मराठी साहित्य – विविधा ☆ पंडित जितेंद्र अभिषेकी  -शास्त्रीय संगीतकार व गायक ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ पंडित जितेंद्र अभिषेकी  -शास्त्रीय संगीतकार व गायक ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे 

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर….., चंद्र व्हा हो पांडुरंग अशा छान छान गाण्यांना संगीतबुद्ध करणारे व स्वतः गाणारे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म 21 सप्टेंबर 1932 सालीझाला.

गोव्याच्या मंगेशीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणाऱ्या नवाथे यांच्या अभिषेकी घराण्यात त्यांचा जन्म झाला. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पंडित जगन्नाथ पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरुवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथाश्रमात राहून, वारावर जेवून, माधुकरी मागून ते शिकले. त्यांनी एकूण 21 गुरु केले व प्रत्येक गुरूकडून जेवढे पाहिजे तेवढेच घेतले. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायन शैली त्यांनी निर्माण केली. प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातील महत्त्वाचा गुणधर्म. त्यांनी संगीत दिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांना खूप आवडले.. उदाहरण द्यायचे झाले तर मैलाचा दगड ठरलेल्या “कट्यार काळजात घुसली “या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती तर 1966 साली रंगभूमीवर आलेल्या” लेकुरे उदंड झाली”या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या “किरी स्तावांच्या  तियात्र “नाट्य प्रकारातल्या संगीताचा त्यांनी वापरला या नाटकात सगळ्यात पहिल्यांदा रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्स वापरले गेले. हे संगीत काळाच्या पुढे जाणारे होते. अभिषेकींनी स्वतःसंगीत दिलं तसं दुसऱ्यांच्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले. आकाशवाणीसाठी केलेल्या ” बिल्हण “या संगीतिकेत पु.ल. च्या संगीत दिग्दर्शनात ते गायले. यातली गीते मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली होती तर” वैशाखवणवा” या चित्रपटासाठी दत्ता डावजेकर यांनी संगीत बद्ध केलेले “गोमू माहेरला जाते होनाखवा” हेगीत ही त्यांनी म्हटले. अनेक नाटकांना संगीत दिले.

एक चतुरस्त्र गायक, संगीतकार व संगीतज्ञ म्हणून प्रसिद्धी मिळवली. ते गोवा कला अकादमीचे सल्लागार व संस्कारभारतीचे सदस्य होते. त्यांनी चिपळूण येथील ७६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.

त्यांची गाजलेली गानसंपदा….. अनंता तुला कोण पाहु…कबीर गुलाल उधळीत रंग..अभिरामा सुगंधाचा… अमृताची फळे… आम्हा न कळे ज्ञान… काटा रुते कुणाला.. कैवल्याच्या चांदण्याला….. गोमू माहेरला जाते हो.. तपत्या झळा उन्हाच्या..  दिवे लागले रे दिवे.. ध्यान करू जाता मन… प्परब्रम्ह भेटी लागी… पांडुरंग दाता.. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल…. शब्दावाचुन कळले सारे.. सर्वात्मका सर्वेश्वरा… हरी भजना वीण  काळ… हे बंध रेशमाचे.. हे सुरांनो चंद्र व्हा..  हे दीपा तू जळत राहा… विकल मन माझे झुरत.. स्वप्नात पाहिले जेते राहूदे… चंद्रा लेणी तुझी रोहिणी.. जा उडुनी जा पाखरा… इत्यादी.

आपल्या संगीतातील कार्याने अजरामर झालेल्या पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी7 नोव्हेंबर 1998 रोजी जगाचा निरोप घेतला.अशा या थोर गायकाला विनम्र प्रणाम!

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नैवेद्यम समर्पयामि ….! – डॉ.सौ.सुमेधा आपटे-रानडे ☆ संग्रहिका – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? मनमंजुषेतून ?

☆ नैवेद्यम समर्पयामि ….! – डॉ.सौ.सुमेधा आपटे-रानडे ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

नैवेद्यम समर्पयामि ….|’

एरवी आपल्या सण परंपरेला न मानणारी मंडळी,’आखाडी’ so called ‘गटारी’ अगदी न चुकता साजरी करतात. असा थोडासा ‘broad minded’ विचार आपल्या सर्व सणांच्या बाबतीत झाला तर,किती छान होईल ना..!!आता हेच बघा ना,श्रावण सुरु होतोय,पाठोपाठ गणपती,नवरात्र,दिवाळी अशी सणांची रांगच लागते. या सगळ्यात महत्वाचा असतो तो ‘नैवेद्य’.. फक्त देवाला दाखवायला लागतो म्हणून असतो का हा ‘नैवेद्य?’.. नाही,खरतरं या ‘नैवेद्य’ करण्यामागे अनेक गोष्टींची योजना आपल्या परंपरेत आहे.

माझ्या मैत्रीणी यावर म्हणतील “काहीही हं,तो नैवेद्य करायचा म्हणजे एक event च असतो बाई!! सरळ ऑर्डर देऊन करुन आणतो”..

पण,मैत्रीणिंनो,आपल्या संस्कृतीत नैवेद्याला अनन्यसाधारण महत्व आहे. देवाला अन्नस्वरुपात अर्पण केलेला ‘नैवेद्य’ आपण प्रसाद म्हणून खातो. ऋतू नुसार सण व त्या सणांचे व देवांचे विशिष्ठ नैवेद्य हे ठरलेले असतात. ह्याचा संबंध नैवेद्य-आरोग्य असा १००% आहेच. पण माझ्यामते घरात ‘स्वतः नैवेद्य बनवणे’ ही एक आपल्या संस्कृतीने आपल्यातील चांगल्या Qualities निर्माण करण्यासाठी दिलेली activity वाटते मला. कशी काय?..बघा

१. नैवेद्य करताना अगदी सोवळ्यांत नसलं तरी शुचिर्भूत होऊन नैवेद्य करावा लागतो. इथे Hygiene आलं.

२. नैवेद्याला काय काय लागेल ते पक्क माहिती असावं लागतं, पदार्थांचे प्रमाण काटेकोर ठेवावे लागते, कारण चव पहायची मुभा नसते.  नैवेद्य हा ठराविक वेळेतच तयार करावा लागतो..Accuracy and Time management 

३. नैवेद्य करताना करणाऱ्यांना खायची मुभा नसतेच, पण घरातल्या इतर मंडळींनाही स्वतः च्या मनावर प्रचंड ताबा ठेवावा लागतो. फोडणीचे खमंग वास,पुरणपोळीचा खरपूस वास रसनेंद्रियास उत्तेजित करत असताना हा control खूप काही शिकवून जातो..कारण नैवेद्य दाखविल्याशिवाय खायचे नाही हा दंडक आहे ना! बघा ‘संयम'(Patience,self restraint) हा अत्यंत महत्वाचा गुण नैवेद्याने  develop होतो. जो आजकाल खूप कमी होत चाललाय.

४. नैवेद्य हा नेहमी सात्विक, सुंदर च होतो. कारण करणाऱ्याने अत्यंत मनापासून, एकाग्रतेने,‌ श्रध्देने तो बनवलेला असतो. Concentration, devotion झालं ना develop..

५. नैवेद्याचे ताट वाढताना ते सुध्दा एक ठराविक पध्दतीने वाढले जाते. डावी-उजवी बाजू नीटनेटकेपणाने वाढणे हे कोणत्या कलेपेक्षा कमी नाही. ताटाच्या बाजूला रांगोळी साक्षात कलाविष्कार!!

६. नैवेद्यातून आरोग्य जपल्या जातंच कारणं तो सर्व रसात्मक,भक्ष्य,भोज्य,चूष्य,लेह्य या स्वरुपातील ही असतो. नैवेद्य दाखवताना आपण जे “ॐ प्राणाय स्वाहा,ॐअपानाय स्वाहा…’ हे म्हणतो,ते काय आहे? तर प्राण,अपान,उदान,व्यान,समान हे शरीरातील कार्यकारी वायू आहेत,ते त्या अन्नाचे ग्रहण,पचन,अभिसारण,उत्सर्जन करण्यास आपल्याला सहाय्यभूत ठरतात. त्यांचे स्मरण करुन देवाला नैवेद्य दाखवल्या जातो.

अर्थात,मैत्रीणींनो विकत,आयता आणून दाखवलेला नैवेद्य हे सगळे skills, qualities आपल्यात कसे बरे develop करेल?? but,i know नैवेद्य करायला वेळ कुठाय?? हो,ना? मग,सगळं ताट नको निदान त्यांतील एकतरी पदार्थ ‘नैवेद्य’ म्हणून करायला काय हरकत आहे? साधी खिर करा पण स्वतः करा. आपल्या छोट्यांना शाळेत Activities देऊन वेगवेगळी skills develop केली जातात. पण आपली संस्कृती ही आपल्याला असे task देत असते. तिचा आपण आपल्यातील qualities improve करण्यासाठी नक्कीच उपयोग केला पाहिजे..मग बघा ‘नैवेद्यम समर्पयामि|’ असे म्हणताना किती समाधान होईल..

– डॉ. सौ. सुमेधा आपटे-रानडे

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वैश्विक गणेश यात्रा: चीन मधील ‘भगवान विनायक’ ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

 ☆ वैश्विक गणेश यात्रा: चीन मधील ‘भगवान विनायक’ ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆ 

चीन म्हणजे पोलादी पडद्याआडचा देश. या अश्या चीन चे आणि भारताचे संबंध फार प्राचीन आहेत. प्राचीन म्हणजे किती जुने..? काही निश्चित सांगता येणं कठीण आहे. पहिल्या शतकात चीन मध्ये असलेल्या हिंदू मंदिरांचे पुरावे मिळाले आहेत. मात्र हिंदू धर्माचा प्रादुर्भाव चीन मध्ये या पेक्षा ही आधी झाला असावा.

आज सुध्दा चीन मध्ये अनेक हिंदू मंदिरं आहेत. आणि जिथे हिंदू मंदिरं आहेत, तिथे गणरायाची उपस्थिती ही असतेच असते. चीन च्या ह्या हिंदू मंदिरांमध्ये श्री गणेशाच्या अनेक प्राचीन मूर्ती आहेत. येथे गणेशाला बुध्दी आणि समृध्दी ची देवता मानलं जातं. 

चीन च्या फुजियान प्रांतात, क्वांझाऊ शहरात, जवळपास वीस हिंदू मंदिरं आहेत. ही सारी मंदिरं साधारण दीड हजार वर्ष जूनी आहेत. त्या काळात चीन चा, भारताच्या तामिळ भाषिक क्षेत्राशी मोठा व्यापार चालायचा. आजच्या तामिळनाडू मधून अनेक वस्तु चीन ला जायच्या, आणि चीन हून साखर आणि इतर पदार्थ आयात केले जायचे. स्वाभाविकतः या क्वांझाऊ शहरात मोठ्या संख्येने तामिळ व्यापारी आणि त्यांची माणसं राहायची. त्यांनीच ही मंदिरं बांधली. (२०१९ च्या डिसेंबर मध्ये चीन चे राष्ट्रपती शी जिनपिंग भारतात आले असताना, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या बरोबर ची एक बैठक तामिळनाडू च्या ‘महाबलीपुरम’ येथे ठेवली होती. सातव्या आणि आठव्या शतकात, पल्लवांच्या काळात, भारत आणि चीन मधील व्यापार येथून होत होता, त्याला उजळणी देण्यासाठी महाबलीपुरम ची निवड केलेली होती). सन ६८५ च्या आसपास, तेग राजवंश्या च्या काळातली ही मंदिरं आहेत. या मंदिरांमध्ये नंतर स्थानिक चीनी लोक ही यायला लागले आणि पूजा करायला लागले. या मंदिरांवर मेंदारिन (चीनी), संस्कृत आणि तामिळ भाषेतील शिलालेख आहेत. या सर्व मंदिरांमध्ये भगवान गणेश विराजमान आहेत. चीन च्या गंसू प्रांतात तुन-हुयांग (की दुन-हुयांग) शहरातील बौध्द मंदिरांमध्ये श्री गणराय, कार्तिकेयांबरोबर दिसतात.    

चीन च्या उत्तर भागात झालेल्या उत्खननात जी गणेश प्रतिमा मिळाली आहे, ती कार्बन डेटिंग च्या अनुसार सन ५३१ ची आहे. चीन च्या अगदी दक्षिण टोकावर असलेले गुआंगदोंग (Guangdong) हे बंदर (port) आहे तर क्वांझाऊ किंवा चिंचू ही सुध्दा बंदरांची शहरं आहेत. तामिळ व्यापारी, सागरी मार्गाने, याच बंदरांच्या रस्त्याने चीन मध्ये यायचे. स्वाभाविकतः या सर्व बंदरांच्या आसपास अनेक हिंदू मंदिरांचे अवशेष आजही मिळतात. या शहरातील पुरातत्व संग्रहालयांमध्ये भगवान शंकर, गणेश, दुर्गा देवी इत्यादींच्या अनेक प्रतिमा आहेत. 

सागरी मार्गाशिवाय, भारतीयांचे चीन ला जायचे इतरही मार्ग होते. आसाम च्या कामरूप हून, ब्रम्हदेशाच्या रस्त्याने भारतीय व्यापारी चीन ला जायचे. काश्मीर च्या सुंग-लिंग हून चीन ला जाणारा अजून एक मार्ग होता. दुसर्‍या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत, दीडशे हून जास्त चीनी विद्वानांनी भारतातील संस्कृत ग्रंथांचा चीनी भाषेत अनुवाद करायला आपल्या जीवनाचे ध्येय बनवले होते. वेदांना चीनी भाषेत ‘मांग – लून’ (ज्ञान आणि बुध्दीचे विज्ञान) म्हटले जाते. अनेक ‘संहिता’ आणि ‘शास्त्रांचा’ अनुवाद चीनी भाषेत उपलब्ध आहे. गंमत म्हणजे यातील काही ग्रंथ असे आहेत, जे भारतात आलेल्या मुस्लिम आक्रांतांनी नष्ट केले होते, परंतु यांचा चीनी अनुवाद उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, ‘सांख्यकारिका’ हा ग्रंथ मूळ संस्कृत मध्ये कुठेही सापडत नाही. मात्र त्याचा चीनी अनुवाद – ‘जिन की शी लून’ (Jin Qi Shi Lun) उपलब्ध आहे. आता या चीनी ग्रंथाचा पुन्हा संस्कृत भाषेत अनुवाद केला गेला आहे. असे इतरही ग्रंथ आहेत. 

आज सुध्दा चीन मध्ये, चीनी भाषा बोलणारे, परंतु हिंदू जीवन पध्दती आणि परंपरा मानणारे लोकं राहतात. यांची संख्या तुलनेने कमी आहे. म्हणून चीन च्या पाच प्रमुख पंथांमध्ये यांचा समावेश नाही. परंतु हा समुदाय आज सुध्दा भारतीय सण आणि उत्सव उत्साहाने साजरा करतो. ‘गणेश उत्सव’ हा चीनी पध्दती ने साजरा केला जातो.  

संग्राहक : श्री अनंत केळकर   

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आजीची स्टेमसेल बॅंक….डाॅ.प्रेमेन बोथरा ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ आजीची स्टेमसेल बॅंक….डाॅ.प्रेमेन बोथरा ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

आज्जीची स्टेमसेल बॅंक !

माझी आज्जी..बहुदा पहिली स्टेमसेल बॅंकेची मुहुर्तमेढ रोवणारी स्री असेल..!

भारत खरंच बुद्धीवंताचा देश ! कित्येक पुरावे मिळतात त्याचे ! त्यापैकीच हा एक ! 

आज्जीची स्वत:ची स्टेमसेल बॅंक होती..आजी शंभरी गाठलेली !पण गाडग्यांच्या ऊतरंडीत नाव,वयाप्रमाणे सर्वांची नाळ साठवलेली ! कित्येक वर्षे ! कुठलंही प्रिजरवेटीव न वापरता ठेवलेली ! त्या प्रत्येक गाडग्यात अर्ध्यावर गवर्‍यांची राख असायची !आणि त्यात  वाळवून ठेवलेली नाळ असायची ! घरात कुणी जन्माला आलं की त्याची कापलेली नाळ सावलीत स्वच्छ पांढर्‍या कापडावर वाळविली जायची !आणि नंतर ती या राख भरल्या गाडग्यात जपून ठेवली जायची..त्याची ऊतरंड स्पेशल असायची..घुप्प अंधार्‍या खोलीत कोपर्‍यात ! अगदी माळवदाच्या थंड घरात ! मडक्यावर चुन्याने नावं लिहीलेली असायची प्रत्येकाची ! त्या ऊतरंडीला कुणाला हात लावायची मुभा नसे ! काय आहे त्यात विचारलं तरीही ऊत्तर रागातच यायचं !! 

तर अशी स्टेमसेल बॅंक गावातल्या प्रत्येकाच्या घरी तिनं सुरु केली..आणि घरात कोणाला कोणताही आजार जो पंधरा दिवसापेक्षा जास्त असला की,लोक तिला विचारायला यायचे !! मग ती ज्याची नाळ असेल ते गाडगं मागवायची अनं त्या कोरड्या नाळेला आमच्या घरी एक शाळीग्राम सदृष्य दगड होता..त्यावर ती पाण्याचे चार थेंब टाकून घासायची !आणि त्या रुग्णाला चाटण्यासाठी द्यायची !! आणि रुग्ण कांही दिवसात पुर्ण बरा व्हायचा !! 

माझ्या मोठ्या भावाला रिकेटस झालेला..!अर्थात डाॅक्टरांची ट्रीटमेंट घेऊनही फरक नव्हता..वडिल माॅर्डन सायंन्सला मानणारे !पण जेव्हा औषधांनी फरक पडत नव्हता तर त्याला त्याची नाळ ऊगाळून दिलेली..आणि तो लवकरच बरा झालेला ! (मी डाॅक्टर आहे ! कुणाला हे चुकीचं ज्ञान असेल असं वाटण्याची दाट शक्यता)..असे कितीतरी प्रसंग आलेले.तो हाय ग्रेड फिवर असो की अजून कोणता आजार..औषध एकच ! नाळेची एक मात्रा ! माझ्या आईला डिलेवरी नंतर परप्युरियल मॅनिया झालेला..!औषधोपचार झाले ! फरक नव्हता.आज्जीने आईकडच्या आज्जीकडून आईची नाळ मिळविलेली ! आणि त्याची मात्रा आईला दिलेली..आई त्यातून सुखरुप बाहेर आली !!पण आज्जीने हा प्रयोग कदाचित अशा आजारासाठी पहिल्यांदाच केलेला ! 

हे सगळे संदर्भ मला माझ्या वडिलाकडून मिळालेले ! मी माझ्या मुलांची नाळ अशीच जपून ठेवलीय !! अजून तशी गरज पडलेली नाहीये !! 

सो काॅल्ड नवे ज्ञानी मला आर्थोडाॅक्स विचारांचा म्हणतीलही हे लिहीलेलं वाचून !असं कांही नसतं हे ही म्हणतील पण सद्यस्थितीला स्टेमसेल स्मरुन ही प्रिजरवेशनची पद्धत जुनी असेलही पण त्यामागील वापराचे ज्ञान नक्कीच सारखे आहे !!स्टेमसेल अॅडव्हान्स असेलही..त्याचा बहुअंगी वापर आता खुप असेलही पण त्या जुन्या पद्धतीला जरी आज अडगळीत टाकलं गेलं असेल..तरीही त्यामागे नक्कीच खुप मोठं सायन्स होतं,आहे…ते खरंच एक पाऊल होतं जुन्या पिढीचं ! आजाराला सहज जिंकण्याचं ! विशेष माझ्या आईकडील आज्जी आणि वडीलांकडील आज्जीला दोघींनाही हे  ज्ञान होतं..पण काळाच्या ओघात हे ज्ञान मागे जरी पडलं असेल तरीही त्यातील गुढ अजून कोणी शोधलेलं नाही…आणि ते पुर्णत:विकसित होतं यात शंका नाही..त्या त्या काळाची आपली एक ओळख असतेच तसेच त्या त्या काळात गरजेनुसार विकसित झालेले सायन्सही ! 

केशरबाई अन रतनबाईंचा हा वारसा खरंच वाखणण्याजोगा आहे !! 

असे काही अनुभव आपले असतील तर जरुर शेअर करा ! स्टेमसेलचा हा जुना अवतार तितकाच भारी आहे जितका आजची सुधारित स्टेमसेल बॅकेचा आहे !!

#आज्जींनो तुम्ही आजही तुमच्या कतृत्वाने जिवंत आहात#

डाॅ. प्रेमेन बोथरा, हिंगोली.

मो 9518522393

(विचार करायला लावणारे– काहीतरी. प्रयोग करुन बघायला हवा– असे काहीतरी.) 

संग्राहक :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सत्यनारायण पूजा : काळाची गरज – भाग 2 ☆ श्री अभय शरद देवरे

? विविधा ?

☆ सत्यनारायण पूजा : काळाची गरज – भाग 2 ☆  श्री अभय शरद देवरे ☆ 

पुढे चालू

देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू.

गणपतीचा नैवेद्य ठरलेला. मोदक.

मोदकच का ?

गणेशांना आवडतो म्हणून !

का आवडतो ?

गणेश हा बुद्धीदाता आहे. आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे. बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. बाकी त्यात सोयाबीनची टरफले, नारळाची भुशी आणि शेंगदाण्याचा चोथाच असतो. जर्रा जाहीरात दाखवायची खोटी, पडले तुटून त्या डब्यावर. हे जाहिरात तंत्र या कंपन्यांना बरोब्बर माहिती आहे, त्यामुळे जाहिरातींचा मारा करून, सचीन, कपील इ. ब्रॅण्डचा वापर केला की, आपले प्राॅडक्ट खपते. चोथा खाऊनच जर वजन वाढणार असेल तर मग असली नारळ आणि शेंगदाणेच का नकोत ? नारळ आणि शेंगदाणे खाऊन तब्येत सुधारत होती. घरच्या घरी बारा बारा बाळंतपणे होत होती. टाॅनिक म्हणून काय होते ? गुळ आणि शेंगदाणे. नारळ आणि गुळ. जो आपल्याकडे नैवेद्य म्हणून दाखवला जात होता आणि आमच्याच घरातील बाल हनुमान आणि बाल गणेशांना प्रसाद म्हणून मिळत होता. भक्तीपूर्ण नैवेद्याला, कोलेस्टेरॉलच्या भीतीने बदनाम केले गेले आणि जाणीवपूर्वक आरोग्याचा व्यापार सुरू झाला.

देवीला पुरणाचाच नैवेद्य लागतो.

पुरण म्हणजे चणे. हरभरे डाळ शिजवून गुळ घालून केलेले मनगणे असो वा कडबू असोत, पुरणाची पोळी असो वा नुसते पुरण असो, आणि या सर्व नाजूक नैवेद्यावर साजूक तूपाची धार…… फक्त ताकद वाढत होती. वेगळ्या टाॅनिकची गरज नव्हती. घोड्याला काय खाद्य दिले जाते ? हरभरेच ना ? घोड्यासारखी गती आणि वाजीकर शक्ती मिळवण्यासाठी तसेच तेच खाद्य आपल्याला मिळण्याची व्यवस्था आपल्या देवांच्या नैवेद्यामधून केलेली होती. गॅस वाढतो, पित्त वाढते, जाडी वाढते म्हणून जेवणातून चणाडाळच हद्दपार केली आणि प्रोटीन पावडरचे डब्बे मात्र जिममधे खपवले जाऊ लागले. हे कधी लक्षातच आले नाही.

नागपंचमीला नागोबाला लाह्या, हळदीच्या पानात लपेटलेल्या पातोळ्या, पानगे, गोकुळाष्टमीला शेवग्याच्या पाल्याची भाजी, कोजागिरीला आटीव दूध, गुढीला श्रीखंड, हे नैवेद्य आरोग्य रक्षण करणारेच होते. नारळीपौर्णिमेला नारळीभात ठरलेलाच. नारळावरूनच ओळखली जाणारी ही पौर्णिमा!

वेगवेगळ्या ऋतुमधे येणारे वेगवेगळे सण, आणि या निमित्ताने होणारे नैवेद्य हे जणु काही आरोग्याचे बूस्टर डोसच होते. दरवर्षी नियमाने घ्यायचे आणि आरोग्य सांभाळायचे !

या लेखाच्या अनामिक लेखकाचे आभार मानावे तेवढे थोडेच !

मलाही जाणवले की इतरवेळी नाश्त्याला शिरा असतो तोच पूजेच्यावेळी प्रसाद बनतो. कसे माहीत नाही पण तेच पदार्थ वापरून तीच गृहलक्ष्मी जेंव्हा शिरा हा प्रसाद म्हणून बनवते तेंव्हा त्याची चव वेगळी लागते. कारण त्यात भक्ती उतरलेली असते. बाकी वर्षभर शिरा हा प्रसादासारखा कधीही लागत नाही.

सत्यनारायणाच्या पूजेत आवर्जून तीर्थ म्हणून दिले जाणारे पंचामृत हे शेतात बायोकल्चर म्हणून वापरले जाऊ शकते याची कल्पना आहे ? साता-यातील एक अवलिया शास्त्रज्ञ श्री शेखर कुलकर्णी यांनी त्यावर एक प्रयोग केला. त्यांनी आपल्या गच्चीवरील मातीविरहित बाग पंचामृताच्या साहाय्याने तयार केली. दूध, दही, साखर, मध आणि तूप हे एकत्र करून पंचामृत तयार केले. श्री. कुलकर्णी यांनी एका कुंडीत सर्वात खाली नारळाच्या शेंड्या टाकल्या. त्यावर दोन चमचे पंचामृत टाकले. त्यावर घरातला ओला कचरा टाकून पुन्हा दोन चमचे पंचामृत टाकले. असेच दोन थर तयार करून एक झाड सोबत असलेल्या मातीसहीत लावले. पुढील २१ दिवसात पंचामृताने कच-याचे विघटन केले आणि झाड तरारून वाढले. त्यानंतर त्यात रोजचा कचरा टाकून झाडाला वाढवले. अशा प्रकारे त्यांनी गच्चीत अनेक झाडे फुलवली आहेत. पूर्वी पंचामृत हे तुळशीच्या झाडाखाली टाकले जाई. आणि तुळशिखालील माती ही गांधीलमाशी किंवा मधमाशी चावल्यावर औषध म्हणून लावली जाई. याचा अर्थ पंचामृत हे ख-या अर्थाने अमृत आहे हे आपल्या पूर्वजांना माहीत होते.

सत्यनारायणाची पूजा मला सर्वात जास्त का आवडते ते सांगू ? या पूजेच्या निमित्ताने एकाच दिवशी जवळजवळ शंभर परिचित घरी येतात आणि घर हे घरासारखे वाटते. इतरवेळी कोणालाही घरी यायचे निमंत्रण द्या, आपण बोलावतो, लोक हो म्हणतात पण येतीलच याची खात्री नसते. पण तिर्थप्रासादाला या असे सांगितले तर आवर्जून सहकुटुंब येतात. देवाचे दर्शन घ्यायचे असल्याने कोणाच्याही मनात दुस-याबद्दल वाईट विचार नसतात. ती एक प्रसन्न संध्याकाळ असते. सर्वाना एकप्रकारची पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते. ती दिसत नाही, दाखवता येत नाही पण अनुभवता मात्र जरूर येते. आजच्या तरुण पिढीला पाच हजार फेसबुक फ्रेंड असतात पण व्यक्तिगत जीवनात भेटणे, बोलणे हे त्यांना आवडत नाही. सत्यनारायणाच्या पूजेच्या निमित्ताने त्यांना घडलेला माणसांचा सहवास हा त्यांना नक्कीच आयुष्यात उपयोगी पडतो.

एक छोटीशी पूजा, पण एवढा मोठा अर्थ सांगून जाणारी ! लोकांना एकत्र आणणारी ही पूजा काळाची गरज नव्हे काय ? आज प्रत्येकजण एकमेकांपासून शरीराने आणि मनाने दूर गेलाय. त्यामुळे आजपर्यंत नव्हती इतकी गोष्टींची गरज निर्माण झाली आहे. कोणाला पटो किंवा न पटो, या धार्मिक रूढी, परंपरा लोकांमधला आपपरभाव नाहीसा करून मानवतावाद शिकवतात. मग टीकाकार काहीही म्हणोत.

मुळात हिंदू धर्म आणि आपण म्हणजे हत्ती आणि सात आंधळे यांच्या गोष्टींसारखे आहोत. जशी ज्याची नजर तसे त्याचे आकलन ! कोणत्याही धर्मावर टीका करणे खूप सोपे आहे कारण त्या टीकेसाठी खूप बुद्धी लागत नाही, फक्त मनात द्वेष असला म्हणजे झाले. मला नेहमी प्रश्न पडायचा की हिंदू धर्मालाच का इतके टार्गेट केले जाते ? विचाराअंती लक्षात आले की लोक फळांनी डवरलेल्या झाडालाच दगड मारतात, वठलेल्या किंवा काट्यांच्या झाडाला नव्हे ! तसेच हेही…….

क्रमशः….

© श्री अभय शरद देवरे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आईचा खिसा…केदार साखरदांडे ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ आईचा खिसा…केदार साखरदांडे ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

मला लहानपणी नेहेमी प्रश्न पडायचा की बाबांना कसा खिसा असतो. त्यात ते पेन , सुट्टी नाणी, कधी कधी बंद्या नोटा ठेवतात. तसा आईला खिसा का नसतो. शाळेची फी भरताना बाबा कसे ऐटीत खिश्यातून काढून फी साठी पैसे देतात , किंवा प्रगति पुस्तकावर खिश्यातल पेन काढून ऐटीत सही करतात. तसा आई जवळ खिसा का नसतो. आणि जर असलाच खिसा तर नेमका कुठे असतो. आईला विचारलं तर ती फक्त हसायची. तुला भूक लागली असेल ना अस म्हणून पदर खोचून शिऱ्या साठी रवा भाजायला घ्यायची . त्या रवा  भाजण्याच्या वासावर भुकेशिवाय दुसरं काही सुचत नसे. एकदा खेळताना पडल्यावर पायाची जखम पुसायला कापसाचा बोळा मिळाला नाही म्हणून चक्क कॉटन च्या नव्या साडीच्या टोकाने  माझी जखम पुसून काढली आणि  कपाटातील कैलास जीवन काढून त्यातलं लोण्याच्या गोळ्या सारख मलम माझ्या जखमेवर लावलं. मला रात्री लवकर झोप यायची तेंव्हा घरातली काम लगबगीने आवरून ती तिच्या जुन्या साडीचा काठ घडी करून मला दिव्याच्या उजेडाने  त्रास होऊ नये म्हणून डोळ्यावर मांडायची आणि मला त्या साडी सारखीचं अगदी तलम निद्रा यायची. कुठे बाहेर जाताना बाबा खिशातून पैसे काढून रेल्वेची तिकीट काढायचे आणि आई मात्र खिडकीतून झो झो येणारा वारा माझ्या कानाला बसतो म्हणून माझ्या काना केसां भोवती आपला पदर गुंडाळून घ्यायची. तेंव्हाही माझं लक्ष खिडकीतल्या बाहेरच्या दृश्या बरोबर बाबांच्या खिश्या कडे असायचं. मोठा झाल्यावर मी सुद्धा बाबांसारखा खिसा शिवून घेऊन त्यात वेगवेगळ्या वस्तू ठेवणार हे ठरवून ठेवले होते. नेमकी तेंव्हाच आई पदराच्या टोकाला गुंडाळून ठेवलेली गोळी (मला तहान लागली असताना) हळूच माझ्या जिभेवर ठेवायची. तृषा पूर्ण शांत व्हायची. कधी खेळताना सर्व मुलं बॉल आणण्यासाठी वर्गणी काढत अश्यावेळी आई तिच्या पदरात बांधलेला रुपया दोन रुपया काढून देत असे आणि वर रुपया देऊन उन्ह फार आहेत पेपरमिंट खा चघळायला म्हणून सांगत असे. मित्र म्हणत तुझी आई खूप छान आहे रे तेंव्हा कॉलर टाईट होत असे. आईकडे खिसा नसताना बाबापेक्षा जास्त गोष्टी तिच्या कडे कश्या हा प्रश्न मला मला थोडा मोठा होता  होताना पडू लागला. आणि एक दिवस मला माझंच उत्तर सापडून गेलं. आईकडे खिसा असतो आणि त्या खिश्याला चौकट नसते तो आईचा पदर असतो जो कायम मुलांसाठी सुखं बांधून ठेवत असतो आणि तोच आईचा कधीही न रिक्त होणारा खिसा असतो .

 – केदार अनंत साखरदांडे

प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कशी येते मॅच्युरिटी..? ☆ संग्राहिका – डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले

? इंद्रधनुष्य ?

 ☆ कशी येते मॅच्युरिटी..? ☆ संग्राहिका – डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

(परिपक्व व्यक्तिमत्व)

  • माणूस जेव्हा दुसऱ्यांना बदलण्याऐवजी स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.
  • माणूस जेव्हा जास्त बोलण्याऐवजी समोरच्याचे ऐकून घ्यायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.
  • माणूस त्याच्या समोरचे लोक जसे आहेत तसे त्यांना स्वीकारायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.
  • प्रत्येक माणसाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा स्वतःचा असा विशिष्ट दृष्टिकोन असतो हे समजायला लागते तेव्हा माणसाकडे मॅच्युरिटी येते.
  • प्रत्येकवेळी आपणच शहाणे असल्याचा आविर्भाव आणणे माणूस जेव्हा बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.
  • माणूस काळानुसार बदल स्विकारुन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.
  • माणूस आपल्याजवळ जे आहे त्यात आनंद मानून तक्रारी करणे बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.
  • माणूस जेव्हा जबाबदाऱ्या घ्यायला आणि चुकांमधून पुढे जायला शिकतो,तसेच आपल्या चुकांचे खापर इतरांवर फोडणे बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.
  • माणूस इतरांवर जळण्याऐवजी स्वतःमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.
  • माणूस इतरांची स्वतःसोबत तुलना बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.
  • माणूस रागावर नियंत्रण ठेवून समजूतदारीने वागण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.
  • माणूस निर्णय घेतल्यानंतर चंचलपणे न वागता घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने उभे राहायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.

परिपक्व असणे म्हणजेच प्रत्येक प्रसंगात समजूतदारीने निर्णय घेणे.

आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या.

सर्वानी आनंदात राहा. आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.

संग्राहिका – डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ (1) फसवाफसवीचा डाव (2) चेटूक – सदानंद रेगे ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

?  काव्यानंद  ?

 ☆ (1) फसवाफसवीचा डाव (2) चेटूक – सदानंद रेगे ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. राधिका भांडारकर

काव्यानंद  (श्री. सदानंद रेगे यांची कविता) 

[1]

फसवाफसवीचा डाव

तुझ्या एका हातात 

ऊन आहे

एका हातात

सावली आहे

मला माहीत आहे

माझ्याशी खेळलीस

तसलाच

फसवाफसवीचा डाव

तुला श्रावणाशी 

खेळायचा आहे..

 सदानंद रेगे….

[2]

चेटुक...

श्रावणाची सर

फुलांच्या पायांनी

येते आणि जाते

चेटूक करुनी..

 

पाने झाडीतात

पागोळ्यांची लव

फुलांच्या कोषात

ओलेते मार्दव….

 

वार्‍याच्या चालीत

हिरवी चाहूल

अंगणी वाजते

थेंबांचे पाऊल…

 

पिसे फुलारते

ऊन्हाचे लेकरु

लाडे हंबरते

छायेचे वासरु….

 

अभाळी झुलते

निळाईची बाग

इंद्रधनुला ये

रेशमाची जाग…

 

आणिक मनाच्या

वळचणीपाशी

घुमे पारव्याची

जोडी सावळीशी….

सदानंद रेगे

 ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. राधिका भांडारकर

२१ सप्टेंबर हा कवी सदानंद रेगे यांचा स्मृतीदिन.

त्या निमित्ताने, त्यांच्या काव्याचा रसास्वाद—–

वास्तविक ते नाटककार,लघुकथा लेखक,व्यंगचित्रकारही होते…पण साहित्यविश्वात ते कवी म्हणून अधिक ठसले. त्यांच्या कवितेचे एक वैशिष्ट्य, वेगळेपणा म्हणजे,त्यांची मुक्त ,स्वैर कल्पनाशक्ती. वेगळा दृष्टीकोन. त्यांच्या कवितेत आढळणारा व्हिजन. मात्र त्यांच्या व्हीजनमधे त्याच त्याच मनोभूमिकेची बांधिलकी आढळत नाही .विषय एकच असला तरी कवितेतला आशय निराळा भासतो. कल्पनाशक्तीला चौफेर स्वातंत्र्य दिल्याचे जाणवते. कुठल्याही एकाच विचारात ती अडकून पडत नाही ती निरनिराळ्या कोनांतून व्यक्त होते. त्यामुळे सदानंद रेगे यांची कविता ही विशुद्ध वाटते. त्यांच्या कवितेतली भरारी अथवा कोलांटी ,यांचं कुतुहल वाटतं.

त्यांची कविता सर्वसमावेशक आहे. म्हणजे संस्कृती,परंपरा ,अस्मिता,आपली माती अशा वर्तुळात ती गिरक्या घेत नाही…ती संकुचीत नाही.विमुक्त आणि सर्वस्पर्शी आहे.मनमोकळ्या वार्‍यासारखी आहे.—-मात्र सदानंद रेगे यांची कविता ,गाभार्‍यातल्या जाड काळोखात ,प्रकाशाचे कण शोधावा तशी आहे..त्यांची कविता वाचताना जाणवतं, की कविता ही कवीचीचअसते. वाचकाचा असतो तो गर्भशोध. दडलेल्या आशयाचा शोध. कधी वाचकाची,कवीच्या मानसिकतेशी नाळ जुळते तर कधी ती अधांतरीही राहते. पण लहान ओळी,ओळीत गुंफलेले शब्द कधी मऊ,कधी भेदक–..पण त्यातून तयार झालेला हा काव्यसर वेगळ्याच तेजाने चमकतो.थक्क करतो.

फसवाफसवीचा डाव आणि चेटूक  या दोन्हीही कवितेत श्रावण आहे. पण एकाच श्रावणाच्या माध्यमातून ,व्यथेला पाहण्याची, विचार करण्याची दृष्टी मात्र वेगळी आहे. फसवाफसवीचा डाव हे  मुक्तछंदातील लघुकाव्य आहे.आणि चेटूक हे षडाक्षरी (षटकोळी) किंवा अक्षर

छंद काव्य आहे…

‘तुझ्या एका हातात ऊन आहे

एका हातात सावली आहे…’

–नियतीनं आयुष्यभर चकवलं. सुखदु:खाचे चटके दिले. चढउतार दाखवले. उन सावल्यांतून फिरवलं–असं हे विरोधाभासी आयुष्य जगताना, कवीला कुठेतरी श्रावणातल्या उनसावल्या जाणवतात. आणि हा फसवाफसवीचा खेळ मानवी जीवनात जसा आहे तसा निसर्गातही आहे याची समज मिळते. अगदी दहाच ओळीतला हा मानवी जीवनाचा निसर्गाशी असलेला संबंध श्रावणाकडे बघण्याची एक पलीकडची दृष्टी देतो. मानव आणि निसर्ग याची घातलेली ही सांगड मनात राहते.

‘श्रावणाची सर

फुलांच्या पायांनी

येते आणि जाते

चेटुक करुनी….’

—वास्तविक फुलं म्हणजे कोमलता. चेटूक या शब्दात उग्रता आहे. म्हणजे हे दोन्ही शब्द अर्थाने विरोधाभासी असले तरी कवितेच्या मानसिकतेत ते चपखल बसतात.

—मात्र सदानंद रेगे यांच्या फिनीक्सदुपाररस्ते, ब्रांकुशाचा पक्षी*, वगैरे कवितातून आढळणारे निखारे,ठिणग्या नागडेपणा ,काठिण्य  हे ,चेटुक या कवितेत आढळत नाही. त्यामानाने ही कविता सौम्य आहे.

–पागोळ्यांची लव, ओलेतं मार्दव, हिरवी चाहुल, थेंबांचं पाउल, उन्हाचं लेकरु, छायेचं वासरु, हे शब्द एकेका घुंगरासारखे मनावर नाद उमटवतात.कवितेतला हा इंद्रधनु, रेशमी श्रावण मनावर तरंगत असतानाच, शेवटच्या कडव्यात मात्र ,कवीच्या एकाकीपणाशी येउन थबकतो.

‘आणिक मनाच्या

वळचणीपाशी

घुमे पारव्याची

जोडी सावळीशी…’

—हा रेशीम मुलायम श्रावण, कुठेतरी तुटलेल्या क्षणांपाशी येउन थांबतो.अन् आठवणींचे हे  चेटुक कवीला वेदना देते असं वाटतं…

–त्यांचीच ‘अक्षरवेल’ या काव्यसंग्रहातील श्रावणावरचीच आणखी एक कविता सहज आठवते…

‘आला श्रावण श्रावण

गुच्छ रंगांचे घेउन

आता मेल्या मरणाला

पालवी फुटेल

गोठलेल्या आसवांना

पंख नवे येतील….’

–अशी आहे सदानंद रेगे यांची कविता!!—एकांगी किंवा एकात्म नसलेला ,विविधांगी,अनेक कोनी  व्हीजन त्यांच्या कवितेत सातत्याने जाणवतो….विषय एक पण अंतरंग निराळे…

— ‘ सूर्याच्या नरडीवर उमटलेले सावल्यांचे व्रण…” अशा पंक्तीही जाणीवेला अंकुर फोडतात…आणि एक तीव्र कळ घेउनच, सदानंद रेगे यांची कविता जाणीवेच्या पलीकडे जात राहते….

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सत्यनारायण पूजा : काळाची गरज – भाग 1 ☆  श्री अभय शरद देवरे

? विविधा ?

☆ सत्यनारायण पूजा : काळाची गरज – भाग 1 ☆  श्री अभय शरद देवरे ☆ 

नुकतीच घरी सत्यनारायणाची पूजा यथासांग पार पडली. ही पूजा गेल्या कित्येक वर्षांपासून दर श्रावणात आणि मंगल कार्य झाल्यावर आमच्या घरात केली जाते. इतक्या वर्षात ती अंगवळणीही पडली आहे पण सोशल मीडियावर व्यक्त होणे जसे सोपे झाले तसे हिंदू धर्मावरील जहरी फुत्काराना उधाण आले.काही महाभाग तर केवळ त्या एका उद्दिष्टासाठीच जगू लागले. ( त्यांना त्यासाठी पैसे मिळत असावेत बहुतेक ) श्रावणापासून सुरू झालेले सण धुलीवंदनाच्या दिवशी संपतात पण सन्माननीय टीकाकार मात्र वर्षभर या सणांवर टीका करण्याचे इतिकर्तव्य वर्षभर पार पाडतात. कॉपीपेस्ट केलेल्या म्हणजेच चोरलेल्या या पोस्ट एखाद्या संसर्गजन्य आजाराप्रमाणे सर्वत्र पसरतात. त्यात मांडलेले मुद्दे इतके प्रभावी असतात की माझ्यासारख्या श्रद्धेय माणसाच्याही श्रद्धा डळमळीत होऊ पहातात. हिंदू धर्म म्हणजे जातीयवादी, परंपरावादी, स्पृश्यास्पृश्य मानणारा, एका विशिष्ठ समाजाच्या हातात सर्व अधिकार ठेवणारा अशा अनेक शेलक्या शेलक्या विशेषणांनी संभावना केली जाते. कोण तो मनू….जो  काळा का गोरा हे माहीत नसतो किंवा त्याचा तो कुप्रसिद्ध मानला गेलेला ग्रंथ मुळापासून संस्कृतमधून वाचणे तर सोडाच पण साधा पाहिलेलाही नसतो, तरी पण त्याच्यावर आणि त्याला चिकटवलेल्या जातीवर, पीएचडी केल्यासारखे असंख्य महामहोपाध्याय तुटून पडतात. तेंव्हा असे वाटून जाते की खरेच आपला धर्म इतका वाईट आहे का ?

मग मी माझ्या अल्पबुद्धीने या धर्मातील रूढी परंपरांमागचा विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. विचार करु लागलो की कोडी सहजपणे सुटत जातात आणि माझ्या प्राणप्रिय धर्माची महानता समजू लागते. दरवर्षी घरात होणारी सत्यनारायणाची पूजा हीसुद्धा अशीच एक आदर्श परंपरा आहे. मला माहित नाही की सत्यनारायण या नावाचा देव खरच आहे का ते ! मला माहित नाही की तो साधुवाणी, कलावती किंवा लीलावती ही पात्रे खरेच होती का ? मला माहित नाही की हे व्रत न पाळल्यामुळे देव शिक्षा करतो का ते ! तरीही मी पूजा करतो कारण त्यातून मिळणारे आत्मिक समाधान मला शब्दात वर्णन करता येत नाही पण अनुभवता मात्र जरूर येते.

नेमके प्रत्येकाच्या घरात काय घडते जेंव्हा सत्यनारायणाची पूजा केली जाते तेंव्हा ? पूजा होणार म्हणून दोन दिवस अगोदर गृहिणी घराच्या साफ़सफाईला लागते. जाळेजळमटे, अडगळ काढून टाकली जाते. स्वच्छतेतून निर्माण होणारी धार्मिकता घरात वावरू लागते. पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीविक्रीतून आपोआपच मार्केटमध्ये पैसे फिरू लागतो. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सण अनेक लोकांना अन्नाला लावतात. सत्यनारायणाची पूजा हीसुद्धा त्याला अपवाद नाही. ही पूजा जर कोणी नाही केली तर फुले, फळे, सुपारी, हळद, नारळ, तांदूळ, गहू, रवा, साखर दूध, आदी उत्पादकांना त्याकाळात वाढीव ग्राहक मिळणार नाही.

पूजेसाठी लागणा-या दुर्वा, पत्री, प्रसाद यांचे केवळ धार्मिक महत्व नाही तर या सगळ्या गोष्टींचा औषधी उपयोग आहे. म्हणूनच शास्त्रकारांनी पूजेत वापर करायला सांगितला आहे. हिंदू धर्मातील कोणतीही रूढी, परंपरा ही माणसाला निसर्गाच्या जवळ नेते आणि निसर्गाचे संवर्धन करायला शिकवते. पूजेनंतर वाटला जाणारा प्रसाद हा अनारोग्यातून आरोग्याकडे जाणारा एक राजरस्ताच आहे. प्रसाद भक्षण करून आपण विविध रोगांना आपले भक्ष्य बनू देत नाही हे आपल्या लक्षातच येत नाही. सोशल मीडियावर एक लेख आला होता तो जसाच्या तसा समोर ठेवत आहे.

देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू.

क्रमशः….

© श्री अभय शरद देवरे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाबासाहेब पुरंदरे….. एक आठवण ☆ श्री विजय गावडे

श्री विजय गावडे

? मनमंजुषेतून ?

☆ बाबासाहेब पुरंदरे….. एक आठवण  ☆ श्री विजय गावडे ☆  

ज्यांचे पूर्ण जीवन शिवशाहीमय झालंय त्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेना मानाचा मुजरा.

साधारण विसेक वर्षांपूर्वीचा काळ. असेच पावसाळ्याचे दिवस होते. धो धो सरी कोसळत होत्या. पाय मात्र दादरच्या राजा शिवाजी विद्यालयच्या दिशेने चालत होते. आज शिवशाहीरांच व्याख्यान होणार होतं. विषय होता ‘महाराजांची Time Management ‘ प्रमुख पाहुणे होते रिझर्व बँकेचे त्या वेळचे संचालक डॉ. नरेंद्र जाधव.

राजा शिवाजी विद्यालय सभागृह तुडुंब भरलेलं. ओल्या अंगानिशी लोक मिळेल तिथे स्तब्ध. ज्यांना जागा मिळाली नव्हती ते उभे होते. सभागृहात प्रवेश न मिळालेले कमी भाग्यवान क्लोज्ड सर्किट टीव्ही वर समाधानी होते.

महाराजांच्या Time Management वर बोलणारे बाबासाहेब स्वतःही दिलेल्या वेळेच्या अगोदर हजर होते. मात्र पावसामुळे झालेल्या वाहन कोंडीत अडकलेले डॉ. नरेंद्र जाधव मात्र थोडे उशिरा पोहोचले. आपणांस झालेल्या उशिराबद्धल त्यांनी शिवशाहीरांशी दिलगिरी व्यक्त केलेली दिसली.

पावसाच्या पाण्याने तुडुंब झालेल्या जलाशयाप्रमाणेच ओसंडून वाहणाऱ्या सभागृहामध्ये शांतता पसरली आणि शिवशाहीरांची ओघवती वाणी बरसु लागली.

“ वेडात मराठे वीर दौडले सात “ या गीतात वर्णिलेली प्रतापराव गुजर आणि मंडळीची ती अंगावर शहारे आणणारी गोष्ट कथन करतांना शिवशाहीर तल्लीन झालेले आणि एक एक पदर तारखानीशी उलगडून दाखवताना त्यांच्या वाणीला चढत जाणारी धार श्रोत्यांना शिवकाळात घेउन जाणारी. 

बाबासाहेबांच्या वाणीतून तो प्रसंग तर जीवन्त झालाच परंतु वेळेच्या काटेकोर अंमल बजावणीविना प्रतापराव आणि मंडळींना महाराजांच्या खपामर्जीला कसे बळी पडावे लागले हे शिवशाहीरांच्या तोंडून ऐकण्याचे भाग्य आम्हाला त्या दिवशी लाभले.

सम्पूर्ण आयुष्य शिवशाही आणि छत्रीय कुलवतन्स छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोवतीच ज्यांनी खर्ची घातलं त्या या महाराष्ट्र भूषण ऋषीतुल्य व्यक्तीमत्वाला शम्भराव्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

© श्री विजय गावडे

कांदिवली, मुंबई 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares