मराठी साहित्य – विविधा ☆ संत  वेणास्वामी – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ संत  वेणास्वामी – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(सूर्याच्या लेकी या महाग्रंथासाठी निवड झालेला सौ.पुष्पा प्रभूदेसाई यांचा संत वेणास्वामी हा लेख क्रमशः ई-अभिव्यक्ती च्या वाचकांसाठी:

“सूर्याच्या लेकी” हे नावच मुळी इतके समर्पक आहे की, सूर्याच्या तेजा प्रमाणे समाजात स्वत:च्या तेजाचा, ज्ञानाचा ,प्रकाश पसरविला आणि तोही अनंत हाल-अपेष्टा सहन करून! इतकेच नाही तर त्या तेजाचा समाजाला उपयोग करून दिला. भारतात अशा अनेक शूरवीर कर्तबगार आणि संत स्त्रिया होऊन गेल्या.

अशा अनेक स्त्रियांपैकी मला मनोमन भावल्या त्या समर्थ रामदास यांच्या शिष्या ‘संत वेणाबाई ‘त्याच ‘संत वेणास्वामी’. दक्षिणकाशी समजल्या जाणाऱ्या, कोल्हापुरात गोपजी देशपांडे गोसावी राहात होते. पुराणग्रंथ, तत्वज्ञान आणि ज्योतिषाचे ते ज्ञाते होते. श्री जगदंबा महालक्ष्मीच्या कृपेने त्यांना एक कन्यारत्न झाले.(इ. स.१६२८) . तिचे नामकरण झाले ‘वेणा.’ वेणा दिसायला सुंदर तर होतीच, पण खेळात खूप रममाण होणारी होती. कोड कौतुक खूप होत होते. कुतुहल म्हणून यांनी कन्येची पत्रिका पाहिली. तिच्या पत्रिकेत वैधव्य असा योग होता. आणि त्याचबरोबर अध्यात्मिक पातळीवर उच्च स्थान प्राप्तीचा योग होता. ही गोष्ट त्यांनी घरी सांगितली नाही. ती जात्याच हुशार होती. त्यामुळे वडिलांनी तिला लिहायला वाचायला शिकविले .एकनाथांचे “भावार्थरामायण” “भागवत” ग्रंथ ही वाचायला लागली. घराण्यात राम भक्तीचा पूर होता. लहान असतानाच वेणा ‘अध्यात्मरामायण’ तोंडपाठ म्हणू लागली .राम भक्ती ही वेणाच्या रक्तात होती. आई बरोबर भजन, कीर्तन ऐकायला जात असे. या काळात समर्थ रामदासांचा संप्रदाय महाराष्ट्रात नुकताच उदयाला आला होता. तत्कालिन प्रथेप्रमाणे आठव्या वर्षी मिरज येथील चंदुरकर देशपांडे यांच्या एकुलत्या एक मुलाशी तिचे लग्न झाले. घर संपन्न होते.  ती माहेरी गेली.  आणि एके दिवशी सर्वजण जेवायला बसले होते ,आणि वेणाला  , मिरजेला बोलावल्याचा सांगावा आला. तिचे पती स्वर्गवासी झाल्याची बातमी आली. हसण्या खेळण्याच्या वयात बाराव्या वर्षी वैधव्य आले. तत्कालीन सामाजिक पद्धतीनुसार केशवपन झाले. आणि ती अळवण (लाल लुगडे) नेसायला लागली. कोवळ्या वयातील अशा रूपातील वेणाचे चित्र डोळ्यासमोर आले की आपल्यालाही बेचैन होते.

तिने स्वतःला सावरले. धार्मिक ग्रंथांचे वाचन करण्यात मन गुंतवू लागली .आपल्या सासरी ती राहात असे. सासरच्यांनीही तिला शिक्षणात मागे पडू दिले नाही. एकदा रामदासस्वामी भिक्षेसाठी दारात आले,” जय जय रघुवीर समर्थ”, तुंबा भर दूध मिळेल का? सासूबाईंनी आतूनच सांगितले. दूध आहे , पण ते मारुतीच्या अभिषेकासाठी ठेवले आहे. ठीक. म्हणून समर्थ निघून गेले. पण ही गोष्ट वेणाच्या मनाला लागून राहिली. एकदा ती घरातील कामे आटोपून, तुलसी वृंदावना  जवळ ‘एकनाथी भागवत, वाचत बसली असताना ,समर्थ रामदास भिक्षेसाठी दारात आले. वेणा वाचत बसलेली पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी तिला विचारले “मुली हे तुला समजते का “वेणाने उत्तर दिले,” समजत नाही ,समजून घेण्याचा प्रयत्न करते .मनात प्रश्न येतात. पण सांगणार कोण?” वेणाची तत्व जिज्ञासा पाहून समर्थांनी तिच्या शंका विचारल्या. 25 प्रश्न तिने विचारले. जीव आणि शिवा चे लक्षण ,आत्मा परमात्मा, मायेचे स्वरूप ,त्यावर सत्ता कोणाची, चैतन्य काय आहे? आद्याचे स्वरूप काय आहे? शून्य शून्य पण चैतन्य, जन्म मृत्यू आणि बद्धमुक्त कोण आहे? सगुण निर्गुण, ब्रह्म मार्ग कोण सांगेल? असे पंचवीस प्रश्न तिने विचारले. त्यानंतर समर्थांनी तिच्या प्रश्नांना उत्तरे दिली .आणि वेणाला सांगितले की ,रोज हे वाचत रहा. तुला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. समर्थ स्वामी निघाले. त्यांना पहात राहिली. तिला सद्गुरु मिळाला.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मोडेन, पण वाकणार  नाही. ☆ सौ. राधिका माजगांवकर पंडित ☆

? मनमंजुषेतून ?

☆ मोडेन, पण वाकणार  नाही. ☆ सौ. राधिका माजगांवकर पंडित ☆ 

आमचे काका ती. स्व. दामोदर सखाराम माजगांवकर देहू रोड येथे मिलीट्रीत होते. आर्मीतल्या, ब्रिटीश राजवटीत हुतात्मा झालेल्या शूरवीरांची कथा सांगण्यांत त्यांचा हातखंडा होता. ऐकतांना प्रसंग डोळ्यांसमोर  उभा रहायचा. लहानपणी मनावर ठसलेली, कोरलेली अंगावर शहारे  आणणारी ही कथा आहे – श्री.कर्णिकांची.

पुण्यातल्या श्री जोगेश्वरीवरून बुधवार चौकाकडे जाणाऱा सरळ रस्ता – थोडक्यात म्हणजे हल्लीचं श्रीदगडूशेट गणपती मंदिर, श्री गणेश वास्तव्य आहे ना, तोच तो रस्ता. त्याच्या डावीकडे फरासखाना पोलीस चौकी आहे. तिथेच एक दीपस्तंभ अजूनही कित्येक वर्षांचा, जुना झाला तरी भक्कमपणे उभा आहे आणि त्यावर नाव कोरलंय – “भास्करदा कर्णिक”.                                                                        

कर्णिकांनी आपल्या देशासाठी फार मोठ्ठं बलिदान केलं आहे. पण आज पुणेकर त्यांना विसरले आहेत. हा स्तंभ म्हणजे कसलं प्रतिक आहे? कुणाच्या नावाची ही निशाणी आहे? त्याबद्दल कसलीच, काहीच माहिती नसलेली अशी ही वास्तु सध्या उपेक्षित ठरलीय. कारण श्री. कर्णिकांच्या बरोबरच त्यांची निशाणी, काळाच्या पडद्याआड गेलीय. पण त्यांचा आदर्श, त्यांचं बलिदान, त्यांचं नाव आपण मनात जागवूया.

श्री.भास्करदा कर्णिक ऑर्डिनन्स फॅक्टरित नोकरीला होते. हुषार आणि अत्यंत धाडसी होते. त्या काळचे १९४०-४२ सालचे उच्चपदवी विभूषित असे असलेले हे धडाडीचे तरुण! देशासाठी काहीतरी करण्याची त्यांच्या मनात विलक्षण उर्मी होती. ऑर्डिनन्स फॅक्टरीतच नोकरीला असल्याने तेथील सामग्री जमवून धाडसाने यांनी हातबॉम्ब तयार केले. थोडे थोडके नाही, तर अर्धा ट्रकभरून बॉम्बची सज्जता  झाली आणि हा बॉम्बहल्ला करण्यासाठी कर्णिकांना देशप्रेमी साथीदारही मिळाले. त्यांची नांवे सांगायलाही अभिमान वाटतो, श्री. गोरे, श्री दीक्षित, श्री काळे, श्री जोगेश्वरी मंदिरातील’ व्यवस्थापक गुरव श्री भाऊ बेंद्रेही त्यांना सामील होते. इतकंच काय, देवीच्या मंदिरातच हे बॉम्ब लपवले होते. अखेर धाडसी खलबत होऊन निर्णय ठरला. आणि कॅपिटॉलवर बॉम्ब टाकण्यांत ते यशस्वी झाले. पण हाय रे देवा! कसा कोण जाणे दुर्दैवाने ब्रिटीशांना सुगावा लागला आणि साथीदारांसह श्री. कर्णिक पकडले गेले.

फरासखान्यात ह्या देशप्रेमींना आणण्यांत आलं. आजचा सध्याचा मजूर अड्डा आहे ना?तीच ती  जागा. पुराव्याअभावी बाकीचे साथीदार सुटले. पण श्री.कर्णिक मुख्य आरोपी म्हणून, डाव फसल्यामुळे अडकले. पण ते डगमगले नाहीत. परिस्थितीचं  भान त्यांना आलं. लघुशंकेसाठी परवानगी मागून ते बाजूला गेले. क्षणार्धात खिशातली विषारी पुडी त्यांनी गिळून घेतली. चार पावलं चालल्यावर फरासखान्याच्या पहिल्या पायरीवरच ते कोसळले आणि तिथेच त्या क्षणीच त्यांनी देशासाठी देहत्याग केला.

तर मंडळी असा आहे त्या पायरीचा इतिहास. मोडेन पण वाकणार नाही, हे ब्रीदवाक्य स्मरुन तो देशप्रेमी हुतात्मा झाला. त्यांची आठवण स्मृतिचिन्ह म्हणून उभा केलेला स्तंभ आता जुना झालाय. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलंय. मध्यंतरी बराच काळ गेला. भास्करदा कर्णिक ही अक्षरेही आता पुसट झालीत. आणि आता ह्या हुतात्म्याचाही दुर्दैवाने पुणेकरांना विसर पडलाय.

संपली श्री भास्कर दा. कर्णिक  ह्यांची  कथा. ज्यांना ही कथा माहित आहे, ते दगडूशेट गणपती मंदिरातून बाहेर पडतात, डावीकडे वळून स्तंभापुढे उभे रहातात, क्षणभर विसावतात  आणि नतमस्तक होतात.

तर मंडळी आपणही या थोर हुतात्म्याला मनोभावे श्रध्दांजली देऊयात. ??

भारतमाताकी जय!

मित्र मैत्रिणींनो, एक गोष्ट नमूद करून, आवर्जून सांगाविशी वाटते. माझे ती.स्व.काका मिलिट्रीत असल्यामुळे त्या हुताम्याचं हौतात्म्य ते जाणत होते. अजूनही इतिहासकालीन दोन दीपमाळा श्रीजोगेश्वरीसमोर   भक्कमपणे उभ्या आहेत. तिथे आम्ही रहात होतो. फरासखाना तिथून आम्हाला अगदी जवळच होता. काका थकले होते. काठी  टेकत टेकत मला सोबत घेऊन “श्री.कर्णिक स्तंभा”जवळ जाऊन नतमस्तक होऊन मानाची सलामी, मानवन्दना हुतात्मा श्री. कर्णिकांना ते द्यायचे.

धन्य ते हुतात्मा – श्री. कर्णिक आणि धन्य ते माझे देशप्रेमी काका. त्या दोघांना आपण कडक सॅल्यूट करूया. तर अशी होती ही श्री. कर्णिकांची गौरवपूर्ण  धाडसी गाथा.

तेथे कर माझे  जुळती. ??

© सौ राधिका माजगावकर पंडित,

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! बॅलेन्टाईन डे ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? बॅलेन्टाईन डे ! ?

“काय पंत, आज एकदम ठेवणीतला ड्रेस घालून स्वारीचे प्रस्थान कुठे ?”

“अरे आज आमच्या सिनियर सिटीझनचा ‘बॅलेंटाईन डे’ आहे बर.”

“तुमची काहीतरी गडबड होत्ये पंत, तुम्हाला ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणायचं आहे का ?”

“उगाच नेहमी सारखा आगाऊ पणा नकोय, तो ‘व्हॅलेंटाईन डे’ तुमचा, आमचा ‘बॅलेंटाईन डेच’ आहे आज.”

“म्हणजे मी नाही समजलो?”

“अरे परवा लेल्याचा मुलगा आला US वरून आणि येतांना त्याने ‘बॅलेंटाईन स्कॉच’ आणली आहे आमच्या सिनियर सिटीझन ग्रुपसाठी.  मग लेले म्हणाला या सगळयांनी घरी शनिवारी संध्याकाळी, आपण आपला ‘बॅलेंटाईन डे’ साजरा करू.  म्हणून त्याच्याकडेच चाललोय.”

“Ok, एन्जॉय करा पण लेले काकूंना हे चालत ?”

“अरे नाही चालत, पण त्या गेल्यात पुण्याला, सत् संग करायला आणि तोच मोका साधून आमचे आज ‘बॅलेंटाईन डेच’ सेलेब्रेशन आहे.”

“पुण्याला आणि सत् संग करायला ?”

“का, पुण्याचे लोक सत् संग करत नाहीत ?”

“तसच काही नाही, पण आपल्या शिवाजी पार्कात कुठंही सत् संग चालत नाही की काय, उगाच एव्हढे त्यासाठी लांब पुण्याला कशाला जायला हवे ?”

“तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण त्यांचे माहेर पुण्याचे, उभे आयुष्य पुण्यात…. “

“गेले असेल, पण सत् संग तो  सत् संग, तो मुंबईत केला काय आणि पुण्यात केला…. “

“असे तुला वाटत, पण त्यांच मत थोडं वेगळे आहे.”

“यात कसलं आलं आहे मत, सत् संग सगळीकडे सारखाच असतो ना ?”

“अरे त्या इथे पण एक दोनदा

सत् संगाला गेल्या होत्या, पण त्यांच म्हणणं असं पडलं की इथल्या सत् संगाला पुण्याची सर नाही.”

“म्हणजे काय पंत, मी नाही समजलो?”

“अरे ती एक पुण्याची मानसिकता आहे, आमच्याकडे जे जे आहे, मग ते काहीही असो, ते जगात कुठेच नाही आणि आपण मुंबईकर त्यांचा तो भ्रम दूर करू शकत नाही, एव्हढे बरीक खरे.”

“ते ही खरच आहे म्हणा.”

“आणि लेले काकू पुण्याला गेल्यात हे आमच्या दृष्टीने बरेच नाही का ? नाहीतर आम्ही आमचा ‘बॅलेन्टाईन डे’ कसा साजरा केला असता, काय बरोबर ना ?”

“Ok, एन्जॉय करा पंत, पण मला एक कळत नाही हे तुमच्या नातवाचे चांदीचे बोंडले कशाला घेतले आहे तुम्ही बरोबर ?”

“अरे आज आम्ही तेच पेग मेझर म्हणून वापरणार आहोत !”

“काय, चांदीचे बोंडले पेग मेझर म्हणून वापरणार तुम्ही ?”

“तुझी चेष्टा कळते बर मला, पण आता वय झाले. तुझ्या वयाचा होतो तेव्हा….. “

“ते तुम्ही मागे एकदा सांगितले होतं आणि माझ्या ते चांगल लक्षात आहे.  आत्ताच्या या तुमच्या पेग मेझरच काय ते…. “

“सांगतो, सांगतो.  मगाशीच मी तुला म्हटलं, लेले काकू मूळच्या पुण्याच्या, तर त्यांनी

पुण्याला जाताना, लेल्याने काही उद्योग करू नयेत म्हणून, पार्टीचा सगळा सरंजाम कपाटात ठेवून, चावी आपल्या बरोबर नेली आहे पुण्याला, अस मला लेल्यानेच  सकाळीच फोन करून कळवले, म्हणून हे…. “

“पण म्हणजे तुमची ‘बॅलेन्टाईन’ पण कपाटात…… “

“नाही नाही, ती आधीच जोशाच्या घरी सुखरूप आहे आणि जोश्या ती येतांना घेऊनच येणार आहे.”

“काय सॉलिड फिल्डिंग लावली आहे तुम्ही लोकांनी पार्टी साठी, मानलं तुम्हाला !”

“मानलंस ना, मग आता तू जा तुझ्या रस्त्याने आणि मी…. “

“जातो जातो, पण एक शंका आहे.”

“आता कसली शंका?”

“पेग मेझरच काम झाल, पण ग्लासचे काय, पाहिजे तर माझ्याकडचे….. “

“काचेचे अजिबात नको आणि तुझ्या कडचे नकोच नको, उगाच सगळीकडे बोंबाबोंब करशील.”

“मग काय द्रोणातून स्कॉच…. “

“उगाच वाटेल ते बडबडू नकोस, तेव्हढी अक्कल आहे आम्हाला.”

“पण मग ग्लासांचा प्रश्न… “

“आम्ही सोडवला आहे.”

“तो कसा काय पंत?”

“अरे असं बघ, आमच्या ग्रुप मधे बहुतेक सगळ्यांनाच डायबेटीस आहे आणि प्रत्येकाकडे जांभळाच्या झाडाच्या खोडापासून बनवलेला लाकडी ग्लास आहे, त्यामुळे तो पण प्रश्न…. “

“निकाली लागला असंच ना ?”

“बरोबर ओळखलस !”

“पंत, म्हणजे पेग मेझर आणि ग्लासांचा प्रश्न तर सुटला, पण मग ही ‘बेनाड्रील सिरप’ची बाटली कशाला बरोबर घेतली आहे तुम्ही? “

“अरे सांगतो सांगतो, एकदा अशाच सेलेब्रेशनच्या वेळेला कुलकर्णीला एक पेग मध्येच झाली आणि सगळ्यांनी ठरवले की आता त्याला आणखी द्यायची नाही.”

“बर मग !”

“मग काय, पठया ऐकायला तयार नाही, आणखी पाहिजे म्हणून हट्ट धरून बसला. पण त्याची एक पेग नंतरची अवस्था बघून त्याला आणखी स्कॉच द्यायला कोणीच तयार नव्हतं.”

“पुढे”

“पुढे काय, जोश्यानेच अक्कल चालवून देतो, देतो म्हटलं आणि त्याचा ग्लास घेवून गेला किचन मधे आणि कपाटातली बेनाड्रीलची बाटली काढून ते चांगल अर्धा ग्लास भरून वर  पाणी टाकून ग्लास फुल करून दिला कुल्कर्ण्याच्या हातात, तेव्हा कुठे तो थंड झाला आणि आज पण कुलकर्णी पार्टीला आहे, म्हणून म्हटलं असावी एखादी बेनाड्रीलची बाटली इमर्जंसी म्हणून.”

“खरच धन्य आहे तुमची पंत !”

“आहे ना, मग येतोस का आम्हाला कंपनी द्यायला, बोल ? “

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रभू…. ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ प्रभू…. ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

प्रभू…..

कोणताही अर्ज केला नव्हता की कुणाचीही शिफारस नव्हती,…..

असे कोणतेही असामान्य कर्त्तृत्व ही नाही तरीही अखंडपणे तू माझे हे हृदय चालवत आहेस…..

चोवीस तास जिभेवर नियमित अभिषेक करत आहेस…..

मला माहीत नाही खाल्लेले न थकता पचवून सातत्यपूर्ण कोणतीही तक्रार न करता चालणारे कोणते यंत्र तू फिट करुन दिले आहेस..,..

पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत विना अडथळा संदेश वहन करणारी प्रणाली कोणत्या अदृष्य शक्तीने चालते आहे काही समजत नाही…..

मी मात्र ती कशी चालते हे सांगून खोटा अहं पोसतो आहे…..

लोखंडाहून टणक हाडांमध्ये  तयार होणारे रक्त कोणते जगावेगळे आर्किटेक्चर आहे याचा मला मागमूसही नाही……

हजार हजार मेगापिक्सल वाले दोन दोन कॅमेरे अहोरात्र सगळी दृश्ये टिपत आहे…

दहा-दहा हजार टेस्ट करणारा जीभ नावाचा टेस्टर,…..

अगणित संवेदनांची जाणीव करुन देणारी त्वचा नावाची सेन्सर प्रणाली,…..

वेगवेगळया फ्रिक्वेंसीची आवाज निर्मिती करणारी स्वरप्रणाली आणि त्या फ्रिक्वेंसीचे कोडींग-डिकोडींग करणारे कान नावाचे यंत्र,…..

पंच्याऐंशी टक्के पाण्याने भरलेला शरीर रुपी टँकर हजारो छिद्रे असतानाही कुठेही लिक होत नाही…..

अद्भूत,…..

अविश्वसनीय,…….

अनाकलनीय……

अशा शरीर रुपी मशीन मध्ये कायम मी आहे याची जाणीव करुन देणारा अहं देवा तू असा काही फिट बसविला आहे की… आणखी काय मागाव मी……

आता आणखी काही हवंय अशी मागणी सुद्धा शरम वाटायला भाग पाडते……

आज एव्हढेच म्हणावेसे वाटते मी या शरीराच्या साहाय्याने तुझ्या प्रेम सुखाची प्राप्ती करावी यासाठीच्या तुझ्या या जीवा-शिवाच्या खेळाचा निखळ, निस्वार्थी आनंदाचा वाटेकरी राहीन अशी सद्बुद्धी मला दे……

तूच हे सर्व सांभाळतो आहे याची जाणीव मला सदैव राहू दे…

देवा तुझे खूप खूप आभार…..

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विदुषी घोषा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ विदुषी घोषा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆ 

ऋग्वेद काळात अनेक ऋषिका होऊन गेल्या. त्यातील घोषा या विदुषी ची कथा आपण ऐकूया.

घोषा ही दीर्घतामस ऋषींची नात व कक्षीवान ऋषींची कन्या. ऋषींच्या आश्रमात ती सगळ्यांची लाडकी होती पण दुर्दैवाने लहानपणीच तिच्या सर्व अंगावर कोड उठले. त्यामुळे तिने लग्नच केले नाही. अध्यात्मिक साधनेत तिने स्वतःला गुंतवून टाकले. तिला अनेक मंत्रांचा साक्षात्कार झाला. तिने स्वतः अनेक मंत्र आणि वैदिक सूक्ते रचली. ऋग्वेदाच्या दशम मंडलात तिने दोन पूर्ण अध्याय लिहिले आहेत. प्रत्येक अध्यायात 14/ 14 श्लोक आहेत. आणि सामवेदामध्ये सुद्धा तिचे मंत्र आहेत.

ती साठ वर्षांची झाली. त्यावेळेला तिच्या एकदम लक्षात आले की आपल्या पित्याने अश्विनीकुमारांच्या कृपेमुळे आयुष्य, शक्ती आणि आरोग्य प्राप्त केले होते. आपणही अश्विनीकुमार यांना साकडे घालू.

अश्विनी कुमार यांना प्रसन्न करून घेण्यासाठी घोषाने उग्र तप केले.”अभूतं गोपा मिथुना शुभस्पती प्रिया

अर्यम्णो  दुर्या अशीमहि ” अश्विनीकुमार प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले. तिच्या इच्छेनुसार त्यांनी तिचे कोड नाहीसे केले  व ती रूपसंपन्न यौवना बनली. त्यानंतर तिचा विवाह झाला. तिला दोन पुत्र झाले. त्यांची नावे तिने घोषेय आणि सुहस्त्य अशी ठेवली. दोघांना तिने विद्वान बनवले. युद्ध कौशल्यात देखील ते निपुण होते.

घोषाने जी सूक्ते रचली याचा अर्थ असा आहे की,”हे अश्विनी देवा आपण

अनेकांना रोगमुक्त करता.आपण अनेक रोगी लोकांना आणि दुर्बलांना नवीन जीवन देऊन त्यांचे रक्षण करता. मी तुमचे गुणगान करते .आपण माझ्यावर कृपा करून माझे रक्षण करा आणि मला समर्थ बनवा. पिता आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देतो तसे उत्तम शिक्षण, आणि ज्ञान तुम्ही मला  द्या. मी एक ज्ञानी आणि बुद्धिमान स्त्री आहे. तुमचे आशीर्वाद मला दुर्दैवा पासून वाचवतील. तुमच्या आशीर्वादाने माझ्या मुलांनी आणि नातवांनी चांगले जीवन जगावे. तिच्या तपश्‍चर्येने प्रसन्न होऊन  अश्विनी कुमारांनी तिला मधुविद्या  दिली . वैदिक अध्यापन शिकवले. रुग्णांना रोगमुक्त  करण्यासाठी , अनुभव, ज्ञान मिळवण्यासाठी, त्वचेच्या आजारापासून बरे होण्यासाठी गुप्‍त शिक्षण विज्ञान शिकवले.

अशाप्रकारे कोडा सारख्या दुर्धर रोगाने  त्रासलेल्या या घोषाने वेदांचे रहस्य उलगडून दाखवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. तिने एकाग्रतेने अभ्यास केला आणि तिला वैदिक युगातील धर्मप्रचारिका ब्रह्मवादिनी घोषा हे स्थान प्राप्त झाले. अशा या बुद्धिमान, धडाडीच्या वैदिक स्त्रीला शतशत नमन.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुखाची शिल्पकार ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ सुखाची शिल्पकार ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

वाढदिवसामीच मला चाॅकलेट दिलं,

एक घट्ट मिठी मारून “लव यू ” म्हटलं,

मीच केलय एक प्राॅमिस मला,

कायम खूश ठेवणार आहे मीच मला….

Priority लिस्टवर माझं स्थान नेहेमीच शेवटी,

ते आणिन आता थोडतरी वरती,

सगळ्यांचं सगळं करताना विसरणार नाही स्वतःला,

मीच एक फूल दिलय आज मला….

खूप खूप वर्षांनी खाली ठेवलाय

तो सुपरवुमनचा किताब,

मन होऊन जाऊदे फुलपाखरू आज…

नाही जमत मला तिच्यासारखा स्वयंपाक,

आणि येत नाही तिच्यासारखं रहायला झक्कास,

येत नाही टाईम मैनेजमेंट मला,

काँम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक गैजेट्स मधे मी “ढ” गोळा….

आज मान्य मला माझे सारे दोष अन् कमतरता,

माझ्यातला वैशाख,

कारण आज उतरवून ठेवलाय,

मी आदर्श भारतीय नारीचा पोषाख….

हिचे केस, तिची उंची, हिचा रंग, तिचा आवाज,

नको ती तुलना, नको ती इर्ष्या,

तोच स्त्रीयांचा खरा शाप…

आज मी मिळवणार आहे अपूर्णतेतल्या पूर्णतेचा उःशाप….

मी शिकवणार आहे मला, जशी आहे तशी आज,

आरश्यासमोर उभी राहून बघणार आहे स्वतःला,

ना कोणाची

बायको, सुन, आई, मुलगी म्हणून… फक्त मला…

गुणदोषांसकट स्वतःच्या प्रेमात पडायचय मला…

का हवा मला

नेहेमीच घोड्यावरून येणारा स्वप्नातला राजकुमार?

मीच होणार माझ्या सुखाची शिल्पकार…

आत्ममग्नतेच्या तळ्याकाठी बसेन काही काळ,

आणि फुलवेन स्वतःच्याच अस्तित्वाची बाग!!!

Happy Valentine’s day  To All Women

 

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भरताचे नाट्यशास्त्र ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ भरताचे नाट्यशास्त्र ☆ श्री अरविंद लिमये ☆

भरतमुनीनी लिहिलेला ‘नाट्यशास्र’ हा सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो.आज माघी पौर्णिमा.भरतमुनी जयंती ! या निमित्ताने त्यांच्या या ग्रंथाची ओझरती ओळख करुन देण्याचा हा प्रयत्न.जेणेकरुन जिज्ञासू रसिकांना या ग्रंथांवर अनेक अभ्यासकांनी लिहिलेल्या संशोधनात्मक ग्रंथसंपदेच्या माध्यमातून हा ग्रंथ समजून घेण्याबाबत उत्सुकता वाटावी.

या ग्रंथाचे लेखन भरतमुनींनी नेमके कधी केले हे ज्ञात नसले तरी त्यांचा कार्यकाल ख्रिस्तपूर्व चौथ्या किंवा पाचव्या शतकातला मानला जातो. याचाच अर्थ इसवीसनपूर्व काळापासून भारतवर्षात नाट्य,नृत्य,गायनादी कला प्रगतिशील स्तरावर पोचलेल्या होत्या हेच सिद्ध होते.

‘भरताचे नाट्यशास्त्र’ या ग्रंथात नाट्य,अभिनय याशिवाय नृत्य,गायन आदी पूरक कलांचे रंगमंचावरील सादरीकरणाचे शास्त्र व व्याकरणही सविस्तर समजून सांगितलेले आहे.या ग्रंथाची प्रत्यक्ष नाट्यप्रयोगासाठीची उपयोगिता तसेच या ग्रंथाची व्याप्तीही समजावी या हेतूने प्रातिनिधिक स्वरूपात त्यातील ‘अभिनय’ या अंगाचा इथे सविस्तर उहापोह करीत आहे.

या ग्रंथामधे ३६ अध्याय असून त्यातील आठव्या अध्यायात भरताने अभिनयाच्या चार प्रकारांची वैशिष्ट्ये विशद केलेली आहेत.हे चार प्रकार खालीलप्रमाणे-

१) आंगिक २) वाचिक ३)आहार्य व ४) सात्त्विक अभिनय.

आंगिक अभिनय – हा शरीराच्या माध्यमातून केलेला अभिनय. भरताने या ग्रंथात नाट्यधर्मीशैलीचा विचार करताना विविध अंग-उपांगांच्या हालचाली व मुद्रायुक्त रितीबद्ध हावभाव यांची सविस्तर ओळख करून दिलेली आहे.नाट्यधर्मीशैलीनुसार  हात,पाय,कंबर,छाती, मस्तक यासारख्या मुख्य अंगांच्या आणि बोटे,डोळे,नाक,गाल यासारख्या उपांगांच्या काही निश्चित आणि प्रतीकात्मक रितीबध्द चेष्टांची एक विशिष्ठ भाषाच तयार केली होती व  गद्यपद्यात्मक संवादातील व पात्रांच्या कृतीतील नेमका आशय  याच मर्यादित चेष्टांद्वारेच व्यक्त केला जायचा.

आंगिक अभिनयाचे मुखज,शरीर व चेष्टाकृत हे तीन प्रकार. यातील ‘मुखज’ म्हणजे चेहऱ्यावरील भुवया,पापण्या, डोळे, नाक, गाल, ओठ इत्यादी विविध उपांगांद्वारे केलेला अभिनय. ‘शरीर’ अभिनय म्हणजे खांदे,मान, हात, पाय यासारख्या मुख्यअंगाद्वारे केलेला अभिनय. आणि ‘चेष्टाकृत’ म्हणजे शरीर अवयवांच्या विविध हालचालींद्वारे केलेला अभिनय.

याशिवाय कोणती भूमिका साकारताना नटाने कसे चालावे, उठावे, बसावे इत्यादीबाबतचे नियमही नाट्यशास्त्रात सांगितले आहेत.उदा.- वृद्ध पात्र, तरुण पात्र, मध्यमवयीन,अपंग, दमून आलेले, दुःखी, आनंदाने भारलेले, अशा विविध पात्रांच्या मनोवस्था आणि स्थितीनुसार त्यांचे चालणे, उठणे, बसणे, यातील नेमके आणि सूक्ष्म फरक अभिनयाद्वारे दाखवणे अपेक्षित असते. तसेच वेड्या माणसाचा अभिनय करताना त्याचे अस्ताव्यस्त केस, कपडे याबरोबरच त्याचे डोळे, भुवया इत्यादीद्वारे होणारा मुखज अभिनय किंवा भरभर चालता चालता मधेच थबकणे,धपकन् बसणे, संतापणे, मधेच हसणे, यासारखे शरीर व चेष्टाकृत अभिनय याद्वारे त्याचे वेगळेपण अधोरेखित होणे अपेक्षित आहे.

आंगिक अभिनयाचं नेमकं सार भरतमुनींच्याच शब्दात सांगायचे झाले तर ते असे सांगता येईल.-‘ निरनिराळ्या वासाची फुले एकत्र करून माळी जशी फुलांची एक माळ तयार करतो त्याचप्रमाणे नटाने भिन्न भिन्न भावदर्शक अंगोपांगांची रचना करून त्याची सरस, सुंदर, सहज, स्वाभाविक आणि मनोहर दिसेल अशी भावमाला गुंफावी आणि ती प्रेक्षकांना प्रदान करुन आनंदित करावे.’

वाचिक अभिनय-नाटकातील गद्य पद्यात्मक संवाद, गद्य व संगीताद्वारे वाचेचा उपयोग करून प्रस्तुत करणे यास भरताने ‘वाचिक अभिनय’ असे संबोधले आहे. लेखकाच्या प्रत्येक शब्दातील व शब्दांमागील अर्थ जाणीवपूर्वक जपला पाहिजे यासाठी भरतमुनींनी शब्दांच्या खालील चार शक्ती सांगितलेल्या आहेत.

१) अभिदा शक्ती- शब्दांचा  साहित्यिक अर्थ स्पष्ट करणारी शक्ती.

२) लक्षणा शक्ती- शब्दात लपलेला अर्थ प्रकट करणारी.

३) व्यंजना शक्ती- शब्दांमधील सांकेतिक अर्थ प्रकट करणारी.      ४)तात्पर्य शक्ती- शब्दाचा हेतू प्रकट करणारी.

नटाच्या वाचिक अभिनयातून म्हणजेच संवादांमधील शब्दोच्चारातून या चार शक्तींचा प्रत्यय येणे आवश्यक आहे.

अशा या वाचिक अभिनयाच्या पायावरच आंगिक, आहार्य आणि सात्त्विक अभिनय तोललेले आहेत. याचाच अर्थ अभिनयाच्या या इतर सर्व प्रकारांचा डोलारा वाचिक अभिनयाच्या पायावरच उभा असतो.                           आहार्य अभिनय नाटकातील पात्रे रंगमंचावर सादर करणाऱ्या  नटांना पात्रांचे रूप देणे व अभिनयासाठी आवश्यक वातावरण निर्माण करणे हे काम रंगतंत्राचे असते. तसेच दृश्यबंध

व अन्य मंचवस्तू नाटकातील अभिनयासाठी योग्य वातावरण निर्माण करतात. प्रकाश व ध्वनी संयोजनाद्वारे त्या वातावरणाला पूर्ण रूप प्राप्त होते. वेशभूषा व रंगभूषा नटाला पात्ररुप देतात. तथापि या कृत्रिम साधनांनी निर्माण केलेले वातावरण कृत्रिम नसून अस्सलच आहे असा आभास अभिनयाद्वारे निर्माण करणे ही नटाची जबाबदारी असते. अभिनयाच्या या अंगास  ‘आहार्य अभिनय ‘ असे म्हटले जाते.

सात्विक अभिनय पात्राच्या सत्त्वाशी संबंधित असलेल्या मानसिक प्रक्रिया आंगिक व वाचिक व आहार्य अभिनयाच्या माध्यमातून व्यक्त करणे यास भरताने ‘सात्त्विक अभिनय’ ही संज्ञा दिली आहे.उदा.- कंठ दाटून येणे,डोळ्यात अश्रू येणे,स्तंभित होणे,रोमांचित होणे,शरीराला कंप सुटणे,इत्यादी.या सर्व प्रतिक्रिया नटाच्या अंतर्मनातून निर्माण होत असल्याचा आभास निर्माण करणाऱ्या अभिनयास ‘सात्त्विक अभिनय’ असे म्हटले जाते.

भरताच्या नाट्यशास्त्रातील अभिनय या संकल्पनेचा हा ओझरता परिचय !

नाट्यशास्त्र या ग्रंथात भरतमुनीनी नाट्यास पूरक अशा नृत्यसंगितादी कलांचे शास्रही विदित केलेले आहे. दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये उगम झालेली ‘भरतनाट्यम्’ नृत्यशैली भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावरच आधारित आहे. भरतनाट्यम् नृत्याचे  सादरीकरण कर्नाटकी संगीताच्या साथीने होते. या नृत्य पद्धतीवर द्रविड संस्कृतीचा प्रभाव आहे. तंजावर बंधू म्हणून मान्यता पावलेल्या संगीतकारांनी या नृत्याचा ‘मार्गम्’ रचला आणि त्याच क्रमाने आजही या नृत्याची प्रस्तुती करण्याची प्रथा आहे.

नाट्यनृत्यकलांचा भक्कम पाया असलेल्या ‘भरतमुनींचे नाट्यशास्त्र’ या ग्रंथाचे मोल म्हणूनच अमूल्य आहे.

भरतमुनी जयंती निमित्त त्यांचे हे लेखनरुपी स्मरण हीच त्यांना वाहिलेली माझी आदरांजली !???

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रिक्त मरण (Die Empty) ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ रिक्त मरण (Die Empty) ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

वाचण्यासाठी आणि त्यातून काहीतरी शिकण्यासाठी अनेक पुस्तकं आहेत त्यातलंच एक सर्वोत्तम पुस्तक म्हणजे टॉड हेनरी यांचे “Die Empty”

हे पुस्तक लिहण्याची प्रेरणा आणि कल्पना लेखकाला एका बिझनेस मिटींग मध्ये मिळाली…

मिटींगमध्ये डायरेक्टरने तेथे उपस्थित लोकांना प्रश्न विचारला. की “जगातील सर्वात श्रीमंत जमीन कोठे आहे?”

प्रेक्षकांपैकी एकाने उत्तर दिले : “तेलाने समृद्ध गल्फ राज्ये.”

तर दूसर्‍याने उत्तर दिले : “आफ्रिकेतील डायमंड खाणी.”

त्यांची उत्तरं ऐकल्यानंतर डायरेक्टर म्हणाले : नाही, जगातील सर्वात श्रीमंत जमीन म्हणजे स्मशानभूमी. कारण असे लाखो लोक मरण पावले आहेत ज्यांच्याजवळ अनेक मौल्यवान कल्पना होत्या पण त्या कधीच प्रकाशात येऊ शकल्या नाहीत आणि इतरांना त्याचा काहीच फायदा सुध्दा झाला नाही. त्यांच्या या सर्व मौल्यवान कल्पना त्यांच्याबरोबर या दफनभूमीत पुरण्यात आल्या आहेत.

याच उत्तराने प्रेरीत होऊन लेखक टॉड हेनरी यांनी “Die Empty” हे पुस्तक लिहले.

सर्वात सुंदर जर त्यांनी काही या पुस्तकात म्हटलं असेल तर ते म्हणजे “तुमच्या आतमध्ये जे सर्वात बेस्ट आहे जे तुम्ही करु शकता ते आतमध्येच ठेवुन मरु नका. निवडण्यासाठी आपल्याकडे नेहमीच पर्याय असतो त्यामुळे नेहमी रिक्त मरण निवडा…

रिक्त मरण किंवा Die Empty या शब्दाचा इथे अर्थ असा आहे की तुमच्यामध्ये जो काही चांगुलपणा आहे, जे काही चांगले तुम्ही या जगाला देऊ शकता ते सर्व मरण्यापूर्वी या जगाला देऊन जा…

जर तुमच्याकडे एखादी कल्पना असेल तर ती सादर करा…

जर तुमच्याकडे ज्ञान असेल तर ते इतरांना द्या…

जर तुमच्याकडे एखादे ध्येय असेल तर ते साध्य करा…

तुमच्याकडे जे आहे त्यावर प्रेम करा, इतरांचा सांगा आणि इतरांमध्ये वाटा आतमध्येच दडवून ठेवू नका…

चला तर मग, द्यायला सुरुवात करुया. आपल्यामध्ये जे काही चांगले आणि आपण जे काही चांगले या जगाला देऊ शकतो ते सर्व  आपल्यामधून काढून या जगामध्ये पसरवा….

शर्यत सुरु झाली आहे…

चला, हे जग सोडण्याआधी रिक्त होऊया…

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मनातील अडगळीची खोली… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

?  विविधा ?

☆ मनातील अडगळीची खोली… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

मनातली अडगळीची खोली काय डोकावले आहे का कधी ह्या खोलीत… ?

प्रश्न जरा विचित्र वाटतो खरा, पण बघा जरा विचार करून शेवटचं कधी डोकावलं होत ते.

आपण आपल्या घरातल्या अडगळीच्या खोलीत अधून मधून डोकावत असतो. नेहमी नाही पण महिन्यातून एकदा तरी नक्की डोकावतो. एखादी वस्तू जी क्वचित लागते ती तिथे ठेवलेली असते ती आणायच्या कारणाने तरी, आणि नाहीच तर साठलेले धुळीचे थर झटकून खोली स्वच्छ करण्याच्या हेतूने तरी.

सगळं सामान, अर्थात बरचस नको असलेलं झटकून स्वच्छ पुसून नीट लावून ठेवतो. उगीचच सगळ्या वस्तूं वरुन हात फिरवतो, काही खास गोष्टींवर घातलेले कव्हर बाजूला सारून ते झटकून परत घालतो.

काय काय सापडत म्हणून सांगू. आरामखुर्ची, पेंड्युलमचे घड्याळ, कधी काळी शिवणकाम शिकलो आहे ह्याचा शिक्का मोरतब करणारे मशीन,एफेम रेडियो, पिढ्यानपिढ्या चालत आलेला पाळणा, तीनचाकी सायकल जी आता कोणीही चालविणार नाही, पाटावरवंटा ज्यावर चटणी वाटण्यासाठी आपल्याकडे शक्तीही नाही, रॉकेल वरचे कंदील आता रॉकेल न का मिळेना, स्टोव्ह जो पेटवता सुद्धा येत नाही अशा एक ना अनेक वस्तू असतात.

परवा मी पण सहज माझ्या अडगळीच्या खोलीत गेले होते. तिथे धूळ झटकून खोली आवरताना एक खुर्ची सापडली ती पाहून मला माझ्या माळी काकांची आठवण झाली. परवाच ते मला विचारत होते, ताई एखादी खुर्ची असेल तर द्याल का? त्यांचे वडील आले होते गावाकडून आणि त्यांना खाली बसता येत नव्हतं. पटकन ती खुर्ची काढली झटकली आणि देण्यासाठी सज्ज केली. तेव्हाच ठरवलं अश्या वस्तू ज्या आपल्याला नको आहेत त्या आता ठेवायच्या नाहीत. ज्या चांगल्या आहेत त्या देऊन टाकायच्या. खराब झालेल्या टाकून द्यायच्या नाहीत तर भंगारात द्यायच्या.

हा विचार करत असतानाच मला असं वाटलं.. की माणूस नुसते अडगळीच्या खोलीतच अडगळ ठेवत नाही तर त्यापेक्षाही जास्त अडगळ मनात ठेवतो. ती साठवतो आणि त्याला खतपाणीही घालतो. त्या गाठोड्यात असतात अनेक गोष्टी जसे मान, अपमान,अपयश काही तुटलेली अपूर्ण राहिलेली स्वप्न, दुखावलेली दुरावलेली नाती, आपल्या मित्र मैत्रिणीशी झालेले भांडण, ते कोण मिटवणार म्हणून मनात असलेली अढी, अश्या एक ना अनेक गोष्टी. एका वर एक थर चढतच जातात, आणि नकळत त्याची अडगळीच्या खोली पेक्षाही जास्त मोठी खोली मनांत तयार होते.

तेव्हा ठरवलं घरात नको असलेल्या वस्तूंची खोलीच ठेवायची नाही. नको असलेल्या वस्तू ठेवायच्याच नाहीत, ना घरात आणि ना मनात. नको असलेल्या वस्तू देऊन मोकळं व्हायचं. सगळया गोष्टींचा कसा रोखठोक हिशोब ठेवायचा. एखाद्याची एखादी गोष्ट आवडली नाही तर तिथल्या तिथे सांगून मोकळे व्हायचे. त्याचे व्याजावर व्याज चढवायचे नाही मनांत. एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली म्हणून कुढत बसायचे नाही, धुळी सारखी झटकायची आणि पुढे जात रहायचे. अपयशाला गोंजारत बसायचे नाही तर त्याला यशाची पहिली पायरी समजून यश मिळे पर्यंत प्रयत्न करत रहायचे.

आज ह्या गोष्टी तुमच्या समोर मांडायच कारण आपण सगळेच जणं मनात खूप काही साठवून ठेवतो भूतकाळाला जास्त महत्त्व देऊन वर्तमान हरवून बसतो. तस नकरता वर्तमानात जगूया ह्या क्षणाचा आनंद घेऊया.

बघा आठवून तुम्ही शेवटचे कधी डोकावले होते मनातल्या खोलीत??

आज नक्की डोकावा नको असलेल्या साचलेल्या विचारांना काढून टाका, काही गैरसमज झाले असतिल तर त्या व्यक्तीशी बोलून दूर करा. कुढत बसू नका आणि सगळ्यात महत्वाचे विचार साठवून ठेवूच नका कोणापाशी तरी बोलून मन मोकळं करा. साठलेली धूळ आपोआपच निघून जाईल,एक स्वच्छंद, निरोगी मनाचे आयुष्य जगता येईल.

खुश रहा आनंदी जगा. ?

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – एकात्मता के वैदिक अनुबंध : संदर्भ- उत्सव, मेला और तीर्थयात्रा भाग -12 – रक्षाबंधन ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

प्रत्येक बुधवार और रविवार के सिवा प्रतिदिन श्री संजय भारद्वाज जी के विचारणीय आलेख एकात्मता के वैदिक अनुबंध : संदर्भ – उत्सव, मेला और तीर्थयात्रा   श्रृंखलाबद्ध देने का मानस है। कृपया आत्मसात कीजिये। 

? संजय दृष्टि – एकात्मता के वैदिक अनुबंध : संदर्भ- उत्सव, मेला और तीर्थयात्रा भाग – 12 – रक्षाबंधन ??

भाई-बहन के सम्बन्धों का उत्सव मनाने वाला रक्षाबंधन संभवत: विश्व का एकमात्र पर्व है। इस पर्व में बहन, भाई को राखी बांधती है। पुरुष भी परस्पर राखी बांधते हैं। पुरोहित द्वारा भी राखी बांधी जाती है। अनेक स्थानों पर वृक्षों को भी राखी बांधी जाती है। ‘भविष्यपुराण’ के अनुसार इंद्राणी द्वारा निर्मित रक्षा सूत्र को देवगुरु बृहस्पति ने इंद्र के हाथों बांधते हुए स्वस्तिवाचन किया था।  रक्षासूत्र का मंत्र है-

येन बद्धो बलि राजा, दानवेन्द्रो महाबल:

तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल:।

इस मंत्र का सामान्यत: यह अर्थ लिया जाता है कि दानवीर महाबली राजा बलि जिससे बांधे गए थे,(धर्म में प्रयुक्त किए गये थे)  उसी से तुम्हें बांधता हूं। ( प्रतिबद्ध करता हूँ)।  हे रक्षे!(रक्षासूत्र) तुम चलायमान न हो, चलायमान न हो। चलायमान न होने का अर्थ स्थिर अथवा अडिग रहने से है।

प्रकृति के विभिन्न घटकों, समाज के विभिन्न वर्गों को रक्षासूत्र बांधना/ उनसे बंधवाना राष्ट्रीय एकात्मता का प्रदीप्त और चैतन्य है। भारतीय समाज को खंडित भाव से खंड-खंड निहारने वाली आँखों के लिए यह अखंड भाव का अंजन है।

एक विचारप्रवाह है कि वैदिक काल से  रक्षाबंधन रक्षासूत्र एवं प्रतिबद्धता का उत्सव रहा। विदेशी आक्रमणकारियों के भारत में प्रवेश के पश्चात स्थितियाँ बदलीं। आक्रांताओं से  अपनी अस्मिता की रक्षा के लिए कन्याएँ, भाई को रक्षासूत्र बांधने लगीं। सहोदर की समृद्धि वह सुरक्षा के लिए कार्तिक शुक्ल द्वितीया को मनाया जाने वाला भाईदूज या यमद्वितीया का त्योहार भी इसी शृंखला की एक कड़ी है।

क्रमश: ….

©  संजय भारद्वाज

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares