मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रीराम गाथा.. + संपादकीय निवेदन – सौ.मंजुषा सुधीर आफळे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. मंजुषा सुधीर आफळे

🌹 अभिनंदन 🌹

तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत श्रीराम नवमी निमित्त आयोजित काव्य लेखन स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. मंजुषा सुधीर आफळे यांच्या काव्य रचनेस सर्वोत्कृष्ट प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ई अभिव्यक्ती परिवारातर्फे त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐

त्यांची पुरस्कार प्राप्त काव्य “श्रीराम गाथा” आज प्रकाशित करत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

📚🌹📚🌹📚🌹📚🌹📚

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रीराम गाथा… ☆ 🖋 सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆

(पुरस्कार प्राप्त काव्य)

 श्रीराम गाथा महान

आदर्श जीवन तत्व

आचरावे जीवनात

साधावया ते ममत्व.

शब्द शब्द जो सुखाचा

सारासार तो विचार

शिकवण मानवास

हलका करेल भार.

 *

राम नाम सत्य थोर

कल्याण ते साधताना

एकनिष्ठ, सत्यवचनी

कठोर, न्याय देताना.

 *

अती नम्र, मृदू वाणी

कोमल हृदयी गोडवा

ग्रंथ, थोर रामायण

कथा मनात ठसवा.

 *

राम गाथा जप तप

सतत नामस्मरणी

चिंता संपेल मानवा

बोलती मारूती स्वामी.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

सांगली.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५३ आणि ५४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५३ आणि ५४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ५३ – – 

सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी ।

सदा सर्वदा सत्यवादी विवेकी |

न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा |

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||५३||

अर्थ : नेहमी नम्रतेने बोलणारा आणि आपल्या मधुर वाणीने लोकांना आपलेसे करणारा, सत्यवचनी आणि विवेकी असणारा, त्याचप्रमाणे कधीही वायफळ आणि असत्य न बोलणारा असा जो परमेश्वराचा भक्त असतो तो जगामध्ये खरोखरच धन्य होय.

(आर्जवी – नम्र, मिथ्य वाचा – खोटे बोलणे, त्रिवाचा – त्रिवार /निश्चित / ठामपणे. परंतु येथे बोलण्यात एकवाक्यता नसलेला असा अर्थ घेता येतो)

विवेचन : भक्ताने कसे असावे ते या श्लोकातही समर्थ सांगत आहेत. त्याचे बोलणे आर्जवी असते. आर्जवी म्हणजे नम्र. आर्जवी म्हणजे लाचार नव्हे. ज्याला (ईश्वराचे) ज्ञान झाले आहे असा भक्त आपोआपच नम्र होतो. फळांनी लगडलेले झाड जसे झुकलेले दिसते त्याप्रमाणे खरा ज्ञानी, विद्वान आणि भगवंताचा भक्त नम्र असतो. ही नम्रता त्याला कोठून उसनी आणावी लागत नाही. ती त्याच्या आतूनच उत्स्फूर्तपणे येते.

समर्थांना मधुर बोलणे अतिशय प्रिय आहे. दासबोधामध्ये ते म्हणतात,

पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते|

तरी मग कर्कश बोलावे ते, काय निमित्ये ||

आपण जसे बोलू तसे उत्तर समोरून मिळेल. मग विनाकारण दुसऱ्याला लागेल असे बोलण्यात काय अर्थ? काही लोक बोलण्यात अत्यंत फटकळ असतात. आपल्या बोलण्याने लोकांची मने दुखावतात. अशी माणसे अप्रिय होतात. मग भलेही ती स्वतःला स्पष्टवक्ता म्हणवून घेतात. परंतु त्यांचा स्पष्टवक्तेपणा इतरांना जखम करणारा असतो. आपण गोंदवलेकर महाराजांची प्रवचने वाचली असतील तर त्यातील भाषा किंवा कधी के वि बेलसरे यांचे निरूपण ऐकले असेल तर त्यांचे बोलणे किती नम्र आणि मधुर होते याचा प्रत्यय आपल्याला येतो. हीच खऱ्या भक्ताची लक्षणे आहेत.  

“सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात. ” गोडही बोलायचे आणि सत्यही बोलायचे ही तारेवरची कसरत असते. परंतु दुसऱ्याला न दुखवता देखील सत्य सांगता येते. असा भक्त समर्थांनी सांगितल्याप्रमाणे सदा सर्वदा म्हणजे नेहमी सत्य बोलतो. परंतु या सत्य बोलण्यात विवेकाचा वापर तो करतो. एखाद्या अत्यवस्थ किंवा शेवटच्या घटका मोजत असणाऱ्या रुग्णाला जर आपण भेटायला गेलो आणि त्याला म्हटले की आता ही तुझी शेवटची अवस्था आहे. त्यातून तू बरा होणार नाहीस. असे बोलणे सत्य जरी असले तरी ते अविवेकाचे आहे. म्हणून अशा वेळी विवेकाचा वापर करून, ” तू बरा होणार आहेस. तुला लवकरच बरे वाटेल. ” अशा प्रकारचा धीर देणे उपयुक्त ठरते.

खोटे बोलणे आणि स्वतःच्या असत्य वागण्याचे लटके समर्थन करीत राहणे ही सवय बऱ्याच लोकांना असते. परंतु काही काळानंतर लोकांना अशा माणसांचा स्वभाव लक्षात येतो आणि मग त्यांच्या बोलण्यावर ते फारसा विश्वास ठेवत नाहीत. ते बोलतात एक करतात दुसरे आणि वागतात तिसऱ्या प्रकारचे. अशा वागणाऱ्यांसाठी समर्थांनी त्रिवाचा हा शब्द वापरला आहे. म्हणजे ज्यांच्या वागण्याबोलण्यात एकवाक्यता नसते अशा व्यक्ती. परमेश्वराचा खरा भक्त कधीही असत्य बोलून आपली जीभ विटाळत नाही. त्याला खोटे बोलण्याची गरजही भासत नाही. कारण त्याला काही लपवायचे नसते. खोटे ते बोलणाऱ्या माणसाला आपल्या बोलण्याची वेगवेगळी कारणे सांगावी लागतात. आणि आपण आधी काय बोललो होतो हे लक्षात ठेवावे लागते. भक्त हा निर्मळ मनाचा आणि सरळ स्वभावाचा असतो. त्यामुळे त्याच्या वागण्या बोलण्यात एकवाक्यता असते. त्यामुळे तो जे बोलतो ते सत्यच असते. त्याचे शब्द त्याच्या निर्व्याज आणि निरलस व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब असतात.

– – आणि ज्याच्या शब्दांत सत्य, नम्रता आणि विवेक असतो, तोच खरा “सर्वोत्तमाचा दास” ठरतो.

स्वसंवाद :

१) माझ्या बोलण्यात नम्रता आणि माधुर्य आहे का?

२) “स्पष्ट बोलतो” या नावाखाली मी कधी दुसऱ्याला दुखावतो का?

३) सत्य बोलताना मी विवेकाचा वापर करतो का?

४) माझे विचार, बोलणे आणि वागणे यात सुसंगती आहे का?

– – – – 

श्लोक क्र. ५४

सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी |

मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी |

चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा |

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा |५४|

अर्थ : जो भक्त तरुणपणी एकांतात राहून आपला काळ घालवतो, कल्पनेच्या राज्यात जो रमत नाही, ज्याची भगवंतावरील श्रद्धा अढळ असते, असा भक्त खरोखरच त्या सर्वोत्तम असलेल्या भगवंताचा जगामध्ये धन्य असलेला दास आहे.

(सेवि – काळ घालवणे, आरण्य – एकांतवास, मिळेना – मिसळत नाही, मेळी – समूह, चळणे – परावृत्त होणे)

विवेचन : ज्या व्यक्तीला भगवंताची ओढ लागलेली अशी व्यक्ती तरुणपणातच एकांतात राहून त्याचे ध्यान किंवा नामस्मरण करणे पसंत करते. इथे समर्थांनी अरण्य हा शब्द जरी वापरलेला असला तरी प्रत्यक्षात अरण्यातच जाऊन राहिले पाहिजे असा त्याचा अर्थ नाही तर भगवंत प्राप्तीसाठी एकांतात जाऊन तपश्चर्या करणे आवश्यक आहे हा त्याचा अर्थ घेता येतो. आजच्या काळात ही गोष्ट थोडीशी विचित्र वाटेल. तरुणपणातच कसे काय एकांतात राहायचे आणि भगवंताचे ध्यान करायचे? ती तर म्हातारपणी करण्याची गोष्ट आहे अशी आपली समजूत असते. पण साधना ही पुढे ढकलण्याची गोष्ट नव्हे तर तरुणपणीच करण्याची गोष्ट आहे.

एकांताची सवय होण्यासाठी घरातील एखादा निवांत कोपरा किंवा जवळचे एखादे शांत मंदिर अशा ठिकाणी जाऊन स्वसंवाद करता येईल. काही काळ टीव्ही, मोबाईल यासारख्या गोष्टींपासूनही दूर राहण्याची सवय करावी लागेल.

पण समर्थ या अनुभवातून गेले आहे. “आधी केले मग सांगितले” असेच त्यांचे बोल आहेत. अगदी तरुणपणी त्यांनी नाशिक जवळील टाकळी येथे राहून बारा वर्षांचा काळ एकांतात घालवला. ज्ञानेश्वरादी भावंडांनी एकांतात राहूनच तपश्चर्या केली. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर एकांतात आपला काळ घालवित असत.

तरुण वयात उत्साह असतो, काहीतरी करण्याची जिद्द असते अशावेळी एकांताचे सेवन सहज होऊ शकते. जेव्हा सगळी गात्रे थकलेली असतात अशावेळी एकांतात राहणे मनुष्याला शक्य होत नाही. वृद्धापकाळी मुलांशी पटत नाही म्हणून जंगलात जाऊन राहणे हे लादलेले वैराग्य म्हणता येईल. तीर्थयात्रा, निरनिराळ्या ग्रंथांचा अभ्यास, भजन, प्रवचन, कीर्तन इत्यादी गोष्टी तरुणपणीच उत्तमरीत्या करता येतात. मुखात रामाचे नाव तरुणपणीच यायला हवे. आयुष्यभर जर जिभेवर राम नाही आला तर अंतिम समयी तरी तो कसा येईल? त्यावेळीही कामच आठवेल.

तरुणपणीच भगवत भजनात रमलेला माणूस चुकूनही कल्पनेच्या राज्यात रममाण होत नाही. जी माणसे कल्पनेच्या राज्यात रमतात, ती कोणतेच कर्तव्य नीट पार पाडू शकत नाहीत. एकांताची सुद्धा सवय व्हावी लागते. एकांत पचावा लागतो. त्याची सवय व्हावी लागते. काही लोकांना समूहात राहण्याची एवढी सवय असते की ते एकांत सहन करू शकत नाहीत. पण सदैव लोकांमध्ये राहिले तर काही काळाने माणसाचे मन मलिन होते आणि मग अशा वेळी एकांत आणि स्व चिंतन आवश्यक असते. म्हणूनच पूर्वीची माणसे काही काळ साधनेसाठी म्हणून घरातून निघून जात असत. आणि काही काळानंतर परत येत असत. दैनंदिन जीवनातील ताणतणाव, धावपळ इत्यादी गोष्टींना कंटाळलेली काही माणसे वर्षातून काही दिवस नियमितपणे विपश्यनेसाठी जातात त्याचाही उद्देश हाच असतो.

एखाद्याला भगवंत प्राप्तीची ओढ लागली तरी त्याचा उत्साह काही दिवस टिकतो आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरू होते. कारण लोकांमध्ये राहून त्याच्या मनात वेगवेगळे विचार येतात. तर कधी त्याचा बुद्धिभेद होतो आणि त्याचा जो निश्चय असतो तो ढळतो. माणसाचे मन अतिशय चंचल असते. बंधनात राहणे, एकच एक गोष्ट करणे त्याला आवडत नाही. म्हणून करुणाष्टकामध्ये समर्थ म्हणतात, ” घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा, म्हणवुनी करुणा हे बोलतो दीनवाचा… “परंतु परमेश्वराचा जो खरा भक्त असतो आणि तरुणपणापासूनच जाऊ भगवंत प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो अशा व्यक्तीचा निश्चय कधीही ढळत नाही अशी व्यक्ती म्हणजे परमेश्वराची खरोखरच प्रिय भक्त असते.

स्वसंवाद :

१) मी साधना/नामस्मरण “नंतर करू” असे पुढे ढकलतो आहे का?

२) माझ्या दिवसात मला एकांतासाठी किती वेळ मिळतो? की मी तो जाणीवपूर्वक टाळतो?

३) मी वास्तवात कृती करतो का, की कल्पनांच्या जगातच रमतो?

४) माझा आध्यात्मिक निश्चय किती दृढ आहे? अडचणी आल्या की तो ढळतो का?

५) आजपासून मी एक छोटी पण सातत्यपूर्ण साधना सुरू करू शकतो का? 

– क्रमशः श्लोक ५३ आणि ५४.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ झुलता झुलता… ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 

☆ झुलता झुलता नीलांबरी शिर्के 

दोघींना दिसला

रिकामा झोपाळा

फिरून फिरून

आलेला कंटाळा!!

*

म्हणाल्या एकमेकी

चला चला बसुया

झुलूनी जरासे

गंमत करूया!!

*

झुलता झुलता

गंमत वाटली

एक मनी तर

निवांत झोपली!!

*

दुजी मनी जरा

सावरून बसे

मुखावर तिच्या

उमटले हसे!!

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तिची नजर… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ तिची नजर… ☆ राधिका भांडारकर ☆

(वृत्त – पादाकुलक)

हाती होते गुच्छ फुलांचे

 “घेता का हो?” विनवत होती

ऊन तापले सोसत चटके

एक बालिका धावत होती…

 गुंग चिंतेत जो तो होता

कशास कोणी बघावे तिला

का जाणावी गरज भावना

फक्त नको चा शब्द राहिला….

 *

 बाल्य लोपले वणवण आली

भविष्याच्या अंधारी ती

स्वप्नच नव्हते उरले काही

भाकरी एकच हवी होती…

 *

 कळवळले मी तिला पाहता

 खूण करताच धावत आली

 घेतली फुले मग ती सारी

 डोळ्यात तिच्या रेष चमकली …

 *

काय अर्थ हो त्या नजरेचा

मज अजूनही कळला नाही

भाव निरागस त्या डोहाचे

अंतरातले मिटले नाही…

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कुछ तो लोंग कहेंगेही… ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ कुछ तो लोंग कहेंगेही☆ शीला पतकी 

आपल्या आई वडिलांना सुद्धा काही वेळा आपली हुशारी कळत नाही. मी आमच्या घरात विज्ञानाचे प्रयोग करत बसायची. मग त्याचा रंग देणे – खिळे मारणे हे माझ्या हातून व्हायचं नाही. ते मी आमच्या कामवाल्या बाईच्या नवऱ्याकडून करून घ्यायची.

– – एकदा चक्क मी ‘ तिहेरी उपयुक्त शेगडी ‘ नावाचं उपकरण तयार केले.

घरात आमच्या एक जुनं कुकर पडलं होतं – किर्लोस्कर कंपनीच! डबे डबे जोडलेले. माझ्या डोक्यात रात्री तीन वाजता ही कल्पना आली की याच्यामध्ये वाफ सोडली तर, (ते वाफेवर होणार कुकर होतं) म्हणजे त्या प्रत्येक डब्याला आतून एक नळीचा कनेक्शन होतं – म्हणजे पहिल्या डब्यातली वाफ दुसऱ्या डब्यात, दुसऱ्यातून तिसऱ्या या पद्धतीने..! ते मी शाळेत घेऊन गेले. नळाची शेगडी तयार केली. त्या नळातनं कमी व्यासाचा एक तांब्याचा पाईप आत मध्ये फिट केला. नळातून पाणी सोडल्यावर ते गरम होऊन बाहेर यायचं.. आत मध्ये बसवलेल्या तांब्याच्या नळातलं पाणी.. त्याची गरम वाफ होत असे, कारण शेगडीच्या आत तापमान जास्त.. त्या नळीवर कोळसा असायचा ना. तांब्याची नळी आणि कमी व्यास त्यामुळे 

ती वाफ शेतावर फवारणी करतो तो पाईप असतो ना त्याच्याद्वारे त्या कुकरला जोडून आत सोडली. एका वेळेला तीन वस्तू होत होत्या.. म्हणजे शेगडी, शेगडी सारखी… बाजूला नळ जोडलेले.. याच्यातून पाणी येत होतं ते 56-57 अंश सेल्सिअस इतकं गरम, आणि डब्यामध्ये डाळ तांदूळ आणि बटाटे – – 

– – ४0 मिनिटात शिजवून तयार…! 

… कुकर शेगडीवर ठेवलेला नाही, ते सगळं वाफेवर व्हायचे. हे असलं काही काम मी घरात करत बसले की वडील आमच्या आईला सांगायचे, ” काय करते की येडं कुणास ठाऊक. काहीतरी जुनंपानं घेऊन खटपट करत बसतय झालं.. नादिष्ट आहे. कसे व्हायचे या पोरीचे कुणास ठाऊक?” घरात अशी चर्चाही चालायची. आई म्हणायची, “ जाऊदे, काहीतरी करून ती आपला आनंद घेतेना.. राहू दे “…

– – या उपक्रमाला राष्ट्रपती-सन्मान प्राप्त झाला त्यावेळेला रेडिओ होता. सातच्या बातम्यात त्याचा सन्मान झाल्याचेही सांगितले. लखनऊ येथील प्रदर्शनात त्याची मांडणी झाली. तत्कालीन राष्ट्रपती आदरणीय झैलसिंग यांनी गाडीतून उतरून उपकरण पाहून याचे अतिशय कौतुक केले. लखनऊच्या सर्व वृत्तपत्रांनी मुलाखती घेतल्या. इथे आल्यावर आमचे सोलापुरात अनेक ठिकाणी सत्कार झाले. कारण त्या काळात राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या एक दोनच शाळा होत्या. आता सुद्धा कमीच आहेत. सर्वत्र माझं कोड कौतुक…! वृत्तपत्रात मुलाखती… शाळेतल्या सगळ्या मैत्रिणींनी, शिक्षकांनी, घरी बोलावून सत्कार केले. – – पण आमच्या घरात – –

काय येडं काहीतरी करतंय झालं… ही प्रतिक्रिया होती. चालायचंच.. प्रेमापोटी बोलतात ते.

एकूण काय… कोण काय म्हणते याकडे फारसं लक्ष देऊ नये. यावर मी काल एक व्हिडिओ पाहिला.. चार छान सुटाबुटातली माणसं.. समोर एक माणूस उभा आहे.. ती चार माणसं एकत्र बोलत होती…

“आपण नेहमी विचार करतो ना की चार लोक काय म्हणतील?… ते चार लोक आम्हीच आहोत… आम्ही काही म्हणणार नाही…! आणि इथं ती फिल्म संपते.

– – – थोडक्यात काय.. तर आपण विचार करू नये.

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५१ आणि ५२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५१ आणि ५२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ५१ – – 

मदें मछरे सांडिला स्वार्थबुद्धी|

प्रपंचिक नाही जयाते उपाधि|

सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा|

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा|५१|

अर्थ : जो अहंकार आणि द्वेषरहित आहे, ज्याने स्वार्थ बुद्धीचा त्याग केला आहे, जो संसारात राहूनही विरक्त वृत्तीने वागतो, नेहमी नम्र आणि मधुर वाणीनेच बोलतो, असा मनुष्य सर्वोत्तम अशा भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय.

(मद – अहंकार, मछरे -मत्सर/द्वेष, सांडिला – सोडून दिले आहे, स्वार्थ बुद्धी – केवळ स्वतःचा फायदा पाहणे, उपाधि – बाह्य पाश /बंधन, सुवाचा – गोड /मधुर बोलणे)

विवेचन : हा फार सुंदर आणि अर्थपूर्ण असा श्लोक आहे. खऱ्या भक्ताची लक्षणे आपल्याला समर्थ या ठिकाणी सांगत आहेत. खरा भक्त अहंकार आणि द्वेष रहित असतो. त्याने स्वार्थ बुद्धीचा त्याग केलेला असतो. काही ठिकाणी या श्लोकामध्ये पाठभेद आढळतात. काही पुस्तकांमध्ये सांडली असा शब्द आहे तर काही पुस्तकांमध्ये सांडिला असे म्हटले आहे. या शब्दांमुळे अर्थामध्ये जरा फरक पडतो ज्या पुस्तकामध्ये मदे मत्सरे सांडीली स्वार्थ बुद्धी असे म्हटले आहे, तिथे सांडली म्हणजे त्याग केला या अर्थाने मद, मत्सर आणि स्वार्थ बुद्धी या तिघांचाही खऱ्या भक्ताने त्याग केलेला असतो असा अर्थ घेता येतो. तर जेव्हा सांडीला हा शब्द वापरलेला आढळतो तेव्हा मद, मत्सर आणि स्वार्थ बुद्धी हे दुर्गुण खऱ्या भक्ताला सोडून गेलेले असतात. म्हणजे त्याला ते स्पर्शही करत नाहीत असा अर्थ घेता येतो. तसेच काही पुस्तकात मत्सरे तर काही ठिकाणी मछरे हा शब्द वापरला आहे. अर्थात दोन्हींचा अर्थ मत्सर हाच आहे.

या शब्दांच्या जास्त खोलात न शिरता आपल्याला असे लक्षात येते की खरा भक्त हा अहंकार आणि द्वेषरहित असतो. त्याच्याजवळ स्वार्थ बुद्धी नसते. मद म्हणजे गर्व किंवा अहंकार. माणसाला स्वतःच्या कर्तृत्वाचा खूप गर्व असतो. त्यातूनच मग तो मी हे केले, मी ते केले, माझ्यामुळेच हे झाले अशा प्रकारची अहंकारी विधाने करत असतो. एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा वरचढ आहे असे दिसले की मग त्याचा मत्सर जागा होतो. तो त्याचा द्वेष करू लागतो आणि मग त्या व्यक्तीला नामोहरम करण्यासाठी कोणत्याही पातळीला जातो.

स्वार्थ म्हणजे स्व -अर्थ. स्वार्थी माणूस केवळ स्वतःचाच फायदा पाहत असतो. पैसा, संपत्ती यासारख्या गोष्टी कितीही मिळाल्या तरी त्याचे समाधान होत नाही. अजून हवे, अजून हवे असे त्याला वाटत राहते. एकदा हातात भरपूर पैसा आला की मग त्याच्या जोडीला मद येतो. अहंकार वाढत राहतो. त्याचबरोबर प्रतिस्पर्ध्याचा द्वेषही मनामध्ये ठाण मांडून बसतो. पण जो परमेश्वराचा खरा भक्त असतो, त्याची मानसिक अवस्था या सगळ्याच्या पलीकडे गेलेली असते. तो तृप्त असतो. आहे त्या परिस्थितीत संतुष्ट आणि समाधानी राहतो. कोणाचा तिरस्कार किंवा द्वेष करणे त्याच्या मनात येत नाही.

या श्लोकात खऱ्या भक्ताचे आणखी एक सुंदर लक्षण समर्थ सांगतात. खरा भक्त प्रपंच तर करतो पण कसा? तर संसारात राहूनही तो त्यापासून अलिप्त असतो. तो विरक्त वृत्तीने जगतो. खरा भक्त असण्यासाठी भगवे कपडे, माळा, टिळा, टोपी, गंध इत्यादी धारण केले पाहिजे असे नाही. त्यासाठी कुठे वनात जावे लागत नाही. आपण संसारात राहून सुद्धा भगवंताचे लाडके भक्त होऊ शकतो.

कमलपुष्पाचे उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कमळ चिखलात असते पण त्यात राहूनही ते त्यापासून दूर असते. असेच संसारात देखील राहता आले पाहिजे. संसाराची उपाधी खऱ्या भक्ताला असत नाही म्हणजेच त्याला संसाराचे पाश बांधू शकत नाहीत. संसारात असूनही तो मुक्त असतो, विरक्त असतो.

खऱ्या भक्ताचे आणखी एक सुंदर लक्षण समर्थ सांगतात. त्याचे बोलणे नम्र असते, बोलण्यात माधुर्य असते. आपल्या बोलण्याने तो कोणालाही दुखवत नाही. यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. खऱ्या भक्ताच्या अंगी हे गुण आपोआप येतात. निवडणूक आली म्हणजे बरेच पुढारी अगदी नम्रतेने जनतेला सामोरे जातात. कार्पोरेट क्षेत्रातही कामाच्या गरजेपोटी नम्रता धारण केली जाते. पण हे सगळे मुखवटे असतात. आतले रूप वेगळ्याच असते. असे आपल्याला अनेक प्रसंगी आढळून येते. खरा भक्त हा अंतर्बाह्य निर्मळ असतो. मृदू सबाह्य नवनीत, तैसे सज्जनांचे चित्त. लोणी जेवढं मऊ आणि मुलायम असतं, तसंच सज्जनांचे चित्त असतं असं तुकाराम महाराज म्हणतात.

समर्थ रामदास किंवा संत तुकाराम यांच्यासारखे संत काही वेळा कठोरपणाने बोलताना दिसतात. पण त्यामागे समाज हिताची तळमळ असते. आई सुद्धा आपल्या मुलाला प्रसंगी रागावते, तर कधी चिडून ” मर मेल्या… “असे सुद्धा उद्गारते. परंतु त्यातही तिचे प्रेम असते आणि मुलाच्या कल्याणाचाच विचार असतो. असेच संतांचीही बोलणे असते. जाणीवपूर्वक कोणाचेही मन दुखवावे म्हणून ते बोलत नसतात.

म्हणून आपणही परमेश्वराचे प्रिय भक्त होण्याचा प्रयत्न करावा. अहंकार, मत्सर आणि स्वार्थ बुद्धी यांच्यासारख्या दुर्गुणांचा त्याग करण्याचा प्रयत्न करावा. प्रपंचात रहावे, प्रपंच उत्तम करावा. परंतु ज्या काही गोष्टी घडतात, त्यांच्याकडे साक्षीभावाने पाहायला शिकावे म्हणजे आपल्याला त्या बंधनकारक होत नाहीत. अनावश्यक बोलणे टाळावे आणि जे काही आपण बोलू त्यात नम्रता आणि माधुर्य असावे. असा भक्त हा त्या सर्वोत्तम परमेश्वराचा जगातील सर्वोत्कृष्ट असा भक्त असतो.

स्वसंवाद ::

१) माझ्या बोलण्यात नम्रता आणि माधुर्य आहे का – की ते केवळ गरजेपुरते असते आणि आतमध्ये वेगळेच असते?

२) माझ्या मनात कोणाबद्दल मत्सर किंवा द्वेष आहे का – आणि त्याची मला जाणीव होते का?

३) “संसारात राहूनही विरक्त” – माझ्या जीवनात मी साक्षीभावाने वागण्याचा प्रयत्न करतो का की संसारातील गोष्टी मला पूर्णपणे बांधून टाकतात?

– – – 

श्लोक क्र. ५२ – – 

क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे।

न लिंपे कदा दंभ वादे विवादे॥

करी सुखसंवाद जो उगमाचा।

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५२॥

अर्थ : खरा भक्त तत्वचिंतनात वेळ घालवतो. अहंकार, दंभ आणि वादविवादात तो वेळ घालवत नाही किंवा त्यात गुंतून पडत नाही. तो उगमाचे म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाचे चिंतन करून स्वतःशी किंवा इतरांशी सुख संवाद साधतो असा भक्त परमेश्वराचा खरोखरच धन्य असा भक्त होय.

(क्रमी – वेळ घालवतो, तत्त्वचिंतन – परमात्मस्वरूपाचे चिंतन, अनुवाद – आचरण /अनुकरण, लिंपे – लिप्त होत नाही किंवा दोष लावून घेत नाही, दंभवाद – फसवा युक्तिवाद, विवाद – निष्फळ वाद, उगम – मूळ स्वरूप)

विवेचन : खरा भक्त आपला वेळ कसा घालवतो हे समर्थ पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत सांगतात तर भक्ताने कसे असू नये हे दुसऱ्या ओळीत त्यांनी सांगितले आहे.

– – क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे…

साधकाचे अंतिम ध्येय परमेश्वराला प्राप्त करून घेणे हे असते एकदा त्याने ही गोष्ट आपल्या मनाशी निश्चित केली की मग त्याचे चिंतन करण्यातच तो आपला वेळ घालवतो. त्याव्यतिरिक्त जो इतर गोष्टींमध्ये आपला वेळ घालवतो तो खरा साधक नव्हेच! तो मूळ तत्वाचे म्हणजे परमेश्वराचे चिंतन करतो. याच ओळीत अनुवादे हा शब्द आला आहे याचा अर्थ नीट समजून घ्यायला हवा. साधारणपणे अनुवाद म्हणजे भाषांतर असे आपण समजतो परंतु या ठिकाणी त्याचा अर्थ आचरण किंवा अनुकरण असा घ्यायला हवा. म्हणजे ज्याला परमेश्वराच्या मूळ स्वरूपाचे ज्ञान झाले आहे तो साधकाने जसे वागायला हवे तसेच वागत असतो. आपल्या गुरूंनी किंवा आपल्या श्रेष्ठ ग्रंथांनी जी गोष्ट सांगितली आहे, त्याचे अनुकरण करत असतो. त्याचा अनुभव घेत असतो. ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाबद्दल एक तरी ओवी अनुभवावी असे म्हटले जाते. म्हणजे केवळ ज्ञानेश्वरीवाचून उपयोग नसतो तर त्याप्रमाणे वागून त्या ओवीची अनुभूती घेणे, अनुभव प्राप्त करणे हा त्याचा अर्थ आहे आणि खरा भक्त तेच करत असतो.

असा भक्त निष्करण वादविवादात गुंतून पडत नाही. आपल्याला थोडेफार ज्ञान झाले, काही मोजक्या ग्रंथांचे आपण वाचन केले म्हणजे आपल्याला फार कळते आहे असे आपल्याला वाटू लागते. मग आपण ते दाखवण्यासाठी समोरच्या व्यक्तीशी वादविवाद करत बसतो आणि मी किती श्रेष्ठ आहे, मला किती कळते हे अप्रत्यक्षपणे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. खरा भक्त बोलतो, गातो ते फक्त परमेश्वराबद्दल बोलण्यासाठीच. त्याचीच महती तो गात असतो. म्हणून तो व्यर्थ वादविवादात पडत नाही किंवा त्यात स्वतःला गुंतवून घेत नाही.

आपल्याला दिवसाचे चोवीस तास मिळतात. त्यातील आठ ते दहा तास झोपेत जातात. दहा ते बारा तास आपली नोकरी, प्रपंचाचे काम यात जातात आणि उरलेले तीन -चार तास आपण आपल्या मनाप्रमाणे घालवतो. त्यात टीव्ही पाहणे, मोबाईल पाहणे, मित्रमंडळींमध्ये गप्पा मारणे यासारख्या गोष्टी करतो. खरा भक्त या वेळेत काय करतो? तर तो स्वतःशी संवाद साधतो, आत्मचिंतन करतो. त्यालाच सुखसंवाद असे म्हणता येईल. हा सुखसंवाद उगमाकडे जाण्याचा असतो. गंगा नदी किंवा यमुना नदी आपण पाहिलेली असते परंतु हिमालयात प्रवास करणारे यात्रिक किंवा भाविक गंगोत्री किंवा यमुनोत्री म्हणजेच गंगेच्या किंवा यमुनेच्या उगमपर्यंत जातात. म्हणजेच मूळ स्थान शोधून काढतात.

आपल्यालाही मनुष्यजन्म प्राप्त झाला आहे. परंतु आपणही आपले मूळ स्वरूप काय आहे हे जाणून घेतले पाहिजे. कोहम म्हणजे मी कोण आहे, माझे मूळ स्वरूप कोणते आहे असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. मग आपण सोहम पर्यंत येतो म्हणजे तो मीच आहे हे आपल्याला कळू लागते आणि मग आपलाच आपल्याशी संवाद होऊ लागतो. ” तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. ” आणि जेव्हा भक्ताच्या वागण्यात ही सगळी लक्षणे दिसू लागतात, तेव्हा तो फक्त खरोखरच परमेश्वराचा धन्य भक्त ठरतो.

स्वसंवाद ::

१) माझा रिकामा वेळ कशात जातो – तत्त्वचिंतनात की मोबाईल, गप्पा यासारख्या गोष्टींमध्ये?

२) मला थोडे ज्ञान झाले म्हणून मी वादविवादात पडतो का – की माझ्या ज्ञानाचे आचरण करण्यावर माझा भर असतो?

३) “कोहम ते सोहम” – मी कोण आहे हा प्रश्न मला कधी पडला आहे का? माझ्या मूळ स्वरूपाचा शोध घेण्याची माझ्या मनात खरी ओढ आहे का?

– क्रमशः श्लोक ५१ आणि ५२.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २९६ – देवपुजा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २९६ – विजय साहित्य ?

☆ देवपुजा…! कविराज विजय यशवंत सातपुते ☆

पुजार्चन करताना

करू सोळा उपचार

आवाहन देवतांना 

घडे दर्शन त्रिवार….! १

देऊ आसन मंत्राने

लाभण्याला सुखासन

पाद्यपुजा करूनीया

यशप्राप्ती संकलन…! २

 *

अर्घ्य सुगंधी जलाने

लाभे मना  समाधान

आचमन गंगाजल

होई आनंद विधान…! ३

 *

स्नान घालता देवास

मिळे जिवनात सुख

पंचामृत देता देवा

स्नेह माधुर्य सन्मुख…! ४

 *

अभिषेक देवतांना

स्थैर्य‌ शांततेचा लाभ

वस्त्र अर्पिता प्रेमाने

लाज राखी पद्मनाभ…! ५

 *

यज्ञोपविताचा मान

मोक्षप्राप्ती लाभतसे

गंध लावता देवाला

ज्ञानप्राप्ती गेही वसे…! ६

 *

फुले अर्पिताच मिळे

सर्व सुख समाधान

कुंकू हळद पिंजर

लाभे सौभाग्याचे दान..! ७

 *

अलंकार देता‌ देवा

मनी श्रीमंतीचा वास

धूप प्रक्षालन करी

कीर्ती ऐश्वर्य प्रवास…! ८

 *

दीपदान सौख्य मोठे

ज्ञान वैराग्य लाभते

प्रासादिक नैवेद्याने

अन्नपुर्णा सुखावते…! ९

 *

आरतीच्या गजरात

प्रसन्नता नांदे धामी

प्रदक्षिणा घालताना

लाभ स्वामित्वाचा नामी…! १०

 *

श्रीफलाने पुजार्चना

दावी सौख्याचे शिखर

दुर्वा तुलसी बेलाने

कृपा हस्त शिरावर…! ११

 *

मंत्र पुष्पांजली देई

सुख समृद्धीचे देणे 

अक्षतांनी परिपुर्ण

सोळा उपचार लेणे…! १२

 *

नमस्कार स्विकारावा

विनयाने विनवणी

सह कुटुंब प्रार्थना 

नको दुर्भाग्य मन्मनी…! १३

 *

यथाशक्ती यथामती

करू पुजा मनोभावे

नाना लाभ फलदायी

अशा देव पुजनाने….! १४

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हिशोब प्राक्तनाचा… ☆ सुरेखा चिखलकर ☆

सुरेखा चिखलकर

? कवितेचा उत्सव ?

☆ हिशोब प्राक्तनाचा… ☆ सुरेखा चिखलकर ☆

भावना जेव्हा ओढाळ झाल्या

थकला भागला जीव

भावनांना कुशीत घेऊन

प्रसवत राहिला शब्द न शब्द

भोगलेल्या आठवांचे गाठोडे

विझणाऱ्या सांजेला आठवून

काही जखमा माफीची

 परवानगी देत नाहीत तर

विद्यात्याच्या हिशोबाने घडून

द्यावे सारं काही अन्

काळजाला सोलून आपणही

प्राक्तन म्हणून भोगून घ्यावं

सांजेचे कवडसे अन्

पापण्या मात्र आभाळ होतात

आसवं पाझरू लागताच मलाच

हरवाया शब्दांची धार होऊन

विझल्या राखेवर मग

शांततेची अत्तरे सांडावीत अन्

शब्दांच्या वेदनांनी मूठमाती

द्यावी मातीच्या त्या देहावर…

🙏 

© सुरेखा महिपती चिखलकर

गोटखिंडी, तालुका वाळवा

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २३ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २३ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

समाज स्थितीचे वर्णन

गाथेतील अभंग वाचत असता संत तुकारामांच्या काळी समाजस्थिती कशा प्रकारची होती याचाही आपल्याला काही अभंगांतून अंदाज येतो. आजच्या लेखात याच संदर्भातील काही अभंगांचा अभ्यास करावा असे मला वाटते.

समाजात फार अंदाधुंदी माजली होती. न्याय राहिला नव्हता. श्रेष्ठ मानला, जाणारा ब्राह्मण वर्ग त्यांचा नीती धर्म विसरला होता. अशा परिस्थितीचे वर्णन करणारा हा गाथेतील अभंग पहा—

हाती होन दावीती वेणा /

करिती लेकीची धारणा//

ऐसे धर्म जाले कली/

पुण्य रंक पाप बळी//

सोडिले आचार/

द्विजृाचहाड जाले चोर//

टिळे लपविती पातडी /

लेती विजार कातडी//

बैसोनिया तक्ता/

अन्योविण पीडिती लोका//

मुदबरव लिहिणे/

तेल तूप साबण केणे //

नीच्याचे चाकर/

चुकलिया खाती मार//

राजा प्रजा पिडी/

क्षेत्री दुश्चितासी तोडी//

वैश्य शुद्रादिक/

हे तो सहज नीच लोक//

* वघे बाह्यरंग/*

आत हिरवे वरी सोंग//

तुका म्हणे देवा/

काय निद्रा केली धावा//

समाजाची ही अशी अत्यंत हीनदीन अवस्था पाहून तुकाराम महाराज खेद व्यक्त करत आहेत आणि देवाला निद्रा सोडून धाव घेण्याचे साकडे घालत आहेत.

ते देवाला सांगतात, ” लग्नात लोक त्यांच्या कन्येचे पैसे(होन) घेतात आणि तिला सासरी पाठवतात. याचाच अर्थ चक्क तिचा विक्रय करतात. ज्याच्याकडून जास्त पैसे मिळतील त्याच्या गळ्यात ती सौभाग्यकांक्षिणी वरमाला घालणार. अत्यंत शोचनीय अशी बाब आहे ही. हा कलियुगात माजलेला अधर्म आहे. याने पुण्याचा क्षय होऊन पाप वाढत चालले आहे. ब्राह्मण आपला धर्म, सदाचार सोडून चहाड्याचोऱ्या करू लागले आहेत. कुंकवाचा टिळा लावणे, पंचांग बघणे सोडून देऊन यवनांप्रमाणे वेश धारण करणे त्यांनी सुरू केले आहे. न्यायाधीश न्यायाच्या आसनावर बसून न्याय असणाऱ्यांनाच शिक्षा ठोठवून पीडित करीत आहेत. पाकशाळेत (मुदबख) लागणाऱ्या बारीक सारीक वस्तूंचा जमाखर्च लिहिण्यात वेळ दवडत आहेत. ते नीच माणसांचे चाकर होऊन कामात झालेल्या क्षुल्लक चुकीसाठी मार खात आहेत. ज्या प्रजेचे पालन करायचे ती प्रजा आधीच दुःखी असताना क्षत्रिय राजे तिला लुटतात आणि पीडा देतात. वैश्य व शूद्रादिक लोक तर स्वभावतःच हलक्या मनोवृत्तीने वागत आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगावे? अशा प्रकारे लोकांत बाह्य देखावा, अनाचार व ढोंगीपणा पसरला आहे. अंतरंगात मत्सर आणि वरून सोज्वळतेचे

सोंग या माणसांत भरले आहे. या दुष्टांना दंड देण्यासाठी अहो देवा तुम्ही या असा महाराज धावा करीत आहेत. ”

तुकाराम महाराजांना ब्राह्मणांकडून अशा प्रकारचा त्रास भोगावा लागला आहे. समाजातील त्यावेळच्या चातुर्वर्णी पद्धतीचा अर्थ विशेषतः या ब्राह्मण वर्गाने चुकीचा लावल्यामुळे, स्वतःला विद्वान समजून ते समाजातील दुबळ्या माणसांना अत्यंत हीन लेखत आणि त्यांचे जगणे असह्य करीत. यासाठीच अशा प्रकारचे अभंग रचून समाजात जागृती निर्माण करण्याचा तुकाराम महाराजांचा प्रयत्न असावा. या वर्ण व्यवस्थेसंबंधी असलेल्या हा अभंग पहा—

वेद विहित तुम्ही आई का हो कर्मे /

बोलतो ती वर्मे संतांपुढे//

चारी वर्ण जाले एकाचिये अंगी/

पाप-पुण्यभागी विभागीले//

प्रथम पाऊली पावविला पंथ/

आदी मध्य अंत भेद नाही//

आंबे बोरी वड बाभुळ चंदन/

गुणागुणभिन्न अग्नि एक//

तुका म्हणे मन उन्मन जो होय/

तोवरी हे सोय विधी पाळी//

तुकाराम महाराज म्हणतात, ” अहो लोकहो,

वेद प्रणित अवस्था काय आहे, ते तुम्ही ऐका. मी तुम्हा संतांपुढे ती सांगतो. एकाच देवापासून ब्राह्मणादी चार वर्ण निर्माण झाले आहेत. सर्व एकाच देवाची लेकरे आहेत. ते आपापल्या विहित कर्माने व पाप-पुण्याच्या भागाने वाटले गेले. सर्वांच्या उत्पत्तीचे स्थान जो हरी त्याच्या ठिकाणी प्रारंभ, मध्य, आणि अंत नाही. आंबे, बोरी, वड, चंदन यांचा दृष्टांत देऊन महाराज सांगतात या वृक्षातील गुणांचे व दोषांचे अनेक भेद आहेत. पण जळल्यानंतर ते एकच होतात. सर्वांची एक राखच होते. मूळ हरीच्या ठिकाणीही आदि अंत, कर्ता कर्म फळ इत्यादी भेद नसतो. जोपर्यंत मनाची उन्मनी अवस्था होत नाही तोपर्यंत मनुष्याने वेदाने सांगितलेल्या विधी मार्गा ने चालले पाहिजे. थोडक्यात, ब्राह्मण श्रेष्ठ आणि शूद्र नीच ही भावना मनातून त्यागिली पाहिजे.

त्या काळात सिंहस्थ- पर्वणी असा एक काळ मानला जात होता. आजही पंचांगात आपल्याला सिंहस्थ काळ हा शब्द सापडतो. या काळात लग्न, मुंज अशी मंगल कार्ये होत नाहीत असे म्हणतात. आता बदलत्या काळानुसार सर्व लोक ही परंपरा पाळतातच असे नाही. या समस्त काळात त्यावेळी ब्राह्मण डोक्यावरचे व दाढीचे केस काढायचे. त्यावरून महाराजांनी हा अभंग रचला आहे. ते म्हणतात—-

आली सिंहस्थ पर्वणी/

न्हाव्या भटा झाली धणी //

अंतरी पापाच्या कोडी/

वरी वरी बोडी डोई दाढी//

बोडीले ते निघाले/

काय पालटले सांग वहिले//

पाप गेल्याची काय खूण/

नाही पालटले अवगुण//

भक्तीभावेवीण /

तुका म्हणे अवघा सीण //

सिंहस्थ पर्वणी आली म्हणजे क्षेत्रात जे भट व न्हावी असतात त्यांची चंगळ होते. अंतःकरणात कोट्यावधी पापे आहेत, आणि दाढी काढली व डोक्याचे मुंडन केले तर त्याचा काय उपयोग? नुसते केस निघाले, पण अंगातील अवगुण निघाले का? त्याची काय खूण आहे? तुकारामांना एवढेच सांगायचे आहे की, पांडुरंगाची श्रद्धेने भक्ती करण्या वाचून बाकीचे सर्व व्यवहार पिडादायीच आहेत.

चातुर्वर्ण व्यवस्था हीच त्यावेळची मुख्य समाज व्यवस्था होती. या व्यवस्थेतील लोकांच्या कर्मा विषयी आणि प्रारब्धाविषयी महाराज वेळोवेळी सांगतात.

पहा हो देवा कैसे जन/

भिन्नभिन्न संचिते //

एक नाही एका ऐसे/

दावी कैसे शुद्ध हीन//

पंचभूते एकी राशी/

सूत्रे कैसी ओळखावी//

तुका म्हणे जो जे जाती/

त्याची स्थिती तैशी ते//

देवा, हे लोक किती निरनिराळ्या प्रारब्धाचे आहेत. एका सारखा एक नाही. प्रारब्धाच्या योगाने काही चांगले आणि काही हीन अशी विविधता दिसते. सर्व सृष्टी पंचमहाभूतांच्या एकाच मूळ पदार्थाने बनली आहे, असे असताना नशिबाची भिन्नता कशी ओळखावी? जो जन्माप्रमाणे, कर्माप्रमाणे ज्या जातीचा असेल तशीच त्याची स्थिती असते. थोडक्यात ब्राह्मणांनी विद्याभ्यास करावा, वेदपठण करावे, क्षत्रियांनी देशाचे सीमा रक्षण करावे, वैश्यांनी व्यापार करावा आणि शूद्रांनी गावाची साफसफाई करावी. समाजाची घडी उत्तम रीतीने बसण्यासाठी ही व्यवस्था होती, परंतु ब्राह्मण वर्गांनी त्याचे स्वरूप उच्च~नीच अशा प्रकारचे केले.

पुढील लेखात आणखी काही अभंगांचा आपण परामर्श घेऊ.

क्रमशः… २३ 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘आज ५ जून, जागतिक पर्यावरण दिन’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘आज ५ जून, जागतिक पर्यावरण दिन’ ☆ श्री दिवाकर बुरसे

(त्यानिमित्त जनजागृतीसाठी लिहिलेल्या दोन कविता रसास्वादासाठी प्रस्तुत.)

यंत्रदास विरचित श्रीसुरक्षितताबोधग्रंथामधील विश्वसौंदर्यवर्णननाम आध्याय १९

विश्व सौंदर्य वर्णन

अरे विश्व पाहे जरा रंगलेले

जरा ऐकते सूर नादावलेले

हळू हुंग सूगंध धुंदावलेले

सुखे पांघरी वात मंदावलेले ll१ll

*

पहा पर्वतांची कशी ती निळाई

पहा लाल माती पहा रानराई

पहा पाखरांचे थवे हिंडणारे

पहा सारिका, मोर ते नाचणारे ll२ll

*

पहा वीज, वारे, पहा मेघ, तारे

पहा पुष्पभारे, पहा रे किनारे

पहा धातुसाठे, पहा रत्नसाठे

पहा गारगोटे, पहा अष्म मोठे ll३ll

*

कसे तेज फाके नभी भास्कराचे

रुपेरी मृदू चांदणे पौर्णिमेचे

पहा क्रीडने, नर्तने वासरांची

पहा रंग, रूपे जळी मासळ्यांची ll४ll

*

जरा ऐक ती गर्जिते सागराची

वंशीवनी वाजते शीळ साची

जरा ऐक रे खर्ज ते मंडुकांचे

जणू साम गाती जथे ब्राह्मणांचे! ll५ll

*

प्रभूने कसे विश्व हे निर्मियेले

विनाकारणे का असे निर्मियेले?

जगी शासनू फक्त त्याचेच चाले

अरे, पानही श्रीकृपेनेच हाले! ६ll

*

इथे कीड, मुंगीसही अर्थ आहे

घुशी, साप, डासासही कार्य आहे

किडे, गांडुळे, पाल, माशा, मसूरे

तरू, खेचरे, भूचरे, जsलचरे ll७ll

*

कुणाची अरे ही असे मालमत्ता?

कुणाची इथे चालते सांग सत्ता?

अरे, यातले तू वदे, काय केले

बुधा! बोल ना काय तू निर्मियेले? ll८ll

*

तुलाही अरे निर्मिले ईश्वराने

जसे निर्मिले विश्व सारे तयाने

कधी जे कुणी निर्मीलेलेच नाही

तया छेदण्याचा कुणा हक्क नाही ll९ll

*

जगातील सारेच आहे पुरेसे

विभागून घ्यावे जिवांनी जरासे

दुज्या जsगवावे, स्वतःही जगावे

असे सूत्र सांभाळुनी वावरावे ll१०ll

*

नसे आपले, का धरावीस आशा

उगा कासया हाव, का रे पिपाशा?

नको ओरबाडू निसर्गास वेड्या

तयाच्याच हाती तुझ्या सर्व नाड्या ll११ll

*

बसे ज्यावरी त्या न शाखेस तोडी

पुरे हाव आता, पुरे, स्वार्थ सोडी

निसर्गात आहे क्रमू नेमलेले

जसे सूत्र माळेमधे ओवलेले ll१२ll

*

चुकोनी जरी तोडिले सूत्र कोणी

गळोनीच जाती मणी चौ दिशांनी

न माळेस अर्थू, न रत्नांस शोभा

अशाने कुणाचे भले होय बाबा! ll१३ll

– – –

यंत्रदासविरचित श्रीसुरक्षितताबोधग्रंथामधील पर्यावरणसमस्यावर्णननाम अध्याय २०

पर्यावरण समस्या वर्णन

नव्या संस्कृतीने पहा काय केले

निसर्गास सा-या प्रदूषीत केले!

नभा नासवीले, जळा नासवीले

फळा नासवीले बिजा नासवीले! ll१ll

*

कुठे पाखरे भेदरोनी उडाली?

कुठे कूजने कोकिळांची विराली?

वने, वाटिका पार खंगून गेल्या

हिरे, माणके, पाच संपून गेल्या! ll२ll

*

कुठे व्याघ्र गेले? कुठे सर्प गेले?

कुठे भृंग गेले? कुठे हंस गेले?

गवे, कासवे, केसरी, रान साळू

मृगे, माकडे, खेकडे, मोर, भालू ll३ll

*

कुठे वन्य प्राणी? कुठे शुद्ध पाणी?

कुठे रातराणी? कुठे लोकगाणी?

कुठे नम्र वाणी? कुठे देववाणी?

धरा ही कशी दीसते दीनवाणी! ll४ll

*

दिसेना कुठे वृक्षवल्ली जराशा

खुळ्या मानवाच्या किती या पिपाशा!

खरी कस्तुरी फक्त काव्यात राहे

इथे कुंद दुर्गंध कोंदून आहे! ll५ll

*

पहा वाळवंटे जगी माजलेली

धुरू-धूलिकांनी नभे दाटलेली

भगांकीत झाली धरित्री बिचारी

कुणी सर्व केले? मनाला विचारी ll६ll

*

जमीनीत हे क्षार कोठून आहे?

कसे शुष्क झाले कुवे, कूप, नाले?

कुठे दूर पर्जन्य गेले रुसोनी?

गिधाडामुखी रंगती हर्षगाणी! ll७ll

*

पहा उष्णता वाढताहे जगाची

स्थिती घोर आहे पहा जंगलांची

जमिनीतले तेलसाठे उडाले

जळे, वायु सारे अशुद्धून गेले ll८ll

*

सुरत्नाकराच्या तळी काय आहे?

अरे, त्याज्य सारे उदासून आहे!

अणू चांचण्यांनी दशा काय केली?

धरा अंतरी पार पिंजून गेली! ll९ll

*

नवी संस्कृती हाटवीते समुद्रा

तयाने तरी का धरावी मर्यादा?

नवे भोग आले, नवे रोग आले

कुमारी आवंढा गिळे, गर्भ गाळे! ll१०ll

*

गुणी माणसांचाच बाजार केला

किडे, कीटकांचाहि संहार केला

कुठे सत्य गेले? कुठे वीर्य गेले?

कसे ‘कोरोना’सारखे रोग आले? ll११ll

*

पहा ‘ताज’ आता भुरा दिसताहे

हिमासारखा तो खरा शुभ्र आहे

पहा जान्हवीची दशा काय आहे

मळी, सांडपाणी तिथे वाहताहे! ll१२ll

*

अरे, खेद मानू नको बोलण्याचा

जरा जाण हेतू अशा सांगण्याचा

नसे वेळ गेली अजूनी टळूनी

पुरे हाव, स्वार्था धरी आवरोनी ll१३ll

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares