मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘द बेस्ट शेफ…’ – लेखिका: गौरी ब्रह्मे ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर☆

श्री मनोहर जांबोटकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘द बेस्ट शेफ…’ – लेखिका: गौरी ब्रह्मे ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

दुपारचे दोन वाजत आले होते. ऊन चांगलंच चढलं होतं. घरी परतायची घाई होती. मुलं शाळेतून आली असणार. त्यांचं जेवण, अभ्यास, आपली कामं, सगळंच वाट बघत असतं. तरीही या रस्त्यावर नेहमीप्रमाणे गाडीची गती मंदावतेच, पावलं जराशी रेंगाळतातच. कारण या रस्त्यावर आई रहाते. तिला दोन मिनिटं भेटून येऊ असा विचार मी करते.

कित्येकदा इथे जवळपास कामासाठी येऊन जाते, पण तिला सांगत नाही. सांगितलं, तर घरी का आली नाहीस, म्हणून ती रागावते. पण आपल्याला कायमच घाई असते. आज वाकडी वाट करून तिला भेटूच म्हणते.

ढळढळीत दुपारी मला दारात पाहून आई जरा चमकतेच.

काय ग अचानक? म्हणत लगेच हातात पाणी देते.

काही नाही गं… सहज आले, म्हणत आईच्या सोफ्यावर धपकन बसते. इथे धपकन बसायला फार मजा वाटते. मग तिच्या जिव्हाळ्याचा प्रश्न येतो,

‘जेवलीस? ‘

मी नाही म्हणते, घरी जाऊन (आपणच बनवलेलं) जेवायचं असतं. जरा इकडचं तिकडचं बोलतो आम्ही.

परत जिव्हाळा प्रश्न रिटर्न्स, जेवतेस का? मी नको गं… म्हणत असतानाच, उशीर बघ किती झालाय, मुलं बघतील आज एक दिवस स्वतःचं, जेऊनच जा म्हणत, एकीकडे ती स्वयंपाकघरात शिरतेसुद्धा.

एकटीच असल्याने स्वतःपुरता सकाळचा स्वयंपाक करून तिने संपवलेला असतो. त्यामुळे माझ्यासाठी आता स्क्रॅचपासून सुरुवात करायची असते. तिला काम करावं लागतं, या गोष्टीचं मी स्वतः आई झाल्यापासून मला फार वाईट वाटतं. पण तसंही आईचं कायम ऐकावं, हे मी नाहीतरी आमच्या लेकीला बजावत असतेच. त्यामुळे मी तिचं निमूट ऐकते.

‘जरा वेळ टीव्ही बघ, मी करते काहीतरी’ म्हणत, साठी ओलांडलेली माझी आई, एकीकडे कांदा चिरायला घेते.

काही मदत करु का गं? या प्रश्नाचं उत्तर ‘ नको, बस नुसती ‘ असं येणार हे माहीत असलं, तरी मी उगाच तिला विचारते. कारण हे उत्तर ऐकायला मला आवडतं.

पाच मिनिटात स्वयंपाकघरातून कांदा फोडणीत घातल्याचा वास, कुकरच्या शिट्टीचे, भाकरी थापल्याचे आवाज येऊ लागतात. मला तिच्या हातची भाकरी प्रचंड आवडते, हे ती कधी म्हणजे कधीच विसरत नाही. माझ्यासाठी जगातला बेस्ट शेफ कामाला लागलेला असून सगळ्यात सुंदर अन्न बनत असतं.

दहाव्या मिनिटाला माझ्यासमोर तव्यावरची तांदळाची भाकरी, वाफाळतं पिठलं, घट्ट दह्यातली कांद्याची कोशिंबीर, जवसाची ताजी चटणी, भाजलेला पापड असलेलं सुग्रास ताट येतं.

पहिल्या घासाबरोबरच मी आनंदाचा कढ गिळते आणि मला जेवताना बघून आईची पुढच्या चार दिवसांची भूक भागते. पांढऱ्याशुभ्र भाकरीचे पदर व्यवस्थित सुटलेले, पिठल्याची कंसिस्टंसी परफेक्ट, कोशिंबीरीला घरचं दही, इतकं साधं आणि रुचकर जेवण आपण खूप दिवसात जेवलो नाहीये हे मला जाणवतं. आजकाल इतक्या हॉटेलांचे रिव्ह्यू वाचत असतो आपण, पण या जेवणाचा रिव्ह्यू लिहायला शब्द कमी पडतील. आणि तसंही, देव, बच्चन, पुलं, लताबाई आणि आईच्या हातचं जेवण यांचे रिव्ह्यू लिहू नयेत.

आज पुन्हा एकदा पटलं, पोट भरणारं जेवण सगळीकडे मिळतं, पण तृप्त करणारं जेवण फक्त आईकडे मिळतं!

 *

लेखिका: सुश्री  गौरी ब्रह्मे.

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तिचे थांबणे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

प्रफुल्ला शेणॉय

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ तिचे थांबणे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

असं म्हणतात की, वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही,

पण वेळेचं गणित साधणाऱ्या ‘ती’ला मात्र थांबावं लागतं वेगवेगळ्या रूपात.

उदाहरणार्थ : साध्या-साध्या गोष्टी.

पोळपाटावर एक पोळी लाटून तयार असते, इतकी जलद.

पण ‘ती’ तिथे थांबून रहाते, तव्यावरची आधीची पोळी नीट भाजून होईपर्यंत. कंटाळा आला म्हणून अर्धी-कच्ची सोडत नाही.

कधी घामाघूम होऊन, कधी पाय, कधी पाठ दुखत असते, तरीही.

सगळी कामे आटोपल्यावरही, ती ओट्यापाशी थांबते, गॅसवरचं दूध ओतून वाया जाऊ नये म्हणून.

तशीच, जोडीदार आकाशी उंच झेप घेत असताना, घरट्यातल्या पिलांच्या पंखात बळ येईपर्यंत, ‘ती’ थांबते.शी-शू सांगता येणाऱ्या, पण आपले आपण आवरता न येणाऱ्या मुलांबाळांसाठी, कधी सोबतीला बाथरूमच्या दारापाशी ती थांबून असते.मुलांकडून अभ्यास करून घेताना, शब्द- वाक्य- गणितं- व्याकरण सगळं बरोबर येईपर्यंत ‘ती’ थांबते.मुलं लहान असो नाहीतर मोठी. परीक्षा, पालक-सभा, त्यांचं अभ्यासासाठी पहाटे लवकर उठणं, रात्री उशिरा झोपणं. सगळ्यासाठी ती त्यांच्या पाठीशी थांबते.

चहा-कॉफीचा एक निवांत घोट नवऱ्यासोबत घ्यायचा म्हणून थांबते. तेवढ्याच चार निवांत गप्पा होतील, एकमेकांचे त्रास-ताण, शेअर करण्यासाठी.

घरातल्या सगळ्यांना जेवण वाढून होईपर्यंत, कुणी उशिरा येणार असेल तर तोपर्यंत ‘ती’ थांबते, जेवायची. सगळ्यांच्या पाठीशी ‘ती’ थांबते.

खरंतर ती पाठीशी थांबते म्हणून सगळे चाललंय. व्यवस्थित.

काय हरकत आहे हे मान्य करायला. तिच्या या, ‘थांबण्यात’ही एक ऊर्जा आहे, त्या ऊर्जेमुळेचं वेळ चांगली चालली आहे.

अशा वेळेस प्रत्येक घरात, ती मात्र पाठीशी ‘थांबून’ आहे. अगदी स्ट्रॉंग.

एकही दिवस स्वयंपाकघर बंद नाहीये, कंटाळा येतो, थकवाही. तरीही रोजच्या-रोज सगळी स्वच्छता, एक्स्ट्रा काळजी, कोणत्याही आजारपणाला घरात शिरकाव करू द्यायचा नाही, असं तिने मनाशी पक्क ठरवलंय.

म्हणूनच म्हटलं, तिच्या या थांबण्यातही एक ऊर्जा आहे. त्या उर्जेमुळेच ही अशी कठीण वेळही निघून जाईल.

प्रत्येक घरातील ‘तिला’ सादर नमन!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :  प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नवं वळण… कवयित्री : सुचेता गोखले ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

उषा नाईक

📖 वाचताना वेचलेले 📖

नवं वळण… कवयित्री : सुचेता गोखले ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

स्त्री जन्माची गाथा गेली नव्या वळणावर

राजा राणी स्वार आता स्वतंत्र मार्गावर

 *

पूर्वीची ती लाजरी राणी गेली कुठे हरवून?

रुसल्या राणीची समजूत काढणारा

राजा, नाही येत दिसून.

 *

स्त्रीमुक्तीचे दिवस आले सोन्याचे

आता स्वयंपाघरात राज्य असते दोघांचे

 *

तिशीतील राजा राणी, परिपक्व त्यांची मते

करियरची घोडदौड सांभाळत करतात कामे फत्ते

 *

स्वयंपाक करायचा दोघांनी

बाळ सांभाळायचे दोघांनी

 *

तोलून तराजूत कामे सारी

म्हणतात मैत्री आमच्यात भारी

 *

तिने केली भाजी तर त्याने करावे वरण

त्याने आणले दळण तर तिने करावे तळण

 *

चिऊ-काऊच्या गोष्टी बरोबर मऊ मऊ भात

बाळ राजे चालतात धरून दोघांचा हात

 *

नवीन कुटुंबातून आजी आजोबा हरवले

बाळ राजे आई बाबा सोबत खेळण्या हट्टावले

 *

पिझ्झा आणि बर्गर आले, गेले मोदक आणि लाडू

आईची झाली मॉम आणि बाबाचे झाले डॅडू

 *

नको मोबाईल नको टीवी नका आता टोकू

बालगीतातून भेटतील त्यांचे दोस्त चिकू पिकू

 *

स्त्री म्हणजे वात्सल्याचा झरा

शिक्षणाच्या ज्योतीने उजळेल तो खरा

 *

दोघे आता समर्थ संसार रथ सांभाळण्या

पुढच्या पिढीस सर्वतोपरी सक्षम करण्या

 *

स्त्री शिकली की घर होते संस्कारीत

नवीन पिढी नक्कीच करेल भारताला विकसित

कवयित्री : सुचेता गोखले

प्रस्तुती :  उषा नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सन्मान निधी…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “सन्मान निधी…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

“आई,  तूपण ना! काय हे? बाबांच्या फक्त १२,००० रुपयांच्या पेन्शनसाठी इतकी धावपळ कशाला? आपण आपल्या एका कर्मचाऱ्याला यापेक्षा जास्त पगार देतो…! “

मोहित चिडून आईला म्हणाला.

 केवळ लाईफ सर्टिफिकेट देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लांब रांगेत उभं राहण्यापेक्षा घरी जाऊ या,  असा तो आग्रह करू लागला.

 मोहितचं म्हणणं काही अंशी खरंच होतं.

त्यांचा कोट्यवधींचा व्यवसाय होता. वर्षभरात लाखो रुपये पगार-भत्त्यांत जात होते.

मग फक्त १२,००० रुपयांसाठी इतका वेळ का घालवायचा?

 

मोहितचे वडील एकनाथराव गेल्या महिन्यात अल्पशा आजाराने वारले होते. ते सरकारी शाळेत शिक्षक होते आणि १२ वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. त्यांना पेन्शन मिळत होती. त्यांच्या निधनानंतर शासनाच्या नियमानुसार अर्धी पेन्शन त्यांच्या पत्नी सरला यांना मिळणार होती. त्यासाठीच आज त्या बँकेत लाईफ सर्टिफिकेटची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आल्या होत्या.

 

महिनाभरापूर्वी एके दिवशी मोहितचा मुलगा कुशाग्रचा आठवा वाढदिवस होता. त्याने आजीकडे सायकलची मागणी केली होती.

 

सरलाताईंच्या खात्यात फारसे पैसे उरले नव्हते. म्हणून त्यांनी मोहितकडे १०,००० रुपये मागितले. मोहित ऑफिसला निघायच्या तयारीत होता. थोडं आश्चर्याने पाहून त्याने पत्नी श्रेयाला आईला पैसे द्यायला सांगितले. श्रेया पैसे देताना हलकंसं पुटपूटली,

“आजकाल खूप मंदी आहे बरं का! जरा सांभाळून खर्च करा. ”

 

संध्याकाळी सरलाताईंनी त्या पैशांतून कुशाग्रसाठी सायकल घेतली आणि घरात पुन्हा हशा-आनंद पसरला.

 

पण पुढच्या आठवड्यात मोहितची मोठी बहीण माहेरी आली.

 

नवरा जिवंत असताना सरलाताईंना कधीच पैशांसाठी कुणाकडे पाहावं लागत नव्हतं. ते स्वतःच पेन्शनमधून त्यांना थोडेफार पैसे देत असत.

आता मात्र मुलीच्या निरोपासाठीही त्यांना सुनबाईकडे हात पसरावा लागणार होता.

श्रेयाचे तेच शब्द त्यांच्या मनात घुमत होते,

“ मंदी आहे… जपून खर्च करा! ”

 

मन खट्टू करून त्या मुलीला रिकाम्या हाताने निरोप देऊ लागल्या,  तेवढ्यात श्रेया स्वतः पुढे आली आणि २००० रुपये त्यांच्या हातात ठेवत म्हणाली,

“ मुलीला रिकाम्या हाताने कसं पाठवणार? ”

पण त्या शब्दांत आपलेपणा कमी आणि टोमणा जास्त होता हे सरलाताईंना जाणवलं.

 

सरलाताईंच्या आयुष्यात पैशांची खरी कमतरता नव्हती. औषधं,  रिचार्ज,  छोट्या गरजा—मोहित लगेच पैसे देत असे.

पण मंदिरात दान करायचं असो,  सणासुदीला नोकरांना काही द्यायचं असो,  नातेवाईकांना भेट द्यायची असो,  प्रत्येक वेळी मागणं त्यांच्या स्वाभिमानाला टोचत होतं.

 

अलीकडे त्यांची बहीण आली होती. तिची आर्थिक परिस्थिती बेताची होती. तिला मदतीची अपेक्षा होती. पण सरलाताई स्वतःच पैशासाठी सुनेकडे पाहताना दिसल्यावर तिने काहीच मागितलंच नाही.

 

आणि मग एक दिवस मोबाईलवर मेसेज आला — State Bank of India कडून.

 

सहा महिन्यांची पेन्शन — ७२,००० रुपये — त्यांच्या खात्यात जमा झाल्याचा संदेश होता. सरलाताई जवळच्या ATM मधून १०,००० रुपये काढून घरी येत होत्या. त्यांच्या चालण्यातला आत्मविश्वास,  चेहऱ्यावरचे तेज सांगत होतं — पेन्शनला “सन्मान निधी” का म्हणतात ते.

 

कोट्यवधींच्या संपत्तीपेक्षा त्यांच्या पतींच्या त्या १२,००० रुपयांच्या पेन्शनमध्ये त्यांना अधिक वजन,  अधिक आधार आणि सर्वात महत्त्वाचं — स्वाभिमान जाणवत होता.

 

आई-वडिलांचं आयुष्य आपल्या आरामासाठी झिजलेलं असतं. आणि आपण मात्र त्यांच्या गरजांकडे ‘रक्कम’ म्हणून पाहतो.

 

गोष्ट पैशांची नाही,  स्वाभिमानाची आहे.

सन्मानाची आहे, भावनांची आहे.

 

पेन्शन म्हणजे फक्त पैसे नसून ती ‘सन्मानाची सही’ आहे.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाई ग… लेखिका : सुचरिता ☆ प्रस्तुती – स्वाती मंत्री ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ बाई ग… लेखिका : सुचरिता ☆ प्रस्तुती – स्वाती मंत्री ☆

जो दिवस साजरा करण्याची मुळात वेळच येता कामा नये

ज्यासाठी अभिनंदन, शुभेच्छा, कार्यक्रम, विकृत विनोद,  सण-समारंभ, भाषणं, सत्कार, व्याख्यान इत्यादी सोहळ्याची गरजच उरता नये

मनातून नष्ट न होणाऱ्या असमानतेच्या एकदिवसीय टोचणीदिनाचं अस्तित्वच असता नये

या तात्पुरत्या शिराळशेठी दिवसाचं काय करायचं, हे नुमजून हळदीकुंकू गजरा-कजरा,साडी,दागिने वगैरे करणाऱ्या स्त्रियांची कीव करावी लागू नये

ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्या अंधाऱ्या कपारीपर्यंत पोचताना स्वातंत्रसूर्याची वेळ संपून अवेळी संध्याकाळ होऊ नये

पन्नास टक्यांतील काही टक्क्यांना काही प्रमाणात जोखडातून मुक्तता मिळाली म्हणजे घोडं गंगेत न्हालं असं ठाम विधान प्रचलित होऊ नये

थेट गर्भापासून तिरडीपर्यंत सर्व स्थितीत विकल्या जाणाऱ्या देहांचं बाजारअस्तित्व अमान्य करण्याचं झापडबंद सुखासीन आंधळेपण तुला येऊ नये

एक दिवस वगळता उरलेले तीनशे चौसष्ठ दिवस ज्यांचे आहेत त्यातले शंभर टक्के सगळेजण खलनायकच असतात, असा उलटा एकेरी भ्रम उराशी धरण्याचा मंदपणा तुझ्यात  असू नये

म्हणून

तू

लवकरात

लवकर

शहाणी

हो

त्यासाठी

विचार

करायला

सुरुवात

कर

हाच

एक

उपाय

आहे

लेखिका:सुचरिता

प्रस्तुती: स्वाती मंत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘‘काय मिळालं असतं?’ – हिन्दी कवी : डॉ. मधू चतुर्वेदी – मराठी अनुवाद : विजय प्रभाकर नगरकर ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆

शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘‘काय मिळालं असतं?’ – हिन्दी कवी : डॉ. मधू चतुर्वेदी – मराठी अनुवाद : विजय प्रभाकर नगरकर ☆ प्रस्तुति – शामला पालेकर

मूळ हिंदी कविता : ‘क्या क्या मिलता? ‘

मराठी भावानुवाद : “काय मिळाले असते? “

कवयित्री : डॉ. मधु चतुर्वेदी

मराठी अनुवाद : विजय प्रभाकर नगरकर

प्रस्तुती: शामला पालेकर

स्त्रीच्या भावनेचा सिटी स्कॅन केला तर…

अपमानाच्या असंख्य घटनांचा धोकादायक साकाळलेला डोह मिळाला असता,

निराशेच्या गंभीर जखमेतील वाहती वेदना दिसली असती,

अगतिक बैचेनीची आकडेवारी लक्ष्मण रेषा ओलांडताना दिसली असती,

ताटातुटीच्या भयाने वाढलेली गती अनेक रात्र जागलेल्या आसवांनी बेफाण पुरात वाहताना, कंठात रुतलेले उत्तर दिसले असते,

सकारण हरलेले वादविवाद, दयनीय अवस्थेत मिळाले असते,

उपेक्षेच्या डंखाचे निशाण त्या मशीनला ऐकू आले असते,

कोंडलेल्या हुंदक्यांची आर्तता

रिक्तपणाचे साचलेले मळभाचे घनदाट आकाश, अगतिक रात्रीच्या बदललेल्या असंख्य कुशी धोक्याच्या निशाणीच्या वर पोहचलेल्या, प्रेम याचनेचा उच्च स्वर आकाशाला भिडणारा वेदना लपवून ठेवण्याचा चिंताजनक ग्राफ, सहन केलेले टोमणे व टोचून बोलले स्वर छिन्न भिन्न स्वप्नांचा एक मोठा पुंजका मिळाला असता,

अनव्रत टिकेचे खोल व्रण दिसले असते,

भावना शोधणारी मशीन असती तर सुहास्य मुद्रेमागील वेदनेचे सत्य समोर आले असते.

मुळ हिंदी कविता : “क्या क्या मिलता” – कवयित्री : डॉ. मधु चतुर्वेदी

मराठी अनुवाद : विजय प्रभाकर नगरकर

प्रस्तुती : शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “देवाचं काही अडत नाही..” कवी :कुसुमाग्रज ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ? 

☆ “देवाचं काही अडत नाही..” कवी :कुसुमाग्रज ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर

देव मानावा की मानू नये

या भानगडीत मी पडत नाही,

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही..!

 

ज्यांना देव हवा आहे

त्यांच्यासाठी तो श्वास आहे,

ज्यांना देव नको आहे

त्यांच्यासाठी तो भास आहे,

आस्तिक नास्तिक वादात

मी कधीच पडत नाही,

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही..!

 

हार घेऊन रांगेत कधी

मी उभा रहात नाही,

पाव किलो पेढ्याची लाच

मी देवाला कधी देत नाही,

जो देतो भरभरून जगाला

त्याला मी कधी देत नाही,

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही..!

 

जे होणारच आहे

ते कधी टळत नाही,

खाटल्यावर बसून

कोणताच हरी पावत नाही,

म्हणून मी कधी

देवास वेठीस धरीत नाही,

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही..!

 

देव देवळात कधीच नसतो…

तो शेतात राबत असतो,

तो सीमेवर लढत असतो,

तो कधी आनंदवनात असतो,

कधी हेमलकसात असतो,

देव शाळेत शिकवत असतो,

 तो अंगणवाडीत बागडत असतो,

तो इस्पितळात शुश्रूषा करीत असतो,

म्हणून…

ह्यांच्यातला देव मी कधी नाकारत नाही,

 

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही..!

* * * *

कवी: कुसुमाग्रज

प्रस्तुती: उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “स्वभावाला औषध असतं” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “स्वभावाला औषध असतं” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

स्वभावाला औषध असतं, पण ते रोज घ्यायचं असतं.

– स्वभावातला स्व सोडून भाव जपायचा असतो!

– नाराजीतला ना सोडून राजी होऊन हसायचं असतं!

– अधीरातला अ सोडून धीरानं घ्यायचं असतं!

– मनातला हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं!

– हरामातला ह सोडून रामासारखं जगायचं असतं!

– संतापातला ताप सोडून संत व्हायचं असतं!

– संवादातला वाद सोडून सुसंवाद साधायचा असतो!

– अहंकारातला अहं सोडून ॐकारात विलीन व्हायचं असतं!

 लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ करी ऑफ कॉन्स्पिरसी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ करी ऑफ कॉन्स्पिरसी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

पुरणपोळ्या खाण्याचं पुण्य कटाच्या आमटीसोबतच पोटाला मिळतं म्हणून आज ही रेसिपी वाचाच!

आज सकाळपासून महाराष्ट्रातल्या हजारो घरांच्या किचनमधून एक विशिष्ट, खमंग आणि मसालेदार असा सुगंध दरवळतोय. प्रेशर कुकरच्या शिट्ट्यांचा आवाज आता शांत झालाय, पण खऱ्या ‘कारस्थानाला’ आता कुठे सुरुवात झाली आहे. पुरणपोळीचा बेत म्हटला की घराघरात एक वेगळीच लगबग असते, पण त्या गोडधोड पोळीच्या सावलीत एक अशी डिश शिजत असते, जिच्याशिवाय जेवणाचं पान पूर्णच होऊ शकत नाही.

**

याला ‘करी ऑफ कॉन्स्पिरसी’ म्हणण्याचं कारण असं की, ही आमटी म्हणजे चण्याच्या डाळीने मागे सोडलेल्या अस्तित्वाचा एक हुशार अविष्कार आहे. पुरणासाठी डाळ शिजवून झाल्यावर जे पाणी उरतं, त्याला आपण ‘कट’ म्हणतो. खरंतर ते फेकून देण्यासारखं पाणी, पण गृहिणींच्या कल्पकतेने त्यातून जे अमृत बाहेर पडतं, त्यालाच आपण ‘कटाची आमटी’ म्हणून ओळखतो.

आजच्या या घाईघाईच्या जगात जिथे इन्स्टंट रेसिपीजचा सुळसुळाट झालाय, तिथे कटाची आमटी बनवणं ही एक ‘स्लो कुकिंग’ची कला आहे. त्याआधी घरातील पुरुषवर्गासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि वैधानिक सूचना. जोपर्यंत किचनमधून तो विशिष्ट खमंग दरवळ येत नाही, तोपर्यंत उगाचच ‘काय होतंय?’ किंवा ‘डाळ शिजली का?’ हे बघायला तिथे जाऊ नये. डाळ शिजली आहे की नाही हे पाहण्यासाठी बोटचेपेपणा करणं म्हणजे सुगरणीच्या कामात खोडा घालण्यासारखं आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत कट व्यवस्थित निघत नाही, तोपर्यंत डाळ शिजली असं म्हणता येणार नाही.

**

कटाची आमटी ही अत्यंत नाजूक पाककृती आहे, जी केवळ सरावानेच जमते. जर थोडंही गणित चुकलं, तर आमटीची ‘गुळवणी’ व्हायला वेळ लागत नाही. या आमटीचा जो सुगंध संपूर्ण गल्लीत पसरतो, तेच तिचं खरं ‘आयएसओ ४१०००’ प्रमाणपत्र असतं. त्यासाठी मसाल्याची तयारी ही एखाद्या युद्धाच्या तयारीसारखी असावी लागते. जिरं, लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता मंद आचेवर खमंग भाजून घेताना जो आवाज येतो, तोच या रेसिपीचा खरा म्युझिक स्कोअर आहे.

खोबऱ्याचा एक तुकडा गॅसच्या निळ्या ज्योतीवर थेट धरून तो वरून काळा होईपर्यंत भाजणं, ही या रेसिपीतली सर्वात थरारक पायरी. तो भाजलेला काळा तुकडा आणि गरम मसाला जेव्हा मिक्सरमध्ये एकत्र फिरतात, तेव्हा तयार होणारा मसाला म्हणजे या कटाच्या आमटीचा आत्मा असतो. त्यात चिंचेचा कोळ, थोडा गूळ आणि चवीनुसार मीठ घातलं की बेस तयार होतो. पण थांबा, खरी जादू अजून बाकी आहे.

**

फोडणीची तयारी करताना आज थोडं उदार व्हावं लागतं. तेलाचा वापर रोजच्यापेक्षा थोडा जास्त हवा, कारण त्याशिवाय आमटीला ती ‘तर्री’ किंवा ‘कट’ येणार नाही. मोहरी, जिरं, हिंग, हळद आणि कढीपत्त्याची फोडणी बसली की त्यात तीळ आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे नाचू लागतात. मग त्यात भिजवलेले शेंगदाणे, खोबऱ्याचे पातळ काप आणि आपल्या खिशाला परवडतील तसे काजूचे तुकडे टाकले की एक राजेशाही थाट येतो.

हा सगळा मसाला आणि कट एकत्र होऊन जेव्हा गॅसवर १० मिनिटं उकळायला लागतो, तेव्हा किचनमधलं वातावरण एखाद्या मंदिरातल्या गाभाऱ्यासारखं पवित्र होतं. वरून हिरवीगार कोथिंबीर पेरली की ‘करी ऑफ कॉन्स्पिरसी’ सर्व्ह करण्यासाठी तयार होते. ही आमटी नुसती चवीला लागते असं नाही, तर ती पुरणपोळी खाण्याचं पुण्य आपल्या पोटाला मिळवून देते.

**

एका बाजूला मऊशार पुरणपोळी आणि दुसऱ्या बाजूला झणझणीत कटाची आमटी, हा संगम म्हणजे मराठी खाद्यसंस्कृतीचं सर्वात मोठं यश आहे. ही आमटी म्हणजे केवळ जेवणातला एक पदार्थ नसून, तो संयम आणि कौशल्याचा एक परिपाक आहे. म्हणूनच, पुढच्या वेळी जेव्हा घरात पुरणपोळीचा बेत असेल, तेव्हा त्या कटाच्या आमटीकडे आदराने बघा, कारण ती डाळीच्या त्यागातून निर्माण झालेली एक चविष्ट क्रांती आहे.

ज्या घराच्या किचनमधून कटाच्या आमटीचा सुगंध बाहेर येत नाही, त्या घराला पुरणपोळीचा खरा आनंद कधीच कळू शकत नाही.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : गौरी गाडेकr

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “स्वतःच बना स्वतःची आई…” – लेखिका: डॉ. शुभदा गोडबोले ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “स्वतःच बना स्वतःची आई…” – लेखिका: डॉ. शुभदा गोडबोले ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

नमस्कार मी शुभदा गोडबोले. पेशाने मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे. माझ्या 27 वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे प्रत्येक माणूस वयाच्या कुठल्याही टप्प्यावर का असेना तो प्रेमाला मिस करतो. आता प्रेम म्हटल्यावर लगेच आपल्याला ते हिरो आणि हिरॉईनचं सिनेमामधलं प्रेम आठवतं. पण ते प्रेम नाही म्हणत मी. तर ज्याला आपण माया, ममता, वात्सल्य म्हणतो, ते आईचं प्रेम प्रत्येकाला आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्यावर हवं असतं.

थोडं स्वतःच्या आयुष्यात डोकावून बघा ना… मग तुमच्या लक्षात येईल की, मी काय म्हणते ते. कारण प्रत्येक फॅमिलीमध्ये कोणीतरी खूपच प्रेमळ असतं, जे दुसऱ्यांसाठी खूप झटतं, त्यांची जीवापाड सेवा करतं, कारण त्याचा तो स्वभाव असतो. त्याला ते जमतं. ती व्यक्ती स्वतःचे छंद, आवडी निवडी बाजूला ठेवून दुसऱ्यांसाठी झटते (आणि जास्त करून घरातली स्त्रीच हे करत असते.) पण पुरुषही थोड्या फार प्रमाणात असे असलेले आपण पहातो.

तर सांगायचा मुद्दा हा की, त्या व्यक्तीला दुसऱ्यांकडून तितकसं अटेंशन मिळत नाही. तिला नेहमी गृहीत धरलं जातं. ती व्यक्ती त्याची फिकीरही करत नाही, पण एखादी वेळ अशी येते की, त्या व्यक्तीलाही प्रेमाची गरज असते. मग त्या व्यक्तीला एकाकी वाटतं आणि कुठे तरी आधार हवा, असं वाटतं.

ह्या मनाच्या अस्वस्थतेमुळेच काही व्याधी निर्माण होतात उदा : ऍसिडिटी, डोकेदुखी, डिप्रेशन, रक्तदाब, मधुमेह वगैरे…

तर ह्याला उपाय एकच आहे की, तुम्हीच तुमची आई व्हा. जसं प्रेम तुम्ही तुमच्या मुलांवर, नातवांवर करता तसं स्वतःवर करायला शिका. कारण प्रेम करणं, हा तुमचा स्वभाव आहे. मात्र स्वतःकडे प्रेमाने पाहायला तुम्ही विसरून गेला आहात, आणि सगळं प्रेमाचं भांडं दुसऱ्यांवर ओतता आहात.

एखाद्या स्त्रीची कंबर खूप काम करून दुखली, किंवा गुडघा दुखला तरी ती स्त्री त्या अवयवाचा राग करते आणि ‘काय मेलं झालं ह्याला दुखायला, ‘ असं म्हणून ती अपेक्षा करते की, नवऱ्याने किंवा मुलांनी तरी विचारावं की ‘दमलीस का?’ काही बाम वगैरे लावून देऊ का.. एक तर मूव्हची जाहिरात बघून अपेक्षा दुणावतात. पण प्रत्येक वेळी कोणी वेळ देईलच, असं नाही.

अशावेळी मनात कुढण्यापेक्षा स्वतःच स्वतःची आई बना. थोडा वेळ एकटं बसा, आणि दुखणाऱ्या भागावरून जमल्यास हात फिरवा.. आता पाठ दुखत असेल तरी डोळे मिटा आणि हात फिरवताना फील करा… स्वतःच्या शरीराकडे प्रेमाने बघा, आणि तुमच्या मुलाला किंवा नातवाला म्हणता ना… तसं म्हणा… काय झालं माझ्या बाळाला.. बरं नाही का?

आणि मग स्वतःच्याच डोक्यावरून हात फिरवा. दुखऱ्या भागाला थोडा वेळ गोंजारा.. आणि बघा जादू… दुखणं दूर पळतं की नाही. सुरुवातीला लाज वाटेल, पण हे मनातल्या मनात आपण आपल्याशीच बोलत असल्यामुळे कोणाला ऐकायलाही जात नाही, आणि खूप बरं वाटतं.

ह्या सगळ्यात भावना खूप महत्वाची आहे. तुमच्या मुला-नातवासारखं स्वतःबद्दल प्रेम निर्माण करा. तुम्हाला जो खाऊ खावासा वाटेल, तो सगळ्यांसाठी घेऊन या आणि त्यांच्यासोबत मनसोक्त खा. तुम्हाला आवडणारी भाजी आवर्जून बनवा आणि दुसऱ्यांसाठी काही वेगळं बनवा.

पण स्वतःची आई बना आणि स्वतःचे लाड करा. ते ही दुसऱ्यांना न दुखावता.

कारण हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही आणि मग आयुष्यात हे करायचं राहिलं, ते राहिलं… ह्याची खंत करून दुःख करण्यात काय अर्थ आहे? दुसऱ्यांसाठी प्रेमाचा सागर असणारे तुम्ही स्वतःच कोरडे राहिलात तर काय उपयोग.

विचार करा आणि एकदा का होईना, हे करून पहा. ह्या मुळे आपल्यावर एकटं राहायची वेळ आली, तरी आपली प्रॅक्टिस असते, मग डिप्रेशन येत नाही.

लेखिका: डॉ. शुभदा गोडबोले

प्रस्तुती : शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares