डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “गाडी जोरात पळवायची असेल तर…” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
एका तत्ववेत्त्याने समोर बसलेल्या लोकांना प्रश्न विचारला, ‘ गाडी जोरात पळवायची असेल, फास्ट जायचं असेल तर गाडीला काय असणे गरजेचे आहे…? ‘
एक मुखाने सर्वांनी उत्तर दिलं, ‘ गाडी जोरात पळवायची असेल तर गाडीला ऍक्सिलेटर असणं गरजेचं आहे…! ‘
सर्वांना विचारून झाल्यानंतर हे महोदय हसत म्हणाले, ‘ गाडी जोरात पळवायची असेल, तर गाडीला सर्वप्रथम ब्रेक असणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या गाडीला ब्रेक नाही त्या गाडीत तुम्ही बसाल का? तिला चालवायची हिम्मत कराल का? गाडी चालवताना कुठे आणि कधी ब्रेक मारून थांबायचं, हे जर समजलंच नाही तर अपघात ठरलेला..’
किती मोठी गोष्ट यांनी सोप्या भाषेत सांगितली…
आयुष्याचंही असंच नाही का?
आयुष्यात किती जोरात धावायचं…. यापेक्षा कोणत्या दिशेने जायचं आणि नेमकं कुठं थांबायचं… कुठे ब्रेक मारायचा हे कळणं जास्त महत्त्वाचं….!
पुढे पुढे जायचं असेल तर योग्य ठिकाणी ब्रेक मारता यायला हवा, हेच आयुष्याचं अंतिम सत्य….
असो, ज्यांच्या आयुष्याला कायमचा ब्रेक लागला आहे.. ज्यांची गाडीच पुढे जात नाही, अशांसाठी आपल्या मदतीमधून त्यांना केलेल्या मदतीचा हा लेखाजोखा…
ऑगस्ट महिना प्रचंड गडबडीत गेला…
ट्रेनिंग सेंटर मध्ये तयार होणारे लिक्विड वॉश, गिफ्ट आर्टिकल, आणखीही विविध वस्तू विक्री करणे, बाहेरगावच्या ऑर्डर घेणे, त्यांनी सांगितलेले पत्ते टाईप करणे, प्रिंट काढणे, पाकिटे तयार करणे आणि कुरिअर करणे…
या सर्व कामांसाठी आमच्याकडे कोणीही माणूस नाही, ही सर्व कामे मला आणि मनीषालाच करावी लागतात.
15 ऑगस्ट रोजी विविध संस्थांनी झेंडावंदनासाठी बोलावले होते, इथे झालेल्या छोटेखानी भाषणात ‘ भीक मागणाऱ्या लोकांना भीक देऊ नका, त्यांनी तयार केलेल्या वस्तू विकत घेऊन त्यांना स्वावलंबी बनवा,’ असे सांगून सर्व ठिकाणी प्रॉडक्ट दाखवत हिंडलो….
त्यात गणपती आले, आणि या उत्सवासाठी लागणाऱ्या विविध वस्तू आपल्या लोकांनी तयार केल्या.
‘आपल्या मंडळासमोर आम्हाला विक्रीसाठी एक स्टॉल द्या’ असे गणेश मंडळांना आवाहन केले…
अनेक गणेश मंडळांनी आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला….
खरंतर याची मूळ कल्पना, ‘मुरुडकर झेंडेवाले’ चे करता-करविता श्री गिरीश मुरुडकर सर यांची, मी ऋणी आहे त्यांचा!
मग आमच्या ह्या दिव्यांग आणि वृद्ध लोकांना अशा विविध मंडळांकडे रोज घेऊन जाणे, आणून सोडणे, रोजच्या रोज विक्रीचे सामान पोहोचवून देणे, हिशोब ठेवणे, त्यांना गर्दीत काही होऊ नये याची काळजी घेणे…
आमची प्रचंड दमछाक झाली…!
आज आत्ता हा लेखाजोखा लिहिताना रात्र संपून पहाटेचे पाच कधी वाजून गेलेत कळलं नाही….!
.. हरकत नाही, यावर्षीच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अनेक भिक्षेकऱ्यांना, माणूस म्हणून स्वातंत्र्य मिळाले, यातच आनंद आहे…!
” भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी ” ही डोळ्यासमोर घडणारी प्रोसेस पाहून जो आनंद होतो, तो वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत.
…… ‘ सुरवंटाचं फुलपाखरू होणं,’ ही प्रोसेस आम्ही शब्दशः बघतो आणि जगतो सुद्धा…!
रक्षाबंधनाच्या दिवशी आणि त्यानंतर सुद्धा अनेक दिवस जिथे भेटू तिथे रस्त्यावर आमचे रक्षाबंधन पुढे अनेक दिवस चालूच होते…
…. कुणी सुतळी बांधली, कुणी दोरा, तर कुणी चिंधी…
दोन्ही हात भरून जायचे… आणि मनही…!
बाजारात मिळते तशी एकही आकर्षक राखी माझ्या दोन्ही हातांवर नव्हती… पण वरवर ओबडधोबड दिसणाऱ्या, अनेक सुरकुतलेल्या हातांनी माझ्या लोकांनी बांधलेल्या या राख्या जगातल्या सर्वात सुंदर राख्या होत्या…!
…. ‘काय ओवाळणी देऊ मी तुम्हाला?’ मी विचारलं, तेव्हा एक आजी कमरेवर हात ठेवून टेचात म्हणाली, ‘काय देशील तू बोल?’
यावर खरंतर मी निरुत्तर झालो… यांना द्यायला माझ्याकडे आहेच काय…???
जे काही देतो आहे ते समाज…. म्हणजे आपण सर्व…!!! मी फक्त पोहोचवण्याचे काम करतो आहे…
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर, आपल्या सर्वांच्या माध्यमातून तीन ताईंना व्यवसाय सुरू करून दिला… चार मुलींच्या थकलेल्या फिया भरून झाल्या…
… रक्षाबंधन खऱ्या अर्थाने साजरे झाले…!
या सर्वांबरोबरच रस्त्यावर वैद्यकीय तपासणी, हॉस्पिटलमध्ये रुग्ण ऍडमिट करणे, हॉस्पिटलमधील गोरगरीब रुग्णांना जेवणाचे डबे देणे, दिव्यांग व्यक्तींना कुबड्या – काठ्या तथा इतर वैद्यकीय साधने देणे, डोळ्यांच्या तपासणी करून डोळ्यांचे ऑपरेशन करणे, खराटा फलटणच्या माध्यमातून रस्त्यावर झाड लोट करणाऱ्या मंडळींना किराणा देणे, या आणि अशा अनेक बाबी सुरूच होत्या…!
आपल्या सर्वांच्या साथीने हे सुरू केलं आहे माऊली.. माझा प्रणाम स्वीकार करावा.
आपले स्नेहांकित,
डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : abhisoham17@gmail.com,
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈














