मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “भारतीय मसाला डबा – –” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

 ? वाचतांना वेचलेले ?

☆ “भारतीय मसाला डबा – –” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

भारतीय कुटुंबाची अख्खी महत्ता, गुण वैशिष्ट्ये या रोजच्या डब्ब्यात ठासून भरलेले आहेत असं म्हटलं तर मुळीच वावगं वाटणार नाही.

मिठासारखे वडील…. 

जेवणात मीठ नसेल तर बेचव जेवण कोणीही खाणार नाही. त्याचप्रमाणे संसारात वडील पाहीजेच. ते नसले तर संसाराला चव उरत नाही. म्हणून मिठासारखे वडील हे प्रत्येक संसारात हवेच. 

हळदी सारखी आई…. 

कुठेही जा.. आपली छाप सोडणारी.. रंगात रंगूनी सा-या रंग माझा हळवा… मरावे परी रंगापरी उरावे… अशी हवी हवीशी, आपली आई. 

जिरे-मोहरी म्हणजे भावंड…..

कमी-जास्त प्रमाणात तडतडणारंच… चवीने भांडणारे… म्हणूनच याच्या उपास-बिन उपास अशा सोईस्कर वाटण्या करुन दिलेल्या. 

काळा मसाला म्हणजे दोन्हीही आजोळ कंपनी…..

बऱ्या -वाईट घराणेशाहीच्या गोष्टींच सुवासिक चूर्ण… जातील तिथे आदरयुक्त कौतुकास पात्रच ठरतात. 

मेथीचे आणि उडदाचे दाणे म्हणजे…. एके काळचे जवळचे आणि आता जरा दुरावलेले खणखणीत नातलग…. हे अधून-मधूनच बरे असतात. नसता अति परिचयात अवज्ञा ठरलेलीच यांची. 

आणि किसून उरलेल्या खोब-याचे तुकडे…. (काही कुजके पण) म्हणजे छोट्या गावातले काका, मामा लोक…. ह्यांच्या घरी यांचा किस पाडला जातो म्हणून हे आपल्या घरात येतात, भाच्यांवर बारीक लक्ष ठेवतात आणि मग खाजगीत पालकांना सल्ले देतात… अण्णा… लक्ष ठेव बरं… पोरं याच वयात हातातून निसटतात. त्या जोश्याच्या पोराचं असंच.

त्या कमरेतनंच मोडलेल्या मिरच्या…. म्हणजे शहरी आत्या आणि मावश्या… मोडतील पण भाच्यांचं पुरेपूर दिलोजानसे स्कैनिंग करतील… बेबीताई सांभाळ गं पोरीला… अगं काय तिचं ते नखं वाढवणं, रोज शाम्पू वापरणं, आरश्यात बघणं… उद्या उजवायची आहे तिला.. लोकं लक्ष ठेवून असतात म्हटलं. 

आणि सर्वात शेवटी…. मित्रमैत्रिणी म्हणजे बडीशेप…

एकमेकांना असा काय शेप देतील ना की सारी टेन्शन एकदम खल्लास….

– – हे सर्व लोक एकेका वयात एकेकटे जिणं हराम करतील, पण एकत्रितपणे येऊन जीवही तेवढाच लावतील….. आयुष्याला चटपटीत, घमघमीतही तेच बनवतील. 

असा हा भारतीय मसाला डबा चिरायू होवो!

 

कवी: अज्ञात

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “रतनजी, तुम्हीच सांगा…” – लेखक : डॉ. संजय उपाध्ये ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ “रतनजी, तुम्हीच सांगा…” – लेखक : डॉ. संजय उपाध्ये ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

रतनजी,

रतनजी, तुम्हीच सांगा

तुम्हाला ‘टाटा’ कसा करू?

गीतेमधली व्यवसायात्मिका बुद्धी राष्ट्रासाठी योजलीत

व्यक्ती ते समष्टी सर्वांचं भलं करण्यासाठी सारी जीवनवर्षे मोजलीत

तुम्ही स्वकर्तृत्वाने चिरंजीव झालात तरी डोळ्यांतील आसवांना सांगा कसा आवरू ?

रतनजी,

रतनजी, तुम्हीच सांगा

तुम्हाला ‘टाटा’ कसा करू?

यंत्र तंत्रादी विज्ञानम् मध्ये तळातला माणूस पाहिलात 

सर्वोच्च पदावर राहूनही कायम नम्र राहिलात

अतिरेक्यांनी हल्ला केलेल्या ताजला पुन्हा ताज मिळवून दिलात

राष्ट्राच्या प्रत्येक संकटात दिलात संपन्नतेचा हात

.. वाटतं तुमच्यासारखी माणसं नवीन जग करतात सुरू

रतनजी,

रतनजी, तुम्हीच सांगा

तुम्हाला ‘टाटा’ कसा करू?

अल्पसंख्याक आपला समाज.. पण सत्तेकडून काही मागितलं नाहीत.. उलट तुम्हीच देशाचा सत्तेविना आधार झालात.. हे सर्व जगाला आहे माहीत.

.. तुमच्या निधनानंतर भारतीय ध्वज अर्ध्यावर उतरला का? ठाऊक नाही कारण राजकारणाला विधीनिषेध नुरला काही.. परंतु सरशी तेथे पारशी ही म्हण.. तुम्ही ‘पारशी मुळे सरशी’ अशी केलीत.

आम्ही तुमच्यामुळे खातो, येतो, जातो, नि जगतो.. आज..

.. आज कामावर जाऊन तुम्हाला अभिवादन नक्की करू..

…… रतनजी, तुम्हीच सांगा….

तुम्हाला ‘टाटा’ कसा करू?

लेखक : डॉ. संजय उपाध्ये

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “स्पर्शाचं महाभारत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ “स्पर्शाचं महाभारत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

स्पर्शाचं महाभारत.!

ज्येष्ठ पती-पत्नींनो, तुम्ही एकमेकांना शेवटचा स्पर्श हल्ली कधी केला होता?

…आठवते का??

बर्‍याच वर्षांपूर्वी नसिरुद्दीन शहा आणि शबाना आजमी यांचा स्पर्श चित्रपट पाहिला होता. सई परांजपे त्याच्या दिग्दर्शिका..!

अंधशाळेच्या प्रिन्सिपॉल सोबत झालेली भावनिक गुंतागुंत आणि त्यामुळे गवसलेले स्पर्शांचे विविध अर्थ आणि कंगोरे यांचे सुंदर मिश्रण होतं त्यात…. नसिरुद्दीन शहा यांनी उभा केलेला प्रिन्सिपल केवळ अप्रतिम. 

शबाना आजमी प्रिन्सिपल सोबत आणि मुलांसोबत ओळख झाल्यानंतर साडी विकत घेताना डोळे मिटून त्या साडीचा “स्पर्श” हाताच्या बोटांनी अनुभवतात तो प्रसंग अजूनही डोळ्यांसमोर आहे..

हे सगळं आठवायला एक कारण घडलं… 

काल-परवा ‘आपलं माणूस ‘ हा सिनेमा पाहिला.. अप्रतिम..! नाना आणि सुमीत राघवन..

त्यातल्या शेवटच्या एका प्रसंगात नाना सुमितला बोलता-बोलता

विचारतात, “आबांना, म्हणजे तुझ्या वडिलांना, या वर्ष-दोन वर्षांत कधी सिनेमाला घेऊन गेला होतांस? 

कधी आउटींगला? 

बाहेर जेवायला?” 

सुमित गप्प… इथपर्यंत ठीक..

पण नंतर नाना सुमितला विचारतात, “शेवटचं कधी शिवला होता रे म्हातार्‍याला?” 

आणि अंगावर सरसरून काटा आला.. 

नाना पुढे म्हणतात,

“एका घरात राहून एकमेकांना आपण वर्षानुवर्षे “स्पर्श” करत नाही “ही साधी गोष्ट नाही” हा तर पुढचा कहर..

किती साधी गोष्ट.. एकमेकांना ‘स्पर्श’ करणं. एकमेकांशी बोलतो आपण, एकमेकांची काळजी ही घेतो, पण खरंच स्पर्श टाळतो का? 

.. आणि तो खरंच इतका महत्वाचा असतो? 

आयुष्यात किती वेळा किती जणांना कसे-कसे स्पर्श करतो आपण?

खरंतर त्वचा म्हणजे पंचेंद्रियांपैकी एक.

स्पर्शाची जाणीव करून देणारी. पण हीच स्पर्शाची जाणीव वादळ होऊन अशी अंगावर येते..

लहानशी गोष्ट स्पर्श… पण तिचं महाभारत होतं. मग कितीतरी स्पर्श आठवतात, आणि आठवत राहतात..

पायाला मुंग्या आल्यावर कधी अंगठ्याला ‘स्पर्श’ केलाय?

आपलाच स्पर्श, पण किती अनोळखी वाटतो? 

आणि मग असे कितीतरी स्पर्श आठवू लागतात..!

उन्हाने तापलेल्या रस्त्यांवरून अनवाणी चालण्याने भाजलेल्या तळपायांना झालेला थंडगार पाण्याचा स्पर्श..

दिवाळीत आंघोळी… आधी पाडव्याला आईने.., भाऊबीजेला बहिणीने अंगाला तेल लावताना, त्यांच्या तळव्यांचा स्पर्श..

…. तळवे सारखेच, पण कुठे आईची माया, कुठे बहिणीचा खट्याळपणा त्या स्पर्शांमधेे ओथंबलेला. 

रूढी-परंपरा स्पर्शांशीच संबंधित..

.. ओवाळताना सुवासिनीच्या अंगठ्याचा कपाळाला होणारा स्पर्श.

.. लग्नात लज्जा होमाच्या वेळी, एकमेकांच्या ओंजळीतून सांडणारा स्पर्श..

स्पर्श लाजरे असतात, बुजरे असतात.. मायने ओथंबलेले असतात कधी कधी धीट, तर कधी आक्रमक असतात, पण ते बोलतात..

.. पायावर डोकं ठेवताना कपाळाला होणारा पायांच्या बोटांचा स्पर्श आश्वासक भासतो…

.. आजीने मायेने तोंडावरून फिरवलेला थरथरता वृध्द हात, त्यावेळी नकोसा वाटला तरी, आता सतत भास होऊन गालांवरून फिरत असतो..

स्पर्श रेशमी असतात.. 

जाडेभरडे असतात.. 

आपल्या सगळ्या जीवनाला अर्थ देणारे असतात..

आज माझी आई सत्तरीच्या पुढे आहे. कधी-कधी तिच्या मांडीवर डोकं ठेवून लोळत मी टिव्ही पाहतो. ती पण माझ्या नसलेल्या केसांवरून हात फिरवत म्हणते

“रोड झालास रे” ती स्पर्शांची गुंतावळ दहा-पंधरा मिनिटांत कितीतरी देवाण-घेवाण करते..

स्पर्शांना धर्म, जात, देश कसलेच बंधन नसते.. ईदच्या दिवशी एकमेकांना आलिंगन देऊन मुबारक बाद दिली जाते, तशीच दसर्‍याला सुद्धा गळाभेट असतेच की. 

पाश्चात्य संस्कृती मध्ये शेकहँड करतात. फ्रेंच लोक गालाला गाल लावतात. ही परिचयाची, भेटीची पद्धत. इथेही स्पर्श महत्त्वाचा..

– – का असेल स्पर्श महत्त्वाचा? 

मला वाटतं इतर ज्ञानेंद्रिय खोटं बोलू शकतात पण स्पर्श फक्त खरं बोलतात.. 

हे प्रत्येक संस्कृतीला माहिती असतं..

मानवी जीवनाची अथांग गाथा अशीच स्पर्शांनी मोहरलेली आहे.

आणि तेच स्पर्श उतारवयात मिळेनासे झाले तर..? 

म्हणूनच नानांच्या प्रश्नाने अंगावर काटा येतो. “शेवटचं कधी शिवला होतास रे म्हातार्‍याला?”

लक्षातच येत नाही आपल्याला..

हजारो शब्दांचं, शेकडो औषधांचं काम एखाद्या स्पर्शानं होऊन जातं. माणसं थकतात म्हणून स्पर्श नाही ना थकत…. ती आपली गोष्ट सांगत राहतात. 

कुठे तरी, कोणाचे तरी, हात ताटकळतात…. डोक्यावरून फिरण्यासाठी.,

कुणाचेतरी तळवे.. 

कोमेजून जातात तोंडावरून, पाठीवरून न फिरल्यामुळे..

सुरकुतलेल्या हातांवरील कातडी आसूसते, नातवांनी ओढून पाहावी म्हणून..,

…. पण वेळ नसतो ना आपल्याकडे. 

पैसा असतो, टीव्ही असतो,

गाड्या, घोडे सगळं काही आहे.

…. पण, पण म्हातारीच्या पाठीवर हात ठेवून “जेवलीस का गं ?” असं विचारण्यासाठीचा वेळ आणि स्पर्श हरवून बसलो आहोत आपण…!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सहा ‘भ’ महत्वाचे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सहा ‘भ’ महत्वाचे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

– – 

सहा भ च्या आचरणातून व्यक्तिमत्व विकास – – 

– – प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीचे सर्वे भवन्तु सुखिन: हे ध्येय आहे.

– – आई ही कुटुंबाचा आधार आहे आणि तिची कुटुंबातील भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वांना एकत्र घेऊन, सर्वांचा स्वभाव ओळखून आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवणे ही तिची विशेषता आहे. दैनंदिन जीवनात नकळत प्रत्येक आई ६ भ च्या माध्यमातून आपल्या मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवत असते.

– – ६ भ म्हणजे भाषा, भूषा, भजन, भोजन, भवन, भ्रमण हे सहा भ आचरणात आणून घरातील आई सक्षम आणि संस्कारित पिढी घडवत असते.

१) भाषा – बोलण्याची शक्ती निसर्गाने मानवाला दिलेलं एक वरदान आहे. आई बाळाशी बोलतांना योग्य शब्दांची निवड करत हसऱ्या चेहऱ्याने, मृदु आवाजात बोलत असते बाळ पण तिचे बारकाईने निरीक्षण करत तसा प्रतिसाद देत मोठे होते. दोन तीन वर्षांचा झाला की तिच्या बोलण्यातला खरेपणा, प्रामाणिकपणा, आदर, विनम्र भाव या सर्वांचा त्याच्यावर कळत नकळत संस्कार होतो.

२) भूषा – भूषा म्हणजे फक्त वेशभूषा एवढंच नसून तो अतिशय व्यापक विषय आहे व जीवनशैलीचा महत्वाचा स्तंभ आहे. वेशभूषेत स्वच्छ कपडे, केसांची पद्धत, गंध, टिळा इ. गोष्टींचा समावेश होतो. आई वडिलांचे निरीक्षण आणि अनुकरणातून या गोष्टी घडतात.

३) भजन – आई सकाळ संध्याकाळ काही मंत्र, स्तोत्र म्हणत असते. त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण कुटुंबावर दिसतो.

४) भोजन – बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत आई त्याला चिऊ काऊ दाखवत भरवत असते पण त्यानंतर ती त्याला घरातील सर्वांसोबत जेवायला बसवते. एकत्र भोजनाचा संस्कार नकळत घडत जातो.

५) भवन – घरातील स्वच्छता, नीटनेटकेपणा, सर्व वस्तू जागेवर ठेवणे प्रत्येकाचे कर्तव्य असते, आई सर्वांसाठी आदर्श असते. दारात तुळस त्यासमोर रांगोळी, तोरण, घरी गोड धोड बनवत आई आपल्या कुटुंबासह सणवार साजरे करते. एकोपा आणि घरातील वातावरण पवित्र ठेवण्यात तिची भूमिका महत्त्वाची असते.

६) भ्रमण – बाळ वर्षाचे झाले की आई त्याला खेळायला वेगवेगळ्या बागेत घेऊन जाते. आजी आजोबा संध्याकाळी मंदिरात घेऊन जातात, आपल्या गावी घेऊन जातात. तिथल्या लोकांशी ओळखी होतात, त्यामुळे बालवयातच गावाची एक ओढ निर्माण होते.

६) प्रत्येक व्यक्तिचा शून्य ते पाच हा वयोगट अतिशय महत्त्वाचा असतो आणि याच वयोगटात व्यक्तिचे व्यक्तिमत्त्व घडत असते. आई ६ भ च्या माध्यमातून आपल्या पाल्याचे संगोपन आणि त्याच्या व्यक्तिमत्व विकासाला आकार देते.

… कुटुंबाचे प्रबोधन करतांना आईची भूमिका खूप मोलाची असते, भावी पिढी संस्कारित करणाऱ्या प्रत्येक माऊलीला शतशः नमन.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकr

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘सहावे सुख…’ – लेखिका : सुश्री शांताबाई शेळके ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘सहावे सुख…’ – लेखिका : सुश्री शांताबाई शेळके ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

चिनी लोकांत एक प्रथा आहे. ते परस्परांचे अभीष्टचिंतन करतात, त्यावेळी ” तुला सर्व सहा सुखे मिळोत, ” असा आशीर्वाद देतात. पाच सुखे म्हणजे – आरोग्य, संपत्ती, नावलौकिक, चांगला जोडीदार व चांगली मुलं.

सहावे सुख म्हणजेच ज्याचे त्याला कळावे असे सुख. ते त्याचे त्यानेच आयुष्यात शोधून काढायला हवे. ते सहावे सुख समोरच्या माणसाला सापडावे, लाभावे असे अभीष्टचिंतन करणारा म्हणत असतो.

आपल्याकडे तर ज्ञानेश्वरमाऊलींनी सांगितले आहेच : “जो जे वांछील| तो ते लाहो| प्राणिजात||”

प्रत्येकाचं हे सहावे सुख निराळे असेल.

समाजात प्रत्येकाचे राहणीमान वेगळे, आर्थिक स्तर वेगळे, गरजा वेगळ्या. ह्या सगळ्याचा विचार केल्यावर वाटलं, ज्याचं त्याचं सहावे सुख वेगळं.

आजच्या टप्प्यावर ज्या गोष्टी मला व्हायला हव्या आहेत, त्या त्या माझं सहावे सुख असू शकतात.

पण त्या सहाव्या सुखामागे पळायला मला आवडणार नाही. जे आहे, जे मिळतंय, ते माझं सहावं सुख आहे.

छान कार्यक्रम बघायला मिळावेत, ट्रिपला जायला मिळावं, आरोग्यपूर्ण असावं – निदान तब्येतीची तक्रार नसावी. चांगलं चांगलं लिहायला सुचावं, ही माझी सहावी सुखं आहेत. तसं तर यादी करू तितकी कमी वा जास्त होईल.

आत्तापर्यंत राहिलेल्या गोष्टी करायला मिळाल्या, तर तेही सहावं सुख असेल. त्याचा शोध आपोआपच लागतो.

खरं आहे ते. सुखाच्या खूप मागे लागण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीच्या मागोमाग जाण्यातच खरं सुख आहे. त्या वाटेवर चालताना आनंदाचं झाड मिळेल, खळाळणारा झरा लागेल, कधी ऊन कधी सावलीचा लपंडाव असेल, गाणारी वाट असेल…. स्वतःची चित्तवृत्ती समाधानी ठेवणं हे सहावं सुख सगळ्यांना लाभावं.

लेखिका: सुश्री शांता शेळके

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ म्हातारपणा..  कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री अनंत केळकर ☆ ☆

? वाचताना वेचलेले ?

 ☆ म्हातारपणा..  कवी : अज्ञात प्रस्तुती : श्री अनंत केळकर ☆

म्हातारपणाला नाव छान

कोणी म्हणे संन्यासाश्रम

कोणी म्हणतं वानप्रस्थाश्रम

मी म्हणतो आनंदाश्रम

 

म्हातारपणात कसं राहायचं?

घरात असेल तर आश्रमासारखं

आश्रमात असेल तर घरासारखे

कशातच कुठे गुंतायचं नसतं

 

जुन्या आठवणी काढायच्या नाही

‘आमच्या वेळी’ म्हणायचं नाही

अपमान झाला समजायचं नाही

उगाच लांबण लावायची नाही

 

सुखाची भट्टी जमवत जायचं

साऱ्यांशी दोस्ती जुळवत राहायचं

रागलोभाला लांब पळवायचं

आनंद सारखा वाटत जायचं

 

म्हातारपणसुद्धा छान असतं

लेन्स इम्प्लांटने स्वच्छ दिसतं

नव्या दातांनी सहज चावता येतं

कानयंत्राने ऐकू येतं

 

पार्कात जाऊन फिरून यावं

क्लबात जाऊन पत्ते कुटावं

देवळात जाऊन भजन करावं

टीव्हीमधल्या सिरियल बघावं

 

मुलांसमोर गप्प बसावं

नातवंडांशी खेळत राहावं

बायकोबरोबर भांडत जावं

मित्रांबरोबर बोलत सुटावं

 

जमेल तेव्हा टूरवर जावं

बायकोचं लगेज सोबत न्यावं

दिलखुलास फिरून घ्यावं

थकलं तिथेच बसून राहावं

 

लायन रोटरी अटेंड करावं

वेळ असेल तर गाणं गावं

एकांतात ठेक्यावर नाचून घ्यावं

पाहिलं कुणी व्यायाम म्हणावं

 

कंटाळा आला झोपून जावं

जाग आली फेसबुक बघावं

बघता बघता घोरत राहावं

टोकलं कोणी व्हाटस्ऍप उघडावं

 

एकटं घरी किचन पाहावं

दुधाची साय गायब करावं

मुलांचा खाऊ टेस्ट करावं

आलं मनात गोडाचं खावं

 

जुना शर्ट घालत राहावं

थोडे केस सावरत राहावं

आरशालाच बोगस म्हणावं

कोणी नसलं तर वाकुली करावं

 

छान रंगवावी सुरांची मैफील

मस्त जमवावी जेवणाची पंगत

सुरेल जुळवावी गप्पांची संगत

लुटत राहावी जगण्याची गंमत

 

स्वाद घेत,दाद देत

तृप्त मनाने आनंद घेत

हळुच आपण असं निघून जावं

जसं पिकलं पान गळून पडावं

 

कवी : अज्ञात

संग्राहक – श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शुभ दीपावली… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ शुभ दीपावली… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

*

दीपावली परत जायला निघाली हं, मित्रांनो!

कसं भरून येतंय ना?

बघता बघता आली आणि निघालीसुद्धा!

दिल अभी भरा नहीं. ‘…

न मागता खूप काही देऊन निघालीय!

 

दर वेळेचंच आहे हे असं हिचं!

येते, येते….

आले, आले म्हणायचं…..

उसळत यायचं…..

सगळी दुनिया प्रकाशमय करायची…..

मनामनांत प्रकाश पसरायचा….

उद्यासुंदरच आहे, या भावनेची ज्योत तेवत ठेवायची…..

स्वप्नांना प्रकाशाची वाट दाखवायची….

आणि खोल आतून हळवं करून निरोप घ्यायचा!

तुळशीच्या लग्नापर्यंत थोडी थोडी लांब जात मग दिसेनाशी होते….

पण मनोमनी तेवत राहते…..

आठवणी उजळत ठेवते….

प्रवासाच्या पुढच्या वाटेवर

प्रकाशदीप ठेवून जाते

आपल्यासाठी…..

आम्ही कृतज्ञ आहोत गं तुझे!

 

अंगणात शांत झालेल्या पणत्या उचलल्या जातील

आता उद्यापासून…..

त्यातले तेल- वात संपलेले असले तरी

प्रत्येकाच्या मनाच्या गाभाऱ्यात ती ज्योत तेवतच राहणार आहे…

 

म्हणूनच

जरा तहजीब से बटोरना बुझे दियों को दोस्तो!

इन्होंने अमावस की अंधेरी रात में हमें रोशनी दी थी….

किसी और को जलाकर खुश होना अलग बात है…

इन्होंने तो खुद को जलाकर हमें खुशी दी थी……

 

शुभ दीपावली!

*

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: श्रीमती स्वाती मंत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मैत्रीचं झाड – कवी : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मैत्रीचं झाड –  कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

मिळतील का हो कुठे

मैत्रीच्या बिया

एक झाड लावावं म्हणतो

अंगणात माझ्या

*

असेल जे सतत

डोळ्यांसमोर माझ्या

सांगेन मग त्यालाच

सुख दु:खाच्या कथा

*

काळजी घेईन त्याची छान

निगुतीनी वाढवेन त्याला

खत-पाणी घालून घालून

जीवही लावेन त्याला

*

रोज फुटेल नवी पालवी

त्याच्या माझ्या नात्याला

फळा-फुलांचे येतील बहर

ऋतूमध्ये मैत्रीच्या

*

तसे असतातच की मित्र खूप

समाजामध्ये आपल्याला

कधी क्वचित येतो पण

मैत्रीमध्ये दुरावा

*

जाईन जेव्हा जवळ त्याच्या

धरेन अलगद फांदीला

तेही देईल आधार तेव्हा

माझ्या उतरत्या खांद्याला

*

बघा कधी तुमच्याही

मैत्रीत आला रुसवा

मैत्रीचं एक झाड

अंगणात तुम्ही रुजवा

*

म्हणूनच विचारतो

कुठे मिळतील

या मैत्रीचा बिया

सगळेच लावू एकेक झाड

अंगणात आपल्या आपल्या 

*

बाजार नको मैत्रीचा

मित्र असावा खात्रीचा

कवी:अज्ञात

प्रस्तुती : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वाचनाचं खरं महत्त्व…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “वाचनाचं खरं महत्त्व…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

“गुरुजी, मी कितीतरी पुस्तकं वाचली… पण त्यातलं बहुतेक विसरलोय. मग वाचनाचा उपयोग काय?” एका जिज्ञासू शिष्याने गुरुजींना प्रश्न विचारला.

गुरुजींनी काही उत्तर दिलं नाही. फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले.

काही दिवसांनी ते नदीकाठी बसले होते. अचानक गुरुजी म्हणाले –

“मला तहान लागली आहे. पाणी आण. पण त्या जुन्या चाळणीत भरून घे.”

शिष्य चकित झाला.

ही कसली विनंती?

चाळणीतून पाणी आणायचं? त्यात तर सगळीकडे छिद्रं आहेत!

पण त्याने वाद केला नाही.

त्याने चाळणी उचलली आणि प्रयत्न सुरू केले.

एकदा.

दोनदा.

पुन्हा पुन्हा…

कधी तो वेगाने धावला,

कधी कोन बदलून पाहिला,

कधी छिद्रं बोटांनी बंद करून पाहिली.

पण काही उपयोग झाला नाही.

एक थेंबही पाणी टिकेना.

शेवटी तो दमून-भागून गुरुजींच्या पायाशी चाळणी ठेवून म्हणाला –

“माफ करा, मी अपयशी ठरलो. हे अशक्य होतं.”

गुरुजी प्रेमाने म्हणाले –

“तू अपयशी झालास नाहीस. जरा चाळणीकडे नीट बघ.”

शिष्याने खाली पाहिलं…

आणि त्याला काही जाणवलं.

ती जुनी, काळी, घाणेरडी चाळणी आता स्वच्छ व चमकदार झाली होती.

पाणी जरी टिकून राहिलं नाही, तरी सतत वाहत राहिल्याने ती चाळणी झळाळून निघाली होती.

गुरुजी पुढे म्हणाले –

“वाचन असंच असतं. तुला प्रत्येक गोष्ट लक्षात राहिली नाही तरी हरकत नाही.

ज्ञान पाण्यासारखं हातातून निसटतं… पण मन मात्र ताजंतवानं होतं.

वाचनाने विचार स्वच्छ होतात,

आत्मा ताजातवाना होतो,

कल्पना प्रफुल्लित होतात.

आणि कळत-नकळत तू आतून बदलत जातोस.”

वाचनाचं खरं उद्दिष्ट म्हणजे स्मरणशक्ती भरून काढणं नव्हे…

तर आत्म्याला स्वच्छ, समृद्ध आणि प्रबुद्ध करणं आहे.

* * * *

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पेरावे तसे उगवते! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ पेरावे तसे उगवते! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

ही कथा आहे ‘१३ लाख रुपये दहा रुपयांच्या बदल्यात’ची.

एका व्यावसायिकाने नुकतेच दुकान उघडले होते. तेवढ्यात एक महिला आत आली आणि म्हणाली,  “सेठ,  तुमचे दहा रुपये घ्या…! “

व्यावसायिकाने त्या गरीब महिलेकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले,  जणू काही त्याची नजर विचारत होती,  “मी तुम्हाला दहा रुपये कधी दिले? “

बाई म्हणाली,  “काल संध्याकाळी,  मी वस्तू खरेदी केल्या तेव्हा मी तुम्हाला शंभर रुपये दिले. ७० रुपयांचा माल खरेदी केला. तुम्ही मला ३० रुपयांऐवजी ४० रुपये परत दिले. “

 व्यापाऱ्याने दहा रुपये कपाळावर लावले,  नंतर ते परत त्याच्या कॅश बॉक्समध्ये ठेवले आणि म्हणाला,  “मला सांग ताई,  वस्तू खरेदी करताना तू खूप वाटाघाटी करत होतीस. किंमत पाच रुपयांनी कमी करण्यासाठी तू खूप वाद घातलास आणि आता तू हे दहा रुपये परत करायला आली आहेस! ”

महिलेने उत्तर दिले,  “किंमत कमी करून घेणे,  हा माझा अधिकार आहे. पण एकदा सौदा झाला की,  त्या वस्तूचे कमी पैसे देणे हे पाप आहे. “

तो व्यापारी म्हणाला,  “पण,  तू कधी कमी पैसे दिलेस? तू पूर्ण पैसे दिलेस. हे दहा रुपये चुकून तुझ्याकडे गेले. तू ते ठेवले असतेस तर मला काही फरक पडला नसता. ”

ती महिला म्हणाली,  “तुम्हाला काही फरक पडत नसेल. पण माझ्या मनात नेहमीच हा सल असता की,  मी तुमचे पैसे जाणूनबुजून घेतले. म्हणूनच मी काल रात्री ते परत करायला आले होते. पण तुमचे दुकान त्यावेळी बंद होते. “

व्यापाऱ्याने त्या महिलेकडे आश्चर्याने पाहत विचारले,  “तू कुठे राहतेस? ”

ती म्हणाली,  “मी सेक्टर ८ मध्ये राहते. ”

त्या व्यापाऱ्याचे तोंड वासले गेले.

तो म्हणाला,  “तुम्ही ७ किलोमीटर अंतरावरून दुसऱ्यांदा आला आहात,  मला हे दहा रुपये देण्यासाठी? “

त्या महिलेने सहज उत्तर दिले,  “हो,  मी दुसऱ्यांदा आले आहे. मनःशांतीसाठी हे करावेच लागले. माझा नवरा आता या जगात नाही,  पण त्याने मला एक गोष्ट शिकवली आहे. दुसऱ्याच्या मालकीचा एक पैसाही खाऊ नका. कारण एखादा माणूस गप्प राहू शकतो,  पण देव कधीही हिशोब मागू शकतो. आणि आपल्या मुलांनाही त्या हिशोबाची शिक्षा होऊ शकते. “

हे सांगून ती महिला निघून गेली.

व्यापाऱ्याने ताबडतोब कॅश बॉक्समधून तीनशे रुपये काढले आणि नोकराला म्हणाला,  “तुम्ही दुकान सांभाळा,  मी लवकरच परत येईन. ” तो व्यापारी बाजारातल्या एका दुकानात पोहोचला. दुकानदाराला तीनशे रुपये देत म्हणाला,  “प्रकाशजी,  तुमचे तीनशे रुपये घ्या. काल,  तुम्ही सामान खरेदी करायला आलात,  तेव्हा बिलाचे जास्त पैसे भरले. ”

प्रकाश हसून म्हणाला: ” मी जास्त पैसे दिले होते,  ते मी पुन्हा दुकानात आलो असतो,  तेव्हा तुम्ही ते मला देऊ शकला असता! पण इतक्या सकाळी तुम्ही मला तीनशे रुपये द्यायला आलात.”

व्यापारी म्हणाला,  ” तुम्ही पुन्हा कधी आला असता? तोपर्यंत मी मेलो असतो तर? तुम्हाला माहीत नव्हते की,  माझ्याकडे तुमचे तीनशे रुपये आहेत! बरोबर ना? म्हणूनच ते देणे आवश्यक होते. देव कधी हिशोब मागेल हे मला माहीत नाही… आणि माझ्या मुलांनाही त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात…! “

तो व्यापारी निघून गेला होता.

पण प्रकाशचे मन अशांत होते.

दहा वर्षांपूर्वी त्याने एका मित्राकडून तीन लाख रुपये उसने घेतले होते. पण पैसे परत करण्याअगोदर त्याचा मित्र मरण पावला.

त्याच्या मित्राच्या कुटुंबाला त्या पैशांची काहीच कल्पना नव्हती. म्हणूनच कोणीही ते परत मागितले नव्हते.

प्रकाश लोभात बुडाला होता. म्हणून त्यानेही ते परत करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. आज त्याच्या मित्राचे कुटुंब गरिबीत जगत होते. त्याची पत्नी लोकांची घरे झाडून,  पुसून मुलांना वाढवत होती. तरीही,  प्रकाशने त्यांच्या पैशावर डल्ला मारला होता.

“देव कधी न्याय मागेल हे मला माहीत नाही.. आणि माझ्या मुलांनाही त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात… ” सेठचे हे शब्द ऐकून प्रकाश घाबरला होता. तो दोन-तीन दिवस तणावात राहिला.

शेवटी,  त्याचा विवेक जागृत झाला. त्याने बँकेतून तेरा लाख रुपये काढले आणि ते देण्यासाठी मित्राच्या घरी गेला.

त्याच्या मित्राची पत्नी घरी होती. ती तिच्या मुलांसोबत गप्पा मारत बसली होती. तेव्हाच प्रकाश आला. तिच्या पाया पडला.

त्या विधवेसाठी,  जी एकेक रुपयासाठी झगडत होती,  १३ लाख रुपये खूप मोठी रक्कम होती.

ते पैसे पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले.

ती प्रकाशला आशीर्वाद देऊ लागली,  ज्याने प्रामाणिकपणे पैसे परत केले होते!

ही तीच महिला होती जी एका व्यावसायिकाला त्याचे दहा रुपये परत करण्यासाठी दोनदा गेली होती!

कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांची देव नक्कीच परीक्षा घेतो. पण तो त्यांना कधीही सोडत नाही. एक दिवस तो नक्कीच न्याय करतो. देवावर विश्वास ठेवा!

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares