मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाई ग… लेखिका : सुचरिता ☆ प्रस्तुती – स्वाती मंत्री ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ बाई ग… लेखिका : सुचरिता ☆ प्रस्तुती – स्वाती मंत्री ☆

जो दिवस साजरा करण्याची मुळात वेळच येता कामा नये

ज्यासाठी अभिनंदन, शुभेच्छा, कार्यक्रम, विकृत विनोद,  सण-समारंभ, भाषणं, सत्कार, व्याख्यान इत्यादी सोहळ्याची गरजच उरता नये

मनातून नष्ट न होणाऱ्या असमानतेच्या एकदिवसीय टोचणीदिनाचं अस्तित्वच असता नये

या तात्पुरत्या शिराळशेठी दिवसाचं काय करायचं, हे नुमजून हळदीकुंकू गजरा-कजरा,साडी,दागिने वगैरे करणाऱ्या स्त्रियांची कीव करावी लागू नये

ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्या अंधाऱ्या कपारीपर्यंत पोचताना स्वातंत्रसूर्याची वेळ संपून अवेळी संध्याकाळ होऊ नये

पन्नास टक्यांतील काही टक्क्यांना काही प्रमाणात जोखडातून मुक्तता मिळाली म्हणजे घोडं गंगेत न्हालं असं ठाम विधान प्रचलित होऊ नये

थेट गर्भापासून तिरडीपर्यंत सर्व स्थितीत विकल्या जाणाऱ्या देहांचं बाजारअस्तित्व अमान्य करण्याचं झापडबंद सुखासीन आंधळेपण तुला येऊ नये

एक दिवस वगळता उरलेले तीनशे चौसष्ठ दिवस ज्यांचे आहेत त्यातले शंभर टक्के सगळेजण खलनायकच असतात, असा उलटा एकेरी भ्रम उराशी धरण्याचा मंदपणा तुझ्यात  असू नये

म्हणून

तू

लवकरात

लवकर

शहाणी

हो

त्यासाठी

विचार

करायला

सुरुवात

कर

हाच

एक

उपाय

आहे

लेखिका:सुचरिता

प्रस्तुती: स्वाती मंत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ जागतिक कविता दिन विशेष – मानसउत्सव… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

📚 क्षण सृजनाचा 📚

☆ जागतिक कविता दिन विशेष – मानसउत्सव… ☆ श्री सुनील देशपांडे 

(२१ मार्च जागतिक काव्य दिनाच्या निमित्ताने)

सध्याचा पुणेकर असलेला मी अंतर्मनाने मूळ कविता प्रेमी नाशिककर.

दरवर्षी २८ फेब्रुवारी कुसुमाग्रज जयंती हा मराठी दिन, परंतु विशेषतः ‘मराठी कविता दिन’ म्हणून माझ्या मनात कायम घर करून राहिलेला आहेच. १० मार्च हा कुसुमाग्रजांचा स्मृतिदिन. त्यामुळे नाशिक मध्ये असताना २८ फेब्रुवारी ते १० मार्च हा मराठी उत्सव म्हणून आम्ही साजरा करत असू. 

खरं म्हणजे कवितेचे प्रेम निर्माण करणारी पहिली कविता कुसुमाग्रज उर्फ आमचे लाडके तात्या यांची… 

‘उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले’ तेव्हापासून वेगवेगळ्या वयामध्ये पाठ्यपुस्तकातून तसेच कवी संमेलनातून त्यांच्या अनेक कवितांनी वेड लावले. अगदी ‘स्वातंत्र्यदेवतेच्या विनवणी’ पर्यंतच्या लोकप्रिय कवितांना रोजच वंदन करावेसे वाटते. 

सध्या शारीरिक कारणामुळे फारसे बाहेर पडू शकत नसलो तरी २८ फेब्रुवारी ते १० मार्च या दिवसात मनातून हा ‘मानसउत्सव’ मी साजरा करतच असतो. आणि काव्य प्रेमामुळे त्यानंतरही वेगवेगळ्या विविध दिवशी कवितेचे ‘मानसउत्सव’ साजरे करण्याची माझी प्रथा खालील दिवशी मनापासून चालूच असते. रसिकांच्या माहितीसाठी हे  दिवस सादर करीत आहे.

१) २१ मार्च : आंतरराष्ट्रीय कविता दिन किंवा जागतिक कविता दिन :

१९४५ मध्ये स्थापन झालेल्या युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन अर्थात युनेस्को या संस्थेने काव्य अभिव्यक्तीद्वारे भाषिक विविधतेला पाठिंबा देण्याच्या आणि लुप्त होत असलेल्या भाषांना ऐकण्याची संधी वाढवण्याच्या उद्देशाने २१ मार्च हा जागतिक काव्य दिन म्हणून १९९९ मध्ये प्रथम स्वीकारला आणि त्यानंतर संपूर्ण जगामध्ये विविध भाषांमध्ये २१ मार्च हा दिवस जागतिक काव्य दिन म्हणून साजरा केला जातो.

२) २८ एप्रिल: राष्ट्रीय महान कविता दिन. 

भूतकाळात होऊन गेलेल्या खूप मोठ्या आणि महान कवींच्या कविता आठवणे त्यांचे पठण करणे मनन करणे आणि अशा कवींच्या काव्यवाचनाचे कार्यक्रम करणे यासाठी राष्ट्रीय महान कविता दिन साजरा केला जातो. 

३) ३० एप्रिल

अमेरिकेमध्ये ‘पोएम इन युअर पॉकेट डे’ म्हणजेच तुमच्या खिशातली कविता. असा एक अभिनव दिवस साजरा केला जातो. लघु कविता, छोट्या कविता, चारोळ्या, पाचोळ्या, रुबाई, शायरी वगैरे  पद्धतीच्या कविता अशा प्रकारच्या कवितांना उठाव येण्यासाठी आणि अशा प्रकारच्या कविता सध्या अमेरिकेमध्ये खूपच लोकप्रिय असून भारतात सुद्धा सध्या अशा प्रकारच्या कविता अत्यंत लोकप्रिय होत आहेत. अशा कवितांसाठी अनेक लोकप्रिय कवीं मार्फत हा दिवस साजरा केला जातो.

४) ७ मे : कविवर्य रवींद्रनाथ टागोर जयंती 

हा दिवस सहसा संगीतकविता किंवा उत्तम अशा वृत्तबद्ध कविता किंवा संगीतिका अशा पद्धतीच्या काव्य अविष्काराने साजरा करण्याची पद्धत आहे. विशेषतः बंगाली साहित्यिकांमध्ये हा दिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भारतातही काव्यप्रेमी व्यक्ती या दिवशी विविध प्रकारचे उत्तम संगीतमय काव्याचे व संगीतीय कविता अथवा काव्यगायन, संगीत नृत्य गायन अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या आयोजनाने हा दिवस साजरा केला जातो.

५) आषाढ शुद्ध प्रतिपदा 

(हा दिवस साधारणपणे जुलै महिन्यात येतो)

आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा संस्कृत भाषेतील महान कवी व नाटककार कवी कुलगुरू कालिदास यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा होतो. याला ‘महाकवी कालिदास दिन’ किंवा ‘कवि कुलगुरू कालिदास दिन’ म्हणतात. महान कवि कालिदास यांच्या मेघदूत या महान काव्याचा निर्मिती दिवस मानला जातो. हा दिवस कालिदास जयंती दिन म्हणूनही समजला जातो. या दिवशी विविध कवी संमेलने व कवितांचे उत्सव साजरे करण्याचा प्रघात आहे. वर्षा ऋतू मधील हा काव्योत्सव. पाऊस अर्थात वर्षा ऋतू हा काव्य भावना जागृत करणारा काव्यात्मक वातावरण निर्माण करणारा ऋतू म्हणून समजला जातो. यामुळेच कवी मंडळींचा सगळ्यात आवडता दिवस त्यांच्या सगळ्यात आवडत्या ऋतूमध्ये म्हणजेच सिझनमध्ये येणारा हा स्फूर्तीदायक दिवस.

६) २१ ऑगस्ट : राष्ट्रीय कवी दिवस 

हा दिवस कवींच्या सन्मानासाठी साजरा केला जातो. कवितांमधून सामाजिक जागृती आणि सामाजिक संस्कार करणाऱ्या प्रसिद्ध कवींचा त्यादिवशी सन्मान केला जातो. त्यांच्या कवितांचे कार्यक्रम. विविध काव्य स्पर्धा व उत्कृष्ट कविता पारितोषिके देऊन अशा विविध पद्धतीने राष्ट्रीय कवी दिवस साजरा केला जातो. हा दिवस कवींचा दिवस म्हणून साजरा केला जातो. 

७) ऑक्टोबर महिन्याचा पहिला गुरुवार: राष्ट्रीय कविता दिन

एका सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे की ८ ते १६ वर्षा दरम्यान शिक्षण घेणारी पिढी कवितेवर मनापासून प्रेम करते. सर्वसाधारणपणे या वयोगटातील ४८.८% विद्यार्थी कविता प्रेमी असतात. अशा नव्या पिढीतील उदयोन्मुख कवींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यातील कवी गुणांना उजाळा देण्यासाठी राष्ट्रीय कविता दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आहे. प्रथमत: हा दिवस इंग्लंडमध्ये राष्ट्रीय कविता दिन म्हणून साजरा होत असे. त्यावेळी अनेक देश ब्रिटिश राजसत्ते खाली असल्यामुळे त्या देशांमध्ये हा दिवस साजरा करण्याची पद्धत सुरू झाली. विशेषतः प्रसिद्ध कवींनी नवीन पिढीतील कवींचे काव्यविश्वात स्वागत करून त्यांच्या मनात कवितेविषयी प्रेम जिव्हाळा व नवीन पिढीच्या काव्य कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणे हे उद्दिष्ट या दिवसाचे असते. नव्या पिढीतील काव्य कल्पनांना जुन्या पिढीतील कवींनी केलेला सलाम म्हणजे राष्ट्रीय कविता दिन.

८) अश्विन पौर्णिमा (कोजागिरी पौर्णिमा) : महर्षी वाल्मिकी जयंती 

(हा दिवस साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये येतो)

महर्षी वाल्मिकी यांना आद्यकवी मानले जाते. या विश्वातील पहिली कविता ज्यांना स्फुरली ते महर्षी वाल्मिकी. म्हणून त्यांना कवितेचे जन्मदाते संबोधले जाते. महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती दिनी कवितेच्या निर्मात्याचा जन्मदिवस म्हणून अनेक ठिकाणी कवितांचे कार्यक्रम आणि कवींचा सन्मान अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या दिवशी स्वच्छ चांदण्यामध्ये सहसा रात्रीच्या वेळी काव्य रंगात रंगून जाणे आणि केशरी दुधा बरोबर काव्याचा आस्वाद घेणे हा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम सगळीकडे भारत देशामध्ये साजरा केला जातो. सर्व अबालवृद्ध स्त्री पुरुष मध्यरात्री नंतर पर्यंत सुद्धा या कार्यक्रमामध्ये रंगून जातात.

असे हे मला ज्ञात असणारे वर्षातील विविध पद्धतीने साजरे होणारे कवितांचे दिवस. या दिवसांच्या आठवाच्या निमित्ताने माझी एक कागदावर न उठलेली कविता .. कल्पनेमध्येच लपून असलेली कविता..  त्या कवितेबद्दलची ही कविता रसिकांच्या चरणी अर्पण…

****

☆ नवीन कविता… ☆ श्री सुनील देशपांडे 

सुचते आहे मनात का ही नविन कविता

रुजते आहे बीज घेउनी नवीन कविता. 

*

या बीजातुन नवीन कांही फुटते आहे,

या बीजातुन खरेच येईल नवीन कविता ?

*

मनात माझ्या जे जे आहे व्यक्त व्हायचे,

घेऊन येईल का ते सारे नवीन कविता ?

*

नाविन्याचे कपडे लेऊन जुनीच येईल, किंवा

दिव्य देहिनी असेल का ती नवीन कविता ?

*

संचित प्रश्नांचे जे जाळे मनात माझ्या,

सोडवील का गुंता थोडा नवीन कविता ?

*

गुंता माझ्या मनातला ती सोडवील जर,

मुक्ती देईल मलाच माझी नवीन कविता.

*
ज्या मुक्तीची वाट आजवर पहातो आहे,

त्या मुक्तीची वाट दाखविल नवीन कविता.

 — श्री सुनील देशपांडे

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “खासियत जुन्या मैत्रीची…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “खासियत जुन्या मैत्रीची” ☆ श्री सुधीर करंदीकर

शाळा / कॉलेज सोडून बरीच वर्ष सरतात. तेव्हाच्या बऱ्याच मित्र / मैत्रिणींचे आपल्याकडे मोबाईल नंबर नसतात त्यामुळे कधी बोलणे नसते आणि भेट पण नसते. त्यातल्या कुणाची अचानक ५० वर्षांनंतर अचानक भेट व्हावी, आणि नुसती नजरानजर होताच त्यांनी एकमेकांना नावासकट ओळखावे, हे शक्यच नाही, असेच सगळे म्हणतील. कारण चेहेऱ्यात बदल झालेला असतो, डोक्याचे केस पांढरे झालेले असतात, माणसांना टक्कल पडलेले असते, आवाजात बदल झालेला असतो, वगैरे वगैरे. पण जुन्या मैत्रीत जर काही खासियत असेल, तर मात्र अशक्य वाटणाऱ्या गोष्टी पण शक्य होतात. यावरचा माझा अनुभव वाचायला आवडेल.

– – – – –  

नेहमीप्रमाणे आज सकाळी ८ वाजता एकटाच फिरायला बाहेर पडलो. कोथरुडजवळ मृत्युंजय मंदिरासमोरून फुटपाथवरून जात होतो. अधून मधून इथे भेटणाऱ्या मैत्रिणी मनवा आणि मेघना यांची आठवण झाली. त्या परदेशी गेल्या असल्यामुळे त्यांची भेट होणार नव्हतीच. चहाच्या टपरी जवळ आलो, चहावाल्यांना हात केला, आणि पुढे निघालो. समोरून एक मॅडम येत होत्या.

यांना केंव्हातरी खूप जवळून बघितलंय असं जाणवलं. मॅडम ना पण तसंच वाटलं असावं, असे त्यांच्या चेहऱ्यावर भाव दिसले. एकमेकांकडे बघत बघत आम्ही एकमेकांना क्रॉस झालो. दोघं थोडं पुढे गेलो, आणि दोघांनी एकदमच मागे वळून बघितलं. खूप जवळची ओळख आहे असं दोघांनाही जाणवलं.

आणि गंमत म्हणजे आम्ही दोघेही उलटं म्हणजे मागे मागे चालायला लागलो. चालत चालत शेजारी शेजारी आलो आणि हसत हसत आपोआपच एकमेकांशी हात मिळवणी झाली.

आणि दोघे एकदमच म्हणालो

मॅडम : अरे, सुधीर तू…

मी : अरे, छाया तू…

(आम्हाला रस्त्यावर उलटं चालताना बघून जाणारे येणारे पण जरा थबकलेच की हा काय प्रकार आहे.)

दोघे एकदम : ग्रेट सरप्राईज. कॉलेज सोडल्यानंतर म्हणजे ५० वर्षानंतर आज अचानक भेट.

छाया : सुधीर, तुझा एकदम सेम स्मायलींग फेस. नो चेंज

मी : छाया तुझा पण तोच आनंदी चेहरा, नो चेंज

दोघेही : आणि तेच उलटं चालणं. आणि म्हणून तर एकदम ओळखू शकलो ५० नाही ५२ वर्षांनंतर

जुन्या आठवणी आणि गप्पा सुरू होत्या, एवढ्यात बाजूला असलेल्या चहाच्या टपरी चे मालक आले आणि

म्हणाले : दादा, चहा इथेच आणून देऊ, का, दुकानात येऊन घेणार.

मस्त चहा झाला. ५२ वर्षात भेट तर नाहीच आणि एकमेकांचे मोबाईल नंबर माहित नसल्यामुळे कधी फोनवर बोलणे पण नव्हते. भरपूर जुन्या जुन्या म्हणजे कॉलेजमधे ५ वर्ष बरोबर होतो त्या वेळच्या गप्पा सुरू झाल्या. किती वेळ बोलत होतो, हे समजलंच नाही. चहावाले सांगायला आले, दादा ऊन वाढतंय, दुकानासमोर सावलीत खुर्चीवर बसून गप्पा मारा.

दोघंही भूतकाळातून वर्तमान काळात आलो.

पुन्हा असंच भेटायचं ठरलं आणि इथेच भेटायचं ठरलं.

बाय-बाय झालं आणि जुन्या आठवणीं मध्ये रमत रमत आपापल्या मार्गाला लागलो.

घरी गेल्यानंतर ही आगळी वेगळी भेट कॉलेजच्या ग्रुपवर सविस्तर टाकली. आणि माझी पोस्ट वाचून एका कॉलेज मित्राचा मेसेज आला –

तुझी आणि छायाची इतक्या वर्षानंतर अचानकपणे भेट होणे / गप्पा होणे आणि ते पण रस्त्यावरती सहज फिरता फिरता, म्हणजे आश्चर्यच आहे. तू लिहिलेली घटना वाचता वाचता मी पण कॉलेज डेज मधल्या भूतकाळात गेलो. मला चांगलं आठवतंय, कुठलाही पिरियेड संपला, आणि पुढच्या पिरेडला वेळ असला, तर सगळे मुलं मुली क्लास बाहेरच्या मोठ्या पॅसेजमध्ये गप्पा मारत उभे असायचे, काहीजण क्लास रूम मध्ये अभ्यासाचे वाचत असायचे. तू आणि छाया मात्र अशा वेळेस कायम पॅसेज मध्ये उलटे चालत चालत गप्पा मारत असायचे. मला आठवतं पूर्ण कॉलेजमध्ये उलटे चालत गप्पा मारणे ही तुमची खासियत होती.

आज पण तुम्ही दोघांनी उलटे चालून तेच दोघेजण आहात ही खात्री मात्र मस्त करून घेतली. नाहीतर कुणीही दोघांची बऱ्याच वर्षानंतर अचानक भेट होते तेव्हा त्यांचे बोलणे साधारण असे असते –

तुम्ही सुधीर करंदीकर ना! किंवा तुमचं नाव अमुक अमुक आहे ना! तुम्ही भोपाळच्या कॉलेजमध्ये होता ना! अशी सुरुवात होते.

आणि तुमची ५२ वर्षानंतर भेट झाली तेव्हा, डायरेक्ट ओळख पटल्यासारखेच, सुधीर तू … छाया तू… अशी सुरुवात झाली. ग्रेट, सिंपली ग्रेट.

मी पण तिथे असतो तर मजा आली असती. बहूदा गप्पा मारता मारता संध्याकाळ झाली असती. आणि चहा वाल्यानी पुढच्या चहाबरोबर ब्रेड पण दिली असती.

भेटत रहा, मजा करा, जुन्या आठवणी कळवत चला…

बाय-बाय.

दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या मित्रांचा व्हाट्सअप वर ग्रुप मिटिंग कॉल आला – माझ्या आणि छायाच्या अचानक भेटीचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होते. आणि ५२ वर्षांनंतर आम्ही एकमेकांना एका क्षणात ओळखले यावर आधी कुणाचाच विश्वास बसत नव्हता. पण कॉलेजच्या आम्ही काय काय गप्पा मारल्या, ते सांगितल्यावर सगळ्यांची खात्री पटली. एक जण म्हणाला मला जरा छाया चा मोबाईल नंबर दे. फोन लावून बघतो ओळखते का मला पण! आणि जरा कॉलेजच्या गप्पा मारू. मज्जा येईल.

मी म्हटलं देतो देतो, आणि लक्षात आलं, काल गप्पांच्या ओघामध्ये, आपण छायाला ती पुण्यात कुठे राहते, पास आउट झाल्यानंतर कुठे नोकरी केली, इथे घरी कोण कोण असतं, आणि मुख्य म्हणजे तिचा मोबाईल नंबर काय आहे, हे सगळेच विचारायला विसरलो होतो.

मित्रांचा आधी विश्वास बसला नाही. पण नंतर त्यांना पटलं की इतक्या वर्षांनंतर जुन्या गप्पां मध्ये रंगल्या नंतर असे होऊ शकते.

आता असेच सकाळी फिरताना छाया कधी भेटते, तिच्याबरोबर रस्त्यावर उलटे कधी चालतो, याच्या मी प्रतिक्षेत आहे.

भेट होणार हे नक्की आणि ती पण मृत्युंजय मंदिराच्या समोरच हे पण शंभर टक्के पक्के.

ही माझी गोष्ट वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये पण तुमच्या शाळेतल्या / कॉलेजमधल्या मैत्रिणीं बरोबरच्या / मित्रांबरोबरच्या आठवणी जाग्या होतील, आणि त्या आठवणींमध्ये तुम्हाला छान रमता येईल, कदाचित माझ्यासारखी अशी अनपेक्षित भेट पण होईल, हे नक्की.

चलो, बाय बाय ….

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज… – ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

??

☆ आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज…  ☆ राधिका भांडारकर ☆

आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज

यांना सविनय दंडवत..

राजा कसा असावा? हा प्रश्न जगात कुणालाही विचारला तर त्याचे उत्तर एकच, ”राजा असावा तर शिवाजी सारखा”.

महाराज! नुसत्या आपल्या नामोच्चाराने आम्ही रोमांचित होतो! शिवरायासारखा एक जाणता राजा या देशात, महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला, आणि त्याने कधीही विसर न पडणाऱ्या पराक्रमाचा, संस्काराचा, नैतिकतेचा, महान इतिहास घडवला, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहेच.

व्हिएतनाम आणि अमेरिकेत वीस वर्षे युद्ध चालले. अमेरिकेला वाटत होते की या देशाला नष्ट करण्यासाठी अगदीच थोडा वेळ लागेल. पण युद्ध लांबले. अमेरिकेस माघार घ्यावी लागली. व्हीएतनामचा विजय झाला. त्यानंतर पत्रकारांनी त्यांच्या राष्ट्रपतींना त्यांच्या विजयाचे रहस्य विचारले असता, ते उत्तरले,

“युद्धकाळात हिंदुस्थानातील एका शूर राजाचे चरित्र माझ्या हाती आले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच आम्ही युद्धनीती ठरवली. आणि ती ठामपणे राबवली. आणि आम्ही विजयी झालो. ”

पत्रकारांनी विचारले, “तो हिंदुस्थानी राजा कोण? ”

राष्ट्रपती उत्तरले, छत्रपती शिवाजी महाराज. हा महापुरुष आमच्या देशात जन्माला आला असता तर आज आम्ही जगावर राज्य केले असते. ”

याच राष्ट्रपतींनी स्वतःच्या मृत्यूपूर्वी आपली अंतिम इच्छा लिहून ठेवली होती की,

“माझ्या समाधीवर खालील वाक्य लिहिले जावे”

“छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा समाधीस्थ झाला! ”– — आणि आजही त्यांच्या कबरीवर हे वाक्य वाचायला मिळते.

महाराज असे तुम्ही! जगाचे आदर्श राजे. आपल्याबद्दल म्या पामराने काय आणि किती बोलावे?

शिव म्हणजे पावित्र्य, मांगल्य, सौंदर्य आणि शक्तीही. आपल्या नावानेच आमचे हृदय उचंबळते.

पण महाराज आज या पत्राच्या निमित्ताने, एक खेदही व्यक्त करावसा वाटतोय्. आज कुठेतरी आपल्या ऐतिहासिक नावाचा, आदर्शाचा, पराक्रमाचा केवळ दुरुपयोग केला जातोय. स्वार्थी माणसे निमित्त साधून भांडणे, दंगली माजवतात. झुरळ मारायची ही शक्ती नसलेली ही माणसे, केवळ मतांसाठी छाती फुगवून, “आम्ही शिवरायांचे वंशज आहोत! ” अशा आरोळ्या ठोकतात. याचे प्रचंड दुःख होते. मान खाली जाते. लाज वाटते.

महाराज! या अशा रणछोडदासांसाठी मी आपली नम्रपणे क्षमा मागते. आणि यांना सद्बुद्धी दे अशी प्रार्थना ही करते. शिवाजीचे वंशज म्हणून त्यांना खरोखरच अभिमान असेल तर त्यांनी शिवचरित्राचा सखोल अभ्यास करावा. लोकनेता कसा असावा याचे ज्ञान मिळवावे.

आपली,

प्रयत्नपूर्वक आपले आदर्श जपणारी कुणी एक…

©  राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १३ आणि १४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १३ आणि १४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक १३ वा – –

मना सांग पां रावणा काय जाले।

अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥

म्हणोनी कुडी वासना सांडी वेगीं।

बळे लागला काळ हा पाठिलागी॥१३॥

अर्थ: हे मना, महापराक्रमी अशा रावणाचा अंत कसा झाला या गोष्टीचा विचार कर. त्याला कल्पनाही नसताना त्याच्या राज्याचा संपूर्णपणे नाश झाला. म्हणून वाईट वासना सोडून दे. कारण सर्व शक्तिमान असा काळ सर्वांच्याच पाठीमागे लागलेला आहे.

आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला “विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी” असे सांगतात. विवेक हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. माणसाजवळ ज्ञान, संपत्ती, सत्ता, ऐश्वर्य सर्व काही असेल परंतु विवेकाची उणीव असेल तर त्याचे जीवन व्यर्थ जाते. जीवनात सारासार बुद्धीचा म्हणजेच विवेकाचा वापर करून वागले पाहिजे. रावण शक्तिमान होता. देवांनाही त्याने बंदी बनवले होते. तो वेदांचा जाणकार होता परंतु त्याच्या मनातील दुष्ट वासनांनी त्याचा घात केला. परस्त्रीच्या मोहाने त्याने सीतेसरख्या पतिव्रतेला पळवून आणले. त्याचे हे दुष्कृत्य त्याची पत्नी मंदोदरी, त्याचा भाऊ बिभीषण आणि दरबारातील गुरुजनांना आवडले नाही. त्यांनी त्याला वेळोवेळी सीतेला सन्मानाने परत पाठव असे सांगितले. परंतु मदांध आणि वासनांध रावणाला ते पटले नाही. त्यामुळे फक्त त्याचाच नाही तर त्याच्या संपूर्ण राज्याचा विनाश झाला.

पुत्रमोह आणि सत्तेचा लोभ यामुळे अंध झालेल्या धृतराष्ट्राने आपला पुत्र दुर्योधन, दुःशासन इ. च्या दुष्कृत्यांचा विरोध न करता त्यांना मूक संमतीच दिली. दुर्योधनाने सुद्धा पांडवांची पत्नी असलेल्या द्रौपदीची अभिलाषा धरली होती. त्यामुळे कौरवांचा संपूर्णपणे नि:पात झाला. महाभारतात एका प्रसंगी दुर्योधन बोलताना असे म्हणतो की चांगले काय आणि वाईट काय हे मला कळते. परंतु मला चांगले वागण्याची बुद्धीच होत नाही. याचाच अर्थ दुर्योधन आपल्या मनातील वाईट विचारांचा, वासनांचा त्याग करू शकला नाही विवेकाने वागू शकला नाही. “म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी” असे समर्थ म्हणूनच म्हणतात.

या रामायण महाभारतातील उदाहरणाव्यतिरिक्त इतिहासात आणि वर्तमानात देखील वाईट वासना मनात ठेवून वागल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्याचा विनाश झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अनेक राजे आणि राज्यांचा नाश झाला आहे. अनितीने वागल्यामुळेच अनेक व्यक्तींनी स्वतःचा विनाश ओढवून घेतला आहे. काळ हा सर्वशक्तिमान आहे. त्याची सर्वांवर सत्ता चालते. जन्मलेल्या व्यक्तीला मृत्यू निश्चित असतो परंतु तो केव्हा येईल हे सांगता येत नाही. म्हणून वेळीच सावध होणे गरजेचे. तीच जाणीव आपल्याला समर्थ या ठिकाणी करून देतात. ” पापाची वासना नको दावू डोळा “असे संत तुकाराम महाराज देखील आपल्याला सांगतात ते यामुळेच.

महाभारतात यक्ष आणि युधिष्ठिर यांचा एक संवाद याबाबतीत अतिशय समर्पक असा आहे. ” या जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य कोणते? “असा प्रश्न यक्ष युधिष्ठिराला विचारतो. त्यावर युधिष्ठिराने दिलेले उत्तर मोठे छान आहे. तो म्हणतो, ” जन्मलेल्याला मृत्यू निश्चित आहे परंतु तरीही त्याचे भान व्यक्तीला नसते. आपण अमर आहोत असेच सगळे वागत असतात. हेच या जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य आहे. “

या सगळ्या इतिहासातील उदाहरणांवरून आपण काहीतरी बोध घ्यायचा असतो. इतिहास हा केवळ वाचण्यासाठी नव्हे तर त्यापासून शिकण्यासाठी असतो. पुढच्या ठेच मागचा शहाणा असे आपण म्हणतो ते याच अर्थाने! आपले आयुष्य मर्यादित असते. म्हणून मृत्यूचे भान ठेवून प्रत्येकाने वाईट वासनांचा त्याग केला पाहिजे आणि आपल्या आयुष्यात सत्कर्मांना स्थान दिले पाहिजे असेच समर्थांचे सांगणे आहे. आणि हे जेवढ्या लवकर लक्षात येईल तेवढे चांगले!

स्वसंवाद :

  • माझ्या मनात अजूनही कोणत्या वाईट वासनांचे बीज दडलेले आहे का?
  • रावण किंवा दुर्योधन यांच्या कथांमधून मी खरोखर काही बोध घेतो का?
  • सत्ता, अहंकार किंवा मोह यामुळे माझ्या विवेकावर पडदा तर पडत नाही ना?
  • जीवन क्षणभंगुर आहे ही जाणीव ठेवून मी माझा वर्तमान अधिक सजगपणे जगतो का?
  • माझ्या आयुष्यात सत्कर्मांची वाढ आणि दुष्प्रवृत्तींचा त्याग करण्यासाठी मी सजग प्रयत्न करतो का?

श्लोक १४ वा 

जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला ।

परी शेवटीं काळमुखीं निमाला ॥

महाथोर ते मृत्युपंथेचि गेले ।

कितीएक ते जन्मले आणि मेले ॥१४॥

अर्थ :

आपल्या पूर्वसंचित कर्मांमुळे आपल्याला हा मनुष्यजन्म प्राप्त होतो. हा जन्म खरोखरच दुर्लभ आहे; परंतु असे असले तरी मृत्यू कोणालाही चुकलेला नाही. म्हणून हे मना, विचार कर – या जगात अनेक महापुरुष होऊन गेले; परंतु त्यांनाही मृत्युपंथाची वाट धरावीच लागली. सर्वसामान्य माणसे तर किती जन्मली आणि मेली याची गणतीच नाही.

या श्लोकातून समर्थ रामदास स्वामी मानवी जीवनाचे एक अटळ सत्य सांगतात. मागील श्लोकात त्यांनी “बळे लागला काळ हा पाठिलागी” असे म्हटले आहे. त्याच विचाराची अधिक स्पष्ट मांडणी येथे दिसते. मनुष्यजन्म दुर्लभ असला तरी मृत्यू हा त्याचा अविभाज्य भाग आहे.

राम, कृष्ण, संत ज्ञानेश्वर यांसारखे महान पुरुष या पृथ्वीवर होऊन गेले; पण त्यांनाही एक दिवस मृत्युपंथाचा स्वीकार करावाच लागला. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात – “जे जे उपजे ते नाशे”. म्हणजेच जे निर्माण होते ते नाश पावतेच. जन्म आणि मृत्यूचे हे चक्र अखंड चालूच असते.

निसर्गातही हेच दिसते. झाडावरील पिकलेली पाने गळून पडतात आणि त्यानंतरच नव्या पालवीला जागा मिळते. थोडक्यात सांगायचे तर नवनिर्मितीसाठी जुन्याचा निरोप आवश्यक असतो. मृत्यू ही देखील निसर्गाच्या या नित्यचक्रातील एक महत्त्वाची क्रिया आहे.

जन्म आणि मृत्यू या जणू एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. जीवनाला कंटाळलेले वृद्ध किंवा असाध्य रोगांनी त्रस्त झालेले काही जण मृत्यूला वरदान मानतात. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे मनुष्य जुने झालेले वस्त्र टाकून देऊन नवीन वस्त्र धारण करतो; त्याप्रमाणे आत्मा जर्जर देह सोडून नवीन शरीर धारण करतो. त्यामुळे मृत्यू हा अंत नसून नव्या प्रवासाची सुरुवात आहे असेही म्हणता येईल.

तरीसुद्धा माणसाच्या मनात मृत्यूचे भय असते. कारण देहाशी असलेली आसक्ती फार प्रबळ असते. परंतु काळापुढे सर्व समान असतात. लहान-थोर, स्त्री-पुरुष, राजा-रंक असा कोणताही भेद काळ करत नाही. म्हणूनच समर्थ “परी शेवटीं काळमुखीं निमाला” असे अत्यंत नेमके शब्द वापरतात.

राम, कृष्ण किंवा संत ज्ञानेश्वर यांसारख्या महान विभूतींनी आपले अवतारकार्य पूर्ण करून देह ठेवला. त्यांच्यासारख्या महापुरुषांचेही जीवन मर्यादित होते. मग सामान्य माणसांचे जीवन किती क्षणभंगुर आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे.

आपल्याला हा जन्म पूर्वसंचितानुसार मिळतो. आपल्या मनातील वासना पूर्ण करण्यासाठी आणि कर्मफळे भोगण्यासाठी आपण जन्म घेतो असे सांगितले जाते. चांगल्या कर्मांचे चांगले फळ मिळते, तर वाईट कर्मांचे दुष्परिणाम भोगावे लागतात. भोग संपेपर्यंत जीवनयात्रा सुरूच राहते.

म्हणूनच समर्थ आपल्याला सूचित करतात की या दुर्लभ मनुष्यजन्माचे महत्त्व ओळखावे. प्रपंच करत असतानाही परमार्थाचा मार्ग धरावा. जीवनाचा उपयोग सत्कर्मांसाठी आणि आत्मोन्नतीसाठी करावा.

स्वसंवाद :

  • माझ्या जीवनाचे अंतिम ध्येय काय आहे याचा मी कधी गंभीरपणे विचार केला आहे का?
  • मृत्यू अटळ आहे ही जाणीव ठेवून मी माझे वर्तमान अधिक अर्थपूर्ण जगतो का?
  • हा दुर्लभ मनुष्यजन्म मला काही चांगले करण्यासाठी मिळाला आहे का, याचा मी कधी विचार करतो का?
  • प्रपंच करत असतानाही परमार्थ साधण्यासाठी मी काही प्रयत्न करतो आहे का?

– क्रमशः श्लोक १३ आणि १४.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ऑपरेशन ‘लोकटक विजय’” – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “ऑपरेशन ‘लोकटक विजय’” – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके

ब्रिगेडीअर श्री. सौरभ सिंग शेखावत (Retd.)

(मग पुढील काही दिवस canoe चालवून सराव केला गेला… यात हलत्या नावांत उभे राहून गोळीबार करण्याच्या सरावाचाही समावेश होताच. गरज पडेल तेंव्हा या canoe पाण्यात पालथ्या करून त्या पालथ्या झालेल्या canoeवर बंदुका टेकवून, पाण्यात तरंगत राहातही निशाणेबाजीचा सराव झाला! या प्रयत्नांत हत्यारे पाण्यात पडत, बुडून तळाशी जात. मग आपले पाणबुडे सैनिक ही हत्यारे शोधून परत आणीत. असे वीस पंचवीस दिवस झाल्यावर एकेदिवशी ‘टार्गेट’ (लक्ष्य)च्या किती जवळ जाता येईल याची चाचणी झाली… यशस्वी चाचणी झाली! ) 

इथून पुढे – –

दिवस… नव्हे रात्र निश्चित झाली… हल्ला करण्याची! केवळ बारा सैनिक, तीन नावा… एका नावेत मोहिमेचे नेतृत्व करणारे अधिकारी आणि इतर दोन नावांत सहा-सहा सैनिक. सैनिकांना बुलेट प्रुफ जाकेटस घालून चालणार नव्हते… कारण जर पाण्यात पडावे लागले तर वजनाने बुडण्याची शक्यता अधिक होती. अतिरेकी असलेल्या फुमदीपासून अगदी सुरक्षित अंतरावर आणखी नावांनी वेढा घातला… अतिरेकी तेथून निसटले तर ते तावडीत सापडावेत म्हणून ही योजना होती. पण यामध्ये काही झाले असते तर वेढा गोलाकार असल्याने आपला गोळीबार आपल्याच सैनिकांसाठी धोकादायक ठरू शकला असता. पण हा धोका पत्करण्याशिवाय गत्यंतर नव्हतेच. अर्थात याचाही सराव झाला होताच!

जे टार्गेट होते, त्याच्या अगदी समोर गवताचे एक छोटे बेट होते. तिथे पोहोचायचे आणि तिथून गोळीबार करावा, अशी योजना होती. त्यानुसार तीनही नावा निघाल्या आणि टार्गेटपासून सुमारे एक किलोमीटरभर अंतरावर पोहोचल्या… पाहतात तो काय? ज्या बेटावर चढून गोळीबार करायचा होता ते बेटच नाहीसे झालेले होते! गवताचा तो मोठा पुंजका वा-याने कित्येक मीटर्स दूर वाहून निघून गेलेला होता!

आता? आधी सराव झालेला असल्याने त्या नावा पलटी करणे आणि त्यांवर बंदुका ठेवून गोळीबार करणे अशी योजना झाली! पण ही बाब सोपी नव्हती… पाण्यात पोहोताना शरीर कितीतरी हलते, नाव तर हलणारच… अशा स्थितीत अचूक निशाणा कसा लागणार? अंधार तर होताच… मध्यरात्र उलटून गेलेली होती. चांदणरात्र होती म्हणून थोडं दिसत होतं. मागील नावा आणि किना-यावरून नाईट विजन यंत्रणा वापरून मोहिमेच्या प्रमुख अधिका-यांना इत्यंभूत माहिती दिली जात होती.

परंतू ते गवताचे बेटच नाहीसे झाल्याने थोडी अडचण झाली होती. म्हणून मोहिमेच्या प्रमुखांनी canoeवर उभे राहून अंदाज घेण्याचा प्रयत्न केला… पण त्यामुळे canoe कलंडली आणि साहेबांच्या सोबत त्या नावेत असलेले सर्वजण पाण्यात पडले… परंतु हत्यार हवाबंद प्लास्टिक पिशव्यांत आणलेली असल्याने बचावली! Canoe सरळ केली, तिच्यातलं पाणी काढलं… आणि मोहीम पुन्हा सुरु झाली!

ज्याने तिथली खबर आणली होती, त्या माणसाचं Code Name ठेवलं होतं… James Bond! मोहिमेचे नेतृत्व करणारे अधिकारी ज्या बोटीत बसले होते, त्या बोटीच्या पुढच्या भागात हा जेम्स बसला होता. आता तिन्ही नावा त्या अंधारातून हळूहळू मार्ग काढीत लक्ष्य जवळ करीत निघाल्या… वल्ह्यांचा (चप्पू) मात्र आवाज टाळता येत नव्हता. तेवढ्यात साहेबांच्या मानेला थंड हवेचा स्पर्श होऊ लागला… साहेब सावध झाले. त्यांच्या मागून वाहणारी हवा लक्ष्याच्या दिशेने वाहात होती… याचा अर्थ पहा-यावर असलेल्या अतिरेक्याला आवाज तर निश्चित येईल. साहेबांनी जेम्सला वल्ह्याने टोचलं! तो बिचारा.. त्याला वाटलं हे सर्व कमांडो आहेत म्हणजे काहीही करू शकतात… थेट जायचं आणि अतिरेक्यांना गोळ्या घालायच्या! पण तसं शक्य नव्हतं… काहीच वेळात या तिन्ही नावा अतिरेक्यांच्या गोळीबाराच्या टप्प्यात येणार होत्या… आणि लपायाला कुठेही संधी नव्हती… कारण आजूबाजूला फक्त पाणी!

साहेबांनी नावा तिथून मागे घेण्याचा आदेश दिला. आणि सुमारे चार किलोमीटर्सचा वळसा घ्यायला लावला… जेणेकरून वल्ह्यांचा आवाज अतिरेक्यांना ऐकू जाणार नाही! या कामाला आणखी दीड दोन तास लागणार होते… पण त्याला इलाज नव्हता!

दूरवर अंधारातही पाहू शकणा-या दुर्बिणीतून टेहळणी करणारे पथक साहेबांना संदेश वहन उपकरणाच्या साहाय्याने प्रत्येक गोष्ट सांगत होते… एक अतिरेकी पहा-यावर होता… त्याने त्या झोपडीशेजारी एक उंच मचाण बांधले होते… आणि तो जागा होता… हातातली विजेरी अधून मधून इकडे तिकडे फिरवत सावधपणे पहारा देत होता!

आता नशीब आपल्या सैनिकांच्या बाजूने फिरले. आधी मार्गातून वाहून गेलेली फुमदी नेमकी सैनिक ज्या बाजूने त्या बेटावर जाण्याचा प्रयत्न करणार होते… त्याच बाजूला येऊन स्थिरावली होती. तिच्यावर चढून सैनिकांनी आपापल्या शस्त्रांसाठी भक्कम जागा तयार केली! आता अतिरेक्यांना पुरते घेरले गेले होते… अकरा अतिरेकी तावडीत सापडले होते… त्यातील दहा झोपलेले होते. एक पहा-यावर होता!

ठरलेल्या बाजूने न आल्याने नेमक्या झोपड्या कोणत्या याबाबत थोडा संभ्रम निर्माण झाला होता. पण साहेबांनी किना-यावर असलेल्या पथकाकडून पुन:पुन्हा खात्री करून घेतली… कारण कोणत्याही परिस्थितीत निष्पाप सामान्य नागरीकांवर गोळीबार होऊ द्यायचा नव्हता. किना-यावरून दिसणारे दृश्य आणि आता दुस-या बाजूने आल्याने दिसणारे दृश्य यात फरक असू शकत होता. शिवाय सतत जागा बदलणारी गवताची बेटं होतीच. बेटाला वेढा घालून थांबलेल्या काही पथकांचा गोंधळ उडाला होता… त्यांना योग्य मार्गदर्शन केले गेले… आणि नक्की कोणत्या झोपड्यांवर हल्ला चढवायचा हे निश्चित झाले! अन्यथा त्या अंधारात स्थानिक गरीब मच्छीमार लोक मारले गेले असते! सतत केलेला सराव, आणि योग्य पद्धतीने योजना आखलेली असल्याने हे करणे सोपे झाले!

पहाटेचे साडेतीन वाजले होते. मचाण सुमारे १५ मीटर्स अंतरावर होतं. तेवढ्यात तो अतिरेकी पहारेकरी मचाण उतरून खाली येऊ लागला… आणि त्याच बरोबर अतिरेक्यांच्या झोपड्यांमधून चार पाच जण बाहेर पडले. त्यांचा तो नेहमीचा शिरस्ता असावा. त्यांपैकी काही जण प्रात:विधीसाठी निघाले असावेत.

मचाणावरचा पहारेकरी खाली उतरल्याची संधी साधत साहेबांनी आणि त्यांच्या सहका-याने त्यांची नाव गवताच्या फुमदीवर चढवली… गोळीबार करण्यासाठी स्थिर जागा तयार करून घेतली… दृष्टीपथात येणारे गवत थोडे थोडे करीत तोडून टाकले… जेणेकरून अचूक नेम साधता येईल!

नेमबाजीत माहीर असलेल्या साहेबांनी नेम धरला… एवढ्यात किना-यावरून संदेश आला… साहेब… आणखी एक अतिरेकी मचाण चढतो आहे. तर खरंच एक अतिरेकी मचाणावर चढताना दिसला अंधुकसा. तो वर आला आणि त्याने तिथेच आळोखे-पिळोखे देत व्यायाम करायला सुरुवात केली. आता दोन नेम धरले गेले… आपल्या आधुनिक रायफल्समधून दोन गोळ्या निघाल्या… आणि ते दोघेही अतिरेकी खाली कोसळले! काही क्षण शांततेत गेले आणि… त्या चारही झोपड्यांमधून आपल्या सैनिकांच्या दिशेने तुफान गोळीबार सुरु झाला. आपल्या सैनिकांनी केलेला सराव यावेळी कामाला आला. अवघ्या चारच मिनिटांत अकरा पैकी नऊ अतिरेकी ठार केले गेले. एक महिला अतिरेकी जखमी अवस्थेत सापडली… तिला वैद्यकीय उपचारांचे आश्वासन देऊन ताब्यात घेण्यात आले… एक अतिरेकी मात्र कट्टर निघाला… सात गोळ्या लागूनही तो जिवंत राहू शकला… त्याने फुमदी वरून खाली उडी मारून पाण्यात बुडी मारली… हलकेच डोके वर काढून गवताला धरून तो तरंगत राहिला आणि आपले सैनिक तिथून मागे फिरल्यावर एका मच्छीमाराच्या मदतीने तो किना-यावर गेला… स्थानिक डॉक्टरकडून उपचार मिळवले आणि तो घरी गेला. पण काही तासांतच त्याला पोलिसांनी अटक केली… त्याचा पाय कापावा लागला! मात्र त्याला जिवंत पकडले गेल्याने त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली!

४५ दिवसांचा सराव, योजना, योजनेत वेळोवेळी केले गेलेले बदल यांमुळे मुख्य कारवाई केवळ चार मिनिटांत आटोपली… आणि आपले सर्व सैनिक सहीसलामत परतले! ज्या अधिका-याच्या नेतृत्वाखाली हे रोमांचक ऑपरेशन पार पडले… त्यांची ही ख्यातीच होती… त्यांनी ज्या ज्या सैनिकाला सोबत मोहिमेवर नेले… ते ते सर्व सैनिक सुरक्षित परत येत असत… कामगिरी फत्ते करूनच!

पुढील सहा दिवस या सर्व सरोवराची भारतीय लष्कराने काटेकोर तपासणी केली. अनेक हत्यारे जप्त केली… ज्यांत rocket launchers सुद्धा होते… अतिरेक्यांची तयारी पुरेपूर होती. त्यांना नेस्तनाबूद केल्यामुळे पुढील अनेक अतिरेकी कारवायांना लगाम तर बसलाच शिवाय अतिरेक्यांच्या मनात भारतीय लष्कराची भीती अधिक गडद झाली!

 या मोहिमेचे नेतृत्व अगदी स्वत: आघाडीवर राहून करणारे ब्रिगेडीअर श्री. सौरभ सिंग शेखावत (Retd.) यांची माहिती आणि महती सांगण्यासाठी खरं तर दोन स्वतंत्र लेख लागतील. ब्रिगेडीअर साहेब आता सेवानिवृत्त असून त्यांची खूप प्रेरणादायी जीवन कहाणी विविध मुलाखती, लेख आणि बातम्यांतून मी समजावून घेतो आहे.

समाप्त

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ पाव मण लाकडे + संपादकीय निवेदन – श्री नंदकुमार पंडित वडेर – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

📚📖 अ भि नं द न 📖 📚

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सांगली यांनी आयोजित केलेल्या २०२५ च्या सांगली जिल्हा ग्रंथोत्सवात आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिक श्री नंदकुमार पंडित वडेर यांना सुजाण वाचक सन्मानपत्र बहाल करण्यात आले आहे.

श्री. वडेर यांचे ई-अभिव्यक्ती (मराठी) परिवारातर्फे मन: पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐

– संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

आजच्या अंकात वाचूया त्यांचे एक आलेख – “पाव मण लाकडे…”

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # पाव मण लाकडे… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“आता चुल पेटावयाला एक लाकूड शिल्लक नाही घरात.. स्वयंपाक, चहापाणी, आंघोळीचं गरम पाणी इतकी कामं कधीची खोळंबली आहेत.. चूलच पेटली नाही तर झाला की बट्ट्याबोळ… आणि मोळीवाल्याकडून जर जळणासाठी सरपणच मिळाले नाही तर काय मी आता या चुलीत माझी हाडं टाकावीत कि काय? तुम्ही त्या गॅस एजन्सी च्या दुकानात कामाला जाता आणि रोज शंभर घरा घरातून तो गॅसचा सिलेंडर पोहचता करता… त्यांच्या चुलीची एवढी काळजी घेता पण स्वत:च्या घरची काही काळजी असते का तुम्हाला? … त्या तुमच्या एजन्सी मालकाला सांगून एक गॅस कनेक्शन तरी आपल्य घरी आणायचं होतं तेव्हा… बाई गं सांगून सांगून थकले पण तुम्ही कसले जुन्या परंपरावादीला चिकटून बसलेले… श्रीमंतीचे चोचले गरीबांना परवडणारे नसतात आणि आधुनिक सोयी सुविधांच्या विरोधात कायम तुम्ही उभे… बाकीचे तुमचे सहकारी बघा. टू व्हिलर वरून सगळीकडे गॅस पोहचवतात आणि तुम्ही अजूनही त्या बाबा आदम च्या जमान्यातील जुन्या एटलास सायकल वरून पायाचे तुकडे पर्यंत पॅडल मार मारून एकेक गॅस सिलेंडर पोहचवत राहता.. अश्या दगदगीने किती थकून जायला होतयं तुम्हाला… आम्ही घरातली माणसं तुम्हाला दाताच्या कण्या करून सांगून थकलो पण तुम्ही काही बदलायला तयार नाही… तुमचं आपलं संत तुकारामांच्या सारखं एकच पालुपद.. सगळ्यांच्या भुका भागविण्यासाठी आपण कष्ट घेतले तर त्याचं मोठं पुण्य मिळतं.. भुकेलेल्याला अन्नदान केल्यासारखे… पण त्याची त्यांना त्यावेळी काही होती का कदर… सिंलेडरची डिलिव्हरी करणारा दारात दिसला रे दिसला तर त्याच्यावरच तोंडसुख घ्यायला तयार… काय तर गॅस नोंदवून महिना उलटून गेला आणि आता आणताय होय… काहीतरी मध्ये बरेच काळाबाजार करून वरकड कमाई झाल्यावर तुम्ही नंबराचा द्यायला आलात… आणि आता वर ‘चायपानीची’ अपेक्षा ही असणारच… इकडे आमच्या घरात पोरंबाळं, म्हातारे कोतारे भूकबळीचं तेव्हढे होयाचे राहिले होते… दिवसभर सारखी अशी पळापळ करून सगळ्यांना जर गॅस डिलीवरी वेळ द्यायला काय होतं तुमचं… पण तुमचे नखरे फार वाढलेत… जो वरती ज्यादा ची चिरीमिरी देतो त्याच्या दारी पहिला गॅस जातो… हो का नाही.. अशी शिव्याशापाची बिना कारणाची बोलणी खाऊन मन तुमचं खट्टू होतं. तरीही तुम्ही तुमचं कर्तव्य करायचं सोडत नाही…

आणि आता तर ते आखाती युद्धाचा भडका उडाला. त्यात तेल गॅसचा पुरवठ्यावर बंधन आल्यावर दिस ताच इकडे नफेखोरी करणारी सगळी सावजं मंडळीनीं परिस्थितीचा फायदा उचलला नाही तरच नवल… पांढरे बगळे नि खाकी ससाणे बेरक्या जातीची. स्वार्थ नि संधीसाधू गिधाडे सामान्य जनतेला ओरबाडून खायला बसली नाही तरच नवल.. याने त्याच्या नावाने बोंब मारायची आणि त्याने याच्या. तेही फक्त मिडीयासमोर… आणि गरीब बिचारा तो गॅस डिलिव्हरी करणारा मात्र सगळ्यांच्या रोषाला सामोरा गेल्याने उद्रेकाचा बळी होतो… त्याला वेठीस धरून काय साधणार म्हणा.. तो पोटार्थी प्रापंचिक माणूस… लोकांच्या झुंबडी त्या गॅस च्या दुकानी बसते.. मला पाहिजे गॅस आधी अश्या हमरीतुमरी होतात.. डिलिव्हरी मॅनला मध्यला मध्ये चढ्या बक्षिसाची लालूच दाखवून तो गॅस आपल्या घराकडे पळवतात… तेव्हा इतर नाराज आपली निराशेची आरोळी ठोकत राहतात.. पण त्या डिलिव्हरी मॅनचा एक माणूस म्हणून कोणीच कसला विचार करत नाहीत… तहानभूक विसरून तो एकटाच मात्र आपलं प्रामाणिकपणे देशसेवेचे कर्तव्य करतो…

आणि रात्री उशिरा ने जेव्हा तो आपल्या घराकडे निघतो तेव्हा त्याला आपलं घरदारं बायका पोरं सकाळ पासून उपाशी तपाशी राहून आपण वखारीतून पाव मण लाकडाची मोळी कधी घरी घेऊन येतोय याच्याकडे डोळे लावून वाट पाहत असलेले कोमेजलेले चेहरे दिसत असतात.. चारदोन रूपयाची वरकड कमाईतूंन त्यानं शेव फरसाणाचा पुडा सोबत घेतलेला असतो… त्यामुळे जरा तरी घरदार हसतं खेळतं राहील आणि ते बघून आजचा आपला थकवा दूर पळून जाईन… आजचा दिवस तर पार पडला… उद्याचं उद्या काय ते बघता येईल… ज्यानं चोच दिलीय त्यानं त्याच्या चाऱ्याची पण काही ना काही सोय केलेली असती.. तो काळजी घेणारा बसला असताना आपण का म्हणून काळजी करत बसायचं नाही का? हे वचन रोज रात्री झोपताना आपल्या कुटुंबाला ऐकवून दाखवलं कि त्याला शांत झोप लागते…

*

© नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा…भाग – १२ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १२ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

गाथेतून उमजणारी गीता (२)

सध्या आपण गाथेतून उमजणाऱ्या गीता तत्वाचे चिंतन करीत आहोत.

भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की “करणारा तू कोण? नियतकर्माचे पालन करून तू ते कर्म कृष्णार्पण कर. कर्ता करविता हा एक भगवंतच आहे. हेच गीतेतले तत्त्व तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून भक्त जनांना सांगत आहेत. ते म्हणतात, “माझ्या वाणीतून अभंगांच्या रूपात जे बाहेर येते, ते सर्व बोल पांडुरंगाचेच आहेत. बोलविता धनी तोची आहे.”

ते म्हणतात,

झाली माझी वैखरी/ विश्वंभरी व्यापक/

मोकलीने जावे बाणे/ भाता जेने वाहिला/

आता येथे कैचा तुका/ बोले सिक्का स्वामींचा/

हे जे काही शब्द माझ्या मुखावाटे बाहेर पडत आहेत, ते माझे नसून मी तर स्वामींचा शिक्का आहे. ते माझ्याकडून वदवून घेत आहेत. भात्यातून बाण जसे बाहेर पडतात, त्याचप्रमाणे माझ्या मुखावाटे शब्द बाहेर पडतात इतकेच!

पिडलेती भ्रमे/ वाटा नकळती वर्मी/

 तुका म्हणे भार/ माथा टाका अहंकार//

हरीच्या भेटीची आस लागलेल्या भक्तांना

तुकाराम महाराज सांगतात की तुमच्या मनातील देहाच्या अहंकाराचा भार जेव्हा तुम्ही टाकाल, तेव्हाच तुम्हाला हरी भेटेल.

संत तुकारामांनी खालील अभंगात गीतेतून होणारा बोध भक्तांच्या निदर्शनास आणून दिला आहे.

काय दरा करील वन/ समाधान नाही जव/

(जोपर्यंत अंतःकरणात समाधान नाही, ते वासना शून्य झालेले नाही, तोपर्यंत रानात, गिरीकंदरात जाऊन तपश्चर्या करण्याचा काहीही उपयोग नाही.)

रीधता धावा पेवा मधी/ जोडे सिद्धी ते ठायी/

(धान्य काढण्याकरता पेवामध्ये घाईघाईने शिरले, तरी लगेच अन्न मिळेल का? )

काय भस्म करील राख/ अंतर पाख नाही तो/

(मुळात अंतकरण जर शुद्ध नसेल, तर अंगाला नुसती राख फासून काय उपयोग? )

वर्ण आश्रमाचे धर्म / जाती श्रम झालिया/

(वर्णाश्रम-धर्मानुसार विहित कर्म करण्याचा कंटाळा केला, तर ते कर्म वाया जाईल)

सर्व संतांना हेच सांगायचे आहे की कोणतेही कर्म उच्च किंवा नीच नसते. समाजाची घडी व्यवस्थित राहण्यासाठी खरंतर वर्णाश्रम धर्म रचना केली गेली. परंतु पुढे मात्र ब्राह्मण म्हणजे उच्च आणि शूद्र म्हणजे नीच अशी भावना लोकांच्या मनात विनाकारण निर्माण केली गेली.

गीतेत भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेला कर्म संबंध विच्छेद या ठिकाणी तुकाराम महाराज साधकांना सांगत आहेत.

तेही नव्हे जे करिता काही/ ध्याता धाई तेही नव्हे/

तेही नव्हे जे जानवी जना/ वाटे मना तेही नव्हे/

त्रास मानिजे कांटाळा/ अशुभ वाचाळा तेही नव्हे/

तेही नव्हे जे भोवती भोववे/ नागवे धावे तेही नव्हे/

तुका म्हणे एकची आहे/ सहजी पाहे सहज/

 याचा अर्थ असा की, हे साधका तू जे काही करशील ती भक्ती नाही, कारण त्याचा कर्तेपणा तू तुझ्याकडे घेशील. ध्यान करणाऱ्याने मूर्ती समोर ठेवून जरी ध्यान केले, तरी ती भक्ती नाही, कारण त्यात तुझा अहंकार असेल. लोकांना परमार्थ समजावणे, मनाला जे वाटेल तीही भक्ती नव्हे. एकच तत्व महत्त्वाचे आहे, मुद्दाम ठरवून काहीही कर्म करण्याचा अभिमान स्वतःकडे न ठेवता तू जर सहजपणे पाहशील तर तीच खरी भक्ती होईल.

 हेच तत्व अधिक स्पष्ट करण्यासाठी तुकाराम महाराज दुसऱ्या अभंगात काय सांगतात ते आपण पाहू.

 जे जे जेथे पावे/ तेथे समर्पावे सेवे/

 सहज पूजा याची नावे/ गणित अभिमान/

 अवघे भोगिता गोसावी/ आधी अवसानि जीवी/

 तुका म्हणे सीण /न धरिता नवे भिन्न//

 जीवाने जर मी करणारा आणि मी भोगणारा

 असा अभिमान बाळगला नाही तर भगवंताशी द्वैत राहत नाही.

 

 विचारा वाचून/ न पाविजे समाधान/

 देह त्रिगुणांचा बांधा/ माजी नाही गुण सुधा

 देवाचिये चाडे/ देवा द्यावे जेजे घडे/

 तुका म्हणे होते/ बहु गोमटे उचिते//

 या ठिकाणी विवेकाविषयी महाराज जनसामान्यांना सांगत आहेत. ज्या ठिकाणी विचार नसेल, विवेक नसेल, त्या ठिकाणी समाधान प्राप्त होणार नाही. प्रपंच असार आहे आणि आत्माच सार तत्व आहे, असा विवेक झाल्याशिवाय संतोष तेथे नाही. त्रिगुणात्मक अशा या शरीरात कोणताच गुण परिपूर्ण नाही. म्हणून आपण केलेले कर्म हे कोणत्याही गुणांनी(सत्व, रज, तम) युक्त असले तरी ते देवालाच अर्पण करणे आवश्यक आहे. गीतेत भगवान हेच सांगतात की पार्थ, सर्व कर्म तू मला अर्पण कर.

क्रमशः… १ 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ …मग लेखणीच पाय बनली! ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

श्री सचिन वसंत पाटील

??

☆ …मग लेखणीच पाय बनली! ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

विसाव्या वर्षी अपघातामध्ये दोन्ही पायातली ताकद गमावली. त्यावेळेपासून चालणं फिरणं बंद झालं. वडिलांना वाचनाचा छंद होता. खूप कमी वयात चांगली पुस्तके वाचायला मिळाली. त्यातून ग्रामीण साहित्याची गोडी लागली. पुस्तकातील विचारांनी जगण्याची उमेद दिली. सकारात्मक दृष्टिकोन दिला. पाय चालत नाहीत म्हणून लेखणी हाती घेतली. मग वाट मिळाली. हळूहळू लेखणीच पाय बनली. सुरुवातीला मन रितं व्हावं म्हणून लिहीत होतो नंतर ग्रामीण माणसांच्या कथा-व्यथा लिहू लागलो.

सांगलीजवळच्या कर्नाळ या खेडेगावात लहानाचा मोठा झालो. माझ्या कथांचे नायक, नायिका या गावातील कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यातील व्यथा-वेदना काल्पनिक नसून अवतीभवतीच्या व कृष्णाकाठच्या आहेत. हे सगळं अनुभूतीतून आलेलं वास्तवदर्शी लेखन आहे. असं जरी असले तरी या कथा लिहून मी काय फार मोठं काम केलं नाही. उलट मी ज्या शेतकरी कुटुंबात जन्मलो, ज्या मातेच्या पोटी जन्मलो, ज्या मातीतून उगवलो त्या मातीचे ऋण फेडण्यासाठी कर्तव्य भावनेतून मी लिहितो.

माझ्या ‘सांगावा’ या पहिल्याच कथासंग्रहातील बहुसंख्य कथा नातेसंबंधावर आधारित आहेत. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणामुळे नात्यामधील वाढलेलं अंतर, हरवलेलं प्रेम, जिव्हाळा, ओलावा, माणूसकी या कथांतून आली आहे. तर ‘अवकाळी विळखा’ या कथासंग्रहामध्ये प्रामुख्याने शेती-शेतकरी या विषयांशी संबंधित कथा आहेत. त्या मानाने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी हा शेतीला पाणी असल्याने सुखी, संपन्न मानला जातो. परंतु या शेतकऱ्यांच्याही अनेक समस्या आहेत, त्यांचेही वेगवेगळे प्रश्न आहेत. ते शासनदरबारी मांडण्याचा, इतरांना सांगण्याचा प्रयत्न मी या कथांच्या माध्यमातून केला आहे. शेतकऱ्यांचे दु:ख, व्यथा-वेदनांबरोबरच काही प्रश्नांची सकारात्म उत्तरे शोधायचा प्रयत्न मी केला आहे.

गाव हा सगळ्यांच्याच आपुलकीचा, जिव्हाळ्याचा विषय असतो. आज गाव बदललंय, बदलतंय… गावावर ग्लोबल वॉर्मिंग, माॅल, ढाबा संस्कृती टी. व्ही. , मोबाईल अशी अनेक आक्रमणे आली आहेत. गावात अनेक सेवा, सुविधाही आल्या आहेत. गावातल्या अनेक परंपरा बंद पडल्या आहेत. जुनी अलुतेदारी-बलुतेदारी पार मोडीत निघाली आहे. झाडांची संख्या घटली आहे. देशी गाय, बैलजोडी, कावळे, चिमण्या दुर्मीळ झाल्या आहेत. पण हळूहळू माणूसही माणसांपासून दुरावतोय. मनामनातलं अंतर वाढतंय. भोवतालचं जग आभासी बनतंय. आपण करीत असलेली प्रगती पोकळ वाटतेय… तरीही ही सगळी आक्रमणे पचवून आज गाव कसं उभं आहे. हे गावातील बदल, गावातील अस्सल, इरसाल माणसं आणि जुना गावागाडा ‘गावठी गिच्चा’ या कथासंग्रहात आला आहे.

कथेबरोबरच ‘पाय आणि वाटा’ या नावाने माझा एक ललितसंग्रहही प्रसिद्ध झाला आहे. मला वीस वर्षे पाय होते आणि वीस बाबीस वर्षे मी पायांशिवाय जगलोय. पाय असण्यातलं सुख आणि पाय नसण्याचं दु:ख समान पातळीवर ठेवून हे लेखन करायचा प्रयत्न मी केला आहे. वीस वर्षे पायाने अनुभवलेल्या संवेदना या लेखनात एकवटलेल्या आहेत. त्याबरोबरच मराठी बोलीभाषा टिकल्या पाहिजेत तरच आपली संस्कृती टिकेल या भावनेतून मराठीतील दुर्मीळ बावीस बोलीतील बावीस कथांचे संपादन ‘मायबोली रंग कथांचे’ या अनोख्या पुस्तकात केले आहे. पुस्तके वाचल्यामुळे मी जिवंत राहिलो! लेखनामुळे प्रेरणा मिळाली. पुस्तकांचे, मायमराठीचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. हे उपकारांची अल्पशी परतफेड या शब्दांची सेवा करून केला आहे.

माझ्या हालचालींना-लेखनाला मर्यादा आहेत. मला बसून लिहीता येत नाही. एका कुशीवर झोपून रोज दोन पाने मी लिहू शकतो. सातत्याने वीस-पंचवीस वर्षाच्या दीर्घ लेखनातून तीन कथासंग्रह प्रकाशित झाले. चांगला वाचक मिळण्याच्या बाबतीत मी नशीबवान आहे. पहिल्या ‘सांगावा’ या कथासंग्रहाच्या पाच आवृत्ती प्रकाशित झाल्या. महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकनेते राजारामबापू पाटील पुरस्कारांसह अनेक पुरस्कार या संग्रहास मिळाले. तर ‘अवकाळी विळखा’ या कथासंग्रहाची तिसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. त्यासही महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, गुहागर, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांचा मानाचा कै. शंकर खंडू पाटील पुरस्कार, माणदेश साहित्य प्रतिष्ठानच्या पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच माझी कथा सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे बी. ए. भाग एक आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी. काॅम. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे, हा माझा सन्मान नसून मी करीत असलेल्या सेवेचा सन्मान आहे. माझ्या पुस्तकांवर मान्यवर समीक्षकांचे चार समीक्षाग्रंथ प्रसिद्ध झाले. अनेक मराठी अभ्यासकांनी राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरांवर शोधनिबंध सादर केले असून एमफीएल, पीएचडी संशोधनासाठीही या साहित्याची निवड झाली आहे. तरीही मी माझ्या कथा लेखनावर अजिबात संतुष्ट नाही. मला सतत वाटत राहते, आपण आणखी चांगली कथा लिहिली पाहिजे.

*****

©  श्री सचिन वसंत पाटील

संपर्क – विजय भारत चौक, मु. पो. कर्नाळ, ता. मिरज जि. सांगली, पिन कोड ४१६ ३०४  मोबा. ८२७५३७७०४९.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फुले वेचिता बहरू… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

??

☆ फुले वेचिता बहरू… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

माझ्या बागेतल्या कुंदाच्या झाडावर सध्या एक अद्भुत दृश्य पाहायला मिळते आहे. कळ्यांनी लगडलेले झाड, शुभ्र फुलांनी भरून आलेले—जणू अंगणातच चांदणे उतरले. आरती प्रभू यांची एक सुंदर कविता आहे, समईच्या शुभ्र कळ्या. ही फुले म्हणजे जण समईच्या शुभ्र कळ्या असेच वाटले. किती फुले वेचली, तरी झाड बहरण्याचे थांबले नाही. त्याच्यावरच्या कळ्या उमलत राहिल्या. त्या क्षणी संत ज्ञानेश्वरांचा अभंग आठवला, “ फुले वेचिता बहरू कळियांसी आला ”. किती साध्या शब्दांत किती मोठे तत्त्व सांगून गेले आहेत ज्ञानेश्वरमाऊली!

प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो. मोगऱ्याची फुले उन्हाळ्यात येतात; उन्हाळ्यातच आंब्याला मोहर येतो आणि वातावरणात घमघमाट सुटतो. जणू संपूर्ण आसमंत सुगंधाने भरून जातो. तसाच कुंदालाही हिवाळ्यात बहर येतो आणि तो भरभरून फुलतो. निसर्ग प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आनंद देत असतो—कधी सुगंधातून, कधी रंगांतून, तर कधी केवळ शांत सौंदर्यातून. फुलांना बहर, आंब्याला मोहर आणि हवेला सुगंध…! हे नक्षत्रांचे देणे, हे देवाघरचे देणे!

आपण अनेकदा देण्यात थांबतो. आता पुरेसे दिले, आता माझा वाटा संपला असे म्हणत. पण निसर्ग मात्र कधी थकत नाही. फुले वेचली तरी तो पुन्हा बहरतो. झाडावरून फुले काढली, तरी ते रुसत नाही; उलट नव्या कळ्यांना उमलण्याची संधी देते. देताना त्याला अपेक्षा नसते. नाही मोबदल्याची, नाही कौतुकाची. त्याशिवाय ते हातचं राखून देत नाही. आपली ओंजळ अपुरी पडते.

कुंदाला वास नसतो, असे आपण म्हणतो. पण खरंच नसतो का? की आपण वासाच्या शोधात असताना सौंदर्य पाहायचे विसरतो? शुभ्र पाकळ्या, नितळ रूप, साधेपणा—हे सारे पाहिले की मन आपोआप प्रसन्न होते. देवाला वाहिले तरी तो प्रश्न करत नाही, “ मला सुगंध का नाही? ” गजऱ्यात गुंफले, हार केला तरी फुले आढेवेढे घेत नाहीत. केवढी ही स्थितप्रज्ञता! हे शिकायला गीताच वाचली पाहिजे असे काही नाही. निसर्ग आपल्याला त्याच्या कृतीतूनही शिकवत असतो.

कुंदाच्या फुलांना त्यांच्या अस्तित्वातच समाधान असते. त्यांनी आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारलेले असते. मोगऱ्याच्या फुलांसारखा आपल्याला वास नाही म्हणून ते स्वतःला दुःखी करून घेत नाहीत. ते प्रसन्नच असतात नेहमी आणि त्यांच्याकडे मन भरून पाहणारा देखील प्रसन्न होतो. या फुलांकडून आपल्यालाही शिकायला मिळते. आपल्यात असलेले गुण, सौंदर्य, सामर्थ्य हे दाखवण्यासाठी गाजावाजा कुठे आवश्यक असतो? सुगंध नसला तरी चालतो, रूप नितळ असेल तर पुरेसे आहे. कुणी देवासाठी वापरले, कुणी सजावटीसाठी… फुलांचे काही म्हणणे नसते; आपण मात्र लगेच माझा वापर कसा केला गेला याचा हिशेब मांडायला लागतो.

कुंदाच्या झाडाकडे पाहताना वाटते, आपणही असेच असावे. कुणी आपल्याकडून घेतले तरी न रुसता पुन्हा पुन्हा द्यावे. कौतुक न झाले तरी बहरणारे. निसर्ग आपल्याला भरभरून देतो; आपण त्यातून प्रसन्नता घ्यायची की आपल्याच दुःखाला कवटाळून बसायचं हा आपला प्रश्न आहे.

अंगणातले ते शुभ्र चांदणे संध्याकाळपर्यंत मनात साठवून ठेवले. फुले सुकतील, गजरे विस्कटतील; पण त्या फुलांनी दिलेली शांती, प्रसन्नता मात्र टिकून राहील. आणि ती टिकवून ठेवणे आपल्यावर असते. आपलं आयुष्यही असंच असतं ना! थोडे देणे, थोडे बहरणे आणि उरलेल्या कळ्यांसाठी जागा ठेवणे!

© विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares