मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पाशवी ?” ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

??

☆ “पाशवी ?” ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

अमानवी, अमानुष किंवा पाशवी हे शब्द अनेकदा माणसांनी केलेल्या कृत्यांसाठी वापरले जातात. बऱ्याच काळापासून ते शब्द मला खटकत आले आहेत. विशेषतः ‘पाशवी’ हा शब्द तर फारच त्रास देतो. ते शब्द अप्रस्तुत वाटण्यामागे माझी काही कारणेही आहेत.

आज त्याबद्दल लिहावेसे वाटण्यासाठी तात्कालिक कारण म्हणावे, तर नुकतीच घडलेली एक घटना वाचनात आली.

पण मुळात, ते शब्द मला का खटकतात? 

मनुष्यप्राण्याच्या हातून घडणाऱ्या काही कृत्यांच्या संदर्भात हे शब्द सर्रास वापरले जातात. उदाहरणार्थ, कुठेतरी कौटुंबिक वादामुळे, किंवा व्यावसायिक शत्रुत्वातून उद्भवलेल्या कडाक्याच्या भांडणानंतर एका गटाचे लोक दुसऱ्या गटातल्या निरपराध व्यक्तींनाही जीवे मारतात. अशा घटनेनंतर ‘अमानुष नरसंहार’ अशा मथळ्याखाली ती बातमी छापून येते.

बलात्काराच्या घटनांमध्येही अमानवी, पाशवी अशी विशेषणे नेहमी वाचनात येतात. पुण्याजवळ नसरापूर येथे नुकत्याच घडलेल्या एका घटनेचेही वृत्तांकन करताना, ‘पाशवी अत्याचार’, ‘माणुसकीला काळिमा’ अशी विशेषणे वाचनात आली.

एका बाबतीत कोणाचेही दुमत असणार नाही की, मी उदाहरणादाखल दिलेल्या सर्वच घटना निंदनीय आहेत, आणि कोणाच्याही हातून कुठेही त्या घडल्या तरी मनात चीड उत्पन्न होतेच. अगदी दूर कुठेतरी युरोपीय देशांमधल्या ज्यू-धर्मियांवर, ८०-८५ वर्षांपूर्वी हिटलरच्या सैन्याने केलेल्या अत्याचारांबद्दल आपल्याला आजही घृणाच वाटते.

आपण या अत्याचारांसाठी ‘अमानवी’ हा शब्द जेंव्हा वापरतो तेंव्हा त्या शब्दात असाही अर्थ गर्भित असतो का, की मानवजातीच्या प्राण्यांच्या हातून अपेक्षित नसली तरी, इतर जातीच्या प्राण्यांकडून तशी कृत्ये घडू शकतात? माझा नेमका आक्षेप त्याच गर्भित अर्थाला आहे. ‘पाशवी’ हा शब्द वापरताना तर तो अर्थ गर्भितदेखील नसतो. आपण सरळ-सरळ असेच म्हणत असतो की ते कृत्य पशूकडून घडले तर काही नवल नाही!

पण हे तर सर्वमान्य आहे की कधीकधी एखादा प्राणी किंवा पक्षी, निव्वळ भीतीपोटी आणि स्वसंरक्षणार्थ दुसऱ्या प्राण्या-पक्ष्यावर हल्ला करतो. तसेच एखाद्या पशूला जर भूक लागली तर आणि तरच तो दुसऱ्या प्राण्याची हत्या करून आपली भूक भागवतो. पण त्यातदेखील एक विलक्षण सत्य दडलेले आहे. सर्वसाधारणपणे, कितीही भूक लागलेली असली तरी पशू भक्ष्य शोधत रानोमाळ हिंडतो, पण सहसा आपल्या जातीच्या प्राण्याला मारून खात नाही. अपवादात्मक परिस्थितीत कदाचित तसेही घडतही असेल.

त्याचप्रमाणे, लैंगिक भूक भागवण्यासाठी एखाद्या पशूने बलात्कार केल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही. त्यासाठीही पशूजातीतल्या नराकडून मादीची, किंवा मादीकडून नराची मनधरणी केली जाते आणि त्यानंतरच त्यांचा समागम होतो असे मी ऐकले-वाचले-पाहिले आहे.

परंतु, मनुष्य हा एकमेव प्राणी असेल जो भुकेपोटी नव्हे तर इतर भावनांच्या प्रभावाखाली चोरी, दरोडे किंवा हत्या करतो. केवळ मनुष्यप्राणीच आपली लैंगिक भूक भागवण्यासाठी बलात्कार करतो. मग त्याच्या कृत्यांना ‘पाशवी’ म्हणणे कितपत सयुक्तिक आहे?

आता, हे सगळे विचार आजच लिहावेसे मला का वाटले?

… आजच वर्तमानपत्रात फोटोसह आलेली एक बातमी वाचली. गुजरातमध्ये पालिताना तालुक्यातल्या गरजिया नावाच्या गावी, काळू परमार नावाचा एक माणूस गुरे चारण्यासाठी रानात गेला होता. अचानक एका सिंहिणीने त्याच्यावर झेप घेऊन त्याला खाली पाडले. त्यानंतर ती सिंहीण त्या माणसाच्या पायावर आपले वजन ठेवून बसून राहिली. त्याच्या नरडीचा घोट ती अगदी सहज घेऊ शकली असती. पण तिने तसे केले नाही. त्या बिचाऱ्या माणसाला फारसे काहीच करता येत नव्हते. पण तिथे जमलेल्या गावकऱ्यांनी दगड मारून त्या सिंहिणीला पळवून लावायचे प्रयत्न सुरु ठेवले. बऱ्याच प्रयत्नांती, ती सिंहीण उठून रानात पळून गेली आणि काळू परमारचा जीव वाचला.

अधिक माहिती अशी समोर आली की त्या सिंहिणीने नुकतीच एक शिकार केलेली होती. कदाचित ती भुकेजलेली नसेलच. आणि म्हणूनच तिने काळूला जीवे मारले नाही!

आता या घटनेला लोक असेही म्हणण्याची शक्यता आहे की, “त्या सिंहिणीने काळूला जिवंत सोडून अक्षरशः ‘माणुसकी’ चा प्रत्यय दिला!”

खरे पाहता, इतकेच म्हणता येईल की त्या सिंहिणीने केवळ ‘पशुधर्म’ पाळला !

 

© कर्नल आनंद बापट ( निवृत्त ) 

 मो  9422870294

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७३ आणि ७४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७३ आणि ७४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ७३ – – 

देहेदंडणेचे महा दुःख आहे।

महादुःख ते नाम घेता न राहे।

सदाशिव चिंतीतसे देव देवा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।। ७३।।

अर्थ : देहाला कष्ट दिल्याने मोठया यातना होतात. परंतु रामनाम घेतल्याने या यातना राहत नाहीत. प्रत्यक्ष भगवान शंकर देखील देवाधिदेव म्हणजेच श्रीरामाचे चिंतन करतात. अशा श्रीरामाचे प्रभात समयी आपण चिंतन करावे.

(देहेदंडणे – देहाला कष्ट/यातना देणे )

विवेचन : अनेक लोक परमेश्वर प्राप्तीसाठी उपासतापास, नवस, तीर्थयात्रा आदी गोष्टी करतात. या सगळ्या गोष्टींनी देहाला कष्ट होतात. त्याच्या यातना किंवा दुःख भयंकर असते. सर्वांनाच या गोष्टी शक्य होतील असेही नाही. नर्मदा परिक्रमा करणे अतिशय पुण्यप्रद मानले जाते. परंतु सर्वांनाच ते शक्य होईल अशातला भाग नाही. बद्रीनाथ, केदारनाथ ही अत्यंत पवित्र धामे आहेत. पण जर शारीरिक क्षमता नसेल तर त्यांची यात्रा करणे कठीण होते. देहाला त्रास देणारी होते. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी तप:साधना करीत असत. त्यासाठी एकांतात जाऊन बारा बारा वर्षे तपश्चर्या करीत. कोणी एका पायावर उभे राहून तप करीत असे तर कोणी नदीच्या पाण्यात उभे राहून. असे अनेक प्रकार होते. या सगळ्या गोष्टींचा उद्देश देहाबद्दलची आसक्ती नाहीशी व्हावी आणि परमेश्वर प्राप्तीकडे मनाचा कल व्हावा असा असायचा. परंतु देहाला एवढे कष्ट देऊन सर्वांनाच परमेश्वर प्राप्ती होईल अशी शाश्वती नव्हती. शिवाय काही कारणाने तप करणे मध्येच थांबले तर सर्वच व्यर्थ जायचे.

परंतु नामसाधनेत असे कष्ट देहाला पडत नाहीत. नामसाधना सोपी आहे. तुकाराम महाराज देखील सांगतात, “नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. “मग एवढे सोपे साधन सोडून देहाला ताडन करणारी इतर साधने का अवलंबावीत ?

या संसारात देखील मानवी देहाला अनेक प्रकारचे कष्ट होतात. नानाविध त्रासांना सामोरे जावे लागते. प्रारब्धाने वाट्याला आलेले दुःख भोगावेच लागते. या सगळ्या गोष्टीत शरीराला प्रचंड त्रास होतो. आपण म्हणतो की कोणी कोणाचे दुखणे वाटून घेऊ शकत नाही. हे खरेच आहे. प्रारब्धाने आलेले दुःख ज्याचे त्यालाच भोगावे लागते. पण सगळ्या परिस्थितीत रामनाम औषधाचे काम करते. देहाला वेदना होतील पण रामनामामुळे तो त्रास मनापर्यंत पोहोचत नाही. देहाच्या दुःखावर इतर औषधे तात्पुरती काम करतात पण रामनाम त्यावर मात करण्याची शक्ती देते. मात्र ते औषध नियमितपणे घोट घोट पोटात जायला हवे.

रामनामाचे इतके महत्व समर्थ पुन्हा पुन्हा सांगत आहेत. एखाद्याला एखादी गोष्ट सांगून, समजावूनही पटली नाही तर त्याला एखाद्या मोठया व्यक्तीचे उदाहरण देऊन समजवावे लागते. समर्थ म्हणतात, ” हे मना, अरे तुला किती आणि काय सांगू ? प्रत्यक्ष योगियांचा राणा असलेले भगवान शंकर देखील श्रीरामाचा जप करतात. त्याचेच चिंतन करतात. मग तुला करायला काय हरकत आहे ?” श्रीराम हे देवांचे देव आहेत. त्यांनीच देवांना रावणाच्या बंदिवासातून सोडवले आहे. आदी आणि अंत तेच आहेत. तेव्हा हे मना, प्रभात समयी रामाचे चिंतन कर.

स्वसंवाद :: 

१. मी परमेश्वर प्राप्तीसाठी किंवा समाधानासाठी केवळ बाह्य कष्टांचे (उपासतापास, कठीण व्रतवैकल्ये) अवडंबर माजवत आहे का?

२. जेव्हा शारीरिक किंवा मानसिक व्याधींमुळे माझ्या देहाला ‘दुःख’ होते, तेव्हा मी निराश होतो की रामनामरूपी औषधाचा आश्रय घेतो?

३. “कोणी कोणाचे दुखणे वाटून घेऊ शकत नाही” हे त्रिकालाबाधित सत्य स्वीकारून, मी माझ्या मनाला नामस्मरणाने खंबीर बनवले आहे का?

४. जर प्रत्यक्ष भगवान शंकर (देवाधिदेव) निरंतर रामनामाचे चिंतन करतात, तर मग संसारी असलेल्या माझ्या मनाला नामस्मरणाचा संकोच का वाटावा?

============== 

श्लोक क्र. ७४ – – 

बहुतांपरी संकटे साधनाची।

व्रते दान उद्यापने ते धनाची।

दिनाचा दयाळू मनी आठवावा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।। ७४।।

अर्थ : परमेश्वर प्राप्तीच्या साधनांमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात. व्रते, दानधर्म, उद्यापन करणे या गोष्टींसाठी गाठीशी पैसा लागतो. परंतु दिनांसाठी दयाळू असणाऱ्या भगवंताला आठवण्यासाठी यापैकी कशाची जरुरी नाही. म्हणून अशा या भगवंताचे पहाटेच्या सुमारास चिंतन करावे.

(बहुतांपरी – अनेक प्रकारचे, साधनांची – ईश्वर प्राप्तीच्या विविध मार्गांची, उद्यापन – एखाद्या व्रताच्या अखेरीस केलेला धार्मिक विधी )

विवेचन : ईश्वरप्राप्तीचे अनेकविध मार्ग आहेत. त्यासाठी कोणी व्रतवैकल्ये करतो, कोणी एखादे अनुष्ठान करतो, तर कोणी दानधर्माचा मार्ग अनुसरतो. आपण कोणता मार्ग निवडायचा याचे स्वातंत्र्य अर्थातच साधकाला असते. तरी समर्थ या मार्गातील धोके आणि अडचणी आपल्या निदर्शनास आणून देतात. या सगळ्या गोष्टींसाठी धनाची जरुरी असते. व्रत करायचे म्हटले तर काही तरी नियम आलाच. त्यानुसार शरीराला पडणारे कष्टही आले. शिवाय व्रताचे काही नियम असतात. त्यांचे व्यवस्थित पालन झाले पाहिजे. व्रत व्यवस्थित पूर्ण झाल्यानंतर त्याची विधिपूर्वक सांगता करावी लागते. त्यासाठी पुरोहितांना बोलावून धार्मिक विधी, दानधर्म, दक्षिणा आदी गोष्टी कराव्या लागतात.

व्रत, दानधर्म आणि उद्यापने या गोष्टी करायच्या तर पैशाची व्यवस्था आधी करावी लागते. बरे, या सगळ्या गोष्टी म्हणजे परमेश्वर प्राप्तीसाठीचे बाह्य मार्ग झाले. हे सगळे करीत असताना माणूस यातच गुंतून पडतो. परमेश्वर प्राप्तीसाठी अंतर्मुख होण्याची आवश्यकता असते. तो आपल्या अंतर्यामीच वसलेला असतो. सगळे लोक व्रतवैकल्ये, उद्यापन सोहळे, दानधर्म आदी गोष्टी समारंभपूर्वक करतात म्हणून आपल्यालाही असे करायलाच हवे नाहीतर लोक काय म्हणतील अशी भीती सामान्य माणसाच्या मनात असते. बऱ्याच वेळा मग इतरांना दाखवण्यासाठी देखील असे विधी मोठे समारंभपूर्वक करावे लागतात. यात आर्थिक आणि मानसिक कुतरओढ होते ती सर्वसामान्य माणसाची. त्याचा गोंधळ होतो. नेमके काय करावे ते कळत नाही. सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. पण परमेश्वर यापैकी कुठल्याच गोष्टीची अपेक्षा तुमच्याकडून करत नाही.

समर्थांसारख्या संतांना या गोष्टीची अचूक जाणीव असते. समर्थांच्या काळात तर सामान्य माणूस जपतप, अनुष्ठान, व्रते, उद्यापने यासारख्या कर्मकांडात अडकून पडला होता. तो बहिर्मुख झाला होता. त्याला अंतर्मुख करणे आवश्यक होते. समर्थांसारखे सद्गुरू लोककल्याणाचा कळवळा असल्यानेच नामस्मरणासारखा सोपा मार्ग सांगत आहेत. परमेश्वर हा अत्यंत दयाळू आहे. त्याची दीन होऊन म्हणजेच आर्ततेने भक्ती केली, तर तो आपल्या दासांवर कृपा करतो. ‘ नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ‘ असे समर्थांनी सांगितलेच आहे. आपणही तो मार्ग अनुसरावा. दीनांचा दयाळू असलेल्या भगवंताला मनी आठवावे. त्याचे रूपगुण अंतरी साठवावे. अशा या भगवंताचे प्रभात समयी चिंतन करावे. संत एकनाथ महाराज म्हणतात, ” आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. “

स्वसंवाद :: 

१. मी करत असलेल्या धार्मिक गोष्टी (व्रतवैकल्ये किंवा पूजा) केवळ ‘इतरांना दाखवण्यासाठी’ किंवा एक सामाजिक प्रथा म्हणून करत आहे का?

२. भगवंत माझ्या अंतर्यामीच आहे हे ठाऊक असूनही, मी त्याला शोधण्यासाठी बाह्य कर्मकांडात आणि सण-समारंभांच्या अवडंबरातच गुंतून पडलो आहे का?

३. जेव्हा माझ्याकडे आर्थिक मर्यादा असतात, तेव्हा मी देवाचा कोप होईल या भीतीने व्याकुळ होतो, की “तो दीनांचा दयाळू आहे” या भावनेने त्याला आर्ततेने साद घालतो?

४. संत एकनाथ महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, मी सर्व चिंता त्या लक्ष्मीपतीवर सोडून देऊन कधी ‘आवडीने आणि भक्तीभावाने’ केवळ नामस्मरण केले आहे का?

– क्रमशः श्लोक ७३ आणि ७४

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ || वारीतला शिरा आणि डोळ्यातलं पाणी || ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? इंद्रधनुष्य ?

|| वारीतला शिरा आणि डोळ्यातलं पाणी || ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

– – – एक मनाला भिडणारा प्रसंग

|| वारीत खाणं-पिणंमजा नाही… वाटणंमजा आहे ||

|| एक घास पोट भरतो… एक घास मन भरतो ||

|| सत्य प्रसंग: सासवड ते जेजुरी – वारी 2023 ||

|| श्री स्वामी समर्थ || श्री विठ्ठल रखुमाई || 

——— 

|| 5 किलो शिरा आणि 5 लाखांचं समाधान ||

*

आषाढी वारी 2023. सासवडचा मुक्काम.  

लाखो वारकरी. टेंट, पालं, भजनाचा गजर.  

रात्री 8 वाजता अन्नछत्रात जेवणाची पंगत.  

*

पुण्याचा एक तरुण – नाव ऋषी‘. वय 28. IT कंपनीत.  

पॅकेज 25 लाख. पहिल्यांदाच वारीला. ‘Reel’ बनवायला आला होता.  

GoPro, iPhone, गॉगल. “Wari Vlog” प्लॅन.  

 

जेवणाच्या रांगेत उभा. पानात पडलं – भात, आमटी, एक शिरा.  

ऋषीने व्हिडिओ सुरू केला – “Guys, बघा वारीचं जेवण. Simple पण Soulful. ”

शिरा उचलला. कॅमेरासमोर ‘Yummy’ म्हणणार…

 

तेवढ्यात बाजूच्या पानावरून आवाज – “आई ग…”

वळून बघितलं. 7-8 वर्षांचा पोरगा. नाव ‘सखाराम’.  

मळकट कपडे. केस विस्कटलेले. डोळे मोठे.  

त्याच्या पानात फक्त भात-आमटी. शिरा संपला होता.  

 

वाढणारा काका म्हणाला – “माफ करा बाळा. शिरा संपला. उद्या नक्की. “

सखारामच्या डोळ्यात पाणी. हळूच म्हणाला – “काका, मी 3 दिवसापासून गोड खाल्लं नाही. आई म्हणाली होती – वारीत ‘बुंदीचा लाडू’ मिळतो. तो नाही मिळाला… शिरा तरी…”

 

ऋषीने ऐकलं. GoPro बंद केला.  

क्षणभर विचार केला. मग स्वतःच्या पानातला ‘शिरा’ उचलला.  

सखारामच्या पानात टाकला.  

म्हणाला – “घे बाळा. तुझा ‘बुंदीचा लाडू’. ”

 

सखारामचे डोळे चमकले. पण त्याने शिरा उचलला नाही.  

त्याने पानाचे 4 भाग केले.  

1 घास स्वतः खाल्ला.  

2रा घास शेजारच्या 4 वर्षांच्या पोरीला दिला – “ताई, खा. “

3रा घास मागे बसलेल्या आजीला – “आजी, गोड खा. “

4था घास… ऋषीकडे बघितलं. हसला. ऋषीच्या पानात टाकला.  

“दादा, तू पण खा. वारीत एकट्याने नाही खायचं. “

 

ऋषी सुन्न.  

25 लाखाच्या पॅकेजवाला… 7 वर्षांच्या पोराकडून ‘वाटणं’ शिकला.  

त्याने तो घास खाल्ला. खारट लागला.  

कारण डोळ्यातलं पाणी त्यात पडलं होतं.  

 || रात्रभर झोप नाही || सकाळी शिरानाही… विचारबनला ||

ऋषी रात्रभर झोपला नाही.  

GoPro उघडला. Vlog डिलीट केला.  

सकाळी 4 ला उठला. सासवडच्या बाजारात गेला.  

रवा, साखर, तूप, काजू… 5 किलोचा शिरा बनवायचं सामान घेतलं.  

एकट्याने स्टोव्ह लावला. शिरा बनवला.  

वासाने सगळे वारकरी गोळा झाले.  

 

ऋषी ओरडला – “माऊली, काल माझा ‘एक’ शिरा 4 जणांनी वाटून खाल्ला.  

आज माझा ‘5 किलो’ शिरा 500 जणांनी खायचा.  

रांग लावा. पण अट एकच –

एक घास स्वतः खायचा… दुसरा शेजाऱ्याला भरवायचा.  

कारण वारीत ‘पोट’ नाही भरायचं… ‘प्रेम’ भरायचं. “

 

500 वारकरी. रांग लागली.  

ऋषी स्वतः वाढत होता. प्रत्येकाला सांगत होता – “शेजाऱ्याला द्या. “

सखाराम पण होता. त्याने 3 घास खाल्ले… 3 जणांना भरवले.  

आणि ऋषीला म्हणाला – “दादा, काल तू मला ‘गोड’ दिलं…

आज तू ‘सगळ्यांना’ गोड देतोय. तू ‘विठोबा’ आहेस. “

 

ऋषी रडला. म्हणाला –

“बाळा, मी विठोबा नाही. मी ‘वाटमारा’ होतो.  

‘Like-Share-Subscribe’ साठी आलो होतो.  

तू मला ‘Love-Care-Sacrifice’ शिकवलंस.  

आजपासून माझा ‘Vlog’ बंद… ‘वारकरी’ सुरू. “

|| जेजुरीचा खंडोबा आणि वारीचा शिरा ||

दिंडी जेजुरीला पोहोचली.  

सोन्याची जेजुरी. पिवळी भंडारा उधळण.  

ऋषी पुन्हा शिरा बनवणार होता.  

 

तेवढ्यात सखाराम धावत आला.  

हातात मळकट पिशवी. उघडली.  

आत 2 रुपये, 5 रुपये… असे करून 137 रुपये.  

“दादा, हे माझे ‘वारीचे पैसे’. आईने दिले होते.  

मी खर्च केले नाही. तू ह्यातला शिरा कर.  

म्हणजे हा शिरा ‘माझा’ पण असेल. “

 

ऋषीने ते 137 रुपये डोक्याला लावले.  

म्हणाला – “बाळा, तुझ्या 137 रुपयात जो ‘गोडवा’ आहे ना…

तो माझ्या 25 लाखात नाही.  

कारण तू ‘हौसे’साठी नाही… ‘दुसऱ्यासाठी’ वाचवलेस. “

 

त्या दिवशी जेजुरीत 10 किलो शिरा वाटला गेला.  

नाव दिलं – “सखारामचा शिरा”.  

पाटी लावली – “एक घास तुम्ही खा… दुसरा शेजाऱ्याला द्या.  

कारण पंढरीचा रस्ता ‘पोटाने’ नाही… ‘परस्पराने’ कापायचा असतो. “

|| आज… 2026 ||

आज ऋषी IT सोडली. ‘वारी फूड ब्लॉगर’ नाही.  

तो ‘वारी अन्नपूर्णा’ नावाची NGO चालवतो.  

दरवर्षी वारीत 10 टन शिरा, लाडू, बिस्कीट वाटतो.  

पण नियम तोच – “एक घास स्वतःचा… दुसरा शेजाऱ्याचा. “

 

सखाराम?

तो आता 10 वर्षांचा. ऋषीदादासोबत वारीला येतो.  

खिशात 10 रुपये असले तरी 5 रुपये ‘शिरा फंडा’त टाकतो.  

म्हणतो – “दादा, आपण ‘गरीब’ नाही… ‘श्रीमंत’ आहोत.  

कारण आपल्याकडे ‘वाटायला’ आहे. “

 

आणि हो…

ऋषीच्या ऑफिसमध्ये एकच फोटो आहे.  

सखारामचा. पानाचे 4 भाग करतानाचा.  

खाली लिहिलंय – “My CEO. He taught me Sharing is Earning. ”

|| भक्तांनो, वारीतल्या खाण्या-पिण्यातले 6 बोध ||

  1. || वारीत बुफेनसतो… प्रसादअसतो ||

हॉटेलमध्ये आपण ‘पोट’ भरतो. वारीत ‘पंगत’ भरते. फरक काय? हॉटेलात ‘मी’ जेवतो… वारीत ‘आम्ही’ जेवतो. म्हणूनच तिथला शिरा ‘अमृत’ लागतो.  

  1. || ‘एक घासची किंमत एक लाखापेक्षा मोठी ||

ऋषीचा 1 घास सखारामसाठी ‘बुंदीचा लाडू’ झाला. तुमचा ‘उरलेला’ घास कोणासाठी ‘पहिला’ घास होऊ शकतो. वाटून बघा.  

  1. || मुलं खातनाहीत… वाटतात‘ ||

मोठी माणसं ‘साठवतात’. सखारामसारखी मुलं ‘वाटतात’. म्हणूनच विठोबाला ‘बालरूप’ प्रिय आहे. कारण ‘मूल’ झालं की ‘मळ’ जातो.   

  1. || ‘Vlog’ पेक्षा लोगमहत्त्वाचे ||

ऋषी ‘Reel’ बनवायला आला होता… ‘Real’ होऊन गेला. कॅमेरा बंद करा… काळीज सुरू करा. तिथे ‘Like’ नाही… ‘जीवन’ मिळतं.  

  1. || 137 रुपये ‘137 कोटीवर भारी पडले ||

सखारामचे पैसे ‘संख्येने’ लहान… ‘वृत्तीने’ मोठे. देव ‘दान’ नाही बघत… ‘भाव’ बघतो. 1 रुपया ‘ओढून’ दिला तर ‘कचरा’… ‘रडून’ दिला तर ‘कुबेर’.  

  1. || वारी मजानाही… जबाबदारीआहे ||

‘खाणं-पिणं-नाचणं’ वारी नाही. ‘खाऊ घालणं-पाणी पाजणं-सांभाळणं’ वारी आहे. पंढरीचा रस्ता ‘पायाने’ नाही… ‘परोपकाराने’ तुडवायचा असतो.   

|| शेवटचा मंत्र || विठूमाऊलीचा ||

“बाळांनो, वारीला येताना ‘डबा’ भरून आणू नका…

‘दिल’ भरून या.  

कारण ‘पोळी’ शिळी होते…

‘प्रेम’ शिळं होत नाही.  

‘शिरा’ संपतो…

‘स्मरण’ संपत नाही.  

 

एका घासात ‘विठ्ठल’ भेटतो…

जर तो घास ‘दुसऱ्याच्या’ मुखात गेला तर.  

म्हणून या वर्षी ‘वारी’ करा…

पण ‘एकट्याने’ नको…

‘सोबत’ करा.  

‘खाऊन’ मजा नाही…

‘खाऊ घालून’ मजा आहे.  

तीच खरी ‘पंढरीची वारी’. ”

|| राम कृष्ण हरी || जय जय राम कृष्ण हरी ||

|| श्री स्वामी समर्थ || 

 भक्तांनो, या वारीला जाताना एक्स्ट्रा डबाघेऊन जा. एक्स्ट्रा बिस्कीटघ्या. वाटेत सखारामभेटेल… त्याला शिराद्या. कदाचित तो तुमचा ऋषीकरेल. ही गोष्ट 1 ‘वारीमित्राला पाठवा… म्हणजे पंढरीच्या वाटेवर भूकनाही… फक्त भक्तीउरेल

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माणूस आजाराने मरत नाही… – लेखक : . अखिलेश राजूरकर ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

श्री मनोहर जांबोटकर

? वाचताना वेचलेले ?

☆ माणूस आजाराने मरत नाही… – लेखक : . अखिलेश राजूरकर ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

माणूस आजाराने मरत नाही; तो कारणं संपली की मरू लागतो…

मी गेली अनेक वर्षे आयसीयूमध्ये काम करतो आहे.

हजारो रुग्ण पाहिले.

हजारो नातेवाईकांचे डोळे पाहिले.

हजारो वेळा मृत्यूला दारात उभं पाहिलं.

आणि तरीही, आजही काही गोष्टी मला आश्चर्यचकित करतात.

 

मी जे लिहितो आहे ते कोणतं संशोधन नाही. कोणताही वैद्यकीय निष्कर्ष नाही. याला अनेक अपवाद असतील. अचानक घडणारे अपघात, क्षणात होणारे मृत्यू, नियतीचे काही क्रूर फटके — मी त्याबद्दल बोलत नाही.

 

मी त्या संघर्षाबद्दल बोलतो आहे जो आयसीयूमध्ये दिवसेन्-दिवस चालतो.

जिथे जीवन आणि मृत्यू दोघेही एकाच खोलीत बसलेले असतात.

जिथे एखाद्या माणसाला चार दिवस, आठ दिवस, कधी चार आठवडे लढावं लागतं.

 

या संघर्षात मला एक गोष्ट वारंवार दिसली आहे.

काही रुग्ण असे असतात की त्यांच्या शरीरात आजारांशिवाय दुसरं काहीच नसावं असं वाटतं.

डायबिटीज.

रक्तदाब.

थायरॉईड.

जुना हार्ट अटॅक.

पक्षाघात.

किडनीचे विकार.

फुफ्फुसांचे आजार.

 

त्यांचे अहवाल पाहिले की वैद्यकीय भाषेत त्यांच्याबद्दल आशावादी राहणं कठीण वाटतं.

पण हेच लोक कधी कधी मृत्यूच्या दारातून परत येतात.

हळूहळू बसायला लागतात.

पुन्हा चालतात.

पुन्हा घरी जातात.

आणि काही महिन्यांनी OPD मध्ये हसत भेटायला येतात.

 

दुसऱ्या बाजूला एखादा रुग्ण असतो.

वयाने कमी.

मोठे आजार नाहीत.

तुलनेने निरोगी.

पण तो मात्र आपल्या हातातून निसटून जातो.

 

वर्षानुवर्षे हे पाहिल्यानंतर मी स्वतःला एक प्रश्न विचारू लागलो.

नेमकं काय असतं ते, जे काही लोकांना परत खेचून आणतं?

काय असतं ते, जे काही लोकांना मृत्यूच्या सावलीतूनही चालत बाहेर आणतं?

 

वैद्यकीय विज्ञान त्याची अनेक उत्तरं देतं.

पण सगळी उत्तरं देत नाही.

आणि कालांतराने मला एक गोष्ट जाणवू लागली.

कदाचित माणूस किती आजारी आहे, हे नेहमी महत्त्वाचं नसतं.

कधी कधी त्याला अजून किती जगायचं आहे, हे जास्त महत्त्वाचं असतं.

त्याला अजून मुलाचं लग्न बघायचं असतं.

मुलीचा संसार उभा राहिलेला पाहायचा असतो.

नातवाला मोठं होताना पाहायचं असतं.

कर्ज फेडायचं असतं.

घर बांधायचं असतं.

एखादं स्वप्न पूर्ण करायचं असतं.

किंवा फक्त घरी परत जाऊन आपल्या माणसांमध्ये पुन्हा बसायचं असतं.

 

व्हेंटिलेटरवर पडलेले अनेक रुग्ण मला आजही आठवतात.

त्यांच्या शरीरात शक्ती उरलेली नसते.

पण त्यांच्या डोळ्यांत भविष्य उरलेलं असतं.

आणि मला वाटतं, त्या भविष्याची ओढच त्यांना परत आणत असते.

 

आयसीयूमध्ये मशीन हृदयाचे ठोके मोजतात.

ऑक्सिजन मोजतात.

रक्तदाब मोजतात.

शरीरातल्या जवळजवळ प्रत्येक गोष्टीचं मोजमाप करतात.

 

पण एक गोष्ट मोजण्यासाठी अजून कोणतंही मशीन तयार झालेलं नाही.

“या माणसाकडे अजून किती जगण्याची कारणं उरली आहेत?”

कदाचित हीच ती संख्या आहे जी सर्वात महत्त्वाची असते.

 

मी अनेक वृद्ध जोडपी पाहिली आहेत.

पन्नास-साठ वर्षे एकत्र जगलेली.

त्यांपैकी एक व्यक्ती गेल्यानंतर दुसरी फार काळ जगत नाही.

कदाचित त्याला वैद्यकीय स्पष्टीकरण असेल.

पण एक डॉक्टर म्हणून अनेकदा मला असं वाटतं की त्यांच्या आयुष्याचा अर्थच हरवलेला असतो.

त्यांच्या जगण्याचं कारण निघून गेलेलं असतं.

आणि ज्या दिवशी कारणं संपतात, त्या दिवशी माणूस थोडा थोडा मरायला लागतो.

 

उलट एखादा बाप असतो.

अत्यंत गंभीर अवस्थेत.

पण त्याला अजून मुलांना उभं करायचं असतं.

घर सांभाळायचं असतं.

जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या असतात.

आणि अशा लोकांना मी मृत्यूच्या दारातून परत फिरताना पाहिलं आहे.

 

म्हणून आज इतकी वर्षे आयसीयूमध्ये उभं राहिल्यानंतर जर कोणी मला विचारलं की जीवनाबद्दल सर्वात मोठा धडा कोणता मिळाला?

तर मी एवढंच सांगेन—

माणूस फक्त श्वासांवर जगत नाही.

तो फक्त हृदयाच्या ठोक्यांवर जगत नाही.

तो फक्त औषधांवरही जगत नाही.

तो जगतो त्या कारणांवर, ज्यासाठी त्याला उद्या पुन्हा डोळे उघडायचे असतात.

 

कदाचित म्हणूनच मानसोपचारतज्ज्ञ Viktor Frankl यांनी लिहिलं होतं—

“He who has a why to live can bear almost any how. “

“ज्याच्याकडे जगण्याचं कारण असतं, तो कोणताही संघर्ष सहन करू शकतो. “

आयसीयूने मला या एका वाक्याचा अर्थ रोज शिकवला आहे.

 

आजार शरीराला कमकुवत करतात.

पण आशा माणसाला जिवंत ठेवते. हा प्रकार फेसबुकवर पोस्ट केल्यास लोक “लाईक” करून पुढे जाणार नाहीत; ते शेवटपर्यंत वाचतील, स्वतःच्या आई-वडिलांचा, जोडीदाराचा किंवा एखाद्या ICU अनुभवाचा विचार करतील. तिथेच लेख जिंकतो.

*

लेखक :डॉ. अखिलेश राजूरकर

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “संवादाचा अभाव” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “संवादाचा अभाव☆ श्री जगदीश काबरे ☆

भारतीय समाजात आजही अनेक कुटुंबांमध्ये विवाहाचा अंतिम निर्णय पालकच घेतात. मुलगा किंवा मुलगी यांची संमती विचारली जाते; पण अनेकदा ती केवळ औपचारिकता ठरते. स्पष्ट नकार देण्याचे स्वातंत्र्य अनेक तरुण-तरुणींना प्रत्यक्षात मिळत नाही. आई-वडिलांचा शब्द अंतिम, घराण्याची प्रतिष्ठा, समाज काय म्हणेल? किंवा इतके चांगले स्थळ शोधून आणले आहे, अशा दबावांमुळे अनेक तरुण-तरुणी स्वतःच्या मनाविरुद्ध निर्णय स्वीकारतात. अशा वातावरणात मुक्त संवादाची जागा भीती, मौन आणि कधीकधी तर क्रूर कृत्य करण्यास भाग पाडतात. परिणाम सिया गोयलने तिचा प्रियकर चेतन चौधरीशी संगनमत करून थंड डोक्याने केतन अगरवालचा लोहगडच्या दरीत ढकलून केलेला खून.

मुलांना स्वतःच्या भावना, मत किंवा नकार मोकळेपणाने व्यक्त करता येत नसतील, तर समस्या अधिक गुंतागुंतीची बनते. दडपलेला विरोध, मानसिक ताण, असहाय्यता किंवा संताप कधी कधी चुकीच्या आणि विनाशकारी मार्गाने बाहेर पडू शकतो. अर्थात, कोणत्याही गुन्ह्याचे समर्थन यामुळे होत नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या कृतीसाठी कायदेशीरदृष्ट्या जबाबदार असते. परंतु समाजशास्त्राचा उद्देश केवळ दोषी शोधणे नसून अशा घटना घडण्यामागील सामाजिक परिस्थिती समजून घेणे हा असतो.

पालकांनी मुलांच्या आयुष्याबाबत निर्णय घेताना त्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून स्वीकारणे आवश्यक आहे. विवाह हा दोन कुटुंबांचा नव्हे, तर दोन व्यक्तींचा दीर्घकालीन सहजीवनाचा निर्णय असतो. त्यामुळे त्यामध्ये स्पष्ट, निर्भय आणि प्रामाणिक संवाद होणे अत्यंत गरजेचे आहे. मुलाने किंवा मुलीने नाही म्हटले, तर त्या नकाराचा आदर करण्याची मानसिक तयारी पालकांमध्ये असली पाहिजे. नकार म्हणजे अवज्ञा नव्हे; तो व्यक्तिस्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे अशा घटना समाजासाठी इशारा असतात. त्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात की, विवाहसंस्थेत संवादाला किती महत्त्व दिले जाते, मुलांच्या इच्छेला किती स्थान दिले जाते आणि कुटुंबातील निर्णयप्रक्रिया किती लोकशाहीवादी आहे. संवाद, परस्पर सन्मान आणि स्वायत्तता यांचा अभाव असेल, तर त्याची किंमत कधी कधी संपूर्ण कुटुंबाला मोजावी लागू शकते.

घटना घडून गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा आधीच संवादाने प्रश्न सोडवला तर नंतर डोक्याला हात लावून बसायची पाळी येणार नाही, हे आपली कुटुंबव्यवस्था केव्हा समजून घेईल?

© श्री जगदीश काबरे

(लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail.com मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पाऊस आला गं… ☆ संगीता कुलकर्णी ☆

संगीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ पाऊस आला गं ☆ संगीता कुलकर्णी ☆

पावसाळा म्हटलं की मला प्रथम आठवतो तो मन धुंद करणारा मृद्गंगंध… ! पहिल्या पावसाची गोष्टच काही वेगळी… ! त्याचे आणि माझे नाते खरंतर जिव्हाळ्याचे.. पाऊस आला की मी खिडकीत उभी राहून त्याच्याशी बोलू लागते त्याचा थंडगार वारा मनाला सुखावून जातो आणि शब्द उसळ्या मारू लागतात… शब्दांना पूर घेऊन एक वेडा पाऊस आला… !

 आला आला

 पाऊस आला

 मला भिजवून ओलेचिंब करुन गेला

पहिल्या पावसाच्या सरी अंगावर बरसू लागल्या की येणार्‍या मृगाची चाहूल लागते.

सर्वच या सृजन सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात.. पहिल्या पावसाची आतुरता या सृष्टीतल्या प्रत्येक न् प्रत्येकाला ही असतेच ना.. !

पहिल्या पावसाच्या वेळी जेव्हा आकाश भरून येते तेव्हा सृष्टीची किमया डोळे उघडे ठेवून बघत रहावी अशीच…

 पावसाची सर

 कोसळत होती 

 भिजताना सृष्टी

 उमलत होती

चिंब भिजलेल्या सृष्टीचा किमया मी मनात रेखाटत होते.. निळेभोर दिसणारे आभाळ एकदम काळेसावळे होते… ढगांची गर्दी… ढगांचा एकमेकांवर आदळणारा आवाज..

तो आवाज ऐकला की टाळ मृदुंगाशी स्पर्धा करतो की काय असा भास मला होतो.. चिंब भिजलेल्या सृष्टीचा अप्रतिम सुंदर 

देखावा मनात रेखाटत मी पावसाकडे बघत होते… सृष्टीतील त्या चैतन्याचा तो सोहळा डोळ्यात भरून घ्यावा आणि कानात साठवून ठेवावा एवढा नादमय… पाऊस म्हणजे अख्या सृष्टीला वेड लावणारा अद‍्भूत सोहळा… ! 

 आसुसलेली धरणी 

 मिलनासाठी

 दोन हातांचे पंख

 पसरून उभी

पहिल्या पावसाच्या पहिल्या थेंबाने धरणीला स्पर्श होताच पावसाचे ते अगणित थेंब मातीत जेव्हा मिसळतात तेव्हा माती गर्भवती राहून तिच्या कुशीतून बीजाला कोंब फुटतो. तुकारामांच्या भैरवीतली “तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी” हा संदर्भ मातीला या काळात तंतोतंत लागू पडतो.

मातीचा तो धुंद वास…त्याने सुखावत होती.

हसताना मृद्गंगंध पसरवीत होती..

बहरत होती… लाजत होती आणि लाजून चिंब चिंब होत होती.

तो मृद्गंगंध श्वासात किती आणि कसा भरून घ्यावा… !

हा पाऊस आसमंतात एक नवं चैतन्य फुलवतो, सर्वांची तहान भागवितो, मातीत थेंब पडल्यावर पसरणारा तो मृदगंध अगदी उरात साठवावासा वाटतो..

वातावरणात विलक्षण गारवा येतो.

मृगाच्या पावसाचे आणि सृजनाचे एक विलक्षण असे नाते आहे. वळवाचा पाऊस आणि मृगाच्या पावसात तसा जमीन आसमानाचा फरक … वळवाचा पाऊस एकदा लागून गेला की तो नुकसानच करून जातो पण मृगाचा पाऊस तो आला की सगळ्यांना सुखावून जातो… सृष्टीतील सर्वांना तो वेड लावतो. पहिला पाऊस नवीन चैतन्य घेऊन येतो. मनाला जगायला नवीन उभारी देतो.

आयुष्यातले छोटे छोटे आनंदाचे जगण्याचे क्षण पहिला पाऊस मिळवून देतो.

माझ्यासाठी प्रत्येक नव्या क्षणी येणारा पाऊस हा पहिलाच असतो कारण मला तो दरवेळी एक नवी कविता देऊन जातो. मला त्या पावसात गुंतून राहणं आवडत.. जमतं… तो स्वत:हून मला भावना देतो… मला आशय पुरवतो. पाऊस सोबत केवळ गार हवा किंवा चिंब सरीच घेऊन येतो असं काहीच नाही तर पाऊस त्याही पलीकडे जाऊन प्रीत, विरह, आनंद यांसारख्या बऱ्याच भावना सोबत घेऊन येतो… पहिल्या पावसात त्याने मला भिजत असलेली पाहून जो मनमुराद आनंद लुटला त्या क्षणाची तुलना किंचीतच दुसऱ्या क्षणाशी होईल… मला बेधुंद जगताना पाहून त्यालाही पावसात भिजायची इच्छा झाली होती… पहिल्या पावसाचे ते थेंब अलगद ओठांनी चुंबूनी घ्यावेसे वाटतात…

पाऊस आणि आठवण या दोघांचे घट्ट नाते आहे फरक फक्त इतकाच की पाऊस शरीराला भिजवतो आणि आठवणी कायम मनाला… ! या हृदयाचे त्या हृदयी अशी अवस्था… छळणारा, जाळणारा तरीही हवाहवासा वाटणारा पाऊस…!

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”द्वंद्व मनातले..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “द्वंद्व मनातले.. ☆ संध्या बेडेकर ☆

हो की नाही ?? बरोबर की चूक ??

योग्य वर्तन की अयोग्य वर्तन ?? खूपदा हे द्वंद्व आपली परीक्षा घेत असत.

आज सकाळी आमच्या घरी काम करणाऱ्या मावशी म्हणाल्या.

काकू माझ्या जावेची आई वारली हो.

मी म्हटलं,

अरे !! हो का ? मग तुम्ही गेल्या नाही. का बरं ? 

 मला या लोकांचं खूप कौतुक वाटतं 

ही मंडळी नातीगोती आपल्या पेक्षा जास्त छान सांभाळतात.

माहेरी सासरी कोणताही कार्यक्रम असो, या बस चां प्रवास करून तेथे नक्की जाणार. आज पाऊस आहे, ऊन आहे असे प्रश्न यांना पडत नाहीत बहुतेक.

बरं ! असंही नाही की त्या दिवशी त्या कामाला येणार नाही. पायी चालत येणे, काम करणे, पुन्हा घरी पायी जाऊन, बसने दोन तासांचा प्रवास करून, तेथून पुन्हा पायी चालत कधी कधी तर भर चिखलात चालून त्या तेथे पोहचतात.

कौतुक आहे. नाही का ?? 

आपल्या सारखं (म्हणजे मी माझ्या बद्दल बोलतेय) नाही की आपल्या सोयीनुसार आपण जातो किंवा फोन करून आपलं कर्तव्य पार पाडतो.

असं म्हणतात,

एकवेळ सुखात सहभागी झालं नाही तरी चालेल, पण दुःखात माणसाने जरूर जावे, आधार द्यावा.

मावशी म्हणाल्या,

काकू ! जायला तर हवं होत हो, पण मी नाही गेले. त्या पूढे म्हणाल्या,

काल पूर्ण दिवस याच विचारात गेला. एक मन म्हणतं होत जायला पाहिजे, तर दुसरं मन जून्या घटनेची सारखी आठवण करून देत होतं.

 काकू!! दोन वर्षांपूर्वी माझे आई वडील दोघेही गेले, पण या माझ्या जावेने एकदाही विचारलं नाही. साधी चौकशी ही केली नाही. आता आमची लोक पण फोन वगैरे करतातच की. पण एक फोन सुद्धा केला नाही हो.

न येण्याचे खोटे कारणही सांगितले नाही.

फक्त पाऊस पडला की भात लावायला ये असा फोन न चूकता करतात.

 काकू! श्रीमंतीचा भारी माज आहे तिला. हेच जर एखाद्या श्रीमंत घरात घडलं असतं, तर लगेच धावत गेले असते.

बरं! हे असं वागणं काही पहिल्यांदाचच आहे, असं नाही.

मी बरोबर नक्कीच वागले नाही, पण त्यांना त्यांच्या वागण्याची जाणीव केंव्हा होईल ? 

 काल मी देवाची माफी सुद्धा मागितली.

म्हंटल,

देवा !! आजचे दोन नंबर कापून घे बाबा. पण यावेळी मी असंच वागणार. या दोन नंबरची भरपाई मी कधी तरी करेन.

 गरीबांच्या घरचे मरण म्हणजे मरण नाही का ? काहीच संवेदनशील घटना नाही का ?? 

प्रत्येक वेळेस यांची श्रीमंती महत्वाची, कौतुकाची का ?? 

खरं तर त्यांच्या आईचा काहीच दोष नाही हो यात, पण मी गेले नाही.

माझ्या लक्षात आलं,

हा श्रीमंतीचा रोग समाजातील प्रत्येक पातळीवर आहे.

या रोगाने पछाडलेल्या लोकांची जमात सर्व ठिकाणी आढळते.

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे लोक बरेच असतात.

तसं मला मावशीचे म्हणणे पटले. अगदी सहज सुलभ प्रत्येकाच्या मनात येणारे हे विचार आहेत.

असे प्रसंग आपल्याला दुविधेत टाकतात. आपली चूक कळत असते, पण झालेला अपमानही लक्षात असतोच ना.

योग्य वर्तन विरुद्ध (×) अयोग्य वर्तन या मध्ये खडाजंगी युद्ध चालू असत.

 आपलेच प्रश्न ? त्यावर आपणच दिलेली उत्तरे, नंतर उत्तरांचे विश्लेषण. यांचे जणू पारायण सुरु असते. एका विचारांवर थांबल्या नंतर पुन्हा थोड्या वेळाने तीच सायकल सुरू होते.

हो. की. नाही ???

 यापैकी एकावर येऊन गाडी काही लवकर थांबत नाही. असं किती तरी वेळ / कधी कधी तर बरेच दिवस हा खेळ मनात चालू असतो. यावेळी अनेक वाचलेले सुविचार ही आठवतात.

 कोणी कसं वागावं ? हे आपल्या हातात नाही. पण आपण नेहमी व्यवस्थित वागावं ना.

असं वागल्याने खरंतर ते स्वतःचाच अपमान करतात. आपला कुठे झाला ?

 असे एक ना अनेक विचार मध्ये मध्ये लुडबुड करतात. आपला निर्णय बदलण्याचा प्रयत्न करतात 

पण का ? का म्हणून नेहमी ऐकायचं ? सहन करायचं ? त्यांचे ऐकत राहिले तर समोरच्या ची हिम्मत वाढते. आपण काहीही करू शकतो, कसेही वागू शकतो, असा त्यांचा समज कधीतरी दूर केलाच पाहिजे.

They should not take us for granted.

बरं एवढं करून श्रीमंत म्हणजे असे काही गडगंज वगैरे नाही. आणि असले तरी त्यांच्या दाराशी आम्ही उभे आहोत का ?? 

मोठी कार, डोळ्यांवर मोठा गॉगल्स, हातात मोठा मोबाईल, मग तो आय फोन असेल तर अजून स्मार्ट, अजून श्रीमंत समजून वागणारे लोक आजूबाजूला बरेच दिसतात.

दोन चार वाक्य इंग्रजीचे बोलता आले तर श्रीमंतीत अजून दोन डिग्री ची वाढ.

 हीच श्रीमंती, हाच स्मार्टनेस बस. बाकी कांक्रीट असं काही दिसत नाही त्यांच्यात.

खरं तर 

Making other people feel small, doesn’t make you big.

अशा लोकांशी वागायची आपली एक पॉलिसी आपल्यालाच तयार करायची असते.

 माझं माझं मी ठरवलंय. अगदी पहिल्या च अनुभवावरून नाही, पण जर असं वागणं नेहमीचच झालं तर, मग मात्र काही तरी ठरवावच लागत. त्यावेळी 

I follow the Principle.

Forget the past but Remember the lesson.

Moral in my life is very simple.

You treat me good, I will definitely treat you better.

कधी कधी आपल्याला आपल्याच वागण्याचे कारण लक्षात येत. की 

We have reduced communication to the people we love, not because we hate them but because they make us feel like, we are nothing to them.

चांगले संबंध नक्कीच असावेत, पण ती काय एकाच पार्टीची जबाबदारी असते का ??

I follow these principles in my life.

मावशीचे बोलणे ऐकून, मी आपल्याच विचारात दंग होते.

मावशींच्या बोलण्याने पुन्हा भानावर आले.

त्या विचारत होत्या,

काकू !! मी बरोबर बोलतेय का ? माझ वागणं एकदम चूकच आहे का ? 

आता काय उत्तर द्यावं ?? कळेना मला.

मी म्हटलं,

“कुसुम ताई कोणावर एवढं नाराज होऊ नका. ” त्याच महत्व आपल्या आयुष्यात कमी करा. पण या अशा प्रसंगी जाऊन या.

तुम्हालाच बरं वाटेल.

नाहीतर तुमच मन तुम्हाला खात राहील.

 शैवटी मला माझंच कौतुक वाटलं. समाधान मिळाल.

चांगले बरोबर विचारांनी चूक अयोग्य वर्तनावर मात केली.

म्हणतात ना,

Be a good person but do not waste time to prove it.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७१ आणि ७२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७१ आणि ७२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ७१ – – 

जयाचेनि नामें महादोष जाती।

जयाचेनि नामें गती पाविजेती।

जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।। ७१।।

अर्थ :  भगवंताच्या नामस्मरणाने मोठमोठी पापे नाहीशी होतात. साधकाला उत्तम अवस्था प्राप्त होते. पुण्याचा संचय होत जातो. असे सर्व काही ज्यामुळे प्राप्त होते त्या भगवंताचे नामस्मरण आणि चिंतन पहाटेच्या वेळी करावे.

(महादोष – मोठमोठी पापे/पातके/दोष, गती – अवस्था/मुक्ती/मोक्ष)

विवेचन : भगवंताच्या नामाचा महिमा अपार आहे. सतत नामस्मरण केल्याने महादोष म्हणजे महापापे नाहीशी होतात. भगवंतांचे नाम आपले अंतःकरण शुद्ध करते. वाईट गोष्टी, पापकर्म करण्याची इच्छाच होत नाही. चोरी करणे, खोटे बोलणे, व्यभिचार करणे, हत्या करणे, अपेयपान (दारू)करणे या सारख्या गोष्टी या महापाप मानल्या जातात. परंतु सतत भगवंताचे नाम घेत राहिल्याने या गोष्टी करण्याची इच्छाच नाहीशी होते. व्यक्ती सदाचारी बनते. वाल्या कोळ्याचे उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. वाटमारी करणे, हत्या करणे यासारखी महापापे त्याच्या हातून घडली होती. परंतु महर्षी नारद आणि ऋषींच्या उपदेशामुळे त्याच्यात अंतर्बाह्य बदल झाला. आपल्या कर्माचा पश्चाताप होऊन त्याने रामनामाचा आश्रय घेतला. रामनामाची जादू एवढी मोठी आहे की वाल्या कोळ्याचे रूपांतर महर्षी वाल्मिकीत झाले. रामायणासारखा अद्वितीय ग्रंथ लिहून ते जगासाठी वंदनीय ठरले.

रामनामामुळे गती म्हणजे उत्तम अवस्था प्राप्त होते. अंतकाळी भगवंताचे नाम मुखात येणे यासारखे भाग्य नाही. ‘ अंते मती सा गती: ‘ असे म्हटले जाते ते यामुळेच. शेवटचा दिस गोड व्हावा असे तुकाराम महाराज म्हणतात याचा अर्थ हाच आहे. पण आयुष्याच्या अखेरच्या क्षणी माणसाच्या मुखात अचानक रामनाम येत नाही. त्यासाठी सतत मनाने भगवंताचे नामस्मरण करण्याची सवय असावी लागते. ही सवय असेल तरच अंतकाळी भगवंत आठवतो.

समर्थ तिसऱ्या ओळीत म्हणतात की नामाच्या योगाने पुण्यठेवा घडतो म्हणजे वाढतो. बँकेतील आपल्या खात्यात आपण बचत म्हणून थोडे थोडे पैसे टाकत राहतो. यात सातत्य असले तर ही पुंजी वाढत जाते. मुद्दलावरही व्याजही लागू होते. रामनाम ही तर अत्यंत मौल्यवान ठेव ! थोडीथोडी जमा करत गेलो की पुण्यसंचय वाढत जातो. संत मीराबाई म्हणतात, ” पायो जी मैने रामरतन धन पायो… ” हे असं अमोलिक धन आहे की ” खर्च न खुटे, चोर न लुटे. ” इतर धन खर्चल्याने संपतं. पण याची महती काही वेगळीच. हे तर दिवसेंदिवस वाढतच जातं. विशेष म्हणजे हे धन असं आहे की याला चोरही लुटू शकत नाही. सातत्याने रामनाम घेणाऱ्याचा पुण्यसंचय वाढतच राहतो.

नामस्मरणाने वासनांचा क्षय होतो. म्हणजे भगवंत प्राप्तीखेरीज इतर वासना हळूहळू नष्ट व्हायला लागतात. शेवटी केवळ भगवंत प्राप्तीची इच्छा उरते. आपल्या पुण्यसंचयानुसार ती या जन्मी किंवा पुढील जन्मी भगवंत नक्की पूर्ण करतो. तेव्हा हे मना, प्रभात समयी श्रीरामाच्या रूपगुणांचे चिंतन कर. दिवसभरही त्याचे नित्य स्मरण ठेव. हे नाम तुला मोक्षाकडे घेऊन जाईल.

स्वसंवाद ::

१. मी रोज माझ्या बँक खात्यातील शिल्लक (Balance) तपासतो, पण माझ्या खात्यात ‘पुण्यठेवा’ किंवा रामनामाची पुंजी किती जमा होत आहे, याचा हिशेब ठेवतो का ?

२. “शेवटचा दिस गोड व्हावा” असे मला वाटते, तर मग शेवटच्या क्षणी ते नाम सहज मुखात यावे म्हणून मी आजपासूनच अंतःकरणाला तशी सवय लावत आहे का?

३. माझ्या हातून कळत-नकळत होणारे छोटे-मोठे दोष किंवा वाईट विचार दूर व्हावेत म्हणून मी नामस्मरणाचा आधार घेतो का?

४. मीराबाईंनी म्हटल्याप्रमाणे, मला हे ‘अमोलिक धन’ मिळवण्याची खरी आस लागली आहे का की अजूनही चोरांनी लुटल्या जाणाऱ्या नश्वर धनामागेच धावत आहे ?

==========

श्लोक क्र. ७२ – – 

न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही।

मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही।

महा घोर संसार शत्रू जिणावा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।। ७२।।

अर्थ : रामनाम घेण्यासाठी पदरचे पैसे खर्च करावे लागत नाहीत. मुखाने रामनाम घेताना काही कष्ट पडत नाहीत. या रामनामाच्या साहाय्याने अत्यंत कठीण अशा संसाररूपी शत्रूवर मात करता येते. त्यासाठी प्रभात समयी श्रीरामाचे चिंतन करावे.

(न वेचे – खर्च करावे लागत नाहीत, ग्रंथीचे – पदरचे, अर्थ – पैसा, घोर – कठीण, जिणावा – जिंकावा)

विवेचन :  माणसाची देहबुद्धी फार प्रबळ असते. देहासाठी आणि देहाच्या सुखासाठी जे जे लागेल, ते मिळवण्याच्या प्रयत्नात माणूस असतो. सगळी ऐहिक सुखे उपभोगण्यासाठी पैशाची मोठी गरज असते. त्यामुळे माणूस पैशाला फार जपतो. प्रसंगी देहापेक्षाही पैशाला महत्व देणारी माणसे व्यवहारात पाहायला मिळतात. आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करून ती पैसा मिळवण्याच्या मागे लागलेली असते. सामान्य माणूस स्वतःच्या मौजमजेसाठी हवे तेवढे पैसे खर्च करायला तयार असतो पण दानधर्माची वेळ आली की हात आखडता घेतो. सर्वसामान्य माणसांची ही मानसिकता समर्थ उत्तम प्रकारे जाणून आहेत. म्हणून रामनाम घेण्याबद्दल ते सांगतात की यासाठी पदरचा एक पैसाही खर्च करावा लागत नाही. वरील ओळीचा अर्थ आणखी एका प्रकारे घेता येईल. ते म्हणजे भगवंत प्राप्तीसाठी वेगवेगळे ग्रंथ वाचून त्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न सामान्य माणूस करतो. आपली पारमार्थिक बैठक तयार होण्यासाठी आवश्यक त्या ग्रंथांचे वाचन अवश्य करावे. पण तेवढे झाल्यानंतर अधिक ग्रंथ वाचण्यात वेळ न घालवता नामस्मरण करावे. नामस्मरणासाठी ग्रंथ वाचनाची आवश्यकता नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, “वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वाहावा भार माथा… “नुसते पुस्तकी ज्ञान किंवा शब्दपांडित्य महत्त्वाचे नसून, भगवंताच्या नामाची अनुभूती घेणे आणि अंतःकरणात भक्ती बाळगणे हेच वेदांचे खरे सार आहे हेच तुकाराम महाराजांना या ठिकाणी सांगायचे आहे.

दुसरी गोष्ट अशी की हे रामनाम मुखाने घेण्यास कोणतेही कष्ट पडत नाही. इतर तपसाधनेत तरी देहाला कष्ट पडतात. त्याचप्रमाणे तीर्थयात्रा वगैरे करायची म्हटले तरी देहाला कष्ट घ्यावेच लागतात. पदरचा पैसा खर्च करावा लागतो. पण रामनाम घेण्यासाठी यातील काहीही करावे लागत नाही. फक्त आपली इच्छा मात्र हवी. त्यासाठी स्वतंत्र वेळ देण्याची आवश्यकता नाही. सर्व संतांनी आपापली कामे करताना मुखाने हरिनामाचा जप सुरु ठेवला होता. आपणही आपली नित्यकर्मे करताना वाचेने किंवा मनाने भगवंताचे नाम घेऊ शकतो.

आपण सामान्य माणसे ! संसारात अडकलेलो असतो. बांधले गेलेलो असतो. पण हे बंधन दिसत नाही आणि कळतही नाही. आपले आयुष्य शेवटपर्यंत संसारासाठी धावाधाव करण्यातच जाते. शेवटी एक वेळ अशी येते की आपण हे सगळे कोणासाठी आणि कशासाठी केले असे वाटून पश्चाताप होतो. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. संसार म्हणजे विवाहित माणसाचा पती, पत्नी, मुले, नातेवाईक असा साधारण अर्थ आपण घेतो. पण जो माणूस जन्माला आला तो या संसारात अडकला. मग तो विवाहित असो वा अविवाहित. एका संसार या शब्दाचा व्यापक अर्थ हे जग असाही आहे. जीवनाबद्दल एका हिंदी गीतात फार सुंदर ओळी आहेत. ‘ संसार हैं एक नदिया, दु:ख सुख दो किनारे हैं, ना जाने कहाँ जाए हम बहते धारे हैं… ‘अशा या संसाररूपी नदीतून तरून जायचं असेल तर रामनामाशिवाय तरणोपाय नाही.

संसार गोड वाटतो, जिव्हाळ्याचा वाटतो पण तो आपला मोठाच शत्रू आहे हे लक्षात येत नाही. ते लक्षात येते तेव्हा आयुष्याची किंमत आपण मोजलेली असते. एखाद्या गोष्टीचे माणसाला जेव्हा व्यसन लागते, तेव्हा ती गोष्ट त्याला अती प्रिय होते. मग ती वाईट आहे हे कळले तरी ती त्याला सोडवत नाही. तंबाखू, दारू इ. चे व्यसन लागलेल्यांची अशीच अवस्था होते.

समर्थ श्रीरामस्तुती करताना म्हणतात, ” संसारसंगे बहू शीणलों मी, कृपा करी रे रघुराज स्वामी. ” संसार हा आपला महाशत्रू आहे हे लक्षात घेऊन वागणाऱ्याला संसार बाधत नाही. तो संसारात असतो पण साक्षीभावाने प्रपंचाकडे पाहतो. हे सगळे प्रारब्धाचे खेळ आहेत हे तो जाणून असतो. सर्वसामान्यांना तो संसारात रमलेला दिसेलही पण त्याचे चित्त भगवंताकडे असते. आपण बसने किंवा रेल्वेने प्रवास करीत असतो. काहीवेळा सोबत असलेल्या सहप्रवाशांशी आपल्या छान गप्पा होतात. पण आपले स्टेशन आले की आपल्याला उतरावे लागणार हे आपण जाणून असतो. त्यामुळे त्या सहप्रवाशाना सोडून जाताना विशेष दुःख होत नाही. असेच आपण संसारातही असावे. पाण्यात राहूनही चिखलापासून अलिप्त असणाऱ्या कमलदलांप्रमाणे ! हे सगळे सांगणे सोपे पण आचरणे कठीण आहे. पण रामनाम घ्यायला तर सुरुवात करू या. तेव्हा हे मना, अधिक वेळ दवडू नकोस. प्रभात समयापासून भगवंताचे चिंतन कर असेच समर्थ आपल्याला या श्लोकातून सांगू इच्छितात.

स्वसंवाद :: 

१. ज्या ऐहिक सुखांसाठी आणि पैशासाठी मी रात्रं-दिवस देह झिजवतो, ते सुख मला कधी चिरंतन शांतता देऊ शकेल का?

२. नामस्मरणासाठी पैशांचा खर्च नाही आणि देहाला कष्टही नाहीत, तरीही मी ते टाळण्यासाठी वेळेचे किंवा थकव्याचे निमित्त शोधतो का?

३. संसारातील नाती आणि कर्तव्यांमध्ये मी इतका गुरफटलो आहे का, की मला या सगळ्याकडे ‘साक्षीभावाने’ किंवा अलिप्तपणे पाहता येत नाहीये?

४. पाण्यात राहूनही चिखलापासून अलिप्त राहणाऱ्या कमळाप्रमाणे, मी संसारात राहूनही माझे चित्त भगवंतचरणी ठेवण्याचा प्रयत्न करतो का?

– क्रमशः श्लोक ७१ आणि ७२

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आराम करा ?.. नाही.. नको.. – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ आराम करा ?.. नाही.. नको.. – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

 – – – एका जेरियाट्रिशियन (वृद्धावस्था तज्ज्ञ) यांच्या मनातून उमटलेले शब्द

वृद्धापकाळात एखादी व्यक्ती दीर्घकाळ अंथरुणाला खिळून राहिली आणि तिची मुले फक्त “आराम करा… घाई करू नका… ” एवढेच म्हणत राहिली, तर अनेकदा तिथूनच सर्वात धोकादायक परिस्थितीची सुरुवात होते.

– – – “वृद्ध व्यक्तीसाठी अंथरुणावर पडणे सोपे असते; पण पुन्हा उठणे अत्यंत कठीण असते. अनेक वेळा आजार माणसाला मारत नाही, तर अंथरुण मारते. “

मी डॉ. सॉंग युआनमिंग, वय ५४ वर्षे.

… गेली २७ वर्षे एका नामांकित रुग्णालयाच्या जेरियाट्रिक्स (वृद्धावस्था चिकित्सा) विभागात कार्यरत आहे.

या काळात १६, ००० हून अधिक रुग्णांवर उपचार केले आणि २, ४०० पेक्षा अधिक गंभीर स्थितीची प्रमाणपत्रे लिहिली.

आज मी वैद्यकीय परिभाषा वापरणार नाही. मी फक्त माझ्या डोळ्यांसमोर घडलेल्या तीन सत्य घटना सांगणार आहे.

… या तिन्ही कथा प्रत्येकाच्या आई-वडिलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

पहिली घटना (२०१९ – शरद ऋतू)

रुग्ण: ८१ वर्षीय निवृत्त शिक्षक श्री. सन

त्यांच्या मांडीच्या हाडाला (Femoral Neck) फ्रॅक्चर झाले होते.

शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

तिसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितले,

“वॉकरच्या साहाय्याने चालण्याचा प्रयत्न सुरू करा. “

मात्र मुलगा म्हणाला,

“बाबा इतके वयस्कर आहेत… पुन्हा पडले तर? त्यांना आराम करू द्या. “

गेल्या २७ वर्षांत मी “आराम करा” हे शब्द किमान ५०० वेळा ऐकले आहेत.

आणि प्रत्येक वेळी माझ्या अंगावर काटा आला.

कारण ८० वर्षांवरील व्यक्तीसाठी हे तीन शब्द अनेकदा मृत्यूकडे नेणारे ठरतात.

श्री. सन यांनी मुलाचे ऐकले.

ते अंथरुणावरच राहिले.

– ७ वा दिवस – खोकला सुरू झाला.

– १२ वा दिवस – ३८. ७° ताप; CT मध्ये फुफ्फुसांचा Hypostatic Pneumonia आढळला.

– १८ वा दिवस – ICU मध्ये दाखल.

– २३ वा दिवस – निधन.

… त्यांचा मृत्यू फ्रॅक्चरमुळे झाला नाही.

शस्त्रक्रियेच्या गुंतागुंतीमुळेही झाला नाही.

तर दीर्घकाळ अंथरुणावर पडून राहिल्यामुळे झालेल्या न्यूमोनियामुळे झाला.

हाड बरे झाले… पण फुफ्फुसे अंथरुणामुळे निकामी झाली.

दुसरी घटना (जानेवारी २०२१)

रुग्ण: ७८ वर्षीय पक्षाघात (स्ट्रोक) झालेला रुग्ण – श्री. ली

दहा दिवसांनी त्यांची प्रकृती स्थिर झाली.

मी त्यांच्या मुलीला सांगितले,

“आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुनर्वसन (Rehabilitation). “

– दिवसातून किमान दोनदा बसवा.

– प्रत्येक वेळी ३० मिनिटे.

– शक्य असल्यास उभे करा.

– थोडे चालवा.

मुलगी अतिशय सेवाभावी होती.

२४ तास काळजी घेण्यासाठी केअरटेकर ठेवला.

जेवण, औषधे, अंघोळ, डायपर… सर्व काही व्यवस्थित.

पण एक गोष्ट झाली नाही… त्यांना हलवलेच गेले नाही.

तिला भीती वाटत होती—

दुखेल… थकतील… पडतील…

जेव्हा केअरटेकर त्यांना बसवण्याचा प्रयत्न करायचा, ती म्हणायची—

“जबरदस्ती करू नका… आराम करू द्या. “

तीन महिन्यांनंतर… त्यांचा दुसराही पाय निकामी झाला.

हा दुसरा स्ट्रोक नव्हता.

तर Muscle Atrophy (स्नायूंचे झपाट्याने क्षीण होणे) होते.

दीर्घकाळ अंथरुणावर राहिल्यास—

– दर आठवड्याला १. ५ ते ३% स्नायू नष्ट होतात.

– तीन महिन्यांत जवळपास ४०% स्नायू कमी होतात.

परिणाम—

अर्धांगवायू → पूर्ण अर्धांगवायू

“अजून उभे राहू शकतात”

“आता कधीच उभे राहू शकणार नाहीत. “

ते आणखी १४ महिने जगले.

– – या काळात त्यांना तीन बेडसोर झाले.

सर्वात मोठी जखम इतकी खोल होती की हाड दिसत होते.

ड्रेसिंग करताना ते टॉवेल घट्ट पकडून वेदना सहन करायचे…

डोळ्यांतून अश्रू वाहायचे.

प्रत्येक वेळी मुलगी रडत म्हणायची—

“बाबा… आराम करा… “

हेच शब्द… सर्वात मृदू… पण सर्वात क्रूर ठरले.

तिसरी घटना (२०२३)

रुग्ण: ८३ वर्षीय श्री. झाओ

Hip Replacement शस्त्रक्रिया झाली होती.

त्यांचा मुलगा अभियंता होता.

दुसऱ्या दिवशी तो वही घेऊन माझ्याकडे आला.

“डॉक्टर, कृपया सात दिवसांचा पुनर्वसन कार्यक्रम लिहून द्या. “

मी योजना तयार केली—

– दिवस १ – घोट्याचे व्यायाम (प्रत्येक तासाला २० वेळा)

– दिवस २ – पाय उचलणे (१० × ४)

– दिवस ३ – वॉकरच्या सहाय्याने २ मिनिटे उभे राहणे

– दिवस ५ – १० पावले चालणे (४ वेळा)

– दिवस ७ – ८ मीटर चालणे

त्यांना वेदना झाल्या का?

हो.

तिसऱ्या दिवशी उभे राहताना त्यांच्या कपाळावर घाम होता…

ओठ पांढरे पडले होते.

मुलाने मात्र असे म्हटले नाही—

“आराम करा. “

त्याने फक्त एवढेच म्हटले—

“बाबा… फक्त ३० सेकंद उभे रहा… मी टाइमर लावला आहे. “

फक्त ३० सेकंद…

त्यांनी दात ओठ खात ते पूर्ण केले.

आणि तेच ३० सेकंद त्यांच्या आयुष्यातील सर्वात प्रभावी औषध ठरले.

१४ व्या दिवशी…

ते स्वतःच्या पायांनी चालत वॉर्डच्या बाहेर आले.

हळूहळू… पण स्वतःच्या पायांवर.

त्या वर्षीच्या १८४ रुग्णांमध्ये त्यांची पुनर्प्राप्ती (Recovery) सर्वोत्कृष्ट होती.

२७ वर्षांच्या अनुभवातून शिकलेले ५ धडे

१. दोन आठवड्यांपेक्षा जास्त अंथरुणावर राहणे म्हणजे स्नायूंचा झपाट्याने ऱ्हास.

अंथरुण म्हणजे विश्रांती नव्हे…

तो विनाशाची सुरुवात असू शकतो.

२. पहिले ७२ तास हे सुवर्णक्षण (Golden Period) असतात.

याच काळात हालचाल सुरू झाली की नाही, यावर पुढील आयुष्य ठरते.

३. सर्वात धोकादायक तीन गोष्टी

– न्यूमोनिया

– रक्ताच्या गाठी (Blood Clots)

– बेडसोर

.. या अनेकदा मूळ आजारापेक्षाही अधिक जीवघेण्या ठरतात.

४. चुकीचा सेवाभाव

रुग्णाचे प्रत्येक काम आपणच करणे…

त्यांना अधिक अपंग बनवू शकते.

५. खरी सेवा म्हणजे…

त्यांना पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न करणे.

कधी कधी त्यासाठी थोडे कठोर व्हावे लागले तरी.

शेवटचा संदेश

मला विचारले गेले—

“तुम्हाला सर्वात जास्त कशाची भीती वाटते?”

मी उत्तर दिले—

“मला गंभीर आजाराची भीती वाटत नाही. “

“मला भीती वाटते जेव्हा कोणी म्हणते— ‘आराम करा. ‘”

कारण त्या क्षणी…

प्रयत्न करण्याची इच्छा संपलेली असते.

मी माझ्या कुटुंबालाही सांगितले आहे—

“जर मी कधी अंथरुणाला खिळलो… तर मला कधीही ‘आराम करा’ असे म्हणू नका. “

“मला उठवा… चालवा… टाइमर लावा… आणि सांगा—

‘बाबा… फक्त अजून ३० सेकंद!'”

आपल्या सर्वांसाठी

देव करो, आपल्या आई-वडिलांवर अशी वेळ कधीच येऊ नये.

परंतु जर आलीच—

✖️ “आराम करा” असे म्हणू नका.

✔️”मी तुम्हाला उभे राहायला मदत करतो. ” असे म्हणा.

कदाचित ते ३० सेकंद…

त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतील.

कारण…

स्वतःच्या पायांनी चालत शौचालयापर्यंत जाणे—

ही वृद्धापकाळातील सर्वात मौल्यवान स्वातंत्र्याची भावना आहे.

ते जपा… आजपासूनच.

टीप: प्रत्येक रुग्णाची परिस्थिती वेगळी असते. शस्त्रक्रिया, स्ट्रोक किंवा गंभीर आजारानंतर हालचाल सुरू करण्याचा निर्णय नेहमी उपचार करणाऱ्या डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्ट यांच्या सल्ल्यानुसारच घ्यावा. 

***

माहिती संग्राहक : अज्ञात

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… पंढरीचे वर्णन – भाग – २८ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथापंढरीचे वर्णन – भाग – २८ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

पंढरीचे वर्णन

भूतलावरील वैकुंठ, पंढरपूर या श्रीक्षेत्राचे वर्णन आणि महात्म्य सांगणाऱ्या गाथेतील अभंगांचे आपले विवेचन चालू आहे. आज आणखी काही अभंग पाहूया.

पंढरपूर कसे आहे, तेथे काय काय चालते याचे वर्णन करणारा हा एक फार सुंदर अभंग पहा.

जववरी नाही देखिली पंढरी/

वर्णीशील थोऱी वैकुंठीची//

मोक्ष सिद्धी तेथे हिंडे दारोदारी/

होऊनी कामारी दीनरूप//

वृंदावन सडे चौक रंगमाळा/

अभिनव सोहळा घरोघरी//

नामघोष कथा पुराण कीर्तनी/

ओवीया कांडणी पांडुरंग//

सर्व सुख असे तेथे सर्वकाळ/

ब्रह्म ते केवळ नांदतसे//

तुका म्हणे जे न साधे सायासे/

प्रत्यक्ष ते दिसे विटेवरी//

तुकाराम महाराज भक्ताला सांगतात, ” जोपर्यंत तू पंढरपूर पाहिले नाहीस, तोपर्यंत तू वैकुंठाची थोरवी वर्णन करशील. या पंढरपुरात सिद्धी आणि मोक्ष सांगकामे(कामारी) होऊन दारोदार दीनपणे हिंडत असतात. अर्थात ज्याचे पाय पंढरपुरास लागतात, त्याला मोक्षप्राप्ती नक्की होते. इथे घरोघरी तुळशी वृंदावने आहेत, रस्ते झाडून जागोजागी सडासंमार्जन आणि रांगोळ्या घातलेल्या दिसतात. घरोघरी अभिनव सोहळे चालू आहेत. कथा, पुराणे, कीर्तने, नामघोष होत आहेत. दळण- कांडण करताना स्त्रिया पांडुरंगाला आळवून ओव्या गात आहेत. या इथे सर्वकाळ सर्व सुखे असून मूर्तीमंत ब्रह्माचा वास आहे. मोठ्या कष्टाने जे प्राप्त होऊ शकत नाही, ते ब्रह्म या ठिकाणी प्रत्यक्ष विटेवर उभे आहे.

होय होय वारकरी/ पाहे पाहे रे पंढरी//

काय करावी साधने/ फळ अवघेची येणे//

अभिमान नुरे/ कोड अवघेची पुरे//

तुका म्हणे डोळा/ विठोबा बैसला सावळा//

पुढे महाराज भक्तांना सांगतात की, वारकऱ्यांनो पंढरीचे दर्शन घ्या. बाकीच्या साधनांची काही जरुरी नाही. सर्व फळ या पंढरपुरातच मिळते. अभिमान राहत नाही.

(या ठिकाणी अभिमानाचा अर्थ देहाभिमान असा आहे) सर्व मनोकामना पूर्ण होतात. डोळ्यामध्ये सावळ्या विठ्ठलाचे रूप भरून राहते, त्यामुळे सर्वत्र त्याचाच प्रत्यय येतो.

पंढरीसी जाये/ तो विसरे बाप माय//

अवघा होय पांडुरंग/ राहे धरुनिया अंग//

नलगे धन मान/ देह भावे उदासीन//

तुका म्हणे मळ/ नाशी तात्काळ ते स्थळ//

यासाठी वारकऱ्यांनो पंढरपुरी जा, तेथील पांडुरंगाचे दर्शन घेतल्यावर तुम्ही तुमचे मायबाप विसराल. याचाच अर्थ असा तुम्हाला प्रापंचिक आसक्ती राहणार नाही. तुम्ही स्वतःच पांडुरंग रुपी व्हाल आणि त्याच स्थितीत राहाल. कसलाच अभिमान न राहता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. धनद्रव्य, मानसन्मान याची इच्छा तुमच्या ठिकाणी राहणार नाही, कारण देहाविषयी तुम्ही उदास व्हाल. पंढरपूर हे क्षेत्र त्रिगुणरूपी मळाचा विनाश करणारे आहे.

पंढरीचा महिमा कसा अगाध आहे, याचे वर्णन तुकाराम महाराज या खालील अभंगात करतात.

पंढरीस दुःख न मिळे ओखदा/

प्रेम सुख सदा सर्वकाळ//

पंढरपुरात निरंतर पांडुरंगाचे प्रेम सुख असल्यामुळे दुःख औषधालाही (ओखदा) मिळत नाही.

पुंडलिके हाट भरियेली पेठ/

अवघे वैकुंठ आणियेले//

पंढरपुरीची पेठ भक्त पुंडलिकाने वसविली असल्यामुळे त्याने तेथे संपूर्ण वैकुंठ आणले आहे.

उदीमासी तुटी नाही कोणा हाणी/

घेउनिया धणी लाभ घेती//

या ठिकाणी व्यापार-उदीमात खोट कधीच येत नाही. नुकसान जराही नसून फायदाच फायदा आहे.

पुरले देशाशी भरले सिगेसी/

अवघी पंचक्रोशी दुमदुमित//

या पेठेत विठ्ठल हाच माल आहे. देशाला पुरेल एवढा माल शिगोशीग भरला आहे. पंढरीची पंचक्रोशी अशी या मालाने दुमदुमून गेली आहे.

तुका म्हणे संता लागलीसे धणी/

बैसले राहोनी पंढरीस//

सर्व संतांना येथे फार तृप्ती, समाधान लाभले आहे. कारण विठू माऊली त्यांना भेटली आहे, म्हणून ते पंढरीतच वास करून राहिले आहेत.

सुरवर येती तीर्थे नित्य काळ/

पेठ त्या निर्मळ चंद्रभागा//

साक्षभूत नव्हे सांगितली मात/

महिमा अत्यद्भूत वर्णवेना//

पंचक्रोशीमाजि रीघ नाही दोषा/

जळती आपैसा अघोर ते//

निर्विषय नर चतुर्भुज नारी/

अवघा घरोघरी ब्रह्मानंदू//

तुका म्हणे ज्यापे नाही पुण्यलेश/

जारे पंढरीस घेई कोटी//

चंद्रभागारुपी ही पेठ अतिशय शुद्ध आहे म्हणून इथे देवही येतात आणि सारी तीर्थेही येतात. ही गोष्ट नुसती ऐकीव नाही किंवा सांगोवांगी नाही तर प्रत्यक्ष अनुभवलेली आहे असे तुकाराम सांगत आहेत. या पेठेचा अद्भुत महिमा वर्णन करण्यास शब्द नाहीत.

या पंचक्रोशी मध्ये कोणत्याही दोषांना प्रवेश नाही. संचितात जे काही मोठे दोष असतील ते येथे आपोआप गळून जातात. या ठिकाणी स्त्रिया- पुरुष चतुर्भुज निर्विषय देवाप्रमाणे विषयहीन आहेत. त्यांच्या काम- वासना जळून गेल्या आहेत. घरोघरी ब्रह्मानंद आहे. ज्यांच्यापाशी पुण्याचा लवलेश नाही, त्यांनी पंढरीस जाऊन लागेल तेवढे पुण्य प्राप्त करून घ्यावे.

या अभंगात तुकाराम महाराज काय सांगतात?

अवघीच तीर्थे घडली एक वेळा/

चंद्रभागा डोळा देखिलिया//

अवघीच पापे गेली दिगंतरी/

वैकुंठ पंढरी देखिलिया//

अवघिया संता एक वेळा भेटी/

पुंडलिक दृष्टी देखिलिया//

तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक/

विठ्ठलची एक देखिलिया//

ज्याने चंद्रभागेचे दर्शन घेतले, त्याला सकल तीर्थांचे स्नान घडले. एवढे हे दर्शन पुण्यकारक आहे. भूतलीचे हे वैकुंठ, पंढरपूर पाहिले असता सर्व पातके नाहीशी होतात, दिगंतरात जातात. एका पुंडलिकाचे दर्शन घेतले की सर्व संतांच्या दर्शनाचा लाभ होतो आणि एका विठ्ठलाचे दर्शन घेतल्याने आपण जन्माला आल्याचे सार्थक होते.

असा आहे हा पंढरीचा महिमा. चला तर मग पंढरीसी जाऊ /विठू माऊलीला/

डोळा भरू पाहू//

क्रमशः… २८

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares