मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ निर्व्याज… लेखिका : सुश्री धनश्री लेले ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

??

☆ निर्व्याज… लेखिका : सुश्री धनश्री लेले ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर ☆

रत्नागिरीला एका कार्यक्रमासाठी गेले होते, पावसाळ्याचे दिवस होते. तुफान पाऊस पडत होता. कार्यक्रम रात्री नऊचा होता. संध्याकाळी सातनंतर आवरायला घेतलं,

एवढय़ात दार वाजलं. आत्ता कोण?  अशा प्रश्नांकित चेहऱ्यानेच मी दार उघडलं. एक पासष्टीच्या काकू उभ्या होत्या.

धनश्री लेले तुम्हीच ना?

मी म्हटलं, हो. या ना आत.

त्या आत आल्या. बऱ्याचशा भिजल्या होत्या. दोन हातांत दोन मोठय़ा पिशव्या होत्या. त्या बसल्या. मनात आलं, ‘आवरायचं आहे, साडेसात पर्यंत थिएटरला पोहोचायचंय, आता किती वेळ जाणार आहे काय माहीत. ’ 

माझ्या मनातला हा प्रश्न समजून घेऊनच जणू त्या म्हणाल्या, अगं, तुझा वेळ नाही घेत. खरंतर बसतही नाही, पण जिने चढून आले ना, थोडी धाप लागली म्हणून बसले.

छे छे बसा की. माझं होईल वेळेत आवरून. मी असं म्हटलं होतं खरं. पण या कोण काकू?  आणि यांचं माझ्याकडे नेमकं काय काम आहे?  हा पुढचा प्रश्न मनात उभा.

जणू त्यांना तोही कळला. म्हणाल्या, तू मला ओळखणार नाहीस म्हणजे गरजच नाही ओळखण्याची. मी पाध्ये काकू. माझं काही काम नाही हो तुझ्याकडे. सहज तू रत्नागिरीत येणार आहेस कळलं म्हणून तुला भेटायला आले.

इथेच असता का तुम्ही?  मी विचारलं.

नाही इथे माझी मुलगा-मुलगी असतात, पण मी राजापूरजवळ भू गावात राहते. महाराष्ट्रातलं एकाक्षरी एकच गाव भू.. त्यांनी माहिती पुरवली. काकू तुम्ही शिक्षिका होतात का?  असं अगदी ओठावर आलं होतं. पण नाही विचारलं.

काकू तुम्ही मला कसं ओळखता?  मी काही टीव्हीवर वगैरे नसते त्यामुळे इतक्या आत भू पर्यंत माझ्याबद्दल कसं कळलं?  अगदी सहज ओघात विचारलं.

अगं, मागे तुझ्यावर चिटणीस सरांनी एका पुस्तकात लेख लिहिला होता, ते पुस्तक वाचलं होतं. आम्ही टिव्ही नाही गं जास्त बघत. हां पुस्तकं वाचतो. तर ते पुस्तक वाचल्यापासून तुला भेटायची इच्छा होती मनात. आज वृत्तपत्रामध्ये तुमच्या कार्यक्रमाची जाहिरात बघितली नि आले.

अहो, पण एवढय़ा पावसात? ’

अगं, पावसाचं काय?  आमच्या कोकणाचा जावईच तो. पडायचाच. एस. टी. असते ना संध्याकाळची. मग निघाले. दीड-दोन तास लागतात भू गावातून यायला. काकू म्हणाल्या.

बसा, चहा सांगते तुम्हाला.

अगो छे, तुझं आवर तू.. तुला या पिशव्या दिल्या की मी निघाले. असं म्हणून काकूंनी त्या मोठय़ा दोन पिशव्या माझ्या हातात दिल्या.

काय आहे यात?

काही नाही गो, आम्ही कोकणातले लोक काय देणार?  पानाची डावी बाजू आहे. , काकू म्हणाल्या.

म्हणजे?  मी चक्रावून विचारलं.

अगं, त्या पुस्तकातून कळलं की तुझे बाहेर खूप दौरे असतात, बराच प्रवास करतेस. घरात रोजच्या कामालाही वेळ होत नसेल मग डाव्या बाजूच्या गोष्टी काय करणार तुम्ही मुली?  म्हणून आंब्याचं, आमोशीचं लोणचं. सांडगी मिरच्या, मेतकूट, दोन-तीन प्रकारचे मुरंबे, दोन-तीन प्रकारच्या कोरडय़ा चटण्या, खाराची मिरची, आंब्याची साठं, कुळथाचं पीठ असं थोडं थोडं घेऊन आलीय.

थोडं थोडं?  बाप रे. मला पिशव्या उचलवत नव्हत्या. आणि या काकू एस. टी. ने पावसात एवढय़ा जड पिशव्या घेऊन आल्या.

अगं, डावी बाजू अशी तयार असली ना की पोळी पटकन खाता येते मुलांना. पोळीशी काय?  हा प्रश्न राहत नाही. तूही रात्री यायला उशीरबिशीर झाला तर पोळी बरोबर हे खा हो.

भरल्या डोळ्यांनी, नि:शब्द होऊन मी एकदा काकूंकडे आणि एकदा त्या पिशव्यांकडे पाहत उभी होते. पिशव्या खाली ठेवल्या आणि काकूंना मिठी मारली.

कोण होते मी त्यांची?  काय नातं होतं आमचं?  घरची माणसंही कदाचित हा विचार करणार नाहीत मग काहीशे किलोमीटर लांब राहणाऱ्या काकूंनी एवढा विचार का करावा?  स्वत:ला होणाऱ्या त्रासाचा विचारही न करता केवळ मला हे सगळं देता यावं म्हणून एवढय़ा लांब आल्या त्या?  काय बोलू?

शब्दापेक्षा कृती नेहमीच मोठी असते हे शब्दांना कळलं असावं म्हणून शब्द खूप आत दडून बसले असावेत. धन्यवादाचा एक शब्द मी उच्चारू शकले नाही.. ‘धन्यवाद.. थॅंक्यू.. ’ या शब्दांना इथे काय मोल होतं?  नाही म्हणायला एकच शब्द मनात उभा होता. निर्व्याज.. खरंच निर्व्याज.. काय मिळवायचं होतं त्यांना?

जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, बघतील त्याचं ते.. अशी वृत्ती अवतीभोवती सतत दिसत असताना. गेल्या युगात शोभेल अशी ही निर्व्याज वृत्ती काकूंनी कशी काय सांभाळली?  

खरंच, माझा काय फायदा?  मला काय मिळणार आहे?  कृती करण्यापूर्वीच हे प्रश्न पडतात सध्या आपल्याला. सध्या कशाला?  दासबोधाची पहिली ओवी.. त्यात ही ‘श्रवण केलियाने काय प्राप्त’ असा सवाल श्रोते विचारतील. श्रवण करण्यापूर्वीच असा विचार समर्थानीही केला. फायद्याशिवाय जन नाही.

पण इथे मात्र संपूर्ण वेगळं चित्र पाहत होते. कोण कुठली दुसरी व्यक्ती. जिचा आपल्याशी दूरान्वयेही संबंध नाही तिचा एवढा विचार करून, तिला आपण थोडं तरी सहकार्य करू या. हा असा विचार म्हणजे रामराज्यच.

आपण या गोष्टीला ‘लष्कराच्या भाकऱ्या भाजणे’ अशी रोखठोक म्हण देऊन ठेवलेली आहे. पण लष्करालाही भाकऱ्या लागतात आणि त्या भाजणारे ही कुणीतरी असतातच. स्वातंत्र्य दिनाला कमरेएवढय़ा पाण्यात उभं राहून गस्त घालणाऱ्या सैनिकाचा फोटो.. सबसे तेज.. व्हॉट्स अपवर अपलोड करून व्हर्चूअल अश्रू गाळणारे आपण असं कुणी करत असेल निर्व्याज प्रेम तर लष्कराच्या भाकऱ्या भाजतोय. असं म्हणून मोकळं होतो.

मनात विचार आला हे असं निर्व्याज वागायला कधी तरी जमणार आहे कां आपल्याला?  निसर्ग निर्व्याजच वागत असतो. झाडं स्वत:ची फळं स्वत: खात नाही. नदी स्वत:चं पाणी स्वत: पीत नाही, गाई स्वत:चं दूध स्वत: पीत नाहीत. आठवीत संस्कृतमध्ये या आशयाचा श्लोक पाठ केला होता. त्यात नदी होती, गाय होती, झाडं होती, पण माणूस नव्हता.

कारण तो सुभाषितकार या काकूंना भेटला नव्हता. ‘ऐंशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती’ लाभाविण प्रीती. बाप रे. कल्पनाही सहन होणार नाही आजच्या काळात.

पुन्हा येशील तेव्हा कळवून ये हो. म्हणजे छान मोदक वगैरे करून आणीन. काकूंच्या बोलण्याने मी भानावर आले. आणि यातलं काही संपलं आवडलं तर नि:संकोच सांग. पाठवून देईन मुंबईस.

मनात आलं म्हणावं, काकू नका आता आणखी काही बोलू. तुमचं हे निर्व्याज प्रेम घ्यायला आमच्या ओंजळी समर्थ नाहीत हो.

तुझमे कोई कमी नही,

मेरी ही झोली तंग है’..

काळ्या ढगांनी भरलेल्या आभाळात लख्ख वीज चमकावी आणि तेजाने सगळा आसमंत उजळून निघावा. तशा त्या कोसळणाऱ्या पावसात आलेल्या काकू मला वाटल्या. एक ज्योत उजळली त्यांनी मनात. आता बाहेरच्या ‘मी, माझा’च्या वाऱ्यापासून तिला जपण्याचं काम करायचं होतं. खूप कठीण.

 

लेखिका : सुश्री धनश्री लेले

संग्राहिका / प्रस्तुती : उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈ संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आम्ही नजर वर करूनही बोलत नाही आणि तुम्ही? – लेखिका : एक फौजी पत्नी ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ आम्ही नजर वर करूनही बोलत नाही आणि तुम्ही? – लेखिका : एक फौजी पत्नी ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

☆

आम्ही नजर वर करूनही बोलत नाही आणि तुम्ही पगार मोजता 

मी एक फौजी पत्नी आहे म्हणून ही गोष्ट मला जास्त लागली

कालपासून तो व्हायरल व्हिडिओ बघतेय झोजिला गुमरी रोडवर एक महिला जवानाला म्हणते आम्ही TAX भरतो तेव्हा तुम्हाला पगार मिळतो आम्ही GenZ आहोत

ऐकून काळजाला चिर पडली आज प्रत्येक सैनिकाचं मन दुखावलंय हा व्हिडिओ बघून

आम्ही आमच्या सैनिकांशी नजर वर करून सुद्धा बोलत नाही

होय आमच्या घरात संस्कारच तसे आहेत माझा नवरा जेव्हा गणवेश घालतो तेव्हा तो फक्त माझा नवरा राहत नाही तो देशाचा रक्षक होतो त्याच्या गणवेशाला आम्ही देवासारखं पूजतो त्याच्यासमोर आवाज चढवणं तर दूर नजर वर करून बोलण्याचीही आमची हिंमत होत नाही कारण आम्हाला माहिती आहे त्या गणवेशामागचा त्याग काय आहे

 – आणि तुम्ही तुम्ही त्याच गणवेशाची किंमत पगारात मोजता

… त्या पगाराची किंमत तुम्हाला माहिती आहे का

… हा पगार कशाचा मिळतो माहिती आहे

.. चाळीस डिग्रीत सियाचिनवर जेव्हा बोटं गोठतात तेव्हा मिळतो

.. दोन वर्षांतून एकदा घरी आल्यावर आपल्या मुलाने ओळखलं नाही तेव्हा मिळतो

.. दिवाळीच्या दिवशी सीमेवर गोळ्या झेलताना मिळतो

… आणि जेव्हा तिरंग्यात लपेटून तो घरी येतो तेव्हा त्याच्या पत्नीच्या कपाळावरचं कुंकू पुसलं जातं त्याची किंमत म्हणून हा पगार मिळतो

तुम्ही कधी मोजू शकता का ही किंमत??  किती TAX भराल आणि या बलिदानाची किंमत द्याल??  

प्रत्येक संकटात आधी आर्मीला बोलवा

पूर आला आर्मीला बोलवा

भूकंप झाला आर्मीला बोलवा

कोणी अडकलं आर्मीला बोलवा

आपला जीव वाचवण्यासाठी तो स्वतःचा जीव धोक्यात घालतो तो विचारत नाही हा कोणत्या जातीचा आहे हा TAX भरतो का तो फक्त वाचवतो कारण त्याने शपथ घेतली आहे देशाच्या रक्षणाची

– – आणि आपण?  आपण त्यालाच सांगतो तुझा पगार आमच्या TAX मधून येतो.

किती दयनीय अवस्था आहे आपल्या विचारांची..

GenZ म्हणजे काय?

GenZ असणं म्हणजे अरेरावी नाही.

GenZ असणं म्हणजे प्रश्न विचारणं पण संस्कार विसरणं नाही.

आमच्या जवानांचा अपमान करून तुम्ही मॉडर्न होत नाही तुम्ही देशाच्या मुळापासून तुटता

लक्षात ठेवा झोजिला रोड बंद आहे म्हणजे काहीतरी कारण आहे. तिथे जवान उभा आहे म्हणजे तुमच्या भल्यासाठी उभा आहे… सेल्फी आणि रीलसाठी नाही

माझी हात जोडून विनंती – – 

… प्रत्येक नागरिकाने एक गोष्ट लक्षात ठेवा सैनिकाची रिस्पेक्ट करणं ही काही वेगळी गोष्ट नाही ती गरज आहे तो आहे म्हणून आपण आहोत

… टॅक्सने देश चालतो मान्य पण टॅक्सने देश सुरक्षित राहत नाही देश सुरक्षित राहतो तो सीमेवर छाती ताणून उभ्या असलेल्या जवानामुळे

… उद्यापासून एक काम करा.. रस्त्यात एखादा फौजी दिसला तर फक्त एकदा जय हिंद म्हणा त्याला कळू द्या त्याच्या त्यागाची किंमत आम्ही पैशात नाही तर सन्मानात करतो

– – – कारण फौजी कधीच पगारासाठी लढत नाही तो इज्जतीसाठी लढतो आणि ती इज्जत आपणच राखायची आहे.

जय हिंद!!

– – एका फौजी पत्नीच्या मनातून…

☆

प्रस्तुती: गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “बाळ..!!!” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “बाळ..!!!” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(प्रत्येकाच्या दारावर त्याच्या नावाची ठसठशीत पाटी असते.. “ओळख” नावानं होत असेलही… “परिचय”, आपल्या वागण्यामुळं होतो! मोठ्ठं नाव असलेल्या परंतु, परिचय हरवुन बसलेल्या लोकांनी याला सगळीकडुन हाकलुन दिलं.

हा आला मग आपलं गाव शोधत… त्याला ध्रुवासारखं अढळ स्थान हवं होतं, जिथून त्याला कुणीही उठवणार नाही… आणि मग त्याला हा उकिरडा सापडला…) इथून पुढे

– –

हाडामांसाच्या माणसांनी त्याला कधी “हात” दिला नाही, परंतु इथल्या निर्जीव उकिरड्याने त्याला “साथ” दिली… स्वतःसाठी काही करणं म्हणजे “दागिना”, दुसऱ्यासाठी काही करतो तो “अलंकार”…! आज दुसऱ्याला आधार देवुन उकिरडा “अलंकार” झाला!

खोटं सुगंध लावून मुखवटे घालून फिरणाऱ्या माणसांपेक्षा… कोणताही मुखवटा न लावणारा हा दुर्गंधीत उकिरडा त्याला जास्त जवळचा वाटला.

आपण एखादी गोष्ट स्वतःसाठी कमावतो, तेव्हा आपलं “वैभव” वाढतं.. पण दुसऱ्याला काही कमावण्यासाठी मदत करतो, तेव्हा आपलं “ऐश्वर्य” वाढतं..!

वैभवात लोळायचं की ऐश्वर्याचा आस्वाद घ्यायचा?  लोळतं ते गाढव… अशा लोळणाऱ्या, मुखवटाधारी गाढवांच्या गर्दीपासुन तो दुर आला आणि तेव्हापासून तो इथेच आहे… या उकिरड्यात, ध्रुवबाळासारखा, अढळ…!

फ्लेक्स च्या पेपर खाली तो गुपचूप झोपून राहतो… कुणाला कळत ही नाही, आणि कळलं तरी कुणाला फरक पडत नाही, आणि म्हणुन मग कोणी उठवायला येतही नाही…!

पुण्यात राहून तो उत्तम मराठी बोलायला सुद्धा शिकला आहे. त्याची सर्व कहाणी ऐकली! त्याला एक हॉटेल काढायचं होतं, ते त्याचं स्वप्न आहे… तो एक उत्तम कुक सुद्धा आहे…!

गाढ झोपेत असतांना, तो हेच, स्वप्न पहात असेल का?  मी त्याला त्यावेळी झोपेतून उठवलं होतं… त्याचं स्वप्न कदाचित मी मोडलं असेन.

पण नाही, मी त्याला समजावुन सांगेन, ‘दोस्ता, झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचा पाठलाग जागेपणीच करायचा असतो. ‘

सध्याच्या अन्नपूर्णा प्रकल्पांमध्ये अनेकांना आम्ही जेवणाचे डबे तयार करण्याचं काम देत आहोत, यालाही डबे तयार करण्याचं काम आपण द्यावं, हे मी मनोमन ठरवलं. सर्वात प्रथम याला शुचिर्भूत करणे अत्यंत आवश्यक होतं.

बुधवारी दिनांक 16 जूनला याच्यासाठी सर्व कपडे घेतले. दाढी आणि कटिंग साठी माणूस ठरवला. एका जागेवरून दुसर्‍या जागेवर जाण्यासाठी व्हीलचेअरची आवश्यकता होती या व्हीलचेअरची ऑर्डर दिली.

आता गुरुवारी याच्यामध्ये अंतर्बाह्य बदल घडवून आणणं आवश्यक होतं, आंघोळ घालणं महा आवश्यक होतं. यानंतर पुढे मग उदरनिर्वाहाचं साधन!

मी त्याच्यासाठी करणार असलेल्या बाबींची त्याला सर्व कल्पना दिली. ऐकताना, Sir… Sir… म्हणत तो दरवेळी पायाशी झुकण्याचा प्रयत्न करायचा, म्हणायचा सर, ‘प्रणाम करु द्या हो…! ‘ दरवेळी मी मात्र अवघडुन जायचो…

एकदा त्याला हसत म्हणालो, ‘ओळख टिकावी म्हणुन केला जातो तो नमस्कार… कुणाच्या मिंध्यात आहोत म्हणुन, कमरेत झुकणं, हे झालं अभिवादन… निष्ठा वाहताना केला जातो तो मुजरा… आणि काहीतरी हवंय म्हणुन केलं जातं ते वंदन मित्रा.. , तु नको वाकुस… मला अवघडल्यासारखं होतं.. ‘

‘अर्धाच अर्थ सांगितलात सर… काहीही नको असतांना, नतमस्तक होणं म्हणजे प्रणाम…! ‘ या त्याच्या वाक्यावर झुकण्याची पाळी माझी होती…!

… यानंतर गुरुवारी 17 जूनला पुन्हा याला भेटायला गेलो. पूर्वी दाढी आणि कटिंग चे काम करणारा एक कारागीर, परिस्थितीमुळे सध्या भीक मागत आहे, याला सुद्धा भिक्षेकऱ्यांच्या दाढी आणि कटिंगचं काम दिलं आहे. याला आपण राजू म्हणू…!

राजू स्वतः अपंग आहे. याला व्हीलचेअर आणि दाढी कटिंगचं सर्व साहित्य घेऊन दिलं आहे. रस्त्यावरच तो हा व्यवसाय करतो, आणि आपण आपल्या माध्यमातून सुद्धा त्याला व्यवसाय देत आहोत.

तो माझ्यावर अतिव प्रेम करतो…! या भावनेतून बऱ्याच वेळा तो माझ्यावर अधिकार गाजवतो. ‘मय डाक्टर का राइट हॕन्ड हय, मेरे परमिशन के बगैर डाक्टर को मिलने का नय,… डाक्टर को मिलना हय, तो मेरसे पयले बात करने का’… असा त्याचा प्रेमळ आग्रह असतो. जे लोक त्याच्या परवानगी (? ) वाचून मला “डायरेक्टली” भेटायला येतात, त्यांच्याकडे तो रागाने पाहतो… मला या सर्व गोष्टींची मजा वाटते आणि कौतुक सुद्धा!

तर या राजुला हक्काने मी दाढी आणि कटिंग करायला लावली “त्याची”… राजुचा कुशल हात “त्याच्या” डोक्यावर आणि गालावर नाचत होता… कटिंग करतांना, वाढलेल्या केसातल्या किडे आणि अळ्या रस्त्यावरून दुडूदुडू धावत होत्या… यांच्याकडे पाहून मला असं वाटलं की पुण्यातलं ट्राफिक यांच्यामुळेच जाम होईल का काय…?

दाढी झाली, कटिंग झाली, आता आंघोळीचं काय…?  या उच्चभ्रु रस्त्यावर, आम्हां “भिकार” लोकांना बादली आणि पाणी कोण देणार?  

मी माझ्या “राईट हॅन्ड” राजूभाई कडे सुचक पाहिलं… त्याने माझा प्रश्न अचुक ओळखला आणि म्हणाला, ‘मय है ना सायेब, कायको टेन्शन लेता हय…? ‘

थोड्याच वेळात त्याने दहा लिटरचे बिसलेरीचे पाच कॅन आणले, सोबत माझा सहकारी मंगेश वाघमारे होताच… आम्ही बिसलरीच्या पाण्याने मग “त्याला” आंघोळ घातली, रस्त्यावरच…

आंघोळ झाल्यावर थक्क होवुन पहात राहिलो मी त्याच्याकडे…! एखाद्या चित्रपट अभिनेत्याला लाजवेल इतका देखणा होता तो! दाढी आणि वाढलेल्या केसांच्या जंजाळात हे जाणवलं नव्हतं…! तीन वर्षे तो या उकिरड्यात लपून रहात होता. त्याचं बदललेलं रुप पाहुन मलाही विश्वास बसेना…!

दर वेळी अंगावर पाणी पडल्यावर तो डोक्यावर हात नाचवत “शंभोsss” म्हणायचा… मला नंतर जाणवलं… म्हटलं, ‘यार, राजू, आज आपल्या हातून अभिषेक झाला रे, नकळत… ‘ 

‘हां सायेब, आपुनको मंदिरमे जानेका जरुरतच नय… ‘ तो हसत म्हणाला. जगातलं त्रिवार सत्य तो नकळतपणे बोलून गेला… “मानवसेवा हिच ईश्वरसेवा! “

साबण लावल्यावर, “त्याच्या” अंगाला सुवास येत होता, म्हटलं, ‘मंगेश, आपल्याला आता कसलीही अगरबत्ती लावायची गरजच उरली नाही राव… ‘ मंगेश मंद हसला…

आंघोळ झाल्यावर “त्याला” जेवू घातलं… तो तृप्त झाला…!

‘काय गं मनिषा?  आपलं हे “जेवण” म्हणजेच आपण त्याला वाहिलेला “नैवेद्य” असेल का…? ‘

ती सुद्धा फक्त गालात हसली…!

यानंतर, त्याच्या कुडकुडणाऱ्या अंगावर चादर टाकून आम्ही निघालो…

‘Sir, I am feeling very nice, I love you sir, I love you…! ‘ तो उतावीळपणे, कृतार्थपणे हात जोडत ही वाक्यं म्हणत होता… डोळ्यांतून पाणी ओघळत होतं… , त्याला कोणत्या भाषेत आमचे उपकार मानावेत तेच कळत नव्हतं, काय बोलावं?  त्याला हेच कळेना…!

त्याचे हे हसुमिश्रीत अश्रु.. , प्रसाद… प्रसाद म्हणतात तो हाच असेल का?  पूजा… पूजा म्हणतात ती हिच असेल का…???  हिच पूजा असेल तर आमच्या हातुन आणखी एक पूजा झाली होती…!

मी विचार करत राहिलो… आम्ही त्याच्यावर चादर पण चढवली होती. इसीको “इबादत” कहते होंगे क्या…?  आम्ही “त्याच्या” मनात जगण्याच्या आशेची एक मेणबत्ती पेटवली होती…! तो चमकून उठलाय या प्रकाशात…! यालाच “Prayer” म्हणत असावेत काय…!

आज शुक्रवारी याच्या बाबतीतला सर्व घटनाक्रम पुर्ण झाला… माणसाला माणसांत आणणारा आजचा हा शुक्रवार! Good Friday आजच असेल काय…?

तो झोपतो ते ठिकाण – तो उकिरडा आम्ही खराटा-पलटण च्या आज्यांमार्फत उखडुन टाकणार आहोत. नववधु रस्त्यावरच्या गालाचा बट्टा मिटवणार आहोत, हळदीनं तीला माखणार आहोत…!

मी निघालो, खुरडत खुरडत तो माझ्याकडे यायला लागला… त्याला उठायचं होतं, पण ते शक्य होत नव्हतं… पुन्हा हात जोडुन म्हणाला, ‘तुम्ही खुप केलंत माझ्यासाठी… ‘ 

म्हटलं, ‘अरे अजुन कुठं काय केलंय… आत्ता तर सुरुवात केलीय… पण, लक्षात ठेव आपण कुणाला दिलेलं आठवायचं नाही, आणि दुसऱ्यानं दिलेलं कधी विसरायचं नाही!’

तो हसला आणि म्हणाला, ‘सर एक विनंती करायची होती, मला आईवडिल नाहीत. तुम्ही आणि मॅडम मला पदरात घ्याल? ‘ 

मी पुन्हा त्याच्या जवळ गेलो, त्याला जवळ घेतलं… तो रडायला लागला. त्याला बोलायचं होतं खुप… पण शब्द डोळ्यांतुन ओघळु लागले…! बऱ्याच वेळानं, पालथ्या मुठीनं डोळे पुसत, हुंदका देत, तो म्हणाला, ‘सर मी आज तुमचं बाळ झालो…! ‘

‘बापाला कुणी ‘सर’ म्हणतं का येड्या… ‘ म्हणत त्याच्या पाठीत मी धपाटा घातला… आणि तो खुद्कन हसला.

जोरदार पाऊस कोसळत होता… बाप होण्याच्या खुशीत मग मी चिंब न्हालो…!

– समाप्त –

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक मजेशीर अनुभव ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ एक मजेशीर अनुभव ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

Positivity can solve any problem. 

काल अनंत चतुर्दशी. सगळ्यांनीच गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी बाप्पांना प्रार्थना करत विसर्जनाच्या कार्यक्रमात भाग घेतला असणार.

काल सकाळपासूनच आमच्या भागामध्ये कर्कश्य आवाजात गाणी, ढोल ताशे सुरू होते. दारं खिडक्या बंद केल्या तरी आवाजाची कर्कश्यता कमी होत नव्हती. त्यामुळे घरात कुठलंही काम करताना लक्ष लागत नव्हतं. कानावर सारखे ताड ताड ताड वाजत येत होते.

अशा वेळेस नकारात्मक विचार मनात विचार येत होते की ज्यांनी लाऊड स्पीकर चा शोध लावला तो जर लावला नसता किती मजा आली असती. डीजे चा शोध नसता लागला तर किती मजा आली असती. गणपती बाप्पा हा कर्कश्य आवाज कसा सहन करत असतील, ते हा आवाज बंद का करत नाहीत. आसपास आजारी माणसं असतील, त्यांचे काय हाल होत असतील. सारखे असे विचार मनात येत होते आणि कुठेच लक्ष लागत नव्हतं. आणि रोजची कामे पण करता येत नव्हती.

_आणि अचानक मनात विचार आला – negativity always increases the problem and positively can always solve the problem. _

आणि लगेच विचार आला की गणपती बाप्पा मिरवणुकीमध्ये खूप खुश असणार. सगळे लोक आनंदात एकत्रपणे ढोल ताशे वाजवत आहेत, लाऊड स्पीकर वरची गाणी ऐकत त्यांचा आनंद घेत आहेत. बाप्पाची एकच इच्छा असते की सगळ्यांनी 

एकत्र यावं आणि आनंदी राहावं. कर्कश्य आवाज वगैरे ही गौण बाब आहे.

पूर्वी केव्हातरी वाचलेलं आठवलं की जेव्हा असे कर्कश्य आवाज वातावरणात असतात तेव्हा त्या आवाजांमुळे वेगळ्या प्रकारच्या लहरी waves तयार होतात. आणि त्या लहरींमुळे वातावरणात असलेले/ जमिनीवर असलेले रोगजंतू नष्ट होतात. त्या लहरींमुळे आसपासच्या प्राणीमात्रांना/ पक्षांना पण एक वेगळी ऊर्जा मिळते आणि ते खुश होतात. लहरींमुळे आसपासच्या वृक्षांपासून मिळणारे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. त्यामुळे वातावरणातील प्रसन्नता वाढते आणि वृक्ष पण खुश होतात.

अशा छान छान विचारांमुळे माझे कर्कश्य आवाजां वरचे लक्ष आपोआप कमी झाले.

घराच्या खिडक्या उघडल्या तरी आवाजाकडे लक्ष जात नव्हते. बाप्पांचे नाव घेत घेत कालची रुटीन कामे मस्त झाली. कर्कश्य आवाज जाणवलाच नाही.

ज्याने कोणी positivity can solve any problem हे विचार मांडले असतील त्यांना धन्यवाद दिले.

 

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “बाळ..!!!” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “बाळ..!!!” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

सोमवार दिनांक 14 जून 2021… संध्याकाळी सहा वाजता फोनची रिंग वाजली. फोन चार्जिंगला लावलेला, पीन काढून हातात घेतला. ‘हॅलो… ‘

‘Is it Dr. Abhijit Sonawane there? ‘ पलीकडून अनोळखी आवाज आला.

‘Yes sir, speaking, Dr. Abhijit here…! ‘ 

‘Oh great… doctor my name is XXX, I need your help… I am helpless and lying on the road, since very long time… ” अत्यंत सफाईदारपणे इंग्लिश मध्ये एक गृहस्थ माझ्याशी संवाद साधत होते.

अर्ध्या तासाच्या संभाषणातून कळलं ते असं… हे एक गृहस्थ, पॅरालिसीस मुळे डावा हात नीट काम करत नाही आणि त्याच सोबत दोन्ही पायही. उच्चशिक्षित आहेत. एका नामांकित बँक मध्ये काम करणारे हे गृहस्थ परिस्थितीच्या एका फटक्याने रस्त्यावर आले आणि गेल्या कित्येक महिन्यांपासून फुटपाथवर पडून आहेत निराधार…! मी त्यांना काय मदत करू शकतो हे ते अजीजीने विचारत होते. रस्त्यावरून जाणाऱ्या एका  व्यक्तीला विनंती करून त्यांनी मला फोन केला होता.

‘उद्या मंगळवारी दुपारी बारा वाजता मी तुम्हाला येऊन भेटतो मला पत्ता द्या’ मी म्हणालो. ते पडून असलेल्या ठिकाणचा पत्ता त्यांनी मला खाणाखुणा सकट दिला. पुण्यातील नामांकित रस्ता… या रस्त्याचा अभिमान नाही असा एकही पुणेकर सापडणार नाही. पत्ता शोधणं अवघड नव्हतं. मंगळवारी 15 जूनला बरोबर बारा वाजता मी दिलेल्या पत्त्यावर गेलो.

पुण्यातला हा रस्ता म्हणजे नटलेल्या नववधूसारखा…! आजूबाजूला लाईनशीर असलेली झाडं, म्हणजे तिच्या कपाळापर्यंत आलेल्या बटा जणू… इथली भव्य शोरूम्स आणि हॉटेल्स म्हणजे तिने घातलेले दागिने… सरळ जाणारी, कुठेही वक्र नसलेली ही वाट म्हणजे तीचं सरळ धारदार नाक… इथेच असणारं सांस्कृतिक कला जपणारं एक स्थळ, म्हणजे तीच्या कपाळावर तीनं ल्यालेलं सौभाग्याचं लेणं जणू…!

अरे पण हे काय? रस्त्यावर ज्या ठिकाणी मला यायला सांगितलं होतं तिथे तर उकीरडा होता.. हा उकिरडा म्हणजे… नटलेल्या या नववधूच्या गालावर उमटलेला बटबटीत काळा चट्टा वाटला मला!

रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त विखुरलेल्या बाटल्या, कचरा, विष्ठा आणि आणखीही बरंच काही… नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे या सर्व कचऱ्याचा अक्षरशः चिखल झाला होता. यामुळे आजूबाजूच्या वातावरणात दुर्गंधी पसरली होती. येणारे जाणारे लोक या ठिकाणाला टाळून वळसा घालून पुढे जात होते.

उकिरड्यापासून दहा फूट अंतरावर मी बुलेट थांबवली. गाडीवरून न उतरताच आजूबाजूला ते गृहस्थ कुठे दिसतात का हे पाहू लागलो. उकिरड्याकडे पुन्हा लक्ष गेलं… याच कचऱ्यावर अर्धवट पसरलेला फाटलेल्या फ्लेक्सचा एक तुकडा कोणीतरी झाकून ठेवला होता. दुर्गंधी येऊ नये म्हणून किंवा हा कचरा दिसू नये म्हणून कुणीतरी ही शक्कल लढवली असावी.

मला हसू आलं… दुर्गंध झाकून लपतो काय? आणि सुगंध… झाकला तरी दरवळायचं सोडतो काय…?

बराच वेळ शोधुनही, त्या गृहस्थांचं नामोनिशाण मात्र कुठेही दिसलं नाही. मनात विचार केला, इथून ते काही कारणासाठी दुसरीकडे कुठेतरी गेले असतील, येतील परत… आपणही येऊ पुन्हा परत कधी तरी… हा विचार करून मी बुलेट स्टार्ट करून गाडी आणि माझ्या अंगाखांद्यावर असणारं शंभर-दीडशे किलोचं साहित्य सावरत पुढे निघालो.

थोडंसं अंतर पुढे गेलो आणि मनातल्या विचाराने गाडीला कचकन ब्रेक लागला. पॅरालिसीस झालेला माणूस जाईल कुठे…? पत्ताही बरोबर दिला होता. मग तीथंच कुठंतरी असणार ते.. मनात शंकेची पाल चुकचुकली… गाडी वळवून, नो एन्ट्री मधून मी पुन्हा उलट्या दिशेने उकिरड्याकडे निघालो.

यावेळी गाडी उभी केली. अंगाखांद्यावरचं सामान रस्त्यावर काढून ठेवलं. पाऊस भुरभुरत होताच. मी नाक दाबत उकिरड्याजवळ आलो… दुर्गंध आणखी तीव्र झाला होता. डाव्या हाताने नाक दाबत, उजव्या हाताने, उकीरड्यावर अंथरलेला फ्लेक्सचा तुकडा सहज म्हणून मी बाजूला केला. आणि विजेचा धक्का बसावा त्‍याप्रमाणे माझा हात आपोआप मागे फेकला गेला.

मी हादरलो…! फ्लेक्सच्या या तुकड्याखाली, अंगाचं मुटकुळं करून एक व्यक्ती उजव्या कुशीवर, पाय पोटाजवळ दुमडुन शांतपणे झोपली होती, नमस्कारासाठी जोडतात तसे हात जोडुन ते उजव्या गालाखाली दडपून ठेवले होते… आईच्या पोटात बाळ याच अवस्थेत असतं! परिस्थितीमुळे उकिरडा हिच या बाळाची आई झाली होती इतकंच…

अंगावरचा फ्लेक्स काढल्याबरोबर दुर्गंधी मध्ये आणखी वाढ झाली… दुर्गंध सुद्धा इतका दुर्गंधीत असू शकतो हे आज प्रथमच जाणवलं.

तो अजूनही शांत झोपला होता. उकिरड्यात असलेल्या दुर्गंधाचा त्याला “गंध” सुद्धा नव्हता, कसलीही किळस चेहऱ्यावर नव्हती! अर्थात जीने पोटात घेतले तिची कसली किळस? आईच ती शेवटी!

मी याच्याकडे नीट पाहिलं. रान माजावं, तसे डोक्यावर केस माजले होते. पिकतं ते शेत, माजतं ते रान! शेताची मशागत केली जाते… माजलेल्या रानाची मशागत करायचीच नसते, त्याला उखडून फेकूनच द्यावं लागतं! गालावर वाढलेली दाढी अशी, जणू कुणीही न पेरता उगवलेल्या काटेरी बाभळी…! मान ना मान… म्हणत, खऱ्या अर्थानं या गळ्यात पडल्या होत्या…!

अंगावर कळकट्ट शर्ट… कधीकाळी यालाही कुठलातरी रंग नक्कीच असेल… आज तो “बेरंग” होता! त्याखाली पॅन्ट. पॕन्टला बक्कल नव्हतंच… पण, कमरेपासून खाली येऊ नये म्हणून सुतळीने तीला बांधून ठेवलं होतं.

“आपले” म्हणणारे लोक सुद्धा जीथं आपल्याला “नागवं” करायला कमी करत नाहीत, तीथं ही क्षुल्लक अशी सुतळी कोणाची तरी लाज वाचवू पाहत होती! वाह रे दुनिया!

मल – मूत्र – विष्ठा याने ही संपूर्ण पॅन्ट भरून गेली होती. तो उठून चालूच शकत नाही… सर्वकाही जागेवरच! करणार काय? मल – मूत्र – विष्ठा यांची संपुर्ण जबाबदारी या पॅन्टने घेतली होती, बिनबोभाट!

एरव्ही, हे माझं काम नाही, ही माझी जबाबदारी नाही, असं म्हणणारी अनेक मंडळी भेटतात… त्यांच्यापेक्षा हि वास मारणारी, पण जबाबदारीचं भान ठेवणारी पॅन्ट लाखमोलाची! एकुणच, संपूर्ण जगात असलेला दुर्गंध जणू तीथे एकवटला होता… या गृहस्थाला सोबत करण्यासाठी!

याचं वय असावं 40 वर्षे! फोनवरील बोलण्यावरून मला कुणीतरी पोक्त गृहस्थ असावेत असं वाटलं होतं. तो अजुनही गाढ झोपेत होता. आलिशान घरात गाद्या गिरद्यांवर झोपेवाचून तळमळत पडलेले लोक मी पाहिले आहेत… तीथं हा मनमौजी मात्र या उकिरड्यात गाढ झोप घेत आहे… स्वर्गीय सुख अनुभवत आहे! खरा नशीबवान तो!

मी त्याला खांद्याला धरुन हळूच हलवलं. खरंतर कुणालाही झोपेतून उठवायला मला आवडत नाही. यांच्या आयुष्यातली स्वप्नं भंगलेलीच असतात.. किमान झोपेतली स्वप्नं आपण कशाला तोडावीत? याचवेळी, डोळे चोळत तो जागा झाला.

मी म्हटलं, ‘काल तुम्ही मला फोन केला होतात. ‘ 

‘Oh… yes.. yes… I remember. You are Dr. Abhijit, right sir? ‘

‘Yes. मित्रा तू मुळचा कुठला? ‘ अहो जाहो चे बांध तोडून आमच्यात मैत्री निर्माण व्हावी यासाठी मी सरळ एकेरी हाक मारली.

त्याने गावाचं नाव सांगितलं. कोकण संपून एक राज्य सुरू होतं, त्या राज्यातल्या एका गावाचा तो रहिवासी.

‘तुला या घाणीचा त्रास होत नाही? ‘

‘कोणती घाण, कसली घाण? ‘ त्याने आजुबाजुला पहात अत्यंत निरागसपणे विचारले. त्याच्या या “निरागस” प्रश्नातच उत्तर दडलं होतं!

प्रत्येक शब्दाचा अर्थ संदर्भानुसार बदलत असतो. ताटात असलेलं आजच पक्वान्न दुसऱ्या दिवशी खराब होतं, नासतं… तेव्हा त्याला उकिरड्यावर फेकून दिलं जातं… फेकणारा ती घाण म्हणून फेकतो. पण उकिरडे धूडाळणाऱ्या कुत्र्या मांजरांना मात्र ही फेकलेली घाण म्हणजे मेजवानी असते… त्यांच्यासाठी ते अन्नच असतं! काल जे पक्वान्न ताटा ची “शान” होतं, आज उकिरड्यावर पडल्याबरोबर ते “घाण” होतं! प्रत्येक शब्दाचा अर्थ संदर्भानुसार बदलत असतो हेच खरं…! ताटापासून उकिरड्यापर्यंतचा प्रवास म्हणजेच माणसाचं आयुष्य असावं का?

बोलता बोलता मी त्याच्या भूतकाळामध्ये शिरलो.

आई-वडिलांसह हा एके दिवशी पुण्यात आला. याचं शिक्षण बीकॉम. एका बँकेमध्ये काम करू लागला. सर्व काही सुरळीत होतं. कालांतराने आई आणि वडील दोघेही वारले. मधल्या काळात याला पॅरालीसीसचा झटका आला. त्यात डावा हात आणि दोन्ही पाय निकामी झाले. नोकरी गेली… संसार कधी फुलला नाही.

रेस मधला नामांकित घोडा हि लंगडा झाला की त्याची किंमत त्याक्षणी संपते, याचं ही तसंच झालं. घराचं भाडं द्यायला पैसे नाहीत आणि हा आता कोणतंही काम करू शकत नाही… यात ते भाड्याचं घर सुद्धा सुटलं. आणि मग सुरू झाला आयुष्याच्या नाटकाचा दुसरा अंक…

जागा मिळेल तिथे दुकानाबाहेर रस्त्यावर किंवा इतर कोणत्या तरी ठिकाणी येऊन तो झोपायचा… खुरडत चालायचा… कोणी काही देईल ते खायचा. असली घाण दारात नको म्हणून प्रत्येकाने त्याला दारासमोरून हाकलून दिलं.

प्रत्येकाच्या दारावर त्याच्या नावाची ठसठशीत पाटी असते.. “ओळख” नावानं होत असेलही… “परिचय”, आपल्या वागण्यामुळं होतो! मोठ्ठं नाव असलेल्या परंतु, परिचय हरवुन बसलेल्या लोकांनी याला सगळीकडुन हाकलुन दिलं.

हा आला मग आपलं गाव शोधत… त्याला ध्रुवासारखं अढळ स्थान हवं होतं, जिथून त्याला कुणीही उठवणार नाही… आणि मग त्याला हा उकिरडा सापडला.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तुळशीबाग” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “तुळशीबाग…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

झालं असं की,

लग्नाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त सौंना स्पेशल गिफ्ट द्यायचं मनात होतं. नातेवाईक, मित्रमंडळी यांना बोलावून जंगी सेलिब्रेशन करायचं ठरवलं पण विनाकारण खर्च करण्यापेक्षा तेच पैसे मुलीच्या कॉलेजसाठी उपयोगी होतील. असं सौंच मत अर्थात मलाही ते पटलं तरीही तिला काय गिफ्ट दयावं हे समजत नव्हतं. साडी, दागिने, ट्रीप सगळ्यालाच तिनं नकार दिला.

“तुला नक्की काय गिफ्ट पाहिजे? ”मी विचारलं.

“चिडणार नसाल तर सांगते”

“नाही चिडणार. बोल”

“आपण तुळशीबागेत जाऊ. खूप दिवसात गेलो नाही. ”सौंच्या अत्यंत अनपेक्षित मागणीनं मी पार क्लीन बोल्ड. काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजलं नाही. म्हणून होकारार्थी मान डोलावली. दुसऱ्या दिवशी गर्दी आणि पार्किंग प्रॉब्लेमचा विचार करून रिक्षानं दुपारी तुळशीबागेत पोचलो. आजकाल सगळीकडे सगळं काही मिळतं तरीही तुळशीबागेतल्या खरेदीची सर कशालाच नाही. जसं हॉटेलमधलं जेवण कितीही चांगलं असलं तरी घरचं जेवण ऑल टाइम बेस्ट! ! तसंच काहीसं.

नेहमीप्रमाणे तुळशीबागेत तुडुंब गर्दी. कडकडीत उन्हातही खरेदीचा अफाट उत्साह होता त्यात सौ हरवल्या आणि मी आजूबाजूला बघत उभा राहिलो. सर्व महिला भान हरपून तुळशीबागेतल्या मोहमयी दुनियेत हरवतात हा सार्वत्रिक अनुभव… 

… खरंतर पुरुष मंडळींना ‘काय घ्यायचं ते घे अन पटकन चल’ असं ओरडून सांगायचं असतं पण स्पष्टपणे सांगता येत नाही. कितीही कंटाळा, वैताग आला तरी शांत रहावं लागतं. भरिसभर म्हणजे बायका हे कसं दिसतं, ते कसं दिसतं, हे घेऊ की ते घेऊ असं विचारून हैराण करतात. त्यामुळे पुरुषांना खास करून नवऱ्यांना सतत अलर्ट मोडवर रहावं लागतं.

… माझीसुद्धा अवस्था अशीच झालेली. अगदी ‘एक रुपया’ अशी किंमत सांगितली तरी महिलामंडळींना महाग वाटते आणि मग सुरू होतो बार्गेनिंगचा खेळ. दुकानदारानं सांगितलेल्या किमतीला वस्तू घेणं महिला मंडळींना कमीपणाचं वाटतं याच्या नेमकं उलट पुरुषमंडळी “किती” एवढंच विचारतात आणि पैसे देऊन मोकळे होतात.

तास-दीड तास झाला तरी सौंची खरेदी सुरूच होती. उभं राहून पाय आणि डोकं दुखयाला लागलं. जाम कंटाळलो.

“ए, चल बास आता”

“दोन मिनिटं. हे कानातलं बघा. किती छान आहे”

“हा मस्तयं. घेऊन टाक”

… मी निघण्याचा आग्रह करत होतो पण सौ खरेदीत गुंग होत्या. इतक्यात तिचं लक्ष गेलं माझा आविर्भाव पाहून ती म्हणाली “सॉरी! ! माझ्यामुळं तुम्हांला ताटकळावं लागलं. इच्छा नसताना इथं यावं लागलं. ” 

“अगं, तसं काही नाही”

“माहितीये. तुम्ही काही बोलणार नाही. चला निघू या. आता थेट लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसालाच येऊ. तेसुद्धा जमलं तर “इच्छा नसताना उतरलेल्या चेहऱ्यानं सौ निघाली. मला कसतरीचं वाटलं. बायकोची इतकी साधी इच्छा.

त्यातसुद्धा तिनं तडजोड केली.

… मनात कालवाकालव झाली. तिचं वागणं खूप खोलवर भिडलं. विनाकारण अपराधी वाटायला लागलं.

“कितीही घेतलं तरी कमीच आहे. चला” सौंच्या बोलण्यानं विचारांची तंद्री तुटली.

“अजून आपण त्या साईडला गेलो नाही. तिकडं खूप व्हरायटी आहे. ”

“नको”

“अगं खरंच, तुला हवी तेवढी खरेदी कर मी सोबत आहे”

“चेष्टा करताय”

“नाही. खरंच! ! तुझी शप्पथ”

“माझा खूप राग आलाय ना”

“नाही गं राणी. आज सगळी तुळशीबाग फिरल्याशिवाय घरी जायचं नाही. बिनधास्त खरेदी करू”मी हसलो तेव्हा सौंचा चेहरा उजळला. पुढचे दोन-अडीच तास तुळशीबागमय होते. प्रत्येक खरेदीत मी सक्रिय सहभाग घेतला. बार्गेनिंगसुद्धा केलं त्यामुळे सौ प्रचंड नव्हे अतिप्रचंड खुष झाली.

– – – किमती, ब्रॅंडेड वस्तूंपेक्षा आपल्या माणसांना ‘वेळ देणं’ यापेक्षा मोठं गिफ्ट नाही.

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”रफ वही..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “रफ वही..“ ☆ संध्या बेडेकर ☆

“आयुष्याची वही व्यवस्थित ठेवायला, पुन्हा एकदा रफ वहीची गरज भासू लागली आहे. “

आजकाल एखाद्याचे नाव आठवत नाही, कोणाकडे गेले की,

अरे! ! हे सांगायचे/ विचारायचे राहूनच गेले. असं होतं. एखादी वस्तू कुठे ठेवली आहे? ? हे आठवत नाही. घरात ती वस्तू आहे हे नक्की माहित असतं, पण वेळेवर शोधूनही ती वस्तू मिळत नाही. वस्तू खूप महाग असते अस वगैरे नाही, पण घरी असलेली वस्तू वेळेवर कामास येत नाही. त्यांचे वाईट वाटते. त्यापेक्षा जास्त त्रास आपल्याला आठवत नाही या गोष्टीचा होतो.

म्हंटल तर घर व्यवस्थित आहे. काम करायची पध्दत ही व्यवस्थित आहे. वस्तू व्यवस्थित वापरणे, काम झालं की त्या जागेवर ठेवणे हेही सवयीत आहे. सर्व व्यवस्थित आहे. कुठे काही मी कमी पडत नाही. खरं तर,

काकू! ! तुम्ही घर छान ठेवता. नेहमी चकाचक.

असे ‘comments ‘ ऐकल्यावर 

मी स्वतः वरच मनातल्या मनात हसते. हे सर्व वरवरचे आहे. असं मला वाटू लागलं आहे.

वाढत्या वयाचा परिणाम आता दिसू लागला आहे.

काल हल्दीरामचा रसगुल्ल्याचा डबा उघडला. त्यात एकंदर सोळा रसगुल्ले असतात, हे मला नक्की माहित आहे. सर्व संपले. पण सोळा कसे? कुठे? कोणाला? दिले, त्याचा हिशोब सहज लावत असताना चार रसगुल्ल्यांचा हिशोब काही लागत नव्हता. चार मेंम्बर असलेल्या शेजारच्या सर्व फॉमिलीज् डोळ्यासमोर आल्या, पण आठवत नव्हतं. मी आनंदाने प्रेमानेच माझ्या सुखदुःखाच्या प्रिय मैत्रिणींना दिले होते. याचा आनंदच होता मला, पण डिटेल्स आठवत नव्हते, त्यांचा त्रास होत होता.

या चार दिवसांत काय काय झालं? ? कुठे? कोणाकडे? गेलो, हे जेंव्हा आठवत नाही, तेंव्हा मानसिक त्रास खूप होतो. त्यात नुकसान असं काही च नसतं, फक्त आपल्याला आठवत नाही याचं दुःख होत. त्याचा त्रासही होतो.

बरं! ! असं नाही की सर्व च विसरते. काही अनावश्यक गोष्टी ज्या विसरले तर बरं होईल, त्रास कमी होईल असं वाटत, त्या छान आठवतात. त्या आठवतात म्हणून त्रास होतो.

बरे असो.

शाळेत असताना एक रफ वही असायची ज्यात सर्व लहान लहान गोष्टी लिहिल्या असायच्या. नक्की कोणत्या पेजवर आहे हे जरी माहीत नसलं तरी या वहीत कुठेतरी कानाकोपऱ्यात मिळेल ती खात्री असायची. ‘शोधा म्हणजे सापडेल’ हा आत्मविश्वास असायचा. ही रफ वही खूप महत्वाची असायची. पण तिचे रंगरूप काही खूप छान नसायचे. त्यामानाने बाकी वह्या जास्त व्यवस्थित असायच्या. बाकी फेअर कॉपीज् या रफ वहीच्या भरवशावर खूप मटकायच्या. पण अडल्या वेळी हीच जीवाभावाची सखी मदतीला धावून यायची. वर्ग संपता संपता सरांनी काही विशेष गोष्ट सांगितली तर घाईघाईत रफ वहीत लिहायचे. म्हणजे आपलं काम अडणार नाही, शोधलं तर आपल्याला नक्की कळेल/ मिळेल, आपलं काम होईल. ही मनोमन खात्री असायची. स्वतः वर विश्वास असायचा.

आता पुन्हा अशाच एका रफ वहीची गरज मला भासू लागली आहे.

म्हणजे अगदी रसगुल्ल्यांचा हिशोब वगैरे लिहायला नाही, पण रोजची दैनंदिनी लिहायला. आयुष्याची गणित सोडवायला. घरातील वस्तू संपल्या, कोणाला फोन करायचा आहे, मेसेज द्यायचा आहे, हळदीकुंकू, लग्नाला जायचे आहे. डॉक्टर कड़े जाणे आहे. आपली साप्ताहिक, मासिक, वार्षिक काम, bank details हे सर्व आता लिहून ठेवायचे असा विचार मनात आला. आणि रफ वहीची आठवण झाली.

अस विसरण म्हणजे एक सिग्नलच आहे. स्वतः कडे लक्ष द्यायची गरज आहे.. मी विसरते, मी विसरते हा विचार मनात पक्का बसायच्या आधी त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे.

वयामाना प्रमाणे हे सर्व होणारच, पण जेवढं लांबवता येईल तेवढं बरं. आत्मविश्वास कमी व्हायला नको. म्हणून मधून मधून ही रफ वही चाळायची, म्हणजे उजळणी होत राहील.  गोष्टी लक्षात राहतील. आपली काळजी आपणच घ्यायला हवी.

अल्झायमर ची सुरुवात अशीच होते. तेंव्हा एकाच वहीत सर्व लिहिलेले असले तर तेथे शोधलं तर सर्व मिळेल. ही खात्री हवी.

म्हणतात ना,

“There is nothing in this world that can trouble as much as your own thoughts. “

मनाच्या ज्या दरवाज्यातून संशय आत शिरतो ना, त्याच दरवाज्यातून आपला स्वतः वरचा विश्वास बाहेर पतो. आत्मविश्वास कमी झाला तर पूढचे सर्वच कठीण होईल.

 मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही. एकदा का एखादा चूकीचा विचार मनात घर करून बसला, तर मग दिशाभूल होते. मनात जे पेराल ते अधिक वेगाने उगवत.

चूकीच्या विचारांवर वेळेवर बंधनं घालणे आवश्यक आहे.

म्हणून वेळेवर सावध राहणही आवश्यक आहे.

रफ वही ची आयडिया मला आवडली, पटली लगेच एक शंभर पानांची वही तयार केली. ही वही मात्र अगदी समोरच ठेवली, नाही तर ही वही कुठे ठेवली? ? हेच विसरायला होईल.

आज वार्षिक चेक अप करिता डॉक्टर कड़े जायचे आहे. म्हणून काल मागच्या सर्व टेस्ट रिपोर्ट बघून रफ वहीत सर्व लिहून काढल. उजळणी केली. आज डॉक्टर ने विचारायचाच अवकाश की मी भराभर तारखांसकट सर्व उत्तरे दिली.

डॉक्टर म्हणाले पण,

व्वा मॅडम! ! तुमची स्मरण शक्ती छान आहे. बदाम वगैरे व्यवस्थित घेता बहुतेक डायट मध्ये. डॉक्टर हसले.

त्यांना काय माहिती हा सर्व रफ वहीचा कमाल आहे.

काही असो, मी माझ्या समस्या वर शोधलेला मार्ग मला आवडला. त्यांचा सकारात्मक प्रभाव ही दिसला.

आता मी स्वतः शी खूप गप्पा मारते. स्वतः लाच सांगते,  चला संध्या मॅडम, चला 

फ्रीजमधून वांगी काढायची आहेत. दूधाचे भांडे ठेवायचे आहे. असं स्वतः लाच सांगत सांगत काम करत राहते. मुलं सूना आॉफिस मध्ये गेल्यावर माझंच राज्य असत. मी एकटीच स्वतः बरोबर बोलत आपली कामं करत राहते. रामरक्षा ऐकते. म्हणते.  

कोणाकडे जायचे असेल तर तयारी करते. तेथे काय बोलायचे? ? ? हे आठवते, ठरवते. त्यांच्या घरच्या घडलेल्या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवते. आवर्जून त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करते. होम वर्क करुनच बाहेर पडते.

काल जोशी वहिनीकडे गेले, तेंव्हा त्यांचे कौतुक अभिनंदन करायला मी विसरले नाही. इतक्यातच त्यांची नात सिंगापूरला उच्च शिक्षणासाठी गेली असल्याचे लक्षात ठेवून त्यांचे अभिनंदन केले.

मला माझेच कौतुक वाटले. मनोमन माझ्या रफ वहीला धन्यवादही दिले.

आता प्रगती बरी आहे.

म्हणतात ना,

There are different problems In different phases of life. Without hesitation, take decisions timely as per your requirements.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ समुद्रस्नान की समुद्रदर्शन? ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? मनमंजुषेतून ?

☆ “समुद्रस्नान की समुद्रदर्शन?”  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

☆

समुद्र अत्यंत शक्तिशाली असतो हे त्याच्या आसपास जीवन व्यतीत करावे लागते त्या लोकांना चांगलेच ठाऊक असते!

मच्छीमार बांधवांना केवळ पोटासाठी समुद्राच्या पोटात खोलवर शिरावे लागते. एरव्ही ते सुद्धा समुद्राच्या नादी लागत नाहीत. पाण्यात होडी घालताना त्याला हात जोडून नमस्कार करतात. पाण्यातून किनाऱ्यावर सुखरूप आल्यावरही मागे वळून हात जोडतात. तिथे, ज्यांचा समुद्राशी कधीतरी संबंध येतो, त्यांनी समुद्राशी कसं वागलं पाहिजे?

भारतीय शास्त्रांत काही विशिष्ट तिथींचा अपवाद वगळता समुद्र स्नान निषिद्ध मानले आहे, यामागे काही कारणे असतीलच.

समुद्राचे केवळ दर्शन घेतल्यानेही मनाला आनंदाची अनुभूती येऊ शकते. परंतु समुद्र माणसाला आकर्षित करून घेतो, हेही खरे. पण म्हणून बेधडक त्याच्या अंतरंगात प्रवेश करणं योग्य नाही. आपल्या पुढे शंभर पावलं सपाट किनारा असताना आपल्यापर्यंत येणाऱ्या लाटेच्या पाण्यात घोट्यापर्यंत पाय भिजवून, हातात ते जल घेऊन तेच समुद्राला पुन्हा देऊन मागे वळावं… आणि किनाऱ्यावर वाळूत बसून तो महा सागर अनुभवावा!

समुद्राच्या पाण्यात निम्मी वाळूच तर असते आणि तीही अगदी बारीक. लाटेसरशी ती वाळू किनाऱ्यावर पसरत जाते. आणि पाणी मागे सरल्यावर तिथेच राहते काही वेळ. दुसरी लाट येताच पुन्हा समुद्रात जाण्यासाठी आतुर असते. त्यामुळे याक्षणी तुमच्या पायांखाली असलेली वाळू कधी निसटून जाईल हे सांगता येत नाही!

त्यात कोकणातील समुद्र किनारे बऱ्याच ठिकाणी उताराचे आहेत. स्थानिक नागरिकांशी दोन शब्द बोलल्यास सर्वकाही समजू शकते. पण कानांत वारे शिरलेल्या शहरी प्रजेला स्थानिकांशी बोलणं कमीपणाचं वाटू शकतं!

त्यात मुख्यतः पुरुषांना इथे पुरुषार्थ दाखवण्याची खुमखुमी येते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहलींमध्ये दोन भिन्न लिंगी समूह एकत्रित असतील तर हिरो संप्रदाय काहीतरी सिद्ध करण्याच्या प्रपंचात गुंतून जातात.

तो दुचाकी जीवघेण्या वेगात आणि रीतीने दामटत असतो आणि त्याला मिठी मारून बसलेली ती रोमांचित होत असते… तो किती हिंमतवाला आहे.. हे ती शब्दांविनही व्यक्त करीत राहते… आणि त्याचा वेग आणि आवेगही वाढत जातो!

समुद्रकिनारही असेच दृश्य असते. किंबहुना नदी, धरणे, तलाव या ठिकाणीही हाच दुरंगी सामना दिसू शकतो.

नव्या मराठीत या अगोचरपणाला शायनिंग खाणे किंवा मारणे अशी संज्ञा आहे. याला कुटुंबासोबत आलेले पुरुषही अपवाद नाहीत!

आताशा reels साठी कोण काय कreel याचाही भरवसा देत येत नाही.

पाण्यातले साहसी क्रीडा प्रकार आयोजित करणारे व्यावसायिक तुमच्या जीवाला किती प्राधान्य देतात, ही तपासून पाहण्याची बाब आहे. लाइफ जॅकेट हे पाण्यात बुडण्यापासून काहीच मिनिटे वाचवते हे लक्षात घ्यावे. पण ही वस्तू महाग म्हणून व्यावसायिक पुरेशा संख्येने उपलब्ध करून देत नसतील बहुदा. आणि जे देतात त्या वस्तूंचा दर्जा की. तपासतो?

शिवाय आपण यात घबराट दिसतो म्हणूनही काही लोक ते अंगावर चढवत नाहीत. मनात प्रचंड भीती असताना जल प्रवासाचा आनंद एक पर्यटक म्हणून कसा घेता येतो हे समजत नाही. ज्यांना पोटासाठी हा प्रवास करावाच लागतो, त्यांच्याबद्दल काय बोलावे? केवळ नशिबावर हवाला ठेवून राहायचे हे त्यांच्या हाती.

जंजिरा किल्ल्यावर मोठ्या बोट मधून छोट्या तराफ्यांवर उतरणाऱ्या लोकांसाठी काय सुरक्षितता साधने असतात? त्यात मग ते तिथले नेहमीचे लोक तुम्हांला आणखी घाबरवून टाकायला सज्ज असतातच. काही विपरीत घडले तर जबाबदारी नावाची गोष्ट स्वीकारणार कोण आणि मेलेल्या माणसाला त्याचा काय उपयोग?

शालेय किंवा महाविद्यालयीन सहलींचे आयोजन करताना या पिढीच्या अतिरेकी साहसी वृत्तीला लगाम घालणं केवळ अशक्य असते. एका शिक्षकाच्या ताब्यात चार मुलं आहेत… आणि त्यातील एक जण त्यांच काहीही न ऐकता पाण्यात पुढे पुढे जात राहिला तर शिक्षक काय करू शकतात? तो विद्यार्थी जिवंत पाण्याबाहेर आला तरच शिक्षा करू शकणार.. एवढंच!

त्यामुळे समुद्र सहली मध्ये पाण्यात उतरू न देणे हा एकमेव नियम असणे आणि तो पाळणे हाच एकमेव उपाय.

मागील सर्व अपघातांचा इतिहास पाहता विद्यार्थी शिक्षकांच्या सूचनांकडे पूर्ण दुर्लक्ष करून पाण्यात पुढे गेल्याची उदाहरणे अधिक दिसतील. एकदा त्या प्रचंड समुद्रात, गर्दीत आणि गोंधळात प्रवेश केल्यावर नियंत्रण ठेवणं अशक्य गोष्ट असते! कमरेला दोर बांधून थोडे पुढे जाणे तुलनेने सुरक्षित असते.. पण तेवढा उद्योग का करावा? पण असा दोर सोबत कोण ठेवणार हाही प्रश्नच नाही का?

भरती ओहोटी चे वेळापत्रक अनेक किनाऱ्यांवर प्रदर्शित केलेले असते… त्याकडे गांभीर्याने न पाहणारे अतिशहाणे मग अलिबाग किल्ल्यावर सहा तास अडकून पडतात!

समुद्रातील वाळूत चालताना नेहमीच्या रस्त्यावर चालताना लागतो त्यापेक्षा दुप्पट वेळ लागतो हे समजून न घेतल्याने पाण्यातून मागे फिरणाऱ्या लोकांना समुद्र माफ नाही करू शकत. केवळ धम्माल करायला आलेली मुलं, महिला यांत मोठ्या संख्येने बळी गेलेले आहेत.

बाकी समुद्र hypnotize करतो, अमावास्या, पौर्णिमेला अशा घटना जास्त होतात… हे वादग्रस्त विषय असून ते पूर्वानुभवाचे सामान्यीकरण असू शकते.

एकदा अपघात घडून गेल्यावर तो त्या त्या व्यक्तींच्या, कुटुंबांच्या स्मृतिपटलांवर मोठा काळा डाग बनून राहतो… कायमचा!

त्यातून हाताशी आलेली, तरुण, एकुलती एक मुलं गमावणे किती क्लेशदायक असते.. हे अनुभवाशिवाय समजणार नाही!

समुद्राच्या पाण्याला पाय लावावेत, पाय लावल्याबद्दल हात जोडून क्षमा याचना करून मागे सरावं, हे उत्तम! दर्शन पुरेसं आहे समुद्राचं!

बाकी प्रत्येकास मनाजोगते जगण्याचा आणि मरण्याचा अधिकार आहेच!

परदेशातील समुद्रकिनारे, तिथले आधुनिक साधनांनी सुसज्ज जीवरक्षक, तिथल्या लोकांची जल साक्षरता याची आणि आपल्याकडच्या परिस्थितीची तुलना होऊ शकत नाही. आणि आपल्याकडे माणशी एक सुरक्षारक्षक नेमला तरीही लोक ऐकतीलच याची शाश्वती नाही! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तिच्या हातचे पोहे…! ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ तिच्या हातचे पोहे…! ☆ शीला पतकी ☆

☆

परवा फेसबुक वर काही गोष्टी सर्च करत असताना एक व्हिडिओ पाहिला त्यामध्ये सोलापुरातील एक तरुण एक मनोरुग्ण अत्यंत किळसवाण्या अवस्थेत रस्त्यावर पडून होता आणि त्याला एक तरुण धरून उभा होता तो मनोरुगण असलेला तरुण त्याला विरोध करत होता पण याने त्याला नेटाने खाली बसवले. बरोबर आणलेल्या न्हाव्याच्या मदतीने त्याचे केस कापत होता. असंख्य जखमा डोक्यात झालेल्या… डोक्यातून जे बाहेर येत होतं ते बघण्याच्या पलीकडचं होतं… नंतर त्या मुलाला स्वच्छ वगैरे करून त्याने सिविल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट वगैरे केल…

तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मी त्या मुलाला फोन केला कारण तिथे नंबर होता आणि तो सोलापुरात असल्यामुळे ते लगेच शक्य झाले. मी त्याच्या कामाचे कौतुक केले कारण तरुणाईचा उद्धट जल्लोष पाहिल्यानंतर अशा तरुणाईची समाजा प्रति असलेली निष्ठा आणि संवेदनक्षमता पाहून मी भारावून गेले. मी त्या तरुणाला फोन केला आणि दुसऱ्या दिवशी भेटायला बोलावले. माझे नाव ऐकून तरी सोलापुरात बऱ्याच जणांना माहित आहे त्यामुळे त्याला आनंद झाला आणि दुसऱ्या दिवशी वेळ घेऊन तो माझ्या घरी भेटायला आला.

आशिष त्याचे नाव! त्याने आपला परिचय करून दिला आणि हे काम दहा वर्षापासून तो करतोय त्याच एक फाउंडेशन आहे त्याची नर्सिंग कोर्स झालेली बायको या कमी त्याला मदत करते अशी सर्व माहिती त्यांनी मला सांगितली.

या प्रसंगाची सुरुवात कशी झाली हे काम त्याने का निवडले अशी तपशिलावर चर्चा झाली तेव्हा त्यांनी सांगितले की… “सिद्धेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेऊन येत असताना अनेक भिकारी… मनोरूगण असलेले,… रस्त्यावरच्या कचराकुंड्यामध्ये अन्न शोधणारी… अशी खूप मंडळी दिसतात… त्यातील एक मुलगी रस्त्यावरती कचराकुंडी जवळ अन्न शोधताना मला दिसली. मुलगी तरुण होती. वय साधारण वीस बावीस वर्षे आणि मी थोडा काळजीत पडलो नंतर मी पोलिसांना फोन केला पोलीस आले पण फारशी दखल घेतली नाही. त्यांनी मला दवाखान्यात नेण्यापर्यंत मदत केली ती मुलगी पूर्णपणे मनोरुग्ण होती काही बोलत नव्हती तीला काही स्मरत नव्हते. पत्नी समवेत जाऊन तिला घरी आणले अंघोळ वगैरे घालून स्वच्छ केले बायकोने आपली साडी नेसायला दिली आणि ती मुलगी इतकी सुंदर दिसायला लागली.. गोरीपान होती. आता या मुलीला कुठे सोडावे? हा प्रश्न निर्माण झाला पत्नी नर्स असल्यामुळे घरीच तिची सेवा आम्ही चालू केली. दोन एक महिने ती आमच्या घरी होती त्यानंतर पुनर्वसन करण्याचे माझ्याकडे काही साधना नाही आणि ऐपतही नव्हती मग मी अशा पुनर्वसन केंद्राचा शोध घेतला आणि कर्जत जवळ असे पुनर्वसन केंद्र मला आढळले तिथे जाऊन कार्य करीत असलेल्या ज्योतीताई नावाच्या मॅडमची मी संपर्क साधला त्यांना जाऊन भेटलो त्यानी पुनर्वसन करण्याचे मान्य केले आणि आम्ही तिला त्या ठिकाणी सोडूनआलो. आमच्या घरापासून दूर जाताना मात्र ती अत्यंत हळवी झाली कारण आमच्या आधाराची तिला सवय झाली होती. त्या केंद्रामध्ये तिचे पुनर्वसन.. तिच्यावर काही उपचार… हे चालू होतं. उत्तम खाणे पिणे मोकळी हवा या सगळ्याचा परिणाम तिच्या प्रकृती वरती झाला ती थोडीशी सुधारली काही काही गोष्टी तिला आठवायला लागल्या… ती असंबद्ध बडबडत असे.. त्यातून काही गोष्टी उलगडल्या जाऊ लागल्या… ती मुलगी ज्या गावची होती त्या गावचे नाव लक्षात आले. त्या गावातल्या काही खुणा… आपले वडील कोण होते… असं ती हळूहळू बोलायला लागली… त्या सगळ्याची जुळवा जुळव करून ती मुलगी ज्या गावची होती आणि तिने सांगितलेल्या खूणा… तिच्या वडिलांचा असलेला टेलरिंग चा व्यवसाय या सर्वांचा मी शोध त्या गावी जाऊन घेतला. अशी एखादी मुलगी कुणाची नाहीशी झाली का याचाही शोध घेतला… आणि मला एक कुटुंब असे सापडले यांचा टेलरिंगचाच व्यवसाय होता आणि त्यांची मुलगी आठ वर्षांपूर्वी हरवली होती. त्यांना त्या मुलीचा मी फोटो दाखवला काही गोष्टी जुळल्या मग त्या मुलीला घेऊन आम्ही त्या गावी गेलो त्या मुलीलाही हळूहळू सगळ्या गोष्टी आठवल्या त्या कुटुंबाला तरी विलक्षण आनंद झाला. संस्थेच्या नियमाप्रमाणे सर्व गोष्टींची पूर्तता करून आम्ही बाहेर पडलो. आम्ही येताना मात्र तिच्या डोळ्यात कृतज्ञता होती. कारण तिचे कुटुंब तिला पुन्हा मिळाले होते तरीही चाचपड होतीच पण आई-वडील मिळाल्यामुळे आम्ही निर्धास्त होतो.

थोड्या दिवसांनी फीडबॅक घेण्यासाठी मी पुन्हा त्या कुटुंबात गेलो तिला छान स्विकारले होते तिची काळजी घेतली होती ती आता पूर्वीपेक्षा सुंदर दिसत होती कारण तिची माणसं तिला भेटली होती. आमच्या गप्पा झाल्या सगळ्या कुटुंबाची बातचीत झाली. तिच्यामध्ये झालेल्या सुधारणा ने आम्ही समाधानी झालो. हे सर्व आम्ही बोलत असताना ती आतून ट्रेमध्ये पोह्याच्या डिश घेऊन आली आमच्या हातात तिने पोहे दिले. त्या क्षणाला मला झालेला आनंद मी वर्णन करू शकत नाही. जी मुलगी कचराकुंडीवर अन्नाचे कण वेचत वेड्यासारखी जगत होती त्या मुलीने आपल्या कुटुंबात परत प्रवेश मिळवला.. कुटुंबाचे प्रेम तिला मिळाले… घरातील बऱ्याच गोष्टी ती पुन्हा करायला शिकली होती… आज तिने माझ्यासाठी केलेल्या पोह्याला अमृताची चव होती. तिच्या हातचे पोहे खाऊन मी तृप्त झालो. डोळ्यात आलेल्या पाण्याने समोरचे काहीच दिसत नव्हते “… ही सर्व कथा सांगताना तो तरुण आजही भारावलेला होता आणि मला म्हणाला ताई 218 लोकांचे या पद्धतीने मी त्यांच्या कुटुंबात पुनर्वसन केले आहे आणि अनेकांना हॉस्पिटलमध्ये आणि पुनर्वसन केंद्रात पाठवले. जी माणसं माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे त्यांच्यासाठी मी रोज संध्याकाळी खिचडी भात बनवतो किंवा दाल खिचडी बनवतो आणि ती नेऊन त्या ठिकाणी वाटतो. माझी बायको हे सर्व काम करते रोज संध्याकाळी तिथली सगळी वेडी माणसं आमची वाट पाहत असतात कारण त्यांच्या पोटात भूक असते आणि आमच्या हातात माया…! फक्त रविवारी मात्र आम्ही सुट्टी घेतो कारण आमचे कुटुंब आहे कुटुंबाला थोडा वेळ देणे गरजेचे आहे त्या दिवशी सुद्धा लोक तिथे येऊन उभे असतात आमची वाट बघत… आज संस्था लहान आहे पुरेसे कार्यकर्ते मिळाले लोकांकडून काही मदत मिळाली तर हे काम अखंड चालू ठेवण्याचा प्रयत्न मी करेन आणि त्यासाठी मी प्रयत्न करित असतो.

त्याला मी गरजा विचारल्या. आम्हाला रोज तांदूळ डाळ आणि तेल मसाले एवढं मिळालं तर आम्ही त्या लोकांना संध्याकाळचे जेवण देऊ शकतो यापेक्षा वेगळे जेवण त्यांना पचत नाही त्यामुळे हेच जेवण द्यावे लागते लोक आमचा वाढदिवस आहे, लग्नाचा वर्धापन दिन आहे म्हणून मिठाई वाटायला येतात पण त्याचा आम्हाला उपयोग होत नाही कारण ती या लोकांना पचत नाही आणि मग त्याचे वेगळेच परिणाम होतात. त्यामुळे आम्ही स्वतः आणलेली खिचडी त्यांना देतो..

या कामासाठी रस्त्यावरून रुग्ण प्रथम हॉस्पिटलमध्ये पोहोचवणे या कामाला आम्हाला रिक्षा मिळत नाही रिक्षावाले अशी माणसं रिक्षात घेत नाहीत पाचशे मीटर वरून सिविल मध्ये नेण्यासाठी मी दोनशे रुपये रिक्षावाले दिले आहेत तरी लोक न्यायला तयार नसतात आजारी पडलेले आडवे झालेले पेशंट रिक्षात घालून नेणे शक्य नसते यासाठी संस्थेला एक ॲम्बुलन्स घेण्याचा विचार आहे. काही कपडे पांघरूण विजार टी-शर्ट यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मी त्याला माझ्या माध्यमातून ॲम्बुलन्स मिळवून देण्याचा प्रयत्न करीन असे सांगितले आहे आता त्याच्या ॲम्बुलन्स साठी मी काही मदतीच्या सोर्सेसचा शोध घेत आहे आपल्याला काही माहीत असल्यास जरूर कळवा

आशिष ने सांगितलेली ही सर्व कथा ऐकून मी अगदीच स्तब्ध झाले तो म्हणाला तुमचे नाव खूप आहे तुम्ही मला मदत कराल याची मला खात्री आहे. जाताना त्याने मला नमस्कार केला म्हणाला तुम्ही मला आईच्या जागी आहात मी म्हणाले सामाजिक काम करणाऱ्या माझ्या अनेक मुला आज एका मुलाची भर पडली…!

आशिषला एक ॲम्बुलन्स मिळवून द्यायची हे माझ्या मनाशी ठरवले पाहुयात परमेश्वर किती साह्य करतो इतके छान काम करणार्या या तरुणाईला आमच्यासारख्या अनुभवी वयस्काने मदतीचा हात पुढे करावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे बाकी सगळं परमेश्वराच्या हातात आपल्यालाही कुणाला असे मदतीचे सोर्सेस ठाऊक असल्यास जरूर कळवा.

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मौनाचे सामर्थ्य… ☆ शुभा रुद्र ☆

शुभा रूद्र 

? मनमंजुषेतून ?

☆ मौनाचे सामर्थ्य… ☆ शुभा रूद्र  ☆

☆

मौनाचे सामर्थ्य आणि निसर्गाचे मूक तत्त्वज्ञान – – 

‘मौन’ ही केवळ शांत बसण्याची क्रिया नाही, तर ती अंतर्मनाचा सुसंवाद साधणारी एक अत्यंत प्रभावी भाषा आहे. जेव्हा आपण बाह्य जगाचा कोलाहल थांबवून निसर्गाशी एकरूप होतो, तेव्हा निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला जीवनाचा एक अमूल्य धडा देत असतो. सूर्य, चंद्र, झाडे, माती आणि दगड हे सगळे शांत राहूनही विश्वातील सर्वात मोठा संदेश आपल्याला देत असतात. या मूक संवादातूनच मौनाचे खरे सामर्थ्य प्रकट होते.

निसर्गाच्या कुशीत शांतपणे निरीक्षण केले, तर साध्या-साध्या गोष्टींमधून मानवी जीवनाचे मर्म उलगडते. झाडावरील किड्यांच्या सहज प्रवृत्तीतून आपल्याला आपल्या आहाराच्या आणि जगण्याच्या पद्धतीवर विचार करण्याची प्रेरणा मिळते. “अन्न हे प्यायचे असते आणि पाणी हे खायचे असते, ” म्हणजेच प्रत्येक घास ३२ वेळा चघळून खाण्याचा निसर्गदत्त नियम आपल्याला आरोग्याची गुरुकिल्ली शिकवतो.

त्याचप्रमाणे, मंदिराच्या पायरीशी असणारे कासव आपल्याला संयम आणि इंद्रियनिग्रहाचा संदेश देते. आपले चार पाय, तोंड आणि शेपूट या सहा अवयवांना संकुचित करणाऱ्या कासवाकडून आपल्याला काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंना नियंत्रणात ठेवून, अहंकार बाजूला सारून जगण्याची शिकवण मिळते.

निसर्गातील सर्वात सुंदर आविष्कार म्हणजे फूल! फूल कधीही गाजावाजा करत उमलत नाही, पण त्याचा सुगंध संपूर्ण आसमंतात पसरतो. माणसाच्या सद्गुणांचेही तसेच असते. संतांप्रमाणेच सुगंधी फुलेही केवळ आनंद वाटण्याचे काम करतात. नदी, सूर्य, आणि माती कधीही कुणामध्ये भेदभाव करत नाहीत.

एका ठराविक वयापर्यंत निसर्गाकडून केवळ ‘घेणारा’ माणूस जेव्हा ‘देण्याची’ कला शिकतो, तेव्हाच त्याचे जीवन सार्थकी लागते.

“नको असलेला भाग काढून टाकला की शिल्प तयार होते… “

हाच नियम मानवी आयुष्यालाही लागू होतो. दगडाच्या पोटात मूर्ती दडलेली असते, फक्त छिन्नीचे घाव घालून नको असलेला दगड काढून टाकावा लागतो. माणसानेही आपल्यातील दुर्गुण, संकुचित विचार आणि अहंकार बाजूला सारला, तर तो स्वतःच्या आयुष्याचा एक उत्कृष्ट शिल्पकार बनू शकतो. मौनाच्या या सामर्थ्याला ओळखून, निसर्गाच्या मूक पाऊलखुणांवर चालणे, हेच खऱ्या समृद्ध जीवनाचे लक्षण आहे.

 ☆

© शुभा रूद्र

मो. 9657189569

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares