मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भेटी वेगवेगळ्या..  पण आयुष्य बदलवणाऱ्या… ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ भेटी वेगवेगळ्या..  पण आयुष्य बदलवणाऱ्या☆ शीला पतकी 

भेट देणे भेट घेणे पहिली भेट शेवटची भेट ऊरा ऊरी भेटणे परमेश्वराला! हल्ली मिळणे या शब्दाला सर्रास..  मला पेन भेटला असं म्हणतात.  ते भेटणे.  लग्नामध्ये भेट बकरा… कदाचित हा शब्द काही वेगळा असावा…  तिथे सर्व नातेवाईकांच्या गाठीभेटी होतात ते भेट ठीक आहे पण बकरा काय माहित नाही तो विडंबित बेड सुद्धा झाला आहे..  भेटीत तृष्टता मोठी ते वेगळच..  ती तृष्ठाता ऋणानुबंधाच्या गाठीशी संबंधित आहे…

मतदार संघात भेटीगाठीवर भर देण्यात आला ते प्रकरण वेगळे आहे तिथल्या भेटींना वेगळा अर्थ आहे.  विरोधी पक्षनेते मुख्यमंत्र्यांना भेटले..  त्यांची बंद खोलीत भेट झाली हे वेगळच आहे इथे सगळे राजकारणच बदलतं…!

व्यावसायिक भेट तिथे करार ठरतात.  वेळेवर डॉक्टर भेटले म्हणून तो वाचला या भेटीला तर वेगळाच अर्थ आणि अनन्य साधारण महत्त्व आहे.

हल्ली सर्वात चर्चेचा विषय पंतप्रधान, ट्रम्प तात्यांना भेटले…  जागतिक खळबळ सुरू होते… खळबळजनक भेट…

अहो कुणीतरी आपल्याला भेटायला आले आहे आनंददायी घटना असते किंवा हल्ली कोणी येतच नाही किंवा फोन येतो मी भेटायला येऊ का वेळ घेऊन येणारे शिस्तबद्ध लोक…  इकडून चाललो होतो म्हणलं भेटून जाऊ… संधी साधू माणसं.  आवर्जून भेटायला आले आदर आणि प्रेम! परमेश्वरा कंटाळा आला एकदाचाये खाली भेट मला… वैतागल्यावर येणारे वाक्य!

भरत भेट… हा तर लहानपणापासून कोरला गेलेला धडा कारण रामाची त्याच्याशी भेट झाल्यावर रामाच्या पादुका डोक्यावर घेऊन तो आपल्या गावी गेला आणि त्या सिंहासनावर ठेवून त्याने 14 वर्षे राज्य केले हा भेटीतला व बंधू प्रेमाचा आदर्श.  

रिकामे ढग दिसले की धरती फाटून जाते तिला ओढ लागते त्याच्या भेटीची…  साहित्यिक भेट…! म्हणजे दुष्काळ पडणार पण डायरेक्ट सांगत नाहीत.

बापाबरोबर जन्मभर राहिलो 

बाप कधीच भेटला नाही 

तो गेल्यावर कळलं

 माझ्याशिवाय कोणासाठीच तो आयुष्यभर झटला नाही…!

नवकवींची काव्यमय भेट

 

येथे सागरा धरणी मिळते

 तेथे तुझी मी वाट पाहते.

गुगल मीट म्हणजे पत्ता!

दोन ओंडक्यांची होते भेट सागरात एक लाटतोडी दोघा पुन्हा नाही भेट

तत्वज्ञानी भेट!

के की मुसाची चाळीसगाव स्टेशन वरची भेट आपल्या प्रेयसी साठी रोज दोन माणसांचा स्वयंपाक करून तिच्यासाठी गुच्छ तयार करून येऊन एका विशिष्ट गाडीची वाट पाहत भेटीची अपेक्षा करणारा केकी… भारतातील महान चित्रकार ज्याची आपल्या प्रेयसीची कधीच भेट झाली नाही ही सत्य कथा आहे…  ती हळवी भेट!

पंडित जवाहरलाल नेहरू आपली पत्नी कमला नेहरू हिला टी बी झाल्यामुळे शेवटच्या आठ वर्ष भेटले नाहीत त्यांचा अंतिम संस्कार सुभाष चंद्र बोस यांनी केला अत्यंत संताप जनक…  न झालेली भेट

शबरीची रामाची झालेली भेट अपारंपार भक्ती आणि भक्तीची खात्री असलेली भेट याला श्रद्धा म्हणतात ही श्रद्धा भेट आहे.

रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांची भेट… तरुणांमध्ये भारतीय विचार रुजवणाऱ्या महान वैचारिक वारशाची भेट!

जंगलातल्या ओसाड आश्रमाशी आल्यावर तिथे पडलेल्या शिलेला स्पर्श होताच अहल्या शाप मुक्त झाली ती राम भेट शाप मुक्तीची भेट आहे.

सावकार बापान ऋणमुक्तीसाठी लग्न करून आणलेली सून शोभण्याचा वयाची मुलगी…  तो हाक मारतो आई…  आणि मान वर करून पाहतो ती त्याचे प्रेयसी असते…  शारदा सिनेमातील मीनाकुमारी, राज कपूर यांची भेट…  तत्कालीन समाज व्यवस्थेवर कोरडे ओढणारी…  महिलांवर अन्याय करणारी…  मीनाकुमारी अगतिक पण निश्चयी नजर आणि राज कपूर ची धक्का बसलेली असाह्य दृष्टी दिग्दर्शकाची कमाल दाखवणारी भेट!

अशा असंख्य भेटी आजही स्मरणात आहेत.  कितीतरी लिहिता येईल पण कामवाली आली आहे ती पुन्हा भेटत नाही ना…  म्हणून लेखणीला विराम..  

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”ही सुद्धा आदिशक्तीच…!!” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “ही सुद्धा आदिशक्तीच..!! ☆ संध्या बेडेकर ☆

… “जोडीदाराला आयुष्यभर साथ देणारी पत्नी म्हणजे आदिशक्तीच नाही का ??”

आज बऱ्याच वर्षांनंतर माझी मैत्रिण ‘रिया’ भेटली. मधल्या काळात कधी तरी फोन वर बोलणं होतं असे. जून्या आठवणी ताज्या झाल्या. माझ्या चेहऱ्यावर चे भाव बघून ती लगेच म्हणालीच,  “ओळखलं नाहीस ना मला. “

अग !! मी पण तुला ओळखल नाही,  आम्ही दोघी मनमोकळेपणाने हसलो.

दोघींमध्ये आमूलाग्र बदल झाला होता. क्षणभर व्यक्तिमत्वांची अदलाबदल झाली की काय ?? असं वाटलं 

रियाला बघून,  “हीच का ती स्टाइलिश रिया जाधव ?? “असा प्रश्न मनात आला.

त्यावेळेस आमच्या मैत्रिणींमध्ये ‘रिया ‘ म्हणजे सर्वात स्टायलिश, स्वतः भोवती गरगर फिरणारी. फॅशन, योग, जॉगिंग, फिटनेस, प्रोटीन शेक, diet यावर लक्ष देणारी. त्यातच ‘चेरी ऑन केक ‘म्हणजे छान इंग्लिश बोलणारी. आमच्या सगळ्यांच्या मध्ये वेगळीच उठून दिसणारी. आमच्याच वयाची असली तरी सर्वांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असायची ती. कधी कधी हेवाही वाटायचा.

प्रत्येक भेटीत तिचा काही तरी नवीन फंडा असायचा. आता काय म्हणे ?? मी पहाटे चारला उठते व व्यायाम करते.

आता काय तर,  मी प्रत्येक वार प्रमाणे त्या त्या रंगाचे कपडे घालते. म्हणजे सोमवारी पांढरा तर गुरवारी पिवळा. शनिवारी काळया रंगाचा ड्रेस घालणार. रंग तोच असला तरी प्रत्येक वारी ड्रेस वेगळा असायचा. आमच्या गृप मध्ये रिया म्हणजे सर्वात स्मार्ट, वेगळीच दिसायची. तिचा ड्रेसिंग सेन्स खूप छान. व ती स्वतःला छान कॅरी करायची. एकदम ” smart impressive, fashionable, modern ” वजनावर कटाक्षाने लक्ष देणारी. तिला बघून असं वाटायचं जीवन जगावं तर असं.

स्वतः जशी टिपटॉप रहायची, तसंच तिच घरही असायचं. घर व इतर गोष्टी चां बॅलन्स तिला छान सांभाळता यायचा. मला तिचं नेहमीच कौतुक वाटायचं.

सर्व गोष्टींची एकानंतर एक आठवण आली. फॅशनमध्ये आम्ही कोणी तिच्या जवळपास ही नसायचो. खास करून मी तर अजिबात नव्हतेच.

तिच्या नवनवीन गोष्टी ऐकुन मला आश्चर्यच वाटायचे, आपल्याला कसं काहीच सुचत नाही, जमतं नाही. आपण घर, स्वयंपाक, मुल, त्यांचे डबे, परीक्षा, नवऱ्याची काळजी यातच गुंतलेलो असतो.

यातले एखादे काम कमी केले तर वेळ मिळेल का ? ? खरंतर मी अगदी चारला पहाटे वगैरे काही उठू शकत नाही, हे मला नक्की माहित होतं. पण गुरवारी पिवळी साडी किंवा ड्रेस घालणे ही साधी गोष्ट ही आपल्याला जमत नाही. मला तिच्या सारखं रहावं, फॅशन करावी असं वाटायचं, पण जमायच नाही. मनात खूप विचार यायचे. आपण बरोबर की चूक ? याचा गुंता सोडविण्यात मी बिझी असायचे.

जसं फोन मध्ये अनावश्यक डेटा सेव्ह झाला की फोन कसा हॅन्ग होतो ना, तसंच काहीसं माझ्या मनाचं व्हायच. आपल्याच वेळापत्रकाची उलट सुलट तपासणी करत रहायची. फॅशन तर काही कधी जमली नाही पण डिस्टर्ब मात्र नक्की व्हायची. कधी अगदी खूप ठरवून काही केलं तर बरं दिसतय का ?? लिपस्टिक खूप डार्क लावलं का ?? असंही वाटतं रहायचं. म्हणजे आत्मविश्वास असा नव्हताच.

फॅशन करायला एकतर मनापासून आवड असावी लागते, ती समज, तो सेन्स असावा लागतो. फॅशन तुमच्या पर्सनालिटी ला साजेशी असावी लागते. प्रसंगानुरूप, वेळेनुसार कपड्यांची, रंगाची निवड करता आली पाहिजे. फॅशन म्हणजे काही दुसऱ्यांची काॅपी करायची गोष्ट नाही. हे सर्व कळत होतं. तरी सुप्त इच्छा मात्र होती. रिया सारख कोणाला बघीतल की ती इच्छा पुन्हा पुन्हा जागृत व्हायची.

वयाप्रमाणे सर्व च बदलत गेले. मुलं मोठी झाली. अनघा कॉलेज मध्ये जाऊ लागली. अनघाला छान सुंदर तयार झालेलं बघताना मला छान वाटायचे. तिने खूप स्मार्ट रहाव‌ असं मला नेहमी वाटायचे. माझी अपूर्ण इच्छा अनघा पूर्ण करत होती.

एकदिवस अनघा म्हणाली, आई !! माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या, “तुझी आई छान दिसते. She is very well maintained and looks young. “

आई तुझा व्यायाम व योग वर्ग बंद करू नकोस हं. अशीच छान रहा.

बाबा लगेच म्हणाले,  अगं !!! अनघा एकदा आईला बाजारात घेऊन जा. तिच्या personality ला साजेसे नवीन कपडे घे. गरज वाटल्यास प्रोफेशनल हेल्प घे. तिलाही खूप आवड आहे या सर्वांची.

ब्युटिशियन ‘ मालविका ‘.  अनघाची मैत्रिणी ने माझे ‘makeover ‘करून दिले. माझा हेअर कट केला. म्हणाली,

काकू हा ‘ salt n paper hair cut ‘ तुम्हाला छान दिसतोय. वेगवेगळे comfortable dresses घेतले. , make up चे प्रशिक्षण दिले. थोडक्यात मी पण फॅशन जगात / संस्थेत प्रवेश घेतला.

आपल्या वयाची मर्यादा सांभाळून मी पण उत्साहाने नवनवीन कल्पना आत्मसात करत होते. आता बऱ्यापैकी समाधान ही झाले आहे. स्वतः ला बदलणे म्हणजे आपल्या’ comfort zone ‘ मधून थोडे बाहेर निघावे लागते. हे कळले.

आता,

काकू छान दिसताय. हेअर कट छान दिसतोय. असे रिमार्क मिळताहेत.

चला, उशिरा का होईना, एक इच्छा पूर्ण झाली.

आज रिया पण म्हणाली,  अग !! छान दिसतेस.  Very Smart.

पूढे रिया म्हणाली,  एक जमाना था,  ” When I was very perticular about my looks. “

मधल्या काळात आयुष्याने एवढे रंग दाखविले की, आता रंगांचे तारतम्य विसरलेच बघ मी. रिया म्हणाली

रिया ची मुलगी  ऋतुजा म्हणाली,

“मावशी !!! मागची पूर्ण बारा वर्षे बाबा आजारी होते. आईने बाबांची खूप सेवा केली. आम्हाला सांभाळले. घराकडे लक्ष दिले. “

मावशी !! मला आईला पुन्हा पुर्वी सारखं बघायचंय. तिने पुन्हा तसंच जगाव असं मला वाटतं. बाबांची पण हीच इच्छा होती.

रिया ची मागच्या बारा वर्षांची कहाणी ऐकून तिने तिच्या वर आलेल्या कठीण प्रसंगाला तिने ज्या धैर्याने तोंड दिले ते ऐकून पुर्वीची स्टाइलिश रिया नव्याने दिसली. “

आज वेगळीच रिया समोर होती. कणखर, कर्तव्यदक्ष, संयमाने आपली जबाबदारी पार पाडणारी. न डगमगता एकानंतर एक येणाऱ्या समस्यांना तोंड देणारी.

एक वेळेस आपल्या स्त्रीत्वाचा सजून धजून जगण्याचा हक्क बजावणारी, आयुष्याचा पूर्णपणे आनंद घेणारी.

आज कर्तव्याला तेवढ्याच जबाबदारी ने पार पाडणारी.

खरंच,

आयुष्याच्या प्रवासात सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत अनेक गोष्टी घडतात. परिस्थिती नेहमी एकसारखी नसते.

“न डगमगता जोडीदाराला आयुष्यभर साथ देणारी पत्नी म्हणजे आदीशक्तीच नाही कां ?? “

म्हणतात ना,

“उस नारी का कोई मुकाबला नहीं, जिसके पास शक्ति के साथ सहनशक्ति भी हो।”

रिया म्हणाली,  पूर्ण एक तप ग !!!

बहुतेक मागच्या जन्माची काही तरी परतफेड असावी. मला समाधान आहे की मी माझे कर्तव्य /सेवा मनापासून केली.

मी विचारलं, कस manage केलंस ग हे सर्व ???

रिया म्हणाली, अग म्हणतात ना,

“Mind is nothing but traffic of thoughts. Select your route carefully. “

मी संयमाने गरजेप्रमाणे वागत गेले.

या अवधीत मी फक्त एकच प्रार्थना करत होते,

हे देवा,

जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया.

जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया.

मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय 

माझे मला कळाया, देई रे बुद्धी रामराया.

आज पुन्हा एकदा रिया ला बघून मी तिच्या आदरयुक्त प्रेमात पडले. काही लोकांच्या संगतीत आपलं आयुष्य घडत असतं. हे नक्की.

लेखिका : संध्या बेडेकर.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”आयुष्याची छायाचित्रे..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “आयुष्याची छायाचित्रे.. ☆ संध्या बेडेकर ☆

न्युटन ने अगर गिरे हुए सेब की जगह गिरे हुए लोग देखे होते तो *gravity *की जगह *Humanity* की पढाई हो रही होती.  

श्रावण महिना म्हणजे विशेष महिना. श्रावण सोमवार, नागपंचमी, गोकुळाष्टमी, असे अनेक सणवार आणि १५ ऑगस्ट हा राष्ट्रीय सण. त्यानंतर लगेच नवरात्र, दसरा, दिवाळी 

महिने केंव्हा सुरू होतात ? आणि केंव्हा संपतात, कळतच नाही. नवीन लग्न झालेल्यांच्या घरी अजून एक भर म्हणजे मंगळागौर पूजन. एकंदरीत उत्साही वातावरण.

आमच्या भजन मंडळीला अनेक ठिकाणी भजनासाठी आमंत्रण असते.

दरवर्षी आम्ही दोनदा तरी भजन आनंदवन आणि आसरा या वृद्धाश्रमात करतोच.

तेथील लोकांना पण आता आमची सवय झाली आहे.

तेथे गेल्यावर मात्र आयुष्याची अनेक छायाचित्रे प्रकर्षाने जाणवतात. रंगीन असं एकही चित्र दिसत नाही. म्हणजे मला नेहमी वाटतं ज्यांना आयुष्यात लहान सहान कारणांवरून तक्रार असते ना त्यांनी मधून मधून वृद्धाश्रमाला भेट द्यावी. अशा सर्वांचे डोळे उघडतील आणि डोकं ठिकाणावर येईल.

बरे असो,

वृद्धाश्रमाचे नाव जरी आनंदवन असले तरी आनंदाचा अभाव स्पष्ट जाणवतो. प्रत्येक चेहर्यावर नकळत नजर थांबते, चेहऱ्यावरील भाव वाचायचा मी प्रयत्न करते. त्यांच्या डोळ्यातील स्तब्ध भाव त्यांच्या दुःखाची, पण स्पष्ट न दिसणारी अनेक कारणं मनात धुमाकूळ घालतात.

येथे स्वइच्छेने कोणी येत असेल का ? 

या लोकांचे कोणी नातेवाईक नाहीत का ? यांची मुल कुठे आहेत ? यांनी कोणती नोकरी केली असेल ? यांचे येथे येण्याआधीच आयुष्य कसे असेल ? यांना कोणी भेटायला येत असेल का ? घरच्यांनी पण नाइलाजाने यांना इथे ठेवले असेल का ? 

त्यांचा पण आयुष्याचा काही काळ मजेत गेला असेलच ना. खटृटी मीठी यादें असतीलच ना. त्यावेळी आयुष्य नावाच्या पुस्तकाचे पूढचे पान त्यावर काही तरी भारी लिहिलं असेल या आशेने / विचाराने पलटवत असतीलच ते. आता ते पुस्तक बंदच करून ठेवलं असेल का त्यांनी ? 

 एका खोलीत चार अनोळखी माणसं एकत्र राहतात. सर्व जेष्ठ, एकटे, मनाने खचलेले,

एकमेकांना बघून यांच्या दुखात भरच पडत असणार. कदाचित समदुःखी असल्याने आपापल्या भावना एकमेकांजवळ व्यक्त करणं जमत असेल का त्यांना ? 

शहरात अनेक वृद्धाश्रम आहेत. काही तर अगदी फाइव स्टार आहेत. तेथे गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर बिचारा भाव दिसत नाही. पण येथे मात्र त्यांना बघून जीव कासावीस होतो.

प्रत्येक वर्षी दोन चार नवीन चेहरे दिसतात, तर जूने चेहरे गायब असतात. ते कुठे गेले ? आपल्या घरी गेले का ? असा विचार मनात येतो पण विचारायची हिम्मत होत नाही.

आज कार्यक्रम चालू असताना एक गृहस्थ उमाताईंजवळ आले आणि म्हणाले, 

“तुमची काही हरकत नसेल तर त्या तिथे बसलेल्या ताई आहेत ना, त्या छान गाणं म्हणतात. त्यांना एक भजन म्हणू देत का ? “

 उमाताईंनी लगेच हो म्हंटल आणि लगेच पेटीची साथ दिली. थोड्या वेळ का होईना त्या ताईंच्या चेहऱ्यावर आनंदी भाव बघून आम्हाला बरं वाटलं 

आज भजन झाल्यावर, संस्थेचे संस्थापक बरोबर चहा घेत असताना त्यांनी आपले अनुभव सांगितले. सध्या सामाजिक परिस्थिती कशी खालावली आहे त्याबद्दल ते बोलत होते. एकेक *खरी गोष्ट * ऐकून जीव खालीवर होत होता.

सध्या लोकांची वैचारिक समीकरण चूकत आहेत. संवेदना जणू मेल्या आहेत. लोक माणूस घाणे झाले आहेत. बाकीचे जाऊ दे स्वतः चे आई वडील पण नकोसे झाले आहेत.

सामाजिक परिस्थिती भयावह आहे.

अस प्रत्येक घरी आहे, असं म्हणता येणार नाही. पण प्रमाण वाढत चाललंय. सामाजिक आरोग्य ढासाळलय. हा रोग तीव्र गतीने वाढतोय. कॅंसर सारख्या रोगांवर रामबाण औषध शोधणं सुरू आहे. पण या रोगांवर औषध काय ? 

म्हणूनच की काय, 

काल आसाम सरकार ने या दिशेने एक पाऊल उचलले आहे. त्यांनी आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना दर वर्षी ७ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर सुट्टी जाहीर केली आहे.

ती कशाला ? 

तर तुम्ही तुमच्या आणि तुमच्या बायकोच्या आईवडिलांबरोबर ही सुट्टी घालवावी यासाठी.

म्हणजे आता परिस्थिती ही आहे की हे सांगावं लागतंय. कुठून तरी सुरुवात करणं पण गरजेचे आहे.

संस्थापक जे सांगत होते, 

त्यात नटसम्राट चे उदाहरण होते. तर मुलांनी वृद्धाश्रमात आईला किंवा वडिलांना आणून सोडलेली अनेक व्यक्ती होत्या. त्यानंतर त्यांना भेटायला सुद्धा येत नाहीत. त्यांची तब्येत खराब आहे हे सांगायला फोन केला, तर तो सुद्धा उचलत नाहीत. आपण कोणालाही नकोसे आहोत ही भावना च माणसाला अर्ध अधिक संपवते. हे असे लोक जीवन जगत नाही तर दिवस काढतायेत. श्वास चालू असेपर्यंत जगणार आहेत नाईलाजाने.

मी सहज त्यांना मला तेथे ओळखीचे वाटणाऱ्या एका गृहस्थांबददल विचारले तर ते म्हणाले, 

अहो!! ते सहकार नगर मध्ये राहणारे श्री देशमुख आहेत. बायको मागच्या वर्षी गेली. मुलगा अमेरिकेत स्थायिक आहे. एका मोठया कंपनीत वैज्ञानिक आहे.

Gravitational force संबंधित काही तरी research करतोय म्हणे.

आई गेली तेंव्हा किंवा त्यानंतरही *त्याला* भारतात येणे जमले नाही.

मोठा माणूस तो. म्हणून वेळ मिळाला नाही. 

संस्थापकांचा राग लक्षात आला.

देशमुख येथे रहात नाही पण आठवड्यातून दोन तीन दा येतात. छान इंग्रजी बोलतात. खूप पुस्तकं वाचतात. सर्वांशी गप्पा मारतात, सर्वांना बरोबर घेऊन बाग काम करतात. त्यांच्या येण्याने येथील वातावरण थोडं बदललंय.

तेवढ्यात श्री देशमुख तेथे आले. आमच्या बरोबर गप्पा मारत होते.

चेहऱ्यावर, बोलण्यात आत्मविश्वास होता.

जे झालं ते झालं. त्यावर विचार करत बसण्यापेक्षा पूढे काय करायचे ? हे बघावे. या मताचे असावे. 

असे त्यांच्या बोलण्यावरून वाटल. श्री देशमुख म्हणाले, 

मी पण त्यांच्यातलाच एक आहे. त्यांचा एकटेपणा, दुःख मी समजू शकतो. मी येथे रहात नाही पण मधून मधून येतो.

स्वतः ला किती ही समजवा, किती ही बहादुर बनायचा प्रयत्न करा, शेवटी कुठे तरी हृदयात दबलेले दुःख, ती जखम आपल डोकं वर काढतेच ना.

सहजच देशमुख साहेब बोलून गेले.

माझा मुलगा अमेरिकेत वैज्ञानिक आहे. Gravitational force च्या संदर्भात Reaserch करतोय.

थोडं हसून (?) म्हणाले, 

ज्यावेळी न्युटनने सफरचंद खाली पडताना बघीतले आणि gravity चां शोध लावला. त्यावेळी जर त्याने माणसाला खाली पडताना बघीतल असतं तर बर झालं असतं. आज लोकांनी gravity च्या ऐवजी Humanity चां अभ्यास केला असता. 

नाही का ? 

सर्व स्तब्ध होते. जग पूढे चाललंय, पण आपण ? प्रत्येकाच्या चेहर्यावर अनेक प्रश्न होते.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “संस्कार म्हणजे…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? मनमंजुषेतून ?

☆ “संस्कार म्हणजे…☆ श्री जगदीश काबरे ☆

संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार.

गुणांचा गुणाकार याचा अर्थ स्वतःमधील गुण वाढवायचे आणि दोषांचा भागाकार याचा अर्थ स्वतःमधील दोष कमी करायचे.

 

मनन करून, सर्वांगीण विचार करून कृती करतो तो मानव.

… विचार व कृती चांगल्या होण्यासाठी संस्कारांची गरज असते.

… प्रत्येक कार्यच चांगले संस्कारयुक्त असावयास पाहिजे,

 

उदाहरणार्थ – – 

.. केळी खाऊन आपण साले टाकतो ही कृती आहे.

.. केळे खाऊन साल कचऱ्याच्या टोपलीत टाकणे ही प्रवृती.

.. केळे खाऊन साल रस्त्यावर टाकणे ही विकृती.

.. दुसऱ्याने रस्त्यावर टाकलेली साल कचऱ्याच्या डब्यात टाकणे ही संस्कृती.

 

… म्हणून आपल्या कृत्याची जबाबदारी नशिबावर, ईश्वरावर न ढकलता प्रत्येकाने आपल्या आत डोकावून स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून स्वीकारली पाहिजे.

आणि त्यासाठी ईश्वराची नाही तर सदविवेकाची गरज आहे. –

 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भीमाचे गर्वहरण… लेख दुसरा  ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

??

☆ भीमाचे गर्वहरण… लेख दुसरा  ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

कौरवांच्या नाशानंतर, असे म्हणतात, की एकदा भीमाला आपणच जगात सगळ्यात बलशाली आहोत असा गर्व झाला. मग मारुतराया वृद्ध वानराच्या रुपात आला, माझी शेपूट हलवून बाजूला कर म्हणाला आणि भीमाचे गर्वहरण केले.

— — 

मी gym मध्ये अक्षरशः घाम गाळत होतो. यंदा सालाबादप्रमाणे होणारा माझा नवीन वर्षाचा gym ला जायचा संकल्प बराच तग धरून होता. माझी लेकही नेटाने gym ला जात होती, पद्धतशीर व्यायाम करत होती आणि डायटही फॉलो करत होती. आणि त्याचा सुडौल परिणामही दिसून येत होता. आणि त्यामुळे माझ्या gym ला जाण्यावर तिचं विशेष लक्ष होतं.

माझीही ताकत आणि वजनं उचलायची capacity वाढत चालली होती. लेकीच्या आग्रहामुळे आणि सुचनांमुळे वजनं उचलण्याच्या पहिल्या सेटनंतर मी आवर्जून पुढचा सेट जास्त वजनांचा घेत होतो. I was becoming pretty good at this.

आजही gym मध्ये छान लय मिळाली होती. आज gym मध्ये कोणी एक साठीच्या आजूबाजूच्या वयाचे काका नवीनच दिसत होते. शरीरात stiffness होता आणि dumb bells घेऊन त्यांना जमेल तसं, झेपेल तसं ते front raise, hammer curl वगैरे करत होते.

माझे घाम गाळणं चालू होतं आणि ते काका माझ्याकडे कौतुकानं बघत होते. मी squats मारत असताना, ते अगदी थांबून लक्षपूर्वक पाहत होते. माझे leg press करून झाल्यावर त्यांना राहवेना. ते मुद्दाम माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले, “व्वा, फारच छान करता हो तुम्ही. “

माझ्या शरीरावर मूठभर मांस चढले. मी हळूच तिरक्या नजरेने gym मधले आणखी कोणी या कौतुकसोहळ्याचे साक्षीदार आहेत का बघून घेतलं.

“फक्त, squats करताना तुम्ही खाली जाताना जोरात खाली जाता, तसं करू नका. आणि वर येताना spring action ने वर येता, तसंही करू नका. भार खांद्यांवर आणि गुडघ्यांवर नकोय, hip joint आणि मांड्यांवर हवा आहे. आणि त्या टाचा उचलल्या जातात, तेवढ्या सांभाळा, बरं का !”

“Leg press लासुद्धा तुमचा angle बदलायला हवा आहे. आणि वजन पुढे ढकलताना पाय गुडघ्यातून सरळ करत आहात तुम्ही, तेही टाळा. “

माझा तोंडाचा वासलेला “आ” तसाच राहिला होता. ते काका त्यांच्या पुढच्या gym routine कडे वळले आणि मी आमच्या gym trainer ला – राजू सरांना गाठलं.

“राजू सर, हे नवे काका कोण ?” माझी पृच्छा.

राजू सरांनी कानाच्या पाळ्यांना हात लावला, जीभ चावली आणि म्हणाले – “सर, चैनी सरांचं नाव ऐकलं आहेत का तुम्ही ? नातीचा वाढदिवस आहे म्हणून चार दिवस आले आहेत इथं चिंचवडला.

Weight lifting चे नॅशनल लेव्हल चॅम्पियन होते ते. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत मेडल्स मिळवली आहेत त्यांनी. ७३ वर्षांचे आहेत, पण फिटनेस बघा त्यांचा.

एअर फोर्स मध्ये होते. आता बदलापूरला स्वतःचं gym आहे. Weight lifting, power lifting साठी मुलं तयार करतात ते. पुढच्याच आठवड्यात त्यांचे दोन विद्यार्थी रोमानियात स्पर्धेत भाग घ्यायला चालले आहेत. त्यांच्या अनेक शिष्यांनीही एशियाड, कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये यश मिळवलं आहे. “

माझा तोंडाचा वासलेला “आ” अजूनही तसाच राहिला होता.

— —

भीमाच्या ताकदीचे, पुन्हा एकदा, पार गर्वहरण झालं होतं.

(ताजा कलम : निवृत्त ज्युनियर वॉरंट ऑफिसर, श्री हेरंब चैनी, वायू सेना यांचा या मे महिन्यात (२०२६) लवकरच माननीय संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते दिल्लीला सत्कार होणार आहे.)

– लेख दुसरा

© डॉ मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पाणी…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “पाणी…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी

सकाळी बागेत चालायला गेले होते. नेहमीचा ग्रुप बसला होता. सगळ्याजणी पासष्ठ ते पंच्याहत्तरीच्या आहेत. एक, दोन राउंड घेऊन थोडा वेळ गप्पा मारत बसतात. संगीताचा खणखणीत आवाज लांबुनच कानी आला…

” इतकं गुण्यागोविंदानी शांततेत सगळं जग चाललं होतं तर… मी म्हणते कशाला भांडणं उकरून काढायची? “

” हो ग खरचं त्या ट्रम्पला युद्ध करायची काय गरज होती ?”

जया म्हणाली,

 ” त्यांचही काहीतरी कारण असेल ना?त्याशिवाय का कोणी युद्ध करेल.. ?

आज यांचा वेगळाच विषय ऐकून राऊंड न घेता मी तिकडेच गेले विचारलं,

” आज काय इराण अमेरिका विषय का?” 

” सध्याचा तोच ज्वलंत प्रश्न आहे. म्हणूनच आज आम्ही त्याची चर्चा करत आहोत. ये.. “

मी त्यांच्या गप्पा ऐकायला बसले.

” माझ तर ठाम मत आहे.. ट्रम्प यांच चुकलंच… “

” म्हणजे तू इराणची बाजू घेणार आहेस का? “

“खरं म्हणजे मी तटस्थ भूमिकेत आहे. (हीच मत कोण विचारणार आहे देव जाणे… मनात म्हटलं..) माझं म्हणणं इतकंच आहे की युद्धानंतर होणारे भयानक विनाशकारी परिणाम विचारात घ्या. “

सुधाताई मध्येच म्हणाल्या,

“एकेकांना पट्ट्या मारून सरळ केलं पाहिजे”

” अहो पट्ट्या कसल्या मारताय ?ती काय शाळा आहे का ?मुख्याध्यापिका म्हणून रिटायर्ड होऊन पंधरा वर्षे झाली तुम्हाला.. तरी अजून तीच शिक्षा सांगताय”

 ” तुम्हाला समजलं नाही.. मी प्रतिकात्मक बोलले. ज्याला जी भाषा समजते त्याला तसं उत्तर दिलं तरच त्याला ते समजते. “

मध्येच विनया म्हणाली,

” पंचमहाभूतातील जल आणि ही चराचर सृष्टी, ईश्वरानी सर्वांसाठी निर्माण केलेली आहे. अशा सखोल अध्यात्मिक विचारांची आपल्यासारखी त्यांना बैठक नाही. तिथे जाऊन कोणीतरी त्यांना हे शिकवायला पाहिजे. “

” हो ते पण खरं आहे. तुझं हे म्हणणं मात्र मला अगदी पटलं.. म्हणूनच शांततेत समाधान आहे.. हे त्यांना कळत नाही.

” मला तर वाटतं त्या होर्मुझ का काय सामुद्रधुनीतून जहाजांनी एकमेकांना वाट करून द्यायची. जरा कडेकडेनी जायचं.. जा बाबा तुम्ही जा.. आम्ही पण जातो. कोणी कोणत्या दिवशी जायचं आपापसात चर्चा करून ठरवून घ्यायचं. त्यासाठी युद्ध कशाला?”

“बरोबर आहे.. आणि एखादी गोष्ट करायचीच अस मनानी ठरवलं तर ती करता येते. “

” हो… आता रोजचच ऊदाहरण घे.. पुण्यात कसं आम्ही छोट्या गल्लीत.. कार, टेम्पो, रिक्षा, स्कूटर, शिवाय कडेला भाजीवाले, भेळ पाणीपुरीवाले असले तरी त्यातून वाट काढत जातो. “

निशा लगेच म्हणाली,

” याचं कसलं कौतुक.. तुम्ही पुणेकर कशाचाही अभिमान बाळगता. “

” निशा.. तुम्ही सोलापूरकर तर काही बोलूच नका. इतक्या वर्षात तुम्हाला तुमचा पाणी प्रश्न सोडवता आलेला नाही. पाच दिवसांनी तुमच्याकडे पाणी येतय”

विनिता म्हणाली,

” हो म्हणूनच तर पुढची पिढी पुण्यात राहायला येत आहे. “

” त्यांच्यामुळे इथल्या जागेचे भाव वाढले आहेत. पुढे या सर्वांना पाणी कसं पुरणार हीच चिंता आम्हाला आहे. “

आता यांची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवरून एकदम जिल्हास्तरीयवर आली.

निशा म्हणाली,

” आमच्या सोलापूरची शेंगा चटणी, कडक भाकरी, हुरडा तुम्हाला आवडतो. “

“अग पण त्याचा इथे काय संबंध?”

खरंतर कशाचाच.. कुणाचाही.. कसलाच.. संबंध नव्हता. या मैत्रिणी बागेत येतात. येऊन कुठलीही मतं मांडतात. घरी त्यांचं कोणी… ऐकत नाही. आणि यांच्याशी बोलायला घरी कुणाला वेळही नाही.

 इथं कसं मैत्रिणींशी काहीही बोलता येतं. वाट्टेल ती मतं मांडता येतात.

आपण सगळ्या विषयावर कसं बोलू शकतो असं… ऊगीच आपल मनाचं समाधान करून घेता येत… या सहज आनंदासाठी… खरंतर सगळ्याजणी इथे जमतात.

स्वाती इतका वेळ गप्प होती. ती एकदम उभीच राहिली. म्हणाली, “अगं आज संध्याकाळी मी कैरीची डाळ करून आणायचं ठरल आहे ना? ती भिजत घालायची आहे. आत्ता पाण्यात घातली तरच ती चांगली भिजेल. “

आता पाण्याची चर्चा एकदम वैयक्तिक पातळीवर आली.

 सगळ्या भानावर आल्या.

“हो ग पाच-सहा तास तरी भिजली पाहिजे “… असं एकजण म्हणाली

मी स्वातीला विचारले,

“कैरीची डाळ घेऊन कुठे जाणार आहेस?”

” अगं अनुकडे.. तिचे मिस्टर बेड रिडन आहेत. ती बाहेर जाऊ शकत नाही. म्हणून आम्ही चार पाच जणी अधून मधून तिच्याकडे जातो. गप्पा मारतो. तिचा दिवस चांगला जातो. “

संगीता म्हणाली,

” मी गोड करंज्या नेणार आहे. ती विचारत असते मी काय करू? वय झालं.. दमते ग.. बिचारी… म्हणून तिला सांगितल आहे.. तू फक्त पाणी दे. “

” आमची अगदी वाट पाहत असते.. चला निघू या”

” ए सोलापूरकर गुडघे दुखतात ना.. चालत जाऊ नको. मी गाडीवर सोडते तुला घरी. “

 दोघींनी तिचा हात धरला. सगळ्याजणी घरी निघाल्या.

खरचं मनात सामंजस्य, प्रेम, माया आपुलकी, आपलेपणा असला की अनेक प्रश्न सोडवता येतात…

ट्रंप साहेबांनी खरतर आमच्या मैत्रिणींशी बोलून त्यांचा सल्ला एकदा घेतला पाहिजे.

आंतरराष्ट्रीय चर्चा करता करता सहजपणे रोजच्या जीवनातले प्रश्न सोडवणाऱ्या…

हातात हात घालून एकमेकींना आधार देत… घरी निघालेल्या या मैत्रिणींची मैत्री बघून माझ्या डोळ्यात आपोआप आलं… पाणी…

©  नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वटसावित्री! ☆ तृप्ती कुलकर्णी ☆

तृप्ती कुलकर्णी

🪷 मनमंजुषेतून 🪷

☆ वटसावित्री! ☆ तृप्ती कुलकर्णी

मानवी तृष्णेची तहान शमवणारी कथा.

अनादी कालापासून माणसाला मृत्यूबद्दलचे भय आणि आकर्षण दोन्हीही वाटत आले आहे. या भयावर मात करण्यासाठी त्याने सतत नाना प्रकारच्या युक्त्या शोधण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. तथापि मृत्यूचे वास्तव हे या सगळ्याला कायमच आव्हान देत आले आहे. या आव्हानाला उत्तमरीत्या प्रतिसाद देणारी कथा म्हणजे वटसावित्रीची कथा. त्यामुळे या कथेतल्या सावित्रीबद्दल, तिने मागितलेल्या वरांबद्दल आणि एकूणच यमाबद्दल एक उत्सुकता मनात निर्माण झाली. त्या उत्सुकतेतून ही कथा पुन्हा पुन्हा वाचण्याचा मोह झाला. आणि प्रत्येक वेळी त्याच्यात काय नवीन सापडते हे स्वतःशीच पडताळण्याचा प्रयत्न झाला. त्यातून गवसत गेलेल्या काही गोष्टी.

काही कथा काल्पनिक का खऱ्या या वादाच्या पलीकडे असतात. त्यांचं मूल्य कथा म्हणून स्वतःला सिद्ध करणं हे नसून त्यामध्ये सांगितल्या गेलेल्या गोष्टीचा विचार दुसऱ्या पर्यंत पोहोचवणं हा महत्त्वाचा असतो असं मला वाटतं. वटसावित्रीची कथा ही यापैकीच एक महत्त्वाची वाटते. याचं कारण या गोष्टीत असणाऱ्या मृत्यूच्या अनेक छटा…

साधारणपणे मृत्यू म्हटलं की आपल्या डोळ्यांपुढे शारीरिक मृत्यू हा चटकन येतो. परंतु मृत्यू हा शरीरापर्यंत पोहोचण्याआधीही अनेक पातळीवर मानसिकदृष्ट्या पोहोचलेला असतो. जसं की राज्य नसणं हा एखाद्या राजासाठी आणि राजकुमार म्हणून गणल्या जाणाऱ्या व्यक्तीसाठी मोठ्या प्रमाणावरती मानसिकदृष्ट्या मृत्यूच असतो. आपले सर्व राजभोग, राज कर्तव्य सोडून एखाद्या वनामध्ये अत्यंत सामान्य पातळीवरील जीवन जगावं लागणं. हा शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि बौद्धिक दृष्ट्या सुद्धा अक्षमता दाखवणारा, मृतवत अवस्था निर्माण करणाराच प्रसंग आहे. एक प्रकारे तो मृत्यूच आहे.

इथे हा राजा अंध दाखवलेला आहे. अंधत्व हे सुद्धा फक्त दृष्टी पूर्ती मर्यादित नसून संकुचित दृष्टी किंवा अज्ञानाची दृष्टी या अर्थाने सुद्धा महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून एखाद्या राजाचं राज्य नष्ट होण्यामागे त्याची संकुचित वृत्ती किंवा त्याचं अज्ञान हे मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असणे ही गोष्ट मान्य करावी लागेल. आणि त्याबाबतीतला अंधत्व हे तर राजाकडे होतं ते अंधत्व दूर करण्याची थोडक्यात त्याबाबतीत ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा, वर सावित्रीने यमाला मागितला. म्हणजे इथे राज्यप्राप्तीसाठीचा राज्य चालवण्यासाठीचा जो दृष्टिकोन, आवश्यक ती क्षमता लागते तिची प्राप्ती ही महत्त्वाची आहे. ती सावित्रीने मिळवली म्हणजे मृत्यूची एक छटा सामर्थ्यहीनता यावर मिळवलेला विजय आहे.

त्यानंतर आपल्या सासू-सासर्‍यांसाठी तिने मागितलेले आणखीन पुत्रांचे वरदान म्हणजे साम्राज्यविस्तारासाठी लागणारे शारीरिक, मानसिक सामर्थ्यशाली जीवांची वृद्धी आहे. ज्या वेळेला सासू-सासरे ज्ञानाने सामर्थ्याने युक्त होतील त्यानंतर त्यांचे होणारे पुत्र हे हे देखील त्याचे प्रतीक असतील. आणि त्यांची जेव्हा वाढ होईल संख्यात्मक दृष्टीने गुणात्मक दृष्ट्या तेव्हा ते साम्राज्य विस्तार पावेल यात शंकाच नाही. म्हणजे अशा अर्थाने साम्राज्याचा संकुचिकरण होण्याचा किंवा पुन्हा ते हातून न जाऊ देण्याचा विजय हा देखील तिने मागितला.

आणि सरते शेवटी स्वतःला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मागून ते साध्य करण्यासाठी प्रत्यक्ष सत्यवानाला पुनर्जन्म मिळाला. यातून सावित्रीने पुन्हा एकदा चैतन्यमय तेजस्वी आनंददायी आणि धर्माधिष्ठित जीवनाची निवड केली. ज्या वेळेला राजा तसे पुत्र हे सर्व धर्माधिष्ठित जीवन जगतील त्यावेळेला ते  राज्य तेथील, वातावरण, तेथील इतरेजन यांचे जीवन देखील  सर्वच दृष्ट्या उन्नत ठरणारे असेल. थोडक्यात एका वरातून सावित्रीने संपूर्ण राज्याची तेही सामर्थ्यवान आणि नीतीवान राज्याची  पायाभरणी केली.

हा सर्व प्रसंग वटवृक्षाच्या झाडाखाली झाला म्हणून आज वटवृक्षाचे महत्व. परंतु वटवृक्षाचे आधीच पुराणातही पुष्कळ महत्त्व आहे. मुळात हा वृक्ष आपल्या पारंब्यातूनही पुन्हा नवनिर्मितीची क्षमता धारण करतो. म्हणजे या वृक्षातच मुळात अजेय राहण्याची वृत्ती आहे. विस्ताराचा ध्यास आहे. आणि अनेकांना आश्रय देण्याची क्षमताही आहे. थोडक्यात एखाद्या राजाला किंवा एखाद्या मनुष्याला ज्याप्रमाणे आपल्या वंश विस्ताराची किंवा साम्राज्यवाढीची इच्छा असते तशीच काहीशी इच्छा धारण करणारा वृक्ष आहे. असे सगळे साधर्म्य साधणारे योग या कथेत जुळून आले आहेत.

त्यामुळे सर्वच प्रकारच्या मृत्यूवर विजय प्राप्त करण्यासाठीच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची  प्रगाढ ज्ञानाची आणि विश्वासाची ही कथा आहे असं मला वाटते. जे लोक अधिक अभ्यासक आणि जाणकार असतील ते आणखीनही शोधतील. पण एकंदरी कथा मानवी तृष्णेची तहान शमवणारी आहे यात शंका नाही.

© तृप्ती कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भीमाचे गर्वहरण… लेख पहिला  ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

??

☆ भीमाचे गर्वहरण… लेख पहिला  ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

कौरवांच्या नाशानंतर, असे म्हणतात, की एकदा भीमाला आपणच जगात सगळ्यात बलशाली आहोत असा गर्व झाला. मग मारुतराया वृद्ध वानराच्या रुपात आला, माझी शेपूट हलवून बाजूला कर म्हणाला आणि भीमाचे गर्वहरण केले.

— —

मी एकदा सोलापूर रस्त्याने संत श्री नारायण महाराजांच्या केडगाव बेटातून चिंचवडला इनोव्हा गाडीतून एकटाच परत येत होतो.

संध्याकाळी ६ चा सुमार होता. हायवेला भांडगावच्या सोनाक्षी मंगल कार्यालयातले लग्नकार्य आटोपत आले होते. कार्यालयाच्या दारात “बुढ्ढीके बाल” विकणारा पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांना लिफ्टसाठी हात करत उभा होता. in न केलेला काळा पिवळा चौकडीचा हाफ शर्ट, पायात साध्याशा चपला, खांद्यावरच्या दांडीला ५-१५ बुढ्ढीके बाल च्या पिशव्या लटकवलेल्या, खांद्याला रिकामीशी शबनम छाप झोळी.

म्हटलं आज याला AC गाडीतून lift द्यावी. हा तरी कधी गाडीत बसणार? त्याच्यासाठी गाडी थांबवल्याचे त्याला आश्चर्य वाटले. तो गाडीत बसला व माझी बडबड सुरू झाली. त्याचं नाव बबलू आणि तो हडपसरला भाड्याने रहात होता.

“ काय काय विकता?”

“बुढ्ढी के बाल, साबणाचे बुडबुडे व साधे मोठे फुगे.”

“दिवसाला किती बुढ्ढीके बाल विकले जातात?”

“तीन एकशे. पाच रुपयाला एक.”

“ते कसे बनवतात?”

– – मग बबलूने ती process सांगितली. २ किलो साखरेतून तीनशे पिशव्या बनतात. वगैरे वगैरे.

२ किलो साखर म्हणजे फारतर १०० रुपये आणि या पिशव्या विकून त्याला १५०० रुपये मिळत होते. म्हणजे १४०० रुपये नफा.. दिवसाला. म्हणजे महिन्याला??? माझ्या डोक्यात आकडेमोड वेगाने सुरू झाली.

“आणि बुडबुडे व फुगे कुठेत? ”

“संपले. ”

– – त्यांच्यातही कमीतकमी १००% नफा होता. बबलूच्या दिवसाच्या नफ्याचा आकडा माझ्या कल्पेनेपेक्षा खूपच मोठा होत चालला होता.

“इथे कसे काय? ”

“लग्न असलं की विक्री चांगली होते. पुण्यापासून (१०० किलोमीटर दूर असलेल्या) इंदापूरपर्यंतच्या सर्व मंगल कार्यालयांच्या मॅनेजरशी माझे कॉंट्रॅक्ट आहे. मी फोननुसार विक्रीला आलो की मॅनेजरला १०० रुपये द्यायचे. …” – उन्हाने रापलेला, साधासा दिसणारा पण दिवसाकाठी किमान २-३००० रुपये नफा करणारा बबलू सांगत होता.

“पण इतक्या सर्वांशी कॉंट्रॅक्ट करून काय उपयोग? तुम्ही तर एकाच ठिकाणी जाऊ शकता. ” – माझा चाणाक्ष सवाल.

“ मुलं ठेवली आहेत ना…”. त्याचं शांत उत्तर…..

“ गावचीच १८-२० मुलं आहेत. २ खोल्या भाड्याने घेतल्या आहेत. मेहुणा मार्केटिंग करून raw material आणतो. मी सगळ्यांसाठी बुढ्ढीके बाल बनवतो. मुलांना महिना १०-१२, ००० पगार देतो… ”

मला यातून दोनच आकडे डोळ्यांसमोर नाचत होते. हा माणूस महिना २ लाख रुपये पगार वाटतो. आणि रहाणं, खाणं, पिणं वगळता प्रत्येक मुलामागे महिना ७०-८०, ००० रुपयांचा नफा कमावतो. अशी १८-२० मुलं. म्हणजे स्वत:सकट महिन्याला याचा निव्वळ नफा लाख्खो रुपयांच्यावर जातो.

“दिल्लीजवळ ७० किलोमीटरवर मीरतला रहातो. तुमच्यासारख्यांच्या आशिर्वादाने तीन मजली इमारत आहे, ४ गाड्या आहेत… ” बबलू सांगत होता, आणि मी तोंड उघडे टाकून गाडी चालवत होतो.

— —

या प्रवासाच्या दुसऱ्या दिवशी मी व बायको म्हात्रे पुलाजवळ dp road वर एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. शेजारीच एक मंगल कार्यालय होतं. दारात एक मुलगा बुढ्ढीके बाल विकत उभा होता.

मी त्याच्याजवळ गेलो, विचारलं, “कुठे रहातोस? ”

तो म्हणाला : “ हडपसरला. ”

“बबलूकडे का? ”

तो चकित. ‘हो’ म्हणाला.

“त्याला सांग काल तो ज्या गाडीने आला त्याचा “ड्रायव्हर” भेटला होता. ”

भीमाच्या ताकदीचे पार गर्वहरण झालं होतं.

– लेख पहिला 

© डॉ मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “अशीही एक वटपौर्णिमा…” ☆ मुक्ता महेश अभ्यंकर ☆

मुक्ता महेश अभ्यंकर

??

“अशीही एक वटपौर्णिमा☆ मुक्ता महेश अभ्यंकर ☆

हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते.

माझ्या लग्नानंतर आम्ही पवना नगरला राहत होतो तेव्हा माझी लग्नानंतरची वटपौर्णिमा होती. अगदी मराठी सिनेमात दाखवतात तशी मी आठ दहा सुवासिनीं बरोबर वडाची पूजा केली होती.

त्या नंतरच्या वर्षी माहेरी वटपौर्णिमेला जायचा योग आला. नुकत्याच लग्न झालेल्या माझ्या मैत्रिणी बरोबर गणपती मंदिरात वडाची पूजा करायला गेले.

मंदिरात पूजेसाठी खूप बायका आल्या होत्या. मंदिरा बाहेर पाच फळांचा वाटा घेऊन विक्रेते व फुलवाले बसले होते.

मंदिराच्या आत पूजेसाठी खूप सारे गुरुजी होते.

मंदिराच्या परिसरातील वडाच्या झाडाभोवताली भरजरी साड्या नेसून असतील तेवढे दागिने घालून सुवासिनींनी गर्दी केली होती.

काही सुवासिनी गुरुजींच्या सल्ल्याप्रमाणे पूजा करत होत्या. नंतर नंतर वडाभोवती पांढरा धागा गुंडाळायला गोंधळ उडाला. आपला धागा कुठला हे ही कळेनासे झाले होते. हातात येईल तो धागा बायका वडा भोवतली गुंडाळून कशीबशी प्रदक्षिणा पूर्ण करत होते. पूजेसाठी इतकी गर्दी झाली की नंतर नंतर मोठ्या रांगा कराव्या लागल्या व फावल्या वेळेत बायकांच्या गप्पा सुरू झाल्या.

त्या मोकळ्या वेळेत बायका आपल्या घरच्यांबद्दल बोलू लागल्या. खूप जणी घरात होणाऱ्या मतभेदांबद्दल सांगत होत्या. त्यातील काही जणी आपल्या सासरी होणाऱ्या त्रासा बद्दल सांगत होत्या.

काही जणींना आपल्या पती कडून योग्य मान ही मिळत नव्हता तरीही त्या पूजेसाठी आल्या होत्या. एक जन्म ही ज्याच्या बरोबर सुखाने राहू शकत नाही त्याच्या बरोबर सात जन्माची सोबत मिळण्याची पूजा करायला आल्या होत्या. सुवासिनी एकमेकांना जी फळे देत होत्या ती फळे खूप कोवळी आणि खाण्यालायक ही नव्हती.

पूर्वीच्या काळी स्त्रियांना घराबाहेर जायला मिळायचे नाही पुजेच्या निमित्ताने बाहेर जाऊन लोकांना भेटणे ह्या उद्देशाने सण वार साजरे करण्यात यायचे.

हल्ली पण वडाची फांदी तोडून सुवासिनी एकत्र जमून पूजा करतात तर काही वडाचे रोप लावून वटपौर्णिमा साजरा करतात. पण आता त्याच्या कडे एक इव्हेंट म्हणून बघितले जाते. रिल्स बनवणे स्टेट्स सारा दिखावा.

खरं तर नवरा-बायकोचे नाते विश्वास, आदर, प्रेम आणि मैत्री या पायावर आधारित असावे. दोघांनीही एकमेकांच्या भावना समजून घेऊन, सुख-दुःखात एकमेकांना खंबीरपणे साथ देणे हे एक सुखी वैवाहिक आयुष्याचे गमक आहे. असे झाले तर खरी वटपौर्णिमा साजरी झाली असे म्हणता येईल असे मला वाटते.

©  मुक्ता महेश अभ्यंकर

साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी , कोंढवा पुणे

संपर्क :  सन युनिव्हर्स फेज २, एम ५०३, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे, पुणे.

फोन   : ७५०६२४३०५०

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पान खाये सैया हमारो…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “पान खाये सैया हमारो…” ☆ श्री सुधीर करंदीकर

विड्याचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणानंतर पान खाल्ल्याने तोंडाची चव वाढते. पान खाल्ल्याने तोंडातील अनेक जीवाणूंचा प्रभावीपणे सामना केला जातो ज्यामुळे तोंडाला दुर्गंध येत नाही. तसेच दात पोकळी, दात किडणे यांचा त्रास कमी होतो. जेवणानंतर पानाचा विडा किंवा नुसते पान चावून खाल्ल्याने आतड्या निरोगी राहतात. आरोग्यासोबतच ते सौंदर्य वाढवण्यातही फायदेशीर ठरते.

देशातच काय तर आता विदेशात देखील विड्याचे पान मोठ्या आवडीने खाल्ले जाते. प्राचीन काळापासून भारतात जेवणानंतर पान खाण्याची परंपरा आहे. मात्र, पान खाणं ही सवय चांगली नाही, यामुळे दात खराब होतात, असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे.

मुळात विड्याचे पान खाणे ही चुकीची सवय नसून पान खाल्ल्याने अनेक आजारांपासून आपली सुटका होते. यात प्रामुख्याने सर्दी, खोकला, फुफ्फुसांशी संबधी आजार दूर होतात आणि अनेक लाभ मिळतात.

विड्याच्या पानांची चव ही तिखट स्वरूपाची असते. परंतु यामध्ये कॅल्शियम (Calcium), प्रोटीन (protein), खनिज (Minerals), कार्बोहायड्रेट (carbohydrate), फायबर (Fiber), व्हिटॅमिन सी (vitamin C) भरपूर प्रमाणात असतात. जे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे आणि अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.

(conditions apply – पानामधे तंबाखू, गुटखा असे प्रकार टाकू नयेत)

पान खाण्याचे फायदे व त्यापासून मिळणारी पोषक तत्वे या विषयावर जो रिसर्च झालेला आहे तो असे दाखवतो की विड्याचे पान जर बायकोने तयार केले असेल तरच त्याच्यातली सर्व पोषक तत्वे जागृत होतात आणि त्याचा फायदा खाणाऱ्याला पूर्णपणे मिळतो.

इतर कोणी पान तयार केले असेल तर फक्त दिखाऊ फायदा होतो, म्हणजे ओठांना आणि जिभेला लाली येते एवढाच पान खाण्याचा फायदा त्यांना होतो.

म्हणून शक्यतोवर बायकोने केलेले पान खाण्यावरच भर असू द्यावा हेच रिसर्च सांगते.

एखादा महिना वर सांगितल्याप्रमाणे पान खाऊन बघा आणि अनुभव कळवा.

भाग २ —

बऱ्याच जणांचे मला यावर मेसेज आले /फोन आले, की आम्हाला हे फायदे नक्कीच मिळवायचे आहेत, पण बायकोने तयार केलेले पान रोज कसे मिळवावे, हा मोठा प्रश्न आहे, काय करता येईल?

उत्तर खूप सोपे आहे – बायकोला कायम खुश ठेवा.

बायकोला कायम खुश कसे ठेवावे याकरता – मला आनंदी राहायचे आहे, काय करू? , हा माझा लेख जरूर वाचा.

काही लेडीज नी असा प्रश्न विचारला, की विड्याच्या पानाचे फायदे मिळवण्याकरता पुरुषांनी बायकोने केलेले पान खावे असे तुम्ही लिहिले आहे. पण मग विड्याच्या पानाचे फायदे मिळवण्याकरता आम्ही बायकांनी कुणी केलेले पान खावे!

यावर उत्तर असे आहे, की कुणीही तयार केलेले पान स्त्रियांनी खाल्ले तरी त्यांना त्याचे सगळे फायदे मिळतातच. कारण पानामध्ये असलेली सर्व पोषक तत्वे जागृत करण्याची किमया देवाने जशी बायकोच्या हातात दिलेली आहे, तशीच किमया सर्व स्त्रियांच्या तोंडात पण दिलेली आहेत. बघा ना, स्त्रियांच्या आवाजात कायम गोडी असते आणि बोलण्यात कायम प्रेम असतं.

त्यामुळे स्त्रियांकरता पान कुणी केले आहे हे महत्त्वाचे नसून, त्यांनी रोज पान खाणे हेच महत्त्वाचे आहे.

टीप : आमच्या बागेत विड्याच्या पानांचा वेल आहे. त्यामुळे मी रोज बायकोनी तयार केलेले पान खातो. आणि बायको पण स्वतः केलेले पान खाते)

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares