मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शॉर्टकट… – भाग – ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ शॉर्टकट… – भाग – ३ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

(त्या दिवशी सामान घ्यायला मी स्टोअरमध्ये गेले तर हमीदा भेटली. कोणीतरी बोलायला भेटलं म्हणून बरं वाटलं.  ॓ठहरोना हमिदा. साथ जायेंगे.॔ असं म्हणत तिला थांबवून माझं सामान घेऊन झाल्यावर आम्ही बरोबर निघाले. थकल्यासारखी दिसणारी हमीदा पावले ओढीत सावकाश चालत होती. )

इथून पुढे – – 

 ॓क्यूं हमीदा, तबीयत ठीक नही है क्या? क्या हुआ? 

या माझ्या प्रश्नावर ती म्हणाली, क्या करनेका बहन? अपना नशीबही अच्छा नही. चाचाके मर्जीनुसार कभी उनके रूममे भी जाना पडता है. पैर दबाने के बहाने से बुला लेते है और…. क्या करूं? मेरे फॅमिलीको खाली मेरा पैसा चाहिये. मेरा पासपोर्ट वगैरा सब चाचाके पास ही है. यहा दो बरस पुरे होने के बाद मुझे दो महीने की छुट्टी मिलेगी. तब तक मै वापस नही जा सकती. अभी मैने एक तरकीब सोची है. जब जब चाचा पैर दबाने के लिए बुलाते है, तो मैं पहिले उनसे कुछ अच्छा गहना मॉ॑ग लेती और मेरे बॅग में रखती. सायरा बेगमको सब पता है. लेकिन वो कुछ नही कर सकती. मेरे मेहनत का पैसा तो मेरे घरवालेही खाते है. कम से कम कुछ सोना तो मेरे पास रहेगा. तिचं घर आल्यावर,  ॓फिर मिलेंगे.॔ खुदा हाफिज.॔ म्हणून ती निघून गेली.

 पण तिचं बोलणं ऐकून माझ्या डोक्यावर वीज पडल्यासारखं झालं. माझी अवस्था तिच्यापेक्षा फार वेगळी नव्हतीच !दिवसेंदिवस सुरेंद्रची मागणी वाढत चालली होती. त्यातच सुलेखा ताईला दिवस गेल्याचं कळलं. मी वरकरणी त्यांच्या आनंदात सहभागी असल्याचं नाटक केलं. पण एकदा सुलेखा ताईला फोनवर कुणाशी तरी बोलताना मी ऐकलं होतं की त्या होम सायन्सच्या डिप्लोमाची फी खूपच जास्त आहे. आता दोन वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आपली इथून सुटका नाही हे मी मनोमन जाणलं होतं. बाळ.. बाळंतीणीचं करायचं सोडून मला कोण शिकायला पाठवेल? इतकी चांगली हक्काची मुलगी कामाला घरात असताना मला कोण एवढ्यात भारतात पाठवेल?॔ 

… आणि त्यादिवशी सुरेंद्रने ॓मोठी मागणी ॔ पुढे केली. मी सगळी काळजी घेईन. तुला काही त्रास होणार नाही असं आश्वासनही दिलं.॔ हे कधीतरी घडणारच होतं, म्हणून मीही सावध होते. मुंबईला मी रात्रीच्या ज्युनिअर कॉलेजला जात असताना माझ्याबरोबरच्या काही मैत्रिणी, त्यांनी काल कुठे कसा सेक्सचा अनुभव घेतला ते रंगवून सांगत असंत. अमक्या तमक्या त्या मोठ्या बकऱ्याकडून ठरल्यापेक्षा मी काय जास्त उकळलं, ड्रेस कॉस्मेटिक्स ज्वेलरी सेट कसं मिळवलं. याचं वर्णन करीत. मी त्यांच्या धैर्यापुढे अवाक् होई…. .॔ 

चित्रा पुन्हा रडू लागली. तिच्या पाठीवर हात फिरवत राजश्री तिला शांत राहायला सांगत होती. पण हे सगळे प्रकार ऐकून राजश्रीच एवढी हादरून गेली होती की आता तिच्याच पाठीवरून हात फिरवायला तिला सावरायला, तिचे डोळे पुसायला रमेश जवळ असता तर फार बरं झालं असतं असं तिला वाटत होतं. आणि एकीकडे हे सारं रामायण ऐकायला तो इथे नाही तेही चांगलं झालं असं वाटत होतं.

 काही मिनिटं अशीच शांततेत गेली. थोडं थांबून चित्रा म्हणाली दीदी,॓ कसं सांगू तुला? सुरेंद्रची मागणी मान्य करण्याआधी मी त्याच्यापुढे मुंबईतली महागाई, शिक्षणाचा खर्च, आमची घराची गरज असा सारा पाढा वाचला. त्यानं मला माझ्या मुंबईच्या बँक अकाउंटमध्ये पन्नास हजार रुपये जमा करण्याचं आश्वासन देऊन ते पूर्ण केलं. आणि मगच मी त्याच्या स्वाधीन झाले. मी कबूल करते की माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. पुरुष सहवासाची आणि प्रत्येक वेळी बँकेत जमा होणाऱ्या पैशाची मला भुरळ पडली. पण मला आता तिथून, या साऱ्या मोहातून लवकर बाहेर पडायचं होतं. मी वेळेवर मुंबईला पोचले नाही तर इथलं शैक्षणिक वर्ष सुरू होईल. मला पुढच्या वर्षात ॲडमिशन मिळणार नाही हे मला माहीत होतं.

 दीदी, तुम्हा दोघांना माहितेय की मला पुढे शिकून कॉम्प्युटरचा एखादा कोर्स करून स्वतःच्या पायावर उभे राहायचंय.

 ॓… आणि माझं नशीब चांगलं म्हणून दुबईच्या त्या मोहमयी, सोनेरी दुनियेतून परतण्याचा ॓शॉर्टकट ॔ मला लवकरच सापडला. काही दिवसांपूर्वी सुलेखाताई,  ॓आज मी लवकर घरी येते. दोघी मिळून थोडे लाडू, शंकरपाळे करू.॔ असे सांगून शाळेत गेली. आणि अनपेक्षितपणे, सुखाला चटावलेला सुरेंद्र लवकर घरी आला. त्याला मी ॓आज ताई पण लवकर घरी येणार आहे.॔ असं अजिबात सांगितलं नाही. आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे आमच्या प्रेमाचा सिलसिला सुरू असतानाच सुलेखाताई तिच्याकडची किल्ली लावून दार उघडून आत आली. सुरेंद्रला घाईनं माझ्या खोलीतून बाहेर पडताना पाहून आणि आमच्या चेहऱ्यावरून तिनं काय ते जाणलं.

 खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून तिला आमचा संशय होताच. पण आज आम्ही रंगेहाथ पकडले गेलो होतो. त्या दोघांची खूप वादावादी झाली. मलाही खूप बोलणी खावी लागली. शक्य तितक्या लवकरचं तिकीट काढून माझी मुंबईला रवानगी करण्याचा निर्णय झाला. मी ताईकडून आठवणीनं माझ्या पासपोर्टबरोबर माझं बारावीचं आणि माझी इतर सर्टिफिकेट्स मागून घेतली आणि मगच माझी बॅग भरायला घेतली. दीदी, मी तुम्हा दोघांची क्षमा मागते. माझा अपराध तुम्ही समजून घ्याल ना?॔ 

 राजश्री काहीही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हती. आपण काय करायला गेलो आणि हे काय होऊन बसलं याबद्दल खंत करावी की आपण विश्वासानं दुसऱ्या देशात पाठवलेली दुसऱ्याची मुलगी सुखरूप घरी आली याबद्दल देवाचे आभार मानावे हेच तिला समजेना. डोळे पुसत, जिना उतरणाऱ्या चित्राकडे ती निःशब्द होऊन नुसती बघत उभी राहिली.

 मन मोकळं झाल्याने चित्राला आता जरा बरं वाटत होतं. राजश्रीताईकडून घरी येताना चित्राला दुबईतला आणखी एक प्रसंग आठवला…

… एकदा काही खरेदीसाठी ती सुलेखाताई आणि सुरेंद्र एका मॉलबाहेर भेटणार होते. त्या दिवशी सुरेंद्रनं आपल्याला घरी फोन करून ठरल्या वेळेपेक्षा एक तास लवकर तयार राहायला सांगितलं होतं. सुरेंद्रला आवडणारा सुंदर आकाशी रंगाचा ड्रेस घालून आपण तयार झालो. ड्रेसचं आणि आपलं सुरेंद्रनं अगदी ॓साग्रसंगीत  ॔कौतुक केलं. बाहेर पडल्यावर गाडी वेगळ्याच दिशेला निघालेली पाहून आपण सुरेंद्रला विचारलं ,॓आपल्याला ताईने तिकडच्या मॉलमध्ये बोलावलं आहे ना ?॔हो. पण त्याआधी एक सरप्राईज आहे बाईसाहेबांना. असं म्हणत सुरेंद्रने गाडी ॓गोल्डसूक ॔ जवळ उभी केली. मागे ताईंबरोबर खरेदीला गेलो होतो तेव्हा आपल्याला आवडला होता तसाच सोन्याचा सेट सुरेंद्रने आपल्यासाठी खरेदी केला. भारावून जाऊन तो सेट पर्समध्ये ठेवताना आपल्याला झालेला आनंद आपण लपवू शकलो नाही. गाडीत बसल्यावर सुरेंद्र म्हणाला,  ॓बाईसाहेब याची पुरेपूर वसुली मी करणार आहे बरं !॔आपण खोटं खोटं रागावून त्याला आणखीनच उत्तेजन दिलं होतं. मॉलमधली खरेदी आटोपून, घरी येऊन सारं आवरल्यावर रात्री आपण आपल्या खोलीचं दार लावलं. तो चमचमणारा सुंदर सेट घालून स्वतःला पुन्हा पुन्हा आरशात न्याहाळलं. मग एका जुन्या ड्रेसमध्ये तो सेट गुंडाळून अलगद बॅगेच्या तळाशी ठेवला.

… आत्ता दीदीला सगळं काही सांगताना ही गोष्ट आपल्याला आठवली नाही की हे सांगायचं आपण मुद्दामून टाळलं ?

समाप्त –

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शॉर्टकट… – भाग – २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ शॉर्टकट… – भाग – २ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

(स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उज्वल भविष्याची स्वप्न पाहत चित्रानं आईचा, दीदी आणि भाईसाहेबांचा आशीर्वाद घेतला. भावांना जवळ घेऊन निरोप घेतला आणि मोठ्या हिमतीनं विमानात पाय ठेवला. दुबई एअरपोर्टवर सुरेंद्र सुलेखा तिला न्यायला आले होते. चित्रा सुखरूप दुबईला पोचल्याचा फोन आला तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला होता.) – इथून पुढे – – 

साऱ्या विचारांनी, आठवणींनी शिणून राजश्रीला झोपाळ्यावरच डुलकी लागली. जाग आली तेव्हा सुनंदाबाई स्वयंपाक करून निघून गेल्या होत्या. रमेश येऊन त्याचं आवरून पेपर वाचत होता. राजश्री जागी झालेली पाहून त्यानं काळजीन विचारलं,  ॓बरं वाटत नाहीये का? किती थकलेला दिसतोय तुझा चेहरा!॔ 

“ काही नाही. थोडी डुलकी लागली होती. देवाजवळ देवा लावते आणि जेवून घेऊया “ राजश्री उठत म्हणाली.

जेवण झाल्यावर राजश्रीने संध्याकाळी बँकेत कळलेली चित्राच्या अकाउंटची हकीगत रमेशला सांगितली. चित्रा चोरी करणार नाही याबद्दल दोघांचीही खात्री होती.

मग नेमकं काय झालं असेल? चार-पाच महिन्यात एवढे कसले पैसे जमा झाले असतील? अशा विचारांच्या आवर्तात केव्हातरी राजश्रीला झोप लागली. दुसऱ्या दिवशी लवकर उठून आवरून रमेश दौऱ्यावर चालला होता तेव्हाच राजश्रीलाही जाग आली होती पण तिला उठावसंच वाटेना. पुन्हा चित्राच्या विचारात ती बुडून गेली..

 *****

सुरुवातीला आठवड्यातून एकदा चित्राचा ठराविक वेळी फोन येई तेव्हा तिची आई, भाऊ येऊन बसत. स्पीकरवर फोन ठेवला की साऱ्यांना तिचं बोलणं ऐकता येई. आणि तिच्याशी बोलताही येई. दुबईच्या कितीतरी गोष्टी ती उत्साहाने सांगत असे.

॓दीदी इथला एअरपोर्ट, रस्ते अगदी स्वच्छ आणि सुंदर आहेत. रस्त्यावर छान झाडं, फुलं आहेत आणि दिनेश रस्त्यावर इतक्या प्रकारच्या सुंदर मोटारी बघितल्या ना की मला तुझी खुप आठवण येते. किती प्रकारची गाड्यांची चित्रं तू जमविली आहेस. मी येताना आणीन आणखी चित्रं तुझ्यासाठी.

दीदी, सुलेखाताईची जागा पण आपल्यासारखी छान आहे. इथे मॉल्सपण खूप मोठे आहेत. ही दोघही मला बरोबर घेऊन जातात. आम्ही खरेदी करतो, खातो पितो. काळजी करू नका मी मजेत आहे.॔ असं उत्साहाने सांगायची तर कधी आपुलकीने दीदीची, भाईसाहेबांची चौकशी करायची. दहावीत गेलेल्या दिनेशला नीट अभ्यास करायलाही सांगायची.

घरकाम आणि स्वयंपाक या दोन्ही जबाबदाऱ्या चित्रानं घेतल्याने, सुलेखाला अगदी मोकळं छान वाटत होतं. गेली चार वर्ष स्वतः सगळं काम आणि नोकरी करण्यात तिची फार धावपळ झाली होती.

असाच एकदा चित्राचा ठरल्यापेक्षा वेगळ्या वेळी फोन आला होता.  ॓दीदी इथे येऊन आता दोन महिने होऊन गेले. मी सुलेखा ताईला माझ्या होम सायन्सच्या कोर्सबद्दल विचारलं. माझी सर्टिफिकेट तिच्याजवळ दिली. पण सुलेखा ताई म्हणाली की तू येईपर्यंत इथलं शैक्षणिक वर्ष अर्धं संपून गेलं आहे. आता तू घरच्या कॉम्प्युटरवर दुपारी प्रॅक्टिस कर. काही नवीन माहिती मिळव.॔ हे सारं ऐकताना चित्राच्या आवाजातली निराशा झाली जाणवत होती.

त्या रात्री मुद्दाम फोन करून राजश्री सुलेखाशी बोलली. पण ॲडमिशनचे काही अवघड नियम गोड भाषेत सांगून सुलेखानं वेळ साजरी केली. पुढच्या वर्षीच्या ॲडमिशनची आत्ताच चौकशी करते असेही ती म्हणाली. पण राजश्रीच्या मनातही शंकेची पाल चुकचुकली. पूर्ण शैक्षणिक वर्ष फुकट गेल्याने चित्राचाही जीव हळहळत होता. तिला मुकाट्याने घर काम आणि बाजारहाट करण्यावाचून गत्यंतर नव्हतं. तिच्या पगाराचे पैसे मात्र सुलेखा नियमित पाठवत होती. तरी हळूहळू चित्राच्या फोनमधला उत्साह कमी होत असल्याचं राजश्रीला जाणवलं.

काल बँकेत कळालेल्या माहितीने तर राजश्रीला आणखीनच कोड्यात टाकलं होतं. सुलेखाला सकाळीच फोन करावा असं ठरवून राजश्री स्वतःचं आवरत होती. तेवढ्यात सुनंदाबाई आल्या त्या सांगतंच की,  ॓अहो दीदी, चित्रा आज पहाटे अचानक घरी आलीय. तुम्हाला सर्वांना भेटावसं वाटलं म्हणून आले. इतकंच बोलली आणि डोक्यावर पांघरून घेऊन आडवी झाली. आज रात्री ती तुम्हाला भेटायला येणार आहे. माझ्याशी धड काही बोललीच नाही. तुमच्याजवळ बोलेल काहीतरी कदाचित !॔हे ऐकून राजश्रीला चांगलाच धक्का बसला. सुलेखानं साधं फोन करून चित्राच्या येण्याबद्दल कळवलंही नव्हतं. काय झालं असेल नेमकं? राजश्री विचारात पडली. आता रात्रीची आणि चित्राची वाट बघण्याखेरीज उपाय नव्हता.

चित्रा आल्यावर राजश्रीनं तिला स्वतःजवळ सोफ्यावर बसवून घेतलं. पाठीवरून हात फिरवला आणि प्रेमानं विचारलं,॓ बरी आहेस ना बेटा?॔ पण राजश्रीच्या या प्रश्नावर चित्रा बांध फुटल्यासारखी गदगदून रडू लागली. राजश्रीने तिला थोडं रडू दिलं. शांत झाल्यावर चित्रा म्हणाली,  ॓दीदी, माझ्या हातून मोठी चूक झालीय. मला क्षमा करा. मी तुमचा माझ्यावरचा विश्वास मोडलाय. काय आणि कसं सांगावं तेच कळत नाहीये….. पण आता मला सगळं सांगायलाच हवं.

तिथे माझा सगळा दिवस कामात जात होता पण रात्री मात्र माझ्या खोलीमध्ये झोपायला गेल्यावर तुमच्या सर्वांच्या आठवणीनं मला फार रडू यायचं. एकटं.. एकटं वाटायचं. तिथे खायला प्यायला कमी नव्हतं पण ज्या उद्देशाने मी इथे आले होते त्या माझ्या शिक्षणाचं काहीच पुढे होत नव्हतं.

सुट्टीच्या दिवशी त्या दोघांबरोबर मला फिरायला मिळायचं. चकचकीत, डोळे दिपवणाऱ्या त्या श्रीमंत जगाचं दर्शनही मोहात पाडणारं होतं. त्या दोघांबरोबर मी पहिल्यांदा मॉलमध्ये गेले तेव्हा त्या उंच सरकत्या जिन्यांवरून मला सावरण्याच्या निमित्तानं सुरेंद्रने माझा हात दाबून धरला, तेव्हाच त्याचा स्पर्श मला वेगळा वाटला. मग लक्षात यायला लागलं की, सुलेखाताई अंघोळीला गेली असेल तेव्हा स्वयंपाकघरात काहीतरी मागायच्या निमित्ताने येऊन तो मला जाणूनबुजून स्पर्श करायचा. दीदी, खरं सांगते इथे तुमच्याकडे मला कसलीच भीती वाटली नाही. भाईसाहेबांबद्दल तर नेहमी आदरच वाटला. पण तिथे सुरेंद्रचं लागट वागणं जाणवायला लागलं होतं.॔ 

चित्रा पुन्हा हुंदके देऊन रडू लागली. चित्राच्या डोळ्यांपुढे तो पहिलाच प्रसंग उभा राहिला…

एकदा सुरेंद्र अचानक ऑफिसमधून लवकर घरी आला. सुलेखाताईला घरी यायला अजून वेळ होता. आपण सोफ्यावर बसून कादंबरी वाचण्यात गढलो होतो. वॉश घेऊन आल्यावर सुरेंद्रनं बॅगेतून एक छान मोठं चॉकलेट काढून आपल्या पुढे धरलं. चॉकलेट घ्यायला हात पुढे केल्यावर तो म्हणाला,  ॓अगं, नको. पुस्तक वाचतेयस ना? ते खराब होईल. मीच देतो तुला… असं म्हणत त्यानं अगदी जवळ बसून आपल्या तोंडात चॉकलेट भरवलं. आपण वाचत असलेल्या कादंबरीत नुकताच अशा प्रकारचा प्रसंग रंगवला होता. त्यानं लावलेल्या भारी सेंटचा मंद सुवास, तोंडात विरघळणाऱं चॉकलेट, त्याची भुरळ घालणारी नजर सारं मोहात पाडणारं होतं. त्याच्या मिठीला आपण केलेला प्रतिकार लटका आहे हेही त्याच्या केव्हाच लक्षात आलं होतं… 

पण हे सगळं दीदीला कोणत्या तोंडानं सांगणार?

हुंदके थांबल्यावर चित्रा दीदीला एवढंच म्हणाली, दिवसेंदिवस दिवस त्याची लगट वाढत चालली होती. आणि मी कबूल करते की माझाही पाय मोहाच्या घसरगुंडीवर पडला होता. मला सावरायला कुणी नव्हतं.

सुरेंद्र– सुलेखा ताईच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आला होता. खरेदी करायला आम्ही तिघं एकत्रच गोल्डसुक मार्केटला गेलो होतो. सोन्याचा तो चमचमणारा बाजार पाहून डोळे दिपून जात होते. ताईंची पसंती चालली होती. मीसुद्धा मला आवडलेला एक सोन्याचा नेकलेस पुन्हा पुन्हा गळ्याला लावून बघत होते. मागच्या आरशात पाहिलं तर सुरेंद्र ॓छान दिसतोय ॔ अशी पसंतीची मान डोलावत, मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडेच पाहत होता. दोन-चार पगार आपल्याला इथेच द्यायला सांगून तो सेट खरेदी करता आला तर किती छान होईल, या विचाराने झोपेतसुद्धा मला तो हार दिसत होता.॔ 

थोडं थांबून, पाणी पिऊन चित्रा पुढे सांगू लागली,  ॓एखादं सामान आणायचं राहिलं असलं तर मी आमच्या घराजवळ असलेल्या स्टोअरमध्ये जात असे. तिथेच माझी आणि हमीदाची चार-पाच वेळा गाठ पडली होती. ती सुद्धा काही सामान घ्यायला स्टोअर मध्ये यायची. तिच्याशी बोलताना कळलं की तीही हैदराबादहून इथे एका कुटुंबात काम करण्यासाठी आली होती. तिला आठ नऊ भावंडे होती. वडिलांच्या बांगड्या विकण्याच्या व्यवसायात त्यांचं भागत नव्हतं. कुणाच्या तरी ओळखीनं ती दुबईला आली होती. साधारण माझ्याच वयाची होती. इथे तिला घरकाम पुष्कळ होतं. फक्त नियमितपणे तिच्या घरच्यांना तिचा पगार मिळत होता आणि हमीदाला पंधरा-वीस दिवसांनी अम्मीशी फोनवर बोलता येत होतं.

त्या दिवशी सामान घ्यायला मी स्टोअरमध्ये गेले तर हमीदा भेटली. कोणीतरी बोलायला भेटलं म्हणून बरं वाटलं.  ॓ठहरोना हमिदा. साथ जायेंगे.॔ असं म्हणत तिला थांबवून माझं सामान घेऊन झाल्यावर आम्ही बरोबर निघाले. थकल्यासारखी दिसणारी हमीदा पावले ओढीत सावकाश चालत होती.

– क्रमशः भाग दुसरा

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शॉर्टकट… – भाग – १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ शॉर्टकट… – भाग – १ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

॓सुनंदाबाई, संध्याकाळी चांगली कोवळी मेथीची जुडी आणा. भाईसाहेब दोन-तीन दिवस बाहेरगावी जात आहेत. थोडे पराठे बरोबर देता येतील. ॑ नाश्ता करता करता राजश्री सुनंदाबाईंना दिवसभरच्या कामाच्या सूचना देत होती.

रमेश नाश्ता करून कोर्टाच्या कामासाठी बाहेर पडला होता. त्याच्या वडिलांपासून चालत आलेली त्यांची टॅक्स कन्सल्टेशनची फर्म चांगली नावाजलेली होती. एम कॉम झालेली राजश्री फर्ममध्येच अकाउंटस् चं काम सांभाळायची. आवरायला उशीर झाला की राजश्रीला चित्राची खूप आठवण येई.

  ॓दीदी, ड्रेसला इस्त्री करून ठेवली आहे. मॅचिंग बांगड्या गळ्यातलं पण ठेवलाय तिथेच आणि टेबलावर गोड ताज्या ताकाचा ग्लास ठेवलाय. आठवणीने प्या बरं का. मागचं सर्व आवरून येतेच मी ऑफिसला.॔ असा प्रेमळ आग्रह करणाऱ्या हुशार, चटपटीत चित्राला दुबईला पाठवून आता वर्ष होऊन गेलं होतं.

  ॓हल्ली ती फोनवर पहिल्यासारखी उत्साहाने बोलत नाही. नुसतं हो… नाही.. बरं.. म्हणंत फोन ठेवून देते. काही बिनसलय का तिचं ते एकदा नीट विचारलं पाहिजे.॔ असा विचार करत राजश्री सँडल्स घालत होती. तेवढ्यात फोन वाजला.

  ॓आता कोण असेल? आधीच उशीर झालाय ॔. असं मनात म्हणंत राजश्रीनं फोन उचलला. फोन तिच्या नेहमीच्या बँकेतल्या मॅनेजरचा होता. राजश्रीला शक्य तितक्या लवकर बँकेत भेटायला बोलावलं होतं.

  ॓संध्याकाळी नक्की येऊन जाते.॔ असं म्हणत राजश्रीनं फोन ठेवून दिला. एवढं अर्जंट काय काम असेल तिला प्रश्नच पडला.

 *****

  ॓तुमच्याकडे कामाला असलेल्या चित्राचा आपण इथे तुमच्या मदतीने एन् आर् आय् अकाउंट उघडला आहे. या नॉन रेसिडेंट इंडियन अकाउंटमध्ये दरमहा 22/25 हजार रुपये जमा होतात आणि त्यातले 15/16 हजार रुपये काढले जातात.॔ संध्याकाळी भेटल्यावर बँक मॅनेजरने सांगितलं.

  ॓ हो. मी तुम्हाला सांगितलं होतं की चित्राला आम्ही दुबईला माझ्या मैत्रिणीकडे मदतीसाठी पाठवत आहोत. तिचा भाऊ येऊन घरखर्चासाठी थोडे पैसे काढत जाईल. राजश्री म्हणाली.॔

पण गेल्या चार-पाच महिन्यात या अकाउंटमध्ये नेहमीच्या रकमेशिवाय

आणखी जवळजवळ दीड लाख रुपये जमा झाले आहेत. काही फिक्सड् डिपॉझिट वगैरे करायचं असेल तर विचारा तिला. ही जमा रक्कम थोडी जास्त वाटली नेहमीपेक्षा म्हणून बोलावलं तुम्हाला. मॅनेजर म्हणाले ॔

  ॓थँक्स! मी कळवते तुम्हाला काय करायचं ते.॔ असं म्हणून राजश्री गडबडीने उठली.

घरी येईपर्यंत उलट सुलट विचारांनी राजश्रीचं डोकं भणभणून गेलं. तोंड धुऊन तिनं कपडे बदलले. सुनंदाबाईने दिलेलं गरम थालीपीठ आणि तिला आवडणारी वेलचीची कॉफी पितानाही तिच्या डोक्यात चित्राच होती. चित्राचा विषय सुनंदाबाईंजवळ… तिच्या आईजवळ… काढावा का हा मनातला विचार तिने बाजूला केला.

आधी रमेशजवळच बोलावं याबद्दल, असं ठरवून ती गप्प राहिली. खाण्यापिण्याची भांडी आवरून सुनंदाबाई बाजारात गेल्या. रमेश यायला अजून तसा वेळ होता. हॉलमध्ये टांगलेल्या वेताच्या झोपाळ्यावर ती विचार करत बसली. तिचं मन पाच सहा वर्ष मागे गेलं.

 *******

राजश्रीचं गर्भाशयाचं ऑपरेशन करायचं ठरलं होतं. कदाचित गर्भाशय काढावही लागणार होतं. ऑपरेशननंतर दोन-तीन महिने राहायला येऊ शकेल असं सासर… माहेरचं कुणीच नव्हतं. त्यामुळे घर सांभाळेल, तिची काळजी घेईल अशा एखाद्या चांगल्या बाईच्या ती शोधात होती. त्याचवेळी तिच्याकडे भांडी घासणाऱ्या बाईंनी तिला चित्राचं नाव सुचवलं होतं. चित्राची आई बाईंच्या लांबच्या नात्यातली होती. अलिबाग जवळच्या एका छोट्या गावात ती मुलगी कुटुंबीयांसह राहत होती. चित्राच्या कामसूपणाची, चांगुलपणाची बाईंनी खात्री दिली आणि मदतीसाठी चित्राला मुंबईला आणायचं ठरलं.

चित्राने थोड्याच दिवसात मुंबईच्या जीवनाशी जुळवून घेतलं. राजश्रीदीदी आणि भाई साहेबांचा विश्वास संपादन केला. ऑपरेशननंतर दीदीची मनापासून काळजी घेतली. तिची औषधं, खाणं.. पिणं सारं सांभाळलं. डायबेटीस असलेल्या भाईसाहेबांचं पथ्याचं खाणं शिकून घेतलं. स्वच्छ, नीटनेटक्या, हसतमुख मितभाषी चित्राला राजश्री आणि भाईसाहेबांनी घरातल्यासारखंच वागवलं होतं. त्यांना मूलबाळ नव्हतं आणि आता राजश्रीच्या ऑपरेशन नंतर ती शक्यताही दुरावली होती.

चित्राच्या बोलण्यातून कळलं होतं की तिच्या वडिलांना मुंबईत चांगली नोकरी होती पण त्यांच्या व्यसनामुळे साऱ्या संसारावर अवकळा आली होती. धाकट्या दोन भावांच्या शिक्षणासाठी चित्रांने स्वतःच शिक्षण आठवीनंतर सोडलं होतं आणि गावातच एक लहानशी नोकरी धरली होती. आईसुद्धा मोलमजुरी करत होती. चित्रा तिला मिळणाऱ्या पगारातून कुटुंबाला मदत करत होती. तिला घरच्यांची आठवण यायची पण लांब राहून का होईना आपण त्यांना मदत करतोय हे जाणवलं की तिला बरं वाटायचं.

राजश्री आणि भाईसाहेबांनी तर या कुटुंबाला आधार द्यायचं ठरवलंच होतं.

  ॓चित्रा, तू आता इथेच राहून रात्र शाळेत जाऊन तुझं शिक्षण पूर्ण कर. आपण जमेल तसं तुझ्या भावांना आणि आईलासुद्धा आणू इथे. दीदी आणि भाईसाहेबांच्या या बोलण्याने चित्राच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. तिची रात्र शाळा सुरू झाली. राजश्रीने खटपट करून, डिपॉझिट भरून एक छोटी दीड खोलीची जागा या कुटुंबासाठी मिळवली आणि काही महिन्यातच चित्राची आई आणि भाऊही मुंबईला आले. राजश्री आणि भाईसाहेबांनी  ॓कमवा व शिका॔ असा चांगला गुरुमंत्र या कुटुंबाला दिला होता. कुटुंब खरंच गुणी होतं. जर मोठा दिनेश शाळेत जायच्या आधी जवळपासच्या सोसायटीतल्या चार-सहा जणांच्या गाड्या पुसायच्या तर कधी कुणाला दूध, भाज्या आणून द्यायचा. चित्राच्या आईला सुद्धा चांगली घरकामं मिळाली. धाकटा भाऊ जवळच्या शाळेत जायला लागला. सगळ्यांचं आयुष्य आधीपेक्षा सुकर झालं होतं.

अशीच एकदा राजश्रीची बालमैत्रीण सुलेखा एका लग्नाच्या निमित्ताने राजश्रीकडे चार-पाच दिवस राहायला आली होती. पाच वर्षांपूर्वी लग्न होऊन सुलेखा नवऱ्याबरोबर दुबईला गेली होती. त्यानंतर आत्ताच मैत्रिणींची भेट होत होती. त्यामुळे गप्पांना, खाण्यापिण्याला, फिरण्याला उधाण आलं होतं. सुलेखाचा नवरा सुरेंद्र दुबईत एका चांगल्या कंपनीत नोकरीला होता. सुलेखा तिथल्या शाळेत शिक्षिकेची नोकरी करत होती.

इथे आल्यावर, राजश्रीच्या घरी काम करणारी कामसू, विश्वासू, शांत स्वभावाची चित्रा सुलेखाच्या मनात भरली. त्यावेळी नुकतीच बारावी पास झालेल्या चित्रांनं पुढे कुठलं शिक्षण घ्यावं याची चर्चा राजश्रीकडे चालू असतानाच,  ॓चित्रासारखी मुलगी आपल्याला मदतीला मिळाली तर?॔ असा विचार सुलेखाच्या मनात चमकून गेला.

  ॓अगं, चित्राला आमच्याकडे दुबईला पाठवतेस का? तिथे आता मुलींसाठी स्पेशल होम सायन्सचा कोर्स सुरू झालाय. आम्ही चित्राला त्या कोर्सला घालू आणि मला चित्राची घरकामात मदतही होईल. आम्ही दरमहा तिच्या इथल्या अकाउंटमध्ये साधारण 22… 25 हजार रुपये जमा करू. तिचं शिक्षण होईल आणि पैसे पण जमतील.॔ सुलेखाने आपला प्रस्ताव राजेश्रीकडे मांडला.

राजश्री विचारात पडली. चित्राच्या कुटुंबाला पैशाची गरज तर होतीच. दोन्ही भावांचे शिक्षण, चित्राचं लग्न, मुख्य म्हणजे स्वतःची जागा असं सगळंच व्हायचं होतं. त्यांच्या राहत्या खोलीच्या कराराचे अकरा महिने कधी संपायचे कळायचंही नाही. मग राजश्रीलाच धावपळ करून, जादा भाडं कबूल करून जागेचं नवीन ॲग्रीमेंट करून घ्यावं लागायचं. सुलेखाच्या या प्रस्तावामुळे या कुटुंबाचा फायदा होईल असंच राजश्रीला वाटलं.

मुलीला एवढ्या लांब, अनोळखी ठिकाणी पाठवायला सुनंदाबाई प्रथम तयार नव्हत्या. मग चित्रानेच आईची समजूत घातली. चित्राला पासपोर्ट मिळाल्यावर सुरेंद्र सुलेखानं दुबईहून आवश्यक ती कागदपत्रं पाठवली. चित्राच्या येण्याचा उद्देश, तिची राहण्या जेवण्याची व्यवस्था, तिचा दरमहाचा पगार अशा बऱ्याच गोष्टींची नोंद तिथल्या सरकारी खात्यात झाल्यावर अखेर एकदाचं परवाना पत्र आणि तिकीट दुबईहून आलं. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उज्वल भविष्याची स्वप्न पाहत चित्रानं आईचा, दीदी आणि भाईसाहेबांचा आशीर्वाद घेतला. भावांना जवळ घेऊन निरोप घेतला आणि मोठ्या हिमतीनं विमानात पाय ठेवला. दुबई एअरपोर्टवर सुरेंद्र सुलेखा तिला न्यायला आले होते. चित्रा सुखरूप दुबईला पोचल्याचा फोन आला तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला होता.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संध्याछाया सुखविती हृदया… ☆ सौ. राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ संध्याछाया सुखविती हृदया… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

मिलिटरीमध्ये निर्णयात्मक, कडक शिस्तीच्या आणि नियम बद्ध वातावरणात वाढलेल्या कर्नल साहेबांचा खाक्या काही और होता. भल्या पहाटे निसर्गरम्य वातावरणात वावरायला त्यांना खूप आवडायचं. चिमणपाखरांची भाषा त्यांना अवगत असल्यामुळे त्या दोस्तांशी दोस्ती करून बागेतून गोल फेरफटका मारून ते आपल्या पेन्शनर मित्रांकडे वळायचे.

आज पंधरा दिवस झाले तरी वासुनानांचा पत्ता नव्हता. हॊ त्याला कारणही तसंच होतं आयुष्याच्या संध्याकाळी पुढे जाण्यात त्यांच्या बायकोने, 1ला नंबर पटकावला होता.

ती मला सोडून माझ्या आधी देवाकडे का गेली? ह्या प्रश्नांच्या भोवऱ्यातून वासुनाना अजूनही बाहेर पडले नव्हते.

अखेर ह्या मित्र मंडळींनी त्यांना बागेत आणलंचं. त्यांना बोलतं करण्यासाठी मित्रांची धडपड चालूच होती.

पण ‘आता मी काय करू? कसा जगू? वेळ, दिवस कसा घालवू? ह्या त्यांच्या प्रश्नाचं उत्तर कुणालाच देता येईना. सगळेच गप्प होते. सगळ्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं इतकं की कट्ट्यावर बसलेल्या मंडळींच्या तोंडून नेहमी एकच वाक्य बाहेर पडायचं.

“हम पंछी एक डालके” 

आणि बरं का! ह्या सगळ्यांचे पुढारी होते कर्नल साहेब. खूप विचार करून त्यांना एक आयडिया सुचली. उत्स्फूर्तपणे ते म्हणाले, “मंडळी मला एक विचार सुचलाय. आपण आता रिकामं बसून नाही चालायचं. रिकाम्या डोक्यात शिरू पाहणाऱ्या सैतानाची कत्तल करायची. एकदम गोळी मारायची त्याला” 

गोंधळलेल्या नागुअप्पांनी त्यांचा धबधबा आंवरत विचारलंन्, “अरे बा, कर्नलया तुझी मिल्ट्री भाषा सोड. आणि सरळ भाषेत बोल ना जरा! आपण नक्की काय करायचं ते तरी सांग. कुठून तरी वासुनाना निराशेतून बाहेर आलेचं पाहयजेतं”

“सांगतो,! सगळ सांगतो! नागूआप्पा तुमच्यापासून सुरुवात करूया. नागोजीराव अहो काय बॉडी आहे तुमची 85 पार केलीतं पण अजूनही 75 चेच वाटताय तुम्हीं. आहात कुठे! कर्नल साहेबांची गाडी रुळावर येतच नव्हती.

“अरे करण्या! तुझी गाडी रुळावरून घसरतीय लेका, मी काय विचारतोय आणि तू कां मला हरभऱ्याच्या झाडावर चढवतोयस?

आता मात्र सगळेच’एक डालकेपंछी’ओरडले”कर्नल साहेब मुद्द्यावर या, आणि सांगा तुमची भन्नाट आयडिया” 

कर्नल, भरदार मिशीतून मिस्कील हंसतं बोलते झाले, “आठवून बघा लहानपणीआपल्या शाळेत पी. टी. चा स्पेशल एक तास राखून ठेवलेला असायचा.

हॊ असायचा, पण मग त्याचं काय इथं? आपण काय आता त्या पी. टी. ला जाऊन वेळ घालवू शकतो का?

 “अहो मुद्याचं बोला हॊ कर्नल साहेब “उतावळे साठीचे संभाजीराव आता मात्र कावले होते. त्यांच्या गरम होत चाललेल्या डोक्यावर हात ठेवून साहेब म्हणाले, धीर धर! यार असा तापू नकोसआपल्या डोक्यात सैतान नकोय आणि संतापही नकोय. तुमच्या अधीर मनाला अधिक न ताणता माझ्या भेजातल्या आयडिया सांगतो,

 असं बघा नागप्पा ती समोर बालमंडळी बसली आहेतं ना, मोबाईल मध्ये डोकं खूपसून, त्यांना आपण मैदानात मोकळ्या हवेत, कोवळ्या उन्हात आणायचं आणि व्यायामात गुंतवायचं. एका जागी बसलेल्या ह्या गुळाच्या ढेपा हलल्याच पाहिजेत. बागेच्या गोल रिंगणात त्यांना पळवायचं. ” 

अरे पण महाभागा ती पोरं तयार होतील कां?

 कां नाही? त्यांचे बापही तयार होतील. पिझ्झापास्ता खाऊन ढेकर देणाऱ्यांना रींगणात पळवलेलं त्यांच्या आईबापांनाही नक्की आवडेल.

“अगदी बरोब्बर! मुलांना शिस्त लावणे त्यांना नाही जमलं, पण ते आपण जमवलं, आणि मी म्हणतो परस्पर पावणे बारा वाजले तर आईबाप कशाला विरोध करतील? उलट त्यांच्या ते पथ्यावरच पडेल. आपणचं सुरुवात करूया”

” बेस्ट आयडिया” आप्पा उत्साहाने उभे राहयले.

मिशीतल्या मिशीत हंसणाऱ्या कर्नल साहेबांच्या मनात आलं, होईल -होईल, दोस्तांना गुंतवण्याचा आपला प्रयोग नक्कीच यशस्वी होईल. त्यांच्याअंगात चैतन्याचं वारं सळसळायला लागलं.

आणि मग कर्नल पुढे सरसावून म्हणाले, “म्हणजे आयडिया नंबर एक पटलीय ना तुम्हाला? कापऱ्या हातांच्या टाळ्या खणखणीत वाजल्या आणि बेंबीच्या देठापासून, शाळकरी मुलांसारखा कोरस भरगच्च होकार दणदणला.

कोपऱ्यातून विशूभाऊंचा आवाज आला, “अरे त्या बालचमुंबरोबर आपणही कवायत करू या की! त्यांना लगोरी, विटी दांडू काकडी कोशिंबीर इत्यादी खेळ शिकवूया. पोरं दमली कंटाळली तर मामाच पत्र हरवलं, बटाटा शर्यत इत्यादी गंमतीशीर खेळात त्यांना आपण गुंगवूया. हे जुने मजेचे खेळ खेळताना बागेतल्या कुंदकळ्यांबरोबर या बाळ गोपाळांच्या हास्यकळ्याही उमलतील. “कोपऱ्यातल्या त्या आवाजाला टाळ्यांनी दणकून दाद दिली. आणि पेन्शनरांच्या घोळक्यातून दिलखुलास खोडकर हंसू बाहेर पडलं. कर्नलचा खणखणीत आवाज दणाणला, “सुनो यार! आता आयडिया नं. 2 ते आपलं, वर्तुळातलं, समोरचं फिरत मोफत वृत्तपत्र वाचनालय आहे ना! तिकडे आपल्याला आता वळायचय” 

“त्यात काय! रोजच आपण जातो की तिथे. ती तर आपली फेवरेट जागा आहे. जगातल्या उलाढाली, राजकीय गोष्टी, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान याची बँक लुटायला. गप्पांचा फड संपल्यावर या आवडत्या अड्ड्याकडे आपण हमखास रोजच वळतोच की, कोवळ्या उन्हाची शाल पांघरून पेपर वाचायला का मज्जा येते राव!

त्या सुखकल्पनेतून मित्राला बाहेर काढत कर्नल म्हणाले, “सदुभाऊ पण या अड्डयावर आता आपण ह्या बाळगोपाळांना पण घेऊन जायचंय. “

काय सांगताय! पण येतील का ती पोर आपल्या म्हाताऱ्यांच्या बरोबर?

अहो येतील की, आपण त्यांचे प्रेमळ आजोबा होऊन त्यांची मोबाईल मधली मान वर्तमानपत्रात अडकवायची. असं बघा, अण्णांना वयामुळे दिसत नाही. ही छोटी मंडळी पेपर वाचून दाखवतील त्यांना.

मुलांना पण त्यामुळे स्पष्ट उच्चाराची, मराठी वाचायची, सामाजिक जबाबदारीची जाणीव होईल”.

रघुदादांनी अण्णांच्या पाठीवर थाप मारली. “अण्णा लेका दुहेरी फायदा होईल तुझा. त्या मुलांचा आणि त्यांच्या बापांचा पण फायदा होईल. ” 

“तो कसा काय?

असं बघ मोबाईलचं भूत मानगुटीवर बसल्यामुळे पोरांचं डोकं आणि डोळेही बिघडलेत. तासंतास स्क्रीन समोर बसल्याने पाठदुखी, मान दुखी, चिडचिडेपणाआणखी काही विकारांनी आकार घेतलाय.

 त्यांच्या विकासाचा कणाच मोडलाय रे!

त्यांना दुजोरा देत जोशीभाऊ म्हणाले, “वर्तमानपत्रात राजकारण, खेळ, अर्थशास्त्र एकाच ठिकाणी मिळेल त्यामुळे मेंदूला चालना मिळून मेमरी वाढते. शब्दसंग्रह वाढून ज्ञानात भर पडते. नियमित वाचनाची सवय लागून रिकामं मन सैतानाचं घर न बनता बुद्धीचा आगर होतं. ” 

इतका वेळ पेपर वाचणारे गजाभाऊ ओरडले “अरे ही बघा आजकी ताजी खबर, उत्तर प्रदेश सरकारने शाळांमधून हिंदी आणि इंग्रजी वर्तमानपत्रे उपलब्ध करून देण्याचा आणि प्रार्थनेच्या आधी दहा मिनिटे वृत्तपत्र वाचनाचा निर्णय घेतलाय. आणि जगभरातून ह्या निर्णयाचंशाळांतून स्वागतच झालय”

हे ऐकल्यावर कर्नल साहेबांनी आनंदाने आरोळीच ठोकली. “अरे मग आपणही हा निर्णय मान्य करून मराठी पेपर वाचन सुरू करूया. मुलांच्या जिभेला मातृभाषेचं वळण लाऊ. इंग्लिश मीडियम मुळे मराठी इंग्रजीची त्यांच्या बोलण्यात येणारी खिचडी तरी वाचेल. कर्नल साहेब बाकी तुमच्या पोतडीतल्या आयडिया भन्नाटचं असतात. उशीर कशाला! उद्याचाच मुहूर्त धरू.

बागेतल्या मारुती पुढे शकुनाचा नारळ फोडून, खोबऱ्याचा प्रसाद वाटून, कार्यक्रमाचा श्री गणेशा आत्ताच करूया.

कर्नल साहेबांनी पिल्लू सोडलं “मंडळी आता गुढीपाडवा जवळचं आलाय सगळ्या भाभीजींना माझा निरोप सांगा भरपूर मसाले भात करून आणायचा. कडुलिंबाच्या चटणीचा उतारा हवाच श्रीखंडपुरीची ऑर्डर देऊया. आणि साजरं करूया वनभोजन. उंच उंच गुडी बागेतच उभी करूया. मदतीला चिल्लीपिल्ली वानर सेना आपल्या हाताशी असेलच. अशाप्रकारे चैतन्य बागेत चैतन्य उसळलं. सगळ्यांनी ही कल्पना उचलून धरली आणि होकार भरला 

 मंडळी काय सांगू तुम्हाला! तेव्हांपासून दरवर्षी ह्या चैतन्य उद्यानात गुढीपाडवा साजरा केला जातो बागेत उंच उंच गुढी उभारली जाते. माळापताकांनी बाग सजवली जाते. हौशी पुरुष मंडळी सनई सुरू करतात आणि मग काय! त्या चैतन्य बागेत वनभोजन साजरं होतं. नववर्षाची अशी ही उत्साही आनंदी सुरुवात गुढीपाडव्यापासून सुरू झाली.

अशा प्रकारे कर्नल साहेबांचा उपक्रम पार पाडतांना सगळेच आनंदात असतात.

बायकोच्या वियोगाचं काही काळ का होईना वासुनाना दुःख विसरलेत. कारण बागेत रोज पेपरवाचन, कवायत पकडापकडी, पळणे, p. T. चा तास साजरा होतो. बाल मंडळींबरोबर हे ज्येष्ठही आता चिरतरुण झालेत. दुःख आणि दुखणं गोंजारायला त्यांना आता वेळच नाहीय्ये बरं का!

आणि हॊ ह्याचं सगळं श्रेय नक्कीच कर्नलसाहेबांनाच आहे. तर धन्यवाद कर्नल साहेब. मित्र-मैत्रिणींनो तुम्हांलाही गुढी पाडव्याच्या आत्तापासूनच शुभेच्छा.

धन्यवाद 

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संस्कार…!  लेखक : श्री चंद्रशेखर गोखले ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ संस्कार…!  लेखक : श्री चंद्रशेखर गोखले ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे

दुसरीत असताना एक धडा होता, एका शाळेत वार्षिक तपासणी सुरू असते. पाहुणे येतात, दोन मुलांना वर्गासमोर उभे करून विचारतात… सांगा बघू या दोघात श्रीमंत कोण आहे? एक दात किडका, हडकुळा मुलगा उभा असतो पण त्याच्या अंगावर मखमली सदरा असतो, टेरीकाँट्ची विजार असते, गळ्यात सोन्याची साखळी असते, पायात महागडे बुट असतात.

दुसरा मुलगा सुदृढ असतो, स्वच्छ दातांचा, हसतमूख, पण त्याचा गणवेश साधा असतो, त्याच्या गळ्यात दत्तात्रेयाचा काळा धागा असतो, पायात साध्या चपला असतात. मुलं काय पहिल्या मुलाकडॆ श्रीमंत म्हणून बोट दाखवतात.

कसले हे धडे? या पासून काय धडा घ्यायचा आम्ही? गरीब श्रीमंत हा भेद मात्र. त्या कोवळ्या वयात मनात जो ठसला तो पन्नाशी गाठे पर्यंत… तेंव्हा माझ्या डोळ्या समोर श्रीमंत मुलगा म्हणून यायचा तो आमच्या वर्गातला अर्णव तळवलकर… तो राहायलाही आमच्या समोर होता. ज्या काळात शेखर, मकरंद, उदय, शैलेश, दिलीप अशी ठरलेली नावं ऐकीवात होती त्या काळात या तळवलकारांच्या मुलाचं नाव अर्णव होतं. त्याच्या धाकट्या बहिणीचं नावही असच खास… जयजयवंती.

तशी अर्णवकडची प्रत्येक गोष्टच खास होती, त्या काळात त्याच्या हॉलमधे फ्रीज होता, घरात गुळगुळीत फरशी होती, शोभिवंत कार्पेट होतं, जेवायला बसण्यासाठी डायनींग टेबल होतं, फुलदाणीत कायम ताजी फुलं ठेवलेली असायची. टेबलावर डीशमधे रसरशीत फळं ठेवलेली असायची.

त्याची आई बिनबाह्यांचा ब्लाऊज घालायची, घरात वावरताना पायात स्लीपर घालायची, अर्णवच्या बाबांना अरे तुरे करायची..

आणि आमच्याकडे? सतत ओचा पदर खोचलेली, सतत कामात गर्क असलेली माझी आई. एक अंधारं स्वैपाकघर जिथे सतत तळणीचं काम चालायचं, एक दुरमुखलेली बैठकीची खोली.. दोन खुर्च्या कधीकाळी घेतलेल्या. आलेली पत्र अडकवण्यासाठी एक तार खिडकीत लटकलेली असायची. वेलजी भाई अँड सन्सचं फुकटात मिळालेलं बटबटीत कँलेंडर दुसर्‍या खिळ्यावर फडफडत असायचं.

केवढा हा विरोधाभास? कधी अर्णवकडे जावं लागलं तर, तर त्याची आई भूतदया दाखवल्यासारखं माझ्याशी चांगलं वागायची, अर्णवला माझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नसायचा. पण त्याची आई माझ्यासमोरच त्याला समजवायची.. “असं नाही करायचं, शेखर तुझ्या वर्गात आहेना? ” तो माझ्याकडे आणखिनच तुच्छतेने बघायचा. कारण शाळेत बाई माझ्याशी कशा वागतात हे त्याला माहीत होतं. म्हणूनच मला सुद्धा त्याच्याघरी जायला मनापासून आवडायचं नाही. पण जावं तर लागायचच

कारण अर्णवची आई आमच्या आईकडून थालीपिठाची भाजणी, चकल्या, चिवडा, कुळथाचं पीठ असं काही ना काही घेत असायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसे नकद द्यायची. आणि माझ्या हातावर पेपरमिंटची गोळी. एव्हाना पंचक्रोशीत माझ्याकडे दयेनं पाहणार्‍यांची संख्या वाढतच होती. त्यात अर्णवची आई आघाडीवर होती, ‘ छायाताई बघ किती कष्ट करतात? कुणासाठी? तुझ्यासाठीच ना? मग अभ्यास नको करायला? ’ हे समीकरण मला तेंव्हाही लक्षात यायचं नाही.. अजूनही येत नाही, आई कष्ट करते त्या बदल्यात मी अभ्यास करायचा? … मग आईचं सामान पोहचवून यायचो, गरम गरम पातेलं शेगडीवरून उतरवायला मदत करायचो, वाळवणं सांभाळायचो ते कशाच्या बदल्यात होतं?

पण कोणताही प्रश्न विचारायचा मला अधिकार नव्हता. कारण एक दोन वर्ष माझी दांडी उडाली होती. आता अर्णवही माझ्या वरच्या इयत्तेत गेला होता. तो काळ असा होता की, तुम्ही शालेय जीवनात अपयशी ठरलात की तुमचा जन्म वाया गेला. मग नाही नाही ते दोष तुम्हाला येऊन चिकटणार, जो बोलणार नाही तो आळशी… समोरचा आपल्याशी असा का वागतो? हे तेव्हा बरेचदा लक्षातच यायचं नाही.. एकदा असच झालं… ,

तेंव्हाचं आमचं पार्लं म्हणजे तुरळक वस्तीचं टुमदार गाव होतं. तिन्हीसांजेआधीच सामसूम व्हायची. इतकी की लोकलचा आवाज गावात घुमायचा, तशी त्या काळातही अर्णवची आई सोबत कामवाली घेतल्याशिवाय फिरायची नाही, ते ही ती दोन पावलं मागे.. अर्णवची आई पुढे, बाईच्या हातात पिशव्या, अर्णवच्या आईच्या हातात फक्त पर्स. पण त्या दिवशी काय झालं कोण जाणे… प्रार्थना समाजच्या इथल्या चिंचोळ्या रस्त्यावरून ती एकटीच चालली होती, वातावरण अंधारलेलं, रस्त्यावर तुरळक रहदारी, तिच्या हातात सामानाच्या पिशव्या… योगायोग असा की माझ्या आधी अर्णव तिथूनच सायकलवरून पास झाला, तेंव्हा आम्ही दोघे टिळक मंदिराच्या व्यायाम शाळेत जायचो. एकदमच बाहेर पडायचो. पण त्याच्या बाबानी त्याला नवीन स्टायलीश सायकल घेऊन दिल्यापासनं त्याच्या लेखी माझा भाव आणखीनच घसरला होता. तो पुढे निघून गेला.

मला आश्चर्य वाटलं. आम्हाला आई रस्त्यात अचानक दिसली की कोण आनंद व्हायचा,… अक्षरश: आम्ही उड्या मारायचो.. जरा हातातली पिशवी घे असं आईला सांगावं लागायचं नाही. ते आपोआपच आमच्याकडून घडायचं. आम्ही सगळीच भावंड आईसाठी वेडी होतो. पण अर्णव मात्र भुर्र्कन निघून गेला, मी त्याच्या आईपाशी थांबलो. म्हंटलं ‘आज उशीर झाला तुम्हाला…’

त्या ‘हो अरे…’ म्हणत काहीतरी बोलल्या. मी म्हणालो, द्या पिशव्या मी घरी नेऊन पोहोचवतो. त्याना पण ओझं जडच झालं होतं. त्या सुखावल्या. पटकन पिशव्या माझ्या सायकलला लावल्या, आणि मी निघणार… तेव्हढ्यात त्यांनी मला थांबवलं. क्षणात, क्षणापुरता त्यांचा अविर्भाव बदलला.

तो बदल, त्यांचा तो सावधपणा, त्याही वयात मला खटकणारा होता. सावध होत, त्यांनी सहजपणाचा आव आणत त्यांची पर्स काढून घेतली. त्यांच्या या कृतीला अनेक पदर होते. माझी कौटूंबीक पार्श्वभूमी, माझी शालेय प्रगती, माझ्याबद्दल मारले जाणारे शेरे, ताशेरे… निमूट राहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मी निमूट पुढे झालो.

काळही पुढे जात होता. अर्णव वारेमाप शिकला. मधे दोन तीन वर्ष अमेरिकेला सुद्धा होता… मी पण सुचेल ते लिहित होतो. नशिबाने हात दिला होता, त्या आधी घर सोडलं. पार्लं कायमचं सुटलं होतं, अर्णवचं लग्न झालं, त्याचे बाबा गेले, जयजयवंती सासरी गेली, हे सगळं कानावर येत गेलं. माझी गोष्टही माझ्या परीने पुढे सरकत होती.

मग “मी नवा ” हे आणखी एक पुस्तक बाजारात आलं. या पुस्तकाच्या निमित्ताने दिलिपभाईनी एक कार्यक्रम पार्ल्याचा मार्केटमधल्या राममंदिरात ठेवला. तिथे अर्णवची आई आली आणि मला भेटायला थांबली. जाताना इतकेच म्हणाली, “ उद्या मला इथेच भेटशील का? माझं महत्वाचं काम आहे. ”

मी उमाकडे बघितलं. तिने मला कळेल अशी मान तुकवली आणि भेटायची वेळ ठरली. आणि ठरल्याप्रमाणे आम्ही भेटलो सुद्धा… औपचारीक बोलणं गरजेपुरतं झाल्यावर त्या म्हणाल्या, “ माझं एक महत्वाचं काम आहे “… असं म्हणत त्यानी एक पुरचूंडी माझ्या हवाली केली. म्हणाल्या यात चवदा तोळे सोनं आहे. कसंही करून तू हे जयूला नेऊन दे. मी जाणं शक्य नाही आणि ती आली तरी मी हे करू शकत नाही. कारण माझ्यावर सुनेचा आणि नातवंडाचा पहारा असतो. हे अर्णवच्या हाती लागलं, तर हे सुद्धा तो गिळून टाकेल. घर आणि काही पाँलीसीज त्याने फसवून माझ्या सह्या घेऊन बळकावलं आहेच, घर त्याने त्याच्या नावावर करून घेतलंय, हे त्याच्या सी ए नेच मला सांगितलय. मी मला माहीत नसल्याचा आव आणून त्या घरात खोट्या मानाने राहते, पण मी पुर्णपणे त्याच्या कह्यात आहे.

… आधी घर स्वच्छ ठेवायला धडपडत होते. आता सगळं नीट आहे हा लोकांचा गैरसमज टिकवायला धडपडते आहे. मला माहीत आहे, मी गेल्यावर हा जयुच्या तोंडाला पानं पुसणार आहे. देवदयेनं तिला काही कमी नाही, पण तरी आईकडून असं काहीतरी मला तिला द्यायचं आहे… पिशवीतून पर्स काढून घेणार्‍या त्याच होत्या. ती पुरचुंडी स्विकारणारा मीच होतो. भोवतीचं पार्लंही तेच होतं पण.. पण काळ बदलला होता..

– – मला काय वाटतं माहितिये, यशाने तो माणूस बदलत नाही, पण त्याच्याकडे बघण्याचा इतरांचा दृष्टिकोन बदलतो…

त्यांनी जयजयवंतीचा घाटकोपरचा पत्ता दिला, सवड झाली की जा म्हणाल्या..

मी घाईने म्हणालो “ इतकं जोखमीचं काम, सवडीनं जा काय… मी उद्याच जातो. तुम्ही तिला तसं कळवून ठेवा…”

– – खरं सांगतो ती चवदा तोळ्यांची पुरचुंडी खिशात जपून ठेवली आणि डॊळ्यासमोर त्या धड्यातली दोन मुलं उभी राहीली… त्यांच्या जागी अर्णव आणि मी दिसायला लागलो आणि श्रीमंतीचा खरा अर्थ समजला…

… घेतलेली कामगिरी उद्या चोख बजावल्यावर तर, अर्णव माझ्याशेजारी उभा राहूच शकत नव्हता…

लेखक : श्री चंद्रशेखर गोखले

प्रस्तुती : प्रभा हर्षे

 ९८६०००६५९५

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हास्य… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ हास्य… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

“सायकल चालवता येते का?? “

त्याच्या प्रश्नाने ती गडबडली कारण नेमकं तिचं ‘स्वप्न काय’ त्याने विचारताच ती म्हणाली, “नवऱ्यासोबत टू व्हीलरवर बसून वेगात हुरर करत हिंडायचं… “

तिचं स्वप्न ऐकताच त्याचा हा प्रश्न… ती मग हळूच म्हणाली, “थोडी थोडी जमते.. “

तो म्हणाला, “हरकत नाही, आपल्याकडे प्रॅक्टीसला टू व्हीलर नाही, सायकल आहे म्हणून विचारलं… “

ती थोडी हिरमुसली, पण तो मात्र खळखळ हसला होता, कारण स्वतःला सायकल येत नाही पण त्याच्या मागे बसून हुरर करत हुंदडायचं स्वप्न ती बघत होती.

‘सायकल’ ऐकून बहुतेक ‘नकार’ हे समजून त्याचं रुटीन सुरू होतं. सायकलवर टांग मारून तो निघणार तेवढ्यात जोशी आजी गॅलरीतून ओरडल्या, “बंड्या होकार आलाय… उद्या येत आहेत ते तारीख काढायला… “

मन हवेत तरंगलं आणि सायकल सुध्दा हवेत चालली त्यादिवशी. पुढे सगळं स्वप्नासारखं घडत गेलं. कोणी नसलं तरी चाळीतल्या सगळ्यांनी सगळ्या भूमिका घेतल्या. जोशी आजी पुढाकाराला होत्याच, भाले मामा झाले, कोणी काका, कोणी करवल्या, असं करत गरिबीतलं कार्यही माणसांच्या प्रेमामुळे श्रीमंत झालं. बंड्याचे दोनाचे चार हात झाले तेंव्हा आजी म्हणल्याच, “नशिबात असलं की घडतच नाही, तर चांगले बंगल्यावाले पोरं बिनलग्नाचे बसलेत. बंड्याने नशीब काढलं. गुणी पोरगीं मिळाली… “

सगळं नवं स्वीकारत ती बंड्याशी नातं जपत होती. बंड्याही तसाच, परिस्थितीने गरीब असला तरी मनाने श्रीमंत असलेला… रोज गजरा चूकत नव्हता… ती ही सगळं स्वीकारणारी, फक्त एक खंत, टू व्हीलर डोळ्यासमोरुन जात नव्हती…

एकदा उगाच काहीतरी बिनसलं आणि तिने स्वप्न छेडलंच. “मी म्हणालेच होते बाबाला, तो सायकलवाला आहे… गाडी घोडी नाही त्याच्याकडे… “

तिच्या या वाक्याने तो हिरमुसला, डबा उचलून गपचूप निघून गेला. उगाच बोललो असं वाटून ती रडवेली झाली. जोशी आजीकडे जाऊन मुसमुसुन रडली. आजीला सगळं सांगितलं.

आजीने पाठीवर हात फिरवत जवळ घेतलं आणि म्हणाली, “बंड्याला कोणी नाही, ह्या चाळीचा जिना झाडून मिळालेल्या भाकरीवर मोठा झाला. माझ्या शिकवण्यांमध्ये येऊन बसायचा म्हणून त्याला शाळेत टाकलं. जिन्याखाली राहायचा. शिकला, ही छोटी नोकरी मिळाली, ही खोली भाड्याने घेतली, पै पै जमवून ही सायकल घेतली. आयुष्यात तू आलीस, आता आणखी दिवस बदलतील बिचाऱ्याचे… पण तू एक लक्षात ठेव, त्याचं आणि तुझं, दोघांच्या चेहऱ्यावरचं हास्य ज्या दिवसापासून ह्या वस्तूंसाठी हरवायला लागेल त्या दिवसापासून संसार फक्त एक कर्तव्य राहील, त्यातलं हास्य लोप पावेल… वस्तू येत राहतील, पण त्यासाठी लागणारा वेळ तुला सहन करावा लागेल, तरच खरी गंमत,.. “

तिलाही पटलं… ती घरी पळाली. त्याची येण्याची वेळ झालीच होती. आवरून जिन्यापाशी थांबली. तो दिसताच म्हणाली, “गाडीवर मागे नाही, तर सायकलवर समोर बसायचं आहे मला… तुला येते का तशी डबलसीट चालवता..? “

तो हसला. ती सायकलच्या दांडीवर बसली… त्याने गजरा तिच्या केसात माळला. सुगंधी वाऱ्यात.. एकदम जोरात… खळखळ हास्याच्या तालावर सायकल वेगात निघाली.

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

छत्रपति संभाजी नगर महाराष्ट्र

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जानते हो मेरा बाप कौन है…? ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ?

☆ जानते हो मेरा बाप कौन है…? ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

जानते हो मेरा बाप कौन हैं – – 

 – – आणि माझा तोतरेपणा*…

मी एका बहुराष्ट्रीय खाजगी बँकेत नोकरी करतो. मी लहानपणापासूनच तोतरा आहे. जसजसे माझे वय वाढत गेले, तसतसा हा तोतरेपणा बराच कमी झाला आहे, पण अजूनही, संधी मिळताच, तो पुन्हा डोके वर काढतोच.

बँकेच्या नोकरीत अनेकदा या तोतरेपणावरून मी चेष्टा सहन केली आहे, टपल्या खाल्ल्या आहेत, माझ्या अनुपस्थितीत या तोतरेपणामुळे माझी खिल्ली उडवली जाते. पण मला आता या सगळ्याची सवय झाली आहे.

अशा सगळ्यांची तोंडं मी माझ्या अचूक कामाने बंद करतो.

दुर्दैवाने, आजही असे बरेचजण आहेत जे तोतरेपणा असलेल्या लोकांना ‘मंद’ किंवा ‘निर्बुद्ध’ समजतात.

असो, आज जी घटना सांगत आहे, त्या दिवशी बँकेत आमच्याकडे कर्मचाऱ्यांची कमतरता होती, त्यामुळे कामकाज सुरळीत चालू ठेवण्यासाठी आणि ग्राहकांना गैरसोय होऊ नये म्हणून, मला माझे नेहमीचे काम सोडून ‘स्वागत कक्षा’ची जबाबदारी घ्यावी लागली.

आमची शाखा ही एक खूपच गजबजलेली शाखा होती. इंडस्ट्रीयल भाग आणि उच्चभ्रू लोकांच्या बंगले – सोसायट्यांमध्ये आमची शाखा होती, त्यामुळे कारखान्यातील कामगारांपासून समाजातील श्रीमंत व्यक्तींपर्यंत सगळेच जण आमचे खातेधारक होते.

एरवीही आमच्याकडे गर्दी असायचीच आणि आजतर आणखीनच बिकट परिस्थिती होती. आजही रांगा लांब होत्या आणि नेमकी आज वातानुकूलन यंत्रणा (air conditioning) काम करत नव्हती, दुरुस्तीसाठी मेकॅनिक बोलावले होते पण ते अजून दोन तीन तासांनी येणार होते. ग्राहक व कर्मचारी दोघेही उकाड्याने हैराण झाले होते.

आम्ही सगळेच एरवी अगदी सूट – टाय असे फॉर्मल कपड्यांत असतो, पण आज इतर सर्वांप्रमाणेच, मीही माझी टायची गाठ सैल केलेली होती, बाह्या दुमडलेल्या होत्या आणि जॅकेट / सूट मी माझ्या नेहमीच्या टेबलावर काढून ठेवलं होतं.

मी नुकतेच एका ग्राहकाचे काम पूर्ण केले होते, आणि एका झकपक कपडे घातलेल्या महिलेने रांगेत पुढे घुसण्याचा प्रयत्न केला, रांगेत पहिल्या असलेल्या बाईला बाजूला ढकलले.

मला ती जे काही सांगत होती, ते न ऐकताच, मी तिला अत्यंत नम्रपणे इतरांप्रमाणेच रांगेत येण्यास सांगितले. आणि रांगेत आता पहिल्या असलेल्या महिलेचे काम करू लागलो.

हे तिला आवडले नाही, आणि ती आरडाओरड करू लागली. “आणखी काऊंटर का नाहीत ? अधिक स्टाफ कामाला का लावलेला नाही ? आम्हाला किती उशीर होतोय ? ” वगैरे, वगैरे.

तिच्या शब्दांत, ती “या बँकेची एक खूप महत्त्वाची ग्राहक” होती.

मी तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि दुसऱ्या महिलेचे काम करत राहिलो. ती गेल्यावर, त्या मागच्या बाईने पुन्हा रांगेत पुढच्या व्यक्तीच्या पुढे घुसण्याचा प्रयत्न केला, आधी तिचे काम करण्याची मागणी केली आणि आपण किती महत्त्वाचे ग्राहक आहोत, आपला वेळ किती अमूल्य आहे वगैरे कॅसेट पुन्हा वाजवली.

“त् त् तुम्ही फ् फ् फारच छान आणि महत्त्वाची माहिती दिलीत, म् म् मॅडम” मी म्हणालो, “आता प् प् प्लीज रांगेत उभ्या राहा आणि त् त् तुमच्या आधी आलेल्या या सगळ्यांप्रमाणे आपला क्रमांक येण्याची वाट पहा. ” आणि मी रांगेतील पुढील माणसाची अडचण जाणून घेऊ लागलो.

“बँकेने अशा बकवास, लायकी नसलेल्या माणसाला या काऊंटरवर का बसवलं आहे ? ” ती मोठ्या आवाजात विचारू लागली.

तिने पुन्हा रांगेत घुसायचा प्रयत्न केला, मी पुन्हा तिला रांगेत उभं राहायला सांगितलं. यामुळे आगीत तेल पडल्यासारखं झालं. ती बाई खूपच चिडली. आणि ‘मी तिचा अपमान केला, तिला शिवीगाळ केली, असभ्यपणे बोललो’ अशी ओरड करू लागली.

पैसे काढणे – भरणे, परकीय चलनासाठी एक आणि मी काम करत होतो ती स्वागतकक्षाची एक अशा एकूण तीन रांगा होत्या. ही उपटसुंभ बाई या तीनही रांगांत फिरून, आधीच वैतागलेल्या ग्राहकांना आणि कर्मचाऱ्यांना चिथावण्याचा प्रयत्न करू लागली. दाणदाण पावले टाकत ती येरझाऱ्या घालत होती, आणि तरी कोणी काही लक्ष देईना म्हटल्यावर, ‘मला मुख्य मॅनेजरला भेटायचं आहे, या उर्मट माणसाची तक्रारच करायची आहे, त्याला कामावरून काढूनच टाकायला लावायचं आहे, जानते हो मेरा बाप कौन हैं ? ‘ वगैरे बडबडत फिरत होती.

जसजसा वेळ जात होता, तसतशी माझ्या चुकांची यादी इतकी लांबत चालली होती की, ते ऐकणाऱ्या कोणालाही वाटले असते की मी जणू तिच्यावर प्राणघातक हल्लाच केला होता.

मी खूण करून, ऑपरेशन्स मॅनेजर मंदारचे (जो शाखेच्या दैनंदिन कामकाजाची आणि कर्मचाऱ्यांच्या बाबींची काळजी घेत असे) लक्ष आमच्याकडे वेधून घेतलं. त्याच्यासमोरील ग्राहकाचे काम संपल्यावर, बाहेर काय चालले आहे हे पाहण्यासाठी तो त्याच्या केबिनमधून बाहेर आला. त्याने त्या महिलेला स्वतःची ओळख करून दिली आणि विचारले की तो काही मदत करू शकतो का.

लगेचच तिचे वागणे बदलले. आरडाओरडा थांबवून तिने आग्रह धरला की मी उद्धटपणे वागलो होतो, मी माफी मागितली पाहिजे आणि बँकेने मला ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे.

तिला मॅनेजरच्या केबिनमध्ये बसून लेखी तक्रार करायची होती.

तिला शांत करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे, बँकेच्या हॉलमधील वातावरण शांत करण्यासाठी, त्याने तिला बँकेतील कॉन्फरन्स खोलीत नेले.

काही मिनिटांनंतर, दुसरा एक कर्मचारी मला बोलावण्यासाठी बाहेर आला आणि म्हणाला की मला मंदार सरांनी कॉन्फरन्स खोलीत बोलावले आहे.

मी दार वाजवून आत गेलो. त्या बाईला सगळं तिच्या मनासारखं होत असल्याची खात्री पटली होती, त्यामुळे मी दिसताच तिने माझ्याकडे बोट दाखवले. “हो, हाच तो. याला माझी माफी मागायला लावा, याला कामावरून काढून टाका नाहीतर मी तुमच्या मुख्य कार्यालयात पत्र लिहीन.”

मंदारने माझ्याकडे पाहिलं, मी हसून खांदे उडवले. “मला माफ करा, मी तसे करू शकत नाही, ” तो तिला म्हणाला.

“का नाही, तुम्हीच या शाखेतले सगळ्यात मोठे अधिकारी आहात ना ? तुम्हीच ब्रँच मॅनेजर आहात ना?”

मंदारने नकारार्थी मान हलवली. “नाही, मी फक्त ऑपरेशन्स मॅनेजर आहे, ” तो तिला म्हणाला.

झालं, तिचा सोज्वळपणाचा मुखवटा तिने तत्काळ फेकून दिला, पुन्हा गोंधळ घालायला सुरुवात केली, आणि “मला ‘खऱ्या’ मॅनेजरशी बोलायचे आहे, फालतू छोट्यामोठ्या अधिकाऱ्यांना भेटण्यात मला इंटरेस्ट नाही”, म्हणू लागली.

मंदार काहीतरी बोलणार होता, पण मीच त्याला थांबवले. “मी ब्रँच मॅनेजरना बोलावतो, ” असं म्हटलं आणि खोलीतून बाहेर पडलो.

काही मिनिटांनंतर मी कॉन्फरन्स खोलीत परत आलो. आत्ता येताना मी माझ्या शर्टाच्या बाह्या खाली करून बटणे लावली होती, टाय व्यवस्थित बांधला होता आणि माझा सूट घातला होता.

“कुठे आहे तुमचा मॅनेजर ? ” तिने माझ्यामागे कोणी आहे का हे पाहण्यासाठी आजूबाजूला पाहत विचारले.

“म् म् मॅडम, म् म् मी स्वतःच ब्रँच म् म् मॅनेजर आहे, ” मी तिला म्हणालो, “आज स्टाफ क क कमी असल्याने सहकाऱ्यांना म् म् मदत करण्यासाठी मी त्या काऊंटरवर बसलो होतो. त् त् तुमच्या तक्रारीत काही त् त् तथ्य नाही हे तुम्हालाही म् म् माहित आहे. नीट रांगेत उभ्या राहिल्या असतात तर एव्हानापर्यंत त् त् तुमचे काम होऊनही गेले असते.

इत:पर, तुम्ही खूप महत्त्वाच्या कस्टमर आहात असंच तुम्हाला वाटत असेल, तर या शाखेतले खाते बंद करून तुम्ही दुसरीकडे जायला मोकळ्या आहात, तसा अर्ज तुम्ही स्वागत कक्षावर देऊ शकता. हां, अर्थात तो अर्ज देण्यासाठी तुम्हाला रांगेतच उभे रहावे लागेल. “

मी बोलायचा थांबलो, तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते. मंदारने फक्त स्मितहास्य केले, त्याने आपली भूमिका अगदी परिपूर्णपणे बजावली होती.

आणि “जानते हो मेरा बाप कौन हैं” वाली आमची कस्टमर मान खाली घालून निमूटपणे कॉन्फरन्स खोलीतून बाहेर पडली.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मैत्री… भाग – २ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे☆

श्री मेघ:श्याम सोनवणे

? जीवनरंग ?

☆  मैत्री… भाग – २ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆  

(अचानक विचार आला. आपला एखादा मित्र कार्यक्रम सोडून इथे आला तर? त्याने आपल्याला अशा अवतारात बघितलं तर? गावातल्या एका मोठ्या, श्रीमंत शेतकऱ्याचा मुलगा स्वतःच वावरात राबतोय! पाण्याची बारी देतोय! चिखलाने बरबटलेले कपडे घालून लागवड करतोय! या कल्पनेनेच मला कसंतरी झालं.) – इथून पुढे – – 

बघता बघता दुपार उलटली. कार्यक्रम सोडून आपल्याला बोलवायला कुणी येणार नाही हा विश्वास खरा ठरला. चुकून जर कुणी आलंच तर लागवडीला माणसं कमी आहेत, बाया घेतलेल्या आहेत, मी कार्यक्रमाला येऊ शकत नाही असं सांगता आलं असतं.

लागवडीचं काम जोरात चाललं होतं. रविवार असल्याने बायांना काम उरकून घरी जायची घाई होती. तसं बघता दुपारपर्यंत निम्म्यापेक्षा अधिक काम झालं होतं. चार वाजताच लागवड उरकली तर? मग काय करायचं? बायको म्हणेल, “गेटटुगेदरला जा. ” पण मी तर तिथे जाणार नव्हतो.

आता तिथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम चालू असेल. मुलं-मुली एकमेकांशी अनौपचारिक गप्पा मारत असतील. जुन्या आठवणी काढून हसत असतील. एकमेकांचं कौतुक करत असतील.

नकळत मी माझी तुलना मोडकशी करू लागलो. तो जर्मनीत सेटल झाला असला तरी मीही गावातला एक मोठा शेतकरी होतो. आम्हाला मूळचीच जमीन जास्त. त्यात मी माझ्या कष्टाने अजून भर घातली होती. आज गावात माझ्याइतकं क्षेत्र कुणालाही नव्हतं. पण मोठा शेतकरी असूनही वावरात काम करायची माझी खोड मोडली नव्हती. स्वतःच्या वावरात काम करायला कसली लाज?

चार वाजता लागवड संपली. बायामाणसं घरी गेली. गडी संध्याकाळच्या धारांची तयारी करायला गोठ्यावर गेला. बायको “घरी चला” म्हणाली पण मी गेलो नाही. तिथेच बांधावर बसून राहिलो. डोक्यात पुन्हा एकदा तेच विचारचक्र सुरू झालं. एव्हाना कार्यक्रम उरकला असेल. चारपर्यंतचीच वेळ होती. आता पाच वाजून गेले होते. आता सगळे घरी निघाले असतील. मी सुटकेचा निश्वास टाकला.

पण नंतर माझ्या विचारांची दिशा बदलली. मला स्वतःचा राग आला. आपण आपल्या आयुष्यात काही करू शकलो नाही याचं वाईट वाटून घेण्यापेक्षा आपली मित्रमंडळी ‘ज्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप काही केलं आहे’ त्यांचं मला कौतुक का करावं वाटलं नाही? शाळेत ज्या मित्रांबरोबर खेळलो, अभ्यास केला, मार खाल्ला, त्यांच्या यशाचा मला हेवा वाटावा? त्यांचं कौतुक करण्याचा मोठेपणा माझ्यात नाही?

विचारांच्या या वेगळ्या प्रवाहाने स्नेहसंमेलनाला न जाऊन आपण चूक केल्याचं लक्षात आलं. जे नशिबात होतं, ते आपल्याला मिळालं. पण ज्यांनी स्वत:चं नशीब घडवलं, त्यांचं कौतुक मी करायलाच हवं! विहिरीवर जाऊन हातपाय धुवावेत, घर गाठावं आणि कपडे बदलून शाळेत जावं. तिथे गेल्यावर सांगता येईल की अचानक लागवडीचं ठरलं.

मी धावतच विहिरीवर गेलो. मोटर चालू केली. विहिरीजवळचा एक आउटलेट खोलला. पाटात उतरून हातपाय धुवू लागलो. हातपाय धुताना मला जुने दिवस आठवू लागले.

आमच्या घरापुढे पाण्याचा हापसा होता. शाळा घराजवळच असल्याने पोरं सकाळ संध्याकाळ हापशावर यायची. सकाळी पाणी प्यायला हापशावर, दुपारी डबे धुवायला हपश्यावर, संध्याकाळी हातपाय धुवायला हापशावर. घरापुढच्या बाभळीवर जशा दिवसभर चिमण्या दिसायच्या तशीच हापशावर दिवसभर पोरं दिसायची. आमचं घर माझ्या मित्रांसाठी “आओ जाओ, घर तुम्हारा” होतं.

हापशाच्या आठवणींनी मी पुन्हा एकदा लहान झालो होतो. स्वतःचं देहभान हरवून बसलो होतो. माझ्यातला लहान मुलगा पाटातल्या पाण्यात खेळत होता.

पाईपमधून बदाबदा पडणाऱ्या पाण्याच्या आवाजाने बांधावरून चालत येणाऱ्या बडबडीकडे माझं लक्ष गेलं नाही. मान वर करून पाहिलं तर काय दिसलं? सणवाराला घालावेत तसे खास कपडे घातलेल्या मित्र-मैत्रिणी बांधावरून चालत माझ्याकडे येत होत्या. त्या सगळ्यांना शेतावर आलेलं बघून मला गुदमरल्यासारखं झालं. आपण कार्यक्रमाला गेलो नाही म्हणून सर्वजण इकडे आले काय?

आज स्नेहसंमेलनाला सत्तर विद्यार्थी आल्याचं समजलं. त्यातले वीस जण माझ्याकडे आले होते. एवढ्या सगळ्यांत मी मोडकला लगेच ओळखला. तो माझ्याकडे बघून हसला पण काही बोलला नाही. तो वेळ काढून माझ्याकडे आला होता हेही महत्त्वाचं होतं. मला मोडकशी बोलावं वाटत होतं. पण एवढी पोरं-पोरी खास माझ्यासाठी आलेली. कोण काय बोलतंय कळत नव्हतं. एवढ्यातून एकट्या मोडकचीच चौकशी कशी करायची?

तसा मोडकही फारसा बोलका नव्हता. शाळेत असताना मोडक हसतमुख चेहऱ्याचा मुलगा होता. आजही तो गालातल्या गालात हसत होता. क्षणभर वाटलं, मोडक त्याची पोझिशन दाखवायला तर आला नाही? “लोखंडे, बघ, आज मी कुठे आणि तू कुठे! ” 

“गेटटुगेदरला का आला नाहीस? एवढा कामदार लागून गेलास की काय? ” बोरावकेने विचारलं. ही बोरावके वर्गातसुध्दा खूप बडबड करायची.

“तू आम्हाला भेटायला आला नाही म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो” असं म्हणून जांभळेने मला लाजवलं.

आता खरं सांगण्याशिवाय पर्याय नव्हता. शिवाय मित्रांशी खोटं बोलणं मला जमणारही नव्हतं. “तुमच्यापैकी बरेच जण नावाजलेल्या कंपन्यांत, मोठमोठ्या पदांवर काम करत असताना मी मात्र आहे तसाच राहिलो. त्यामुळे कार्यक्रमाला यायची लाज वाटली. ” मी खरं ते सांगितलं.

“अरे राजा, आम्ही करतोय ते तर कुणीही करेल. पण तुझ्यासारखा शिकला-सवरलेला मुलगा शेती करतोय याहून चांगली गोष्ट कोणती? तू सुध्दा पोस्टग्रॅज्युएट झाला आहेस. ठरवलं असतं तर तुही हवी तशी नोकरी मिळवली असती! पण तू शेती करायचं ठरवलं. तू नुसती शेतीच केली नाहीस तर तुझ्या वडिलांच्या सातबाऱ्यातलं क्षेत्रही वाढवलं! ” बर्वेने मोठं भाषणच दिलं.

“मुख्याध्यापकांनी तर भाषणात तुझं आवर्जून कौतुक केलं. तू शेती करतोय याचा त्यांना अभिमान आहे. ” कोलतेने त्या भाषणाची आठवण करून दिली आणि इतरांनी माना हलवून माझ्याकडे कौतुकाने पाहिलं.

“तुला आमचा अभिमान आहे की नाही माहित नाही, ” शाळेत असताना वर्गात कधीच न बोललेली वरपे म्हणाली, “पण आम्हाला तुझा खूप खूप अभिमान आहे. ” 

खरं तर मी मित्रांची चौकशी, कौतुक करायचं तर तेच माझी चौकशी, कौतुक करू लागले. मी एकटा आणि ते एवढे सगळे. ते मला बोलूही देईनात. मग विचार केला, हॉटेलात नेऊन सर्वांना चहा पाजावा. तिथं सर्वांशी बोलता येईल.

“काय लोखंडे, ओळखलं का नाही? ” बराच वेळ माझ्याकडे बघत असलेला मोडक शेवटी बोलला.

“तुला ओळखणार नाही असं कधी होईल का? ” इथेसुद्धा माझा इगो आडवा आला होता. मोडक बोलल्यावरच मी त्याच्याशी बोललो होतो. “एक काम करू. इथं एक नवीन हाॅटेल झालंय. आपण तिथं चहा घेऊ. ” मी पुढे म्हणालो.

“दोस्ता, शाळेत असताना मला घरी नेऊन जेवायला घालायचा आणि आता इथे हॉटेलवर चहा पाजून परत पाठवणार का? “

मोडकच्या प्रश्नाने मला लाजवलं. माझी त-तं-म-मं झाली. मोडकने पुढे केलेला हात मी माझ्या हातात घेतला. त्या हस्तांदोलनात तीच पूर्वीची उब होती, प्रेम होतं, आपुलकी होती.

“मी मिसेसला सांगून आलोय की भारतात गेल्यावर लोखंडेच्या घरी जाऊन बाजरीची भाकर उडदाच्या आमटीत चुरून खाणार… ” 

मोडक असं बोलताच माझे डोळे भरून आले. त्याला भाकर चुरून खायला, बुक्कीत कांदा फोडायला मीच शिकवलं होतं. मोडक अजून काही बोलला असता तर मी पोरींसारखा रडलो असतो.

“काय रावऽ तुझं आडनाव लोखंडे आणि वाफ्यात पाणी शिरल्यावर ढेकूळ विरघळावं तशी तुझी अवस्था व्हावी? ” असं विचारताना घेनंदने हसण्याचा प्रयत्न केला पण तो डोळ्यांच्या खालच्या कडा बोटांनी कोरड्या करत होता. त्या क्षणी बऱ्याच जणांच्या डोळ्यांत पाणी आलेलं. आपलं रडकं तोंड दिसू नये म्हणून सर्वजण इकडे-तिकडे बघत होते.

शेवटी मीच कसंबसं हसलो. खिशातला रुमाल काढून तोंड पुसण्याच्या निमित्ताने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि मित्र-मैत्रिणींना “चला, माझ्या घरी जाऊ” म्हणालो.

– समाप्त –

लेखक : अनामिक 

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनवणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मैत्री… भाग – १ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे☆

श्री मेघ:श्याम सोनवणे

? जीवनरंग ?

☆  मैत्री… भाग – १ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆  

“लागवडीचं मधेच काय काढलंय? ” बायको ओरडली, “उद्या रविवार आहे, कामाला बाया मिळणार नाहीत. आणि उद्या तुमचं गेटटुगेदर पण आहे ना? ” 

“मला गेटटुगेदरला जायचं नाही! ” मी शांतपणे बोललो, “उद्याच्याला लागवड करून घेऊ. ” 

“इतके दिवस गेटटुगेदर, गेटटुगेदर नाचत होता आणि आज काय झालं? ” अचानक काढलेल्या कामाने बायको वैतागली होती.

“मला जायचं नाही. विषय संपला! ” 

“रविवारच्या दिवशी दिवस आणि सवयीनी बायका रोज पण जास्त मागतील… ” मला बाहेर जाताना बघून बायको कुरकुर करू लागली. रविवारची लागवड करायची तिची इच्छा नव्हती.

“बायांनी किती पण रोज घेऊ दे. लागवड उद्याच करायची! ” 

मागच्या काही वर्षांत दहावीचं स्नेहसंमेलन घेण्याची टूम निघाली आहे. आमच्याही वर्गमित्रांनी स्नेहसंमेलन घ्यायचं ठरवलं. माझ्यासह गावातील काहीजण एकत्र आले आणि कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. स्नेहसंमेलनाच्या आयोजक समितीत मीही होतो.

गावात राहणारे वर्गमित्र सोडले तर दहावीच्या बॅचमधली बरीचशी मुलं संपर्कात नव्हती. मुलींचंही तसंच. लग्न होऊन त्या सासरी नांदत होत्या. क्वचित एखाद दुसरीची भेट व्हायची.

“दादा, उद्या तुमचं गेट-टुगेदरहे ना? ” रविवारच्या दिवशी मालकाने कांदा लागवडीचा घाट घातल्याने गडी बावरला होता. त्या बिचाऱ्यालाही रविवारची सुट्टी हवी असते.

“उद्या कार्यक्रम आहे पण मी जाणार नाही. आपली लागवड महत्त्वाची आहे. ” मी तिरसटपणे बोललो. माझा मूड बघून तो गप्प बसला. रविवारचं काम करणं कुणाला आवडतं?

स्नेहसंमेलनाचा दिवस जवळ येऊ लागला आणि व्हाट्सअप ग्रुपवर मॅसेजचं प्रमाण वाढलं. कोण कुठे आहे, काय करत आहे याची कल्पना येऊ लागली.

गावातली म्हणजे आमच्याच वर्गातली कितीतरी पोरं-पोरी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत होती. काही पदव्यांनी मोठे झाले होते, काही अधिकारांनी तर काही पैशांनी. आमच्यातले काही कंपनीत कामगार झाले, काही नोकरदार, काही डॉक्टर, काही इंजिनियर, काही प्राध्यापक तर काही सरकारी अधिकारी. दोन वर्गमित्र तर सैन्यात भरती झाले होते. काही पोरीदेखील पोरांना लाजवतील अशा पदांवर काम करत होत्या.

स्नेहसंमेलनाचा दिवस जवळ येऊ लागला तसा माझ्यातला न्यूनगंड जागा होऊ लागला.

कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी, शनिवारी संध्याकाळी, आम्ही सात-आठ जण शाळेत जमलो. कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. दिलेली जबाबदारी प्रत्येकाने व्यवस्थित पार पाडली होती. आता कार्यक्रमात उपस्थित राहणं एवढाच भाग शिल्लक होता. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी माझ्याकडे कसलीच जबाबदारी नव्हती.

त्या रात्री मला झोप येईना. वर्गात माझ्या शेजारी बसणारा, अभ्यासातही कायम माझ्या मागे असणारा बोराटे आता महसूल अधिकारी झाला होता. आमच्या वर्गातला साळवे, ज्याच्या घरी त्या काळात खाण्यापिण्याचे वांधे असायचे, किलोस्कर न्यूमॅटिकमध्ये सिनिअर इंजिनियर झाला होता. कायम मागच्या बेंचवर बसून धिंगाणा घालणारा जाधव आता मोठा बिल्डर झाला होता.

एवढंच कशाला? केदारी नावाची मुलगी, जी कुणाला आठवतही नव्हती, झेडपीच्या निवडणुकीनंतर जिल्हा परीषद सदस्या झाली होती. ढेरंगे आडनावाचा पोरगा, ज्याला शाळेत असताना चप्पल घालायला मिळाली नाही, आता क्लास-वन ऑफीसर झाला होता.

मला खरं कौतुक वाटलं परटाच्या मोडकाचं! आम्ही एकमेकांना आडनावानेच हाका मारायचो. तो मला लोखंडे म्हणायचो आणि मी त्याला मोडक. खालच्या आळीत त्यांची लाॅन्ड्री होती. त्या काळात कोण रोज कपड्यांना इस्त्री करत होतं? मोडकाची लाॅन्ड्री फारशी चालत नसे. त्याच्या घरी कायमची तारांबळ. ज्या दिवशी तो डबा आणत नसे, त्या दिवशी त्याला मी माझ्या घरी जेवायला नेत असे.

तोच एके काळचा गरीब मोडक आता जर्मनीत नोकरी करत होता. इंग्रजीबरोबर जर्मन भाषा शिकला होता. दहावीनंतर तो शहरात मामाकडे शिकायला गेला आणि त्यानंतर आमचा संपर्कच झाला नाही. आता व्हाट्सअप ग्रुपवर पोरं-पोरी त्याचं कौतुक करत होते. खास स्नेहसंमेलनासाठी भारतात येणार म्हणल्यावर मोडक आमच्यासाठी सेलिब्रिटी झाला होता.

एकदा मला मोडकला व्हाट्सअपवर “हाय” करावसं वाटलं होतं. पण नंतर म्हणलं आता मोडक मोठा माणूस झालाय. त्याने आपल्या “हाय”ला रिप्लाय दिला नाही तर? एक मन असंही सांगत होतं की मोडक स्वतःच मला फोन करेल. पण त्याचा फोन आला नाही.

वर्गातल्या बऱ्याचशा मुला-मुलींनी केलेली प्रगती बघून मला प्रश्न पडले. मला काय कमी होतं? मी का प्रगती करू शकलो नाही? वर्गात माझी गणना हुशार विद्यार्थ्यांमध्ये होत होती. आमच्या घरची परिस्थिती चांगली होती. वडील मोठे शेतकरी होते. तरीही मी एवढा मागे का राहिलो?

मी शिकलो नाही असं नाही. माझं पोस्टग्रॅज्युएशन झालं. पण करिअर म्हणून जी जडणघडण व्हायला हवी होती ती झाली नव्हती. मला चिंता लागली. आयुष्यात यशस्वी ठरलेल्या मित्र-मैत्रिणींना उद्या तोंड कसं दाखवायचं? सर्वजण विचारणार, “तू आता काय करतो? ” त्यांना काय सांगायचं? शेवटी मी ठरवलं. गेट-टुगेदरला जायचंच नाही.

त्या रात्री नीट झोप आली नाही. पहाटेच उठलो. हळूहळू उरकलं. सहा वाजता ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून शेतात गेलो. बरोबर गडी होताच. सकाळी सकाळी आम्ही कांद्याचं रोप उपटायला सुरुवात केली. आठ वाजता रोजंदारीवरच्या बायका हजर झाल्या. बायको त्यांच्यामागे होतीच. मी पाण्याच्या बाऱ्यावर तर गडी कांद्याचं रोप वाफ्यांनी टाकत होता. वावरात लागवड चालली असली तरी माझं मन शाळेतच होतं.

फोन सायलेंट मोडवर ठेवलेला. आज मी कुणाचा फोन घेणार नव्हतो. दहा वाजेपर्यंत कुणाचा फोन आलाही नाही. साडेदहानंतर मात्र खिशात ठेवलेला मोबाईल थरथरू लागला. दोन-तीन वेळा तसं झाल्यावर मोबाईल चेक केला तर मित्रांचे मिस्ड कॉल. न पाहिल्यासारखं करून मोबाईल खिशात ठेवला.

अकरा वाजल्यानंतर एसएमएस येऊ लागले. नेट चालू केलं तर व्हाट्सअपवर धडाधड मॅसेज पडू लागले. कार्यक्रमालाच जायचं नाही त्यामुळे मॅसेजला उत्तर द्यायचा किंवा कॉलबॅक करायचा प्रश्न नव्हता.

विहिरीवरून आणलेल्या पाईपलाईनचं पाणी पाटाने खळखळत पुढे सरकत होतं. बारं दिल्यावर लोण्यासारख्या मऊ मातीचे गादीवाफे पाण्याने टरारून भरत होते. माझंदेखील मन शाळेच्या आठवणींनी भरून आलं होतं.

पहिली ते चौथी मराठी शाळा आणि पाचवी ते दहावीतली हायस्कूलची वर्षे डोळ्यांपुढे उभी राहिली. मला माझ्या मित्र-मैत्रिणींना खरंच खूप भेटावंसं वाटत होतं. पण काय करणार? मी शेतकरी माणूस. त्यांच्यापुढे कसा जाणार? त्यांना काय सांगणार? स्वतःबद्दल सांगताना “एवढं शिकूनसुद्धा मी मातीत मरतोय” हे सांगू?

आता सर्वजण हॉलमध्ये बसले असतील. आता दीपप्रज्वलन चाललं असेल. आता प्रमुख पाहुणे सरस्वती पूजन करत असतील. आता आमची वयोवृध्द शिक्षक मंडळी व्यासपीठावर बसली असतील. आता माझे मित्र व मैत्रिणी समोरच्या खुर्च्यांवर बसून शिक्षकांची मनोगतं ऐकत असतील. सूत्रसंचालनाची जबाबदारी घेतलेला बर्वे आत्ता डायसपुढे उभा बोलत असेल.

कार्यक्रमाचा आराखडा आम्हीच बनवला असल्याने ते नियोजन मला पाठ होतं. मनगटावरच्या घड्याळात बघून ‘आता तिथे काय चालू असेल’ याचा अंदाज मी बांधत होतो. कांद्याची लागवड चालू असलेल्या वावरात उभा असलो तरी मनाने मी शाळेतच होतो. पुढे जाणाऱ्या प्रत्येक मिनिटाबरोबर स्नेहसंमेलनात काय घडत असेल याचं चित्र डोळ्यांपुढे उभं राहत होतं.

मला मित्रांची, मैत्रिणींची आठवण क्षणोक्षणी येत होती. पण कार्यक्रमात बिझी असलेल्या मित्रमैत्रिणींना माझी आठवण येत असेल का? माझी शंका निराधार होती. जसा इथे मी त्यांना मिस करत होतो, तसं तेदेखील मला मिस करत होतेच की! त्याशिवाय का एवढे मिस्ड कॉल आणि मेसेजेस आलेत?

अचानक विचार आला. आपला एखादा मित्र कार्यक्रम सोडून इथे आला तर? त्याने आपल्याला अशा अवतारात बघितलं तर? गावातल्या एका मोठ्या, श्रीमंत शेतकऱ्याचा मुलगा स्वतःच वावरात राबतोय! पाण्याची बारी देतोय! चिखलाने बरबटलेले कपडे घालून लागवड करतोय! या कल्पनेनेच मला कसंतरी झालं.

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : अनामिक 

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनवणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ते लोक… (अनुवादित) – हिन्दी लेखक : सुशांत सुप्रिय ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ ते लोक… (अनुवादित) – हिन्दी लेखक : सुशांत सुप्रिय ☆ उज्ज्वला केळकर

रेल्वेच्या या डब्यात ते चौघे आहेत. मी मात्र एकटाच आहे. ते हट्टे -कट्टे आहेत. मी मात्र अशक्त, मरतुकडा आहे. ते उंच, तगडे आहेत, मी मात्र सर्वसामान्य आहे. घाईघाईत मी चुकीच्या डब्यात चढलो की काय? मी यावेळी त्या लोकांच्या मध्ये असायला नको आहे. माझ्या अंतरात कुणीतरी मला चेतावणी देत आहे.

देशातील अनेक भागात दंगे होताहेत. आमचा भाग त्यापासून अस्पर्शित आहे. पण केव्हा काय होईल, कुणास ठाऊक? पुढचा तासभर मला यांच्यापासून सावध राहायला हवं.. जपर्यंत माझं स्टेशन येत नाही, तोपर्यंत…

मी चोरट्या नजरेने त्यांच्याकडे बघतो. दोघांची लांब दाढी आहे. चौघांनी हिरवा कुडता आणि पायजमा घातलाय आणि पांढरी जाळीची गोल टोपी घातलीय. ते चौघे माझ्याकडे टवकारून का पहाताहेत? काही गडबड तर नाही. त्यांचे विचार धोकादायक तर नाहीत.?

भयाचा एक सूक्ष्म गंध हवेत मिसळला होता. मी तो वास घेऊ इच्छित नव्हतो, तरी तो माझ्या नाकात घुसत होता आणि डोक्यापर्यंत संदेश पोचवत होता, त्यामुळे मी अस्वस्थ होत होतो. कुठल्या तरी अघटिताची, अनिष्टाची अशुभ सावली माझ्यावर पडते आहे आणि बेचैनी माझ्या आत पंख फडफडू लागते आहे. देशातील अनेक भागात आतंकवाद्यांनी बॉम्ब -स्फोट केले आहेत. शेकडो लोक मारले गेले आहेत. त्यानंतर अनेक ठिकाणी दंगे सुरू झाले. दगडफेक, आगी लावणे, लूट-पाट होऊ लागली. त्यानंतर अनेक ठिकाणी कर्फ्यू लावावा लागला. मी शांतपणे जगू इच्छतो. पण शांतता आज एक दुर्मिळ गोष्ट झालीय. दुर्मिळ आणि अप्राप्य. नरभक्षी जनावरांसारख्या शंका मला चिरू -फाडू लागल्या आहेत.

एकदा माझे डोळे त्यांच्या डोळ्यांना भिडतात. त्यांच्या सावळ्या चेहऱ्यावर उगवलेले थंड डोळे माझ्याकडे बघताहेत. ते लोक आमच्यापेक्षा किती वेगळे आहेत. आम्ही सूर्याची पूजा करतो, तर त्यांचं चंद्रावर प्रेम आहे. आम्ही डावीकडून उजवीकडे लिहितो, तर ते अगदी उलट, उजवीकडून डावीकडे लिहितात. आमची सगळी पवित्र तीर्थस्थाने याच देशात आहेत, तर त्यांची या देशाच्या बाहेर आहेत. त्यांचं नाक, त्यांचे डोळे, त्यांचा बांधा, त्यांचं रूप-रंग सगळं आमच्यापेक्षा वेगळं आहे,

ते माझ्याकडे टक लावून का बघताहेत? ते आतंकवादी तर नसतील? त्यांच्या बॅगेत ए. के. 47 आणि बॉम्ब तर नसतील? बाहेर थंडी असूनही मला घाम येतोय. शरीर कापतय. जसं काही लाल तिखट डोळ्यात गेलय. तहानेनं माझा घसा कोरडा पडलाय. जीभ टाळूला चिकटलीय. मी ओरडू इच्छितोय, पण गळ्यातून आवाज बाहेर येत नाही. माझ्या खाका घामान भिजल्या आहेत. कपाळावरून गंगा, यमुना, सरस्वती वहातेय. आज मी बी. पी. ची गोळी खाल्ली नाही का? माझ्या डोक्यातील नसांमध्ये इतका तणाव का भरला गेलाय? माझ्या डोळ्यांपुढे अंधार पसरत चाललाय. मला चक्कर येतेय का? मला श्वास घ्यायला इतका त्रास का होतोय? माझ्या छातीवर इतका जड दगड कुणी ठेवलाय?

अरे, तो दाढीवाला माणूस उठून माझ्याकडे का येतोय? मला सुरा मारेल की काय तो… अरे देवा, डब्यात कोणी पोलिसवालाही नाही. आज काही मी वाचत नाही. त्याच्या गोळ्या आणि बॉम्बचा घास बनेन मी! नाही तर यांच्या सुऱ्याचा घास बनेन! भिंतीवर टांगलेल्या फ्रेममधील फोटो बनेन मी! भूतकाळ आणि इतिहास बनेन मी! असं मरायचं होतं तर मला! दंगेखोरांच्या हाताने… ऐन तारुण्यात. रेल्वेच्या रिकाम्या डब्यात. अकारण. पण आता माझं वय तरी काय आहे? माझ्यानंतर माझ्या बायको-मुलांचे काय होईल? नाही… नाही… थांबा थांबा. माझ्याजवळ येऊ नका. तुम्हाला तुमच्या देवाची शपथ. माझे प्राण वाचवा.

ओह! माझ्या मनात या माशा का भिणभिणताहेत?

‘भाईजान, आपली तब्बेत बिघडलीय का? इतक्या थंडीतही आपल्याला घाम आलाय. आपण कापत आहात. आपल्याला डॉक्टरांची गरज आहे, असं वाटतंय. आपण घाबरू नका. धीर धरा. आम्ही आपल्याबरोबर आहोत. अल्लाह सगळं ठीक करेल. ’ 

तो माझ्या चेतनेच्या मुखाशी टकटक करतोय. तो कुणी भला माणूस वाटतोय. आता त्याचा चेहरा १९६५च्या भारत-पाक युद्धाचा हिरो अब्दुल हमीदच्या चेहऱ्यात बदललाय. नाही… नाही… आता त्याचा चेहरा आपले भूतपूर्व राष्ट्रपती ए. पी. जे. अबुल कलामध्ये रूपांतरित झालाय…

आता त्याचा चेहरा सुप्रसिद्ध गझल गायक गुलाम अलीसाखा ओळखीचा वाटतोय. आता तो माणूस गुलाम अलीच्या अंदाजात गातोय,

 

ये बातें झूठी बातें हैं

ये लोगों नें फैलाई हैं… बातें 

आह! … ही डोकेदुखी… हा अंधार.

गाडी थांबलीय. बहुतेक स्टेशन आलं वाटतं. ते लोक मला आधार देऊन गाडीतून उतरवताहेत. आता ते मला कुठे तरी घेऊन जाताहेत… आता मी हॉस्पिटलमधे आहे… त्यांनी माझ्याकडून फोन नंबर घेऊन सुमीला, माझ्या पत्नीला बोलावून घेतलय.

नाही… नाही ते वाईट लोक नाहीत. मी चुकलो होतो. ते चांगले लोक आहेत. माणुसकी अजून जिवंत आहे.

‘यांचं बी. पी. खूप हाय झालं होतं. या लोकांनी योग्य वेळी त्यांना इथे आणलं. मॅडम, तुम्ही या चौघांचे आभार माना. औषधांनी बी. पी. आता कमी झालाय. आपण यांना घरी घेऊन जाऊ शकता. यांना जास्तीत जास्त आराम करू द्या. ’ डॉक्टर सुमीला सांगत होते.

आता मी पहिल्यापेक्षा बरा आहे. माझी पत्नी आणि ते चौघे मला हॉस्पिटलच्या बाहेर घेऊन येत होते.

‘भाईसाहब मी आपल्या सगळ्यांची अत्यंत ऋणी आहे. मी आपले आभार कसे मानू? आपल्यामुळेच आज यांचे प्राण… ’ सुमीच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते.

‘कैसी बात करती हो बहन! आम्ही जे केलं, ते आमच्या भावासाठी केलं. अल्लाहची हीच मर्जी होती. ’ 

मी अतिशय शरमिंदा झालो. आपलं सारं कामकाज सोडून ते चौघे मला मदत करत होते. आम्ही सगळे एकाच आईची लेकरे आहोत. आम्ही एका माणसाचे दोन डोळे आहोत. आम्ही एकाच प्रदेशातील रहिवासी आहोत. आमचं रक्त आणि घाम एक आहे. ते परके नाहीत. आमच्यापैकीच आहेत.

” ख़ुदा हाफ़िज़, भाई. आपली काळजी घ्या. ’

” ख़ुदा हाफ़िज़! ’

टॅक्सी निघाली. दूर जाणार्‍या त्यांच्या पाठी खूप ओळखीच्या वाटू लागल्या. जशी त्यांची पाठ माझ्या वडलांची पाठ आहे. जशी त्यांची पाठ माझ्या भावाची पाठ आहे. असं वाटत होतं, मी त्यांना कित्येक वर्षे ओळखतो आहे.

टॅक्सी माझ्या घराकडे जात होती. बाहेर आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. उशिरा उगवणारा चंद्र्देखील आकाशात वर चढून तेजाने चमकत होता आणि माझा रस्ता प्रकाशित करत होता आणि सुमी माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणत होती, ‘ ती माणसं नव्हती, देवदूत होते. ‘ 

 

मूळ हिन्दी कथा- ‘वे’ – 

मूळ लेखक – सुशांत सुप्रिय

मो. – 8512070086

मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares