मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जीर्णोद्धार… – भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ जीर्णोद्धार…  भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

“अवं धनी, इथं बसून कशापायी काळजी करत बसलायसा? यीळभर देवळात तरी जाऊन बसा. इट्टल रखमाईकडं बघत बसचाल तर मनाला शांत वाटंल बघा. आता आरती करून भटजी निघून जात असतील बघा. ” कारभारणीनं सांगितलं की हा गडी कधी न्हाई म्हणायचा नाही. ‘तिचा शबुद म्हंजी लक्ष्मीचा शबुद असतुय’ असं म्हणायचा. गुमान पायात वहाणा सरकवून कुशाबा देवळाकडं बिगी बिगी निघाला.

कुशाबाच्या डोक्यात एकच विचार घोळत होता. “त्या भैताडानं इचारायची हिंमत तर कशी केली आसंल? अडत्या हाय, अडीअडचणीला मदत करतुय, शेतावरला समदा माल एकलाच उचलतोय. भाव बी घालून पाडून मागत न्हाय. हे समदं जरी खरं असलं तरी बी देऊळ दहा वर्स चालवाय देतोस का म्हनून इच्यारनं हे त्येला शोभतंय का? यंदा पिकं करपल्यात, थकबाकी झालीय. मंग काय पिढ्यानपिढ्या वावरात बांधलेलं देऊळ चालवायला द्यायाचं व्हय? दोन वर्सापूर्वी कारभारणीनं दिलेले डाग बँकेत ठेवून कर्ज काढलंया. अजूनपतुर डाग सोडवता आलं न्हाई. म्या आतल्या आत किती गटांगळ्या खातोय, हे माजं मलाच ठाव हाय. अता कर्ज झालं म्हनूनशान काय देऊळ चालवायला द्यायाचं? पाच लाख देतो म्हनला. सालीना साठ हजार रूपय बी देतो म्हनला. दहा वर्ष झाल्यावं देऊळ सोडून जातो, म्हनून लिवून द्यायाला तयार हाय. त्येचा काय डाव असंल ते त्येला आनि त्या इट्टल रखमाईलाच ठाव असंल. निस्तं माज्या डोस्क्याचं खोबरं करायला निघालाय. छ्या! म्या काय एवढा नीच हाय व्हय? पुन्यांदा कंदी त्या इट्टल रखमाईकडं डोळं वर करून बघाया तरी हुईल का? ” तोवर कुशाबा मंदिरात येऊन पोहोचला.

टाळ्यांच्या गजरात आरती सुरू झाली. पाचदहा म्हातारी कोतारी आणि चार पाच पोरं आरतीला उभी होती. आरती झाल्यावर, भटजी जाताना हातावर केळीचे काप हमखास ठेवायचे. द्यायला काहीच नसलं तेव्हा बचकभर खडीसाखर उदारमनाने हातावर नक्कीच ठेवायचे. जणू काही त्यासाठीच ते लोक जमत असावेत.

आज का कुणास ठाऊक इट्ट्ल रखमाईकडे बघताच कुशाबाच्या डोळ्यांत अचानक टचकन पाणी आलं. धोतराच्या सोग्यानं हलकंच पुसत, दोन्ही कानांच्या पाळ्यांना हात लावत त्यानं माफी मागितली. आपसूकच त्यानं दोन्ही गालावर चापट्या मारून घेतल्या. विनम्र भावाने दोन्ही हात जोडले. ‘तूच मायबाप हाईस. माजी काय अडचण हाय, ते तुला समदं ठाव हाय. म्या काय येगळं सांगायाचं? ’ असं मनातल्या मनात पुटपुटला. निरंजनाच्या तबकात एका रूपयांचं नाणं टाकून नमस्कार केला. भटजीने दिलेली दोन केळी घेऊन बाहेर पडला.

कुशाबा घरी पोहोचल्याची चाहूल लागताच कारभारणी कुसुमनं आतूनच आवाज दिला. “धनी, हात पाय धुवून घ्या म्हंजे जेवून घेता यील. ” कुसुमच्या हुकुमावरून हात पाय तोंड धुवून कुशाबा पाटावर बसला. ताटात भाजी, वरणाची वाटी, एक केळं कुस्करून, तव्यावरची गरमा गरम भाकर टाकली. चार घास पोटात ढकलून कुशाबा बाहेर ओसरीवर येऊन बसला. अंगणातच पाच-दहा येरझारा टाकल्या.

आत येऊन भिंतीला पाठ टेकून घोंगडीवर बसला. ‘काय करावं? ‘ हा डोक्यात भिरभिरणारा भुंगा काही केल्या बाहेर पडायचं नावच घेत नव्हता. तितक्यात सगळं आवरून कुसुम येऊन शेजारी बसली. कुशाबाची उलघाल पाहून कुसुमच्या डोळ्यांतही पाणी दाटलं होतं. “धनी, कधी दुष्काळात पिकं करपून गेली तर कधी अति पावसानं पिकच न्हाई, तर जमीनबी वाहून गेलीया. तुमी कवाबी इतकं हवालदिल झाला न्हाईसा. तुमी किती जीवाचं रान केलंय आतापतुर, हे समदं मला ठाव हाय. या संकटात तुमी एकला न्हाई, म्या बी तुमच्या संगं हाय. समदं रान पिकू दे म्हनूनशान म्या रोज त्या पांडुरंगापुढे हात जोडते. मानसानं मनात काय आसंल ते घडाघडा बोलून टाकावं. मला सांगिटलं न्हाई तर आनि दुसऱ्या कुनाला सांगनार हायसा? पैसा वतून दोन्ही मुलग्यांना पुन्याला मोठं शिक्शान दिलं, लग्नं लावून दिली, पुण्यात फिलॅट घ्येयाला मदत केलीत. त्ये चांगल्या नोकरीत हाईत. तुमी एक शबुद टाका, सोन्यासारखी आपली दोनी पोरं धावून येत्याल. तुमी तुमच्या आईबापाला किती मायेनं जपत हुता ते त्येंनी लहानपनापास्नं बगिटलेलं हाय. पन त्येंची मदत घ्यायाला तुमचं मन धजत न्हाई. काय करायचं आता? ते आता त्या पांडुरंगालाच म्हाईत. “

पांडुरंगाचा विषय निघताच कुशाबानं अडत्या सेठ काय बोलला ते कुसुमला सांगितलं. त्यावर कुसुमनं अनवधानानं कानावर हात ठेवले. ‘अता म्या काय सांगू? त्ये प्रकरन, तुमा आनि तुमच्या इट्टल रखमाईच्या यांच्यातलं हाय. तुमीच काय ते बघूनशान घ्या’ असं म्हणत तिनं वाल्या कोळीच्या पत्नीचा पवित्रा घेतला. कुशाबाच्या डोक्यात अडत्याचाच विचार घोळत राहिला. कधी डोळा लागला ते कळलं नाही.

पहाट होत आली असावी. कुशाबाच्या स्वप्नांत साक्षात विठ्ठल उभा ठाकला. कधीतरी आषाढी एकादशीला पंढरपूरात पाहिलेला तोच विठ्ठल साक्षात समोर होता. काळाकुळीत ओबडधोबड, गुलाल बुक्क्यानं पुरता माखून गेलेला प्रसन्न चेहरा. एखाद्या निवडणुकीतल्या विजयी झालेल्या वीरासारखा! दिवसभराच्या मिरवणुकीनंतर थकून गेल्याचा भाव असला तरी त्या चेहऱ्यामागे दडलेला विजयाचा उन्माद आणि आनंद लपत नव्हता. विठ्ठलानं मिश्किलपणे हसत विचारलं, ‘काय रे, कुशाबा, काय झालंय तुला? असा चेहरा पाडल्यासारखा दिसतोस? ’ 

विठ्ठलाला पाहून कुशाबाच्या डोळ्यांत पाणी तरारलं, कृतकोपानं म्हणाला, “मला काय झालंय ते तुला म्हाईत न्हाई व्हय? उगाच येड पांघरून पेडगावला जाऊ नगंस. कधी सूर्यदेवाला भाजून काडायला सांगतोस तवा वरूणदेवाला इकडं फिरकायला देत न्हाईस. पीकं करपत न्हाईत व्हय? कधी वरूणदेवाला सांगून झोडपून काढायला लावतूस. पिकं सगळी व्हावून जात्यात. पिकं चांगली येतात तवा कीड आणि रोगराई होवून पीकं फस्त होत्यात, हे समदं तुला दिसत न्हाईत व्हय? “

विठ्ठलाच्या डोळ्यांत आईची माया दिसत होती पण तो गालातल्या गालात हसत म्हणाला, “कुशाबा, संकटाशिवाय श्रद्धा फुलत न्हाई गड्या. मी तुला कवाबी सोडलेलं न्हाई. तू एकटा न्हाईस, मी तुझ्या पाठीशी आहे. आरं, दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी हे समदं सृष्टीच्या चक्राप्रमाणे घडत असतं. त्यात मी काही करू शकत नाही. पृथ्वीचं तुम्ही जे काही शोषण सुरू केलंत ना, त्याचेच परिणाम भोगत आहात. आता मोठी शेती राहिलीच कुठे? वाटण्या होऊन तुकडे तुकडे होत जाऊन सगळेच अल्पभूधारक झाला आहात. एकट्याला ट्रॅक्टर कसं परवडेल सांग? इतके शेतमजूर कुठे मिळतील? सहकार-शेती तुम्हाला पटत नाही. पाणी सिंचनाच्या सोयी नसल्यामुळे उत्पादनात घट येते. सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे मातीची गुणवत्ता वाढते आणि पिकांची वाढ सुधारते. हे तुम्हाला सांगून पटत नाही. मग शेती किफायतशीर कशी होईल? आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव ही आणखी एक मोठी समस्या आहे. कधी कधी शेतमालाच्यापेक्षा वाहतुकीचा खर्च अधिक व्हायला होतं. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही ही मोठी समस्या आहे, तेव्हा पिकवायचं तरी कसं?

दुसरं असं की सगळ्याच भूमीपुत्रांना शेती सोडून पंख्याखाली ऑफिसात बसून चाकरी करायची असेल त्याला मी तरी काय करणार सांग? महागाई भत्त्यावर डोळा ठेवून असलेल्या नोकरदारांना २००१ साली कोथिंबीरीची जुडी दहा रूपयाला मिळायची ती आजही त्यांना दहा रूपयालाच हवी असते. मॉलमध्ये हजारात खर्च करणारे, लिंबं, भाज्या विकणाऱ्या आजीकडे दोन पाच रूपयासाठी घासाघीस करताना दिसतात. शेतमालाचे भाव वाढले की ‘महागाई वाढली’ असा गळा काढणारे नेते, भाव कमी झाले की शेतकऱ्यांचे नुकसान कोण भरून काढणार, म्हणून सरकारविरुद्ध मोर्चे काढायला मोकळे असतात. ” 

“बरं ते समदं श्यानपन सोड. त्या अडत्यानं मला काय इच्यारलं, ते म्हाईत हाय का न्हाई तुला? त्येच्याबद्दल बोल, काय करायचं ते सांग? ”

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संग्राह्य… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆

सौ. अर्चना गादीकर निकारंगे

🌸 जीवनरंग 🌸

☆ संग्राह्य… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे 

सकाळची वेळ होती. काम उरकून जान्हवी जरा सोफ्यावर येऊन बसली. जयेश म्हणजे तिचा नवरा मघाशीच कामावर गेला होता. डायनिंग टेबलवर पालवीचा अभ्यास चालू होता त्यामुळे नुसता पसारा दिसत होता. यावर्षी ती चौथीत गेली होती. नुकतीच शाळा चालू झाली होती. तिथे जवळच आसावरी ताई त्यांच्या पोथी वाचनात दंग होत्या. उकाड्याने हैराण व्हायला झाले होते. जान्हवीने खिडकीजवळचा फॅन लावला. पाच दहा मिनिट जरा बसून तिला पालवीला शाळेसाठी तयार करायचे होते. जयेशच्या डब्याला पोळीभाजी देण्याच्या निमित्ताने तिचे पोळीभाजीचे काम अगोदरच आवरले होते. पण आता त्या तिघींसाठी तिला वरण भाताचा कुकर लावायचा होता व बिटाची कोशिंबीर पण करायची होती.

बघता बघता जान्हवीच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली होती. पालवीच आता नऊ वर्षांची होणार होती. जयेशचे वडील अनिल राव आणि आई आसावरी ताईंनी जान्हवी लग्न होऊन सासरी आल्यावर कधी तिला सुनेसारखी नाहीतर स्वतःच्या मुलीप्रमाणेच वागणूक दिली होती. दोन वर्षांपूर्वी अनिल राव वारले होते. सरकारी नोकरीत उच्च पदावर राहून ते निवृत्त झालेले होते आसावरी ताई पण मराठी विषयाच्या काॅलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. त्या सुध्दा निवृत्त झाल्यावर आपला वेळ देवाधर्मात, झाडांची देखभाल करण्यात व्यतीत करत होत्या. गाण्याची आवड असलेल्या, बागकामाचा छंद असलेल्या 

अशा चौफेर व्यक्तिमत्वाच्या होत्या. जान्हवीच्या आईने जेवढे संस्कार करुन उरले असतील तेवढे त्यांनी तिच्यावर केले होते. घरातील धार्मिक कार्यांतील रीतीभाती असोत, स्वयंपाकाची वेगळी पदधत असो आणि मराठी भाषा बोलण्यातील उच्चार असोत त्यांनी तिला चूक बरोबर समजावून सांगितले होते. त्यापाठी उपहासाची भावना नसून प्रेमच होते आणि हे सर्व जान्हवीने पण मोठ्या मनाने समजून घेतले होते.

आमटीला फोडणी देऊन जान्हवीने पालवीला आवाज दिला. ” पलू, चल लवकर. आवर आता शाळेत जायच आहे की नाही? उशिर झाला तर स्कूल बस निघून जाईल. तिथपर्यंत पालवीने पण अगोदरच दप्तर भरून शाळेचा युनिफाॅर्म घातला होता. आता जेवायचे तेवढे राहीले होते. ” हे काय ग मम्मा, मी तर तयार पण झाले. ” दे ना लवकर जेवायला. ” अस म्हणून पालवीने डायनिंग टेबलची खुर्ची बाहेर काढली व ती बसली. आज लेकीला तयार पाहून जान्हवीने जरा हुश्श्य केले. पुढच्या दहा मिनिटांत ती पालवीला गेटवर स्कूल बसमध्ये बसवून आली. आसावरी ताईंचे देवाचे वाचन आटोपल्यावर त्या दोघी जेवण आटोपून आपापल्या खोलीत आराम करायला गेल्या.

संध्याकाळी मात्र जान्हवीने हाॅलच्या गॅलरीत उभ राहूनच पालवीच्या बसची वाट पाहायचे ठरविले होते. थोड्याच वेळात बस गेटवर आली. बसमधून पालवीला उतरलेले पाहून जान्हवी दार उघडायला गेली. कारण तिला ठाऊक होते की पालवीला दार उघडेस्तोवर धीर नसतो. आज नाचत नाचत पालवी घरात शिरली. तिचे हे वागणे रोजचेच असायचे. घराबाहेर पडल्यापासून घरात शिरेपर्यंत तिच्याबरोबर काय काय झाले? तिला कोण काय बोलले? हे सगळे इत्थंभूत आजी व आईला सांगितल्याशिवाय तिचा दिवस जात नसे. आज पण ती दप्तर कसेबसे जागेवर ठेवून ” आजी, आजी ” करत आसावरी ताईंकडे गेली. त्या तिला थोड्या रागावून म्हणाल्या, ” पलू, किती वेळा तुला सांगायच बाहेरुन आल्यावर पहिल्यांदा हात-पाय धुवायचे. आम्ही दोघी कुठे पळून जाणार असतो का? मग सांग तुला काय सांगायचे आहे ते. ” पालवी पटकन बाथरूमचा दरवाजा ढकलून आत जाऊन पाय धुऊन आली. ” आजी, काय झाल सांगू तुला? ” आज मीराने डब्यात पुरणपोळी आणली होती, तिने मला पण दिली. मग मीसुध्दा माझ्या डब्यातले आप्पे तिला देऊ केले. जान्हवी तिथे बसून हे सर्व ऐकत होती. पालवी पुढे आजीला म्हणाली, ” आजी आणि बरं का? आमच्या मराठीच्या टीचर आहेत ना त्यांनी काहीतरी मोठ वाक्य म्हटल होत. मला ना त्याचा अर्थ सांग ना ग. काय बर होत ते? ” अस म्हणून ती आठवण्याचा प्रयत्न करु लागली. तिला तस विचार करताना पाहून जान्हवी व आसावरी ताई एकमेकींकडे पाहून हसल्या. पलू आनंदाने जोरात ओरडली. ” आठवल मला. पेरावे…? काय होते ते बर? ” नाही आठवत पालवी थोडी नाराज होऊन म्हणाली. आसावरी ताई तिला जास्त निराश न होऊ देता म्हणाल्या. ” अग बाळा, तुला असच म्हणायच आहे का की पेरावे तसे उगवते? ” पालवीने एक जोरात टाळी वाजवून म्हटले, ” हो ग आजी, अगदी बरोबर. तुला कस माहिती आमच्या टीचरनी अस म्हटलेल.? आणि याचा अर्थ ग काय असतो? पेरावे म्हणजे काय? ” आसावरी ताई हसून तिला म्हणाल्या, ” बस बाळा माझ्याजवळ. मी तुला सांगते त्याचा अर्थ काय आहे तो. ” पालवी येऊन त्यांच्याजवळ बसली. आसावरी ताईंनी आजीच्या वात्सल्याने पालवीच्या पाठीवरून हात फिरवला व त्या तिला म्हणाल्या, ” बर का पालवी, पेरावे तसे उगवते म्हणजे जस एखादा धान्य पेरणारा कोण? सांग बर ” पालवी झटकन म्हणाली ” शेतकरी. ” ” बरोबर. तो जमिनीची नांगरणी झाल्यावर जे धान्य पेरतो तेच धान्य धरणीमाता परत पिकांच्या रुपात आपल्याला देते. आता पुढे रोजच्या आयुष्यात आपण माणस जशी चांगली किंवा वाईट कृती करतो. तशी फळ आपल्याला मिळतात. हा निसर्गाचा नियमच आहे. म्हणून बाळा वडीलधारी माणस लहान मुलांना सांगत असतात, कधी कोणाला उलट बोलायच नाही, वाईट बोलायच नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही. दुखवायचे नाही ते म्हणूनच. ” पालवी गंभीर होऊन आजी सांगत असलेला शब्द नी शब्द लक्ष देऊन ऐकत होती. पालवी ही मुळातच शांत स्वभावाची होती. तिची आजी काहीतरी चांगले सांगतेय हे तिच्या बाल मनाला कळत होते. टीचरने सांगितलेल्या त्या वाक्याचा अर्थ असा आहे हे कळल्यावर ती पुढची काही मिनिटे विचार करत राहिली. आपली आजी किती हुशार आहे तिला काहीही विचारा तिला सर्व माहीत असत असा विचार मनात येऊन ती नकळत आजीवरच्या अभिमानाने ताठ बसली. तिथे बसून ऐकत असलेल्या जान्हवीला पण सासूबाईंचा सार्थ अभिमान वाटला. जान्हवीच्या माहेरच्यांमध्ये त्यांना आदर होता. जान्हवी विचार करू लागली. ” मीसुध्दा पलूला एवढ्या साध्या, सोप्या भाषेत समजावू शकले नसते. आई खरच ग्रेट आहेत. लहानांशी कस बोलाव त्यांना सोप्या भाषेत कस समजवाव हे त्यांना अगदी छान कळत. ” रात्री झोपायला खोलीत जाताना तिने आसावरी ताईंना त्यांच्या त्या खुबीबद्दल मनापासून धन्यवाद दिले. त्यावर त्या म्हणाल्या, ” अग, अंगची शिक्षिका आहे ना मी, लहान मुलांना व्यवस्धित समजावून सांगण्यात मी माझे आयुष्य सत्कारणी लावले आहे. ” अस म्हणून त्या खोलीत जाऊ लागल्या. त्यांना पाहून जान्हवी विचार करू लागली. ” खरच किती सुंदर विचारांनी परिपूर्ण आहेत ह्या? मनाच्या हार्ड डिस्कवर हयांच्या ह्या विचारांना नक्की संग्राह्य करून ठेवायला हव. ” आणि ती स्वतःशीच हसली.

© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे 

मुंबई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “बासरी… !!!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

🌸 जीवनरंग 🌸

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “बासरी… !!!☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

*काय गं म्हातारे? आज काय त्रास….? मी गंमतीनं या आज्जीला विचारलं….! *

*मला काय नगो…. माज्या पोराला दे, न्हेमीची औशदं…. *

*ही आज्जी खुप थकलीय… माणसाला होणारे जवळपास सर्व आजार हिला आहेत… पण कधीही आजपर्यंत एकाही आजारावर स्वतःसाठी हिने औषध घेतलं नाही…! कधीही विचारलं तर म्हणायची, मला काय नगो, माज्या पोराला दे…. *

*हां… हिला दिसायचं कमी आलं होतं, तेव्हा मात्र माझ्या मागं लागुन, भांडुन डोळ्यांचं आॕपरेशन करवुन घेतलं होतं…. इतरांच्या आधी स्वतःचा नंबर आधी लावुन घेतला होता…. हट्टानं गोळ्या आणि ड्राप्स मागुन घेतले होते… *

*मी तीला म्हणायचो, इतर औषधं कधी मागत नाहीस, आता डोळ्याच्या आॕपरेशनसाठी का मागं लागलीस? ती यावर गप्प राहायची… *

*आज भिक्षेक-यांची गर्दी कमी म्हणुन तीची थट्टा करायची लहर आली…. *

*बोल की म्हातारे… काय औषध देवु…? मी मुद्दाम डिवचलं…. *

*नेहमीसारखंच बोलुन गेली… मला काय नगो माज्या पोरालाच काय आसंल तर दे…. *

*मी म्हटलं, तुज्या पोराला मी दरवेळी न तपासता, तु सांगते म्हणुन औषध देतो…. एखादवेळी काही झालं तर? पुढच्यावेळी त्याला इथं आणलंस तरच औषध देईन…. नाहीतर नाही…. *

*म्हातारी हबकली… म्हटली खरं म्हणतु का थट्टा करतु माजी? तीच्या डोळ्यातली भिती स्पष्ट जाणवली…! * 

*म्हटलं, खरंच म्हणतोय, थट्टा नाही. पुढच्यावेळी त्याला इथं आणायचं…! मी देणार नाही औषधं न तपासता… *

*आसं नगा करु सायेब…. नेहमी अरे तुरे करुन बोलणारी, आज साहेब म्हणायला लागली…. *

*मला गंमत वाटली…. *

*म्हटलं पोरगं मोठं आहे ना तुझं? मागच्यावेळी 40 वय सांगीतलं होतंस, त्याला इथं यायला पाय नाहीत का? आईला भिक मागायला लावुन घरात झोपतो… लाज वाटत नाही का त्याला….? कामधंदा कर की म्हणावं…. मी तावात बोलुन गेलो…. * 

*म्हातारी… जवळपास 75 वर्षाची… अंगावर मांस नाही… फक्त हाडं… सुरकुतलेल्या कातड्यानं झाकलेली…. कंबर आणि गुडघे कामातुन गेलेले…. डोळे खोल गेलेले…. नाही म्हणायला, मी दिलेला चष्मा त्या डोळ्यांवर….! * 

*माझ्या या वाक्यांनी ती दुखावली असावी…. इकडं तीकडं धरंत, कण्हत मी बसलो होतो तिथं कशीबशी आली, शेजारी बसली…. आणि हळुच आवाजात म्हणाली…. * *डाक्टर सायेब, त्याचं वय 40 आसंल…. खरं हाय, पन त्यो येवु शकत न्हाय.. कारण त्यो पायानं जनमल्यापसनं आपंग हाय…. मी भिक मागती, त्याची लाज त्याला वाटती का न्हाय मला म्हाईत न्हाय…. कारन जनमल्यापसनं त्यो येडसर हाय…. आन् कामधंदा पन न्हाय करु शकत…. कारन, येड्या मानसांना कुनी काम देत न्हाई…. *

*आता दचकायची पाळी माझी होती, मी शरमलो…. आपल्याला माहित नसतांना आपण काहीबाही बोलुन जातो…. पण समोरचा माणुस दुखावतो…. *

*मी शरमेनं तीला म्हटलं, आगं आज्जी, मी गंमत केली, मला तसं नव्हतं म्हणायचं…. मी काहीतरी सारवासारव केली…. *

*आजी मात्र दुखावली गेली… मलाच वाईट वाटलं…. पुन्हा म्हटलं… माफ कर आज्जी… मी सहज बोलुन गेलो….! *

*ती कसंनुसं हसली, म्हणाली…. काय माप करु सायेब…? तुमचा काय दोश? आवो फाटल्यालं शीवायला गेले आन् दोराच संपुन गेला आसं झालंय… दोश कुणाला द्यायचा? * 

*म्हटलं, हो ना,… होतंय असं…. कसं तुमच्याच पोराला असं झालं कुणास ठावुक…? *

*ती पुन्हा कण्हत कुंथत जागेवर जावुन बासली…. शांतपणे…. *

*नऊ महिने व्हायच्या आत जन्मला का तो? मी तीच्याजवळ जावुन विचारलं…. *

*मला काय म्हाईत? बेफिकीरीने ती बोलली…! *

*मी गोंधळलो…. म्हटलं… आं… आज्जी, तुला नाय म्हाईत म्हंजे? *

*तितक्याच शांततेत ती बोलली, माज्या पोटचं न्हाई ते…. सवतीचं हाय….! *

*मला कळलं नाही…. आणि मग नेहमीच्या सवयीने मी उकरत गेलो…. जखमांची खपली उकलत गेलो…. जुन्या जखमा पुन्हा छेडत गेलो…. *

*…. हिचं लग्न झालं…. पण हिला बरीच वर्ष पोर होईना… नव-यानं वाट पाहुन हिला घराबाहेर काढलं… दुसरा घरोबा केला… डोळ्यादेखत सवत आली…. सवत घरात… ही बाहेर… बाहेर कुणाचा आसरा नाही…. सवत म्हणायची, घरातली सगळी कामं कर, दोन वेळचं जेवण आन् रात्री झोपायला जागा देते…. हि घरातली सगळी कामं करायची… पडेल ते… सवत सांगेल ते….! *

*खरंतर ही लग्नाची, सवत बिनलग्नाची, पण बोलणार कोण? बोललं तर ऐकणार कोण? आणि बोलुन फायदा काय? दोन वेळचं जेवण आणि रात्रीला मिळालेला निवारा यांतच ती धन्यता मानायची…. *

*सवत आणि नवरा दोघंही खुप त्रास द्यायची पण…. पण….! *

*एके दिवशी पाळणा हलला, सवतीला मुलगा झाला…. सहा महिन्यांचं बाळ असतांना, नवरा अॕक्सिडेंट मध्ये गेला…. पुढच्या सहा महिन्यांत सवत कुठल्याशा आजाराने गेली…. *

*वाकड्या पायाचं हे बाळ घरात एकटं रडत रहायचं…. आईविना…. *

*दोन दिवस हिने ही रडु दिलं त्याला…. सवतीचं पोर…. माझा काय संबंध? मेलं तर मरु दे….. सवतीनं नवरा नेला…. मला घराबाहेर काढलं…. मी कशाला कुणाचं करु….? *

*दोन दिवसांनी, हिनं ते पोर उचललं…. आणि निघाली कुठंतरी टाकायला….. *

*जसं या वर्षभराच्या पोराला तीनं टाकुन देण्यासाठी उचललं, तसं ते पोर आई समजुन हिच्या छातीशी झोंबायला लागलं…. *

*आयुष्यात पहिल्यांदाच “आई” झाल्यासारखं तीला वाटायला लागलं…. पोर फेकायला गेलेली ही “बाई”, पोराला न फेकताच येताना दुध घेवुन आली, तीच्याही नकळत “आई” होवुन गेली….! *

*आज कित्ती वर्ष झाली…. त्याला ती सांभाळत्येय…. त्याचे आजार बरे करण्यासाठी राहतं घर विकलं…. एकुलतं एक छप्पर विकलं…. दागदागीने विकले…. पोर मात्र आहे तसंच राहीलं…. *

*दुर्दैव हे, की या मुलाला काहीच कळत नाही, आपल्यासाठी कुणी काय केलंय हे समजण्याची त्याची पात्रता नाही…. दरवेळी घरी गेलं की हा मुलगा, या आज्जीकडे अनोळखी नजरेनं पाहतो…. जशी ही माझी नव्हेच कुणी…. *

…. *आणि याच अनोळखी मुलाला जगवण्यासाठी ही सावत्र आई…. सख्खी होवुन जाते…. रस्त्यावर भिक मागते….. *…. *आज कित्येक वर्ष….! *

*त्याचं दुखलं खुपलं बघता यावं, केवळ याचसाठी तीनं हट्टानं डोळ्यांचं आॕपरेशन करवुन घेतलं होतं तर…..! *

*कुणीतरी कुणासाठी काहीतरी करत असतं…. त्यामागची भावना ही असते की, उद्या याची परतफेड होणारच आहे…. * *पण, इथं ही माऊली भिक मागुन या वेडसर मुलाला जगवते…. कुठल्याही परतफेडीच्या अपेक्षेवाचुन…. * *आणि या मुलाला माहीतच नाही की, आपल्या एक दिवसाच्या जगण्यासाठी, रोज कुणीतरी आपला आत्मसन्मान इथं विकतंय…. *

*आजीचा हात हातात घेवुन म्हटलं… आज्जी, हे पोरगं तुझं नाही तरी तु एव्हढं करतेस….? *

*तेव्हा डोळ्यात पाणी आणुन म्हणाली, माजंच हाय वो ते….! *

*माझ्याकडनं औषधं घेवुन, तु त्याला अजुनही बरं करण्याचा प्रयत्न करतेस? कसं शक्य आहे ते? *

*ती म्हणाली, चंद्रावर जायला पैशे पडत्यात डाक्टर, चंद्र पहायला पैशे न्हाई पडत…. आवो…. लोकं चंद्रावर गेली, आमाला जमिनीवरनं तरी चंद्र पाहु द्या…. पोरगं बरं झालंय असं रोज मला सपान पडतंय… आवो आमाला सपान तरी पाहु द्या….! *

*काय बोलु मी….? *

*पण आज्जी, किती दिवस हे करणार? *

*फुलाला काय म्हाईत आसतंय का? आपुन देव्हा-यात जाणार का मयतीला वाहणार? तरी फुल काय उमलायचं राहतंय का? तसंच आमचं बी….! उमलत राहायचं डाक्टर…. देव्हा-यात पडलो तरी लोकं फुलंच म्हणणार आन् तिरडीवर पडलो तरी लोकं फुलंच म्हणणार…. सुगंध हितं बी द्यायचा आन् सुगंध तीथं बी द्यायचा…. आपण आपलं इमान सोडायचं न्हाई…. *

*एका डाॕक्टर माणसाला, एक अशिक्षित बाई जगण्याचं गुपीत सांगत होती…. आजपर्यंत कुठल्याही डिग्रीच्या पुस्तकात नसलेलं मर्म ती उलगडत होती…. *

*आज्जी, पण या सगळ्यात तुला किती त्रास झाला? इथुन पुढंही होणारच आहे…. मग? *

*डाक्टर, पोकळ बांबुला टोचुन भोकं पाडली की मग तीची “बासरी” व्हती…. कुणी त्याला “पावा” म्हणतं…. आवो जलमाला येवुन पोकळ बांबु व्हायचं का आंगावर भोकं पाडुन घिवुन बासरी व्हायचं हे ज्याचं त्याला कळलं पायजेन…. पोकळ बांबु नुसताच “वाजतो” पण बासरीतनं ग्वाड आवाज येतु…. *

*मी शहारलो….! *

*म्हटलं, आज्जी, कुटं शीकलीस हे….? *

*विषण्ण हसत म्हणाली, शिकवाय लागतंय व्हय डाक्टर? आवो आपुनच कळतं सारं….! *

*खरंच हे शहाणपण आलं होतं, त्या भोगलेल्या अमर्याद वेदनांमुळे…. *

*काच, स्वप्नं आणि नाती तुटली की टोचतातच… या टोचण्यातुनच मग जन्म होतो जीवनातील तत्वज्ञानाचा….! *

*डाक्टर…. आज्जी च्या हाकेनं भानावर आलो…. *

*मला येकच काळजी हाय वो…. मी जर या पोराच्या आदी मेले तर… 8 दिवसात ते पोरगं बी तडफडुन मरंल…. आज इतकी वर्षं सांबाळला,… मी गेल्यावर कुणीच करनार न्हाई त्याचं….! *

*माजी येकच इच्चा हाय आता…. *

*ती शुन्यात बघायला लागली, आणि कानाजवळ येवुन बोलली…. कुनतीच आइ म्हननार न्हाय आसं पन…. पन…. *

*पण काय आज्जी? *

*पन…. माज्या आदी त्यानं मरावं…..! * 

*मी हादरलो…. *

*आज्जीनं कळवळलेला आपला चेहरा पदरानं झाकुन घेतला…. पदराआडुन दबकत येणारे ते तीचे हुंदके मलाच असह्य झाले…. *

*ब-याच वेळानं तीला शांत करुन मी निघालो…. जातांना पुन्हा वळुन मागं पाहिलं…. *

*किमान शंभर भोकं पडलेलं… ठिगळांनी शिवलेलं लुगडं घालुन… सावत्र पोरासाठी झिजलेलं शरीर आणखी झिजवत खुरडत चालुन, स्वतःचा आत्मसन्मान अनोळखी लेकरासाठी गहाण टाकुन भिक मागणा-या….. स्वतःच्या अंगावर भोकं पाडुन घेवुन, माणुसकीचं सुरेल गाणं गाणा-या या “बासरीला” मी मनोमन नमस्कार केला….!!! *

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आहेर… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

सुश्री नीला महाबळ गोडबोले

? जीवनरंग ?

☆ आहेर… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले

तो नि त्याची बायको समारंभाच्या हॉलमधे शिरले की सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळत.

प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक कुत्सित हसू येई..

तो.. अजय.. गावातला एक दुकानदार..

तालुक्याच्या गावात त्याचं कपड्याचं दुकान होतं, त्याच्या वडिलांनी सुरू केलेलं.. फार मोठं नाही आणि फार लहानही नाही… मध्यम म्हणता येईल असं…

वडिलांचा अजय एकुलता एक मुलगा.. शिक्षणात फारसा रस नसलेला… बारावी जेमतेम गुणांनी उत्तीर्ण झाला..

शिक्षणाला रामराम ठोकला नि दुकानात बसायला लागला… रक्तातून आलेली धंद्याची आवड नि लहानपणापासून वडिलांनी दुकानात बसायला लावल्यामुळे धंद्याची उत्तम जाण…. शिवाय जिभेवर साखर नि डोक्यावर बर्फ…. दुकानात बसू लागला तसा धंदा अजूनच वाढला..

देखण्या अजयवर गावातल्या वधुपित्यांचं लक्ष होतच्….

संस्कारी नि सुरेख असलेल्या माधुरीशी लग्न होऊन अजयचे दोनाचे चार हात झाले… पुढच्या चार वर्षांत चार चिमुकली पावलं घरात दुडदुडू लागली…

…. अजयच्या वडिलांनी दुकान अजयकडे सोपवलं नि अध्यात्माचा मार्ग धरला…

अजयने शेजारचं दुकानही विकत घेतलं.. दोन्ही दुकानं जोडली, सुरेखशी अंतर्गत सजावट केली..

लहानशा दुकानाची छानशी शोरूम झाली… येणाऱ्या जाणाऱ्याच्या नजरेत भरू लागली..

कालांतरांनं छानसं टुमदार घरदेखील त्याने बांधलं… गावातील उच्चवर्तुळात त्याची उठबस वाढली..

नाही म्हटलं तरी त्याची प्रगती गावातील लोकांच्या नजरेत येऊ लागली..

” एवढा पैसा थोडाच सरळमार्गाने येतो… धंद्यात लबाडी करत असणार.. “.. गावात कुजबुज सुरू झाली..

खरंतर त्याची नि त्याच्या कुटुंबाची राहणी तशी साधी होती.. धंद्यासाठी दुकान मोठं केलेलं असलं तरी घर छोटसं नि साधसंच बांधलेलं…. दोन चाकीवरूनच तो फिरत असे…. मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातेललं…. साऱ्यांचे कपडेही साधेसेच असत…

ना व्यसनं… ना मोठे शौक.. हॉटेलातही कधी ते कुटुंब जात नसे…

” एक नंबरचा चिकट आहे हा अज्या… ” दोस्त नि गावातले लोक त्याच्या माघारीच नाही तर तोंडावर बोलायचे..

या लोकांच्या बोलण्याला अजून एक कारण होतं… अजय कोणत्याही कार्यांत एखाद्या रुपयाचाही आहेर करीत नसे… त्याचं हे रिकाम्या हातांनी जाणं सा-यांनाच खटकणारं…

उच्चभ्रूंच्या कार्यात कुणाचे सोन्या-चांदीचे आहेर.. कुणी उंची वस्त्रे आहेर म्हणून आणलेली.. तर कुणाची गलेलठ्ठ रकमांची पाकिटे.. पण..

अजयकडून साध्या रिकाम्या पाकिटाचाही आहेर नसलेला..

अगदी नातेवाईकांच्या लग्नातही हीच गत..

” नव-यानं नाही म्हटलं तरी आपण आपल्या साठवलेल्या पैशातून आहेर करावा.. असं रिकाम्या हाताने कार्याला जाणं.. किती वाईट दिसतं.. एवढा कंजुषपणा करून काय मिळवतो गं तुझा नवरा.. मेल्यावर साठवलेलं डबोलं इथच सोडून जाणार नं.. की बरोबर नेणार आहे? अगं, लोक किती नावे ठेवतात.. “

…. माधुरीला तिच्या नातेवाईकांकडून, मैत्रिणींकडून, शेजारणींकडून हे ऐकावं लागायचं.. तिला खूप वाईट वाटायचं. डोळे भरून यायचे.. पण ती नव-याच्या शब्दाबाहेर जाणारी नव्हती. बिचारी निमूटपणे सहन करायची..

…. कार्याला जायचं पण तिथं जेवायचं मात्रं नाही… हे धोरण अजय नि पत्नीने पाळलेलं..

अनेक वर्षे हेच सुरू होतं…

तो अक्षय्य तृतीयेचा दिवस होता… त्या दिवशी गावातील पाच अनाथ वधु-वरांचा सामुहिक विवाह सोहळा गावातल्याच सामाजिक संस्थेने आयोजित केलेला.. मोठा मंडप घातलेला.. गावातील असा पहिलाच सोहळा असल्याने अख्खं गाव लोटलेलं.. आमदार, जिल्हाधिकारी अशा व्ही. आय. पीनीही उपस्थिती लावलेली.. गावातील श्रीमंतही हजर असलेले.. या उच्चभ्रूंनी अनाथ जोडप्यांना मदत म्हणून मोठमोठे आहेर आणलेले… सामान्यांनीही यथाशक्ती भेटवस्तू आणलेल्या.. स्टेजवर मान्यवर बसलेले.. त्यांची भाषणे, त्यानंतर लग्नसोहळा.. नंतर जेवण….. असा कार्यक्रम…

एवढ्यात अजय सहकुटुंब मांडवात शिरला.. नेहमीप्रमाणे आजही सा-यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या..

तो नि त्याचं कुटुंब रिकाम्या हातानेच आलेलं..

” अनाथांच्या लग्नाला तरी काहीतरी आहेर आणायचा होता.. किती निर्लज्ज, स्वार्थी नि कंजुष आहे हा माणूस.. ” लोकांत कुजबुज सुरू झाली..

” श्री. अजय नाईकसाहेबांनी व्यासपीठावर यावं.. “

अजय व्यासपीठावर गेला.. तसे साऱ्यांचेच डोळे विस्फारले.

अध्यक्षांचं भाषण सुरू झालं..

…. ” आजचा कार्यक्रम संपन्न होतोय तो केवळ अजय नाईकसाहेबांमुळे … त्यांनी या लग्नसोहळ्यासाठी पाच लाख रुपयांचा आहेर दिलेला आहे… वगैरे… वगैरे.. “

पुढचं भाषण बऱ्याच लोकांच्या डोक्यातच शिरलं नाही..

अजय भाषणासाठी उभा राहिला….

” मित्रांनो, तुम्हाला बसलेला धक्का मी समजू शकतो. कोणत्याही लग्नात रुपयाभरही आहेर न करणारा मी..

अन् आज मी या लग्नासाठी पाच लाखांचा आहेर दिला.. कदाचित तुम्हाला हे खोटं वाटलं असेल..

पण हे खरं आहे..

…. दोस्तांनो, मी तेंव्हा पाचवी-सहावीत असेन. माझ्या मावशीकडे माझ्या मावसभावाचं लग्न होतं.

मावशीचं सासर खूप श्रीमंत, तालेवार.. त्यामुळे लग्न सोहळा जंगी.. मी नि माझी बहीण आई बरोबर समारंभाला गेलो होतो…. घरचं देवकार्य पार पडलं. नातेवाईक आहेर देऊ लागले.. कुणी सोन्याच्या अंगठ्या, कुणी सोनसाखळ्या नवरदेवाला भेट म्हणून दिल्या.. मावशीला भरजरी सांड्यांचे आहेर दिले जात होते…

…. आईची आहेराची पाळी आली.. आईनं तिच्या भाच्याला सोन्याचं लहानसं वळं दिलं… मावशीला साडी दिली.. मावशीच्या यजमानांना धोतरटोपी दिली.. तशा मावशीच्या सासुबाई गरजल्या,

” शांते, असले कपडे आमची नोकरमाणसंसुद्धा वापरत नाहीत.. आमचा अपमान करण्यासाठी असले कपडे आणलेस का? घेऊन जा ते कपडे परत… “

त्या बाईंनी ते कपडे आईकडे भिरकावले..

आई रडू लागली तसे मावशीचेही डोळे भरले.. पण कुणाचीच बोलायची हिम्मत झाली नाही..

आमची त्यावेळी बेताची परिस्थिती होती.. दुकानाचं कर्ज डोक्यावर होतं. आजोबांच्या

आजारपणाचा मोठा खर्च झालेला होता. रोजचाच खर्च कसाबसा भागत होता. आईने स्वत:चं कानातलं गहाण टाकलं. त्यातून लहानसं वळं केलं. उरलेल्या पैशातून मावशीसाठी साडी नि काकांसाठी धोतरजोडी घेतली.

… त्या बोलण्याने आई खूप दुखावली. पण तिने तोल ढळू दिला नाही.. लग्नापर्यंत आम्ही थांबलो..

नि लग्न झाल्याबरोबर जेवण न करता आमच्या गावी परत आलो..

.. दिवस सरले. आमचं कर्ज फिटलं. दुकानातून भरपूर पैसे मिळू लागले. तिकडे मावसभावाने व्यसनापायी सगळं वैभव गमावलं…. पण माझ्या मनावर उमटलेला तो अपमानाचा ओरखडा मात्रं बुजला नाही.

मी ठरवलं की कोणाला कधीच आहेर द्यायचा नाही…!! म्हणून मी कोणत्याही समारंभात रिकाम्या हाताने यायचो.. तुम्ही मला हसायचात, चेष्टा करायचात, माझा अपमानही करायचात.. पण मी त्याकडे काणाडोळा करायचो.. कारण पदरमोड करूनही दिलेल्या आहेराची किंमत दुस-याच्या लेखी काय असते, हे लहानपणीच मी अनुभवलं होतं.. मी आहेर द्यायचो नाही पण घरी आल्यावर एका पेटीत ती आहेराची रक्कम जमा करायचो….. या गोष्टीला अकरा वर्षे झाली. मागच्या महिन्यात पेटीतील रक्कम मोजली.

अडीच लाख झाली. त्यात मी माझे स्वत:चे अडीच लाख घातले… पाच लाख या अनाथ लेकरांच्या लग्नसोहळ्याला दिले. त्यातून त्या जोडप्याचा लग्नसमारंभ केला जाईल आणि संसारोपयोगी वस्तू देऊन त्यांचा संसार उभा राहील..

…. गरज नसणा-या श्रीमंत लोकांना पद्धत म्हणून उगीचच आहेर करून नावे ठेवून घेण्यापेक्षा आहेराची गरज असणा-यांना आहेर केलेला बरा… नाही का? “

आता लाज वाटण्याची वेळ उपस्थितांची होती..

.. पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी अजयकडे पाहिले नि टाळ्यांच्या कडकडाटाने त्याला मानवंदना दिली…

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “दयासागर” – भाग – ३ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? जीवनरंग ❤️

☆ “दयासागर” – भाग – ३ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

(विवेकने विषय काढताच तो म्हणाला,

“माय डियर जंटलमन, वी हॅव नॉट सीन मिस्टर जॉन फॉर लास्ट वन मंथ”.

“काय? कामावर आला नाही तो?”

“नाही ना, त्याची काही खबर ही नाही. तुला काय वाटतं?”

“मला वाटतं तो काम पूर्ण करण्यात गढून गेला असावा. गेल्या दोन महिन्यात मी त्याला बरेच पैसे पाठवलेत. त्यामुळे त्याला पैशाची अडचण भासणार नाही. सगळं काम पूर्ण करूनच कामावर यायचा त्याचा बेत असेल.”

“मला वाटतं तो काम पूर्ण करण्यात गढून गेला असावा. गेल्या दोन महिन्यात मी त्याला बरेच पैसे पाठवलेत. त्यामुळे त्याला पैशाची अडचण भासणार नाही. सगळं काम पूर्ण करूनच कामावर यायचा त्याचा बेत असेल.”

“मला नाही वाटत तसं. तू एकदा त्याच्या गावात जाऊन आला आहेस ना? एकदा जाऊन तर पहा”

“मलाही उत्सुकता आहेच. उद्याच जातो. तुही आलास तर बरे होईल.”

“ओ. के. , मलाही बरेच दिवस चेंज मिळालेला नाही. आपण दोघेही जाऊ”) 

इथून पुढे – – 

दुसरे दिवशी दोघेही जॉनच्या गावात येऊन पोहोचले. घर माहित असल्यामुळे शोधायला फार वेळ लागला नाही. पण घराला भले मोठे कुलूप पाहून थोडा वेळ वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तोपर्यंत दोघेही आजूबाजूला भटकून आले. त्याच्या घराला लागून असलेली जमीन पाहिली. ती तशीच होती. सारं काही पूर्वीसारखंच होतं. कुठेही बांधकामाच्या खुणा दिसत नव्हत्या. अय्यर काय समजायचं ते समजला.

” विवेक, कुठे आहे तुमचे प्रार्थना मंदिर? हीच ना ती जागा? “

“होय अय्यर, हेच त्याचं घर. त्याची जमीन. पण मला तर इथं नवीन काहीच दिसत नाही “

“आणि दिसणारही नाही. “

“म्हणजे? “

“विवेक, जॉनने तुला फसवलंय? तुला लुबाडलय. तुझे पैसे घेऊन तो पसार झालाय. मी तुला सुरुवातीलाच सावध करत होतो. पण तू ऐकले नाहीस. “

“नाही अय्यर, माझा अजूनही विश्वास बसत नाही. त्यानं बांधकाम केलेलं नाही हे दिसतच आहे. पण कदाचित दुसरीकडे काम केलं असेल. त्याची अनेक पत्रं मला आलेली आहेत. “

“खुळा आहेस. समोर पाहतोयस ना सगळं? तू बुडालायस हजारो रुपयांना. तरीही तुझा त्याच्या प्रामाणिकपणावर विश्वास आहे? अरे माणसाचं मन हे इथून तिथून सगळीकडे सारखंच असतं. त्याचा प्रामाणिकपणा किंवा अप्रमाणिकपणा स्थलकालाच्या मर्यादा सांभाळीत बसत नाही. आता पुढे काय करायचं ते ठरव. “

घराच्या पायरीवर बसून गप्पा चाललेल्या असतानाच एक वृद्ध गृहस्थ त्यांचे जवळ आले.

“आर यू इंडियन डॉक्टर्स? “

“यस सर “

“हू इज मिस्टर साने? “

विवेकने आपली व अय्यरची ओळख करून दिली. त्या वृद्ध गृहस्थाने ही आपले नाव सांगितले. तो जॉनचा शेजारी होता. तो पुढे बोलू लागला,

“मिस्टर साने, आय ॲम व्हेरी सॉरी टू टेल यू मि. जॉन इज ॲबस्कॉंडेड. मला सार माहित आहे डॉक्टर. एके दिवशी दारूच्या नशेत जॉननेच मला सारं सांगितलं आहे. त्याचा प्लॅन सांगितला. तुमच्याकडून पैसे कसे मिळत आहेत हे सांगितलं. त्याचा प्लॅन म्हणजे एक नाटक होतं. तो एक भंपक माणूस आहे. त्याने काही केलेलं नाही आणि त्याला काही करायचंही नाही. त्यानं तुम्हाला हजारो रुपयांना लुबाडले. तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलाय. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला. पण तो तुमचे सगळे पैसे घेऊन गायब झालाय तुम्ही त्याला सोडू नका. त्यांन आमची, आमच्या गावाची अब्रू घालवली आहे. तुम्ही इतक्या दुरून आलात. तुमच्यासारख्या सेवा करणाऱ्या माणसाला त्याने फसवावं याच्याइतकं वाईट दुसरं काही असूच शकत नाही. तुम्हाला काही सांगावं तर तुम्ही इंडियाला गेल्याच त्याच्याकडून समजलं. त्यामुळे सगळं माहित असूनही आम्ही काही करू शकत नव्हतो. पण आता आम्ही. तुम्हाला सगळी मदत करू. कृपा करून आमच्यावर विश्वास ठेवा. तुमचे पैसे तुम्हाला मिळालेच पाहिजेत. त्याला शिक्षाही झाली पाहिजे.”

म्हाताऱ्याचे बोलणे ऐकून दोघेही चक्रावून गेले. आपण काय ऐकतो आहोत तेच विवेकला समजेना. अय्यरने त्याला धीर दिला.

“विवेक, हे म्हणताहेत ते बरोबर आहे. आपण जॉनचा शोध घेऊ. पोलिसात तक्रार नोंदवू. असं गप्प बसून चालणार नाही. उठ.”

विवेकने क्षणभर अय्यरकडे पाहिले. तो थांबला. पण त्याच्या चेहऱ्यावर निराशा दिसत नव्हती. मनाशी काहीतरी ठरवल्याप्रमाणे तो बोलू लागला, “नाही अय्यर, थांब. अशी घाई करून चालणार नाही. थोडा धीर धर. थोडा विचार कर. मी माझं सर्वस्व जॉनला दिल. कशासाठी? एक प्रार्थना मंदिर बांधण्यासाठी. इतक्या दूरवर भगवान कृष्णाचं मंदिर होतंय. त्याला आपण मदत करावी असं वाटणं यात काहीच चूक नाही. जो माणूस आपल्याशी चांगलं वागला त्याच्याशी विश्वासाने वागणं यातही काही चुकतंय असं मला वाटत नाही. आता आपण तक्रार करून त्याचा शोध घेऊन त्याच्याकडून पैसे वसूल करू शकू असं वाटतंय तुला? सहज शक्य होईल ते? “

” मग काय त्याला असंच सोडून द्यायचं? तुझ्या पैशांपैकी काही रक्कम तरी तुला परत मिळेल की नाही? “

“कदाचित मिळेल ही. पण पैसे परत मिळवल्याने काय काय मिळवता येईल? आत्ताची आमची मैत्री, परस्परावरचा विश्वास परत मिळवता येईल? “

“त्यानं कुठं तुझी कदर केलीय? तुझा विचार तरी काय आहे? “

“थोडे दिवस थांबायचं. काहीच करायचं नाही. आपण इथे येऊन गेलो हे त्याला नक्की समजेल. आपण त्याच्यावर लक्ष ठेवू शकत नसलो तरी त्याचं आपल्यावर नक्कीच लक्ष असणार आहे. त्याला समजू दे की आपल्याला सारं माहित आहे आणि तरीही आपण शांत आहोत. “

“त्यामुळे काय होईल? “

“त्यामुळेच तर सारा होईल. एक ना एक दिवस त्याला आपली चूक कळून चुकेल. तो आपण होऊन आपल्याकडे येईल, पश्चात्तापाने होरपळत आणि

पश्चात्तापासारखी दुसरी शिक्षा असू शकत नाही. “

“हे सार घडेल असं आजही वाटत तुला? आजच्या युगात? “

“का नाही घडणार? आपल्या तत्त्वावर असलेली आपली श्रद्धा एका मामुली माणसासाठी किंवा काही रुपयांसाठी ढासळू द्यायची का हा खरा प्रश्न आहे. मला पूर्ण खात्री आहे. अय्यर, असच घडेल. मी इथं प्रार्थना मंदिर बांधायला मदत करणार होतो ते काही दगडविटांची सुंदर इमारत निर्माण व्हावी म्हणून नाही. तर आपल्या संस्कृतीचं, धर्माचं तत्त्वज्ञान प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून. मग तूच सांग, काय शिकवले आपल्या धर्मानं, संस्कृतीने? संत महंतांनी काय सांगितल आहे? चुकलेल्यांना वाट दाखवण्यासाठी त्यांना सुधारण्याची संधी आपण द्यायला नको का? हेच तर आपल्या संस्कृतीचं तत्त्वज्ञान आहे. ते विसरून नुसती देऊळ बांधत सुटलं तर काय उपयोग? “

“धन्य आहे बाबा तुझी! आपल्याला काही हे जमलं नसतं. मला तर वाटतंय आता तू इथे असताना वेगळं मंदिर बांधण्याची आवश्यकताच नाही. एवढ्या शांतपणे विचार करणारा दयाबुद्धी असणारा तू असताना देवाच्या मूर्तीची आवश्यकता तरी काय? “

म्हातारा सारं लक्ष देऊन ऐकत होता. त्याचे डोळे पाणवले. काय बोलावं, कसं बोलावं त्याला समजेना. न राहून तो म्हणाला, ” मिस्टर साने यू आर रियली ग्रेट! मला आत्ता आठवण होते ती प्रभू येशूच्या त्या शब्दांची! त्या प्रभू पुत्राला क्रुसावर चढवले तरीही त्याने दयाबुद्धी सोडली नव्हती. तो फक्त एवढेच म्हणला होता, “परमेश्वरा यांना क्षमा कर. कारण हे काय करत आहेत हेच त्यांना समजत नाहीये. ” तुमचे आत्ताचे उद्गार यापेक्षा फारसे वेगळे नाहीत. तीच क्षमाशील वृत्ती. तेच मनोधैर्य. चुकलेल्या मेंढराला कळपात घेण्यासाठी धडपड. “

“आजोबा, मी कोणी देवदूत नव्हे. पण तुमच्या धर्मातील असो किंवा आमच्या धर्मातील मूळ तत्त्वज्ञान एकच आहे ना? दया आणि क्षमा ही तत्व काही कोणत्या एका धर्माची नाहीत. त्यांना स्थळ काळाच बंधन ही नाही. चुकलेल्यांना सुधारण्याची जास्तीत जास्त संधी द्यावी हे प्रत्येक धर्मानच सांगितलं आहे. म्हणून म्हणतो, जॉनला आपण सध्या तसंच सोडून देऊ. तो नक्की सुधारेल. आपण सगळेजण तशी प्रार्थना करू. “

 मावळत्या सूर्याच्या साक्षीने तिघेही वाट पाहू लागले एका नव्या सूर्योदयाची!

समाप्त

लेखक : श्री. सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “दयासागर” – भाग – २ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? जीवनरंग ❤️

☆ “दयासागर” – भाग – २ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

(“त्याचं काय आहे साहेब, करायचं म्हटल्यावर काही अवघड नाही. माझ्या घराजवळची मोकळी जागा तुम्ही पाहिलीत ना? आमचीच आहे ती. तिथेच तर करायचं सगळं. प्रश्न आहे तो फक्त पैशाचाच. बघू केव्हा जमेल तेव्हा. ठीक आहे, येतो मी. ” – इथून पुढे – – 

जॉन निघून गेला. पण त्यानं रंगवलेलं स्वप्न विवेकच्या डोक्यातून जात नव्हतं. किती सुंदर स्वप्न होतं ते. स्वतः कमी शिकलेलो आहोत म्हणून ती वेळ दुसऱ्यावर येऊ नये ही जॉनची इच्छा. त्याला अशिक्षित तरी कसं म्हणायचं? पण पैसा कसा उभारायचा? सारेजण मदत करायला तयार होतील का? निदान आपण तरी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. नाही तरी आपलं असं कोण आहे या जगात? आपल्या मायदेशी आपली आई आणि आपण स्वतः. इथं मिळणारा पगार आपल्यापुरता अगदी भरपूर आहे. नाही तरी आपण इथं कोणत्या उद्देशाने आलो आहोत? केवळ पैसा मिळवायचा म्हणून तर नाहीच नाही. उलट आपल्या व्यवसायातून आपल्या देशाची, धर्माची, संस्कृतीची ओळख सर्वांना करून द्यावी हा हेतू नव्हता का आपल्या मनात? मग आता आलेली ही संधी का सोडायची? इथल्या दोन-तीन वर्षांच्या वास्तव्यात बरंच काही करता येईल.

आपला हा विचार त्यानं जॉनला बोलून दाखवला. क्षणभर काय करावे तेच जॉनला समजेना. विवेकनेही नुसते बोलून न थांबता प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी म्हणून त्याचं दिवशी त्याला काही रक्कम देऊ केली.

“साहेब, शुभ कार्याचा संकल्प आपण सोडलेला आहे. तुमच्या पद्धतीप्रमाणे आणि आमच्या पद्धतीप्रमाणे ही सर्वप्रथम आपण ईश्वराचे स्मरण करूया. मी एक छोटेसे प्रार्थना मंदिर बांधून सुरुवात करतो. त्यात एक छोटीशी मूर्ती असेल येशूची तर दुसरी असेल भगवान श्रीकृष्णाची. “

जॉनने विवेकचा निरोप घेतला. पुढचे आठ दिवस तो दवाखान्यात दिसला नाही. एके दिवशी सकाळी तो विवेकच्या क्वार्टरवर आला. घाईघाईने हातातले कागद टेबलावर पसरले.

“साहेब, हा पहा प्लॅन! हे छोटसं प्रार्थना मंदिर. त्यांच्या पलीकडे शाळेची इमारत. शिवाय या मोकळ्या जागेत बाग करता येईल. “

विवेकने प्लॅन पाहिला.

“जॉन, फार मोठे स्वप्न पाहू नकोस. तुला कोण किती मदत करेल हे सांगणं अवघड आहे. म्हणून आपल्याला झेपेल तेवढेच हाती घे. “

“होय साहेब, हा संपूर्ण प्लॅन आहे. आपण सुरुवातीला फक्त प्रार्थना मंदिरच बांधायचं आहे. “

जॉन रोज येऊ लागला. रोज काही ना काही सांगू लागला. कामाची सुरुवात विवेकच्या हस्ते व्हावी म्हणून त्याने विवेकला विनंती केली. पण कामाच्या व्यापात ते जमले शक्य नसल्यामुळे विवेकने त्याला नकार दिला. जॉन दर चार-आठ दिवसांनी गावाकडे जाऊ लागला. डॉक्टर अय्यर हे सारे पाहत होता. विवेकने जॉनशी एवढी जवळीक करावी हे त्याला पटत नव्हते. त्याने विवेकला तसे सुचवूनही पाहिले. पण विवेकचा जॉनवर विश्वास होता. जॉन आयुष्यात काहीतरी चांगलं करतोय, आपला त्याला हातभार लागतोय याचा त्याला आनंद होता. या प्रार्थना मंदिराच्या रूपाने आपल्या धर्माची, संस्कृतीची ओळख इथल्या लोकांना करून देता येईल म्हणून त्याला मनापासून आनंदाच होत होता. जॉन कडून सतत येणारा वृत्तांत त्याला सुखावत होता. आज काय जागा साफ करून झाली. उद्या काय नको असलेली झाडेझुडपे तोडून झाली. एक ना दोन. कामाची जशी जशी प्रगती झाल्याचे समजत होते तशी तशी विवेक कडून पैशाची मदत ही मिळत होती.

एके दिवशी अवेळी दारावर थाप पडलेली ऐकून विवेकला आश्चर्य वाटले. कोण आलं असेल? त्याने दार उघडले. ड्युटीवरील वॉर्ड बॉय निरोप घेऊन आला होता. विवेकची आई खूप आजारी होती. त्याला ताबडतोब भारतात परतणं जरुरीचं होतं.

विवेकने क्षणभरात सामानाची आवराआवर केली. आता परत यायचे म्हणजे एक महिना तरी सहज लागेल. त्याला एकच काळजी वाटू लागली. जॉनची! एकीकडे कधी एकदा आईला भेटतो असे झालेले, तर दुसरीकडे जॉन आता भेटू शकत नाही म्हणून काळजी. त्याने एका कागदावर त्याच्यासाठी निरोप लिहून ठेवला,

“प्रिय जॉन, मला आईच्या आजारपणामुळे अचानक जावे लागत आहे हे तुला समजले असेलच. मी लवकरात लवकर परत येईन. तू तुझे काम थांबवू नकोस. ते चालूच ठेव. मला काही कारणाने लवकर येणे शक्य झाले नाही तर मी तुला तेथूनच पैसे पाठवीन. तू ही प्रोग्रेस कळवत रहा. माझा पत्ता तुला ऑफिसमध्ये मिळेलच. “— तुझा डॉक्टर विवेक साने

 *. *. *. *. *. *. *

विवेक आपल्या घरी परतला. तोपर्यंत त्याच्या आईची तब्येत फारच बिघडली होती. शेजाऱ्यांनी शेजार धर्म पाळला होता. अशक्तपणा बराच वाढला होता. आपला मुलगा आलेला पाहून तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. निस्तेज चेहऱ्यावर हास्याची एक लहर उमटली. अशा अवस्थेत दोन दिवस केले आणि तिसऱ्या दिवशी दिवस मावळतानाच तिची प्राणज्योत मालवली.

विवेकचा एकमेव आधार निखळून पडला. एवढ्या मोठ्या जगात आपण अगदी एकटे पडलो आहोत याची त्याला जाणीव झाली. या गावात, या देशात आपल्या मायेचे कोणीही नाही. मग या गावाला आपलं तरी कसं म्हणायचं? आपण कुठेही राहिलो तरी काय फरक पडणार आहे? ‘ अवघे विश्वची माझे घर ‘हेच खरं. आपण हे सर्व सोडून जायचं आणि कायमचं इंग्लंडमध्ये राहूनच आपला सेवाधर्म चालू ठेवायचा त्याने निश्चय केला. हे जुनं घर, फर्निचर सगळ्याची व्यवस्था लावायला हवी. जे काही दोन-चार नातलग आहेत त्यांचा निरोप घ्यायला हवा. दोन-चार महिने सहज लागतील. त्यानं लगेच तसे कळवून टाकलं व तो पुढच्या तयारीला लागला.

घर साफ करता करता त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्याच्या आईचे पासबुक त्याला मिळाले. सहज म्हणून त्याने उघडून पाहिले. एक भली मोठी रक्कम पुस्तकात शिल्लक दिसत होती. त्याने गेल्या वर्षभरात जे काही पैसे आईला खर्चासाठी म्हणून पाठवले होते त्यातील अगदी थोडीशी रक्कमच खर्च झाली होती. बाकीचे सारे पैसे जसेच्या तसे आईने शिल्लक ठेवले होते. आईच्या आठवणीने त्याचे डोळे भरून आले. आपण आईसाठी पैसे पाठवले होते. ते तिथेच झाले. आता ते आपले नाहीत. त्यांन ठरवून टाकलं. पुढच्या दोन दिवसात त्यानं कागदपत्रांची पूर्तता केली. बँकेतून पैसे मिळताचक्षणी सगळ्या रकमेचा ड्राफ्ट जॉनच्या नावानं काढून त्याला पाठवून दिला आणि मगच तो घरी आला. बऱ्याच दिवसानंतर तो समाधानी दिसत होता. आईने साठवलेले पैसे सत्कारणी लागले याचा तो आनंद होता. मधून मधून जॉनची पत्र येत होती. त्यावरून आपण जाईपर्यंत प्रार्थना मंदिर पूर्ण झालेले असेल याची त्याला खात्री वाटत होती.

चार महिने कसे निघून गेले समजले ही नाही. आज शेवटचा दिवस. उद्यापासून या घरावर आपला हक्क नाही. काल मिळालेल्या घराच्या किमतीची रक्कम जॉनला पाठवून, सर्वांचा निरोप घेऊन विवेक घरी परतला. संध्याकाळ केव्हा होते आणि मुंबईला जाणा-या गाडीची वेळ केव्हा होते असं त्याला झालं होतं.

*. *. *. *. *. *

रूमवर डॉक्टर अय्यर त्याची वाट पाहत होताच. विवेकने त्याला सारा वृत्तांत सविस्तर सांगितला. आपण सारं आयुष्य आता इथेच काढणार आणि आपल्या संस्कृतीचा प्रसार करणार हेही सांगितलं. अय्यर अस्वस्थ झाला. त्याला कसं सांगावं हे समजेना. पण केव्हातरी सांगावं लागणारच होतं. विवेकने विषय काढताच तो म्हणाला,

“माय डियर जंटलमन, वी हॅव नॉट सीन मिस्टर जॉन फॉर लास्ट वन मंथ “.

“काय? कामावर आला नाही तो? “

“नाही ना, त्याची काही खबर ही नाही. तुला काय वाटतं? “

“मला वाटतं तो काम पूर्ण करण्यात गढून गेला असावा. गेल्या दोन महिन्यात मी त्याला बरेच पैसे पाठवलेत. त्यामुळे त्याला पैशाची अडचण भासणार नाही. सगळं काम पूर्ण करूनच कामावर यायचा त्याचा बेत असेल. “

“मला नाही वाटत तसं. तू एकदा त्याच्या गावात जाऊन आला आहेस ना? एकदा जाऊन तर पहा”

“मलाही उत्सुकता आहेच. उद्याच जातो. तुही आलास तर बरे होईल. “

“ओ. के. , मलाही बरेच दिवस चेंज मिळालेला नाही. आपण दोघेही जाऊ “

– क्रमशः भाग दुसरा 

लेखक : श्री. सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “दयासागर” – भाग – १ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? जीवनरंग ❤️

☆ “दयासागर” – भाग – १ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

लंडनच्या विमानतळावर विवेकने पाय ठेवला. क्षणभर त्याला गलबलून आलं. आपण खूप दूर येऊन पोहोचलो आहोत याची त्याला जाणीव झाली. चारी बाजूंना दिसणारा झगमगाट त्याचे डोळे दिपवू शकत नव्हता. त्याच्या डोळ्यासमोर दिसत होता तो त्याच्या गावातला एसटी स्टँड! आपण मुंबईला जाणाऱ्या गाडीत बसलो होतो. आपल्याला निरोप द्यायला आई आली होती. परदेशात जायला तिने परवानगी दिली असली तरी आता वर्षभर तरी भेट होणार नाही या कल्पनेने तिचे डोळे भरून आले होते. आपणही तिला लवकर येण्याचे आश्वासन दिले होते. ती आशा मनात बाळगूनच ती घराकडे परतली होती.

पण असं घरच्या आठवणीत गुंतून चालण्यासारखं नव्हतं. त्यानं ठरल्याप्रमाणे पुढचा प्रवास सुरू केला. लंडन पासून सुमारे दिडशे किलोमीटर लांब असलेल्या छोट्याशा खेडेगावात तो येऊन दाखल झाला. गाव अगदी छोटसं पण किती रमणीय होतं! चारी बाजूंनी वेढलेले डोंगर, कधी न पाहिलेली बर्फाच्छादित शिखरे, तांबड्या पिवळ्या पानांची झाडे, त्या खालून जाणारे काळे कुळकुळीत रस्ते आणि डोंगराच्या उतारावर पसरलेली टुमदार घरे. त्या छोट्याशा गावात मिशनची इमारत शोधून काढणं त्याला अवघड गेलं नाही. गावाच्या एका बाजूला असलेली लाल भडक दगडांची छोटीशी इमारत त्याला खुणावत होती.

पहिला दिवस कसा संपला समजलच नाही. प्रवासाचा शीण, गावाकडील माणसांच्या आठवणी, मग या सुंदर खेड्यात येणं, आल्यावर सर्व कागदपत्रे सादर करणं, प्रवेश मिळवणं, होस्टेलची रूम ताब्यात घेणं यात दिवस कसा संपून गेला त्याला समजलच नाही. आता मात्र कामाला लागायचं होतं. एक डॉक्टर म्हणून आपण इथं आलो असलो तरी आपण एक हिंदू मिशनरी डॉक्टर आहोत. प्रत्येक रुग्ण हा परमेश्वर- स्वरूप मानून त्याची सेवा करणं, इतकच नव्हे तर प्रत्येक माणसाशी त्याच पद्धतीने वागणं हाच आपला धर्म बनला पाहिजे. तशी वृत्ती आपल्यापाशी आहे याची त्याला जाणीव होती. काहीतरी वेगळं करून दाखवणं हा त्याचा पहिल्यापासूनचा स्वभाव होता. नाही तर उत्तम नोकरी मिळत असतानाही ती सोडून एका हिंदू मिशनरी हॉस्पिटलमध्ये तो कशाला आला असता?

आजचा संपूर्ण दिवस त्याने आपल्या संस्थेचा परिचय करून घेण्यातच घालवला. भारतात मुख्य कार्यालय असलेल्या या संस्थेच्या शाखा अनेक देशात पसरल्या होत्या. केवळ ग्रामीण भागात किंवा खरोखर आवश्यकता असेल अशा ठिकाणी जाऊन संस्था उघडणं, शाळा, दवाखाना, ग्रंथालय यासारख्या सोयी पुरवणं, इतकच नव्हे तर भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान, कला, धर्म यांची जगाला ओळख करून देणं हा संस्थेच्या कामाचा मुख्य उद्देश होता. विवेक इथे डॉक्टर म्हणून आला होता. त्यामुळे लोकांच्यात मिसळून जाणं त्याला सहज शक्य होतं. आपली माणसं आणि तिथली माणसं, आपला धर्म आणि तिथला धर्म सर्वकाही अगदी जवळून अभ्यासता येणार होतं. म्हणूनच तो मनोमन खुश झाला होता

… आज त्याच्या कामाचा पहिला दिवस होता. ऑफिससमोरच्या बागेतील छोट्याशा कृष्णमंदिरात जाऊन त्याने दर्शन घेतले. मनःपूर्वक प्रार्थना करुन अत्यंत उदात्त भावनेने तो दवाखान्याकडे वळला.

सर्व स्टाफशी ओळख झाली. त्याच्याबरोबर त्याच्यासारखेच आणखी दोन भारतीय होते. एक होता केरळमधला डॉक्टर अय्यर, तर दुसरा होता कानपूरचा डॉक्टर वर्मा. बाकीचे तिघे इंग्लंडमधलेच होते. डीन होते डॉक्टर सुब्रमण्यम.. एक निष्णात शल्य विशारद आणि मूर्तीमंत उत्साह! त्यांनी सर्वांची ओळख करून घेतली. सर्वांचे स्वागत केलं.

“फ्रेंड्स, वेलकम ऑल ऑफ यु! आय एम प्राऊड ऑफ माय इंडियन फ्रेंड्स हू हॅव डिसाईडेड टू डिव्होट देअर लाईफ फॉर द सर्विस ऑफ द पीपल. आय थिंक, वुई नीड नॉट वेस्ट अवर टाईम. लेट अस् स्टार्ट अवर वर्क “.

… बघता बघता कामाचा प्रचंड व्याप सुरू झाला. दिवस पाळी असो वा रात्रपाळी, विवेक प्रत्येक काम अगदी मन लावून करीत होता. पेशंटची केवळ शारीरिक वेदनाच नव्हे तर त्याचं मानसिक दुःखसुद्धा समजून घेत होता. त्याला माहीत होतं की सगळेच पेशंट्स काही आपल्याशी खरं बोलत नाहीत. सांगितलेली पथ्य पाळत नाहीत. औषध घेण्यात टाळाटाळ करतात. पण कुणावरही न रागवता, सर्वांशी गप्पा गोष्टी करत तो पेशंटला सगळं काही करायला भाग पाडत होता. दिवसभर पेशंटच्या विश्वात रमावे आणि आपली ड्युटी संपली की पुस्तकांच्या जगात हरवून जावे. दवाखान्यातलेच नव्हे तर गावातले कितीतरी रहिवासी त्याचे अगदी चांगले मित्र बनले होते. आपल्या देशातील गमतीजमती सांगण्यात, आपल्या संस्कृती विषयी बोलण्यात, आपल्या धर्माविषयी, राष्ट्रपुरुषांच्या विषयी काय सांगू आणि काय नको असं त्याला होत असे. डॉक्टर अय्यरबरोबर तत्त्वज्ञानावर गप्पा मारताना रात्र कशी संपून जाई त्याला समजत सुद्धा नसे. डॉक्टर स्मिथच्या हिंदू धर्माविषयीच्या खुळचट कल्पना दूर करता करता त्याला कितीतरी गोष्टी समजावून सांगाव्या लागत असत. तो आल्यानंतर त्यानं कित्येक पेशंट्सना नुसत्या योगांच्या उपचाराने बरं केलं होतं. कित्येकांना व्यसनापासून मुक्त केलं होतं. कित्येकांना चक्क भक्तीमार्गाला लावलं होतं… कुणावरही कसलीही सक्ती न करता.! याचा परिणाम एकच झाला… तो म्हणजे डॉक्टर विवेक अगदी अल्पकाळात लोकांचं दैवत बनला.

अशाच एके दिवशी विवेक आपल्या क्वार्टरवर परतला. दारातच पायरीवर वॉर्ड बॉय बसलेला.

“काय रे जॉन, असा उदास का?

“काय सांगू साहेब, बरेच दिवस सांगीन म्हणतो. पण धीरच होत नाही “.

“हे बघ, आधी आत ये? नि:संकोचपणे सांग सगळं. काही होतंय का? “

“हॅ, आपल्याला काय होणार साहेब? चोवीस तास औषध आपल्या अवतीभवती असतात. कोणता आजार होतोय असं वाटलं की खा गोळी. “

“मग अडचण काय आहे? “

“साहेब, अडचण आहे ती पैशांची. घरात सतत काही ना काही प्रॉब्लेम चालूच आहेत. पगार कसा पुरायचा? पैसा कसा पुरवायचा हेच समजत नाही. “

“अरे, मग मी काय करू म्हणतोस? “

“साहेब, शक्य असेल तर थोडेफार पैसे. ,.. फार नाही दहा पाउंड दिलेत तरी चालेल “

“तेवढ्याने भागणार आहे काय? ते संपतील. पुन्हा काय? त्यापेक्षा आपल्या गरजा कमी कशा करता येतील ते बघावं “

“चलतो साहेब, मोठ्या अपेक्षेने आलो होतो. “

“अरे, बस बस. असा वैतागू नकोस. मी देतो तुला आत्ता पैसे. पण उसनवारी करणं बरं नव्हे एवढेच माझं सांगणं. “

“तेही बरोबर आहे साहेब. आता तुम्ही म्हणता तसंच करतो. फालतू खर्च एकदम बंद. “

“तसं केलंस तर फार बरं होईल. “

…. पैसे खिशात टाकून आभार मानून जॉन पळाला. इतक्यात डॉक्टर अय्यर तिथे आले.

“हॅलो मिस्टर साने, काय दानधर्म केलात का? “

“दानधर्म कसला रे? त्याची थोडी नड होती, म्हणून दिले थोडे पैसे. “

“व्हेरी गुड, आता विसरून जा ते पैसे. “

” का? “

” तो काही प्रामाणिक माणूस नाही “.

“तुझा काही अनुभव? “

“नाही, पण त्याच्याविषयी ऐकलय तसं. “

“मग जाऊ दे. प्रत्यक्ष अनुभव नसताना आपण अविश्वास दाखवणं मला बरोबर वाटत नाही “

“ओ. के. जंटलमन. लेट अस् हॅव अ डिनर “

…. पंधरा दिवस झाले असतील नसतील. जॉनने प्रामाणिकपणे पैसे परत आणून दिले. मग हे नेहमीचेच होऊन बसले. जरूर भासली की जॉननं हात पसरावेत. विवेक देईल तेवढे पैसे त्याने घ्यावेत आणि काही दिवसांनी प्रामाणिकपणाने परत करावेत. जॉन आता मोकळेपणानं बोलत असे. घरची सुखदुःख सांगत असे. आपल्या खेड्याविषयी बोलत असे. विवेकही त्याच्या मैत्रिने सुखावला. हा वॉर्डबॉय आपला मित्र केव्हा झाला त्याला समजलही नाही. एका वीकेंडला तो त्याच्या गावीही जाऊन आला. त्याचं घर पाहिलं. छोटसं शेत पाहिलं. बदल म्हणून इथे यायला हरकत नाही असंही त्यानं ठरवलं.

“डॉक्टर साहेब, एका गोष्टीचं फार वाईट वाटतं “

“कोणत्या रे? “

“आपण शिक्षण जास्त घेतलं नाही याचं. नाहीतर चार पैसे जास्त मिळवता आले असते. “

“मग आता शिकतोस? मी शिकवतो तुला. “

“आता? काय लक्ष लागणार आहे शिक्षणात? पण एक विचार मात्र मनात येतो. “

“कोणता? “

“आपल्या गावात एक शाळा काढावी. छोटीशीच. छोटसं प्रार्थना मंदिर बांधावं. “

“वा, सुंदर आहे की कल्पना. पण या सगळ्याला पैसा लागणार आणि कोण करणार हे सगळं? कुठे करणार? इतकं सोपं नाही ते. “

“त्याचं काय आहे साहेब, करायचं म्हटल्यावर काही अवघड नाही. माझ्या घराजवळची मोकळी जागा तुम्ही पाहिलीत ना? आमचीच आहे ती. तिथेच तर करायचं सगळं. प्रश्न आहे तो फक्त पैशाचाच. बघू केव्हा जमेल तेव्हा. ठीक आहे, येतो मी. “

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री. सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हेतू – – (अनुवादित) – मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघःश्याम सोनवणे ☆

श्री मेघःश्याम सोनवणे

? जीवनरंग ?

☆ हेतू – – (अनुवादित) – मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघःश्याम सोनवणे 

आमच्या घरातला तो तपकिरी रंगाचा सोफा माझा खूपच आवडता होता… बाबांनी तो मुंबईहून मागवला होता. मी त्याच्या मऊ गादीवर उड्या मारायचो… कधीकधी मी त्यावर झोपायचोही. ताई चे, माझ्या बहिणीचे लग्न ठरले तेव्हा सोफा येऊन एक महिन्यापेक्षा कमीच वेळ झाला होता… लग्नाची तयारी जोरात सुरू झाली होती. बाबांनी लग्नासाठी त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतून आणि बँकेतून सर्व पैसे काढले होते. लग्न मोठ्या थाटामाटात साजरे झाले.

बाबांनी माझ्या बहिणीच्या सासरच्यांना लग्नासाठी खूप सामान पाठवले होते… मला आठवतही नाही की काय काय पाठवले होते. मी माझ्या आईला विचारले होते की माझ्या बहिणीचे लग्न झालेल्या घरात अशा वस्तू नाहीत का… आईने माझ्याकडे हसत हसत पाहिले आणि म्हणाली, “सर्व काही आहे बेटा, पण हे सर्व मुलींच्या लग्नाच्या वेळी द्यावेच लागते… “

ताई आता नवीन पलंगावर झोपेल याचा मला आनंद झाला… ताई आता नवीन खुर्चीवर बसेल…

लग्न तर पार पडले होते, पण लग्नानंतर काही दिवसांनी, जेव्हा मी शाळेतून घरी परतलो तेव्हा मला घराबाहेर एक ट्रक उभा असलेला दिसला… बाबा त्यावर आमचा तपकीरी रंगाचा सोफा ठेवत होते. मी धावत खोलीत गेलो. मी बाबांना विचारले, “आपला सोफा कुठे चालला आहे, मग आता मी कुठे बसणार?” 

बाबा म्हणाले, “पुढच्या महिन्यात आपण एक नवीन सोफा घेऊया. “

आमचा सोफा ताईच्या घरी गेला होता… नंतर आमच्या घरी कधीच नवीन सोफा येऊ शकला नाही… आम्ही खोलीत लोखंडी खुर्च्या ठेवल्या होत्या, पण मला त्यावर बसण्याची अजिबात इच्छा होत नव्हती.

ताई च्या लग्नाला सहा महिने झाले होते. लग्नानंतर पहिल्यांदाच ताई आईला भेटायला आली तेव्हा ती खूप रडत होती. आई बराच वेळ तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती… आई म्हणत होती, “आपण तरी काय करू शकतो? काही लोकांचे मन कधीच भरत नाही… पण वेळ सर्वकाही ठीक करेल. ” मला संपूर्ण गोष्ट समजली नाही, पण आई मनाच्या हेतूंचे महत्त्व समजावून सांगत राहिली.

लग्नानंतर काही महिन्यांनी, ताईचा धाकटा दिर आमच्या भाऊजींसोबत आमच्या घरी आला होता. तो माझ्याच वयाचा असावा. पण जेव्हा तो आमच्या घरी आला तेव्हा असं वाटलं की जणू काही कुणी खास महत्वाचा पाहुणा आला आहे. आई रोज सकाळी ताईच्या दिराला ग्लास भरून दूध द्यायची. त्याचं आवडतं जेवण घरी बनवलं जायचं… बाबा त्याला सतत सोबत फिरायला घेऊन जायचे…

ज्या दिवशी तो जाणार होता, त्या दिवशी त्याच्यासाठी खूप नवे कपडे खरेदी केले गेले होते. पहिल्यांदाच मला वाटले की मी कधी कुणाचा दिर बनेन… असो, ज्या दिवशी माझे भाऊजी परत जाणार होते, त्या दिवशी माझ्या ताईच्या दिराने त्याला माझा कॅरम बोर्ड पाहिजे असा आग्रह धरला.

माझा कॅरम बोर्ड… मला तो माझ्या जीवापेक्षाही जास्त आवडता होता. मी माझ्या मित्रासोबत रोज संध्याकाळी कॅरम खेळायचो. मी तो माझ्या ताईच्या दिराला का देऊ? पण बाबांनी मला समजावले, “बेटा, तू तो त्याला दे… ” 

“मी देणार नाही… तो माझा आहे… ” 

“मी तुला एक नवीन घेऊन देईन… ” 

“तूम्ही म्हणाला होतात की आपण एक नवीन सोफा घेऊ… तो तरी कुठे आला बाबा… “

बाबा गप्प बसले, पण माझा कॅरम बोर्ड माझ्या बहिणीच्या दिराला देण्यात आला होता… त्यानंतर चाळीस वर्षे उलटून गेली आणि मी कॅरम कधीच खेळलो नव्हतो. कॅरम बोर्ड गेला होता. मी माझ्या बहिणीच्या दिराला माझा कॅरम बोर्ड दाखवल्याबद्दल मलाच वाईट वाटत होते, राग येत होता. मी बरेच दिवस दुःखी होतो. मग मी माझ्या आईला विचारले की माझ्या भाऊजींनी त्यांच्या धाकट्या भावासाठी नवीन कॅरम बोर्ड का खरेदी केला नाही. त्यांनी माझा सोफा आणि कॅरम बोर्ड का घेतला. ” 

पहिल्यांदाच, माझ्या आईने मला सांगितले, “काही लोकांचे हेतू कधीच पूर्ण होत नाहीत, बेटा… माणसाचे पोट भरलेले असो वा नसो, त्यांचे हेतू मात्र पूर्ण झालेच पाहिजेत. ” असे म्हणत, माझ्या आईने तिचे डोळे पुसले आणि मला तिच्या पदरात घेतले.

बरीच वर्षे उलटून गेली. आता मला सोफा ही आवडत नाही, कॅरम बोर्डही नाही…

एके दिवशी, दिल्लीतील एका मॉलमध्ये जेवत असताना, बर्गरची जाहिरात पाहून मी थबकलो… त्यावर लिहिले होते, “पोट भरेल, पण मन नाही… मी माझी पत्नी सुधाला म्हटले की हे कंपनीचे लोक अशी चुकीची माहिती देतात. ते म्हणतात की पोट भरेल, मन नाही…. ‘पोट भरले नाही तरी मन भरेल’ असे लिहायला पाहिजे होते… पोट भरण्यापेक्षा हेतू पूर्ण करणे, मन भरणे जास्त महत्वाचे आहे. या जगात, ज्याचं मन भरलेलं नाही, त्याच्याकडे सर्व काही असूनही, ते दुसऱ्यांच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करतात, ज्यांचे मन समाधानी नसते… त्यांच्या घरात कोणाचीही बहीण आनंदी राहू शकत नाही, व स्वतः ते ही नाही.

हिंदी कथा लेखक – अनामिक  

मराठी अनुवाद – श्री मेघःश्याम सोनवणे

नाशिक.

9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “जाणीव…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

☆ “जाणीव…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

गेले काही दिवस त्याचं मन थार्‍यावर नव्हतं. ऊदास झालं होतं.. भरकटलं होतं.. सध्या कुठलीच गोष्ट मनासारखी घडतं नव्हती. कंपनीने दोन महिन्यापूर्वी त्याला कामावरून कमी केलं होतं. चार-पाच ठिकाणी त्याने प्रयत्न केला होता पण काम होत नव्हतं. आज एके ठिकाणी तो गेला होता तिथेही त्याची निराशा झाली होती. वैतागुन मोटरसायकल घेऊन तो निघाला.

आई समोर होती.. म्हणाली,

” अरे देव बघत असतो रे… तो दाखवेल तुला मार्ग… होईल सगळं नीट. जरा धीर धर रे बाळा… “

” तरी पण… जरा जाऊन येतो. रात्री मित्राकडेच राहीन. ” 

तिरीमिरीतच तो निघाला.

तो ऐकणार नाही हे आईला कळतं होतं. ती शांत होती. तो अमोलकडे जाऊन मन मोकळे करून येईल… हे तिला माहित होते. फोन सुध्दा न घेता तो बाहेर पडला.

त्याला आज कुणाशीच बोलावंसं वाटत नव्हतं. तो निघालाच..

मनात म्हणाला…

आई बिचारी भोळी आहे. तिला जगाची काही ओळख नाही. तिचा आपला देवावर प्रचंड विश्वास… जसं काही सगळं काही तिचा देवचं करतो… जाऊ दे…

संध्याकाळ झाली होती. आज त्याला अमोलकडे पण जावसं वाटेना. तो सुसाट वेगाने गडाकडे निघाला… त्याच आवडतं ठिकाण… तिथे पायथ्याशी जाऊन जरा शांतपणे बसू असे त्याने ठरवले.

आता वस्ती मागे पडली होती. मोकळा रस्ता होता. त्याच्या नेहमीच्या वळणावर त्याला झाड दिसलं.. तो वळला.. आता थोड्या वेळातच गडाचा पायथा…

मध्येच गाडी कुरकुरायला लागली.. आणि अचानक खरखर आवाज करत बंद पडली. तो वैतागला.. आजचा दिवसच खराब आहे…

खूप वेळा किक मारली… मग गाडी चालू झाली.

आता त्याच आसपास लक्ष गेलं. अंधार चांगलाच गडदं झाला होता. जोरात वारा वाहत होता.

त्या वाऱ्यानी हलणारी झाडं वेगळीच वाटत होती. अंधारात रस्ताही दिसेनासा झाला होता. विचारांच्या तंद्रीत आपण दुसऱ्याच रस्त्याला लागलो आणि आपली वाट चुकली हे त्याच्या लक्षात आले.

आकाशात बघितलं तर चंद्र, चांदण्या नव्हत्याच… नुसताच अंगावर येणारा काळाभोर काळोख.. कसाबसा तो गाडी हळूहळू चालवत होता.

 कुठे जातोय समजत नव्हतं. त्याच्या मनात आलं..

 चकवा लागला की काय…

कुठला आहे हा रस्ता…

थांबायची पण भीती वाटायला लागली होती.

अचानक एखादं हीस्त्रं श्वापद येऊन आपल्याला खाऊन टाकेल की काय असही क्षणभर त्याला वाटलं… भीतीची लहर अंगभर लपेटली होती.

कुठल्या संकटात अडकलो आहोत हेच कळत नव्हते… काळोखी वाट संपतच नव्हती…

तो तसाच पुढे निघाला. त्या भयाण शांततेत गाडीचा आवाज अंधार चिरत जातं अजूनच कर्कश्य वाटत होता.

अशाच सैरभैर अवस्थेत त्याला काहीतरी चमकल्या सारख दिसलं.

लांबवर दिसत असलेल्या त्या क्षीण उजेडाच्या दिशेने हिम्मतं धरून तो निघाला.

जवळ गेल्यावर गाडीच्या उजेडात त्याला शेंदूर लावलेला दगड दिसला. त्याच्यासमोर एका खोलगट दगडात तेल वात लावलेली होती. त्या वातीचाच प्रकाश त्याला दिसला होता. देवासमोर नारळ फोडलेला होता. त्याच्या जीवात जीव आला. दिवा आहे म्हणजे इथे निश्चितच कोणीतरी असणार…

इतक्यात आवाज आला,

” कोण आहे रे”

” मी… मी गडावर निघालो आणि वाट चुकलो. “

“थांब आलोच ” असं म्हणत एक म्हातारा काठी टेकत आला.

” अरे लेकरा आज अमोशाला असा रात्रीचा कशाला निघालास? आता अंधारात गडाची वाट सापडायची नाही. रात्र झालीय थांब इथचं”

गत्यंतरच नव्हतं. म्हाताऱ्याने पाणी दिलं. खरंतर भुकेची जाणीव झाली होती. म्हाताऱ्याने ते ओळखलं. अर्धी भाकरी आणि थोडीशी भाजी असलेला डबा त्याला दिला.

” हे खा.. एवढेच आहे बघ” 

न बोलता तो खायला लागला.

त्या झोपडीत मिणमिणणारा तेलाचा दिवा तेवढा होता.

म्हाताऱ्याने बाहेर जाऊन देवा समोरचा अर्धा नारळ आणला. त्याचे तुकडे केले.

” अमोशाचा असला तरी प्रसादाचा आहे घे… “

म्हणून त्याला दिले. तो निमूटपणे खायला लागला. म्हणाला,

” आजोबा असं इथं एकटं झोपायला तुम्हाला भीती नाही वाटत? “

” अरे कशाची भिती? आपण घाबरलो की जग घाबरवतयं बघ.. आपण ताठ राहायचं.. सामना करायचा. एक मारलं तर आपण दोन मारायचे ” आजोबा अगदी शांतपणे म्हणाले. तो त्यांच्याकडे बघायला लागला.

खाऊन झालं तसं हात धुवायला तो बाहेर गेला. त्याला वाट दाखवणारा दिवा आता शांत झाला होता. विझला होता.

आजोबा म्हणाले, ” चांगल्या घरचा दिसतोस मग अशा अवेळी गडावर कशाला निघालास”.

“सहजच वाटलं निघालो”

” वाटलं की केलं… असा वेडेपणा करू नये रे.. थोडं थांबावं.. विचार करावा… वेळ बघावी… बरं ती चादर घे आणि झोप आता”

तो सतरंजीवर आडवा झाला. तरी त्याला लवकर झोप लागेना…

 म्हाताऱ्याने ते ओळखलं म्हणाला,

“अरे झोप येईना का? तू झोप बिनघोर मी आहे ना.. काळजी नको करू… “

त्यांच्या शब्दांनी त्याला एकदम आश्वासक वाटलं…

” मी आहे ना.. “

या शब्दांनी त्याला आईच्या देव्हारात असलेल्या फोटोतील स्वामींचा चेहरा समोर आला त्याच्या खाली हेच शब्द लिहिलेले होते…

आज आपण अचानक इथे कसे आलो? हे आजोबा काय भेटले… त्यांनी तीच चार वाक्य कशी म्हटली… हे सगळं त्याला गुढ… अलौकिक वाटत होतं…

आता मनावरचा ताण कमी झाला. खरंच आपण इतके का गडबडून गेलो? जाऊ दे थोडे दिवस… काहीतरी निघेल मार्ग…

विचारांच्या नादात झोप कधी लागली त्याला कळलंच नाही.

सकाळी सूर्यप्रकाशाच्या उजेडानी त्याला जाग आली. आपण कुठे आहोत याचे भान आले. उठून तो बाहेर आला.

“झाली का झोप? ये.. “

म्हातारा म्हणाला.

” निघतो आता आई वाट बघत असेल. “

त्यानी आजोबांना वाकून नमस्कार केला. म्हणाला,

” तुम्ही भेटलात म्हणून.. नाहीतर रात्रीचा कुठे भरकटलो असतो कोण जाणे. “

” अरे वाट चुकलेल्याला आसरा द्यायचा.. त्यात काय एवढं… आणि कोणाला घरात घ्यायचं कळतं रे.. आता नीट घरी जा. “

” हो”

निघताना काळ्यामीट्ट अंधारात वाट दाखवणाऱ्या.. शेंदूर लावलेल्या दगडाच्या देवाकडे तो गेला. खाली बसून त्यानी नमस्कार केला. डोळ्यातून घळंघळं पाणी वाहत होते. याच देवाने त्याला रात्री प्रसाद दिला होता.

त्याला एकदम आईची आठवण झाली.

त्याचं मन भरून आलं.

मनात विचार आला.. काल रात्री ते आजोबा देवासारखे धावून आले… खरंतर म्हातारी माणसं नेहमी बोलतात तसंच साधंच बोलले पण… त्या चार शब्दांनी त्यांनी माझी समजूत काढली… असच वाटलं

मात्र एक कोडं त्याला पडलं होतं. कालच्या त्या अंधाऱ्या भयाण रात्री.. वाऱ्यात… एवढ्याशा तेलात तो दिवा टिकला कसा?

विझला कसा नाही?

निघताना आई म्हणाली होती..

” देव आहे रे “..

आईच्या त्या देवानीच तो दिवा आपल्यासाठी पेटता ठेवला..

म्हणजे ” तो ” असतो तर…

जाणिवेचा एक छोटासा दिवा आज त्याच्या अंतरंगात पेटला होता.

त्याच्याही नकळत…

कालचा मनातला राग जाऊन कुठलीतरी एक आत्मिक शांतता आत्ता त्याला वाटत होती… माझ्याकडे अनुभव, कॉलिफिकेशन आहे. मी अजून नेटाने प्रयत्न करीन तो मनाशीच म्हणाला..

संकटात असतानाच त्याची प्रचिती येते.

त्या विझलेल्या दिव्याला… शेंदूर लावलेल्या देवाला मनोभावे नमस्कार करून तो घरी निघाला…

कालचा अंधारा रस्ता आता झगझगीत सूर्यप्रकाशानी ऊजळला होता…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जळता निखारा… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ जळता निखारा… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(गौरीला फार वाईट वाटायचं. या सुंदर मुलीच्या नशिबी हे सुख लिहायला देव कसा विसरला. का असा शाप या निष्पाप जिवाला? ” गौरीच्या जिवाला घोर लागायचा.)

इथून पुढे – – 

आता प्रसन्न रिटायर झाला. आजपर्यंत त्या दोघांना कुठेही ट्रीपला, बाहेर जाता आलं नाही.

यावेळी मात्र गौरी म्हणाली, “ आपण जाऊया ना हो एकदा तरी परदेशी ट्रीपला. कधीही गेलो नाही आपण दोघेच असे. आपल्या सोसायटीतल्या बर्वे गोखले फॅमिली जात आहेत दोघे दोघे. जायचं का आपण? ”

प्रसन्न म्हणाला, ”अग पण मग विभाचं काय करायचं? का तिला घेऊन जायचं? ”

“नको नको. आपणच जाऊ की हो फक्त दोघे. फक्त एकच महिन्याचा प्रश्न आहे. येताना आपण माझ्या मावस बहिणीकडे पण लंडनला जाऊन येऊ. किती वर्षे ती तिकडे आहे आणि आपल्याला बोलावतेय की. असे फक्त महिनाभर जाऊन येऊया. मी शुभाला विचारू का? विभाला महिनाभर ठेवून घेतेस का तुझ्या घरी? ती नाही म्हणायची नाही असं वाटतंय. ”

प्रसन्न म्हणाला, “ बघ विचारून. पण जमणार नसेल तिला तर मग आपल्याला जाता येणार नाही गौरी.”

शुभाचा बंगला मोठा होता. मागे पुढे अंगण, छान बाग, मागे झोपाळा. नशीब काढलं होतं शुभानं. गौरीच्या मनात आलं.

गौरी शुभाच्या घरी गेली. शुभाला सुट्टीच होती त्या दिवशी. तिच्या सासूबाईंनी स्वागत केलं शुभाचं.

”या या गौरीताई. किती दिवसानी आलात. साहिल ची आठवण येते की नाही? बघा तरी किती गुंड झालाय हल्ली.” साहिलला झोपाळ्यावर घेऊन बसत त्या हसून म्हणाल्या.

गौरी हसत म्हणाली ”नाही कशी येत या गुंडूची आठवण.. पण शुभा आणते ना दर रविवारी त्याला. रमतो अगदी तो “ 

गौरी आत गेली. शुभाच्या बेडरूममध्ये दोघी बसल्या.

“काय ग आई? आज अचानकच? ”

“शुभा, तुला एक विचारायचं होतं. अग आपल्या सोसायटीतली जोडपी चालली आहेत युरोप ट्रिप ला. आम्हाला आग्रह करत आहेत या म्हणून. मग तसेच लंडनला तुझ्या शशीमावशीकडे जाऊन येऊ.

तर तो महिना विभा तुमच्याकडे राहू देत का? म्हणजे मला अजिबात तिची काळजी रहायची नाही. तिला एकटीला कशी सोडू आपल्या घरी मी? ” गौरीच्या डोळ्यात पाणी आलं.

शुभा तिच्याजवळ बसली. ”आई, जरूर जा तुम्ही. मी नक्की संभाळीन विभाला. त्यात काय एवढं ग? सासूबाई पण नाही म्हणणार नाहीत. एकच महिन्याचा तर आहे ना प्रश्न? जा तुम्ही. तसेही तुम्ही कुठेच जाऊ शकत नाही ग विभामुळे. ओळखीचे लोक जात आहेत तर जरूर जा.”

निर्धास्त होऊन गौरी घरी आली.

संध्याकाळी शुभाने समीरला सांगितलं. ” आपल्याकडे विभाला महिनाभर येऊ दे ना? आईबाबांना बिचाऱ्यांना कधीच कुठं जाता येत नाही. मी हो म्हटलं म्हणून तू रागावला नाहीस ना समीर? ”

समीर म्हणाला, “फार गुणी आहेस तू शुभा. याच तुझ्या सरळ साधेपणावर मी भाळलो ना? अग येऊ दे तिला. मी कसा रागावेन तुझ्यावर?”

आणि मग गौरी प्रसन्न निर्धास्त मनाने, विभाला शुभाकडे पोचवून ट्रीपला गेले.

शुभाच्या सासूबाईंना विभा आलेली फारसं रुचलं नाही असं वाटलं शुभाला. एरवी त्यांचं आणि शुभाचं अतिशय पटायचं. होत्याच त्या हुशार आणि मनमिळाऊ. शुभा सारखी गोड मुलगी घरात आल्यावर त्यांना आनंदच झाला. समीर एकुलता एक असल्याने त्यांची मुलीची हौस राहिलीच होती. दोघी सासू सुना खूप मजा करत. खरेदी करायला बरोबर जात. हॉटेलात दोघीच जाऊन छान एन्जॉय करत. कदाचित आपण त्यांना न विचारताच विभाला इकडे आणलं म्हणून त्यांना राग आला असेल असं म्हणून शुभाने तो विषय कानामागे टाकला.

विभा पहिल्यांदा बुजली पण मग रुळली शुभाच्या घरात. छोटा साहिल तर सतत तिच्या बरोबर असायचा. त्याला घेऊन ती झोपाळ्यावर बसली की सासूबाई काहीतरी काम काढून तिच्याजवळ बसायच्या. न जाणो, चुकून तो हिच्या हातून पडला तर?

त्या दिवशी शुभाला ऑफिस चं काम होतं म्हणून ती ऑफिसला गेली आणि समीर घरीच होता. विभा एकटीच बागेत झोपाळ्यावर बसली होती. मोठे झोके घेत असताना तिची ओढणी वाऱ्यावर उडत होती. केस मोकळे सुटून झोक्याबरोबर पंख्यासारखे पसरत होते. तिचा चेहरा आनंदाने फुलून लालबुंद झाला होता नुसता. अनिमिष डोळ्यांनी समीर तिच्याकडे बघत उभा होता. काहीतरी कामासाठी सहज बागेत आलेल्या सासूबाईंनी समीरकडे बघितलं. विभाकडे बघत असलेली त्याची नजर त्यांना वेगळंच सांगून गेली. आपल्या आईची चाहूल लागताच, तिची नजर चुकवत समीर घरात निघून गेला. सासूबाईंच्या पोटात धस्स झालं पण तरीही असं नसेल म्हणून त्यांनी आपल्या मनाची समजूत घातली. विभाचं अप्रतिम लावण्य कोणालाही भुरळ घालेल असंच होतं.

त्या दिवशी ती बागेत झाडांना पाणी घालत होती. तिचा घरातलाच गाऊन भिजून गेला होता. वर खोचलेल्या गाऊन मधून तिचे गोरेपान नितळ गुडघे आणि पोटऱ्या दिसत होत्या. पुन्हा एकदा सासूबाईंना समीर तिच्याकडे भान हरपून बघताना सापडला. पुन्हा त्यांची नजरा नजर झाल्यावर समीर आत निघून गेला. आता मात्र सासूबाई बेचैन झाल्या. चाणाक्ष आणि अनेक पावसाळे बघितलेल्या त्या बाईना हे लक्षण ठीक दिसलं नाही.

त्यांना शुभाशी एकटीला बोलायची संधी मिळत नव्हती. अचानक, त्या दिवशी समीर घरी नव्हता पण शुभा घरात एकटी होती. , साहिलला घेऊन त्याला संभाळणारी मुलगी आणि विभा बागेत गेल्या होत्या. सासूबाईंनी शुभाला हॉल मध्ये बोलावलं.

“शुभा, जरा आपला चेहरा आरशात नीट बघितला आहेस का? किती ओढलेला चेहरा, हे कळकट गाऊन, कधी केस नीट शेप देऊन कापलेले नाहीत. बघते आहेस ना?” 

हसून जवळ बसत शुभा म्हणाली, “ हे काय आज सासूबाई? मी नेहमीचीच तर आहे तुमची शुभा”

सासूबाई गंभीरपणे म्हणाल्या, ”हो. पण गोष्टी बदलण्याच्या आत डोळे उघडून बघ बायो. तू विभाला घरी आणलं आहेस ते चांगलंच केलंस. ती आणि तू जुळ्या बहिणी ना? तिचा चेहरा, कांती रूप बांधा कुठेही जराही धक्का लागलेला नाहीये. आणि तू? बघ निरखून स्वतःकडे शुभा. तिची थोरली बहीण दिसतेस तू हल्ली. ”.. त्यांनी काय झालं आणि स्वतः पाळत ठेवून बघितलेलं तिला सांगितलं.

“ शुभा, माझा मुलगा लाखात एक आहेच ग. पण शेवटी तो पुरुष आहे बाळा. त्या रूपाचा त्याला मोह पडणारच. ती आहेच तशी अप्सरा. हे बघ माझ्या सुने, काही विपरीत घडायच्या आत ही जोखीम तू आईबाबांकडे नेऊन पोचवावीस हे उत्तम. दोन दिवसात ते येत आहेत ना? आता हिला अजिबात जास्त ठेवून घेऊ नकोस. तिला बुद्धी कमी आहे, समज उणी आहे हे असलं तरी तारुण्य मुसमुसतं आहे नुसतं. पुरुषाला हेच फक्त हवं असतं मुली. फक्त सुंदर शरीर. तू वेळीच शहाणी हो. विपरीत घडूच देऊ नकोस. अग बाईसारखी बाई असून मला तिच्याकडे बघावंसं वाटतं, तर समीर तर पुरुष आहे बेटा.

हा जळता निखारा घरी आणून आपल्याच सुखी संसाराला आग नको लावू शुभा. पटतंय का? आणि आत्ताच नव्हे तर पुन्हा कधीच आणून विषाची परीक्षा बघू नकोस मुली. अडचण असली तर तू माहेरी रहायला जात जा पण ही जोखीम इथे आणू नकोस. ”

.. शुभा तिथून उठून गेली.

रात्री तिने निष्पापपणे झोपलेल्या आपल्या बहिणीकडे बघितलं. झोपेत तिचा गाऊन वर गेला होता आणि मांड्या उघड्या पडल्या होत्या. केस डोळ्यावर महिरप करत होते आणि निरागस विभा झोपेत हसत होती. शुभाने तिचा गाऊन खाली केला. हळुवारपणे तिला मायेने पांघरूण घातले. अत्यंत प्रेमाने तिचा पापा घेतला. सगळ्या जगाची माया तिच्या पोटात दाटून आली. या भाबड्या जिवासाठी तिचा जीव नुसता कासावीस झाला.

दुसऱ्याच दिवशी शुभाने विभाला मार्केटमध्ये नेले. ती अगदी हरखून गेली. तिला शुभाने कितीतरी छान ड्रेस गाऊन, कायकाय तरी घेऊन दिले. नव्या लेदरच्या बॅगमध्ये हे सगळं भरलं.

“सासूबाई, आज विभाला आईबाबांकडे पोचवून येते हं. ” भरल्या डोळ्यांनी शुभा म्हणाली.

तिने त्यांना मिठी मारली. “ थँक्स थँक्स सासूबाई. माझ्या हे कधीही लक्षात आलं नसतं हो. जग माझ्या सारखं सरळ साधं आहे असंच वाटतं हो मला. पण तुम्ही किती शहाण्या आहात. थँक्स. मला सावध केल्याबद्दल. आणि वेळीच माझा संसार वाचवल्या बद्दल पण. मी आता जरा स्वतःकडे पण लक्ष देईन “.

शुभाने आपली कार काढली आणि विभाला शेजारी बसवून म्हणाली,

“ चला! जायचं ना आपल्या आईबाबांकडे?”

– – आणि वळणं घेत शुभाची कार माहेरच्या रस्त्याला लागली.

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares