मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मी तो केवळ भारवाही… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मी तो केवळ भारवाही…☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

असं म्हणतात गुडघे दुमडता आले तर कोणतीच चादर छोटी पडत नाही…!

आयुष्यात तडजोड ही करावीच लागते…!! !  

नात्यांसाठी तडजोड करणे हा तर आयुष्याचा एक भागच आहे…

– नाती टिकवायची असतील तर कोणाला तरी झुकावंच लागतं…. आपल्या माणसांपुढे झुकण्यात कसली आलीय शरम…?

आणि असं आहे, डोंगरा वर चढणारा माणूस कायम झुकलेला असतो… पण तो वर जात असतो….!

उताराला लागलेला माणूसच छाती पुढे काढून भराभरा चालत असतो, पण तो “खाली” येत असतो….!

– – ज्याच्याकडे उंची असेल तोच झुकू शकतो… आणि झुकणं म्हणजे हरणं नव्हे, नाती जिंकण्यासाठी केलेला तो प्रणाम असतो…!

“झुकणं” आणि “हरणं” समजण्यात गल्लत झाल्यामुळे, अशी कित्येक नाती छिन्न विच्छिन्न होऊन रस्त्यावर आली आहेत, जगण्याचा शाप घेऊन, मरणाची याचना करत जगत आहेत…!

अशा याचकांचं जगणं कुठं तरी सुसह्य करता यावं, सन्मानाने त्यांना जगता यावं, यासाठी आपणा सर्वांच्या साथीनं केलेल्या काही प्रयत्नांचा हा लेखा जोखा…..

या महिन्यात, नेहमीप्रमाणे रस्त्यावरील गोरगरीब आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणारे गोरगरीब यांना अन्नपूर्णा प्रकल्पातून आपण जेवणाचे डबे दिले आहेत….!

– सणासुदीला गोडधोड दिले आहे…!

– रस्त्यावर पडलेल्या अनेक लोकांच्या तपासण्या रस्त्यावरच करून… गंभीर रुग्णांना दवाखान्यात ऍडमिट केले, बरे झाल्यावर त्यांना आपण व्यवसाय टाकून देणार आहोत.

– जून जुलै महिने पोरांच्या शिक्षणाचे…. “भीक नको बाई शिक” या प्रकल्पांतर्गत या महिनाअखेर, पूर्वी भीक मागणाऱ्या परंतु आता शाळा कॉलेजला जाणाऱ्या 52 मुले आणि मुली यांच्या शाळा कॉलेजच्या फी आणि शैक्षणिक साहित्य घेऊन दिले आहे……. सांगायला अत्यंत आनंद होतोय की एके काळी भीक मागणारी मुलगी यावर्षी बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (BBA) मध्ये फर्स्ट क्लासने ग्रॅज्युएट झाली, सध्या माझ्या या मुलीसाठी जॉब शोधतो आहे 

– – रस्त्याकडेला पडलेल्या, या कोमेजलेल्या फुलांचा आता एक सुंदर हार तयार होईल…!

या सर्व पोरा पोरींना सांगून ठेवलंय, आयुष्यात जिंकाल तेव्हा आवरायला शिका आणि हराल तेव्हा सावरायला शिका…! हरणं हे मिठासारखंच असतं; परंतु बाळांनो आयुष्याला चव त्यामुळेच येते…!

हरणं चवीपुरतंच घ्यायचं… कैरीच्या फोडीवर घेतो तसं…!! !  

– – आणि हो, खूप पैशे कमवले म्हणजे यशस्वी झालात असं समजू नका….

दुसऱ्याच्या आनंदासाठी काहीतरी करायची इच्छा जेव्हा मनात निर्माण होईल, त्यावेळी यशस्वी झालात असं समजा… आपल्याला पाहून कोणाला भीती वाटेल असा वाघ आपल्याला व्हायचंच नाही….

संकटात सापडलेलं कुणी, आपल्याला पाहून गळ्यात पडून म्हणेल, बरं झालं, तुम्ही आलात, तुम्हाला पाहून मला खूप धीर आला, तुमचीच वाट पाहत होतो…! तेव्हा समजा तुम्ही यशस्वी झालात…

– बाळांनो, स्वतःसाठी वापरतात ते नुसतंच धन असतं… दुसऱ्याच्या आनंदासाठी वापरता त्यावेळी ते धन, लक्ष्मी होतं…!

– आणि शेवटी काय रे…. चंदनाचा टिळा दुसऱ्याच्या कपाळावर लावला, तरी आपले हात सुगंधी होतातच की…! आषाढाच्या शेवटच्या दिवशी अमावस्या येऊन गेली, पण जाताना श्रावण देऊन गेली…

…. या अमावस्येला सुद्धा आमचे “मध्यरात्रीचे सूर्य” मात्र चमकतच होते.

एका महोदयांनी मला विचारले, “ तुमच्या सेंटरवर किती भिकारी काम करतात? किती कामगार आहेत?? ” 

त्यांना म्हणालो, “ माऊली, ते आता भिक्षेकरी नाहीत; कष्टकरी झाले आहेत, आणि आपल्या सेंटरवर ते कामगार म्हणून नाही; तर भागीदार म्हणून काम करतात. ” 

– – हो…. या सेंटरमुळे जवळपास 50 अंध अपंग आणि वृद्धांना रोजगार मिळाला आहे. आणि ते कामगार नाहीत, आपले पार्टनर आहेत….!

…. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे…

…. कोमेजलेल्या मनात हिरवळ दाटली आहे…

…. डोळ्यातला पाऊस थांबला आहे…

…. आयुष्यात कोवळं ऊन पडलं आहे…

स्वतःच्या “जीवाला” श्रमिक करून… ” शिवाची पूजा ” या श्रावणात त्यांनी मांडली आहे…!

.. श्रावण… श्रावण म्हणजे अजून काय असतो…?

आपल्या या उपक्रमाची दखल पंतप्रधान कार्यालयाकडून घेण्यात आली आणि दूरदर्शन या सरकारी चॅनलवर त्याची बातमी करून संपूर्ण देशभर प्रसारित केली.

.. स्वतःला टीव्हीवर पाहताना त्यांना झालेला आनंद कोणत्या रंगात रेखाटू?

माऊली, स्वतःला टीव्हीवर पाहताना, त्यांच्या विस्फारलेल्या डोळ्यात मला आख्ख विश्व दिसलं….!

त्यांच्या आनंदाचं गाणं गायला शब्द कुठून आणू?

.. मला नेहमी असं वाटतं चित्रकला म्हणजे मूक गाणं… आणि गाणं म्हणजे बोलणारी चित्रकला…!

त्यांच्या प्रसन्न चेहऱ्यावर, एक “भावगीत”, ‘चित्र” म्हणून उमटलं होते…!

मी कसे गावून दाखवू हे भाव गीत…? हे चित्र कसं दाखवू मी तुम्हाला…???

…. अर्थात या भावगीताचे कवी आणि संगीतकार दानिश भाई शहा, विपुलभाई शहा आणि चित्रकार आपण सर्वजण…!! !  

– – मी नामधारी, भारवाही हमाल….!! !  

दारात पोस्टमन काहीतरी पार्सल घेऊन येतो… आपल्याला त्याचा चेहरा दिसतो… पण देणारा कुणीतरी वेगळाच असतो….! तसंच काहीसं आहे… मी फक्त पोस्टमन…. मी स्वतः काहीच देत नाही…. फक्त योग्य पत्त्यावर पोहोचवतो…. देणारे आपण आहात…!! !  दारापर्यंत पोचवणारा पोस्टमन मी आहे… माझा फक्त चेहरा दिसतो… माऊली मी फक्त पोस्टमन नामधारी….! ‘ आपण धनी…. धन्याचा तो माल, मी फक्त भारवाही हमाल…!

माऊली आपल्या सर्वांना माझा आणि मनीषाचा शिरसाष्टांग नमस्कार…! आपल्या सर्वांमुळे हे सर्व काम सुरू आहे…. हे आम्ही जगत असताना…. दुसऱ्याला जगवत असताना…. मरेपर्यंत लक्षात ठेवू.

– – एक खंत आहे, प्रोफेशनल कंपनीने तयार केलेल्या प्रॉडक्टप्रमाणे माझ्या अंध अपंग वृद्ध आई-वडिल आणि आजी आजोबांनी केलेले प्रॉडक्ट प्रोफेशनल आहेत…! पण म्हणावा तसा खप नाही, विक्रीसाठी प्लॅटफॉर्म नाही, मार्केटिंग / बिझनेस हा माझा पिंड नाही, लोकांचे पगार करायच्या दिवशी दानिश भाई, विपुल भाई धावून येतात, तरीही क्रेडिट कार्ड वरती लोन काढावेच लागते… पुढे काही दिवसाच्या आत ते फेडावेच लागते…. ते कुठून फेडावे कळत नाही….!

प्रकल्प चालू होऊन चारच महिने झाले, कौतुकाचा वर्षाव होऊन, या चार महिन्यात विविध स्तरातून मला 6-7 पुरस्कार मिळाले…! पण माऊली मला पुरस्कार नको… मला मिळालेल्या पुरस्कारामुळे माझ्या रस्त्यावरच्या माणसांची चूल पेटणार नाही…. माझं कोणतंही कौतुक नको, पाठीवर शाबासकीची थापही नको…

– – कारण कौतुक आणि शाबासकी मला जगण्याचं बळ देतात; परंतु या बळाची गरज माझ्यापेक्षा, माझ्या रस्त्यावरच्या अंध अपंग आई-वडिलांना आहे…! आणि माझ्या होणाऱ्या कौतुकामुळे त्यांची पोटं भरत नाहीत…

…. मला एक ठिणगी हवी आहे… त्यांची चूल पेटवण्यासाठी…

…. फक्त एक फुंकर हवी आहे, त्यांच्यातला निखारा धुमसता ठेवण्यासाठी…

…. दोन हातांची ओंजळ हवी आहे, पेटलेली ज्योत तेवती ठेवण्यासाठी…

…. एक शब्द हवा आहे, त्यांच्या आयुष्याची कविता लिहिण्यासाठी…!

आपले स्नेहांकित,

डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे.

 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मक्याचं कणीस… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

सुश्री नीला महाबळ गोडबोले

??

☆ मक्याचं कणीस… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले

आषाढ -श्रावणाचा चिंब ओला दिवस..

आमच्या घराची कडी ठोठावली जायची..

घरी कुणी आलेलं आवडण्याचं ते वय नि तो काळ.. अगदी निरागस..

मी धावत जाऊन दार उघडायची..

” बाबा आहेत का? “.. भारदस्त आवाजातला प्रश्न.. सायकल भिंतीशी लावत विचारलेला..

गोरा रंग, पिंगट-घारे डोळे, भरपूर उंची, पांढरा पायजमा, पांढरा सदरा नि पांढरीच टोपी.. अशा वेशातील ती व्यक्ती म्हणजे आप्पाकाका.. आप्पाकाका खाडीलकर..

काही व्यक्ती खूप जवळच्या असतात.. पण त्यांचं नातं आपल्याला कधीच कळत नाही..

त्यातलेच आमचे आप्पाकाका..

ते आमच्या बाबांचे कसलेतरी भाऊ होते..

नात्याचं नाव काहीही असो पण संबंध जवळकीचे होते.. आपुलकीचे होते..

” वहिनी कणसं काढून घ्या.. ताजी आणलीयेत शेतातून.. ” म्हणत ते आईच्या हातात एक भलीमोठी जड पिशवी देत..

ती कणसं आम्ही पुढचे कितीतरी दिवस खात असू…

मनानं आप्पाकाकांची नि कणसांची जोडी नकळत जुळवलेली…

आजही मक्याचं कणीस म्हटलं की आप्पाकाकाच् डोळ्यासमोर येतात..

पिस्त्याच्या रंगाशी जवळीक साधणारी कणसाची सालं… क्रेपच्या कापडासारखी..

रंग डोळ्याला नि स्पर्श बोटांना सुखावणारा..

या पानांच्या आतले मऊ मुलायम सोनेरी केस..

पाश्चिमात्य गो-या सुंदरीच्या भु-या केसांशी स्पर्धा करणारे..

गालांना गुदगुल्या करणारे..

या केसांच्या आतल्या दंतपंक्ती. मोत्यासारख्या.. पांढ-याशुभ्र नाहीतर पिवळसर.. एका सरळ रेषेतल्या…

आभाळ गच्च भरून आलेलं. ढगांना न पेलवणारं पाणी अखंड बरसणारं.. सारा आसमंत सर्दाळलेला..

” कणसं सोलून द्या पोरांनो ” आईचा आदेश..

कणीस सोलणं हे फार आवडीचं काम..

त्याचे सोनेरी केस एकमेकांच्या गालावर फिरवणं..

त्याच्या मिशा लावून गडगडाटी हासणं..

सालांच्या बाहुल्या, फुलं बनवणं..

यांनी आमचं बालपण रम्य केलं..

कणीस सोलण्याआधी आईनं सालं बाजुला करून दाण्यात नख टोचून पाहिलेलं.. त्यातून टचकन् दूध बाहेर आलेलं.. कणसाच्या कोवळेपणाची ग्वाही देणारं..

कणसात लोखंडी उलथन्याचं टोक खुपसून आई गॅसवर कणसं भाजायची..

त्या कुंद वातावरणात तो खमंग वास घरभर भरून रहायचा..

आई कणसांना निगुतीनं साजुक तूप, मीठ, लिंबू लावून आम्हाला द्यायची..

आम्ही तिघं भावडं घराच्या पायरीवर बसून 

पावसाच्या रिमझिमीच्या पार्श्वसंगीताच्या नादात मन लावून ते कणीस खायचो..

नि काळं झालेलं तोंड, नाक पाहून मनसोक्त हसायचो…

थोडी कमी कोवळी कणसं आई हळद, मीठ घालून उकडायची..

कणसाच्या दाण्यापेक्षा त्यातलं ते मिठाळ पाणी जास्त आनंद देऊन जायचं..

जून कणसं किसून आई ” मक्याची उसळ ” नावाचा अद्वितीय पदार्थ बनवत असे..

मोहरी, जिरे, कढीपत्ता घातलेली नि पांढ-याशुभ्र ओल्या खोब-याने, हिरव्यागार कोथिंबीरीने नि लिंबाच्या फोडीने सजलेली ती पिवळीधम्म लुसलुशीत उसळ मर्मबंधातली ठेव…!!  

बालपण सरलं..

लग्नानंतरच्या मंतरलेल्या दिवसांत नव-याबरोबर महाबळेश्वरच्या वेण्णा लेकच्या काठावर गुलाबी थंडीत खाल्लेलं कणीस रोमॅंटिक.. अविस्मरणीय..

ते फक्त कणीस नव्हतं.. त्याच्या चवीत सगळा माहोल उतरलेला…

हाडात शिरणारी थंडी नि त्यात भर घालणारा डोंगरातला पाऊस.. महाबळेश्वरचाच..

कुशीत कुडकुडणारी सात-आठ वर्षांची लेक..

वेण्णालेकजवळच्याच ” बगीचा ” मधलं ” गरमागरम ” कॉर्न पॅटीस ” नि त्या नंतरची वाफाळती कॉफी.. पुन्हा पुन्हा महाबळेश्वरकडे खेचणारी..

कालौघात ” स्वीट कॉर्न ” नं खाद्यजीवनात प्रवेश केला, देशी कणसाला दूर लोटलं अन् अख्खं खाद्यविश्व काबीज केलं..

ढबू मिरची, व्हिनेगार, चिली-सोयासॉस यांच्या स्वादानं ब्रह्मानंदी टाळी लावणारं क्लिअरकॉर्न सूप….

कुरकुरीत नूडल्स, रसरशीत स्वीट कॉर्न नि टोमऍटोसॉसच्या चवीतली टॅंगीकॉर्न भेळ..

कॉर्नच्या सारणाला बटाट्याच्या मृदु आवरणात लपेटून भाजलेली चविष्ट 

कॉर्न टिक्की…

खुसखुशीत खमंगकॉर्न पराठा..

चीज च्या चवीत न्हाऊन निघालेला नि टचकन मक्याचे दाणे दाताखाली आणणारा कॉर्न राईस..

पिवळ्या मक्याच्या दाण्यांनी नटलेला कॉर्न पिझा…

खुमासदार बेक्ड कॉर्न व्हेजिटेबल्स..

मक्याचे दाणे, टोमॅटो आणि इतर पदार्थांनी बनलेलं रंगीबेरंगी कॉर्न सलाड…

… किती म्हणून नावे घ्यावीत?

” कॉर्न क्लब ” नावाची रेस्टॉरंटची अख्खी साखळी जिभेचे ” कॉर्नचोचले ” पुरवायला उभी होती..!!  

भारताला व्यापून टाकलेल्या ” चिनी खाद्यसंस्कृतीने तर मक्याच्या पिठालीही अन्नात घुसवलं.. नि ” सर्वात्मका ” करून सोडलं..!!  

पंजाब्यांची मकईकी रोटी… लोण्यानं मढलेली नि त्याबरोबरचा हिरवागार सरसोंका साग.. लाजबाब… जिभेचे चोचले पुरवणारा नि तब्येतीलाही जपणारा..!!  

बोटाच्या आकाराचं इवलुसं, नुकतच भुईतून डोकावणारं ते नाजुकसं ” बेबी कॉर्न “मात्रं पदार्थात पाहिलं की माझा जीव हळहळतो.. भूकच मरून जाते..

जिव्हालौल्यासाठी त्या कोवळ्या जीवालाही न सोडणा-या मानवजातीचा राग येतो.. नि मी चमचा खाली ठेवते!!  

बालपण कधीचच सरलं..

तारुण्यानंही बाय बाय केलय..

गाडी आता उताराला लागलीय…

गाडीचे पार्ट्स अधूनमधून कुरकुर करतात..

हॉटेलिंगचा कंटाळा येतो..

चायनीज पोटाला मानवत नाही..

घरचा वरणभात नि भाकरीभाजी बरी वाटते…

पावसाळ्याचा एखादा झिम्माड दिवस असतो… गरमागरम चटपटीत खावसं वाटतं.. जिओ मार्ट मधून दोनच कणसं मागवतो..

पन्नास रुपयांची ती दोन कणसं पाहून भडकणा-या महागाईवर चर्चा करतो..

.. तेव्हा घरची -शेतातली ताजी कणसं म्हणत् पन्नास कणसं एकही पैसा न घेता मायेपोटी देणारे आप्पाकाका आठवतात..

कणसाची हिरवी सालं नि रेशमी सोनेरी केस कच-याच्या डब्यात टाकताना…

केसांच्या लावलेल्या मिशा नि आम्हा भावंडाचे ते निरागस चेहरे डोळ्यांसमोर हसू लागतात…

कणीस खाताना रंगलेल्या गप्पा कानात गुंजतात…

.. आम्ही नवरा-बायको एका भाजलेल्या कणसाचे दोन तुकडे करतो नि कोसळणा-या पावसाला साक्षी करत रिचवतो…

कणीस छानच असतं पण दातात अडकलेली कणसाच्या दाण्याची सालं हैराण करून सोडतात..

टूथ पिकने ती सालं दातातून काढताना… मात्रं..

आप्पाकाका, केसांच्या मिशा, सालांची फुलं, एकमेकांवर कणसांची सालं नि केस फेकत केलेली पळापळी, आईच्या हातची ती स्वर्गीय मक्याची उसळ…

मलमली तारुण्यातला कणसाच्या साक्षीनं अनुभवलेला एकमेकांचा गुलाबी सहवास…

लेकीला कवेत घेत भरवलेलं महाबळेश्वरातलं कॉर्न पॅटीस…

मिरजेहून कोल्हापुरला जाताना बहिणीकडे ओढ घेणारं मन नि रस्त्यावरचं कणीस…

कितीकिती हळव्या आठवणी काळजात झिम्मा खेळू लागतात…

नि लक्षात येतं…

.. कणसापेक्षा त्याच्यासोबतच्या आठवणी जास्त चवदार आहेत..

आयुष्यभर जिभेवरच नाहीतर काळजात रेंगाळणा-या!!  

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विवाहितांसाठी सुखी जीवनाची पाच सूत्रे… भाग – २ ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ विवाहितांसाठी सुखी जीवनाची पाच सूत्रे… भाग – २ ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

विवाहित पुरुषांसाठी 

१) पत्नीची कधीच कोणाबरोबर तुलना करू नका 

तुलना करूच नका…. ना इतरांकडे असलेल्या वस्तूंची, ना इतरांच्या पत्नीशी, ना इतरांच्या कोणत्याच गोष्टीची आपल्या जीवनाशी बरोबरी करू नका!! प्रत्येकाचे जीवन हे वेगळेच असते, त्यामुळे जे आपल्याला मिळाले आहे त्याचा विचार करून त्यात आनंद माना. कारण दुरून डोंगर साजरे असतात. म्हणून असे डोंगर दूरच ठेवा. समोरच्याची पत्नी बघ किती चांगली आहे…. असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा समोरच्याच्या दृष्टीनेही तुम्ही “समोरचे” असता त्यामुळे त्याच्या नजरेतून “तुमची” चांगली असणार न! हे लक्षात घ्या!

२) स्वतःला ठेवा फिट…. मग संसार होईल हिट 

प्रत्येक पुरुषाला खरेतर आपण छान दिसावे असे वाटते, त्यासाठी काहीजण प्रयत्न करतात मात्र काहीजण बेफिकीर राहून शरीराचा घेर आणि वजन वाढवतात. कोणत्याही स्त्रीला ढेरपोट्या नवरा आवडत नसतो. गबाळा राहिलेला आवडत नसतो. जसे नवऱ्याला घरी गेल्यावर बायकोने फ्रेश स्माईल देत, फ्रेश कपड्यात स्वागत करावे असं वाटत तसेच पुरुषांनीही बाहेरून घरी जाताना ऑफिसातच स्वतःला थोडं फ्रेश करावं, असेल तर सेंट किंवा पावडर लावून मग घरी जावे. थोडक्यात काय तर…. जे तुम्हाला तिच्याकडून अपेक्षित आहे तेच तुमच्याकडूनही तिला अपेक्षित असते. हे लक्षात घ्यावे.

जे स्वतःबद्दल तेच घराच्या सौंदर्याबद्दल….. तुम्हाला तुमचे घर हे सुंदरच असावे असे वाटते. त्याची यथाशक्ती जबाबदारी पत्नी उचलत असतेच. पण तिच्याही मागे बारा व्याप असतात. ते सांभाळून ती घर सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करते. अशावेळी जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा त्याकामात तुम्हीही हातभार लावू शकता की…! विशेषतः दोघेही नोकरी करणारे असतील तर तिथं नवऱ्याने हे जास्त काळजीने केले पाहिजे. असे ज्या घरातील पुरुष करतात त्या घराची गृहलक्ष्मी नक्कीच आनंदी राहते आणि ती आनंदी तर तुम्ही आनंदी न! घर आवरण्याच्या कामी आपल्या मुलांची मदत घेता येते आणि त्यातून नकळत मुलावर संस्कारही होतात.

३) पत्नीवर लक्ष ठेवा पण प्रेमाने!!

पत्नीचे वेळापत्रक प्रेमाने जाणून घ्या. तीही घरासाठी जमेल तसे धावत असते, हे लक्षात घ्या!! आणि मग तिच्या हातून एखादे जरी (छोटेसे) पण वेगळे काम चांगले झाले तर त्याचे कौतुक करा!! तिच्या आवडीचा गजरा किंवा एखादे चॉकलेटपण तिला अशावेळी खूप होते. कारण…

बक्षीस की किमत देखी नही जाती तो…. बक्षीस देनेवाले की नियत देखी जाती है!

त्यामुळे तिला हुरूप येतो आणि अजून चांगल्या गोष्टी ती करण्याचा प्रयत्न करते.! कौतुक कोणाला नको असते हो?? सर्वांनाच हवे असते!! मग त्यात कंजुषी का करायची?

महत्वाचे म्हणजे तिच्याबद्दल जिज्ञासू राहा पण भोचक राहू नका. जिज्ञासूपणा सुखकारी आणि भोचकपणा… प्रलयकारी!! त्यामुळे तिच्या पाठीमागे तिची पर्स, मोबाईल, कपाट अजिबात चेक करत बसू नका. तुम्हाला कसली शंका असेल तर तिच्यासमोर तिला सांगून या गोष्टी पाहू शकता. पाठीमागे नको. तसे केल्याने अविश्वासाचा पाया रचला जातो आणि सुखी संसाराला तडे जाणे सुरु होते.

कदाचित अशावेळी तुम्हाला न आवडणारं काहीतरी तिच्या पर्समध्ये, मोबाईलमध्ये सापडेल त्याबद्दल लगेच त्याला धारेवर धरण्याऐवजी ती गोष्ट का तिच्याकडे आहे हे समजून घ्या. उदा. कधीतरी केसात माळलेला गजरा संध्याकाळी कामावरून निघताना तिने पर्समध्ये टाकलेला असतो. आणि नंतर घरी आल्यावर तो काढायचा विसरून जाऊ शकते. आणि नंतरच्या दिवशी तो सुकून वाळून तिथंच राहतो. त्यावर इतर अनेक वस्तू पडत असतात आणि गजरा मग तळाशी पडून राहतो. नेमका तो तुम्हाला तो दिसला तर लगेच “हे हायजेनिक नाही…. वाईट आहे हे असं तुझ्यासाठीच” असं लेक्चर देण्यापेक्षा तुम्ही शांतपणे तो सुकलेला गजरा काढून डस्टबीनमध्ये टाकू शकता आणि एखादा हलकासा पुणेरी टॉन्ट मारून वातावरण हलकं करू शकता!

४) स्त्रियांच्या गरजा स्वतःसाठी कमी अन घरासाठी जास्त असतात अनेकांना असं वाटत की, पत्नी सतत काहीतरी मागतच असते. हे आणा, ते आणा,. अमुक पाहिजे, इत्यादी…. काही ठिकाणी हे खरेही आहे. पण माझ्या आजवरच्या निरीक्षणानुसार तरी बऱ्याच घरी त्या मागण्याच्या यादीत तिच्या स्वतःसाठीच्या गोष्टी कमी आणि घरासाठी, संसारासाठी व एकूणच कुटुंबासाठी लागणाऱ्या जास्त असतात. त्यामुळे कधीतरी तिने न मागता साधा दहा रुपयाचा गजरा अचानक एकेदिवशी घरी गेल्यावर तिला देऊन सरप्राईज केलं तरी ती खुश होते. नेहमी पैठणीच घेतली पाहिजे असं नाही! किंवा असेही करू शकता की समजा तिने किराणाची यादी दिलीय तर ते सामान घेऊन झाल्यावर न विसरता कधीतरी तिच्या आवडीची एखादी वस्तू. पदार्थ पण खरेदी करून घरी गेल्यावर… आधी किराणा पिशवी तिच्या हातात देऊन नंतर हळूच तिच्या आवडीची गोष्ट हळूच तिच्या समोर धरा… आणि तिचा चेहरा पहा! नाही तिने जादू की झप्पी दिली तर पहा!!

तिला रोज उठून तुम्ही लाड करावेत, अशी अपेक्षा मुळीच नसते!! पण कधीतरी मुद्दाम सवड काढून या गोष्टी करा!! दिवाळी दसर्याला तिला गिफ्ट देण्यापेक्षा एखाद्या रविवारी देखील असा तिच्या आवडीच्या गोष्टीचा “दसरा” करता येतो!! त्यातून मग संसार देखील हसरा होतो!!

५) कपबशी सारखं नको तर चपलांच्या जोड्यासारखं राहावं 

अनेकदा म्हणतात की, पतिपत्नी म्हणजे जणू कपबशी सारखं नातं! एक असेल तर दुसऱ्याला महत्व….

मात्र म्हणतो की, बशी फुटली तरी कपातून का होईना चहा पिता येतो की! त्यामुळे मी त्यापुढं जाऊन म्हणेन की….

पतिपत्नी म्हणजे चपलांच्या जोड्यासारखं नातं…. एक चप्पल हरवली तर दुसरीला अस्तित्व उरत नाही….

“तू आहे म्हणून मी आहे…. ” हि भावना कायम मनात (दोघांनीही) ठेवावी. कारण सुखी संसाराचा तोच गुरुमंत्र आहे. तसेच…..

“तू नही होती तो मेरा क्या होता रे” असं कधीतरी लाडात जेव्हा पत्नी तुम्हाला म्हणेल तेव्हा “स्वर्गसुख” म्हणजे काय असत ते पुरुषांना कळेल.

घरातला पसारा असो की मनातला पसारा असो….

एकाने पसरलं तर दुसऱ्याने सावरायचं असत.

हे विसरू नका!

वेळ काढून इतकं सगळं वाचल्याबद्दल तुमचे आभार!

– समाप्त –

© डॉ. धनंजय देशपांडे  

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

https://www. facebook. com/ddtilakroad

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तीन तिगाडा काम बिगाडा” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “तीन तिगाडा काम बिगाडा” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

३ हा अंक बऱ्याच जणांना अशुभ वाटतो. “तिन तिगाडा काम बिगाडा” अशी आपल्याकडे म्हण पण प्रचलित आहे.

आता जमाना बदलतो आहे आणि आता ३ हा अंक शुभ मानणाऱ्यांची संख्या जोमाने वाढते आहे. कुणाची जन्म तारीख ३ असते / कुणाचा जन्म महिना ३ असतो / काहींच्या जन्म तारखेच्या सगळ्या अंकांची बेरीज ३ होते, म्हणून ते स्वतःला नशीबवान समजतात. बरेच जण येन – केन प्रकारे ३ अंकाशी कनेक्ट राहण्याचा प्रयन्त करतात, जसे गाडीच्या रजिस्ट्रेशन नंबर ची बेरीज ३ झाली पाहिजे / मोबाईल नंबर च्या अंकांची बेरीज ३ झाली पाहिजे. यावरून मला एक जुनी घटना आठवली – 

नेहेमीप्रमाणे सकाळी फिरायला बाहेर पडलो. बायको सकाळी योगा क्लासला जाते, त्यामुळे मी नेहमी एकटाच असतो. फिरत फिरत मारुती मंदिराजवळ आलो आणि नेहमीच्या ठिकाणी, आज चक्क केव्हा तरी भेटणाऱ्या मॉर्निंग वॉक मैत्रिणी मेघना आणि मनवा यांची भेट झाली. तारीख होती २५ /०३ / २०१८.

मनवा : काका आज तारखे मधल्या सगळ्या अंकांची बेरीज सिंगल डिजिट मधे किती होते.

(मी आधी तोंडी बेरीज करायचा प्रयत्न केला, पण ते जमले नाही. मग आपल्या जुन्या सवयी प्रमाणे हातावरची कांडी मोजून ३ हे उत्तर काढले)

मी :

मनवा : काका उत्तर एकदम बरोबर आहे. इस बात पे, एक एक चाय हो जाये.

मी : मला तोंडी बेरीज करता आली नाही, म्हणून, पेनल्टी म्हणून, आजचा चहा माझ्याकडून.

मनवा : काका, काही जणांचा डावा मेंदू तल्लख असतो, ते लोक आकडेमोडीत हुशार असतात. तुमचा उजवा मेंदू तल्लख आहे, त्यामुळे तुम्हाला प्रेमाचे गणित चांगले जमते. Nothing wrong in that.

मेघना : काका ३ या आकड्यावरून तुमच्या डोक्यात लगेच काय विचार येतो.

मी : तिन तिगाडा काम बिगाडा.

मनवा : काका, इथेच आपण नेहमी चूक करतो. Think only positive.

मी : आपण ३ हा नेहमीच अशुभ मानत आलो आहोत. कुठलेही शुभ कार्य आणि ३ यांचे कधीच जमत नसते, अशी आपली परंपराच आहे. एखाद्याला ओवाळायचे असेल आणि तीनच बायका असतील, तर ते अशूभ होते, म्हणून एक स्त्री पुन्हा एकदा ओवाळते. महत्वाच्या कामाकरता कुठे जायचे असेल, आणि ३ जणं असतील, तर आपण एक सुपारी बरोबर नेतो.

मेघना : काका, आपल्याला यातूनच बाहेर पडायचे आहे. आपण नेहमी तिघे भेटतो. मजा येते ना? कधी वादावादी झाली आहे का? आपल्या गप्पांमध्ये आपण कधी कुणाविषयी वाईट बोलतो का? मग ३ अंक अशुभ कसा काय?

मनवा : काका, एखादे मोठे काम सुरु करायचे असेल; काही छोटी कामे करायची असतील, काही चांगल्या सवयी सुरु करायच्या असतील, जसे – रोज फिरायला जायचे आहे, रोज व्यायाम करायचा आहे, रोज योगा करायचे आहे, रोज घरच्यांबरोबर गप्पा मारायला वेळ काढायचा आहे, रोज या वेळात टीव्ही बंद ठेवायचा आहे, जंकफूड खाणे बंद करायचे आहे, वजन कमी करण्याकरता दीक्षित पॅटर्न सुरू करायचा आहे /

दिवेकर पॅटर्न सुरू करायचा आहे, असे जे जे मनात असेल, त्यांचा श्री गणेशा करताना आपण ब्रह्मा – विष्णू – महेश, या त्रिमूर्तींना श्रद्धा पूर्वक नमस्कार करतो आणि मग कामाला सुरुवात करतो.

मनातलं अस्तित्वात उतरणार हे नक्की. कारण त्यामागे शक्ती असणार आहे, या ३ देवतांची.

मेघना : काका, देवानी आपण कायम आनंदी असावं, याकरता आपल्या चेहेऱ्यावर ३ च अवयव दिले आहेत, जे आपल्या मर्जीप्रमाणे आपण उघडू शकतो आणि नको तेव्हा बंद ठेऊ शकतो. कान, डोळे आणि तोंड. नाक हे सतत उघडेच ठेवावे लागते. आपल्या चेहऱ्यावरच्या या ३ अवयवांचा आपण योग्य वापर केला, तर आपण कायम आनंदी राहू शकतो. कशी घ्यायची या तिघांची मदत —

तोंड – आवश्यक तेवढेच बोलणे

डोळे – न पटणार्‍या घटनांकडे डोळेझाक करणे.

कान – वाद विवाद घडवणाऱ्या गोष्टींकडे कानाडोळा करणे.

मी : ३ ची ही बाजू आधी कधी माझ्या लक्षातच आली नाही!

मी : तुमच्या दोघींच्या नावांमध्ये मेघना / मनवा ३ – ३ अक्षरे आहेत, त्यामुळेच तुम्हाला असे सुंदर विचार सुचत असणार हे नक्की.

मनवा : काका, तुमच्या सुधीर या नावात पण अक्षरे ३ च आहेत, हे विसरला का?

म्हणजे आपण तिघे आहोत आणि नावातली अक्षरं पण ३ – ३ – ३ आहेत. आपण नेहमी भेटतो मारुती मंदिरा जवळ. त्या देवाच्या नावामध्ये अक्षरं पण ३ च आहेत.

मेघना : काका, आमच्या दोघींच्या जन्म तारखेतल्या सगळ्या अंकांची बेरीज ३ होते, म्हणूनच आम्ही एकदम लकी आहोत. काका, तुम्ही पण कायमच लकी असता, तुमच्या जन्म तारखेतल्या अंकांची बेरीज करुन सांगा जरा. हमखास ३ च असणार!

मी : नशिबानी मला कायमच साथ दिली आहे हे नक्की, तुमच्या दोघींशी ओळख झाली, हे लकी असल्यामुळेच. पण त्याचा ३ शी काही संबंध असेल, असा मी विचारच कधी केला नव्हता आणि जन्मतारखेच्या अंकांची बेरीज पण कधी केली नव्हती. बेरीज करून बघतो. मी अंकांची बेरीज केली, आणि अहो – आश्चर्यम म्हणजे बेरीज ३ आली. मी उडालोच.

मी : नशीब कायम माझ्या पाठीशी कां असते, याचे कोडे मला आज तुमच्यामुळे उलगडले. माझी बेरीज पण ३ आहे. माझी जन्म तारीख आहे २० / ५ / १९४९.

मनवा आणि मेघना : वाह, क्या बात है. अंदाज एकदम परफेक्ट.

आमच्या गप्पा सुरू असताना बाजूला बसलेले चहा पिणारे पण आपापल्या खुर्च्या आमचे भोवती सरकवून आमच्या ग्रुप मध्ये सहभागी झाले होते.

एक जण : आज ३ या अंकाविषयी खूपच छान माहिती मिळाली. मी ३ या अंकाला अशुभच मानत होतो. यापुढे मात्र आता नाही.

दुसरे एक जण : (चहा वाल्यांना उद्देशून) दादा, या तिघांचं आजचं चहाचं बिल माझ्या नावावर मांडा. मजा आली. माझ्या मुलीची जन्मतारीख 3 मार्च आहे.

चहाचे दुकानदार : वा, वा, क्या बात है. मी पण तुमच्या गप्पा ऐकल्या, खूप नवीन विचार समजले. ३ अक्षरी नावे असणाऱ्या, जन्म तारखेच्या अंकांची बेरीज ३ असणाऱ्या, तुम्हा तिघांना माझा नमस्कार. आज पासून मी रोज ३ गरीब लोकांना चहा फ्री देणार आहे.

आम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. आणि एकमेकांना बाय – बाय करून आपापल्या मार्गाने निघालो.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ वेडा… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “वेडा…☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

मंदिराबाहेर नेहमीप्रमाणेच भिक्षेकरी तपासत होतो. तपासुन घेण्यासाठी, औषधांसाठी नेहमीचीच भिक्षेकर्यांची झुंबड.

सहज लक्ष गेलं एका कोपऱ्यात, तिकडे दगडावर एक बाबा बसलेले दिसले. बसणंताठ, नाक तरतरीत आणि सरळ, घारुळे डोळे, अंगावर साधे पण स्वच्छ कपडे. बराचवेळ मी तिरक्या नजरेने पहात होतो – हे भिक्षेकरी नक्कीच नव्हेत! सहज दिसलं, उजव्या घोट्यापासुन पाय नव्हता त्यांना, बाजुलाच कुबडी टेकवुन ठेवली होती.

थोड्या वेळानं सहज लक्ष गेलं, कोणीतरी काहीतरी देत होतं आणि ते घेत होते. अरे! माझा अंदाज चुकला तर. उत्सुकता वाढली म्हणुन त्यांच्याजवळ जायला लागलो तर कुणीतरी म्हणालं, “डॉक्टर, नका जावु, वेडा आहे तो! ”

उत्सुकता स्वस्थ बसू देईना म्हणुन गेलो. मला वाटलं ते मला पाहुन हात पुढे करतील. पण त्यांचा हात पुढं आलाच नाही तिथंही अंदाज चुकला माझा. मीच म्हणालो, “बाबा काही त्रास? ” कुबडी घेत हळुच उठत ते म्हणाले, “Good afternoon doctor. I think I may have some problem in my right eye! ”

मी उडालोच. इतकं अस्खलीत इंग्लिश ऐकुन. मी धक्क्यातून बाहेर येत डोळा बघितला, पिकलेला मोतीबिंदू होता. मी म्हणालो “मोतीबिंदु आहे बाबा, ऑपरेशन करावं लागेल. ” तसे म्हणाले, “Oh, cataract? I had cataract operation in 1999 for my left eye in Ruby Hospital but…”

हा प्रकार काहीतरी वेगळा आहे हे आता पक्कं जाणवलं, म्हणालो, “बाबा, तुम्ही इथं काय करताय?”

“मी रोजच इथं येतो दोन तास.”

“हो पण का? मला तर तुम्ही चांगले शिकलेले वाटता? ”

शिकलेले या शब्दावर जोर देत ते हसत म्हणाले, “शिकलेले? ”

म्हणालो, “बाबा तुम्ही थट्टा करताय का माझी? ”

“Oh no doc. Why would I? Sorry if I have hurt you! ”

“हर्ट नाही पण मला काही कळत नाहिये, काय चाललंय बाबा? ”

“कळुन घेवुन काय करणार आहात डॉक्टर? ”

“ओके, चला आपण तिकडे बसू, नाहीतर लोक तुम्हालाही वेडा म्हणतील! ” असं म्हणुन ते हसायला लागले. आम्ही दोघंही थोडं बाजूला जावुन एका टपरीत बसलो.

“Well Doctor, I am Mechanical Engineer. ” बाबांनी इंग्लिशमध्येच सुरुवात केली. “मी xxxxx या कंपनीत सिनीअर मशीन ऑपरेटर होतो, एका नविन ऑपरेटरला शिकवत असतांना पाय मशीन मध्ये अडकला, आणि हातात कुबडी आली. कंपनीने सर्व खर्च करुन वर आणखी थोडे पैसे देवुन घरी बसवलं. लंगड्या बैलाला कोण ठेवेल? मग स्वतःचं छोटं वर्कशॉप काढलं, मस्त घर घेतलं, मुलगाही मेकॅनिकल इंजिनियर आहे, वर्कशॉप वाढवुन त्याने छोटी कंपनी टाकली…”

मी चक्रावलो, “बाबा पण मग तुम्ही इथं कसे? ”

“मी? नशिबाचे भोग! मुलाने व्यवसाय वाढवायचा म्हणुन कंपनी आणि घर दोन्ही विकलं. म्हटलं पोराची भरभराट होत्येय. विकू दे! विकून सगळं घेऊन तो गेला जपानला. आणि आम्ही इथे उरलो जपानी बाहुल्या म्हणुन! ” ते हसायला लागले. हसणंही इतकं करुण असु शकतं. हे मी अनुभवलं…

“बाबा पण तुमच्याकडे स्किल आहे, लाथ माराल तिथं पाणी काढाल तुम्ही. ”

तुटलेल्या उजव्या पायाकडे पहात बाबा म्हणाले, “लाथ? कुठे आणि कशी मारु सांगा? ”

मी ओशाळलो, मलाच वाईट वाटलं. “आय मीन बाबा कुणीही नोकरी देईल तुम्हाला अजुनही, कारण या क्षेत्रातला तुमचा अनुभव खुप आहे”

“Yes Doctor, मी एका वर्कशॉपमध्ये आहेच कामाला. 7000 मिळतात मला”

माझ्या डोक्यातला तिढा काही सुटत नव्हता. “अहो बाबा तरी मग तुम्ही इथं कसे? ”

“डॉक्टर, मुलगा गेल्यावर एका चाळीत पत्र्याचं शेड घेतलंय भाड्यानं, तिथं मी आणि माझी बायको राहतो, तीला Paralysis आहे ती जागेवरुन उठू शकत नाही. मी 10 ते 5 ड्युटी करतो, 5-7 इथं बसतो, आणि घरी जावुन “तिघांचा” स्वयंपाक करतो! ”

“बाबा आत्ताच म्हणालात, घरी तुम्ही आणि बायको असता मग तिघांचा स्वयंपाक? ”

“डॉक्टर, माझ्या लहानपणी माझी आई वारली, माझ्या जिवलग मित्राच्या आईनेच त्याच्याबरोबर मलाही सांभाळलं, दोन वर्षांपूर्वी तो मित्र वारला हार्ट अटॅकने! 92 वर्षाच्या त्याच्या आईला मी आणलं मग माझ्याच पत्र्यात. ती कुठं जाईल आता या वयात? ”

मी सुन्न झालो. या बाबाचे स्वतःचे सर्व हाल, बायको अपंग, स्वतःला पाय नाही, घर धड नाही, जे होतं ते मुलानं विकलं. त्यात मित्राच्या म्हाताऱ्या आईला सांभाळतोय..

“बाबा, मुलानं तुम्हाला रस्त्यावर आणलं, तुम्हाला राग नाही येत त्याचा? ”

“No No Doctor, अहो ते त्याच्यासाठीच कमावलं होतं, घेतलं त्याने, काय चुकलं त्यात? ”

“बाबा घेण्याची पद्धत चुकली त्याची, त्यानं ओरबाडून घेतलं सर्व! ”

“डॉक्टर, अहो आपले पुर्वज माकड होते, शेपुट गेलं तरी ओरबाडायची सवय जाइल का माणसाची? ” असं म्हणुन हसता हसता तोंड फिरवलं. ते हसणं होतं कि लपवलेले हुंदके???

“बाबा, कळलं मला 7000 मध्ये भागत नाही तिघांचं म्हणुन तुम्ही इथं येता, बरोबर? ”

“No you are wrong Doctor. 7000 मध्ये मी सर्व मॅनेज करतोच सगळं, पण जी म्हातारी आई आहे मित्राची, तीला डायबेटीस आणि ब्लड प्रेशर दोन्हीची औषधं चालु आहेत, ती मात्र मॅनेज होत नाहीत या सात हजारात”

“मी येतो दोन तास इथे, कुणी दिलेलं अन्न मी स्विकारत नाही, पैसे कुणी दिले तर मात्र घेतो. तिची महिन्याची औषधं ओळखीच्या मेडिकल स्टोअर मधून आधीच घेतो आणि रोज दोन तासात जे पैसे मिळतील ते पैसे मेडिकलवाल्याला रोजच्या रोज देतो! ”

या बाबाला त्याचा स्वतःचा मुलगा सोडुन गेलाय आणि हा बसलाय दुस-याची आई सांभाळत. डोळ्यातुन पाणी येवु न देण्याचा आटोकाट प्रयत्न करुनही डोळे शेवटी मला दगा देतातच.

“बाबा, दुसऱ्याच्या आईसाठी तुम्ही इथं पैसे मागायला येता? ”

“दुसऱ्याची? अहो माझ्या लहानपणी खुप केलंय तीनं माझं. आता माझी पाळी आहे इतकंच! मी त्या दोघींना सांगितलंय.. 5 ते 7 आणखी एक काम मिळालंय म्हणुन…”

“बाबा, आणि त्यांना जर कळलं तुम्ही इथे मागता म्हणुन तर? ”

“अहो कसं कळेल? दोघीपण खाटेवर पडून.. इकडच्या कुशीवरुन तिकडं होता येत नाही त्यांना मी केल्याशिवाय. येतीलच कश्या त्या? हा.. हा.. द्या टाळी! ”

हुंदका लपवण्याची आता माझी पाळी होती पण बाबांइतका मी सराईत नव्हतो या लपवालपवीत!

ब-याच वेळानं लक्षात आलं टाळीसाठी दिलेला बाबांचा हात माझ्या हातात तसाच होता, तोच हात दोन्ही हातात घेवुन मी त्यांना विचारलं, “बाबा तुमच्या आईला मी डायबेटीस आणि ब्लड प्रेशरच्या गोळ्या कायम स्वरुपी दिल्या माझ्याकडुन तर तुम्हाला इथं हे असं मागावं लागणार नाही, Right?”

म्हणाले, “No Doctor, तुम्ही भिकाऱ्यांसाठी काम करता, तिला तुम्ही गोळ्या देणार म्हणजे एका अर्थी ती भिकारीच झाली ना? मी आहे अजुन समर्थ, तीचा मुलगा म्हणुन. मला कुणी भिकारी म्हणालं तरी चालेल पण तीला नाही”

“OK Doctor, जावु मी आता? घरी जावुन स्वयंपाक करायचा आहे अजुन”

“बाबा भिका-यांचा डॉक्टर म्हणुन नाही, तुमचा मुलगा समजून घ्या ना आज्जीसाठी औषधं…”

हात सोडवत ते म्हणाले, “डॉक्टर, आता या नात्यात मला अडकवु नका please… 

एक गेलाय सोडुन. आज मला आशेला लावून उद्या तुम्ही गेलात तर? सहन करायची ताकत नाही राहिली आता! ”

असं म्हणून ते कुबड्यांवर निघाले सुद्धा….

जाताना हळुच डोक्यावर हात ठेवला, म्हणाले, “काळजी घे बेटा स्वतःची…”

शब्दातुन त्यांनी मी लावलेलं मुलाचं नातं नाकारलं, पण डोक्यावरल्या हाताच्या गरम स्पर्शातुन जाणवलं, त्यांनी हे नातं मनोमन स्वीकारलंय..

या वेड्या माणसाला पाठीमागुनच नमस्कार करण्यासाठी माझे हात मग आपोआपच जुळले!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विवाहितांसाठी सुखी जीवनाची पाच सूत्रे… भाग – १ ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ विवाहितांसाठी सुखी जीवनाची पाच सूत्रे… भाग – १ ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

विवाहितांसाठी सुखी जीवनाची पाच सूत्रे – –

विवाहित महिलांसाठी

१) कधीच कुणाशी बरोबरी करू नका 

ना इतरांकडे असलेल्या वस्तूंची, ना इतरांच्या नवर्याची, ना इतरांच्या कोणत्याच गोष्टीची आपल्या जीवनाशी बरोबरी करू नका!! त्यातून निष्पन्न फार काही होत नाही उलट त्या ओझ्याने आपलाच माणूस दबून जातो आणि चिडचिड वाढते!! प्रत्येकाचे जीवन हे वेगळेच असते, त्यामुळे जे आपल्याला मिळाले आहे त्याचा विचार करून त्यात आनंद माना.

२) स्वतःसह घरही सुंदर ठेवा 

प्रत्येकीला जसे आपण छान दिसावे असे वाटते, त्यासाठी ती प्रयत्नही करते. तसेच आपले घर देखील कायम सुंदर राहील याची काळजी घ्या!! कारण पुरुषांना (जरी ते घरकामात मदत करत नसेल तरी) घर हे सुंदरच असावे असे वाटते. त्यामुळे घरातील पुरुषाला आनंदी ठेवण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे! याकामी आपल्या मुलांची मदत घेता येते आणि त्यातून नकळत मुलावर संस्कारही होतात. घरात पसारा दिसल्यावर पुरुषाच्या कपाळावर आठ्या का पडतात? याचा विचार करा 

३) पुरुषांवर लक्ष ठेवा पण प्रेमाने!!

पुरुषाचे बाहेरचे वेळापत्रक प्रेमाने जाणून घ्या!! तो आपल्यासाठीच धावपळ करतोय, हे लक्षात घ्या!! आणि मग त्याच्या हातून एखादे जरी (छोटेसे) काम चांगले झाले तर त्याचे ‘योग्य” त्या प्रकारे कौतुक करा!! त्यामुळे त्याला हुरूप येतो आणि अजून चांगल्या गोष्टी तो करू लागतो!! कौतुक कोणाला नको असते हो?? सर्वांनाच हवे असते!! मग त्यात कंजुषी का करायची?

महत्वाचे म्हणजे त्याच्या पाठीमागे त्याचे खिसे तपासत बसू नका. उलट त्याच्या समोर तपासा…. हे त्याला सुद्धा कदाचित आवडेल आणि दोघांमधील विश्वासाचा पाया अजून मजबूत होईल. अशावेळी कदाचित तुम्हाला न आवडणारं काहीतरी त्याच्या खिशात सापडेल त्याबद्दल लगेच त्याला धारेवर धरण्याऐवजी त्याला ती गोष्ट का घ्यावीशी वाटली हे त्याच्याकडून समजून घ्या. उदा. गाय छाप पुडी सापडली तर “तंबाकू किती घातक” यावर लेक्चर देण्यापेक्षा त्याला ती का खावी वाटत्ये हे समजून घ्या आणि मग त्याला त्या ऐवजी दुसरे चांगले पर्याय पण असतात हे दाखवून द्या.

व्यसनमुक्तीच्या एका शॉर्टफिल्ममध्ये एक सीन पाहिलेला…. ज्यात बायको त्याच्या नवऱ्याजवळ मिठीत उभी राहून किस घेताना आधी हळूच म्हणते, “ये होटोका जाम हररोज मिलेगा अगर तुम ग्लास का जाम दूर रखो तो”

तर आशय समजून घ्या! लहानपणी आपल्याला आई कशी म्हणायची, “अभ्यास कर, चांगले मार्क पडले तर तुला आवडीचे घड्याळ घेऊन देईन” 

बास…. तोच फॉर्मुला नवऱ्याबद्दल वापरून पहा! फायद्यात जाल.

४) पुरुषाच्या गरजा फार कमी असतात. हे लक्षात घ्या 

त्याला रोज उठून तुम्ही लाड करावेत, मसाज करावा, अंघोळ घालावी, गोड धोड खाऊ घालावे, कायम सजून राहावे अशी अपेक्षा मुळीच नसते!! पण कधीतरी मुद्दाम सवड काढून या गोष्टी करा!! दिवाळी दसर्याला त्याची आरती करून अभ्यंग स्नान घालण्या पेक्षा एखाद्या रविवारी देखील “दसरा” करता येतो!! त्यातून मग नवरा देखील हसरा होतो!!

५) चांगल्याचा आग्रह धरा 

चुकून कधीतरी नोकरीत टेबला खालून चे व्यवहार होऊ शकण्याची जर नवर्याची खुर्ची असेल तर त्या घरातील महिलांनी खूप सावध राहावे!! आपण साधे राहू, चटणी भाकरी खाऊ पण “असल्या” पैशातून येणारे सुख नको, हे त्याला ठणकावून सांगा!! आरोप करत नाही पण खरे सांगतो, महिला जर या बाबतीत “जागृत” राहिल्या तर देशातील निम्मा भ्रष्टाचार कमी होईल!! कारण सर्व जगाला तो उल्लू बनवू शकतो किवा धाकात ठेवू शकतो पण घरी बायकोसमोर तो झुकतोच!! त्याचा फायदा घेवून त्याला सन्मार्गावर चालण्या साठी सतत प्रोत्साहन द्या!!

वेळ काढून इतकं सगळं वाचल्याबद्दल तुमचे आभार!

– भाग पहिला 

© डॉ. धनंजय देशपांडे  

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

https://www. facebook. com/ddtilakroad

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “स्वातंत्र्य दिन !” ☆ श्री प्रसाद साळुंखे ☆

श्री प्रसाद साळुंखे  

? मनमंजुषेतून ?

☆ “स्वातंत्र्य दिन !” ☆ श्री प्रसाद साळुंखे ☆

चकचकीत ऑफिसात, उंचावरून, मेल येतो.

‘हे साजरं झालंच पाहिजे‘… जिवंत सोहळ्यालाही डेडलाईन..

मग काय.. तयारी सुरू,

जुन्या सजावटीची धूळ झटकते.. कलाकुसरीचे कंदील लागतात.

.. पण नेमकं कितवं वर्ष? .. यावर teams call मध्ये चर्चा होते .. इतर मुद्द्यांसोबत .. नि फायनल होतो बोर्ड.

…. फक्त वर्ष बदलून मेल पडतात .. ‘सगळ्यांनी पारंपरिक वेषात या’ असं फर्मान निघतं .. परंपरा जपणाऱ्याला पारितोषिक असतं. मग तो दिवस उजाडतो….   

दोनेक दिवस आधीच… कारण त्या दिवशी लोणावळा वगैरे जवळच्या जवळ फिरायला सुट्टी असते म्हणे,

पारंपरिक तयारीने लोक gather होतात … झेंडावंदनाचा लॅपटॉप सेट व्हायचा असतो … प्रोजेक्टरही या प्रकाराशी जुळवू पाहतो …. 

…. मग ओपन होऊ लागतं झेंडावंदनाचं  ppt आणि video,

… थंड वातावरणात, मंद आवाजात राष्ट्रगीत घुमतं,

… मानघाले कारकुनी लोंढे अपराधी भावनेने ते पुटपुटल्यासारखं करतात,

… ‘ भारतमातां की ‘ वरच आरोळी विरते..

मग पुन्हा टेबलं सरकतात, केक आणला जातो … जुलै-ऑगस्ट वाल्यांचे (वाढ?) दिवस घालण्यासाठी.

… एका बजेटच्या खड्यात दोन पक्षी.

मग हौजीचा कल्ला होतो .. कधी नव्हे ते नंबर achieve होतात…. सेल्फ्या क्लिकतात .. रिळं बनतात,

 ‘Come on guys’ केकाटत, रॅम्पवॉक नावाचे हास्यास्पद सांस्कृतिक धिंडवडे होतात. 

…. थोडक्यात एक आटोपशीर सेलिब्रेशन होतं. ग्रुप फोटोंच्या प्रूफ सकट, गळ्यात कार्ड घातलेले सेवेसी तत्पर कारकून, पुन्हा लॅपटॉपला जुंपून बसतात…. मग कधीतरी उदार होऊन मालक पुरवतात .. एक थंड समोसा, वेफर्स, जिलबी, सरबत वगैरे … असा कॉर्पोरेटी जंगी बेत असतो.

.. सगळं साजरं केल्याचं एक सामूहिक समाधान (?) लाभतं .

.. बळजबरीचे आयोजक सुस्कारा सोडतात.

 

माझ्या मनात मात्र एका पेढ्याच्या बजेटचं, मराठी शाळेतलं, स्फुरण चढवणारं,

‘बलसागर भारत होवो ‘ .. घुमत राहतं …आठवणींचा झेंडा फडफडतो …

… किती बदलत जाते ना ! सरसर स्वातंत्र्याची परिभाषा? पिढी दर पिढी स्वातंत्र्याची समज, आणि साजरीकरण बदलतं. 

 

हल्ली साजरीकरणाचा समान साचा आहे अगदी, सगळ्याचाच…

.. गणेशोत्सव, दहीहंडी, आंबेडकर जयंती, शिव जयंती,

.. स्पीकर, नाचगाणं, सेल्फ्या, रिल्स, नि खादाडी.

— या उपर कोणाचं कसलंच कर्तव्य लागत नाही स्वातंत्त्र्याप्रती.. 

 

… म्हणून काही साजरं करायचं म्हटलं, की काटाच येतो अंगावर हल्ली !!

…. परत सारं जुनं जुनं व्हावं वाटतं,

…. या नव्या युगात, साधं सोपं घडणं पण कठीण होतंय ना?

 

एक बरं ….. 

सुट्टीनंतरच्या दिवशी साडेनवाच्या ठोक्याला लॉग इन करण्याच्या बोलीवर, आज लवकर निघण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे कळपाला….. 

… काय करावं बरं या स्वातंत्र्याचं ?

© श्री प्रसाद साळुंखे

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9664027127

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवळाबाहेरचा विठ्ठल ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

देवळाबाहेरचा विठ्ठल… ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

काल सकाळी सहज फेरफटका मारायला खाली उतरलो.. एक चक्कर संपूर्ण कॉलनीला मारून, सकाळची हसरी आणि प्रसन्न शांतता अनुभवून, मध्येच पक्षांची सुरेल किलबिल ऐकुन आणि डोंगराच्या आड निवांत निद्रा घेणाऱ्या पण अवनी मातेला आपल्या तेजाने कृत्य कृत्य करण्यास आतुर असलेल्या सूर्याचे प्रथम दर्शन घेणे हा तसा तर माझा नित्य दिनक्रम..

प्रभात ऊर्जेचा हा श्वास संपूर्ण दिवसासाठी मला drive करणारा एक फॅक्टर आहे. आणि हा कार्यक्रम गेली पंधरा वर्षे अखंड सुरू आहे..

आज ही ऊर्जा फेरी सकाळी सुरू झाली.. अगदी एखादं किलोमीटरवर असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरापाशी मला थोडीशी गर्दी दिसली म्हणून मी ही घुटमळलो तेथे..

पाहिले तर सात वर्षाची एक चिमुरडी आपल्या दीड वर्षाच्या भावाला बाजूला घेऊन लता दिदींचे ‘ज्योती कलश छलके… ‘ गात होती..

– – कपडे बेताचेच.. घरची गरिबी प्रचंड असावी.. पण सुरांची सरस्वती मात्र तिच्यावर प्रसन्न होती.. तिच्या तेजस्वी रुपात आणि प्रतिभासंपन्न गळ्यात लक्ष्मी साक्षात उतरली होती.. तिचा तो दीड वर्षाचा भाऊ सुद्धा त्याच्या वयापेक्षा कितीतरी पटीची स्वभावातील परिपक्वता दाखवत होता.. शांतपणे आपल्या बहिणीची प्रतिभा तो ही कौतुकाने पाहत होता..

मला कळेना.. किती सुखद अनुभव.. माझी सकाळ सार्थकी लागली या आनंदात मी तिथेच रेंगाळू लागलो.. एका मागे एक सुरेल गीतांची ती मैफिल मला सोडायचीच नव्हती.. मंत्रमुग्ध होऊन मी तिथेच थांबलो.. हळू हळू गर्दी ओसरली.. आणि आता मी एकटाच होतो.. काही वेळाने त्या गान सरस्वतीने गाणे थांबवले. मला अत्यंत आदराने नमस्कार करून आपल्या भावाला सोबत घेऊन निघायच्या तयारीत ती उठली खरी आणि मला काहीतरी दिसले…. तिच्या बाजूलाच तिने एका छोट्याश्या पाटीवर काही अक्षरे लिहिली होती.. ती पाटी वाचली आणि मी ही थबकलो..

‘मला शिकायचंय…’

दोनच शब्द.. पण माझे कुतूहल शिगेला पोचले.. आस्थेने तिची चौकशी केल्यावर मला कळले तिचे नाव कस्तुरी होते.. आणि तिच्या भावाचे प्रसन्न.. कस्तुरीचे बाबा संगीत विशारद होते आणि एका अपघातात त्यांना त्यांचे पाय गमवावे लागले होते.. तेव्हा पासून म्हणजे साधारण वर्ष भरपासून ते घरीच असायचे.. घरची गरिबी सुरवातीपासूनच होती पण बाबांच्या अपघाताने ती दरिद्र्याकडे वळली.. आई घरकाम करून काहीतरी मिळवायची आणि जेमतेम खाता येईल इतकच हे कुटुंब कमवत होते. संस्काराशिवाय हे दांपत्य आपल्या मुलांना अतिरिक्त काहीही देऊ शकत नव्हते.. त्यात कस्तुरीला वर्षभरापूर्वी नाईलाजाने शाळा सोडावी लागली.. आणि याचे दुःख कस्तुरीच्या बोलण्यातून जाणवत होते. मला समजलच नाही बोलता बोलता एक तास कसा संपला..

काका मला निघायला हवे.. आईला मदत करायची आहे.. असे म्हणून कस्तुरी, प्रसन्नला अंगावर घेऊन लगबगीने निघाली..

ती पाटी मात्र माझ्या डोक्यातून काही निघत नव्हती..

‘मला शिकायचंय…’

विचारांच्या चक्रातून मी बाहेर येतच नव्हतो.. माझ्या मुलीचे demands मला आठवू लागले. अमुक एक प्रकारचीच बॅग हवी म्हणून असलेला तिचा हट्ट आणि तो पुरवण्यासाठी आम्हा उभयतांचा चाललेला आटापिटा.. सगळे डोळ्यासमोरून हटतच नव्हते.. ‘ मला शिकायचंय.. ‘

शिकण्यासाठी केवढी तपश्चर्या करावी लागतेय.. सकाळी उठून आपल्या दीड वर्षाच्या भावाला घेऊन गळ्यातल्या सरस्वतीचा आविष्कार इतरांना देऊन त्यात ही भीक न मागता फक्त एकच अपेक्षा..

‘मला शिकायचंय…’

खरंच मला जड होते का तिला शिकवणे?? असे किती पैसे लागतील??? महिना दोन ते तीन हजार.. जास्तीत जास्त.. मला खरंच फार नव्हती ही रक्कम.. पण द्यावे की नाही हा संभ्रम मात्र नक्कीच होता. कुटुंबाला घेऊन एकदा हॉटेलिंग करताना अतिशय मामुली वाटणारी रक्कम अचानक मला खूप मोठी वाटायला लागली.. कसे असते ना…. समाजासाठी आपण काही तरी करायला हवे हे स्वतःसह इतरांना मी आजपर्यंत हजारो वेळा सांगितलंय. पण मग आज जी गोष्ट मला शक्य आहे ते करताना मात्र माझा हात आणि मेंदू दोन्ही आखडले आहे.. लाज वाटली स्वतःची.. आणि एक निर्णय झाला..

दिवसभर मी कस्तुरीच्या admission साठी माझे सो कॉल्ड सगळे resources वापरले. तिच्या वडिलांना भेटलो.. कागदपत्रे घेतली. आणि तिचे admission आमच्या विभागातील एका अत्यंत प्रतिष्ठित अशा शाळेत केले.. कस्तुरी आणि प्रसन्न यांच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतली ती पुढे किती तरी वर्षे.. ते कुटुंब आमचे कधी झाले ते कळलच नाही.. साधारण आठ एक वर्षांनी कस्तुरीला तिच्या कुटुंबीयांसमवेत आपल्या गावी जावे लागले ते कायमचेच….

हळू हळू संपर्क तुटला.. आणि कस्तुरी विस्मृतीत गेली..

परवा सहज टीव्ही लावला.. आणि एका सुरेल आवाजाने अक्षरशः डोळ्यात पाणी आणलं.. reality show मध्ये एक तरुणी गाऊन झाली होती.. आणि अंतिम निकाल तिच्या बाजूने लागला.. संगीत क्षेत्रातले दिग्गज तिचे कौतुक करताना थकत नव्हते.. एका कॉर्पोरेट मध्ये अतिशय मोठ्या हुद्द्यावर काम करत असलेल्या या मुलीला जेव्हा विचारण्यात आले की या यशाचे श्रेय कुणाला.. तर ती लगेच म्हणाली, ” विठ्ठलाला.. “

” म्हणजे..??? “

” होय, त्या विठ्ठलाला.. त्या परमेश्वराला जो मला त्या मंदिरात नाही तर मंदिरा बाहेर भेटला.. मला योग्य दिशेला जायचे होते पण काकांनी ती हिम्मत केली आणि मला शाळेत घातलं.. कदाचित त्यांनी केलेली ही मदत त्यांच्यासाठी खूप छोटी असेल आज ही.. पण माझे आणि प्रसन्नचे आयुष्याचं सोनं झाले….

काका आज जर तुम्ही मला ऐकत असाल तर हा पुरस्कार तुमचा आहे काका..! “

माझ्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते.. कस्तुरीने आज मला खूप मोठे केले.. पण मी खरंच काय केलं.. एक छोटीशी मदत आणि एक आयुष्य घडले.. स्वतःचा अभिमान नव्हे पण बरे वाटले.. एव्हढे समाधान मी कधीच अनुभवले नव्हते.. हे मला आयुष्यभर पुरणार होते..

“देवळाबाहेरचा विठ्ठल… “

.. माझ्या कायम लक्षात राहिला आणि माझ्या या नंतरच्या पंढरीचा शोध घेण्याचा निश्चय करून मी एका वेगळ्या अनुभूतीने झोपायला गेलो..

सकाळी मला सर्वात आधी देवळातल्या विठ्ठलाचे आभार मानायचे होते.. आणि प्रार्थना करायची होती, तुझा छोटासा अंश माणुसकीचा सर्वांना दे…. मला दिलास काही वर्षांपूर्वी.. आणि जीवन काय हे मला कळले..

…. आणि देवळाबाहेरचे असे विठ्ठल बरेच होऊ देत.. कारण अशा बऱ्याच कस्तुरी ज्यांच्यात लक्ष्मी, सरस्वती आणि प्रतिभा उपजतच आहेत.. त्यांना या विठ्ठलाची गरज आहे…

दान हे श्रेष्ठ आहे.. कोणत्याही रूपात करा.. पुण्य फळास येणार आहे. आयुष्यात कुठे आणि कसा उपयोग होईल सांगता येत नाही.. एका हाताने द्या.. समोरुन दोन्ही हाताने मिळेल…

लेखक : श्री विनय वाघ 

प्रस्तुती : श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बंदिवास कृष्णाचा… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ बंदिवास कृष्णाचा… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

कृष्णा, आज तू मला ‘बंदिवासातील कृष्ण’ म्हणून तू कसा होतास ते व्यक्त करावसं वाटतंय! जन्माला येण्यापूर्वीच देवकी- वसुदेव कंसाच्या बंदी शाळेत असताना तू देवकीच्या पोटात- बंदीवासात होतास, बंदिस्त होतास! त्यावेळी कंस तुला काहीही करू शकला नाही. तुझा जन्मच कंसाच्या पारिपत्यासाठी असल्याने नऊ महिने देवकीच्या कुशीत राहून जन्मल्याबरोबर मथुरेत जाण्याचे तुझ्या नशिबात होते!

तिथे बालपणीच्या क्रीडा करता करता तू तुझ्या गोप – सवंगड्यांच्या प्रेमाच्या बंदीवासात होतास! त्यावेळी कालिंदीच्या डोहातील कालिया मर्दन, पूतना राक्षसीणी चा वध तसेच काही राक्षसांचा संहार (शकट-विकट) या सर्व गोष्टी तुझ्या हातून घडणार होत्या, त्यामुळेच तू त्या गोकुळाच्या प्रेमात होतास! राधेच्या भक्तिमय प्रेमाच्या बंदीवासात तू इथे सापडलास! हा प्रेमाचा बंदिवास तुझ्या आयुष्याला वेढून होता.. तिने दिलेले प्रेमाचे मोरपीस अखंड तुझ्या मस्तकी होते.. गोकुळातून बाहेर पडलास तरी तुझी मुरली ही राधेच्या आधीन झालेली होती. त्या गोकुळाच्या प्रेममय बंदिवासातून बाहेर पडल्यावर तू पुन्हा तिकडे मागे वळून पाहिले नाहीस!

तू सांदिपनी ऋषींच्या आश्रमात अध्ययनासाठी गेलास, तिथे वेगवेगळ्या मित्रांच्या सहवासात राहिलास पण नकळत सुदाम्याच्या प्रेमाचा पाश तुझ्या मनाला गुंतवून ठेवला होतास, त्याला सोडून तू गेलास पण मित्रत्वाच्या बंदिवासात तू नक्कीच अडकलेला होता. द्वारकेला सुदामा तुला भेटायला आला आणि त्याची परिस्थिती जाणून तू त्याला ‘सुदाम नगरी’ दिलीस तो मित्रत्वाचा, बंधुत्वाचा प्रेमपाश तुला मनात नक्कीच अडकवून गेला! पुढे मथुरा सोडून तू द्वारकेला नवीन राज्य स्थापन केलेस. द्वारकेचे तुझे राजेशाही आयुष्य तुला अष्टराण्यांच्या बंदिवासात ठेवत होते. तो तुझा तारुण्याचा सोनेरी बंदीवास होता. सत्यभामा, रुक्मिणी यासारख्या राण्यांनी तुला त्यांच्या प्रेमाच्या बंदीवासात गुंतवून ठेवले! सोळा सहस्र राण्यांची सुटका करून तू त्यांना आपल्याबरोबर विवाहाच्या बंदीवासात अडकवलेस!

असे हे तुझे आयुष्य सतत गुरफटलेले होते! कंसाचे पारिपत्य तुझ्यासाठी आव्हान होतं, ते तू पार पाडलंस आणि मुक्ततेचा श्वास घेतलास! स्वतःचे राज्य निर्माण केलेस! पांडवांच्या बद्दल तुला प्रेम होते… द्रौपदी स्वयंवराच्या वेळी पांडवांची साथ करून द्रौपदीला राणी पद मिळवून दिलेस.. सुभद्रा तुझी सख्खी बहिण होती तर द्रौपदी ही तुझी मानलेली बहीण होती. जिची साथ देताना तिचा “सखा” म्हणून तू द्रौपदीच्या मनाच्या बंदीवासात कायमच राहिलास!

“महाभारत” युद्धात दृष्टांचे निर्दालन करण्यासाठी तू पांडवांच्या बाजूने उभा राहिलास. कुरुक्षेत्रावर आपल्यासमोर उभ्या असलेल्या सैन्यात द्रोण, भीष्म आणि सर्व रथी, महारथी पाहून व्यथित झालेल्या अर्जुनाला तू मार्ग दाखवलास हे तुझे मोठे ऋण आहे! खरंतर हे सर्व रथी- महारथी यांचे तुझ्यावर खूप प्रेम होते, पण तुझे संपूर्ण आयुष्य तुझ्यासाठी वेगवेगळ्या रूपात बंदिस्त होते! कर्तव्य कर्म करत असताना तू कधीही मागे आला नाहीस. देवरूपातून मनुष्य रूपात येऊन तू सतत कर्म करीत राहिलास आणि त्यामुळे आलेले त्रास ही भोगत राहिलास! असं वाटतं की, मानव जन्मात आल्यावर हा देहरूपी पिंजऱ्याचा बंदीवास तू भोगलास आणि कुणालाही न कळता त्या पिंजऱ्यातून, तुझ्या जीव रूपातून तू मुक्तही झालास! तेव्हाच तुझा या पृथ्वीतलावरील बंदीवास संपला असं म्हणावंसं वाटतं!

राम आणि कृष्णांचे जन्म हे आपल्याला जीवनातील योग्य मार्ग दाखवण्यासाठी आलेले होते! अन्यथा त्यांना या मानव रुपाची काय ओढ असणार? पण त्यांच्यातील देवत्वाची जाणीव करून देण्यासाठी आणि मानवामध्ये जागृती निर्माण करण्यासाठीच हे मनुष्य रूपात जन्माला आले..

जेव्हा जेव्हा कृष्ण जन्म येतो, तेव्हा विविध विचार मनात पिंगा घालत राहतात… ते शब्द रूप करण्याचा व्यक्त होण्याचा हा प्रयत्न!

यदा यदा ही धर्मस्य, ग्लानिर्भवती भारत!

अभ्युत्थानमधर्मस्य, तदात्मानं सृजाम्यहम!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मायक्रो व्हेकेशन” ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “मायक्रो व्हेकेशन” ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

गेल्या वर्षी आम्ही कोचीला गेलो होतो. म्हणजे मी मुंबईहून आणि माझी मुलगी दीप्ती आणि नात इरा सिंगापूरहून. तीन दिवस तिथे एकत्र राहिलो. हिंडलो, फिरलो, गप्पा मारल्या. चौथ्या दिवशी आपापल्या घरी परतलो.

‘Brunton Boatyard’ च्या बाल्कनीत उभं राहिलं, की समोर बॅकवॉटर दिसायचं. थोड्या अंतरावर पलीकडचा किनारा. किनाऱ्यावर झाडं. त्यापलीकडे रस्ता. त्यावरून जाणारी वाहनं. बॅकवॉटरमधून अधूनमधून जाणाऱ्या बोटी, ट्रॉलर…. तरीही एकंदरीत शांत वाटायचं. आमचा व्हेकेशन मूड द्विगुणित व्हायचा.

बाल्कनीत उभं राहून डावीकडे बघितलं, की फेरीबोटी दिसायच्या. थोडं वाकून बघितलं, की किनाऱ्याला लागलेली फेरी, त्यातून बाहेर पडणारी दुचाकी – चारचाकी वाहनं, लगबगीने बाहेर पडणारी माणसं…… आणि ती रिकामी होताहोता आत शिरणारी अलीकडची वाहनं, ऑफिस -व्यवसायासाठी घाईघाईत पलीकडे निघालेली माणसं…… चार-पाच, मिनिटांतच फेरी भरायची आणि पुन्हा पलीकडे जायला निघायची.

तर गंमत म्हणजे बाल्कनीतून समोर पाहिलं, तर व्हेकेशन मूड आणि डावीकडे बघितलं, तर रोजची धावपळ.

बघता बघता तीन दिवस संपले. आम्ही आपापल्या घरी परतलो. त्या सिंगापूरला आणि मी मुंबईला.

नेहमीचा दिनक्रम सुरू झाला.

आम्ही बरीच वर्षं या घरात राहत आहोत. पूर्वी समोरच्या इमारती नव्हत्या. सगळी झाडंच होती. मध्ये दोन टुमदार बंगले. त्यापलीकडे राम मंदिर. एकंदरीत सगळं शांत वाटायचं. तीन-चार वर्षांपूर्वी समोर दोन इमारती बांधल्या. त्यात लोक राहायला आले. मध्ये अंतर असल्यामुळे तसे तिकडचे आवाज इथपर्यंत येत नाहीत. सकाळच्या वेळी तर शांतच असतं तिथे.

मीही सकाळच्या धावपळीत असते. खिडकीत उभं राहण्याची चैन त्यावेळी परवडतच नाही.

पण एकदा कशी कोणास ठाऊक, खिडकीत उभी राहिले. आमच्या खाली असलेली हिरवीगार झाडं. नंतर अजिबात रहदारी नसणारा रस्ता. त्यापुढे त्या दोन इमारती. त्यांच्याही अलीकडे, पलीकडे झाडं. बघूनच एवढं शांत वाटलं! 

तेवढ्यात डावीकडे मान वळली. तिथे तसे रहदारीचे रस्ते. T आकारात मिळालेले. T ची वरची आडवी रेघ असणारा रस्ता स्टेशनपासून थेट मेन रोडपर्यंत जाणारा. त्यामुळे त्या दोन्ही रस्त्यांवरून बाईक्स, रिक्षा, मोटारी, लॉऱ्या…. हीss सगळी वर्दळ. शिवाय स्टेशनकडे धावणारी आणि स्टेशनमधून बाहेर पडणारी माणसं. परिसरात भरून राहिलेली धावपळ!

आणि अचानक कोचीची आठवण झाली. मन पुन्हा एकदा त्या व्हेकेशनमध्ये शिरलं. तीन दिवसांची व्हेकेशन. तीन पिढ्यांची व्हेकेशन. आता मी मुंबईत आणि त्या दोघी सिंगापूरला. पण मी खिडकीत उभी राहिले आणि आम्ही तिघीही कोचीला एकत्र असल्यासारखं वाटलं.

तेव्हापासून कितीही घाईगडबडीत असले, तरी दिवसातून एक-दोनदा तरी खिडकीतून समोर आणि डावीकडे बघते. कोचीला पोहोचते. आणि मनातला सुट्टीचा, दिलासा देणारा कप्पा उघडतो.

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares