मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कशाला पाडता कीस…! ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ कशाला पाडता कीस…! ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

(एक सत्यघटना) 

भाजीवाल्याशी घासाघीस??? कशाला पाडता कीस..!

स्थळ : पुण्यातील नवी पेठ विठ्ठल मंदिराशेजारचा भाजीवाला, ज्याच्याकडे फुलाचे हार, नारळ, फळेही असतात 

दिनांक : 16 ऑगस्ट 2025 

वेळ : सकाळी नऊची 

घटना : एक गृहस्थ तिथं हार घ्यायला आलेला….

गृहस्थ : हा हार कितीला दिला?

दुकानदार : पन्नास रुपये 

गृहस्थ : काहीही काय? लुटू नका असं… नीट भाव करून द्या 

दुकानदार : मी कशाला लुटू साहेब? योग्य तोच भाव लावलाय 

गृहस्थ : मला काय बाजारभाव माहित नाही का? मार्केट यार्ड मंडईत हाच हार तीस रुपयाला आहे….

(अशी वादावादी सुरु असतानाच तिथं दुसरा एक हेल्मेट घातलेला गृहस्थ येतो)

हेल्मेटवाला : भाजीवाले काका, कांदे अर्धा किलो द्या 

(कांदे घेऊन पैसे देऊन तो निघाला तरी त्या गृहस्थाची घासाघीस सुरूच होती. शेवटी न राहवून त्या हेलमेटवल्याने त्या गृहस्थांना विचारले…)

“नाव काय हो तुमचे? ”

“माधव पाटील…. काय करायचं तुम्हाला?

हेल्मेटवाला : “नाही…. मला काही नाही करायचं पण बोलताना नाव घेऊन बोलायचं होत म्हणून विचारलं!

तर माधवराव…. मंडईत हार तीसला मिळतो, हे मान्य… मग तुम्ही तिथंच का नाही जात घ्यायला? इथं का वाद घालत बसलाय? पण तुम्ही तिकडं जाणार नाही. हे मला माहित आहे. कारण…. तिथं पार्किंगला दहा रुपये मोजावे लागतात, प्लस नव्या पेठेतून मार्केट यार्ड मंडईत जाणार… जायला दहा रुपयाचे आणि यायला दहा रुपयांचे पेट्रोल खर्चणार… मग तो तिसवाला हार तुम्हाला साठ रुपयाला पडणार…

मग त्यापेक्षा इथं घराजवळच तुम्हाला तो पन्नास रुपयाला मिळतोय तर तो महाग का वाटतोय? तो दुकानदार गरीब बिचारा मेहनतीने काम करतोय अन त्याला तुम्ही लुटारू म्हणताय? अहो… खरे लुटारू जिथं आहेत तिथं मात्र तुम्ही काही बोलत नाही. शेपूट घालता ना? ”

(शेपूट म्हटल्यावर माधवराव जाम भडकले)

“ अहो… काही काय बोलताय? ”

हेल्मेटवाला : “खरं बोलल्यावर तर सख्या आईचा पण राग येतो. मी तर परका आहे. पण मुद्दा समजून घ्या. बाहेर वीस रुपायत मिळणारा मका ( कॉर्न) मॉलमध्ये, मल्टिप्लेक्स मध्ये शंभर रुपयाला गपगुमान घेता न? तिथे का नाही घासाघीस करत? का नाही त्यांना लुटारू म्हणत? राहिला प्रश्न किमतीचा… तर या भाजीवाल्याकडे नारळ पन्नासला आहे. तोही तुम्हाला महाग वाटणार… मग कोकणातच जा की… तिथंले लोक प्रेमाने फुकट देतील. फणस पण फुकट देतील…. जा…. घेऊन या? जाणार का? नाही न?

बर्फाचे रंगीत गोळे ( आईस्क्रीम) विकणारा ते वीस पंचवीस रुपयाला देतो. तेही महाग म्हणाल… मग हिमालयात जा की… तिथं बर्फ फुकटच आहे. घरून फक्त एखादी शरबताची बाटली सोबत न्या… झालं काम! जाणार का? नाही न? ”

“ मग तुमचा वेळ वाचवणारा म्हणजेच नकळत पैसे वाचवणारा गल्लीतला भाजीवाला लुटारू कसा? तुम्हाला तो फुलांचा हार पन्नासला घ्यायचा तर घ्या नाहीतर मंडईत जा की सरळ! आमच्याकडे फुलाचा हार घ्या अशी निमंत्रण पत्रिका पाठवलेली का तुम्हाला या भाजीवाल्याने? नाही ना? मग झालं तर! वाद घालत बसू नका. निघा वाटलं तर!! आणि एक लक्षात घ्या…. असं दुसऱ्याचे हक्काचे कष्टाचे दोनपाच रुपये घासाघीस करून घेतलेला हार ज्या देवाला वाहणार आहात… तो देव वरून तुमचं हे सगळं पाहतोय… कसा प्रसन्न होईल तो तरी? त्याच्या दुसऱ्या लेकराला दुखावून तुम्ही देवाला प्रसन्न करायला जाताय… विचार करा…. “

यावर माधवराव थोडे शांत झाले…. चेहरा पण सौम्य झाला आणि त्यांनी खिशातून पन्नासची नोट काढून तो हार घेतला. हे पाहून त्या हेल्मेटवाल्याने आपलं हेल्मेट काढलं…. आणि त्याचा चेहरा पाहताच माधवराव चकित होत म्हणाले….

“अरे साक्षात डीडी… तुम्ही? “

आणि चक्कपैकी मिठी मारली….

आजचीच ही घटना….

*

डॉ. डीडी क्लास : जिथं लुटलं जातंय असं वाटतं तिथं नक्की आवाज उठवला पाहिजे. पण जे लोक श्रीमंत होण्यासाठी नव्हे तर दोन वेळच्या भाकरीसाठी उन्हातान्हात कष्ट करून प्रामाणिकपणे व्यवसाय करत असतात त्यांना कधीही घासाघीस करू नका. तुमच्या त्या दोन पाच रुपये वाचवण्याने तुम्ही काय अंबानी होणार नाहीत. पण घासाघीस नाही केली तर मात्र इतरांच्या मनात घर करून राहाल आणि त्याच्यासाठी तरी तुम्ही नक्कीच अंबानी ठरणार…! मी जेव्हाही कधी या भाजीवाल्याकडे येतो… तेव्हा जितकं तो सांगेल तितकं मी पैसे देतो त्यावेळी निघताना तो स्वतःच… एखाद लिंबू.. एखादा आवळा माझ्या पिशवीत टाकून डोळे मिचकावत म्हणतो… ‘ असू द्या हो…!! माझ्या दुकानात तुम्ही येता हेच भारी आहे. मी पाहतो न तुमचे व्हिडीओ!! ‘ …. मी निशब्द! पण मला तरी हे असे लोक जास्त श्रीमंत वाटतात.

तर मंडळी… पहा विचार करून…. एक माधवराव आज बदलले… असे अनेक माधवराव तुमच्याही अवतीभोवती असतील…. किंवा तुमच्यातच माधवराव दडलेला असेल… तर कृपया त्याला बदला थोडं….. मग पहा जीवनात किती आनंदाचे झरे येतील!! आणि तुम्हाला हे पटलं असेल तर नक्की फॉरवर्ड करा. चांगल्या पोस्ट फॉरवर्ड केल्यास खूप पुण्य लागतं असं गरुडपुराणात सांगितलंय म्हणे.

– – शेवटी काय तर… डीडी क्लास बोले तो लाईफ झक्कास! 

© डॉ. धनंजय देशपांडे  

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हवेत आम्हांला आजी-आजोबा! ☆ श्री सुभाष धारणकर ☆

श्री सुभाष धारणकर

? मनमंजुषेतून ?

हवेत आम्हांला आजी-आजोबा! ☆ श्री सुभाष धारणकर 

मध्यंतरी एकदा लहान मुलांचे मित्र ज्येष्ठ चित्रकार श्री. ल. म. कडू सर यांचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला. त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितलेला अनुभव,

“लहान मुलांना एकदा एका स्पर्धेत मी चित्र काढायला सांगितले. चित्राचा विषय होता आपले घर. मुलांच्या मनातील घराचे चित्र आपापल्या कल्पनेप्रमाणे मुलांनी काढले. एका मुलाने एक छोटे घर काढले पण त्याला एक मोठे कुलूप दाखविले. मला ते चित्र जरा वेगळेच वाटले. माझी उत्सुकता ताणली गेली आणि त्या मुलास मी विचारले. “अरे तू घर एकदम छोटे काढले आणि त्याला भले मोठे कुलूप दाखविलेस. ” तो छोटा निरागस बाळ मला म्हणाला, “सर, माझे घर असेच आहे. माझे आई बाबा सकाळीच बाहेर पडतात. जाताना घराला कुलूप लावून जातात. मला पाळणाघरात सोडतात. संध्याकाळी घरी येताना मला पाळणाघरातून घेतात आणि घराचे सकाळी लावलेले कुलूप काढतात. आम्ही घरात प्रवेश करतो. असे आमचे दिवसा आई बाबा घरी नसलेले सतत कुलूप असलेले घर. ”

… प्रसंग तसा खूप छोटाच. पण मनात घर करून गेला. जाणवले ज्या घरात आजी आजोबा नसतात. त्या घराची जवळजवळ अशीच परिस्थिती असते. आजी आजोबा हेच त्या घराचे घर सांभाळणारे कुलूप. माझे मन त्या मुलाशी समरस होवून विचार करू लागले. घरी आजी आजोबा आहेत असे समजून ते मूल माझ्याशी बोलायला लागले.

आजी – आजोबा हवे असतात. त्यांच्यावर संस्कार करायला, संध्याकाळी श्लोक शिकवायला, झोपताना गोष्टी सांगायला, माया करायला, घरात आजी आजोबा हवेच.
बाबा कामावर जातात. आईपण नोकरी करते, त्यांना वेळ नसतो पण आजी आजोबा मात्र घरी असतात, नातवंडाना सांभाळतात. आई रागावल्यावर आजीच्या पदराखाली आजी घेते आणि काय चुकले ते गोडीने सांगते. बाबांचा धपाटा चुकतो आजोबांच्यामुळे. आजोबा म्हणजे घरातील वरिष्ठ न्यायालयाच.
शाळेतून आल्यावर घर उघडे असते. हसत मुखाने आजी समोर येते. दप्तर जागेवर ठेऊन, हातपाय धुवून जेवायला ये. असा हुकूम देते. आपोआपच ती सवय लागते. मला आजीमुळे शिस्त लागली आहे. माझी प्रकृती चांगली आहे. कारण गरमागरम जेवण आजी वाढते, सगळ्या भाज्या खाण्यास बजावते आणि खायला पण लावते, मुरंबा, सुधारस काहीतरी गोड पण देते. आजी मला सगळ्या भाज्या, कोशिंबिरी खायला लावते. सणाच्या दिवशी उकडीचे मोदक, धिरडी, वाटलीडाळ, पुरणपोळी, गुळाची पोळी, भाजी कुरडई, पापडी आजी आवर्जून करते. आजीच्या हाताला छान चव आहे कारण ते पदार्थ ती प्रेमाने करते. माझे जेवण होईपर्यंत जवळ बसते. जेवायला बसताना वदनी कवळ घेता म्हणायला लावते, जेवण झाल्यावर पान स्वच्छ करून उचलायला लावते. तिला खूप अभंग, ओव्या पाठ आहेत. सकाळी काम करताना आजी ते गुणगुणत असते.

सगळ्या वर्गात माझे वाचन छान आहे, जेवणानंतर आजोबाना पेपर वाचून दाखवण्याचे काम माझे आहे. कारण स्वच्छ, अर्थ समजून आवाजाचे चढ उतार घेऊन कसे वाचायचे ह्याची शिकवणी असते ती. स्वातंत्र्याचा सगळा इतिहास मला आजोबांनी सांगितला आहे. मला वक्तृत्वात नेहेमी नंबर मिळतो. कारण माझे आजोबा. ते तयारी करून घेतात. माझे आजी आजोबा म्हणजे नवं आणि जुनं यांचा संगम आहे. नवीन नवीन पदार्थ खा म्हंटले तर आजोबा चमचाभर तरी खाऊन पाहतात आणि छान आहे म्हणतात. त्यांना वेगवेगळे छंद आहेत. लेख लिहितात, कथा लिहितात. त्या छापुनेही येतात. त्यांना संगीताची, गाण्यांची, वाद्यांची आवड आहे. त्यांना संगणकाचे ज्ञान असल्याने त्याचा मला खूप उपयोग होतो. या वयातील त्यांचे संगकाबद्दल काही नवे शिकण्याची आवड पाहून खूप हेवा वाटतो. माझी आजी तर नवी विजेची उपकरणे सहजगत्या वापरते.

खरंच आजी-आजोबा घरात असणे म्हणजे देवघरात देव असणं. धकाधकीच्या जीवनात या परिवाराचा बॅलन्स डळमळीत होत चालल्याचं खूपदा नाही लक्षात येत! आणि तो बॅलन्स डळमळीत होऊ नये यासाठीच गरज असते आजोबा आजीची. खरं सांगायचं झालं मुलांच्या संगोपनाच्या वेळी प्रत्येक पालकाची ओढाताणच होत असते. प्रपंचातल्या ओढाताणीमुळं आपली मुलं लहान असताना, आपल्याला त्यांचं बालपण एन्जॉय करता येत नाही. म्हणून नातवंडांमधेच आपल्या मुलांचं बालपण पहायचं असतं. हातातून निसटून गेलेले ते निरागस क्षण परत मिळवण्यासाठीची एक सन्धी असते. आपली नातवंडं! नातवंड म्हणजे नको असलेली जबाबदारी नव्हे तर तो आहे म्हातारपणाचा विरंगुळा… 

म्हातारपण हे एक बालपणच आहे. मग तुम्हालाही खरंतर एक सवंगडी मिळत असतो नातवाच्या किंवा नातीच्या रूपात. मग किती छान आहे म्हातारपण…! रिटायर्ड लाईफ एन्जॉय करण्यासाठी मुलाना आणि नातवंडांना दूर ढकलायला पाहिजे असं कुणी सांगितलंय. आता यापुढे तुमच्या नातवंडाला पहाल ना तेव्हा त्याच्यात तुमची मुले पहा… आणि प्रपंचाच्या व्यापात मुलांना जे तुम्हाला देता आलेलं नाही ते नातवंडांना द्या… तुमचा मायेचां स्पर्श द्या.. आपुलकीचा ओलावा द्या… त्याला गोष्टी सांगा… त्याच्यासाठी गाणं म्हणा…त्याचे बरोबर नाचा. अहो… तेच मागे राहणार आहे… तुम्ही हे जग सोडून जाल तेव्हा… आणि हीच संस्कारांची शिदोरी तुमची नातवंडे आयुष्यभर जपणार आहे. नव्हे…. नव्हे… त्या संस्काराच्या शिदोरीवरच त्यांचे आयुष्य उभं राहणार आहे.

मला वाटतं ….

आजी – आजोबांचे प्रेम । त्याला बासुंदीची गोडी । 

त्यांच्या प्रेमासाठी । आम्ही मुलं वेडी

आणि आजीआजोबांना काय वाटतं आमच्या सांगू तुम्हाला?

दुधापेक्षा साय गोड । नातवंडांच्या प्रेमाला I

गात नाही तोड। 

©  श्री सुभाष धारणकर

बिबवेवाडी, पुणे. भ्र. ध्व. ९४२३००२९५४ ध्व. क्र. ०२०-२६९६००६४. ईमेल – address-subhashdharankar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रश्न, प्रश्न, आणि प्रश्न !!! ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

??

☆ प्रश्न, प्रश्न, आणि प्रश्न !!! ☆ श्री जगदीश काबरे ☆

कोण होतास तू काय झालास तू…! 

ना अत्र ना तत्र ना परत्र…. ना भूमी ना आकाश…

समन्वयाच्या वाळवंटात…. संभ्रमाच्या मृगजळात…. भयावह घुसमटणारा अंधार सर्वत्र.

अख्खा समाज झालाय बहिरा आणि मुका सरून जातंय माणसाचं उमेदीचं आयुष्य.. वटवृक्षाचे बोन्साय बनवण्यातच त्यांना समजलंच नाही.. विष्णुमय जग विषाणूमय कधी झालं ते…

धमन्यातून वाहणाऱ्या रक्तासारखी स्वयंभू होती भूमिका.. तिचं दावणीला बांधलेलं जनावर कधी झालं.. तेही कळलंच नाही…

परधर्माच्या द्वेषाचा विषाणू शरीरात, मनात, मेंदूत, फुफ्फुसात.. सर्वत्र भरून राहिला आहे.

इथे भक्त असू शकतो प्रतिगामी वा पुरोगामी.. भक्त सहज बुद्धाकडून युद्धाकडे येतो..

.. उजवीकडे पहा विकासाच्या जपमाळेखाली दडला आहे हिंसेचा संहार 

.. तर डावीकडे सहिष्णुतेच्या नावानं असहिष्णु फुत्कार!

.. कोणाला झाकू कुणाला काढू?.. या विखारी पर्यावरणाचे झाले आहेत परिणाम..

धार्मिक ध्रुवीकरणाचे, राजकीय अस्मितेचे, आणि दुभंगलेल्या समाजाचेही.. अकस्मात पोहोचले आहेत बहीणभाऊ लांब लांबच्या किनाऱ्यावर 

.. गावकुसाबाहेरच जगणं झालंय किडामुंगीसारखं 

.. शहरी नर-नारी सरपटताहेत सापसुरळ्यांसारखं 

रोज रोज दंगल झाली तरी हरकत नाही. धर्मासाठी, जातीसाठी, वादासाठी, सत्तेसाठी माणसे मेली तरी हरकत नाही… आभासी का असेना ‘शत्रू असणे’ हीच मूलभूत प्रेरणा झाली आहे..

देशभक्तीच्या नावानं परधर्मीयांना कापून काढणे हीच इतिकर्तव्यता ठरली आहे..

.. वाढली महागाई तर वाढू दे.. वाढली बेरोजगारी तर वाढू दे.. झाले हुंडाबळी तर होऊ दे.. झाला शिक्षणाचा बट्ट्याबोळ तर होऊ दे…. पण परधर्मीयांना सर्वात आधी कापू दे

या कापाकापीच्या गदारोळात 

.. कधीतरी माणसे भेटतील का? 

.. कधीतरी माणसे बोलतील का? 

.. कधीतरी संवादाच्या पुलावर जमतील का?

 – – मला पडले आहेत प्रश्न, प्रश्न आणि प्रश्नच…

…. त्यांची उत्तरे कधीतरी मिळतील का? 

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ५६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… – भाग – ५६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

बकेट लिस्ट.

“सेटलमेंट किंवा आयुष्यात स्थिरावणं” याचा विचार नव्या पिढीतले युवक युवती किती गांभीर्याने आणि सखोलपणे करतात!

काही वर्षांपूर्वी मी माझ्या लेकीला म्हटले होते म्हणण्यापेक्षा विचारले होते, जेव्हा तिचे लग्न होऊन दोन-तीन वर्ष झाली होती की, “तुम्ही मूल होण्याविषयी काही विचार करत आहात की नाही?”

तेव्हा ती झटकन म्हणाली होती, ” अगं! अजून वेळ आहे. अजून आम्ही नीट सेटल नाही झालोय. थोडं स्थिरस्थावर होऊ दे. आमच्या जॉब विषयीही आम्हाला अजून निर्णय घ्यायचेत वगैरे वगैरे …”

“सेटल नाही झालो अजून” या अंतर्गत त्यांचे अनेक विचार असतात. बँक बॅलन्स, मनासारखी नोकरी किंवा परदेशी जाऊन अधिक पैसे मिळवण्याची योजना, “ड्रीम हाऊस” खरेदी करणे. एकंदरच आयुष्याचा रेखीव शाश्वत आराखडा केल्यानंतरच मुलांना जन्म देण्याचा विचार येतो. या संपूर्ण सद्यस्थितीतल्या या तरुण मुलांच्या पार्श्वभूमीवर मी जेव्हा मागे वळून याच वयात असतानाचे “आम्ही दोघं” पुन्हा पाहते तेव्हा मला प्रचंड आश्चर्य वाटतं. “आधी लगीन कोंढाण्याचे” या टॅगलाईन प्रमाणे आजची पिढी आधी आयुष्यात सेटल व्हायचे मग पुढचे.. असाच विचार करते. ते योग्य की अयोग्य, शहाणपणा की वैचारिक अतिरेकीपणा हे मला माहीत नाही. या प्रश्नांविषयी मी ठामपणे माझे मत मांडू शकत नाही. “पाण्यात पडले की आपोआप पोहोता येते” या संस्कारातून कदाचित आमची जडणघडण झाली असावी. हात पाय कसे मारायचे त्याचं शास्त्रोक्त तंत्र आम्हाला अवगत नव्हतं तरी आम्ही पोहोत होतो. नाका तोंडात पाणी जाऊनही बुडलो मात्र नाही याचंच अप्रूप होतं.

विलासचा स्टार्टअप, माझी बिन पगारी, कधीही सोडावी लागणारी डळमळीत नोकरी, स्वतःचं आयुष्य स्वतः घडवण्याची प्रतिज्ञा आणि भाड्याच्या घरातली सहजीवनाची सुरुवात, चार रिकाम्या भींती, हातगाडीवरून आणलेलं अगदीच प्राथमिक स्वरूपाचं मोजकच सामान आणि झिरो बँक बॅलन्स पण प्रचंड आत्मविश्वास आणि “साथी हाथ बढाना” यामुळे जीवनाच्या भिंतींवर खरोखरच बहारदार रंग आपोआपच चढत गेले. खरं म्हणजे आयुष्याच्या अत्यंत अनोळखी टप्प्यावर आम्ही होतो. मागच्या पिढीतल्या तीर्थरूप मंडळींच्या सहजीवनाची पाहिलेली चित्रं, अनुभव, त्यांचं जगणं, त्यांनी आखलेल्या दिशा आणि मार्ग ही केवळ शिदोरी होती.. भांडवल होतं म्हणूया. पण जाणीवा प्रगल्भ झाल्यानंतरच आपोआपच त्यांनी आखून दिलेल्या रस्त्यांवरच्या आदर्शपणा बरोबरच अपुरेपण, त्रुटी यांचाही विचार मनामध्ये अधिक आव्हाने घेऊन येत होता पण या साऱ्यात नक्कीच खूपच गंमत होती. एक निराळंच थ्रिलिंग होतं. “आपल्याकडे काहीच नाही” ही भावना नेहमीच निराशाजनक नसते तर ती आपल्याला नकळत अधिक उद्युक्त आणि कार्यक्षम बनवते.

ब्रुक बाॅन्ड कॉलनीतल्या “तीन ब” बिल्डिंग मधल्या वरच्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये आम्ही राहत होतो आणि खाली शरद, पद्मजा पिंगे त्यांच्या मनीष आणि मोनिका या अत्यंत गोड, लहान मुलांसमवेत राहत होते. पद्मजा तत्पर गृहिणी आणि शरद हे हेस्ट या जर्मन औषधी कंपनीचे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होते. जळगावला आल्याबरोबर पहिली जर आमची कुणाशी घट्ट मैत्री झाली असेल तर ती या चौकोनी गोजीरवाण्या कुटुंबाशी. नकळतच घर, संसार याबाबतच्या अनेक उपयुक्त टिपा मला पद्मजाकडून मिळाल्या. तसे आम्ही एकाच पिढीतले, एकाच वयाचे होतो पण त्यांचे लग्न लवकर झाल्यामुळे ते वैवाहिक जीवनातले अनुभवी. फरक इतकाच होता की त्यांचा प्रेमविवाह होता आणि आमचं ठरवून झालेलं लग्न होतं. लग्न प्रकारातला हा फरक हे पती-पत्नीचं नातं घडवण्यात नक्कीच महत्त्वाचा ठरतो. शरद आणि पद्मजाचं नातं आधीच मुरलेलं होतं. आमचा मात्र टीदींग पिरेड होता. त्यामुळे आमच्या नात्याची वीण जमवण्यात शरद आणि पद्मजाचा नक्कीच महत्त्वाचा सहभाग होता.

शरदकडे कंपनीकडून आलेले मोठमोठे लाकडी पॅकिंग बॉक्स असत. त्यात आलेली औषधे काढून त्या रिकाम्या बॉक्सेसची शरद वासलात लावत असे.

एक दिवस विलासने शरदला विचारले, “यातले काही बॉक्सेस मला देशील का?” ते बॉक्सेस रफ असले तरी रुंद आणि लाकडाचे आणि तसे मजबूत होते. शरदला काहीच प्रॉब्लेम नव्हता. असेही ते बॉक्सेस ठेवणे त्याच्यासाठी अडचणीचेच होते. विलास आर्किटेक्ट असल्यामुळे त्याने काही भन्नाट कल्पना आमचं घर सजवण्यासाठी वापरल्या. सारख्या लांबी रुंदीचे ते लाकडी बॉक्स त्यांनी असे रचले की चक्क छानसा डबल बेड तयार झाला. त्यावर आम्ही गादी टाकली आणि वरून छान चादर घालून ते बॉक्स झाकले शिवाय तशाच बॉक्सेसचा उपयोग करून हॉलमध्ये सेंटर टेबल पासून छान बैठक विलासने तयार केली. लगेच कोपऱ्यातील एका सजवलेल्या बॉक्सवर मी फुलदाणी ठेवली आणि त्यात भरण्यासाठी लागणारी सुंदर फुलं मला शेजारच्या पूनम मानधनेनी आणून दिली. ही माझी ब्रुक बॉन्ड कॉलनीतली अत्यंत जवळची, हुशार प्राध्यापक सखी.. जिच्याशी माझी आजही तितकीच घट्ट मैत्री आहे. तिच्याविषयी जितकं लिहावं तितकं थोडंच आहे. नक्की लिहीन कधीतरी.

पिंगे दांपत्याशी घनदाट दोस्ती होण्याचं आणखी एक कारण म्हणजे, पद्मजा मुंबईची सीकेपी आणि शरद कोकणातला. दोघंही मत्स्याहारी. ही खाद्यसंस्कृती फारच जुळली.

पांडे मावशी(ज्यांच्यामुळे आम्हाला एक सुंदर घर मिळालं) तर अगदी पहाटे आमचं दार वाजवायच्या. ते दोघं (मिस्टर अँड मिसेस पांडे) भल्या पहाटे लांबलचक प्रभात फेरी मारून यायचे. पांडे काका घरी जायचे आणि पांडेमावशी आमच्याकडे. “ तुला काही हवंय का? काहीही लागलं तर विनासंकोच सांग” म्हणायच्या. कधी त्यांच्या लिंबाच्या झाडाला आलेले लिंबू, मोगरा, अबोलीची फुलं घेऊन यायच्या तर कधी, ” उद्या पाणी येणार नाही बरं का! टाकी भरली जाणार नाही. जरुरीपुरतं पाणी साठवून ठेव “असं काळजीने सांगायच्या. कधी घरी केलेले उडदाचे पापड, चिवडा डब्यात घेऊन यायच्या. मी चौदा वर्ष कॉलनीत राहिले आणि त्यांनी सदैव माझ्यावर माया केली. काय नातं होतं आमचं? नाती काय रक्ताचीच असावी लागतात का? ही अशी अनेक ऋणानुबंधांची नाती म्हणजे आयुष्याचा एक मोठा ठेवा असतो!

त्यावेळी मोबाईल्स नव्हते नाहीतर आमच्या घरातील या कल्पक सजावटीचे फोटो नसते का काढले? आज आपण प्रत्येक आनंदाचा क्षण मोबाईल मध्ये तात्काळ बंदिस्त करतो पण या तंत्रज्ञानाच्या अभावाने आमच्या आयुष्यातल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण क्षणांची फक्त मनात उमटलेली छायाचित्रंच उरली आहेत.

अद्ययावत वेलफर्निश्ड घरात, माझ्या आवडत्या खिडकीत, भुरभुरणारा पाऊस निरखत हे सारं लिहिताना मला आठवतोय तो माझा कोवळ्या कळीतला संसार. लहानशीच बकेट लिस्ट. थोडे थोडे पैसे मिळाले की ती लिस्ट पूर्ण करायची धडपड आणि त्यातला आनंद. एकीकडे नोकरीचा राजीनामा द्यावा लागल्याची खंत तर दुसरीकडे वेलीवर उमलणाऱ्या फुलाच्या चाहुलीचा आनंद. खरोखरच,

।दिवस तुझे हे फुलायचे

झोपाळ्यावाचून झुलायचे।।

आनंद, हुरहूर, उत्सुकता आणि काहीशी धडधड बाकी काही म्हणजे काही नाही..

 क्रमशः…भाग ५६

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सध्या मी स्वतः बरोबरच गप्पा मारण्यात रमते… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ सध्या मी स्वतः बरोबरच गप्पा मारण्यात रमते… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

या एक दीड वर्षात सगळंच बदललय. कुठे जाणे नाही, आणि कोणी घरी येत नाही. ज्या काही गप्पा रंगतात त्या फक्त फोनवरच.

पूर्वी बाहेर जाणे होत असे. रिटायरमेंट नंतर भरपूर रिकामा वेळ मिळाला. मी नोकरी करत असल्याने कधी सुट्टी मिळाली, की घरचीच पेंडिंग कामे होत असतं. किंवा काही आवश्यक कामे त्या दिवशी करायची. हाच परिपाठ जवळ जवळ तीस वर्षे सुरू होता. •••

नोकरी पूर्ण झाल्यावर ठरवलंच होत, आता ते सर्व करायचे, जे कधी मनात असूनही वेळेअभावी करता आले नाही. आम्ही पुण्यात स्थायिक झालो. योग वर्ग सुरू केला. दोन भिशी सुरू झाल्या. वाचक मंच, जेष्ठ नागरिक संघ. नाटक, गाण्याच्या मैफली exhibitions वगैरे वगैरे. एकंदरीत पुण्याच्या कल्चर मधे मी रंगून गेले. सर्व मैत्रिणी मिळून बाहेर जेवायला जाणे. ‘TTMM ‘ प्रमाणे खर्च करणे. एक दोन दिवसांची पावसाळी, हिवाळी ट्रीप काढणे. त्यामुळे वेळ कमीच पडत होता. कधी डोहाळजेवण तर कधी हळदीकुंकू. जेमतेम घरची कामे करणे व नंतर कुठेतरी भटकंती असायचीच. आठवड्यातून दोन तीन दिवस जरी असा काही प्रोग्रम झाला की बाकी दिवस आराम करण्यात जात असत. एकंदरीत मी खूप बिझी असायची. म्हणजे ‘ ‘Busy without Business’ म्हंटल तरी चालेल. •••••

आता मात्र सर्व एकदम बदललंय.

आता घर एक घर. या खोलीतून त्या खोलीत एवढीच भटकंती. बोलायला घरी आम्ही दोघेच. या दरम्यान बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. मला माझ्या घराची नव्याने ओळख झाली. आपल्या घरात किती अनावश्यक गोष्टी आहेत. कुठे काय ठेवलं आहे? किती तरी गोष्टी आत दडपून ठेवल्या आहेत. त्यांना कधी वापरल्याचे आठवत नाही. जावई येईल तेंव्हा हा सेट काढूया. जावई आहेत अमेरिकेत. ते केंव्हा येणार?? माहीत नाही. ते सेट कित्तेक दिवस वापरलेच जात नाहीत. •••

घरात लक्ष द्यायला वेळ मिळाला, तर अनेक गोष्टी कळल्या. स्वच्छता वाढली. अडगळ कमी केली. अनावश्यक गोष्टी फेकल्या गेल्या, किंवा दिल्या गेल्या. म्हणजे थोडक्यात बाहेर फिरण्याच्या नादात जी कामे साचलेली होती ती पूर्ण केली. घरात वस्तू असूनही किती तरी वस्तू उगीच घेतल्या. कारण वेळेवर कधी त्या दिसल्याच नाहीत. आता वयामानाप्रमाणे विसर पडणे होणारच आहे. तेंव्हा प्रत्त्येक गोष्ट योग्य जागी व्यवस्थित ठेवली. लिस्ट लिहून ठेवल्या. आता वेळ छान जाऊ लागला. नव्याने घर लावण्याचा आनंद मिळला. ••••

हे सर्व करताना मला एक नवीन मैत्रिण मिळाली. ••••

‘तीच ती, माझीच मी’

जी नेहमीच माझ्या बरोबर होती. पण इतरांशी गप्पा मारण्यात तिच्याशी बोलायला वेळच मिळत नव्हता. गप्पा मारल्या तरी वरवरचं गप्पा होत असत. आता मात्र तिच्याशिवाय माझे पान हालत नाही. खूप गप्पा मारतो आम्ही. काही वेळ काळ बघावा लागत नाही. कपडे बदला, मेकअप करा. काही भानगडीच नाही. हा माझा नवीन छंद मला खूप आवडतोय. आता ती मला खूप गोष्टी सूचवते. नवीन आयडिया देते. किती तरी कामांची आठवण करून दिली तिने. तिच्या नवीन कल्पना मला खूप आवडतात. ••••

मनसोक्त गप्पा मारणे. चर्चा करणे चालूच असते आमचे. वेळ छान जातो मन हलकं होतं. एक तर लपवाछपवी नाही. हे सांगू की नको. ती काय म्हणेल?? हसेल का माझ्यावर.??? या भानगडीच नाही. कूठे जायची गरजही नाही. मी बोलायच्या आतच तिला सर्व कळते. प्रत्त्येक गोष्ट छान ‘logically ‘ समजाविते. भावनांच्या आहारी जाऊ देत नाही. विचारांना बरोबर दिशा देते. •••••

किती तरी जूने पारंपरिक पदार्थ तिने करायला सांगितले. अगदी व्यवस्थित रेसिपी सांगितली. काही ही करायच्या आधी तिचे होमवर्क जबरदस्त असते. त्यामुळे सर्व व्यवस्थित पार पडत. मग ते घरातील एखादे काम असो, एखादा पदार्थ करणे असो, नाहीतर कोणाला फोन करणे असो. प्रत्त्येक कार्यात समाधान मिळते. आपल्या क्षमतेनुसार आपण छान केलंय असं वाटतं •••

आठवतातच. काही चांगल्या तर काही वाईट. काहींच्या आठवणीने आजही डोळ्यात पाणी येतं. तेव्हा ती लगेच म्हणते, ••• रडते कशाला?? तेंव्हा तुझीच चूक होती?? एवढ्या ‘अपेक्षा’ ठेवशील तर असेच होईल. ••••इतकं कोणाच्या म्हणण्यात येऊ नये. ••••लोकांसमोर किती ‘झुकायचे ‘हे कळलेच पाहिजे. ••••इतकी ‘अकडही’ कामाची नाही. ••••एवढं काही झालं नव्हतं तेंव्हा, तू उगाचच ‘बाऊ’ केला होता. अस नाही की नेहमी रागवतेच, कधी कधी कौतुकाची थाप पण देते. •••••

अग! ! असंच असतं आयुष्यात. कधी आपण जिंकतो तर कधी आपण बरोबर, योग्य असूनही ते आपल्याला मिळत नाही. नोकरीचे अनुभव आहेत ना तुझ्याकडे. मनात यायचाच अवकाश, की तिचे उत्तर तयार. •••••

म्हणायचाच अवकाश की कंबर दुखतेय, •••की लगेच लेक्चर मिळत, ••• सांगितले कोणी होते?? बाथरूम स्वच्छ करायला. झेपत नाही ना मग कशाला करायचे?? जेवढं झेपत तेवढंच करं ना. कोणी येत नाही तुझं घर बघायला. ••••

आता मला घरीच एक Advisor friend, philosopher guide. One in all. मिळाली आहे. मला खूप मजा येते. माझ्या जीवाभावाची मैत्रिण घरीच आहे. ••••

उशीरा का होईना बऱ्याच जून्या गोष्टी नवीन दृष्टीकोनातून स्पष्टपणे तिने दाखविल्या. आयुष्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांचा गुंता हळूहळू सूटत होता. मन स्वच्छ होतं होत. इतकी वर्षे उगाच डोक्यावर भार ठेवून जगण्याची चूक कळत होती. वय वाढलं. अनुभव वाढले. घटनांकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. या रिकाम्या वेळेत त्याचे संपूर्ण विश्लेशण करायला वेळ मिळाला. व मनसोक्त खुल्या मनाने बोलणे झाले. ••••

“स्वाभिमान व अहंकार मधली पुसटशी रेघ लक्षात आली. “स्वतः चेच गैरसमज दूर झाले. दुसऱ्यांच्या नजरेतून घटना बघता आल्या. •••••

चांगल्या व वाईट विचारांचे “अनुलोम विलोम” करायला शिकले. ••••

मनातलं ओझं कमी करायचे एकमेव विश्वासाचे ठिकाण म्हणजे स्वतः ची स्वतः बरोबर असलेली मैत्री. हे लक्षात आले. गोष्टी समजण्याची योग्य पध्दत शिकायला थोडा वेळ लागतो पण एकदा समजल्या की पूढे आयुष्य सोपे होते. ••••

कठीण काळात नेहमी सर्व वाईटच होत असं नाही. कधी कधी खूप महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ मिळतो. ••••

मिळालेला हा एकांत माझ्या साठी उपयोगी ठरला. घराचे, विचारांचे सुयोग्य व्यवस्थापन झाले. माणसांची खरी ओळख झाली. माझ्यातल्या माझ्या सखीने याकाळात मला खूप सल्ले दिले. सर्व गोष्टी आमच्या दोघींमध्येच राहिल्या. अनेक प्रश्न सूटले. विचारांचा गुंता सुटला. आयुष्य जास्त सरळ व सोप्पं झाल. मन स्थीर झाल. •••••

आता ठरवलंय सखीला विचारल्या शिवाय काहीही करायचे नाही. ••••

ती नेहमी म्हणते, ••••

अग! ! एखाद्या वटवृक्षा सारखं हो. स्थीर, धीर, गंभीर. लहान सहान गोष्टींना घाबरायच नाही. प्रत्त्येक दिवशी नवीन पालवी फूटू दे. वृक्षाच्या शाखा वाढू दे. कोणाला तरी त्याचा आधार नाही तर सावली मिळु दे.. •••• 

म्हणतात ना, •••

‘मन’ से ज्यादा उपजाऊ जगह और कोई नहीं, क्योंकि वहां जो भी कुछ बोया जाए, वह बढ़ता जरूर है । चाहे वह “विचार “हो, “नफरत “हो, या “प्यार” हो ।••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी, चहा, पाऊस, आणि खिडकी… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ मी, चहा, पाऊस, आणि खिडकी ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

पाऊस पण ना खूप खोडकर… मला जेव्हा खूप वाटत की याने आज बेभान होऊन कोसळाव तेव्हाच हा नेमका दांडी मारणार आणि मग अचानक कधीतरी धो-धो कोसळणार नी बेभान होऊन बरसणार… कधीतरी एखाद्या दिवशी हलकीशी रिमझिम सर येणार… त्याची ही वेगवेगळी रुपे पाहण्यात ही हरवून जावंस वाटतं. पावसाला धो-धो बरसताना पाहिलं ना की असं वाटतं हा पण खूप आसुसलेला असतो तिला–धरणीला भेटण्यासाठी… अर्थात त्याची वाट मी बघतच असते पण त्याच्या ओल्याशार स्पर्शाने मातीचा दरवळणाऱ्या सुगंधाची बात काही औरच…! ! !

मला पावसात भिजायला खूप आवडत कारण ती मनातून भिजत असते चिंब…आठवणींमध्ये.. … माझ्या काही ना काही आठवणी आहेच… मनातल्या एका कप्प्यात बंद केलेल्या… कधी चेहऱ्यावर हसू तर कधी डोळ्यांत आसु आणणाऱ्या… कधी गोड तर कधी कडू वाटणाऱ्या मग अशा या आठवणी खिडकीत बसून चहाच्या एक- एक घोटाबरोबर गिळून पुन्हा मनात बंद करते

मात्र गार वाऱ्यामुळे अंगावर येणारा शहारा गरम चहाच्या घोटासरशी नजरेआड होतो.

पाऊस पडायला लागला की माझे मन कल्पनेच्या विश्वातही रमत… जिथे सर्व बंध तोडून हवी तशी कल्पना करुन मन स्वत:ला हवं तसं जगतं तिथे मन नेहमीच रेंगाळत असतं… खरचं पाऊस पडायला लागला की गरम चहाचा स्वाद घेत कोसळणाऱ्या पावसाला खिडकीतून बघत कल्पनेच्या विश्वात रमून जाण्यातही खूप मजा आहे…!

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नुसताच टीकाकार की सक्रिय नागरिक : मी कोण? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ “नुसताच टीकाकार की सक्रिय नागरिक : मी कोण? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

सोसायटीच्या गणेशोत्सवात यावर्षी बराच विचारविनिमय, वादविवाद, रुसवेफुगवे असं सगळं पार पडून शेवटी ठरलं की, डीजे मुक्त गणेशोत्सव तर होईलच, शिवाय सोसायटी मधल्या पाच ज्येष्ठ सभासदांची समिती जमाखर्चाचं काम बघेल. झालं.. तिथंच अनेकांचा पापड मोडला. दरवर्षीचे पाच सात स्वयंघोषित अनुभवी कार्यकर्ते, गणेशभक्त, आधारस्तंभ दुसऱ्या दिवसापासून यायचेच बंद झाले. ‘साऊंड सिस्टीम बंद तर मग कसला उत्सव? ‘ असा चेहरा घेऊन पोरं वावरायला लागली.

मागच्या वर्षापर्यंत असं नव्हतं. मुलं जमून गणपती उत्सव करायची. मोठी माणसं फार तपशीलात जायची नाहीत. पण मग असं लक्षात आलं की, रोज रात्री उशिरापर्यंत काम करावं लागतं आणि भूक लागते म्हणून, झोमॅटो, स्वीगी वापरुन फूड पार्सल्स मागवली गेली आणि त्याची भरमसाठ बिलं उत्सवाच्या खर्चात लावण्यात आली. त्यात पिझ्झा, बर्गर, चायनीज, पावभाजी, मसाला पाव, कोल्ड कॉफी, सँडविचेस अशी यादी तर होतीच. शिवाय अनेकदा सामिष पदार्थ सुद्धा मागवले गेल्याचं लक्षात आलं. या खर्चाची रक्कमच वीस हजाराच्या वर गेली. पूजा खर्चाला पैसे फार लागतात म्हणून, त्या पूजाखर्चात कपात करण्यात आली. “सकाळ संध्याकाळ हार आणि गजरे कशाला लागतात? ” असा युक्तिवाद करुन एकवेळची फुलं बंद केली गेली. नेहमीचे गुरुजी “त्यांचे चार्जेस खूप जास्त आहेत” या नावाखाली थांबवले गेले. पौरोहित्य करणारे चार्जेस घेत नाहीत, त्याला “दक्षिणा” असं म्हणतात, हेही कुणाच्या गावी नव्हतं. पण विसर्जनाच्या आदल्या दिवशी गणपती मंडळाच्या वतीनं सगळ्या रहिवाशांना प्रसाद भोजन असा जंगी कार्यक्रम आखण्यात आला आणि त्यात भोजनाच्या ऐवजी पावभाजी, पुलाव, भेळ पाणीपुरी आणि आइस्क्रीम असा मेनू ठेवला गेला. विसर्जनाची मिरवणूक डॉल्बी साउंड सिस्टीम आणि लेसर लाईट्स लावून निघाली. दररोज मंडळाच्या वतीने एक किलो उत्तम केशरी पेढ्यांचा नैवेद्य असे, विसर्जनाच्या दिवशी असाच माव्याच्या मोठ्या मोदकांचा प्रसाद प्रत्येक घरी दिला जायचा. खर्च फार होतो म्हणून या दोन्ही गोष्टी बंद पाडल्या गेल्या. ही गोष्टसुद्धा अनेकांना खटकली.

हा सगळा प्रकार सगळ्यांनीच पाहिला होता. गणेशोत्सव हा आनंदाचा उत्सव असला तरीही तो आधी धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उत्सवच आहे, आणि तो त्याच्या मूळ रूपातच साजरा व्हायला हवा यावर सगळ्या जुन्या पिढीतल्या सभासदांचं एकमत होतं. होळी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी ही सगळी चर्चा झाली आणि उत्सव योग्य प्रकारे साजरा झाला पाहिजे, असं ठरलं. उत्सवाचा कल बदलतोय, हे लक्षात आल्याक्षणी वेळीच योग्य निर्णय घेऊन चुकीचे पायंडे बंद पाडण्यासाठी माणसं पुढं आली. आता गणेशोत्सवात फक्त “सेलिब्रेशन आणि इव्हेंट” शोधणाऱ्यांना याचं वाईट वाटलं असेलही. वाटू देत बापडं, पण ज्यांना योग्य अयोग्य समजतं, त्यांनी फक्त दोषारोप करत न बसता, स्वतः सक्रीय सहभागी होऊन, पुढाकार घेऊन सकारात्मक कृती केली, हे जास्त महत्त्वाचं.

गणेशोत्सव असो किंवा अन्य कोणताही सार्वजनिक उत्सव असो, आपल्या घरच्या उंबऱ्याबाहेर आपल्याला वाट्टेल तसं वागण्याचं स्वातंत्र्य असतं, असं कुठंय? मला नाचायला मिळेल, धिंगाणा घालायला मिळेल, मंडळाच्या खर्चातून मजा करायला मिळेल, हा खऱ्या कार्यकर्त्याचा स्वभावगुण नव्हे. पण तरीही हा अवगुण गणेशोत्सवात शिरला आहे, हे सत्य तर कुणालाच नाकारता येण्यासारखं नाही.

आमच्यावेळेला काय होतं, कसं होतं, जे होतं ते कित्ती चांगलं होतं, हे आता सांगण्यात काही अर्थ उरलेला नाही. पण अत्यंत सात्विक, कठोर शिस्तशीर आणि उत्सवाची पवित्रता पक्की ठाऊक असणारी मंडळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहेत, आणि जी विद्यमान आहेत, त्यांना उत्सवात सहभागी करुनच घेतलं जात नाही, ही वास्तविक परिस्थिती आहे.

ही स्थिती केवळ सोसायटीच्या गणेशोत्सवापुरतीच मर्यादित आहे, असं नाही. संपूर्ण गणेशोत्सवातच सगळ्या मंडळांमध्ये थोड्याफार फरकाने असंच दिसतं. “आमचा उत्सव”, “आमचं मंडळ” याऐवजी “आपला उत्सव”, “आपलं मंडळ” असं अजूनही १०० टक्के झालेलं दिसत नाही.

अतिशयोक्तीचा भाग नाही. पण पूर्वी खरोखरच दोन सदस्यांकडे मूर्तीच्या देखभालीची व्यवस्था असे. त्यांच्याकडे सुती कापड, मलमल कापड, मऊ ब्रश असा सगळा सेट असायचा. रोज सकाळ संध्याकाळ मूर्ती हलक्या हातांनी पुसून घ्यायची, तिच्या मुकुटावर, कपाळावर, हातांवर, पायांवर वाहिलेलं गंध, हळद, कुंकू ब्रशनं पुसून काढायचं. तिचा शेला बदलायचा, असं काम असे. रोजच्या पूजेच्या वेळी आधीचे हार, गजरे, माळावस्त्र, फुलं हे सगळं नीट उतरवून नवे हार घालणं हे त्यांचं काम.

गणपतीच्या दोन्ही बाजूस मोठ्या पितळी समया तेवत असत. त्या समयांची आणि पूजेच्या उपकरणांची रोजची स्वच्छता आणि व्यवस्था दोघेजण पाहत. गणपतीपुढे रोजची रांगोळी काढणं, रोजच्या नैवेद्याचं नियोजन करणं, रोजचा प्रसाद आणि खिरापतीची व्यवस्था करणं हा मोठा भाग असे. गणपतीला रोजच्या रोज ताज्या दूर्वा, आघाडा, शमीपत्रे वाहण्यासाठी मिळवून आणणे, दुर्वांच्या जुड्या करणे, नैवेद्यासाठी तुळशीपत्र आठवणीने आणणे, रोजच्या रोज पाच फळांची व्यवस्था करणे, ही अत्यंत आवश्यक गोष्ट होती.

गणपतीचा नैवेद्य हा तर अतिशय जबाबदारीचा भाग. महिनाभर आधीपासून कुठल्या दिवशी कोणत्या कुटुंबाकडून दुपारचा आणि कोणत्या कुटुंबाकडून संध्याकाळचा नैवेद्य यायचा आहे, याची जबाबदारी दोघांकडे असे. ते प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवत. सकाळच्या पूजेत फळे, पंचखाद्य, मोदक, दूध, पंचामृत, गूळखोबरं ही व्यवस्था असे. गुरुजींना पूजेपूर्वी किंवा पूजेनंतर दूध आणि फळे असा फराळ असे. मग दुपारी बारा ते एक च्या दरम्यान नैवेद्य. तो ज्या त्या घरातून महिला सदस्य आणत असत. हा पूर्ण चारीठाव मिष्टान्न भोजनाचा साग्रसंगीत नैवेद्य असायचा. संध्याकाळी मात्र वाटली डाळ, लाह्या, बत्तासे, खारका, साखर फुटाणे, साखरदांड्या, दडपे पोहे, पेढे, खोबऱ्याच्या वड्या, राजगिऱ्याचे लाडू, खजुराचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, चुरमुरे, दहीपोहे, केळी, सफरचंदे, चिकू अशी खिरापत येत असे. लहान मुलांसाठी श्रीखंडाच्या गोळ्या आवर्जून असत. आरती झाल्यानंतर तो प्रसाद प्रत्येकाला नीट वाटण्याची जबाबदारी महिलावर्ग घेत असे. समोसे, कचोरी, ढोकळा, सुरळीच्या वड्या, वडे असे पदार्थ संध्याकाळी आरतीनंतर प्रसाद म्हणून वाटण्याची पद्धत नव्हती. प्रसादाची पवित्रता अगदी काटेकोरपणे जपली जायची. “त्याला काय होतंय? ” असा प्रश्न विचारण्याची कुणाची टाप नसे आणि चुकून विचारलाच तर मांडवातून सरळ घरचा रस्ता दाखवून घरी येथेच्छ लाखोली वाहिली जात असे. “आधुनिकतेच्या नावाखाली उंडगेपणा” रेटणाऱ्यांना तिथं कामच दिलं जात नसे. रात्री दूधसाखरेचा नैवेद्य दाखवून समयांच्या वाती बारीक केल्या जात.

त्या सगळ्या चालीरीती पार पाडताना बायका मंडळींचा पिट्ट्या पडे खरा, पण त्यातून जो आनंद मिळे, त्याला तोड नव्हती.

संध्याकाळी आरती मंडळ असे. तालासुरात अकरा अकरा आरत्या खड्या स्वरात म्हटल्या जात. श्लोक असत, देवे होत. रोजच्या वारानुसार आरत्या वेगवेगळ्या होत, पण ज्ञानोबा तुकोबांच्या आरत्या मात्र रोज होत असत. “वाट पाहे सजणा” म्हणणाऱ्याच्या पाठीत तत्क्षणी धपाटा बसत असे. शंकराची आरती, देवीची आरती, पांडुरंगाची आरती, दत्ताची आरती, मारुतीची आरती या अनिवार्य असत. आरती येत नसतानाही नुसतंच “जयदेव जयदेव” म्हणून घसा खरडवणाऱ्याचं श्रीमुख टोमॅटोसारखं लालबुंद होईल असा विशेष प्रसाद दिला जात असे. त्यामुळं, अगोचरपणा, थिल्लरपणा, शाब्दिक कोट्या करणे, निलाजरे विनोद करणे यांना उत्सवात थारा नव्हता. मोठ्यांचा प्रचंड धाक असे.

उत्सवात मूर्ती ठरवणे, ती आणणे, स्थापन करणे, तिला दहा दिवस सांभाळणे, विसर्जन मिरवणुकीत ती नीट नेणे आणि व्यवस्थित पाण्यात उतरवून तिला निरोप देणे हे काम ठरलेले पाच सहा जण करत असत. विसर्जनाच्या वेळी उत्तरपूजा झाल्यावर नारळ वाढवला जाई आणि बाकीचे सगळे बाजूला होत. गणपतीचे वस्त्र, जानवे आणि तळ्यातील थोडीशी माती तबकात आणली जात असे. ती माती मूर्तीच्या जागी टाकत. मगच दुसऱ्या दिवशी सजावट उतरवली जाई.

उत्सवापूर्वी सगळ्या साहित्याची तपासणी करणं आणि उत्सवानंतर देखील सगळ्या वस्तूंचा हिशोब लागणं हेही काम असे. सतरंज्या, पूजा साहित्य, गणपतीचे टेबल, रोषणाई साहित्य, सजावटीचे पडदे, त्यांच्या दांड्या, झांजा, टाळ, घंटा, समया, हुंडी, चौरंग, पाट अशी ती बरीच मोठी यादी असे. त्याची स्वतंत्र वही असे. दरवर्षी त्यात थोडीफार नवी खरेदी होई. ताम्हण, तेलाच्या बरण्या, उदबत्ती घर, नैवेद्याची तबके अशा गोष्टींची भर पडे. त्याच्या मोठ्या ट्रंका असत. उत्सवात वापरलेले सगळे साहित्य नीट स्वच्छ करुनच पॅक केले जाई. सतरंज्या, बेडशीट, पडदे धुवून घेतले जात. आदल्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत मिरविणारा एकही आधारस्तंभ, खंदा कार्यकर्ता, “वाजवणार-गाजवणार” पट्टीतला, “गर्वच नाही तर माज आहे मला मी कार्यकर्ता असल्याचा” असं स्टेटस ठेवणारा एकही पठ्ठ्या या आवराआवरीच्या कामात सहभागी पूर्वीही होत नसे, आजही सहभागी होत नाही.

ही सगळी कामं हा उत्सवाचा अविभाज्य आणि अतिशय जबाबदारीचा भाग होता. तो नीट पार पाडल्यानंतर मिरवणुकीचा विचार असे. ९० टक्के भर उत्सवावर आणि फक्त १० टक्के भर मिरवणुकीवर असायचा. मिरवणारे मिरवत असत आणि काम करणारे काम करत. त्यात या दोघांनाही कधीच बदलावंसं वाटलं नाही. दोन्ही प्रकारची माणसं त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार उत्सवात सहभागी होत राहिली. आजही खरा कार्यकर्ता फोटोजीवी नाहीच. तो मिरवताना दिसत नाहीच. पण त्याच्या समर्पित असण्यामुळेच उत्सव होतोय, हेही त्रिवार सत्य.

एकदा गणपतीसाठी नक्षीचा सागवानी पेशवाई चौरंग करायचं ठरलं तेव्हा “मोठ्ठाला देणगीदार न शोधता” तीन चार वर्षं रक्कम बाजूला काढत काढत चौरंग तयार झाला. भरभक्कम देणगीदारांकडून रकमा घ्यायच्या आणि वरून पुन्हा पावती पुस्तकं घेऊन फिरायचं असा प्रकार कुणी चालू दिला नाही. पैशाच्या जोरावर उत्सवात उन्माद येऊ दिला नाही, हे जाणत्या कार्यकर्त्यांनी जपलेलं भान आहे. “मी चांदीची उपकरणी देतो, पण मी सांगतो तशी मिरवणूक काढा” या असल्या प्रलोभनांना जुनी मंडळी बळी पडली नाहीत, हे किती चांगलं झालं.

उत्सव साजरा करण्यासाठी पैसे लागतात, ही गोष्ट कितीही खरी असली तरीही फक्त पैशाच्याच जोरावर उत्सव साजरा होतो, हे मात्र अजिबात खरं नाही. उत्सव तत्वांवर होतो, भावनेवरच होतो. आधुनिकतेची, करमणुकीची चौकट आखण्यासाठी जाणत्या व्यक्तींचं मार्गदर्शन घेतलं तर बिघडतं कुठं? त्यात कसला इगो? आणि कार्यकर्त्याला तर असा इगो असूच नये.

मूळ रुपाला कसलीही बाधा येऊ नये, उलट त्या उत्सवाचं मांगल्य आणखी वाढावं, अशी समाजाची भावना असेल तर समाजातली सज्जनशक्ती आणि सार्वजनिक गणेशोत्सव यांच्यात एक भक्कम विशाल पूल बांधला गेला पाहिजे. समाजाच्या सर्व क्षेत्रांमधल्या व्यक्तींना मंडळांनी “कार्यकर्ता” म्हणून या उत्सवात सहभागी करुन घेतलं पाहिजे. आणि या विविध क्षेत्रातल्या लोकांनीही या उत्सवात आलं पाहिजे. समाजातली सज्जनशक्ती या उत्सवातल्या त्याज्य गोष्टी समूळ काढून टाकण्यासाठी निश्चित प्रभावी ठरेल. अगदी वैज्ञानिक संशोधकांपासून ते अंगणवाडी शिक्षिकांपर्यंत सगळे या उत्सवात कार्यकर्ता म्हणून आले पाहिजेत. उत्सवातली सकारात्मकता निश्चित वाढेल.

राहता राहिला प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांचा. आपण स्वतःला बदललं पाहिजे, तेव्हाच आपला उत्सव बदलेल. आपण घरात बसून टीव्हीवर मिरवणुका बघून, नंतर टीकेचे बाण सोडून काय होणार? “गणपती बाप्पा स्वतःच त्याचा उत्सव दोषमुक्त करुन घेईल” असं म्हणून घरात बसून टीका करणं पूर्ण थांबवलं पाहिजे. लोकमान्यांनी मोठ्या विश्वासानं हा उत्सव आपणा सर्वांच्या हातात दिला आहे. तो वसा आपण सोडून देऊन कसं चालेल? लावण्या, आयटम साँग्ज, धांगडधिंगा आणि मंगलवाद्य, भक्तिसंगीत, भजन, कीर्तन यांची आपापली अशी वेगळी जागा असते, हे आपल्याला नक्की कळतं ना? मग तो बदल घडवण्यासाठी आपणच पुढं होऊया. महाराष्ट्राच्या राज्यउत्सवात सहभागी होऊया. उत्सवाचं मूळ रुप सुंदर आहेच, त्याला आता श्रवणीय, प्रेक्षणीय आणि आनंददायक करुया..!

|| गणपती बाप्पा मोरया ||

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ त ट स्थ… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

??

☆ त ट स्थ… ☆ श्री मंगेश मधुकर

ऑफिसपासून जवळ होता म्हणून नातेवाईकाच्या फ्लॅटमध्ये रहायला गेलो. भाडंसुद्धा कमी होतं. चार मजल्याची जुनी सोसायटी. शेजाऱ्याच्या हळूहळू ओळखी होत होत्या. एका संध्याकाळी सोसायटी गेटजवळून जात असताना पुढे असलेल्या आजींच्या हातातली पिशवी खाली पडली. त्यातले कांदे-बटाटे विखुरले. मी पटकन गोळा करून पिशवी आजींकडे देताना चेहरा ओळखीचा वाटला. निरखून पाहील्यावर लक्षात आलं त्या माझ्या शाळेतल्या बाई होत्या. तब्बल तीस वर्षनी भेटत होतो अर्थातच त्यांनी मला ओळखलं नाही. बाईंच्या अचानक झालेल्या भेटीनं खूप आनंद झाला. मी नाव, शाळा, दहावीचं वर्ष सांगीतल्यावर बाई फक्त हसल्या आणि जाऊ लागल्या. वाकून नमस्कार केला पण काहीच प्रतिक्रिया नाही. खूप आश्चर्य आणि वाईटही वाटलं.

कारण…….

माझ्या आठवणीतल्या बाई खूप प्रेमळ, गप्पीष्ट, आपुलकीनं बोलणाऱ्या. छान शिकवणाऱ्या, कधीच न रागावणाऱ्या न मारणाऱ्या अशा होत्या. त्यांची खासीयत म्हणजे खूप गोष्टी सांगायच्या. त्यामुळे सर्वांच्या फेवरेट. इतक्या प्रेमानं वागायच्या की जणूकाही आमची शाळेतली आईचं. त्याच हसतमुख बाई आज फारच वेगळ्या वाटल्या. का? कशामुळे? विचारांच्या गर्दीत हरवलो.

“साहेब, फार मनावर घेऊ नका. आजी तशाच आहेत. ”गेटजवळचा दुकानदार माझ्याकडं पाहत म्हणाला.

“तशाच म्हणजे?? ”

“कायम गप्प. फक्त कामापुरतं बोलतात. बिचाऱ्या… ”एवढं बोलून दुकानदार कामात गुंतला. मी पण जास्त काही विचारलं नाही पण बाईंचं वागणं डोक्यातून जात नव्हतं.

रात्री निवांत पुस्तक वाचत होतो. दहा-साडे दहाची वेळ. पावसाचा, गाड्यांचा आवाज सोडला तर सोसायटीत शांतता. अचानक मोठमोठ्यानं आवाज यायला लागला. खिडकीतून पाहीलं तेव्हा छत्री घेतलेला एकजण डूलत डूलत येत होता. आजूबाजूला कोणीही नव्हतं तरी तंद्रीत बडबडत होता. समोरच्या बिल्डिंगजवळ पोचल्यावर आवाज वाढला. धड उभं राहता येत नव्हतं पण बोलण्याचा आवेश मात्र भलताच आक्रमक.

“कोणाला सोडणार नाही. कापून टाकीन. खलास करीन. मला फसवलंत ना. बदला घेणार”समोर कोणीही नव्हतं तरी बोलत होता. काही वेळानं कमरेला पट्टा लावलेल्या एक आजी काठी टेकवत जिन्यातून खाली आल्या आणि त्याच्यासमोर उभ्या राहील्या. मी नीट पाहिलं तर त्या आजी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर संध्याकाळी भेटलेल्या बाईच होत्या. चेव चढलेला तो तावातावानं हातवारे करत बोलत होता आणि बाईं ऐकत होत्या.

“असं काय बघतीस. कोणाच्या बापाला घाबरत नाही. समजलं का? ”

“झालं की सांग. घरी जाऊ”बाई

“प्रवचन चालूयं का? ”तो खवळला.

“मग दुसरं काय? हे रोजचंच आहे. थकलास की घरी जाऊ”

“तू जा. मी येणार नाही”

“लोकांना त्रास होतोय”

“आणि माझ्या त्रासाचं काय? ”

“ज्यानं केलं तो इथं नाही मग त्यांच्या नावानं शिव्या देऊन काय उपयोग?? . ”

“त्याची प्रतिनीधी तू आहेस की.. ”

“तेच तर सांगतेय. घरी चल. समोर बसते काय उद्धार करायचा तो कर. इतरांना त्रास नको. ”

“का? इथं लाज वाटते. चारचौघात अब्रू जायची भीती वाटते. “

“अजून राहिलीये?? “

“मी एकट्यानं घालवली नाही. तुझ्या लाडक्यानं फसवून सही घेऊन जमीन विकली. भीक म्हणून जुनाट दोन खोल्या आणि थकलेली म्हातारी देऊन स्वतः नवीन जागेत रहायला गेला. ”नशेमध्ये तो बराच वेळ बरळत होता. काही वेळानं आवेश उतरल्यावर त्याला हाताला धरून बाईंनी घरी नेलं. हा सगळा प्रकार पाहून मला खूप वाईट वाटलं परंतु सोसायटीतल्यांसाठी हा प्रकार सवयीचं असला पाहिजे कारण एकही खिडकी उघडली नव्हती आणि कोणी मध्यस्तीसाठी सुद्धा आलं नव्हतं. बाईंची हतबलता पाहून कसंतरीच वाटलं. पोराच्या कानफटात मारावीशी वाटलं. तिरमिरीत ऊठलो पण स्वतःला आवरलं.

दुसऱ्या दिवशी शेजारच्या काकूंकडे चौकशी केली तेव्हा समजलं की बाईंचे मिस्टर दहबारा वर्षपूर्वीच गेले. दोन मुलं, दोघांच्या वेगवेगळ्या तऱ्हा, एक स्वार्थी तर दुसरा व्यसनी. थोरला पक्का मतलबी, कावेबाज. गोड बोलून आई, भावाच्या सह्या घेऊन वडीलोपार्जित जमीन विकली अन सगळा पैसा स्वतः घेतला. आईला जुनं घर आणि दोन लाख दिले आणि अजून जबाबदारी नको म्हणून संबंध तोडले तर धाकटा हूशार पण मनासारखी नोकरी मिळाली नाही म्हणून हताश झालेला. चार पाच ठिकाणी नोकरी केली पण कुठंच टिकला नाही. यश मिळालं नाही. त्यात भावानं फसवलं म्हणजे आगीत तेल. नोकरीचे प्रयत्न सोडून स्वतःचीच किव करू लागला. दारूचा आधार घेतला आणि त्यात गुरफटला. सुधारण्यासाठी बाईंनी बरेच प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही. बाईंचे अनेक विद्यार्थी आयुष्यात यशस्वी झाले परंतु त्यांची मुलं मात्र??? मुलांना घडवण्यातलं अपयश खूप मनाला लागलं. स्वाभीमान दुखावला. चांगले संस्कार देऊनही मुलं नाकर्ते निघाली. हा स्वतःचा मोठा पराभव वाटला. चेहऱ्यावरचं हसू संपलं. वागणं एकदम निर्वीकार. तोंड दाखवायची लाज वाटायची म्हणून घरातच थांबायच्या. कामापुरतचं घराबाहेर पडणं. मोजकं बोलणं. कुठं येण-जाणं नाही. कार्यक्रमात सहभाग नाही. भेटीगाठी नाहीत. तोंडाला कायम कूलूप फक्त विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं द्यायच्या. घर पेन्शनवर चाललेलं. दोन्ही मुलं आपापल्या जगात गुंग. काहीही चूक नसताना शिक्षा बाई भोगत होत्या. साहजीकच तब्येतीवर परिणाम झालाच. बीपीचा त्रास होताच सोबतीला डायबिटीस आला. त्यासाठी औषध होती पण मानसिक त्रास वाढलेला. थोरला असून नसल्यासारखा तर धाकटा बिनकामाचा. कोणाचाच आधार नाही. एकाकी पडल्या मुळे बाई खचल्या. जे समोर येईल सहन करायचं हा मार्ग स्वीकारला.

मैत्रीणीच्या आयुष्याची फरफट सांगताना काकूंचे डोळे भरले अन मी सुद्धा भावुक झालो. काहीतरी करायला पाहिजे असं खूप वाटलं.

— 

दोन-तीन दिवसा नंतर रात्री पुन्हा तोच प्रकार. रहावलं नाही. तडक ऊठलो आणि खाली गेलो. हेलपाटणाऱ्या मुलाची बडबड सुरू आणि बाई समोर उभ्या. मुलाला समजवण्यासाठी पुढं गेलो तेव्हा बाईंनी थांबायची खूण केली आणि स्वतःच्या कपाळावरुन बोटानं आडवी रेघ मारत “नशिबाचे भोग आहेत. तेच फेडतेय. ”बोलताना बाईंचा चेहरा कमालीचा शांत अन डोळे कोरडे होते. मला नमस्कार करून बाई मुलाला घेऊन जिना चढायला लागल्या.

— 

दुःखं, राग, चीड, संताप यापलीकडे गेलेल्या बाई उतारवयात वाट्याला आलेली अवहेलना सहन करत करत तटस्थ झाल्या….. जगण्यातलं एक भयाण वास्तव पाहून खूप वाईट वाटलं.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पाऊणशे वर्षापूर्वीचा ‘वाडा’ संस्कृतीतील आमचा गणेशोत्सव ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ पाऊणशे वर्षापूर्वीचा ‘वाडा’ संस्कृतीतील आमचा गणेशोत्सव ☆ श्री दिवाकर बुरसे

तेव्हा आम्ही पुण्यात कसबा पेठेत सरदार श्रीमंत आबासाहेब मुजुमदार बोळातील एका वाड्यात रहात होतो हे सर्वांनाच माहित आहे.

त्या छोट्या घरातही गौरी-गणपतीचा सण थाटात साजरा व्हायचा. गणेशाच्या आगमनानंतर दोन दिवसांनी गौरींचे आगमन व्हायचे आणि दोघांचे निर्गमन, विसर्जन, बोळवण पाचव्या दिवशी व्हायचे अशी आमच्या घरची प्रथा होती. सामान्यतः सार्वजनिक गणेशोत्सव मात्र दहा दिवस चालायचे. आमच्या वाड्यातही सार्वजनिक गणपती बसवला जायचा.

त्यात तरुण मुलांचा पुढाकार असे. हे तरूण उत्सवाचे सारे नियोजन करीत. ते घरोघर जाऊन वर्गणी गोळा करीत. त्यातून सारा उत्सव संपन्न होई.

भाद्रपद मासातील पुण्याचे वायुमान सुखद असे. तसे पाहिले तर पुण्याचे एकूण वायुमान, उष्ण-शीत-पर्जन्य असे तिन्ही ऋतू अत्यंत सुखद, आल्हाददायकच असते. त्यावेळी उन्हाळ्यात सुद्धा पंख्याची आठवण क्वचितच व्हायची. पावसाळा जीवघेणा कधीच नसे. शीतकाळ सुखद, उत्साह, आरोग्यवर्धक वाटे. भाद्रपदात पावसाचा जोर कमी झालेला दिसे. तरीही आधूनमधून एखादी हलकी फुलकी सर येवून जायची. रात्री शाल, स्वेटरची आवश्यकता भासायची.

गणपतीची शाडूची मूर्ती वडिलांचे मूर्तिकार मित्र श्री पटवर्धन किंवा नातूंच्या वाड्यातले मूर्तिकार श्री गोखले यांच्याकडून आणायचो. आमच्या गौरी अगदी वेगळ्या आणि युनिक आहेत. पंच्चाहत्तर वर्षापूर्वीच्या आहेत. हे गौरींचे मुखवटे श्री शंकरराव चौधरी (बबूआत्याचे यजमान) यांनी दिलेले आहेत. आजही आम्ही त्यांचीच स्थापना करतो. जगात इतरत्र कुठेही असे मुखवटे उपलब्ध नाहीत.

माझी आई हाडाची कलाकार होती. तिच्या अंगी नेतृत्व गुणही उच्च प्रतीचे होते. गौरायांचे हात, विविध दागिने, वस्त्रे, फुले, फुलांच्या वेण्या, हार, मोत्यांच्या जाळ्या इ. सर्व ती स्वहस्ते बनवीत असे.

आमच्या वाड्यातल्या महिला हरतालिका व्रत एकत्र साजरे करीत. माझी आई- सर्वांच्या सिंधुबाई – या पूजेचे आयोजन करीत असे. पूजेसाठी, चौरंग, पाट, ताम्हणे, तांब्या-भांडी, पळ्या-पंचपात्री, फुले- बिल्वदले-पत्री इ. पूजासाहित्य जमवणे, मांडामांड करणे, शिवपिंडींसाठी स्वच्छ धुतलेली वाळू आणणे या सर्व गोष्टी ती वाड्यातल्या तरूण उत्साही मुला-मुलींकडून करवून घेत असे. पूजा सांगायला वाड्यातच राहणाऱ्या थिटे गुरुजींना पाचारण केले जाई.

हरतालिकेच्या दिवशी सर्व महिला, मुली उपवास करीत. रात्रभर जागरण करीत. विविध खेळ खेळत. त्या खेळात पाच ते पंच्यांशी वयाच्या स्त्रियांचा सहभाग असे. मध्यरात्री रुईच्या पानावरील मध चाटून दिवसभर केलेला निर्जळी उपवास सोडला जाई.

चतुर्थीला घरोघर गणेशाचे आगमन व प्रतिष्ठापना होत असे. आसमंत विविध सुगंधाच्या उदबत्त्या, फुले, पाने आणि पक्वान्ने यांच्या संमिश्र सुगंधाने कोंदाटून जायचा. धार्मिक पूजा, पाठ, कर्मे करणे हे घरातील कुटुंबप्रमुखाचे काम असे. वाड्यातील मुले अंगणात सार्वजनिक गणपती बसवीत. वर्षभर प्रतीक्षा केल्यावर येणारा हा त्यांचा मोठा आनंदोत्सव असे.

घरोघरी सकाळ-संध्याकाळ अथर्वशीर्षाची आवर्तने, आरत्या होत. मुले संध्याकाळी प्रत्येकाच्या घरच्या आरतीला आवर्जून जात. त्यामागे हुंदाडायला मिळणारी हक्काची मोकळीक आणि विविध प्रकारच्या खिरापतीं चाखण्याचे आकर्षण असे.

घरगुती आरत्यांनंतर सार्वजनिक गणपतीची आरती होत असे. प्रत्येक दिवसाच्या प्रसादाची जबाबदारी एकेक परिवार वाटून घेत असे. ह्या आरत्या दीर्घकाळ चालत, उत्तरोत्तर रंगत जात. अखेर मंत्रपुष्पांजली आणि गणेशाचा नामगजर झाल्यावर प्रत्येकाच्या हातावर घसघशीत प्रसाद पडे.

ऋषिपंचमीला महिला ऋषिस्मरण, ऋषिपूजन करून विशेष उपवास करीत. या उपवसाठी त्यांच्या अल्पोपहारात ‘ऋषींचे पदार्थ’, म्हणजे माणसाने पशूंचे सहकार्य न घेता स्वतः श्रम करून पिकवलेले धान्य, फळे, भाजीपाला इ. चा समावेश असे.

गणपती आणि गौरींना रंगीबेरंगी कर्दळी, डेलिया, झेनिया, आँस्टर, गुलाब इ. फुलांची आरास केली जायची. ही फुले आम्हाला आमचे एक नातेवाईक पुणे विद्यापीठातून आठवणीने, न चुकता घरपोच आणून देत. अशा प्रकारची दुर्मिळ वैविध्यपूर्ण फुले मंडईत सामान्यांना सहसा उपलब्ध नसत. वडील पाषाणकरांकडून गौरींसाठी केवड्याचे कणीस घेऊन येत. हीच पाने नंतर रेशमी महावस्त्रामधे पुढील वर्षभर ठेवली जात. त्याने वस्त्राना कसर लागत नसे आणि नेसल्यावर केवड्याचा मंद सुगंध दरवळत असे. आघाडा, दूर्वा, तेरड्याची व इतर फुले विकायला दारावर बाया येत. त्यांच्याकडून या वस्तू घेतल्या जात.

गणेश चतुर्थीला गणपतीला एकवीस उकडीच्या मोदकांचा नैवेद्य केला जात असे. पानात पडलेले गरम गरम मोदक आणि वर साजुक तुपाची धार असे तुडुंब जेवल्यावर काय हो, डोळ्यावर पेंग यायची अगदी!

गौरी आगमनाच्या दिवशी, घरोघरच्या महिला, मुली नटून-थटून-सजून या गौरायांचे ‘सोन्या मोत्याच्या पावलांनी’ स्वागत करीत. प्रत्येकीच्या केसात, अंबाड्यावर पांढऱ्या- पिवळ्या शेवंतीच्या, मधे मधे लालभडक रांगांची सुपारीची फुले आणि मयुरपंखाची हिरवीकंच नाजुक पाने, चंदेरी कलाबूत खोचलेल्या जाडसर सुतड्यात गुंफलेल्या ‘वेण्या’ माळलेल्या असंत. (आता सध्या बाजारात या वेण्या दिसतही नाहीत.) दारात सनई चोघडे झडत. मुली देवींना आपल्या घरात हिंडवून घराचा कोपरान् कोपरा दाखवीत. नंतर त्यांची प्राणप्रतिष्ठा व पूजा आरती केली जाई. देवींजवळ नंदादीप लावला जाई. संध्याकाळी पुन्हा आरती करून नैवेद्य अर्पिला जाई. नैवेद्याच्या ताटात साधा भात, वरण, ज्वारीची भाकरी आणि शेपूची, मेथीची भाजी असा साधा बेत असे.

गौरींच्या पुढची आरास लक्षवेधी असे. त्यात विविध फळे, फळभाज्या, मिष्टान्ने, पक्वान्ने, पाने-फुले, खेळणी इ. चा समावेष असे. सजावटीत निश्चित असे कल्पनासूत्र क्वचितच असे. गौरायांपुढे कुंची घातलेलं एक बाळ मात्र न विसरता मांडलं जायचं. ते फार गोंडस दिसायचं!

गौरी आगमनानंतरचा दुसऱा दिवस म्हणजे ‘गौरी पूजनाचा’, अत्यंत महत्वाचा दिवस. या दिवशी, दोन दिवस आधीच येवून बसलेले गणपती बाप्पा, आपले आसन सोडून, सरळ या गौरायांच्या जवळ, अगदी मधोमध येवून बसत.

या दिवशी गौरी-गणपतींचे विशेष लाड, कौतुक केले जाई. माहेरवाशिणी म्हणून आलेल्या जेष्ठा-कनिष्ठा आणि त्यांचा भाऊराया गणेश यांच्या कौटुंबिक संम्मेलनात सणाच्या निमित्ताने घरोघरी आलेल्या माहेरवाशिणी आणि भाऊ सहभागी होत असत. सारी भावंडे एकत्र येवून, मिळून मिसळून आनंद उधळत.

माझी आई सुग्रण होती. तिचा नेहमीचा साधा स्वयंपाकही फार रुचकर असे. तिला स्वतः केडगांवच्या सद्गुरु श्री नारायण महाराजांचे आशीर्वाद लाभले होते. तिचे ‘अन्नपूर्णा’ हे नामकरणही त्यांनीच केले होते. ती खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा होती. शेकडो, हजारो माणसे तिच्या हातचे जेऊन संतुष्ट झाली आहेत.

आमच्या दुसऱ्या, म्हणजे भाऊकाकांच्या घरीही स्वतंत्र गौरी असत. इतर मेनू बहुतेक सारखाच असे. माझी कुसुमकाकू रव्याचे लाडू करीत असे. तिच्या हातचे रव्याचे लाडू खाणे हा एक स्वर्गीय आनंद होता. तसे लाडू मी आजपर्यंत अन्यत्र चाखले नाहीत. कौतुक म्हणजे काकू माझ्यासाठी हे लाडू राखून ठेवीत असे. मग पुढचे आठ दहा दिवस मी रोज काकांकडे जात असे.

गौरीं पूजनाच्या दिवशी, म्हणजे गौरी जेवायच्या दिवशी विशेष भोजन, महाप्रसाद केला जात असे. त्यात हिरवी नारळाची चटणी, वाटलेली कोरडी डाळ, पंचामृत, डांगर, मावळी काकडीची कोशिंबीर, मोहरी वाटून लावलेले लाल भोपळ्याचे भरीत, गव्हल्या-नखुल्या-मालत्यांच्या खिरी, साधा भात, मसाले भात, साधे वरण, कुरडया, पापड, पापड्या, घोसाळ्याची भजी आणि पडवळ घालून केलेची ताकाची कढी (ही घोसाळ्याची भजी आणि पडवळाची कढी अत्यावश्यक असे.) पेशवाईतील प्रसिद्ध वैशिष्ठ्यपूर्ण ब्राह्मणी आळूची पातळ भाजी, (हिलाच कोकणात ‘आळूचे फदफदे’ या गलिच्छ नावाने संबोधतात! ) कटाची आमटी, उसळलेल्या मिरच्या, बटाट्याची कोरडी भाजी, श्रावण घेवड्याची भाजी (श्रावण घेवडा हा खास ‘पुणेरी’ शब्द. इतरेजन त्यालाच फरसबी म्हणतात) साखरी भात, पुरण पोळी, श्रीखंड, सुधारस, रव्याचे लाडू आणि पोटात पत्रीसाखर दडवलेले, वेलदोडे घातलेले, वर बेदाणे जडवलेले, साजूक तुपातले बेसनाचे लाडू!

जेवणात साजूक तुपाचा प्रच्छन्न उपयोग होत असे. तूप चमच्याने वाढण्याऐवजी वाटीत वाढले जात असे. (त्या वाट्याही वेगळ्या आकाराच्या असत. त्यांना ‘द्रोण’ म्हणत. राजा केळकर संग्रहालयात आता दिसतात.) मोदक, पुरणपोळी यावर वरून तुपाचे तामले उलटे करण्याचीही प्रथा होती! कलोस्टेरल, कॅलरी कॉन्शसनेस, वर्कआऊट, बॅलन्स डाएट, झीरो फिगर असले अभद्र शब्द अजून जन्माला यायचे होते!

भोजनानंतर गौरी गणपतीला मुखवासार्थे त्रयोदशगुणी नागवल्लीच्या ५-७ पानांचे गोविंदविडे अर्पण केले जात. या दिवशी आम्हा मुलांनाही विडा खाण्याची अनुमती असे. जिभा बाहेर काढून कुणाचा विडा किती रंगलाय हे प्रदर्शित करण्याची स्पर्धा लागे. एखाद्याचा विडा जरा कमी रंगलेला असेल तर तो परत दुसरा विडा खायला धावायचा. एरवी मात्र मुलांसाठी तांबूलभक्षण पूर्णतः निषिद्ध, वर्ज्य असे.

एका वर्षी माझ्या मावशीचे यजमान स्व. श्रीमान सरदार माधवराव पुरंदरे यांनी तर चक्क एकवीस पानांचे भलेमोठे गोविंदविडे बनविल्याचे मला आठवते. मी त्यावेळी तीन-चार वर्षांचा असेन. तो एक विडा उचलण्यासाठी मला माझ्या दोन्ही बालभुजांचा उपयोग करावा लागला होता!

एकावर्षी प्रतिवर्षीप्रमाणे वाड्यात सार्वजनिक गणपती बसला. एक – दोन दिवस आनंदात, उत्साहात गेले. पण तिसऱ्या दिवशी रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला. अंगणात तळे साठले. सर्वात दुर्दैव म्हणजे गणेश मूर्तीवरील मंडपाच्या छतातून पाणी गळू लागले. रात्रभर त्या पाण्याचा अभिषेक शाडूच्या प्रतिष्ठित मूर्तीच्या माथ्यावर नव्हे पण मांडीवर होत राहिला.

सकाळी एक कार्यकर्ता मूर्तीजवळ जाऊन पाहतो तो काय, संपूर्ण मूर्ती भिजली होतीच, पण मूर्तीच्या मांडीवर पाण्याची संतत धार पडून मांडीला भले मोठे छिद्र पडले होते. शरीराचा काही भागही विरघळून गेलेला!

अशी भंगलेली मूर्ती पूजेत ठेवणे अयोग्य असे जाणकार वरिष्ठ मंडळींनी सांगितले. मग काय लगेच दुसरी मूर्ती आणून, तिची विधिवत स्थापना करून पुढील दिवस पुढील दिवस साजरे केले. अनंत चतुर्दशीला दोन्ही मूर्तींचे विसर्जन केले गेले.

या वर्षीचा (कदाचित१९५२-५५ साल असावे) हा गौरी जेवण्याचा दिवस मात्र अभद्र ठरला!

आमच्या शेजारी शंकरराव व पार्वतीबाई अभ्यंकर हे दाम्पत्य आपला मुलगा काशीनाथ व सून सुमतीसह रहात होते. शंकरराव तथा तात्यांची प्रकृती बरी नव्हती. जलोदराच्या महाव्याधीने ते त्रस्त होते. श्रावण कसाबसा गेला. भाद्रपद उजाडताच त्यांचा रोग बळावला. गणेश चतुर्थी पार पडली. गौरी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

आमच्या दारावरून तात्यांचे कलेवर नेताना घराचे दार लोटावे लागले. अंगणातल्या सार्वजनिक गणेशाला चादरीच्या पडद्याआड झाकावे लागले. तात्यांचा देह ओंकारेश्वर स्मशानात नेला गेला. अंत्यविधी उरकून पुरुषमंडळी परतली. काहींनी वाड्यातल्या नळ कोंडाळ्यावरच स्नाने उरकली तर काहींनी आपापल्या घरी केली. त्या दिवशी गणपतीची सायंपूजा व आरती झाली नाही. पुढील उर्वरित पाच दिवस कोणीतरी पूजा करीत असे. पण ह्या पाच दिवसात सर्वांनीच सुतक पाळले. हा गणेशोत्सव साधेपणाने झाला.

तिसऱ्या दिवशीच्या भोजनाचा मेनू सामान्य असे. पोळी, भाजी, चटणी इ. मिष्टान्न म्हणून पुरणाचे कडबू केले जात. जेवणाच्या अखेरीस दही भात आवश्यक.

दुपारनंतर गौरी गणपतींच्या विसर्जनाची तयारी सुरू व्हायची. गणपती विसर्जनाला वाटलेली कच्ची हरभऱ्याची डाळ, तिला चरचरीत हिंग-जिऱ्याची फोडणी दिलेली असे. इतर जिन्नस मिरची, कोथिंबीर, जिरे, मीठ, लिंबाचा रस इ. चिमूटभर साखरही घातलेली असे. काही अपवाद वगळता, सर्व तिखट मिठाच्या पदार्थात गूळ किंवा साखर आवश्यक. ते आमच्या पुणेरी ब्राह्मणी खाद्यसंस्कृतीचे वैशिष्ठ्य आहे.

सायंकाळची आरती व्हायची. या वेळचे वातावरण भक्तिमय, आनंदमय असे पण त्याला उदासपणाची किनार असे. गौरी गणपतीच्या विरहाच्या कल्पनेने डोळ्यांच्या कडा ओलावल्या जायच्या. आता तब्बल एक वर्ष वाट पहावी लागणार या कल्पनेने सारेच भावुक होत. वडिल मंडळींनाही एका बाजूला तोंड वळवून कोणाला न कळत, धोतराच्या सोग्याने आपले पाणावलेले डोळे टिपताना मी पाहिलं आहे अनेक वेळा!

अखेरची आरती व मंत्रपुष्पांजली झाल्यावर सर्वजण देवांना फुले अक्षता वहात आणि घश्यात आडकलेला उमासा आवरत ‘पुनरागमनायच’ म्हणून देवांना साष्टांग नमन करून अखेरचा निरोप देत. गृहिणी देवांच्या हातावर कानवले आणि चमचाभर कवडीचे दही ठेवी.

गणपती एका ताम्हनात ठेवला जाई. गौरींचे मुखवटे जागेवर किंचित हलवून त्यांचेही लाक्षणिक विसर्जन होई. पुरुष मंडळी आणि मुले गणेशमूर्ती वाजत-गाजत- नाचत नदीवर नेऊन विसर्जित करीत. जाताना ‘गणपतिबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लौकर या’ असा अखंड घोष केला जाई.

घरी राहिलेल्या महिला गौरींचे मुखवटे गादीच्या पिशवीत गुंडाळून अलगद डब्यात ठेवीत. इतर वस्तूंची आवराआवर करून त्या जागच्या जागी जात. घरी पोहोचेपर्यंत सगळी आवराआवर झालेली असे. ‘ होत्याचे नव्हते’ झालेले असे!

नदीवरून घरी परतताना आठवणीने नदीकाठची मुठभर वाळू आणून घरात सर्वत्र टाकली जायची. परतीच्या वाटेवर भेटणाऱ्या प्रत्येकाला प्रसाद दिला जायचा. तो प्रसाद भेटेल त्याला आणि वाड्यातील घरोघरी जाऊन दिला जायचा.

गणेश विसर्जन करून परत आलेली मुले मात्र परस्पर घरी जाणे टाळून अंगणातील सार्वजनिक गणपतीच्या रिकाम्या मांडवात उगाचंच रेंगाळत रहात. ती काहीशी शांत, उदास, मलूल, रडवेली, केविलवाणी दिसत!

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खुद को खुश रखिए बस्… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ खुद को खुश रखिए बस्… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

जागतिक ज्येष्ठ दिनाच्या शुभेच्छा – – 

काल आमच्या जेष्ठ नागरिक संघात ‘जागतिक महिला दिनाच्या ‘निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मी देशपांडे काकां काकूना घेऊन गेलो. आज त्यांना पण संघाचे मेंबर बनविले. ••••

अजय काल आॅफिस मधे जाताना तसे सांगूनच गेला होता. अजय म्हणाला, •••• काका, आज आई बाबांना पण घेऊन‌ जा. अजिबात घरातून निघत नाहीत. अशाने आजारी पडतील. •••••

मी व देशपांडे काका काकू आम्ही वेळेच्या आधी पोचलो. सर्व ‘ formalities’ पूर्ण केल्या. बऱ्याच जणांशी‌ ओळख ही करून दिली. काही जण ओळखीचे पण भेटले. •••••

आजचा कार्यक्रम छान झाला.

सर्व जेष्ठ बंधू आणि भगिनींनी उत्साहाने‌ भाग घेतला. सर्व ज्येष्ठांसाठी हा संघ म्हणजे विसाव्याची एक उत्तम जागा आहे. त्यांच्या वयाचे मित्र, मैत्रिणी भेटतात. छान गप्पा रंगतात. प्रत्येकाला आपली कला दाखवायचा chance मिळतो. आतापर्यंतचे आयुष्य घर संसार, मुलं बाळं, नोकरी करण्यातच गेले. कुठे तरी सुप्त इच्छा राहुनच गेल्या. प्रत्त्येकात छोटा मोठा कलाकार लपलेलाच असतो. काही न काही छंद असतातच. ••••

आता पुन्हा एकदा आयुष्याच्या या वळणावर मौका मिळाला आहे. आपले गुण प्रदर्शन करण्याकरिता. आणि आता तर कोण काय म्हणेल???? ही भीतीही कमी झाली आहे. थोडबहुत विसरलं तरी चालतं. एकच लाईन दोन-तीन दा म्हंटली तरी चालते. म्हणजे अगदी अध्यक्षांचे नाव विसरले तरी कोणी काही म्हणत नाही. देशपांडे ना कुलकर्णी म्हटले, किंवा मराठे ना जोशी म्हंटले तरी चालतं. लगेच कोणी तरी सुधार कार्य करतातच. खुर्चीतुन उठताना आधार देतात. बसताना खुर्ची पकडून ठेवतात. सभा संपली की,

काका!! तुम्ही राहु द्या. मी ठेवतो तुमची खुर्ची. •••

काका!! तुम्ही बसा. मी आणतो चहा तुमच्या साठी. •••असं म्हणणारे भेटतात. काका येऊ का???? घरापर्यंत पोहोचवायला विचारतात. बरं वाटतं ना.!! कोणी असं विचारलं तर. स्वतः बद्दलच अभिमान वाटतो, की एवढे लोक आहेत मला विचारणारे.!! ही ‘VIP Treatment ‘ मनाला कुठे तरी आनंद देते. गाण्याचा कार्यक्रम असल्यास ‘Music therapy ‘ सहज होते व टाळ्या वाजविल्याने ‘accupressure therapy’ पण होऊन जाते. ••••

” एक पंथ‌ दो काज ” सहज होतात. •••

एकंदरीत जेष्ठ नागरिक संघ म्हणजे आपली हौस पूर्ण करायचे एक उत्तम ठिकाण आहे. प्रेक्षक आणि कलाकार दोघेही आपलीच माणसे असतात. तेथेच आपल्या आवडीचे काही असेही मित्र भेटतात, जे मोबाईल वर कसे काम करायचे.??? हे शिकवतात. संध्याकाळी बागेत भेटतात. हळुहळू मैत्री वाढते. मित्रांच्या ओढीने रोज बागेत फिरायला जायचा उत्साह वाढतो. गप्पा रंगतात. रोजच्या दिवसाची सुरुवात उत्साहाने होते. ••••

हेच तर आवश्यक आहे. सर्व ज्येष्ठांना. आयुष्याच्या या फेज मधे प्रत्त्येक दिवस चांगला उगवला व आनंदाने मावळला तर. यापेक्षा दुसरे काय हवे?? •••

“कुल मिलाकर फायदे का सौदा है ।”

पाय दुखतात, कंबर दुखते, मी इतक्यात विसरतो, लक्षात रहात नाही. हे सर्व तर होणारच आहे. याच पायांच्या भरवशावर तर आता पर्यंत धावत होता ना तुम्ही. मग ते थकणार नाही का.??? हे सर्व चालतच राहणार आहे. म्हणून काय घरीच बसायचं का‌?? मग हे सर्व मित्र कसे काय भेटणार?? येथे आल्यावर थोडा वेळ का होईना आपलं दुःख, त्रास विसरतो आपण.. ••••

म्हणतात ना, ••••

” मित्र ते चिकित्सक असतात, जे आपल्या शब्दांनी, सहवासाने तुमचा उपचार करतात. ” •••••

सकाळपासून आजच्या कार्यक्रमाला जायचे आहे, म्हणून तयारी करतो, देशपांडे ना काय सांगायचे?? कुलकर्णी ना काय विचारायचे???? याची चारदा उजळणी केली, म्हणजे रोज च्या पेक्षा आजचा दिवस वेगळा, जास्त ‘active ‘व चांगला गेला. नाही का.???

बस असाच प्रयत्न रोज झाला तर प्रत्त्येक दिवस अगदी मजेत जाईल. •••

रोज सकाळी उठून आज काय करायचे?? कोणाला फोन करू का??? देशपांडे ना फोन केला तर, कुलकर्णी कडील शुभ समाचार कळतो. तर उद्या कुलकर्णी ना फोन करा. तुमच्या व त्यांच्या आवडीच्या कॉमन विषयावर बोला. वर्तमानपत्रातील एखादी बातमी लक्षात ठेवून त्यांना सांगा. म्हणजे मेंदूची पण ‘exercise’ झाली ना. ••••

आयुष्याच्या गाडीचे स्टीअरिंग व्हील आपल्या हातात ठेवा. त्याला विचारपूर्वक कोणत्या दिशेने फिरवायचे ते ठरवा. जेथे तुम्हाला आनंद मिळेल तेथे जा. तुम्ही एक हात पुढे करुन तर बघा, तुमचा हात पकडणारे चार जण भेटतात की नाही. कधी तुम्ही पण कोणाला तरी आधार द्या. तुम्हाला ही चांगले वाटेल. आत्मविश्वास वाढेल. कधी तरी मस्त कट्ट्यावर बसून आपल्या मित्रांबरोबर चहा प्या. बघा तर मग, तुमचं वय पाच दहा वर्षांनी कमी झालेलं तुम्हालाच वाटेल. ••••

म्हणतात ना, ••••

“मृत्यू च्या आ्धीचा एक दिवस म्हणे उत्सव साजरा करायला सर्वात उत्तम दिवस असतो. पण तो दिवस नक्की कोणता??? हे माहीत नाही. तेंव्हा रोजचा दिवस शेवटचा दिवस समजून उत्सव साजरा करावा. “••••

आता आपल्याकरिता, ••••

 ” Every morning is symbol of rebirth for us. “••••

बाहेर जाताना थोडा राग, लोभ घरीच ठेवल्यास उत्तम. स्मार्ट आजोबा म्हणून लोकांनी ओळखावे, अशी इच्छा असल्यास 

थोडे नियमही लक्षात ठेवावे. ••••

“फक्त माझेच ऐका, हेही बरोबर नाही. प्रत्त्येक वेळेस माझाच झोका उंच गेला पाहिजे. हा हट्ट बरोबर नाही. आपल्या घरच्या गोष्टी सांगणे किंवा दुसऱ्यांच्या चौकशा करणे पण चूकच. “•••••

आज घरी आल्यावर देशपांडे काका काकू खुश होते. अजय अनिता ला बरे वाटले. त्यांनी एक मोठा गोळ्यांचा डबा बाबांना दिला. चिल्लर पैसे त्यांच्या जवळ दिले. बाहेर जाताना. पैसे ठेवत जा. या गोळ्या आपल्या मित्रांकरिता घेऊन जात जा. असं अजय म्हणाला. •••••

घरचे जेष्ठ आनंदी असले, म्हणजे घरचे वातावरण आनंदी राहते. •••••

” खुद को खुश रखिए, वो भी एक बडी जिम्मेदारी हैं।”

म्हणतात ना, ••••••

“No luxuries are required to be happy.

It needs only positive attitude and good company. “

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares