आम्ही सोलापूरला निघालो होतो. राजू ड्रायव्हरला हे म्हणाले,
” गाडी चालवताना फोनवर बोलायचं नाही. तुझा महत्त्वाचा फोन असेल तर गाडी थांबवून बोलत जा. “
” हो काका” तो म्हणाला.
संध्याकाळी राजुचा फोन वाजला. तो म्हणाला,
“काका कस्टमरचा फोन आहे. जागा बघून गाडी थांबवतो आणि बोलतो. “
पुढे मोठं वडाचं झाड दिसत होतं. त्याला पार होता. तो म्हणाला,
” झाडाखाली थांबवतो. तुम्ही बसा. नाहीतर पाय मोकळे करा. “
आम्ही उतरून झाडाकडे गेलो. पारावर बसलेल्या मावशींनी विचारले,
” काय गाडी बिघडली का काय? “
” नाही त्याला महत्त्वाचा फोन आलेला आहे. “
” अस का.. बर बरं.. या इथं बसा तोवर निवांत”
कुठे जायचे? कुठुन आलात? कुठले तुम्ही? वगैरे चौकशी सुरू झाली.
हे गावाकडचे लोक मला फार आवडतात. लगेच गप्पा मारायला सुरुवात करतात.
लांबून शेळ्यांचा मोठा कळप घेऊन एक सावळा मुलगा येताना दिसला.
त्या म्हणाल्या,
” हे आलं आमच येडखुळं”
तो येऊन तिथे उभा राहिला. चेहऱ्यावरून तो भोळसर आहे हे लक्षात येत होते. तो थांबला तसा सगळा कळपही तिथे उभा राहिला. मुलाने एक पिल्लू खांद्यावर घेतलं होतं. त्यांच्या रोज गप्पा होत असाव्यात.
आज कुणाच्या शेतात वगैरे बोलणे सुरू झाले.
मी विचारले,
” या पिल्लाला तुम्ही उचलून का घेतले आहे? “
” अहो लहान लेकरू आहे. लांबवर पल्ला आहे. ते दमतयं मग.. ” तो म्हणाला.
तेवढ्यात एक शेळी त्याच्याजवळ आली. काळंभोर असलेले ते गोड पिल्लू त्यानी खाली सोडलं.
तो सहजपणे म्हणाला,
” बाळाला भूक लागलीयं आईला कळलं “
पिल्लू आईकडे गेले. तो खाली बसला. त्याबरोबर कळपातली सगळी छोटी, मोठी पिल्लं त्याच्या भोवती जमा झाली. त्यानी त्या पिल्लांना जवळ घेतलं…. कुरवाळलं… मायेनी त्यांच्या अंगावरून हात फिरवला…. डोक टेकवलं…
त्याच्यातला तो सहज आपलेपणा मी बघत होते.
पाच मिनिटांत तो जायला निघाला. ते छोट पिल्लू परत त्याच्या जवळ आलं.
त्यानी आता मानेच्या मागे काठी आडवी धरली होती. त्यावर दोन्ही हात टाकून तोंडाने टाॅक टाॅक असा आवाज काढला.
पिल्लू निमुटपणे बाकीच्या शेळ्यांच्या मागे चालायला लागलं.
जाता जाता तो म्हणाला,
” शहाणी असतात पिल्ली न सांगता त्यांना कळतंय बघा “असं म्हणून तो निघून गेला.
हे सगळं किती गोड होतं. अवघ्या पाच मिनिटात त्या मुलाची अपार माया मला बघायला मिळाली.
असं निरपेक्ष प्रेम करायला मन तसंच हवं…..
हे निर्मळ मैत्र मुक्या प्राण्यांना आपोआप कळतं… मला तर ते अगदी समोर दिसलं…
या मुलाला येडखुळं कस म्हणावं…
सहज जाता जाता असं काही दिसलं की डोळे आपोआप भरून येतात….
आता डोळे उघडे ठेवून हे बघायचं… त्यांच्याकडून शिकायचं असं ठरवलेलं आहे…….
(ऑपरेशनने पूर्ण स्पायनल कॉर्ड तर जुळवला. आता व्हर्टिब्रल कॉलमचे व्हर्टिब्रे जुळवणे कठीणात कठीण होते. अर्थात ही तात्पुरती डागडूजी ठरणार होती. सांधलेल्या हाडांमध्ये ओसिफिकेशन होऊन व्हर्टिब्रल कॉलम पूर्ण तयार व्हायला काही दिवसांच्याच काय, आठवड्याचा, महिन्याचाही अवधी लागणार होता.) इथून पुढे —-
X आणि Y बाहेरून जोडताना खरी कसरत होती. कंबरेच्या भोवती टाक्यांची मार्च तयार झाली होती. एवढे सगळे टाके घालून पूर्ण होईपर्यंत किरण पूर्ण दमून गेला होता. सिजर आणि नीडल खाली ठेवल्यावर त्याला एकदम ग्लानी आल्यासारखे झाले.
ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतरही दोन ट्रेंड नर्सेस, अनेस्थेटिस्ट, आणि दोन असिस्टंट डॉक्टर्स पेशंट जवळ उभेच होते. त्या उरलेल्या दोन बॉडीज आता निकामी होत्या. पण याही काही काळ बर्फामध्ये प्रिझर्व करणे गरजेचे होते.
किरणने तर फार मोठे काम केले होते. पण सीनियर डॉक्टर नवलकरांपुढे आता खूप प्रश्नचिन्हे आ वासून उभी होती. पोलिसांना, तरुणांच्या पालकांना, पत्रकारांना काहीतरी सांगणे जरुरीचे होते. शांतपणे विचार करून दोन दिवस काहीही न सांगता, त्या नवीन बॉडीचा रिस्पॉन्स बघूनच काय ते सांगावे असे त्यांनी ठरवले.
किरणने आपल्या तिकडच्या गाईड्स ना, कॉलेजच्या डिनना, आणि मित्रांना आपण केलेल्या या ऑपरेशनची इथंभूत बातमी ईमेल करून कळवली होती. इंडियन मेडिकल असोसिएशनलाही आपल्या या धाडसी प्रयोगाचा रिपोर्ट दिला होता.
कोणालाही ऑपरेशन थेटर मध्ये यायला परवानगी द्यायची नाही, अगदी नुसते डोकावायलाही द्यायचे नाही असे सांगण्यात आले.
त्या दोघांचे आई-वडील, मित्र सगळ्यांनी बाहेर गर्दी केली. थेटर मधून बाहेर येताच सगळ्यांनी त्यांना घेरले. ” डॉक्टर डॉक्टर, ” ” हे बघा अपघात अतिशय जोरदार झालेला आहे. आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतच आहोत. केवळ परमेश्वराच्या हातात सगळे काही आहे. नक्कीच सगळे प्रार्थना करूया. दोन-तीन दिवस तरी आम्ही काहीच सांगू शकत नाही. प्रार्थनाकरणे, धीर धरणे, पॉझिटिव्ह थिंकिंग एवढेच आपण आता करू शकतो. कृपा करून हॉस्पिटलमध्ये गर्दी करू नका. आम्हाला आमचे काम करू द्या. दोन्ही मुलांच्या दोन व्यक्ती इथे फक्त बाहेर थांबू शकता.
पुढचे दोन दिवस त्या ऑपरेशन थेटर मध्ये फक्त ठराविक डॉक्टर्स, नर्सेस ये-जा करत होत्या. संध्याकाळपासून स्वतः किरण पेशंट जवळ बसूनच होता.
त्याचा XY पेशंट अजून पूर्ण बेशुद्धच होता. सलाईन, ब्लड सुरू होते. सगळ्यात चांगली गोष्ट एकच होती, ती म्हणजे दोन्ही मित्रांचे ब्लड ग्रुप्स एकच होते. त्यामुळे ब्लड ऍडजेस्ट व्हायला काही प्रॉब्लेम आला नाही.
किरण आपल्या पेशंटकडे पाहत होता. त्याच्या पायाची बोटे हलल्याचे त्याला जाणवले. एकदम ” सिस्टर, सिस्टर! लूक! ” म्हणून त्याने आवाज दिला. डॉक्टर्स सिस्टर्स यांच्या डोळ्यात एकदम आनंद चमकून गेला. अरे वा! म्हणजे मेंदूतून आलेली संवेदना पायाच्या बोटापर्यंत पोहोचली. व्हेरी गुड! एक क्षण त्याच्या बॉडीने चांगलाच रिस्पॉन्स दिला होता. त्याने आपल्या बाबांना लगेचच फोनवरून ही माहिती दिली, तेही ताबडतोब हॉस्पिटल कडे धावले. आपल्या प्रयत्नांना यश येणार याचा आनंद सगळ्या टीमच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
किरण ने आपल्या तिकडच्या डीन आणि इथल्या आय. एम. ए. च्या मेंबर्सना एसएमएस केला. सगळीकडून त्याला अभिनंदनचे मेसेजेस यायला लागले.
दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर नवलकरांनी त्या दोघांच्या फक्त अगदी जवळच्या लोकांना बोलावून घेतले. प्रथमच त्यांनी त्या दोघांची नावे विचारली. एक अतुल रामचंद्र घाडगे आणि दुसरा अभिजीत श्रीकृष्ण पाटील होता.
डॉक्टरांनी या दोन्ही मुलांच्या पालकांना अतिशय शांतपणे पण आत्मविश्वासाने सांगायला सुरुवात केली. ” हे पहा मी आत्ता जे सांगणार आहे ते तुम्ही अतिशय शांत चित्ताने आणि मनावर दगड ठेवूनच ऐकायला पाहिजे. अपघात इतका जबरदस्त होता हे दोघेही वाचणे केवळ अशक्यच होते. पण.. पण.. रिलॅक्स.. मी, माझा मुलगा डॉक्टर किरण परदेशातून आला म्हणूनच आम्ही ही अतिशय रिस्की शस्त्रक्रिया करू शकलो. तुम्ही कुटुंबांनी आपले दुःख थोडे आवरून, मन मोठे करून, दोन्ही कुटुंबे एकत्र येऊन या नवीन मुलाला स्वीकारायचे आहे. दोन्ही मुलांचा जिवंत राहण्याचा विचारच सोडून द्यावा लागला असता. पण या प्रयत्नांमुळे आपल्याला एकाच व्यक्तीत दोघांना भेटायचं आहे. तो पूर्ण बरा व्हायला काही महिने लागतील. त्याला इथेच आमच्या ऑब्झर्वेशन खालीच रहावे लागेल. नंतर काय करायचे आपण नंतर ठरवू. “
डॉक्टरांचे सांगणे संपले. सगळेजण सुन्न होऊन गेले होते. एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू अशी त्यांची अवस्था झाली होती. अतुल आणि अभिजीत दोघेही जिगरी दोस्त होते त्यामुळे दोन्ही घरची पण चांगली मैत्री होती.
दोघांकडच्या घरच्यांनी डॉक्टरांच्या अपेक्षेपेक्षा लवकर, आलेले आव्हान स्वीकारले. दोन्ही घरच्यांनी एक होऊन त्याला सांभाळायचे ठरवले. पण आता मोठा प्रश्न निर्माण झाला “तो “कोण? म्हणजे किरण चा XY. तो नक्की कोण? अतुल की अभिजीत? तोही निर्णय सगळ्यांनी किरण वरती सोपवला.
हळूहळू चांगल्या पद्धतीने त्याच्यात सुधारणा होत होती. सगळ्यांच्या मनावरचा ताण, चिंता कमी व्हायला लागली होती. तोच एक दिवस डॉक्टरांच्या टेबलवर एका वकिलांची नोटीस आली “तुमच्या हॉस्पिटलमध्ये दोन खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचसाठी डॉक्टरांनी अनुकूल तारखेला कोर्टामध्ये हजर राहावे “. हे वाचून डॉक्टर नवलकर सुन्न होऊन गेले.
डॉक्टर किरणनी मात्र त्यांना समजावले. ” बाबा, काही काळजी करू नका. आपण कोणाचे काही वाईट हेतूने केले नाही. मेडिकल असोसिएशन ची या ऑपरेशनला मान्यता आहे. मी सगळे सिद्ध करतो. तुम्ही अगदी रिलॅक्स रहा. “
एव्हाना परदेशामध्ये किरणच्या प्रयोगावर, त्याच्या निष्कर्षावर, त्याला मिळालेल्या रिझल्टवर कितीतरी डिस्कशन झाले आणि त्याला ऑनर व अवॉर्ड घोषित केले गेले. त्यामुळे त्याच्या प्रयत्नांना आणखीनच वजन आले.
आत्तापर्यंत “तो ” डोळे उघडून सर्वांशी बोलायला लागला होता. सरबत, दूध, वरून पातळ भात खायला लागला. किरणनी त्याचे नाव घोषित केले.
अक्षय रामकृष्ण घाडगे पाटील!
ऑपरेशन करतानाच XY असे किरणने मनोमन नाव दिले होते. दोघांच्या आधीच्या नावातले “अ ” अक्षय तयार झाला.
या अक्षयच्या केस चा निकाल ऐकायला आज कोर्टाच्या आवारात प्रचंड गर्दी झाली होती. मुद्दाम पत्रकार परिषद न घेताच, या प्रयोगाला मोठी प्रसिद्धी मिळणार होती. देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध मिळणार होती. देशाची मान ही या क्षेत्रातील कामगिरीमुळे उंचावणार होती.
मरायला आलेले दोन जीव वाचवून एक तरी आयुष्य मार्गी लावले गेले होते. बोलायला हे सोपे वाटले तरी प्रत्यक्षात ऑपरेशन करणे, त्या क्षणी तो निर्णय योग्य वेळेवर घेणे हे धाडसाचे होते जे डॉक्टर नवलकर आणि डॉक्टर किरण ने दाखवले होते. नुसता निर्णय घेतला नव्हता, तर तो प्रत्यक्ष कृतीतही उतरवला होता. नुकताच परदेशातून आल्या आल्या, आपल्या घरी ही न जाता, आईलाही न भेटता तडक हॉस्पिटलमध्ये तो आला होता. यावरून तो किती कर्तव्यदक्ष आहे हे कळून आले होते. ऑपरेशन नंतर पेशंटची दखल घेणे, त्याच्यावर लक्ष ठेवणे, त्यांच्या पालकांची मनस्थिती सांभाळणे, सोपे नव्हते. ते सगळे सीनियर डॉक्टर नवलकरांनी मोठ्या जबाबदारीने पार पाडले होते. त्यामुळे कोणा एका समाजकंटकाच्या मागणीवरून ‘तो’ खून मानून चालणार नव्हते. न्यायदान करताना अक्षयचे आयुष्य, डॉक्टर नवलकरांचे करिअर आणि अक्षयच्या आई-वडिलांची मानसिकता जपली जायला हवी होती.
या केस बद्दल देशमुख साहेब खूप विचार करत होते. देशमुख साहेबांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. वरवर पाहिले तर निश्चितच दोन जीव, दोन शरीरे जिवंत असताना कापली गेली होती. एका दृष्टीने निघृण खूनच होते ते! पण कशासाठी मारले होते? मारण्याचा उद्देश काय होता? अशा प्रकारच्या प्रयोगाला मान्यता द्यावी का? आत्ता दोन मुलांचीच शरीरे जुळवली होती. समजा असा प्रसंग आला की एका पुरुषाच्या शरीराचा एक भाग आणि दुसरा भाग स्त्रीच्या शरीराचा! काय होईल मग पुढे? अशा व्यक्तीला तो म्हणायचे कि ती? पण अशी दोन शरीरे ऍडजेस्ट तरी होतील का? हार्मोनल इम्बॅलन्सचा किती प्रॉब्लेम येईल. त्या दृष्टीने हे विचार करणे जरुरीचे होते.
देशमुख साहेब विचारात गढून गेले होते. या केसच्या बाबतीत मात्र सगळा सॉफ्ट कॉर्नर अक्षय आणि डॉक्टर नवलकर यांच्याच बाजूने होता. आजच्या घडीला तरी जगामधला हा यशस्वी प्रयोग असल्याकारणाने त्यावर काही शंका घेण्याचे कारणच नव्हते. आय. एम. ए. आणि परदेशातील मेडिकल कौन्सिलनेही या ऑपरेशनचा गौरव केल्यामुळे निश्चितच कौतुकास्पद होते. त्यामुळे देशमुख साहेबही निकाल देण्यासाठी सज्ज होते.
– – – आपल्या देशातल्या एका ऑपरेशनचे विश्लेषण करण्याचे, त्या डॉक्टरांचे कौतुक करण्याचे, हॉस्पिटलच्या स्टाफ चा गौरव करण्याचे, ते खून नाहीत हे सिद्ध करण्याचे आणि आपल्या देशाची मान उत्तुंग करण्याचा मोठा अभिमानाचा निकाल ते आज देणार होते. हे मोठे महत भाग्य त्यांच्या वाट्याला आले होते.
– – – किरणचे “मिशन अक्षय“ कमालीचे यशस्वी झाले होते.
कोर्टाच्या आवारात आज “न भूतो न भविष्यती” अशी गर्दी उसळली होती. आजचा निकाल ऐकण्यासाठी त्या दोघांच्या घरचे नातेवाईक, मित्र मंडळ, जुने वकील आणि नवशिके, तमाम डॉक्टर्स यांची सगळ्यांची एकत्र जत्राच भरली होती. सगळ्यांच्याच मनामध्ये कुतूहल होते. डॉक्टर लोकांनी ही केस गुप्त ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. पण प्रसार माध्यमाचे लोक थोडेच गप्प बसत आहेत? त्यांनी कुठून कुठून माहिती काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे डॉक्टरांच्या या प्रयोगाची कुणकुण सर्वांनाच लागली होती.
जीव वाचवण्याच्या प्रयत्नात कायद्याच्या अशा विचित्र कचाट्यात आपण सापडू असे त्यावेळी डॉक्टर नवलकर पिता पुत्रांना वाटलेही नव्हते. आपल्यासमोर दोन तरुण देह तडफडत आहेत आणि त्यांना वाचवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, याच भावनेतून त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती.
खरंतर त्या रात्री सीनियर डॉक्टर नवलकर, आपल्या परदेशातून शिकून आलेल्या डॉक्टर मुलाला आणायला विमानतळावर गेले होते. त्याचे विमान आल्यावर, त्याचे सामान त्याच्या ताब्यात मिळेपर्यंत जवळजवळ दोन तास गेले होते. त्यामुळे गाडीमध्ये सामान ठेवून घरी जायला रात्रीचे 12:30 वाजून गेले होते. घरी त्याची आई त्याला निरांजनाने ओवाळण्याची जय्यत तयारी करून वाट पाहत होती. तब्बल दोन वर्षांनी तिचा लाडका लेक, उच्च शिक्षण घेऊन, आपल्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये मदत करायला तयार होऊन आला होता. कधी एकदा आपल्या मुलाला डोळे भरून पाहते असे तिला झाले होते. पण वाट पाहणे काही संपत नव्हते.
आदल्या दिवशीच्या संध्याकाळपासून प्रवास झाल्यामुळे किरण कंटाळला होता. त्यामुळे बाबा ड्रायव्हिंग करतो म्हटल्यावर त्याने आज कोणतीच तक्रार केली नाही. विमानात एका ठिकाणी बसून पाय अगदी अवघडून गेले होते. विमानातले सपक-सपक खाणे, अगोड ज्यूस पिऊन, कधी एकदा आईच्या हातचे, ताजे चमचमीत खातोय असे त्याला झाले होते. तिकडून निघताना विमानतळावर त्याला गुडबाय करायला आलेल्या फ्रेंड सर्कलच्या सुखद आठवणीही अजून मनात रेंगाळत होत्या. इकडे परत यायची ओढ आणि तिथे मजेत घालवलेले दिवस, तिथली प्रॅक्टिकल्स, तिथले छान राहणीमान पण सर्वांचे तुटक तुटक वागणे, सगळ्या सगळ्यांनी मनात गर्दी केली होती. इकडे परत येण्याचा आनंद आणि तिकडचे सोडून येण्याचे थोडे दुःख अशा संमिश्र भावनांनी त्याच्या मनात गर्दी केली होती. शिवाय प्रवासाचा ताण, शिणवटा यामुळे नुसते डोळे मिटून राहणे त्याला बरे वाटत होते.
तेवढ्यात डॉक्टर नवलकरांचा मोबाईल वाजला. त्यांना वाटले घरूनच रिंग केली असणार. कधी येताय? कुठे आहात? पण पाहतात तर काय? त्यांच्या हॉस्पिटल वरून रिंग होती. काहीतरी इमर्जन्सी असल्याशिवाय रिंग येणारच नाही याची त्यांना खात्री होती. मोबाईल ऑन करून त्यांनी विचारले,
” आत्ता? .. ठीक आहे ” म्हणून त्यांनी मोबाईल बंद केला.
” काय झालं बाबा? “
” अरे हॉस्पिटल मध्ये दोन सिरीयस केसेस आल्यात. हे बघ मी तुला घरी ड्रॉप करतो आणि ताबडतोब निघतो. “
” छे छे बाबा तसं कशाला? आपण आधी तिकडे जाऊ. घरी कळवतो मी तसे ”
बाबांच्या होकाराची वाट न पाहता किरणने घरचा नंबर फिरवला.
” आई मी आलोय हं. पण पहिल्यांदा बाबांबरोबर हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो. अगं एक्सीडेंटच्या दोन इमर्जन्सी केसेस आहेत. तेवढ्या पाहतो आणि लगेच घरी येतो. “
काही क्षणातच दोघेजण हॉस्पिटलमध्ये आले. एक्सीडेंटच्या केसेस असल्यामुळे गर्दी जमा झाली होती. पण तिकडे लक्ष न देता दोघेही पेशंटकडे धावले. इमर्जन्सी बोर्ड मध्ये दोन टेबलांवर दोन तरुण मुले बेशुद्ध होऊन पडली होती. एकाला मोटरसायकलवरून सुसाट येताना जोरात धडक बसली होती, मागच्या सीटवरचा मुलगा उडून ट्रकच्या चाकाखाली आला होता आणि गाडी चालवणारा ट्रक वर जोरात आदळला होता. त्यामुळे पुढच्याला हेड इंजुरी सिव्हियर होती आणि कमरेपासून खाली चिरडले गेले होते. हेवी ब्लीडिंग मुळे दोघेही बेशुद्ध होते. काय करावं? दोघे वाचण्याची शक्यता तरी आहे का? डॉक्टर ना काही समजेना.
स्ट्रेचरवरून दोघांनाही ताबडतोब ऑपरेशन थिएटरमध्येच हलवलं, डॉक्टर विचार करायला लागले. दोघांनाही इतका जबरदस्त मार लागला होता, की काही करता येणं अशक्यच होतं. प्रयत्न प्रयत्न तरी काय करायचे? मेंदूचा पार चक्काचूर झाला होता, छातीच्या फासळ्याही तुटल्या होत्या. नाही म्हणायला याचा कमरेखालचा भाग शाबूत होता आणि दुसऱ्याचे डोके आणि छाती शाबूत होतीं. काय करावं? कशी ही हल्लीची बेजबाबदार मुलं? कसा थोडाही विचार करत नाहीत? यांच्या आई-वडिलांनी काय करायचं आता? कसा धक्का सहन करणार आहेत हे? डॉक्टरांनाच काही सुचेना.
” बाबा एकच पर्याय दिसतोय मला आणि तोही ताबडतोबच केला पाहिजे ” किरण म्हणाला. आपल्या भुवया उंचावून डॉक्टरांनी किरणकडे पाहिले. याला अजून पर्याय सुचतोय? अरे काहीतरी शक्य आहे का या ठिकाणी? “
” बाबा, मी नुकतीच ऑर्गन इम्प्लांटेशनची ऍडव्हान्स सर्जरी शिकलोय. त्याचा प्रयत्न अर्थात प्रयोग करून पाहायचा का? या ज्या दोन इंजुर्ड वेगवेगळ्या बॉडीज आहेत, त्यातले दोन शाबूत भाग एकत्र करून एकच व्यक्ती आपण वाचवू शकतो. कळतंय ना मी काय म्हणतो ते? “
” अरे पण कसं शक्य आहे हे? ”
” आहे बाबा, तुम्ही फक्त हो म्हणा. मी प्रयत्न करून पाहतो “
डॉक्टरांनी होकाराची नुसती मान हलवली.
एव्हाना हॉस्पिटलचे अनेस्थेटीस्ट, ट्रेंड नर्सेस, ऑपरेशन थिएटरचा मेन चार्ज असणारे सगळे जमा झाले होते. डॉक्टर किरणनी सगळ्यांना अगदी थोडक्यात आपण करून पाहणार असणारा प्रयोग सांगितला. जितक्या लवकर ऑपरेशन सुरू होईल, तेवढे हवे होते. नाहीतर दोन्ही आयुष्यांचे दिवे विझतच चालले होते.
ऑपरेशन थिएटरचे दार बंद झाले. बाहेर लाल दिवा लागला. इकडे किरणचे हात झपाट्याने कामाला लागले. दोघांना वेगवेगळी ऑपरेशन्स करून वाचवणे शक्यच नव्हते. हेड इंजुरी झालेल्याचे हार्ट ही आता हळूहळूच सुरू होते. दुसऱ्याच्या पायाचा चक्काचूर झाला होता. आता दोन तरुण वाचणे केवळ अशक्यच होते. पण दोघांमुळे एक तरुण तयार होऊन वाचू शकत होता. एक नवीन आयुष्य सुरू करता आले असते.
दोघांचे निकामी भाग पटकन सुटे करून, चांगले भाग लवकरात लवकर जोडणे हेच मोठे दिव्य ऑपरेशन किरण आज करणार होता. आपल्या समोरील पेशंटला वाचवणे हाच डॉक्टरी पेशाचा धर्म होता आणि किरणला तेवढेच दिसत होते.
आपल्या मनामध्ये ऑपरेशनचा आराखडा झटकन त्याने तयार केला. एका शरीरातील डायफ्रॅम च्या वरचा शाबूत असलेला भाग म्हणजे X एक्स आणि डायफ्रॅम च्या खालचा शाबूत असलेला भाग म्हणजे Y वाय. आपल्याला X+Y=XY असे करायचे आहे. आपल्या समोरील आव्हान किती अवघड आहे, याची किरणला कल्पना होती. पण आता डगमगायचे नाही. प्रयत्न करायचे असा निश्चय करून किरणने बाबांना X ची अन्ननलिका Y च्या जठराला जोडायला सुरुवात करायला सांगितले. त्यानंतर रक्तवाहिन्या, स्नायू एवढे बाबांसाठी जोडायचे ठेवून त्याने मुख्य मज्जा रज्जू, spinal cord सांधायला घेतला. त्याचा मेंदू आणि हात कुशलतेने आणि अतिशय एकाग्रतेने कामाला लागले होते.
खरंतर दोन वेगवेगळ्या शरीरातील पेशी, अवयव साधणे म्हणजे दिव्यच होते. जेवढी सर्जरी अवघड होती, तेवढ्याच त्यानंतरचा त्या बॉडीचा मिळणारा रिस्पॉन्स ही अवघड होता. महत्त्वाचा होता. त्यावरच त्या ऑपरेशनचे यशापयश अवलंबून होते.
जर हे ऑपरेशन यशस्वी झाले, तर हे पहिले यशस्वी ऑपरेशन ठरणार होते. संपूर्ण जगात ही अशी कॉम्प्लिकेटेड सर्जरी अजून तरी झाली नव्हती. तिकडे अभ्यास करताना एकाचा तुटलेला हात किरणने आपल्या सरांच्या मदतीने जोडला होता. किडनी ट्रान्सप्लांट केली होती. त्याच्या सरांनी केलेले हार्टचे ऑपरेशन ही त्यानी अगदी जवळून पाहिले होते. पण टोटली दोन वेगवेगळ्या बॉडीज जॉईन करून जीवनदान द्यायचा हा पहिलाच प्रयोग होता. आपल्या या प्रयत्नांना परमेश्वराची कृपा लाभली तरच हे ऑपरेशन यशस्वी होणार याची किरणला खात्री होती. मनोमन देवालाही नमस्कार करूनच त्यांनी या ऑपरेशनचा निर्णय घेतला होता.
ऑपरेशनने पूर्ण स्पायनल कॉर्ड तर जुळवला. आता व्हर्टिब्रल कॉलमचे व्हर्टिब्रे जुळवणे कठीणात कठीण होते. अर्थात ही तात्पुरती डाकडूजी ठरणार होती. सांधलेल्या हाडांमध्ये ओसिफिकेशन होऊन व्हर्टिब्रल कॉलम पूर्ण तयार व्हायला काही दिवसांच्याच काय आठवड्याचा महिन्याचाही अवधी लागणार होता.
☆ “चातुर्मास माझ्या आवडीचा…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
परंपरेनी चालतं आलेलं स्तोत्र, मंत्र, आरत्या, पूजा हे सगळं तिला फार आवडायचं. ती मनोभावे ते करायची.
पुढच्या पिढीचा मात्र तिला मनातून फार राग होता. यांना काही सांगायची सोय नाही…. प्रत्येक गोष्टीचं कारण विचारायचं… हे का.. आणि ते का.. जाऊ दे…. पण आपलं आपण तरी करायचं हे तिने ठरवलं होतं.
आज श्रावणी सोमवार होता. तिची पूजा आरती झाली. कहाणी वाचून झाली. फराळ करायच्या आधी तिला देवदर्शन करायचे होते. म्हणून ती शंकराच्या देवळात जायला निघाली. निघताना नवऱ्याने, घरच्यांनी तिला जरा टोकलंच…. पण त्यांचं न ऐकता ती निघाली.
मैत्रिणीला तरी विचारावे म्हणून ती पलीकडे राहणाऱ्या मैत्रिणीकडे गेली.
मैत्रिणीने दार उघडले. ती गडबडीत होती.
“ये ग”… म्हणाली.
” तू येणार नसशीलच तरी पण विचारते येणार आहेस का शंकराच्या देवळात दर्शनाला ?….. “
“अगं आता कसं ग मला जमणार? सुनबाई दहाला ऑफिसला जाणार. नातं शाळेतून येणार, कामवाली…… “
” दे दे आयुष्यभर तू न येण्याची शंभर कारणं दे. “
ती जरा रागावली मैत्रिणीवर.
” आज एवढा श्रावणी सोमवार आहे तुला काही नाही त्याचं….. “
“तसं नाही ग… जबाबदारी आहे. सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या उद्योगाला जावं लागतं.. “
” संसार आयुष्यभर पाठी लागलेला आहे… त्याच्यात किती गुंतून राहणार आहेस?मग देवधर्म तू कधी करणार?”
” अगं नातं लहान आहे. जरा मोठी झाली की… “
मैत्रीण बोलत होती पण तिचं काही न ऐकता ती निघाली…
साडेनऊ झाले होते. रीक्षा दुसऱ्या रस्त्याला लागलेली बघून तिने विचारले,
“अरे रिक्षा इकडे कुठे?”
” आजी शंकराची रांग इकडे बोळात वळवली आहे. आज खूप गर्दी आहे. श्रावणी सोमवार आहे ना.. “
” हो का? बरं.. “
तिने पूजेचे ताटं घेतलं. नारळ, हारं फुलं, साखर फुटाणे..
ती रांगेत उभी… बायका मुली मजेत होत्या. फोटो घेणं, गप्पा मारणं, व्हीडीओ काढणं चालू होतं. फोन चालू होते. रांग हळूहळू सरकत होती.
पाऊण तास झाला होता.
देऊळ अजून दूर होत. हातातलं ताट जड वाटायला लागलं…
मनातल्या मनात ” शिवमहिम्न” म्हणायचं होत….. “जय शीव ओंकारा” आरती म्हणायची होती… पण गोंधळ गडबड आवाज… ईतका होता की बस्स….. त्यामुळे मनाला शांतता नव्हती..
दीड तासानंतर देऊळ दिसलं. फुलांनी सजवलेलं लाइटिंग केलेलं आज वेगळं दिसत होतं.
आता रेटारेटी सुरू झाली.
ताट हातात धरून हात भरून आला होता.
लांबून दर्शन घेतलं.
समोर ठेवलेली शंकराची छोटी मूर्ती आज हारात बुडून गेली होती. तिथल्या गुरूजींनी, नारळ, हार देवाला स्पर्श करून बाजुला ठेवला…
जेमतेम एक मिनिट दर्शन मिळालं…
चार माणसं गर्दी हटवायला होते
” चला पुढे चला… ” म्हणत होते. ती आपोआप पुढे सरकली…
आज देवं नीट दिसले नाहीत….
केवळ दर्शनासाठी घरी कुणाचं न ऐकता अट्टाहासानी ती आली होती…
देवळात तिच्याबरोबर न आलेल्या मैत्रिणीची तिला आठवण झाली…
लांबून कसंतरी दर्शन झालं.
खरंतर दर्शन झालं असं उगीच म्हणायचं….
रुखरुख लागली तिला….
रिक्षा करून ती घरी निघाली. दमली होती… दमण्यापेक्षा दर्शन नीट झाले नाही… त्यामुळे मनाला आज समाधान वाटत नव्हते.
मैत्रिणीचे दार उघडे होते. समोर ती खुर्चीवर बसली होती.
मैत्रिणीची नात नाचत समोर आली म्हणाली.
” आजी बाप्पाचा प्रसाद घ्यायला ये ना… “
घरातला शंकराचा फोटो मैत्रिणीने टीपॉयवर ठेवला होता.
त्याला हार, फुलं घातली होती. समई, निरांजन तेवत होतं. प्रसाद समोर ठेवला होता.
मैत्रीण म्हणाली..
” झाल ना दर्शन.. आता ये ग… बैस थोडा वेळ.. तुला काॅफी करते. दमल्यासारखी दिसतेस… “
अस म्हणून मैत्रीण आत गेली.
ती थकून खुर्चीवर बसली. मनात विचार चक्र सुरू झाले…
सकाळी गडबडीत असलेली मैत्रीण आता शांत होती. सुनबाई, नवरा, मुलगा ऑफिसला गेले होते. कामवाली बाई येऊन घर साफ करून गेली होती. नात शाळेतून आली होती.
सकाळी पूजेनंतर वाचलेली खुलभर दुधाची कहाणी तिला आठवली….
ईतकी वर्ष आपण ती कहाणी वाचायची म्हणून नुसतीच वाचली…
मैत्रिणीने केलेली पूजा बघून
तीला आज ते मनोमन जाणवले..
त्यात लपलेला खोल मतीतार्थ आपण कधी समजून घेतला नाही.
तिला आठवली शुक्रवारची कहाणी…
सहस्त्र भोजन घालणारा भाऊ गरीब बहिणीला जेवायला बोलवत नाही. तरी ती जाते. भाऊ तिला हाकलून देतो. काही दिवसांनी तीचं दळींद्र जातं. ती समर्थ होते. मग भाऊ तिला बोलवतो. जेवायला गेल्यावर ती दागिन्यांवर एक एक पदार्थ ठेवते…. या कहाणीतून तर केवढा मोठा बोध घेता येईल………
दानाचं महत्त्व सांगणाऱ्या कहाण्या, व्रत का करावं हे सांगणाऱ्या, देव प्रसन्न कसा होईल ?, जगात कसे वागावे ?, चूक नसताना दोष देऊ नये,
प्रत्येक कहाणीतून केलेले विचार प्रबोधन तिला आठवायला लागले.
ललिता पंचमीची, महालक्ष्मीची, श्रीविष्णूची कहाणी आणि इतरही कहाण्या अर्थ समजून परत नीट वाचायला हव्या आहेत.. हे तिच्या लक्षात आले.
अरेच्या…. म्हणजे यासाठी होत्या का या कहाण्या….
देवा चुकले रे मी..
खुलभर दुधातल्या कहाणीतल्या म्हातारी सारखा मैत्रिणीने मुलाबाळांचा, सुनेचा, नातवंडांचा आत्मा तृप्त करून मग पूजा केली होती.
समाधानानी मनाचा गाभारा कसा भरायचा हे आज मला कळले रे…
या कहाण्यात सांगितलेला बोध प्रत्यक्ष आचरणात आणायला हवा आहे. हे आता तिच्या मनाला पटले.
आपल्याला बऱ्यापैकी भानं आलेल आहे. आता आपण स्वतःला बदलायचचं…
उतायचं नाही मातायचं नाही. आता हा सुदृढ विचारांचा वसा टाकायचा नाही असं मनोमन तिने ठरवलं.
तरच ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होईल…….
हे तिच्या लक्षात आले.
सुखानी नांदायचं असेल तर रोज जगताना कसं वागलं पाहिजे हे या कहाण्या शिकवतात.
मैत्रिणीनी कॉफीचा कप तिच्या हातात दिला.
आणि नातीला म्हणाली,
” तु पाठ केलेलं आजीला म्हणून दाखव”
नातं फोटोसमोर हात जोडून ऊभी राहून म्हणायला लागली..
” कैलास राणा शिवचंद्रमौळी
फणींद्र माथा मुकुटीं झळाळी
कारुण्य सिंधू भवदुःखहारी
तुजविण शंभो मज कोण तारी “
नातीने तिला प्रसाद दिला.
तिने शंकराच्या फोटोला मनोभावे नमस्कार केला.
चातुर्मासातल्या या नुसत्या कहाण्या नाहीत तर आपल्याला संपूर्ण जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या आहेत हे तिला समजले…. पुढच्या पिढीला नुसती नावं ठेवून उपयोग नाही तर त्यांना आपण शिकवले पाहिजे.. तरचं ती शिकतील हे तिच्या लक्षात आले.
☆ मिळवती झाले, काय मिळवले? – भाग-२ ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
(मुलांच्या शिक्षणासाठी, भवितव्यासाठी, त्यांना कधी काही कमी पडू नये यासाठी, त्यांचे वेगवेगळे छंद सहजपणे जोपासण्यासाठी माझं मिळवतं असणं किती उपकारक आहे हे नोकरी न करणाऱ्या आयांकडे पाहून अधिकच जाणवू लागलं.) – इथून पुढे —
कुठचाही गर्व नव्हता, पैसे मिळवते म्हणून मिजास तर नव्हतीच नव्हती. पण मुलांना उत्तम त-हेने वाढवतोय, त्यांचा व्यक्तित्व-विकास साधू पहातोय याचा अभिमान, त्याहीपेक्षा हा आनंद मात्र नक्कीच खूप जास्त होता. नोकरी करतांना मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही ही खंत होती. ‘‘आई, इतर मुलांच्या आया कशा शाळेत येतात, बाईंशी बोलतात. तू मात्र कध्धीच येत नाहीस शाळेत. ” असं खट्टू होऊन मुलं कधीकधी म्हणायची. मन खूप कातर व्हायचं तेव्हा. वाटायचं चार दिडक्यांसाठी केवढी ही यातायात. आणि नेमक्या अशाच वेळी, मुलांच्या ट्रीपसाठी, गॅदरिंगसाठी, स्कॉलरशिपच्या स्पेशल क्लाससाठी, शाळेच्या इमारतीच्या निधीसाठी या आणि अशा असंख्य कारणांनी किती पैसे वरचेवर खर्च करावे लागतात हे आठवायचं. एकटाच कमावता असणाऱ्याच्या पगारात घरदार चालवितांना घरातल्या सर्वांच्याच मनाची होणारी कुतरओढ, सर्व आघाड्यांवर एकट्यानेच एकाचवेळी लढतांना करावी लागणारी उरस्फोड आसपास दिसायची आणि त्या माझ्या त्या चार दिडक्यांची किंमत झर्रकन् जाणवून जायची. या असल्या वारंवार उद्भवणा-या प्रसंगातून, मुलांच्या सर्व गरजा विनासायास भागविण्यासाठी पैसे मिळवणं अधिक गरजेचं आहे, नोकरी ही एक अविभाज्य गरज आहे हे वास्तव मनाला पूर्ण पटलंच होतं. आणि एकदा हे पटल्यावर उगीच खंत करत बसण्यापेक्षा, मिळणारा रिकामा वेळ जास्तीत जास्त करून मुलांसाठी राखून ठेवावा हे शक्य होतं.
या असल्या झोपाळ्यावरच बसून झुलणा-या विचारांना सोबत घेऊन काळ पळतच होता. मुलं मोठी होत होती. आवश्यक ते सर्व संस्कार, हौस, मौज-कौतुक, सगळं उरीपोटी धडपडून केलं जात होतं. त्यांच्या दुखण्या खुपण्यासाठीच जणू रजा साठत होती – संपत होती. नोकरीत मिळणा-या LTC सारख्या अनेक सवलतींचा उपयोग लहान वयातच मुलांना प्रवासाचा अनुभव, मजा मिळवून द्यायला, आपल्या देशातली सौंदर्यस्थळं दाखवायला करता येत होता. त्यांच्या आवडीचे नाटक सिनेमे, प्रत्येक वेळी भेळ-आईस्क्रीम सकट, या मिळवतेपणामुळेच फारशी तारांबळ न होता पार पडत होते. मुळात संसाराची खूप आवड होतीच म्हणून आणि नोकरीमुळे घराकडे दुर्लक्ष करते असं कोणी म्हणू नये म्हणूनही रात्रीचा दिवस करून, दिवाळीचा फराळ, गौरीगणपतीची आरास, वाढदिवसांचे केक सारं-सारं घरीच केलं जात होतं… कदाचित् जास्तच नेटकेपणाने. रजा काढून, वेळेत सवलत घेऊन, वेगवेगळ्या कारणाने सवाष्ण-ब्राह्मण जेवू घातले जातच होते. स्वत:च्या कुवतीचा परीघ पुरेसा लवचिक करून हवा तसा मोठा करण्याची ही उमेद मला नोकरीनेच दिली होती ना?
आणखी एक गोष्ट प्रकर्षाने याच काळात जाणवली. नवरा काय किंवा सासरचे इतर कोणी काय, त्यांची निगा – हो निगाच म्हणायला हवं, वेळच्यावेळी राखली की मग मी दिवसभर नोकरी करायला त्यांची हरकत नव्हती. कारण मी क्वचितही कर्तव्यात कसूर करणार नाही हे त्यांना ठाऊक होतं. म्हणून जे बरं चाललं होतं त्याला आधार परत मिळवतेपणाचाच.
आणि हो, घरात निर्माण झालेल्या कुठल्याही प्रश्नाचं खापर फोडायलाही हा नोकरीरूपी दगड होताच – सोशिक, सहनशील, सदैव हवाच असलेला, ‘तुझी काही गरज नाही’ असं गुरकावणारा समोरचा माणूस मनातून आपल्यावर खूशच आहे हे मनोमनी जाणणारा.
जरा वय वाढलं तसं घरात मदतीला कोणी बाई नेमावी असं वाटू लागलं. नोकरीच्या जीवावर उधळपट्टी चाललीय, मिजास वाढलीय् इ. बोलण्यांकडे दुर्लक्ष करण्याएवढा मनाचा घट्टपणा नोकरी करतांना केव्हाच मिळाला होता. जणू एखादा परममित्रच. शिवाय मी दोन बेरोजगारांना रोजगार मिळवून देत होते हा एक समाधान देणारा मुद्दा वेगळाच.
कितीक प्रसंग – घर की नोकरी हा प्रश्न पाडणारे – पण एव्हाना हे प्रश्न पेंढा भरलेल्या वाघासारखे असतात हे कळलं होतं. कारण प्रत्येक प्रश्नाला घरासाठी नोकरी हेच उत्तर येत होतं. कसाही विचार केला तरी. साड्या-दागिने-हॉटेलिंग यासाठीच नोकरी कधीच नव्हती. हां, नोकरीमुळे मी माझा व्यक्तित्व विकास, मुलांचे उत्तम शिक्षण, आणि एकूणच सर्व घराची आर्थिक उन्नती.. याला नक्कीच हातभार लावतेय याचा मला अभिमानच वाटायला हवा ना? अपराधीपणाची भावना कशासाठी? आल्यागेल्याला काही काळ दिलासा, लायक गरजू माणसाला जमेल तेवढी आर्थिक मदत या मिळवतेपणामुळेच शक्य होत होती. मुलांना वेळ कमी देता येत असला तरी, त्यांच्या बाबतीत कुठल्याच कर्तव्यात मी कमी पडत नाही हे मी कणखरपणाने सांगू शकत होते ना?
बाहेरगावी जावं लागेल, घराकडे, मुलांकडे दुर्लक्ष होईल म्हणून, चालत आलेली प्रमोशनची संधी मी आपणहून नाकारली तेव्हा खूप क्लेश झाले मनाला. मी माझ्यासाठी की इतरांसाठी हे द्वंद्व कित्येक दिवस चालू होतं मनात. शेवटी ‘मिळवती’ पेक्षा ‘आईचा’ विजय झाला. हे compromise – कर्तव्याचा आनंद आणि स्वत्त्व दुर्लक्षिले याचे दु:ख… दोन्हींचा एकदम अनुभव देणारं – हीसुद्धा मिळवतेपणाचीच देणगी.
आता मुलं इतकी मोठी झालीयेत की दोन वेळेची जेवणाची सोय करण्यापलीकडे, आणि बाबांबद्दल खात्री नसेल तेव्हा आईकडे पैसे मागणे यापलीकडे आईची गरज राहिलेली नाही. आणि हो, इतके दिवस, ‘‘आई, तू किती वेळ बाहेर असतेस घराच्या ” असं म्हणणारी तीच मुलं ‘‘आई तुला काही माहिती नाही, बाहेर जगात काय चाललंय् ते ” असं म्हणून माझ्यावरच गुरगुरू पहातात तेव्हा हसूच येतं मला – एक समाधानमिश्रित हसू.
असं वाटतं, ‘बरं झालं नाहीच सोडली नोकरी ते’ – हाच विचार माझ्या समवयस्क मिळवत्यांना मनात येत असणार. नाही माझी खात्रीच आहे तशी. नाहीतर स्वेच्छानिवृत्तीची सवलत असूनही फारशा मिळवत्या बायका त्याचा फायदा घेतांना दिसत नाहीत. सगळ्यांनाच जाणवत असणार की, मुलांचा सहवास, घराचा सहवास, काही प्रमाणात शरीरस्वास्थ्य यासारखं महत्त्वाचं काही गमावलं असलं तरी कितीतरी, एरवी हरवल्यासारख्या झाल्या असत्या त्या गोष्टी या मिळवतेपणामुळेच तर मिळाल्या होत्या ना? स्वत:च्या कर्तृत्वाची जाणीव, धीटपणा, निर्णयक्षमता, आत्मविश्वास, कणखरपणा, सर्वांशी जमवून घेण्याची सवय, अशा कितीतरी आधारकाठ्या, ज्या मिळवती झाल्यावर माझ्याही नकळत सहजपणे माझ्या हातात आल्या, त्यांच्या आधारानेच तर घर-नोकरी ही तारेवरची कसरत जमून गेली. त्याबद्दल नोकरीचे आभार तरी किती मानावे?
Self help is the best help असं म्हणतातच ना?
इतकं शिकूनही फक्त स्वयंपाकपाणी करत घरी बसावं, सर्वांनी आपल्याला गृहीत धरावं, आपापल्या तालावर नाचायला लावावं, स्वत्त्व विसरायला लावावं आणि आपल्या हातात कोणतेच पत्ते नसल्याने, येणाऱ्या सगळ्या अडचणी आणि त्यासाठी फक्त स्वतःला गृहीत धरलं गेलं तरी ते सगळं मुकाट सहन करावं, यापेक्षा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून संसारातल्या संकट वाटाव्यात अशा कितीतरी गोष्टी सहजपणे हाताळायला शिकवणारं.. त्यासाठी बळ देणारं मिळवतेपण नक्कीच चांगलं नाही का?
असं म्हणून हुश्श म्हणता म्हणता दचकलेच. ५ मिनिटात केवढा प्रवास करून आलं मन.
आणि मग एकदम एक विचार चमकून गेला मनात –
‘‘ कुछ पानेके लिये कुछ खोना पडता है।” असं खेदाने म्हणण्याऐवजी, आपण दिलखुलासपणे असं का नाही म्हणावं… ‘‘ कुछ खोनेके लिए पहले कुछ पाना तो पडता है ना?”
☆ मिळवती झाले, काय मिळवले? – भाग-१ ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
‘‘ए आई SS, अहो बाबा, लवकर या ना इकडे. ओळखा बरं काय गंमत आहे माझ्याकडे? नाही ना ओळखत? अहो मला बँकेत नोकरी मिळाली. हे पहा पत्र. आई, इतकं मस्त वाटतंय् ग मला. आता मी मिळवती होणार, माझ्या पायावर उभी रहाणार… ”
… आज अचानक माझं मन एकदम २५ वर्षं मागे गेलं होतं. अचानक तरी कसं? आज नोकरीला २५ वर्षे पूर्ण झाली. बँकेत छोटासा शुभेच्छादर्शक कार्यक्रम झाला. घरी येतांना एका वेगळ्याच आनंदात मन तरंगत होतं. कसला आनंद हा? ही कोणती वेगळीच तृप्ततेची झालर आहे या आनंदाला? माझी मीच विचारात पडले. आणि मला एकदम तो नोकरी मिळाल्याचा दिवस आठवला. पाय चालत होते पण मन मात्र आठवणींच्या गोफात गुंतून गेलं.
नोकरीचा पहिला दिवस, मग पहिला पगार, त्याचा एक वेगळाच मन भरून टाकणारा आनंद, त्यातून घरातल्या सर्वांसाठी घेतलेल्या भेटवस्तू, नकळत नोकरीत रुळत गेलेलं मन, बँकेच्या परिक्षांमध्ये मिळवलेलं यश, मनाजोगत्या जोडीदाराशी लग्न, आयुष्याची सांगता झाल्याचं सांगत आलेला पहिला मुलगा, आधी मातृत्व की आधी नोकरी या कात्रीत सापडून बराच काळ कासावीस होत राहिलेला जीव… एक एक करत जणू चित्रपटच उलगडत होता मनासमोर, आणि अचानक एका विचारापाशी गचकन् ब्रेक लागावा तसं मन थांबलं… ‘ आज २५ वर्षं झाली. काय मिळवलं मी इतक्या वर्षात? नि काय गमावलं? ‘ हा विचार – विजेसारखा कल्लोळत आला नि त्याने दोन्ही मनांना जागं केलं.
‘मिळवती झाले खरी, पण काय मिळवलं? ’ – एक मन.
‘मिळवती झाले नि काय काय मिळवलं!! ’ – दुसरं मन.
— – या दोन मनांच्या हुज्जतीत, बुध्दीला न्यायनिवाड्याचं काम देऊन सुनावणी सुरू झाली…
का मला एवढा आनंद झाला होता नोकरी मिळाल्याचा? मुलींनी खूप शिकावं आणि एवढया शिकल्या म्हणून करिअर करण्याचा जोरदार विचार करावा असे ते दिवस नव्हते. स्त्री-सुधारणेची गाडी, मुलींनी लग्नाआधी कमीत कमी पदवीधर व्हावे या वळणावर येऊन बरेच दिवस थांबलेली होती. उपवधूंसाठी ‘नोकरी करते’ हा अजूनतरी सर्वात मोठा जमेचा मुद्दा झाला नव्हता. मला आनंद झाला त्याचं कारण म्हणूनच जरा वेगळं होतं.
– – शिक्षणाचा नोकरी करतांना उपयोग होतो ही माझी प्रामाणिक समजूत प्रत्यक्षात भ्रामक आहे हे माहिती नव्हतं. त्याहीपेक्षा, आई-वडिलांनी इतके पैसे खर्च केले, आता पाठच्या भावंडांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी मी हातभार लावू शकेन हे समाधान सर्वात जास्त होतं. ऐश करण्यासाठी पैसे मिळविण्याचा विचार मनात यावा असे संस्कार नव्हतेच आमचे. थोडी स्वत:ची हौस, थोडी घरातली गरज आणि स्वत:च्या कर्तव्याची नव्याने होऊ लागलेली जाणीव यामुळेच नोकरी करावीशी वाटत होती.
तर नोकरी मिळाली. चुटकीसरशी रिकामटेकडा वेळ कामाला लागला. सुस्तावलेला मेंदू अंग झडझडून जागा झाला. त्याच्या हातात बांधलेले हातापायांचे लगाम ओढले गेले तसा हातापायांचा वेग वाढला. रिकामपणी उगाचच इकडेतिकडे भिरभिरणारे डोळे घड्याळ्याच्या काट्यांवर स्थिरावले आणि या सर्वांचा परिपाक म्हणून मी चक्क वक्तशीर झाले. आणि हो, बँकेत इतरांनी नावे ठेवू नयेत म्हणून नीटनेटकेपणाने – टापटिपीने राहू लागले. आईला केवढा आनंद. जणू हा तिचाच विजय!
हळुहळू मग एक बोचरं सत्य उजेडात आलं. माझ्या रूपागुणांच्या कानामागून येऊन चांगलाच तिखट झालेला ‘माझं मिळवतेपण’ हा asset, उपवधू म्हणून असणारा माझा भाव अचानक वधारून गेला आणि सहजपणे एक उत्तम स्थळ मिळून गेलं. सुसंस्कृत सुशिक्षित मध्यमवर्गीय घर, स्मार्ट हुशार नवरा इ. इ. — पण तरीही नोकरी हा asset हातचा घालवून स्वत: एक liability बनून रहावं हे मनाला पटेना. आणि इथेच सासरच्या लोकांशी माझं चक्क एकमत झालं.
रस्ता बदलला पण माझं मिळवतेपण चालूच राहिलं. या मिळवतेपणाचं खरं रंग रूप इथूनच पुढे नीट दिसू लागणार, एवढं कळण्याएवढी विचारशक्ती, ते रूप कोणतंही असलं तरी सहज, हसतमुखाने आपण त्याच्याशी हातमिळवणी करू हा आत्मविश्वास, इतके दिवस नोकरी करता करता आपोआपच मिळाला होता.
जीवनक्रम बदलला तसं माहेरी असणारं हट्ट करण्याचं, बेजबाबदारपणे वागण्याचं स्वातंत्र्य, ‘जबाबदारी’ चं रूप घेऊन घरी मुक्कामालाच आलं आणि इथेही, आपलं काम पार पाडतांना कुठल्याही कलीगबरोबर adjust करून घेण्याची नोकरीमुळे जडलेली सवय मदतीला पदोपदी धावून येऊ लागली. घड्याळ्यासोबत पळण्याचा वेग कमालीचा वाढला होता. आपल्या नोकरीचा घरातल्यांना त्रास होऊ द्यायचा नाही हा एक नवा संस्कार हातात छडी घेऊन सतत पाठीमागे आहे असं वाटायचं. केव्हा केव्हा खूप जाचही व्हायचा त्याचा. पण इथेच एक नवा विचार मनात उगवू पहातोय हे जाणवायला लागलं… सगळ्यांचा मानमरातब अगदी मनापासून सांभाळून, त्यासाठी कुवतीपेक्षा जास्तच धावपळ करूनही कुठेतरी आपण स्वतंत्र आहोत, बहुतेक आर्थिकदृष्ट्या, हा विचार… तो मिळवतेपणाच्या खतपाण्यावर तर रुजत होता ना? हळूहळू सासरच्या अंगणात त्याला कर्तेपणाची, स्वाभिमानाची, स्वत:चा सुगंध दरवळणारी गोड मोहक फुलं येऊ लागली. नोकरी करतो म्हणजे – जगावेगळं काही करत नाही ही स्वत:च स्वत:ला दिलेली शिकवण, या फुलांचा आल्यागेल्याच्या स्वागतासाठीच उपयोग करीत होती. आणि इथे मूठभर की ओंजळभर हा निर्णय घेण्याची शक्ती, अधिकार मला मिळवतेपणानेच मिळवून दिला होता.
यथावकाश संसारवेलीवरही फूल उगवलं. दिसामासाने वाढू लागलं. हे वळण मात्र खरं परीक्षा घेणारं होतं. वाढती जबाबदारी पेलायला आवश्यक असणारा चाकरमानीचा हात, त्या बाळमुठीत आपली बोटे सोपवून त्याच्यासोबत रिकामा रहाणार का हा यक्षप्रश्न, नव्हे एक चावरा भुंगा मनात गरगर फिरू लागला. बाळ मोठा होत होता तसंतसं हे नोकरीचं जू झुगारून द्यावसं वाटायला लागलं. त्याचं ‘आई-आई’ ऐकूनही, अडखळणारं पाऊल जबरदस्तीने दाराबाहेर टाकतांना मनावर ठेवावा लागणारा दगड त्या नोकरीवरच फेकून मारावा आणि माघारी वळावं असं रोज-रोज वाटायचं. नोकरीपायी आपण बाळाकडे दुर्लक्ष करतोय का, आईच्या कर्तव्यात कमी पडतोय का ही नोकरीपायी निर्माण झालेली पहिली आणि अत्यंत दाहक व्यथा होती. काम करतांना सतत मन कुरतडत रहाणारी, मन:स्वास्थ्य पळवून नेणारी, व्याकूळ करून सोडणारी. सोडावी का नोकरी? काय करू? पण मग बाळ मोठा होईल, त्याचं स्वतंत्र विश्व निर्माण होईल आणि आपण हळुहळू रिकामं व्हायला लागू तेव्हा काय? या महागाईच्या दिवसात, हातातली चांगली नोकरी, काही वर्षांच्या मानसिक ओढाताणीसाठी सोडणं कितपत शहाणपणाचं आहे? आणि ‘ मी ‘ की घर.. मुलगा ‘ ‘ व्यवहार की भावना ‘, ‘पैसे की प्रेम’ या दोन टोकात हिंदकाळणारा मनाचा किरकिरणारा झोका एक दिवस खाडकन थांबला. तो दिवस – मुलाला शाळेत घालण्याचा. बालवाडीत प्रवेश मिळविण्यासाठी २०००रु. डोनेशन द्यावं लागणार हे कळलं. पूर्वीचे २०००रु. खूपच होते. पण ते भरून मग मुलगा मॅट्रीकपर्यंत चांगल्या शाळेत राहील असं म्हणून खुणावणारं समाधान, आणि ते समाधान कुशीत घेऊन उभं राहिलेलं माझं मिळवतेपण.
समाधानाची किंमत पैशात मोजायला लावणारा तो पहिलाच प्रसंग. पण नंतरही बरेचदा भेटला. आणि फार शिकवून गेला. फार मोठा आत्मविश्वास देऊन गेला की मुलांचे भवितव्य उजळविण्यासाठी मी देवीसारखे चार हात लावलेत. चहू दिशांनी बाळाला प्रेमाने न्हाऊ घालणारे ममतेचे दोन हात आणि त्याचे हात हातात धरून, त्याची मान उंच आणि पावले आत्मविश्वासपूर्वक पडावी म्हणून आवश्यक ते पाठबळ पुरविणारे दोन ‘अर्थ’ पूर्ण हात. मनाची खिन्नता, मन कुरतडणारी खंत मग पळूनच गेली कुठेच्या कुठे. मुलांच्या शिक्षणासाठी, भवितव्यासाठी, त्यांना कधी काही कमी पडू नये यासाठी, त्यांचे वेगवेगळे छंद सहजपणे जोपासण्यासाठी माझं मिळवतं असणं किती उपयोगी पडणारं आहे हे दिवसेंदिवस अधिकच जाणवू लागलं.
शुक्रवारी रात्री दहा वाजता मी घरी पोहोचलो. लॅचने घर उघडलं, बेडरूममध्ये अंजली गाढ झोपली होती. तिला दुसऱ्या दिवशी बँकेत जायचं असतं, मला शनिवार रविवार सुट्टी. मी कपडे बदलले, हातपाय धुतले आणि फ्रीझमधून बाटली काढली. ग्लास, सोडा, काजुगर सर्व तयारीनीशी मी प्यायला बसलो. एका दमात लार्ज पेग संपवला… दुसरा पेग भरला आणि रोलिंग चेअरवर डुलत बसलो. अंजली झोपली हे बरेच झाले नाहीतर माझ्या ड्रिंक वरुन चिडली असती आणि एक मोठे लेक्चर दिले असते तिने. माझे पण पिणे फार वाढले हे खरेच. अस्वस्थ मन शांत करण्यासाठी या पेयाचा आधार घेतोय मी.
शांतता आहे कुठे मनाला? मोठे होण्यासाठी धावतोय.. दुसरा कुणी पुढे जाण्याआधी माझा वेग वाढवतोय…. यात माझी दमछाक होतेय… तरी धावतोय.. धावतोय.
मला या वेळी माझ्या आईबाबांची आठवण येते आहे, कोकणातील धामापूर सारख्या खेड्यात रहाणारे, रोज धामापूरहुन मालवणला चालत शाळेत जाऊन शिक्षकांची नोकरी करणारे माझे बाबा, सकाळी पाचला उठून कमरेवर कळशी घेऊन पाणी भरणारी आणि आम्हा तीन भावंडांना संस्कार देणारी माझी माता.. दोनशे रुपये पगारात महिना चालवत होते. समाधानी होते.. त्यात सतत आलं गेलं होतं. सण आनंदाने साजरे होतं होते.. शाळेत जाताना आम्हा भावंडाच्या पायात चप्पल नसायचं तरी काटा सहजासहजी घुसायचा नाही पायात कारण पाय घट्ट होते. त्याकाळात नव्हते ताण? काळज्या? पुढे जायची घाई? थोडीपार होतीच… पण असं दारू पिऊन डोकं शांत करायच किंवा झोपेची गोळी घेऊन झोपायच, कुणाच्या मनात यायचं नाही, पण आत्ता या काळात?
माझ्या डोक्यात विचारांचा पिंगा घुमत होता.. त्याच वेळी नवीन प्रोजेक्ट पुढील आठवड्यात पूर्ण करायची डेड लाईन पण आठवत होती. कसा प्रोजेक्ट पुरा होईल? नवीन इंजिनिअर भरलेत, पण त्यांच्या कामाची गती किती धिमी? सर्व ठिकाणी मलाच मरावं लागत. नवीन मुलांच्या चुका दुरुस्त करण्यात दिवस संपतो, मग प्रोजेक्ट कसा पुरा होईल? विचार करता करता माझा पाय लागला आणि टेबलावरचा ग्लास खाली पडला आणि खळकन आवाज झाला, त्याने अंजलीला जाग आली आणि ती बाहेर आली.
झोप मोडल्यामुळे अंजली आधी चिडली होतीच त्यात मी हॉलमध्ये बाटली, ग्लास यासह बसलेला पाहून तिचा पारा चढला.. ” घर आहे का गुत्ता? किती दारू पितोस? काही लाज…? “
“अग नाही, आत्ताच सुरु केलंय ‘.
“तुला काय वाटलं, मी झोपले म्हणजे ठार मेले काय, मला जाग होती दार उघडलंस त्याची? दोन पेग तरी झाले असतील… कशाला प्यायची? “
“अग टेन्शन कंपनीत.. मनातून भीती जात नाही.. प्रोजेक्ट पुरा नाही झाला तर लाथ मारतील म्हणून… इथे तुमच्या बँकेसारखी यूनियन वगैरे काही नसतं.. “
“म्हणून दारू? “
“मग काय करू? कसा विसरू दिवसभराचा त्रास? “
“त्या करिता दारू हा पर्याय नाही अजित.. “
“मग? दुसरा कसला पर्याय आहे का? “
“आहे, माझ्या मैत्रिणीचा दीर आहे मानसोपचारतज्ञ, डॉ नाडकर्णी. ”
“म्हणजे मी वेडा झालो की काय? “
“वेडा झाल्यावरच मानसोपचारतज्ञची मदत घ्यायची असते, असं वाटतं का तुला? याकरिता वाचन हवं.. मनाचं आरोग्य महत्वाचं, आपण भारतात त्याकडेच दुर्लक्ष करतो. ताण तणाव याकरिता परदेशात कौन्सीलिंग करतात.. त्याचा खूपच फायदा होतो. ”
“मग मी उद्या डॉ नाडकर्णीना भेटायचं? “
“होय… मी पण सोबत येतेच आहे.. मी सकाळी मैत्रिणीला सांगून उद्याची अपॉइंटमेंट मिळवतेच, बघ ते किती तुझ्या मनात शिरतील.. तुझे प्रॉब्लेम्स कमी होतील.. आता पिणे पुरे.. झोप. ”
मी गुपचूप ग्लासाचे तुकडे भरले आणि झोपायला गेलो.
दुसऱ्या दिवशी अंजलीने आपल्या मैत्रिणीला सांगून डॉ नाडकर्णी यांची रात्री आठची भेट ठरवली.
आम्ही दोघे मरीनलाईन्स स्टेशनजवळ असलेल्या डॉ नाडकर्णी यांच्या कन्सलटिंगरूम मध्ये भेटायला गेलो. बरोबर आठ वाजून दहा मिनिटांनी डॉक्टरनी आत घेतलं.
डॉ – “ बोला सामंतसाहेब.. अगदी मनातलं बोला.. कसलाही आडपडदा न ठेवता बोला. ”
एवढ्यात अंजली बोलायला लागली.. ” डॉ, माझे मिस्टर एका मल्टिनॅशनल कंपनीत जबाबदारीच्या पोस्टवर आहेत, त्यांच्या डोक्यावर सतत जबाबदारी असते.. मोठे मोठे प्रोजेक्ट्स पुरे करायचे असतात.. त्त्यांचे म्हणणे त्यांच्या टीममधील नवीन मुलं बेजबाबदार वागतात, प्रोजेक्ट यशस्वी करण्याचे दडपण सतत राहते.. त्यामुळे… “
डॉ – “ त्यामुळे काय? “
अंजली – “त्यामुळे यांची झोप उडाली आहे.. झोपेसाठी पिल्स घ्यायची सवय झाली आहे आणि..“
डॉ – “ आणि दारू पिण्याची सिगरेट्स ओढायची गरज निर्माण झाली आहे, बरोबर ना … “
अजित – “ होय डॉक्टर, त्याशिवाय मन शांत होतं नाही, सतत डोक्यात तेच विषय रहातात.. अस्वस्थ वाटतं. ”
डॉ – “ पण काय? दुसऱ्या दिवशी पुन्हा मन अस्वस्थ होतच ना? आणि शरीरावर हँगओव्हर रहातो त्याचे काय? दारुमुळे शरीराची नासाडी होते त्याचे काय? “
अजित – “ खरे आहे डॉक्टर, मला फार शरमिंदे वाटते, आईवडिलांची आठवण येते. ”
डॉक्टर – “ का? आई वडिलांची आठवण का येते? तुमच्या लहानपणाबद्दल सविस्तर सांगा. ”
अजित – “ डॉ, मी कोकणातला. माझे वडील शिक्षक.. मेहनती.. रोज पंधरा किलोमीटर चालत जाऊन येणारे. शिवाय घरची थोडी बागायती सांभाळणारे. आई पण खुप मेहनती. घरात गाई वासरे होती. त्त्यांचे दूध काढून विकून दोन पैसे संसारासाठी जमवणारी. मला अजून दोन भावंडे. या गरिबीत सर्वाना उत्तम शिक्षण आईबाबांनी दिले. “
डॉ – “ खरेच भाग्यवान आहेस तू. कोकणात जन्म. कोकण म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात.. तेथली माणसे गरीब असतील कदाचित पण साधी आणि कलासक्त.. अनेक मोठे कलाकार कोकण गोव्यातील दिसतील. “
अजित – “ होय, डॉक्टर.. माझे बाबा तबला काय वाजवायचे.. त्यांच्यासारखा तबला कुडाळ मालवण भागात कोणी वाजवत नसे. ”
डॉक्टर – “ आणि तू? तू काही वाद्य शिकला नाहीस? ”
अजित – “ मी पेटी वाजवायचो, हार्मोनियम.. बाबांना साथ द्यायचो. तीन परीक्षा दिल्या मी.. सतत सुरांच्या कैफात असायचो मी.. पण… “
डॉक्टर – “ पण काय? आता पेटी नाही वाजवत? “
अजित – “ नाही.. पेटी वाजवायची बंद केली मी… कारण त्या सुरात हरवल्यामुळे अभ्यासात मागे पडू लागलो.. दहावीत सहामाही परीक्षेत गणितात कसाबसा पास झालो.. बाबा काळजीत पडले.. माझ्यामागची दोन भावंडे होती शिकणारी.. मला शिकायचं होतं.. हार्मोनियम वाजवून गोविंदराव पटवर्धन होणे सोपे नसते.. शिवाय कला ही अशाश्वत… दुसरे नवीन वाद्य आलं की हे वाद्य कालबाह्य ठरतं.. मोठे होऊन पैसे मिळवणे आवश्यक.. त्यामुळे पेटी विकून टाकली त्यावेळी… “.. मी डोळे पुसत पुसत डॉक्टरना माझा भूतकाळ सांगत होतो.
डॉक्टर – “ ओके, मग.. पुढे सुरांपासून लांब गेलास.. मग शिक्षणाकडे लक्ष देऊन इंजिनीअर झालास.. मोठ्या कंपनीत नोकरीला लागलास… मोठा पगार मिळू लागला.. मोठ्या जबाबदाऱ्या.. बरोबर? “
अजित – “ होय डॉक्टर, पगार मोठा आहे.. घर मोठं घेतलय.. अंजली पण बँकेत नोकरी करते.. सारं काही आहे पण मन कमकुवत झालंय.. मनातले विचार जात नाहीत… रात्री रात्री तेच विचार.. मन घाबरतं… मग त्याकरता झोपेची गोळी नाहीतर तीन चार पेग… हे संपतच नाही. ”
डॉक्टर – “ बरं, मला लक्षात आलाय तुझा प्रॉब्लेम.. हा प्रॉब्लेम तसा सर्वच नवीन सुशिक्षित मुलांचा आहे. नोकरीत पैसे देतात पण सतत कामाचे दडपण ठेवतात, सर्वसाधारण माणूस किती काम करू शकतो, त्याच्या दुप्पट अपेक्षा ठेवली जाते. पण एवढ्या पैशांची सवय झाली की दुसरीकडे कमी पगारात ऍडजस्ट करू शकत नाही. अजित, तुझे बाबा तसे भाग्यवान. कमी पगार मिळत असेल त्यांना पण ते समाधानी होते. तुझी आई कोंड्याचा मांडा करणारी होती. तुझे बाबा नशिबी कारण त्यांना उत्तम तबला वाजवता येत होता. तू पण नशीबवान कारण तू हार्मोनियम वाजवत होतास, नव्हे ती तुझी पहिली आवड होती, बरोबर…. ‘
अजित – “ अगदी बरोबर.. “
डॉक्टर – “ पण तू तुझा छंद अपुरा ठेवलास. तू पेटी विकून टाकलीस.. मी म्हणेन तू तुझं मन विकलंस, बरोबर? अजित तू सूर विसरलास.. राग विसरलास.. गोविंदराव पटवर्धन विसरलास.. बरोबर? तुझे पेटीवादन सुरु असते तर तुला झोपेची गोळी घेऊन झोपायची गरज पडली नसती.. दारू प्यायची गरज पडली नसती. तू तूझ्या छंदापासून लांब गेलास आणि मनाने कमकुवत झालास. तू तुझी नोकरी सोडू शकत नाहीस कारण तू आयुष्याच्या मध्यानीला आला आहेस, जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात अशा वयात… पण पुन्हा सुरांची आराधना कर. पुन्हा सा.. रे.. ग.. म.. प मनात आणि घरात घुमू दे. संगीताच्या मैफिली असतात मुंबईत.. तूझ्या सुट्टीच्या दिवशी बायकोला घेऊन मैफिली ऐक.. मुद्दाम पुण्याला जा रजा घेऊन आणि सवाई मैफिलिंची मजा घे.. तू तुझी टेन्शन्स केंव्हाच विसरशील.. झोपेची गोळी घ्यायची गरजच पडणार नाही तुला. ”
अंजली – “ बरं डॉक्टर, काही मेडिसिन वगैरे.? “
डॉक्टर – “ औषध एकच, जाताना दादरला थांबा आणि हरिभाऊ विशवनाथ आणि कंपनीमध्ये मस्त सुरांची हार्मोनियम खरेदी करा. सुरात भिजा, नोकरी सांभाळून गाण्याच्या मैफिली ऐका.. मोबाईलचा वापर शास्त्रीय गाणी ऐकण्यासाठी करा आणि मला पेटीवादन ऐकण्यासाठी बोलवा… आणि महत्वाचे म्हणजे अजित.. अंजली, मी पण उत्तम व्हायोलीन वादक आहे.. माझा हा छंद आहे म्हणून मी निरोगी आहे.. शरीराने आणि मनानेही… ”
“आजी हे घे पटकन, चटका बसतोय मला म्हणत चिमणीने आपल्या इवल्याश्या तळहातावर आणलेले गरम दोन भजे झेलत झेलत आजीच्या शॉलमधून आत टाकले आणि आजीने ते शॉल डोक्यावर घेत मुटूमुटू खाऊन घेतले.. आजीचा मघाचा चेहरा आणि आताच्या चेहऱ्यात एकदम बदल जाणवला आणि हे सगळं बघितलेलं रमाबाई हसून म्हणाल्या, “आजी भज्यांनी काय औषधाचं काम केलं का,..? “
तिच्या या प्रश्नावर तिला हळू बोल असे दटवत आजी खुसफूस करत म्हणाली, “रमे वीट आला आहे त्या कडूझर औषधांचा आणि त्या मिळमिळीत जेवणाचा.. जिभेला असं थोडंसं चमचमीत किंवा आवडीचं खावं वाटतं ग.. पण इथे तर काळजीच्या नावाखाली पार तोंड बंद केलं आहे आमचं. बोललं तर राग येईल ह्या लोकांना, आता 80 वर्षाची मी, मला ह्यांच्या संसारात काही जागा नाही… एरवी अडगळ होऊन जगते, मग खाऊन मेले मी तर बिघडलं कुठे… पण ही लोकं औषधं देऊन आणि ते आळणी अन्न खाऊ घालून बळजबरी जगवत ठेवत आहेत मला. त्यांचा अगदीच जीव नाही असं नाही ग, पण वीस वर्षांपूर्वी रक्तातात साखर काय सापडली, सगळ्यांनी माझी पुरणपोळी बंद केली. अग मी चालून फिरून करत होते की सगळं मेंटेन, पण उगाच बाऊ करून सूनबाईंनी माझ्या गोडावर बंधनं घातली. आधी वाटलं काळजी आहे त्यांना, पण प्रत्येकवेळी ‘नको त्रास होईल’ ह्या भीतीने घास काढून घेतला… हळूहळू मी मान्य करत गेले. पण वय वाढायला लागलं आणि माझ्यातलं लहान मुल जागं झालं.. तिकडे भजे, समोसे तळले की इकडे तोंडाला पाणी सुटतं गं… वासना वाईटच गं, पण माणूस जोडलाच आहे ना वासनेशी.. मग कसं जमवायचं सगळं..
बरं माझ्याच घरात आहे का असं, तर नाही. माझ्या मैत्रिणी ही तेच सांगतात.. परवा त्या जोशीचा फोन आला.. तिच्या नवऱ्याला आंब्याचं फार वेड… आंबा सिझन आला की रसाशिवाय जेवण करत नव्हता. पण ह्या चार वर्षात पॅरॅलीसिस ने अंथरुणावर पडला.. मग सून आणि मुलांनी काही आंबा खाऊ दिला नाही. तुम्हाला त्रास होईल म्हणे. बिचारा मरताना आंबा हा शब्द उच्चारत गेला ग. मी म्हणते दिला असता अर्धी वाटी रस तर काय बिघडलं असतं का..? शेवटी हगणं मूतणं करायला माणूसच लावलाय ना… झाले असते दोन जुलाब जास्त… दोन हगीज जास्तीचे गेले असते… पण तृष्णा तर पूर्ण झाली असती ना…
मी मात्र आता चिमणीला धरलं आहे हाताशी… आणि अति खाऊ नाही हे मलाही कळतंय की, पण… त्या चावट जिभेला कोणी सांगावं… ती म्हातारी झाल्यावर जास्त त्रास देते बहुतेक… आणि तिला हे नाक साथ देतं ना गं… आता मला सांग, आयुष्य गेलं त्या स्वयंपाक घरात… तिखट, मसाले, अश्या अनेक चवीने स्वयंपाक केला… खाल्ला, खाऊ घातला, त्या अन्नातून एवढ्या सहज मन कसं बाहेर पडेल… बरं, खायचं काही खुप नसतं. उगाच त्या वासाने चाळवळलेल्या भुकेला शमवायचं असतं बस… पण ही लोकं मऊ भात, खिचडी आणून देतात ना. त्यावर लोणचं ना काही… आणि बाऊ एवढा… ‘त्यांची तब्येत बिघडेल… ‘ मला तर अस्सा राग येतो.
पण आता चिमणी आली ना कामी. मग मी ही झाले आता लबाड. हा हा… ” म्हणत आजीने आपलं बिनदाताचं बोळकं पसरवलं आणि चिमणीला टाळी दिली.
चिमणी हसली आणि म्हणाली, “चल बाय अज्जू, अभ्यास आहे मला,.. ” आणि पळाली.
आजी मग औषध घेऊन अलगद आपली खाली सरकून झोपली. रमाबाईने त्यांच्या अंगावरची शाल नीट केली. ते करताना रमाबाईला एकदम गहिवरून आलं. मागच्या पौर्णिमेला घरात कुळाचार झाला होता. आजी आपल्याला म्हणत होती, ‘रमा, पुरणाच्या पोळीचा तुकडा आणून दे गं चोरून… ‘ पण आपण नाहीच म्हणालो. सुनांना मागितलं तर सुनांनी लगेच कांगावा केला. लेकही अंगावर धावले. बिचारी आजी गप्प बसली. चिमणी नेमकी ट्रीपला गेली होती. ‘आजीला पुरणपोळी खुप आवडते असं नेहमी म्हणतात त्या… ‘
हे सगळं आठवून रमा गहिवरली होती. दुसऱ्या दिवशी रमा छोट्या डबीत काहितरी घेऊनच आली होती. ‘आजीची खोली झाडेपर्यंत दार लावते’ म्हणत तिने आजीला पटकन डबीतून अर्धी पोळी आणि त्यावर तूप असं खायला दिलं. आजीला आनंद गगनात मावेना. ‘किती किलोचं पुरण घालायचे गं मी,.. सगळयांना वाटायचे… ‘ एवढं म्हणत आजीला रडू फुटलं. रमाने डोक्यावर हात फिरवला. “रडू नका. घ्या खाऊन. ” आजी एक एक घास खाताना डोळे बंद करून अगदी तृप्तपणे खात बसली होती. रमाला मनातून आंनद झाला.
दुसऱ्या दिवशी रमा आली तर सूनबाईची तणतण सुरू होती आजीला.. “जरा दम धरायचा ना. पातळ खराब केलं ना… ”
आजी अगदी अपराधी होऊन ऐकत होती. पण रमाने सावरलं. “असू द्या मॅडम, मी आवरते सगळं… जा तुम्ही… “
आजीचे डोळे भरून आले. म्हणाली, “माझ्या हावरट पणाचा रमा तुला त्रास गं… “
आजी म्हणाली, “आता आवड निवड अशी नाही गं, पण काय माहीत ह्या जीवाला कशी ही अन्नाची तृष्णा लागते… फार नाही, पण अगदी घासभर का होईना खावंसं वाटतं… “
रमाबाई निघाली. आजी म्हणाली, “रमा, ह्याला तू हवरटपणा समज की काहीही, पण तू असे वयस्कर लोकांना सांभाळायचे काम करते म्हणून सांगते, जे आमच्यासारखे अगदी जाण्यासारखे आहेत…. त्यांना खाण्यासाठी तरसु देऊ नकोस गं,.. ह्या देहाचे हे खेळ कळत नाही कधी कधी, त्या वासनेत जीव अडकून बसतो गं,.. जा बाई, अंधार पडलाय, ये उद्या… “
रमा निघाली. रात्री झोपेत आजी स्वप्नात आली… “मुगाचा लाडू आणते म्हंटली, ह्याने सुद्धा जीव तृप्त झाला गं रमे,.. “
रमा दचकून उठली. पहाटेचे पाच वाजले होते… तेवढयात मोबाईलवर रिंग वाजली… आजीच्या घरून फोन… तिने पटकन उचलला… आजीची सुनबाई रडत बोलत होती.. “आजी गेल्या रमाबाई,.. जरा मदतीला या लवकर” म्हणत फोन ठेवला.
रमाला गहिवरून आलं. रात्री ओट्यावर काचेच्या बरणीत बांधून ठेवलेले लाडू देखील रडत होते. जणू काही तृप्ती राहिली हे सांगत होते. पण स्वप्नातलं आजीचं वाक्य रमाला आठवलं. ‘तृप्ती झाली ग रमे… ‘ हे सगळं आठवून रमाला अधिकच रडू फुटलं…
कॉलेजचा शेवटचा दिवस होता. सर्वजण एकमेकांना मिठ्या मारून निरोप घेत होते. मैदानावर तर त्यादिवशी जत्रा भरलेली होती. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी दाटून आलेलं दिसत होतं. आणि मी वैशालीला आणि विनयला शोधत होतो. जवळपास अर्धा तास होऊन गेला तरी दोघेजण माझ्या नजरेला दिसत नव्हते. शेवटी मी त्यांना शोधायचा नाद सोडला आणि जायला निघालो. तर कॉलेजच्या गेटजवळ दोघेजण दिसले.
दोघेही एकमेकांच्या समोर जवळपास दहा फुटांवर उभे होते. दोघंही एकमेकांच्या डोळ्यात टक लावून पाहत होते. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. आणि एकमेकांच्या जवळही जात नव्हतं. त्यांना त्या अवस्थेत मी बघितलं आणि माझ्याच काळजाचं पाणी झालं. मी विनय जवळ गेलो. त्याचा हात धरला आणि त्याला ओढून वैशाली जवळ आणून उभं केलं. तसा विनयचा हुंदका बाहेर पडला त्याच्या डोळ्यातून पाण्याची धार वाहायला लागली. त्याने खिशातला रुमाल काढला आणि डोळे पुसणार तोच वैशालीने त्याच्या दोन्ही डोळ्यातलं पाणी तिच्या दोन्ही हाताने पुसायला सुरवात केली.
मी मात्र हा खेळ शांतपणे बघत उभा राहिलो. दोघांच्याही डोळ्यातलं पाणी संपल्यावर मग दोघांना मी तिथं असल्याची जाणीव झाली. आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं. त्या दोघांचा एकमेव आधार मी होतो. दोघांचाही मितवा मीच होतो. त्या दोघांच्यात काही भांडण झालं किंवा वाद झाले तर कायम मीच मिटवायला हजर असायचो. दोघेही जीवापाड प्रेम करायचे. त्या दोघांचा हा सिनेमा तीन वर्षे सुरू होता आणि मी एकटाच हा सिनेमा पाहत आलो होतो. काहीवेळा तर या सिनेमाचा लेखक मीच झालो होतो. कारण बऱ्याचवेळा त्या दोघांना पुन्हा एकत्र आणण्यात माझा वाटा मोठा होता.
आज आम्ही तिघेही वेगळे होणार होतो. पुन्हा भेट होईल न होईल माहित नव्हतं. पण या दोघांनी मात्र आयुष्यभर सोबत राहायचं लग्न करून संसार करायचा ही स्वप्ने बघितली होती. पण उद्यापासून भेट होणार नव्हती. एकमेकांना बोलता येणार नव्हतं. त्यावेळी मोबाईल नव्हते. वैशालीच्या घरी फोन होता. पण तो तिला वापरायला बंदी होती. एकमेकांचा निरोप एकमेकांना पोचवायचा कसा? हा त्यादिवशी मोठा प्रश्न दोघांनाही पडलेला होता. आणि याचं उत्तर फक्त माझ्याजवळ मिळेल असा त्यांना विश्वास होता.
आम्ही तिघेही चालत एस. टी स्टँड वर आलो. तिघांची तीन गावे तिन्ही दिशेला होती. त्यामुळे आता जशा गाड्या येतील तसे आम्ही वेगळे होणार होतो. दोघेही माझ्याकडे केविलवाणे पाहू लागले. आणि मला मार्ग सुचला. ठरलं असं ज्या गाड्या आमच्या गावातून जिल्ह्याच्या ठिकाणी येतात आणि जातात त्या एस. टी. च्या मागे खडूने कोड मध्ये आपला मेसेज लिहायचा. मग ते कोड ही मी ठरवले. हळूहळू तिघांच्या गाड्या आल्या आणि आम्ही वेगळे झालो.
मी आणि विनय मात्र दुसऱ्या दिवसापासून भेटू लागलो. स्टँडवर विनय सकाळीच हजर असायचा. दुसऱ्या दिवशी वैशालीच्या गावची गाडी समोर उभी होती. विनयने खिशात खडू आणलेच होते. आम्ही गाडीच्या मागे गेलो आणि तिथं 8.. 1.. एवढच लिहिलं. त्याचा अर्थ होता आठवण येतेय.. म्हणून… दोघेही हसलो. गाडी गेली. ती गाडी जाऊन पुन्हा यायला तीन तास लागायचे. आम्ही वाट पाहत थांबलो. तीन तासाने ती गाडी पुन्हा आली. आम्ही धावत गाडीच्या मागे जाऊन बघितलं. तर वैशालीने तिथं चौकोन काढून त्यात खाडाखोड केली होती. आणि तिथं बारीक अक्षरात तीन शब्द लिहिले होते. ते असे.. त… रा… स..
याचा अर्थ तिला खूप त्रास होतोय..
दुसऱ्या दिवशी आम्ही गाडीवर लिहिलं.. एक प्रश्नचिन्ह काढलं. त्याच्या पुढे मराठीत त्रेसष्ठ लिहिलं. याचा अर्थ होता कधी भेटायचं? . गाडी गेली. पुन्हा तीन तास वाट बघत बसलो. पुन्हा गाडी आली. आम्ही तिथं जाऊन बघितलं पण तिथं काहीच नव्हतं. विनय नाराज झाला. आम्ही तिथून निघणार तेवढ्यात बाजूला चिकटवलेलं पत्रक दिसलं. ते पत्रक होतं तिच्या गावच्या जत्रेचं. आणि त्या पत्रकावर खाली तिने व्ही हे अक्षर इंग्रजी मध्ये दोनवेळा लिहिलेलं होतं. विनय आणि वैशाली. म्हणजे जत्रेत या तिथं भेट होईल. विनयला लै आनंद झाला. आम्ही गाडीवर पुन्हा लिहिलं. ओके.. आणि पुन्हा प्रश्नचिन्ह.. म्हणजे जत्रेत कुठं आणि किती वाजता.?? गाडी गेली.. आता पुन्हा वाट पाहणे गरजेचे होते. पुन्हा गाडी आली आणि उत्तर ही आलं. तिने एक गोल काढून त्यावर बारीक बारीक चौकोन काढलेले होते. आणि मध्ये दहा हा आकडा लिहिलेला होता. आम्ही डोकं खाजवून खाजवून अंदाज लावला आणि माझ्या लक्षात आलं. जत्रेत पाळणे येतात. त्या पाळण्या जवळ दहा वाजता भेट होईल. मी हा शोध लावल्यावर विनय माझ्याकडे फार कौतुकाने बघू लागला.
मी आणि विनय तिच्या गावच्या जत्रेत हजर झालो. जिथे पाळणे होते तिथं तिची वाट पाहत थांबलो. आणि काही वेळाने घामाने भिजलेली वैशाली तिथं आली. विनय आणि वैशाली दोघेही बराच वेळ तिथं थांबले. मी तोपर्यंत जत्रा फिरून आलो. विनयने तिच्या हातात गुलाबी फुगा दिला आणि मी तिथून निघालो.
सहा महिने हा खेळ सुरू राहिला. मला एका ठिकाणी नोकरी मिळाली होती. मी माझ्या कामाला जात होतो. विनय मात्र दररोज एस. टी स्टँडवर पडून असायचा. आणि रात्री एका ठिकाणी कामाला जायचा. काम संपवून सकाळी स्टँडवर हजर व्हायचा आणि प्रेमाच्या त्या अक्षरांचा खेळ रंगवत बसायचा. आता बऱ्यापैकी दोघानाही कोड ची भाषा जमायला लागलेली होती. अर्थात या शाळेचा आणि या दोघांचा मास्तर मी होतो. त्यामुळे मला समाधान होतं. मी माझ्या नव्या नोकरीत रमून गेलो होतो. विनय ही बरेच दिवस झाले मला भेटायला आला नव्हता. एस. टी दोघांच्या भावना एकमेकांच्या पर्यंत फुकट पोहचवत होती.
दोन महिन्यांनी आज विनय माझ्याकडे धावत पळत आला. मी कामावर होतो. स्टँड पासून माझं काम फार लांब नव्हतं. विनय काहीच बोलला नाही. गोंधळला होता. माझा हात धरून तो मला स्टँडवर घेऊन गेला. वैशालीच्या गावावरून आलेली एस. टी. नेहमीच्या जागेवर थांबून होती. विनयने
माझा हात धरून गाडीच्या मागे नेलं. वैशालीने पाठवलेला निरोप म्हणजे कोड त्याला आज समजला नव्हता. म्हणून तो मला घेऊन आला होता.
गाडीच्या मागे आज वैशालीने चित्र काढलेलं होतं. मडक्यावर मडके अशी पाच मडकी काढलेली होती. सगळ्यात खालचं मडकं मोठं. त्यावर त्याच्यापेक्षा लहान. त्यावर अजून लहान. अशी पाच मडकी एका रेषेत काढून बाजूला तिने एक मोठं वर्तुळ काढून ते ठळक केलं होतं. ते बघितलं आणि मला त्याचा अर्थ कळला. विनय तसाच गोंधळून माझ्याकडे पाहत होता. मला हुंदका दाटून आला. आणि मी त्याला गच्च मिठी मारली. आणि त्याला मिठीत घेत म्हणालो, ”विनय वैशाली आता कधीच तुला भेटू शकणार नाही. तू तिला विसरून जा. तुझ्या नव्या आयुष्याला सुरवात कर.. ”
विनय चिडला. त्याने मला विचारलं याचा अर्थ काय ते नीट सांग. मी विनयला पुन्हा त्या चित्राजवळ नेलं. आणि समजावून सांगितलं.. ही एकावर एक उभी असलेली मडकी म्हणजे जातीयतेची उतरंड आहे भावा.. ही उतरंड फोडून तिला तुझ्याकडे यायला परवानगी नाही. म्हणून बाजूला मोठं वर्तुळ काढून तिने तिची वेदना यात भरून पूर्णविराम दिला आहे. म्हणजे तिला थांबण्याशिवाय आता पर्याय नाही.
विनय एकदम शांत होऊन त्या चित्राकडे पाहत उभा होता आणि मी विनयकडे एकटक नजर लावून उभा होतो. तेवढ्यात गाडी सुरू झाली. विनयने ते चित्र हाताने पुसून टाकलं आणि जोरात हंबरडा फोडून रडायला लागला. त्याने जातीयतेचे वैशालीने काढलेले चित्र हाताने पुसले खरे पण ती जातीयतेची उतरंड मात्र आम्हाला फोडता आलीच नाही.
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील एका हार्ट स्पेशालिस्ट सर्जनची ही कथा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते. आजच्या काळात तर ती फारच गरजेची…. म्हणून सांगतोय.
हे डॉक्टर अतिशय निष्णात. सगळीकडे त्यांच्या कौशल्याचा बोलबाला. मृत्यूच्या दाढेतून अनेकांना त्यांनी बाहेर काढून जणू नवीन जीवन दिलेलं. मात्र ऑपरेशन करण्यापूर्वी जसा एक कन्सर्न फॉर्म (ऑपरेशनच्या परवानगीचा अर्ज) भरून घेतला जातो त्याच फॉर्मसोबत हे डॉक्टर अजून एक फॉर्म भरून घ्यायचे. त्यात त्यांनी विचारलेलं असायचं की, ‘जर तुम्ही या ऑपरेशनमुळे वाचलात, तर बाकीचे आयुष्य तुम्ही कशा प्रकारे जगणार आहात ते इथं लिहून द्यायचं आणि त्याचबरोबर आजवरच्या जीवनात “करायचे राहून गेलेलं” असं काही असेल तर तेही लिहायच. की ‘मला जीवदान मिळाले तर मी अमुक तमुक करेल!’
ऑपरेशनला आलेले रुग्ण तो फॉर्म भरून डॉक्टरकडे देत. त्यात कुणी लिहिलेलं असायच की, ‘आजवर कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही. तर आता यापुढे देईन. तर कुणी लिहायचं…. ‘माझ्या लहान मुलासोबत मी भरपूर खेळेन. ते राहूनच गेलं आहे. ‘ ‘कामधंद्याच्या नादात निसर्गात भटकायचं, टूरवर जायच राहून गेलं आहे. ते नक्की आता करणार. ‘ एकाने तर हेही लिहिलं की, ‘माझ्याकडून आजवर कुणाला दुखावलं गेलं असेल तर त्यांना शोधून त्यांच्याकडे स्वतः जाऊन माफी मागेन. ‘ एकीने लिहिलं…. ‘संसार, पै पाहुण्याच्या नादात स्वतःसाठी जगायचं, हसायचंच विसरून गेलेय… यापुढं मनसोक्त हसत हसत जगणार. ‘ निवृत्त वडिलांनी लिहिलेलं…. ‘माझ्या शिस्तीच्या वागण्यामुळे अनेकांना माझ्याबद्दल तक्रारी होत्या. उर्वरित आयुष्यात अशी तक्रार कुणाचीच येऊ देणार नाही. ‘ एका सासूने लिहिलं होतं…. ‘लेक आणि सुनेत मी थोडं डाव उजवं करत आले. आता लेकीसारखंच सुनेशी वागेन!’
अशी अनेकांनी त्यांची त्यांची उर्वरित जीवनाची संकल्पचित्रे त्या फॉर्ममध्ये शब्दात मांडली. आणि मग डॉक्टर त्या रुग्णाला ऑपरेशन थियेटर मध्ये नेत आणि यशस्वीरित्या ऑपरेशन करून जीवनदान मिळवून देत.
नंतर काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवल्यावर डिस्चार्ज देताना त्या त्या रुग्णाने भरून दिलेला तो ‘उर्वरित आयुष्याबद्दलचा फॉर्म’ त्याला परत देत. आणि त्याला सांगत की, “तुम्ही घरी जाल, नव्याने जीवन जगाल तेव्हा तुम्ही राहून गेलेल्या ज्या ज्या गोष्टी लिहिल्या आहेत, त्या प्रत्यक्षात आणल्यावर त्याच्या समोर ‘टिकमार्क’ करत जा. आणि मग सहा महिन्यांनी तो फॉर्म घेऊन मला भेटायला या आणि सांगा की त्यातल्या कशासारखं जीवन तुम्ही जगला? “
आणि मग डॉक्टरांच्या लक्षात आलं की, सगळ्यांनी सगळं लिहिलं पण कुणाशीच भांडण / वैर झालं नाही असा एकही नसणार! पण तरीही कुणीही असं लिहिलं नव्हतं की, ‘जर मी वाचलो तर मला अमुक व्यक्तीचा बदला घ्यायचा आहे. माझ्या त्या शत्रूला धडा शिकवायचा आहे. आणि जमलं तर त्याला पूर्ण बरबाद करायच आहे’
किंवा असेही कुणी लिहिले नव्हते की, ‘मला अजून खूप पैसे कमवायचे आहेत. खूप श्रीमंत व्हायच आहे. स्वतःला खूप बिझी ठेवायचं आहे. ‘
आणि मग सहा महिन्यांनी भेटायला आलेल्या रुग्णांना डॉक्टर विचारत, “ऑपरेशनपूर्वी जेव्हा कधी तुम्ही स्वस्थ होता. तेव्हा असं आयुष्य का जगला नाहीत जे गेल्या सहा महिन्यात जगलात. तुम्हाला तसे जगण्यासाठी कुणी अडवलं होत? “
यावर रुग्ण निरुत्तर होत, मात्र निघताना डॉक्टरचे पाय धरून समाधानाने घरी जात.
डॉ. डीडी क्लास : मृत्यूची घंटा वाजल्यावरच आपण जागे होतो. हार्ट अटॅक आल्यावरच त्यातून वाचल्यावर निष्कारण होणारी धावपळ थांबवतो. जेवणाखाण्याची हेळसांड थांबवतो. शिस्तबद्ध आयुष्य जगतो.
आज जरा हे सगळं वाचून झाल्यावर खुर्चीत स्वस्थ डोळे मिटून थोडं चिंतन करा की हातात किती आयुष्य आहे…. माहित नाही. पण निदान जितके आहे ते कशा प्रकारे जगायचे ते मनाशी नियोजन करा. आणि जमलंच तर ते सगळं एकाखाली एक असं वहीत लिहून काढा. आणि मस्तपैकी हातपाय तोंड धुवून नव्याने आयुष्याकडे पाहायला सुरु करा. आणि स्वतःला आधी हेच सांगा की, “अजून कुठं उशीर झालाय? जब जागो तब सवेरा” यामुळे तुम्हाला अजून उत्साह येईल. आणि हे मी स्वानुभातून सांगतोय.
पंधरा वर्षांपूर्वी मीही अशीच चूक केलेली आणि मी ती जाहीरपणे मान्य देखील करतोय. जेवणाकडे हेळसांड करून धाव धाव धावत होतो. सगळं मनासारखं प्रत्यक्षात आणलं खरं पण अचानक अटॅकपायी पूना हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल व्हावं लागलं. त्यातून बाहेर आलो खरा पण आत जातानाचा मी अन बाहेर आल्यावरचा मी यात जमीन अस्मानाचा फरक होता. जिथं चार पायऱ्या चढायला डॉक्टरांनी बंदी घातली होती आणि चौथ्या मजल्यावरचे (विना लिफ्ट)चे घर ताबडतोब सोडून ग्राउंड फ्लोअरला दुसरं घ्या असं सांगितलं होत तिथं मी ते काहीही न करता मस्त ठणठणीत जगतोय. गडकिल्ले चढून जातोय. योग्य आणि वेळेवर आहार, रोज स्वतःसाठी एक तास (morning walk) आणि योगासने, रात्री झोपताना गार दूध, नो जागरण…. बास याच उपायावर त्या आजारातून बाहेर आलो. एकही गोळी न खाता. म्हणून म्हणतो, मला जी अक्कल “घंटा” वाजवून आल्यावर आली ती वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून हा लेखप्रपंच!
आणि अजून एक म्हणजे…. फार वखवख करत जगणे सोडून द्यावे.