मराठी साहित्य – विविधा ☆ “माणसाचे माणूसपण…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? विविधा ?

☆ “माणसाचे माणूसपण…☆ श्री जगदीश काबरे ☆

मनुष्य हा जिवंत प्राणी असला, तरी केवळ जैविक प्रक्रिया आणि प्रेरणांनी चालणारे यंत्र नाही. भूक लागली की अन्न घेणे, तहान लागली की पाणी पिणे, किंवा लैंगिक प्रेरणेने प्रेमसंबंध निर्माण करणे हे सर्व नैसर्गिक आहे, पण या कृतींमध्ये केवळ शारीरिक क्रिया असेल तर त्यात ‘मानवता’ नसते. आपण या कृती करतो, पण एकवेळ अशी येते की आपल्या मनात “का?” हा प्रश्न उभा राहतो. आपण का जगतो, का खातो, का पितो, का प्रेम करतो, का द्वेष करतो, हे प्रश्नच आपल्या माणूसपणाची सुरूवात असते. यंत्राला “का?” विचारता येत नाही; ते फक्त ‘कार्य’ करते. पण मानव विचार करतो. विचारच त्याला जैविकतेच्या पलीकडे घेऊन जातो. ‘का?’ हा प्रश्न म्हणजे सज्ञानतेचा प्रारंभ. एकदा हा प्रश्न पडला की सर्व अनुभवांवर एक नवा प्रकाश पडतो. भूक लागली म्हणून खाणे आणि पोषणासाठी खाणे यात फरक जाणवतो. प्रेम हे केवळ शारीरिक नसून भावनिक आणि बौद्धिकही आहे, हे कळते. प्राण्यात दोन लिंग का आहेत? हा प्रश्न जेव्हा पडतो, तेव्हा जैविक रचनेपलीकडे जाऊन प्रजोत्पादन, समाजरचना, आणि लैंगिकतेच्या नैतिक-मानसिक अर्थाचा शोध सुरू होतो. अशा वेळी आपण यंत्र नसतो, तर चेतन प्राणी बनतो.

 मानवाचा विकास हा या ‘का?’ च्या शोधातच झाला आहे. आदिमानवाने आकाशातील वीज, पाऊस, आग, तारे, मृत्यू, जन्म या सगळ्यांविषयी स्वतःशीच का आणि कसे, असे प्रश्न विचारले आणि त्यातून वैज्ञानिक पद्धत जन्माला आली. विज्ञान म्हणजे प्रश्न विचारण्याची पद्धत. धर्म, परंपरा, आणि समाजरचना अनेकदा उत्तरं देतात, पण तिथे प्रश्न विचारायला, शंका घ्यायला, चिकित्सा करायला वाव नसतोच. त्या उलट विज्ञान प्रश्न विचारतं, शंका घेतं चिकित्सा करतं. कारण का? विचारण्यातच प्रगती आहे. आपण जेव्हा भौतिकतेच्या पलीकडे विचार करतो, तेव्हा आपल्याला मानवतेची खरी किल्ली सापडते. विज्ञान आपल्याला मानवतेकडे नेणारा मार्ग आहे. ते केवळ यंत्रे निर्माण करत नाही, तर आपल्या विचारांना सज्ञान बनवतं. विज्ञानामुळे आपण शरीर, मन आणि निसर्ग यांच्या परस्परसंबंधाचा अर्थ शोधतो. यंत्र म्हणून शरीराचं महत्त्व नाकारायचं नाही; शरीर म्हणजे आपल्या अनुभवांचं माध्यम आहे. पण शरीराच्या मर्यादेपलीकडे जाणारा विचार म्हणजेच माणूसपण. शरीराला भूक लागते, पण मेंदूला अर्थाची भूक असते. शरीर तहानेने पाणी मागतं, पण मन म्हणजे मेंदू ज्ञानाची तहान बाळगतं. शरीर लैंगिकतेने प्रेम व्यक्त करतं, पण विचारांच्या उंचीवर ते सर्जनशीलतेत आणि करुणेत रुपांतरित होतं.

यंत्राला आदेश दिले की ते चालतं; पण माणूस विचार करून स्वतःचे आदेश घडवतो आणि इतराने दिलेले आदेश पाळायचे की नाही हे तारतम्याने ठरवतो. हीच त्याची ओळख आहे. जर आपण विचार थांबवले, प्रश्न विचारणे थांबवले, तर आपण पुन्हा यंत्र होतो — समाज, धर्म, बाजार किंवा राजकारण यांच्या नियंत्रणाखाली चालणारे यंत्र. पण ‘का?’ विचारणारा माणूस मुक्त असतो. तो कोणत्याही धर्माचा अंधानुयायी राहत नाही, कोणत्याही जात-लिंग-धर्माविषयी द्वेष बाळगत नाही, कारण त्याला समजतं की द्वेषाचं मूळ अज्ञानात आहे. मला परधर्मीयांचा राग का येतो? असा प्रश्न पडतो, तेव्हा आपण आपल्यातील भीती, संस्कार, आणि इतिहासाकडे पाहू लागतो. त्या प्रक्रियेतून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपला मानवतेकडे प्रवास सुरू होतो. म्हणूनच ‘का?’ हा प्रश्न म्हणजेच आत्मजागृती. तो प्रश्न आपल्याला स्वार्थातून परमार्थाकडे, अंधश्रद्धेतून विवेकाकडे, आणि यंत्रमानवतेतून खऱ्या मानवतेकडे नेतो. विज्ञान म्हणजे या प्रवासाची दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे. विज्ञान सांगतं की निसर्गात घडणाऱ्या सर्व गोष्टींच्या मागे काही कारण असतं, प्रत्येक क्रियेला परिणाम असतो, आणि सर्व विश्व एकमेकांशी जोडलेलं आहे. म्हणूनच विज्ञान आपल्याला अंधानुकरणापासून वाचवतं, आणि प्रश्न विचारायला शिकवतं.

मानवाचा उत्क्रांती प्रवास हा फक्त शरीराच्याच नव्हे तर विचारांच्याही उत्क्रांतीचा प्रवास आहे. एकेकाळी आपण फक्त अन्नासाठी जगत होतो, पण आज आपण अर्थासाठी जगतो. या प्रवासात ‘का?’ हा प्रश्नच आपल्याला जगण्याची चालना देतो. शरीर मर्यादित आहे, पण विचार अमर्याद आहेत. शरीर मरण पावते, पण विचार जिवंत राहतात. म्हणूनच विचारविश्वात रममाण होण्यात खरी मजा आहे. तिथे आनंद भौतिक सुखांपेक्षा गहिरा असतो, कारण तो ज्ञानातून, सत्याच्या शोधातून मिळतो. विज्ञानसाक्षरता म्हणजे केवळ प्रयोगशाळेतील प्रयोग नव्हे, तर जीवनाकडे विवेकाने पाहण्याची वृत्ती. ‘का?’ विचारणं म्हणजेच विज्ञानसाक्षरतेचा पाया आहे. प्रत्येक प्रश्न आपल्याला नव्या उत्तराकडे, नव्या शोधाकडे घेऊन जातो. आणि या नव्या शोधातून पुन्हा नवे प्रश्न निर्माण होतात आणि पुन्हा नव्या शोधाचा शोध आपण घेऊ लागतो. अशाप्रकारे सततच्या शोधक वृत्तीमुळे आपण यंत्रापेक्षा श्रेष्ठ ठरतो. कारण आपण फक्त जगत नाही, तर जगण्याचा अर्थ शोधतो असतो. माणूस म्हणून आपली खरी ओळख विचार करणारा प्राणी अशीच आहे. आपण खाणं, पिणं, प्रजनन करणं या क्रिया केवळ शरीर सुखासाठी करतो; पण विचार करणे, जाण येणे, प्रश्न विचारणे, हे मानव प्रजातीच्या उन्नतीसाठी करतो. शरीर जगण्यासाठी आहे, पण विचार हे जीवनाचं कारण आहेत. म्हणूनच ‘का?’ हा प्रश्न पडणं म्हणजे प्राण्यापासून मानवाकडे मारलेली उंच उडी आहे. विज्ञान हा त्या उडीचा धागा आहे; जो आपल्याला ज्ञान, करुणा, आणि मानवतेकडे नेतो. शरीर, यंत्र, जग ही सर्व साधनं आहेत; पण विचार हेच अंतिम साध्य आहे. त्या विचारविश्वात रममाण झाल्यावरच आपण खऱ्या अर्थाने ‘माणूस’ होतो.

थोडक्यात, माणसाचं शरीर जैविक यंत्र आहे. भूक लागली की खातो, तहान लागली की पाणी पितो, लैंगिक प्रेरणा आली प्रेम करतो. सगळं आयुष्य असेच गेलं तरी आपल्याला काही चुकीचे वाटत नाही. पण जर तुम्हाला ‘का?’ हा प्रश्न पडत असेल तर हे सर्व काही काळाने मिळमिळीत वाटायला लागते. आपण का खातो, का पितो, आपल्याला लैंगिक भूक का लागते? हे प्रश्न पडले तर आपण प्राणी राहात नाही; आपण माणूस होतो. तसेच परधर्मीय, पारलिंगी माणसांविषयी आपल्याला राग का? येतो हे कळल्यावर आपण माणूस होतो. कारण ‘का?’ हा प्रश्न पडल्यावर आपण प्राण्यापलीकडे जातो. माणसाला माणूसपण देणारा वैज्ञानिक दृष्टिकोन हा आपल्याला मानवतेची किल्ली उघडून देणारा मंत्र आहे. प्राणी वाईट नाहीत, शारीरिक भूक भागवणे वाईट नाही; पण विज्ञानामुळे सज्ञान झाल्यावर, विज्ञानसाक्षर झाल्यावर प्राणी अवस्थेपलीकडे, शारीरिक भुकांच्या पलीकडे जात विचारविश्वात रममाण होण्यातच खरी मजा आहे… खरे माणूसपण आहे.

 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आषाढीच्या स्वादातली भक्ती… ☆ तृप्ती देव ☆

तृप्ती देव

? मनमंजुषेतून ?

☆ आषाढीच्या स्वादातली भक्ती… ☆ तृप्ती देव ☆

आषाढ मास सुरू झाला, की वातावरणात एक वेगळाच ओलसरपणा आणि आल्हाददायक गारवा पसरायचा. आभाळ भरून यायचं आणि त्या ढगांच्या गडगडाटात पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या माऊलींच्या टाळ-मृदंगाचा नाद ऐकू येतोय असा भास व्हायचा. आमचं कुटुंब मध्यमवर्गीय, त्यामुळे दरवर्षी आषाढीला पंढरपूरला जाणं काही शक्य नसायचं. पण पंढरपूरचं ते अथांग पावित्र्य, तो विठ्ठलमय आनंद दरवर्षी आमच्या घराच्या अगदी लहानशा स्वयंपाकघरात आणि देवघरात अलगद उतरून यायचा.

आमच्यासाठी आषाढी एकादशी म्हणजे केवळ एक उपवास नव्हता, तो तर आनंदाचा एक कौटुंबिक ‘चंगल’ असायचा. त्या एका दिवसात आईच्या हाताची चव, आजीच्या शब्दांतली निस्सीम भक्ती आणि संपूर्ण घरभर पसरलेला विठोबाचा अदृश्य पण जाणवणारा वास… हे सगळं असं काही एकवटायचं, की घरचंच पंढरपूर व्हायचं.

“उद्या कोण कोण उपवास करणार रे? “

एकादशीच्या आदल्या संध्याकाळी स्वयंपाकघरातून आईचा हा नेहमीचा प्रश्न यायचा. आणि आम्ही सर्व भावंडं खेळता खेळता, अभ्यासाच्या वह्या मिटता मिटता एका सुरात ओरडायचो— “मी! “, “मी करणार! “, “मी पण! “

कोणीही नाही म्हणायचा प्रश्नच नसायचा. कारण आमच्या बालमनाला माहीत होतं, उपवास म्हणजे उपाशी राहणं किंवा काहीतरी सोडून देणं नव्हतं; तर उपवास म्हणजे वर्षातून एकदा मिळणारे काहीतरी अत्यंत स्वादिष्ट, खमंग आणि जिभेवर रेंगाळणारे पदार्थ खाण्याची हक्काची पर्वणी!

त्यानंतर स्वयंपाकघरात आई आणि आजीची एक सुरेल, लयबद्ध जुगलबंदी सुरू व्हायची. एकादशीच्या मेजवानीची यादी ठरवली जायची. वरीचे तांदूळ, साबुदाणा, शिंगाड्याचं पीठ, राजगिरा, लाल माती लागलेले रताळे, बटाटे, सैंधव मीठ… आई एकेक नाव घ्यायची आणि आजी तिच्या अनुभवाच्या पोतडीतून त्यात भर घालायची. यादी लांबत जायची, पण दोघींच्याही चेहऱ्यावर थकव्याचा एकही ओरखडा नसायचा. उलट एक वेगळाच उत्साह दिसायचा.

तेव्हा आजच्यासारखे मिक्सर किंवा फूड प्रोसेसर नव्हते. त्यामुळे भाजलेल्या शेंगदाण्यांची टरफलं काढणं आणि ते हाताने फिरवायच्या लोखंडी मशीनमध्ये बारीक करणं हे एक मोठं काम असायचं. आई शेगडीवर शेंगदाणे भाजायला लागली, की संपूर्ण घरात त्याचा खमंग वास सुटायचा. आमचं मुख्य काम काय? तर आईची नजर चुकवून त्या गरम-गरम, खरपूस भाजलेल्या शेंगदाण्यांची मूठभर चोरी करायची आणि तोंडात टाकायची! आईला सगळं समजायचं, ती तिरप्या नजरेने बघून गोड हसायची, पण कधी रागवायची नाही.

कोपऱ्यात ठेवलेल्या पितळेच्या कढईत साजूक तूप वितळत असायचं. आईने तूप कढवून बरणी काठोकाठ भरून ठेवलेली असायची. रात्री झोपण्यापूर्वी आई एका मोठ्या पातेल्यात साबुदाणा भिजत घालायची. कितीही कामं असली, तरी साबुदाणा भिजवायला ती कधीच विसरली नाही. आम्हाला वाटायचं ती आमच्यासाठी हे करतेय, पण खरं तर ती तिच्या त्या सावळ्या “विठोबासाठी” करत असायची.

एकादशीची सकाळ उजाडायची तीच मुळी एका वेगळ्या चैतन्याने. घरात रेडिओवर भीमसेन जोशी किंवा प्रल्हाद शिंदे यांचे अभंग वाजत असायचे. स्वयंपाकघर आणि देवघर यांची विभागणी करणारी एक विटांची भिंत होती, पण मनातील ती सीमारेषा केव्हाच मिटून गेलेली असायची.

एकिकडे देवघरात आजीने अंघोळ करून, सुती साडी नेसून पूजेची तयारी सुरू केलेली असायची. ताजी फुलं, सुवासिक उदबत्ती, कापूर, चंदनाचा गंध आणि बेलपान विठ्ठलाच्या फोटोसमोर वाहिली जायची. आजी डोळे मिटून, अगदी संथ आणि तृप्त स्वरात “पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय… ” अशी साद घालायची.

ठीक त्याच वेळी, भिंतीच्या पलीकडे स्वयंपाकघरात आईच्या हातातून लोखंडी कढईत जिरे आणि हिरव्या मिरचीची तडतडणारी खमंग फोडणी पडायची! तो फोडणीचा पहिला तवंग आणि त्याचा तिखट-गोड सुवास जेव्हा घरभर पसरायचा, तेव्हा वाटायचं की भक्तीचा पहिला नैवेद्य विठ्ठलाला पोहोचला आहे.

सकाळचा बेत ठरलेला असायचा— मऊसुत, मोकळी-सळसळीत झालेली दाण्याचे कूट लावलेली साबुदाणा खिचडी, सोबत यायची आंबट-तिखट हिरवी चटणी, आणि तोंडाची चव वाढवणारा शिंगाड्याचा मऊ शिजलेला शिरा. त्या शिऱ्यामध्ये वाहणारं साजूक तूप आणि आईच्या मायेचा सुवास दोन्ही इतके एकजीव झालेले असायचे, की पहला घास तोंडात टाकताच स्वर्गीय सुखाचा अनुभव यायचा.

सकाळची नहारी झाली की दुपारी पुन्हा स्वयंपाकघराची चाकं फिरू लागायची. दुपारचा बेत म्हणजे साक्षात अन्नपूर्णा अवतरल्यासारखा असायचा. मऊ शिजलेली भगर, त्यावर ओतण्यासाठी चिंच, गूळ आणि शेंगदाण्याचा रस्सा घालून उकळलेली आंबट-गोड आमटी. सोबतीला लालसर रताळ्याच्या साखरेत घोळवलेल्या मऊ फोडी, घरचं उपवासाचे लिंबाचे लोणचं आणि उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले साबुदाणा-बटाट्याचे पापड.

त्या काळात बाजारातून रेडीमेड आणायची पद्धत नव्हती. कोणतीही वस्तू विकतची नसायची; जे काही ताटात यायचं ते आईने स्वतःच्या हाताने, घामाच्या थेंबांनी आणि प्रेमाने तयार केलेलं असायचं. आणि जे घरचं असतं, तेच खऱ्या अर्थाने देवाचं असतं, हा आजीचा नियम होता.

दुपारच्या जेवणाची पंगत बसायची. आम्ही मुलं पोटभर जेवायचो. दिवसभरात घरच्या वातावरणात एक शांत, सात्विक भक्ती न्हाऊन निघालेली दिसायची. जेवणं आटोपल्यावर, सगळी भांडी घासून आई जेव्हा स्वयंपाकघराच्या उंबरठ्यावर थकून बसायची, तेव्हा तिच्या कपाळावर घामाचे थेंब असायचे. ती आजीकडे किंवा आमच्याकडे पाहून हळूच विचारायची— “जेवण कसं झालं? आपला विठोबा खूश झाला असेल ना गं आज? “

तिचा तो निष्पाप, भाविक चेहरा पाहून मला आतून सांगावसं वाटायचं— “आई, विठ्ठलाचं माहित नाही, पण तुझं हे अथांग कष्ट आणि प्रेम पाहून साक्षात विठोबा देवघरातून बाहेर येऊन तुझ्यासमोर हात जोडून उभा राहिला असेल गं! “

संध्याकाल झाली की दिवेलागणीची वेळ व्हायची. तुळशीसमोर आणि देवघरात दिवा लावला जायचा. त्या काळात आमच्याकडे टीव्ही नव्हता, हातात स्क्रीन बिलगलेले मोबाईल नव्हते. पण तरीही घरात अजिबात कंटाळा नसायचा. कारण विठोबा आणि रुक्मिणीचं अस्तित्व घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक नात्यात जाणवत होतं.

आजी संध्याकाळी तिचा उपवास सोडताना किंवा रात्रीच्या वेळी फक्त एकच ठराविक जिन्नस घ्यायची— राजगिऱ्याच्या पांढऱ्याशुभ्र लाह्या, एक केळ किंवा सफरचंद आणि वाटीभर दूध. ती नेहमी एक मोलाची गोष्ट सांगायची, “बाळांनो, आपल्या या धावपळीच्या, चपळ आयुष्यात थोडा संयम, थोडी शांतता हवीच. विठ्ठलाला अवाजवी नैवेद्य नको असतो, त्याला मनाचा साधेपणा हवा असतो. “

पण आई रात्री पुन्हा स्वयंपाकघरात हजर व्हायची. रात्रीच्या वेळी आम्हा मुलांसाठी ती उपवासाची खमंग थालीपीठे भाजायला घ्यायची. शेगडीच्या उष्णतेने तिचा चेहरा लाल बुंद व्हायचा. डाव्या हाताने कपाळावरचा घाम पुसत, उजव्या हाताने थालीपीठावर तूप सोडणं तिचं थांबायचं नाही.

आम्हा सगळ्यांना पाटावर बसवून ते गरमागरम, खरपूस भाजलेलं थालीपीठ, त्यावर घरात साठवलेल्या दुधाच्या सायीचं काढलेलं पांढरंशुभ्र लोणी आणि बाजूला आंबट-तिखट लोणचं… बास! त्या जेवणात जे समाधान असायचं, ते जगातल्या कुठल्याही मोठ्या हॉटेलच्या पक्वान्नात नसेल. ते समाधान फक्त चवीमुळे नव्हतं, तर त्या चवीमागे असलेल्या आईच्या अखंड, निरपेक्ष श्रमांमुळे होतं.

दुसऱ्या दिवशी द्वादशीला आमचा उपवास सुटायचा, आम्ही पुन्हा नेहमीच्या जेवणावर यायचो. आमची एकादशी संपायची, पण मला वाटतं आईची एकादशी कधीच संपायची नाही. तिचा विठोबा फक्त भिंतीवरच्या चौकटीतल्या फोटोत नसायचा; तो तिच्या प्रत्येक हालचालीत, मुलांसाठी केलेल्या प्रत्येक कामात, आणि तिच्या सोशिकतेत असायचा. आई म्हणजे माझ्या घराची साक्षात रुक्माई, तिच्या हातात असतो विठोबाचा पवित्र नैवेद्य, तिच्या काळजात असतो अखंड भक्तीचा गाभा, आणि तिच्याच पायाशी असतो माझा पंढरपूरचा राया!

आता खूप वर्षं उलटून गेली. काळाचं चाक वेगाने फिरलं. घरात आधुनिकता आली. हाताने शेंगदाणे कुटायची गरज उरली नाही, कारण मिक्सर आले. रेशनच्या दुकानाची किंवा साहित्याची चिंता नाही, सुपरमार्केट्स आली. उपवासाचे पदार्थ बनवायचे कष्ट नको म्हणून बाजारात विकतचे पापड, रेडीमेड थालीपीठ भाजणी आणि थेट घरपोच मिळणारे डबे आले. सगळं काही अगदी सोपं, सुटसुटीत आणि वेळेची बचत करणारं झालं.

पण… पण त्या आषाढी एकादशीचा तो जुना, मनाला तृप्त करणारा स्वाद मात्र पुन्हा कधीच नाही आला. त्या पदार्थांमध्ये सगळं काही योग्य प्रमाणात असतं, पण आईच्या हाताची ती जादू आणि आजीच्या प्रार्थनेची ती उब त्यात नसते.

म्हणूनच, आजही जेव्हा आषाढी एकादशी जवळ येते, मी भूतकाळाच्या आठवणींमधून बाहेर पडते आणि मेरे स्वयंपाकघरात आईसारखीच खंबीरपणे उभी राहते. माझ्या मुलांना जवळ बोलावून त्याच मायेने विचारते— “उद्या कोण उपवास करणार रे? ” ते मुलं आपापल्या मोबाईलवरून मान वर करत नाहीत, कदाचित त्यांना त्याचं महत्त्व नसेल, पण तरीही मी न हार मानता आईसारखीच तयारी करायला घेते. मी आज आईची जागा घेतली आहे खरी, संसार सांभाळतेय, पण तिच्यासारखं विशाल, निखळ प्रेम आणि ती भक्ती मी कुठून आणू? हा प्रश्न मला नेहमी सतावतो.

कधी कधी डोळे मिटले की असं वाटतं, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात लाखो वारकऱ्यांची माऊली उभी आहे, विठोबा कटेवर हात ठेवून रांगेत उभ्या असलेल्या भक्तांची वाट पाहतोय… पण मी त्या रांगेत नसून, खूप दूर एका कोपऱ्यात, माझ्या आईच्या आठवणींच्या पंक्तीच्या शेवटी बसलेली आहे, तिच्या आठवणीत पूर्णपणे न्हाऊन निघालेली आहे.

तेव्हा मला मनोमन जाणवतं की, माझा विठोबा फक्त दगडी मंदिरात किंवा गर्दीत नाही; तर तो माझ्या आईच्या कष्ट उपसणाऱ्या हातांमध्ये, तिने दिलेल्या पांढऱ्याशुभ्र लाह्या आणि लोण्यामध्ये, आणि उपवासाच्या दिवशी तिच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या त्या शांत, तृप्त हसण्यामध्येच विसावलेला आहे. “जिथे भाव, तिथे देव. ” आषाढी एकादशी साजरी करणं म्हणजे केवळ उपवास करणं किंवा कष्टाची वारी करून पंढरपूर गाठणं नव्हे— तर आपल्याच घरात वर्षानुवर्षे आपल्यासाठी झटणाऱ्या विठोबाला आणि रुक्मिणीला ओळखणं होय. त्या माऊली म्हणजेच आपली “आई” आणि “आजी”— ज्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या संस्कृतीचं, प्रेमाचं हे चैतन्य जपलं, आणि आपल्या मनामनात भक्तीची आषाढी कायमची रुजवली.

┉❀꧁꧂❀┉

© तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “दत्तक…!!!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “दत्तक…!!!☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

हा मला भेटला साधारण तीन वर्षांपूर्वी.. रस्त्यावर पडलेला होता.. मी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जात होतो तेव्हा मला हा दिसला.. महिना जानेवारी 2020!

उघड्या अवस्थेत असलेला हा एका भिंती कडेला पडून होता. आधी याच्या अंगावर ब्लॅंकेट आणून टाकलं आणि त्याला एडमिट केलं होतं. तो तापाने फणफणला होता. डॉक्टर म्हणाले, ‘वाचण्याची शक्यता कमी आहे’… परंतु तो वाचला.

परत बाहेर आल्यानंतर पुन्हा आजारी पडला. पुन्हा त्याला ऍडमिट केलं. यावेळी डॉक्टर म्हणाले, ‘आम्ही काहीच करू शकत नाही’, पण याहीवेळी तो वाचला… आणि काही काळाने पुन्हा आजारी पडला.. श्वासामध्ये घरघर चालू झाली. मी त्याला पुन्हा एडमिट केलं. डॉक्टर म्हणाले, ‘हा काही तासांचा सोबती आहे… ‘ तरीही तो यातून वाचला…

यापुढेही दोनदा तो गंभीर आजारी पडला आणि आपण त्याला ऍडमिट केले आणि तिथेही तो वाचला… मी डॉक्टरांचे आभार मानू की निसर्गाचे????

याला कोणीही नाही. वडील लहानपणी वारले. याच्या आईने याचा सांभाळ केला. परंतु दहा बारा वर्षाचा असताना त्याची आई याला सोडून गेली. आई वर याचा खुप जीव होता! आई… आई… म्हणून तो खूपदा तिची आठवण काढायचा!

पाच वेळा तो वाचला गंभीर आजारातून… त्याला इतक्या गंभीर आजारातून कोण आणि कशासाठी वाचवत होतं…? मलाही कळत नव्हतं…

एकदा पूर्ण बरा झाल्यानंतर मला म्हणाला, ‘सर मी आता परत रस्त्यावर झोपायला जाऊ का? ‘

मी त्याला म्हणालो, ‘पाच वेळा तुला वाचवला.. इतका तुझ्यावर खर्च केला तो तू रस्त्यावर झोपावं म्हणून का रे? मी मूर्ख आहे का रे नालायका? ‘ 

तो यावर हसत लाडीगोडी लावत मला म्हणाला होता, ‘मग मी तुमच्या कामात तुम्हाला मदत करू का? ‘ 

या नंतर मी त्याला माझ्या कामात मदतनीस म्हणून घेतलं परंतु मी त्याला जास्त पगार देऊ शकत नव्हतो. शेवटी भिकारीच की मी!

एकदा त्याला म्हणालो, ‘तुला आता मी भाजी विकण्याचा व्यवसाय टाकून देतो, तो तू कर…! ‘ 

‘व्हय.. चालतंय की सर’, असं तो तेव्हा म्हणाला होता. आणि यानंतर मी त्याला एक सायकल घेऊन दिली. त्या सायकलला कॅरेज लावून दिलं आणि त्याला भाजीचा व्यवसाय टाकून दिला. त्याला सेटल करून मी त्याचा हात सोडला होता. स्वतंत्रपणे जगण्यासाठी..!

आज मला तो पुन्हा भेटला कॅम्प मध्ये.. सायकलच्या कॅरेजला भाजी लावून तो धंदा करत होता… ‘ए.. मेथी घ्या वीस रुप्पय पेंडी.. वीस रुप्पय पेंडी.. वीस रुप्पय पेंडी..! ‘

माझ्या या पोराला पाहून माझा उर भरून आला… हा तोच होता ज्याला पाच वेळा मरता-मरता वाचवलं होतं. माझ्या तोंडावर रुमाल आणि गॉगल होता.. मी त्याच्या जवळ जावून म्हणालो, ‘पाच रुपये पेंडी देतो का? ‘

अर्थात त्याने ओळखलं नाही.. साहजिकच त्याला राग आला. तो म्हणाला, ‘तुमच्यासारख्या मोठ्या लोकांमुळे शेतकरी मरत आहे… हे असे बुलेट आणि कार मधून येता.. नाही तिथे खर्च करता… आणि आमच्या सारख्या गरीब लोकांकडे बार्गेनिंग करता… ‘ वगैरे वगैरे तो खूप काही बोलत होता…

या नंतर मी हळूच माझ्या डोक्यावरची कॅप काढली.. रुमाल काढला.. आणि गॉगल काढला.. आणि म्हणालो, ‘ए येड्या, मला “वीस रुप्पय पेंडी” लय महाग वाटती, परवडत नाय.. पन्नास रुपयाला एक पेंडी देशील का..?

मला पाहून तो चमकला. माझ्याकडे त्याने नीट पाहिलं आणि रस्त्यावर लोटांगण घातलं ‘अवो सर.. आवो… तुमि.. आयला.. वलकला नाय.. मापी करा.. ‘

गाडीवरून उतरून मी त्याला आलिंगन दिलं. अक्षरशः त्याच्या कपाळाचं आणि हाताचं चुंबन घेतलं. त्याला पुन्हा हसत म्हणालो, ‘मला वीस रुप्पय नको.. पन्नास रुपयांना पेंडी दे.. ‘

तो म्हणाला, ‘काय किंमत करता सर? आक्ख आयुष्य तुम्ही मला दिलं आहे… सगळ्या पेंढ्या घेऊन जावा की हो. ‘

यानंतर त्याच्या सगळ्या पेंड्या पन्नास रुपये प्रमाणे विकत घेऊन मी रस्त्यात वाटल्या होत्या… यावर तो रडत होता आणि मी हसत होतो..! कुणी रडताना हसण्याची ही माझी पहिलीच वेळ..!!

हा तोच होता… रस्त्यात पडलेला.. कधीही जाईल अशा अवस्थेतला.. पाच वेळा अतीगंभीर अवस्थेतून सुद्धा हा का वाचला? कसा वाचला? कोणी वाचवले याला मला कळलं नव्हतं…!

याच्याच शेजारी एक आजी भाजी विकत होती. ती आमच्या दोघातला संवाद पाहून जवळ आली आणि त्याला खुणेनं विचारलं, ‘कोण आहे रे हा? ‘ 

त्याने, तीला काय सांगितलं मला माहित नाही, परंतु हात जोडत ती माझ्या जवळ आली होती. मी त्याला खुणेनं विचारलं, ‘आता हि आजी कोण? ‘ 

तो म्हणाला, ‘ही माझी आई आहे’.

मी चक्रावलो, मी त्याला म्हणालो, ‘अरे तुझी आई तर तुझ्या लहानपणीच वारली… मग ही कोण…?

तो म्हणाला, ‘ही, आई माझ्यासारखीच रस्त्यावर पडली होती.. मी सावरल्यानंतर तीला म्हणालो, मी भाजी विकतो आई, त्यातली तुला थोडी देतो.. तू सुद्धा विक… ‘ ती तयार झाली आणि आम्ही दोघेही आता तुमच्या पैशातून दिलेली भाजी विकतो..! आई म्हणून मी तिला दत्तक घेतलंय सर…! ‘ तो सहजच बोलून गेला…

माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. ‘अरे नालायका, आईबाप दत्तक घेतात रे पोरांना.. तू आज रस्त्यावरच्या आईला दत्तक घेऊन “लायक” झाला आहेस रे… तूच आज बाप झालास कीं रे… ‘ म्हटलं, ‘येड्या, तु हे कुठून शिकलास? ‘ 

म्हणाला ‘सर, मी तुमचा “आशीश्टन्ट” म्हणून काम करत होतो ना तवा शिकलो… आपुन खड्ड्यातून भायेर आल्यानंतर… दुसऱ्याला पण खड्ड्यातून भायेर काढायचं… सर तुमी शिकवलं व्हतं ना… ईसरले ना सर तुमी? मी नाय इसारलो… ‘ 

‘मी कसा इसरेन येड्या…? काय आणि कसं सांगू? ओहो… आत्ता मला कळलं… तुला पाच वेळा मरताना निसर्गानं का वाचवलं? तुला एक आई दत्तक घ्यायची होती ना येड्या…! “

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतीय सैनिकांचा बंधुभाव… जगावेगळा! – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतीय सैनिकांचा बंधुभाव… जगावेगळा! – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके 

(अजय सिंग यांच्या पायांखाली शत्रूने पेरून ठेवलेल्या भूसुरुंगाचा भयावह स्फोट झाला. झाडाच्या जमिनीवर आलेल्या मूळाने बरेचसे स्फोटक अडवले होते पण तरीही अजय सिंग यांचा उजवा पाय घोट्याच्या थोडासा वर तुटून दूर जाऊन पडला..! आणि हा स्फोट झाल्या झाल्या गोळीचा आवाजही कानी पडला. याचाच अर्थ शत्रू जवळच दडून बसला आहे…! आता इथून निसटून मागे जायला पाहिजे.. अन्यथा संपूर्ण पथकाचा जीव धोक्यात निश्चित येणार! ) 

इथून पुढे – – 

आपला पाय तुटून पडला आहे याची अजय सिंग यांना बराच वेळ जाणीवच झाली नाही… अंगावर मांसाचे तुकडे चिकटलेले होते… रक्त लागलेले होते… पण त्यांचे सारे लक्ष लपून बसलेल्या शत्रूकडे केंद्रित झाले होते. त्यांनी त्या दिशेला रायफल वळवली आणि गोळीबार करण्याच्या पवित्र्यात आले!

सहकारी म्हणाला… ”अजय, एकही गोली चली है… ” 

त्यावर अजय सिंग म्हणाले, ”ते त्यांच्या रायफली नीट साफ करीत नसतील म्हणून एकच गोळी सुटू शकली! ” याही परिस्थितीत दोघे हसले!

तेवढ्यात सहकाऱ्याचे लक्ष अजय सिंग यांच्या तुटून पडलेल्या पायाकडे गेले… बूट असलेला पाय रक्ताने माखलेला! “अजय… तुम्हारा पैर! ” सहकारी उद्गारला.

“सिर्फ एक पैर ही उड गया है.. बाकी बॉडी तो अभी ठीक है… पहले गोली कहां से आयी देखते हैं! ” 

सहकारी अजय सिंग यांच्याकडे बघतच राहिला! खरं तर शत्रूच्या बाजूने गोळीबार झालाच नव्हता. क्लेमोर माईनसाठी जो डेटोनेटर असतो, तो या धावपळीत फुटला आणि त्याचा गोळीसारखा आवाज झाला होता… पण ते लगेच लक्षात आले नव्हते. अजयसिंग यांच्या सहकाऱ्याला वाटले की पाकिस्तान्यांनी बहुदा आर. पी. जी. (रॉकेट प्रोपेल्ड गन) फायर केली आहे ज्यामुळे मोठा खड्डा पडू शकतो!

इतरत्र लपून बसलेल्या पथकांनाही शत्रूचा गोळीबार झाल्याचे वाटले! अशा वेळेस तिथून सुरक्षित माघारी फिरणे हा मार्ग उरला होता. कारण त्या बाजूने पाकिस्तानी सेना येण्याची शक्यता होती, आणि आपले सैनिक जवळजवळ त्यांच्या सीमेत घुसले होते..! स्फोटाच्या आवाजाने पाकिस्तानची आणखी कुमक आपल्या मागावर येण्याची दाट शक्यता होती.

आता या जखमी अवस्थेत अजयकुमार यांना सोडून माघारी फिरता येणार नव्हतं… कुणाही सैनिकाला दुसरा सैनिक असं सोडून येत नाही!

अजय यांना खांद्यावर टाकून त्यांचा ‘Buddy’ (सहकारी) मागे निघाला.. त्यावर अजय म्हणाले… ”ठहर जा! जिसने गोली चलायी है उसे खतम कर के जायेंगे! ” यावर त्यांचे काही न ऐकता सहकारी पुढे चालत राहिला. अजय सिंग मात्र एका हातात तुटलेला पाय सावरत, दुसऱ्या हातातली एके-४७ रोखून सज्ज होते गोळीबाराला उत्तर द्यायला!

या पथकात अगदी हट्टाने सहभागी झालेला एक वैद्यकीय साहाय्यकही होता. त्याचा फायदा झाला. त्याने त्याच्याकडच्या चाकूने सलाईनची बाटली फोडली आणि ते सर्व द्रव अजय सिंग यांच्या जखमेवर ओतले. हे सर्व अंधारात होत होतं. विजेरी पेटवणे धोक्याचे होते! द्रव ओतल्यावर मात्र प्राणांतिक वेदना सुरु झाल्या. पण तोंडातून एक अस्फुट किंकाळीसुद्धा मारता येणार नव्हती!

आपल्या सहकाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत मागे सोडून निघून यायचे नाही अशी पक्की शिकवण भारतीय सैनिकांना दिलेली असते. सहकारी म्हणजे Buddyचं स्वत:चं वजन ९५ किलो.. अजय सिंग त्याला म्हणाले, ”आपल्याला इथवर पोहोचायला दोन दिवस लागले होते. तू मला खांद्यावर घेऊन असं किती अंतर धावशील? मला इथंच सोड. मी मागे कुणी आले तर त्याचा समाचार घेईन! ” अर्थात buddy त्यांचं ऐकणार नव्हताच… त्याने अजय सिंग यांना उचलून धावायला सुरुवात केली!

स्ट्रेचर तयार करणे शक्य नव्हते. buddy ने अजय सिंग यांना स्वत:च्या पटक्याने स्वत:भोवती गुंडाळून घेऊन बांधले. पुढे तीस फूट खोल उतरून जायचे होते. तो अजय सिंग यांना घेऊन घसरत खाली गेला आणि दोघेही एका ओढ्यात कोसळले. सलाईनची सुई निघून आली. जखमेवरच्या पट्ट्या ओल्या झाल्या!

भारतीय सीमा अजून बरीच दूर होती. काल रात्री चालायला सुरुवात केली होती. आजच्या दिवसाची संध्याकाळ होत आली होती तरीही वाट उरकेना. पुढे चालताना एका दगडावरून buddy चा पाय निसटला आणि तो अजय यांना घेऊन खाली कोसळला.. यावेळी त्याचा पाय दोन दगडांच्या सापटीमध्ये विचित्र पद्धतीने अडकून बसला. घोटा सुजला. पाय बाहेर काढता येईना. मागून आलेले दोन सैनिक थांबले. त्यांनी त्या ओढ्यात पडलेल्या एका झाडाची जाड फांदी आणली आणि ते दोघे आणि अजय सिंग यांनी जोर लावून तो दगड थोडा बाजूला करण्यात यश मिळवले. buddy च्या पायातील बूट कापून काढावा लागला. सूज प्रचंड होती. पायाचे हाड मोडलेच असावे. तरीही त्याची अजय सिंग यांना खांद्यावर घेऊन चालायची तयारी होती! सोबत प्रत्येकी ३५ किलोचे ओझे होतेच!

आता पुढे आणखी दोन डोंगर चढून जावे लागणार होते. आता शत्रूच्या सीमेपासून काही अंतर पुढे आल्याने त्यांनी थांबून त्यांचे शर्टस, टीशर्टस फाडून स्ट्रेचर तयार केले. पहिला डोंगर चढण्याच्या प्रयत्नात अजय यांच्या पायाचे ड्रेसिंग निघून आले. अंधार आणि निसरडा रस्ता. अजय सिंग स्ट्रेचरवर जवळजवळ बसलेल्या स्थितीत होते. डोंगर चढताना ते ही हाताला लागेल ते गवत धरून जोर लावत होते. पुढे उतार लागला आणि हे सर्वजण पुन्हा खाली घसरून पडले.. पुन्हा उठले.. ”भाई को साथ लेके जायेंगे… ऐसे थोडेही न पिछे छोडके जायेंगे… ” हे म्हणताना आता ते सर्वजण हसत होते!

अजय यांच्या पायांतून रक्त जास्त वाहू लागल्याचे त्यांना जाणवले. मग त्यांनी एक स्लीपिंग bag उपयोगात आणली. तिच्या आत अजय यांचा पाय सरकवला. आतल्या आत विजेरी चालू केली आणि त्या तेवढ्याशा उजेडात ड्रेसिंग केले! शत्रूला उजेड दिसला असता तर त्यांनी तिथे निश्चित गोळीबार केला असता!

सहकाऱ्यांचे हास्यविनोद सुरूच होते. मात्र त्यांच्या मनात अजय यांच्याबद्दल खूप काळजी दाटून आलेली होती. कारण जखमेतून खूप रक्त वाहून गेले होते! मोडलेल्या पायाने चालणारा पहिला buddy तिथवर पोहोचला आणि त्याने अजय यांना पुन्हा खांद्यावर घेण्याची तयारी दाखवली…! Don’t Leave Enemies Alive… Don’t Leave Friends Behind! शत्रूला जिवंत सोडू नका… आणि मित्राला रणांगणात सोडून माघारी येऊ नका… असा भारतीय सैनिकांचा दंडक आहे!

आता ते एका पोस्टवर पोहोचले होते पण जिथून हेलीकॉप्टर मिळू शकेल अशी पोस्ट आणखी खूप दूरवर होती!

त्या पोस्टवर पोर्टर लोकांना बोलावून घेतले गेले. ते सारे जण जीवाच्या आकांताने अजय यांना घेऊन धावले. सकाळी साडेसात वाजता हेलिकॉप्टर पर्यंत पोहोचले पथक…! रुग्णालयात पोहोचेपर्यंत अजय सिंग शुद्धीवर होते… आणि शांत होते! त्यांचा पाय आणखी वरपर्यंत कापून काढावा लागला!

आपल्याला काही झाले तर घरच्यांना कळवावे यासाठी अजय यांनी त्यांच्या हातावर घरचा मोबाईल क्रमांक लिहून ठेवला होता. पण इकडे मुख्य अधिकारी साहेबांनी त्यांच्या युनिटमधील एका सैनिकाकडून त्यांच्या गावातील एकाचा क्रमांक मिळवला आणि संपर्क साधला. पण अजय यांचे वडील शेतात गेलेले होते. काही वेळाने त्यांच्याशी बोलणे झाले. साहेब म्हणाले, “आपल्या मुलाचा एक पाय तुटला आहे… पण बाकी शरीर सुरक्षित आहे.. जीवाला धोका नाही! ” त्यावर वडिलांना विश्वास बसला नाही. ते म्हणाले, “अगर ठीक है तो मेरी उसकी बात करावो साब! ” 

यावेळी अजय यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेले होते त्यामुळे लगेच त्यांच्याशी बोलणे करून देणे अशक्य होते. साहेब म्हणाले, “अभी बात नहीं हो सकेगी! ” त्यामुळे तर वडिलांची खात्रीच पटली.. आपला अजय गेला! त्यांनी घरी काहीही सांगितले नाही. अजय यांच्या पत्नीला सांगितले की तिच्या माहेरच्या एका माणसाचा रस्ता अपघात झाला आहे, त्याला बघायला जातो आहोत.. आणि ते लगोलग जीपमधून श्रीनगरकडे निघाले सुद्धा!

अजय यांच्या मातोश्रींना मात्र अंदाज आला होता.. कारण अजयच्या वडिलांनी तिला एकांतात घेऊन सांगितले होते… ”अजय को प्रोब्लम हुवा है! ”

 इकडे अजय यांच्या पायांवर प्रारंभिक उपचार झाले आणि त्यांना बाहेर आणण्यात आले. साहेबांनी पुन्हा अजय यांच्या वडिलांना फोन लावला. त्यावर त्यांना अजयच फोनवर बोलत आहेत यावर विश्वास बसला नाही. त्यावर त्यांच्या सोबत जीपमध्ये असलेल्या व्यक्तीने अजय यांचा फोन घेतला आणि खात्री करून घेतली की अजय जिवंत आहेत! अजय त्यांना सांगत होते की, तुम्ही माघारी जा. इथवर येण्यास खूप वेळ लागेल. बरा झालो की मी गावी येणारच आहे लवकर. पण बापाचे काळीज काही मानायला तयार होईना!

इकडे गावात कर्णोपकर्णी वार्ता पसरली. लोकांची अंत्यविधीची तयारी झाली. अजय यांच्या पत्नीला मात्र काहीच खबर नसल्याने त्या शेजारी जाऊन हास्यविनोद करून येत होत्या, नेहमीची कामेही सुरु होती. अजय यांच्या मातोश्री मात्र त्यांना चोरून लपून रडून घेत होत्या. सुनेला धक्का बसू नये याची त्यांना काळजी होती! शेवटी त्या गावातल्या मंदिरात जाऊन बसल्या!

अजय यांच्या वडिलांना त्यांच्या धाकट्या मुलाचा फोन आला. त्यांनी परिस्थिती सांगितली. तोही म्हणाला, ‘जब तक शकल न देखो… तब तक वापीस नहीं आना! ‘

अजयचे वडील शेवटी खूप तासांनी श्रीनगरमध्ये पोहोचले. पोराचा एक पाय तुटलेला त्यांनी पाहिला आणि रडतच बाहेर पडले. माघारी निघाले आणि अर्ध्या वाटेतून माघारी फिरले.. रुग्णालयात आले म्हणाले… एकच पाय पाहिला… दुसरा पाय दाखव!

संपूर्ण उपचार प्रक्रियेत अजय यांनी वेदना मोठ्या धीराने सहन केल्या. कितीही दुखले तरी ते चेहऱ्यावर दाखवत नसत… जणू आपण किती वेदना सहन करू शकतो याची ते स्वत:च स्वत:ची परीक्षा पहात होते.. यावर डॉक्टरही आश्चर्यचकीत होत असत! पाय अनेक वेळा कापावा लागला, त्यात संसर्ग झाला. पण सोबती असलेल्या buddy ने खूप सेवा केली आणि पाय वाचवला.

पुढील उपचारांसाठी अजयकुमार पुण्याच्या लष्करी उपचार केंद्रात आले. त्यांच्यासारखे कित्येक जखमी सैनिक त्यांनी पाहिले आणि आपली परिस्थिती बरी आहे, याची जाणीव त्यांना झाली. पण आपण असे पंगू होऊन राहायचे नाही, अशी त्यांनी मनोमन प्रतिज्ञा घेतली. कित्येकवेळा शस्त्रक्रिया झाल्या.. पण या सर्व वेदनांवर मात करीत ते कृत्रिम पाय लावून, काठीच्या आधाराविना चालायला आणि पुढे पळायलाही शिकले! आणि पुन्हा सेनेत सहभागी झाले. पूर्ण कार्यक्षमतेने. पण आता प्रत्यक्ष लढाईला जाता येणार नव्हते!

परंतू कामाच्या दर्जामुळे त्यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय मोहिमेवर आफ्रिकन देशांत दोन वेळा धाडले गेले. तेथेही त्यांनी पारितोषिकप्राप्त कामगिरी बजावली. पण पायाला कृत्रिम पायामुळे जखमा होत होत्याच. सहकारी सैनिक, अधिकारी यांनी वैय्यक्तिक पातळीवर आर्थिक मदत उभारून परदेशातून उच्च दर्जाचा कृत्रिम पाय उपलब्ध करून घेतला!

या सर्व प्रवासात त्यांचे सहकारी त्यांच्या मागे सावलीसारखे उभे होते. एकदा ते मेस मध्ये सर्वांसोबत भोजन करीत होते. खीर आणायला उठले आणि त्यांच्या हातातली खिरीची वाटी खाली पडली. खीर जमिनीवर सांडली. ते पाहून त्यांचा buddy पुढे आला. त्याने ती जमिनीवर पडलेली खीर हाताने खायला सुरुवात केली… म्हणाला.. माझ्या भावाची खीर आहे… यावर सर्वांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते… सैनिक एकमेकांचे बंधू असतात ते असे…!

सैनिकी सेवेत काही जगावेगळे करावे असे या वीर सैनिकाच्या मनाने घेतले आणि मग एक निराळाच प्रवास सुरु झाला. पाठीवर दहा किलोचे ओझे, पूर्ण युद्धसाहित्य घेऊन चालण्याचा अहोरात्र सराव केला. पाय चांगला असताना अजयकुमार पर्वतारोहण अतिशय वेगाने करण्यासाठी प्रसिद्ध होते. कृत्रिम पायाच्या साहाय्याने हवालदार अजयकुमार जगातील सर्वांत उंचावर असलेली युद्धभूमी असलेल्या कुमार पोस्टपर्यंत चढले… त्यांच्या समवेत असे आणखी आठ जवान होते… हा एक जागतिक विक्रम ठरला.

पुढे अजयकुमार यांनी या पायांवर विमानातून छत्रीच्या साहाय्याने यशस्वी उड्या मारल्या. स्कुबा डायविंग शिकून घेतले. नेमबाजीत केवळ ४५ दिवसांचा सराव करीत राष्ट्रीय पातळीवर मेडल मिळवले. देशभरातल्या अनेक marathon स्पर्धांत सहभाग घेतला.

अजयकुमार आता तरुणांसाठी प्रोत्साहन देण्याचे उपक्रम करतात. त्यांच्याविषयी कितीही लिहिले तरी ते अपुरेच वाटेल अशी त्यांची कामगिरी आहे. असे सैनिक भारतीय सैन्याला लाभले हे देशाचे सुदैवच म्हणावे लागेल!

— समाप्त — 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८३ आणि ८४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८३ आणि ८४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ८३ – – – 

जेणे जाळिला काम तो राम ध्यातो ।

उमेसी अती आदरे गूण गातो ।

बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे ।

परी अंतरी नामविश्वास तेथे ।।८३।।

अर्थ : मदनाला म्हणजेच कामदेवाला ज्या भगवान शंकरांनी जाळून भस्म केले, ते शंकर स्वतः रामाचे ध्यान करतात. श्रीरामांचे गुण अत्यंत आदरपूर्वक पार्वतीला सांगतात. ज्यांच्या ठायी महान सामर्थ्य, ज्ञान आणि वैराग्य हे गुण एकवटले आहेत, अशा भगवान शंकरांच्या अंतरंगात नामाबद्दलचा दृढ विश्वास वास करून आहे.

(ध्यातो – ध्यान करतो, उमा – पार्वती) 

विवेचन :  या श्लोकातही समर्थ रामनामाचे महत्व आपल्याला पटवून देत आहेत. रती आणि मदन ही जोडी म्हणजे कामभावनेच्या देवता मानल्या जातात. कामभावनेचे मानवी जीवनात काही एक महत्व जरूर आहे. परंतु जेव्हा ही कामभावना अतिरेकी रूप धारण करते, तेव्हा ती माणसाला विनाशाकडे नेते. रावणासारख्या पौराणिक व्यक्तिरेखा आणि नंतरच्या काळातही अगदी आजपर्यंत अतिरेकी कामवासनेने ज्यांचा विनाश घडवून आणला अशा अनेक व्यक्तींची नोंद इतिहासात आढळते. त्यातूनच युद्धे देखील उद्भवली आहेत. कामवासना जर ज्ञान, वैराग्य आणि कर्तव्याच्या आड येत असेल तर तिला जाळून भस्म करणेच योग्य ठरते. तेच भगवान शंकरांनी आपला तृतीय नेत्र उघडून केले. तिसरा डोळा हा ज्ञानाचे प्रतीक मानला जातो. त्याचा दुसरा अर्थ असा की ज्ञानाच्या साहाय्याने कामभावनेवर नियंत्रण मिळवावे.

भगवान शंकरांनी त्यांची तपस्या भंग करणाऱ्या कामदेवाला आपला तिसरा डोळा उघडून भस्म केले. एवढे सामर्थ्य असणारे भगवान शंकर पार्वती मातेला श्रीरामांचे गुणवर्णन करून सांगतात. भगवान शंकर म्हणजे सामर्थ्य, ज्ञान आणि वैराग्य यांचे मूर्तिमंत प्रतीक! माता पार्वती देखील काही कमी नाही. ती देखील ज्ञान, वैराग्य आणि साधना यांचे प्रतीक आहे. पण या दोघांमध्ये एक समानता आहे. दोघांच्याही अंतरात रामनामाबद्दल अतूट श्रद्धा आहे. एवढे प्रचंड सामर्थ्य ठायी असलेले भगवान शंकर आणि पार्वती जेथे प्रभू श्रीरामाचे ध्यान करतात तेव्हा रामनामाची महती सांगण्यासाठी आणखी कोणते उदाहरण द्यायला हवे?

आपल्या मनातील कामवासना अनियंत्रित होत असेल, तर त्यावर नियंत्रण मिळवण्यास रामनाम हे अचूक आणि अमोघ अस्त्र आहे. परंतु अशा व्यक्तींनीच रामनाम घ्यावे असा याचा अर्थ नाही. ज्यांच्या ठायी ज्ञान, वैराग्य आणि शक्ती आहे अशा व्यक्ती देखील रामाचे ध्यान करतात. किंबहुना ज्ञान, वैराग्य आणि शक्ती प्राप्त होण्यासाठी रामनामासारखा दुसरा उपाय नाही असे देखील म्हणता येते. ज्ञान, वैराग्य आणि शक्ती यांचे अधिष्ठान रामनाम आहे. संत कबीर म्हणतात, ” कबिरा राम हृदय बसे, काम कहाँ घर होय? ” जिथे हृदयात रामाला स्थान दिले, तिथे कामासारख्या गोष्टींसाठी जागाच कुठे उरते?

स्वसंवाद ::

१. भगवान शंकर आणि माता पार्वती अत्यंत आदराने रामगुणांचे गायन करतात तरी देखील रामनामाचे महत्व मला स्वतःला पटवून देण्यासाठी अन्य गोष्टींची आवश्यकता वाटते का?

२. ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य हे गुण माझ्याकडे नसले, तरी या तिन्ही गुणांचे अधिष्ठान असणारे ‘रामनाम’ घ्यावे असे मला वाटते का?

३. माझ्या मनात जेव्हा एखादा वाईट विचार किंवा अनावर वासना डोके वर काढते, तेव्हा मी माझ्या ‘ज्ञानाचा तिसरा डोळा’ (विवेक) उघडून तिला भस्म करतो का?

– – – – 

श्लोक क्र. ८४ – – – 

विठोने शिरी वाहिला देवराणा ।

तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा ।

निवाला स्वये तापसी चंद्रमौळी ।

जिवा सोडवी राम हा अंतकाळी ।।८४।।

अर्थ :  प्रत्यक्ष विठ्ठलाने देवराणा म्हणजे श्रीशंकराला डोक्यावर धारण केले आहे. त्या श्रीशंकराच्या हृदयात मात्र रामनामाचा ध्यास आहे हे आपल्याला माहिती नाही का? मस्तकी चंद्र धारण करणाऱ्या महान तपस्वी अशा भगवान शंकराचा दाह रामनामाने शांत झाला. आपल्या अंतकाळी रामनामच आपल्याला सोडवणार आहे.

(विठोने – विठ्ठलाने, देवराणा – देवांचा राजा /महादेव, नेणा – जाणत नाही, तापसी – तपश्चर्या करणारा, चंद्रमौळी शिरावर चंद्र धारण करणारा (शंकर), निवाला – शांत झाला)

विवेचन : रामनामाचे महत्व पुन्हा स्पष्ट करणारा हा सुंदर श्लोक आहे. पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे सर्व संत, वारकरी यांचे दैवत. पांडुरंग हा श्रीकृष्णाचाच अवतार मानला जातो. असा हा भक्तांचा लाडका असणारा पांडुरंग स्वतःच्या मस्तकावर श्रीशंकराला धारण करतो. पांडुरंगाच्या डोक्यावर शिवाच्या पिंडीचा आकार दिसतो. दुसरी गोष्ट म्हणजे पांडुरंग स्वतःच श्रीशंकराचे गुणगान करतो. या अर्थाने देखील तो शंकराला डोक्यावर घेतो असे म्हणता येईल. कारण एखाद्याचे गुणगान करणे म्हणजे त्याला मस्तकी बसवणे. तेच पांडुरंगाने केले आहे. पण समर्थ पुढे म्हणतात की ज्या विठ्ठलाने श्रीशंकराला आपल्या शिरावर घेतले आहे, त्या भगवान शंकरांच्या हृदयात देखील रामानामाचा ध्यास आहे. या ठिकाणी श्रीरामाचे आणि रामनामाचे महत्व फारच सुंदररित्या आपल्याला पटवून दिले आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे समर्थ रामनामाचे श्रेष्ठत्व आपल्या मनावर ठसवण्यासाठी वारंवार श्रीशंकराचे उदाहरण का देत आहेत याचाही विचार केला पाहिजे. ज्यांच्याकडे अथांग ज्ञान आणि वैराग्य आहे, तेच जर नामाचा आश्रय घेत असतील, तर आपल्यासारख्या सामान्य माणसाचा अहंकार गळून पडायला हवा, हाच समर्थांचा यामागील हेतू असावा.

श्रीशंकरांना रामनामाचा ध्यास लागलेला आहे. रामनाम म्हणजे जणू त्यांचा श्वास आहे. अशा पद्धतीचा ध्यास आपल्यालाही लागावा अशीच समर्थांची अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महान तपसामर्थ्य अंगी असणारे भगवान शंकर जेव्हा सातत्याने रामनाम जपतात, तेव्हा आपण तर सामान्य माणसे! या श्लोकात भगवान शंकरांबद्दल बोलताना समर्थ म्हणतात, “स्वये निवाला तापसी चंद्रमौळी. ” इथे निवाला शब्दाचे दोन अर्थ घेता येतात. पहिला अर्थ म्हणजे रामनामामुळे त्यांच्या जीवाला शांती लाभली. दुसरा अर्थ आपल्याला परिचित आहे. तो म्हणजे भगवान शंकरांनी जेव्हा हलाहल (विष) प्राशन केले तेव्हा त्यांच्या कंठाचा जो दाह होऊ लागला, तो कशानेही शमेना. त्यांनी मस्तकी गंगा धारण केली, गळ्याभोवती शीतल नाग धारण केला, शीतल असणारा चंद्र मस्तकी धारण केला. परंतु त्यांचा दाह केवळ रामनामानेच शांत झाला. या अर्थानेही ‘ निवाला ‘ हा शब्द वापरला आहे.

श्रीराम हे समर्थांचे आराध्य दैवत आहे. त्यांना नेहमी तो समोर दिसत असतो. म्हणून ते कधीही ‘ तो राम ‘ म्हणत नाही. तर ‘ हा राम ‘ असे म्हणतात. एवढी त्यांची रामाशी एकरूपता आहे. पांडुरंगाने ज्यांना मस्तकी धारण केले आहे असे श्रीशंकर सुद्धा रामानामाचा ध्यास घेतात, तेव्हा असे पावन, पवित्र असे रामनाम आपली देखील अंतकाळी या भवसागरातून सुटका करील असे समर्थांना सांगायचे आहे.

स्वसंवाद :: 

१. पंढरीचा विठ्ठल आणि कैलासीचा राणा शिव यांच्यात जर कोणतेही द्वैत नाही, तर मी मात्र जाती-पाती, पंथ किंवा संप्रदायांच्या खोट्या भेदांमध्ये का अडकून पडलो आहे?

२. संसारातील वेगवेगळ्या संकटांमुळे किंवा वासनांमुळे जेव्हा माझ्या मनाचा ‘दाह’ होतो, तेव्हा मी तो शांत करण्यासाठी बाह्य गोष्टींकडे धावतो, की भगवान शंकरांप्रमाणे रामनामाचा आश्रय घेतो?

३. समर्थांना प्रभू श्रीराम जसे ‘हा राम’ म्हणून अगदी जवळ (अंतर्यामी) भासतात, तशी आत्मीयता आणि ओढ मला कधी नाम घेताना जाणवते का?

४. “अंतकाळी हाच राम आपल्याला सोडवणार आहे” हे अंतिम सत्य ठाऊक असूनही, मी माझा आजचा अमूल्य वेळ केवळ नश्वर गोष्टींची चिंता करण्यातच घालवत आहे का?

– क्रमशः श्लोक श्लोक ८३ आणि ८४

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मानसशास्त्राची पदवी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

श्री मनोहर जांबोटकर

? वाचताना वेचलेले ?

☆ मानसशास्त्राची पदवी… – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

वर्गात प्राध्यापकांनी मानसशास्त्राचा तास घ्यायला सुरुवात केली होती. तेवढ्यात मागून एका मुलाने शिट्टी वाजवली. प्राध्यापकांनी शिट्टी कोणी वाजवली, असं विचारल्यावर संपूर्ण वर्ग शांत बसला. मात्र कोणीच नाव सांगितलं नाही.

सरांनी हातातला खडू खाली ठेवला आणि म्हणाले, ”आपला आजचा तास इथेच संपतो आहे. पण राहिलेला वेळ सार्थकी लावण्यासाठी मी तुम्हाला कालच रात्री घडलेला एक किस्सा सांगतो. “

किस्सा ऐकण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी कान टवकारले.

“काल रात्री उशिरापर्यंत मला झोप येत नव्हती. वेळ काढायचा म्हणून गाडीत पेट्रोल भरून येऊ, असा विचार माझ्या मनात आला म्हणून गाडी काढून मी पेट्रोल भरून घेतलं. पेट्रोल भरल्यावर सहजच मी एका शांत रस्त्यावर गाडी वळवली. रस्त्याच्या कोपऱ्यावर एक अतिशय मादक, सुंदर ललना उभी होती. मी गाडी तिच्याजवळ थांबवून तिला विचारलं की मॅडम, मी आपली काही मदत करू शकतो का? हो, मला घरापर्यंत सोडू शकलात तर फार बरं होईल. गाडीचा दरवाजा उघडून मी तिला आत घेतलं आणि तिच्या घराच्या दिशेने गाडी वळवली. वाटेत आम्ही विविध विषयांवर चर्चा करत होतो. सौन्दर्यासोबतच बुद्धिमत्तेची देणगी लाभलेल्या निवडक स्त्रियांमध्ये मी तिचा समावेश करेन.

तिच्या घराशी पोहचल्यावर तिने लाजत लाजत कबूल केले की माझ्या सहृदय वागण्यामुळे ती माझ्या प्रेमात पडली आहे. मी ही तिच्या सौन्दर्याची आणि बुद्धिमत्तेची तारीफ करत तिच्या प्रेमात पडल्याची कबुली तिला दिली. एकमेकांशी बोलताना मी तिला माझ्या पेशाबद्दल सांगितलं. निरोप घेताना आम्ही फोन नंबरची अदलाबदल केली. अगदी शेवटच्या क्षणी तिने मला सांगितलं की तिचा भाऊ मी शिकवत असलेल्याच महाविद्यालयात शिकतो, त्यामुळे होणारा दाजी या नात्याने मी त्याची काळजी घ्यावी. मी तिला त्याचं नाव विचारलं. त्यावर तिने उत्तर दिलं की तुम्ही त्याला त्याच्या खास सवयीवरून लगेच ओळखाल…

‘तो अतिशय उत्तम शिट्टी वाजवतो. ‘

प्राध्यापकांच्या या वाक्यावर अख्खा वर्ग मगाशी शिट्टी वाजवलेल्या विद्यार्थ्यांकडे बघायला लागला.

प्राध्यापक महाशय त्या विद्यार्थ्याकडे बघून हसून म्हणाले, ” माझी मानसशास्त्राची पदवी / ज्ञान मी विकत घेतलेलं नाही तर स्वकष्टाने अर्जित केलं आहे.

निघ बाहेर वर्गाच्या… “

*

लेखक:अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – ३१ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – ३१ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

समर्पण

पांडुरंगाची निर्व्याज भक्ती करता करता तुकाराम महाराजांच्या तनामनात विठु माऊली विषयी समर्पित भावना निर्माण झाली आहे. त्यासंबंधी काही अभंगांचे आपण येथे विवेचन करण्याचा प्रयत्न करूया. तुकाराम महाराजांना सर्व जग विष्णुमय वाटते आणि साधकांनाही ते हेच सांगतात.

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म/

भेदाभेद भ्रम अमंगळ//

 आईकाजी तुम्ही भक्त भागवत/

 कराल ते हित सत्य करा//

कोणाही जीवाचा न घडावा मत्सर/

वर्म सर्वेश्वर पूजनाचे//

तुका म्हणे एका देहाचे अवयव/

सुखदुःख जीव भोग पावे//

ते असे मानतात की, सर्व जग, त्यातील सजीव प्राणी आणि निर्जीव जड वस्तू हे सगळेच विष्णुमय आहे असे जाणावे. एखाद्या दगडाला शेंदूर फासल्याने त्याला देवत्व येते ना? हाच वैष्णवांचा खरा धर्म आहे. भेद, अभेद, वाद

-विवाद म्हणजे भ्रम आहे. भागवत भक्त म्हणजेच भगवंताचे निस्सीम भक्त! तुम्ही हे ऐका आणि स्वहित करून घ्या असे संत तुकाराम कळकळीने सांगत आहेत. कारण ते स्वतः या अवस्थेपर्यंत येऊन पोहोचले आहेत. कोणत्याही जीवाचा मत्सर करू नये, त्यातच सर्वेश्वराचे पूजन आहे. पुढे महाराज सांगत आहेत की, सर्व जीव हे एकाच देहाचे अवयव आहेत, त्यांनी भोगलेली सुखदुःखे सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या जीवालाच भोगावी लागतात. त्यामुळे दुसऱ्याला दिलेला त्रास किंवा त्याचा केलेला मत्सर पर्यायाने एका भगवंताचाच त्रास समजावा. भागवतात केलेला विश्वात्मकाचा उपदेश याहून वेगळा नाही. थोडक्यात सांगायचे तर ईश्वराप्रती स्वतःला वाहून घेण्याची ही कृती आहे.

या अभंगात महाराज स्वतःची मनोवस्था अधिक स्पष्ट करून सांगत आहेत. ते म्हणतात,

नींदी कोणी मारी/ वंदी कोणी पूजा करी//

मज हेही नाही तेही नाही/

वेगळा दोहीपासून//

देह भोग भोगे घडे/ जे जे जोडे ते ते बरे//

अवघे पावे नारायणी/ जनार्दनी तुकयाचे//

तुकाराम महाराजांची कोणी निंदानालस्ती करोत, किंवा कोणी त्यांना मारोत, (शब्दांचा मार)

कोणी त्यांना वंदोत नाही तर त्यांची पूजा करोत, त्यांना कशाचाच फरक पडत नाही. त्यांना त्याचे सुखही नाही किंवा दुःखही नाही. सुखाचे किंवा दुःखाचे सारे भोग दैववशात केवळ देहाला भोगावे लागतात. संत तुकारामांची देहबुद्धी नष्ट झाल्यामुळे जे काही बरे वाईट भोग आहेत ते एका जनार्दनाकडे, नारायणाकडे जातात. नारायणापाशी तुकाराम महाराजांच्या समर्पणाची ही अवस्था आहे.

सकळ चिंतामणी शरीर/

जरी जाय अहंकार समूळ आशा//

निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धी/

निर्मळ स्फटिक जसा//

मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी/

येती तया पासी अवघे जन//

तीर्थासी तीर्थ झाला तोची एक/

मोक्ष तेणे दर्शने//

 मन शुद्ध तया काय करीसी माळा/

 मंडित सकळा भूषणासी//

हरीच्या गुणे गर्जताती सदा/

आनंद तया मानसी//

तन मन धन दिले पुरुषोत्तमा/

आशा नाही कवणाची//

तुका म्हणे तो परिसाहुनी आगळा/

काय महिमा वर्णू त्याची//

या अभंगात तुकाराम महाराज संतांचा महिमा सांगत आहेत. ज्याचा सर्व अहंकार विनाश पावला आहे, निंदा, हिंसा, कपट, देह बुद्धी ज्याच्यामध्ये जराही उरली नाही, तो स्फटिका समान निर्मळ आहे. त्याचे सर्व शरीर जणू चिंतामणी आहे. मोक्ष देणारे तीर्थ काशीला जाण्याची त्याला आवश्यकता नाही. उलट सर्व तीर्थ अशा पुरुषा पाशी येतात. कारण सर्व तीर्थाना पावन करणारा तो स्वतःच एक तीर्थस्थान झाला आहे. त्याच्या दर्शनाने मोक्षप्राप्ती होते. ज्याचे मन शुद्ध आहे त्याला जपमाळ ओढायची काही आवश्यकता नाही. तो स्वतः सर्व भूषण मंडित आहे. जो सतत हरीचे गुणगान करीत नामघोष करतो तो निरंतर आनंदातच असतो. ज्याने आपले तन, मन, धन पुरुषोत्तमाला अर्पण केले आहे, तो परिसापेक्षाही श्रेष्ठ आहे. तुकाराम महाराज हे स्वतः अशाच पुरुषांपैकी एक आहेत, म्हणून तर आपण त्यांना संत तुकाराम असे ओळखतो.

तुकाराम महाराजांना सर्वत्र एक पांडुरंग दिसत आहे. ते म्हणतात—-

दाता नारायण/ स्वयेभोगीता आपण//

आता काय उरले वाचे/ पुढे शब्द बोलायचे//

देखती जे डोळे/ रूप आपुलते खेळे//

तुका म्हणे नाद/ झाला अवघा गोविंद//

सर्व प्राण्यांना सर्वकाही देणारा दाता दुसरा तिसरा कोणी नसून नारायणाच आहे आणि त्यांना मिळालेल्या सर्व वस्तूंचा भोग घेणाराही तोच आहे. याचाच अर्थ असा की तुकाराम स्वतः नारायणमय झाले आहेत आणि त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा भोग ते म्हणजे नारायण घेत आहे. अशा परिस्थितीत मी मिळवले, मी भोगले असे म्हणायला जागाच उरत नाही. जिकडे पहावे तिकडे त्यांना नारायणाचेच रूप दिसते. (या ठिकाणी भक्त प्रल्हादाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.)

नर आणि नारायण यामध्ये भेद असा राहिलेलाच नाही. जेवढा शुद्ध नाद आहे, तेवढा गोविंद झाला आहे.

म्हणून खेळ मांडीयेला ऐसा/

नाही कोणी दिशा वर्जीयली//

माझिया गोते हे वसले सकळ/

न देखी जे मूळ विटाळाचे//

करुनी ओळखी दिली एकसरे/

न देखो दुसरे विषमासी//

तुका म्हणे नाही काळापाशी गोवा/

स्थितीमति देवावाचुनिया//

वरील अभंगात तुकाराम पुन्हा एकदा स्वतःच्या स्थितीविषयी बोलतात. ते म्हणतात, ” मी असा खेळ आरंभला आहे की त्यामध्ये कोणतीही दिशा वगळली नाही. सर्व दिशा शुभ आहेत. पांडुरंग हाच माझे सर्व गणगोत आहे. त्याने सर्व जग व्यापले आहे, त्यामुळे विठ्ठलाचे मूळ जो भेदभाव तो माझ्या ठिकाणी उरलाच नाही. सर्वत्र पांडुरंग ओतप्रोत भरलेला आहे, अशी त्याने स्वतःच्या स्वरूपाची मला ओळख करून दिल्यामुळे मी त्याच्या स्वरूपा वाचून दुसरे काही पाहू शकत नाही. आता माझे मन काळाच्या कल्पनेत सापडलेले नाही की गुंतलेले नाही. मी कालातीत अशा देवाच्या स्थितीमध्येच माझ्या बुद्धीसह एक झालो आहे. “

तुकाराम महाराजांचा देहाभिमान संपूर्ण तया गळून पडला आहे, परब्रम्हाशी ते एकरूप झाले आहेत.

या संदर्भात आणखी काही अभंगांचा परामर्श आपण पुढील लेखात नक्की घेऊ.

क्रमशः… ३१ 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”जिंदगी की किताब..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “जिंदगी की किताब.. ☆ संध्या बेडेकर ☆

आज फिर मैंने जिंदगी की किताब खोली, देखा तो हर पन्ना तेरी रहमतों से भरा पड़ा था।

 काल मी माझ्या एका हिंदी भाषी मैत्रिणीला Mrs Sharma ला फोन केला. आमच्या नोकरीच्या काळात आम्ही बरेच वर्ष म्हणजे जवळपास तीन वर्षे बरोबर होतो. कारण तीन वर्षांपेक्षा जास्त काळ आम्ही कधीच एका ठिकाणी नव्हतो.

तो काळ जरा नाजूकच होता. कारगिल युद्धाचा काळ. आमचे नवरे चार पाच महिने घरी नव्हते. त्यामुळे त्या कठीण काळात एकमेकांना साथ, सहारा, दिलासा आम्ही देत असू. आमची मुल पण जवळपास एकाच वयाची होती. अर्थातच आमचा बॉन्ड मजबूत झाला. कठीण काळातील ती मैत्री आजही टिकून आहे. आता रिटायर्ड होऊनही पंधरा वर्षं व्हायला आलेत.

 ती नेहमी म्हणायची,

 अरे!! STARs सिर्फ आसमान में ही थोडी चमकते हैं। हमारे हजबंड्स के कन्धे पर भी STARS चमकते हैं।

 मी तिला विचारलं,

 कैसे हो.??

तिने दिलेले उत्तर,

सब अच्छा चल रहा हैं।

करीबन करीबन हम सब ठीक हैं। मजेमें हैं। 

 Col. Sharma यांचा एक पाय युद्धात जखमी झाला होता. आणि तो नंतर कापावाच लागला होता.

 Mrs Sharma म्हणजे माझ्यासाठी Power bank आहे. ऊर्जेचा स्त्रोत. तिच्या डिक्शनरीत हारणे, रडणे, निराश होणे, आपल्या नशिबाला कोसणे, दुसऱ्यांना ब्लेम करणे हे शब्द/ असे विचार नाहीतच बहुतेक. ती माझी मैत्रीण म्हणजे माझ्यासाठी अगदी लॉकर मध्ये जपून ठेवण्यासारखा अनमोल ठेवा आहे.

मी नेहमी देवाला या गोष्टी साठी धन्यवाद देते. कारण, काबिल दोस्तों का साथ मिलना भी तकदीर होती हैं। बहुत कम लोगों के हाथों में यह लकीर होती हैं।

माझ्या हातावर ती रेखा छान स्पष्ट, गडद आणि लांबलचक आहे. याचा मला अभिमान आणि समाधान दोन्ही आहे.

 तिच्या काही गोष्टी माझ्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. एखादया वेळी जेंव्हा कधी मी low phase मध्ये असते, तेंव्हा मी Mrs Sharma च्या गोष्टी आठवते. आणि लगेच माझे विचार बदलतात.

ती नेहमी म्हणायची,

अग!! माझ्या आईच्या पोटात जेंव्हा माझा अंकुर फुटला, तेंव्हा पासूनच माझ्या जिंकण्याची सुरवात झाली. तेंव्हाच माझ्या किती तरी करोड स्पर्धकांना हरवून मी बाजी मारली होती. आणि माझा जन्म झाला. मी winning attitude घेऊनच जन्माला आले आहे. मग हरायचा प्रश्नच येत नाही.

अग!! आयुष्य म्हंटल तर स्ट्रगल असणारच. कमी जास्त होणारच. That is Part of life.

हे तर प्रत्येकाच्या बाबतीतच सत्य आहे.

आज Mrs Sharma ने पुन्हा एकदा आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन कसा असावा? याची आठवण करून दिली. किती तरी जून्या गोष्टी आठवल्या.

साधारण दिसणारी, Mrs Sharma branded कपडे घालत नसे. So called आधुनिक दिसणाऱ्या बायकांमध्ये तिच्या कडे कोणाचे लक्ष पण जाणार नाही, असा तिचा appearance होता.. पण तिचे विचार मात्र branded होते / आहेत.

ती नेहमी म्हणायची,

अग!! एखाद्या समस्येचे उत्तर शोधताना आपण पर्याय कोणता निवडतो?? हे नेहमीच महत्वाचे असते.

जेंव्हा एका सैनिकाशी लग्न करायचा निर्णय मी घेतला, तो माझा विचार पुर्वक निर्णय होता, तेंव्हा ज्या agreement वर मी सही केली होती, त्यात भविष्यात होऊ शकणाऱ्या गोष्टी मला माहित होत्या. कोणते प्रसंग माझ्या आयुष्यात येऊ शकतात?? याची पूर्ण कल्पना होती मला.

बर!! त्यानंतर लग्नाच्या वेळेस सात फेरे घेतानाही ‘वचनांचा’ मी अभ्यास केला होता.

अग! देवाची किती मोठी कृपा आहे की Col Sharma आज माझ्या बरोबर आहेत. त्यावेळी तिने दाखविलेले साहस धैर्य अचंभित करणारे होते. कुठे ही रडणे नाही. घाबरणे नाही. तो पिरेड तिच्या करिता नक्कीच कठीण होता. भेटायला येणाऱ्या बायकांना तीच धीर देत होती. त्याही परिस्थितीत युनिटच्या इतर बायकांचे प्रश्न सोडवत होती.

Col. Sharma ना वाईट वाटत होत की या injury मुळे त्यांना पूर्ण युद्ध खेळता आल नाही.

तेंव्हा खरच कोणाला सॅल्युट मारावा?? Col Sharma की Mrs Sharma??

हा प्रश्न फक्त मलाच नाही, तर अनेक जणांना पडला असावा.

मला म्हणाली,

आता पर्यंत अनेक अनुभव आले ग.

म्हणतात ना,

“Experience is the list of mistakes you committed in past life and not to repeat them in future. “

तेच मी नेहमी लक्षात ठेवते.

आता तर मी बऱ्या पैकी शहाणी झाली आहे.

मला म्हणाली,

“Yesterday I was clever. I wanted to change the world. Today I am wise I am changing my self.

आपल्या नशिबात काही गोष्टी नसतातच हे खरय, पण किती तरी, अनेक गोष्टी आपल्या जवळ असतात. हे लक्षात घेतल तर खरच देवाचे किती आभार मानावे?? हेच कळत नाही. वेळोवेळी देवाने दिलेली साथ कळते. प्रत्येकालाच प्रारब्धाला सामोरे जायचेच असते.

मीच का?? मलाच का?? माझ्या नशीबातच का?? हे प्रश्न स्वतः ला किंवा देवाला सुध्दा विचारायचे नसतात.

अग!! मी देवाजवळ रोज एकच गोष्ट म्हणते,

” हे देवा!! माझी बुदधी नेहमी चांगली जागृत राहू दे. योग्य मार्गावर चालण्याची, योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा दे. मी पडूच नये अस माझ म्हणण अजिबात नाही, पण पुन्हा उठायची शक्ती दे.

दिवसातून किती दा तरी मी देवाचे आभार मानते.

मला म्हणाली,

आज फिर मैने जिंदगी की किताब खोली, तो देखा हर पन्ना तेरी रहमतों से भरा पड़ा हैं।

बरोबर आहे.

म्हणतात ना.

It is not happy people who are thankful.

It is thankful people who are always happy.

दि. २६ जुलै.. हा कारगिल विजय दिवस असंतो. (We may not know them all but we owe them all.)

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनोगत रुख्मिणीचे!☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ मनोगत रुख्मिणीचे! ☆ शीला पतकी 

पांडुरंगापुढची लोट गर्दी, पहाटे तीन वाजल्यापासून सुरू झालेली पूजा… रुक्मिणी बाई जरा नाराज झाल्या म्हणाल्या… तीन वाजता कोणी उठून आंघोळ घालता का? यांची झोप अर्धवट होते… लोक या माणसाला(देवाला) झोप घेऊ देत नाहीत… बर झोप नाही ते नाही… आंघोळ तरी काय.. दही घाल… दूध घाल पाणी घाल.. मग पंचाने पूस मग तो पोशाख तो टिळा ते चंदन आणि केवढी मोठी ती तुळशीची माळा… तयार करून उभं करतात झालं…! म्हणजे हे उभेच आहेत! मी तेव्हाच म्हणलं होतं देवाला अहो नको खाली जायला नको खाली जायला पण म्हणाले “अगं अगणित भक्त आहेत आपले खाली त्याना दर्शन नको द्यायला? … आणि खरं सांगू रुक्मिणी मी दर्शन देत नाही ग मी त्यांना पाहतो… “आता या वाक्यावर काय बोलावे या माणसाला… नवरे कधी बायकोच ऐकून घेतोयत…?

खाली आलो तर एका भक्तांना वीट टाकून उभं केलं त्याच्यावर यांना. त्याची मातृ-पितृसेवा संपेना मग तेवढ्याशा विटेवरी उभे. मी म्हणल ऊभरहायला चांगली जागा तरी बघा… ते म्हणाले, ” बाई तू माझ्या फंदात पडू नकोस तू पलीकडे जा आता या विटेला तू वीट समजतेस तो त्याच्या भक्तीचा पाया आहे आणि श्रद्धा आणि विश्वासाच्या सिमेंटनं ती वीट जमिनीवर घट्ट करून ठेवली मी इथून हलू शकत नाही… “. अहो पण 28 युग झाली आपण तिथेच आहात तुम्हाला असे एवढ्याशा विटेवर उभ राहिलेले पाहून मला मोकळ चाकळ हिंडता येते का? ” तर म्हणतात कसे… ” तुझा काय कमी थाट आहे का तुझी सुद्धा पूजा नित्यनियमानं चालली आहे भरगच्च दागिने अंगावर आहेत मला खाऊ पिऊ घालण्याची जबाबदारी नाही स्वयंपाकाची कटकट नाही “मग मी फणकार्यान म्हणाले, ” तुम्हाला नाही कळायचं आम्हाला बायकांना वाटत असतं आपल्या हातून काहीतरी छान करावं आणि आपल्या नवऱ्याला बसून खाऊ घालावं… त्याने मग केलेल्या पदार्थाचं कौतुक करावं… माझ्या नशिबी मेले हे सुख नाहीच रोज परातभर गोड पदार्थाचा तो नैवेद्य कंटाळा येत नाही का हो तुम्हाला खाऊन… कधी मेल तुम्हाला माझ्या हातच खावस वाटतच नाही… “त्यावर म्हणतात कसे, “अगं ते भक्तीभावने एवढं करताय मग आपण नको का खायला? “… “अहो पण मग माझी बायको म्हणून काही भक्ती नाही का? … याना मुळी माझी किंमतच नाही” असं म्हणलं की हसतात फक्त! … मग काय बोलणार आठ दहा दिवस काही बोलायचं नाही..! एवढा मोठा प्रवास करून येणारा तो गरीब बिचारा वारकरी पाहिला की माझं मन द्रवतं मग म्हणतात कसे द्रवतं ना तुझं सुद्धा मन मग झालं तर आपल्या भक्तांसाठी एवढी तोशिश आपल्याला घ्यायलाच पाहिजे.

मला मेलीला एक काम करू लागले नाहीत कधी पण त्या जनीला दळू लागले.. कांडू लागले.. पाणी भरू लागले.. कोणाची तरी गुरं राखू लागले.. त्या सावत्याला येणं जमणार नाही म्हणून त्याच्या शेतावर गेले. दर्शन द्यायला..! हे सगळं जमतं या माणसाला पण बायकोला वेळ देणं अजिबात जमत नाही. म्हणून मी गेले एकदा रुसून आणि जाऊन चिंचबनात बसले… मग मात्र जरा यांचं धाब दणाणल… मग विनवणी केली त्यांनी मला म्हणाले… चल बाई चल शेजारी उभी रहा तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे ग… तुझ्या जीवावर तर मी एवढ्या भक्तांवर प्रेम करतो. भक्तांवरचं त्यांचं प्रेम पाहिलं ना.. लंगडी खुळी पांगळी अतिशय गरीब घरी डोक्यावर छप्पर सुद्धा पुरेसं नाही अशी माणसं खांद्यावर पताका घेऊन यांच्या ओढीने… पायात चप्पल सुद्धा नसते… एवढा रस्ता चालत येतात… ते माझ्या पतीला भेटायला…! आणि मला पटतं माझ्या आधी माझ्या नवऱ्यावर त्यांचा हक्क आहे…! मग म्हणते उभे राहा उभे राहा आणि द्या सगळ्यांना दर्शन…! आशीर्वाद द्या त्यांना… आता तुम्ही त्यांचे बाप झाला की मला आई होण भागच आहे. अर्थात तुमच्यामुळे हे भाग्य मला मिळते याची मला जाणीव आहे अहो रुसले रागवले म्हणून काय झालं आपल्या नवऱ्यावर प्रेम करणारी जगातली इतकी अफाट माणसं आहेत हे पाहून कोणत्याही बाईला अभिमानच वाटतो… पण देवा मी पण तुमची भक्त असं समजून मला थोडा वेळ द्या एवढी बायको म्हणून विनंती आहे तुम्हाला…! ऐकेल ना अहो ऐका ना…!

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतीय सैनिकांचा बंधुभाव… जगावेगळा! – भाग – 1 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतीय सैनिकांचा बंधुभाव… जगावेगळा! – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके 

सातवी इयत्तेत असतानाच त्याने मनात पक्के ठरवले… फौजेतच जायचं. त्यासाठी शारीरिक क्षमता उच्च दर्जाच्या लागतात, हे समजल्यावर तर रोज व्यायामाचा धडाका सुरु केला! गावातले अनेक तरुण फौजेत होतेच. त्यांच्या पावलांवर पाऊल टाकायचे होते.

१९९९ मध्ये भारत-पाक कारगिल युद्ध झाले आणि त्यानंतर भारतीय सैन्यात मोठ्या प्रमाणात सैन्यभरती सुरु झाली. इथवर त्याच्या वयाची सोळा वर्षे पूर्ण झाली होती. घरून वडिलांचे प्रोत्साहन होतेच. वडील तो भरतीसाठी निघाला की त्याच्या हातावर दोन हजार रुपये ठेवीत. आणि हरियाणाच्या बाहेरच्या राज्यात भरती असली की पाच हजार. पण ते वयच काहीसे अल्लड होते. बंगळूरु येथे होणार असलेल्या भरतीसाठी गेलेला असताना हा पठ्ठ्या चक्क सिनेमागृहात जाऊन बसला आणि एकाच चित्रपटाचे सलग तीन खेळ पाहून आला… तोवर इकडे भरतीसाठी त्याचे मित्र गेटच्या आत दाखल झालेले होते… याला काही प्रवेश मिळाला नाही! पण या लष्करी केंद्रावर त्याने PARA SF चे जवान पाहिले… त्यांचा रुबाब पाहिला आणि मग बस्स… आयुष्यात असाच गणवेश पाहिजे… असा प्रण केला.

पुढच्याच महिन्यात अजयकुमार भारतीय सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले! प्रशिक्षणादरम्यान एक पाय मोडला… बरं होण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि प्रशिक्षण पूर्ण केलेच. आणि काहीच कालावधीत त्यांनी त्यांचे PARA COMMANDO बनण्याचे स्वप्न पूर्ण केले! ही फार मोठी झेप होती!

अजयकुमार यांचा स्वभावच जणू free style. संथ आयुष्य त्यांना आवडतच नसे. सुदैवाने त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये नेमणूक मिळाली आणि एका बहादूर सैनिकाची कारकीर्द सुरु झाली! बर्फाळ प्रदेशात प्रचंड आव्हानात्मक प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर अजयकुमार अतिरेक्यांशी लढण्यासाठी सज्ज झाले होते.

सैनिकी दल कोणत्याही मोहिमेवर निघताना त्या दलाचा वाटाड्या ही मोठी जबाबदारी असते. अजयकुमार आणि महाराष्ट्राचे प्रवीण पाटील हे कमांडो स्काउटच्या कामासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत!

खांद्यावर एम. एम. जी. , अंगावर पस्तीस किलो युद्ध साहित्य घेऊन मैलोनमैल चालण्याची सवय करून घ्यावी लागली!

दहा अतिरेकी, त्यांचे पाच कमांडर, असे एकूण पंधरा जण होते. त्यांच्या मागावर जाण्याचे आदेश मिळाले. या पहिल्याच मोहिमेत दोन अतिरेक्यांना टिपण्याची संधी मिळाली! काही वर्षांत सात मोहिमा यशस्वीरीत्या पार पाडल्या… एकूण तीस-पस्तीस अतिरेक्यांना यमसदनी धाडण्यात सहभागी होता आले! दोन दिवसाची मोहीम असताना त्याच ठिकाणी नाऊ दिवस थांबावे लागले. जवळचे अन्न संपल्यावर झाडाची पाने, वनस्पती खाऊन दिवस काढले! आणि तीन अतिरेकी टिपले!

पुढे पुढे तर परिस्थिती अशी होती की, ‘ऑपरेशन’ मिला मतलब भगवान मिल गया! म्हणजे सातत्याने अतिरेकी विरोधी कारवाया आपल्याला करायला मिळाव्यात, देशाचे शत्रू आपल्या हातून मारले जावेत.. अशी सैनिकांची आंतरीक इच्छा असे!

हवालदार अजयकुमार सिंग यांची ही सैनिकी वाटचाल सुरु होती. जवळजवळ सात-आठ वेळा ते मृत्यूला हुलकावणी देऊन परत आले होते. आणि एके दिवशी….

देखण्या, तरण्याबांड मुलाचा नडगीखालून तुटलेला पाय पाहून ती माऊली जागेवरच मूर्च्छा येऊन कोसळली! बापाची प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वीच देऊन झाली होती… त्यामुळे आज तो शांत होता आणि सुनेकडे पहात होता. सारं घर सुन्न होऊन स्तब्ध होऊन बसलं होतं. प्रत्येकाच्या मनातला प्रश्न निराळा होता….!

खरं तर आपला लेक ज्या नोकरीत आहे, त्या नोकरीत हे असं काही घडणं साहजिकच होतं, हे आई-वडील, पत्नीला ठाऊक होतंच. त्यांच्या गावात, आसपासच्या परिसरात, नात्यांत असे अनेक तरुण त्यांनी पाहिले होतेच… आणि त्यांच्या गावात दोन पुतळेही उभारलेले होते… युद्धात कामी आलेल्या सैनिकांचे!

“बेटा, तू जिंदा लौट आया… यही मेरे लिये बहुत है! इस बुढे बाप में इतनी तो ताकद है की तुम्हें बिठा के खिला सकुं… जब तक मेरी जान में जान होगी तब तक! ” म्हाताऱ्याने बोलता बोलता त्याचा इरादा आणि मर्यादा सांगून टाकल्या आणि दुसरीकडे पहात डोळे पुसून घेतले!

हे शब्द ऐकताच मरणालाही न भिणारा तो बहादूर तरुण मनातून थरथरला… आणि दुसऱ्याच क्षणी पेटून उठला! परावलंबित्व आणि तेही म्हाताऱ्या आई-वडिलांवर? एक पाय नसला म्हणून काय झालं….. दुसरा पाय, दोन हात आणि एक काळीज तर आहे शाबूत!

आणि हा काही त्याला आताच यावेळी सुचलेला विचार नव्हता…. ज्यावेळी पाय तुटून पडलेला पाहिला… त्याचवेळी जीव बचावल्याचे समाधान होतेच… म्हणजे आणखी काही शत्रू यमसदनी पाठवण्याची संधी! आणि उर्वरीत शरीर आणि मुख्य म्हणजे मेंदू शाबूत राहिला याचेच कौतुक जास्त होते त्याच्या मनात!

बारा विशेष सैनिकांची एक तुकडी शत्रूसाठी अगदी सीमेनजीक सापळा रचून बसली होती सात-आठ दिवस. पण हाती काही लागले नाही… शिकारीला जाऊन काहीच न मिळणं ही किती निराशाजनक गोष्ट असते.. हे कसलेल्या शिकाऱ्यांनाच समजू शकते.

मग तळावर परतण्याचा आदेश प्राप्त झाला. तळपायांना आलेले मोठमोठे फोड, सुजलेली बोटं, भिजलेली शरीरं घेऊन हे शूर माघारी फिरले जड पायांनी. आठ दिवसांनी पूर्ण ताटभर अन्न मिळणार होतं. पहिला घास तोंडात घातला आणि खबर आली…. शिकार टप्प्यात आलेली आहे… मारली पाहिजे!

आता हे बारा जण तर तिथून सुट्टी मिळून शांत क्षेत्रात आरामासाठी जायचे होते… पण ते दुसऱ्या दिवशी. म्हणजे नियमानुसार आज ते मोहिमेवर जाऊच शकत होते. मोठ्या साहेबांनी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करून पाहिला… पण त्यांना मनातून ठाऊक होतं…. ही पोरं आता काही थांबणार नव्हती! ‘ऑपरेशन मिल गया… समझो भगवान मिल गया’ अशी यांची धारणा असते! आपण किती अतिरेकी शोधून मारले या संख्येचा सैनिकांना मोठा अभिमान असतो!

“चलो, फटाफट! ” म्हणत अगदी काहीच मिनिटांत दल सज्ज झाले! सोबत घ्यायचे अन्न वजनाने हलके आणि शस्त्रं जड निवडण्यात आली. दोन दिवसांची पायपीट करायची होती. पाकिस्तानी सीमेच्या अगदी नाकाजवळ जाऊन कारवाई करायची होती. या आधीही यांनी अनेक शिकारी केल्या होत्या, आणि तिथल्या कार्यकालात हा स्कोअर आणखी वाढवूनच सुट्टीवर जाण्याचा सर्वांचा निश्चय होता.

सीमेवर काही ठिकाणी तिथल्या भौगोलिक रचनेनुसार भारत-पाक सीमाचौक्यांतले अंतर काही ठिकाणी खूपच जास्त तर काही ठिकाणी खूपच कमी आहे. त्यामुळे काही सैन्यचौक्या आणि त्यांतील माणसं उघड्या डोळ्यांनी स्पष्ट दिसतात. त्यांचे बोलणेही ऐकू येते! त्यामुळे इथे डोळ्यांत अधिक तेल घालावे लागते. भारताच्या चौक्यांत किती माणसे आहेत, ते किती जागरूक आहेत, याचा अंदाज पाकिस्तान सैन्य नेहमीच घेत असते.

पाकिस्तानला भारताच्या हद्दीत अतिरेकी घुसवायचे होते तिथून. कारण त्यांना वाटत होते की, त्यांच्या समोर असलेली चौकी फारशी जागरूक नाही! काही ठिकाणी तर चक्क बनावट चौकी असते… म्हणजे केवळ सांगाडा असतो… तिथे कोणीही नसते… आणि हे दोन्ही बाजूंचे सैनिक करीत असतात! म्हणून ते रात्रीच्या काळोखात सलग तीन दिवस अगदी जवळ येऊन त्या चौकीवर दगड मारून पहात होते… अंदाज घेत होते… आणि आपण काही कारवाई करण्याच्या आत त्यांच्या सीमेत पळून जात होते. ते तीनदा आले म्हणजे पुन्हा एकदा कधीतरी येतीलच, अशी आपल्या अधिकाऱ्यांची खात्री होती!

आपले सैन्यपथक रात्रीच्या अंधारात पाकिस्तानी सीमेच्या अगदी हाकेच्या अंतरावर जाऊन लपून बसले. दिवसा अजिबात हालचाली करता येत नाहीत. चिखल, पाऊस, थंडी.. एकाजागी शांत बसून राहायचे, आणि रात्र पडली की शत्रूच्या वाटेकडे डोळे लावून बसायचे. खाद्यपदार्थ शिजवायचे नाहीत… कारण वास जाईल त्यांना. मग कच्ची मॅगी चावून खायची… सोबतीला काजू, बदाम असले तर उत्तमच.. अन्यथा खाणे हा उपक्रम अगदीच अनिवार्य असतो म्हणून करायचा… खरं ध्येय एकच… शत्रूच्या नरडीचा घोट घेणे!

शत्रूला इथून यायचे असेल तर एकच सोयीची वाट होती. एका उथळ ओढ्यातून येणारी. त्यांच्या उजव्या बाजूला उंच डोंगर होता आणि डाव्या बाजूला खोल दरी. आपले सैनिक आपल्या सैन्यचौकीच्या खालच्या बाजूला जाऊन बसलेले होते. एका तुकडीचे तीन गट केले गेले. अतिरेकी आलेच तर त्यांना पाकिस्तानी बाजूला असलेल्या सगळ्यात शेवटच्या तुकडीने पुढे जाऊ द्यायचे. मधल्या तुकडीने त्यांच्यावर हल्ला चढवायचा आणि त्यातून ते मागे फिरले तर मागची तुकडी आहेच आणि पुढे निसटून गेले तर पुढेही आपली माणसं सज्ज बसलेली असतीलच!

सीमेवर दोन्ही सैन्यांनी भूसुरुंग पेरून ठेवलेले असतातच. पण ज्या अर्थी ते लोक आपल्या चौकीपर्यंत येत होते म्हणजे त्या रस्त्यावर भूसुरुंग नसलेली जागा त्यांनी शोधून ठेवल्या असाव्यात. आता त्याच रस्त्यावर सुरुंग पेरून ठेवणे गरजेचे होते. पण खोदून भूसुरुंग लावणे धोक्याचे होते. त्यासाठी लांब केबल असलेला आणि लांबून कार्यान्वित करण्याजोगा सुरुंग लावण्याची योजना झाली. हे सुरुंग अंधार पडल्यावर लावायचे… आणि सकाळी लवकर काढून घेऊन यायचे असे ठरले. कारण दिवसा त्याचा काही उपयोग नव्हता. शत्रू आला तर डोळ्यांनी दिसणारच होता!

हे काम सतत सहा दिवस झाले. गेल्या दिवसांत सलग तीन रात्री येऊन गेलेला शत्रू या सहा दिवसांत एकदाही आला नाही! हे वाट पाहणे किती जीवघेणे असेल, याची कल्पना करता येणार नाही!

अजय सिंग यांच्याकडे सुरुंग लावण्याचे काम सोपवले गेले होते… कारण या कामात ते अगदी कुशल झालेले होते. इतक्या वर्षांचा अनुभव पाठीशी होता. पण यादिवशी काही वेगळेच घडत होते. सुरुंग लावायला निघालेल्या अजयकुमार यांना त्यांच्या साहेबांनी दोन वेळा थांबवले होते… पहिल्या वेळी “अजून अंधार व्हायचा आहे! ” म्हणून दुसऱ्या वेळी “काहीतरी खाऊन जा! ” असं सांगत.

शेवटी त्या रात्री अजय सिंग पुढे निघाले. सोबत सहकारी होताच. सुरुंग लावायच्या जागेजवळ पोहोचले तेवढ्यात त्यांच्या सहकाऱ्याने त्यांना जोरदार लाथ मारून दूर ढकलून दिले. अजय सिंग यांचा पाय एका वायरवर पडणारच होता तेवढ्यात सहकाऱ्याने पाहिले. त्या वायरचे दुसरे टोक पालापाचोळ्यात लपवून नेत एका झाडाच्या फांदीवर एका मिठाईच्या डब्यात पोहोचवले गेले होते. पाकिस्तानात बनवलेल्या गुलाबजामूनचा डबा होता. त्यात एक किलो स्फोटके भरलेली होती! दोघांनी मिळून ती स्फोटके निकामी केली.

आता अजय सिंग क्लेमोर नावाचा सुरुंग लावायला सज्ज झाले. हा सुरुंग शत्रूच्या बाजूला त्यातून उडालेली स्फोटके जातील अशा रचनेचा असतो, आणि त्याला दूर अंतरावरून कार्यान्वित करता येते. अजय सिंग यांनी याही वेळी अचूक क्लेमोर लावला आणि ते माघारी आले.

ती रात्र काहीही न घडता उलटून गेली. आता मात्र खूप कंटाळा आला होता सर्वांना! आज शनिवार. मागे झालेली चकमक शनिवारीच झाली होती. म्हणजे बजरंग बलींच्या आशीर्वादाने आज निश्चित contact होगा! अशी सर्वांचीच खात्री होती.

आजचीच रात्र इथे थांबायचे ठरले. नाहीतर उद्यापासून मोहिम थांबवण्याचे आदेश प्राप्त झालेले होते. सायंकाळचा सूर्य बुडाला आणि इकडे सर्वांनी मोहिमेवर निघायची पुरती तयारी केली. याजागी पुन्हा यायचे नाही, त्यामुळे मागे कोणत्याही खुणा राहता कामा नयेत, याची व्यवस्था केली.

अजय सिंग क्लेमोर लावण्याच्या ठिकाणाकडे दबकत निघाले. अजय सिंग यांना आज स्फोटक लावण्याची जागा काहीशी निराळी भासली. त्यांनी लावलेला डेटोनेटर तिथून हलवला गेल्याचा संशय आला. कदाचित सहकारी सैनिकाने चुकून तसे केले असावे असे क्षणभर त्यांना वाटले.

अजय सिंग गुडघ्यात वाकून खाली बसलेले होते. त्यांच्या शेजारी असलेल्या एका झाडाचे जमिनीवर आलेले एक जाडसर मूळ अगदी जवळच होते… आणि एक जोरदार स्फोट झाला…!

अजय सिंग यांच्या पायांखाली शत्रूने पेरून ठेवलेल्या भूसुरुंगाचा भयावह स्फोट झाला. झाडाच्या जमिनीवर आलेल्या मुळाने बरेचसे स्फोटक अडवले होते पण तरीही अजय सिंग यांचा उजवा पाय घोट्याच्या थोडासा वर तुटून दूर जाऊन पडला..! आणि हा स्फोट झाल्या झाल्या गोळीचा आवाजही कानी पडला. याचाच अर्थ शत्रू जवळच दडून बसला आहे….! आता इथून निसटून मागे जायला पाहिजे.. अन्यथा संपूर्ण पथकाचा जीव धोक्यात निश्चित येणार!

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares