साडेतीन म्हटल्यावर नकळतच तोंडातून शहाणे असाच पुढचा शब्द बाहेर पडतो. किंवा साडेतीन शहाणे अस म्हंटल्यावर पेशवाई व सोबत सखारामपंत बोकील, देवाजीपंत चोरघडे, विठ्ठल सुंदर आणि नाना फडणवीस हीच नांव डोळ्यासमोर येतात.
पेशवाईच्या अगोदर किंवा नंतर अशा प्रकारची माणसं नव्हती किंवा नाहीत अस नाही. पण पेशवाई आणि हिच नांव साडेतीन शहाणे असा ऊल्लेख झाल्यावर येतात.
राजेशाही, पेशवाई संपली. राज्य, संस्थानं जाऊन देश, व प्रादेशिक प्रदेश म्हणजे राज्य उदयास आली. याच बरोबर वेगवेगळे पक्ष आणि त्या पक्षातल्या खंबीर नेतृत्वाची माणसं समोर आली. काहिंंनी खंबीरपणे पक्षाच नेतृत्व केलं. तर आपण खंबीर असल्याच्या बळावर काहींनी वेगळा पक्ष, गट तयार केला. तसंच काही घराणी आणि घराण्यातली काही माणसं कर्तुत्ववान असल्याच दाखवत त्यांना पुढे आणण्याचा अटोकाट प्रयत्न सुरु झाला, व तो अजूनही काही प्रमाणात बर्याच ठिकाणी सुरु आहे. आणि हीच राज्य, पक्ष, आणि कुटुंबातील काही माणसं पाहिली की परत आठवण होते ती साडेतीन शहाणे या शब्दाची.
पेशवाई काळातले साडेतीन शहाणे यांचा ऊल्लेख नक्की कोणत्या अर्थाने (म्हणजे चांगले का कारस्थानी) करतात हे ठामपणे सांगता आलं नाही तरी ते नक्की कोण आणि त्यातले पूर्ण आणि अर्धे शहाणे कोण हे पक्क होतं. या माणसांची आज एक उद्या अर्धा अशी अदलाबदल नव्हती. पण आज जाणवणाऱ्या साडेतीन शहाण्यांच तसं वाटत नाही.
कारण आज जो पूर्ण शहाणा वाटतो तो कदाचित उद्या अर्धा शाहणाच वाटेल, किंवा शहाणा या यादितही नसेल. तसेच सध्या एकाच पक्षात, राज्यात, घराण्यात या प्रकारचे लोक असल्याच बोललं जातं. सत्तेसाठी किंवा विरोधासाठी एकत्र येण्याचा कल दिसतो. यासाठी धर्म, जात, भाषा, ऊत्सव या (साडेतीन) गोष्टिंचा आधार घेतलेला दिसतो. काहीवेळा खरंच याच गोष्टिंना आधार देण्याची, व यांचा आधार घेण्याची गरज आहे याची जाणीव होते. तर काही वेळा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी याचा वापर केला असं वाटतं. मग यासाठी एकत्र आलेल्या लोकांमधे या प्रकारचे साडेतीन शहाणे सत्तेेसाठी, विरोधासाठी एकत्र असल्याचा सुर निघतो. या एकत्र आलेल्या साडेतीन शहाण्यांचे परत आपले आपले साडेतीन शहाणे असल्याची चर्चा होते. आणि या साडेतीन शहाण्यांची साखळी किंवा संख्या वाढत जाते असं वाटलं तरी जनमानसात सगळ्यांचा ऊल्लेख साडेतीन शहाणे असाच होतो. आणि बर्यचदा त्यात उपहास, टिंगलच जाणवते.
यातला एखादा मुळातच अर्धा असतो. पण आपणच पूर्ण असल्याच्या विश्वास त्याला वाटतो. लोक आपल्यामागे फिरतील असा भ्रम त्याच्या मनात निर्माण झाल्याने मग तो तळ्यात मळ्यात करतो. आणि तो येऊन मिळाल्याने अगोदर संख्येने तीन असणारे व्यावहारिक द्रृष्ट्या साडेतीन झाल्याची चर्चा सुरू होते. विचारांप्रमाणे या चर्चेत गांभीर्य, उपहास, विनोद सगळच जाणवतं.
मुहूर्तांंमधे साडेतीन मुहूर्त, देेवस्थानात साडेतीन शक्तीपीठं हे शब्द कायम वापरले जातील. तसंच शहाणे हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला गेला तरी साडेतीन शहाणे असा वापर यापुढे सुध्दा होत राहील असं वाटत.
☆ ‘संपूर्ण शरणागतीचे तत्वज्ञान’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
प्रपत्ती : संपूर्ण शरणागतीचे तत्त्वज्ञान
भक्ती, तत्त्वज्ञान आणि कृपायोगाचा दिव्य संगम
प्रस्तावना : अहंकारापासून अनंताकडे
मानवी जीवनाच्या आध्यात्मिक प्रवासात एक असा टप्पा येतो की जिथे साधकाला स्वतःच्या प्रयत्नांची मर्यादा जाणवते. त्याच्या अध्यात्मप्रवासात एक क्षण असा येतो की प्रयत्नांची शिडी संपते आणि कृपेचे आकाश सुरू होते.
ज्ञान, कर्म, साधना, तपस्या — या सर्व मार्गांनी प्रयत्न करताना अखेरीस मनाला उमगते की अंतिम सत्य प्राप्त करण्यासाठी अहंकाराचा सर्वस्वी त्याग आणि परमेश्वरावर संपूर्ण विश्वास अत्यावश्यक आहे. याच अवस्थेला भारतीय ‘ विशिष्ठाद्वैत तत्वज्ञान’ परंपरेत “प्रपत्ती” असे म्हणतात.
संस्कृतमधील “प्र + पत्” या धातूपासून सिद्ध झालेला हा शब्द पूर्णपणे शरण जाणे, स्वतःला अर्पण करणे असा अर्थ व्यक्त करतो.
भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णाचे प्रसिद्ध वचन या तत्त्वज्ञानाचे सार सांगते —
“सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥”
(भगवद्गीता १८. ६६)
या एका श्लोकात प्रपत्तीचा संपूर्ण आध्यात्मिक अर्थ सामावलेला आहे.
१. प्रपत्ती : तात्त्विक संकल्पना
प्रपत्ती म्हणजे स्वकर्तृत्वाचा अभिमान सोडून परमेश्वराच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवणे.
भक्तीमार्गात ही अवस्था तेव्हा येते जेव्हा साधकाला स्वतःच्या मर्यादा स्पष्ट जाणवतात. त्या क्षणी तो म्हणतो —
“मी नाही; सर्व काही तूच. ”
या भावनेचे वर्णन करताना जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, “आपुलिया बळे नाही मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची ॥” माणूस स्वतः काही करीत नाही; करणारा खरा परमेश्वरच आहे.
२. रामानुजाचार्य आणि प्रपत्तीचा मार्ग
आचार्य रामानुज (१०१७–११३७) यांनी प्रतिपादित केलेल्या विशिष्टाद्वैत वेदान्तात प्रपत्तीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
त्यांच्या मते जीव आणि परमेश्वर यांचे नाते शेष–शेषी असे आहे —
जीव हा परमेश्वरावर अवलंबून असलेला अंश आहे.
रामानुजाचार्यांच्या“शरणागति गद्य” या ग्रंथात ते परमेश्वराला विनवतात —
“नारायण! तव पादारविन्दयोः शरणं प्रपद्ये।”
ही केवळ प्रार्थना नसून पूर्ण आत्मसमर्पणाची अनुभूती आहे.
३. प्रपत्तीची सहा अंगें
या परंपरेत शरणागतीची सहा लक्षणे सांगितली आहेत —
“अनुकूल्यस्य संकल्पः प्रतिकूलस्य वर्जनम् ।
रक्षिष्यतीति विश्वासो गोप्तृत्ववरणं तथा ।
आत्मनिक्षेपकार्पण्ये षड्विधा शरणागति: ॥”
या सहा अंगांमध्ये प्रपत्तीचे संपूर्ण स्वरूप दिसते.
अनुकूलस्य संकल्पः — ईश्वराला अनुकूल तेच आचरण करणे
प्रतिकूलस्य वर्जनम् — प्रतिकूल गोष्टींचा त्याग
रक्षिष्यतीति विश्वासः — परमेश्वर रक्षण करील हा दृढ विश्वास
गोप्तृत्ववरणम् — त्यालाच पालनकर्ता मानणे
आत्मनिक्षेपः — पूर्ण आत्मसमर्पण
कार्पण्यम् — स्वतःची दीनता स्वीकारणे
४. भक्तिमार्गी संतपरंपरेतील प्रपत्ती
संतपरंपरेत प्रपत्तीचा भाव अत्यंत सजीवपणे व्यक्त झाला आहे. दासबोधात समर्थ रामदासस्वामी म्हणतात,
“आपण मिथ्या साचा देव । देव भक्त अनन्यभाव ।… या नाव आत्मनिवेदन ॥”
(४. ९. २२)
रामरायाकडे समर्थ मागणे काय मागतात पहा, “मजविण तू मज दे रे राम! “
मीराबाईंचं ईश्वराशी हे एकरूप होणं पहा…
“लाली मेरे लालकी जिथ देखूं तिथं लाल
लाली देखन मै गयी, मै ही होगई लाल! “
तुकाराम महाराज म्हणतात,
“घालुनिया भार राहिलो निश्चिंती ।
……….
खुंटले सायास आणिक या जीवां ।
धरिले केशवा पाय तुझे ॥
तुज वाटे आता करी रे अनंता ।
तुका म्हणे संता लाज माझी ॥”
संत एकनाथ महाराज म्हणतात,
” अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आता ।
चरणी जगन्नाथा चित्त ठेले ॥
माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ ।
अनाथांचा नाथ जनार्दन ॥
एका जनार्दनी एकपणे उभा ।
चैतन्याची शोभा शोभतसे ॥ “
५. प्रपत्ती आणि कृपायोग
प्रपत्तीचा मार्ग हा केवळ साधकाच्या प्रयत्नांवर आधारित नाही; तो ईश्वरकृपेवर आधारित आहे. भक्त सतत प्रेमपूर्वक भजन करतो, तेव्हा परमेश्वर स्वतः त्याला मार्ग दाखवतो.
श्रीवैष्णव तत्त्वज्ञानात मोक्ष हा केवळ साधकाच्या साधनेचा परिणाम नसून परमेश्वराच्या निरपेक्ष कृपेचा प्रसाद मानला जातो. प्रपत्ती म्हणजे त्या कृपेचे द्वार उघडणारी अंतःकरणाची अवस्था होय.
६. प्रपत्तीचे आध्यात्मिक सौंदर्य
प्रपत्ती म्हणजे पलायन नव्हे; ती आहे अहंकारावर मात करून अनंताशी एकरूप होण्याची प्रक्रिया.
जेव्हा भक्त म्हणतो —
“मी तुझा आहे; तूच माझे सर्वस्व आहेस. ”
तेव्हा त्या क्षणी भक्त आणि भगवान यांच्यातील भेद विरघळतो, द्वैत विरते!
७. आत्मनिवेदन आणि प्रपत्ती
नवविधा भक्तीतील ‘आत्मनिवेदन’ आणि रामानुजाचार्यांची ‘प्रपत्ती’ हे दोन्ही पूर्ण शरणागतीचे सिद्धांत आहेत, पण त्यांची तात्त्विक चौकट, रचना आणि पायऱ्यांमध्ये स्पष्ट भेद आहे.
आत्मनिवेदनची व्याख्या:
नवविधा भक्ती ही भगवद्गीतेच्या भक्तियोगावर आधारित नऊ पायऱ्यांची प्रक्रिया आहे, ज्यात नववी पायरी ‘आत्मनिवेदन’ आहे. यात भक्त स्वतःचा देह, मन, धन, कर्तृत्व आणि फळ—सर्वस्व भगवंताला समर्पित करतो, “मी तुझाच” ही श्रद्धा दृढ पणे अंतःकरणात बाळगतो. यात ईश्वरावर संपूर्ण विश्वास आणि स्वातंत्र्य-अहंकाराचा पूर्ण त्याग करून वाट्याला आलेल्या सुख-दुःखाला त्याचीच इच्छा मानणे हे मुख्य आहे.
प्रपत्तीची व्याख्या:
रामानुजाचार्यांच्या विशिष्टाद्वैत वेदांतात प्रपत्ती ही शरणागतीची प्रक्रिया आहे, जी कर्म-ज्ञान-भक्तींपेक्षा थेट परमेश्वरकृपेवर अवलंबून आहे. यात वर उल्लेखिलेली सहा अंगे आहेत: अनुकूल कर्मांचा संकल्प, प्रतिकूलांचा त्याग, रक्षकत्वाचा विश्वास, गोप्तृत्वस्वीकार, कार्पण्य (असहाय्यता) आणि आत्मनिक्षेप (आत्मार्पण). ही संरचित, शास्त्रोक्त पद्धत मोक्षासाठी एकमेव साधन मानली जाते
साम्याचे मुद्दे:
दोन्ही सिद्धांतांचा केंद्रबिंदू “पूर्ण समर्पण” हा आहे—अहंकारत्याग, ईश्वरकेंद्रित जीवन, कृपेवरील अवलंबन आणि स्वतःचे सर्वस्व त्याच्या चरणी अर्पण. भावार्थाने ही एकाच अध्यात्मिक सत्याची दोन रूपे दिसतात.
भेदाचे मुद्दे:
भावतत्त्वाने दोन्ही जवळजवळ समान आहेत, पण शास्त्रीय रचना, परंपरा आणि तात्त्विक चौकटीमुळे हे वेगळे सिद्धांत मानले जातात. त्यांना एकच म्हणता येत नाही.
८. उपसंहार : समर्पणातच अनंत
मानवी जीवनात ज्ञान, साधना, तपस्या आणि कर्म यांना महत्त्व आहे. परंतु या सर्व प्रयत्नांचा अंतिम अर्थ तेव्हाच उमगतो जेव्हा साधकाला समर्पणाची अनुभूती प्राप्त होते.
प्रपत्ती म्हणजे प्रयत्नांचा पराभव नव्हे;
ती आहे अहंकारावरचा विजय होय.
भक्ताच्या अंतःकरणात जेव्हा ही जाणीव उमलते —
“देवा, मी तुझा आहे. ”
तेव्हा परमेश्वरही जणू त्याला अश्वासक उत्तर देतो —
“हो, तू माझाच आहेस.”
अशा या दिव्य संवादातच भक्तीचा परमोच्च क्षण जन्म घेतो.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे समर्थन करण्यासाठी आपला देश सोडून आलेली मीराबेन.हिचे मूळ नाव मॅडलीन स्लेड. जन्म २२ नोव्हेंबर १८९२. वडील ब्रिटिश नेव्हीत ऑफिसर होते. सर एडमंट स्लेड वडिलांचे नाव आणि फ्लोरेंन्स आईचं नाव. एका सुस्थितीतल्या ब्रिटिश कुटुंबातल्या मॅडलीनला लहानपणापासून निसर्ग व घोडेस्वारीची आवड.तसेच संगीताची ही आवड होती.पियानो आणि संगीत मैफलीत भाग घेत असे. एकदा त्यासंबंधी कामासाठी जर्मनीला गेली असता रोलॅंडने लिहिलेल्या महात्मा गांधी यांच्या चरित्राविषयी कळले. दुसरे ख्रिस्त आणि विसाव्या शतकातील महान व्यक्तिमत्त्व असे त्यांचे वर्णन ऐकून ती भारावली.
इंग्लंडला परत आल्यावर रोलँड ने लिहिलेले गांधी चरित्र वाचले. आणि गांधीजींची शिष्य होण्याचे, जीवन त्यांना समर्पित करण्याचे ठरविले. त्यासाठी तयारी म्हणून आधी साबरमती आश्रमातील साहित्याचा अभ्यास केला. मांडी घालून बसणे शिकली. आहारात बदल केला. शाकाहार स्वीकारला मांस व मद्याचा त्याग केला. सुत कातणे,लोकर विणकाम शिकली. इंग्लंडमध्ये यंग इंडियाची सदस्य झाली. भगवत् गीता, ऋग्वेद वाचण्याचा अभ्यास केला.
१९२५ मध्ये गांधींची संपर्क साधून त्यांच्या आश्रमात राहण्याची परवानगी मागितली. भारतात येऊन गांधींना भेटल्यावर गांधींनी ‘तू माझी मुलगी होशील’ असे म्हणून तिला ‘मीराबेन’ नाव दिले. आपले जुने जीवन ती विसरली.१९२५ च्या भारतीय काँग्रेसच्या पहिल्या वार्षिक सभेला त्या उपस्थित राहिल्या. साबरमती आश्रमात सुतकताई, विणकाम, स्वयंपाक, स्वच्छता अशी कामे त्या करत. गुजराती व मराठी शिकल्या. साबरमतीत स्वतःने विणकाम केंद्र सुरू केले. रवींद्रनाथ यांच्या शांतिनिकेतनला भेट दिली.१९३१ च्या गोलमेज परिषदेसाठी गांधींबरोबर केल्या. गांधीना अटक झाल्यावर त्यांनाही अटक झाली. आर्थर रोड आणि साबरमती तुरंगात राहावे लागले.
इंग्लंडमध्ये जाऊन सरकारला पटवून दिले की, भारत देश चालवायला समर्थ आहे. ब्रिटिश वसाहत वादामुळे ग्रामीण उद्योगांचा विनाश होतो. उच्च कर लादले जातात. भारत छोडो चळवळीत गांधी व कार्यकर्त्यांबरोबर त्यांनाही अटक झाली. दोन वर्षे पुणे येथे आगाखान पॅलेस मध्ये होत्या. नंतर हरिद्वार येथे किसान आश्रम स्थापला. गो संरक्षणाचे काम केले. भारताच्या स्वातंत्र्याची संबंधित सिमला परिषद, संविधान सभा, भारताची फाळणी आणि गांधीहत्येच्या त्या साक्षीदार होत्या. स्वातंत्र्यानंतर शेती, दुग्ध व्यवसाय, वनसंरक्षण, पर्यावरण या क्षेत्रात काम केले. पुढे १९६० मध्ये ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झाल्या. १९८२ मध्ये मृत्यू झाला. त्यापूर्वी १९८१ मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. त्यांनी काही पुस्तके लिहिली स्वतःचे चरित्र, गांधींची मीरेला पत्रे इ. अशा प्रकारे एका सुखवस्तू ब्रिटिश घरातील मुलगी आपले पूर्वीचे नावासकट सर्व विसरली आणि भारतीय नेत्याची कार्यकर्ती व मुलगी म्हणून राहणे पसंत केले. सगळेच अतर्क्य !
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १३ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
गाथेतून उमजणारी गीता(३)
अर्जुनाला रणभूमीवर माझ्याच नातेवाईकांना मी कसे मारू असा जेव्हा भ्रम झाला त्यावेळी, माता, पिता, बहीण, बंधू, भार्या, अपत्ये ही सर्व नाती कशी असत् आहेत, आणि मी- कृष्ण हेच कसे परब्रह्म आहे याचा उपदेश श्रीकृष्णाने गीतेत केला. त्याच परमतत्वानुसार
तुकाराम महाराज सर्व मोह पाशातून मुक्त झाले आहेत. म्हणून ते म्हणतात,
बाप मेला न कळता/ नव्हती संसाराची चिंता/
विठू तुझे माझे राज्य/ नाही दुसऱ्याचे काज/
बाईल मेली मुक्त झाली/ देवे माया सोडविली/
पोर मेले बरे झाले/ देवे माय विरहित केली/
माता मेली मज देखता/ तुका म्हणे हरली चिंता/
ज्या ज्या गोष्टी असत् आहेत, त्याचा विनाश अटळ आहे हे सत्य स्वीकारण्याची शक्ती जेव्हा अंगी येते, तेव्हाच सत् ची, परमतत्वाची, परब्रम्हाची ओळख पटते. त्याचवेळी जिवा शिवाचे ऐक्य होऊ शकते.
जोपर्यंत माणूस संसार बंधनात अडकून पडलेला आहे, तोपर्यंत त्याला संसाराचे भय असते. एकदा का त्याला संसार हा भासच आहे याची खात्री पटली की तो भव भयापासून मुक्त होतो. महाराज आता संसारातून पूर्णपणे निवृत्त झाले आहेत. त्यांना कसल्याही भोगाची आसक्ती राहिली नाही. म्हणून ते देवाजवळ बोलतात,
भोगावरी आम्ही घातला पाषाण/ मरणा मरण आणियेले/
विश्व तू व्यापक काय मी निराळा/ कशासाठी बळा येऊ आता/
काम सारुनिया काढावे बाहेरी/ आणूनी भितरी काय ठेवू/
तुका म्हणे काही नेणे लाभ हानी/ असेल तो धनी राखो वाडा/
मी गुणातीत आत्मा आहे. मला देह दुःख नाही अशा भूमिकेचा दगड भोगांच्या डोक्यावर ठेवून मी मरणाचा अंत केला आहे. देवा तू जर विश्वव्यापक असशील, तर मी त्यापेक्षा निराळा नाही. अशा परिस्थितीत मला वेगळेपणाचा खटाटोप करण्याची काय जरूर आहे? तू आणि मी एकच आहोत. लाभ किंवा हानीची परवा तू असताना मी का करावी? मी काही लाभ हानी जाणत नाही, जो या देहाचा धनी असेल तोच त्याचे रक्षण करेल.
याचसाठी तुकाराम महाराज त्यांच्या गाथेतून साधकांना विठ्ठलाच्या चिंतनाचे महत्त्व सांगतात.
काय नोहे केले/ एका चिंतीता विठ्ठले/
सर्व साधनांचे सार/ भवसिंधू उतरी पार/
योगयागतपे/ केला त्याने अमुपे/*
तुका म्हणे जपा/ मंत्र त्रीअक्षरी सोपा/
एका विठ्ठलाच्या चिंतनाने काय मिळत नाही? हा भव सिंधू पार करण्यासाठी विठ्ठल हा त्रि अक्षरी मंत्र पुरेसा आहे. योग, याग, साधना वगैरे गोष्टींची काहीही आवश्यकता नाही.
सर्वतोपरी देहाभिमान शून्य होणे म्हणजेच योग आणि तप आहे. तोच परमार्थ आहे. ज्यावेळी देहाभिमान नाहीसा होईल त्याचवेळी जन्ममृत्युरूपी येरझार थांबेल.
योग तप याची नावे/ गणित व्हावे अभिमाने/७
करणे ते हेचि कर/ सत्य बरा व्यापार/
तरी खंडे येरझार/ निधे भार देहाचा/
जेव्हा विषयसुख गोड वाटते, तेव्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात सापडून किती यातना भोगाव्या लागतात याचे वर्णन महाराज त्यांच्या या अभंगात करतात.
विषयाचे सुख /येथे वाटे गोड/
पुढे अवघड/ यमदंड/
मारिती तोडिती/ जोडीतील निष्ठुर/
यमाचे किंकर/ बहु साल/
असिपत्र तरुवर/ खैराचे इंगळ/
निघतील ज्वाल/तैल पाकी/
तप्तभूमीवरी/ चालविती पायी/
अग्निस्तंभ बाही/ कवटाळविती/
म्हणूनी तुका येतो काकुळती/ पुरे यातायाती गर्भवास/
क्षणिक विषयसुखाचे भोगावे लागणारे परिणाम किती भयंकर आहेत याची कल्पना तुकारामांच्या या अभंगातून आपल्याला येते.
एका नामात हरी वसलेला आहे, परंतु आपल्यासारखी सामान्य माणसे देहातच सर्व सुख आहे असे मानतात व त्यामुळे परब्रम्हप्राप्ती आपल्यापासून दूर पळते.
देह हा सादर पहावा निश्चित/ सर्व सुख येथे नाम आहे.
आपल्याला मिळालेल्या देहाकडे आदराने जरूर पहावे, परंतु एक परब्रह्म, एक नामच सर्व सुखाचे साधन आहे.
लटक्या संसारात माणूस अडकतो. लोभ, मोह इत्यादी षड्रिपूंच्या जाळ्यात सापडतो. त्याला हरिनामाचा विसर पडतो. खूप पैसा जमवण्याची धडपड करतो. शेवटी या क्षणभंगुर देहाचा नाश होतो आणि बापाने ठेवलेल्या पैशांवरून दोन भावांचे आपसात भांडण लागते.
लटीकियाच्या आशा/ होतो पडिलो वळसा/
होऊनिया दोषा/ पात्र मिथ्या अभिमाने/
बारावी उघडली दृष्टी/ नाहीतरी होतो कष्टी/
आक्रंदते सृष्टी/ मात्र या चेष्टांनी/
मरणाची नाही शुद्धी/ लोभी प्रवर्तली बुद्धी/
परती तो कधी/ घोड्याची ना माघारी/
साचवुनी मरे धन/ लावी पोरांची भांडण/
नाही नारायण / तुका म्हणे स्मरला.
संसारी माणसाची अशी ही शोककथाच आहे.
आता हा पुढील अभंग पहा.
येथे नाही उरी आले अवतार/ येरे ते पामर जीव किती/
विषयाचे झणी व्हाल लोलिंगत/ जेवलीया अंत नलगे भंग/
वाहून या भार कुंथसील ओझे/ नवे तेचि माझे थीता त्याग/
तुका म्हणे कैसी नव्हे त्याची लाज/ संती केशी-राज साधियाला/
या अभंगात तुकाराम महाराज प्रापंचिकाला उपदेश करीत आहेत. या ठिकाणी अवतार हा शब्द नारायणाच्या मत्स्य, कुर्म आदी दशावतारांना उद्देशून आला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की जिथे हे अवतार सुद्धा राहिले नाहीत तिथे सामान्यांची काय कथा? विषयाची आसक्ती माणसाला कुठे नेईल त्याचा काही नेम नाही. जे खरोखर आपले नाही, त्याचे ओझे खांद्यावरून विनाकारण वाहून हे माणसा तू स्वतःला कष्ट देऊ नकोस. त्यामुळे स्वहिताचा त्याग होईल. केशव हाच परमात्मा आहे, त्याला साध्य करण्यातच स्वहित आहे.
स्वतः तुकाराम महाराज निःसंग होऊन अहोरात्र गोविंदाचे पोवाडे गात होतेच आणि लोकांनाही भवभयापासून मुक्त व्हावे यासाठी ते सावध करीत होते. विठ्ठलाचे नाव वाचेत असल्यामुळे विषयात अडकलेल्या तुकारामांना योग्य मार्ग सापडला. कृष्णाने अर्जुनाला गीतेत हेच सांगितले होते की तू कृष्ण भावना भावित होणे जरुरीचे आहे.
(पूर्वसूत्र- “नेमक्या कोणत्या थकीत कर्ज खात्यांमध्ये मी वसुलीसाठी आवश्यक तो पाठपुरावा योग्य पध्दतीने केलेला नाही हे त्यांनी निदर्शनास आणून द्यायला नको कां? सरसकट आरोप करून ते समाधानकारक स्पष्टीकरणाची अपेक्षाच कशी करू शकतात सर? ‘अकोला ब्रँचचा मी चार्ज घेण्यापूर्वीची तिथल्या गलथान कारभाराची नेमकी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगू कां? ‘ असं तेव्हा मी विचारलं होतं ना सर, ते यासाठीच.. ” मी म्हंटलं.
“तुम्ही जे कांही सांगणार होतात ते मला जरूर सांगा. पण या सगळ्याचं विनाकारण दडपण नका घेऊ. होईल सगळं व्यवस्थित. मी आहे ना? ” वखरेसाहेब म्हणाले.
वखरेसाहेबांच्या या शब्दांमधून जणू ‘तो’च मला आश्वस्त करतो आहे असंच वाटत राहिलं…!
पण पुढे घटनाच अशा घडत गेल्या की कांहीतरी विपरीत होणार असल्याच्या आशंकेने माझं मन सैरभैर होऊ लागलं..! )
इथून स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठीचे अर्ज फाॅरवर्ड झाले त्याला चारसहा दिवस उलटून गेले होते. त्या अर्जांची छाननी करून अर्ज स्वीकृती, अस्वीकृती किंवा त्यांचे प्रलंबन याबाबतचे निर्णय सेंट्रल आॅफिसमधील संबंधित डिपार्टमेंटने तात्काळ म्हणजे ३१ डिसेंबर अखेर कोणत्याही परिस्थितीत घ्यायचे होते. तसे सख्त आदेश एम. डी. आॅफीस कडून त्यांना देण्यात आले होतेच. त्यानुसार तिथे युध्दपातळीवर सर्व कामे सुरूही झाली होती. त्यामुळे रोजच्या इनवर्ड मेलमधे पुणे रिजनमधील स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केलेल्यांची मंजूरीपत्रे रोज टप्प्याटप्याने येऊही लागली होती. अर्थात नाॅर्मल रूटीनमधे मलाही अर्ज स्वीकारल्याचं पत्र अपेक्षित होतंच. तरीही अकोला ब्रॅंचमधील थकीत कर्ज खात्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नामुळे जो अडसर निर्माण व्हायची शक्यता होती त्यामुळे फार तर चार दोन दिवस उशीरा मंजुरीपत्र येऊ शकेल असं मला वाटलं होतं. पण झालं भलतंच. मी नागपूर रिजनल आॅफीसला पाठवलेल्या सविस्तर उत्तरानंतर मला त्यांच्याकडून खरंतर पुढे कसलीही विचारणा किंवा अधिक स्पष्टीकरणाची मागणी आलेली नव्हती. तरीही एकेक दिवस उलटत चालला पण या बाबतीतली माझी प्रतीक्षा मात्र संपली नाहीच. वखरेसाहेब गेले चार दिवस ब्रॅंचेस् व्हिजीटच्या पूर्वनियोजित टूरवर होते त्यामुळे नेमकं काय करावं मला सुचेना. वाट पहाण्याशिवाय पर्यायच नव्हता. तो टूर प्रोग्राम संपवून साहेब आॅफिसला आले ते ३० डिसेंबरला. त्यांच्या अनुपस्थितीतल्या महत्त्वाच्या पेंडिंग मॅटर्सचा निपटारा करण्यात दिवसभर ते पूर्णत: व्यस्तच होते त्यामुळे त्यांना श्वास घ्यायलाही फुरसत नव्हती.
एकदा वाटलं त्याना भेटावं आणि सांगावं सगळं. निदान मनातली चलबिचल तरी कमी होईल. पण मलाच ते योग्य वाटेना. ते टूरवरून दमून आले होते. पुन्हा दिवसभर कामांचं दडपण. ते चिडले नक्कीच नसते पण तरीही..? माझ्या समोरचा प्रश्न माझ्या जीवनमरणाचा नाहीये हे मी स्वत:ला समजावलं आणि मनातले ते उलटसुलट विचार झटकून टाकले. ३० डिसेंबरचा दिवस असाच कोरडेपणाने उलटूनही गेला!
३१ डिसेंबर २००० चा दिवस उजाडला. त्यादिवशीही इनवर्ड मेलमधे माझ्यासाठी कांहीच नव्हतं!
अखेर परतीचे दोर असे पूर्णत: कापलेच गेले होते. आता यापुढे अधांतरी लटकत नाही रहायचं. जे समोर आलंय ते आहे तसं स्वीकारून पुढं जायचं आणि तेच आपल्या हिताचं असणाराय असा विचार केला आणि मन एकदम शांत झालं. आता माझा अर्ज प्रलंबित तरी रहाणार किंवा थेट नाकारला तरी जाणार हे जवळजवळ ठरल्यातच जमा होतं. यापैकी कांहीही झालं तरी ते माझ्यावर अन्याय करणारंच होतं. तरीही त्यानंतर नेमकं जे कांही होईल त्यानुसार तेव्हा काय करायचं करायचं ते वखरेसाहेबांशी बोलून ठरवता येईल असा विचार केला. वखरेसाहेबांची अशी आठवण झाली आणि सकाळपासून आपण त्यांना भेटलोच नव्हतो हेही लक्षात आलं. आज अर्जमंजूरीचा अखेरचा दिवस. त्यांना माझ्याबाबतीतल्या या अडचणीची पूर्वकल्पना असूनही त्यांनी गेल्या पंधरा दिवसांत त्याबाबत कांहीच केलं नाहीय यामागेही कांहीतरी कारण असणारच ना? त्यांच्यामागेही इतर अनेक व्यवधानं होती त्यात ते हा विषय विसरलेही असतील कदाचित. कांहीही असो पण जे व्हायचं ते आता होऊन गेलंय. आमचा लंचब्रेक झाला. मी सोबत आणलेला माझा डबा उघडला. तोंडात घास घेताना हात अडखळला. आपला इथला अन्नाचा शेर अद्याप संपलेला नाहीय असा विचार मनात आला न् मग माझं मलाच हसू आलं. आपण किती वरवरचा विचार करत असतो असंच वाटत राहीलं. जे कांही घडणार आहे ते तोच घडवणार आहे, मग आपला अन्नाचा शेर कुठं आणि किती दिवस हे ठरवणारे आपण कोण?
माझं खाणं आवरलं. शिपायाने सर्व्ह केलेला चहा घेऊन मी माझ्या टेबलावरची पुढची फाईल समोर ओढली तेव्हाच इंटरकाॅमची रिंग वाजली. फोन रिसेप्शनिस्टचा होता. ‘जस्ट अ मिनिट’ म्हणत तिने तो बंद केला. कदाचित वखरेसाहेबांनी आपल्याला बोलावलं तर नसेल? असंही वाटून गेलं पण ते तेवढंच. कारण माझी स्वेच्छानिवृत्ती आणि त्याचे मंजूरीपत्र हे विषय माझ्यापुरते मी पुसूनच तर टाकले होते! पण.. ते खोटं ठरवणारं, अचंबित करणारं वास्तव वखरेसाहेबांच्या केबिनमधे माझी वाट पहातंय याची मला पुसटशीही कल्पना नव्हती!
आज इतक्या वर्षांनंतरही त्यातला थरार मी विसरू शकलेलो नाहीय.
मी केबिनमधे जाताच वखरेसाहेबांनी माझं हसतमुखाने स्वागत केलं.
“काॅंग्रच्युलेशन्स अॅण्ड आॅल द व्हेरी बेस्ट.. ” ते म्हणाले.
त्यांचे प्रसन्नचित्ताने मला अशा शुभेच्छा देणं माझ्यासाठी त्याक्षणी वास्तव नव्हे तर स्वप्नवतच वाटत राहिलं.
“मिस्टर श्रीवास्तव, अवर नागपूर रिजनल मॅनेजर वाॅज नाॅट रेडी टू गीव्ह क्लीनचीट टू यू. तुमच्या Voluntary retirement साठी it was a big obstacle.. ” ते म्हणाले.
पण मग हा तिढा असा अचानक सुटला कसा हेच मला समजेना.
” तुम्ही नका दडपण घेऊ. होईल सगळं व्यवस्थित. मी आहे ना..? ” कांही दिवसांपूर्वीचे मला आश्वस्त करणारे वखरे साहेबांचे शब्द मला आठवले. ते केवळ माझी समजूत घालण्यासाठी बोललेले वरवरचे शब्द नव्हते याची ग्वाही आज दिवसभरात काय घडलं ते त्यांच्याकडून ऐकताना मला प्रत्येक क्षणी जाणवत होतं!
कर्मयोगिनी महिला संस्था, पुणे यांनी ‘पत्रलेखन स्पर्धा’ आयोजित केली होती. या स्पर्धेत आपल्या समुहातील साहित्यिका विभावरी कुलकर्णी यांच्या पत्रलेखनास प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.
ई-अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे विभावरी कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐💐
आजच्या अंकात वाचूया त्यांचे प्रथम पुरस्कार प्राप्त रचना – “पत्रलेखन…”
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆
विविधा
☆ पत्रलेखन ☆ विभावरी कुलकर्णी ☆
(प्रथम पुरस्कार प्राप्त)
****
आदरणीय मॅडम,
सप्रेम नमस्कार.
आज तुम्ही आमच्यात देहरूपाने नसलात, तरी तुमची आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही. आपली पहिली भेट झाली तेव्हा जणू काही जन्मांतरीचे ऋणानुबंध असावेत, असा भास झाला होता. तुमच्या भेटीमुळे कोड्यासारखे गुंतागुंतीचे वाटणारे माझे आयुष्य एखाद्या सुंदर फुलासारखे उलगडत गेले. तुम्ही मला आयुष्याचा खरा उद्देश समजावून सांगितलात आणि त्यामुळेच मला जीवनाची एक नवी दिशा सापडली.
आज मी जी काही यशस्वी ‘रेकी मास्टर’ आहे, ते केवळ तुमच्यामुळेच. तुम्ही दिलेली दीक्षा, तुमची शिकवण आणि तुम्ही करून घेतलेली प्रात्यक्षिके माझ्या यशाचा पाया ठरली. तुमच्या मार्गदर्शनाखाली मी विविध ध्यानाचे (Meditation) प्रकार शिकले. तुमच्या सान्निध्यात आल्यावरच मला जाणीव झाली की माझी ज्ञानाची झोळी किती रिकामी होती. प्रत्येक शिष्याला समान वागणूक आणि समान ज्ञान देण्याची तुमची वृत्ती आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी होती.
रेकीचा खरा अर्थ आणि या पवित्र प्राणशक्तीचा उपयोग कसा करावा, याचे पूर्ण ज्ञान तुम्ही मला दिलेत. पंचमहाभूते, त्यांची उपयुक्तता आणि त्यांची ऊर्जा कशी प्राप्त करावी, हे तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष अनुभवातून शिकवलेत. रेकीचा उगम आणि त्यामागचे शास्त्र तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितले की, त्यामुळेच मला आज समाजसेवेची संधी प्राप्त झाली आहे. तुम्ही दिलेल्या शिकवणीचा उपयोग मी आज लोकांसाठी करत आहे आणि त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत.
कृतज्ञतेत कसे राहावे, आभार मानण्याचे महत्त्व काय असते, चराचर सृष्टीशी स्वतःला कसे जोडून घ्यावे आणि भूतदया कशी असावी, सर्वात राहून अलिप्त कसे असावे, लोभ – मोह दूर कसे ठेवावेत, निरपेक्ष वृत्तीने सेवा कशी करावी.
हे संस्कार तुम्ही माझ्यावर बिंबवलेत. आजही एखादा कठीण प्रसंग समोर उभा ठाकला की, तुमच्या नोट्स आणि तुमची शिकवण मला मार्ग दाखवते. आजही मनातल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या आठवणींतून मिळतात. आपल्यात गुरु-शिष्या पलीकडचे एक अतूट नाते निर्माण झाले होते. आपण दोघींनी मिळून मेडिटेशनवर एक पुस्तक लिहायचे ठरवले होते, पण काळाने ती इच्छा अपूर्णच ठेवली.
तुमची शिकवण आणि तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत, याची मला खात्री आहे. ते आशीर्वाद असेच कायम लाभोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
☆ आकाश कवेत, पाय मात्र जमिनीवर… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
१९९२ मध्ये भारत सरकारने जे आर डी टाटा यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी किताब देऊन त्यांचा सन्मान केला. ही आनंदाची बातमी त्यांना रतन टाटा यांनी कळवली. ही बातमी ऐकल्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली, ती त्यांचे मोठेपण दर्शवणारी आहे. ते म्हणाले, ” O my God, why I am selected for this honour? आपण हे थांबवण्यासाठी काही करू शकतो का? भारतात इतरही अनेक महान लोक आहेत जे भारतरत्न या किताबास पात्र आहेत. मी असे काय मोठे केले? मी जे काही माझ्या आयुष्यात केले ते माझे कर्तव्यच होते. मी ते उत्तम प्रकारे पार पाडले एवढेच! मी देशाला विमानसेवा दिली आणि मूल्याधारीत उद्योगसंस्कृती रुजविण्याचा प्रयत्न केला. पण म्हणून मी एवढ्या मोठ्या सन्मानाला पात्र आहे का? “
पदव्यांसाठी, पुरस्कारांसाठी हव्यास करणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही प्रतिक्रिया आहे. आज प्रत्येक जण मोठेपणाला हपापलेला असतो. मी इतरांपेक्षा किती श्रेष्ठ, मला किती समजते हे दाखवण्याच्या प्रयत्नात असतो. कधी कधी हे दाखवण्याच्या प्रयत्नात ती व्यक्ती केविलवाणी दिसते हेही खरेच! राजकारण हे खरे तर समाजसेवेचे क्षेत्र. परंतु या क्षेत्रात काम करणारे समाजसेवेच्या उद्देशाने अभावानेच येतात. बहुतेकांना सत्ता किंवा पद हवे असते. ते नाही मिळाले तर ते वाटेल त्या थराला जाण्यासाठी कमी करत नाही हे आजकाल आपण पाहतो आहोत. या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात असे सारखे पक्षांतर सत्तेसाठी सुरू राहते.
ज्याप्रमाणे जेआरडी टाटा यांनी त्यांना भारतरत्न पुरस्कार भारत सरकारने जाहीर केल्यानंतर प्रतिक्रिया दिली ती पाहून म्हणावेसे वाटते की खरोखर अशा व्यक्ती धन्य होत. भारताचे भूषण होत. कोणतीही अपेक्षा न बाळगता अशा व्यक्ती आपले कर्तव्य निरलसपणे करीत राहतात.
असेच आणखी एक उदाहरण आठवते. १९५२ सालची गोष्ट आहे. प्रख्यात शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांनी जर्मनीतून इस्रायलमध्ये स्थलांतर केले होते. त्यावेळी इस्रायलचे पहिले अध्यक्ष चॅम वेजमेन यांचे नुकतेच निधन झाले होते. अशावेळी आईन्स्टाईन यांना इस्रायलचे दुसरे अध्यक्ष होण्याबद्दल विचारण्यात आले. त्यांच्यासारख्या अत्यंत बुद्धिमान व्यक्तीने इस्रायलचे अध्यक्ष व्हावे अशी जनतेची इच्छा होती. वास्तविक जर्मनीतून आलेल्या एका अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा हा फार मोठा सन्मान होता. परंतु आईन्स्टाईन यांनी अत्यंत नम्रपणे ही ऑफर नाकारली. ते आपल्या उत्तरात म्हणाले, ” तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आणि प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. त्यासाठी आपला मनापासून आभारी आहे. परंतु त्याचबरोबर मला हेही आपल्याला सांगितले पाहिजे की आपण जे पद मला देऊ करत आहात त्या पदावर बसण्याची माझी पात्रता नाही. कारण गुंतागुंतीच्या अशा मानवी संबंधांच्या क्षेत्रात मला फारसं कळत नाही. त्या विषयाचा मी कधी अभ्यासही केला नाही. मला गणितात आणि भौतिकशास्त्रात थोडीफार गती असेल पण माझी मनापासून अशी इच्छा आहे की त्याच क्षेत्रात मी आणखी परिश्रम करावेत आणखी अभ्यास करावा. “
महान व्यक्ती खरोखरच महान का असतात त्याचे उत्तर म्हणजे मला वाटतं वर आईन्स्टाईन यांनी दिलेली प्रतिक्रिया. नाहीतर आपल्याला एखादे पद मिळावे म्हणून आपण किती आसुसलेले असतो. आपल्याला कोणत्याही विषयात गती आहे आणि आपल्याला कोणतेही काम जमू शकते अशा विचाराने सत्तेकडे किंवा पदांकडे धाव घेणाऱ्यांची सध्या कमतरता नाही. परंतु जेव्हा अशा अयोग्य किंवा अपात्र व्यक्ती पदावर येतात तेव्हा ते त्या पदाला न्याय देऊ शकत नाहीत हे आपण पाहतो.
रामकृष्ण परमहंस, संत गाडगेबाबा, विनोबा भावे, साने गुरुजी यांच्यासारखी थोर मंडळी कोणालाही आपल्या पाया पडू देत नसत. वास्तविक ते काय किंवा आणखी इतर संत काय यांची योग्यता खरोखरच फार मोठी! पण त्यांचे म्हणणे असे असायचे की वाकायचंच असेल तर त्या सर्वशक्तिमान अशा परमेश्वरापुढे वाका. इतरांपुढे नाही. दुसऱ्याला आपल्यापुढे वाकायला लावून काहीच साधत नाही. वाकायला लावणाऱ्याचा अहं वाढत जातो आणि वाकणाऱ्याच्या मनात कमीपणाची भावना!
आम्हाला तर आमच्या कोणी पाया पडले तर केवढा आनंद होतो! आमचा अहम सुखावतो! मला किती लोक नमस्कार करतात हे आपण इतरांना अप्रत्यक्षपणे दाखवून देतो आणि आपण किती मोठे आहोत हेही त्यातून दाखवण्याचा प्रयत्न असतो. अर्थात सगळेच असे असतात असे नाही. काही जण ज्यांच्या पुढे वाकावे किंवा नम्र व्हावे अशा योग्यतेचे असतातच!
या सगळ्या थोर व्यक्तींनी दाखवून दिले आहे की, ‘पद’ माणसाला मोठे करत नाही, तर ‘कर्तृत्व’ आणि ‘नम्रता’ या गुणांमुळे माणूस मोठा होतो. कवी दत्ता हलसगीकर आपल्या कवितेत म्हणतात
“आभाळाएवढी उंची ज्यांची, त्यांनी थोडे खाली झुकावे,
मातीत मळले जन्म ज्यांचे, त्यांना जरा उचलून घ्यावे…”
महाराष्ट्राच्या मातीतील संतांनी तर ही ‘उंची’ प्रत्यक्ष जगून दाखवली. संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर हातात खराटा घेऊन स्वच्छतेचे कार्य केले. लोक त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचे, पण ते स्वतः मात्र गरिबांच्या झोपड्यांत जाऊन त्यांना ‘उचलून धरण्याचे’ काम करत राहिले. त्यांनी सत्तेच्या सावलीलाही स्पर्श केला नाही. तर दुसरीकडे साने गुरुजी यांनी आपल्या साध्या राहणीतून आणि उच्च विचारांतून समाजाला माणुसकीचे धडे दिले. त्यांनी कधीही राजकीय पदाची अभिलाषा धरली नाही, उलट मातीत मळलेल्या कष्टकरी वर्गाला स्वाभिमान मिळवून दिला.
आज आपण पाहतो की, कोणत्याही छोट्या पदासाठी लोक एकमेकांचे पाय ओढतात. ‘आधी सिद्धी आणि मग प्रसिद्धी’ हे जीवनाचे सूत्र आहे. यशाचा मंत्र आहे. पण याचा विसर पडल्यामुळे केवळ नावासाठी आणि प्रसिद्धीसाठी धावणारी माणसांची शर्यत दिसते. खरी श्रेष्ठता आधी ‘सिद्ध’ करण्यात असते. मग प्रसिद्धी आपोआपच मिळते. ‘ न मागे तयाची रमा होय दासी ‘ असे म्हटले जाते. ज्यांच्याकडे खरोखरच ‘उंची’ असते, त्यांना ती ओरडून सांगावी लागत नाही; ती त्यांच्या नम्रतेतूनच झळकत असते.
शिखरावर जाणे महत्त्वाचे आहेच, पण त्याच वेळी पाय जमिनीवर असणे हे त्याहूनही अधिक महत्त्वाचे आहे. कारण जमिनीवर पाय असतील तरच माणसाला दुसऱ्याची वेदना समजते आणि आकाशाचा आवाका उमजतो. या सगळ्या व्यक्तींच्या कवेत आकाश होते पण पाय मात्र जमिनीवर होते.
कविवर्य बा भ बोरकर यांच्या ‘लावण्यारेखा’ या कवितेतील या ओळी मला फार आवडतात. ते म्हणतात
युद्ध हा शब्द आपण रामायण महाभारत हे वाचताना ऐकला यावरचे सिनेमे त्याच्या सिरीयल पाहताना ते पाहायला खूप मजा येत होती. रावणाची 10 तोंड बाणाने कापली जात असताना लहानपणी छान वाटायचं… मग बिभीषण सांगायचा नेमका बाण कुठे मारायचा आहे… मग रावण मरायचा… रामाचा विजय… रावणाचा अंत्यविधी… त्याला रामाची उपस्थिती… आणि मग सितेला घेऊन रामाचे परतणे…!
तसंच महाभारतामध्ये कुरुक्षेत्रावर झालेले युद्ध. सख्खे आणि चुलत यांचं… श्रीकृष्णाने सांगितलेली गीता… कुरुक्षेत्रावरती असलेल्या व्यवस्था… म्हणजे उद्या सैन्याचा किती सैनिकांचा स्वयंपाक करायचा किती मेले आहेत… किती उरले आहेत… हे श्रीकृष्ण खात असलेल्या शेंगाच्या टरफलावरून ठरत असे… आणि तितक्या लोकांचा स्वयंपाक युद्धभूमीवर व्हायचा… ह्या सगळ्या रंजक कथा वाचून कमाल वाटायची.
मी सातवीत असताना हिंदी प्रवीण परीक्षेला बसले होते. खरं तर ती परीक्षा बीए समकक्ष होती आणि मी फक्त सातवीत. त्यात अभ्यासाला एक पुस्तक होतं ‘भारत दर्शन ‘आणि त्यात काही लेख होते त्यातला कुरुक्षेत्रावरचा एक शेवटचा लेख होता त्यामध्ये मरताना दुर्योधन युधिष्ठराला म्हणतो “युधिष्ठिर मै तो विरोंको साथ लेकर स्वर्ग जा रहा हूं तुम विधवाओंको लेकर राज करो”*हे वाक्य संदर्भा सहित स्पष्टीकरण.. चार मार्क इतकाच अभ्यास केला… पण त्या वाक्याचा खरा अर्थ मोठ झाल्यावर कळायला लागला… की अरे खरंच युद्धामध्ये सर्वात जास्त नुकसान कोणाच होत असेल तर ते स्त्रियांचं होतं. पुरुष सगळे सैनिक… ते युद्धभूमीवर मरतात तो मरणारा माणूस कोणाचातरी भाऊ असतो, कुणाचा तरी मुलगा असतो, कुणाचा तरी बाप असतो, कुणाचा तरी नवरा असतो, आणि या सगळ्या बायकांची म्हणजे आई मुलगी बायको या सगळ्यांची यानंतर परवड होते म्हणजे सर्वात जास्त नुकसान स्त्रियांचं होतं… त्यांना वैधव्य घेऊन बिनआधाराचे जगावे लागते आणि ते खरोखर कठीण होते… आणि तो विजय पांडवांच्या हातात येताना सुद्धा त्याला कारुण्याची केवढी झालर होती हे आपल्या लक्षात येईल. पांडव कोणावर राज्य करणार होते? … पुरुष तर सगळे मेले होते ना युद्धात…! ही ही सगळी त्याकाळी होणारी जमिनीवरची युद्ध त्या युद्धाला नियम होते. सामान्य माणसाला त्याची झळ फक्त या पद्धतीने लागत होती मालमत्तेचं नुकसान नव्हतं आताची युद्धं वेगळी आहेत पण कारणं तीच आहेत.. सत्ता…! माझ्या हातात सत्ता असायला हवी. आपल्या भूभागापलीकडे जाऊन मला सत्ता हवी आहे. आणि तो भूभाग मला काबीज करायचा आहे. तेच कारण आहे… तेल साठ्यांचा भूभाग आपल्या ताब्यात कसा येईल यासाठी प्रयत्न…! यामध्ये भारत मात्र चतुर आहे. एकीकडे विरोधी पक्ष हाकाटी पिटत आहे की भारताने कोणाची तरी बाजू घ्यावी नरेंद्र मोदी सारखा हुशार पंतप्रधान त्यांनी कोणाची बाजू घेणे पसंत केले नाही पण आपणच युद्धात मध्यस्थी केली पाहिजे अशी परिस्थिती मात्र फार पूर्वीपासून त्यांनी तयार केली आहे चाबहार(चारबहार) बंदर
विकसित करून भारताने त्या ठिकाणी मोठे काम केले आहे त्यामुळे हा भौगोलिक प्रदेश तेल साठे उपलब्ध करून देण्याला अत्यंत उपयुक्त आहे तो विकसित करून देण्याची ताकद भारतीय इंजिनियर्स मध्ये आहे त्यामुळे इराणला आपल्या विरोधात जाऊन चालणार नाही तसेच ट्रम्प साहेबांना सुद्धा युद्धामध्ये तेल साठ्यावरती आक्रमण करायचे नाही. कारण ते संपले तर युद्धाचे कारण संपेल तेव्हा यातील काही बेटांवर येथे तेल साठे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत ती बेटे सुरक्षित आहेत.! … कालच बातमी आपण वाचली की रिलायन्स कंपनीने तेला साठ्याबद्दल मोठा सौदा केला आहे वगैरे वगैरे… हे काय आज ठरलेलं नसतं अनेक वर्षापासून याची योजना झालेली असते ते साठे आपल्या वर्चस्वाखाली कसे येतील याची तरतूद मोदी सरकारने आधीच करून ठेवली त्यामुळे आता मध्यस्थिला जर बोलावलं गेलं तर ते फक्त मोदींना बोलवलं जाईल आणि युद्ध थांबेल. युद्ध भौगोलिक कारणाने सुरू होते त्याने इतिहास घडतो, बदलतो, सत्ता पालट होऊ शकतो, याचा नेमका फायदा कसा उठवायचा याचे ज्याला सूत्र कळाले तो त्या युद्धात न पडताही त्यावर वर्चस्व गाजवतो.
भारतासारख्या शांतता प्रिय राष्ट्राला युद्ध नकोच आहे.. कुणाचेच नकोय! कारण आम्ही बुद्धाला मानणारे लोक आहोत कोणत्याही देशातल्या शाळेतली मुलं एखाद्या बॉम्बने मृत्युमुखी पडणं या बातमीने आमच्या देशातला प्रत्येक नागरिक अस्वस्थ होतो. युद्धात अपरिमित हानी होते ती महिलांची आणि मुलांची परवा तर मी एक व्हिडिओ पाहिला आजूबाजूला मोठ्या प्रमाणात बॉम्ब चे गोळे पडत होते. अंगाला तोंडाला काळ लागलेल आहे पडल्यामुळे काहीतरी थोड्याशा जखमा झाल्यात असा एक छोटा मुलगा जो पाठीमागे होत असलेल्या बॉम्ब च्या आवाजाने भयभीत झालेला आहे आणि तो हात हलवून सांगत होता” प्लीज स्टॉप इट प्लीज स्टॉप इट “… त्याच्या चेहऱ्यावरचे भय पाहून डोळे पाणावले. तसेचयुक्रेंनच्या युद्धाच्या वेळी सुद्धा तेथील मुलांना सुरक्षितपणे हलवत होते तेव्हा एक मुलगी अगदी पाच सहा वर्षाची बापाला सोडून जायला तयार नव्हती आणि ते दोघे इतके धाय मोकलून रडत होते. त्यांच ते दूर जाणं बघून पोटात अक्षरशा कालवत होत..! काय मिळवणार आहोत जमिनीच्या तुकड्यावर सत्ता साधून..? हे सत्तेची अभिलाषा असणाऱ्यांनाच ठाऊक पण दुनियेतल्या सगळ्या दुःखाची जाणीव झाल्यानंतर शांततेच्या शोधात फिरलेल्या बुद्धांनी जी शिकवण आम्हाला दिलेली आहे त्यामुळे आपण भारतीय लोक युद्धापेक्षा शांती पसंत करतात परवाच्या ऑपरेशन सिंदूर मध्ये आम्ही फक्त जो संदेश द्यायचा होता तो दिला वास्तविक पाहता पाकिस्तान बरोबर दोन हात करून त्याला नेस्तनाबूत करणे इतकी ताकद भारताकडे नक्कीच आहे पण आपल्याकडे एक मंत्र आहे फुत्कारो लेकिन काटो नही आम्हाला कोणालाही बेचिराख करायचे नाही त्या देशातल्या निरपराध सामान्य माणसाला काहीच करायचे नव्हते तुम्ही तुमच्या देशात सुखाने नांदा आम्ही आमच्या देशात पण… पण जर काही कराल तर मात्र सोडणार नाही हे नुसत्या फुत्कारण्यावरून आम्ही दाखवून देतो आमच्यासमोर उदाहरण असतं… सगळं जग जिंकल्यानंतरही मोकळ्या हाताने परत जाणाऱ्या नेपोलियनचे… आणि प्रेतांचे खच पाहून अस्वस्थ झालेल्या सम्राट अशोकाचे… म्हणून आम्हाला भारताला युद्ध नकोच आहे. आम्हाला फक्त बुद्ध हवा आहे! शांततेचा संदेश देणारा… स्थिर जीवनाची शाश्वती देणारा… निसर्गाला जपायला सांगणारा. आणि युद्धभूमी वरती ही गीता सांगणारा कृष्ण.. आम्ही आजही पसंत करतो आणि मला वाटते हेच आम्हा भारतीयांच्या संतोषकारक समाधानाच्या जीवनाचे रहस्य असावे…!
टीप :वरील लेख खूप अभ्यासाचा नाहीच आहे मला नेमकं काय वाटलं त्याचा आहे त्या दृष्टिकोनातून याचे मूल्यमापन करावे.
जन्माने ख्रिश्चन पण मनाने हिंदू असलेली एक ब्रिटिश महिला म्हणजे ॲनी बेझंट.भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एकनिष्ठ व्यक्ती त्या ठवल्या.ॲनी बेझंट यांचा जन्म एक ऑक्टोबर १८४७ रोजी लंडन येथे झाला. त्या पाच वर्षाच्या असताना वडील विल्यम पेजवुड यांचे निधन झाले. ते विद्वान, तत्त्वज्ञ व बहुभाषी होते. आई एमिली ही धार्मिक, कष्टाळू होती. पण पेजवुड यांच्या निधनानंतर आई कौटुंबिक अडचणीत सापडली. त्यामुळे त्यांच्या मैत्रिणीने ॲनीचे शिक्षण व पालन पोषण केले. त्या धार्मिक बनल्या. पुढे १८६७ मध्ये रेव्हरंट फ्रॅंक बेझंट या ख्रिस्ती धर्मोपदेशका बरोबर त्यांचा विवाह झाला. देवावरील श्रद्धेवरून दोघात मतभेद झाले आणि बेझंट यांनी घटस्फोट घेतला.
त्या स्त्री सुधारणावादी होत्या. कामगारांची युनियन स्थापन केली. महिला कामगारांचा संप घडवून आणला. लेखन भाषण मार्गाने समाज सुधारण्याचा प्रयत्न केला. पुढे १८८९ मध्ये थिओसॉफिकल सोसायटीची त्यांचा संबंध आला. ही संस्था अध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा शोध घेणारी व विश्वबंधुत्वाला प्रोत्साहन देणारी होती. त्यात त्या सामील झाल्या. १८९३ च्या सर्व धर्म परिषदेत थिओसाॅफिकल सोसायटीचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. १८९३ मध्ये या सोसायटीच्या प्रसारासाठी त्या भारतात आल्या.
भारताच्या स्वातंत्र्याचा त्यांनी सक्रिय पुरस्कार केला. लोकमान्य टिळकांबरोबर होमरूल चळवळ उभारली. तुरुंगवासही भोगला.१९१७ च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (कलकत्ता) अध्यक्ष पद त्यांनी भूषविले. या पदावरच्या त्या पहिल्या महिला ठरल्या. स्वातंत्र्य लढ्यात पंडित नेहरू, महात्मा गांधी यांनाही त्यांनी सहकार्य केले. त्यांच्या प्रयत्नाने भारतात अनेक शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या. महिला शिक्षणावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. १८९८ मध्ये बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली. यातूनच पंडित मदन मोहन मालवीय यांचे बनारस हिंदू विश्वविद्यालय स्थापन झालं. मुलींसाठी सेंट्रल हिंदू स्कूल फॉर गर्ल्स ची स्थापना करून शैक्षणिक सुधारणांचा पाया घातला.
भारतीय तत्त्वज्ञान, संस्कृती आणि अध्यात्म यांचा सखोल अभ्यास त्यांनी केला. लेखिका व व्याख्याता म्हणून प्रसिद्ध झाल्या. भारतभर प्रवास करून रामायण, महाभारत, उपनिषदे यावर अनेक व्याख्याने दिली. १९०५ मध्ये गीतेचे इंग्रजी भाषांतर केले. २५० ग्रंथ लिहिले. भारतीयांनी प्राचीन परंपरा विसरू नये यासाठी त्यांचा हा प्रयत्न होता. पाश्चात्य स्त्रीने भारतीय संस्कृतीचा मोठेपणा सांगावा हे पाहून लोक प्रभावित झाले. त्यांना मानू लागले. पण सनातनी हिंदू मात्र त्यांना आपल्या शत्रू समजत. सहभोजने, बालविवाह प्रतिबंध, स्त्रियांची सुधारणा इत्यादी क्षेत्रात त्यांनी काम केले. मद्रास येथे ‘कॉमन विल’ आणि न्यू इंडिया’ ही वृत्तपत्रे सुरू केली. असहकार व सत्याग्रह या बाबतीत मात्र गांधींची त्यांचे मतभेद झाले.
मद्रास येथे १९३३ मध्ये ॲनी बेझंट यांचे निधन झाले. पार्थिव देहाचे दहन करून रक्षेचा अंश गंगेत विसर्जित करण्यात आला. ब्रिटिश असूनही भारतीयांविषयीची आत्मियता, समाज सुधारण्याची तळमळ होती. त्या प्रकांड पांडित्य, वक्तृत्व, कार्यक्षमता, स्मरणशक्ती, दीर्घोद्योग, वक्तशीरपणा अशा अष्टपैलू होत्या. ॲनी बेझंट एकदा भारतात आल्या त्या इथल्याच होऊन राहिल्या. पुढील पिढ्यांना प्रेरणादायी असे समर्पित जीवन त्या जगल्या.