मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १०५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १०५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

 (या सदरातील अखेरचा भाग)

माझ्या अजाण वयापासूनच्या विविध टप्प्यांवरचे हे सगळे अनुभव ‘त्या’चा कृपालोभ म्हणजे काय याची पुन्हा नव्याने प्रचिती देणारे साक्षात्कारच होते माझ्यासाठी!

‘देव’ ही मानवनिर्मित संकल्पना आहे. तो अस्तित्वातच नसतो. तो आहे असं मानणं हा एक भ्रम आहे’ असं आग्रहाने सांगणाऱ्यांची भूमिका माझं वय वाढत गेलं तसं अनेकदा ऐकता, वाचताना माझ्या मनात संभ्रम नाही पण प्रश्न मात्र निर्माण करायचीच. पण त्या प्रश्नांची उत्तरं अट्टाहासानं लगेचच मिळवावीत आणि ती टोकाची मते खोटी ठरवावीत अशी असोशी माझ्या मनात कधी निर्माण झाली नाही तरी त्यातलं तथ्य समजून घ्यावं असं, माझं वाचन वाढत गेलं तसं मला मनापासून वाटू लागलं हेही खरंच. हे समजून घ्यावं असं वाटणंच पुढे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात असणारी पुसटशी अंधूक रेषा माझ्यापुरती अधिकाधिक ठळक व्हायला निमित्त झाली. अर्थातच हे सगळं एका क्षणात घडून गेलेलं नाही. तरीही ते घडायला निमित्त झालेले एक एक क्षण मात्र मी समतोल मनाने स्वीकारल्यामुळे माझ्यासाठी ते हितकारक ठरले एवढं मात्र नक्की. या संदर्भातला एक प्रतिनिधिक अनुभव पुढे लिहिण्याच्या ओघात येईलच.

सुरुवातीच्या माझ्या अनुभवांबद्दल यापूर्वी सविस्तर लिहिल्याप्रमाणे माझ्या नकळत्या अजाण वयातच माझ्या बालमनात आजुबाजूचं वातावरण आणि घरातले संस्कार यामुळे माझ्याही नकळत ‘त्या’ची प्रतिष्ठापना झालेली होती! त्याची जाणिव अर्थातच पुढे आयुष्यातल्या कसोटी पहाणाऱ्या असंख्य प्रसंगांमध्ये हळूहळू दृढ होत गेली.

माझ्या मनातलं ‘त्या’चं हे आश्वासक अस्तित्व माझ्या आजवरच्या जीवनप्रवासातला माझा श्वासच कधी आणि कसं बनलं ते मलाच समजलं नव्हतं! तोच श्वास पुढे माझी घुसमट व्हायची वेळ आलेल्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगात माझ्यासाठी संजीवक ठरत असायचा! !

‘श्रध्दा’ म्हणजे तरी वेगळं काय असतं? ‘तो’ आहे हा मनोमन असणारा ठाम विश्वास म्हणजेच तर श्रध्दा! ‘देव’ आहे की नाही हा संभ्रम माझ्या मनात निर्माण व्हायची वेळ जशी कधीच आली नाही तसेच ‘तो’ आहे हे इतरांना अट्टाहासाने पटवून द्यावे असंही मला कधी वाटलं नाही.

खरंतर देवाचं अस्तित्व मानणं किंवा न मानणं हा माझ्यापुरता मी ज्याचा त्याचा प्रश्नच मानला. म्हणूनच असेल कदाचित पण जवळचे अनेक मित्र आणि नातेवाईक नास्तिक असूनही आमचे परस्परसंबंध सलोख्याचेच राहिले. किंबहुना माझ्या मनातली श्रद्धा तिच्यावर अंधश्रद्धेची सावली पडू न देता अलवारपणे जपणं मला त्या सर्वांमुळेच सुलभ झालं असं मला मनापासून वाटतं.

माझ्या मनातल्या या श्रद्धेचं एरवीच्या दैनंदिन जीवनात मला कधीच प्रदर्शन करावं असं वाटलं नाही. कारण माझी श्रध्दा ही माझ्या हाडामांसासारखीच एक नैसर्गिक गोष्ट आहे असंच मला वाटायचं. त्यात आवर्जून मिरवावं असं वाटण्याचा प्रश्नच नव्हता.

मी जसा कधी कर्मकांडात रुतलो नाही तसंच माझ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यं हेच माझे सतत प्राधान्यक्रम राहिले. त्यामुळे अट्टाहासाने अध्यात्मिक ग्रंथांचं वाचन आवर्जून करावं अशी ओढ मला असोशीने कधी वाटलीच नाही. त्यांचं वाचन झालं ते केवळ गरजेनुसार संदर्भ पहाण्यापुरतंच. तरीही लेखनाइतकीच मला वाचनाचीही आवड होती आणि त्या वाचनात नकळत आलेल्या विविधतेमुळे मी त्या त्या वेळी आत्मपरीक्षण करायला प्रवृत्त झालो हे आवर्जून सांगायलाच हवं!

अगदी योगायोगाने वाचनात आलेलं ‘साद देती हिमशिखरे’ हे श्री जी. के. प्रधान यांचे पुस्तक मला प्रभावित करून गेले होते. श्री. हिराभाई ठक्कर यांच्या ‘कर्माचा सिद्धांत’ आणि ‘मृत्यूचे महात्म्य’ या पुस्तकांनी अतिशय मौलिक असं जगण्याचं आणि मृत्यूचंही महत्व मला समजून सांगितलेलं होतं. श्री. संजय पंडित यांच्या ‘मनाचे व्यवस्थापन’ या पुस्तकाने माझ्या मनातली श्रद्धा तपासून पहायला मला प्रवृत्त केले आणि पुढेही माझ्या विचारांना योग्य दिशा देण्याचे कामही केले. श्री नरेंद्र दाभोळकरांच्या ‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा’, ‘भ्रम आणि निरास’, ‘उच्चाटन अंधश्रद्धेचे’ यासारख्या पुस्तकांनीही माझ्या मनातील श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या दरम्यान असणारी पुसट रेषा अधिक ठळक केली. हे सगळंच मला समृध्द करायला निमित्त ठरलेलं आहे!

श्रद्धेवर नकळत पडणारं अंधश्रद्धेचं सावट हळूहळू अधिक गडद होत जाण्याची प्रक्रिया सद्सदविवेकाच्या टोचणीनंतरही आपण सजगतेने थोपवू शकलो नाही तर मनातली श्रद्धा प्रदूषित व्हायला आपोआपच सुरुवात होते. हे अशिक्षितांच्या बाबतीतच नाही तर शिकलेल्या, सुजाण म्हणवणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीतही नकळत कां होईना पण सर्रास घडत असते. यासंदर्भातला माझा एक अनुभव आवर्जून सांगायलाच हवा असं मला वाटतं. तो तसा अगदी साधाच अनुभव पण आपली त्याकडे पहाण्याची दृष्टी स्वच्छ असली तर साध्या साध्या गोष्टीही आपल्याला बरंच कांही शिकवून जातात याचा प्रत्यय देणारा!

माझं पोस्टिंग कोल्हापूर ब्रँचला होतं तेव्हाचा हा प्रसंग. साधारण १९७८-७९ दरम्यानचा. तिथे एकात एक अशा तीन खोल्यांच्या भाड्याच्या जागेत आमचं बि-हाड होतं. रोजची देवपूजा म्हणजे फुले हवीतच. त्याशिवाय पूजा कशी पूर्ण होणार? हाच विचार तेव्हाच्या अननुभवी वयात माझ्या मनात खोलवर रुजलेला होता. आणि ती जागाच अशी होती की निदान एखाद्या कुंडीत फुलझाडाचं रोप लावावं एवढीही जागा घराभोवती कुठे नव्हतीच. त्यामुळे पूजेसाठी फुलपुडी लावण्याशिवाय पर्यायच नव्हता. आणि त्यात मला कांही गैरही वाटलं नव्हतं. फुलवाला पहाटेच कधीतरी फुलपुडी आणून शटरमधून आत टाकून जायचा. त्यामुळे सकाळी उठल्यावर चूळ भरुन मी आधी फुलवाल्याने टाकलेली ती फुलपुडी आत आणून ठेवायचो. रोजच्याप्रमाणे त्या दिवशी सकाळी ती फुलपुडी आत आणायला मी गेलो तर मला ती कुठे दिसेचना. नीट पाहिल्यावर लक्षात आलं की ती फुलपुडी बंद दाराच्या जवळच ठेवलेल्या छोट्या शूज स्टॅंडवरच्या माझ्या बुटाच्या खाचेत पडलीय. मी नाराज झालो. पण तरीही ती फुलपुडी उचलून आत आणली आणि त्या फुलांवर पाणी शिंपडून फुलं तबकात नेऊन ठेवली. आंघोळ आवरून पूजेला बसलो. देव पुसून ताम्हनात ठेवले. गंध लावलं. आणि नेहमीच्या सवयीनं देवाला वाहण्यासाठी तबकातली फुले हातात घेतली. आणि… क्षणभर थबकलो. ती फुलं देवाला वाहावीत असं वाटेचना. हातातली फुलं तशीच परत तबकात ठेवली. देवाला फक्त हळद-कुंकू वाहिलं आणि निरांजन लावून नैवेद्य दाखवला. कांहीतरी निसटून गेल्याची रुखरुख मात्र मनात होती पण क्षणभरच. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधली पुसट रेषा ओळखण्याचा तो क्षण होता. एरवी बुद्धीमुळे भ्रम होतो म्हणतात. पण माझ्या बुद्धीनेच त्या क्षणी ती रेषा नकळत ओलांडू पहाणाऱ्या माझ्या मनाला सावरलं. योग्य आणि अयोग्य यांच्यातल्या फरकाची नेमकी जाणीव करून दिली. पूजेला फुलं न मिळाल्याने मनाला झालेली नाराजी बुद्धीनं अलगदपणे दूर केली. हे अयोग्य आहे हे पटवून दिलं. केवळ उपचारापेक्षा शुचिर्भूतता महत्त्वाची आहे हे समजावून सांगितलं. आणि मग मनातली रुखरुख विरून गेली. मन शांत झालं. मी अलगद डोळे मिटले. हात जोडले. आणि अतिशय नम्रपणे ‘त्या’ला सांगितलं,.. ‘देवा, आता उद्यापासून तुझी रोजची पूजा ही अशीच. जेव्हा केव्हा माझ्या दारात एखाद्या लहानशा कुंडीत कां असेना पण चार-दोन फुलं फुलतील तेव्हाच मी ती तुला वाहिन. “

पुढे जवळजवळ पंधरा- सोळा वर्षांनंतर १९९३ साली आम्ही सांगलीतल्या गावभागातल्या आमच्या स्वतःच्या फ्लॅटमधे रहायला गेलो तेव्हा बाल्कनीतल्या कुंड्यांमधे निशिगंध लावला. आवर्जून लावलेल्या निशिगंधाला लगडलेल्या शुभ्र सुवासिक फुलांची ओंजळ भक्तियुक्त अंत:करणाने मी जेव्हा ‘त्या’च्या चरणी प्रथम वाहिली, तेव्हा मनाला स्पर्शून गेलेली सुखसंवेदना माझ्या मनाला आत्यंतिक उल्हसित करुन गेली होती!

२००६ पासून आम्ही हरिपूर रोडवरील ‘त्रिदल’ या आमच्या नवीन वास्तूत रहायला आलो. आता सभोवतालच्या प्रशस्त बागेत विविध रंग, रूप, वासांच्या फुलांनी दोन-तीन मोठ्या परड्या तुडुंब भरतील एवढी फुले रोज मिळतात आणि तेवढीच झाडावेलींवर शिल्लकही असतात. त्या ताज्या टवटवीत फुलांचे वाटे कितीतरी परिचितांच्या घरच्या देवघरांमधल्या आणि जवळच्या मंदिरामधील ‘त्या’च्यापर्यंत रोज पोचतात आणि कृतार्थता म्हणजे काय याचा अर्थ यथार्थपणे मनाला स्पर्शून जातो! देणाराही तोच असतो आणि घेणाराही तोच! पण त्यात आपलं असं निमित्तमात्र असणंही किती सुखदायी असतं याच्या अनुभव मला रोज नव्याने येतो आहे! !

‘त्या’ला एकदा मनोमन मानल्यानंतर नकळत सुरू झालेल्या ‘त्या’ला जाणण्याच्या प्रक्रियेतील या सगळ्या वाटा आणि वळणे! या प्रवासात या प्रत्येक टप्प्यावर ‘तो’ माझ्याबरोबर असायचाच. त्यामुळे अनेकांना पडतात तसे ‘तो कोठे आहे? ‘ ‘कसा आहे? ‘ हे प्रश्न मला कधीच पडायचे नाहीत. ‘तो’ आहे हेही माझ्यापुरतंच असायचं! इतरांनीही ते स्वीकारावं असं मला कधीच वाटलं नाही. मी माझ्याही नकळत जीवनाचं गणित सोडवण्यासाठी माझ्या नकळत्या वयापासून ‘त्या’चं असणं हे असं एक गृहीतच मानत आलो. आज हे गृहीत चुकलेलं नाहीय याची आजवरच्या अनुभवांती मला पूर्ण खात्री पटल्यानंतर आपल्या जीवनाचं गणित अचूक सुटणार याचा पूर्ण विश्वास मला वाटतो आहे!

‘तो’ माझ्याच नव्हे तर प्रत्येकाच्याच मनामनात अंश रुपाने असतोच. म्हणूनच ‘त्या’ला अंतर्यामी म्हणतात ना? ‘त्या’चं रंगरुप त्या प्रत्येकाच्या श्रध्दा आणि विचारांनुरुप वेगवेगळं असतं एवढंच. त्या वेगवेगळ्या रुपातला ‘तो’ प्रत्येक आस्तिकाच्याच नव्हे तर नास्तिकाच्या मनातही असतोच. त्यातील कुणाला त्याची जाणिव असो वा नसो. केवळ असा प्रत्येकाच्या अंतर्यामीच नव्हे तर चराचरातल्या प्रत्येक कणाकणात अंशरुपाने भरुनसुध्दा ‘तो’ वर अंगुलीभर उरतोच! !

‘त्या’च्याच साक्षीने मी माझ्या मनातल्या ‘त्या’चा आजवर घेतलेला हा मागोवा!

 या निमित्ताने माझ्या ओंजळीत साठलेली ही सगळी सुगंधी शब्दफुले मी आज अतिशय विनम्र आणि कृतज्ञभावाने ‘त्या’च्याच चरणी अर्पण केलीयत हीच भावना याक्षणी माझ्या मनात आहे!

 – पूर्णविराम –

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विश्वचषक फुटबाॅल 2026 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ विश्वचषक फुटबाॅल 2026 ☆ अमृता देशपांडे ☆

फिफा (FIFA) फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबाॅल असोसिएशन ही विश्वचषक सामने खेळवणारी संस्था आहे.

हे विश्वचषक सामने दर चार वर्षांनी खेळले जातात.

या वर्षी 11जून ते 19 जुलै 2026 या दिवसात खेळले जातील. हे सामने कॅनडा, मेक्सिको, आणि युनायटेड स्टेट्स् येथे खेळले जाणार आहेत. कॅनडामध्ये प्रथमच सामना होतो आहे. 1998 पासून 32 देशातले खेळाडू भाग घेत होते. 2026 ला 48 देश क्वालिफाय झाले आहेत. एकूण 104 सामने खेळले जातील.

काबो वेर्दे, कुरकाओ, जाॅर्डन आणि उझबेकिस्तान हे चार संघ प्रथमच भाग घेत आहेत. युकेचे इंग्लंड आणि स्काॅटलंड हे दोनच संघ सामील होतील.

48 संघ सोळा भागात विभागून सामने खेळले जातील. अंतिम निर्णायक सामना न्यू जर्सी (अमेरिका) येथे मेटलाईफ स्टेडियमवर 19 जुलैला खेळला जाईल. 2022 वर्षी अर्जेंटिना व फ्रान्स यांच्यात अंतिम सामना खेळला गेला, तो अर्जेंटिनाने जिंकला होता.

पहिला विश्वचषक फुटबाॅल सामना 1930 साली उरुग्वे येथे खेळला गेला. तेव्हा 13 संघांनी भाग घेतला होता.

यानंतर पुढच्या चार वर्षांनी म्हणजे 2030 ला हे सामने मोरोक्को, पोर्तुगाल, आणि स्पेन येथे खेळले जातील. 2030 हे वर्ष या विश्वचषक सामन्यांचे 100 वे वर्ष असेल. विश्वचषक शतकपूर्तीचा मान म्हणून यातील एक सामना उरुग्वेच्या ईस्तादियो सेंटेनरी स्टेडियमवर खेळला जाईल.

विजेत्याला सन्मानाने, गौरवाने देण्यात येणारा कप हा सुवर्णचषक असतो. तो 3. 5 फूट उंच आणि त्याचे वजन 6. 2 किलो असते. त्याची किंमत 15 मिलियन पौंड म्हणजे भारतीय चलनात करायची तर असते दीडशे करोड रुपये.

पण विजेते ही ट्राॅफी घेऊन जात नाहीत, ती स्वित्झर्लंडच्या FIFA म्युझियम मध्ये ठेवली जाते. विजेत्या प्रत्येक खेळाडूला ब्राॅन्झची प्रतिकृती दिली जाते.

खेळाडूंची धावण्याची शारिरीक क्षमता, स्थिर आणि बळकट मन, समान गोल असताना पुढचा गोल करण्यासाठी लागणारी सांघिक एकात्म शक्ती, विरुद्ध संघातला खेळाडू बाॅल कुठल्या दिशेने कुठे पास करतो त्याप्रमाणे बाॅल गोलपोस्टकडे ठोकणे याला शारिरीक हालचाली आणि मेंदूची अतिशय तत्परतेची क्षमता लागते, तसेच गोलरक्षकाची येणा-या बाॅलचा अंदाज घेण्याची ताकद, मांजरासारखी धारदार नजर, चित्त्यासारखी झप् कन उडी घेण्याची चपळता

आणि सर्वात महत्वाचे, प्रत्येक सामना आणि विश्वचषक जिंकण्याची प्रचंड आणि जबरदस्त इच्छा हेच खेळाचे वैशिष्ट्य!

खेळाडूंच्या बरोबरीने पळणारा रेफरी हा तर प्रेक्षकांचे लक्ष वेधणारा आणि खेळातला महत्वाचा दुवा.

खोडकर, रागीट, पळताना पायात पाय घालून पाडणा-या खेळाडूला एका शिट्टीवर बाहेरचा रस्ता दाखवणारा मास्तरच!

टीव्हीवर सामना बघताना सरासर धावणारे खेळाडू, रेफरी, गोलरक्षक, मध्येच धडाडकन् पडणारे धावक आणि एकत्र आवाजाने आणि टाळ्यांनी प्रोत्साहन देणारे प्रेक्षक हा सगळा नजारा बघायला आणि सामन्याचा थरार अनुभवायला तयार राहूया.

लिओनेल मेस्सी, पेले, रोनाल्डो, डायगो माराडोना यांची आठवण करत, चला तर, 11 जून पासून विश्वचषक फुटबाॅल सामन्यांचा आनंद घेऊया.

©  अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “भावनांचे पोषण करते नातेसंबंधांचे रक्षण” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “भावनांचे पोषण करते नातेसंबंधांचे रक्षण” ☆ श्री जगदीश काबरे ☆

मानवी नातेसंबंधांचा पाया हा केवळ करार, जबाबदाऱ्या किंवा एकत्र राहण्याच्या व्यवस्थेवर उभा नसतो; तर तो अनेकदा न दिसणाऱ्या पण सतत अनुभवता येणाऱ्या भावनिक प्रवाहांवर आधारलेला असतो. नात्यांमधील ऊब, जिव्हाळा आणि आपुलकी या गोष्टी प्रत्यक्षात भावनांच्या सातत्यपूर्ण देवाणघेवाणीमुळे निर्माण होतात. परंतु आधुनिक सामाजिक संरचनेत, विशेषतः बदलत्या विवाह आणि कुटुंब व्यवस्थेत, या भावनांची जागा हळूहळू व्यवहारिकता आणि व्यक्तिकेंद्रित जीवनशैली घेताना दिसते आहे. परिणामी, नाती ‘राहतात’ पण ‘जगली’ जात नाहीत. म्हणून आधुनिक समाजात नातेसंबंधांचा बाह्य आविष्कार जरी पूर्वीइतकाच टिकून असल्याचे दिसत असले, तरी त्यांच्या अंतर्गत आशयात खूप मोठे बदल घडत आहेत. विवाह, कुटुंब आणि सामाजिक नाती या सर्वांचा पाया भावनांवर उभा असतो. ही एक मूलभूत सामाजिक गरज आहे. मात्र आजच्या बदलत्या जीवनशैलीत, वेगवान शहरीकरणात आणि भौतिक प्रगतीच्या अतिरेकात या भावना हळूहळू क्षीण होत चालल्याचे स्पष्टपणे दिसतेय. ‘कुपोषण’ ही संकल्पना आपण सहसा शरीराशी, अन्नाशी जोडतो; परंतु भावनांचेही कुपोषण होऊ शकते, ही जाणीव अद्याप सामाजात चर्चेत फारशी ठळकपणे आलेली नाही. जसे शरीराच्या पोषणासाठी योग्य अन्न, योग्य वेळ आणि संतुलीत आहार आवश्यक असतो, तसेच नात्यांना टिकवण्यासाठी भावनांचे पोषण होणे आवश्यक असते. परंतु आजच्या धावपळीच्या जीवनपद्धतीत या भावनिक पोषणाचा अभाव प्रकर्षाने जाणवायला लागलाय.

यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे चंगळवादाचा वाढता प्रभाव. आर्थिक प्रगती, उपभोगवादी संस्कृती आणि ‘सर्व काही पैशाने मिळू शकते’ हा दृष्टिकोन समाजात खोलवर रुजत चालला आहे. यामुळे आनंदाची व्याख्या बदलली आहे. पूर्वी नात्यातून मिळणारा आनंद, सान्निध्य, आपुलकी आणि परस्पर आधार यांना जे महत्त्व होते, त्यांची जागा आता वस्तू, सुविधा आणि वैयक्तिक यश यांनी घेतली आहे. परिणामी, माणूस नात्यांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी भौतिक साधनांमध्ये गुंतवणूक करू लागला आहे. ही गुंतवणूक तात्पुरता आनंद देऊ शकते, पण ती नात्यांमधील उब निर्माण करू शकत नाही. म्हणूनच नात्यांमध्ये ‘भावनिक कुपोषण’ निर्माण झाले तरी नात्याचे बाह्य स्वरूप वरवर टिकून राहिलेले दिसते. अंतर्गत ऊब आणि जिव्हाळा मात्र हरवलेला असतो. वाणी, कृती आणि स्पर्श या मानवी संवादाच्या मूलभूत माध्यमांमधून भावना व्यक्त होत असतात. माया, ममता, आस्था, सहसंवेदना, ओढ, क्षमा, संयम, आदर आणि कौतुक या केवळ शब्दरूप भावना नाहीत, तर ते नात्यांना पोसणारे घटक आहेत. परंतु आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला आहे. डिजिटल माध्यमांमधून होणारा संवाद हा माहितीपुरता मर्यादित असतो; त्यात भावनिक सूक्ष्मता कमी असते. ‘इमोजी’ आणि ‘मेसेज’ यांच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या भावना प्रत्यक्ष स्पर्श, आवाजातील ऊब किंवा नजरेतील आपुलकी यांची जागा घेऊ शकत नाहीत. परिणामी, नात्यांमध्ये भावनिक अंतर वाढते. हे अंतर हळूहळू तुटकपणात परिवर्तित होत जाते. अशाप्रकारे डिजिटल युगातील संवादाच्या बदलत्या स्वरूपानेही या प्रक्रियेला वेग दिला आहे. सोशल मीडियावरचे आभासी संबंध, तत्काळ प्रतिसादाची सवय आणि सततच्या व्यस्ततेमुळे प्रत्यक्ष संवादाची गुणवत्ता कमी होत चालली आहे. ‘कनेक्टेड’ असण्याचा भास असला, तरी ‘कनेक्शन’ची खोली कमी होत आहे. भावनांची अभिव्यक्ती शब्दांपलीकडे असते… ती आवाजाच्या टोनमध्ये, नजरेत, स्पर्शात आणि उपस्थितीत दिसते. परंतु जेव्हा संवाद प्रामुख्याने डिजिटल माध्यमातून होतो, तेव्हा या सूक्ष्म अभिव्यक्ती हरवतात. परिणामी, नात्यांमध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण होते, जी अनेकदा व्यक्तींना स्वतःलाही स्पष्टपणे जाणवत नाही, पण ती त्यांच्या वर्तनात आणि भावनिक स्थितीत प्रतिबिंबित होते.

विवाहसंस्था ही दोन स्वतंत्र व्यक्तींच्या भावनिक आणि सामाजिक करारावर आधारलेली असते. या कराराचा गाभा ‘भावबंध’ हा असतो. दोन व्यक्ती एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याला धक्का न लावता, परस्पर समजूत, सहानुभूती आणि जिव्हाळा यावर नातं उभं राहतं. परंतु जेव्हा या भावनांमध्ये अभाव निर्माण होतो, तेव्हा नातं केवळ औपचारिक उरतं. ‘बंध’ टिकवण्यासाठी ‘भाव’ आवश्यक असतात; अन्यथा ते नातं केवळ सामाजिक बंधन बनून राहते. अशा परिस्थितीत संघर्ष, गैरसमज आणि तणाव वाढण्याची शक्यता अधिक असते. कारण भावनिक आधार नसताना कोणतेही नाते दीर्घकाळ टिकू शकत नाही. कौटुंबिक नात्यांमध्येही हाच बदल दिसून येतो आहे. एकत्र कुटुंबपद्धतीपासून लहान कुटुंबपद्धतीकडे झालेल्या संक्रमणामुळे व्यक्तींचे स्वातंत्र्य वाढले असले, तरी त्याचबरोबर भावनिक आधार कमी झाला आहे. पूर्वी कुटुंबातील विविध सदस्यांमधील संवाद, सण-उत्सव, एकत्रित वेळ घालवणे यामधून भावनिक बंध दृढ होत होते. आता मात्र प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या जगात व्यस्त आहे. कामाचा ताण, वेळेची कमतरता आणि वैयक्तिक प्राधान्ये यामुळे नात्यांना वेळ देणे दुय्यम ठरते आहे. परिणामी, नात्यांमध्ये औपचारिकता वाढतेय आणि जिव्हाळा कमी होतोय. या बदलांचा समाजातही व्यापक परिणाम दिसून येतोय. जेव्हा व्यक्तीला जवळच्या नात्यांमध्येच भावनिक समाधान मिळत नाही, तेव्हा त्याचा परिणाम समाजातील एकात्मतेवर होतो. सहसंवेदना, परस्पर मदत, सामाजिक जबाबदारी या मूल्यांचा ऱ्हास होतो. माणूस अधिक आत्मकेंद्रित बनतो. ही प्रवृत्ती समाजात तणाव, असुरक्षितता आणि एकटेपणा वाढवते. म्हणूनच भावनिक कुपोषण हा केवळ वैयक्तिक किंवा कौटुंबिक प्रश्न नसून तो एक व्यापक सामाजिक प्रश्न आहे. कारण कुटुंब हे समाजाचे मूलभूत एकक आहे, आणि कुटुंबातील नात्यांची गुणवत्ता समाजाच्या आरोग्यावर थेट परिणाम करते. जेव्हा कुटुंबातील सदस्य भावनिकदृष्ट्या तुटक होतात, तेव्हा त्याचा परिणाम त्यांच्या सामाजिक वर्तनावर, कामाच्या ठिकाणी असलेल्या संबंधांवर आणि व्यापक सामाजिक संवादावर होतो. सहसंवेदनेचा अभाव, असहिष्णुता, आणि वाढती एकाकीपणाची भावना हे सर्व या भावनिक कुपोषणाचेच परिणाम आहेत.

या पार्श्वभूमीवर, भावनांचे ‘अन्नग्रहण’ कसे करावे, याचा विचार करणे आवश्यक ठरते. जसे शरीराला संतुलित आहाराची गरज असते, तसेच नात्यांना नियमित आणि जाणीवपूर्वक भावनिक गुंतवणुकीची गरज असते. संवादासाठी वेळ देणे, एकमेकांचे ऐकून घेणे, कौतुक करणे, चुका स्वीकारून क्षमा मागणे आणि देणे, स्पर्शातून आपुलकी व्यक्त करणे, या सर्व गोष्टी भावनिक पोषणाचा भाग आहेत. या कृती कृत्रिम किंवा औपचारिक नसून नैसर्गिक आणि मनापासून असल्या पाहिजेत. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण नात्यांची खरी ताकद ही त्यांच्या भावनिक गाभ्यात असते. बाह्य यश, संपत्ती किंवा सामाजिक प्रतिष्ठा या गोष्टी नात्यांना टिकवू शकत नाहीत. त्या केवळ पूरक असू शकतात. नात्यांचा पाया मजबूत ठेवायचा असेल, तर त्यात भावनांचे पोषण आवश्यक आहे. ‘भाव’ आणि ‘बंध’ यांचा परस्परसंबंध लक्षात घेतला, तरच बदलत्या काळातही नात्यांची उब टिकवता येईल. अन्यथा, नाती केवळ अस्तित्वात राहतील, पण त्यात जिवंतपणा नसेल, आणि हेच भावनिक कुपोषणाचे सर्वात मोठे लक्षण ठरेल. त्यामुळे भावनांचे पोषण ही केवळ वैयक्तिक गरज नसून, सामाजिक आरोग्य टिकवण्यासाठीची एक अत्यावश्यक अट आहे.

 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ परकाया प्रवेश ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ परकाया प्रवेश ☆ शालिनी जोशी ☆

‘परकायाप्रवेश’ हा शब्द आपल्या नेहमीच्या वापरात अजिबात नाही. पुराणकथात, गोष्टीत कधीतरी ऐकलेला, वाचलेला. अलीकडेच नीना कुलकर्णी यांचे ‘अंतरंग’ वाचत होते. ‘अंतरंग’ हा लोकसत्तेतील अंतरंग या सदरात त्यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे. त्यामध्ये एका लेखात नाटकातील काम हा परकाया प्रवेश असतो असे वाचले. आणि माझे मनात विचारांचे काहूर उठले.

स्वतःचा देह बाजूला ठेवून आत्मरूपाने दुसऱ्याच्या देहात केलेला प्रवेश म्हणजे परकाया प्रवेश. हा काही काळापुरता असतो. पण प्रवेश केलेल्या व्यक्ती सारखे वागणे, बोलणे साधावे लागते. परकायाप्रवेश ही एक सिद्धि आहे. खरंच नट तरी वेगळे काय करतो? जी भूमिका त्याला वटवायची असते तिला योग्य कपडे तो धारण करतो. त्याला योग्य चेहरा रंगवून घेतो. त्या भूमिकेचे वागणे, बोलणे, हालचाली आत्मसात करतो. तिचे जीवनच तो आपल्या पुढे उभे करतो. त्या पात्राच्या भावना हालचालीतून, चेहऱ्यावरील भावातून व्यक्त करण्यासाठी तो नट आपला मूळचा व्यवसाय, गुण, रूप, घरदार, वागणूक काही काळा पुरते का होईना विसरतो. असे त्या नाटकातील भूमिकेशी एकरूप होणे म्हणजेच पर काया प्रवेशच नाही का? काही काळापुरता, नाटकाच्या तीन तासा पुरता. असे साधले तरच लोक भूमिका चांगली वठली म्हणून कौतुक करतात. येथे तरुणाचा म्हाताऱ्यात, राजाचा भिकाऱ्यात किंवा तरुणाचा तरुणीत परकायाप्रवेश होत असतो.

सिनेमा, सिरीयल ची गोष्ट थोडी वेगळी असते. तिथे अभिनय साधला नाही तरी रीटेक असतो व समोर प्रेक्षक नसतात. पण नाटक म्हणजे प्रेक्षकांसमोर केलेला जिवंत पर कायाप्रवेश.

आणखी विचार करता, असे लक्षात आलं एखाद्या व्यक्तीविषयी लिहिताना त्या व्यक्तीशी एकरूप व्हावं लागतं. स्वतःला बाजूला ठेवून, त्या व्यक्तीचे विचार, बोली, मते यांचा विचार करावा लागतो. त्या भूमिकेत शिरलं तरच ते शब्दचित्र रंगवता येत. हीच गोष्ट काव्य निर्मितीचे बाबतीत असते. कवी जेव्हा आपल्या सर्व कथा- व्यथा बाजूला ठेवतो, तेव्हाच रसदार, सत्य, काव्य निर्माण होतं. असा हा परकाया प्रवेशाचा अर्थ मी लावला. तो सोपा नसतो. कवी, लेखकांना तो साधतो. दुसऱ्याच्या अंतरंगात त्यासाठी प्रवेश करावा लागतो. मग पक्षी, वारा, झाडे यांच्या मनातले कळते.

एखाद्या व्यक्तीच्या आत्म्याचा दुसऱ्याच्या शरीराच्या प्रवेश ही सिध्दी श्री शंकराचार्य याना साध्य होती. म्हणूनच मंडण मिश्र यांच्या पत्नीने शंकराचार्यांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी परकाया प्रवेश केला होता. अशा आणखीही गोष्टी सांगतात.

आपण एवढे समजू शकतो की वर्णन करावयाच्या वस्तूचे, व्यक्तीचे गुणदोष, सुख, दुःख व्यक्त करण्यासाठी त्याच्याशी एकरूप व्हावे लागते. स्वतःला काही काळ विसरावे लागते. हाच परकायाप्रवेश. लेखकांच्या कवींच्या मध्ये सहजच हा गुण असतो. म्हणून त्यांचे लिखाण, हावभाव हृदयाला भिडतात, मनाला भावतात.

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अफेेअर आणि करंट अफेअर…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “अफेेअर आणि करंट अफेअर…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

काही वेळा काही शब्द फार जपून वापरावे लागतात. आपल्या मनातला अर्थ आणि समोरच्याने त्याचा घेतलेला अर्थ यात गफलत झाली की संपलच. शहाणा, वेडा हे असे काही शब्द आहेत की ते कोणत्या परिस्थितीत वापरले जातात त्यावर त्याचा अर्थ लक्षात येतोच. यात कधी चांगला अर्थ असतो, तर कधी तो टोमणा असतो. तसाच अर्थ करंट अफेअर या एकत्र केलेल्या शब्दात जाणवला.

आपण नक्की कोणत्या गोष्टीचा विचार करतो त्यावर अर्थ अवलंबून असतो. पण दोन वेगळ्या व्यक्ती वेगळा विचार करत असतील तर वापरल्या जाणाऱ्या शब्दाच्या अर्थात गोंधळ होतो. असच काहीसं मी आणि माझा मित्र यात झालं.

अफेअर आणि करंट अफेअर. असलेेली लफडी आणि सध्या चालू असलेल्या घडामोडी यात गोंधळ झाला. अफेअर खाजगी आयुष्याच्या संबंधी असतं, तर करंट अफेअर याचा संबंध देशात, जगात घडणाऱ्या, सुरु असलेल्या घडामोडी याच्याशी असतो. जे उघड असतं.

आम्ही भेटलो तेव्हा मी सध्या सुरु असलेल्या युध्दाच्या बातम्या पाहिल्या होत्या. तर त्याच त्याच बातम्या पाहून कंटाळा आल्याने तो चंदेरी दुनियाचा कोणता तरी कार्यक्रम. त्यात त्यांनी घातलेले कपडे आणि इतर बरंच काही जे पहायचं असतं, पण त्यावर (आपण) सहसा बोलायचं नसतं (कारण संस्कृती) अस पाहून आला होता.

माझ्या मनात युध्दाचे, तर त्याच्या मनात पाहिलेल्या कार्यक्रमाचे विचार. बाॅॅम्ब कसे पडले याचा विचार मी करत होतो, बातम्यांंमधे दाखवलेल्या त्या धुराळ्यातून मी बाहेर पडलो नव्हतो. तर पाहिलेल्या त्या कार्यक्रमामुळे वेगळ्याच बाॅम्ब वर्षावातून आणि मनात तयार झालेल्या धुराळ्यातून बाहेर पडायच्या मनस्थितीत तो नव्हता. मी अग्निबाणाच्या विचारात, तर तो नयन बाण, आणि मदन बाणांच्या. आणि याच परस्पर विरोधी विचारात या शब्दांनी गोंधळ घातला.

करंट अफेयर काय? अस मी त्याला सहज विचारलं. मग जे विषय निघतील त्यावर तरी गप्पा होतील अस वाटलं.

पण त्यावर तो जे काही बोलला त्यावर मलाच करंट बसला.

कोणाचं करंट अफेयर, काय करायचय आपल्याला, यात खरं खोटं आपल्याला कुठे नक्की माहिती असते. पुुर्वी फक्त सिनेमा, किंवा नाटक यातच हा शब्द ऐकायला मिळत होता. आता सगळ्याच क्षेत्रात अफेअर सुरु असल्याचं बोललं जात. आणि ज्याला आपण करंट म्हणतो ते करंट नसतच. जुनं झाल्यावर आपल्यापर्यंत येतं. आणि त्यावर चर्चा करेपर्यंत एक वेगळं, नवीन (करंट) अफेअर कानावर येतं.

काय त्यांचे कपडे, ते चालणं, तो डान्स. हो तो डान्स असच म्हणाला. नाच म्हणाला असता तर त्या डान्सला कदाचित आदर दिल्यासारख वाटल असत.

आता आम्ही दोघ अफेअर आणि करंट अफेअर यावर गप्पा मारत बसलोय. माझ्या मनातल्या बाणांनी बरंच काही उध्वस्त झालं होतं. तर त्याच्या मनातल्या बाणांनी काही घायाळ झाले असतील. पण बोलतांना आम्ही आमचा बाणा सोडला नाही. माझ्या मनात युध्दामुळे निर्माण होणारी सद्यस्थिती, आणि कलह. तर त्याच्या मनात सद्यस्थितीमुळे निर्माण होणारी काही गृहयुध्द व कलह. युध्दातल्या अग्निबाणांनी काही उंच इमारती जमीन दोस्त झाल्या असतील अस माझं म्हंणण. तर कार्यक्रमातल्या काही गोष्टींमुळे संंस्कृृती जमीन दोस्त व्हायला वेळ लागणार नाही अस त्याच.

युध्दामुळे काही गोष्टींवर नव्याने प्रकाश पडत होता. जे करंट अफेअर मधे होतं. तर त्या झगझगीत प्रकाशा मागच काही प्रमाणात लपवलेलं सत्य त्याच्या (करंट) अफेअर मधून तो सांगायचा प्रयत्न करत होता. माझ्या बोलण्यात युध्दातले स्फोट होते, तर त्याच्या बोलण्यात घटस्फोट. मी आर्थिक हानी बद्दल सांगत होतो. आणि तो सांस्कृतिक हानी बद्दल. अस अफेअर आणि करंट अफेअर यावर गप्पा सुरु होत्या.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अधिक मास : महात्म्य!… २ ☆ श्री नागेश शेवाळकर ☆

श्री नागेश शेवाळकर

? विविधा ?

☆ अधिक मास : महात्म्य!… २ ☆ श्री नागेश शेवाळकर ☆

चित्रबाहू राजाची कहाणी!

महालक्ष्मी विष्णुला म्हणाली, “नाथ, आपण पुरुषोत्तम मासामध्ये दीप प्रज्वलनाची खूप छान माहिती सांगत आहात. आपली वाणी रसाळ आहे त्यामुळे ऐकावेसे वाटते… “

“देवी, तुझी ज्ञानलालसा पाहून मी तुला कथा सांगतो…

सौभाग्य नावाचे एक नगर होते. त्या नगरीचा चित्रबाहू नावाचा राजा होता. तो खूप शूर होता. अत्यंत धार्मिक वृत्तीचा होता. तो कृष्णाची भक्ती करत असे. दानधर्म करणे ही त्याची आवड होती. एकदा अगस्ती ऋषी त्याच्याकडे आले. चित्रबाहूला खूप आनंद झाला. राजाने ऋषी अगस्ती यांचे स्वागत केले. त्यांची पूजा करताना स्तुतीगान केले. राजा म्हणाला, “ऋषीवर, ‌आपण आलात, मी धन्य झालो. मी माझे राज्य आपल्या चरणी अर्पण करतो. “

“राजा, तुझे राज्य मला नको. तुला भेटून मलाही समाधान वाटले… ” ऋषी बोलत असताना राजाची राणी चंद्रकला तिथे आली. तिने ऋषीला नमस्कार केला. चित्रबाहू राजा म्हणाला,

“ऋषीवर, मला कधीकधी असा प्रश्न पडतो की, माझे असे कोणते पुण्याचे काम आहे की, मला राजपद मिळाले. मोठे वैभव प्राप्त झाले. चंद्रकलेसारखी गुणवान पत्नी मिळाली. “

अगस्ती ऋषी काही क्षण डोळे लावून बसले. थोड्या वेळाने डोळे उघडून‌ ते म्हणाले, “मी डोळे लावून‌ बसलो होते तेव्हा मला तुझ्या पूर्व जन्माची हकिकत समजली. चमत्कार नावाचे एक नगर होते. त्या शहरात मणिग्रीव नावाचा एक मानव राहत होता. मणिग्रीव म्हणजे तू! या जन्मात जसा तू सदाचारी आहेस तसा त्या जन्मात नव्हता. तू अत्यंत पापी होता. तुझ्या पत्नीचे नाव सुंदरी होती. सुंदरी म्हणजेच चंद्रकला! पापी पतीसोबत सुंदरी पत्नीधर्म पाळत त्याच्यासोबत राहत होती. मणिग्रीवाच्या वाईट कामाला, त्रासाला त्याच्या गावातील लोक कंटाळले होते. गावकऱ्यांनी मणिग्रीवाला गावातून‌ हाकलून दिले. बृहद्बल त्या राज्याचा राजा होता. त्याने त्याची सारी संपत्ती जप्त केली. त्याला पत्नीसह जंगलात हाकलून दिले.

अरण्यात राहत असलेले मणिग्रीव आणि त्याची पत्नी प्राण्यांची शिकार करून‌ भूक भागवत असत. त्या दोघांना त्या अरण्यात राहताना बराच काळ झाला. एकेदिवशी त्या अरण्यातून एक तपस्वी जात होता. त्याचे नाव उग्रदेव होते. चालताना थकल्यामुळे उग्रदेवाला चक्कर आली. तो जमिनीवर कोसळला. मणिग्रीव आणि त्याच्या पत्नीने त्याला पाहिले. मणिग्रीवाने त्याच्यावर उपचार केले. उग्रदेव शुद्धिवर येताच त्याला मणिग्रीवाने आपल्या घरी आणले. त्याला फलाहार दिला. मणिग्रीवाने त्याची विचारपूस केली.

“मी यात्रेकरू आहे. चालताना माझा रस्ता चुकला. या अरण्यात फिरत असताना खूप श्रम झाल्यामुळे तसेच खूप भूक लागल्यामुळे गरगरल्यासारखे झाले. मी खाली कोसळलो. बेशुद्ध झालो. तुम्ही मला जीवदान दिले. तुम्ही दोघे या अरण्यात का राहता? तुम्ही कोणत्या नगरीचे आहात. मला तुमची काही मदत करता आली तर आनंद होईल. ” उग्रदेवाने म्हणाला. मणिग्रीव त्याची सारी कहाणी उग्रदेवाला ऐकवून म्हणाला,

“मी अनेक दुष्कृते केली आहेत. त्याची शिक्षा म्हणून मी या अरण्यात राहत आहे. माझ्या या साऱ्या प्रवासात माझी पत्नी माझ्यासोबत राहिली. तिची काहीही चूक नसताना तिला अशी शिक्षा भोगावी लागत आहे. सध्या आम्ही फार दुःख भोगत आहोत. यातून बाहेर पडण्याचा नि सुख, ‌शांती, सदाचाराने राहता येईल असा मार्ग मला सांगावा. “

“तू माझी सेवा केलीस. माझा जीव वाचवलास यामागे निश्चितच काहीतरी ईश्वरी संकेत आहे. तुम्हा दोघांचा भाग्योदय मला समोर दिसत आहे. काही दिवसांतच पुरुषोत्तम मास सुरू होत आहे. या महिन्याचे महत्त्व अलौकिक आहे. पुरुषोत्तम मासात भगवान श्रीकृष्णाची मनोभावे पूजा करावी. कृष्णमूर्तीसमोर संपूर्ण महिना नंदादीप लावावा. देवाला नैवेद्य दाखवावा. हे व्रत अत्यंत लाभदायक आहे. हे व्रत केल्याने तुमचा हा अरण्यवास संपुष्टात येईल असा मला विश्वास आहे. ” असे सांगून उग्रदेव पुढील यात्रा करण्यासाठी निघून गेला.

लवकरच पुरुषोत्तम मास आला. मणिग्रीव आणि सुंदरीने उग्रदेवाने सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णाची मनोभावे, यथोचित पूजा केली. त्याचे फळ त्याला मिळाले. मणिग्रीवाच्या स्वभावातील उग्रता नष्ट झाली. मनाला अभूतपूर्व शांती मिळाली. दुष्कर्म करण्याची वृत्ती नाहीशी झाली…

वरील सारा वृत्तांत कथन करून अगस्ती ऋषी म्हणाले, “चित्रबाहू, असा आहे तुझा मागचा जन्म. उग्रदेवाने सांगितल्याप्रमाणे तू पुरुषोत्तम मासामध्ये भगवान श्रीकृष्णाची मनोभावे सेवा करताना संपूर्ण महिना दीप लावला. ते पुण्य गाठीशी होते म्हणून या जन्मात हे सारे वैभव‌ तुला प्राप्त झाले. ” असे सांगून अगस्ती ऋषिंनी चित्रबाहू राजाचा निरोप घेतला…

“नाथ, आपण अत्यंत सोप्या भाषेत चित्रबाहू राजाची कहाणी मला ऐकवली. मला खूप समाधान मिळाले… ” लक्ष्मीदेवी अत्यंत प्रसन्नतेने म्हणाली.

००००

फलदायी मौनव्रत!

श्री लक्ष्मी आणि भगवान विष्णू बोलत असताना लक्ष्मी म्हणाली, “भगवान, आपण सांगितलेल्या कथा ऐकून पुरुषोत्तम मासाबद्दल म्हणजेच त्या मासाच्या कथा ऐकण्याची उत्कट इच्छा होत आहे. एखादी गोष्ट सांगाल‌ का?”

“देवी लक्ष्मी, आपली इच्छा जाणून मी मौनव्रताची माहिती सांगतो… “

“मौनव्रत? म्हणजे चक्क बोलायचेच नाही… “

“होय! तेही संपूर्ण पुरुषोत्तम मास मौन‌ पाळायचे… “

“काय? महिनाभर बोलायचे नाही? कसं शक्य आहे? तेही पृथ्वीवरील मानवाला?”

“का शक्य नाही? भक्ती करणे साधी गोष्ट नाही. कठीण तपस्या केली तर त्याचे फळही तसेच मिळते. “

“देवा, मला मौनव्रताची माहिती द्यावी. “

“देवी, व्रताची माहिती नक्की देईन‌ पण आपण मौनव्रत धारण करू नका… ” असे म्हणत श्रीविष्णू हसले. सोबत लक्ष्मीही हसली.

“ऐका, आता. मौनव्रत म्हणजे पुरुषोत्तम मासामध्ये दररोज एक वेळ जेवण करायचे आणि जेवण होईपर्यंत बोलायचे नाही… “

“देवा, ‌आपण पण असे आहात ना!‌ अहो, महिनाभर मौन‌ ही कल्पनाच अंगावर भीतीचे शहारे आणणारी आहे. फक्त जेवताना बोलायचे नाही हे व्रत त्यामानाने सोपे वाटत असले तरीही ते तितके सोपे नाही. भगवान, मला सांगा, हे व्रत कुणी केले आहे का?”

“हे व्रत मुनीवरांनी केले आहे. “

“काय? देवर्षी नारदांनी‌ हे व्रत केले आहे? कधी, का, कशासाठी?”

“सांगतो. पूर्वीच्या जन्मात नारद मुनी दासी पुत्र होते. पुरुषोत्तम मासात हे मौनव्रत धारण केल्याने पुण्य मिळते म्हणून त्या दासी पुत्राने ते व्रत मनोभावे केले. हे व्रत केल्याने त्याला साधुंचा सहवास लाभला. साधुंच्या सोबत कुरुक्षेत्र येथे त्याने अधिक मासाचे औचित्य साधून तीन दिवस मौनव्रत पाळले. त्यामुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्यांनी नारदाला अनेक विद्यांची शिकवण दिली. आपल्या शिष्याला त्यांनी मानसपुत्र मानले. असा आहे मौनव्रताचा महिमा तोही अधिकमासातील!”

“महाविष्णू, मुनीवराची ही माहिती मला नव्हती. आपण ती सांगितली. मी धन्य झाले. “

“लक्ष्मीदेवी, प्रत्यक्ष इंद्रदेवाला या व्रताचा फायदा झाला हे तुला माहीत आहे का?”

“काय सांगता? इंद्रदेवाने मौनव्रत पाळले पण का? अशी कोणती वेळ इंद्रावर आली की, त्यांनी मौनव्रत धारण केले. “

“सांगतो ऐक. पूर्वी अवंतीनगरात एक ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव वेदशर्मा! तो अत्यंत ज्ञानी, योगी होता. वेदशर्मा वृद्ध झाला असताना अधिकमास आला. तेव्हा वेदशर्माने उपवास करण्याचा विचार केला. परंतु तो शरीराने थकला होता. इच्छा प्रबळ होती परंतु शरीर साथ देईल का नाही ही शंका होती. तो विचारात असताना चमत्कार घडला. एका रात्री त्याला स्वप्न पडले. ‌‌स्वप्नात एक दिव्य पुरूष अर्थात देव आले. ते म्हणाले, “वेदशर्मा, तू तुझ्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर उपवासाचे व्रत निश्चितच करू शकशील. तू मौनव्रत अवश्य कर. “

ते स्वप्न म्हणजे ईश्वरी संकेत मानून वेदशर्माने मौनव्रत धारण केले. ईश्वरी शक्ती पाठीशी असल्याने त्याने ते व्रत पूर्णत्वास नेले. त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या श्रीकृष्णाने त्याला दर्शन दिले. त्याला आशीर्वाद देताना वरदानही दिले. त्यामुळे वेदशर्माने परोपकाराची अनेक कामे केली. त्याचे भाग्य फळाला आले. त्याला श्रीविष्णुने विमान पाठवून वैकुंठात नेले. वैकुंठात जात असताना प्रत्यक्ष इंद्राने त्याला थांबवले. इंद्र म्हणाला, “वेदशर्मा, तू पुण्यवान आहेस. सध्या माझे वृत्रासुरासोबत युद्ध सुरू आहे. तू पुरुषोत्तम मासामध्ये मौनव्रत पाळले होते. तुला त्याचे फळ मिळाले. माझी अशी इच्छा आहे की, तुला जे फळ प्राप्त झाले आहे, त्यापैकी फक्त एका दिवसाचे पुण्य मला द्यावे. त्यामुळे मी वृत्रासुरासोबतचे युद्ध खातरीने जिंकू शकेल. ” इंद्राची इच्छा परोपकारी वृत्ती असलेल्या वेदशर्माने तत्काळ पूर्ण केली. तो वैकुंठात निघून गेला. इंद्रदेवाने वेदशर्माकडून प्राप्त झालेल्या फळामुळे वृत्रासुराचा युद्धात पराभव केला…

“देवी लक्ष्मी, असा आहे, अधिक मासातील मौनव्रताचा फायदा किंवा फळ!”

“भगवान, खरे आहे. मौनव्रत हे तसे कठीण वाटत असले तरीही त्याचे फळ मात्र अलौकिक आहे. ” लक्ष्मी म्हणाली.

००००

अधिक मासातील पर्वकाळ!

भगवान विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या संवादातून भक्तांना‌ अधिक मासासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती मिळत होती. लक्ष्मीने विचारले, “माधवा, मला एका गोष्टीची उत्सुकता लागली आहे. ती म्हणजे, अधिक मासात कोणते पर्वकाळ येतात? त्याची वैशिष्ट्ये नि त्यापासून भक्तांना होणारे लाभ याबाबत माहिती सांगावी. “

“अवश्य!‌ देवी, मला माहिती आहे, हे प्रश्न तू स्वतःसाठी नव्हेतर भक्तांच्या ज्ञानासाठी, उत्कर्षासाठी विचारत आहेस. पुरुषोत्तम मासात व्यतिपात, पोर्णिमा, वैधृती, द्वादशी तसेच अमावस्या हे पाच पर्व येतात. व्यतिपात या पर्व काळात उपासनेमुळे यमधर्म समाधानी होतो. व्यतिपाताच्या दिवशी सुवर्ण दानाचे महत्त्व आहे, तप करून आणि तेरा फळे दान केल्यास पुण्यफळ मिळते. जे भक्त पोर्णिमेच्या दिवशी धार्मिक विधी करतात तेव्हा प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळतो. ज्या दिवशी वैधृती असते त्यादिवशी स्नान, होमहवन आणि दान करतो त्या भक्ताला इच्छित ते सारे मिळते. पुरुषोत्तम मासातील द्वादशीचा योग साधून खुद्द पुरुषोत्तम प्रसन्न होतो. अमावस्या हे अधिक मासातील शेवटचे पर्व! यादिवशी आपल्या पितरांचे स्मरण करून यथाविधी, यथाशक्ती दानधर्म, अन्नदान केल्यास आपले पूर्वज आनंदी होतात. “

“हरीहर, पाच पर्वांची माहिती नि चार पर्वांचे महत्त्व खूप छान, सोप्या भाषेत सांगितले. त्रिविक्रमा, आता द्वादशी ह्या पर्वाचेही महत्त्व सांगावे. “

“रमादेवी, आपण किती एकरुप होऊन ऐकत आहात हे या प्रश्नावरून लक्षात येते. आपली जिज्ञासू वृत्ती खरेच वाखाणण्याजोगी आहे. ऐक. अधिक मासातील एकादशीला उपवास करावा. द्वादशीचे महत्त्व अपरंपार आहे. कुण्या भक्ताला अनेक तीर्थयात्रांचे पुण्य घरबसल्या मिळवायचे असेल तर त्याने आवळीच्या झाडाजवळ जावे. त्या झाडाच्या बुंध्याशी (अर्थात जे झाड नैसर्गिकरित्या नष्ट झालेले असते. परंतु जमिनीवर खोडाचा भाग शिल्लक राहतो) केलेले पिंडदान थेट आपल्या पूर्वजांना मिळते. तसेच ब्राह्मणाला अन्नदान करावे. शक्य असेल त्याने पुढील दाने अवश्य करावीत ती म्हणजे भूमीदान, वस्रदान, गोमाता दान करावे. तुप मिसळून‌ केलेले अन्नदान करावे. हे दान खूप फलदायी आहे. विष्णुप्रिये,

तुझी ज्ञानलालसा पाहून तुला दानाची अधिक माहिती देतो. व्यतिपात, द्वादशी आणि पोर्णिमा या तीनही दिवशी किंवा कोणत्याही एकादिवशी तुपामध्ये तेहतीस अनारसे तळावेत. त्यावर स्वच्छ कापड झाकावे. त्याची पूजा करावी. भोजन दक्षिणेसह ते ब्राम्हणास दान करावे. म्हणजे भरपूर पुण्य मिळते. असा आहे अधिक मासातील पर्वकाळाचा महिमा!”

” हे पद्मनाभा, खरेच अधिक मासातील पर्वकाळाची माहिती आपण खूप छान सांगितली आहे. श्रीहरी!”

 ००००

पुरुषोत्तम मास: स्नान महात्म्य!

पुरुषोत्तम मासाच्या कथा तन्मयतेने ऐकणाऱ्या लक्ष्मीदेवीने पतीला विचारले, “हृषिकेशा, आपण अधिक मासाची भरपूर माहिती दिली आहे. आता फक्त एकच सांगावे, या मासात स्नानाचे काही महत्त्व आहे का?”

“देवी, ‌अगदी योग्य विचारलेस, त्यासंदर्भातील तुला एक कथा सांगतो. त्या कथेतून तुला स्नानाचे महत्त्व समजून येईल. ऐक. शिवपुरी नावाचे एक नगर होते. हे नगर शंकराला अतिशय प्रिय होते. गोकर्ण पर्वताच्या सान्निध्यात हे नगर वसलेले होते. नगरातील लोक अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. पूजा, भजन, वेदमंत्र, प्रवचन, कीर्तन यात रमणारे नागरिक सतत धर्मकार्ये करत. अशा या पावन भूमीत विप्रदास नावाचा मनुष्य राहत होता. सोबत त्याची पत्नी होती. दोघेही सत्शील, धर्मपरायण होते. धार्मिक विधी ते आवडीने करत. गोकर्णाच्या पायथ्याशी गोकर्णी नावाची नदी होती. तिथेच एक शिवलिंग होते. सारणेश्वर या नावाने ते शिवलिंग प्रसिद्ध होते. गोकर्णी नदीत स्नानाचे अपरंपार महत्त्व होते. अधिक मासाचे औचित्य साधून विप्रदासाने त्याच्या पत्नीसह संपूर्ण महिना नदीत स्नान केले. महिन्याच्या शेवटी केलेल्या कार्याचे उद्यापन केले. ब्राह्मणांना भोजन-दक्षिणा देऊन दोघेही मोठ्या आनंदाने घरी निघाले. थोडे चालून जाताच शेकडो प्रेतात्मे अचानक त्यांच्यासमोर आले. दिसताक्षणी कुणीही घाबरेल असेच त्यांचे राहणीमान होते. परंतु विप्रदास घाबरला नाही. तो निर्भीडपणे त्या प्रेतात्म्यांच्या समोर उभा राहिला. त्या प्रेतात्म्यांनीही विप्रदासाकडे पाहिले. त्याचा परिणाम असा झाला की, त्या प्रेतात्म्यांची क्रुरशक्ती नष्ट झाली. अनेक प्रेतात्मे शांत झाले परंतु बरेचसे प्रेतात्मे क्रुर दिसत होते. त्यांच्याकडे पाहताच विप्रदासाची पत्नी खूप घाबरली. ती दूर जाऊन लपली. विप्रदासाने प्रेतात्म्यांना विचारले,

“आपल्या सर्वांची अशी दुर्गती का झाली?” त्यावर अनेकांनी त्यांनी पूर्वजन्मात केलेल्या पापांची माहिती दिली. त्यांची कहाणी ऐकून विप्रदास त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटली. त्याने अधिक मासात गोकर्णी नदीत केलेल्या स्नानापैकी सात दिवसांच्या स्नानाचे पुण्य त्या प्रेतात्म्यांना दिले. तत्काळ चमत्कार घडला. त्या सर्व प्रेतात्म्यांना पूर्वीचे शरीर प्राप्त झाले. ते स्वर्गात गमन करते झाले. ” असे सांगून भगवान विष्णू थांबले. लक्ष्मीदेवी म्हणाली,

“हे संकर्षणा, पुरुषोत्तमा, आपण पुरुषोत्तम मासाची सर्वंकष महत्त्व खूप उत्कृष्टपणे सांगितले आहे. आपण सांगितलेला महिमा ऐकून भक्तगण मोठ्या भक्तिभावाने अधिक मासाचे व्रत, पूजा करतील हे नक्की!

 जय श्रीकृष्ण! जय भगवान विष्णू!!

अधिकमास महात्म्य समाप्त!

००००

© श्री नागेश शेवाळकर

पुणे

मोबा. ९४२३१३९०७१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अधिक मास : महात्म्य!… १ ☆ श्री नागेश शेवाळकर ☆

श्री नागेश शेवाळकर

? विविधा ?

☆ अधिक मास : महात्म्य!… १ ☆ श्री नागेश शेवाळकर ☆

‌आपल्या संस्कृतीची काही खास पवित्र अशी वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी एक म्हणजे दिवा, दीपक! घरातील देवघरात, मंदिरातील गाभाऱ्यात तेवणारा दिवा जसा मंगलमय, पवित्र असतो तसाच तो चैतन्यदायी असतो. प्रज्वलित दिवा एक मंगलमय वातावरण निर्माण करतो. दिवा जेव्हा अंधाराचे निर्मूलन करतो तेव्हाच तो तेजोमय प्रकाशाचे स्वागत करतो. दिवा लावल्याशिवाय जशी देवपूजा संपन्न होत नाही तसेच सायंकाळी लावलेला दिवा एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करतो.

 दिवा दररोज सकाळी, सायंकाळी देवापुढे लावला जातो. षडरात्र, नवरात्र, दीपावली, नागदिवे/ देव दीपावली, पुरुषोत्तम मास आणि इतर अनेक सणांच्या निमित्ताने अहोरात्र नंदादीप तेवत ठेवण्याची आपली परंपरा आहे. अनेक घरांमध्ये सायंकाळी दिवा लावताना घरातील बालकांना देवापुढे बसवून प्रार्थना म्हटली जाते. या प्रार्थनेतून लहानपणापासून दिव्याचे महत्त्व बालकाच्या मनावर बिंबवले जाते. त्यातील काही ओळी…

‘दिव्या दिव्या दीपत्कार,

कानी कुंडल मोतीहार |

दिव्याला पाहून नमस्कार |

दिवा लावला देवापाशी,

उजेड पडला तुळशीपाशी|’

 ज्याप्रमाणे अनेक सणांमध्ये तबकात दीप घेऊन ओवाळण्याची परंपरा आहे, त्याचप्रमाणे अधिकमासात दिव्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या पुरुषोत्तम मासामध्ये देवाजवळ नंदादीप लावण्याची परंपरा अनेक कुटुंबांमध्ये आहे. त्या संदर्भातील काही आख्यायिका ‘अधिकमास महात्म्य’ या अंतर्गत अनेक ठिकाणी वाचायला मिळतात…

अधिक मासाची कहानी

 एकदा भगवान‌ नारायण जनहितार्थ तपश्चर्येत ध्यानमग्न असताना तिथे महर्षी नारद यांचे आगमन झाले. “नारायण… नारायण… ” हा स्वर नारायणांच्या कानी पडला. नारद मुनींचे आगमन झाले हे समजताच भगवान विष्णूंनी डोळे उघडले. त्यांनी विचारले,

“नारदमुनी, यावे. बसा. ‌आपल्या येण्याचे प्रयोजन‌ सांगावे. सारे कुशल आहे ना?”

“होय, ‌नारायणा! सारे काही कुशल आहे. एक प्रश्न विचारायचा आहे.”

“नारदमुनी, तुम्हाला कधीपासून परवानगी घ्यावी लागते? काय मनात आहे ते नि:संकोच विचारावे. “

“नारायण… नारायण…! देवा, दरवर्षी बारा महिने असतात परंतु प्रत्येक तीन वर्षानंतर तेरावा महिना‌ येतो. त्यामागे काही विशिष्ट संकेत आहेत का?”

“मुनी श्रेष्ठ, आपण खूप छान प्रश्न विचारला आहे. जगात सत्कर्म वाढले की कल्याण होते. उलट जगामध्ये वाईट गोष्टींचे प्रमाण वाढले की मग अधोगती सुरू होते. सद्य युगात दुष्कर्मांची संख्या वाढल्यामुळे पाप वाढत चालले आहे. तुम्ही म्हणता त्या बारा महिन्यांनी तक्रार केली होती, की सध्या सर्वत्र वाढलेले पाप आम्ही आमच्या पोटात घेत असतो परंतु ते आम्हाला सहन होत नाही. आम्ही आमच्या पोटात जमा असलेल्या पापाचा तिसरा हिस्सा बाहेर काढून टाकत आहोत म्हणजे तितकाच पापाचा भार कमी होईल. त्याप्रमाणे त्या प्रत्येक महिन्याने तिसरा हिस्सा काढून‌ टाकला. काढून‌ टाकलेल्या पापाच्या हिश्श्यापासून नवीन मास उत्पन्न झाला अर्थात तेरावा महिना जन्माला आला. तो पापमय असल्याने त्याला मलमास किंवा‌ मलिनमास असे नाव मिळाले.

मलमासाला त्याच्या सोबतचे बारा महिने चिडवत होते, त्याची टिंगलटवाळी करत होते कारण कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मलमास अयोग्य समजला जात असे. सूर्याची गती मोजताना मलमास गृहित धरला जात नसे. त्यामुळे मलमास दुःखी होत असे. मलमासाने मानवरूप धारण केले. काय करावे म्हणजे हे बारा महिने आपला दुस्वास करणार नाहीत, मलाही इतर महिन्यांप्रमाणे योग्य स्थान, प्रतिष्ठा मिळेल. अशा विचारात असताना त्याला वैकुंठपती श्रीविष्णुचे स्मरण झाले. मलमास वैकुंठात गेला. आसवं गाळत तो श्रीविष्णुला शरण गेला. भगवान विष्णुंची त्याने आराधना केली. विष्णू म्हणाले,

“वैकुंठात केवळ सुख आणि सुख असताना तू दुःखी का आहेस? काय झाले?” तेव्हा अधिकमासाने स्वतःचे दुःख नम्रतेने श्री मधुसूदनाला सांगितले. ते ऐकून माधव म्हणाले,

“ठीक आहे. आपण आता गोलोकात जाऊया. तिथे मुरलीधर कान्हा आहे. सकल भक्तांचे दुःख तो तत्काळ हरण करतो. चल. “

भगवान विष्णुंच्या पाठोपाठ मलमास गोलोकात गेला. तिथे श्रीकृष्णांचे दर्शन घेतले. मलमासाचे आसवे थांबत नव्हती. ते पाहून श्रीकृष्णाने भगवान विष्णुला विचारले,

“महाविष्णू, हा मानव कोण आहे? हा सतत अश्रू का ढाळत आहे? याला कोणते दुःख आहे?” दामोदराचे प्रश्न ऐकून विष्णुंनी सारी परिस्थिती कृष्णाला कथन केली म्हणाले,

“हा पीडित मास माझ्याकडे आला. मी त्याचे सारे दुःख ऐकले. त्याचे दुःख केवळ तुम्हीच दूर करू शकाल म्हणून मी त्याला गोलोकात घेऊन आलो आहे. या दुःखिताचा तुम्ही उद्धार करावा, त्याच्या दुःखाचे हरण करावे. “

“महाविष्णू, हे चांगले केले. अगोदर तुम्हाला आणि नंतर मला शरण आलेल्या या मलमासाला मी माझे ‘पुरुषोत्तम’ हे नाव देतो. हा सर्व महिन्यांत श्रेष्ठ असेल. इतकेच नाहीतर माझे ऐश्वर्य ह्यास देतो. जसा मी सर्वत्र पवित्र, पूज्य आहे तसाच हाही पवित्र मानला जाईल. पुरुषोत्तम मासात भक्तगण जी धार्मिक कार्ये करतील त्याचे पुण्य फल त्यांना मिळेल. ” श्रीकृष्णाने मलमासाला जणू पुनर्जिवित केले, त्याला वरदान दिले. त्यामुळे आनंदित झालेला पुरुषोत्तम मास भगवान श्रीविष्णूंसह वैकुंठात परतला. त्याने तिथेच वास्तव्य केले…

००००

अधिकमास: दीप प्रज्वलन!

एकदा विष्णुपत्नी लक्ष्मीने पतीला विचारले, “श्रीहरी, मधुसूदना, मला हे जाणून घेण्याची इच्छा आहे की, अधिकमासात देवाजवळ दीप लावण्याचे किंवा लावलेल्या दिव्याचे रक्षण केल्याने कोणते फळ मिळते?”

विष्णू म्हणाले, “ऐक. अधिकमासात दीप लावण्याचा विधी आणि महत्त्व सांगतो…

अधिकमासाच्या प्रथम दिवशी सकाळी स्नानादि कार्ये आटोपून स्वच्छ केलेल्या, सजविलेल्या भूमीवर घट मांडावा. त्याच्यासमोर एक दीप ठेवावा, ज्यात सप्ततंतूंची वात घालून तूप किंवा तेल घालून यथाविधी पूजन करून दीप प्रज्वलित करावा. मनोभावे प्रार्थना करावी…

“हे परमेश्वरा, ही माझी दीपसेवा गोड मानून घ्यावी. ह्या दिव्यामुळे अंध:कार दूर होऊन कांतीही उजळून निघावी. ” याप्रमाणे पूजन केल्यामुळे गोदान, भूदानाचे पुण्य लाभते. दीप दान करणारास ज्याप्रमाणे सुकांती लाभते, त्याचप्रमाणे धनसंपदा लाभते, अखंड सौभाग्य मिळते. यासह विद्या प्राप्त होते, आयुरारोग्यासह समृद्धी मिळते, पुत्रपौत्र संतती लाभते, जो ब्राह्मण स्वतः दीप दान करतो त्याला ब्रम्हज्ञान प्राप्त होते, कुमारिकेस इच्छित पती मिळतो, सर्व दुःखांचे हरण होते, भीती दूर पळते, इतकेच नाही तर अधिकमासात जे कुणी दीप प्रज्वलनाच्या गोष्टी, महत्त्व सांगतात तेही पापमुक्त होतात… “

“श्रीहरी, अधिक मासातील दिव्याची अतिशय चांगली अशी माहिती सांगितली. ” लक्ष्मी समाधानाने म्हणाली.

००००

वेणीमाधव वात!

श्री लक्ष्मीने भगवान विष्णू यांना विचारले, “देवा, अधिक मासात ‘वेणीमाधव वातीचा’ दिवा लावतात. त्याबद्दल सांगावे. “

“महालक्ष्मी, हिंदू संस्कृतीमध्ये देवापुढे लावल्या जाणाऱ्या वातीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या घरात सकाळ, संध्याकाळ पूजेच्या वेळी दिवा लावला जातो ते घर पवित्र होते. सहा दिवस, दहा दिवस नंदादीप लावण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये आहे. त्यामुळे अनेक संकटांचे निवारण होते, एकप्रकारचे चैतन्य निर्माण होते.

 दर तीन वर्षांनी येणाऱ्या ‘अधिक’ मासात देवापुढे वेणीमाधव ही वात प्रज्वलित करण्यात येते. वेणीमाधव वातीचा आकार इतर वातींच्या मानाने मोठा असतो. वेणीमाधव‌ वात लावण्यामागे अध्यात्मिक कारण आहे. वेणीमाधव वात ही नेहमी दिवा लावताना जी वात वापरल्या जाते तशी वात नसते. दररोज जी तुपाची फुलवात वापरण्यात येते त्या तेहतीस फुलवाती एकात एक माळून वेणीमाधव वात तयार होते. ती गुंफण एखाद्या वेणीसारखी दिसते म्हणून त्या वेणीस वेणीमाधव वात असे म्हणतात. हिंदू धर्मामध्ये तसेच अधिक मासामध्ये तेहतीस अंकाला धार्मिक महत्त्व आहे. तेहतीस हा अंक तेहतीस कोटी देवांचे अर्थात तेहतीस प्रकारच्या देवशक्तींचे प्रतिक मानल्या जातो. त्यामुळे तेहतीस फुलवातींची वात प्रज्वलित होताच मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची निर्मिती होते. या ऊर्जेमुळे घरातील अपवित्रता, अघोरी शक्तींचे निर्मूलन होते, सकारात्मक वातावरण निर्माण होते अशी भक्तांची मान्यता आहे. भक्त असेही मानतात की, ही वात लावल्याने निर्माण झालेली पवित्रता पुढील तीन वर्षे म्हणजे पुढील अधिक मास येईपर्यंत टिकून राहते.

ही वात वेणीमाधव म्हणून ओळखली जाते त्यामागे असलेले कारण म्हणजे, सृष्टीचे निर्माते आणि पालनकर्ते ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तीच्या शक्तीचे एकत्रीकरण म्हणजे वेणीमाधव वात होय!

वेणीमाधव वातीचे दुसरे महत्त्व असे की, यातील माधव म्हणजे श्री महाविष्णू! प्रयागराज येथे माधव अर्थात भगवान विष्णू, श्री महालक्ष्मीचे अर्थात आपले वास्तव्य आहे. श्री विष्णू यांना प्रयागराजचे व्दारपाल म्हणून ओळखले जाते, त्यांची पूजा केली जाते. तसेच प्रयागराज येथे गंगा, यमुना, सरस्वती या तीन नद्यांचा संगम आहे. त्यामुळे असे मानले जाते की, या सर्व गोष्टींमुळे वेणीमाधव ही वात आपल्या देवघरात लावल्याने मोठे पुण्य मिळते.

अधिकमासात किंवा धोंड्याच्या महिन्यात एकदा तरी वेणीमाधव वात देवघरात लावल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते, सुख-समाधान-आनंद मिळतो. ज्याप्रकारे त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने पुण्य मिळते तसेच पुण्य वेणीमाधव ज्योत देवघरात लावल्यामुळे प्राप्त होते.

“विष्णू देवा, खूप छान माहिती सांगितली आहे. आपण पाहतोय, वेणीमाधव वातीशिवाय भक्त इतरही वाती लावतात. “

“देवी, खरं आहे. तुमची निरीक्षण शक्ती चांगली आहे. मंजूळ वातही काही भक्त लावतात. हा ज्याच्या त्याच्या भक्तीचा प्रश्न आहे. वातीला वेगवेगळी नावे असली तरीही भक्तांचा भाव सारखाच असतो. “

“बरोबर आहे, देवा! खूप छान माहिती सांगितली. “

००००

मनीमाऊला मिळाली मुक्ती!

श्रीविष्णू लक्ष्मीला म्हणाले, “एक कथा सांगतो, सुशर्मा नावाचा एक ब्राह्मण होता. तो भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत असे. एकदा पुरुषोत्तम मासाचा योग साधून त्याने षोडशोपचारे पुजा करून दीप प्रज्वलित केला. दररोज सकाळ- संध्याकाळ दिव्याची पूजा, भजन करणे हा त्याचा नेम होता. त्याच्या घरी असलेल्या उंदरांना पकडण्यासाठी एक मांजर दररोज येत असे. एके रात्री ती मांजर नेहमीप्रमाणे त्याच्या घरात आली असता ब्राह्मण नेहमीप्रमाणे नाम घेत दिव्यासमोर बसलेला होता. दिव्यावर काजळी चढली असल्याने दिव्याचा प्रकाश मंद झाला होता. तितक्यात तिथे उंदीर आल्याचे पाहून टपून बसलेली मांजर उंदराकडे झेप घेत असताना तिचा पाय दिव्याला लागला. त्यामुळे दिवा हलला. परंतु त्यामुळे ज्योतीवर आलेली काजळी गळून पडली. दिव्याचे तेज फाकले. सकाळ होताक्षणी मांजर गतप्राण झालेली आढळली. देवी, नकळतपणे दिवा प्रज्वलित केल्यामुळे मांजराला मुक्ती मिळून ते मांजर वैकुंठाला पोहोचले. दुसरीकडे मनोभावे दीपपूजन करणारा सुशर्मा नावाचा ब्राह्मण समृद्ध झाला, पुत्रपौत्र प्राप्त झाले. उत्तम आरोग्य, सुख मिळून त्यालाही मोक्ष प्राप्त झाला. “

“हे देवा, आपण खूप छान माहिती सांगितली आहे. त्यामुळे दिव्यासंदर्भात अजून काही ऐकण्याची लालसा उत्पन्न झाली आहे… “

००००

विमला नि सुशीला!

“लक्ष्मीदेवी, तुझी इच्छा जाणून एक कथा ऐकवतो…

अनेक वर्षांपूर्वी मथुरा नगरात शाकली नावाचा एक ब्राह्मण राहत होता. शुद्ध आचरण अशी त्याची ख्याती होती. त्याला विमला आणि सुशीला या नावाच्या दोन बायका होत्या. पुरुषोत्तम मासात एके दिवशी सुशीला पाणी आणण्यासाठी नदीवर गेली, तेव्हा तिला तिथे बरेच स्त्री पुरुष स्नान करताना दिसले. सुशीलेने घरी येऊन पतीला नदी स्नानाचे महत्त्व काय आहे ते विचारले. तेव्हा शाकलीने पत्नीला सांगितले, “श्री विष्णूला प्रिय अशा पुरुषोत्तम महिन्याची सुरुवात झाली आहे. या महिन्यात दीप प्रज्वलित केला असता मोठे पुण्य लाभते. ” ते ऐकून सुशीला म्हणाली,

“पतिदेवा, तुम्ही सांगितलेला या मासाचा महिमा ऐकून संपूर्ण महिना मी दीप लावू इच्छिते. “

पत्नीची इच्छा जाणून शाकलीने तिला परवानगी दिली. सुशीलेने मोठ्या आनंदाने, भक्तिभावाने पूजा करून दीप प्रज्वलित के

ला. नंतर पतीला नमस्कार करून त्यांना जेवायला देऊन स्वतः जेवण केले. आपल्या सवतीने केलेले कार्य विमलेस आवडले नाही. तिच्या मनात सवतीमत्सर जागा झाला. ती विचार करू लागली, काय करावे म्हणजे हिच्या पुजेत व्यत्यय येऊन तिची मनोकामना पूर्ण होणार नाही. विमलेच्या मनात एक कुविचार जागृत झाला. घरात कुणीही नाही हे पाहून विमलाने तेवत असलेला दीप शांत केला, त्यातले तेलही काढून टाकले. नंतर उतावीळपणे काय होते हे पाहण्यासाठी बसून राहिली. बाहेरून आलेल्या सुशीलेला शांत झालेला दिवा दिसताच तिला अतोनात दुःख झाले. तिने श्रीविष्णुला प्रार्थना केली. रोज तसाच प्रकार घडत होता.

विमला जाता येता कधी पदराने, कधी फुंकर घालून, कधी सारे तेल काढून दीप शांत करुन सुशीलाच्या भक्तीमध्ये विघ्ने निर्माण करीत होती. तो प्रकार सुशीलाच्या लक्षात आला परंतु ती शांत राहिली. कुणासही काहीही बोलली नाही. तिने पूर्ण पुरुषोत्तम मासात दीप प्रज्वलन करून व्रताची सांगता केली. त्याचे पुण्य तिला लाभले. दुसरीकडे विघ्नकर्ती विमलालाही तिच्या पापाचे फळ मिळाले. तिची तीन मुले मृत झाली. तिला स्वतःला दोन्ही डोळ्यांनी अंधत्व आले. काही काळानंतर तिलाही मरण प्राप्त झाले… “

“देवी, लक्ष्मी असे आहे, दीप लावण्याचे महत्त्व!”

“स्वामी, केवळ पुरुषोत्तम मासातच नाही तर दररोज मनोभावे दिवा लावणाऱ्या कुटुंबांवर आपला असाच आशीर्वाद असू द्या. “

“तथास्तु!” श्रीविष्णू म्हणाले.

क्रमशः…

© श्री नागेश शेवाळकर

पुणे

मोबा. ९४२३१३९०७१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २३ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २३ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

समाज स्थितीचे वर्णन

गाथेतील अभंग वाचत असता संत तुकारामांच्या काळी समाजस्थिती कशा प्रकारची होती याचाही आपल्याला काही अभंगांतून अंदाज येतो. आजच्या लेखात याच संदर्भातील काही अभंगांचा अभ्यास करावा असे मला वाटते.

समाजात फार अंदाधुंदी माजली होती. न्याय राहिला नव्हता. श्रेष्ठ मानला, जाणारा ब्राह्मण वर्ग त्यांचा नीती धर्म विसरला होता. अशा परिस्थितीचे वर्णन करणारा हा गाथेतील अभंग पहा—

हाती होन दावीती वेणा /

करिती लेकीची धारणा//

ऐसे धर्म जाले कली/

पुण्य रंक पाप बळी//

सोडिले आचार/

द्विजृाचहाड जाले चोर//

टिळे लपविती पातडी /

लेती विजार कातडी//

बैसोनिया तक्ता/

अन्योविण पीडिती लोका//

मुदबरव लिहिणे/

तेल तूप साबण केणे //

नीच्याचे चाकर/

चुकलिया खाती मार//

राजा प्रजा पिडी/

क्षेत्री दुश्चितासी तोडी//

वैश्य शुद्रादिक/

हे तो सहज नीच लोक//

* वघे बाह्यरंग/*

आत हिरवे वरी सोंग//

तुका म्हणे देवा/

काय निद्रा केली धावा//

समाजाची ही अशी अत्यंत हीनदीन अवस्था पाहून तुकाराम महाराज खेद व्यक्त करत आहेत आणि देवाला निद्रा सोडून धाव घेण्याचे साकडे घालत आहेत.

ते देवाला सांगतात, ” लग्नात लोक त्यांच्या कन्येचे पैसे(होन) घेतात आणि तिला सासरी पाठवतात. याचाच अर्थ चक्क तिचा विक्रय करतात. ज्याच्याकडून जास्त पैसे मिळतील त्याच्या गळ्यात ती सौभाग्यकांक्षिणी वरमाला घालणार. अत्यंत शोचनीय अशी बाब आहे ही. हा कलियुगात माजलेला अधर्म आहे. याने पुण्याचा क्षय होऊन पाप वाढत चालले आहे. ब्राह्मण आपला धर्म, सदाचार सोडून चहाड्याचोऱ्या करू लागले आहेत. कुंकवाचा टिळा लावणे, पंचांग बघणे सोडून देऊन यवनांप्रमाणे वेश धारण करणे त्यांनी सुरू केले आहे. न्यायाधीश न्यायाच्या आसनावर बसून न्याय असणाऱ्यांनाच शिक्षा ठोठवून पीडित करीत आहेत. पाकशाळेत (मुदबख) लागणाऱ्या बारीक सारीक वस्तूंचा जमाखर्च लिहिण्यात वेळ दवडत आहेत. ते नीच माणसांचे चाकर होऊन कामात झालेल्या क्षुल्लक चुकीसाठी मार खात आहेत. ज्या प्रजेचे पालन करायचे ती प्रजा आधीच दुःखी असताना क्षत्रिय राजे तिला लुटतात आणि पीडा देतात. वैश्य व शूद्रादिक लोक तर स्वभावतःच हलक्या मनोवृत्तीने वागत आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगावे? अशा प्रकारे लोकांत बाह्य देखावा, अनाचार व ढोंगीपणा पसरला आहे. अंतरंगात मत्सर आणि वरून सोज्वळतेचे

सोंग या माणसांत भरले आहे. या दुष्टांना दंड देण्यासाठी अहो देवा तुम्ही या असा महाराज धावा करीत आहेत. ”

तुकाराम महाराजांना ब्राह्मणांकडून अशा प्रकारचा त्रास भोगावा लागला आहे. समाजातील त्यावेळच्या चातुर्वर्णी पद्धतीचा अर्थ विशेषतः या ब्राह्मण वर्गाने चुकीचा लावल्यामुळे, स्वतःला विद्वान समजून ते समाजातील दुबळ्या माणसांना अत्यंत हीन लेखत आणि त्यांचे जगणे असह्य करीत. यासाठीच अशा प्रकारचे अभंग रचून समाजात जागृती निर्माण करण्याचा तुकाराम महाराजांचा प्रयत्न असावा. या वर्ण व्यवस्थेसंबंधी असलेल्या हा अभंग पहा—

वेद विहित तुम्ही आई का हो कर्मे /

बोलतो ती वर्मे संतांपुढे//

चारी वर्ण जाले एकाचिये अंगी/

पाप-पुण्यभागी विभागीले//

प्रथम पाऊली पावविला पंथ/

आदी मध्य अंत भेद नाही//

आंबे बोरी वड बाभुळ चंदन/

गुणागुणभिन्न अग्नि एक//

तुका म्हणे मन उन्मन जो होय/

तोवरी हे सोय विधी पाळी//

तुकाराम महाराज म्हणतात, ” अहो लोकहो,

वेद प्रणित अवस्था काय आहे, ते तुम्ही ऐका. मी तुम्हा संतांपुढे ती सांगतो. एकाच देवापासून ब्राह्मणादी चार वर्ण निर्माण झाले आहेत. सर्व एकाच देवाची लेकरे आहेत. ते आपापल्या विहित कर्माने व पाप-पुण्याच्या भागाने वाटले गेले. सर्वांच्या उत्पत्तीचे स्थान जो हरी त्याच्या ठिकाणी प्रारंभ, मध्य, आणि अंत नाही. आंबे, बोरी, वड, चंदन यांचा दृष्टांत देऊन महाराज सांगतात या वृक्षातील गुणांचे व दोषांचे अनेक भेद आहेत. पण जळल्यानंतर ते एकच होतात. सर्वांची एक राखच होते. मूळ हरीच्या ठिकाणीही आदि अंत, कर्ता कर्म फळ इत्यादी भेद नसतो. जोपर्यंत मनाची उन्मनी अवस्था होत नाही तोपर्यंत मनुष्याने वेदाने सांगितलेल्या विधी मार्गा ने चालले पाहिजे. थोडक्यात, ब्राह्मण श्रेष्ठ आणि शूद्र नीच ही भावना मनातून त्यागिली पाहिजे.

त्या काळात सिंहस्थ- पर्वणी असा एक काळ मानला जात होता. आजही पंचांगात आपल्याला सिंहस्थ काळ हा शब्द सापडतो. या काळात लग्न, मुंज अशी मंगल कार्ये होत नाहीत असे म्हणतात. आता बदलत्या काळानुसार सर्व लोक ही परंपरा पाळतातच असे नाही. या समस्त काळात त्यावेळी ब्राह्मण डोक्यावरचे व दाढीचे केस काढायचे. त्यावरून महाराजांनी हा अभंग रचला आहे. ते म्हणतात—-

आली सिंहस्थ पर्वणी/

न्हाव्या भटा झाली धणी //

अंतरी पापाच्या कोडी/

वरी वरी बोडी डोई दाढी//

बोडीले ते निघाले/

काय पालटले सांग वहिले//

पाप गेल्याची काय खूण/

नाही पालटले अवगुण//

भक्तीभावेवीण /

तुका म्हणे अवघा सीण //

सिंहस्थ पर्वणी आली म्हणजे क्षेत्रात जे भट व न्हावी असतात त्यांची चंगळ होते. अंतःकरणात कोट्यावधी पापे आहेत, आणि दाढी काढली व डोक्याचे मुंडन केले तर त्याचा काय उपयोग? नुसते केस निघाले, पण अंगातील अवगुण निघाले का? त्याची काय खूण आहे? तुकारामांना एवढेच सांगायचे आहे की, पांडुरंगाची श्रद्धेने भक्ती करण्या वाचून बाकीचे सर्व व्यवहार पिडादायीच आहेत.

चातुर्वर्ण व्यवस्था हीच त्यावेळची मुख्य समाज व्यवस्था होती. या व्यवस्थेतील लोकांच्या कर्मा विषयी आणि प्रारब्धाविषयी महाराज वेळोवेळी सांगतात.

पहा हो देवा कैसे जन/

भिन्नभिन्न संचिते //

एक नाही एका ऐसे/

दावी कैसे शुद्ध हीन//

पंचभूते एकी राशी/

सूत्रे कैसी ओळखावी//

तुका म्हणे जो जे जाती/

त्याची स्थिती तैशी ते//

देवा, हे लोक किती निरनिराळ्या प्रारब्धाचे आहेत. एका सारखा एक नाही. प्रारब्धाच्या योगाने काही चांगले आणि काही हीन अशी विविधता दिसते. सर्व सृष्टी पंचमहाभूतांच्या एकाच मूळ पदार्थाने बनली आहे, असे असताना नशिबाची भिन्नता कशी ओळखावी? जो जन्माप्रमाणे, कर्माप्रमाणे ज्या जातीचा असेल तशीच त्याची स्थिती असते. थोडक्यात ब्राह्मणांनी विद्याभ्यास करावा, वेदपठण करावे, क्षत्रियांनी देशाचे सीमा रक्षण करावे, वैश्यांनी व्यापार करावा आणि शूद्रांनी गावाची साफसफाई करावी. समाजाची घडी उत्तम रीतीने बसण्यासाठी ही व्यवस्था होती, परंतु ब्राह्मण वर्गांनी त्याचे स्वरूप उच्च~नीच अशा प्रकारचे केले.

पुढील लेखात आणखी काही अभंगांचा आपण परामर्श घेऊ.

क्रमशः… २३ 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १०४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १०४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- “बाबा तुम्ही सहन करू शकणार नाही अशी एक गोष्ट आहे. आता रात्र बरीच झालीय.. पण हे तुम्हाला आत्ताच सांगणं गरजेचं आहे. तुम्ही त्रास करून घेणार नसाल तरच सांगतो. ” सलिल म्हणाला.

“नाही त्रास करून घेणार. तू सांग.. काय झालंय?”

त्याने जे कांही सांगितलं ते ऐकून मी सून्न झालो. अक्षरशः गोठून गेल्यासारखा क्षणभर बसून राहिलो. तो म्हणाला होता तसं पैशाने ज्याची भरपाई होऊच शकणार नाही असं बरंच कांही मी गमावून बसलो होतो!!)

महापुरामुळे घरी झालेल्या संपूर्ण विध्वंसाचं शक्य तितक्या मोजक्या शब्दात वर्णन करून तो म्हणाला होता,.. “बाबा आपल्या बंगल्यात ८. ५० फूट उंचीपर्यंत पाणी आलेलं होतं. घरात आता फक्त ओल मुरलेल्या भिंती आणि दिवसभर राबून घरातला सगळा चिखल उचलून बाहेर बागेत रचल्या नंतरचे चिखलमाखलेले फ्लोअर अशी अवस्था आहे. ते सगळं पुन्हा मिळवता येईल बाबा पण तुमचं लेखन… ” तो बोलायचा थांबला. त्याने न सांगताही मला अंदाज आला होता… “लाॅफ्टवर ठेवलेल्या माझ्या बॅगा ना.. ?”मी शांतपणे विचारलं.

“हो. त्या तुमच्या सर्व बॅगांमधे तुम्ही जपून ठेवलेलं पूर्वीपासूनचं तुमचं सगळं लेखन भिजून, कुजून लगदा झाल्याने टाकून द्यावं लागलंय बाबा… “

ऐकून मी सून्न झालो. त्या सर्व बॅगांपैकी कुठल्या बॅगेत काय आहे हे मला फक्त माहित होतं असं नाही तर ते तोंडपाठ होतं. माझ्या आजवरच्या सर्व कथांची मासिके, माझी नाटके, एकांकिका, बालनाट्ये यांची हस्तलिखिते, सेन्साॅर सर्टिफिकेटस्, मला मिळालेले सगळे लेखन-पुरस्कार, ‘प्राजक्त’ या मासिक पत्रिकेत दरवर्षी वेगवेगळे विषय घेऊन गेली अकरा वर्षे मी लिहित असलेल्या सदरलेखनाच्या छापील प्रतींचे गठ्ठे ज्यात ‘प्राजक्त’चे तोवरच्या माझ्या लेखांच्या एकूण १३२ छापील प्रतींचे अंक होते… आणि असंच बरंच कांही! सगळं एका रात्रीत स्वाहा झालं होतं!त्या सदरलेखांमधील जवळजवळ सर्वच आशयांवरून एकेक कथा, एकांकिका, किंवा एखादं दोन अंकी नाटकही.. अशा अनेक नव्या साहित्यकृतींना आकार देण्याचा माझा मनोदय होता. त्याचं नियोजन सुरू होतं आणि अचानक माझं सगळं अक्षरधनच पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने लुटून नेलं होतं!!

माझ्या खरंच ते जिव्हारीच लागलं. त्या रात्री अंथरुणाला पाठ टेकली. आणि त्या अस्वस्थ मनःस्थितीत या विध्वंसात देवघरातील ती दत्ताची मूर्ती? ती.. तीही.. अशीच.. ? या विचाराचाच फटका बसावा तसा मी ताडकन् उठून बसलो. बाकी सर्वजण झोपले होते. सलिल/अनघा दोघांचं उद्याच्या घरस्वच्छतेच्या कामांच्या नियोजनाबद्दलचं बोलणं अस्पष्टसं कानावर आलं न् मी त्या दिशेला धाव घेतली. , !ती.. ती.. दत्तमूर्ती न् इतर सगळे देवही चिखलात वहात जाऊन रुतले गेले असतील तर? तेही चुकून त्या कचऱ्याच्या ढीगात टाकले गेले नसतील ना? नुसत्या कल्पनेनेच मी धास्तावलो.

“बाबा.. तुम्ही झोपला नाहीत अजून? असे घाबरलायत कां? काय झालंय?” मला पहाताच सलिलने विचारलं.

” मला सांग.. आपल्या देवघरातल्या देवांचं काय? ते पण वाहून गेलेत कां? ते.. ते.. चिखलाबरोबर त्या कचऱ्याच्या ढीगात तर टाकले गेले नसतील ना रे?” मी काकुळतीने विचारलं.

सलिलने अनघाकडे पाहिलं

“नाही बाबा… अहो, दिवसभराच्या गडबडीत तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. बाबा.. एक आश्चर्य वाटेल अशी आनंदाची बातमी आहे. “

इतक्या सगळ्या विध्वंसातही आनंदाची बातमी?… मला कांही समजेचना.

“बाबा, घरातला निम्मा शिम्मा चिखल बाहेर बागेत टाकून झालाय. राहिलेला उद्या दिवसभरात टाकून होईल. पण आश्चर्य म्हणजे आपण देव मांडतो ते ते छोटं देवघर तिथंच तिरकं होऊन चिखलात रुतून राहिल्याने त्यातले देव आणि ती दत्तमूर्तीही त्यावरच विखुरलेले दिसले. मी ते देवघर आणि ती मूर्ती स्वच्छ धुवून तिथे घरच्या किचन कट्ट्यावर ठेवलीय बाबा… ” हे ऐकताच माझ्या अंगावर शहाराच आला एकदम.. ! माझं सगळं अक्षरधन वाहून गेलं तरी ‘तो’ आहे! मग आणखी काय हवं? मनाला झालेल्या त्या अनपेक्षित आनंदाने मी भारावून गेलो होतो. सगळं ‘त्या’च्यावर सोपवून होईल ते पहात रहायचं असं मनोमन ठरवलं आणि निश्चिंत झालो.. !!

अंथरुणाला पाठ टेकली तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. त्या निश्चिंत मनात आपल्याला या प्राप्त परिस्थितीत काय करता येईल याचे विचार सुरु झाले आणि झोप निघूनच गेली. मी झरकन् उठून शेजारच्या टीपाॅयवर ठेवलेला माझा मोबाईल उचलला. आजवर माझी नाटके आणि एकांकिका स्पर्धेत सादर केलेल्या मुंबई, पुणे, अहमदनगर, डोंबिवली, नाशिक, अमरावती, नागपूर, इंदौर अशा विविध ठिकाणच्या सर्व संस्थांची व्हाॅटस् अॅप काॅन्टॅक्स उपलब्ध होती. मी लगेचच सर्वांना सविस्तर मॅसेज पाठवून पुरामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची कल्पना दिली आणि त्यांनी सादर केलेल्या माझ्या नाटक/एकांकिका यांच्या संहिता त्यांच्याकडे उपलब्ध असतील तर त्याची एक प्रत प्लीज मला पाठवावी अशी विनंती केली. मी यापेक्षा जास्त कांहीच करू शकत नव्हतो.

माझ्या या नाट्यसंहितांपेक्षाही माझ्यासाठी कणभर जास्तच महत्वाचं होते ते ‘प्राजक्त’ मधल्या जाने. २०१० ते जुलै २०१९ या जवळजवळ साडेनऊ वर्षातल्या माझ्या सदर लेखनाचे १३२ अंक पुन्हा मिळवणे. पण तो प्रश्न अजून अधांतरीच होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी ‘प्राजक्त’ च्या ऑफिसमधे फोन करून विचारणा केली. पुरापूर्वी कांही दिवस आधीच साफसफाई करताना कपाटांमधे जागा करण्यासाठी तिथे साठलेले सगळे जुने अंक त्यांनी रद्दीत विकून टाकले होते!

अखेर एक शेवटचा उपाय म्हणून त्या महिन्याच्या सदरासाठी लिहिलेल्या लेखाबरोबर मी एक जाहीर निवेदन पुढच्या अंकात प्रसिद्ध करण्यासाठी लिहून दिलं. त्यात माझी नेमकी अडचण विशद करून प्राजक्तचे सुरूवातीपासूनचे अंक कुणाकडे उपलब्ध असतील तर मला कळवावे असं वाचकांना आवाहन केलं आणि मी त्याच्या झेरॉक्स कॉपीज् स्वखर्चाने काढून घेईन हेही लिहिलं. या सगळ्या सदरलेखनाला आजपर्यंत कितीतरी वाचकांनी कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया वेळोवेळी आवर्जून पाठवल्या होत्या. त्यांच्यापैकी अगदी एकाने जरी ते अंक जपून ठेवले असतील तर त्या अंकांची मला गरज आहे हे निवेदन दिल्याशिवाय त्याच्यापर्यंत पोचणार कसं? हाच विचार ते निवेदन दिलं तेव्हा माझ्या मनात आलं. आणि ध्यानीमनी नसताना खरंच चमत्कार घडला! जादूची कांडी फिरावी तशी सगळी सूत्रं वेगाने हलत गेली आणि… !

दुसऱ्याच दिवशी सर्व नाट्यसंस्थांकडून मी पाठवलेल्या मेसेजेस् ना सकारात्मक उत्तरे आली आणि पुढे दोन-तीन दिवसात त्यापैकी काहींनी पीडीएफ् रुपात तर बाकीच्यांनी त्या संहितेची झेराॅक्स काॅपी मला पाठवून माझ्या हरवलेल्या अक्षरधनाची कांही प्रमाणात कां होईना भरपाई केली. हा एक सुखद धक्काच होता माझ्यासाठी! नंतर मधे आठदहा दिवसही उलटले नसतील आणि अचानक एक फोन आला.

“आपण अरविंद लिमये बोलताय ना?” आवाज अपरिचित. कांहीसा थकलेला. माधवनगरचे कुणी सुधाकर फाटक आजोबा बोलत होते.

“मी प्राजक्तमधलं तुमचं निवेदन वाचलं. त्यातले तुमचे लेख मला आवडतात. त्यामुळेच मी सभासद झाल्यापासूनचे म्हणजे साधारण २०१५पासूनचे सगळे अंक क्रमवार अॅरेंज करून ते जपून ठेवलेत. पण अट एकच. तुम्ही स्वतः येऊन ते घेऊन जायचे. त्यामुळे निदान आपली भेट तरी होईल. आणि हो.. त्याच्या झेराॅक्स काढायची तसदी नका घेऊ. आज माझे वय आहे ८५. मी प्राणपणाने जपलेले ते अंक योग्य माणसाच्या हाती गेल्याचं समाधान मला मिळतंय याचा मला आनंदच आहे… !” ते बोलत होते. मी थक्क होऊन ऐकत होतो. हे एवढंच नव्हतं. दुसऱ्याच दिवशी ‘प्राजक्त’चं मुद्रण कोल्हापूरला ज्या प्रेसमधे होत असे त्या प्रेसचे श्री. डबीर यांचाही निरोप आला. त्यांच्याकडून २०१० च्या आधीचेही सगळे अंक सेव्ह असल्याने त्यांनी ते पेनड्राईवमधे डाऊनलोड करून देण्याचे आश्वासन दिले.. !

जे मला कधीच परत मिळू शकणार नाही असं मला वाटलं होतं ते माझं सगळं अक्षरशः मला अचानक परत मिळणं हा चमत्कारच होता माझ्यासाठी !!

हे सगळं इतकं अनपेक्षित, इतकं सहज, आणि इतकं अल्पावधीत घडलं की हे एखादं सुखद स्वप्नच आहे असंच वाटत राहिलं! प्रतिकूल परिस्थितीत हे असं हवं ते हवं तसं मला बहाल करण्याची ‘त्या’ची किमया म्हणजे अंधारून आलेल्या मनात भरून राहिलेला मिट्ट काळोख क्षणार्धात उजळून टाकणाऱ्या लख्ख प्रकाशासारखी ‘त्या’च्या अलौकिक स्पर्शाची अनुभूती वाटली मला!

नुकतेच घडून गेल्यासारखे मला इतक्या वर्षांनंतरही स्वच्छ आठवणाऱ्या स्वेच्छानिवृत्ती नंतरच्या काळातले हे दोन प्रातिनिधिक प्रसंग.. ! खरंतर तो आणि मी या विषयाशी संबंधित मनात घर करून राहिलेल्या अशा असंख्य आठवणींचा या प्रदीर्घ अशा सदरलेखनाच्या निमित्ताने मी घेतलेला वेध म्हणजे एकापरीने ‘त्या’चा स्पर्श जाणवलेल्या आजवरच्या आठवणीत साठलेल्या अनेक अनुभवांकडे माझे मागे वळून पहाणेच होते! यातून माझ्या नकळत्या वयापासून मी मनात जपलेला ‘तो’ आज वानप्रस्थात प्रवेश केलेल्या माझ्या आयुष्याच्या उतरत्या वळणावर उभ्या मला कसा दिसतो ते आता या सदराच्या पुढच्या समारोपाच्या भागात.. !

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “उंबरठा…” ☆ अर्चना देशपांडे ☆

अर्चना सुरेश देशपांडे

? विविधा ?

☆ “उंबरठा…” ☆ अर्चना सुरेश देशपांडे ☆

उंबरठा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतो घराच्या मुख्य दाराच्या चौकटीला खालच्या बाजूला लावलेलं जाड उंच लाकूड. उंबरठ्याशिवाय घराला पूर्तता नसते, हा घराचा महत्वाचा भाग असतो.

माझ्या माहेरी घर मोठे होते. प्रत्येक खोलीला उंबरठा होता. पूर्वी अंगणात रांगोळी काढताना उंबरा धुऊन त्यावरही हळदी कुंकू घालून नमस्कार केला जायचा. उंबऱ्यावर गो पद्म, स्वस्तिक रांगोळी काढली जायची.

पूर्वीच्या काळी घर हेच स्त्रीचे विश्व होते. बाईने उंबरठा ओलांडून स्वकर्तुत्वाने काही करायचे म्हटले की तिला घरातून विरोध असायचा.

उंबरठा म्हणजे तिच्यासाठी लक्ष्मणरेषा. स्त्रिने घरातील लोकांच्या विरुद्ध उंबरठा ओलांडून बाहेर जाणे म्हणजे संस्काराची मर्यादा ओलांडली असे मानले जात असे.

नववधू घरात प्रवेश करताना उंबरठ्यावर ठेवलेले तांदळाचे माप ओलांडून मगच घरात प्रवेश करते. तिच्या दृष्टीने हा गृहप्रवेश खूप महत्त्वाच्या ठरतो.

धार्मिक दृष्टीने सुद्धा उंबरठा महत्त्वाचा मानला जातो. नरसिंह व लक्ष्मीचे स्थान त्या ठिकाणी असते. उंबरठा सहसा उंबराच्या झाडाच्या लाकडापासून बनवला जातो.

उंबरठा हा मर्यादेची जाणीव करून देतो. उंबरठ्याच्या आत सुरक्षतेची भावना असते. आपल्या संस्कृतीत उंबरठा म्हणजे संरक्षण, मर्यादा आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. तर वास्तुशास्त्रानुसार उंबरठा नकारात्मक ऊर्जा रोखून धरतो.

हल्ली फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरठा ही कल्पनाच इतिहास जमा झाली आहे. तिथे उंबरे नसतातच, अगदी असेल तर  कडापयाची लांबडी पट्टी बसवून घेतात.

माझ्या मते घराला उंबरा असावा. उंबरा पायाला क्षणभर थांबवतो आणि पाय थांबले की मन ही क्षणभर जागे होते. तो सांगतो जणू आता घरात प्रवेश करतो आहेस, बाहेरचा राग, अहंकार, कटुता दाराबाहेर ठेव आणि घरात प्रवेश करताना प्रेम, आदर, संयम व विनम्रता घेऊन ये.

उंबरठा आपल्याला मर्यादा शिकवतो. बाहेर किती ही मोठ्या पदावर असलास तरी घरी येताना माणूस म्हणून घरात प्रवेश कर.

सद्गुरु वामनराव पै सांगतात “माणसाने कुठे थांबायचे हे माणसाला कळायला हवे” खरं पाहता उंबरा हेच शिकवतो. पती, पत्नी, आईवडील आणि मुले, सासू-सून, बहीण -भाऊ, आजी आजोबा व नातवंडे या प्रत्येक नात्यात उंबरा म्हणजे मर्यादा असतात. हा उंबरा ओलांडला गेला तर नाती बिघडतात आणि हा उंबरा जपला तर आपुलकी राहते, घरात शांतता नांदते.

थोडक्यात दाराचा उंबरा घराचे रक्षण करतो तर मनाचा उंबरा नात्याचे बंध जोडून ठेवतो.

 

© अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares