मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १६ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १६ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

रविंद्रनाथ टागोरांच्या इंग्रजी गीतांजलीला सुप्रसिद्ध आयरिश कवी विल्यम बटलर यीट्स यांची प्रदीर्घ प्रस्तावना लाभली आहे. या कवितांनी त्यांना भारावून टाकलं आहे. या कवितांचा आधारभूत पाया म्हणजे प्राचीन भारतीय अध्यात्मिक तत्वज्ञान, त्यातील साधेपणा, भाबडेपणा, खरेपणा, पारदर्शकता, स्वयं मूल्यांकन करण्याचा धीटपणा, निरपेक्ष समर्पणाची भावना यांच्या कवितेतून होणाऱ्या दर्शनाने ते स्तिमित झाले आहेत. टागोरांच्या कवितांचा गर्भितार्थ, त्यातील तत्वज्ञान त्यांच्या मनाला भिडलं आहे. म्हणूनच त्यांनी एवढी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली असावी. यीट्स यांना देखील सन १९२३ मध्ये साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. 

केवळ गीतांजलीतील कविताच नाही तर रविंद्रनाथांच्या पूर्ण आयुष्याच्या दर्शनाने यीट्स भारावून गेले आहेत. टागोरांच्या आयुष्याबद्दल च्या कल्पना, आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन त्यांना अद्भुत वाटतो. 

त्यांच्या मते रविंद्रनाथांचे वडील, भाऊ व इतर कुटुंबीय देखील असाधारण होते. भारतीय तत्वज्ञानाची अध्यात्मिक बैठक, शतकानुशतके चालत आलेला भक्तिमार्ग, बंगालचे साहित्य आणि कलेमध्ये रमलेले जनजीवन या सर्वांचे सार म्हणजे गीतांजली, असे त्यांना वाटते. 

तासनतास निसर्गाकडे बघत राहणे, जगण्याचे, व्यवहाराचे भान विसरणे हे रविंद्रनाथांच्या असामान्य असण्याचे दाखले आहेत असं त्यांचं मत आहे. 

विश्वविधात्याबद्दलच्या टागोरांच्या भावना निर्व्याज आहेत. त्यांना कसलाही राजकीय वा सामाजिक गंध नाही असं यीट्सना खात्रीपूर्वक वाटतं आणि यामुळेच ते युरोपियन तत्वज्ञांपेक्षा वेगळे आहेत असं ते म्हणतात. 

ते म्हणतात की, गीतांजलीची खरी थोरवी, तिच्या साधेपणात आहे. मोजके शब्द, खऱ्या भावना आणि स्वतःच्या मनात डोकावून घेतलेला हा चैतन्याचा शोध आहे. रविंद्रनाथ कवी म्हणून कसे उमलत गेले याबद्दल लिहितांना ते म्हणतात, ” वयाच्या १५ ते २० वर्षे या कालावधीतील त्यांच्या कविता साध्या, सोप्या व जास्त करून निसर्गाविषयी आहेत. वयाच्या २५ ते ३५ वर्षे या टप्प्यामधील कविता प्रेम आणि शोक या दोन मूलभूत भावनांविषयी भाष्य करतात आणि त्यानंतरच्या काळात ते हळूहळू अध्यात्माकडे वळतात.” 

कोणताही हेतू मनात न धरता टागोरांनी त्या त्या वेळच्या आपल्या सच्च्या भावनांना शब्दरूप दिलं आहे. त्यावेळी हे पुस्तक कोण वाचेल, कोण त्याचा अभ्यास करेल, त्याचा परिणाम काय होईल असे कोणतेही विचार त्यांच्या मनात नव्हते. यीट्सना रविंद्रनाथ एखाद्या निरागस बालकासारखे वाटत. कोणत्याही लौकिक गोष्टींनी, विचारांनी त्यांना बंदिस्त केलेले नव्हतं. 

‘देव काय आहे’ या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या कवितांमधून खूप सोप्या प्रकारे मिळतं. वर्षानुवर्षे हा प्रश्न आपल्याला पडलेला असतो पण टागोरांच्या कविता वाचून आपल्याला समजतं की इतकी वर्षे देव आपल्या मधेच होता, फक्त आपल्याला ते माहित नव्हतं. आपल्या सगळ्या शुद्ध भावना म्हणजेच देवत्व म्हणजेच देव. हे मान्य करण्यासाठी लागणारी प्रामाणिक निरागसता हा टागोरांच्या लिखाणाचा गाभा आहे. स्वत:शी संपूर्ण पारदर्शक राहून, एखाद्या बालकाप्रमाणे मनाची कवाडं सताड उघडी ठेवून घेतलेला स्वत:मधल्या देवत्वाचा शोध म्हणजे गीतांजली आहे व हीच टागोरांची थोरवी आहे, असं कविवर्य यीट्सना वाटतं.

—–

☆ गीत ४६ ☆

I KNOW not from what distant time thou art ever coming nearer to meet me. Thy sun and stars can never keep thee hidden from me for aye.

In many a morning and eve thy footsteps have been heard and thy messenger has come  within my heart and called me in secret. 

I know not why to-day my life is all astir, and a feeling of tremulous joy is passing through my heart. 

It is as if the time were come to wind up my work, and I feel in the air a faint smell of thy sweet presence. 

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत ४६ ☆

ठाऊक नाही कधी, सौंदर्य तुझे मज भावले

सूर्य अन् तारे तुजला, ना लपवू शकले

*

कितीक दिवस मी ऐकते, पदरव तुझा तो

प्रेषित तुझा, हृदयात माझ्या, हळूच डोकावतो

*

आज अचानक कां थरथरे मी आतुनी

हृदयातील कंपने, आनंद लहरी उठवुनी,

*

मज सांगती चल आता, कर्म इथले संपले

तुझा सुगंध येता, अस्तित्व तव जाणले

*

ठाऊक नाही मी कधी तुजकडे आकर्षिले

किती काळ लोटला, भेटीसाठी चालले

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ४७ ☆

THE night is nearly spent waiting for him in vain. I fear lest in the morning he suddenly come to my door when I have fallen asleep wearied out. Oh friends, leave the way open to him ⎯ forbid him not. 

If the sound of his steps does not wake me, do not try to rouse me, I pray. I wish not to be called from my sleep by the clamorous choir of birds, by the riot of wind at the festival of morning light. Let me sleep undisturbed even if my lord comes of a sudden to my door. 

Ah, my sleep, precious sleep, which only waits for his touch to vanish. 

Ah, my closed eyes that would open their lids to the light of his smile when he stands before me like a dream emerging from darkness of sleep. 

Let him appear before my sight as the first of all lights and all forms. The first thrill of joy to my awakened soul let it come from his glance. And let my return to myself be 

immediate return to him. 

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत ४७ ☆

व्यर्थ रात्र गेली, त्याची पाहता वाट

मी असे निद्राधीन, होता भली पहाट

*

नका उठवू विनवितो, आला तो जरी दाराशी

पाखरांनो नका गाऊ, पवना नको पंगा नीरवतेशी

*

निद्रेच्या तमातून तो, स्वप्नासम उलगडू दे

त्याचीच पहिली प्रतिमा, मम नयनी उमटू दे

*

मनाचे जागेपण, त्याच्या तेजातून निथळू दे

जागृती येण्याआधी, नंदनवन त्याचे गाठू दे

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ४८ ☆

THE morning sea of silence broke into ripples of bird songs; and the flowers were all merry by the roadside; and the wealth of gold was scattered through the rift of the clouds 

while we busily went on our way and paid no heed. 

We sang no glad songs nor played; we went not to the village for barter; we spoke not a word nor smiled; we lingered not on the way. We quickened our pace more and more as the time sped by. 

The sun rose to the mid sky and doves cooed in the shade. Withered leaves danced and whirled in the hot air of noon. The shepherd boy drowsed and dreamed in the shadow of the banyan tree, and I laid myself down by the water and stretched my tired limbs on the grass. 

My companions laughed at me in scorn; they held their heads high and hurried on; they never looked back nor rested; they vanished in the distant blue haze. They crossed many meadows and hills, and passed through strange, far-away countries. All honour to you, heroic host of the interminable path! Mockery and reproach pricked me to rise, but 

found no response in me. I gave myself up for lost in the depth of a glad humiliation ⎯ in the shadow of a dim delight. 

The repose of the sun-embroidered green gloom slowly spread over my heart. I forgot for what I had travelled, and I surrendered my mind without struggle to the maze of shadows and songs. 

At last, when I woke from my slumber and opened my eyes, I saw thee standing by me, flooding my sleep with thy smile. How I had feared that the path was long and 

wearisome, and the struggle to reach thee was hard!

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत ४८ ☆

पक्ष्यांची गीते, जागी सकाळ झाली

साज फुलांचा लेऊन, उषा नटली

*

ना खेळलो, ना हसलो, ना बोललो

ना उद्यमा गेलो, ना वाटेत रेंगाळलो

*

न कांही पाहिले, न कांही ऐकले

शोध घेता तुझा, मन पुढे धावले

*

ढगांतून सोनेरी प्रभा पसरली

तरी ना आनंदाची गाणी गायिली

*

माथ्यावर सूर्य, पाऊले वेगात निघाली

नाचऱ्या पानांनी उगाच गिरकी घेतली

*

गुराखी सावलीत पेंगुळले, हाती लाठी

गवतावर पहुडलो मी, पाण्याच्या काठी

*

अनंताच्या वाटेवरचे सहप्रवासी मज हसले

अनेक देश, टेकड्या, कुरणे; पार करण्या गेले

*

वेगात, न पलटता, अदृश्य झाले क्षितिजापार

व्यर्थ यत्न उठण्याचा केला, ऐकून तो तिरस्कार

*

शाल पांघरून आरामाची, घेतले निद्रेचे सुखासन

विसरलो, काय होते या प्रवासाचे प्रयोजन

*

जागा झालो, साक्षात् तू पडलास दृष्टी

स्मित हास्य तुझे, तूच निर्मिल्या या सृष्टी

*

मी वेडा, तुला भेटण्या वणवण करीत होतो

त्या सौंदर्या, त्या गीतांना पारखा होत होतो

– क्रमशः भाग १६.

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “2FA”: टू फॅक्टर ऑथेंटिकेशन  ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

“2FA”: टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

घराला दोन कुलुपे लावता – – 

– – मग सोशल मीडियाच्या अकाउंटला दोन कुलुपे का नाहीत?

घराच्या सुरक्षेसाठी एक लाकडी दरवाजा बिल्डर देत असतोच. पण आपण त्याला सांगून बाहेरून एक लोखंडी दरवाजा (सेफ्टी डोअर) बसवतो ना? आणि दोन्ही दरवाजाला कुलुपे लावतो ना? का लावतो? तर एक्स्ट्रा सिक्युरिटी म्हणून न?

मग जशी घराची काळजी घेता तशीच तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटची पण घेतली पाहिजे न! जसे घरी चोरी झालेली आपल्याला झेपत नाही तसेच सोशल मीडिया अकाउंट हॅक झालेलेही झेपत नाही. मग त्यासाठीच सोशल मीडिया अकाउंटला दुहेरी सुरक्षा आजच बसवा. ज्याचे नाव आहे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA)… ही प्रणाली तुम्ही ऍक्टिव्ह केल्यानंतर प्रामुख्याने तुमचे अकाउंट हॅक होण्याचा धोका संपुष्टात येतो. अर्थात ज्यांनी ऑलरेडी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ऍक्टिव्ह केले आहे त्यांना दंडवत आहेच पण असेही अनेकजण आहेत ज्यांना हे माहीतच नाही किंवा माहित आहे पण कसे करायचे ते माहित नाही, त्यांच्यासाठी हि पोस्ट आहे. यामध्ये महत्वाचे असे ईमेल अकाउंट, व्हाट्स अप अकाउंट आणि फेसबुक अकाउंट यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसिजर देतोय. नीट पाहून घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करा. 

*

ईमेलसाठी :

स्टेप 1: तुमच्या ईमेल अकाउंटमध्ये लॉग इन करा

स्टेप 2: तुमच्या अकाउंटच्या सेटिंग्स किंवा प्रोफाइल सेटिंग्समध्ये जा.

उजवीकडे वरच्या कोपऱ्यातील प्रोफाइल पिक्चरवर क्लिक करा > मग अकाउंट सेटिंग्स > मग सिक्युरिटी.

स्टेप 3: –टू फॅक्टर ऑथेंटिकेशन” किंवा “2FA” शोधा आणि त्यावर क्लिक करा. “Enable” किंवा “सक्षम करा” बटणावर क्लिक करा.

स्टेप 4: – तुमचा फोन नंबर किंवा ऑथेंटिकेटर ऐप (उदा. Google Authenticator, Authy) निवडा. फोन नंबर निवडल्यास, तुमच्या नंबरवर व्हेरिफिकेशन कोड येईल.

स्टेप 5: तुम्हाला मिळालेला व्हेरिफिकेशन कोड एंटर करा. – “Verify” बटणावर क्लिक करा.

स्टेप 6: तुम्हाला बॅकअप कोड मिळतील. ते सुरक्षित ठिकाणी सेव्ह करा. – हे कोड तुम्हाला तुमचा फोन नसताना अकाउंटमध्ये लॉग इन करण्यासाठी मदत करतील.

स्टेप 7: 2FA सक्षम झाले आहे का ते तपासा – त्यासाठी तुमच्या अकाउंटमध्ये लॉग आउट करा आणि पुन्हा लॉग इन करण्याचा प्रयत्न करा. – तुम्हाला 2FA कोड मागितला जाईल. तसे झाले की समजा सर्व सेट झाले आहे 

*

व्हाट्सअपसाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA)

स्टेप 1: तुमच्या फोनमध्ये व्हाट्सअप ओपन करा.

स्टेप 2: सेटिंग्स मध्ये जा, उजवीकडे वरच्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर क्लिक करा > मग सेटिंग्स > मग अकाउंट > टू-स्टेप व्हेरिफिकेशन.वर क्लिक करा 

स्टेप 3: टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्षम (ऍक्टिव्ह) करा त्यासाठी “Enable” बटणावर क्लिक करा. – तुमचा फोन नंबर व्हेरिफाई करा.

स्टेप 4: आता तिथे सहा डिजिट पिन (पासवर्ड) सेट करा आणि पुष्टी करा.म्हणजे ओके द्या. 

– हा पिन सुरक्षित ठिकाणी सेव्ह करा.

स्टेप 5: ईमेल आयडी सेट करा (वैकल्पिक)

– तुम्हाला हवे असल्यास, ईमेल आयडी सेट करा जेणेकरून तुम्हाला पिन रीसेट करण्यासाठी मदत होईल.

टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्षम केल्याने तुमच्या व्हाट्सअप अकाउंटची सुरक्षा वाढते. 

*

फेसबुक साठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA)

स्टेप 1: तुमच्या फोनमध्ये फेसबुक ओपन करा.

स्टेप 2: सेटिंग्स मध्ये जा तिथं उजवीकडे वरच्या कोपऱ्यातील तीन लाइनवर क्लिक करा > सेटिंग्स & प्रायव्हसी > सेटिंग्स > सिक्युरिटी आणि लॉगिन.तिथं क्लिक करा. 

स्टेप 3: “टू फॅक्टर ऑथेंटिकेशन” किंवा “2FA” शोधा आणि त्यावर क्लिक करा.

-ते “Enable” किंवा “सक्षम करा” बटणावर क्लिक करा.

स्टेप 4: फोन नंबर किंवा ऑथेंटिकेटर ऐप निवडा

– तुमचा फोन नंबर किंवा ऑथेंटिकेटर ऐप (उदा. Google Authenticator, Authy) निवडा. फोन नंबर निवडल्यास, तुमच्या नंबरवर व्हेरिफिकेशन कोड येईल.

स्टेप 5 : तुम्हाला मिळालेला व्हेरिफिकेशन कोड एंटर करा. नंतर “Verify” बटणावर क्लिक करा.

झालं काम!

*

डॉ. डीडी क्लास : पाच दहा मिनिटांचे काम आहे पण तुमचं अकाउंट हॅकिंगचे टेन्शन कायमचे नष्ट करणार आहे. त्यामुळे नक्की करा. शिवाय घरच्यांनाही हे सांगून त्याचेही अकाऊंट सुरक्षित करा. वाटल्यास हि पोस्ट सेव्ह करून नंतर इतरांना पाठवून त्यांनाही सजग करा. 

©️ डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD : Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor : transcendental-technologies, Asso. with Pune University (SPPU)

5) Mentor : Canadian Asso. for Security and Intelligence Studies – CANADA

6) Mentor : Direct Action International – UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तिचे थांबणे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

प्रफुल्ला शेणॉय

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ तिचे थांबणे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

असं म्हणतात की, वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही,

पण वेळेचं गणित साधणाऱ्या ‘ती’ला मात्र थांबावं लागतं वेगवेगळ्या रूपात.

उदाहरणार्थ : साध्या-साध्या गोष्टी.

पोळपाटावर एक पोळी लाटून तयार असते, इतकी जलद.

पण ‘ती’ तिथे थांबून रहाते, तव्यावरची आधीची पोळी नीट भाजून होईपर्यंत. कंटाळा आला म्हणून अर्धी-कच्ची सोडत नाही.

कधी घामाघूम होऊन, कधी पाय, कधी पाठ दुखत असते, तरीही.

सगळी कामे आटोपल्यावरही, ती ओट्यापाशी थांबते, गॅसवरचं दूध ओतून वाया जाऊ नये म्हणून.

तशीच, जोडीदार आकाशी उंच झेप घेत असताना, घरट्यातल्या पिलांच्या पंखात बळ येईपर्यंत, ‘ती’ थांबते.शी-शू सांगता येणाऱ्या, पण आपले आपण आवरता न येणाऱ्या मुलांबाळांसाठी, कधी सोबतीला बाथरूमच्या दारापाशी ती थांबून असते.मुलांकडून अभ्यास करून घेताना, शब्द- वाक्य- गणितं- व्याकरण सगळं बरोबर येईपर्यंत ‘ती’ थांबते.मुलं लहान असो नाहीतर मोठी. परीक्षा, पालक-सभा, त्यांचं अभ्यासासाठी पहाटे लवकर उठणं, रात्री उशिरा झोपणं. सगळ्यासाठी ती त्यांच्या पाठीशी थांबते.

चहा-कॉफीचा एक निवांत घोट नवऱ्यासोबत घ्यायचा म्हणून थांबते. तेवढ्याच चार निवांत गप्पा होतील, एकमेकांचे त्रास-ताण, शेअर करण्यासाठी.

घरातल्या सगळ्यांना जेवण वाढून होईपर्यंत, कुणी उशिरा येणार असेल तर तोपर्यंत ‘ती’ थांबते, जेवायची. सगळ्यांच्या पाठीशी ‘ती’ थांबते.

खरंतर ती पाठीशी थांबते म्हणून सगळे चाललंय. व्यवस्थित.

काय हरकत आहे हे मान्य करायला. तिच्या या, ‘थांबण्यात’ही एक ऊर्जा आहे, त्या ऊर्जेमुळेचं वेळ चांगली चालली आहे.

अशा वेळेस प्रत्येक घरात, ती मात्र पाठीशी ‘थांबून’ आहे. अगदी स्ट्रॉंग.

एकही दिवस स्वयंपाकघर बंद नाहीये, कंटाळा येतो, थकवाही. तरीही रोजच्या-रोज सगळी स्वच्छता, एक्स्ट्रा काळजी, कोणत्याही आजारपणाला घरात शिरकाव करू द्यायचा नाही, असं तिने मनाशी पक्क ठरवलंय.

म्हणूनच म्हटलं, तिच्या या थांबण्यातही एक ऊर्जा आहे. त्या उर्जेमुळेच ही अशी कठीण वेळही निघून जाईल.

प्रत्येक घरातील ‘तिला’ सादर नमन!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :  प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आकाश कवेत, पाय मात्र जमिनीवर… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

🔅 विविधा 🔅

☆ आकाश कवेत, पाय मात्र जमिनीवर… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

१९९२ मध्ये भारत सरकारने जे आर डी टाटा यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी किताब देऊन त्यांचा सन्मान केला. ही आनंदाची बातमी त्यांना रतन टाटा यांनी कळवली. ही बातमी ऐकल्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली, ती त्यांचे मोठेपण दर्शवणारी आहे. ते म्हणाले, ” O my God, why I am selected for this honour? आपण हे थांबवण्यासाठी काही करू शकतो का? भारतात इतरही अनेक महान लोक आहेत जे भारतरत्न या किताबास पात्र आहेत. मी असे काय मोठे केले? मी जे काही माझ्या आयुष्यात केले ते माझे कर्तव्यच होते. मी ते उत्तम प्रकारे पार पाडले एवढेच! मी देशाला विमानसेवा दिली आणि मूल्याधारीत उद्योगसंस्कृती रुजविण्याचा प्रयत्न केला. पण म्हणून मी एवढ्या मोठ्या सन्मानाला पात्र आहे का? “

पदव्यांसाठी, पुरस्कारांसाठी हव्यास करणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही प्रतिक्रिया आहे. आज प्रत्येक जण मोठेपणाला हपापलेला असतो. मी इतरांपेक्षा किती श्रेष्ठ, मला किती समजते हे दाखवण्याच्या प्रयत्नात असतो. कधी कधी हे दाखवण्याच्या प्रयत्नात ती व्यक्ती केविलवाणी दिसते हेही खरेच! राजकारण हे खरे तर समाजसेवेचे क्षेत्र. परंतु या क्षेत्रात काम करणारे समाजसेवेच्या उद्देशाने अभावानेच येतात. बहुतेकांना सत्ता किंवा पद हवे असते. ते नाही मिळाले तर ते वाटेल त्या थराला जाण्यासाठी कमी करत नाही हे आजकाल आपण पाहतो आहोत. या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात असे सारखे पक्षांतर सत्तेसाठी सुरू राहते.

ज्याप्रमाणे जेआरडी टाटा यांनी त्यांना भारतरत्न पुरस्कार भारत सरकारने जाहीर केल्यानंतर प्रतिक्रिया दिली ती पाहून म्हणावेसे वाटते की खरोखर अशा व्यक्ती धन्य होत. भारताचे भूषण होत. कोणतीही अपेक्षा न बाळगता अशा व्यक्ती आपले कर्तव्य निरलसपणे करीत राहतात.

असेच आणखी एक उदाहरण आठवते. १९५२ सालची गोष्ट आहे. प्रख्यात शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांनी जर्मनीतून इस्रायलमध्ये स्थलांतर केले होते. त्यावेळी इस्रायलचे पहिले अध्यक्ष चॅम वेजमेन यांचे नुकतेच निधन झाले होते. अशावेळी आईन्स्टाईन यांना इस्रायलचे दुसरे अध्यक्ष होण्याबद्दल विचारण्यात आले. त्यांच्यासारख्या अत्यंत बुद्धिमान व्यक्तीने इस्रायलचे अध्यक्ष व्हावे अशी जनतेची इच्छा होती. वास्तविक जर्मनीतून आलेल्या एका अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा हा फार मोठा सन्मान होता. परंतु आईन्स्टाईन यांनी अत्यंत नम्रपणे ही ऑफर नाकारली. ते आपल्या उत्तरात म्हणाले, ” तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आणि प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. त्यासाठी आपला मनापासून आभारी आहे. परंतु त्याचबरोबर मला हेही आपल्याला सांगितले पाहिजे की आपण जे पद मला देऊ करत आहात त्या पदावर बसण्याची माझी पात्रता नाही. कारण गुंतागुंतीच्या अशा मानवी संबंधांच्या क्षेत्रात मला फारसं कळत नाही. त्या विषयाचा मी कधी अभ्यासही केला नाही. मला गणितात आणि भौतिकशास्त्रात थोडीफार गती असेल पण माझी मनापासून अशी इच्छा आहे की त्याच क्षेत्रात मी आणखी परिश्रम करावेत आणखी अभ्यास करावा. “

महान व्यक्ती खरोखरच महान का असतात त्याचे उत्तर म्हणजे मला वाटतं वर आईन्स्टाईन यांनी दिलेली प्रतिक्रिया. नाहीतर आपल्याला एखादे पद मिळावे म्हणून आपण किती आसुसलेले असतो. आपल्याला कोणत्याही विषयात गती आहे आणि आपल्याला कोणतेही काम जमू शकते अशा विचाराने सत्तेकडे किंवा पदांकडे धाव घेणाऱ्यांची सध्या कमतरता नाही. परंतु जेव्हा अशा अयोग्य किंवा अपात्र व्यक्ती पदावर येतात तेव्हा ते त्या पदाला न्याय देऊ शकत नाहीत हे आपण पाहतो.

रामकृष्ण परमहंस, संत गाडगेबाबा, विनोबा भावे, साने गुरुजी यांच्यासारखी थोर मंडळी कोणालाही आपल्या पाया पडू देत नसत. वास्तविक ते काय किंवा आणखी इतर संत काय यांची योग्यता खरोखरच फार मोठी! पण त्यांचे म्हणणे असे असायचे की वाकायचंच असेल तर त्या सर्वशक्तिमान अशा परमेश्वरापुढे वाका. इतरांपुढे नाही. दुसऱ्याला आपल्यापुढे वाकायला लावून काहीच साधत नाही. वाकायला लावणाऱ्याचा अहं वाढत जातो आणि वाकणाऱ्याच्या मनात कमीपणाची भावना!

आम्हाला तर आमच्या कोणी पाया पडले तर केवढा आनंद होतो! आमचा अहम सुखावतो! मला किती लोक नमस्कार करतात हे आपण इतरांना अप्रत्यक्षपणे दाखवून देतो आणि आपण किती मोठे आहोत हेही त्यातून दाखवण्याचा प्रयत्न असतो. अर्थात सगळेच असे असतात असे नाही. काही जण ज्यांच्या पुढे वाकावे किंवा नम्र व्हावे अशा योग्यतेचे असतातच!  

या सगळ्या थोर व्यक्तींनी दाखवून दिले आहे की, ‘पद’ माणसाला मोठे करत नाही, तर ‘कर्तृत्व’ आणि ‘नम्रता’ या गुणांमुळे माणूस मोठा होतो. कवी दत्ता हलसगीकर आपल्या कवितेत म्हणतात

“आभाळाएवढी उंची ज्यांची, त्यांनी थोडे खाली झुकावे,

मातीत मळले जन्म ज्यांचे, त्यांना जरा उचलून घ्यावे…”

महाराष्ट्राच्या मातीतील संतांनी तर ही ‘उंची’ प्रत्यक्ष जगून दाखवली. संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर हातात खराटा घेऊन स्वच्छतेचे कार्य केले. लोक त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचे, पण ते स्वतः मात्र गरिबांच्या झोपड्यांत जाऊन त्यांना ‘उचलून धरण्याचे’ काम करत राहिले. त्यांनी सत्तेच्या सावलीलाही स्पर्श केला नाही. तर दुसरीकडे साने गुरुजी यांनी आपल्या साध्या राहणीतून आणि उच्च विचारांतून समाजाला माणुसकीचे धडे दिले. त्यांनी कधीही राजकीय पदाची अभिलाषा धरली नाही, उलट मातीत मळलेल्या कष्टकरी वर्गाला स्वाभिमान मिळवून दिला.

आज आपण पाहतो की, कोणत्याही छोट्या पदासाठी लोक एकमेकांचे पाय ओढतात. ‘आधी सिद्धी आणि मग प्रसिद्धी’ हे जीवनाचे सूत्र आहे. यशाचा मंत्र आहे. पण याचा विसर पडल्यामुळे केवळ नावासाठी आणि प्रसिद्धीसाठी धावणारी माणसांची शर्यत दिसते. खरी श्रेष्ठता आधी ‘सिद्ध’ करण्यात असते. मग प्रसिद्धी आपोआपच मिळते. ‘ न मागे तयाची रमा होय दासी ‘ असे म्हटले जाते. ज्यांच्याकडे खरोखरच ‘उंची’ असते, त्यांना ती ओरडून सांगावी लागत नाही; ती त्यांच्या नम्रतेतूनच झळकत असते.

शिखरावर जाणे महत्त्वाचे आहेच, पण त्याच वेळी पाय जमिनीवर असणे हे त्याहूनही अधिक महत्त्वाचे आहे. कारण जमिनीवर पाय असतील तरच माणसाला दुसऱ्याची वेदना समजते आणि आकाशाचा आवाका उमजतो. या सगळ्या व्यक्तींच्या कवेत आकाश होते पण पाय मात्र जमिनीवर होते.

कविवर्य बा भ बोरकर यांच्या ‘लावण्यारेखा’ या कवितेतील या ओळी मला फार आवडतात. ते म्हणतात

जीवन त्यांना कळले हो

मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो.

****

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पंचेचाळीशीनंतरची नवी सप्तपदी… लेखक : श्री मंगेश दोरके ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ पंचेचाळीशीनंतरची नवी सप्तपदी… लेखक : श्री मंगेश दोरके ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

– – सहजीवनाचे नवे ऋतू

– – पंचेचाळीशीनंतरची नवी सप्तपदी – – 

१. पहिले पाऊलः जोडीदाराच्या बदलत्या रूपाचा आणि वयाचा मूक स्वीकार करणे.
२. दुसरे पाऊलः मुले मार्गी लागल्यानंतरच्या रिकाम्या घरट्यात एकमेकांना नव्याने शोधणे.
३. तिसरे पाऊल: जोडीदाराच्या मूक त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि नवे सामायिक छंद शोधणे.
४. चौथे पाऊलः समाजाच्या अपेक्षांतून मुक्त करून हरवलेल्या स्वप्नांना नवे पंख देणे.
५. पाचवे पाऊलः जुने हिशेब सोडून भूतकाळाचे ओझे कायमचे उतरवून ठेवणे.
६. सहावे पाऊल: आजारपणातील निस्वार्थ आधार आणि एकमेकांचा ‘समांतर एकांत’ जपणे.
७. सातवे पाऊल: वेळेचे भान ठेवून कोणत्याही मृगजळामागे न धावता निखळ मैत्री जपणे.

≡ ≡ ≡ ≡ ≡ 

काल माझ्या मावस भावाच्या लग्नाचा मांडव सनईच्या मंगल सुरांनी ओसंडून वाहत होता. होमकुंडातून उसळणाऱ्या पवित्र धुराच्या लोटामुळे माझे डोळे किंचित पाणावले आणि माझी नजर सहजच शेजारी बसलेल्या माझ्या अर्धांगिनीकडे वळली. उकाड्याने तिच्या कपाळावर घामाचे मोत्यांसारखे थेंब चमकत होते. मी खिशातून रुमाल काढला आणि अत्यंत सहजतेचा स्पर्श देत ते टिपले. तिने माझ्याकडे पाहून एक अत्यंत आश्वासक स्मितहास्य केले. समोर सनईचे सूर आकाशाला भिडत होते आणि त्या तरुण जोडप्याने एकमेकांचा हात धरून अग्नीभोवती फेरे घ्यायला सुरुवात केली होती. त्यांच्या डोळ्यांत भविष्यातली सोनेरी स्वप्ने होती आणि जग जिंकण्याची एक खळाळती उमेद होती. ते दृश्य पाहताना मला अचानक पंचवीस वर्षांपूर्वीचा माझा तो दिवस आठवला ज्या दिवशी आम्हीही अशीच एकमेकांना वचने देत ती पहिली सप्तपदी घेतली होती.

विशीच्या उंबरठ्यावर घेतलेली ती पहिली सप्तपदी मुळात संसाराचा डोलारा उभा करण्यासाठी होती. त्यात स्वतःचे घर घेण्याची शर्यत होती; मुलांचे भविष्य घडवण्याची धावपळ होती आणि समाजाला स्वतःचे अस्तित्व सिद्ध करून दाखवण्याची एक अथांग धडपड होती. पण आज पंचेचाळीशीचा उंबरठा ओलांडताना मला तीव्रतेने जाणवत होते की तो धावपळीचा ग्रीष्म ऋतू आता मागे पडला आहे. आता पैशांची पूर्वीसारखी ओढाताण नाही पण वेळेची आणि शरीराची मर्यादा पावलोपावली जाणवू लागली आहे. त्यामुळे आता मृगजळामागे धावायचे नाही तर थांबून निवांतपणे हा उभा केलेला संसार केवळ साजरा करायचा आहे. त्या क्षणी त्या मंडपाच्या कोलाहलातच मी मनातल्या मनात तिच्याशी संवाद साधू लागलो. कोणत्याही अग्नीच्या साक्षीने नाही तर आमच्यातल्या या प्रगल्भ शांततेच्या साक्षीने मी आज स्वतःला आणि तिला संसाराच्या या सांजवेळी एक नवी सप्तपदी देत होतो.

माझे पहिले पाऊल तिच्या बदलत्या रूपाचा आणि वयाचा मूक स्वीकार करण्याचे असेल. तारुण्यातला तो तजेलदारपणा आणि शरीराची ओढ आता ओसरली आहे आणि हे निसर्गाचे सत्य मला हसत हसत स्वीकारायचे आहे. तिचे ते रुपेरी होणारे केस; हसताना डोळ्यांच्या कडेला जमा होणाऱ्या अनुभवांच्या सुरकुत्या आणि शरीराचा वाढलेला डौल या सगळ्या बदलत्या ऋतूंमध्ये मला तिची अभेद्य ढाल बनायचे आहे. पूर्वी तिच्या सुगंधाने मला भुरळ पडायची पण आता रात्री झोपताना सांधेदुखीवर तिने लावून दिलेल्या औषधाच्या वासात मला अधिक सुरक्षित वाटते. तिने विसरलेला चष्मा न रागावता शोधून देण्यापासून ते वयोमानानुसार येणाऱ्या उष्ण झळांमध्ये मी आहे ना हा दिलासा देण्यापर्यंतचा हा आपला नवा बहरलेला रोमान्स असेल.

माझे दुसरे पाऊल या रिकाम्या घरट्यात एकमेकांना नव्याने शोधण्याचे असेल. पहिली सप्तपदी मुलांचे घरटे विणण्यासाठी होती पण आज आपला छावा मोठा होऊन त्याच्या नव्या आकाशात उडून गेला आहे. घर पुन्हा एकदा तसेच रिकामे आणि शांत झाले आहे जसे लग्नाच्या सुरुवातीला होते. पण आता आपण दोघेही काळाच्या प्रवाहात प्रगल्भ झालो आहोत. या रिकाम्या घरात हरवून न जाता आलेल्या या शांततेची कोणतीही भीती न बाळगता मी तिच्या डोळ्यांत माझा तो जुना सखा नव्याने शोधेन. हीच तर खऱ्या प्रेमाची पावती नाही का?

माझे तिसरे पाऊल तिच्या मूक त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे आणि नवे सामायिक छंद शोधण्याचे असेल. गेल्या दोन तपांत तिने स्वतःच्या आवडीनिवडी मारून या घरासाठी जो मूक त्याग केला त्याची जाण मला या वळणावर ठेवायची आहे. संसाराच्या इमारतीचा पाया होताना तिने स्वतःला चंदनासारखे झिजवले आणि त्याची कृतज्ञता केवळ शब्दांत नाही तर माझ्या कृतीत असावी. आता सकाळी उठल्यावर रोजच्या धावपळीऐवजी तिच्या हातात चहाचा गरम कप देणे किंवा बाल्कनीतल्या कुंडीत एकत्र रोपटे लावणे हा आमचा नवा सामायिक छंद असेल. या छोट्या सवयी संसाराची दुसरी इनिंग अधिक सुगंधी करतील.

माझे चौथे पाऊल तिला समाजाच्या अपेक्षांतून मुक्त करण्याचे आणि तिच्या हरवलेल्या स्वप्नांना नवे पंख देण्याचे असेल. आजवर तो संसार आपण केवळ समाजासाठी आणि नातेवाईकांसाठी केला पण इथून पुढचा प्रवास लोक काय म्हणतील या अनामिक भीतीखाली जगायचा नाही. घरात एखादी वस्तू जागेवर नसली किंवा कंटाळा आला म्हणून एखादे काम राहिले तर आता आमच्यात कसलाच अपराधीपणा नसेल. आता आमच्याकडे वेळेची शिदोरी आहे त्यामुळे तिने तिची ती राहून गेलेली सफर करावी; मैत्रिणींसोबत मनसोक्त हसावे किंवा एखादा जुना विसरलेला छंद नव्याने जोपासावा. आयुष्याच्या या दुसऱ्या पर्वात मी माझा पुरुषी अहंकार पूर्णपणे विसरून तिचा सर्वात मोठा चाहता बनेन.

माझे पाचवे पाऊल भूतकाळाचे ओझे कायमचे उतरवून ठेवण्याचे असेल. संसाराच्या पहाटे आपल्या दोघांकडूनही अनेक चुका झाल्या; पैशांच्या ओढाताणीतून झालेले वाद; एकमेकांचे दुखावलेले अहंकार आणि नात्यांमधील कटकटी या सगळ्यातून आपण तावून सुलाखून निघालो आहोत. पण आता उरलेल्या प्रवासात हे जुने हिशेब मला सोबत न्यायचे नाहीत. ज्या गोष्टी आपण बदलू शकलो नाही त्याचे ओझे आता वाहायचे नाही. तिला मनापासून माफ करून आणि स्वतःच्या चुकांची क्षमा मागून एक पूर्णपणे कोरी पाटी घेऊन मला आयुष्याच्या वाटेवर पुढे चालायचे आहे.

माझे सहावे पाऊल आजारपणातल्या निस्वार्थ आधाराचे आणि समांतर एकांताचे असेल. विशीत आपण एकमेकांच्या हातात हात घालून जग जिंकण्यासाठी धावलो पण आता ती जीवघेणी शर्यत उरलेली नाही. ती बाल्कनीत तिच्या पुस्तकात रमलेली असताना आणि मी माझ्या जुन्या गाण्यांत हरवलो असताना आमच्यातली ती अथांग शांतता आम्हाला अधिक जोडेल. हा समांतर एकांत आम्ही जपू. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा औषधांच्या वेळा सांभाळताना किंवा दवाखान्याबाहेर वाट पाहत असताना मी तिचा तोच हात तितक्याच आश्वासकपणे धरेन. तारुण्यातला स्पर्श केवळ आवेगाचा होता पण आताचा माझा स्पर्श हा थेट तिच्या आत्म्याला मायेची ऊब देणारा असेल.

आणि माझे सातवे पाऊल वेळेचे भान ठेवून निखळ मैत्री जपण्याचे असेल. तारुण्यात वाटायचे आपल्याकडे अमर्याद वेळ आहे पण आता जाणवते आहे की आयुष्याच्या पुस्तकातील वाचून झालेली पाने आता उरलेल्या पानांपेक्षा नक्कीच जास्त आहेत. हातातून आयुष्याची वाळू वेगाने निसटते आहे. त्यामुळे आता कोणत्याही मृगजळामागे न धावता उरलेला अमूल्य वेळ मला तिच्यासोबत शांतपणे जगायचा आहे. इथून पुढचा प्रवास केवळ पती आणि पत्नी म्हणून नाही तर दोन अत्यंत जवळचे मित्र म्हणून आपण पार करू. मिळवण्याची धडपड कायमची संपवून या आयुष्याच्या सांजवेळी सूर्य मावळताना मी तिच्या अस्तित्वाचा आणि ती माझ्या प्रवासाची एकमेव आणि सर्वात सुंदर साक्षीदार बनेल.

माझ्या विचारांची तंद्री अचानक तुटली. मंडपात गुरुजींनी शेवटचा मंत्र म्हटला आणि समोरच्या माझ्या मावस भावाने शेवटचा फेरा पूर्ण केला. मंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मी भानावर आलो. माझ्या शेजारी बसलेल्या माझ्या अर्धांगिनीकडे मी पाहिले. ती अत्यंत शांतपणे आणि कौतुकाने तो सोहळा पाहत होती. मी माझा हात हळूच तिच्या मांडीवर विसावलेल्या तिच्या हातावर ठेवला. तिने दचकून माझ्याकडे पाहिले पण माझ्या डोळ्यांतला तो प्रगल्भ आणि आश्वस्त भाव तिने एका क्षणात वाचला. मंडपातल्या त्या अथांग गोंधळातही आम्ही एकही शब्द न बोलता एकमेकांशी खूप काही बोललो होतो. तिने माझ्या हातावरची तिची पकड थोडी अधिक घट्ट केली आणि तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत तृप्त हास्याची लकेर उमटली. कोणत्याही अग्नीची साक्ष न घेताही पंचेचाळीशीनंतरची आमची ही नवी सप्तपदी खऱ्या अर्थाने पूर्ण झाली होती.

लेखक :  श्री मंगेश दोरके

प्रस्तुती : श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ महापुरुषांचा पराभव… ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

? इंद्रधनुष्य ?

☆ महापुरुषांचा पराभव… ☆ राधिका भांडारकर ☆

विजय – पराभव, यश – अपयश, जिंकणं – हरणं या सर्वांमध्येच एक सूक्ष्म रेषा असते जी यशातलंही अपयश किंवा अपयशातलं यश, जिंकण्यातलं हरणं, हरण्यातलं जिंकणं ठरवत असते.

जगाच्या इतिहासात असे अनेक महापुरुष होऊन गेले, ज्यांचे विचार, कार्य किंवा लष्करी प्रतिभा विशाल असूनही त्यांना त्यांच्या अंतिम किंवा एखाद्या मोठ्या संघर्षात भीषण पराभवाला सामोरे जावे लागले.

फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट ज्याने युरोप जिंकला पण वॉटर्लूच्या लढाईत तो पराभूत झाला आणि त्याला आपले साम्राज्य गमवावे लागले.

विसाव्या शतकातील सर्वात शक्तिशाली हुकूमशहा हिटलर यांनी जर्मनीला एका मोठ्या युद्धाच्या खाईत लोटले पण शेवटी त्याचा स्वतःचाच पराभव झाला.

अलेक्झांडरने बहुतेक ज्ञात जग जिंकले परंतु भारतीय उपखंडातला प्रतिकार आणि सैन्याची झालेली दमणूक यामुळे त्याच्या विजयाची मोहीम खंडित झाली.

रोमन सम्राट नीरो याच्या राज्यातील अस्थिरतेमुळे त्यालाही सत्ता गमवावी लागली आणि त्याचा अंत शोकांतिक झाला.

अमेरिकेचे प्रेसिडेंट आणि वर्णद्वेषाविरुद्ध लढणाऱ्या अब्राहम लिंकन यांचाही त्यांच्याच देशात खून झाला.

गॅलिलिओ, टॉलस्टाॅय, साॅक्रेटीस यांच्यासारख्या महापुरुषांनाही प्रस्थापित सत्तेपुढे हार मानावी लागली.

महात्मा गांधीजी नाही पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा म्हटले जाते. वैचारिक पातळीवर ते विजयी झाले पण राजकीय स्तरावर मात्र पराभूत झाले. भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनाही मुंबई आणि भंडाऱ्यातून दोनदा पराभूत व्हावे लागले.

मुळात महापुरुषांना विशिष्ट जातीत आणि गटात वाटल्यामुळेही ते पराभूत ठरले. त्यांच्या अनुयायांच्यातल्या स्पर्धा त्यास कारणीभूत ठरल्या.

एकंदर या सर्वांचा विचार करत असताना सहज मनात येते पराभूत असूनही या सर्व व्यक्ती मानवी मनातून दूर झाल्या नाहीत कारण एकेकाळचा इतिहास त्यांनी त्यांच्या धोरणाने घडवला होता.त्यांच्या पराभवाची कारणेही विविध होती.

मात्र *महापुरुषांचा पराभव* या विषयाचा विचार करताना, त्याची कारणे ठरवताना तो नक्की कुणामुळे आणि कशामुळे झाला याचा अभ्यास करताना, तो दोन ठळक भागात करावा लागतो एक त्यांच्या तत्त्वांचा त्यांच्याच अनुयायांकडून झालेला पराभव आणि दुसरा म्हणजे त्यांची तत्त्वेच, अति महत्त्वाकांक्षा त्यांच्या वैयक्तिक अपयशाची किंवा पराभवाची मूलभूत कारणे ठरू शकतात.

एखाद्या महान व्यक्तीचा त्यांच्या अनुयायांकडूनच कसा पराभव होतो याचा विचार करताना काही ठळक बाबी मनात उतरतात. कुठलीही व्यक्ती ही तिच्या कर्माने महान ठरते. प्राप्त परिस्थितीकडे निराळ्या दृष्टिकोनातून बघून समाजावरची संकटे दूर करण्याचा किंवा समाज उद्धाराचा त्या व्यक्तीचा प्रयत्न असतो. त्या कार्यामुळेच ती व्यक्ती महान ठरते. छत्रपतींनी स्वराज्याच्या प्राप्तीला नेहमी “श्रींची इच्छा” असे म्हटले कारण कार्य श्रेष्ठ असते. व्यक्ती कार्यामुळे महान बनते.

कार्यापेक्षा जास्त कुठलीच व्यक्ती श्रेष्ठ नसते. महापुरुषांच्या जीवनाच्या उत्तरार्धात त्यांचे अनुयायी मात्र त्यांनी आरंभिलेले कार्य पुढे नेण्याऐवजी त्या महापुरुषाची पूजा करण्यात धन्यता मानतात. इथूनच व्यक्ती पूजेला सुरुवात होते आणि महापुरुषांच्या तत्त्वांचा पराभवही सुरू होतो. त्यांच्या तत्त्वांना काळानुरूप बदलतं स्वरूप देण्याऐवजी, अथवा त्यातील निकड, गरज समाजाला समजावण्याऐवजी त्यांचे (त्या व्यक्तींचे) फक्त पुतळे उभारण्यात धन्यता मानतात आणि एक प्रकारे समाजाची दिशाभूल होऊन वैचारिक कुजवणूकही होते. पर्यायाने महापुरुषाचे कार्य, कार्यकारणता, उद्देश हे सर्व विरून जाते. केवळ गळ्यात पुष्पमाळा घालून कोनाड्यात बसवलेलं देवत्त्व त्यांना दिलं जातं. त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजर्‍या केल्या जातात. कधी त्यांच्याविषयी केलेल्या विधानांचा त्यांच्या अनुयायांकडून निषेध वगैरे होतो.

थोडक्यात व्यक्तीपूजन होते. जेव्हा कार्यापेक्षा व्यक्ती श्रेष्ठ होते तिथेच महापुरुषांचं अपयश मोजलं जातं आणि याला जबाबदार त्यांचे अनुयायी असतात. गांधीजी, बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. त्यांचे उदात्त विचार, पराकोटीची सामाजिक बांधिलकी, नैतिकतेचा आग्रह, यांच्याशी जेव्हा त्यांच्याच अनुयायांयांकडून प्रतारणा होते किंवा त्यांच्या वागण्यात विसंगती आढळते तेव्हा नाईलाजाने म्हणावे लागते की महापुरुषांचा पराजय त्यांचे अनुयायीच करत असतात.अधिक तीव्रतेने, अथवा कठोरपणे असंही म्हणता येईल की ज्यांना आपण या महापुरुषांचे अनुयायी म्हणतो ते प्रत्यक्षात फक्त राजकीय फायद्यासाठी त्यांचे “तोंडीलावणं” करतात तेव्हा या महापुरुषांचे झालेले आत्मिक पराभव जाणवतात.

याच विषयाच्या दुसऱ्या भागात “अनुयायी” हा घटक दूर ठेवला तर त्या व्यक्तीच्या आचारसंहितेतच कुठेतरी त्यांच्या पराजयाची बीजे सापडतात आणि यासाठी मला पुराणकालीन युगपुरुषांचाही वेध घ्यावासा वाटतो. प्रजाहितदक्ष, मर्यादापुरुष श्रीरामाचे चरित्र वाचतानाही त्यांनी केलेल्या “सीतेच्या त्यागाचं”समर्थन ओढूनताणूनच करावं लागतं.

पुराणातल्या महापुरुषांचा विचार माझ्या मनात जेव्हा येतो तेव्हा नकळत आणि अगदी अलगद माझं मन महाभारतातल्या महापुरुषांचा विचार करू लागतं. महाभारतातल्या कथा लहानपणापासून जशा सांगितल्या गेल्या तशा स्वीकारल्या गेल्या पण त्यानंतर जेव्हा जाणीवा काहीशा प्रगल्भ होत गेल्या तेव्हा महाभारतात गणल्या जाणाऱ्या थोर, धोरणी, कर्तव्यनिष्ठ शब्दकठोर, वचनबद्ध महापुरुषांविषयी संदेह निर्माण होऊ लागला. त्यात द्रोणाचार्य, अश्वत्थामा, युधिष्ठीर, कर्ण हे सुद्धा सारे महापुरुषच होते पण कुठे ना कुठे ते पराभूत होते, त्यांची कुठल्या ना कुठल्या प्रकारची महानताच त्यांना पराभूत करण्यासाठीचे कारण ठरली असे ठामपणे वाटतं.

त्यापैकी एका व्यक्तीचा मला या लेखात जाणीवपूर्वक परामर्श घ्यावासा वाटतो आणि ती व्यक्ती म्हणजे ज्यांनी आजन्म ब्रह्मचर्य आणि हस्तीनापूरच्या सिंहासनाशी एकनिष्ठ राहण्याची भीषण शप्पथ घेतली होती ते कुरू साम्राज्याचे पितामह, एक महान योद्धे आणि नीतीज्ञ. त्यांची जीवनकथा, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घटना, त्यांच्या प्रतिज्ञा, कुरु साम्राज्यात घडलेल्या प्रसंगाशी त्या त्या वेळच्या त्यांच्या भूमिका, त्या भूमिकांना दिलेलं वचनबद्धतेचं उदात्त कवच, कुरुक्षेत्रातल्या लढाईतलं त्यांचं सेनापतीपद आणि धोरण या अनेक बाबींचा एखाद्या विस्तृत कॅनव्हासवर मांडणी करून आढावा घेतला तर हा महापुरुष पराभूतच होता हे जाणवतं.

देवव्रत ते भीष्म ते भीष्माचार्य ते पितामह हा त्यांचा जीवन प्रवास आणि त्यांच्या भूमिकेवर नक्कीच एक मोठं प्रश्नचिन्ह आकारतं. सोमवंशातील राजा शंतनु आणि गंगा यांचा पुत्र आणि महाभारतातील अत्यंत विख्यात असा एक महापुरुष म्हणजे भीष्म. मूळ नाव देवव्रत परंतु सत्यवती नामक धीवर कन्येवर त्यांच्या वडिलांचे मन बसले आणि तिच्याशी विवाह व्हावा म्हणून “माझ्याच मुलाला राज्य प्राप्त व्हावे” या तिच्या अटीला त्यांनी मान्यता दिली त्याचवेळी देवव्रतने ब्रह्मचर्याची शपथ घेतली आणि या भीषण प्रतिज्ञेमुळे त्यांना भीष्म असे उपनाव प्राप्त झाले आणि तेच प्रख्यात झाले. या प्रतिज्ञेपासूनच खरं म्हणजे भविष्यातल्या त्यांच्या पराभवाचा पाया रचला गेला. रणविद्या, राजनीती, अर्थशास्त्र, अध्यात्म, धर्मनीती इत्यादी क्षेत्रातील त्यांचे ज्ञान अलौकिक होते.

“सर्वशास्त्रवेत्ता” म्हणूनच त्यांना मानले जायचे. कुरुवंशातील शंतनूपासून दुर्योधनापर्यंत अनेक पिढ्यांची त्यांनी काळजी घेतली. चित्रांगद आणि विचित्रवीर्य या सावत्र भावांचे ते संरक्षक बनले. आंबा, अंबिका, अंबालिका या राजकन्यांचे स्वयंवर त्यांनी जिंकले पण या मुली त्यांनी त्यांचा सावत्र भाऊ विचित्रवीर्यासाठी जिंकून आणल्या. स्वीकारलेल्या तत्त्वांचे काटेकोर पालन करणे हा त्यांचा स्वभाव म्हणून आमरण ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेशी ते अशा रीतीने चिकटून राहिले.

परशुरामांनी अंबेशी विवाह करण्याची त्यांना आज्ञा केली होती पण तीही त्यांनी पाळली नाही परिणामी अंबा सूडबुद्धीने ग्रासली गेली आणि कुरुक्षेत्री याच अंबेने शिखंडीच्या रूपात पुनर्जन्म घेऊन अर्जुनासोबत लढताना भीष्मास हरवले. शिखंडी रुपातल्या अंबेकडून म्हणजेच एका स्त्री कडून आलेल्या बाणांचा भीष्मांनी प्रतिकार केला नाही म्हणूनच ते रणांगणात अखेर कोसळले.

दु:शासनाने भर दरबारात केलेली द्रौपदीची विटंबना हा महापुरुष थांबवू शकला नाही हा केवढा तरी मोठा कलंक या महान विद्वान व्यक्तीवर कायमचा लागलेला आहे.
द्रौपदीने त्यांना प्रश्न केला होता, ” जुगारात हरलेल्या युधिष्ठीरास मला पणाला लावायचा काय अधिकार होता? वस्त्रहरणाच्या वेळी पितामह तुम्ही मौन धारण करून न्यायाच्या दरबारात माझा अपमान का केलात? ”

द्रौपदीचा हा प्रश्न म्हणजे भीष्माच्या आचारसंहितेवर आणि न्यायाच्या उल्लंघनावर केलेला थेट आरोप होता. त्यांचा कायदेशीरपणा आणि नीतिमत्तेवरच तिने प्रश्नचिन्ह उभे केले होते आणि इथेच या महापुरुषाचा दारुण पराभव अधोरेखित होतो.

“कुरुवंशाचे खाल्लेले मीठ विरोधास रोकतं” हे त्यांनी केलेलं त्यांच्या मौनाचं समर्थन अत्यंत पांगळं नव्हतं का? कौरवांचे दोष दिसत असतानाही युद्धात त्यांच्याच बाजूने लढणे, ज्या कुलाचे रक्षण करण्यासाठी प्रतिज्ञा केली ते कुल नष्ट होण्याची चिन्हे दिसत असतानाही केवळ प्रतिज्ञेला चिकटून राहण्यासाठी असत्य, अधर्माविषयी मौन बाळगणं हे या महापुरुषाच्या नैतिक पराभवाचं मूळ कारण आहे.

युद्धानंतर इच्छामरणी, मृत्युला उत्तरायण सुरू होईपर्यंत थांबवणारे, शरपंजरी पहुडलेले पितामह भीष्म कृष्णास प्रश्न विचारतात.

“एका क्रूर वास्तवास मला का सामोरे जावे लागत आहे? इतिहास माझ्याकडे कोणत्या दृष्टीने बघेल? ” त्यावेळी कृष्ण सांगतात, ” कुरुक्षेत्रातील रक्तपात हा धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी गरजेचा होता. जरी त्यात पितृतुल्य व्यक्तींचा वध होणे वेदनादायी होते.” श्रीकृष्ण पुढे सांगतात, ” जेव्हा क्रूरता आणि अधर्म मर्यादा ओलांडतात तेव्हा प्रतिज्ञा, वचनबद्धता, शब्दकठोरता हा आत्मघाती मार्ग ठरतो. पितामह! तुमच्या वैचारिकतेत नैतिकता असली तरी वास्तविक लवचिकता नव्हती. असत्य आणि अधर्म दिसत असतानाही तुम्ही तुमच्या विचारांची माघार पत्करली असती तर आज हा रक्तपात नव्हे हे युद्धच वाचले असते. पितामह! म्हणून नेमके इथेच तुम्ही खऱ्या अर्थाने पराभूत झालात.”

एका महापुरुषाचा पराभव कलियुगात किंवा युद्धाच्या काळात हेच सूचित करेल की भीष्माचार्यांसारख्या जुन्या नियमांपेक्षा अन्यायाविरुद्ध लढण्याचे कृष्णा सारखे धोरणच उपयुक्त आहे. कृष्ण -भीष्म यांच्या संवादातून हेच स्पष्ट होते की न्यायाच्या रक्षणासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. स्वीकृत धोरणांना छेद द्यावे लागतात. जे भीष्मासारख्या ज्ञानी पुरुषाला का समजू शकले नाही?

महापुरुषांचा पराभव याविषयाचा विचार करतांना भीष्माचार्यांचे उदाहरण प्रातिनिधीक स्वरूपातले आहे.

वर्तमानात होणाऱ्या निवडणुकांचा, युद्धांचा, युद्धात कोसळणाऱ्या अथवा हत्या होणाऱ्या त्या त्या देशांतील नेत्यांचा, त्यांच्या पराभवाचा विचार भविष्यात जेव्हा कधी होईल तेव्हा त्यांच्याही पराभवाची कारणे अशीच त्यांचे अनुयायी, राजकीय आणि वैयक्तिक स्तरावर तपासली जातील हे नक्कीच.

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आठवणी दाटतात!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “आठवणी दाटतात!!” ☆ श्री संभाजी बबन गायके

मेजर संदीप उन्नीकृष्णन

राऊळात जाता श्री विठ्ठलाची भेट झाली नाही म्हणजे पांडुरंग परमात्मा कुठे तरी दूर, बाहेर गेले असतील. त्यांना येण्यास का बरं वेळ लागतो आहे? असं कुठल्या कामात अडकलेत देव, कुणाच्या भेटीत एवढे गुंतून राहिले असतील? जी अवस्था संत जनाबाईंची तीच अवस्था मूल गमावलेल्या आईची आणि अर्थात बापाचीही! जनाबाईंचा विठ्ठल तरी त्यांना भेटला…पण या आई-बापास त्यांचा विठ्ठल किमान या जन्मी तरी दिसणार नाही प्रत्यक्ष. त्याची जागा दुसरं कुणी घेऊ शकेल अशीही स्थिती नव्हती. त्याच्याऐवजी नव्हे, पण त्याच्यासारखं कुणीतरी आयुष्यात आलं तर…ते कुणाला नको असेल?

एकुलता एक मुलगा…देशरक्षणासाठी जातो म्हणाला. त्याला अडवून उपयोग नव्हताच. प्रकाश पसरवणारा तो संदीप…यांच्या संदीपने देशाचा प्रकाश तेवत राहावा म्हणून स्वत: विझून जाणं पसंत केलं. 

हिंदुस्थानला युद्धात पराभूत करू शकत नाही…पण त्याला सतत रक्तबंबाळ तर करूच शकतो…असं शत्रूच्या म्होरक्याने त्यांच्या पळपुट्या सेनेला शिकवून ठेवलं आहे. “we will bleed them a thousand times” आम्ही एक हजार वेळा युद्ध करू…अशी त्यांची दर्पोक्ती असते..आणि प्रत्येक पराभवानंतर ते हेच म्हणत राहतात. त्यानुसार ते एकेदिवशी देशाच्या आर्थिक राजधानीत घुसले. शेकडो निष्पाप नागरीकांना ओलीस धरले! त्यांना हुसकावून लावण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली!

२६ नोव्हेंबर, २००८. केरळ(मूळ गाव), कर्नाटक(जन्म, बालपण) आणि महाराष्ट्राशी (एन.डी.ए.खडकवासला) नाते असलेले मेजर संदीप उन्नीकृष्णन…मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोरांवर चालून गेलेला झंझावात! Operation Tornado मध्ये 51, Special Action Group (51 SAG) चे पथक प्रमुख म्हणून मेजर साहेब दहा कमांडोजसह ताजच्या सहाव्या मजल्यावर पोहोचले. ओलिसांची सहाव्या मजल्यावरून सुटका करीत ते पाचव्या मजल्यावर पोहोचले. तोच चौथ्या मजल्यावरील एका मोठ्या दालनात अतिरेकी असल्याची शंका आली…दालनाचा दरवाजा आतून बंद होता!

दरवाजा तोडून उघडला गेला…आतून प्रचंड गोळीबार झाला…आपला एक कमांडो जबर जखमी झाला. त्या दालनात हातगोळा फेकून अतिरेकी तिथून दुस-या ठिकाणी निसटून गेले.

मेजर साहेबांनी उर्वरीत कमांडोज सोबत घेत आणखी सुमारे १५ तास ओलिसांची सुखरूप सुटका करण्याचे काम केले. २७ नोव्हेंबरची मध्यरात्र. ताज मधील मध्यभागी असलेल्या जिन्याने वरच्या मजल्यावर एकट्याने शोध घेत जाण्याचा निर्णय साहेबांनी घेतला!

याच प्रयत्नात त्यांनी चार अतिरेक्यांना एका खोलीत आश्रय घ्यायला भाग पाडले…आता त्यांचा पळण्याचा मार्ग बंद…मध्ये मेजर साहेब होते. ते त्यांच्या साथीदारांना म्हणाले…”तुम्ही कुणीही वर येऊ नका…ते धोक्याचे आहे. मी यांचा बंदोबस्त करेन…! आणि मेजर साहेब त्या अंधा-या, धुराने भरलेल्या दालनात घुसले…चार रायफली धडाडल्या…साहेबांनी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला…पण अतिरेक्यांच्या गोळ्यांनी मेजर साहेबांना पुरते घायाळ करून टाकले! एक दीप विझून गेला होता!

साहेबांचे आई-वडील ताज मधील त्या दालनाला दरवर्षी २७ नोव्हेंबरच्या रात्री, मध्यरात्री भेट देतात…जिथे मेजर साहेबांनी शेवटचा श्वास घेतला, त्या खोलीत थांबतात…त्यांच्या अश्रूंना वाटा फुटतात. या दोघांनी आपल्या लेकाच्या स्मृती जपण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु ठेवला आहे…काळ जखमा भरून टाकतो…पण यांच्या जखमा अजूनही ओल्याच आहेत!

पुतळे उभारले गेले, रस्त्यांना नांवे दिली गेली. चित्रपट हे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. जो प्रभाव एखादा ग्रंथ करू शकणार नाही, तो प्रभाव काही तासांत एखादा उत्तम चित्रपट निर्माण करू शकतो. विषय अतिशय रोमांचक असल्याने अनेक चित्रपट निर्माते मेजर साहेबांचे वडील के.उन्नीकृष्णन (ISRO मधील सेवानिवृत्त संशोधक) आणि साहेबांच्या मातोश्री धनलक्ष्मी यांना भेटले. “आम्ही मेजर साहेबांच्या कामगिरीवर चित्रपट बनवू म्हणाले. पण या व्यावसायिक लोकांचा आविर्भाव “आम्ही तुमच्यावर उपकारच करतो आहोत” असा असल्याचे या दोघांना वाटले. त्यामुळे त्यांनी कुणालाच परवानगी दिली नाही. माझा मुलगा देशासाठी हुतात्मा झाला..त्यामुळे तो सर्व देशाचा मुलगा ठरला. पण राजकीय मंडळी त्यांच्या त्यांच्या स्वार्थासाठी अशा बलिदानांचा वापर करून घेतात, याचा त्यांना राग होता. त्यांनी केरळच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याला घरी येण्यास थेट मज्जाव केला होता. मध्ये असेच काही दिवस गेले!

हैदराबादेत जन्मलेला पण अमेरिकेत वाढलेला एक युवा अभिनेता, लेखक आणि अनेक तेलगु चित्रपटांत चमकलेला आणि बाहुबली चित्रपटात खलनायकाच्या वेशात दिसलेल्या देखण्या आदिवी सेश याच्याही मनात मेजर साहेबांची कथा घोळत होती. त्यांनी उन्नीकृष्णन दांपत्याचे मन वळवले…आणि एक नातं आकार घेऊ लागलं! आदिवी यांनी स्वत: कथा, पटकथा लिहिली आणि मेजर संदीप यांची भूमिकाही निभावली…किंबहुना जगली! चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत तन-मन आणि धनाने सहभागी झाले. मध्येच उपटलेल्या कोरोना संकटातही हार न मानता एक सामाजिक जबाबदारी म्हणून ‘मेजर’ चित्रपट तयार व्हावा म्हणून मेहनत घेतली. या काळात कोरोनाने जगाला हैराण करून ठेवले होते, या चित्रपट निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या अनेकांचे जवळचे आप्त यात दगावले. या सर्व परिस्थितीमध्ये धैर्य न गमावता आदिवी काम करीत राहिले…Mission Major!

पण आदिवू यांनी संदीप उन्नीकृष्णन यांचे जीवन समजावून घेतले. Don’t come up! I will handle them! हे मेजर साहेबांनी त्या रात्री उच्चारलेले वाक्य त्यांनी मनात बिंबवून घेतलं. मेजर साहेबांच्या आयुष्यात आलेल्या जवळजवळ सर्वांशी आदिवू स्वत: बोलले, त्या त्या ठिकाणांना भेटी दिल्या…आणि पडद्यावर एक वीर गाथा साकारली गेली. 

‘मेजर’ चित्रपटाच्या पहिल्या प्रदर्शनाला मेजर साहेबांच्या मातोश्री, मेजर साहेबांनी त्यांना भेट दिलेली साडी परिधान करून आल्या होत्या. आदिवी त्यांना ‘अम्मा’ संबोधतात! मी मेजर संदीप यांची जागा कदापि घेऊ शकणार नाही…पण अम्माचा धाकटा मुलगा तर होऊच शकतो. आदिवी यांच्यामुळे उन्नीकृष्णन दांपत्याच्या चेह-यावर कित्येक वर्षांनी पहिल्यांदा हास्य उमटलं…ही खूप मोठी गोष्ट होती. 

आदिवू यांनी चित्रपटातून मिळणा-या पैशांचा विचार केला नाही. हिंदी आणि तेलगु भाषांत हा चित्रपट वेगवेगळा चित्रित केला. हा चित्रपट त्यांनी जागतिक पातळीवर पोहोचावा यासाठी खूप प्रयत्न केले. याचवेळी दक्षिणेतील महान अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित झाले होते…पण तरीही ‘मेजर’ चित्रपटाने उत्तम पैसे मिळवले. अधिकाधिक तरुणांपर्यंत मेजर संदीप यांची शौर्यगाथा पोहोचावी म्हणून कित्येक ठिकाणी हा चित्रपट विनामूल्यही दाखवण्यात आला. मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचा जन्म केरळ येथे झाला होता. केरळसाठी हा चित्रपट खास मल्याळम भाषेतही ‘डब’ करण्यात आला होता. मेजर आणि मेजर संदीप अशी दोन शीर्षके या चित्रपटासाठी राखून ठेवण्यात आलेली होती. तत्पूर्वी अमिताभ बच्चन यांचा मेजर साहब हा हिंदी चित्रपट येऊन गेला होताच. अर्थात याची कथा वेगळी होती. 

भारतात चित्रपट निर्मिती हा प्रचंड मोठा व्यवसाय आहे. अभिनेते, अभिनेत्री यांचा चाहता वर्ग मोठा आहेच…शिवाय या लोकांचे अनुकरणही खूप केले जाते…लोक यांनाच हिरो मानतात. पण देशासाठी खरेखुरे बलिदान देणा-या सैनिकांच्या कथा सामान्य लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीत. अनेक वीरांची माहितीच लोकांना कधीही होत नाही. या पार्श्वभूमीवर आदिवी सेश या अभिनेत्याने दाखवलेले धाडस कौतुकास्पदच म्हणावे लागेल! अभिनंदन, आदिवी! मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आले. १५ मार्च हा यांचा वाढदिवस! यानिमित्ताने त्यांच्या स्मृती जागवण्याचा हा प्रयत्न. जय हिंद!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ कृष्णप्रेम… ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆

अलका ओमप्रकाश माळी

?  क्षण सृजनाचा ?

☆ कृष्णप्रेम… ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆

जगात तेहतीस कोटी देव आहे अस मानलं जात.. असतील ही कदाचित.. पण प्रत्येकाच्या मनात त्याच्या देवाची एक वेगळी प्रतिमा असते.. प्रत्येकाचं आराध्य वेगळं असत.. कोणी विष्णू भक्त असतो तर कोणी शिव भक्त.. कोणी देवी भक्त असतो तर कोणी गणेश भक्त..

किती किती रूपे तुझी..

कुठे कुठे शोधू तुला..

तुझे अनंत देव्हारे…

हे जरी खर असलं तरी प्रत्येकाची श्रद्धा त्याची भक्ती ही वेगळी असते.. कोणी देवावर फुलं वाहून आपली भक्ती जपत असत.. तर कोणी खडकाळ मातीवर अनंत फुलं फुलवून आपली भक्ती दाखवत असत आता इथे प्रत्येकाची श्रद्धा महत्वाची.. आणि जिथे श्रद्धा असते तिथे अंध श्रद्धेला अजिबात स्थान नसते हे महत्वाचे… जेंव्हा पासून देव ही संकल्पना कळायला लागलीय तेंव्हा पासून बाप्पाचे म्हणजे गणपती बाप्पाचे साजिरे रूप च माझ्या डोळ्यासमोर येतं.. आणि मग ह्या सगळ्या च्या ही पलीकडे मनात खोल वर घर करून आहे तो माझा सखा.. कृष्ण… सावळा कान्हा.. त्याचं आणि माझं नात एका गोड आठवणीने जोडलं गेलंय.. लहानपणी आजी आम्हा मुलांना वेगवेगळ्या गोष्टी सांगायची.. रामायण,  महाभारत आणि किती काय काय गोष्टी ती सांगायची त्या सगळ्याच फार रंजक असायच्या पण कृष्णाची गोष्ट जास्त आवडीचे.. रामायणातील राम जेंव्हा सीता मातेला सोडून जायचा तेंव्हा वाईट वाटायचं.. त्या वेळी तर रामाचा राग ही यायचा पण कृष्णाच्या कुठल्याच गोष्टीचा कधी राग आला नाही.. त्याने राधेला किती ही वाट पाहायला लावली.. त्रास दिला तरी तो नटखट कान्हा अजूनच जवळचा वाटायचा.. अर्थात राम आणि कृष्ण हे कोणी वेगळे नाहीत हे कळायचं ते वय न्हवत.. पुढे दोघांच्या प्रेमाची तुलना करायला लागले तेंव्हा दोघं ही आपापल्या अवतारात किती महान होते ह्याची खात्री पटत गेली.. माझी आजी पण गोष्टी इतक्या रंगवून सांगायची ना की बास आत्ता चे हे मालिका वाले पण तिच्या पुढे पाणी कमच म्हणावे लागतील🤪 कृष्ण जन्म रंगवून सांगताना वसुदेवा ने टोपलीत लपेटून ठेवलेलं ते देखणं बाळ अगदी डोळ्यासमोर उभं राहायचं.. कारावासातून बाहेर निघताना झोपी गेलेले पहारेकरी,  नदीला आलेला पूर,  देवकीचा आक्रोश सगळं सगळं आपण जगतो आहोत असा भास व्हायचा.. तेंव्हा पासून हा बालगोपाल मनात घर करून बसला तो कायमचा.. नंद यशोदा घरी वाढताना त्याच्या लिला.. त्याच्या वर आक्रमण करणारे ते क्रूर राक्षस.. ती पुतना मावशी.. आपल्या वरच चाल करून येतायत की काय इतकं ते कृष्ममय जीवन मी जगते आहे असं वाटायचं.. पायाला मुसळ बांधून घर भर फिरणारा लड्डू गोपाळ तर जास्तच लाडका वाटतो.. नटखट कान्हाच्या खोड्या त्याच्या बाल लिला,  त्याच लोण्यावर ताव मारणं.. लोण्यानी माखलेला तो निरागस चेहरा सगळच कस लोभसवाण वाटतं.. सवंगड्यांना सोबत घेऊन त्याने काढलेल्या खोड्या,  गोवर्धन पर्वत उचलून गोकुळ वासियांना दिलेल मायेचं छत,  इंद्राचा चुर केलेला अहंकार हे सगळच कौतुकास्पद वाटतं.. कृष्ण कधी देव आहे म्हणून त्याची भिती नाही वाटतं तो जवळचा मित्र बनून नेहमी जास्तच जवळचा वाटतो.. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तो आपला सखा,  सोबत,  प्रेरणास्थान,  आदर्श पुत्र,  स्त्रियांचा कैवारी,  दुष्टांचा वैरी आणि राधेचा प्रियकर.. ही त्याची सगळीच रूप आपण जगतो आहोत ह्याचा सतत भास होत राहतो ते आपण कृष्ण मय आहोत म्हणूनच.. कृष्ण फार आपला सामान्य माणसा सारखा अगदी आपला वाटतो.. जेवढा तो नंद यशोदेच्या लाडाकोडात वाढला तेवढाच तो संदीपणी च्या आश्रमात सुदामा सोबत सामान्य रोजची कर्तव्य करताना पण तेवढाच प्रभावी वाटतो.. वयाच्या प्रत्येक टप्प्यात कृष्णाने जगण्यासाठी उत्तमोत्तम उदाहरण घालून दिलेली आहेत.. कृष्णा वरचं प्रेम त्याची भक्ती जगण्याची एक वेगळीच प्रेरणा देऊन जाते.. त्याच्या त्यागातलं त्याच निस्सीम प्रेम त्यांचं समर्पण आजच्या पिढीने अनुकरण करण फार गरजेचं वाटतं.. आज जेंव्हा छोट्या छोट्या संकटाना घाबरून मुलं आत्महत्या करताना दिसतात तेंव्हा कृष्ण निती महत्वाची वाटते… कृष्णाची संकटावर मात करण्याची जिद्द जगण्याची नवी ऊर्जा देऊन जातात.. फक्त ती समजून घेण्याची गरज आहे.. आणि मैत्रिणींनो खर सांगू का आपण संकटात आहोत,  आपल्यावर अत्याचार होतायत आपल्याला सोडवायला कृष्ण येईल ह्याची वाट बघण्यापेक्षा स्वतः कृष्ण बनून त्या संकटावर मात करणं म्हणजे कृष्ण भक्ती.. तो तर आहेच आपल्या मनात आपल्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात आपण केलेल्या प्रत्येक चांगल्या कृत्यात,  आपल्या प्रेमात,  आपल्या त्यागात त्याची साथ असतेच ती फक्त आपल्याला ओळखता आली पाहिजे इतकचं.. कधी हा कृष्ण आपला बाबा बनून येतो तर कधी हा मित्र,  भाऊ,  सखा तर कधी पतीच्या रुपात फक्त त्या कृष्णाला आपल्याला ओळखता आलं पाहिजे.. म्हणूनच वाटतं कृष्ण येईल मदत करेल ह्याची वाट पाहत राहण्या पेक्षा आपल्या प्रयत्नांनी ते संकट दूर करण्याचे प्रयत्न करून स्वतः कृष्ण बनता आलं पाहिजे..

जगेन मी कृष्ण बनुनी

राधेचा सखा होऊन

गोपिकांचा बालगोपाल..

यशोधेचा नंदलाल..

होऊनी मित्र सुदाम्याचा..

आधार बनू आपल्या सख्याचा..

रुक्मिणी चा होऊनी नाथ..

सोबत करू देऊ निरंतर साथ..

बनुनी प्रद्युमनाचा पिता..

मार्ग दाखवू सर्वथा..

पांडवांचा होऊनी कैवारी..

दूर करू कौरवी दूर विचारी..

कुण्या द्रौपदीचा होऊनी सखा..

देऊ विश्वास रक्षणाचा..

अर्जुनाचा होऊनी सारथी..

घेऊनी सुदर्शन हाती..

आपणच होऊन आपले मुरारी

मारून टाकू सारे दूर विचारी…

होऊनी कृष्णमय..

मिरवू आनंद निरामय…

 

टीप – सोनी लीव्ह वरती लालो नावाचा सिनेमा पाहिला आणि कृष्णप्रेमाने मन भरून आल.. कृष्ण प्रेमीनी आवर्जून बघावा असा मूव्ही आहे नक्की बघा…)

© अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “युद्ध आणि भारत…” ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

🌸 विविधा 🌸

☆ “युद्ध आणि भारत…” ☆ शीला पतकी 

युद्ध हा शब्द आपण रामायण महाभारत हे वाचताना ऐकला यावरचे सिनेमे त्याच्या सिरीयल पाहताना ते पाहायला खूप मजा येत होती. रावणाची 10 तोंड बाणाने कापली जात असताना लहानपणी छान वाटायचं… मग बिभीषण सांगायचा नेमका बाण कुठे मारायचा आहे… मग रावण मरायचा… रामाचा विजय… रावणाचा अंत्यविधी… त्याला रामाची उपस्थिती… आणि मग सितेला घेऊन रामाचे परतणे…!

तसंच महाभारतामध्ये कुरुक्षेत्रावर झालेले युद्ध. सख्खे आणि चुलत यांचं… श्रीकृष्णाने सांगितलेली गीता… कुरुक्षेत्रावरती असलेल्या व्यवस्था… म्हणजे उद्या सैन्याचा किती सैनिकांचा स्वयंपाक करायचा किती मेले आहेत… किती उरले आहेत… हे श्रीकृष्ण खात असलेल्या शेंगाच्या टरफलावरून ठरत असे… आणि तितक्या लोकांचा स्वयंपाक युद्धभूमीवर व्हायचा… ह्या सगळ्या रंजक कथा वाचून कमाल वाटायची.

मी सातवीत असताना हिंदी प्रवीण परीक्षेला बसले होते. खरं तर ती परीक्षा बीए समकक्ष होती आणि मी फक्त सातवीत. त्यात अभ्यासाला एक पुस्तक होतं ‘भारत दर्शन ‘आणि त्यात काही लेख होते त्यातला कुरुक्षेत्रावरचा एक शेवटचा लेख होता त्यामध्ये मरताना दुर्योधन युधिष्ठराला म्हणतो “युधिष्ठिर मै तो विरोंको साथ लेकर स्वर्ग जा रहा हूं तुम विधवाओंको लेकर राज करो”*हे वाक्य संदर्भा सहित स्पष्टीकरण.. चार मार्क इतकाच अभ्यास केला… पण त्या वाक्याचा खरा अर्थ मोठ झाल्यावर कळायला लागला… की अरे खरंच युद्धामध्ये सर्वात जास्त नुकसान कोणाच होत असेल तर ते स्त्रियांचं होतं. पुरुष सगळे सैनिक… ते युद्धभूमीवर मरतात तो मरणारा माणूस कोणाचातरी भाऊ असतो,  कुणाचा तरी मुलगा असतो,  कुणाचा तरी बाप असतो,  कुणाचा तरी नवरा असतो, आणि या सगळ्या बायकांची म्हणजे आई मुलगी बायको या सगळ्यांची यानंतर परवड होते म्हणजे सर्वात जास्त नुकसान स्त्रियांचं होतं… त्यांना वैधव्य घेऊन बिनआधाराचे जगावे लागते आणि ते खरोखर कठीण होते… आणि तो विजय पांडवांच्या हातात येताना सुद्धा त्याला कारुण्याची केवढी झालर होती हे आपल्या लक्षात येईल. पांडव कोणावर राज्य करणार होते? … पुरुष तर सगळे मेले होते ना युद्धात…! ही ही सगळी त्याकाळी होणारी जमिनीवरची युद्ध त्या युद्धाला नियम होते. सामान्य माणसाला त्याची झळ फक्त या पद्धतीने लागत होती मालमत्तेचं नुकसान नव्हतं आताची युद्धं वेगळी आहेत पण कारणं तीच आहेत.. सत्ता…! माझ्या हातात सत्ता असायला हवी. आपल्या भूभागापलीकडे जाऊन मला सत्ता हवी आहे. आणि तो भूभाग मला काबीज करायचा आहे. तेच कारण आहे… तेल साठ्यांचा भूभाग आपल्या ताब्यात कसा येईल यासाठी प्रयत्न…! यामध्ये भारत मात्र चतुर आहे. एकीकडे विरोधी पक्ष हाकाटी पिटत आहे की भारताने कोणाची तरी बाजू घ्यावी नरेंद्र मोदी सारखा हुशार पंतप्रधान त्यांनी कोणाची बाजू घेणे पसंत केले नाही पण आपणच युद्धात मध्यस्थी केली पाहिजे अशी परिस्थिती मात्र फार पूर्वीपासून त्यांनी तयार केली आहे चाबहार(चारबहार) बंदर

विकसित करून भारताने त्या ठिकाणी मोठे काम केले आहे त्यामुळे हा भौगोलिक प्रदेश तेल साठे उपलब्ध करून देण्याला अत्यंत उपयुक्त आहे तो विकसित करून देण्याची ताकद भारतीय इंजिनियर्स मध्ये आहे त्यामुळे इराणला आपल्या विरोधात जाऊन चालणार नाही तसेच ट्रम्प साहेबांना सुद्धा युद्धामध्ये तेल साठ्यावरती आक्रमण करायचे नाही. कारण ते संपले तर युद्धाचे कारण संपेल तेव्हा यातील काही बेटांवर येथे तेल साठे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत ती बेटे सुरक्षित आहेत.! … कालच बातमी आपण वाचली की रिलायन्स कंपनीने तेला साठ्याबद्दल मोठा सौदा केला आहे वगैरे वगैरे… हे काय आज ठरलेलं नसतं अनेक वर्षापासून याची योजना झालेली असते ते साठे आपल्या वर्चस्वाखाली कसे येतील याची तरतूद मोदी सरकारने आधीच करून ठेवली त्यामुळे आता मध्यस्थिला जर बोलावलं गेलं तर ते फक्त मोदींना बोलवलं जाईल आणि युद्ध थांबेल. युद्ध भौगोलिक कारणाने सुरू होते त्याने इतिहास घडतो,  बदलतो, सत्ता पालट होऊ शकतो, याचा नेमका फायदा कसा उठवायचा याचे ज्याला सूत्र कळाले तो त्या युद्धात न पडताही त्यावर वर्चस्व गाजवतो.

भारतासारख्या शांतता प्रिय राष्ट्राला युद्ध नकोच आहे.. कुणाचेच नकोय! कारण आम्ही बुद्धाला मानणारे लोक आहोत कोणत्याही देशातल्या शाळेतली मुलं एखाद्या बॉम्बने मृत्युमुखी पडणं या बातमीने आमच्या देशातला प्रत्येक नागरिक अस्वस्थ होतो. युद्धात अपरिमित हानी होते ती महिलांची आणि मुलांची परवा तर मी एक व्हिडिओ पाहिला आजूबाजूला मोठ्या प्रमाणात बॉम्ब चे गोळे पडत होते. अंगाला तोंडाला काळ लागलेल आहे पडल्यामुळे काहीतरी थोड्याशा जखमा झाल्यात असा एक छोटा मुलगा जो पाठीमागे होत असलेल्या बॉम्ब च्या आवाजाने भयभीत झालेला आहे आणि तो हात हलवून सांगत होता” प्लीज स्टॉप इट प्लीज स्टॉप इट “… त्याच्या चेहऱ्यावरचे भय पाहून डोळे पाणावले. तसेचयुक्रेंनच्या युद्धाच्या वेळी सुद्धा तेथील मुलांना सुरक्षितपणे हलवत होते तेव्हा एक मुलगी अगदी पाच सहा वर्षाची बापाला सोडून जायला तयार नव्हती आणि ते दोघे इतके धाय मोकलून रडत होते. त्यांच ते दूर जाणं बघून पोटात अक्षरशा कालवत होत..! काय मिळवणार आहोत जमिनीच्या तुकड्यावर सत्ता साधून..? हे सत्तेची अभिलाषा असणाऱ्यांनाच ठाऊक पण दुनियेतल्या सगळ्या दुःखाची जाणीव झाल्यानंतर शांततेच्या शोधात फिरलेल्या बुद्धांनी जी शिकवण आम्हाला दिलेली आहे त्यामुळे आपण भारतीय लोक युद्धापेक्षा शांती पसंत करतात परवाच्या ऑपरेशन सिंदूर मध्ये आम्ही फक्त जो संदेश द्यायचा होता तो दिला वास्तविक पाहता पाकिस्तान बरोबर दोन हात करून त्याला नेस्तनाबूत करणे इतकी ताकद भारताकडे नक्कीच आहे पण आपल्याकडे एक मंत्र आहे फुत्कारो लेकिन काटो नही आम्हाला कोणालाही बेचिराख करायचे नाही त्या देशातल्या निरपराध सामान्य माणसाला काहीच करायचे नव्हते तुम्ही तुमच्या देशात सुखाने नांदा आम्ही आमच्या देशात पण… पण जर काही कराल तर मात्र सोडणार नाही हे नुसत्या फुत्कारण्यावरून आम्ही दाखवून देतो आमच्यासमोर उदाहरण असतं… सगळं जग जिंकल्यानंतरही मोकळ्या हाताने परत जाणाऱ्या नेपोलियनचे… आणि प्रेतांचे खच पाहून अस्वस्थ झालेल्या सम्राट अशोकाचे… म्हणून आम्हाला भारताला युद्ध नकोच आहे. आम्हाला फक्त बुद्ध हवा आहे! शांततेचा संदेश देणारा… स्थिर जीवनाची शाश्वती देणारा… निसर्गाला जपायला सांगणारा. आणि युद्धभूमी वरती ही गीता सांगणारा कृष्ण.. आम्ही आजही पसंत करतो आणि मला वाटते हेच आम्हा भारतीयांच्या संतोषकारक समाधानाच्या जीवनाचे रहस्य असावे…!

टीप :वरील लेख खूप अभ्यासाचा नाहीच आहे मला नेमकं काय वाटलं त्याचा आहे त्या दृष्टिकोनातून याचे मूल्यमापन करावे.

©  शीला पतकी

निवृत्त मुख्याध्यापिका सेवा सदन प्रशाला आणि संचालिका नापास शाळा सोलापूर

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कुकर आणि गॅसवरचा पाडवा! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? मनमंजुषेतून ?

☆ कुकर आणि गॅसवरचा पाडवा! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“अहो ऐकलंत का जरा! “

“अगं लग्न झाल्यापासून तुझ्या शिवाय कुठल्या बाईच ऐकलंय का मी? “

“आता मला कसं कळणार,  ऑफिसमध्ये कोणा कोणाचं ऐकता ते? “

“बरं,  बरं,  कळतात हो मला टोमणे! ते जाऊ दे,  सकाळी सकाळी मला सणा सुदिला वाद नकोय! बोल काय म्हणत होतीस तू? “

“अहो आपण किनई या पाडव्याला स्वर्गात जाऊ या! “

“काय s s s s? “

“अहो केवढ्या मोठ्याने ओरडताय? शेजारी पाजारी बघायला येतील,  काय झालं म्हणून! “

“अगं मग तू बोललीसच तशी! दसऱ्याला जसं सीमोल्लंघन करतात तसं पाडव्याला काय स्वर्गारोहण करतात की काय? “

“अहो नीट ऐकून तर घ्याल किनई,  का लगेच सुतांवरून स्वर्ग गाठाल? “

“अगं मी कुठे स्वर्ग गाठायला चाललोय? तूच म्हणालीस नां,  की आपण या पाडव्याला स्वर्गात जाऊ या म्हणून? “

“अहो हा स्वर्ग म्हणजे एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची शो रूम! “

“अगं मग असं सविस्तर सांग नां,  मला कसं माहित असणार तुझ्या डोक्यात कुठला स्वर्ग आहे ते? पण तिथून तुला काय घ्यायच आहे ते नाही बोललीस. “

“अहो आता मला प्रत्येक पाडव्याला नवीन साडी वगैरे नकोय. अजून पाच सहा कोऱ्या साडया तशाच पडल्येत! “

“पण त्या साडया काय तुला ‘इधर का माल उधर! ‘ करण्यात कधीतरी कामाला येतीलच नां? “

“म्हणजे? “

“अगं म्हणजे एखादी मिळालेली साडी आवडली नाही,  तर तोंड दाबून बुक्क्याचा मार खाल्ल्यागत तुम्ही बायका ती ठेवून घेताच की नाही? “

“मग तोंडावर कसं बरं सांगणार आवडली नाही म्हणून? ते बरं दिसत का? “

“हो ना,  मग तीच साडी कधी ना कधी तरी दुसऱ्या बाईला देता नां,  त्यालाच मी ‘इधर का माल… ‘

“कळलं,  कळलं! आम्हां बायकांचं ते ट्रेड सिक्रेट आहे! “

“यात कसलं आलंय सिक्रेट,  ओपन सिक्रेट म्हणं हवं तर! बरं ते जाऊ दे,  तुला त्या स्वर्गाच्या शो रूममधे कशाला जायचय ते नाही कळलं. “

“मला ‘ठुशी’ घ्यायची आहे! सासूबाईंनी त्यांची खरी ‘ठुशी’ मोठ्या जाऊबाईंना दिली,  तेंव्हा पासून माझ्या डोक्यात निदान एक ग्रॅमची ‘ठुशी’ घ्यायच फारच मनांत आहे. “

“अगं पण तुला आईनं,  वहिनीला दिलेल्या ठुशीच्या बदल्यात तिचा ‘घपला हार’ दिला ना,  मग? “

“अहो त्याला ‘घपला हार’ नाही ‘चपला हार’ म्हणतात! “

“तेच ते,  अगं पण मी काय म्हणतो आपण तुला एक ग्रॅमची खोटी खोटी ‘ठुशी’ कशाला घ्यायची? आपण त्यापेक्षा वा. ह. पे. कडून किंवा पु. ना. गा. कडून खरी सोन्याची ‘ठुशी’ घेऊ या की? “

“नको गं बाई,  हल्ली खरे दागिने घालायची सोय कुठे राहील्ये? सगळ्या बायकांचे सगळे खरे दागिने लॉकरची शोभा वाढवताहेत झालं. “

“मग माझ्या डोक्यात एक नाही दोन वस्तू आहेत,  ज्या नुकत्याच बाजारात नव्याने आल्येत. त्या नवीन आणि इनोव्हेटिव्ह असल्यामुळे खूप म्हणजे खूपच महाग आहेत,  त्या घेऊ या का? “

“अगं बाई,  त्या आणि कुठल्या? “

“प्रेशर कुकर आणि… “

“काय s s s? “

“अगं किती जोरात ओरडलीस? शेजारी पाजारी बघायला येतील ना? “

“अहो तुम्ही बोललातच तसं! प्रेशर कुकर काय बाजारात नवीन आलेली वस्तू आहे? गेली कित्येक वर्ष मी वेग वेगळे कुकर वापरत्ये. “

“अगं खरंच सांगतो,  हा प्रेशर कुकर बोलणारा आहे,  जो नुकताच नवीन आलाय बाजारात! “

“काय सांगताय काय? “

“अगं खरं तेच सांगतोय,  या कुकर मधे ना शिट्याच होत नाहीत! “

“मग कळणार कसं कुकर झाला आहे का नाही ते? “

“अगं जरा नीट ऐक. मी तुला म्हटलं ना,  की हा बोलणारा कुकर आहे म्हणून,  मग त्याच्यात शिट्या कशा होतील? तुला किती शिट्या हव्येत त्यावर तो सेट करायचा आणि गॅस चालू करायचा! “

“बरं,  मग? “

“मग त्यातून थोडया थोडया वेळाने one,  two,  three असे आवाज येतील,  त्यावरून तुला कळेल की कुकरच्या किती शिट्या झाल्येत त्या. “

“अस्स होय! मग बरंच आहे,  सिरीयल बघायच्या नादात मला मेलीला कळतच नाही किती शिट्या झाल्येत त्या! चालेल मला,  आपण तो बोलणारा कुकर घेऊयाच. ते ठुशी बिशीच जाऊ दे,  पुन्हा कधी तरी बघू! “

“Ok,  मग उद्याच जाऊन बोलणारा कुकर घेऊन येवू,  काय? “

“हो चालेल,  पण तुम्ही दुसरी वस्तू पण म्हणाला होतात,  ती कुठली? “

“आहे,  म्हणजे तुझ्या लक्षात आहे मी दोन वस्तू म्हटल्याचे. “

“म्हणजे काय? आम्हां बायकांची मेमरी तशी पुरुषांपेक्षा बरी असते असं म्हणतात! “

“असं कोण म्हणत? “

“आम्ही बायकाच! “

“अगदी बरोबर,  पण ती फक्त तुम्हाला हव्या असलेल्या खरेदीच्या बाबतीतच बरं का! बाकी सगळा उजेडच म्हणायचा. “

“कळलं,  कळलं! मला पण तुम्ही म्हणालात तसा सणा सुदीला वाद नकोय,  ती दुसरी वस्तू काय आहे ना,  ती बोला चटचट,  मला अजून बरीच कामं पडल्येत! “

“अगं त्या दुसऱ्या नवीन वस्तूच तू नांव ऐकलंस ना,  तर नाचायलाच लागशील बघ! “

“नाच करायचा कां आनंदाने गायचं ते नंतर बघू,  पटकन त्याच नांव… “

“रिमोट कंट्रोलची गॅस शेगडी! “

“का s s य? “

“अगं आपल्या टीव्हीला कसा रिमोट कंट्रोल असतो ना,  तसाच या गॅसच्या शेगडीला पण असतो. बसल्या जागेवरून तू गॅस चालू किंवा बंद करू शकतेस. बोल कशा काय आहेत या दोन नवीन वस्तू! “

“झ ss का ss स ss! आता सिरीयल सोडून मधेच उठायला नको गॅस बंद करायला! “

एवढं बोलून बायको किचन मधे पळाली आणि मी… खरी सोन्याची ठुशी परवडली असती,  पण या दोन नवीन,  त्याहून महागडया वस्तू घ्यायचे कबूल करून,  स्वतःच्या पायावर धोंडा तर मारून नाही ना घेतला,  या विचारात पाडव्याला आडवा पडलो!

 

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares