एका व्यापाऱ्याने दक्षिण आफ्रिकेतून एक प्रचंड हिरा विकत घेतला — अगदी अंड्याच्या पिवळ्या बलकाएवढा मोठा. पण त्याची निराशा झाली, कारण त्या हिऱ्यामध्ये आतून एक भेग होती.
एका कुशल ज्वेलरकडे जाऊन मार्गदर्शन मागितले त्याने. ज्वेलरने नीट निरीक्षण करून सांगितले:
“हा हिरा दोन परिपूर्ण रत्नांमध्ये विभाजित करता येईल, आणि दोन्हीची किंमत मूळ हिऱ्यापेक्षा जास्त असेल.
पण एक चुकीचा घाव बसला तर तो तुकड्यांत फुटेल आणि पूर्णपणे निरुपयोगी होईल. मी असा धोका घेणार नाही. ”
व्यापारी जगभर फिरला — अनेक देशांतील दागिनेकारांना तो हिरा दाखवला.
प्रत्येकाचं उत्तर एकच — धोका खूप मोठा.
शेवटी कोणीतरी त्याला अॅमस्टरडॅममधील एका वृद्ध ज्वेलरबद्दल सांगितले —
ज्याच्या हाताला सोनेरी स्पर्श असल्याची ख्याती होती.
तो त्याच दिवशी तेथे पोहोचला.
वृद्ध ज्वेलरने हिऱ्याकडे भिंगातून पाहिले आणि पुन्हा इशारा केला.
तेवढ्यात व्यापाऱ्याने मध्येच बोलत म्हटले:
“ही कथा मी अनेकदा ऐकली आहे.
आता मी तयार आहे. फक्त हे काम करून टाका. ”
ज्वेलरने मान हलवली, किंमत ठरवली, आणि मग शांतपणे शेजारी काम करणाऱ्या एका तरुण शिकाऊकडे वळला.
त्या मुलाने हिरा हातात घेतला, तळहातावर ठेवला, आणि एकच स्वच्छ, अचूक प्रहार केला.
हिरा सुंदरतेने दोन निर्दोष रत्नांमध्ये विभागला.
… त्याने वर बघितलेही नाही — फक्त ते रत्न परत गुरूकडे दिले.
आश्चर्यचकित व्यापाऱ्याने विचारलं:
“हा मुलगा तुमच्याकडे कित्येक वर्षे काम करत असेल? ”
वृद्ध ज्वेलर शांतपणे हसला:
“याचा कामाचा तिसरा दिवस आहे.
त्याला त्या हिऱ्याची खरी किंमत माहिती नाही…
म्हणूनच त्याचा हात थरथरला नाही. ”
—
✨ धडा:
कधी कधी आपण काहीतरी गमावण्याची जितकी जास्त भीती बाळगतो, तितकेच ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे, त्या करण्याची क्षमता आपल्यात कमी होते.
जीवनातील आव्हानांना तितकं जड समजू नका, त्यांना हलकं माना…
तेव्हाच तुमचा हात स्थिर राहील.
* * * *
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
☆ “फक्त नऊ ओळीत महाभारताचे सार…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
फक्त नऊ ओळींमध्ये महाभारताचे सार – –
*फक्त नऊ ओळींमध्ये महाभारताचे सार समजून घ्या, ज्यात पाच लाख श्लोक आहेत… *
तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल,
तुम्ही स्त्री असो वा पुरुष,
तुम्ही गरीब असो वा श्रीमंत,
तुम्ही तुमच्या देशात असाल किंवा परदेशात,
थोडक्यात…
*जर तुम्ही माणूस असाल तर खालील महाभारतातील मौल्यवान ९ मोती वाचा आणि समजून घ्या… *
१. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या अवास्तव मागण्या आणि इच्छांवर वेळीचं ताबा ठेवला नाही तर तुम्ही आयुष्यात असहाय्य व्हाल… *’कौरव’*
२. तुम्ही कितीही बलवान असलात तरी तुम्ही अधर्माला पाठिंबा दिलात तर तुमचे सामर्थ्य, शस्त्रे, कौशल्ये आणि आशीर्वाद सर्व निरुपयोगी होतील… *’कर्ण’*
३. *तुमच्या मुलांना इतके महत्त्वाकांक्षी बनवू नका की ते त्यांच्या ज्ञानाचा गैरवापर करून संपूर्ण विनाश घडवून आणतील… *
*’अश्वत्थामा’*
४. अशी वचने कधीही देऊ नका की तुम्हाला अधर्मींना शरण जावे लागेल… *’भीष्म पितामह’*
५. *संपत्ती, सत्ता, अधिकार यांचा गैरवापर आणि चुकीच्या लोकांचे समर्थन हे शेवटी संपूर्ण विनाशाकडे नेत असते… *’दुर्योधन’*
६. *सत्तेचा लगाम कधीही आंधळ्या व्यक्तीकडे सोपवू नका, म्हणजे जो स्वार्थ, संपत्ती, गर्व, ज्ञान, आसक्ती किंवा वासनेने आंधळा आहे, कारण तो विनाशाकडे नेईल… *’धृतराष्ट्र’*
७. ज्ञानासोबत शहाणपण असेल तर तुमचा विजय नक्कीचं होईल… *’अर्जुन’*
८. फसवणूक तुम्हाला सर्वच बाबतीत यशाकडे नेणार नाही… *’शकुनी’*
९. *जर तुम्ही नैतिकता, नीतिमत्ता आणि कर्तव्य यशस्वीपणे जपले तर जगातील कोणतीही शक्ती तुमचे नुकसान करू शकत नाही. * *’युधिष्ठिर’*
हा लेख सर्वांसाठी फायदेशीर आहे, म्हणून कृपया कोणत्याही बदलाशिवाय सामायिक करा.
*सर्वे भवन्तु सुखिनः*
*सर्वे सन्तु निरामयः*
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती: सौ. शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “चढलेला मोठा आवाज” – लेखक – अज्ञात☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
“शांत स्वरात बोलल्यास साक्षात ईश्वरच त्या घरात वास्तव्य करतो. “
– – आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आली आहेत की, घरामध्ये चढ्या आवाजात बोलू नये. विषारी लहरी पसरतात. मृदू स्वरात संवाद करावा. कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत ठेवावा.
घरात हसतमुखाने वावरावे. मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे.
घरांतील नोकरवर्गावरही तारस्वरात ओरडू नये कारण त्यांना राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या *ऋण लहरी अशुभ अनुभव* देऊ लागतात. अचानक पोट बिघडते. भूक मंदावते. अस्वस्थ वाटू लागते. म्हणून कोणालाच चढ्या आवाजात रागावणे किंवा शिव्या देणे हे *अदृष्य लहरींची शिकार* होण्याची वेळ आणते. काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नि जसा आपोआप शांत होतो तसा आपलाही राग आवरला जातो.
शुभ लहरींचे ही तसेच आहे. १२ हजार मैलांवर असलेल्या मुलाला आई आशिर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते. २५ वर्षाच्या कर्णाला पाहून कुंतीचे उत्तरीय ओले होते. वासराला पाहून गायीला पान्हा फुटतो.
एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंददायी लहरी आपला उत्साह वाढवितात. एखाद्या सफाई कामगाराला बक्षिस दिले तर तो हात उंचावून आशिर्वाद देणार नाही, थँक यु म्हणणार नाही पण
त्याच्या मनातून निघणाऱ्या आनंद लहरींमुळे तुमच्या शरीरा भोवती एक विशिष्ट चुंबकीय तरंग तयार होऊन तुम्हाला आगळावेगळा उत्साह वाटेलच.
म्हणून दानधर्माचे अपार महात्म्य आहे.
फक्त मनुष्य योनीला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे. ती दाहक बोलण्याने अपमानित होते.
म्हणून संवाद साधतांना, मंत्रपठण करतांना, स्तोत्रे म्हणतांना, आरती करतांना, पोथी वाचतांना, *आपला स्वर कमालीचा मृदू असावा. * भले तुम्ही मग कितीही बैठक, सत्संग करा पण बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. तुमच्या आरडा ओरडा करणाऱ्या स्वभावाने कोणीच रिस्पेक्ट करत नाही. शक्य असेल तेवढे शांतपणे बोला, शांतपणे वागा तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल नाही तर सगळं व्यर्थ आणि देखावा आहे.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ वर्ग नावाच्या मैफलीतील कलावंत…! – लेखक : श्री प्रवीण दवणे ☆ प्रस्तुती – सौ. दीपा नारायण पुजारी ☆
☆
शिक्षक म्हणजे बोलणारा कारकून नव्हे. तर तो एक कलावंत आहे. कलावंत ज्याप्रमाणे जन्मावा लागतो असे म्हणतात ;त्याचप्रमाणे शिक्षक सुद्धा जन्मावा लागतो असे मला वाटते. याचाच अर्थ कलावंताची प्रतिभा जशी उपजत असते, पुढे ती मार्गदर्शनाने फुलवता येते. विविध प्रकारच्या कार्यशाळांतून आकाराला येते. व्यासंगाने कलेची जडणघडण करता येते. परंतु मुळात त्या व्यक्तिमत्त्वात कला निर्मितीचे काही रसतंतू असावेच लागतातत्. केवळ कुणाला तरी वाटते आहे म्हणून, कवी नर्तक, चित्रकार गायक, निर्माण करता येत नाहीत. अध्यापन व्यवसायाचा मी जेव्हा अगदी मुळातून विचार करतो, तेव्हा मला असे वाटते, कलावंताप्रमाणे अध्यापक हा सुद्धा अभिजात असावा लागतो. नव्या पिढीला काहीतरी मनातलं सांगावे, केवळ इथून तिथून गोळा केलेले, आजच्या भाषेत कॉपी-पेस्ट केलेले अध्यापन असून चालत नाही. जमिनीतून तरारून बी उगवावे तसे अध्यापन असावे लागते. केवळ देखावा म्हणून प्लॅस्टिकचे झाड प्लास्टिकची फुले कितीही हुबेहूब केली, तरीही आलेल्या पाहुण्यांना चकवता येईल; परंतु फुलपाखरांना चकवता येत नाही. कारण फुलपाखरांना फुलांच्या आत्म्यातील सुगंध कळतो. त्याचप्रमाणे, नव्या पिढीलाही समोर उभा असलेला आपला शिक्षक हा अंतर्यामातून बोलतो आहे की नाही हे नक्कीच जाणवते. विद्यार्थी उघड व्यक्त करू शकणार नाही, परंतु त्याला अध्यापनातील सच्चेपणा नक्कीच प्रतीत होत असतो. मनापासून केलेल्या अध्यापनाने विद्यार्थ्यांची हृदये स्पंदित होतात. खऱ्या अर्थाने आपला व्यवसाय म्हणजे ” ये हृदयीचे ते हृदयी “रुजवण्याचा आगळावेगळा स्वधर्म आहे.
अध्यापनाची कलासुद्धा आपल्या पिंडात असावी लागते. अर्थात् प्रशिक्षणाने एक उत्तम अध्यापक घडवता येतो. पण मुळात अध्यापनाचे काही मूलद्रव्य त्याच्यात असावे लागते.
सुमारे पस्तीस वर्षाच्या अध्यापन काळात आणि अनेक विद्यालयांच्या मधून कार्यक्रम केल्यामुळे तेथीलही अनेक प्रकारचे अध्यापक निरीक्षणांतून अनुभवले.
काहीना केवळ प्राचार्यांच्या केबिनमध्ये खलबते करण्यातच रस असे. आपले नियोजित तास बुडतील कसे, याची काळजीपूर्वक काळजी घेताना काही शिक्षक असायचे. काही शिक्षकांना केवळ वेतनश्रेणी, भत्त्यांची वाढ आणि विविध प्रकारच्या आर्थिक कमाईच्या वाटा यातच रस असायचा. ही मंडळी कधी एखाद्या नव्या पुस्तकाबद्दल बोलली आहेत, किंवा वर्गातील एखादा नवा शैक्षणिक प्रयोग त्यांनी चर्चिला आहे, किंवा स्नेहसंमेलनात एखादा उपक्रम त्यांनी मुलांकडून बसवला आहे, हे मला जाणवलेच नाही. बरीच मंडळी ती अक्षरशः काठावर बसून गंमत पहात. लाटेवर येऊन त्यांना अध्यापनाच्या अथांग तलावात भिजता आलेच नाही. काही जणांना वेगवेगळ्या निमित्ताने चमचमीत खाण्याचे आकर्षण असे. एखादी खाद्य पार्टी आयोजित करण्यात त्यांचा हातखंडा. अर्थातच स्टाफरूम मध्ये असे चेहरे लोकप्रिय असतातच तसेच ते होते. त्यातील काहींचे स्वभाव चांगले होते. परंतु प्रत्यक्ष अध्यापनात जितकी उडवा उडवी करता येईल तितकी ते करत असत. आपल्या संपन्न ग्रंथालयाचा लाभ त्यांनी मनापासून कधी घेतला आहे हे मी अनुभवलेच नाही फक्त पाठ्यपुस्तके तेवढे बदलत असतात आणि संभाव्य प्रश्नांच्या उत्तरांची मार्गदर्शक आहे या व्यतिरिक्त अनेक प्राध्यापकांचा ग्रंथालयाशी संबंध नसायचा नवीन चरित्रे कुठली आली आहे कथा कादंबरी लेखन कुठले आले आहे याकडे त्यांनी आवर्जून लक्ष दिले आहे हे कधी मला जाणवलेच नाही आणि गंमतही की आपण एखाद्याला सुचवू शकतो पण आपल्या व्यवसाय मित्रांना आपण आग्रह करू शकत नाही, कारण आपला अपमान करण्याचे धारदार शस्त्र त्यांच्याकडे असते. त्यांना आपले हेतू ध्यानात येत नाही, त्यांना फक्त वाटते “हा कोण टिकोजीराव! आम्हाला काहीतरी वेगळे शिकवतो आहे. स्वतःचे ज्ञान घरी ठेवा म्हणाव ” हा त्यांचा सूर लगेच आपल्याला लक्षात येतो आणि अर्थातच आपण त्यांना काही सांगण्याच्या फंदातच पडत नाही
परंतु सुदैवाने अशा प्रकारची मंडळी अगदी तुरळक असत, पण एखादा खडा सुद्धा आपले जेवण काहीसे नीरस करतोच ना! उत्साही शिक्षकांचा उत्साह काही उदास मंडळी मुळे मावळतो, अशावेळी ज्येष्ठ शिक्षक, प्राचार्य, यांनी जे चैतन्याने काम करत आहेत, जे प्रयोगाशील आहेत, आपले तन-मन धन खर्च करत आहेत, त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. कारण त्यातच वर्गात आशेने वाट पाहणाऱ्या नव्या पिढीचे भवितव्य दडलेले आहे. कुठल्याही क्षेत्रात लोकप्रियता ही योगायोगाने आपोआप मिळत नाही तर ती प्रत्यक्ष काम करून सातत्य ठेवून मिळवावी लागते. मोराला ज्याप्रमाणे पिसारा असतो, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या भक्तीचा पिसारा त्यांना लाभतो. मी असे काळजाचे शिक्षक अनेक पाहिले आणि मुशाफिरीतही आजही मी असे कार्यशील उत्साही शिक्षक पाहतो आहे अनुभवतो आहे. अध्यापनाची मनापासून आवड असणारे अनेक शिक्षक मी असे पाहिले की त्यांना अधिक वेतनाच्या व्यावसायिक संधी त्यांच्या उमेदीच्या वयात मिळत असूनही अध्यापकच व्हायचे याच स्वप्नाने ते झपातून या क्षेत्रात आले होते. जेव्हा कोणत्याही शाळेत कार्यक्रमासाठी जातो तेव्हा डोळ्यात उत्सुकता असलेला, संवादात प्रसन्नता आणि वागण्यात अगत्य असणारा तरुण अध्यापक मी जेव्हा पाहतो, तेव्हा मला त्याचा मी न पाहिलेला, अतिशय रंगलेला असा तास कल्पनेने अनुभवतो.
एखादी मैफल रंगवायला गायक रंगमंचावर जावा त्या उत्साहाने जे वर्गात जातात आणि तास संपवून पुन्हा एकदा स्टाफरूम मध्ये परतल्यावर तो उत्तम अध्यापनाचा आनंदरंग त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसत असेल, तर तो अध्यापक या क्षेत्राशी एकरूप झाला आहे असे समजावे.
आपण अध्यापक अखेर माणसेच आहोत. केव्हा तरी कंटाळा येणारच. केव्हातरी मन उदास असणार ; आपल्या घरातील किंवा आयुष्यातील सुखदुःख आपल्या चेहऱ्यावर ते उमटणारच. पण हे ‘केव्हातरी ‘ केव्हातरीच असावे, जर तोच आपला स्वभाव झाला, तर आपणही उदास आणि समोरची पिढी उदास!
शक्यतो एका दालनातून दुसऱ्या दालनात जावे, तसे मनाचा मूड बदलून स्वतःला अंतर्यामातून बदलता येणे ही सुद्धा अध्यापन व्यवसायातील एक कला आहे. एकदा हा व्यवसाय आपण स्वीकारल्यानंतर त्या व्यवसायाविषयी, आणि विशेषतः जिवंत मनांना, नवी पंखभरारी देण्याचा हा व्यवसाय निवडल्यानंतर आपली जबाबदारी अधिक वाढते. अंतर्मुख होऊन अगदी प्रत्येकाने आपल्याला या व्यवसायात आनंद मिळतोय का? मिळत असेल तर तो अधिक कसा मिळेल आणि मिळत नसेल तर तो का मिळत नाही याचा शोध अंतर्मुख होऊन घ्यायला हवा असे मला वाटते. आपल्या व्यवसायातील व्यावसायिक अस्थिरता, काही वेळा होणारा स्थानिक पातळीवरचा अन्याय, अध्यापनाव्यतिरिक्त करावी लागणारी शासकीय कामे ही कारणे आहेतच. नक्कीच अशा तऱ्हेच्या कारणांचे कुणीच समर्थन करणार नाही.
पण मला नेहमी वाटते, या सगळ्या बाह्य गोष्टीची शिक्षा त्या अजाण विद्यार्थ्यांना का बरे द्यायची,? उभे आयुष्य त्यांना साद घालत असत भविष्य खुणावत असते. मोठ्या अपेक्षांनी ती समोरील अध्यापकाकडे पाहत असतात. अशावेळी आपला अनुभव, आपले ज्ञान, व्यवहारज्ञान त्यांना भरभरून दिले तर शिक्षक पदाचा विस्तारही होतो आणि ते पद सखोले होते सखोलही होते.
कलावंत ज्याप्रमाणे कलेतील नवनिर्मितीमुळे चिरतरुण राहतो. अक्षरशः अध्यापकाच्या व्यवसायातही तेच घडत असते. मला काही जण विचारत असत, ” एकच कविता अनेक वर्ष शिकवून तुम्हाला कंटाळा येत नाही का? “
मी त्यांना म्हणत असे, “कविता तीच असेल, पण मी नवा आहे. मी नित्य नवा झालो की आपोआपच कवितेतील नवीन रूपरंग आकळतात. शिवाय दरवर्षी वर्ग बदलतो, चेहरे नवीन असतात. त्यामुळे अर्थात ती कविता मला “तीचतीच “वाटत नाही माझे तर स्पष्ट मत आहे, आपल्या मानसिक वयाबरोबर साहित्यातील संवेदनशील पदर अधिक उलगडत जातात. उदाहरणार्थ ‘औदुंबर’ सारखी कविता एका सारखी शिकवू शकत नाही. सतत त्यात नवे नवे काहीतरी सापडत जाते. खरे म्हणजे नवे जे सापडते, ते केवळ कवितेतील असत नाही, तर ते आपल्यातले नवे सापडते ;आणि त्यामुळे भाषा असो की विज्ञान, गणित असो का इतिहास भूगोल, विषय कुठलाही असो ;सतत नव्या वर्षी नव्या वर्गात नव्या मुलांपुढे आपण नवतेचा शोध घेत असतो आणि त्यामुळेच नवनिर्मितीचा आणि कलावंताचा ज्याप्रमाणे संबंध आहे, त्याप्रमाणे अर्थातच अध्यापकाचा आणि नवनिर्मितीचा संबंध आहे. म्हणूनच मला हाडाचा शिक्षकही कलावंत वाटतो. आचार्य अत्रे यांनी आपल्या आत्मकथनात” मी शिक्षक कसर झालो? “या प्रकरणांमध्ये स्पष्ट म्हणून ठेवले आहे, “पुढे आयुष्यात माझ्याकडून जे लेखन झाले, अनेक नाटके लिहिली गेली, साहित्यात मी अनेक प्रयोग केले, त्या सर्वांची मुळे माझ्या अध्यापन व्यवसायात आहेत. अतिशय बोलके वाक्य आहे त्यांचे. लेखनातील प्रतिभा अध्यापनात येते आणि अध्यापनातील प्रतिभेने आपले लेखने वेगळे होते.
शिक्षकाकडे अक्षरशः संपूर्ण समाज अध्यापनाच्या निमित्ताने वर्गात येतो. आणि त्यामुळेच अनेक सुखदुःखे आपण जवळून पाहतो. केवळ आपण पुस्तके वाचत नाही, विद्यार्थ्यांचे चेहरे वाचतो. चेहरे वाचतावाचता, सामाजिक पुस्तक कळत जाते. समाजात नेमके कुठले बरे वाईट बदल होत आहेत, मानसिक प्रवाह येत आहेत, कुठल्या प्रकृती विकृती जन्माला येत आहेत, हे आपल्याला एक कलावंत म्हणून कळते. अध्यापकाला ती संधी असते. मात्र ती घेतली पाहिजे. अध्यापनाच्या व्यवसायाकडे केवळ एक अनुक्रमाणिका पूर्ण करण्याचा, आणि उत्तर पत्रिका तपासण्याचा व्यवसाय तेवढ्यापुरताच जर आपण पाहिले, तर अनुक्रमणिका पूर्ण होईल आपण मात्र अपूर्ण राहू आणि अर्थातच एक अपूर्ण शिक्षक स्वतःलाही न्याय देऊ शकत नाही, आणि आपल्या व्यवसायाला हिला न्याय देऊ शकत नाही. म्हणूनच मनाच्या पूर्ण जागेपणाने, उत्फुल्ल मनाने आपण वर्गात जावे लागते. कलावंत ज्याप्रमाणे एखादी मैफल रंगवतो,.
कधी वक्तृत्वाने कधी अभिनयाने, त्याप्रमाणे अध्यापकाला सुद्धा वर्ग नावाची मैफल रंगवण्याची संधी असते. मात्र ते जिंदादिल मन आपल्यामध्ये हवे, ते आपल्यामध्ये तो निश्चित आहे, म्हणूनच हे हितगुज.
आज एका हॉस्पिटलचा जिना घाईघाईने चढत होतो, पंधराएक पायऱ्या असतील! माझ्या पुढे कठडा पकडून उजव्या हातात दोन पिशव्या सांभाळत एक साठीच्या आसपासचे गृहस्थ हळूहळू जिना चढत होते. किरकोळ शरीरयष्टी, अंगात मळकट शर्ट, साधीशी पॅन्ट!
सहसा मी असं कधी करत नाही, पण आज का कोणास ठाऊक, वाटलं आणि मी मागून त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो, “द्या इकडे पिशव्या! ”
त्यांनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं, एकंदरीत माझे कपडे, डोळ्यांवर राहून गेलेला गॉगल, आणि तसं पाहता माझं वय… मी देखील गेलोय की पन्नाशीत! म्हणजे आमच्या वयात फारसं अंतर नसावं!
“असू द्या! ” ते संकोचून म्हणाले. तरी मी पिशव्या घेतल्या, त्यांनी अजून विरोध करू नये म्हणून भराभर पायऱ्या चढलो आणि वर जाऊन उभा राहिलो. ते जिना चढताना माझ्याकडे पाहून छान हसले. जवळ आले, पिशव्या माझ्याकडून घेतल्या, खाली जमिनीवर ठेवल्या आणि माझ्या दोन्ही खांद्यावर अलगद हात ठेवले.
“बायको सिरीयस आहे माझी, खूप नाजूक अवस्थेत आहे, पण आत्ता पायऱ्या चढताना वाटलं… जगेल ती, अजून जगात चांगुलपणा शिल्लक आहे! ”
सरसरून काटाच आला अंगावर… किती किरकोळ, साधी, क्षुल्लक गोष्ट वाटते आपल्याला, पण घेणारा त्यातून काय, कसं घेईल हे सांगता येत नाही!
आज मनोमन ठरवलं… कोणी दखल घेऊ दे वा न घेऊ दे, निरपेक्ष वृत्तीने जमेल तितकं दुसऱ्यासाठी करत राहायचं…
आयुष्याचा जिना चढत असताना असंच जमेल तितकं दुसऱ्याचं दुःख हलकं करायचा प्रयत्न करायचा! वरच्या टोकाला पोहोचल्यावर जे समाधान मिळेल, तोच तर स्वर्ग की!
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈