मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४९ आणि ५० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४९ आणि ५० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ४९ – – 

सदा बोलिल्यासारीखे चालताहे|

अनेकी सदा एक देवासी पाहे|

सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा|

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा|४९|

अर्थ :  जो बोलण्याप्रमाणे वागतो, परमेश्वराची जरी अनेक रूपे असली तरी तो एकच आहे या दृष्टीने त्याच्याकडे पाहतो, सगुण परमेश्वराची उपासना करताना त्याच्या मनामध्ये कोणतीही शंका असत नाही असा भक्त त्या सर्वोत्तमाचा श्रेष्ठ भक्त असतो.

विवेचन : खऱ्या भक्ताची फार सुंदर लक्षणे समर्थांनी या ठिकाणी सांगितली आहेत. परमेश्वराचा प्रिय भक्त होणे ही सोपी गोष्ट नाही. जशी रोगातून बरे होण्यासाठी अनेक पथ्ये पाळावी लागतात, तशीच पथ्ये भक्ताला देखील पाळावी लागतात. आपले संत म्हणजे “बोले तैसा चाले” या तुकोबांच्या उक्तीचे मूर्तिमंत उदाहरण होत.

व्यवहारामध्ये आपण बऱ्याच वेळा खोटे बोलत असतो. बऱ्याच व्यक्ती बोलतात एक आणि करतात दुसरे ! अशा व्यक्ती दुसऱ्याला उपदेश करण्यात आघाडीवर असतात. परंतु स्वतःवर वेळ आली की त्यांचे वागणे वेगळे असते. आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये घाला असे सांगणाऱ्या बऱ्याच व्यक्तींची मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताना दिसतात. लग्नप्रसंगी हुंडा घेऊ नये, अवास्तव खर्च करू नये अशी सांगणारी मंडळी त्यांच्या मुलांच्या लग्नामध्ये या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून वारेमाप खर्च करताना दिसतात. असे वागणे म्हणजे दुटप्पी वागणे होय.

संतांच्या बोलण्यात आणि वागण्यात एकवाक्यता असते. “काय उणे आम्हां विठोबाचे पायी… “असे तुकाराम महाराजांनी म्हटले. किंवा “सोने रूपे आम्हां मृत्तिकेसमान, ” असे जे त्यांनी म्हटले ती त्यांची अंतरंगातून आलेली निरपेक्ष वृत्ती होती. विरक्ती त्यांच्या रक्तात भिनली होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा त्यांना सोने, नाणे, वस्त्र इत्यादी स्वरूपात नजराणा पाठवला तेव्हा त्यांनी तो नाकारला. छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदासांन आपले गुरु मानत. एकदा तर त्यांनी आपले राज्य समर्थांना चिठ्ठी लिहून झोळीत अर्पण केले होते. परंतु समर्थांनी ते त्यांना परत केले. अशी असते संतांची निरपेक्ष वृत्ती !

अशी भक्ती आणि विरक्ती अंगात भिनली पाहिजे. आपण सर्वसामान्य माणसे आहोत परंतु संतांनी दाखवलेल्या या मार्गावर वाटचाल तर करू शकतो ! माझ्या प्रपंचासाठी आवश्यक तेवढे धन मी मिळवीन. इतरांचे धन किंवा पैसा माझ्यासाठी मृत्तिकेसमान असेल. परस्त्रीकडे मी माता किंवा भगिनी म्हणून पाहीन या गोष्टी तर आपल्याला सहज करता येण्यासारख्या आहेत.

ज्याप्रमाणे आपल्या देशाबद्दल बोलताना आपण म्हणतो की आपल्या देशात अनेकतेत एकता आहे. त्याप्रमाणे परमेश्वराची विविध रूपे आणि विविध नावे असली तरी चैतन्यरूपी असलेला तो परमेश्वर एकच आहे. अनेक संतांनी हे सत्य एकमुखाने सांगितले आहे. गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे की ज्याप्रमाणे विविध नद्या एकाच समुद्राला येऊन मिळतात त्याप्रमाणे विविध देवदेवतांना केलेली प्रार्थना माझ्यापर्यंत येऊन पोहोचते. पण आम्ही सामान्य माणसे हे समजून घेताना गोंधळ करतो. देवामध्ये कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ अशा प्रकारचा भेदभाव करत बसतो.

स्थुलाकडून सूक्ष्माकडे तशी सगुणाकडून निर्गुणाकडे आपली वाटचाल झाली पाहिजे. भगवंताचा श्रेष्ठ भक्त ही गोष्ट जाणून असतो. निर्गुण निराकाराप्रती त्याची श्रद्धा असते. परंतु तरी देखील सर्वसामान्यांच्या मनामध्ये भगवंताबद्दल विश्वास निर्माण व्हावा आणि त्यांचीही वाटचाल सगुणाकडून निर्गुणाकडे व्हावी अशी त्याची इच्छा असते म्हणूनच तो सगुणाची देखील पूजा करतो. असे करताना त्याच्या मनामध्ये कोणतीही शंका किंवा कोणताही भ्रम असत नाही. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे हे तो जाणून असतो. असा भक्त भगवंताचा त्या सर्वोत्तमाचा श्रेष्ठ भक्त होय.

स्वसंवाद :: 

१. माझ्या बोलण्यात आणि वागण्यात एकवाक्यता आहे का? मी इतरांना जे सांगतो ते स्वतः पाळतो का, याचा मी कधी प्रामाणिकपणे विचार केला आहे का?

२. परमेश्वराची विविध रूपे पाहताना माझ्या मनात श्रेष्ठ-कनिष्ठाचा भेद येतो का? “अनेकी एक” हे तत्त्व माझ्या उपासनेत उतरले आहे का?

३. संतांच्या निरपेक्ष वृत्तीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून माझ्या दैनंदिन जीवनात मी एखादी तरी गोष्ट निरपेक्षपणे करतो का?

४. सगुण उपासना करताना माझ्या मनात शंका, भ्रम किंवा न्यूनगंड येतो का? माझी श्रद्धा अविचल आहे का?

५. “सर्वोत्तमाचा दास” होण्याच्या दिशेने माझी वाटचाल सुरू आहे असे मला वाटते का?

– – – 

श्लोक क्र. ५० – – 

नसे अंतरी कामकारी विकारी |

उदासीन जो तापसी ब्रह्मचारी|

निवाला मने लेश नाही तमाचा|

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा |५०|

अर्थ : ज्याच्या मनामध्ये कामवासनेसारख्या निरनिराळ्या प्रकारच्या विकार उत्पन्न करणाऱ्या वासना उत्पन्न होत नाहीत, जो वृत्तीने विरक्त असून ब्रह्मचारी राहून तपस्या करतो, ज्याच्या मनात क्रोधाचा लवलेशही उरत नाही, ज्याचे मन अत्यंत शांत आणि क्रोधरहित होते, असा मनुष्य त्या सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय.

(कामकारी – कामवासना, विकारी – विकृती/अशांती निर्माण करणारा, उदासीन – तटस्थ/निर्विकार, निवाला – शांत/तृप्त, लेश – अंश, तम – अंधार /अज्ञान/ मोह/ अविचार)

विवेचन : मागील काही श्लोकांपासून समर्थ आपल्याला खऱ्या भक्ताची लक्षणे सांगत आहेत. एकेक श्लोक वाचून त्याचा अर्थ लक्षात घेतला की आपणही मानसिकदृष्ट्या खऱ्या अर्थाने समृद्ध होत जातो. आपण जर साधक असू, तर आपण कसे असायला हवे हे यातून कळते.

कामवासना ही माणसाच्या मनातील इतर वासनांपेक्षाही अधिक बलवान असलेली वासना असते. ती अनेक विकार म्हणजेच विकृती उत्पन्न करते. जेव्हा कामवासनेवर माणसाचे नियंत्रण नसते, तेव्हा त्याची बुद्धी काम करत नाही. त्याचा विवेक हरवतो आणि मग नको त्या गोष्टी त्याच्या हातून घडतात. समाजात अनेक राजकारणी व्यक्ती, साधू, संत, बुवा, बाबांचे असे अधःपतन होताना आपण पाहतो.

भगवंताचा सच्चा भक्त मात्र कामवासनेला आपल्या मनाचा ताबा घेऊ देत नाही. वृत्तीने तो उदासीन असतो. या ठिकाणी उदासीन या शब्दाचा अर्थ आपण समजावून घेऊया. सामान्यतः आपण असे समजतो की उदासीन म्हणजे उदास, कंटाळवाणा, ज्याला कशातच गोडी वाटत नाही अशी व्यक्ती. परंतु इथे समर्थांनी हा शब्द त्या अर्थाने वापरलेला नाही. उद् म्हणजे वरच्या दिशेने. लिफ्टला मराठी शब्द उद्वाहक असा आहे. या अर्थाने उदासीन म्हणजे वरची पातळी. सामान्य लोकांपेक्षा साधक एका वेगळ्या वरच्या पातळीवर स्थिर झालेला असतो. देहसुखाला महत्त्व न देता भगवंताच्या नामात तो स्थिर असतो. असा साधक म्हणजे उदासीन.

तो तापस असतो म्हणजे तपस्या करणारा. तपस्या करण्यासाठी आपल्याला कोणी ऋषीमुनी व्हावे लागेल असे नाही तर भगवंताच्या मार्गावर चालण्यासाठी एक प्रकारची साधना आणि त्यातील सातत्य आवश्यक असते. ही साधना म्हणजेच तपस्या असे म्हणता येईल.

‘ब्रह्मचारी’ या शब्दाचा अर्थ देखील या ठिकाणी आपण समजून घेऊ. व्यवहारात आपण ब्रह्मचारी म्हणजे लग्न न केलेला किंवा ब्रह्मचर्य पाळणारा असा अर्थ घेतो. जो विवेकाचा वापर करून आपल्या मनावर संयम ठेवतो आणि ब्रह्मचर्याचे पालन करतो अशी कोणतीही व्यक्ती म्हणजे ब्रह्मचारी. मग ती लग्न झालेली असो किंवा नसो. संसारात राहून देखील ब्रह्मचर्याचे पालन करता येणे शक्य असते आणि खरा साधक त्याचे पालन करतोच. आरोग्य किंवा विद्या प्राप्त करण्यासाठी जसे ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक असते त्याप्रमाणेच साधना मार्गातही ब्रह्मचर्याचे अतिशय महत्त्व आहे.

तिसऱ्या ओळीत समर्थांनी साधकाचे आणखी एक लक्षण सांगितले आहे. ते म्हणजे त्याच्या मनात तमाचा म्हणजे मोह, अज्ञान आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या क्रोधाचा लवलेशही नसतो. काम आणि क्रोध हे बहुधा जोडीनेच आपल्या मनामध्ये वास करत असतात. काम आणि क्रोध या दोन्हींचा अतिरेक झाला की माणूस आपली विचारशक्ती आणि विवेक हरवून बसतो मग त्याच्या हातून नको त्या गोष्टी घडतात. साधनेच्या मार्गावर चालणाऱ्या आणि ज्यांनी बऱ्यापैकी त्यात प्रगती केली आहे अशा व्यक्तींना देखील काम आणि क्रोध यावर नियंत्रण न ठेवता आल्यामुळे त्यांचे अधःपतन झालेले दिसून येते. महर्षी विश्वामित्रांचे उदाहरण तर आपणा सर्वांना माहिती आहे.

खरा भक्त या सगळ्या वासना आणि विचारांवर नियंत्रण ठेवतो. त्याचे मन शांत आणि तृप्त असते. म्हणून आपण जे खरे संत किंवा साधक आहेत, त्यांच्याजवळ शांतीचा अनुभव घेतो. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण प्रसन्नता आणि तेज असते. ते त्यांच्या साधनेतून आणि मानसिक शांततेतून आलेले असते. संत तुकाराम म्हणतात…

शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघेंची दुःख ॥१॥

म्हणउनी शांति धरा । उतराल पैल तीरा ॥ध्रु. ॥

खवळलिया कामक्रोधीं । अंगी भरती आधिव्याधी ॥२॥

तुका म्हणे त्रिविध ताप । जाती मग आपेआप ॥३||

– – म्हणून काम, क्रोध आदी विकारांवर नियंत्रण असलेला, ब्रह्मचर्याचे पालन करणारा आणि साधना मार्गावर सातत्याने वाटचाल करणारा भक्त म्हणजे त्या सर्वोत्तम परमेश्वराचा जगातील उत्कृष्ट असा भक्त होय.

स्वसंवाद :: 

१) माझ्या मनावर कामवासना आणि क्रोध यांचे किती प्रमाणात नियंत्रण आहे – हे मी प्रामाणिकपणे तपासले आहे का ?

२) “उदासीन” म्हणजे वरच्या पातळीवर स्थिर राहणे – माझी साधना मला या पातळीकडे नेत आहे का की मी अजून सांसारिक गोष्टींमध्येच गुंतलेलो आहे ?

३) संसारात राहूनही ब्रह्मचर्य पाळता येते – माझ्या दैनंदिन जीवनात मनावर संयम ठेवण्याचा माझा प्रयत्न किती प्रामाणिक आहे ?

– क्रमशः श्लोक ४९ आणि ५०.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अधिक… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

अधिकलेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

खरं तर अधिक महिना म्हणजे पंचांग, कालमापनामधे येत असलेला फरक काढून कालगणना सुरळीत व्हावी यासाठी केलेली सोय आहे.

पण आपण आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी साजऱ्या करत असतो,

थोडक्यात काय तर इंग्रजी कॅलेंडर मधे लीप वर्ष येते अगदी तसंच.

याला अधिक मास, मलमास, पुरुषोत्तम मास आणि बोली भाषेत धोंडयाचा महिना असं म्हणलं जातं.

या निमित्ताने बरीच व्रत वैकल्ये, जप, तप, वाचन, मनन, नामस्मरण आणि दान यांचे खूप महत्त्व आहे.

या मधे मला काही गोष्टींचा समावेश करावा असे वाटते.

– – चांगल्या सवयी, विचार नेहमीच प्रेरणादायी असतात.

अधिकात करूया 33 सकारांची जोपासना…

सध्या चालू असलेला अधिकमास म्हणजे दानधर्म, व्रतवैकल्ये करुन पुण्यसंचय करायची सुवर्णसंधीच.

अधिक मासात 33 संख्येला विशेष महत्त्व.

दान करायच्या वस्तू 33 या संख्येने – – या दानालाच 33 सकारांची जोड मिळाली तर ! 

कोणते हे ३३ सकार? बघूया…

१) सदाचार  २) सद्भावना ३) समयसूचकता ४) समयपालन ५) समंजसपणा ६) सात्त्विकता ७) सहजता (वागण्या – बोलण्यातील) ८) सौजन्य  ९) स्नेहभाव  १०) स्वयंशिस्त ११) स्वाभिमान १२) सौम्यपणा १३) सुदृढता (शरीर व मनाची)  १४) सत्यवादित्व  १५) संकल्प  १६) संयम  १७ स्मितहास्य १८) सदसद्विवेक १९) सत्संगती २०) समर्पणभाव २१) सरळपणा २२) सौंदर्यदृष्टि २३) सेवाभाव २४) सखोलज्ञान (विशेषतः आपल्या क्षेत्रातील) २५) सरसत्व  २६) सातत्य  २७) समाधान २८) स्वावलंबन २९) सजगता (सावध राहणे) ३०) सुसंस्कार ३१) सहनशीलता ३२) सकारात्मकता ३३) सद्गुरुंसेवा

 हे ३३ सकार आत्मसात करायचे या अधिकमासाच्या निमित्ताने ठरविले तर आयुष्य नक्कीच सफल, सुकर, समृद्ध सुखी होईल. आपण खरोखरच सधन होऊ नाही का?

(पुन्हा ‘स’ आहेच)

… सत्यम् शिवम् सुंदरम् ची अनुभूती यायला वेळ लागणार नाही.

… मात्र हे सकार आत्मसात करायला सकारात्मकता हवी हे निश्चित.

प्रयत्न करायला काय हरकत आहे?…

अधिकस्य अधिकं फलम्

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक  संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नंतर नाही, आताच… – लेखिका : अज्ञात ☆ अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ नंतर नाही, आताच… – लेखिका: अज्ञात ☆ अंजली दिलीप गोखले

“साडी विरण्यापूर्वी नेसून घ्यायला हवी… आणि आयुष्य सरण्यापूर्वी जगून घ्यायला हवं. ”

ही ओळ साधी वाटते, पण तिच्यात आयुष्याचं खूप मोठं तत्त्वज्ञान दडलं आहे.

आपल्या कपाटात अनेक साड्या असतात… काही खास प्रसंगासाठी, काही “नंतर कधीतरी” म्हणून ठेवलेल्या. पण तो “नंतर” अनेकदा कधीच येत नाही. साडी तशीच राहते… आणि हळूहळू तिचा रंग फिका होत जातो.

हेच आपल्या आयुष्याबाबतही होत नाही का?

आपण सतत काहीतरी पुढे ढकलत राहतो—

“आत्ता वेळ नाही… नंतर करू…”

“थोडं स्थिर झाल्यावर जगू…”

“जबाबदाऱ्या कमी झाल्यावर स्वतःसाठी वेळ काढू…”

पण खरं सांगायचं तर,

आयुष्य कुणासाठीही थांबत नाही.

क्षण निघून जातात… आणि आपल्याला कळतही नाही.

आपण इतरांसाठी जगताना स्वतःला विसरतो.

इतरांच्या आनंदात आपला आनंद शोधताना,

आपली स्वप्नं, आपल्या इच्छा… हळूहळू मागे पडतात.

साडीप्रमाणेच आयुष्यही जपून ठेवायचं नसतं,

ते जगून घ्यायचं असतं.

मनात येईल तेव्हा हसायचं,

आवडेल तसं सजायचं,

ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांना वेळ द्यायचा,

आणि स्वतःलाही थोडंसं जगू द्यायचं.

कारण शेवटी,

ना साड्या कायम राहतात…

ना क्षण परत येतात…

म्हणूनच—

“साडी विरण्यापूर्वी नेसून घ्यायला हवी…

आणि आयुष्य सरण्यापूर्वी मनापासून जगून घ्यायला हवं. ”

कारण आयुष्य खूप मोठं नसतं,

पण ते सुंदर नक्की असू शकतं…

जर आपण ते मनापासून जगलो तर…

शेवटी इतकंच—

“उद्या” कधीच खात्रीचा नसतो…

म्हणून आजचं आयुष्य, आजचं हसू, आजचं प्रेम…

आजच जगून घ्या…

 

लेखिका:अज्ञात

प्रस्तुती: अंजली दिलीप गोखले

मोबाईल नंबर 8482939011

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अधिक मास ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ अधिक मास ☆ शालिनी जोशी

यंदा ज्येष्ठ अधिक महिना आहे. रविवार तारीख १७ मे ते सोमवार दिनांक १५ जून २०२६ हा तो कालावधी. त्याविषयी थोडी माहिती.

भारतीय कालगणना चांद्र- सौर पद्धतीवरती आधारित आहे. म्हणजे महिन्यांची गणना चंद्राच्या गतीवर आणि ऋतूंची मांडणी सूर्याच्या गतीवर आहे. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करायला एक महिना लागतो. तोच चंद्रमास- तिथी हे एकक. एका महिन्यात ३० तिथी होतात. अमावस्या संपल्यानंतर प्रतिपदेपासून पुढील अमावस्येपर्यंत एक चंद्रमास होतो. हा साधारण २९•५ दिवसाचा असतो. म्हणून बारा महिन्यांचे २९•५ × १२ = ३५४ दिवस होतात. यानुसार सण ठरतात. चंद्र रोज वेगवेगळ्या नक्षत्रातून फिरतो. पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्राच्या जवळ असतो ते नाव त्या महिन्याला दिले जाते. उदाहरणार्थ चित्रा नक्षत्राजवळ पौर्णिमेला असेल तर तो चैत्र महिना. विशाखा नक्षत्राजवळ पौर्णिमेला असेल तो वैशाख.

पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करायला लागणारा काळ हा साधारण ३६५ दिवसांचा. हे सौर वर्ष. यानुसार ऋतू ठरतात. त्यामुळे दोन्ही पद्धतीत अकरा दिवसांचा फरक पडतो. सण दरवर्षी ११ दिवसांनी मागे सरकतात. हे असेच सुरू राहिले तर चैत्र हिवाळ्यात किंवा दिवाळी उन्हाळ्यात येईल. ऋतू आणि सण जुळणार नाहीत. ही विसंगती टाळण्यासाठी अधिक महिना ही संकल्पना. चांद्र वर्षात दोन वर्ष आठ महिन्यांनी, सण तीस दिवस मागे पडतात. म्हणून तिसऱ्या वर्षी एक अधिक महिना घेतला जातो. त्यामुळे सण व ऋतू यांचा मेळ बसतो. सूर्याच्या भासमान मार्गावर बारा राशी. प्रत्येक महिन्यात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशी प्रवेश करतो. मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करतो तो चैत्र महिना असतो. मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश वैशाख महिन्यात. या बदलाला संक्रमण किंवा संक्रांत म्हणतात. काही वेळा अशी स्थिती येते की एका चांद्र महिन्यात सूर्याचा राशी बदल होत नाही म्हणजे संक्रांत येत नाही. ती पहिली अमावस्या संपण्यापूर्वी आणि दुसरी अमावस्या संपल्यानंतर येते. असा महिना अधिक ठरतो. उदाहरणार्थ आत्ताचा अधिक महिना जेष्ठ.

सूर्याचा वृषभ राशी प्रवेश शुक्रवार १५ मे ६:२१ मिनिटांनी आहे. नंतर अमावस्या रविवार तारीख १७ मे मध्यरात्री १:३१ ला संपते. आणि नंतरची अमावस्या १५ जून सकाळी८:२५ ला संपते. नंतर सूर्याचा वृषभ राशीतून मिथुन राशी प्रवेश होतो. म्हणजे या महिन्यात सूर्याचा राशी बदल नाही म्हणून हा अधिक मास. जेष्ठ अधिक मास आहे.

आणि पुढील नीजजेष्ठ आहे. सणवार नीज ज्येष्ठात करण्याची प्रथा आहे. त्यामुळे मागे आलेले सण पुढे जातात. उदाहरणार्थ गेल्यावर्षी १० जूनला असलेली वटपौर्णिमा २९ जूनला येणार. म्हणजे चंद्राचा महिना लहान व सूर्याचा मोठा तेव्हा अधिक मास.

अधिक टाकले म्हणून त्याला मलमास, अशुभ अपवित्र मानले गेले. तेव्हा तो व्यथित होऊन देवाकडे गेला. विष्णूला शरण गेला. विष्णूने श्रीकृष्णाकडे पाठवले. पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्णाने त्याला स्वीकारले. म्हणून तो पुरुषोत्तम मास झाला. पवित्र, व्रत- वैकल्याचा महिना झाला. मुलगी व जावई लक्ष्मीविष्णू मानून त्याना वाण देण्याची प्रथा आहे. एकंदरीत संयम, नम्रता, आदर यांनी युक्त होऊन कुटुंबासाठी, समाजासाठी श्रेयस्कर काही करणे हे या महिन्यातील कर्तव्य समजावे. सातत्य महत्त्वाचे. पुरुषाकडून पुरुषोत्तमाकडे वाटचाल हा अधिक मासाच्या व्रतांचा उद्देश समजावा.

विज्ञान दृष्टीने हा चंद्र, सुर्य, पृथ्वी यांचा खेळ आहे. सण आणि ऋतु यांच्यात एकवाक्यता केली आहे. आपली सौर-चांद्र पद्धत खगोलशास्त्रावर आधारित आहे. दोन्ही कालगणनांशी जुळणारी सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि खगोलीय सुत्रबद्धता असलेली अशी ही तर्कशुद्ध मांडणी आहे.

 (श्री. विनय जोशी आणि श्री. हेमंत मोने यांचे लेखावरून)

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मला आनंदी राहायचे आहे !” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “मला आनंदी राहायचे आहे !” ☆ श्री सुधीर करंदीकर

” मला आनंदी राहायचे आहे ! “ काय करू ? ” या मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर एकदा मलाच सापडलं बरं का.. तुम्हालाही सांगतो.. बघा पटतंय का ?? – – 

 कायम आनंदी राहणे हे सगळ्यांनाच आवडते. तरीपण आनंदी राहणारी मंडळी अगदीच बोटावर मोजण्या इतकीच असते.

 आनंदी राहण्याचे बरेच मार्ग आहेत पण त्यातला सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे बायकोला खुश ठेवणे.

 बरेच जण म्हणतील की दाखवलेला हा मार्ग अगदी बरोबर आहे, पण तो अतिशय खर्चिक आहे. निरनिराळ्या दुकानात त्यांना नेहमी नेऊन त्यांना खुश करणे हे खिशाला परवडणारे नसते.

 सगळ्यांचे हे म्हणणे अगदी बरोबर आहे. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. जसे बायकोला खुश ठेवण्याचा सोपा मार्ग आणि कठीण मार्ग.

 अतिशय सोपा मार्ग म्हणजे बायकोबरोबर कॅरम खेळा, पत्ते खेळा, गाण्याच्या भेंड्या खेळा, आणि, प्रत्येक खेळामध्ये बायकोच जिंकेल अशी काळजी घ्या.

 घरामध्ये बायको आसपास असताना बायकोच्या माहेरच्या मंडळींशी फोनवर गप्पा मारत चला, बायकोची तारीफ करत चला.

 बायकोने केलेल्या जेवणाची / खाद्यपदार्थांची खुल्या दिलानी तारीफ करत चला. थोडं तिखट मीठ इकडे तिकडे झालं असेल तरी त्याकडे दुर्लक्ष करा.

 घरामध्ये झोका असेल, घराच्या बागेत झोका असेल, किंवा जवळच्या बागेत नेऊन तिथल्या झोक्यावर, बायकोला छान झोके द्या.

 बायको एकदम खुश होणार आणि खुश राहणार हे नक्की. अनुभवाचे बोल असेहि म्हणता येईल.

 चला तर मग या छोट्या छोट्या आणि अगदीच बिन खर्चिक गोष्टी करा आणि कायम आनंदी राहा.

 देवाला पण आनंदी माणसं आवडतात.

देव प्रसन्न होणार आणि बायको पण खुश होणार…

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आठवणींच्या पेटीतला खलबत्ता…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “आठवणींच्या पेटीतला खलबत्ता…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी

माझं सासर सोलापूर असल्याने लग्न झाल्यानंतर मी पुण्याहून सोलापूरला आले. त्यावेळेस यांची नोकरी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या… सोलापूर जवळच्या माढा शाखेत होती. काही महिन्यांनी आमचा संसार माढ्याला सुरू झाला. आईने आणि सासूबाईंनी येताना अनेक गोष्टी दिल्या होत्या.

इतर सामानाबरोबर सासुबाईंनी चांगला डबाभर शेंगादाण्याचा कुटही दिलेला होता. कारण सोलापूर म्हणजे प्रत्येक पदार्थात कुट हवाच… तो बरेच दिवस पुरला. नंतर कुट करायचा तर.. घरी खलबत्ताच नव्हता… मग तात्पुरता खालच्या देशपांडे काकूंचा घेऊन आले. तेव्हा असं शेजाऱ्यांकडे काही मागायला जायची लाज वाटत नसे. देशपांडे काकुंचा तर मला खूपच आधार होता. त्या फार प्रेमळ होत्या. वाड्यातल्या लोकांमध्ये एकोपा माया आणि प्रेम होते.

घरात आवश्यक गोष्टी खूप घ्यायच्या होत्या. त्यामुळे खलबत्त्याचा नंबरच लागत नव्हता. हे म्हणाले,

” पुढच्या दोन चार महिन्यात आपल्याला जमेल तेव्हा घेऊ”

 काकुंच्या खलबत्यात कुट आणि चटणी केली. रात्री ह्यांना जेवताना वाढली.

 तर यांनी वेगळाच मुद्दा काढला. ते म्हणाले तुझी चटणी ” मुद्दा “नाही झाली. मोकळी ढाकळी झाली आहे. ” 

 मुद्दा म्हणजे काय हेच मला कळेना. यांना पण ती कशी करायची ते समजावून सांगता येईना.

” पुण्याला आई अशीच करते. “मी म्हणाले. नंतर सोलापूरला गेल्यावर सासूबाईंना विचारलं. त्या म्हणाल्या,

” शेंगादाणे खरपूस भाजून घ्यायचे. सालं काढायची. तिखट, मीठ घालून खलबत्यात चांगलं… कुटायचं आणि मधून मधून चमच्यानी हलवायच… मग शेंगदाण्यातलं तेल आपोआप सुटतं आणि ती नीट गोळा होऊन एकजीव होते. त्यालाच मुद्दा चटणी म्हणतात. “

“हो.. का.. आता मी तशी करत जाईन”

लगेच त्या म्हणाल्या,

” आणि उगीच थोडी करू नकोस जास्तीचीच करत जा. रोज जेवताना लागते. कधी त्यात लसूण घालून करत जा”.

दुसरे दिवशी सासुबाईंनी मला चटणी कशी कुटायची ते शिकवले. थोड्या प्रयत्नानंतर ती जमली. त्यांना म्हटलं,

” इतकी चटणी दोघात लवकर संपणार नाही. “

तर त्यांनी एक चांगली टीप दिली. त्या म्हणाल्या,

” काही दिवसानंतर ती चटणी गवार, वांगी, तोंडली, दोडक्याच्या भाजीत घालून संपवायची. पण लगेच दुसरी ताजी करून ठेवायची.. ” 

अजूनही मी तसंच करते…

हे खलबत्त्याची चौकशी करून आले. नुकताच संसार सुरू झाला होता.. अनेक खर्च… आणि काकूंचा खलबत्ता आणून काम भागत होतं. त्यामुळे नवीन आणायचा मागेच पडत होत. सासरे माढ्याला आले तेव्हा त्यांच्या ते लक्षात आलं. त्यांनी दणकट असा खलबत्ता बनवून घेतला. बत्त्याला पुढे मोठ्या आकाराचा गोल होता. चांगला दोन किलोचा बत्ता होता. सोलापुरला गेल्यावर सासरे मला म्हणाले,

 ” हा बघ तुझ्यासाठी खलबत्ता करून घेतलाय” तो बघून मला फार आनंद झाला. सासर्‍यांच्या धोरणीपणाचे कौतुकही वाटले.

माढ्याला आल्यावर काकूंना आणि शेजारच्यांना आवर्जून घरी तो बघायला बोलवलं. तेव्हा नवीन काही आणलं की त्या गोष्टीच फार अप्रूप वाटायचं.

 येताना सासूबाई माझ्याबरोबर माढ्याला आल्या होत्या. हे म्हणाले,

” आता आईकडून शेंगाच पिठलं शिकून घे. ” 

खरं सांगते ” शेंगाच पिठलं ” हा पदार्थ मी प्रथमच ऐकत होते. सोलापूरचे लोक शेंगदाणे आणि कूट कुठे आणि कसा वापरतील सांगताच येत नाही.

उपमा करायचा पण त्यात हळद घालायची आणि दाण्याचा कूट घालायचा तो रव्या बरोबर शिजवायचा की… झाला तिखटा मिठाचा सांजा…

तर सांगत काय होते..

शेंगाच पिठल… मग सासूबाईंनी कसं करायचं ते शिकवलं.

 दाण्याच्या कुटात तिखट आणि मीठ घालून एकत्र केलं. तेल गरम करून त्यात ते मिश्रण घातलं. दोन मिनिट चांगल परतलं. नंतर त्यात जरा जास्तीच गरम पाणी घातलं. मंद आचेवर झाकण ठेऊन बराच वेळ शिजायला ठेवल. काही वेळानी पाणी आटल्यानंतर कडेला मस्त पैकी लाल रंगाचा तेलाचा तवंग सुटला होता. कूटही छान मऊसर शिजला होता.

पिठल जरा सरबरीतच ठेवलं होतं.

” हे बघ झालं तयार शेंगाच पिठल… “

सासुबाई म्हणाल्या.

खरंच भाकरी बरोबर ते खमंग चटकदार लागत होतं.

 ते मला चांगलं जमायला लागलं. कोणीही येणार असलं तर हे म्हणायचे की,

” आपलं ते शेंगाच पिठलंच कर… “

एकदा बँकेतले साहेब जेवायला आले होते. त्यांना तर ते पिठले फारच आवडले. त्यांनी सगळं सोडून फक्त पिठलं भाकरी खाल्ली.

आता हेच पिठलं” शेंग भाजी ” म्हणून हॉटेलात सव्वाशे ते दीडशे रुपयाला मिळते.

मसाला करायला खलबत्ता लागायचा. पापडाचे पीठ बत्यानी कुटायचं… दाण्याचा कुट तर वरचेवर करायला लागायचा.

अनेक वर्ष खलबत्ता वापरला. काही वर्षांनी मिक्सर घेतला. त्यात तीन वेळा बटण दाबून एका मिनिटात दाण्याची चटणी केली. ती बघून हे म्हणाले,

“ही चटणी बघ… नुसते दाणे तुटून बारीक झाले आहेत. त्याला काही चव नाही. कसली भगरा.. भगरा झाली आहे. “

 त्यांचे ते म्हणणे मलाही पटले. खलबत्त्यातल्या ” मुद्दा ” चटणीची सर त्याला नव्हतीच. चटणी नुसती मोकळी.. ढाकळी झाली होती.

 त्यामुळे कूट मिक्सरवर.

पण चटणी मात्र आवर्जून खलबत्त्यातच केली जायची…

मिक्सर आल्यावर पाटा वरवंटा शेजारच्या एका ताईंना दिला.

पुण्याला बदली झाली. त्या घराची फरशी नाजूक टाईल्स ची होती. जडशीळ खलबत्त्याच्या धक्क्याने ती फुटेल असे यांना वाटायचे. त्यामुळे हे म्हणाले की,

” खाली काहीतरी जाड कापड घेऊनच कुटत जा. “

 अनेक गावात आमची बदली झाली.

 गेली पन्नास वर्षे तो खलबत्ता घरी आहे. काही वर्षांपासून सोलापूरची चटणी पुण्यातही मिळायला लागली. अर्थात त्याला”ती ” चव नाही असचं वाटतं. आता चटणी खाण्याचं प्रमाणही कमी झाल आहे.

खलबत्त्याचा वापरही जवळजवळ होतच नाही.

घरातलं सामान कमी करायचं… पण जुन्या वस्तू वापरल्या जातील अशाच… योग्य व्यक्तींना द्यायच्या… हा विचार होता.

खलबत्ता काढून टाकायला मन तयारच होत नव्हतं. ऊगीचच असू दे… राहू दे… अस माझ चालु होत…

पण एकदा ठरवलंच… तेव्हा त्याचा कोण नीट उपयोग करेल याचा विचार केला.

रोज माझ्याकडे कामाला येणारी शारदा… तिला तो दिला. ती खूपच खुश झाली म्हणाली,

” माझ्याकडे इतका मोठा खलबत्ता कधीच नव्हता. आता माझा मसाला पटकन कुटून होईल. बरं झालं वहिनी तुम्ही दिला. पोराचं लग्न करणार आहे. वाढत्या संसारात मला फार उपयोगी होईल. “

अगदी आनंदाने तिने तो नेला.

त्यादिवशी मनाला उगीचचं चुटपुट लागली.. सासूबाई… सासर्‍यांच्या आठवणींनी डोळे भरून आले..

घरातल्या एका कोपऱ्यात या निर्जीव वस्तू पडून असतात…

पण त्यांच्यावर आपला जीव जडलेला असतो… त्यामुळे त्या वस्तूची अडचण पण वाटत नसते. इतक्या वर्षाच्या संसारात या वस्तूंनी मोलाची साथ दिलेली असते… त्याच्याशी निगडित अनेक आठवणी असतात त्या विसरता येत नाहीत…

खलबत्ता योग्य ठिकाणी दिला याचं समाधान मात्र आहे. शारदा सांगत होती,

“वहिनी तुमचा खलबत्ता खूपजणी माझ्याकडून घेऊन जातात. सगळ्यांना त्याचा ऊपयोग होतोय”.

आपल्या नंतर मुलांना या वस्तूचं करायचं काय… हे कळणार नाही. त्यामुळे अशा वस्तू आत्ताच एक एक करत… घरातून काढत आहे.

मनात मात्र त्या कायमच्या आहेतच…

आज खूप दिवसांनी खलबत्त्याची आठवण आली. म्हणून आठवणींच्या पेटीतून ती बाहेर काढली..

अशा गोष्टींच्या आठवणीतही आनंद आहे…

 

… आता आठवणी काढू आणि आनंद घेऊ..

©  नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४७ आणि ४८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४७ आणि ४८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ४७ – – – 

मनी लोचनी श्रीहरी तोचि पाहे|

जनी जाणता भक्त होऊनि राहे|

गुणीं प्रीति राखे क्रमूं साधनाचा |

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा |४७|

अर्थ : ज्या साधकाला आपल्या देहाच्या आत आणि बाहेर एकमात्र भगवंतच दिसतो, जो जाणता म्हणजे ज्ञानी भक्त म्हणून जगात वावरतो, जो सगुणाचे प्रेम टिकवतो आणि साधनेचा क्रम कायम राखतो असा भक्त म्हणजे सर्वोत्तमाचा (भगवंताचा)दास हा खरोखरीच जगात धन्य होय.

विवेचन : या ४७ व्या श्लोकापासून ते ५६ व्या श्लोकापर्यंत जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा हे अंतिम चरण आहे. यात समर्थ ज्ञानी साधकाचे किंवा भक्ताचे गुण सांगतात.

या श्लोकाच्या पहिल्या ओळीत समर्थ म्हणतात, ” मनी लोचनी श्रीहरी तो चि पाहे” यामध्ये जो परमेश्वराचा भक्त असतो तो मनात आणि लोचनात म्हणजे डोळ्यांमध्ये परमेश्वराचे रूप पाहतो. इथे दोन गोष्टी समजून घ्यायला हव्यात. मनामध्ये त्याचे निर्गुण रूप असते आणि नेत्रांना म्हणजेच बाह्य जगतात त्याचे दृश्य रूप किंवा सगुण रूपाचे दर्शन होते. तात्पर्य म्हणजे आत बाहेर सर्वत्र त्याला परमेश्वराचेच दर्शन होत असते. भक्त हा शब्द जर आपण पाहिला तर जो परमेश्वराशी जोडलेला आहे तो भक्त. विभक्त म्हणजे वेगळा. जो परमेश्वराशी जोडलेला नसतो तो भक्त कसा असेल ?

खऱ्या भक्ताला देव सर्वत्र दिसतो. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी. प्राणीमात्रात सर्वत्र तोच भरलेला आहे. त्याची दृष्टी सम होते. मग भेद राहत नाही. जो आपल्या अंतरात आहे तोच बाहेर देखील आहे हे त्याला लक्षात येते. मग द्वैत राहत नाही. तो अद्वैताचाच एक भाग होतो. तो परमेश्वराशी तदाकार होतो. परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे हे त्याला सांगण्याची आवश्यकता राहत नाही. तरी देखील जेव्हा कधी तो सगुण मूर्तीचे दर्शन घेतो, तेव्हा देखील तो परमेश्वराच्या दर्शनाने भाव विभोर होतो. त्याचे नेत्र पाणावतात.

समर्थांनी “मनी लोचनी तो चि पाहे” असे जे म्हटले आहे, त्यातील “चि “म्हणजेच तोच परमेश्वर त्याला सर्वत्र दिसतो. जसा तो भक्त प्रल्हादाला दिसत होता. आपल्या सर्वसामान्यांच्या दृष्टीला निर्जीव दिसणाऱ्या खांबामध्येही प्रल्हादाला परमेश्वराचे अस्तित्व दिसत होते.

खऱ्या भक्ताच्या डोळ्यासमोर परमेश्वराची सगुण मूर्ती नसली तरी काही बिघडत नाही. त्याच्या अंतर्यामी ती मूर्ती ठसलेली असते. सगुण निर्गुणाने त्याला काही फरक पडत नाही. “सगुण निर्गुण एकू गोविंदु रे “. अशी त्याची अवस्था असते. त्याला परमेश्वराचे अस्तित्व सर्वत्र जाणवते. अशा भक्ताला समर्थ ज्ञानी भक्त म्हणतात. भक्तीतून ज्ञान होते पण ज्ञान झाल्यानंतरही भक्ती संपत नाही. असा भक्त हा ज्ञानी भक्त असतो.

पण ज्ञानी भक्त म्हणजे भोळा भक्त नव्हे. हा फरक आपण समजून घ्यायला हवा. आपला असा सोयीस्कर समज असतो की भक्त हा भोळा असतो, त्याला व्यवहार कळत नाही. काही लोक अशा लोकांना मूर्ख किंवा बावळट देखील समजतात. परंतु ज्ञानी भक्ताचे असे वागणे समर्थांना अपेक्षित नाही. त्यांच्या दृष्टीने चातुर्य अखंड सावधानता हे मोठे गुण आहेत. त्यांना अपेक्षित असलेला ज्ञानी भक्त व्यवहारात देखील चातुर्याने वागतो. तो लबाडी करत नाही, तो स्वार्थी नसतो परंतु लोकांकडून फसवला जाईल एवढाही भोळा नसतो.

तिसऱ्या ओळीचा अर्थ पाहूया. तिसऱ्या ओळीत समर्थ म्हणतात गुणी प्रीती राखे क्रमूं साधनाचा. ” ही खऱ्या भक्ताची लक्षणे आहेत. परमेश्वराचे जे गुण आहेत की तो सर्वव्यापी आहे, शरणागताला आश्रय देणारा आहे, यासारख्या त्याच्या अनेक गुणां प्रति भक्ताची प्रीती म्हणजे प्रेम असते. परमेश्वराच्या गुणांवरच ज्याची प्रीती नाही, तो परमेश्वरावर प्रेम कसे काय करू शकेल ? असा भक्त साधनेचा क्रम देखील पाळत असतो म्हणजे जिवापाड जपत असतो. साधनेचा क्रम याचा अर्थ भक्त हा पायरीपायरीने परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी जे काही प्रयत्न करत असतो ते. उदा. परमेश्वराच्या नामाचे स्मरण, मनन, सदैव त्याचे चिंतन आणि मग पुढे त्याच्याशीच तो एकरूप होऊन जातो. या सगळ्या विविध पायऱ्या आहेत. या ओळीतील राखे हा शब्द गुणांबद्दल प्रीती राखणे आणि साधनेचा क्रम राखणे या दोन्हींसाठी लागू पडतो.

चौथ्या ओळीत समर्थ अशा भक्ताबद्दल म्हणतात, ” जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. ” सर्वोत्तम म्हणजे सर्वात उत्तम !कोण बरं असेल मग ? तर एक परमेश्वरच सर्वोत्तम आहे आणि अशा या सर्वोत्तमाचा दास होण्यामध्ये जी धन्यता आहे ती अन्य कशातच नाही. म्हणून अशा सर्वोत्तम असलेल्या परमेश्वराचा भक्त खरोखरच धन्य असतो. तसाच भक्त होण्याचा प्रयत्न आपणही करावा हेच समर्थांचे सांगणे आहे.

स्वसंवाद (नवीन) :: 

१) माझ्या दृष्टीत “समदृष्टी” आहे का – माझ्या भोवतालच्या माणसांमध्ये, निसर्गात मला परमेश्वर दिसतो का ?

२) मी “ज्ञानी भक्त” आहे की “भोळा भक्त” – व्यवहारात चातुर्य राखून भक्ती करण्याचा माझा प्रयत्न आहे का ?

३) माझ्या साधनेचा “क्रम” आहे का – नामस्मरण, मनन, चिंतन या पायऱ्या मी नियमितपणे पाळतो का ? 

– – – – 

श्लोक क्र. ४८ – – 

सदा देवकाजी झीजे देह ज्याचा |

सदा रामनामे वदे नित्य वाचा |

स्वधर्मेचीं चाले सदा उत्तमाचा|

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा|४८|

अर्थ :  जो भक्त केवळ परमेश्वराच्या कार्यासाठीच आपला देह झिजवतो, ज्याच्या मुखात अखंड रामनाम आहे आणि स्वधर्माच्या म्हणजे आपल्या कर्तव्याच्या मार्गावर जो उत्तम रीतीने वाटचाल करतो तो भक्त म्हणजे सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय.

विवेचन : देवकाज म्हणजे देवाचे कार्य. खरा भक्त नित्य परमेश्वराचेच काम करीत असतो. तो दोन प्रकारे कार्य करतो. स्वतः परमेश्वराचे नामस्मरण तर करतोच परंतु इतरांनाही परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाने वळवतो. सगळ्या संतांनी हेच परमेश्वराचे कार्य केले आहे. स्वतः नाम घेता घेता त्यांनी इतरांनाही नामाला लावले आहे. मग असा भक्त कोणतेही काम करीत असेल तर ते भगवंताचेच कार्य असते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आपल्या आयुष्यात अखंड रामनाम घेतले परंतु ही करीत असताना त्यांनी हजारो भक्तांना रामनामाची गोडी लावली. स्वतः समर्थ रामदास यांनी रामनामाचे आणि गायत्री मंत्राचे अखंड पुरश्चरण केले. स्वतः अकरा मारुतींची स्थापना केली आणि गावोगाव श्रीराम आणि मारुतीची मंदिरे निर्माण करवली. मठ उभारून महंत घडवले. हे सगळे भगवंताचेच कार्य त्यांच्या हातून झाले. त्या कार्यातच त्यांचा देह झिजला.

भगवंताचे कार्य करायचे म्हणजे केवळ नामस्मरणच केले पाहिजे असे काही नाही. रंजल्या गांजल्यांची, दीनदुबळ्यांची, प्राणीमात्रांची सेवा म्हणजे ईश्वर सेवाच आहे. ते देखील भगवंताचे कार्य आहे असे म्हणता येईल.

भक्ताने नेहमी ईश्वरसन्मुख राहिले पाहिजे. तसे राहण्यासाठी भगवंताचे नाम अखंड त्याच्या मुखात आले पाहिजे. ज्याच्या मुखात भगवंताचे नाम अखंड असते असा भक्त धन्य होय. व्यवहारांमध्ये बोलताना भलेही त्याला लोकरीतीनुसार व्यवहार करावा लागेल. परंतु अंतरातील भगवंताचे चिंतन अखंड सुरूच राहते.

तिसऱ्या ओळीत समर्थ म्हणतात, “स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा” म्हणजे आपल्या वाट्याला आलेले काम तोच आपला स्वधर्म समजून जो उत्तम प्रकारे करतो तो भक्त धन्य होय. बऱ्याच वेळा हे जग म्हणजे एक रंगमंच आहे आणि आपण सर्व त्यावरील कलाकार आहोत असे म्हटले जाते. आपल्या वाट्याला जी भूमिका आली असेल ती उत्तम प्रकारे करणे हे आपले काम आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तोच आपला स्वधर्म आहे तो आपल्याला उत्तम रीतीने निभवता आला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात

तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा ।

पूजा केली होय अपारा । तोषालागी ।।

त्या सर्वात्मक ईश्वराला स्वकर्म कुसुमांनी केलेली पूजा अतिशय प्रिय आहे. म्हणजेच आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडणे हे त्याला आवडते. मग तुम्ही मंदिरात किंवा तीर्थयात्रेला गेला काय आणि नाही गेलात तरी चालू शकते. प्रत्येकाने आपले काम जर उत्तम प्रकारे केले तर हीच त्या परमेश्वराची अतिशय चांगल्या प्रकारे पूजा आपण बांधली असे होईल. मग जगामध्ये आपोआपच सज्जनांची मांदियाळी तयार होईल आणि सगळे सुखी होतील. तेव्हाच ऋषींनी सांगितलेले अस्तित्वात येईल

 सर्वेऽपि सुखिनः सन्तु। सर्वे सन्तु निरामयाः॥

सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चिद् दुःखभाग्भवेत्॥

– – सर्व सुखी होतील सर्वांना आरोग्य लाभेल. अर्थात प्रत्येकाने आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडले तर…

– – आणि असे वागणारा भक्त जगामध्ये धन्य होईल. भगवंताच्या उत्कृष्ट भक्तांमध्ये त्याची गणना होईल.

स्वसंवाद :: 

१) माझ्या दैनंदिन कामात मी “देवकाज” पाहतो का – माझे काम म्हणजे परमेश्वराची सेवा आहे असा भाव माझ्या मनात असतो का ?

२) “स्वधर्म” म्हणजे माझ्या वाट्याला आलेली भूमिका – ती मी उत्तम प्रकारे निभावतो का की इतरांच्या भूमिकेकडे माझे लक्ष जास्त असते ?

३) माझ्या नामस्मरणाने किंवा वागण्याने इतर कोणाला परमेश्वराकडे वळण्याची प्रेरणा मिळाली आहे का ?

– क्रमशः श्लोक ४७ आणि ४८.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अश्रूंच्या एका थेंबात दडलंय संपूर्ण जग”  – माहिती संकलक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “अश्रूंच्या एका थेंबात दडलंय संपूर्ण जग”  – माहिती संकलक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

– रोझलीन फिशर

अश्रूंच्या एका थेंबात दडलंय संपूर्ण जग :

… रोझलीन फिशर यांच्या ‘टोपोग्राफी ऑफ टीअर्स’चा थक्क करणारा प्रवास 

… डोळ्यांतून ओघळणारा अश्रू हा वरवर केवळ खाऱ्या पाण्याचा एक पारदर्शक थेंब दिसतो. पण याच थेंबाला सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास एखाद्या महाकाय शहराचा नकाशा किंवा पर्वतदऱ्यांचे विहंगम दृश्य समोर येते.

२०१३ साली छायाचित्रकार रोझलीन फिशर यांनी एका विलक्षण प्रयोगाला सुरुवात केली, ज्याने मानवी भावनांच्या विज्ञानाला एक नवी दृष्टी दिली. फिशर यांनी या प्रकल्पाला ‘टोपोग्राफी ऑफ टीअर्स’ (Topography of Tears) असे नाव दिले. एका वैयक्तिक शोकाच्या काळात त्यांच्या मनात विचार आला की, माझे अश्रू सूक्ष्मदर्शकाखाली कसे दिसत असतील? इथूनच एका जागतिक स्तरावर गाजलेल्या प्रकल्पाचा पाया रचला गेला. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर, फिशर यांनी उच्च क्षमतेच्या ‘रेझोल्युशन ऑप्टिकल मायक्रोस्कोप’चा वापर केला. त्यांनी जेव्हा स्वतःच्या अश्रूचा पहिला थेंब तपासला, तेव्हा त्यांना आलेला अनुभव थक्क करणारा होता. फिशर यांच्या मते, “हा अनुभव विमानातून जमिनीवरील दृश्य पाहण्यासारखा होता. “अश्रूंमध्ये केवळ पाणी नसते. त्यात तेल, प्रथिने, एन्झाईम्स आणि मिठाचे प्रमाण असते. जेव्हा हा थेंब सुकतो, तेव्हा त्यातील मिठाचे स्फटिक (Crystals) तयार होतात. हे स्फटिक वेगवेगळ्या आकृत्या धारण करतात, ज्या एखाद्या भूभागाच्या नकाशासारख्या दिसतात.

संशोधनादरम्यान फिशर यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. दुःखाचे अश्रू, आनंदाश्रू आणि कांदा चिरताना डोळ्यांतून येणारे पाणी यांच्या रचनेत फरक असतो का? या एका विचाराने या प्रकल्पाला व्यापक स्वरूप दिले. त्यांनी स्वतःचे आणि इतरांचे मिळून जवळजवळ १०० अश्रूंचे नमुने तपासले. विज्ञानाने अश्रूंचे तीन मुख्य प्रकार सांगितले आहेत. पहिले ‘बेसल’ (Basal) अश्रू, जे डोळ्यातील ओलावा टिकवून ठेवतात. दुसरे ‘रिफ्लेक्स’ (Reflex) अश्रू, जे कांदा चिरताना किंवा धुरामुळे येतात. तिसरे ‘सायकिक’ (Psychic) अश्रू, जे केवळ मानवी भावनांमुळे बाहेर पडतात.

आकडेवारी आणि निरीक्षणांनुसार, या प्रत्येक प्रकारच्या अश्रूची सूक्ष्म रचना वेगळी असते. दुःखाचे अश्रू जेव्हा सुकतात, तेव्हा त्यांची रचना विखुरलेली आणि गडद दिसते. याउलट, आनंदाश्रूंची रचना एखाद्या फुलांच्या बागेसारखी किंवा गुंतागुंतीच्या नक्षीसारखी भासते. कांदा चिरताना येणाऱ्या अश्रूंची भूमिती पूर्णपणे वेगळी असते. यामागचं कारण शोधताना असे लक्षात येते की, भावनांनुसार अश्रूंमधील हार्मोन्स आणि रसायनांचे प्रमाण बदलते. न्यूरोट्रांसमीटरमधील हा बदल अश्रू सुकल्यानंतर तयार होणाऱ्या स्फटिकांच्या रचनेवर परिणाम करतो. म्हणूनच, प्रत्येक अश्रू हा त्या व्यक्तीच्या तत्कालीन मानसिक अवस्थेचा जणू ‘फिंगरप्रिंट’ असतो.

– – – फिशर म्हणतात की, “आपल्याला उघड्या डोळ्यांनी जे दिसते, ते हिमनगाचे केवळ एक टोक आहे. ” आपल्या भावना केवळ मनात नसून त्या आपल्या शरीरातील द्रवाच्या रेणवीय रचनेतही उमटतात. हा प्रकल्प केवळ विज्ञानाचा भाग नसून तो मानवी संवेदनांचे एक दृश्य काव्य आहे. एका लहानशा थेंबात इतकी गुंतागुंतीची सृष्टी दडलेली असू शकते, यावर विश्वास बसणे कठीण जाते. पण विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की, आपण जेव्हा रडतो, तेव्हा आपण केवळ पाणी गाळत नसून आपल्या अस्तित्वाचा एक नकाशाच बाहेर टाकत असतो.

– – – आपल्या प्रत्येक भावनांची एक स्वतंत्र भूमिती असते, हे वास्तव आपण कधी मान्य करणार?

*******

माहिती संकलक / लेखक: अज्ञात

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ टेस्ट…  लेखिका: गौरी ब्रह्मे ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

उषा नाईक

📖 वाचताना वेचलेले 📖

टेस्ट…  लेखिका: गौरी ब्रह्मे ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

आईच्या काही पुढच्या टेस्ट करून घेण्याकरता टेस्ट सेंटरमध्ये गेले होते. व्हीलचेयरमध्ये बसून आई आत गेली मी बाहेर वेटिंगरूम मध्ये बसले. बराच वेळ लागणार होता. ‘देव करो अन् सगळं ठीक निघो’, मनाशी म्हणत मी एकदा वर आकाशाकडे/देवाकडे बघत शांत बसून राहिले. एकेकाळी आपले आजार, दुखणी काढलेल्या आईला, हॉस्पिटलचा गाऊन घालून देऊन “जा, आत. सगळं नीट होईल” सांगताना फार विचित्र वाटतं. हे रोल रिव्हर्सल मान्य व्हायला हवं, हे माहीत असतं; पण थोडा वेळ लागायचा तो लागतोच.

सहज लक्ष शेजारी बसलेल्या एका मुलीकडे गेलं. छान चुडीदार ड्रेस, गळ्यात छोटं मंगळसूत्र, हातात मोबाईल आडवा धरलेला आणि तोंडाने सतत काहीतरी पुटपुटत होती. फार टेन्शन मध्ये दिसत होती. आजूबाजूला काय सुरू आहे याकडे अजिबात लक्ष नव्हतं. फक्त मोबाईल आणि ती. तिच्या पुटपुटण्याचा स्पीड इतका जोरात होता की हातात धरलेल्या मोबाईलसकट ती थोडं मागेपुढे होत होती. मग लक्षात आलं, देवाचं काहीतरी स्तोत्र वगैरे म्हणत असणार. म्हणता म्हणता मधेच डोळे बंद करून मोबाईल डोक्याला लावून नमस्कार करत होती. हॉस्पिटल, टेस्ट, सर्जरी ही नावं जरी घेतली तरी भीती वाटायची ती वाटून जातेच. मनात विचार आला, हिचं नक्की कोण आत गेलं असेल? आई, वडील, सासू, सासरे, भाऊ, बहीण की नवरा? का ही एवढ्या टेन्शनमध्ये असेल? ज्या कोणाची उपासना करत होती, त्यावर तिची नितांत श्रद्धा असणार. एक क्षणही न थांबता तिचा जप सुरू होता. माझ्या मनाला मग एक खेळच मिळाला. नक्की तिची आई आत असणार. ज्या मनोभावे ती जप करते आहे त्यावरून आईच असेल असं वाटतं. जगात अपवादानेच एखाद्याला आपली आई नकोशी असते. पण मग वडीलही असू शकतील. बापलेकीतलं प्रेम वेगळं असतं. नवरा असेल तर? इतक्या तरुणपणी काय झालं असेल त्याला? काही गंभीर निघालं तर ही काय करणार? माझ्या मनाचा चाळा संपेना. एवढ्यात एक तरुण तिच्या शेजारी येऊन बसला आणि म्हणाला, वीस मिनिटं तरी लागतील. तरुणीने पटकन त्याच्या डोक्याला मोबाईल लावला आणि जप सुरू ठेवला. आता माझी उत्सुकता शिगेला पोचली. नक्की आत आहे तरी कोण? नवरा शांत बसून होता, तरुणीचा एक क्षणही न गमावता जप सुरू होता. आता तर तिला सभोवती काय सुरू आहे ह्याचीही फिकीर नव्हती. ती आणि तिचा जप. मी स्वतः श्रद्धाळू असले तरी अशी टोकाची आस्तिक नाही. मी तिच्या जागी असते तर कदाचित हे काही केले नसते याची जाणीव मला आहे पण म्हणून ती जे करते आहे त्याची चेष्टा किंवा अवहेलना करायचाही मला काही अधिकार नाही हे ही मला माहीत आहे. ज्याला ज्यातून positive energy मिळते त्याने ते करावं.

बघता बघता वीस मिनिटं झाली. आई अजूनही आतच होती. तेवढ्यात टेस्ट सेंटरच दार उघडलं आणि एक छोटीशी गोड मुलगी दोन वेण्या उडवत आत आली. छान फुलाफुलांचा फ्रॉक घातलेली आणि टपोरे डोळे असलेली! तिला पाहून जप करणारी मुलगी ताडकन उठून उभी राहिली. मुलगी पळतपळत तिच्याकडे गेली आणि पुढचे दोन दात पडलेले बोळकं पसरून “आई, झालीsss टेस्ट! डॉक्टर काका म्हणाले, मी एकदम स्ट्राँग गर्ल आहे!” आईबाबा दोघांनीही तिला जवळ घेत चौकशी सुरु केली.

अरेच्चा! ही शक्यता तर मी गृहितच धरली नव्हती. लहान मुलांना काही गंभीर होत असेल हा विचारच आपल्या डोक्यात येत नाही. जप करणाऱ्या मुलीच्या बाबतीत मी सगळ्या शक्यता मनात आणल्या पण प्रत्यक्ष तिची छोटी लेकच टेस्ट करण्याकरता आत गेली असेल हा विचार देखील मनाला शिवला नाही. Mothers can never think ill about any child in the world. जपवाल्या मुलीने श्रद्धेने परत मोबाईल डोक्याला लावला आणि लेकीला मांडीवर घेऊन बसली.

आपल्या भोवती रोज कितीतरी वाईट गोष्टी घडत असतात पण जगात जोवर आई नावाची जमात आहे तोवर positive energy चा स्त्रोत कायम सुरू राहील. कधीकधी वाटतं हे जग सुरू रहाण्याकरता फक्त आणि फक्त आई नावाची बाई कारणीभूत असते.

त्या छोटीला पटकन बरं वाटू देत अशी प्रार्थना करत मी माझ्या आईचे उत्तम रिपोर्ट हातात घेऊन, तिची आई बनत तिला आधार देत टेस्ट सेंटरमधून बाहेर पडले.

लेखिका : गौरी ब्रह्मे

प्रस्तुती :  उषा नाईक

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # दिलकी नजरसे.. नजरों के दिलसे… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # दिलकी नजरसे.. नजरों के दिलसे… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

तू बघतेस ना त्या गवाक्षातून माझा शोध घेत असतेस… तू उभी असतेस निश्चल पणे कुठल्याही प्रकारचा आवाज आपल्याकडून होणार नाही याची पूरेपूर काळजी घेऊन… अधिर मनाची उतावीळता डोळ्यात येते उतरून आणि त्याला हट्टी मुलासारखे सांगतात कि डोळ्याची पापणी निमिषभरही न हलवता चक्क डोळे ताणून जितके मोठे करून बघता येतील तितके तू मायक्रो ऍंगलने शोध घेत रहा… ओठांची मिटली गुलाब पाकळ्या विलग करू देऊ नकोस… माझं ओझरतं दर्शन झाल्यावरही ना उत्साहाच्या भरात ना आनंदाच्या उकळी फुटल्या असताना शब्दाचा हुंकार आवरून धर… तो मस्तवाल वारा तुला अशी एकटीला भान हरवलेल्या स्थितीत पाहून अंगचटीला येऊन तुला नकळतपणे गुदगुल्या करणार बघ.. त्यानं तुझ्या अंगोपांगावर रोमरोमाचे काटे फुलून आले कि एक हलकिशी शिरशिरी सगळ्या देहावर पसरून जाईल.. तुझे ते मऊ मुलायम रेशमासारखे कुंतल त्या वाऱ्याच्या लहरीवर स्वच्छंपणाने भुरुभुरू उडू लागणार.. एखादी चुकार बट तुझ्या भालप्रदेशी आणि कपोलावर रूळताना तुझं लक्षं नक्कीच विचलित करतील… आणि आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझं मनातलं फडफणारं ते उत्शृंखुल प्रीतीचं पाखरू आता जास्त वेळ कैद होऊन बसणार नाही असं म्हणू लागेल… त्याला जितकं धरून ठेवता येईल तितके पहा… त्यालाही तुझ्या इतकीच प्रेमाची ओढ आहे काय हे तुला पाहायचं ना… चुपके चुपके…

माझ्या या अवस्थेचं जर इतकं बारीक सारीक गोष्टी तुला नेमकेपणानं कश्या बऱ्या ओळखता येतात.. आणि मी इथे आलीय तुला शोधतेय हे ही तू मला न पाहताच कसं काय ओळखू शकतोस… हाच प्रश्न पडलाय ना तुला…

अगं वेडे तू ज्याला शोधतेस तो मी कधीच तुझ्या हृदय मंदिरी विराजमान झालोय बरं… आणि सततची तुझ्या दिलाची धडकन मला समजतेय बरं… कारण खरं प्रेम हे असचं असतं आणि ते दिलकी नजरसे नजरोंके दिलसे ओळखता येतं…

 

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares