मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लग्न… ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ लग्न… ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

नुकताच एका लग्नाला निमंत्रित असल्याने गेलेलो. तर तिथे थाट काय वर्णावा ??? दारातच डाव्या उजव्या बाजूला बर्फात कोरलेले पाच पाच फुटाचे दोन राजहंस उभे….. ते बर्फ लवकर वितळू नये म्हणून त्याभोवती थंड हवेचा झोत सोडणारे अजस्त्र पंखे, त्यात पण रोज वॉटर जोडलेलं त्याचा सुगंधी फवारा येणाऱ्याच्या अंगावर फवारला जात होता.

आत गेल्यावर खुर्चीत बसल्यावर लगेच एकामागून एक असे केटररचे वेटर आलुबोन्डा, चीज टिक्की, हरभरा कबाब असलं काय बाय सर्व्ह करत होते. आणि हे सगळं शूट करण्यासाठी दोन क्रेनवर दोन मोठे कॅमेरे विथ फोटोग्राफर बसलेला, शिवाय दोन ड्रोन वरती घिरट्या घालत शुटिंग करत होतेच, कोपऱ्यात एक म्यूजिकल ग्रुपचा आर्केस्ट्राही सुरु होता ! 

आणि नंतर लग्न थाटात लागलं.

त्यानंतर मंडळी जेवणाकडे आली. अक्षरशः मी मोजले तर ३७ टेबल होते. पंजाबी, महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन…. कॉन्टिनेन्टल; असे बोर्ड लावलेले….. सगळंच हाय फाय आणि उच्च….. मात्र चार आठ लोक एक एक ग्रुप करून त्यातच रमलेले….. इतरांशी काही देणेघेणे नाही… अशा टाइपमध्ये !!

का कोण जाणे….. माझा जीव गुदमरला तिथं…. ना जेवणात इंटरेस्ट उरला ना त्या एकूणच “सोहळा” डेकोरेशन मध्ये !

आणि त्यावेळी मला एक जुनी घटना आठवली…..

माझा एक अवलिया मित्र….. भटकंती आणि जमलं तर अडचणीतल्याना मदत करणं.. हा समान धागा आमच्यात… तर अचानक एका दिवाळीच्या काळात त्याचा फोन आला… “उद्या काय करतोय?” मी म्हटलं, “विशेष काही नाही बाबा… सुट्टी आहे दिवाळीची बास !!”

तर म्हणाला, “सकाळी तयार राहा.. जरा एका ठिकाणी न्यायचं आहे तुला… चल तरी… वेगळं विश्व दाखवतो. “

मी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता.

दुसऱ्या दिवशी मग त्याच्या सोबत निघालो. आणि दीड दोन तासात एका वाडीवर पोचलो… आदिवासी टाईप लोकांची साठ सत्तर घरे असलेली ती वस्ती… मित्र जवळच्या डोंगरावर ट्रेकिंगला जायचा त्यावेळी या वाडीतच गाडी लावून जात असल्याने सगळी वाडी त्याच्या ओळखीची… हा अधून मधून त्या लोकांसाठी कपडे, धान्य, औषधे वगैरे नेवून द्यायचा.

तिथल्या अनेकांना तर मराठी काय पण हिंदीही येत नव्हती… त्यांचा जो एक मुखिया होता त्याला तोडकंमोडकं हिंदी येत होतं. पण तरी “संवादाला भाषा लागत नाही तर प्रेम लागत” हे त्यादिवशी कळलं!

जमेल तशी फुलांची रांगोळी काढून त्यांनी दिवाळीच्या जेवणाची पंगत मांडलेली…. मी, माझ्या शेजारी आमचा अवलिया मित्र, त्याशेजारी ग्रामसेवक…. आणि पाड्याची बाकी पुरुष मंडळी बसलेलो… साधाच बेत होता… पोळी, एक सुकी भाजी… पातळ वरण टाईप काहीतरी आणि शिरा… पण काय तुडुंब जेवल्याचा आनंद झाला.

आणि जेवण झाल्यावर झाडाखाली गप्पा मारत बसलेलो तेव्हा थोडा वेळ त्या लोकांनी त्यांचा पारंपरिक डान्स सादर करून दिवाळीला जणू चार चांद लावले.

ते झाल्यावर मुखियाने एका मुलीला हाक मारून पुढं बोलावलं…. सुमारे वीस बावीस वर्षाची असेल.. गर्द हिरवी साडी, हातात हिरव्या बांगड्या… सगळं नवं नवं दिसत होत… इतक्यात तिने आधी मित्राच्या आणि नंतर माझ्याही पायाला हात लावून नमस्कार केला. मी दचकलो… पण असू दे… माझ्या लेकीसारखीच असं म्हणत आशीर्वाद दिला. मात्र तिच्या मागे (कदाचित तिची आई असावी) ती डोळे पुसताना पाहिली.

मी मुखियाला विचारलं की त्या बाई का रडत आहेत ? त्यावर त्याने जे सांगितलं ते ऐकून मी स्तब्ध झालो. काहीच बोलणे सुचेना.

मुखिया सांगत होता, “गेल्या वर्षी या मुलीचे लग्न झाले. त्यासाठी आईवडिलानी खाजगी सावकाराकडून कर्ज काढलं…. फक्त तेराशे रुपयांचे….. मात्र ते फेडणार कस ? इथं आम्हीच रानातली पाखर मारून जगतो… जोडीला तुमचं धान्य येत तितकंच ! मग रोख पैसे येणार कुठून? 

मग सावकाराने मार्ग सुचवला आणि त्याप्रमाणे हे दोघे आईवडील गेले वर्षभर झाले त्याच्याकडे शेतावर मजुरीला जात आहेत आणि त्या मजुरीतून तो सावकर दरमहा पैसे सगळे वळते करून घेतोय. (म्हणजे थोडक्यात फुकट हमाली वर्षभर सुरु आहे)

*

मी सोबतच्या ग्रामसेवकाला विचारलं… “तो सावकार भेटेल का आता ?”

त्यानेही होकार देत लगेच त्याला फोन करून वाडीवर बोलावलं… तोही त्याची हिशोबाची चोपडी घेऊन आला. सावकारीचे लायसन्स पण दाखवले. आणि हिशोब पण ! 

मित्राने त्याला विचारलं… “आता अजून किती कर्ज फेडणे बाकी आहे ?”

तर म्हणाला, “व्याज फक्त फिटत आहे… मुद्दल अजून तसेच बाकी आहे… तेराशे रुपये. “

(सावकारी कर्ज आणि त्यावरचे व्याज हा वेगळाच मुद्दा आहे. महिना दोन टक्के असा काहीतरी रेट असतो म्हणे म्हणजे वार्षिक तो २४% इतका मोठा होतो… त्यात परत चक्रवाढव्याज गणित त्यात बसवले जाते त्यामुळे कैच्या काय व्याजात पैसे जातात) असो.

ते सगळं ऐकून मी हतबुद्ध… ! माझ्या मित्राने तात्काळ खिशात हात घातला…. हजारेक रुपये निघाले…. माझ्याकडे वळत म्हणाला, “तुझ्याकडे आता कॅश किती आहे ?” 

मी काही न बोलता खिशातून त्याला तीनशे काढून दिले. मित्राने मग ते तेराशे रुपये सावकाराला दिले. सावकारानेही इमानदारीत त्या चोपडीतील कर्जाचे पान फाडून त्या आईवडिलांना दिले. (याला ग्रामीण भागात “पान फाड… व्यवहार” म्हणतात) आणि ते आईवडील कर्जमुक्त झाले. आता त्यांना फुकट मजुरी करायला जायची गरज राहणार नव्हती…

*

थोड्या शांत पण तरीही आतून विषण्ण मनाने तिथून निघालो…. आणि अचानक पुन्हा ते गर्द हिरव्या साडीतलं लेकरू धावत जवळ आलं आणि गच्च मिठी मारून रडत बसलं… अर्थात ते आनंदाश्रू होते…. तिचे आईवडील मुक्त झाल्याचे !!

इथं आम्ही तेराशे रुपये दिले म्हणजे फार काही केले नाही… नाहीतर पुण्यात हॉटेलात फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत गेलो तरी याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट बिल येतेच की ! पण त्या वर्षीची ती दिवाळी… ते रानातले जेवण…. त्या लेकीची गच्च मिठी… आजही आठवलं की…. देवाचे आभार मानतो की…. त्यांच्यामुळे आपल्यामार्फत हे सगळं घडत… आपण निमित्तमात्र !

(माझी एक दिवाळी अशी आगळीवेगळी घडवून आणणारा तो मित्र मात्र कोरोनाचे निमित्त होऊन “वर” गेला… मात्र एक छान आठवण “खाली” ठेवून गेला)

*

आता मूळ मुद्दा पुन्हा तोच की…. एकीकडे जो नुसता बर्फाचा राजहंस उभा होता त्याचा खर्च किमान पाच हजार… बाकी बडेजावचे बिल वेगळेच आणि दुसरीकडे तेराशे रुपयांत लग्न करणारी (तेही कर्जात) आदिवासी मंडळी… मात्र तरी समाधानी आणि आनंदी…. मग खरा आनंद कशात आहे ? पैसे उडवण्यात…. लोकांना श्रीमंती दाखवण्यात की माणुसकी जपून आनंद घेण्यात ? 

तुमच्याकडे खूप पैसा असेल तरी मुलांची लग्न साधेपणाने करा रे… कारण तरी त्यांना मुलं होणार आहेतच. डीजे लावल्याने, लाइटिंग केल्याने काही सटासट मुलं होणार नाहीत !

त्यापेक्षा तोच वायफळ वाया जाणारा पैसा हवं तर मुलांच्या नावाने बँकेत फिक्सला ठेवा…. त्यालाच पुढं जाऊन तो कामाला येईल. नाहीतर सरळ एखाद्या आनंदवन सारख्या संस्थेला दान करून टाका. जास्त पुण्य मिळेल.

तुम्ही कितीही शानदार लग्न सोहळा केला, आणि तेराशे खर्चले तरी काय आणि तेरा लाख खर्चले तरी काय…. लोक नंतर विसरून जाणारच आहेत. तर नको उगीच “दाखवण्यासाठी” म्हणून स्वतःला आर्थिक खड्ड्यात टाकून घेऊ ! 

विचार करा ! आणि पटलं असेल तर इतरांनाही हे पाठवा ! यातून कदाचित १०० मधली १० लग्न जरी आटोपशीर होणे सुरु झाले तरी खूप मोठी चळवळ उभी राहील ज्याचे तुम्ही एक साथीदार असाल !! धन्यवाद.

© डॉ. धनंजय देशपांडे  

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण…गृहिणी – भाग – ५३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण…गृहिणी – भाग – ५३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

गृहिणी

संसार म्हणजे परिकथा नव्हे. ते एक भरभक्कम चॅलेंज आहे. आव्हानच आहे. एका साहित्यिक कुटुंबातून सधन शेतकरी कुटुंबातली माझी वाटचाल तशी बहुरूपीच होती. मनोरंजकही होती. आत्तापर्यंतचे माझे शेतीविषयक ज्ञान हे केवळ भौगोलिक होते. त्या पाठीमागची मेहनत, तळमळ, सिद्धता, मानसिक चढ-उतार जवळून अनुभवताना मी वेळोवेळी थक्क होत होते. आतापर्यंत पाऊस म्हणजे न सुकणारे कपडे, रस्त्यात साचलेली तळी, छत्री रेनकोट आणि आनंदाने मुक्त भिजणे याच व्याख्येत होता पण पाऊस म्हणजे जीवन आणि आस्मानी सुलतानीमुळे बळीराजाची होणारी तगमग जेव्हा मी प्रत्यक्ष अनुभवू लागले तेव्हा पाऊस या संज्ञेतला जीवनावश्यक अर्थ कळू लागला. आभाळ भरून आलं की आई गच्चीवर जाऊन ढगांना साकडं घालत, ”पड रे बाबा! इतकं सारं पेरलंय उगवू दे. ”

कधी मनासारखा पाऊस कोसळायचाही तर कधी अंधारलेलं आभाळ क्षणात मोकळ व्हायचं. एखादी हलकी सर येऊन जायची. अशावेळी त्या नाराजीने म्हणायच्या “हा कसला पाऊस? नुसतं फडकं पडलं! ” सुरुवातीला मला “फडकं पडलं” याचा अर्थच लागायचा नाही. नंतर कळलं असा एकसरी पाऊस म्हणजे बिनकामाचा, एखाद्या लहानशा फडक्या सारखाच.

शेतीचा पसारा म्हणजे काय हेही मी अनुभवत होते. घरात धान्याच्या गोण्या लावलेल्या असत. मोठ मोठ्या पत्र्यांच्या कोठ्यांतून निवडलेलं, न निवडलेलं, चाळलेलं, न चाळलेलं असं धान्य भरलेलं असायचं. बायांच्या मदतीने आईंचं सतत निवडणं, भरडणं, पाखडणं, वाळवणं, उपसणं, भरणं चालूच असायचं. शेतातून सुकवून आलेली तूर मूग तेल लावून भिजवायची, वाळवायची. उखळीत अलगद त्यावर घाव घालून उपसायची आणि पाखडून त्याची डाळ बनवायची. शेंगा फोडून त्यातून शेंगदाणे काढायचे. एक ना दोन अनेक कामं. खरं म्हणजे हा एक मोठा गृह उद्योगच वाटायचा मला आणि तो फार आनंदाने पार पडत असायचा. हे सारं करणाऱ्या बायांचं एकमेकातलं बोलणं मला फार आवडायचं. उखळ, मुसळ, जातं, सुपं यांच्याशी त्यांचं नातं जमलेलं असायचं. गावभर घडणाऱ्या गोष्टी अशावेळी त्यांच्या बोलण्यात असायच्या. त्यांच्या भाषेतला गोडवा ठसका औरच होता.

“आई बाई नडणी कानबाई घडणी”

“ईसगाव तिसगाव भिकारीने चाईसगाव” “भरमना भोपया चारी पाय मोकया” त्यांच्या बोलण्यात जागोजाग अशा म्हणी पेरलेल्या असायच्या. मला बऱ्याच वेळा अर्थ लागायचे नाहीत मग मी त्यांनाच विचारायची. ही एवढी शहरात राहणारी, शिकलेली बाय आपल्याला अर्थ विचारते याचंच त्यांना कौतुक वाटायचं.

आईचं आणि त्यांचं एक गोड नातं होतं. काम वेळेत व्हावं म्हणून आईंचं रागावणं, दटावणं असायचं आणि त्याच वेळी एखादीला त्या म्हणत, “कलाबाई जानं शे का तुले? जाय मग. काले करजो. ” नकळतच मी सगळं टिपत होते. माझ्यासाठी हे सगळं जगच खूप वेगळं होतं.

आमच्याकडे विमल नावाची एक बाई यायची. तिला “मेळवाली म्हणायचे. ” म्हणजे शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या मजुर बायका ती गोळा करायची. त्यांना काम द्यायची. थोडक्यात ती ठेकेदार होती.

तकतकीत कृष्णकांती, मध्यम उंची, घट्ट नेसलेलं लुगडं, तशी भरदार पण अगदी बारीक लवचिक कंबर, हातभर बांगड्या पायात जड चांदीचे तोडे.. अशी विमल म्हणजे मला एखाद्या कलात्मक मराठी चित्रपटातील नायिकाच वाटायची.

सकाळची वेळ असायची. आबा (माझे सासरे) बंगळीवर (झोपाळा) बसलेले असायचे. विमल दाराच्या चौकटीत उंबरठ्यावर उभी असायची. इतक्या अंतरावरून त्यांचा संवाद चालायचा.

“ येव बाई विमल”

“ हाव आबा “

आज कितल्या बाया लागवशे? कपाशी येचनी शेना? ”

“पंधरा एक बाया लागतील आबा. ”

“ पंधरा जास्त वहीतना. दहा पुरे. ”

“नाही ना आबा. वावर आज पुरं नाही वहाउ आख्खो. कालदिन जानं पडीन. ” विमलच्या डोळ्यात विलक्षण चमक असायची. थोडं थांबून ती आबांना म्हणाली.

“ आबा बाया नाही म्हनी राहीनात. त्यास्नी रोज वाढई द्या. समदादूर बायांना रोज वाढेलशे. पंधरा रुपया नाही पुरत. ”

“बरं देखसुत पगारना दिन. तू कामतर पुरं कर. ”

“नाही आबा. बाया नाय म्हनत”

मग थोड्या घासाघासी नंतर जे हवं ते साध्य झाल्यावर विमल परतायची. त्या क्षणी विमल मला एक समर्थ स्त्री वाटायची. तिच्या क्षेत्रातील ती नंबर वन वाटायची. काहीशी धूर्त, धोरणी आणि चतुर. तेव्हा जाणवायचं स्त्रीचं कर्तुत्व हे काही शिक्षण, पदव्यानेच नाही सिद्ध होत. त्या त्या क्षेत्रातील सखोल ज्ञान, नेतृत्व, गरज, एम्प्लॉयर आणि एम्प्लॉयी मधला एक दुवा सामर्थ्याने सांभाळणं हेच कौशल्यअसतं. विमल मध्ये हे गुण उपजतच असावेत. विमल आमच्या घरातल्या बहुतेक सर्व कार्यात सहभागी असायची. आमची दोघींची हळूहळू मैत्री होऊ लागली होती. आमच्या खूप गप्पा रंगायच्या. मग शेवटी ती म्हणायची,

“काय वहिनीबाय? मजा घेई राह्यले माझी”? मनमोकळी हसायची. माझी मासळी खाण्याची आवड समजून ती कधीकधी माझ्यासाठी नदीतल्या मास्यांचे लालभडक कालवणही प्रेमाने घेउन यायची.

छान स्नेहसंबध जुळत होते. नणंदाशी दीरांशी, परिवारातले चुलत, आतेमामे सार्‍यांशीच. खूपवेळा मला परिवारातल्या एकेका व्यक्तीबद्दल कुतुहल वाटायचे.

तरीसुद्धा “आहे मनोहर तरी गमते उदास मजला” याचा अर्थ मनाला भिडत होता. बँक ऑफ इंडियात मी अजून राजीनामा दिला नव्हता पण “विदाऊट पेवर” किती दिवस रजा घेणार? शिवाय अमळनेरला अथवा जवळपास कुठेच बँक ऑफ इंडियाची शाखा नव्हती. भविष्यात होण्याची शक्यताही अधांतरीच होती. कधीतरी मला राजीनामा द्यावा लागणारच होता. मग पुढे काय? ..

“सुनबाई, वहिनीबाई” ही नव्याने मिळालेली बिरुदं अगदी मोरपिसासारखी असली तरी जीवनभर मी याच भावनिकतेत तरंगत राहू शकेन का हे प्रश्नचिन्ह दिवसेंदिवस मोठं होत होतं. या सगळ्या वातावरणात अदृश्यपणे मी माझं जगणं शोधत होते. हे जग कितीही चांगलं असलं तरी माझ्यासाठी ते पुरेसं नव्हतं. रोमँटिक या शब्दाभोवती मी थांबले होते. “रोमँटिक आयुष्य” म्हणजे नक्की काय हे कळत नव्हतं. उंबरठ्यात नवऱ्याची वाट पाहणारी आणि नवऱ्याने केळीच्या पानात गुंडाळलेला गजरा केसात माळल्यावर सुखावणारी या चौकटीतली ओळख मला नक्कीच नको होती.

मला माझे ऑफिस आठवायचे. माझा सोशल ग्रुप आठवायचा. नऊ आठ च्या गाडीची आठवण यायची. अगदी साधना बरोबर एखाद्या भटक्या संध्याकाळी मोकॅम्बो मध्ये खाल्लेल्या चिकन लिव्हर मसाल्याची तोंडाला पाणी सुटणारी आठवण व्हायची. अंजू बरोबरचे भटकणे आठवायचे. हँडलूम हाऊस, स्वदेशी भांडार मधली मुक्त खरेदी आठवायची, आशाबरोबर पाहिलेली नाटके चित्रपट आठवायचे. विठ्ठल भेळवाला ही आठवायचा. विशेषत: या सर्वातला निर्बंधपणा.. याची उणीव मला कुठेतरी जाणवायची. पुन्हा त्याच साऱ्या वातावरणाचा भाग व्हावे असे वाटत नसले तरी “गृहिणी” हा शब्द मला फार भेडसावत होता. तमाम गृहिणींशी आणि त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा आदर राखून मला सांगावेसे वाटते की कुठल्याच दृष्टीने मला “गृहिणी” होणं हा विचार झेपत नव्हता. मला विंदा करंदीकर यांची एक कविता आठवायची,

कर करा मरमर मरा

दळदळ दळा मळमळ मळा 

तळतळ तळा आणि जळा.. गृहिणीच्या कामातला तोचतोच पणा जाणवून देणारी कविता आठवली आणि मी अक्षरश: भेदरले. मला या पायरीवर थांबायचं नव्हतं. मला माझी ओळख हवीच होती आणि ती कुणालाही न दुखवताा, कुणाच्याही मनात गैरसमज निर्माण न करता.. कसे ते अजून ठरायचे होते पण कुणाची मनं न मोडता, आश्वासक आणि प्रामाणिक पद्धतीने माझ्या मनातल्या वादळाची उकल मला करायची होती. काही काळ जावा लागेल. वाट पहावी लागेल. अखेर या विचारापाशी एक दिवस येऊन मी स्थिरावले.

शिवाय आमचं कुटुंब हे सामाजिकदृष्ट्या पुढारलेलं होतं. अमळनेरमधली पहिली कन्या शाळा द्रौ. रा. (द्रौपदा रामचंद्र भांडारकर कन्या शाळा) हे भांडारकरांचे भूषण होतं.. आहे.

त्यामुळेच मी पूर्ण निश्चिंत होते.

– क्रमशः भाग ५३.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “श्रावण.. ओ नो!! ” ते “श्रावण.. ओ येस!…” – लेखक : वैद्य सौ सुमेधा रानडे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

सौ. स्मिता पंडित

??

☆ “श्रावण.. ओ नो!! ” ते “श्रावण.. ओ येस!…” – लेखक : वैद्य सौ सुमेधा रानडे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

परवा माझी मुलं शाळेतून आल्या आल्या सांगू लागली, “आई, श्रावण महिना सुरु होतोय ना? “

मला ऐकून समाधान वाटलं, मी म्हणाले, “हो हो पुढील आठवड्यात सुरु होईल श्रावण महिना, पण तुम्हाला बरं लक्षात आलं! “

ताबडतोब मुलांची प्रतिक्रिया, “अगं स्कूल मध्ये फ्रेंड्स बोलत होते, आता काय हा श्रावण महिना ओह नो, हे नाही खायचं, ते नाही खायचं, सो रूड ना! , हाउ कॅन वी?? “

हे सांगताना दोन्ही मुलांची देहबोली आणि चेहऱ्यावरील हावभाव वेगळेच होते. त्यातून असं जाणवत होतं की यांना या श्रावण महिन्याबद्दल भीती निर्माण झालीय की काय? म्हणजे किती आणि कसं याबद्दल मुलं बोलत असतील या विचाराने मन उद्विग्न झालं.

चूक खरंतर या छोट्या मुलांची नाही, चूक आपली आहे, पालकांची.. मुलं जे ऐकतात, बघतात, अनुभवतात तेच कृतीत, भाषेत आणि वर्तनात उतरवतात. म्हणून हा लेखप्रपंच खास आमच्या सारख्या पालकांसाठी.

बघा ना, आपल्यावेळी श्रावण महिना येणार म्हटले की आपल्यात एक वेगळाच उत्साह यायचा. ‘सणांचा राजा – श्रावण महिना’ यावर तर अनेकदा निबंध लिहिले आहेत. ऊन-पावसाचा खेळ खेळणारा निसर्ग, हिरवागार शालू परिधान केलेली वसुंधरा, विविध रंगाची सुवासाची फुले कायमच मनाला प्रफुल्लित करायची. घराघरात होणाऱ्या व्रतवैकल्यांचा पूर्वी वेगळाच थाट असायचा. कांदा-लसूण न वापरता सुद्धा उत्तम चवीचे पदार्थ घरोघरी बनायचे.

काळ बदलला, आपण मॉडर्न होऊ लागलो आणि आपली संस्कृती-परंपरा जुनी, टाकाऊ, बिनडोक समजायला लागलो. “आम्ही नाही पाळत श्रावण -बिवण. भाजके उपास? आम्हाला ना पोटभर खावंच लागतं. थालीपीठ कसलं खायचं? दिलं सोडून! काय ते मातीचे नाग आणून पूजा करायची? आम्ही निसर्ग संवर्धन करतो, बास! नागपंचमी अँड ऑल इज आउटडेटेड.. ” असे अनेक संवाद आपली पिढी बोलू लागली आहे. खरंच वाईट वाटतं असे विचार ऐकून.. हे ऐकून आपल्या सण परंपराबद्दल नको ते वाईट असेच विचार आपण मुलांच्या मनावर नकळत बिंबवत आहोत. सुंदर अश्या या श्रावण महिन्याचा आणि त्यापुढील येणाऱ्या सर्व सणांचा योग्य दृष्टिकोन आपण मुलांना द्यायला हवा. तो कसा, ते बघूया. (अर्थात नास्तिक लोकांना हे नाही पटणार, त्यांचं त्यांच्याकडे).

१. श्रावण – संयम

सर्वात मोठं दुःख मुलांमध्ये जाणवलं ते म्हणजे आता नॉनव्हेज खाता नाही येणार याचं. ठीक आहे ना, नाही खाल्लं वर्षातले २८ दिवस (मराठी महिने २८ दिवसांचेच असतात हेही आजच्या पालकांना माहीत नाही) तर काही बिघडत नाही. मुलांना स्पष्ट सांगा, “आता १ महिना नाही खायचं नॉनव्हेज. ” आणि तुम्ही ते पाळा आधी. श्रावण महिन्यात होणाऱ्या सणावारी नैवेद्य बनतो, नैवेद्य झाल्याशिवाय काही खाता येणार नाही, हेही मुलांना सांगा. त्यांच्यात संयम आपोआप निर्माण होतो. आयुष्यात याचा पुढे त्यांनाच खूप उपयोग होणार आहे. भाजका सोमवार करू द्या त्यांना, एखादा दिवस नाही अगदी काही हेल्दी खाल्लं तरी काही मोठा फरक नाही पडत. (भाजणी थालीपीठ, खिचडी-कढी ही कैकपटीने पौष्टिक आहेतच, हे या मॉडर्न मातांनी समजून घ्यायला हवं).

२. श्रावण – ऍक्टिव्हिटी

भरगच्च सणांचा हा महिना.. खरंच किती सुंदर रचना या महिन्याची केली आहे ना? दिव्याची अमावस्या, श्रावण सोमवार, नागपंचमी, स्वातंत्र्यदिन, राखी, नारळीपौर्णिमा, जिवती, दहीहंडी, गोपाळकाला, इत्यादी.

या प्रत्येक सणाचा आपण ऍक्टिव्हिटी म्हणून मुलांबरोबर छान उपयोग करू शकतो. असेही ऍक्टिव्हिटी-बेस्ड लर्निंग साठी हजारो रुपये भरून आपण शाळेत घालतो, पण आपल्या संस्कृतीत सणांमुळे आलेल्या या सुंदर ऍक्टिव्हिटीजना मात्र नावं ठेवतो.

३. श्रावण – आरोग्य

अत्यंत महत्वाचा मुद्दा, आपल्या पूर्वजांनी प्रत्येक सणामागे आरोग्याचा विचार करुन त्याप्रमाणे त्याची रचना केली आहे. हा इतका मुद्दा जरी आस्तिक-नास्तिक पालकांनी लक्षात ठेवला तरी त्यांच्या मुलांचं आरोग्य सुधारण्यासाठी त्याची मदत होईल.

अतिपावसाने शरीरातील पाचक अग्नी हा कमी झालेला असतो, त्यावर नॉनव्हेज सारखे जड पदार्थ अन्न म्हणून घेतले तर पचनक्रियेवर ताण येऊन पुढे पचनविकार होतात, त्यामुळे ते नको असं धर्माचा आधार घेऊन सांगितलेलं आहे.

वर्षा ऋतू (पावसाळा) यामध्ये निसर्गत: पित्ताचा संचय शरीरात होऊ लागतो, त्यामुळे अति प्रमाणात कांदा, लसूण, मसालेदार अन्न जर खाल्लं तर पुढे येणाऱ्या शरद ऋतूत पित्ताचा प्रकोप हा जास्त प्रमाणात होईल आणि त्यातून जास्त पित्ताचे विकार होतील. म्हणून कांदा, लसूण कमी करून भाजकं अन्न खाणं या महिन्यात श्रेयस्कर!

सणाच्या दिवशी होणारे वेगळॆ पदार्थ मुलांना थोडे का होईना मुद्दाम खायला द्या. त्यांनाही कळू दे आपल्या पारंपारिक पदार्थांची चव आणि त्यामागचं कारण. आपल्या पिढीला हे पदार्थ कां आवडतात? कारण आपल्या आई-आजीने ते त्या त्या सणाला करुन आपल्यात त्याची टेस्ट डेव्हलप केली. आपल्या दैनंदिन आहारात नावीन्य आणायला हे सण, पदार्थ नक्कीच मदत करतात. भले विकत आणा पण त्या सणाला ते विशिष्ट पदार्थ मुलांना खाऊ द्या. उदा. नारळी पौर्णिमेला नारळी भात, नागपंचमीला तंबीट लाडू, वगैरे.

येणारा प्रत्येक सण मुलांना भरभरून अनुभवू द्यायला हवा. मुली असतील त्यांनी छान नटलं पाहिजे. कां त्यांना मुलांचे कपडे घालून पुरुषी करायचा अट्टाहास आहे देव जाणे! आणि त्याचं त्या पालकांना भारी कौतुक वाटतं. ते म्हणतात बघा आमची मुलगी कशी टॉमबॉय आहे. ती टॉमबॉय नसते, तिला तुम्ही बनवता. अरे नशिबाने स्त्री म्हणून जन्म मिळाला आहे तर घालू दे ना बांगड्या, माळू दे गजरा, लावू दे कुंकू, खेळू दे ना झिम्मा. यातून तिचा सामाजिक, बौद्धिक, शारीरिक, आणि मनासिक विकास होणार आहे. अर्थात या सगळया गोष्टी अती करणं पण योग्य नाही. कर्मकांड, अती सोवळं ओवळं पाळलं तरी मुलांना त्या सणाची घृणा निर्माण होईल असं अजिबात करू नये.

लक्षात असू द्या, आपली परंपरा, सण यांचा मान पालक म्हणून आपण आधी जपायला हवा. त्या महिन्याचं धार्मिक, सामाजिक, आणि आरोग्याच्या दृष्टीने मुलांना महत्व सांगून आनंदाने, ताण विरहित हे सण साजरे केले जावेत, म्हणजे ही पिढी ते टिकवेल आणि पुढे सुरू ठेवेल. नक्कीच याबद्दल विचार करा, श्रावण काय पण कोणत्याच हिंदू महिन्यांची आणि सणांची मुलांमधे भीती निर्माण होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घ्या.

चला, मी तरी माझ्या मुलांना ‘श्रावण फेस्टिव्ह व्हाइब्स’ कशा एन्जॉय करायच्या हे सांगणार!

“श्रावण, ओ येस! ” असं म्हणायला तुम्ही पण सांगणार ना?

(वरील लेखातील मतं ही माझी वैयक्तिक मतं आहेत, प्रत्येकाला असंच वाटलं पाहिजे हा अट्टाहास नाही! )

लेखिका : वैद्य सौ सुमेधा रानडे

आयुर्वेदाचार्य, बालसमुपदेशक.

प्रस्तुती : सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मैत्र जीवांचे… ☆ श्री अ. ल. देशपांडे ☆

श्री अ. ल. देशपांडे

??

☆ मैत्र जीवांचे… ☆ श्री अ. ल. देशपांडे ☆

अडीअडचणीच्या काळी परस्परांना निरपेक्ष मनाने सांभाळून घेणे म्हणजे मैत्री.

एकमेकांचे गुणदोष निर्भय मनाने तसेच हक्काने आवर्जून लक्षात आणून देणे म्हणजे मैत्री.

गरीब श्रीमंत हा भेदभाव स्वप्नातही न येऊ देणारी भावना म्हणजे मैत्री.

प्रसंगी कुणाच्या उपयोगी पडलो तर संबंधितांच्या कौटुंबिक जीवनात डोकावण्याचा आपल्याला हक्क प्राप्त झाला आहे असं चुकूनही मनात येऊ न देणे म्हणजे मैत्री.

अनौपचारिक प्रतिबद्धतेने सदैव एकमेकांचे हितचिंतक असणें म्हणजे मैत्री.

© श्री अ. ल. देशपांडे

अमरावती

मो. 92257 05884

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चला कायम तरुण राहू या का?” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “चला कायम तरुण राहू या का?” ☆ श्री सुधीर करंदीकर

सगळ्यांचच या प्रश्नाला ‘हो’ असंच उत्तर असणार. आणि महिलांचं उत्तर तर ‘हो हो नक्कीच’ असं असणार.

परवा एका कार्यक्रमाला गेलो होतो. कायम तरुण कसे रहावे यावर निरनिराळ्या क्षेत्रामधल्या तज्ञांची भाषणे होती.

सगळ्यांनीच त्यांच्या भाषणांमधून खूप छान छान आणि सोप्या शब्दात माहिती सांगितली. रोजचा व्यायाम, योगा, प्राणायाम, ध्यानधारणा, रोजचे सकाळ संध्याकाळ चालणे, मित्र /नातेवाईक /ओळखीचे यांच्याशी रोज भरपूर गप्पा, गाणी ऐकणे गाणी म्हणणे, रोजच्या खाण्यापिण्याची निवड आणि त्यावर नियंत्रण, वगैरे वगैरे याबद्दल छान आणि सोप्या शब्दात छान माहिती मिळाली. सगळ्यांनीच कार्यक्रम खूप एन्जॉय केला.

एका डॉक्टरांनी सांगितलं की, सीनियर सिटीझन्स यांना कायम तरुण राहायचं असेल आणि तरुण दिसायचं असेल तर काहीतरी नवीन करायला शिका, जे शिकायला आणि करायला कठीण असेल आणि मनाला उत्साह आणि आनंद देणारे असेल.

दुसऱ्या दिवशी मी काल ऐकलेल्या सगळ्या गोष्टी कागदावर लिहून काढल्या, जेणेकरून त्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करता येतील आणि त्यांचा त्यांना पण फायदा घेता येईल.

कालच्या भाषणांमधला “काहीतरी नवीन करायला शिका, जे शिकायला आणि करायला कठीण असेल”, हा विचार मनाला भावला, पण याकरता काय करावे हे काही लक्षात येईना.

एक विचार आला, की आपण स्वयंपाक करायला शिकावं किंवा घरात झाडलोट करायला शिकावं, किंवा भाज्या निवडणे/ भाज्या चिरणे, अशी नवीन कामं शिकावी, ज्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नवीन शिकणे होईल आणि बायकोला पण घरातल्या कामात हातभार लागेल. पण मग लक्षात आलं की यामध्ये कठीण असं काहीच नाही. ही कामं खूपच सोपी सोपी आहेत!!!! (महिला कदाचित या विचाराशी सहमत नसतील).

एक विचार आला, की आपण हार्मोनियम किंवा तबला शिकावा. विचार खूप आवडला, पण मग लक्षात आलं कि या करता कुठेतरी जाऊन क्लास लावावा लागेल. असा कुठलाच क्लास घराजवळ नसल्यामुळे, कुठेतरी लांब जावे लागणार, म्हणजे स्कूटरवर जाणे आले/ ट्रॅफिक आला, वगैरे वगैरे. म्हणून हा विचार रद्द केला.

मग विचार केला की आपण हॉलीबॉल, फुटबॉल, लॉन टेनिस, असा काहीतरी खेळ शिकावा. नवीन शिकणे पण होईल आणि असे खेळणे कठीण पण आहे. बायकोला हा विचार सांगितला. बायको म्हणाली एकदा मोठ्या आरशामध्ये स्वतःला बघा आणि मग डिसिजन घ्या. बायको म्हणेल ते नेहमीच ऐकावे अशी सवय असल्यामुळे लगेच आरश्यासमोर गेलो. स्वतःकडे बघितलं आणि लक्षात आलं की फुटबॉल हॉलीबॉल टेनिस सारखे खेळ आपल्या शरीराला झेपण्या पलीकडचे आहेत.

काय करावे, काय करावे असा विचार करत होतो. माझा नेहमीचा अनुभव म्हणजे एखाद्या गोष्टीचे उत्तर सापडत नसले तर वर बघायचं आणि आपोआप उत्तर सापडतं. म्हणून मी काय करावे काय करावे असा विचार करत वर बघितले. आणि मला उत्तर मिळाले.

नाच करायला शिक, असे उत्तर मला मिळाले. डॉक्टरांनी सांगितलेल्या व्याख्येप्रमाणे माझ्याकरता हे नवीन तर आहेच आणि शिकायला पण कठीण आहे, आणि उत्साह/ आनंद वाढवणारे तर नक्कीच आहे.

नाच म्हटल्याबरोबर माझ्यासमोर नाती कडून नाच शिकणे हा पर्याय पुढे आला.

नात नाचामध्ये एकदम एक्सपर्ट आहे. बऱ्याच ठिकाणी तिचे कार्यक्रम पण होतात. लगेच नातीला फोन केला, आणि वेळा आणि वार ठरवून नाच शिकायला सुरुवात केली.

आता घरी पण रोज नाचाची प्रॅक्टिस करतो आणि मस्त एन्जॉय करतो.

रोज नाच केल्यानंतर, छान शिकवण दिली म्हणून मी कार्यक्रमामधल्या डॉक्टरांचे आभार मानतो/ नाच शिकवल्याबद्दल नातीचे आभार मानतो/ आणि वर बघून ही कल्पना सुचली म्हणून देवाला नमस्कार करतो. आणि बायकोचे पण आभार मानतो.

कायम तरुण राहणे हे तरुण मंडळींना पण आवडणार आणि वयस्कर मंडळींना पण आवडणार (यामध्ये महिलांचा सहभाग नक्की जास्त असणार). चला तर मग नवीन काय करायला शिकायचे ते ठरवा आणि सुरू व्हा…

अशा कुठल्याही छान कार्याकरता रोजच छान मुहूर्त असतो…

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मैत्रीची बँक…” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “मैत्रीची बँक…” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

नुकत्याच साजऱ्या झालेल्या जागतिक मैत्रीदिनाचे औचित्य साधून सुरू करत आहोत…… मैत्रीची बँक …… या मैत्रीच्या बँकेत आपले स्वागत आहे.

आमची वैशिष्ट्ये आणि सुविधा खालील प्रमाणे – – 

०१) ही मैत्रीची बँक २४ तास आपल्या सेवेसाठी सज्ज आहे.

०२) खुशाल यावे आणि आपल्या विश्वासाने ठेवावी प्रेमाची कायमस्वरूपी ठेव आणि हक्काने वसूल करावे मैत्रीचे व्याज. ते पण चक्रवाढीच्या स्वरूपात.

०३) येथे होतात गप्पा टप्पांचे दैनंदिन व्यवहार. शंका कुशंका ठेवाव्या आणि सल्ला मसलत मिळवावी.

०४) आम्ही देतो निखळ आनंदाचे ऋण आणि आपला आनंद हीच आमची परतफेड.

०५) आम्ही स्विकारतो सुखद क्षणांचे धनादेश आणि त्याचे मूल्य आमचे आम्हीच अब्जावधी मधे ठरवतो.

०६) जेथे जाऊ तेथे जेव्हा पाहिजे तेव्हा आणि जितके पाहिजे तितके प्रेम मिळावे म्हणून ATM सेंटर्स पण आहेत. हे ATM म्हणजे असू तेथे मजा अशा स्वरूपाची आहेत.

०७) आपल्या हास्याचा सुखाचा समाधानाचा दागीना आम्ही आमच्या सेफ लॉकरमधे सुरक्षीत ठेवतो आणि या लॉकरची चावी तुमच्याच हातात देऊन केव्हाही लॉकर उघडायची मुभा दिली आहे.

०८) कोणतेही पुरावे न मागता आम्ही खुषीच्या ओव्हरड्राफ्टची सोय केली आहे.

०९) अशा सुंदर बँकेमधे आपले असंख्य मित्र मैत्रिणींचे खाते असल्याने या खातेधारकांशी मदतही आपल्याला मिळू शकेल.

१०) या बँकेचा ताळमेळ सहसा कुणाला साधत नाही. पण विश्वासाच्या ठेवी, प्रेमाची गुंतवणूक सुख समाधानाची राशी आणि मदतीचे देणे हास्याचा नफा यांच्यासह समतोल आपोआप साधला जातो.

अशा सुंदर बँकेचे आपण खातेधारक आहात. तेव्हा या बँकेची नियंत्रक या नात्याने आपणास या बँकेच्या यापुढच्या प्रत्येक वर्धापन दिनाच्या शुभेच्छा आत्ताच देते.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जाळीचे कपाट ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ जाळीचे कपाट ☆ सौ राधिका भांडारकर

स्वयंपाक घराला लागून असलेल्या खोलीत भिंतीजवळ डावीकडे आणि उजवीकडे उघडणारी दोन दारं असलेलं एक लाकडी जाळीचं कपाट माझ्या माहेरच्या घरात होतं. त्याकाळी खरं म्हणजे प्रत्येकच घरात असं दुभत्याचं जाळीचं कपाट हे असायचंच.

घरोघरी मातीच्या चुली त्याप्रमाणे घरोघरी जाळीचे कपाट गं मुली अशी म्हण कोणीच का निर्मिली नाही याचे मला आता नवल वाटते.

खरं म्हणजे तेव्हा कुठे शीतकपाटे अथवा फ्रीज होते! अगदी एखाद्याच्याच घरी असा कौतुकाचा फ्रीज असायचा. बहुतेक ते घर एखाद्या सधन डॉक्टर किंवा वकिलाचेच असायचे, बाकी सगळीकडे जाळीचेच कपाट.

त्या काळात या जाळीच्या कपाटाशी समस्त गृहिणींचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं असायचं. मध्ये एक रुंद फळी असलेलं दोन कप्प्यातलं जाळीचं कपाट म्हणजे घरातलं एक महत्त्वाचं आभूषणच असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. शिवाय कपाटाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की याचा आकार, उंची डिझाईन यामध्ये कमालीचा समताभाव होता. वरच्या कप्प्यात दूध, दही, लोणी खाली चिनी मातीच्या बरणीत लोणचं, जाडं मीठ, वाळलेल्या चिंचेचे गोळे, कोकमं तसेच सकाळच्या जेवणातलं काही उरलेलं वगैरे नीट झाकून ठेवलेलं असायचं. शाळेतून घरी आल्यावर कडकडून भूक लागलेली असायची तेव्हा पहिली धाव या जाळीच्या कपाटापाशीच असायची काहीतरी खाण्यासाठी. आमच्या घरातल्या या कपाटाला वरचा एक पसरट टॉप होता. गमतीने मी त्याला कपाटाची *गच्ची* म्हणायचे. त्यावर आईने अगदी रुचून ठेवलेल्या विविध आकाराच्या पितळी डब्या, बरण्या होत्या आणि त्यात बहुतेक मसाल्यांचे पदार्थ असत आणि दर पंधरा दिवसांनी आम्ही हे मिक्स्ड धातूंचे प्रचंड आवडीचे सामान ब्रासो लावून घासायचो आणि त्यांना लकाकी आणायचो. या लखलखीत पितळी वस्तूंमुळे आमचं जाळीचं कपाट अतिशय देखणं, सुंदर नटलेलं वाटायचं.

अगदी अलीकडेच मी केळकर म्युझियम मध्ये असं जाळीचं कपाट पाहिलं. एखादा लहानपणीचा प्रिय, जवळचा, घट्ट दोस्त भेटावा ना अगदी तस्से मला वाटले. त्या जाळीतून दडलेलं माझं बाळपण जणू काही मला बोलावत होतं! त्या क्षणी माझ्या मनात विचार आला की पूर्वीचं सारंच किती इको फ्रेंडली होतं ना! डबल डोअर, ट्रिपल डोअर, नो फ्राॅस्ट, फ्रीजर हे शब्दसुद्धा कोषात नव्हते आणि त्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या स्पर्धा घराघरात नव्हत्या. जीवनातला सारा टिकाऊ साम्यवाद आणि पर्यावरणपूरक विचार त्या एका जाळीच्या कपाटात सामावलेला होता.

खरोखरच धन्य तो काळ आणि धन्य ती समाधानी संतुष्ट माणसे!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘मानाची भिकबाळी’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ ‘मानाची भिकबाळी’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

पुणे म्हटले की लोकांना प्रथम पेशवाई आठवते. आणि पेशवाई म्हटले की डोळ्यासमोर येतो शनिवारवाडा, कसबा, शनिवार, सदाशिव, नारायण पेठा, लालचुटुक डौलदार झिरमिळ्यांच्या डुलणाऱ्या ब्राह्मणी पगड्या आणि कानात लुटलुटणाऱ्या टपोऱ्या पाणीदार मोती-पाचू-माणकांच्या भिकबाळ्या!

पुणेरी पगडी (आणि हो, भिकबाळीही) विद्वत्तेचे, पांडित्याचे प्रतीक मानले जाते, हे खरे आहे. सध्या पुणेरी पगडी उडविण्याचे, हटविण्याचे प्रयत्न चालले आहेत. मला वाटते, ते योग्यही आहे. विद्वत्ता, पांडित्य यांच्याशी काडीमोड घेतल्यानंतर त्या ‘तसल्या पगड्या’ आणि ‘भिकबाळ्या’ आता हव्यात कशाला!

तसे पाहिले तर ही पुणेरी पगडी आता कोणी वापरतही नाही. केवळ काही विशेष प्रसंगी, सत्कार समारंभाच्या निमित्ताने, नाटका – सिनेमातून आणि विशेषतः राजकारणासाठीच त्या उपयोगात आणल्या जातात. भिकबाळीचेही तसेच आहे. कानात भिकबाळ्या घातलेली तरुण मुले मात्र हल्ली दिसतात काही वेळा. पण सध्याची ती फँशन असावी. त्याचा विद्वत्तेशी, पांडित्याशी दूरान्वयानेही संबंध नसावा.

मलाही भिकबाळी लहानपणापासून आवडते. आपल्या कानात भिकबाळी असावी असे मलाही वाटायचे. पण ती मला कधीच धारण करता आली नाही. एक संधी आली होती बालपणी, पण ती हुकली. त्यानंतर भिकबाळी घेण्याची ऐपत असतानाही मी घेतली नाही. आणि आता तर तशी इच्छा आणि हौसच मी गमावली आहे.

१९५५ सालची गोष्ट आहे. मी त्यावेळी नऊ वर्षांचा होतो. ब्राह्मणाच्या मुलाची मुंज करण्याचे आठ-नऊ हे आदर्श वय. मी कुटुंबातल्या थोरल्या मुलाचा थोरला मुलगा. पहिला नातू. आजोबांनी नातवाची मुंज करायचे घोषित केले. मुंज पुण्यात न करता आपल्या गावी, माळशिरसला (भुलेश्वर, ता. पुरंदर) आपल्या वाड्यात करायची हे ठरले. मुंजीचा दिवसही ठरला. तो होता भारतीय प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी १९५५. मुहूर्त सकाळी ११ वाजून सात मिनिटे.

एक जानेवारी पासून मंगल कार्यापूर्वीचे कुळाचार, उपक्रम, कर्मकांडे सुरू झाली. कुलदेवता, ग्रामदेवता, सद्गुरुदेवता, कसबा गणपती, जोगेश्वरी यांना निमंत्रणे देऊन झाली.

काही जवळच्या नातेवाईकांकडून गडंगणेर, केळवणासाठी निमंत्रणे येवू लागली. चौधरी शास्त्रीजींकडे दिलेली माझी बबूआत्या, (मागच्याच महिन्यातच तिचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले), वडिलांची देवकीमावशी, समोर राहणाऱ्या लक्ष्मीकाकू, शेजारच्या शाळिग्राम मामी इ. कडचे दिवस ठरले. एका पाठोपाठ धडाक्यात कार्यक्रम सुरू झाले.

त्यातील एक महत्वाचे निमंत्रण आले माझ्या सासवडच्या मावशीकडून. सरदार महादेव रामचंद्र पुरंदऱे यांचेकडून. हे मुळचे श्रीमंत घराणे पण आता त्यांची परिस्थिती डबघाईला आलेली होती. तरीही ‘सुंभ जळाला पण पीळ तसाच राहिलेला’ अशी अवस्था. त्यांनी त्यांच्या प्रतिष्ठेला साजेल असाच पुरणपोळीचा बेत केला होता. तीस-चाळीस पान झालं त्या दिवशी. आहेर, मानपान सगळं यथास्तिथ केलं.

दुसरे निमंत्रण आले मामाकडून म्हणजे हिवऱ्याच्या सरदार अण्णाजी बळवंत बोकिलांकडून. (पेशवाईतल्या सखारामबापू बोकिलांचे वंशज) हे माझे आजोळ. माझी आजी, गीताबाई बोकिल ही फार कर्मठ, करारी आणि तालेवार बाई. सासवडला एकटीच रहायची. श्रीमंतीत वाढलेली. माझी आई हे तिचे शेंडेफळ म्हणून लाडाची. तिच्या मुलाची मुंज होत्येय याचे आजीला फार अप्रूप. जेवणाचा थाट थेट पेशवाईचा. चांदीची फुले लावलेले शिसवी पाट, घसघशीत ताटे, त्यापुढे पाच- पाच वाट्या मांडलेल्या. चांदीच्या हत्तीवर लावलेले उदबत्त्यांचे घमघमणारे झाड, प्रत्येक ताटाभोवती सुरेख रांगोळ्या. जेवणात पंच पक्वान्नाचा बेत. जेवणानंतर मुखशुद्धीला गोविंदविडा इ. सर्व काही रीतसर झाले.

सर्वांची जेवणे झाली. ओसरीवर पसरलेल्या जाजमावर सगळे गप्पा मारीत बसले होते. तेवढ्यात आजीने मला प्रेमाने जवळ घेऊन विचारले, “काय रे, तुला मी मुंजीत काय देऊ? सोन्याचे जानवे, बोटातली खड्याची अंगठी की एखादे गळ्यातले बदामाचे लाँकेट? जे तुला आवडेल ते सांग. ” मी आईकडे पाहिले. ती म्हणाली, “अरे, आजी विचारत्येना, मग सांग जे तुला हवंय ते. लाजू नकोस. ” मी विचारात पडलो. माझ्या डोळ्यासमोर ती माणिक – पाचू – मोत्याची, लुटलुट हलणारी भिकबाळी आली आणि मी पटकन सांगून टाकले, “मला भिकबाळी दे. “

आमचा हा आजी-नातू-आईचा संवाद माझे वडील जवळच्या खुर्चीवर बसून शांतपणे ऐकत होते. माझी भिकबाळीची मागणी ऐकल्यावर मात्र ते बोलते झाले. म्हणाले, “अरे, भिकबाळी अशी मागून घेण्यासारखी वस्तू नाहीये रे. ती काही पुरुषार्थ करून, मानाने मिळवायची असते. राजसभेला आपल्या विद्वत्तेने थक्क करणाऱ्या एखाद्या पंडिताला राजा सन्मानाने ती बहाल करतो. आपल्या रामशास्त्र्यांनी कशी मिळवली भिकबाळी श्रीमंत पेशव्यांकडून, तशी मिळवायला हवी”. (हा ‘प्रभात’च्या ‘रामशास्त्री’ चित्रपटाचा परिणाम! ) मी हिरमुसला होऊन, खाली मान घालीत पुटपुटलो, “आजी, तुला जे वाटेल ते दे. जानवं, अंगठी, लाँकेट, काहीही. ” हा विषय तिथेच थांबला. आणि आम्ही पुण्याला परतलो.

ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या मुहूर्तावर माझी मुंज संपन्न झाली. सासवडचे उपाध्याय वे. शा. सं. श्री बगंभटजी यांचे बंधु श्री. बाळंभटजी शाळिग्राम यांच्या पौरुहत्याखाली. चार दिवस सोहळा चालला होता. गावजेवणही घातले गेले.

मुंजीत भिकबाळीऐवजी आजीने मला एक छान सोन्याची आंगठी दिली. भिकबाळीची माझी संधी हुकली होती. एक-दोन दिवसानंतर मी ती आंगठी आईकडे परत दिली, उगाच शाळेत खेळताना हरवायला नको म्हणून!

पाच वर्षांनी एक संधी चालून आली. १९६० साली. या वर्षाचा ‘आदर्श विद्यार्थी’ म्हणून दे. ऋ. ब्रा. सभेने मला निवडले. माझा सत्कार करून काही रोख रकमेचे पारितोषिक दिले.

घरी आल्यावर मी ही आनंदाची वार्ता आईला सांगितली आणि तिला नमस्कार केला. तिने बक्षिसाच्या रकमेचे पाकीट देवासमोर ठेवायला सांगितले. मी तसे केले, पण माझ्या डोळ्यासमोर ती मोती – माणिक – पाचूची, लुटुलुटु हलणारी भिकबाळी चमकत होती. मी आईला तसं सूतोवाच्यही करून ठेवलं.

रात्री मी झोपलोय असं समजून, आईने वडिलांजवळ भिकबाळीचा विषय काढला. त्यावर वडील म्हणाले, “हे बघ, त्याला आदर्श विद्यार्थ्याचे पारितोषिक मिळाले याचा मला अभिमान आहे. पण ती रक्कम भिकबाळीसाठी उडवावी हे मला पटत नाही. विद्यार्थ्याने ती पारितोषिकाची रक्कम आपल्याला उपयोगी, अवडणाऱ्या पुस्तकांवर खर्च करावी असे मला वाटते. ” झाले. भिकबाळीचा विषय पुन्हा एकदा थांबला! माझ्या कानात ती, विद्वत्ता आणि पांडित्य याचे प्रतीक असलेली भिकबाळी लुटुलुटु हलण्याचा योग पुन्हा एकदा टळला.

काळ जात होता. मी भिकबाळीची हौस विसरत चाललो होतो. वडिलांच्या विचारातही काही तथ्य आहे हे वाढत्या वयाबरोबर मलाही पटू लागले होते.

१९८५ साल उजाडले. ‘आखिल भारतीय नाट्य परिषदेचे’, ‘आषाढातील एक दिवस’ या संगीत नाटकातील उत्कृष्ट गीत/काव्य लेखनासाठी, पहिले, ‘छोटा गंधर्व गुण गौरव पारितोषिक’ मला घोषित झाले. मुंबईला जाऊन मी पारितोषिक घेऊन आलो. आई – वडिलांना नमस्कार करून ते पारितोषिक त्यांच्या पायावर वाहिले. डोळ्यासमोर ती मोती – पाचू – माणकाची भिकबाळी पुन्हा चमकली, पण मी गप्प बसलो.

१९९३ साली माझा ‘यंत्रदासविरचित’ ‘सुरक्षितता’ विषयावरचा ‘श्री सुरक्षिताबोध’ पुण्याच्या ‘टेल्को’कंपनीने प्रकाशित केला आणि त्याला ‘महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळा’च्या पहिल्या साहित्य संम्मेलनाने ‘सुरक्षितता विषयावरील सामाजिक जाणीवा निर्माण करणारा सर्वोत्कृष्ट ग्रंथ’ म्हणून प्रथम पारितोषिक देऊन गौरविले. एकशे वीस कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशातील ‘सुरक्षितता’ या वेगळ्या विषयावर इतक्या अनोख्या शैलीत ग्रंथ लिहिणारा मी पहिलाच ग्रंथकार होतो! सर्व बाजूंनी कौतुकांचा वर्षाव झाला. दिल्लीच्या ‘नँशनल सेफ्टी कौन्सिल’चे अध्यक्ष श्री गुप्ता यांनी त्या ग्रंथाला ‘सुरक्षिततेची गीता’ म्हणून गौरविले. डाँ. नीलकंठ कल्याणी, उद्योग महर्षी ऋषितुल्य श्री शंतनूराव किर्लोस्कर, साहित्यिक विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, द्वा. वा. केळकर, इ. मान्यवरांनी मला व्यक्तिगत प्रशस्तिपत्रे पाठवून गौरविले. विद्वत्तेच्या बहुतेक सर्व मांडवाखालून जाण्याचे भाग्य मला त्या निमित्ताने लाभले. ‘पुण्याच्या लौकिकात भर घालणारा नागरिक’ म्हणून पुण्याच्या महापौरांकडून कौतुक झाले. सकाळ, केसरी, म. टा. , लोकसत्ता, टाईम्स इ. वृत्तपत्रांनी त्या ग्रंथावर स्फुटे, परीक्षणे, संपादकीये लिहिली. ‘घरोघरी असावा असा श्री सुरक्षितताबोध’ म्हणून वाखाणले. खूप कौतुक झाले. आता मला आणि माझ्या ग्रंथाला राजमान्यता मिळविली होती.

हे सर्व मानसन्मान आणि पारितोषिके मी माझ्या थकलेल्या आईच्या चरणांवर अर्पण केली. माझे हे यश पाहून तिचे डोळे पाणावले. कौतुकाने तिने माझ्या गालावरून आपले सुरकुतलेले, रुक्ष हात फिरविले. तिच्या डोळ्यातून दोन आसवे ओघळून माझ्या हातावर पडली. मी विचारले, “काय झालं? ” तर ती म्हणाली, ” अरे, हे आनंदाचे आश्रू आहेत. मी खूप आनंदी आहे आज. पण,.. “. “पण काय? ” मी विचारले. तर म्हणाली, “आज ‘हे’ असते तर त्यांना फार आनंद झाला असता तुझे हे कर्तृत्व पाहून. त्यांनी आपल्या हाताने तुझ्या कानात ‘मानाची भिकबाळी’ चढवली असती”.

भीकबाळीविषयीचे त्यांचे तत्वज्ञान आईच्या लक्षात होते तर अजून. मी सुन्न झालो ते ऐकून. माझ्या डोळ्यापुढे मी कधीही न धारण केलेली ती मोती-पाचू-माणकाची ‘मानाची भिकबाळी’ लुटलुटत होती.

वडिलांना इहलोक सोडून सात वर्षे लोटली होती. मी राजमान्यता मिळविली होती. वडिलांच्या इच्छेप्रमाणे मी ग्रंथकार, पंडित, कवि हा लौकिक यथामती प्राप्त केला होता. पण ते पहायला वडिलच हयात नव्हते. आता मला भिकबाळीची हौस उरलेली नाही. मी यापुढे कधी ती धारण करीन आसेही वाटत नाही.

पण जेव्हा जेव्हा मी दगडुशेट गणपतीचे चित्र बघतो, त्याचे प्रत्यक्ष दर्शन घेतो त्या त्या वेळी माझे ध्यान गणेशाची महाकाय तुंदिल तनू, वक्रतुंड, नाना सुगंधाने थबथबा गळणारे गंडस्थळ, कंठातल्या मुक्ताफळांच्या माळा, हिरेजडित किरीट, तीक्ष्ण दंष्ट्र, सरळ सोंड, चंदनचर्चित मलपे दोंद, झळाळणारा पीतांबर, त्यावर वेटोळे घालून बसलेला, इकडेतिकडे चपळाईने टकमक बघणारा कटीचा नागबंध, चरणी बोभाटणाऱ्या वाकिया, घागरिया, रुणझुणणारी नूपुरे, रत्नखचित फरा, हातातील रसाळ मोदक या कशाकडेही न जाता सर्वप्रथम श्री गजानगाच्या लवलवित फडकणाऱ्या कर्णथापा म्हणजे कान आणि त्या शूर्पकर्णातील लुटलुटणाऱ्या, चमकणाऱ्या, मोती-माणिक-पाचूजडित भिकबाळीकडे जाते. दुसऱ्याक्षणी काहीसा ओशाळून भक्तिभावाने मी त्या विघ्नहर्त्या सुखकर्त्या, बुद्धिदात्यापुढे माझे भिकबाळीहीन कान उभयहस्ते पकडून, क्षमायाचना करतो, लीन होतो आणि त्याला साष्टांग नमस्कार घालतो!

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अपराध… लेख क्र. ९ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

 ☆ अपराध… लेख क्र. ९ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

ऋजुता (नाव बदललेले) माझ्या वर्गातली खूप छान दिसणारी, पण गेले दोन दिवस चेहऱ्यावर सतत घाबरलेले भाव असणारी मुलगी.

आज प्रार्थना झाल्यानंतर खाली मान घालून माझ्याजवळ येऊन उभी राहिली.

“काय झालं, बाळा? ” मी प्रश्न विचारला. तशी तिच्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहू लागले. म्हटलं, “ऋजुता, बरं नाही का? काय दुखतंय? ” 

तेव्हा ती म्हणाली, “बाई, परवा तुमच्यावर मी मुद्दाम पाय नाही दिला. मला मागून कोणीतरी ढकललं, म्हणून तुमच्या पायावर पाय पडला. सॉरी! ” 

मी तिला जवळ घेतलं आणि म्हटलं, “वेडी कुठली! अगं, मी तुला काही बोलले का? मी तर विसरूनही गेले होते. डोळे पूस आणि हस बघू. “

डोळे पुसत पुसत ऋजुता आपल्या जागेवर जाऊन बसली.

शाळा सुटताना कायम मी पायऱ्यांवर उभे राहून मुलांना टाटा बाय-बाय करते. दोन दिवसांपूर्वी वरच्या वर्गातली मुलं जोरात धावत आल्यामुळे, त्यांचा धक्का लागून, ऋजुताचा पाय जोरात माझ्या पायावर पडला. मी कळवळले, मटकन खाली बसले. अपराधी भाव चेहऱ्यावर आणत ऋजुता माझ्याकडे बघत बघत निघून गेली. दोन दिवस ती खाली मान घालून बसलेली असे.

काय झालं ते आज तिला विचारायचंच असं ठरवून मी वर्गात गेले होते, तर तीच समोर उभी राहिली होती आणि हा सगळा उलगडा झाला.

किती निरागस आणि निस्वार्थी असतात ना ही मुलं! त्याहीपेक्षा तिचं हे असं संवेदनशील असणं मनाला स्पर्शून गेलं.

आपल्यामुळे बाईंना लागलं ही भावना गेले दोन दिवस तिच्या मनात घर करून होती, त्यामुळे ती धड झोपलीही नसेल कदाचित.

मी दोन दिवसांपूर्वीच तिच्याशी बोलायला हवे होते. मग त्यानंतर वर्गात, “तुम्ही सर्व माझे किती लाडके आहात, मी तुमच्यावर कशी बरं रागवेन? ” असं जेव्हा समजावून सांगितलं तेव्हा कुठे तिचा चेहरा थोडासा निवळला आणि मला बरं वाटलं.

क्रमशः दर गुरुवारी… 

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ श्रावण… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? मनमंजुषेतून ?

☆ श्रावण☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सृष्टी राणीला आनंद झाला

हासत नाचत श्रावण आला.

आषाढ महिन्यातील पावसाचे तांडव शांत होत आले आणि श्रावणाचे वेध लागले.

ढगाआड दडलेल्या सूर्याने धरेशी आता लपंडाव खेळण्यास सुरुवात केली आहे.

श्रावणमास म्हटला की बालकवींच्या पंक्ति आठवतात,

.. श्रावणमासी हर्ष मानसी

 हिरवळ दाटे चोहीकडे

 क्षणात येते सरसर शिरवे

 क्षणात फिरुनी ऊन पडे 

– – नजरेसमोर हिरवागार, प्रफ्फुलीत, टवटवीत निसर्ग उभा राहतो. पाऊस चांगला झालेला आहे, वावरात शेतकर्‍यांनी लावण्या केलेल्या आहेत, रोपे मोठी होऊन शेतात डुलत आहेत.

मला चांगले आठवते, श्रावणी शनिवारी संध्याकाळी लवकर पाच वाजताच सकाळचा उपवास सोडण्यासाठी आम्ही जेवायला बसायचो. केळीच्या पानावरचा तो गरम गरम वाफेचा भात, वरण आणि त्यावर साजूक तुपाची धार! अहाहा! काय त्याची चव! सोबतीला हिरव्या मटारची उसळ, वालाचे किंवा मुगाचे बिर्ढे, अळूच्या वड्या आणि आजीने केलेले तांदळाच्या पिठाचे खोबर्‍याचा चव घालून केलेले घावणे. अगदी ब्रम्हानंद! जेवणं झाली की पप्पा आम्हाला कळव्याच्या पुलावर घेऊन जायचे आणि त्या पावसाळी कुंद वातावरणात दूरवर पसरलेली, डोलणारी भाताची शेते पाहून जो काही आनंद मिळायचा तो केवळ अवर्णनीय!

श्रावणमास म्हणजे सणांची रेलचेल आणि मिष्टान्नांचा रतीब!

नव्या नवर्‍यांनी नटून थटून, साज श्रृंगार करून सोमवारी शंकराला शिवामूठ वाहायची आणि सौभाग्याचे दान मागायचे,

मंगळवारी एकत्र जमून मंगळागौर पूजायची आणि झिम्मा फुगड्या असे खेळून रात्र जागवायची. आता काळ बदलला, मुली नोकरीसाठी बाहेर पडल्या, त्यांची वयेही मोठी असतात, त्यामुळे ह्या सणांचे स्वरूप बदलले असले तरी परंपरा आजही टिकून आहे ही आनंदाची गोष्ट आहे.

नागोबाला दूध घेऊन वारूळाला जाणार्‍या माहेरवाशिणी दिसल्या नाहीत तरी घरोघरी पाटावर नागाचे चित्र काढून नागाची पूजा केली जाते, नागपंचमीचा सण साजरा होतो.

 नारळी पौर्णिमा कोळी बांधवांचा मोठ्ठा सण! “दर्याला आयलंय उधाण” त्या खवळलेल्या सागराला श्रीफळ अर्पण करून शांत करायचे ही नारळी पुनवेची संकल्पना!

त्याचबरोबर रक्षाबंधन! भाऊ बहिणीचे अतूट नाते. बहीण भावाला राखी बांधून त्याला प्रेमाच्या धाग्याने जखडून ठेवते आणि भाऊ तिला तिचे सदैव रक्षण करण्याचे वचन देतो.

गोकुळाष्टमी. कृष्णजन्म! घरोघरी जन्माष्टमी साजरी केली जाते. बालगोपालांचा खेळ! दहीहंडी फोडण्यासाठी पथके तयार असलेली आपण पाहतो. ठिकठिकाणी उंच उंच बांधलेल्या दहीहंड्या फोडण्यासाठी ही पथके तयार असतात. सगळीकडे कसे उत्साहाचे वातावरण! पिठोरी अमावस्येने श्रावणाची सांगता होते.

दारी आलेल्या अतिथीचे रक्षण कर असे सांगून आई मुलाला दिव्याचे वाण देते. वंशाचा दिवा सतत तेवत राहो अशी यामागची भावना.

श्रावणातल्या या सगळ्या सणांच्या पुराणकथा आहेत, अतिशय मनोरंजक आणि उद्बोधक! बदलत्या काळातही त्या टिकून आहेत, आपण त्यांचे महत्व जाणतो आणि यथाशक्ति हे सण साजरे करतो यातच आनंद आहे, समाधान आहे.

कालचक्र हे असेच चाले

श्रावणात मन हिरवे झाले……

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares