मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ म्हातारी लागली दळायला… – कवी : श्री इंद्रजीत पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ म्हातारी लागली दळायला…… – कवी : श्री इंद्रजीत पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

 – एक मराठमोळी लावणी –

उन्हाळ झळा पाेटी कळा,

धरणी लागलीय जळायला

म्हातारी लागली दळायला,

वळीव लागला गळायला ll ध्रु ll

*

कसं संकट उभं म्हाेरं,

बाई सुटलंय बेभान वारं

पाठवण करी साठवण घाई,

साठलं तळ्यात सारं

साऱ्यात पाणी वाऱ्यात गं,

लागलंय धुमाट पळायला

म्हातारी लागली दळायला,

वळीव लागला गळायला ll १ ll

*

वीज कडकड करीत आली,

म्हणे पुढे पडुनी गेली

वढ्यावघळी भरूनी वाहता,

तरारल्या रे तरूवेली

वेल तरणी कुणाची करणी,

लागली साली सळायला

म्हातारी लागली दळायला,

वळीव लागला गळायला ।।२।।

*

लई वंगाळ मालक जीणं,

पुन्हा खुणाविते राणी रानं

बघा माजलंय शिवारी तणं,

सवाल सतावी गहनं

घाणीचं जीणं दु:खित मनं,

लागलीच लागे कळायला

म्हातारी लागली दळायला,

वळीव लागला गळायला ।।३।।

कवी : श्री इंद्रजीत पाटील

 माे. नं. – ८००७७८९६१०

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “पृथ्वीचे मनोगत…“☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

पृथ्वीचे मनोगत☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

अरे मानवा मानवा, सांगू काय आणि कसे?

उंच बांधण्या इमले, नको नष्ट करू राने!

*

तुझ्या प्रगतीचे बाळा, मज कौतुकच आहे,

ग्रह-ताऱ्यांशी पोचली, तुझी अवकाशयाने!

*

विकासाची घोडदौड, तुझी, चालूच राहू दे,

पण पेरू नको तू रे, तुझ्या विनाशाची बीजे!

*

लोकसंख्या बेसुमार, किती वाढते वाढते,

तोल सांभाळेना माझा, शेषनागही थकले!

*

वृक्ष तोडून तोडून, काँक्रिटीकरण सगळे,

मग पावसाचे पाणी, जिरणार सांग कुठे?

*

कधी कडाक्याची थंडी, ऊन साहवेना झाले,

ढगफुटी, महापूर, अतिवृष्टी, अवर्षणे!

*

 झाडे लावा नि वाढवा, जपा कसोशीने राने,

पाणी वाचवा, जिरवा, स्वच्छ करा जलाशये!

*

अन्नधान्य हे दूषित, श्वास घेणे ना मोकळे,

प्रदूषण हे थांबवा, जपा कवच ओझोनचे!

*

 बाळ शहाणा तू माझा, विश्वास मज आहे,

 समजावूनी म्हणून, पृथ्वी माता मी सांगते!

© सुश्री प्रणिता खंडकर

दिनांक.. २१. ०४. २०२५

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ भा न! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ भा न! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

पाहून तव गोड छबी 

तार हृदयात झंकारली 

वर्णन कराया मग तुझे 

लेखणी मी सरसावली

*

एका गाली करी लगट

केश कलाप सोनेरी 

नजर तव डोळ्यांतली 

धकधक वाढवी उरी 

*

लालचुटूक ओठांवरती 

नासिका धारदार छान 

पाहून स्मित मुखावरचे 

जाते हरपून देहभान 

*

प्राक्तन गुलाबाचे बघून

असुया दाटली मनांत

येता “अहो” हिचे कानी 

आलो भानावर क्षणात

 आलो भानावर क्षणात

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तिच्यासम तीच… – चित्रे दोन.. काव्ये दोन.. आशय मात्र एकच ☆ कवयित्री : सुश्री रेखा हिरेमठ आणि कवि: अज्ञात – प्रस्तुती: सुश्री शोभा जोशी  ☆ ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? तिच्यासम तीच … ?

☆ चित्रे दोन.. काव्ये दोन.. आशय मात्र एकच ☆ कवयित्री : सुश्री रेखा हिरेमठ आणि कवि: अज्ञात – प्रस्तुती: सुश्री शोभा जोशी 

☆ ☆ ☆ ☆

सुश्री रेखा हिरेमठ

( १ )

कशाला पाहिजे वंशाला दिवा

ही तेजस्वी समई एकवार पहा 

*

मंद जळते साऱ्या कुटुंबासाठी

तरीही नाही दुषणे जिच्या ओठी

*

साक्षात सूर्याला घेऊन माथ्यावर

हास्य विलसे जिच्या चेहऱ्यावर

*

 पैसे कमवून नवऱ्याच्या जोडीने

घरी येऊन पुन्हा घरकाम करे गोडीने

*

आई आजी बहिण मुलगी बायको

कोणतेही नात्याने जोडलेली असो

*

 बनते प्रेरणा ही कायम चरा चराची

 तेवणारी ज्योत ही शोभा घरा घराची

*
उगीच म्हणत नाहीत तिला शक्ती

तिच्या सम कोणाला जमते भक्ती

कवयित्री : सौ. रेखा दयानंद हिरेमठ

सांगली

☆ ☆ ☆ ☆

सुश्री शोभा जोशी 

(२) 

रोज रोज एकटा चालून,

सूर्य होता दमला,

बघून ही टोपली,

त्यात जाऊन बसला,

माताच ती,

समजला तिला त्याचा कंटाळा,

निघाली ती घराला।

Son in Hand n Sun in Basket.

☆ ☆ ☆ ☆

कवी : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शोभा जोशी 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #286 ☆ गातोय विराणी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 286 ?

☆ गातोय विराणी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

कुणी आहे येथे दुःखी, कुणा दिसतो प्रकाश

कुणी गातोय विराणी, येथे झकास झकास

*

दुःख विचारांचे जाळे, सुख कल्पनांचा खेळ

सुखदुःखाची ही भेळ, छान साधलेला मेळ

दुःख आहे म्हणूनच, अर्थ सुखास सुखास

*

रान वाटा झाल्या रुंद, काल होत्या ज्या अरुंद

गतीमान मोटारींना, इथे झालेला आनंद

वृक्ष तोडून टाकता, रान उदास उदास

*

धान्य सुखाचे पाखडा, जाई उडून फुफाटा

काटे बाजूला सारून, करू मोकळ्या ह्या वाटा

काट्यांमधल्या फुलात, आहे सुवास सुवास

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रवासी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

 

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रवासी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

कोणत्या तीराला

लागते ही नाव

वादळांची वेढ

बेभानले घाव.

*

अंतरी लाटात

हिंदोळतो जीव

दैवाचा घेराव

प्रारब्धाचे डाव.

*

भरोसा कुणाचा

आयुष्य क्षितीज

संघर्ष मनाचा

विश्वासात भाव.

*

पेलूनीया शीड

जीवन सदैव

नाव चाले पुढे

प्रवासी सराव.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सावरकर भारतात अवतरोत पुन्हा… कवी : ह. त्र्यं. देसाई ☆ प्रस्तुती – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? वाचताना वेचलेले ?

☆ सावरकर भारतात अवतरोत पुन्हा… कवी : ह. त्र्यं. देसाई ☆ प्रस्तुती – सुश्री शोभना आगाशे

(२८ मे.. स्वा. सावरकर जयंती – त्यानिमित्त त्यांना आदरांजली)

प्रभु चरणी हिंदु राष्ट्र करित प्रार्थना

सावरकर भारतात अवतरो पुन्हा।। ध्रु।। 

*
‘अभिनव भारत’ नामे क्रांती-कारिणी

संघटना निर्मियली देश-व्यापिनी

शत्रूच्या शिबिरातहि ठाण मांडिले

क्रान्तिस्तव देशबंधू तेथ जमविले

करूनि तया शपथ बद्ध योजिले रणी

संगरार्थ शस्त्रात्रे जमविली झणी

संघटन-क्रांतीने राष्ट्र तारण्या

सावरकर भारतात अवतरो पुन्हा।। १।। 

*

सत्तावन-वर्षी ना बंड जाहले

स्वातंत्र्यास्तव राष्ट्रे समर लढविले

संशोधन करुनि नवा ग्रंथ निर्मिला

मॅझिनीचा चरित-ग्रंथ तेवि रचयिला

उभय जप्त झाले तरी गुप्त मुद्रिले

सर्वत्रहि युक्तीने धाडुनी दिले

अभिनव भारत वैभवशालि बनविण्या

सावरकर भारतात अवतरो पुन्हा।। २।। 

*

त्रस्त आंग्ल सरकारे अटक करुनिया

अंदमान कारागृहि कोंडिले तया

शिक्षा जरि वर्षे पन्नास जाहली

यातनामय भिन्न परी धृति न भंगली

‘कमला’ सम नवकाव्या तेथ रचियले

बंदीजना शिक्षित नी शुद्ध बनविले

हिंदु-बंधु विघटन ते त्वरित रोखण्या

सावरकर भारतात अवतरो पुन्हा।। ३।। 

*

रत्नागिरीमाजि स्थलबद्ध जै असे

लेखन भाषण उत्सव विविध करितसे 

शुद्धिकार्य सहभोजन करवूनी स्वयें

जाति-भेद निर्मूलन घडविले तये

मंदिरही पतितपावनाख्य उभविले

आणि हिंदु-संघटन-प्रेम निर्मिले

चेतविण्या पुनरपि या हिंदवी जनां

सावरकर भारतात अवतरो पुन्हा।। ४।। 

*
हिंदुसभाध्यक्ष बनून राष्ट्र जगविले

झुंजुनिया प्रथम निजामासि नमविले

उत्तेजुनि हिंदूंना सैन्य वर्धिले

त्यायोगे ‘नेताजी’ समर झुंजले

कट पाकिस्तानाचा शिजत पाहुनी

वंग नि पंजाब अर्ध रक्षिला झणी

कर्तव्य न उरता उपवास योजिला

‘आत्मार्पण’ करुनि धन्य धन्य जाहला

देवा! नव देहाने त्यास धाड ना

सावरकर भारतात अवतरो पुन्हा।। ५।। 

(त्यांच्याच ‘शतपैलू सावरकर, तिसरी आवृत्ती, या स्वा. सावरकर प्रेमी मंडळ, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातून साभार)

रचयिता – ह. त्र्यं. देसाई

प्रस्तुती – सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जगणे हलाखीचे, मरण सुखाचे!! ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? जगणे हलाखीचे, मरण सुखाचे!! ? श्री आशिष  बिवलकर ☆

वीतभर खळगीने नाचवले,

अर्धपोटी देह त्यानं पोसला।

निपचित पडला एकटाच,

जगाला आज तो दिसला।

*

आयुष्यभर लक्तरं मिरवली,

आज नवा पांढरा कपडा।

उचलाया लोक दारी आले,

सुखावला गरीबाचा झोपडा।

*

स्वतः स्वतःचा भार ओढला,

आज मिळाले खांदेकरी चार।

निरोपाला जमलीत मंडळी,

निष्प्राण देहाचा उचलाया भार।

*

येड्यागत रित्या खिशाने राहिला,

नाही समजली जगाची जत्रा।

रंक म्हणून जगला आयुष्यभर,

राजावानी खांद्यावर ही अंत्ययात्रा।

*

चुलीत घालाया कधी नव्हती लाकडं,

आज त्याच्यासाठी रचले जगाने सरण।

हसत हसत स्वतःशी पुटपुटला,

हालाखीचे ते जगणे, सुखाचे हे मरण।

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नदी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ नदी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

(आत्मजाणिवेची कविता या कविता संग्रहा मधून)

नदी दुथडी भरून आता निघाली माहेरी

काठावरी निरखती झाडं कावरीबावरी //धृ //

*

गच्च भरतेस तेव्हा तुला ओढ भ्रताराची

ससेहोलपट होते तेंव्हा किती माहेराची

नको तोडूस तू ताल नको होवूस नवरी //१//

*

रान पालटत जाते दिस उगवून येतो

ओलसर पुनवेच्या मनी चांदवा रुजतो

नव्या जगण्याच्या साठी होते मनाची तयारी //२//

*

आम्ही शेतकरी साधे तुझ्यावर जडे जीव

तुझ्या कुशीत नांदते देते हुंकार वैभव

बाई तुझ्या गं पाण्यानं आम्हा लाभते उभारी //३//

*

तुझी गाताना थोरवी तुला म्हणतो माऊली

भाव ठेवून अंतरी तुझी पुजाही मांडली

तुझे पिऊन अमृत आम्ही जगतो शिवारी //४//

*

तुझ्या काठी असणारे तुला देवता मानती

तुला माहेरवाशीण म्हणूनिया पुजताती

तुझ्या ओटीभरणाला साडी-चोळी जरतारी //५//

*

अशी नको रोडावूस उन्हातान्हात तापून

हरघडी टाक बाई तुझे पाऊल जपून

माझ्या मनाचे पाखरू झुरे पाणवठ्यावरी //६//

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “पुन्हा एकदा..(लवंगलता)” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “पुन्हा एकदा..(लवंगलता)” ☆ सौ राधिका भांडारकर 

कुठे हरवला तेव्हाचा तो प्रितीचा रंग सारा

आयुष्याला सोसत नाही रुक्ष कोरडा वारा

*

संवाद नसे शब्द माधुर्य  हरवले कसे कोठे

तेव्हा वाटे मौनात बरे.. नसते वादळ मोठे

*

ढग काळे ते दाटले नभी मिटोनि गेले तारे

जलधारांनो तुम्ही आपुले  आनंदगीत गारे

*

 असा कसा तो गंध गोडवा विरोनि गेला आता

 परत एकदा जुळवू आपण बेसुरातला  भाता

*

 वाटा ओल्या होत्या तेव्हा नरम किनारी वाळू

 त्या वाळुतले सदन आपुले वचनांना मग पाळू

*

 मावळतीला भास्कर जातो अज्ञानाच्या देशी

 निरोप त्याला दोघे देऊ प्रेमस्मृतींच्या वेशी

*

 नको दुरावा या वळणाशी  त्या नात्यांच्या गाठी

 जपूया तशा जशाच होत्या बेधुंद मनासाठी

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares