारनिर्मिती

८ भावनांची निर्मिती

९ हातवारे-हावभाव आणि विचार

१० मूक अभिनयातून भाषेची उत्क्रांती

११ विचारनिर्मिती

१२ होल ब्रेन थिंकिंग

१३ कलानिर्मिती

शिक्षण

१४ बहुविध बुद्धिमत्ता

१५ नादलहरींच्या हिंदोळ्यावर

१६ मेंदूसंशोधन व शिक्षण

जैविक घड्याळाचे केंद्र

१७ जैविक घड्याळ

१८ जनुकीय आजार

१९ चेहरे ओळखण्याचे केंद्र

२० संप्रेरकामुळे येणारे स्थूलत्व

२१ व्यायाम वाढवी मेंदूची कार्यक्षमता

२२ बुद्धिमान पक्षी

जाणिवांच्या शोधात…

२३ जाणिवांचे विज्ञान

२४ जाणिवांचा उगम

२५ ध्यानधारणेतील मेंदूसंशोधन

२६ श्रध्देला मरण का नाही?

कृत्रिम बुद्धिमत्ता

२७ कृत्रिम बुद्धिमत्तेकडे…

२८ ग्लोबल ब्रेन

(अनुक्रमणिकेवरून या पुस्तकाच्या विषयाची व्याप्ती लक्षात यावी म्हणून तिचा समावेश परिचयात केला आहे.)

परिचय : श्री रमेश पानसे

प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “दशक्रिया” – लेखक: बाबा भांड  ☆ परिचय –  श्री अ. ल. देशपांडे ☆

श्री अ. ल. देशपांडे

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “दशक्रिया” – लेखक: बाबा भांड  ☆ परिचय –  श्री अ. ल. देशपांडे ☆ 

पुस्तक : दशक्रिया 

लेखक : बाबा भांड 

किंमत : रु २३० 

पृष्ठ संख्या : २१६ 

प्रकाशक : साकेत प्रकाशन 

बरेच दिवसानंतर एक छान, गावकुसातील लहान सहान परंतू महान या श्रेणीतील घटनांचा अंतर्कल्लोळ ऐकायला मिळाला, वाचायला मिळाला.

श्री बाबा भांड

(महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सन्माननीय अध्यक्षपद भूषविलेले श्री बाबा भांड हे प्रसिद्ध लेखक पण आहेत . त्यांच्या दशक्रिया ह्या कादंबरीवर सिनेमा पण निघाला आहे.!)

पैठण पुष्य-नगरीचे घाट, घाटावरील बारीक सारीक घडामोडी, मानवी जगण्याच्या संवेद‌ना, आगतिकता, अपरिहार्यता, सामाजिक भान, परस्परांचे हित जपत जपतच जगू शकण्याचे भान, सामाजिक विषमतेचा पट घट्ट विणलेली परिस्थिति, त्याचा भेद न करू शकलेले वर्तमान, सामान्यांची, अतिसामान्यांची दैनंदिन जगरहाठीत होत असलेली ससेहोलपट, उगवलेला दिवस केंव्हा मावळतो हेच असहाय्यपणे पहाणारे मानवी जीव, किरवंत म्हणूनच जीवन जगण्याचे नशिबी आलेले रोबोट सदृश्य निराकार चेहऱ्यावरील भाव उडून गेलेले जीव, एकेकाळचे समृद्ध, संपन्न, उन्मादाने जीवन जगलेल्या सावकारांच्या नशिबी आलेले भिक्षापात्र, परंपरेने भाळी आलेले क्रिया-कर्म करण्याशिवाय तरणोपाय नसलेल्या ब्रह्मवृंदाची पीठं, ती (पीठं) सांभाळणा-यांची पुढील पिढी आणि भानुदास नामें शाळकरी मुलाच्या समंजस जीवनसंघर्षाची ही ‘ दशक्रिया ’ नावाची अत्यंत वाचनीय अशी कहाणी वाचून खूप समाधान पावलो आहे.

मी स्वतः बाराबलुतेदार असलेल्या गावाचा रहिवासी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे व खेड्याशी अद्यापही नाळ जुळून असल्यामुळे दशक्रियेतील घटनांचा साक्षी असल्याचे जाणवले. ग्रामीणांच्या तोंडी असलेली बोलीभाषा ही व-हाडी बोलीभाषेचीच मावशी असल्याचे जाणव‌ले. ही भाषा बोलणा-यांची दुर्द‌शाच असते हे माहित असुनही भाषा सौष्ठव, सौंदर्य त्यातील थोडे का होईना मार्दव हे निदान माझ्या सारख्या ग्रामीणाला आंदोलित करते. कुठेतरी ममत्व दडलेलं असल्याचा भास होतो. आणि वर्षानुवर्षे लोटलीत तरीही थेट ग्रामीणांच्या जीवन संघर्षात फारसा बदल नसलेल्याचे पाहून मन विषण्ण होते.

कांदबरी वाचतांना खूप पुढे गेल्यावर अनेक प्रश्न लेखकाला विचारावेसे वाटतात आणि सर्वसाधारण प्रथम पृष्ठा-वर असलेले लेखकाचे मनोगत “ एका कादंबरीची क्रिया व लेखन – प्रक्रिया “ ह्या रूपात जेव्हा वाचकांचे वाचून पूर्ण होते त्यावेळी त्याच्या मनातील प्रश्नांचा लोप होतो. त्याला प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतात. लेखकाच्या प्रामाणिक प्रयत्नांची दाद द्याविशी वाटते आणि ‘मनोगत’ हे शेवटी दिले असल्याने वाचकाच्या बुध्दिला सुध्दा अनेक पैलूंवर विचार करण्याचे स्वातंत्र्य आपोआपच मिळते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचक झपाटलेल्या मनःस्थितित राहतो.

आणि शेवटी कुणाच्या तरी मरणातच फक्त आनंद मिळविणारा भानुदास सूरपारंब्या सोबतच खेळलेल्या शकूच्या अस्थि पाहून थीजून जातो व वाचकाचे आंदोलित झालेले मन अखेरीस पाणाव‌लेले डोळे टिपू लागतात 

परिचय : अ. ल. देशपांडे, अमरावती (व-हाड)

संपर्क – “मथुरा”, मकान नंबर 4, विनोद स्टेट बैंक कॉलोनी, कैंप, अमरावती, महाराष्ट्र – 444602

मो. 92257 05884

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “सर्वसाक्षी…” – लेखक : श्री पुरुषोत्तम रामदासी ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “सर्वसाक्षी…” – लेखक : श्री पुरुषोत्तम रामदासी ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तक परिचय

पुस्तक : सर्वसाक्षी

लेखक : पुरुषोत्तम रामकृष्ण रामदासी.

प्रकाशक : मिलिंद राजाज्ञा.

प्रथम आवृत्ती :२०२५

पृष्ठे : २६८

माननीय पुरुषोत्तम रामदासी हे मराठी साहित्य क्षेत्रातील एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या दर्जेदार लेखनाचं गारुड नकळत वाचकांच्या मनावर आरुढ होतं. त्यांच्या कथांतून, कादंबरीतून नेहमीच जीवनापलीकडचं काहीतरी गूढ अनुभवायला मिळतं. त्यांनी रंगवलेली पात्रं, घटना, वातावरण हे जरी नेहमीचंच, सर्वसाधारणपणे ओळखीचं असं वरवर वाटलं तरी त्यातून उलगडणारं मानवी जीवन हे अनाकलनीय पण एक सखोल वास्तव दाखवणाऱ्या दिशेला अचूकपणे घेऊन जातं.

कादंबरी हा एक विशेष साहित्य प्रकार आहे. यात मूळ कथेचं एक मुख्य बीज असतं आणि हे बीज अंकुरताना हळूहळू त्यात अनेक वेगवेगळ्या स्वभावाची, निरनिराळ्या विचारांची, पद्धतीची पात्ररुपी रोपं फुलत असतात. प्रत्येक पात्राभोवती कुठलं ना कुठलं कथानक गुंफलेलं असतं. विविध पात्रांच्या नातेसंबंधांना घेऊन जाणाऱ्या या विविध छोट्या कथा मूळ कथानकाशी हळूहळू जुळत जातात आणि एक संपूर्ण कथानक पूर्ण होतं. सर्व पात्रांचा मूळ कथेशी काय संबंध असेल या उत्सुकतेपोटी वाचकांचे वाचन चालू राहतं. मनोमन वाचक सहजपणे अंदाज बांधतो. कधी तो अंदाज खरा ठरतो तर कधी त्यात होणार्‍या विस्मयकारी बदलाने थक्क व्हायला होते. कादंबरी कधी शोकांतिका तर कधी सुखांतिका असते तर कधी या दोन्ही मधलं एक धक्कादायक वास्तवही असू शकतं आणि या कथेशी वाचकाला खिळवून ठेवण्याची भूमिका फक्त आणि फक्त लेखकाचं लेखन कौशल्य, लेखन सामर्थ्य, शब्दांचा आणि विचारांचा ओघच करू शकतो. या सर्वांचा अनुभव प्राध्यापक पुरुषोत्तम रामदासी यांची नुकतीच प्रकाशित झालेली सर्वसाक्षी ही कादंबरी वाचताना येतो.

आदिनाथ गडकरी नावाच्या एका लेखकाची ही कथा आहे. या लेखकाचा मनातल्या मनात कालपुरुषाशी संवाद घडत असतो. काळाने उद्गारलेले शब्द त्याच्या कानात घुमतात. ” मी म्हणजे एक पळ. तुमच्या भाषेत एक क्षण. क्षणाक्षणाची अविरत, अखंड आणि चिरंतन साखळी म्हणजे मी. होय! मी काळ आहे. सर्वसाक्षी काळ! ”

इथूनच आदिनाथ गडकरी या लेखकाला झटकन एक प्रेरणा मिळते आणि हळूहळू त्याच्या जीवनपटाची कहाणी उलगडत जाते.

या कादंबरीत आदिनाथ गडकरी आणि उषा साबणे या दोन व्यक्तींच्या निस्सीम प्रेमाची कहाणी केंद्रस्थानी आहे आणि त्या अनुषंगाने रामराव बेळे, राघव, मंदा बेळे, अंजली, दिगंबर, अनु, केशव, सचिन, निरंजन अशी विविध पात्रे स्वतःची एक एक स्वतंत्र कथा घेऊनच या प्रपंचात समाविष्ट होतात.

मला कादंबरीची संपूर्ण कथा तुम्हाला सांगून तुमच्या वाचनाचा रसभंग करायचा नाही. मला फक्त ही कादंबरी वाचताना काय वाटले तेवढेच सांगायचे आहे.

या कादंबरीतल्या कुठल्याही पात्राभोवती कसलंही वलय नाही. समाजात वावरणारी, नेहमीच भेटणारी ही सारीच साधीसुधी माणसं आहेत. यांच्या जीवनात प्रेम आहे, शृंगार आहे, प्रेमातली फसवणूक आहे, शेजारी, बहीण- भाऊ, माय -लेकी यांच्या मधली नाती आहेत, समाजाने ठरवलेल्या नैतिक चौकटीबाहेरची अनैतिक कर्मं आहेत पण अशा कर्मांनाही अनैतिकतेच्या आवरणातून अलगद बाहेर आणण्याचे, त्यांची कारणमीमांसा देतानाचे शाब्दिक आणि वैचारिक कौशल्य लेखकाने या कादंबरीतून सुरेख पद्धतीने दाखवलं आहे.

आयुष्य म्हणजे ॲबिस आहे हे वाक्य वाचकाच्या मनावर खोल परिणाम करतं. आयुष्याला दिलेली ही कृष्णविवराची, कृष्णदरीची कल्पनाच खूप भिडणारी आहे. वास्तविक “ काळाच्या उदरात दडलंय काय” असा विचार करताना कादंबरीतल्या या एकेका पात्राच्या जीवन डोहात खोलवर जाऊन बघण्याचा लेखकाचा प्रयत्न खरोखरच अलौकिक आहे.

मी कादंबरी अक्षरशः झपाटल्यासारखी एका बैठकीत वाचली. सुरुवातीला वाचताना मला एखादी मसालेदार चित्रफीत पहात आहोत असंच वाटलं कारण यात विवाहबाह्य संबंध आहेत, स्पष्ट संवाद आहेत, भडक नसले तरी अश्लीलता टाळून केलेली शृंगारिक वर्णनं आहेत आणि तरीसुद्धा कथेतला एक सुंदर, कोमल, मनाची घालमेल करणारा प्रेमाचा रेशीम धागाही आहे.

रामराव आणि मंदा यांचे पती पत्नी पलीकडचे वेगळेच नाते, राघवचे नपुंसकत्व, सचिनचा मानसिक पिसाटपणा, सचिन आणि राघव मध्ये अडकलेल्या अंजूची व्यथा… या सर्वांबद्दल वाचकाच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. एक सुंदर रहस्यमयता या कादंबरीत आहे आणि समोर पसरलेल्या विविध पात्ररूपी सुमनांची माळ आपल्यापुढे हळूहळू सहजपणे गुंफत जाते. या पात्रांशी वाचकाचं नकळत नातं जडतं आणि कादंबरीच्या शेवटी सारी नाती एक वेगळाच धडा देत अचंबित करतात. आयुष्याची एक संपूर्ण अनाकलनीय बाजू दाखवतात. लेखकाच्या भाषेत सांगायचं तर “अनाकलनीय घटनांच्या प्रवाहात वाहत जाणाऱ्या वाळक्या पानासारखं वहावं लागतं. कर्तुम अकर्तुम अज्ञात शक्तीविषयीचं हेअज्ञान की वंचना?” असं काहीसं वाटत राहतं.

या कादंबरीचे वैशिष्ट्य असं आहे की यात अवास्तव योगायोग नाहीत, गिमिक्स नाहीत, मेलोड्रामा नाही. लेखकाने पात्रांची निर्मिती केली पण त्यांना त्यांच्या प्रवाहात स्वतंत्रपणे लोटून देत त्यांच्याभोवती घडणाऱ्या घटनांबद्दल सहजपणे, सुंदर शब्दशैलीत भाष्य केले. त्यामुळे या कादंबरीत कुठलीही कृत्रिमता जाणवत नाही. ओढूनताणून केलेलं लेखन वाटत नाही. सहज, प्रवाही आणि परिपक्व असं हे लेखन आहे. प्रसंगानुरूप संवाद, भाषेचा साज चढवत सारं काही खुलत जातं आणि दूरस्थपणे वाचक या संपूर्ण कालचक्राचा एक भाग बनून जातो.

कादंबरीच्या सुरुवातीला काळ बोलत असतो आणि शेवट ही काळाच्या वक्तव्यानेच होतो. काळाच्या साक्षीने सारं काही घडत असतं म्हणून काळच सर्वसाक्षी.

अशी ही प्रा. पुरुषोत्तम रामदासी यांची जीवनावरची सखोल, अभ्यासात्मक, काहीशी अध्यात्मिकतेकडे झुकणारी कादंबरी सर्वांनी जरूर वाचावी अशीच..

या सुंदर लेखनासाठी मा. रामदासी सरांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

परिचय –  सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “भारत – सत्य, सत्व, स्वत्व” -लेखिका : लेखक : श्री अभिजीत जोग ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “भारत – सत्य, सत्व, स्वत्व” -लेखिका : लेखक : श्री अभिजीत जोग ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : भारत – सत्य, सत्व, स्वत्व

लेखक : अभिजित जोग

मूळ किंमत ₹४९९₹

भारत हा जगातील एकमेव देश असेल ज्याची खरी ओळख पुसून टाकण्यासाठी एक राष्ट्र म्हणून त्याचं अस्तित्वच नाकारण्यात आलं. शिक्षण आणि इतिहास या त्याच्या शक्तिस्थानांवर हल्ला करून त्याचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान नष्ट करण्यात आला. कधीच लयाला गेलेल्या आणि संग्रहालयापुरत्या उरलेल्या इतर प्राचीन संस्कृतीचं वारेमाप गुणवर्णन करण्यात साम्राज्यवादी शक्तींना कुठलीही अडचण वाटली नाही. पण हजारो वर्षांपासून आजही जिवंत असलेल्या भारतीय संस्कृतीचं महत्व मान्य करणं निरंकुशतावादी शक्तींसाठी गैरसोयीचं होतं. राजकीय स्वातंत्र्य मिळालं तरी या शक्तींनी लादलेल्या वसाहतवादी मानसिकतेतून भारतीयांची अजूनही पूर्णपणे मुक्तता झालेली नाही. न्यूनगंड, आत्मनिंदा यांचा प्रभाव अजूनही ओसरलेला नाही. कारण भारतीयांना आपली खरी ओळख अजूनही गवसलेली नाही.

‘सभ्यता’ या शब्दाचा अर्थ जगाला समजावणारा ; भाषा आणि संस्कृतीची देणगी जगाला देणारा ; विविध ज्ञानशाखांची पायाभरणी करणारा ; गळेकापू स्पर्धेशिवायही समृद्धीची निर्मिती करता येते हे दाखवून देणारा ; वैश्विक मानवी मूल्यांचा संदेश देणारा ; अराजक, अस्थैर्य, असहायता यांच्या गर्तेत सापडलेल्या जगाला स्थैर्य, शांती, समृद्धी, सर्वसमावेशकता यांचा मार्ग दाखविण्याची क्षमता असलेला देश, ही भारताची खरी ओळख भारतीयांनाच करून देणे अत्यावश्यक आहे.

वसाहतवादी मानसिकता झुगारून दिलेला, आपली खरी ओळख पटलेला, आपल्या सुप्त क्षमतांची जाणीव झालेला भारतच जगाला मार्ग दाखविण्याची आपली ऐतिहासिक जबाबदारी पार पाडण्यास सिद्ध होऊ शकेल.

या पुस्तकावरचे काही अभिप्राय ::

श्री. श्री. अभिजित जोग लिखित ‘भारत सत्य, सत्व, स्वत्व’ हा ग्रंथ म्हणजे हजारो वर्षांपूर्वी भारतीयांनी केलेल्या ज्ञानोपासनेचा व भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा धावता आढावाच होय. ‘ज्ञान विज्ञान योग’ असे प्रस्तुत ग्रंथाचे वर्णन करता येईल. यात तत्वज्ञान, अध्यात्म, भाषा (संस्कृत), वैद्यक, खगोलशास्त्र, गणित, धातुशास्त्र या ज्ञान-विज्ञानाच्या सर्व आयामांचा भारतातच उदय झाल्याचे सप्रमाण विवेचन केलेले आढळते. सखोल चिंतन, ‘ना मूलं लिख्यते किंचित’ हे असे धोरण, भारत म्हणजे जगातला पहिला ज्ञानाधिष्ठित समाजाचा देश, वेदोपनिषदे व सभ्यतेची मानवी मूल्ये भारतात निर्माण झाली तेंव्हा इतर देशात अज्ञानांधःकारच होता हे ठासून सांगणारा हा ग्रंथ होय.

— गो. बं. देगलूरकर

नामवंत विद्वान आणि भारतीय कला व स्थापत्यशास्त्राचे सर्वमान्य अभ्यासक

विषयाचा आवाका आणि मांडणी याबाबतीत हे पुस्तक ज्ञानकोषीय पातळीवर जाते. इतका मोठा विषय हाताळताना बारीक-सारीक तपशीलही सुटणार नाहीत याची काळजी घेण्यात लेखक अभिजित जोग पुन्हा एकदा यशस्वी ठरले आहेत.. तरीही, प्रवाही भाषेमुळे हे पुस्तक अत्यंत वाचनीय झाले आहे. भारतवर्षाची खरी ओळख पुनर्स्थापित करणारे हे दर्जेदार पुस्तक सर्व प्रकारच्या वाचकांना आवडेल असा मला विश्वास वाटतो.

— नीलेश ओक

विद्वान संशोधक आणि लेखक

सत्य दडपून जो तथाकथित ‘इतिहास’ पाश्चात्यांनी आपल्यावर लादला, त्याला आह्वान देण्याची ताकद अभिजित जोग यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि लेखणीतही आहे, हे या पुस्तकामुळे पुन्हा एकदा निदर्शनास येतं. प्राचीन काळापासून भारताचं सत्त्व आणि स्वत्त्व हे ज्ञान आणि तत्त्वज्ञाना इतकंच विज्ञानातही आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी जोगांनी संशोधन वृत्तीनी लेखन केलं आहे. आपला हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचविण्यासाठी हे सत्यदर्शक पुस्तक जरूर वाचा.

— डॉ. सुचेता परांजपे

वेद आणि इंडोलॉजी तज्ञ

भारताच्या पुरातन अस्तित्वाला पोखरणाऱ्या डाव्या वाळवीची कृष्णकृत्ये साधार उघडकीला आणणारे, सव्यसाची लेखक अभिजित जोग यांचे अजून एक विलक्षण पुस्तक! सत्य मांडणारे, सत्व जपणारे आणि स्वत्वाची जाणीव देणारे. आपल्या आत्मवंचना ते आत्मघात या जीवघेण्या प्रवासाची गती थोपवणारा एक मोलाचा गतिरोधक आहे हे पुस्तक! अभिजित जोग यांच्या सहज शैली आणि ओघवत्या भाषेतला असा हा तब्बल अडीच सहस्त्रकांचा ठोस पुराव्यांसकट आलेख मांडणारा महत्वाचा दस्तावेज!

— दीपक करंजीकर

लेखक, अभिनेता, व्यवस्थापन आणि अर्थतज्ञ

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares