— आनंदासाठी आपल्या माणसांच्या भेटी हे उत्तम टॉनिक.
झालं असं की,
रविवारी निवांत होतो. घर, ऑफिस, मिटिंग्स, टार्गेटस, ईएमआयमध्ये गुरफटलेल्या आयुष्यात सुट्टीचंसुद्धा एक रुटीन होतं. तेच ते अन तेच ते. आराम करायचा असं ठरवलं तरी काही वेळातच त्याचाही कंटाळा येतो. आजही तेच झालेलं, कामात असताना वेळ पुरत नाही पण आज मात्र वेळ जाता जात नव्हता. खूप कंटाळा आलेला. कशातच लक्ष लागत नव्हतं. विचित्र अशी बेचैनी. कडक उन्हामुळं बाहेर जायची अजिबात इच्छा नव्हती. इतक्यात मित्राचा फोन “काय करतोयेस”
“ऐक ना”मी टाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा जिवलग मित्रांच्या ‘खास प्रेमाच्या भाषेत’ मित्रानं सुरवात केली अर्थात मीही तसाच प्रतिसाद दिला. आयुष्यात काही खास माणसं असतात ज्यांच्यासोबत सगळे मुखवटे काढून मनमोकळं वागता येतं, वाट्टेल ते बोलता येतं. कुठंही ईगो आड येत नाही. आमची मैत्री अशीच होती.
माझी वेगवेगळी कारणं ऐकून मित्र भडकला. “ए गप ऐक. मला काही माहीत नाही. तू येतोयेस. बाय!! ”फोन कट.
थोड्याच वेळापूर्वी भाजीसाठी सोबत येण्याचा सौंनी आग्रह केला तेव्हा मी टाळलं आणि आता मित्राचा फोन. आवरून घराबाहेर पडताना सौंकडे पाहिलं काही प्रतिक्रिया नाही पण तिचा कटाक्ष बरंच काही सांगून गेला.
काही वेळातच चार दिशांना राहणारे आम्ही भेटलो. पद, प्रतिष्ठा, शिक्षण, मान, पैसा, श्रीमंती, जबाबदारी, वयानुसार आलेला पोक्तपणा सगळं सगळं बाजूला ठेवून चेष्टा, मस्करीत गुंग झालो. मस्त फिलिंग होतं.
“बरं झालं आलो. मजा आली. ”
“म्हणूनच आग्रह केला. जास्त नखरे करायला चान्सच दिला नाही. ”
“बिझी लाईफमुळं एकाच शहरात असूनदेखील भेटणं होत नाही. त्यापेक्षा असं अचानक भेटण्यातली मजा काही औरच. ”
“मुद्दाम वेळ काढून भेटणं, घरी जाणं यासारख्या गोष्टी आता दुर्मिळ झाल्यात. ”
“हो रे, आता न कळवता भेटायला गेलो तर आवडतं नाही. ”
“नात्यातली सहजता केव्हाच संपलीय आता फक्त औपचारीकपणा. ”
“फोन, मेसेजेस, चॅटिंग, व्हिडीओ कॉलमुळे कनेक्ट असला तरीही प्रत्यक्ष भेटीतला आनंद वेगळाच. ”
“भाऊ, म्हणूनच म्हणतो अधून मधून तोंड दाखवत जा. बरं वाटतं”गप्पांच्या नादात दोन तास कसे गेले कळलचं नाही. मूड एकदम ताजातवाना झाला.
“थॅंक्स यार, भारी वाटलं. आता पुन्हा पुन्हा भेटू. ” निरोप घेताना प्रत्येकाच्या मनात हीच भावना होती. गाणं गुणगुणत घरात आलो तेव्हा सौं सूचक हसली. “अरे वा, मूड चांगला दिसतोय”
“येस्स.. ”
“जेवणार आहात की मित्रांना भेटून पोट भरलयं. ”सौंचा चिमटा.
“मन तृप्त झालंय. आता पोटपूजा”
कामं, जबाबदाऱ्या तर कायम असणार तरीही वेळ काढून आपल्या माणसांना भेटत रहा. छान वाटतं.
☆ “२१ जून : खगोलीय आणि भूगोलीय महत्त्व” ☆ श्री जगदीश काबरे ☆
२१ जून चे महत्व विशद करणारे ए आय निर्मित छायाचित्र…
२१ जून हा दिवस पृथ्वीच्या परिभ्रमण कालातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या दिवशी उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वांत मोठा दिवस आणि दक्षिण गोलार्धात सर्वांत लहान रात्र अनुभवास येते. यालाच ग्रीष्म अयनांत (Summer Solstice) म्हणतात. हा दिवस केवळ खगोलशास्त्रीय दृष्टीनेच नव्हे तर भूगोल, हवामानशास्त्र, शेती आणि मानवी संस्कृतीच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे. मी सांगलीत राहत असल्यामुळे या दिवसाची माहिती खालील प्रमाणे आहे. सांगलीचे अक्षांश सुमारे १६.८५° उत्तर असल्यामुळे २१ जून रोजी सूर्योदय साधारण सकाळी ५:५८ ते ६:०० दरम्यान झाला आणि सूर्यास्त सायंकाळी ७:०५ ते ७:०७ दरम्यान होणार आहे. म्हणजे आज २१ जूनला सांगलीत दिवसाची लांबी साधारण १३ तास ७ ते १० मिनिटे इतकी आहे.
पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करत असताना तिचा अक्ष सुमारे २३.५ अंशांनी कललेला असल्यामुळे २१ जून रोजी उत्तर ध्रुव सूर्याच्या लंबरेषेत असतो. त्यामुळे सूर्याची किरणे थेट कर्कवृत्तावर (२३.५ अंश उत्तर अक्षवृत्त) लंब रेषेत पडतात. या दिवशी दुपारी सूर्य कर्कवृत्तावर आकाशात सर्वाधिक उंचीवर दिसतो. याच कारणामुळे उत्तर गोलार्धात सूर्यप्रकाशाचा कालावधी सर्वाधिक असतो. त्याउलट दक्षिण गोलार्धात हा दिवस सर्वांत लहान आणि रात्र सर्वांत मोठी असते. तेथे हा हिवाळी अयनांत (Winter Solstice) असतो. तसेच २१ जून हा दिवस पृथ्वीवरील उष्णतेच्या वितरणासाठी महत्त्वाचा आहे. कर्कवृत्तावर सूर्यकिरणे लंब रेषेत पडल्यामुळे उत्तर गोलार्धातील भूमी अधिक तापू लागते. जमीन समुद्रापेक्षा लवकर तापत असल्याने आशियाई खंडावर कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होतो. याच प्रक्रियेमुळे भारतीय मान्सूनला बळ मिळते. त्यामुळे अप्रत्यक्षपणे २१ जूनचा संबंध भारतातील पावसाळ्याशीही जोडला जातो.
या दिवशी ध्रुवीय प्रदेशांमध्ये विलक्षण घटना घडतात. उत्तर ध्रुवाजवळील भागात सूर्य २४ तास मावळत नाही. याला मध्यरात्रीचा सूर्य (Midnight Sun) म्हणतात. तर दक्षिण ध्रुवीय प्रदेशात २४ तास अंधार असतो. मानवी संस्कृतीच्या इतिहासातही २१ जूनला विशेष स्थान आहे. प्राचीन काळातील अनेक संस्कृतींनी अयनांतांचे निरीक्षण करून कालगणना विकसित केली. अनेक प्राचीन वेधशाळा, मंदिरे आणि स्मारके सूर्याच्या या स्थितीशी सुसंगत रचली गेली होती. कारण शेती, ऋतू आणि मानवी जीवन यांचा संबंध सूर्याच्या गतीशी अतूट होता.
भारतीय संदर्भात २१ जूनला आणखी एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. २०१४ मध्ये भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. वर्षातील सर्वांत मोठा दिवस असल्याने आणि भारतीय परंपरेत सूर्य व ऋतूचक्राला असलेल्या महत्त्वामुळे ही तारीख निवडण्यात आली. मात्र एक मनोरंजक बाब लक्षात आली, ती म्हणजे २१ जून हा दिवस सर्वाधिक सूर्यप्रकाशाचा असला तरी तो सर्वाधिक उष्णतेचा दिवस असेलच असे नाही. पृथ्वीची जमीन आणि महासागर उष्णता साठवून ठेवतात. त्यामुळे अनेक भागांत जूनच्या उत्तरार्धात किंवा जुलैमध्ये तापमानाची कमाल नोंदली जाते. याला ऋतूगत विलंब (Seasonal Lag) असे म्हणतात. हा दिवस आपल्याला स्मरण करून देतो की पृथ्वीवरील जीवन, हवामान आणि ऋतू यांचे मूळ आपल्या ग्रहाच्या अवकाशातील स्थान आणि गतीमध्ये दडलेले आहे.✍️
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ६१ आणि ६२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ६१ – – –
उभा कल्प वृक्षातळी दुःख वाहे |
तया अंतरी सर्वदा ते चि आहे |
जनी सज्जनी वाद हा वाढवावा |
पुढे मागुता शोक जीवी धरावा |६१|
अर्थ : एखादा माणूस कल्पवृक्षाच्या खाली उभा आहे परंतु त्याच्या मनात जर दुःखाची किंवा दुःख देणाऱ्या इच्छांचीच कामना असेल तर त्याला आयुष्यभर दुःखच भोगावे लागेल. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती संतांकडे गेली आणि त्यांच्याशी निरर्थक वाद घालू लागली तर त्यालाही आयुष्यभर दुःखालाच सामोरे जावे लागेल.
(वाहे- सुरू राहील, सज्जन- साधू पुरुष, वाद- निरर्थक चर्चा)
विवेचन :आधीच्या श्लोकात श्रीराम किंवा भगवंत म्हणजे कल्पतरू आहे असे समर्थांनी सांगितले. परंतु असा कल्पतरू किंवा कल्पवृक्ष आपल्याजवळ असताना त्याच्या छायेत उभे राहून दुःखाची किंवा दुःख देणाऱ्या गोष्टींची कामना करीत राहिलो तर आपल्या वाट्याला दुःख येईल आणि आयुष्यभर ते दुःखच सुरू राहील. काही माणसांचा स्वभावाच असा असतो की ते आपल्या विचारांनी स्वतःलाच दुःखी करून घेतात. चेहऱ्यावर कायमच बारा वाजलेले असतात. माझ्याच वाट्याला हे दुःख का? मी फार कमनशिबी आहे. मला कुठलीही गोष्ट सहजपणे मिळत नाही. अशा प्रकारचे निराशेचे विचार त्यांच्या मनामध्ये कायम घोळत असतात. आणि परिणामी दुःखच त्यांच्या वाट्याला येते. अशा लोकांबद्दल बोलताना समर्थ म्हणतात की असे लोक कल्पवृक्षाच्या खाली बसूनही दुःखच करीत राहतात त्यांच्या इतके अभागी कोणीच नाही.
खरे संत किंवा साधू पुरुष मुळातच भेटणे दुर्मिळ असते. ते आपल्यासाठी मोक्षमार्गाचे दिशादर्शक असतात. त्या मार्गावर कशी वाटचाल करावी याचे मार्गदर्शन ते करतात. त्यांच्या मनात सदैव आपल्या कल्याणाचीच इच्छा असते. म्हणूनच संतांबद्दल बोलताना तुकाराम महाराजांनी, ” संतांचिया गावी प्रेमाचा सुकाळू” असे म्हटलेआहे. पण काही व्यक्ती संतांजवळ आपले कल्याण करून घेण्याच्या हेतूने जात नाहीत. त्यांना नको ते प्रश्न विचारून किंवा त्यांच्याशी निरर्थक वाद घालून आपली विद्वत्ता ते दाखवण्याचा प्रयत्न करीत असतात. खरंच देव आहे का? तुम्ही पाहिला आहे का? देव आहे हे कशावरून? हे सगळे परमेश्वराच्याच मर्जीने घडते याचा काय पुरावा आहे? यासारखे निरर्थक प्रश्न असे लोक विचारत राहतात आणि निरर्थक व्यर्थ वाद घालत राहतात.
परमेश्वराच्या भक्तीचे महत्व, परमेश्वराची भक्ती कशी करावी, अनुसंधान कसे टिकवून ठेवावे या सर्व गोष्टी त्यांच्याकडून समजून घेण्याऐवजी त्यांच्याशी जर आपण अशा निरर्थक गोष्टींवर वाद घालत राहिलो तर आपल्या वाट्याला आयुष्यभर दुःखच येणार हे निश्चित! आणि वेळ निघून गेल्यानंतर आपली चूक कळली तरी काही उपयोग नसतो.
परमेश्वर सर्वव्यापी आहे. या अर्थाने आपण २४ तास कल्पवृक्षाच्या खाली उभे असतो. कल्पवृक्ष म्हणजे मागितलेले सगळे काही देणारा. या कल्पवृक्षाच्या खाली उभे राहून आपण ज्या काही इच्छा व्यक्त करू, त्यांना ‘तथास्तु’ म्हणून तो आशीर्वाद देत असतो. म्हणून नेहमी विधायक बोलणे, चांगल्या इच्छा ठेवणे आणि चांगले गोष्टींची कामना करणे हे आपल्या मनामध्ये असले पाहिजे. म्हणजे या चांगल्या गोष्टींसाठी त्या कल्पवृक्षाचा आशीर्वाद लाभेल. तो तथास्तु म्हणेल आणि त्या गोष्टी आपल्याकडे परत येतील. परंतु आपण जर दुःख देणाऱ्या गोष्टींची किंवा वाईट गोष्टींची अपेक्षा ठेवली तर त्याच गोष्टी आपल्याकडे परत येणार आहेत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर यालाच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन असे म्हणतो.
या ठिकाणी आपला असाही गैरसमज होण्याची शक्यता आहे की वाईट इच्छा आपण कशाला व्यक्त करू? परंतु आपण कामना करतो ते दुःख देणार्या गोष्टींचीच. भौतिक सुखे, ऐहिक गोष्टी आपल्याला हव्या असतात. पण त्या अंतिमतः दुःखच देतात. श्रेयस मागण्याऐवजी आपण प्रेयसाचीच कामना करतो. म्हणून आपल्या विचाराने आपणच आपले भविष्य घडवत असतो. आपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार असतो.
समजा प्रत्यक्ष परमेश्वर भेटला किंवा अचानक कल्पवृक्षाच्या खाली बसण्याचे भाग्य लागले तर अशावेळी काय मागावे हे सुद्धा आपल्याला कळले पाहिजे. एका भिकारी माणसाने एक लॉटरीचे तिकीट विकत घेतले आणि अशी इच्छा करत बसला की मला जर ही लॉटरी लागली तर मी खूप श्रीमंत होईल आणि गाडीत बसून भीक मागेन. तेव्हा काय मागायचे किंवा इच्छा सुद्धा काय करायची याचेही ज्ञान हवे. त्यासाठी साधनेची आवश्यकता असते. मनामध्ये लोककल्याणाची भावना हवी. साधुसंत भेटल्यानंतर त्यांच्याकडून आत्मोद्धार कसा करून घेता येईल याबद्दल विचार करता यायला हवा. आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या इंद्रियांना वळण लावायला हवे. त्यासाठी वैराग्य आणि विवेक या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अन्यथा नंतर केवळ पश्चातापच हाती उरतो.
म्हणूनच समर्थ या श्लोकातून आपल्याला बजावतात की कल्पवृक्षाची सावली सदैव आपल्यावर आहे, परंतु त्या सावलीचा लाभ घेण्यासाठी आपले मन शुद्ध, विवेकी आणि श्रेयसाभिमुख असणे अत्यावश्यक आहे. संतांची संगती हे त्याचेच साधन. आणि ते साधन वाया घालवणे म्हणजे स्वतःच स्वतःला दुःखाच्या गर्तेत लोटणे होय.
स्वसंवाद ::
१. माझ्या आयुष्यात कल्पवृक्ष म्हणजे परमेश्वर सदैव सोबत आहे, हे मला खरोखर मनापासून वाटते का?
२. मी रोज जे विचार करतो, जे शब्द उच्चारतो, ते विधायक असतात की निराशेचे? माझ्या मनाचा कल कोणत्या दिशेने जास्त आहे?
३. एखाद्या संत, ज्येष्ठ व्यक्ती किंवा गुरूंशी बोलताना मी खरोखर काही शिकण्यासाठी जातो की माझी विद्वत्ता दाखवण्यासाठी?
४. “श्रेयस” आणि “प्रेयस” यांतला फरक मला कळतो पण मी प्रत्यक्ष आयुष्यात श्रेयसाची निवड किती वेळा करतो?
५. माझ्या जीवनातील एखाद्या दुःखाचे मूळ माझ्याच विचारांत किंवा चुकीच्या इच्छांमध्ये होते असे आता वाटते का? (क्रमशः)
– – – –
श्लोक क्र. ६२ – – –
निजध्यास तो सर्व तूटोनि गेला |
बळे अंतरे शोक संताप ठेला |
सुखानंद आनंद भेदे बुडाला |
मनी निश्चयो सर्व खेदे बुडाला |६२|
अर्थ :भगवंताच्या भक्तीचा किंवा स्वस्वरूपाचा ध्यास एकदा तुटला की मनामध्ये शोक, संताप बळजबरीने ठाण मांडतात. सुख आणि आनंद नष्ट होतो आणि परमेश्वराच्या प्राप्तीचा मनामध्ये केलेला निश्चय देखील नष्ट होतो.
(निजध्यास – स्व स्वरूपाचे अनुसंधान, तूटोनी गेला – खंड पडला)
विवेचन :परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्यामध्ये सातत्य आवश्यक असते. त्याचा ध्यास किंवा वेड मनाला लागणे आवश्यक असते. सततचे अनुसंधान किंवा स्व स्वरूपाचे चिंतन परमेश्वर प्राप्तीसाठी आवश्यक असते. परंतु आपले मन जेव्हा वादात अडकते तेव्हा हे अनुसंधान तुटते. मनामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या शंका येऊ लागतात. मनाला काहीतरी काम देणे आवश्यक असते. रिकामे मन म्हणजे सैतानाचे घर असे आपण म्हणतो. जेव्हा परमेश्वराचे अनुसंधान तुटते तेव्हा या रिकाम्या मनामध्ये नको ते विचार गर्दी करू लागतात.
मनाचा मूळ स्वभाव शांततेचा आहे. जेव्हा सातत्याने परमेश्वराचे अनुसंधान, नामस्मरण, भजन, कीर्तन या गोष्टी सुरू असतात, तेव्हा मनामध्ये शांतता, सुख, समाधान आणि आनंद या गोष्टी नांदत असतात. परंतु ही शांतता, समाधान आणि आनंद मग भंग पावतात. शोक आणि संताप बळजबरीने मनाचा ताबा घेतात आणि मग आपण स्वतःला दुःखी करून घेत असतो.
अशी अवस्था जेव्हा आपल्या मनाची द्विधा स्थिती असते तेव्हा होते. संतांनी सांगितलेला उपदेश ऐकल्यानंतर किंवा कीर्तन, प्रवचन ऐकल्यानंतर आपण परमेश्वराची उपासना करावी अशी तीव्रतेने इच्छा होते. परंतु काही काळ गेल्यानंतर संतांच्या उपदेशाचा प्रभाव ओसरतो. परमेश्वरावर असलेली श्रद्धा डळमळीत होऊ लागते मग असे वाटते की परमेश्वर भेटेल की नाही माहिती नाही परंतु आज जो आनंद आपल्या हातात आहे तो उपभोगावा. जो निजध्यास घेतलेला असतो तो आपण सोडतो. तेवढे धैर्य किंवा तेवढी वाट पाहण्याची तयारी आपली राहत नाही. परिणामी चित्तात शोक आणि संताप घर करतात.
श्रद्धावान लभते ज्ञानम! श्रद्धावंतालाच ज्ञान प्राप्त होते. अर्थात हे ज्ञान म्हणजे परमेश्वर प्राप्तीचे ज्ञान किंवा स्व स्वरूपाचे ज्ञान. परंतु त्यासाठी संयम, विवेक आणि वैराग्य या गुणांची आवश्यकता असते. सामान्य माणसाजवळ एवढा धीर नसतो. म्हणून त्याने जी काही दोन चार पावले परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावर टाकलेली असतात, तिथून तो मागे येतो. सद्गुरूंनी मला अमुक इतका जप करायला सांगितला होता. तेवढ्या संख्येमध्ये मी तो केला परंतु मला कोणताही अनुभव आला नाही किंवा परमेश्वराची प्राप्ती झाली नाही. असा विचार करून सामान्य माणूस अध्यात्ममार्गापासून ढळतो. पण ज्याची श्रद्धा अविचल असते, तो कितीही संकटे आली किंवा कितीही तपश्चर्या करावी लागली तरी त्यापासून ढळत नाही. जर त्याला कोणी सांगितले की तू एवढा जप केलास परंतु तेवढा पुरेसा नाही. तुला आणखी इतकाच जप करावा लागेल किंवा आणखी अमुक इतकी वर्षे तपश्चर्या करावी लागेल तर तो त्यासाठी आनंदाने तयार होतो. कारण त्याला माहिती असते की त्यानंतर परमेश्वर आपल्याला निश्चितपणे भेटेल. आणि अशा रीतीने ज्यांची श्रद्धा अविचल असते अशा लोकांना परमेश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही.
म्हणून आपण संतसंगतीचा लाभ घ्यावा. त्यांच्याकडून परमेश्वर प्राप्तीचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यांच्याशी निरर्थक वाद न घालता त्यांच्या सांगण्याप्रमाणे वाटचाल करावी. वेळीच सावध होणे गरजेचे आहे हेच समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितात. तेव्हा निजध्यास सोडू नका. संत सोहिरोबा म्हणतात, ” हरी भजनावीण काळ घालवू नको रे. “
स्वसंवाद ::
१. निजध्यास केव्हा आणि का तुटतो?
२. कीर्तन-प्रवचनानंतर वाटणारी तीव्र भक्तिभावना काही दिवसांत का ओसरते? यावर उपाय काय?
३. “श्रद्धावान लभते ज्ञानम्” या वचनावर तुमचं दृढ विश्वास आहे का?
४. सद्गुरूंनी सांगितलेला जप केला पण अनुभव आला नाही. अशा वेळी मनात कोणते विचार येतात? तुम्ही त्याला कसे सामोरे जाता?
५. संत सोहिरोबांची ओळ “हरी भजनावीण काळ घालवू नको रे” हे मला माझ्या व्यस्त आयुष्यात कसे साधता येईल?
☆ “सलाम या महान सैनिकाला!!!” – इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
१९७१ चे युद्ध संपल्यानंतरची ही गोष्ट आहे. युद्ध संपताच जन. माणेकशॉ यांची निवृत्ती जवळ येऊ लागली होती. एक दिवस त्यांच्या असे लक्षात आले की त्यांचा ड्रायव्हर श्याम सिंग अचानकपणे कुठल्यातरी तणावाखाली आलेला दिसत होता आणि खूप चिंताग्रस्तही वाटत होता. तो काही नेहमीसारखा दिसत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरच्या काळजीकडे दुर्लक्ष करताच येणार नाही इतकी ती अगदी स्पष्ट जाणवत होती. आणि अर्थातच ही गोष्ट जन. माणेकशॉ यांच्या लक्षात आलीच.
” नेमकं काय झालंय श्यामसिंग? आजकाल तू इतका चिंताग्रस्त वाटतोयस की जणू काही तुझ्या घरच्या म्हशीने दूध देणे बंद केले आहे. काय झालंय “
” नाही सर, तसं काहीच झालेलं नाही ” एवढंच बोलून श्यामसिंग गप्प बसला.
पुढचे काही दिवस असेच गेले. पण जन. माणेकशांची निवृत्तीची तारीख जशी जवळ आली तशी श्यामसिंगने शेवटी त्यांना मनातली गोष्ट बोलून दाखवली …….
” सर, माझी एक इच्छा आहे जी फक्त आपणच पूर्ण करू शकता… “
” अरे मग सांग ना मला.. नि:संकोचपणे बोल”.
” सर, मलाही नोकरीतून लवकर निवृत्त व्हायचंय. कृपया यासाठी आपण शिफारस करावी अशी मी आपल्याला विनंती करतो… “
“अरे पण कशासाठी इतक्या लवकर निवृत्त व्हायचंय तुला? काही जमिनीचा वाद, भांडणतंटा आहे, का काही कौटुंबिक वाद? तू तुझी नोकरी व्यवस्थित पूर्ण कर. मी तुला नायब सुभेदार होण्यासाठी मदत करीन. पण तू ही लष्करातली नोकरी सोडू नकोस! ” जन. माणेकशॉ यांनी त्याला सल्ला दिला.
….. ” नाही सर, काही वेगळंच कारण आहे याचं. पण नोकरी सोडेपर्यंत मी तुम्हाला ते सांगू शकत नाही. “
त्याचा प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान पाहून अखेर जनरलने त्याच्या निवृत्तीची आवश्यक ती औपचारिकता पूर्ण केली आणि काही दिवसातच त्याच्या निवृत्तीची ऑर्डर आली.
जनरलने आता पुन्हा एकदा त्याला विचारले ” आता तुला बरं वाटलं ना? आता तरी सांगशील का मला की तुला लवकर का निवृत्त व्हायचे होते? ”
ड्रायव्हर आदबीने उभा राहिला आणि म्हणाला, ” सर, आपला ड्राइवर म्हणून इतकी वर्षं काम केल्यानंतर आता मी दुसऱ्या कुणाचा तरी ड्राइवर म्हणून काम करूच शकणार नाही. आपल्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून काम करणं हा माझ्यासाठी माझ्या जीवनातला सर्वात मोठा सन्मान होता आणि आता इथून पुढे तोच सन्मान आणि ती आठवण आयुष्यभरासाठी सोबत घेऊन मला जगायचं आहे. “.
हे उत्तर ऐकून फील्ड मार्शल माणेकशॉ यांना हसू आलं आणि ते म्हणाले, ” तू खरंच महामूर्ख आहेस! तुम्ही हरियाणवी लोक ना अगदी हट्टी आणि करारी असता. पण आता निवृत्तीबाबतची कार्यवाही सुरु झाल्याने त्यात कुठलाच बदल करणं मला शक्य नाही. ”
मग एक दिवस जनरलने त्याला विचारलेच, ” निवृत्तीनंतर तू काय करायचे ठरविले आहेस? “
” काही तरी करीन सर, एखादी नोकरी शोधेन. “
“तुझ्याकडे शेती किती आहे? “
” शेती नाहीच आहे सर. मी एका गरीब कुटुंबातला आहे.. ”
.. यावर जनरल माणेकशॉ यांचं मन हेलावलं.. ‘एका अशा अधिकाऱ्याचा ड्रायव्हर म्हणून नोकरी केल्यावर दुसऱ्या कुणाकडेच आपण ड्रायव्हर म्हणून काम करू शकणार नाही’, या विचाराने आपल्या उपजीविकेचे साधनच वाऱ्यावर सोडून देणारा असा हा गरजू माणूस बघून कमांडर साहेबांना खूप वाईट वाटले.
श्यामसिंगच्या निरोप समारंभाच्या दिवशी कमांडर माणिकशॉनी त्याच्या हातात एक पाकिट दिले आणि सांगितले.. ” श्यामसिंग, हे पाकिट घरी गेल्यावरच उघडायचं बरं का “.
” होय, सर ” असं म्हणत श्यामसिंगने त्यांना एक सॅल्युट केला आणि निघून गेला.
घरी आल्यावर लगेच तो नोकरी शोधण्यात गर्क झाला आणि ते पाकिट पूर्णपणे विसरून गेला. एके दिवशी त्याची बायको त्याला म्हणाली, ” मी तुमचा आर्मीचा गणवेश ट्रंकमधे ठेवत असतांना त्याच्या खिशात मला हे पाकिट सापडले आहे ”
” अरे बापरे, मी पूर्णपणे विसरूनच गेलो बघ. मला वाचता येत नसल्याने मी ते उघडलेच नाही. नक्कीच त्यात सरांनी मला दिलेले प्रशस्तीपत्रक असेल. कारण वरिष्ठ अधिकारी अशी प्रशस्तीपत्रके देतच असतात. ” “ पण तरी आपण हे मास्तरांकडे घेऊन जाऊ आणि त्यांनाच ते वाचायला सांगू. मला खूप उत्सुकता लागून राहिली आहे त्यात काय लिहिले आहे ते जाणून घेण्याची ” बायको म्हणाली.
म्हणून मग ते दोघे शाळेच्या मुख्याध्यापकाकडे गेले आणि त्यांना ते पत्र मोठ्याने वाचण्याची विनंती केली. मुख्याध्यापकांनी चष्मा घातला, पाकिट उघडले.. वाचले, आणि ते अचानक एकदम स्तब्धच झाले.
“काय झाले गुरुजी? तुम्ही हे पत्र असं निरखून का बघताय? ” काही न कळून श्यामसिंगने विचारलं.
” अरे तुला काही कल्पना तरी आहे का यात काय लिहिलंय याची? “
” नाही गुरूजी! “
“अरे, यात एक हस्तांतर दस्त आहे. “
“ म्हणजे नक्की काय आहे? “ गोंधळून गेलेल्या श्यामसिंगने विचारलं.
” अरे १९७१च्या युद्धातील विजयानंतर हरियाणा सरकारने जनरल सॅम माणेकशॉ यांना त्यांचा बहुमान म्हणून 25 एकर जमीन बक्षीस दिली होती. आणि आता ती पूर्ण जमीन त्यांनी तुझ्या नावावर ट्रान्सफर केलीय. आता तू चक्क 25 एकर जमिनीचा मालक झाला आहेस श्यामलाल “.
– – खऱ्या अर्थाने महान असलेल्या जन. माणेकशॉ यांनी एका ड्रायव्हरला दिलेल्या ‘ऐतिहासिक’ बक्षीसाची ही कहाणी आहे. युद्धातील विजयामुळे स्वतःला बक्षीस म्हणून मिळालेली सोनीपत येथील जमीन तर त्यांनी अगदी सहजपणे आपल्या ड्रायव्हरला दान केलीच, शिवाय या दानशूर नेत्याने फिल्ड मार्शल म्हणून स्वतःला मिळणारे पेन्शनही सैन्यातील जवानांच्या विधवांच्या कल्याण निधीला देणगी म्हणून देऊन टाकले..
अतिशय दिलदार स्वभावाच्या या महान सैनिकाला आणि माणूस म्हणून त्यांच्यात असलेल्या विलक्षण आणि असामान्य माणुसकीला अगदी मनापासून सलाम!!!
जय हिंद!!!!!.
इंग्रजी माहिती संकलक आणि लेखक : अज्ञात.
मराठी अनुवाद आणि प्रस्तुती : मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
भारतीय विचारधारा खूप प्राचीन आहे. निव्वळ प्राचीन नसून ती तितकीच महान देखील आहे. शून्य ही संख्या भारताने विश्वाला दिलेली सर्वात महान देणगी आहे असे म्हटले तर वावगे होऊ नये.
शून्य म्हणजे शून्य. पण हे शून्य जेव्हा एखाद्या संख्येच्या मागे लागते तेव्हा ते त्या संख्येचे मूल्य वाढवित असते. आपल्याकडे शून्याला पूज्य म्हणण्याची पद्धत आहे. मूल्य वाढविणारे शून्याला पूज्य म्हटले जाते असे आपल्या लक्षात येईल. थोडा अधिक विचार करता, किंवा थोडी अतिशयोक्ती करून असे म्हणता येईल की ज्याला आपले मूल्य वाढवायचे आहे त्याने आधी शून्य व्हावं आणि आपल्या आधी सद्गुरू, आराध्य देवता अथवा भगवंताला ठेवावे, म्हणजे तो मनुष्य खात्रीने पूज्य होऊ शकतो. आपल्याकडील अनेक संतांची चरित्रे पाहिली तर आपल्याला याची साक्ष पटू शकेल.
संत तुकाराम महाराज हे प्रापंचिक लोकांसाठी महान असे आदर्श म्हणता येईल. आधी सावकारी आणि नंतर कफल्लक झालेले तुकाराम महाराज जगद्गुरू झाले, ते त्यांनी स्वतःला शून्य केले म्हणूनच, नाही का?
मनुष्याचा जीवन प्रवास सुद्धा शून्यापासून सुरुवात होऊन शून्यापर्यंत येऊन थांबतो असे आपल्याला म्हणता येईल. बाळ जन्माला येताना ते शून्य असते आणि त्या बालकाचा जेव्हा म्हातारा होऊन मृत्यू होतो, तेव्हा तो एकप्रकारे शून्यच होत असतो…! सर्व संत असे सांगतात की शून्यापासून सुरू होणारा प्रवास शून्यापर्यंत येऊन न थांबता, तो पूज्या पर्यंत येऊन ठेपला तर त्या मनुष्याचे, जिवांचे सार्थक झालं असे नक्कीच म्हणता येईल.
शून्य ते शून्य नव्हे शून्य ते पूज्य हा प्रवास वाचायला अगदी सहज, पण आचरण करायला, क्रमण करायला तितकाच खडतर…
सर्व संतांनी हा मार्ग स्वतः आचरून दाखवला आहे. अपवाद सोडले तर अनेक संतांनी अनेक प्रकाराची सुखदुःखे सहन केली, अनंत यातना सोसल्या, उपेक्षा, मानहानी, किती सांगावे…?
पण या संतांनी कायम प्रतिसाद दिला…!
प्रत्येक मनुष्याला संत होणे जमेलच असे नाही, पण त्याला पूज्य (शून्य) होणे नक्कीच जमू शकेल…! यासाठी काही विशेष करायला लागेल असे नाही…
काही गोष्टी मनाशी दृढ करून करण्याचा प्रयत्न केला तर शून्य ते पूज्य हा प्रवास शक होईल.
बाळ जन्मते तेव्हा ते कोणाचेच नसते, त्यामुळे सर्वांचे असते. त्या बालकाची काळजी अगदी परके वाटणारे लोकं सुद्धा स्वयंस्फूर्तीने घेत असतात असे आपल्या लक्षात येईल. बाळ. जसजसे मोठे होऊ लागते, तसतसा त्याचा अहंकार मोठा होऊ लागतो. तो कोणी होत जातो, त्याच्या असण्याला, होण्याला समाज कमीअधिक प्रमाणात खतपाणी घालत असतो.
पन्नाशी पर्यंतचे आपण पाच टप्पे ठरवता येतील.
दहाव्या वर्षी त्याला सगळे आपले आहेत असे कळायला लागते…?
विसाव्या वर्षी त्याला आपल्याला काय हवे हे कळायला लागते…?
तिसाव्या वर्षी त्याला आपले नक्की कोण आहे कळायला लागते…?
चाळीसाव्या वर्षी त्याला आपले आणि परके यातील सूक्ष्म रेषा कळू लागते…
पन्नाशीला त्याला जग काय आहे कळते असे म्हणता येईल… (कदाचित जग काय आहे हे त्याने समजून घ्यावे अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी…)
“एका वाक्यात सांगायचे झाल्यास मनुष्याचा अहंकार पन्नास वर्षाचा होतो…!! “
“पूर्व सुकृत उदयास आले आणि त्याला संताची संगत लाभली तर त्याचा विवेक जागृत होतो, पण सत्संगती लाभली नाही तर त्याचा विवेक जागृत होत नाही आणि मनुष्य अहंकाराचे टोक गाठतो…! “
काही कारणाने सत्संग लाभलेला नाही, पण शून्य होण्याची मनाची तयारी आहे, त्याने अहंकार दूर करण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी संताचे ग्रंथ (संतांनी लिहिलेलं…) वाचावेत, त्यांचा अभ्यास करावा, आणि त्याच्या जोडीला नामस्मरण करावे…
मनुष्याचे आयुष्य शंभर वर्षाचे मानले तर पन्नास हा मध्यबिंदू म्हणता येईल…! चढत्या भाजणीने वाढत गेलेला अहंकार उतरत्या भाजणीने पन्नास ते शंभर पर्यंत शून्यावर आला तर मनुष्य पूज्य होणे सहज सोपे…!
पन्नाशी पर्यंत वाढवलेला प्रपंचाचा पसारा पुढील पन्नास वर्षात आवरता आला तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने जिंकला असे म्हणता येईल…!! शून्य ते पूज्य या प्रवासाला सुरूवात करू इच्छिणाऱ्या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा!!!
मनुष्य सुरुवात तरी नक्की करू शकतो… , प्रयत्न करू शकतो…! यश देणे न देणे रामाची इच्छा!!
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “डिलिव्हरी बॉय!!!” – भाग १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
नेमकी तारीख आठवत नाही, पण तीन वर्षांपेक्षा जास्त झाले असतील, दिवस मात्र पावसाळ्याचेच…!
सकाळपासून आकाश निरभ्र होते, सोबत मी रेनकोट नेला नव्हता.
भिक्षेकर्यांचे सर्व काम आटपायला त्या दिवशी चार वाजले, पोटात अन्नाचा कण नव्हता.
आकाश अजूनही निरभ्र होते, आता पटकन घरी जायचे आणि काहीतरी खायचे असा विचार करून मोटारसायकलवर बसलो.
… दोन लोक छान छान काहीतरी बोलत असताना, मध्येच काहीतरी व्हावं आणि अचानक हमरी तुम्ही वर यावं, एकमेकांवर जोरजोरात ओरडायला सुरुवात करावी, तसंच काहीसं वर झालं असावं.
निरभ्र असलेलं आकाश आता काळं कुट्ट झालं, दोन विजांमध्ये भयानक भांडणे सुरू झाली, त्याचा आवाज खालीपर्यंत येत होता. याचा परिणाम म्हणून त्यांच्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले, पावसाच्या रूपात…!
आणि जोरदार पाऊस सुरू झाला.
सोबत मी रेनकोट आणला नव्हता. कमरेला एक पिशवी लावलेली असते, त्यात थोडेफार पैसे आणि सर्व महत्त्वाची कागदपत्रे असतात. पावसात हि बॅग भिजू नये म्हणून मी गाडीला अडकवलेल्या कुठल्याशा बॅगेत ही बॅग घुसवली.
दोन विजांच्या भांडणात आपण पडायला नको, हा शहाणा विचार करून, आता भिजत निघणार तेवढ्यात एका भिक्षेकर्याने त्याच्या जवळचे रेनकोटचे जॅकेट मला दिले, नको नको म्हणत असतानाही त्याने ते घालायला लावले.
हे मीच त्याला कधीतरी दिले होते, पण आता ते डाव्या काखे पासून पूर्णपणे खाली पर्यंत उसवले होते फाटले होते. दोन ठिकाणी भोकं पडली होती…
त्याचं मन मोडायचं नाही म्हणून आणि जाऊदे बुडत्याला काडीचा आधार म्हणत मी निघालो, पावसाचा जोर प्रचंड होता. मोटर सायकलच्या विरुद्ध दिशेने येणारा आडवा पाऊस वेगाने तोंडावर आपटत होता.
दोन्ही गाल झापडून निघत होते.
एखादा निष्णात ढोलकी पटू रंगात आल्यानंतर त्या ढोलकीच्या दोन्ही बाजूला ज्या वेगाने थपडा मारेल, तसा पाऊस मला ढोलकी समजून दोन्ही गालावर थपडा मारत होता.
आजूबाजूची झाडं त्याच्या या कलाविष्काराला झुकून दाद देत होती, तर काही इकडून तिकडे जोरजोराने माना हलवत होती, बेभान होऊन…!
काही महाभागांनी तर रस्त्यावरच लोटांगण घातलं, त्यामुळे ट्रॅफिक जाम झालं, पण त्या “ढोलकीपटूला” याचे काही सोयर सुतक नव्हते.
रसिकांची दाद मिळाल्यावर कोणत्याच कलाकाराची थांबायची इच्छा नसते, तसंच या पावसाचं झालं.
इकडे प्रचंड पाऊस, रस्त्यावर गुडघाभर पाणी…
आणि तिकडे माझ्या पोटात भुकेचा वणवा पेटलेला…
काय विरोधाभास…!
पाठीवर जवळपास 100 किलोच्या बॅगचे ओझे, बाईकच्या दोन्ही बाजूला दोन मोठ्या आकाराच्या बॅगा खचाखच भरलेल्या, या बॅगेच्या आजूबाजूने जागा मिळेल तिथे काठ्या कुबड्या अडकवलेल्या…
हे सर्व सांभाळत रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यातून कसाबसा मार्ग काढत असताना, पावसाने अजूनही ढोलकी वाजवणे थांबवले नव्हते. जणू त्याची माझ्याशी जुगलबंदी चालू होती…
मुळात काळा सावळा असलेला मी, आज या पावसाने मला गोरा मोरा केला…!
शेवटी या जुगलबंदीत मी जाहीर हार पत्करली आणि गाडी साईडला लावून थांबलो.
संपूर्ण भिजलो होतो, रेनकोटच्या जॅकेटचा काहीही उपयोग नव्हता, आता अंगात ओल्या कपड्यांमुळे अंगात थंडी भरली. मी कुडकुडायला लागलो.
शेजारीच चार तकलादु बांबू रोवून त्यावर फ्लेक्स अंथरलेली एक मोडकी तोडकी वडापावची टपरी होती, एक आजी तिथे वडे तळत होती आणि त्याचा खमंग सुवास सुटला होता.
शाळेत न जायचा हट्ट करणाऱ्या मुलाला, त्याच्या आईने हाताला धरून फरपटत ओढत न्यावं, तसं भुकेने मला या वडापावच्या गाडीपर्यंत नेलं.
आजी वडे तळण्यात गुंग होती, वय असेल सत्तरीचं, चेहऱ्यावर सुरकुत्या, प्रत्येक सुरकुती दुष्काळी भागातल्या जमिनीसारखी भेगाळलेली, तरीही चेहऱ्यावर स्मितहास्य आणि डोळ्यात ममता…!
‘वडापाव खायचा आहे का रे बेटा…? ‘
आजीच्या वाक्याने माझी तंद्री भंगली.
‘हो आजी’…
आजी मला बेटा म्हणाली, मला कौतुक वाटलं.
कढईतला गरम गरम एक वडा तिने पावात खोचून दिला, पावातून निम्मा बाहेर आलेला तो गरमागरम वडा जणू माझ्याचकडे खाऊ का गिळू या नजरेने पाहत होता.
“गरम गरम” वडा पोटातली “आग” विझवणार होता… इथेही पुन्हा विरोधाभासच..!
‘वडा गरम आहे बेटा, सावकाश खा तोंड भाजेल… ‘
आजीचं मायेचं वाक्य ऐकून या थंडीतही मला ऊब जाणवली.
‘अजून एक खा बेटा धर’, म्हणत तिने दुसरा गरम गरम वडापाव माझ्या हाती न मागता दिला.
आजीला कसं कळलं मला भूक लागली असावी…?
मी विचार करत राहिलो.
आजी आजीच असते, नातवांसाठी ती घोडा घोडा होते, झुक झुक आगीनगाडी होते… जेवू घालताना तिच्या हातावर मोर सुद्धा येतो, आणि तो नाचतो… हो मी पाहिलंय मोराला नाचताना…!
ती कधी उंट होते, कधी मांजराचे आवाज काढते, डावा हात उजव्या कानाला धरून, उजवा हात त्यामधून घालून सोंड दाखवत ती हत्ती सुद्धा होते… आजीला सगळंच कसं येतं बुवा…?
आजीच्या मांडीवर तिच्या मऊसूत पदराखाली झोपताना कशाचीही भीती वाटत नाही. गालावरून फिरणारा तीचा खरबरीत हात मात्र तिच्या भूतकाळाची जाणीव करून देत असतो, पण ती कधीच सांगत नाही…
आई बाबा कधी ओरडून एखादा फटका मारायला आले तर आजी नातवंडाना पाठीमागे उभी करून, स्वतः पुढे येते आणि त्यावेळी ती ढाल होते… खरंच आजीला सगळंच कसं येतं…?
आजीला हिशोब मात्र येत नाही…
एक चपाती हाताने खायला घालून म्हणते, आत्ताशी कुठं अर्धी खाल्ली, जेवताना एक चपाती मागितली तर ती दोन देते आणि म्हणते खा एकच आहे…
कधी साडी घेऊ का म्हटलं तर म्हणते, नको रे बाबा ट्रंकेत तर पाच पन्नास पडून आहेत… ट्रंकेत बघितलं तर, आजोबांनी घेतलेल्या तीन-चार विरलेल्या साड्या असतात फक्त..
आजीला सगळं येतं, मात्र हिशोब काही येत नाही…!!!
माझी आजी अशीच होती, हि सुद्धा का कोण जाणे पण मला तशीच भासली…
बरोबरच आहे, “आजी” हे एक मायेचं आभाळ आहे, आणि जगातून कुठूनही पाहिलं तरी आभाळ सारखंच दिसतं ना…?
‘अजून एक खाणार का बेटा… ‘
आजीने पुन्हा माझी तंद्री तोडली.
नम्रपणे मी नको म्हणत, आजीला किती पैसे झाले विचारले.
म्हणाली, ‘दोन वडापाव ना? तीस रुपये झाले बेटा’
पैसे देण्यासाठी पॅन्ट मधल्या एका खिशात मी हात घातला तिथे पैसे मिळाले नाहीत, मी दुसऱ्या खिशात हात घातला, मागच्या खिशात हात घातला, गडबडीने रेनकोट काढून शर्टाच्या खिशात हात घातला, पैसे कुठेही सापडले नाहीत. मी बावचळलो… गोंधळलो…!
हां, आठवलं, आपण पैशाची बॅग मोटरसायकलवर अडकवलेल्या बॅगांमध्ये ठेवली आहे… मग मी मोटरसायकलवर ठेवलेल्या बॅगांची उचकापाचक करायला लागलो. ती सुद्धा बॅग काही केल्या सापडेना…
गडबडीत पडली की काय…? या विचाराने माझा थरकाप झाला… त्यात अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे असतात.
तावातावाने मी बॅग शोधत होतो आणि बॅग मिळत नव्हती.
बॅगेच्या विचाराने मी अक्षरशः रडकुंडीला आलो…
आजीचं लक्ष होतं, म्हणाली, 30 रुपयांसाठी एवढं रडकुंडीला येऊ नको बाळा, नंतर दिले तरी चालतील.
‘तसं नाही आजी पण… ‘
माझं वाक्य तोडत आजी मृदू आवाजात, मायेनं म्हणाली, ‘ अरे बाळा कळतंय मला, कधी पैसे असतात तर कधी नसतात. तू एखाद्या खेड्यातल्या गरीबा घरचा दिसतोस. ‘
‘ गावाकडचं घर सोडून, नशीब काढायला इथं कुठल्यातरी कंपनीत कमी पगारावर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असशील ना…?
अशी खूप मुलं आजी आजी म्हणत येतात माझ्याकडं, ती पदराला हात पुसत म्हणाली… ‘
डिलिव्हरी बॉय…?? आजी मला डिलिव्हरी बॉय का समजली असेल…?
ओह, माझ्याकडची एक मोठी बॅग, गाडीला अडकवलेल्या तशाच दोन मोठ्या बॅगा, जशा Swiggy Zomato किंवा कुरिअर यांच्या डिलिव्हरी बॉईज कडे असतात तशा… हे पाहून आजीने अंदाज बांधला मी सुद्धा डिलिव्हरी बॉय आहे.
☆ ड्रायव्हरलेस टॅक्सी आली म्हणे… लेखिका : तृप्ती देव ☆ प्रस्तुती – मीनल केळकर ☆
… आता किचनलेस बायको कधी येणार?
काल मोबाईलवर ड्रायव्हरशिवाय चालणाऱ्या गाडीचा व्हिडिओ पाहिला आणि नेमकी कामवाली बाई सुट्टीवर गेल्यामुळे सिंकभर भांडी, न तापवलेलं दूध आणि कुकरच्या टेन्शनमध्ये स्वयंपाकघरात पोळपाट-लाटणं घेऊन उभ्या असलेल्या माझ्या मनात दिवसाढवळ्या स्वप्न रंगू लागली! गाडीत ना ड्रायव्हर, ना हॉर्न वाजवणारा काका… सगळं ते नवीन मशीन म्हणजे AI स्वतः करत होतं. विज्ञानाने एवढी प्रगती केलीये तर देवा, हे तंत्रज्ञान आमच्या किचनमध्ये आधी पाठव! आणि जो माणूस हे किचनचं मशीन शोधेल, त्याच्या पायाचं तीर्थ मी रोज सकाळी घेईन; कारण रस्त्यापेक्षा याची खरी गरज आमच्या भारतीय किचनमध्येच आहे.
सकाळी सव्वा सहा वाजल्यापासून मी त्या मशीनपेक्षा जास्त अपडेटेड असते. डोळे उघडायच्या आधीच प्रोसेसर सुरू होतो– मुलाचा डबा, नवऱ्याचा नाश्ता, सासूबाईंचा चहा, गॅसवर दूध आणि फ्रिजमधल्या उरलेल्या भाज्या कशा संपवायच्या या विचारात मी गाढ झोपेतून उठते. मी स्वतः अजून पूर्ण जागी नसते, तोच हॉलमधून नवरोबांचा पहिला प्रश्न येतो, “चहा झाला का? ” अहो, मी काय रोबोट आहे? पण त्यांना चहा मात्र वेळेवर हवा असतो!
जरा कल्पना करा, उद्या जर हे मशीन किचनमध्ये आलं तर काय होईल? सकाळी नवरा म्हणाला, “चहा दे, ” तर मशीन उत्तर देईल, “तुम्ही काल चहाचा कप सिंकमध्ये ठेवला नव्हता, आज तुमची सेवा तात्पुरती बंद आहे! ” तिथेच मुलगा तोंड वेडंवाकडं करून म्हणाला, “आई, तू रोजच काय पोहे करतेस? ” तर मशीन म्हणेल, “बाळा, मागच्या आठवड्यात दोनदा सँडविच आणि तीनदा पास्ता खाल्लाय, विसरलास का? गपचूप पोहे खा, नाहीतर आजचा डबा कॅन्सल! ” इतक्यात त्याने मोजे विचारले तर मशीन सांगेल, “जिथे काल फेकून दिले होते, तिथेच आहेत, स्वतः जाऊन उचल! ” दुपारच्या जेवताना सासूबाई म्हणाल्या, “आज भाजीत मीठ जास्त झालंय, ” तर मशीन लगेच रेकॉर्ड दाखवेल, “हो सासूबाई, मागच्या १७ वर्षांत तुमच्याकडून हीच कमेंट तब्बल ३, ४२८ वेळा आली आहे! ” एवढ्यावरच त्या थांबणार नाहीत, ऐनवेळी म्हणतील, “पोळ्या कमी कर, आज भात जास्त खाणार! ” तेव्हा मशीन डोक्याला हात लावून म्हणेल, “सकाळी तीन पोळ्या सांगितल्या होत्या, त्यानुसार पीठ मळलंय. आता सिस्टीम बदलणार नाही, भातातच ॲडजस्ट करा! “
खरी मजा संध्याकाळी येईल. मी सोफ्यावर निवांत चहा पित बसेन आणि नवरा पाऊस बघून म्हणतील, “गरम गरम भजे कर ना गं! ” मी म्हणेन, “मला काय विचारता? जा मशीनला विचारा, आज मी फक्त युझर आहे! ” नवरा किचनमध्ये जाताच मशीन ओरडेल, “तुमचे वजन दोन किलो वाढले आहे आणि घरात बेसनही संपले आहे. भज्यांचा विचार सोडा आणि गुपचूप शेपूची भाजी खा! “
इतक्यात दाराची बेल वाजते आणि कोणतेही ‘नोटीफिकेशन’ न देता दोन पाहुणे हसत-हसत अवतरतात– “म्हटलं चहा-पाणी करून जावं. ” नवरा सांगतो, “पटकन चहा आणि काजूचा शिरा बनव! ” तेव्हा ते मशीन फ्रिज उघडून डबे तपासेल आणि वायर हायव्होल्टेज होऊन ओरडेल, “अलर्ट! घरात चहाची पत्ती एकच चमचा आहे आणि शिऱ्यासाठी दूधच नाहीये! पाहुण्यांनो, येताना व्हॉट्सॲप का नाही केलं? माझी सिस्टीम क्रॅश होत आहे! ” शेवटी पाहुण्यांचा पाहुणचार करून रात्री सिंकमधला डोंगराएवढा भांड्यांचा पसारा पाहून बिचारं मशीन हँग होईल आणि स्क्रीनवर मेसेज येईल, “सिस्टम एरर! भारतीय कुटुंबाचा पसारा, नखरे आणि बिनबोलावलेले पाहुणे सांभाळण्याची माझी क्षमता नाही! “
अमेरिकेच्या रस्त्यावर गाडी चालवणं सोपं आहे हो, पण भारतीय घरात चार लोकांच्या वेगवेगळ्या आवडी आणि ऐनवेळचे नखरे सांभाळणं कठीण आहे! एकाला तिखट नको, दुसऱ्याला भेंडी नको, नवऱ्याला रोज नवीन हवं, सासूबाईंना ऐनवेळी भात हवा आणि फ्रिजमध्ये फक्त दोन सुकलेल्या सिमला मिरची नि टोपलीत दोन बटाटे! अशा वेळी त्या दोन बटाट्यांमध्ये पाहुण्यांसह अख्ख्या घराला खुश ठेवणं, हे कोणत्याही मशीनच्या बापालाही जमणार नाही! म्हणूनच, ज्या दिवशी ते मशीन स्वतः फ्रिज बघून काय बनवायचं याचं उत्तर शोधेल, त्या दिवशी जगातल्या सर्व बायका टाळ्या वाजवून म्हणतील, “आता खरंच विज्ञान प्रगत झालं! ” काय मग गृहिणींनो, पटतंय ना?
“बाईशिवाय चालणारं भारतीय किचन’ बनवणं विज्ञानाला कधीच जमणार नाही! कारण मशीनमध्ये फक्त डेटा आणि कोडिंग असतं… पण भारतीय किचनमध्ये लागणारा अचूक ‘अंदाज’, चवीची ‘जादू’ आणि कुटुंबासाठी असणारं ‘प्रेम’ कोणत्याही कम्प्युटरमध्ये डाऊनलोड करता येत नाही. गृहिणीचा २४ तास चालणारा प्रोसेसर आणि तिची माया… या तोडीचं तंत्रज्ञान जगात कुठेच तयार होऊ शकत नाही! “
लेखिका : सौ. तृप्ती देव
भिलाई, छत्तीसगड
(लेख आवडल्यास नावासोबत शेअर करा, ही विनंती.)
प्रस्तुती – मीनल केळकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५९ आणि ६० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ५९ – – –
मना कल्पना कल्पिता कल्पकोटी |
नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी |
मनी कामना राम नाही जयाला |
अति आदरे प्रीति नाही तयाला ||५९||
अर्थ : हे मना, नाना प्रकारच्या अनंत कल्पना तू करीत राहिलास तर भगवंताचे दर्शन कदापिही शक्य नाही. ज्याच्या अंतरात वासना असतील, त्याच्या मनामध्ये भगवंताविषयीची कामना निर्माण होणे शक्य नाही आणि भगवंताविषयी कामना नसेल तर त्याच्यावर आदरयुक्त प्रेम कसे राहील?
(कल्पिता – कल्पना करणे, कल्पकोटी – अनंत/ नाना प्रकारच्या)
विवेचन : आपल्या जीवनात कल्पनेचे देखील काही एक विशिष्ट स्थान आहे. आपल्या मनातील कल्पना चांगल्या आणि विधायक असतील तर व्यवहारात त्या प्रत्यक्षात येऊ शकतात, त्यांचा उपयोग होतो. परंतु त्या कल्पनांना जर योग्य दिशा नसेल आणि त्या विधायक नसतील तर त्या जीवनाचा नाश करू शकतात. सदैव कल्पनेच्या राज्यात रमणारा माणूस व्यवहारात अयशस्वी होतो. त्याला धड प्रपंचही जमत नाही आणि धड परमार्थही तो करू शकत नाही. अशी अनेक उदाहरणे आपण आपल्या अवतीभवती नेहमी पाहतो.
समर्थांनी दासबोधात सांगितले आहे की आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका. ज्याला प्रपंच नीट करता आला नाही त्याला परमार्थ कसा जमणार? म्हणून आपल्याला यशस्वी प्रपंच करून परमार्थाकडे वाटचाल करायची आहे. अस्थिर मनाने प्रपंच आणि परमार्थ ही साधणार नाही.
कल्पना करीत राहणे हा मानवी स्वभाव आहे. या कल्पनाच आपल्याला विषयांच्या राज्यात घेऊन जातात आणि त्यांच्या तीव्र ओढीने विषयांचे सेवन आपल्याकडून घडते. साहजिकच भगवंतापासून आपण दूर जात असतो. ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे मनामध्ये विषय चिंतन आणि भगवंत या दोन्ही गोष्टी एकाच वेळी राहू शकत नाहीत. मन एकाच गोष्टीला पूर्णपणे वाहिले पाहिजे.
परमार्थाकडे वाटचाल करताना मनामध्ये वासना असता कामा नये. वासना असतील तर आपल्याला भगवंत हवा, अगदी मनापासून हवा असे वाटणारच नाही. जोपर्यंत आपल्याला भगवंत हवाच आहे असे मनापासून वाटत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होणार नाही.
भगवंत हवा आहे असे मनापासून वाटत असेल तर विषयाकडे धावणारी वृत्ती सवयीने हळूहळू कमी करायला हवी. त्यासाठीच नामस्मरण, पूजा, सत्संग, साधना इ. गोष्टी सांगितल्या आहेत.
पण विषयाकडे धावणारे मन नाना प्रकारच्या कल्पना करीत राहते. मनाची शक्ती अपार आहे. परंतु आपण या शक्तीचा योग्य वापर करण्यापेक्षा गैरवापरच जास्त करीत असतो. दिशाहीन आणि निरुपयोगी कल्पना मनाला थकवा आणतात. म्हणूनच मनाला प्रयत्नपूर्वक योग्य मार्गावर आणायला हवे आणि त्याला योग्य दिशा द्यायला हवी. मला भगवंत हवा आहे अशी निव्वळ इच्छा करून तो प्राप्त होणार नाही. तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. विवेक आणि वैराग्य धारण करावे लागेल. भगवंत हवा असेल तर अन्य सर्व इच्छांचा त्याग करून त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. एखाद्या गोष्टीचा नित्य सहवास लाभला की त्याबद्दल आपल्याला प्रेम निर्माण होते. त्याप्रमाणेच सतत भगवंताचे नाम घेत गेल्याने त्याच्याबद्दल आदरयुक्त प्रेम निर्माण होईल.
स्वसंवाद ::
१) माझ्या मनात दिवसभर कोणत्या प्रकारच्या कल्पना सर्वाधिक येतात – विधायक की विषयप्रधान?
२) मी वास्तवात जगतो का, की कल्पनांच्या जगात जास्त वेळ घालवतो?
३) मला खरोखर भगवंताची ओढ आहे का, की ती केवळ एक वरवरची इच्छा आहे?
४) मी माझ्या मनाला जाणीवपूर्वक योग्य दिशेला वळवण्यासाठी काही प्रयत्न करतो का (नामस्मरण, वाचन, सत्संग)?
– – – – –
श्लोक क्र. ६० – – –
मना राम कल्पतरू कामधेनू |
निधी सार चिंतामणी काय वानू|
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता|
तया साम्यता कायसी कोण आता |६०|
अर्थ : हे मना राम म्हणजे भगवंत कल्पतरू, कामधेनू आहेत. ते निधी, सार, चिंतामणी… सारे सारे काही आहेत. हे सगळे शब्द त्यांचे वर्णन करण्यासाठी कमी पडतात म्हणून समर्थ म्हणतात की त्यांचे कसे आणि काय वर्णन करू? त्यांच्याच योगाने आणि सत्तेने सर्व काही घडत आहे. त्यांची तुलना किंवा साम्य कशाशी दाखवता येईल?
(चिंतामणी – इच्छिलेली वस्तू देणारा, वानू – वर्णन करू)
विवेचन : या श्लोकात समर्थ श्रीरामांच्या भक्तीची महती आपल्याला सांगतात. श्रीरामांबद्दल बोलताना त्यांनी वेगवेगळी विशेषणे वापरली आहेत. श्रीराम कामधेनू, कल्पतरू, निधी सार, चिंतामणी सारे सारे काही आहेत असे समर्थ म्हणतात. या एकेक शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेऊया.
कल्पतरू म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारा एक वृक्ष. त्याच्या छायेत बसून जी कल्पना करावी ते सर्व आपल्याला प्राप्त होते. कामधेनू म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारी दिव्य गोमाता. निधी म्हणजे कुबेराचे भांडार किंवा खजिना, चिंतामणी म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारा काल्पनिक मणी.
प्रभू रामचंद्र भक्तांचे सर्व मनोरथ पुरवणारे आहेत. ते कल्पतरू, कामधेनू आहेत. आपल्या भक्तांना काहीही कमी पडणार नाही याची काळजी ते घेतात. इच्छिलेले सर्व काही देणारे ते आहेत. ते निधी म्हणजे कुबेराचे भांडार आहेत. कुबेराचे भांडार म्हणजे समृद्ध खजिना! कशाचीही कमी नाही. म्हणजेच श्रीरामाच्या भक्तांना कसलीही कमी पडणार नाही. त्यानंतर समर्थ म्हणतात की ते सार आहेत. सार म्हणजे महत्त्वाचे तत्व! या विश्वामध्ये सार म्हणजे फक्त एक श्रीराम. बाकी सर्व काही असार. एका वाक्यात सांगायचे झाले तर रामनाम ही सर्व कुलुपांची अशी एक किल्ली आहे की ज्यामुळे सर्व कुलुपे विनासायास उघडतात.
संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानात परमेश्वराला प्रार्थना करताना म्हटले आहे, “जो जे वांछील, तो ते लाहो. ” म्हणजे ज्याला ज्याला जी जी इच्छा होईल ती ती गोष्ट प्राप्त होवो. अर्थात या ठिकाणी इच्छा म्हणजे सदिच्छा किंवा चांगली इच्छा हे गृहीत आहे. भक्ताच्या चांगल्या इच्छाच भगवंत पुरवेल. आणि श्रीरामांच्या भक्तांना वाईट इच्छा कशी होईल? म्हणून आपल्या भक्तांच्या मोक्षाच्या, दर्शनाच्या सर्व कामना तो दयानिधी पुरविल.
वर निधी म्हणजे कुबेराचा खजिना असे आपण म्हटले आहे. परंतु निधी या शब्दाचा अर्थ या ठिकाणी आणखी वेगळा आणि थोड्या व्यापक अर्थाने घेता येईल. निधी म्हणजे साठा. निधी म्हणजे समुद्र. श्रीराम म्हणजे गुणांचा साठा, दयेचा आणि करुणेचा समुद्र. आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा न करणारा असा तो आहे. त्याच्या गुणांचे काय वर्णन करावे? त्यासाठी शब्द कमी आहेत. तो कोणासारखा बरं आहे? तर त्याच्यासारखा तोच!
अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने? असा तो आहे. तो द्यायला बसला की आपली झोळी अपुरी पडेल. म्हणून काही मागायचे तर त्याच्या जवळच मागावे. जो सगळे काही आहे जो, सारसर्वस्व आहे, त्याच्याजवळ मागण्याचे सोडून इतरांजवळ मागण्यात काय हशील?
व्यवहारामध्ये आपली इच्छापूर्ती किंवा वासनापूर्ती करणारी सारी साधने गौण आहेत. त्या इच्छा, त्या वासना कधी संपतच नाहीत. भगवंत जेव्हा आपली इच्छापूर्ती करतो, तेव्हा काही मागायचे राहतच नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, ” काय उणे आम्हा विठोबाचे पायी? ” अशी भक्ताची अवस्था होते. मन शांत, तृप्त होते आणि अत्यंत सामर्थ्यशाली बनते. कोणतीही आणि कशीही विपरीत परिस्थिती आली तरी ज्याची भगवंतावर श्रद्धा आहे, असा भक्त डगमगत नाही. असे समाधान देणारा भगवंत हा एकमेवाद्वितीय आहे. त्याची बरोबरी कशानेही होणार नाही.
स्वसंवाद ::
१) मी माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बाह्य साधनांवर जास्त अवलंबून आहे का, की परमेश्वरावर विश्वास ठेवतो?
२) “मला अजून काही हवे आहे” ही भावना माझ्यात कितपत आहे? की “काय उणे आहे? ” अशी तृप्ती आहे?
३) मी जे मागतो, ते खरोखर माझ्या कल्याणासाठी आहे का, की केवळ वासनापूर्ती आहे?
४) माझ्या जीवनात “सार” आणि “असार” यातील फरक मला स्पष्टपणे कळतो का?
५) मला भगवंत “सर्वस्व” वाटतो का, की अजूनही इतर गोष्टींमध्येच माझा जास्त विश्वास आहे? (क्रमशः)
☆ “आठ हजार आठशे नव्वद दिवसांची प्रतीक्षा !”भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
भारतीय सेना… जिंदगी के साथ भी… जिंदगी के बाद भी!
(आणि लेकाच्या आठवणीत हे दोन म्हातारे डोंगर आयुष्याचा सूर्यास्त होण्याची वाट पाहू लागले! लष्करी पार्श्वभूमी असल्याने जोसेफ साहेबांचे वडील तरी काहीसे खंबीर होते… मात्र आईची तगमग सुरूच होती..! )
इथून पुढे – –
पंचवीस वर्षांचा काल उलटला आणि इंडियन मिलिटरी अकादमीच्या क्र. ८८-नियमित अभ्यासक्रम-७१व्या तुकडीचा रौप्यमहोत्सव साजरा करण्याची कल्पना काही माजी अधिका-यांच्या मनात आली. कर्नल सजन मोईद्दीन आणि दिवंगत जोसेफ साहेबांच्या सोबत एन. डी. ए. मध्ये आणि पुढे इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून येथे प्रशिक्षण घेतलेल्या सैनिकी-अधिका-यांनी त्यांच्या तुकडीचा रौप्य महोत्सव २४ जून, २०१६ रोजी साजरा करण्याचा कार्यक्रम आखला.
निवृत्त अधिकारी, जवान यांच्या घरी संपर्क साधण्यात आला. एक देखणा कार्यक्रम आयोजित केला… अगदी परदेशातूनही सैनिक-कुटुंबे आली होती. या तुकडीतील १९ अधिकारी देशसेवेत हौतात्म्य प्राप्त करते झाले होते… या १९ अधिका-यांची त्या यादी विक्रम गिल साहेबांनी तयार केली… त्यात जोसेफ साहेबांचे नाव अग्रस्थानी होते. सर्व हुतात्म्यांचे स्मरण करण्यात आले… उपस्थित सर्वांना स्मृतीचिन्हे देण्यात आली… पण या नातेवाईक लोकांत E. जोसेफ साहेबांचे कुणी नव्हते…! कारण त्यांच्याशी संपर्कच होऊ शकला नाही. त्यांच्या पत्त्यावर पाठवलेली सर्व पत्रं माघारी आली होती. आणि संपर्क जरी झाला असता तरी केरळमधून नागालँड मध्ये पोहोचायचे तर खर्च, प्रवास व्यवस्था… कितीतरी समस्या आल्याच असत्या आणि एकतर एवढे दूरचे अंतर! पण कार्यक्रमात काही अधिका-यांच्या मनात एक शल्य निश्चित होतं… जोसेफ साहेब असते तर? किमान त्यांचे आई-वडील तरी आज इथं पाहिजे होते!
समारंभास उपस्थित राहू न शकलेल्या कुटुंबियांना स्मृतीचिन्हे त्यांच्या घरी नेऊन देण्याची व्यवस्था करण्यात आली. दक्षिणेत कर्तव्यावर असलेल्या एका केरळी अधिका-यावर जोसेफ कुटुंबियांचा शोध घेण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी खूप नेटाने शोध घेत दोन महिन्यांनी केरळ मधल्या ग्रामीण भागात जाऊन जीवन कंठणा-या निवृत्त सुभेदार मेजर जोसेफ साहेब यांच्या घराचा शोध लावला… आपल्या लेकाच्या नावाचे स्मृतिचिन्ह पाहून जोसेफ साहेब आणि त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले… आणि बोलण्याच्या ओघात सौ. जोसेफ म्हणाल्या… ”माझ्या लाडक्या लेकाचा चेहराही मला शेवटचा पाहता आला नाही! त्याच्या कबरीवर फुलं वाहून मला त्याला श्रद्धांजली वाहायची होती… आणि त्याचे आभार मानायचे होते! देवाने मला इतका शूर मुलगा दिला… त्याचा अभिमान आहे मला! … पण तो इतक्या दूर आहे त्याच्या कबरीत विसावलेला… माझ्या जीवनाची संध्याकाळ नजीक आली आहे… बहुदा त्याची आणि माझी भेट देवाच्या घरीच होणार आता… ” आणि पुढे अश्रूंचा महासागर लोटला… सायंरेषा अधिकाधिक गडद होत गेल्या!
स्मृतिचिन्ह घेऊन गेलेला अधिकारी एका निश्चयाने परतला. सर्व माजी अधिकारी एकत्र बसले… आणि त्यांनी निश्चय केला… आपल्या मित्राला त्याच्या आईकडे पाठवायचेच! आणि सुरु झाला एका शूर मुलाच्या देहाच्या अवशेषांचा त्याच्या आईपर्यंतचा प्रवास!
जोसेफ साहेबांच्या कबरीचा शोध घेणे हे मोठे जिकीरीचे काम होते. लष्करी परिसरात अंत्यविधी झाला होता… तरीही ही जागा तशी विस्मरणात गेली होती. पण कागदपत्रे आणि इतर बाबी तपासल्या असता कोहिमा मध्ये चाकाबामा येथे एकूण सहा कबरी सापडल्या… चार मुस्लीम अधिका-यांच्या तर दोन ख्रिस्ती अधिका-यांच्या. त्यातील जोसेफ साहेबांची कबर शोधण्यात आली… मित्रांना त्यांचा मित्र पुन्हा गवसला होता.!
हुतात्मा जोसेफ साहेब एन. डी. ए. खडकवासला च्या ७८व्या तुकडीचे विद्यार्थी. त्यांचे सहपाठी पुढे नौदल, वायुदल आणि पायदळात अधिकारी झाले होते… त्यातले बहुतांश आता सेवानिवृत्त झालेले होते. या सर्वांशी संपर्क साधला गेला. आणि काही वेळात मोठी रक्कम जमा झाली.
कर्नल अतुल सालुखे साहेबांनी वायूसेनेतून निवृत्त झालेल्या आणि त्यावेळी इंडिगो विमान कंपनीत वैमानिक असलेल्या कॅप्टन मनोज कुमार यांच्या कानांवर एक गोष्ट घातली… त्यांच्या पुढाकाराने इंडिगो विमान कंपनीने जोसेफ साहेबांच्या कुटुंबियांची आणि जोसेफ साहेबांच्या अवशेषांसाठी विनामूल्य प्रवास व्यवस्था करून दिली. वाटेतील प्रवास, निवास आणि भोजन व्यवस्था संबंधीत ठिकाणच्या लष्करी केंद्रामधील सैनिक, अधिका-यांनी मोठ्या विनयाने आणि बंधू भावनेने करून दिली.
या दरम्यान सर्व सैनिकी अधिकाऱ्यांनी सूत्रे हलवली होती… आणि न भूतो असा निर्णय घेण्यात आला… भारतीय सैन्यातील अत्यंत वरिष्ठ अधिका-यांनी एका अत्यंत भावनिक निर्णयाला संपूर्ण पाठिंबा दिला… जोसेफ साहेबांना त्यांच्या घरी पाठवण्याचा… लष्करी इतमामात! सर्व कागदपत्रे, परवानग्या मिळवण्यात आल्या. ११ ऑक्टोबर, २०१६… जोसेफ कुटुंबीय कोहिमा येथे पोहोचले… जड पावलांनी त्या सर्वांनी दफनभूमीत प्रवेश केला… आईच्या अश्रूंनी कबरीवरची माती ओलीचिंब झाली… तिथल्या गवतावर उगवलेली नाजूक फुलं कावरीबावरी झाली!
कबर विधीवत उकरण्यात आली… प्रार्थना सुरु होत्या… साहेबांचे अवशेष मोठ्या सन्मानाने गोळा करण्यात आले… एका स्वतंत्र शवपेटीत बंदिस्त करण्यात आले… त्यावर राष्ट्रध्वज पांघरला गेला… सलामी झाली… बिगुल वाजला… एक सैनिक अधिकारी आपल्या आईच्या घरी निघाला… १३ ऑक्टोबर, २०१६ रोजी कोची विमानतळावर जोसेफ साहेबांचे पार्थिव पोहोचले… स्थानिक पोलिस, लष्करी अधिका-यांनी पुष्पचक्रे वाहिली… मिरवणूक निघाली… कंजारीमोत्तम इथल्या ख्रिस्ती दफनभूमीत खास व्यवस्था केली गेली होती… कबर तयार होती… १४ ऑक्टोबर रोजी विशेष प्रार्थना सभा आयोजित करून होली क्रॉस चर्च येथे भारतमातेचे सुपुत्र हुतात्मा सेकंड लेफ्टनंट ई. टी. जोसेफ साहेब यांना कायमचा निरोप देण्यात आला! आठ हजार आठशे नव्वद दिवसांनी पोरगं आईकडे परतले होते… आता आई थ्रीसिएम्मा रोज तिच्या लाडक्या लेकाच्या कबरीवर फुलं वाहायला जाऊ शकणार होती… जोसेफ साहेबांच्या मित्रांनी अत्यंत निकराने प्रयत्न करून हेही ऑपरेशन यशस्वी करून दाखवले होते! प्रशिक्षण आणि सैन्यसेवेमध्ये जीवाला जीव देणा-या अधिका-यांनी आपल्या साथीदाराची साथ अखेरपर्यंत सोडली नाही… जय हिंद… जय हिंद की सेना!
(सैनिकांचा इतिहास जिवंत रहावा यासाठी कार्यरत असणा-या उमाताई कुळकर्णी यांच्या पोस्टवरून हा लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली.
☆ # अडला हरी नि शाळेपेक्षा स्पेशल ट्यूशन बरी… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर☆
शी. आई मला किनई नुसती शाळा ते घर नि घर ते शाळा दिवसभर करण्यात बोअर होतयं… रोजचं जा लडदू आणि ये लडदू करण्यात काही थ्रील वाटत नाही बघं… आणि तसंही शाळेत कुठल्याही विषयाच्या टिचर तरी कुठे त्यांच्या तासाला बाय हार्ट शिकवतात… अर्धेअधिक पुस्तक आणि गाईडचं रेफर करून आम्हाला वाचून सांगतात… मग तो मराठीचा तास असूदे नाही तर गणित नाही तर गेलाबाजार सायन्स… सगळ्या टिचरची शिकवण्याची एकच काॅपीपेस्ट मेथड असते… हं या टाॅपिकला यावर्षी च्या पेपरला व्ही. व्ही. आय. एम. पी. मार्क करा आणि त्यातला तो पाचवा प्रश्न यावेळेस विचारला जाण्याची शक्यता आहे… तेव्हा फक्त त्याचं उत्तर तेव्हढं लक्षात ठेवा.. बाकी या लेसन मध्ये काही नाही… आता उद्या दुसरा लेसन आपण बघणार आहोत… आतापर्यंत आपले अकरा लेसन या प्रकारेच तुम्हाला शिकवून झाले आहेत… सगळ्यांना समजलेलं तर आहेच आणि ज्यांना काही डिफिकल्टी असतील तर त्यांनी माझ्या स्पेशल ट्यूशनला ॲडमिशन घेऊन क्लिअर करून घ्यावी… शाळेत तासाला विषयाचा सिलॅबसच जेमतेम पूर्ण होईपर्यंत मारामार तिथे डिफिकल्टी कुठून साॅल्वह करता येणार… आणि माझ्या स्पेशल ट्यूशनमधे नव्वद मिनिटाचा तास असल्याने तुमच्याकडे वेळ देता येतो… शिवाय टेस्ट सिरीजमध्ये विषय चांगला पक्का होऊन डिसटिंक्शन मार्क मिळतात… हा माझा लौकिक आहे… तेव्हा तुम्ही मुलांनी आपल्या पेरेंटसना या क्लासला जायचे आहे म्हणून सांगा. जे येतील त्यांचं भविष्य उज्ज्वल झालंच म्हणून समजा आणि जे येणार नाहीत ते या विषयात फेल झालेच म्हणून समजा… चाॅईस ईज युवर… असं शाळेतला उठसुठ जो तो टिचर आम्हाला रोजच ही
टेप वाजवून दाखवतो… आणि पंचेचाळीस मिनिटाच्या तासात फक्त दहा मिनिटात विषय गुंडाळला जातो बाकी सगळं ट्यूशनमधे सांगितलं जाईल म्हणतात… मग मम्मी आम्ही घरी तरी अभ्यास कशाला आणि का करायचा… का उगाच आताच माथेफोड करायची… सगळी परीक्षेची काळजी जर स्पेशल ट्यूशनमधे घेतली जाणार आहे तर शाळेत तरी कशाला जायचं… तिकडे बाहेरच्या बाहेर ट्यूशन जाॅइन केललं काय वाईट… परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेची नक्कल उत्तरासकट हाती मिळत असेल तर शाळेची गरज काय… आणि कोण आता ते सेल्फ स्टडीज च्या ओल्ड ट्रॅडिशनला फाॅलो करेल… ट्यूशनची फी एकदा भरली कि आपलं फ्युचर सेफ होते… फर्स्टक्लास विथ मेरिटचं भलंमोठ्ठं सर्टिफिकेट हाती येतं तेव्हा तर याचसाठी केला होता अट्टाहास हेच ओठी येतं… (हो ते तेव्हढचं.. डोक्यात काय घुसलयं कोणत्या देवाला ठाऊक).. पण आताच्या डिजीटल जमान्यात उसका भी डर नही… कारण डर के आगेही गुगल कि… चुकलं चुकलं… अपनीही जीत होती है… नाहीतरी तुम्ही माझ्यासाठी या शाळेतल्या आणि पुढच्या काॅलेजच्या शिक्षणासाठी किती खर्च करत राहणार आणि सगळ्यात महत्त्वाचं या वेळखाऊ सव्यापव्यसात माझा टाईम किती बरबाद होईल… ते मला चालायचं नाही… मला त्या टाईम स्लाॅट मधे कुछ तो क्रिएटिव्ह करायचं आहे.. जसं कि पब जी ग्राफिक्स सुपरफास्ट कसं होईल… बंद तिजोरी कशी उघडता येईल… सायलेंट बाॅम्ब कसा बनवता येईल… वगैरे वगैरे.. या सगळ्या गोष्टी काय शाळेत किंवा काॅलेजच्या धड्यात मिळतात काय… त्यासाठी गुगल सर्च करावं लागतं आणि तसं गुगलच आता महागुरू असल्याने बाकी गुरूंची सुट्टी झालीय… माझा आता पाचवीच्या वार्षिक परिक्षेचे सगळे पेपर विथ आन्सर गुगलवरच तर अपलोड झालेले आहेत.. त्याला गुगल पे ने फी भरली कि आपल्याला ॲक्सेस मिळतो… आणि येथून पुढे हिच प्रोसेस फाॅलो केली कि जीवन में खुशीयाही खुशीया आ जाएगी… तेव्हा पप्पा नि मम्मी तुम्ही फक्त पैसै तयार ठेवा… बाकी मी बघून घेतो… आणि लवकरच तुम्हाला माझ्या तर्फे यशसिध्दीचा आनंदाचा मेवा देतो…