मराठी साहित्य – विविधा ☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(चरैवेति  चरैवेति)

[नागपूर येथून प्रसिद्ध होणा-या ‘राष्ट्रसेविका’ या अंकासाठी  सौ.पुष्पा प्रभू देसाई यांच्या भारतीय रेल्वेवरील लेखाची निवड झाली आहे. तो आपल्या वाचनासाठी चार भागात देत आहोत.]

भा–  र –त – ज्ञान आणि भक्ती मध्ये रमणारा, तो भारत. भारतीयांच्या चौकसबुद्धी मुळे भूमिती शास्त्र, ज्योतिषशास्त्र, गणित ,रसायन शास्त्र, वैद्यकशास्त्र, संगीत, साहित्य, कला अशा अनेक शास्त्रांनी, भारताला सौंदर्य आणि संपन्न बनविले.  अनेक गोष्टीत भारत समृद्ध होता. आणि आहे .त्यापैकीच आजच्या काळातील समृद्धी म्हणजे भारतीय रेल्वे.

भारतीय रेल्वेचे जाळे म्हणजे देशातील रक्ताभिसरण संस्था.’ लाईफ लाईन ‘असे म्हणायला हरकत नाही .त्याचा श्रीगणेशा झाला तो इंग्रजांच्या कारकीर्दीत. ती एक इंग्रजांनी दिलेली  देणगी आहे असे म्हणायला हरकत नाही. पहिला आराखडा तयार झाला, तो     १८32 मध्ये. पुढे’,’ रेड हिल’ नावाची पहिली रेल्वे  १८ 37 साली धावली . १८४४  मध्ये लॉर्ड हार्डिंग यांनी खाजगी व्यावसायिक मंडळींना रेल्वे चालू करण्याची परवानगी दिली . दोन रेल्वे कंपन्यांना  इस्ट इंडिया मदत करायला लागली.१८५१मधे सोलनी अँक्वाडक्ट रेल्वे ,रुरकी येथे बांधण्यात आली.१८५६मधे मद्रास रेल्वे कंपनीची स्थापना झाली आणि दक्षिण भारतात रेल्वेचा विकास सुरू झाला .१८५७ मधे पहिली प्रवासी गाडी बोरीबंदर ते ठाणे (३४कि. मि.) अशी धावली. त्याची चर्चा ब्रिटनच्या वर्तमानपत्रातही आली. साहिब, सिंध ,आणि सुलतान अशी त्या वाफेच्या इंजिनांची छान नावे ठेवून बारसे झाले. आता रेल्वेच्या बाळाने बाळसे धरायला सुरुवात केली. पुढे हावडा ते हुगळी (२४कि.मी.) नंतर १८६४ मधे  कलकत्ता ते अलाहाबाद–दिल्ली असा लोहमार्ग पूर्ण करून १८७०मधे गाडी त्यावरून धावायला सुरुवात झाली .१८७५ मधे ९१०० कि.मि.चे अंतर स्वातंत्र्यापर्यंत४९३२३ कि.मि. पर्यंत पोचले.१८८५ मधे भारतीय बनावटीचे  इंजीन  बनविण्यास सुरुवात झाली. आणि बाळस  धरलेलं बाळ आता चालायला लागलं. १९४७ पर्यंत भारतात ४२ रेल्वे कंपन्या होत्या. स्वातंत्र्यानंतर १९५१मधे त्या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून, ताठ मानेने भारतीय रेल्वे मानाने मिरवू लागली. स्वातंत्र्यानंतरही तिच्या विस्ताराचा वेग फारसा वाढला नाही. तरी विकास कमी झाला नाही. भारतीय रेल्वे देशाच्या प्रगतीशी जोडली गेली आहे.

पूर्वीच्या वेगवेगळ्या भागांचे एकत्रीकरण करून, त्याचे सहा भाग पाडले गेले .तरीही इतक्या मोठ्या  पसार्याचे  व्यवस्थापन करणे कठीण, म्हणून त्याचे आणखी सोळा-सतरा भाग पाडले गेले.

1) उत्तर रेल्वे–मुख्य ठिकाण दिल्ली.२)उत्तर पूर्व –गोरखपूर. ३)उत्तर पूर्व सीमा -गोहाटी. ४) पूर्व रेल्वे- कलकत्ता. ५)दक्षिण पूर्व-कलकत्ता.६) दक्षिण मध्य-सिकंदराबाद.७) दक्षिण रेल्वे–चेन्नई.८) मध्य रेल्वे–पुणे.९)  दक्षिण पश्चिम–हुबळी.१०)उत्तर पश्चिम–जोधपूर.११) पश्चिम मध्य–जबलपूर.१२) उत्तर मध्य–अलाहाबाद.१३) दक्षिण पूर्व मध्य–बिलासपूर.१४) पूर्व तटीय–भुवनेश्वर.१५)  पूर्व मध्य–हाजिपूर.१६) कोकण रेल्वे–बेलापूर. कोकण रेल्वे भारतीय रेल्वे बोर्डाच्या नियंत्रणाखाली वेगळी संस्था आहे. सोयीसाठी प्रत्येक रेल्वे विभागाने पुन्हा ६४ भाग पाडले आहेत. उपनगरीय प्रवासी वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे प्रणाली वापरली जाते. मुंबई, कलकत्ता, चेन्नई, हैदराबाद ,पुणे येथे ती कार्यरत आहे. मुंबई, कलकत्त्याच्या उपनगरीय वाहतूकीच्या गाड्या स्वतंत्र उड्डाण पुलासारख्या मार्गावरून धावतात. मुंबई हे ठिकाण पश्चिम मध्य आणि हार्बर वर येत असल्याने मुंबईकर उपनगरीय सेवेवर अवलंबून असतात. तिच्यावर त्यांचा खूप जीव आहे. त्यामुळे ही सेवा मुंबईची नस मानली जाते.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नानीची भांडी ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ नानीची भांडी ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

मी लहान असताना आमच्या शेजारच्या घरमालकीण (जिला सगळे नानी म्हणत) त्या माझ्या नानीची ही एक आठवण. एकंदरीत चार भाडेकरूंची मालकीण होती तरीही ती घरातली सगळी कामं स्वतःच करायची आणि ते ही अगदी आत्मीयतेनं. आपण शिकलो नाही पण मुलांना शिकवायचंय तर पैसा साठवायला हवा ही जाणीव तिला होती. शिवाय अजून एक गोष्ट म्हणजे नानीच्या मनासारखी स्वच्छता, टापटीपपणा दुसऱ्या कुणाला जमणं अवघडचं.  स्वच्छतेचं तिला व्यसन होतं असं म्हटलं तरी चालेल. याची छोटी झलक तिच्या भांडी घासण्यात दिसायची. 

रोज रात्री अंगणात गोष्टी ऐकायची आमची वेळ आणि भांडी घासण्याची नानीची वेळ एकच असायची. त्यामुळे गोष्टीला आपोआपच बॅकग्राऊंड म्युझिक मिळायचं. अजूनही ते दृश्य लख्खं आठवतं. रात्रीचं जेवण झालं की नानी भांड्यांचा ढिगारा घेऊन अंगणात यायची. ढिगाराच असायचा. कारण एक तर माणसं जास्त असायची आणि त्यात नानीचं शाकाहारी जेवण आणि इतरांचं मांसाहारी जेवण यांची भांडी वेगळी असायची. मागच्या अंगणात दोन सार्वजनिक नळ होते त्यातल्या एका नळावर नानीचं भांडी घासण्याचं काम चालायचं. नानी भांडी घासता घासता गोष्टीत रस दाखवायची आणि मी तिच्या भांडी घासण्यात. 

कधीकधी गोष्ट नसेल तर माझ्या आणि नानीच्या गप्पा सुरू व्हायच्या. नानीला बोलायला खूप लागायचं. ती मला बोलतं करायची. शाळेतली एखादी गोष्ट सांग, अभ्यास केला का सांग, किंवा अजून काही खेळातली गंमत, मैत्रिणीशी भांडण झालं असेल तर असं सगळं काही त्या भांडी घासण्याच्या कार्यक्रमात बोलणं व्हायचं. 

पण कधीकधी तिचा मूड नसायचा. तेव्हा मी विचारायचे… 

“नानी आज तू बोलत का नाही?” 

“दमले आज मी”.  

“मग मी करते ना तुला मदत”.  

“कशाला पुढं बाईच्या जन्माला हे करावं लागतंच. आतापासून नको. त्यापेक्षा तू श्टोरी सांग.”

आणि मग मी तिला गोष्ट सांगायचे. पण माझं लक्ष गोष्टीपेक्षा नानीच्या भांडी घासण्यात अधिक असायचं. एकंदरीतच ती ज्या पद्धतीनं भांडी घासायची ते पाहून असं वाटायचं नानीचा या भांड्यांवर खूप जीव आहे.

एखादा माणूस पूजा जेवढ्या भाविकतेनं करतो ना तसं नानी भांडी घासायची. पूजेचं कसं एक तबक असतं… त्यात फुलं-पत्री, हळद-कुंकू आणि पूजेचे इतर साहित्य ठेवलेलं असतं तसं नानींच भांडी घासण्याचं सामान एका ताटलीत नीट ठेवलेलं असायचं. (हा! नानीच्या कुठल्याही अशा सामानाला हात नाही लावायचा नाही तर मग काय खरं नसायचं.) नारळाच्या शेंड्या, भांडी घासायची राख, चिंचेचा कोळ, थोडं मिठ  आणि एका मोठ्या भांड्यात गरम पाणी. असा सगळा जामानिमा घेऊन, नानी त्या त्या भांड्यांना त्या त्या पद्धतीनं स्वच्छ करायची. कुठलं भांडं, कसं साफ करायचं, तसंच का साफ करायचं अशा माझ्या प्रश्नांच्या सरबत्तीला ती प्रेमानं तोंड द्यायची. आणि भांडी धुऊन झाली की त्यातलंच एक स्वच्छ ताट, मला देऊन म्हणायची,  

“बघ बरं, यात तुझा चेहरा सपष्ट दिसतो का?”

मी ते ताट हातात घेऊन चेहरा बघायचे आणि ‘हो’ म्हणायचे. मग नानीचा चेहरा खुलायचा. तेव्हा मला याची गंमत वाटायची. पण आज कळतंय तिला दिवसभराच्या श्रमाचं सार्थक झाल्यासारखं वाटत असेल. 

लॉकडाऊनच्या काळात भांडी घासताना नानीची नकळत आठवण आली तशी मी लहान होऊन पुन्हा नानीच्या अंगणात गेले. नानीशी आणि तिच्या भांड्यांशी संवाद साधू लागले.

भांडी

किती निगुतीने घासत असते बाई

आपल्या घरातली भांडी, 

ती भांडी म्हणजे केवळ वस्तू नसतात; 

तर त्या असतात घरातल्या माणसांच्या ‘तृप्ततेच्या खुणा’. 

म्हणूनच माणसांच्या तऱ्हांप्रमाणेच ती ओळखत असते भांड्यांच्या ही तऱ्हा. 

त्यांच्या नितळतेसाठी चांगल्यातला चांगला साबण आणि चरा पडू न देणारी घासणी वापरते.

खरकटं काढून, स्वच्छ आंघोळ घालून, सुगंधी साबणाने घासून, धुवून काढते.

आणि काही वेळासाठी का होईना पण त्यांना पालथं निजवते.

दूध, तेल, तूप, या स्निग्धता जपणाऱ्या भांड्यांवर तर खास जीव तिचा.

ऊन ऊन पाण्याने त्यांचे सर्व अंग शेकून त्यांच्या ओशटपणाचा थकवा ती घालवून टाकते.

इतकंच काय, तिला माहीत असतात तांब्या-पितळ्याच्या भांड्यांच्याही व्यथा.

म्हणूनच त्यांना हाताळताना ती बोटभर का होईना चिंच आणि मीठ यांनी त्यांची दृष्ट काढते. 

मग त्यांच्या तेजस्वी रुपाने स्वतः च झळाळून उठते. 

किती निगुतीने घासत असते बाई, 

आपल्या घरातली भांडी, 

जाणून त्यांच्या तऱ्हा.

 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ख-या इंजिनियर तर सगळ्या महिलाच ☆ संग्रहिका – सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ ख-या इंजिनियर तर सगळ्या महिलाच ☆ संग्रहिका  – सुश्री मीनल केळकर ☆ 

ख-या इंजिनिअर तर सगळ्या महिलाच——.

ख-या इंजिनिअर तर सगळ्या महिलाच आहेत—-.

डब्याचं झाकण उघडत नसेल तर कोणत्या बाजूने दणका घालायचा ते तिलाच माहिती—-..

निसटणारी पक्कड कशी पकडायची——…

डुगडुगणारं पोळपाटाचा पाट स्थिर कसा करायचा——…

गळणारा नळ बंद करताना कसा हळुच रिव्हर्स करायचा——.

गॅस शेगडी कमी जास्त करताना मध्येच बंद पडत असेल तर, बंद न पडू देता कशी वापरायची—–..

संपलेल्या पावडरच्या डब्यातून शेवटच्या कणापर्यंत हातावर आपटून कशी पावडर काढायची——..

अशा एक ना अनेक कुशलतेची कामं करणाऱ्या—— 

——— समस्त महिला इंजिनिअर्स  ना खूप  खूप शुभेच्छा

 

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कलास्वाद ☆ भेंडाच्या कलाकृती ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते

सौ.वंदना अशोक हुळबत्ते

? कलास्वाद ?

☆ भेंडाच्या कलाकृती ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆

आजच्या कलास्वाद मध्ये  एक दुर्लक्षीत विषय घेणार आहे  तो म्हणजे ‘भेंडाच्या कलाकृती’.

भेंड म्हणजे काय? हे आधी समजून घेवू.भेंड म्हणजे मऊ लाकूड त्याला ‘सोलाऊड’ ही म्हणतात. हे लाकूड चिपाडा सारखे असते. चिपाड बाहेरू पिवळसर टणक आतून पांढरे असते . तसेच भेंड ही बाहेरून तपकिरी आणि आतून पांढरे शुभ्र. ते अतिशय मऊ आणि हलके असते. त्याला वेगवेगळे आकार देता येतो. खोडाचे गोल पातळ पापुद्रे अखंड स्वरूपात कापतात. तो गोल बाजारात मिळतो.त्याच्या लांब अखंड पट्टया ही बाजारात मिळतात. आपल्या गरजे नुसार वापरता येतात. या पट्टया पासून जाई, जुई , निशिगंध, गुलाब, मोगरा इ.फुले बनवता येतात.

विशेष म्हणजे ओडीसा शास्त्रीय नृत्यात नर्तकी याच भेंडा पासून तयार केलेले दागिने वापरतात. तिथे या भेंडा पासून वेगवेगळे दागिने बनवतात ते खुप आकर्षक असतात. त्यांना धार्मिक महत्त्व आहे. आपल्या भागात ही पूर्वी बांशिंगाच्या  सजावटीसाठी भेंड वापरत.

मी या भेंडापासून म्हणजेच सोलाऊड पासून वेगवेगळ्या फ्रेमस तयार करते. काळ्या कापडावर भेंडाची फुले पाने सुंदर दिसतात. कोंबडा कोंबडी आणि तिची पिल्ले, मोर इ.चित्रे भेंडातून तयार करते. प्रथम आवश्यकते नुसार काच घेते. त्याला गर्द काळा, निळा किंवा  तपकिरी रंग देते. मग त्यावर चित्रे काढून त्यावर सोलाऊड कापून चिकटवते व चित्र तयार करते. काम कौशल्य पूर्ण असल्याने बराच वेळ लागतो ही चित्रे तयार करताना आनंद वाटतो. चित्र पूर्ण झाल्यावर फ्रेम केली जाते. फ्रेमच्या आकारा नुसार मोराची रचना बदलते. दोन, तीन, चार, पाच मोर चित्रात दाखवते. काळ्याभोर पार्श्वभूमीवर हे चित्र अधिक उठून दिसते. या चित्राने घरातील हाॅलची शोभा निश्चित वाढते. जोग सरांच्या कलेचा वारसा मी आज जोपासत आहे.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

सांगली

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वाचन आणि अभिवाचन ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

? विविधा ??‍?

☆ विविधा ☆ वाचन आणि अभिवादन… ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

वाचन हा शब्द वाचनाची रुची असणार्यासाठी आनंददायी, उत्साहवर्धक आणि मनापासून आवडता असा आहे . मात्र काही जणांसाठी दुपारच्या वेळी वर्तमानपत्र ‘ किंवा पुस्तक डोळ्यासमोर धरले की निद्रा प्रसन्न होते असा अनुभव ! त्यांना लाभणारा आनंद आगळा वेगळा ! पण वाचाल तर वाचाल हेच त्रिवार सत्य आहे .

अर्थात वाचाल तर वाचाल हे एखाद्या रिक्षाच्या – ट्रकच्या मागील बाजूला लिहिले असते, ते न वाचण्यासाठी – किंवा न वाचणाऱ्यांसाठी ! कारण मागून येणारा गाडीवाला हे वाचेल की आपली गाडी चालवण्याकडे लक्ष देईल ?

काही का असेना,वाचन हे प्रत्येकासाठी अतिशय आवश्यक,उपयुक्त,विचारांना प्रगल्भता आणणारे आणि मन प्रसन्न करणारे असतेच असते. ज्याला वाचनाची आवड असते,त्याला कधीही कुठेही कंटाळा येत नाही,तो आपला आपला वेळ झकास घालवू शकतो आणि कायम ताजातवाना राहू शकतो .

वाचनाचे प्रकारही खूप आहेत बरं!रस्त्यावरून जाताना दुकानाच्या पाट्यांचे वाचनही मनाला रिझ वते .शाळेमध्ये नुकताच इंग्रजी शिकायला सुरुवात केलेला एक मुलगा,एसटी स्टॅण्ड जवळील पाट्या वाचून बुचकळ्यात पडला. त्याला समजेना या भागामध्ये लोडगे आडनावाचे इतके लोक कसे?तो पाट्या वाचताना Ram Lodge,श्रीकृष्ण लोडगे, शिवाजी  लोडगेअसे वारंवार लोडगे लोडगे येत होते .पुढच्या इयत्तेत गेल्यानंतर त्या स्पेलिंग चा उच्चार आणि अर्थ त्याला समजला आणि त्याला आपल्या बाल वाचनाचे हसू आले .

वाचन होण्यासाठी प्रामुख्याने आपले डोळे चांगले हवेत .तरच आपण वाचू शकतो .लहान वयात एकदा का वाचनाची गोडी लागली की त्या व्यक्तीला तहान भूकही लागत नाही .आणि नुसतेच खायला मिळाले,वाचायला नाही मिळाले तरी त्याला रोजचे जगणे नीरस वाटायला लागते.. गोडी निघून जाते. वाचनाचे कितीतरी फायदे आहेत. व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्याच्यासारखे दुसरे साधन नाही. वाचन करणारा चांगले वाचतोच पण त्याच बरोबर दुसऱ्याचे बोलणे ऐकतो सुद्धा .आपलेच घोडे जाऊदे पुढे !असे करत नाही .

मुख्यतः वाचन हे स्वतःसाठी होते .अभिवाचन ही त्यापुढची महत्त्वाची पायरी आहे .अभिवाचन यामध्ये वाचन आहेच आहे,पण हे वाचन स्वतःबरोबर दुसर्‍यांसाठीच आहे. ऐकणाऱ्या चे कान तृप्त करण्याची, मन उल्हसित करण्याची, माहिती समजून देण्याची जबरदस्त ताकद अभी वाचनामध्ये असते. सहसा आपणअभिवाचन”आकाशवाणी” वरून ऐकतो. अभिवाचना मध्ये फक्त वाचकांचे डोळे काम करत असतात आणि असंख्य श्रोत्यांचे कान आणि मन काम करत असतात.श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची ताकद, अभी वाचकाच्या वाचनामध्ये,आवाजामध्ये,उच्चार यांमध्ये असते.ही एक दोन बाजूंनी होणारी प्रक्रिया  असते .अभी वाचकाला वाचनाची आवड तर पाहिजेच पण ते वाचन बिनचूक हवे -एकही शब्द जराही चुकून चालत नाही .चुकलाच तर श्रोत्यां पेक्षा त्या वाचकालाच जास्त अपराधी वाटते .विशेषतः अंधांना,निरक्षरांना. आणि गृहिणींना या अभिवाचनाचा जास्त फायदा होतो. त्यांना बसल्या जागी, सहज नवीन माहिती, साहित्य कानावर पडते. अन त्यांच्या मनावर कोरले जाते. म्हणून आवड असणाऱ्याने वाचनाबरोबर अभी वाचनाची सवय लावून घेतली. तर त्याच्या कडून एक प्रकारे समाज सेवा घडू शकते.

वाचन हे फक्त शब्दांचे होऊ शकते असे नाही तर चित्रांवरून ही आपण वाचन करू शकतो .विशेषतः लहान मुलांना चित्र वाचनाचा फार फायदा होतो .नवीन नवीन वस्तूंचा परिचय होतो,माहिती होते आणि आपोआप ज्ञानामध्ये भर पडते.

चला तर पुन्हा एकदा लहानांपासून मोठ्यांपर्यंत वाचन आणि अभि वाचनाचे ओळख करून देऊ या आणि आपण हे दोन्ही प्रकारे वाचू या .आयुष्यातला आनंद वेचु या .

अर्थात हे विचार सुद्धा जो कोणी वाचेल त्यालाच पटेल.

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समाराधना…अभय आचार्य ☆ संग्राहिका : सौ. स्मिता पंडित

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ समाराधना…अभय आचार्य ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित ☆ 

समाराधना 

गोविंदरावांच्या समाराधनेच कौतुक हा गावातल्या गप्पांचा नेहेमीचा विषय. नित्य अन्न संतर्पण होत असे . दुपारी बारा वाजता पहिली पंगत बसली की  चार वाजून जाईस्तोवर पंगती सुरूच असत. स्वतः गोविंदराव पंगतीत फिरून सावकाश होऊ द्यात म्हणत असत . मोठे दत्त भक्त असा गोविंदरावांचा लौकिक होता . दत्त महाराजांच्या कृपेने मला काही कमी पडलं नाही, तेव्हा मी देखील दानधर्मात काही कमी करणार नाही हा त्यांचा विचार असे .

पंगतीत दत्त महाराजांची पदे म्हटली जात आणि अनेकदा स्वतः गोविंदराव गुरुचरित्रातील एखादा कथाभाग पंगतीत येऊन सांगत असत . त्याच गावी एक अत्यंत गरीब अशी म्हातारी राहत असे . फाटकं  तुटकं नेसून ती त्या वाडयाच्या दाराशी येऊन बसे. सर्व पंगती झाल्यावर उरलेले पदार्थ ती घेऊन जात असे .ती अन्न घेऊन जाताना नेहेमी म्हणे, “अरे दोघाना पुरेल इतकं दे रे बाबा. “  ती झोपडीत एकटीच राहणारी, मग दुसरा कोण हा प्रश्नच असे .असेल कोणा प्राण्यासाठी म्हणून सर्व दुर्लक्ष करीत . 

ती झोपडीत आल्यावर दार लावून घेत असे . झोपडीत एक जीर्ण अशी दत्त महाराजांची तसबीर होती . दत्त महाराजांना त्या अन्नाचा नैवेद्य दाखवीत असे. आणि म्हणे, “ दत्ता, दमला असशील ! ये S खा दोन घास माझ्या बरोबर “  एक मंद अशी चंदन सुगंधाची झुळूक त्या झोपडीत शिरे . एक दिवस चुकून दार लावायला म्हातारी विसरली आणि हे सर्व एका मनुष्याने पाहिले . त्याने ताबडतोब ही  बातमी गोविंरावांपर्यंत पोहोचवली . ‘ आपल्या अन्नातील उरलेल्या अन्नाचा नैवेद्य दत्त महाराजांना ???’  ही  कल्पनाच त्यांना सहन होईना . 

त्यांनी त्वरित  मुदपाकखान्यातील सर्व सेवकांना फर्मान सोडले, उद्यापासून त्या म्हातारीला काहीही देऊ नये. झाले — म्हातारीला दटावून सेवकांनी हाकलून दिले . आपल्याला खायला काही नाही 

यापेक्षा दत्त उपाशी या जाणिवेने म्हातारी कळवळली. इकडे दत्त महाराजांची नित्य पूजा करणाऱ्या पुजारीवर्गाला त्याच रात्री दत्त महाराजांचा दृष्टांत झाला, “ अरे मला उपवास घडतोय ,त्या गोविंदाला जाऊन सांग. “ गोविंदरावांना हा दृष्टांत निरोप मिळाला ,त्यांनी पुजारी आणि सेवक वर्गाला विचारले “ काल नैवेद्य होता ना ? “ ‘ हो ‘ असे उत्तर सर्वांकडून मिळताच ते विचारात पडले . 

दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच दृष्टांत आणि ह्या खेपेस दत्त महाराजांची मुद्रा क्रोधव्याप्त अशी . सकाळ होण्याची वाट न बघता पुजारी रात्रीच धावत वाड्यात आला . घामाने ओलाचिंब आणि अत्यंत घाबरलेला– हा काय प्रकार असावा हे जाणून घेण्यासाठी गावातील सर्वांना  सकाळी गोविंदरावांनी बोलावणे केले, तेव्हा तो म्हातारीच्या नैवेद्याची बातमी देणारा मनुष्य दिसला . तात्काळ काही तरी उमगून गोविंदरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते तडक म्हातारीच्या झोपडीकडे गेले . उपवासाने क्षीण अशा अवस्थेत म्हातारी निजूनचं होती.  तिचे पाय अश्रूंनी  धुवत गोविंदराव म्हणाले “ आजपासून नित्य नैवेद्य दाखवत जा–”.  झोपडीतील जीर्ण दत्त महाराजांच्या तसबिरीत एक बदल मात्र झाला होता. महाराजांच्या चेहेऱ्यावर मोहक हास्य दिसत होते– श्रीगुरुदेव दत्त !!!—

 – अभय आचार्य

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रतिबिंब ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे

सौ.मंजुषा सुधीर आफळे

?  विविधा ?

☆ प्रतिबिंब ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆ 

पावसाचे दिवस होते. काहीतरी१७/९/२०२१ बाजारातून आणायचे, म्हणून मी घराबाहेर पडले.त्यातच, थोडे अंतर गेल्यावर पावसाने मला गाठलेच. पाऊस कोसळू लागला. मी पण आडोशाला थोडा विसावा घेत उभी राहिले. विसाव्याच्या क्षणी मन एकांत न शोधेल तर नवलच. “मन वेड असतं” असे म्हणतात, ते पण खरं. विसाव्याच्या क्षणी, मनाच्या गाभाऱ्यात लपलेल्या प्रतिबिंबांना निरखून पाहण्याची एक सवय आपल्याला असतेच. मी पण या क्षणी वेगवेगळी प्रतिबिंब पाहण्यात दंग झाले.

मी जिथे उभी होते, तिथून काही अंतरावर असलेल्या जागेकडे माझी नजर पुन्हा पुन्हा वळत होती. कारण, मला रोज बकुळा येथेच भेटत होती. अगदी याच वेळी. आजही तिच्या आठवणींनी मन बेचैन झाले. बकुळा आता दूर गावी गेली होती. आमच्या राहत्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या, एका बिल्डिंग मध्ये ती राहत होती. ती जवळच्याच एका गतिमंद मुलांच्या शाळेत जात असे. आमच्या घराच्या समोरील रस्त्यावरूनच ती येत जात असे. मीही कधी कधी मोकळा वेळ मिळेल, तेव्हा त्याच शाळेत मुलांना भेटायला जात असे. संध्याकाळी फिरायला गेल्यावर, किंवा मंदिरात बकुळा मला भेटत असे. ती दिसायला खूपच छान होती. उंची तशी कमीच, आवाज मात्र मोठा. जीभ थोडी जड असल्याने कधी कधी तिचे बोलणे कळत नसे. स्वच्छ पण थोडे अघळपघळ कपडे ती घालत असे. केस  छोटे. पण डोळे मात्र खूपच बोलके. रस्त्यात गर्दीच्या ठिकाणी,  ती मला नेमकेपणे ओळखत असे. माझा हात आपल्या हातात पकडून, “ताई, उद्या येणार ना शाळेत?” असे विचारत असे. मग मी, “हो, तू पण ये हा” असे म्हणल्या शिवाय तिचे समाधान होत नव्हते. तिचा तो प्रेमळ स्पर्श आमचे आदल्या जन्मीचे ऋणानुबंध असल्याचे सांगुन जाई. तिच्या इतके प्रेमळ निरागस व भाबडे हास्य, मी याआधी आणखी कुणाचेही पाहिले नाही. काही क्षणांतच, ती आपला हात घाईघाईने सोडवून घेत असे. व हसत हसत झपाझप पुढे निघून जाई. एवढीच काय ती भेट. पण या भेटीची ही मनाला सवय लागली होती. आज तिच्या आठवणीने मनात प्रश्न उमटत राहिले. खरेच, कशी असेल ती? नवीन जागेत तिला समरस होता आले असेल का? आपली आठवण तर येतच असेल. आणि मी मनातल्या मनात प्रार्थना करू लागले.” देवा, तिला आवडणारी एखादी ताई तिला लवकर भेटू दे. ती नेहमी आनंदी, सुरक्षित, व सुखी राहू दे. आता पाऊस थांबला. मी पण एकांतातून  बाहेर आले. काम आटपून घरी आले. आणि दारातच असणाऱ्या नारळीच्या झाडाकडे माझे लक्ष गेले. त्या नारळीच्या झाडात, एक छोटे सुपारी चे झाड आपोआप आले होते. ते झाड पाहून आम्ही सर्वजण आनंदित झालो. त्याची नीट काळजी घेऊ लागलो. पण तरी हळूहळू लक्षात येऊ लागले की, झाडाची वाढ खुरटली आहे. पाणी भरपूर असले तरी, सूर्यप्रकाशा साठी सुपारीला संघर्ष करावा लागत होता. नारळीच्या झावळ्यांचा, मोठा पसारा तिच्या डोक्यावर होता. नाजूक असूनही हे झाड, नारळी च्या कुशीत धिटाईने उभे होते. नुकत्याच, छोट्या छोट्या हिरव्या झावळ्या फुटल्या होत्या. तरीपण रोज पाणी घालताना काळजी वाटत होती. अगदी बकुळी सारखीच. कसे होईल या सुपारीचे? बाकी झाडांचे काय? आणि माणसांचे काय? सुख दुःख सारखेच की, दोन्हीही सजीव आहेत. आपला जिवंतपणा टिकवून चैतन्य देत राहतात. त्यांच्या सहवासात येणाऱ्यांना नवीन ऊर्जा देत राहतात. पण एकदा का त्यांची वाढ खुंटली. तर मात्र त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. त्यांच्या वेगळ्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागते. आणि मन जरा हळवे होतेच. पण त्यांच्यातील एकाकीपणा न्यूनता कमी करण्याच्या प्रयत्नात, आपल्याला हातभार लावता आला, तर तो आनंद फुलवताना खूप समाधान मिळते. व अशा वेळी आपल्याला होणारे कष्ट, खूपच क्षुल्लक वाटतात. म्हणूनच असे अनमोल क्षण अनुभवायचे, व मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवायचे. आठवणींची ही “मोरपिसे” मनाच्या आरशात प्रतिबिंब होऊन राहतात. आणि आपल्याला बरंच काही   देऊन जातात. आपले मन प्रफुल्लित करणारी असतात. गरज असते, कधीतरी अंतर्मुख होऊन अशी प्रतिबिंब न्याहाळण्याची.  म्हणूनच विसाव्याच्या क्षणी जेव्हा जेव्हा तुम्हाला या आरशात डोकावण्याची संधी मिळेल, तेव्हा ती सोडू नका. या मोरपिशी आठवणी, अनमोल आहेत. आयुष्यात रंगीबेरंगी ऊर्जा, चैतन्य निर्माण करणाऱ्या आहेत. या आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवतात.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

१७/९/२०२१

विश्रामबाग, सांगली.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आदरणीय टिळक,  आज तुम्ही हवे होतात … ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ.सुचित्रा पवार

? मनमंजुषेतून ?

☆ आदरणीय टिळकआज तुम्ही हवे होतात … ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

 महनीय,लोकमान्यजी टिळक 

         साष्टांग अभिवादन 

खरे तर आम्ही तुम्हाला पत्र लिहावे इतके आम्ही मोठे नाही,तुमच्याशी कोणती चर्चा करावी इतकेही समपातळीचे नाही तरीही ‘थोरांची ओळख ‘या इतिहासाच्या पुस्तकापासून आपली ओळख अन विचारांनी आम्ही प्रेरित झालो,तुमच्या जयंती पुण्यतिथीला त्याच पाठातून तुम्ही उच्चारलेली,”स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !” या ब्रिटिश सरकारला दिलेल्या बाणेदार उत्तराने आमचे रोम रोम स्फुल्लींगले,” मी शेंगा खाल्ल्या नाहीत,टरफले उचलणार नाही अन कोणाचे नावही घेणार नाही ” हा परखडपणा नकळत आमच्याही अंगी आला ;आणि कित्येक भाषणाना वाहवा मिळवली ! आपण सुरु केलेली ‘मराठा,केसरी ‘ वर्तमान पत्रातून हिंदी जनतेत ब्रिटिशांविरुद्ध वाढवलेला असंतोष,तुरुंगातही गप्प न बसता लिहिलेला ‘गीतारहस्य ‘ हे सगळं तुमच्या अंगी कुणी बाणवले? आणि आजच्या पिढीत ते का नाही? हा प्रश्न वारंवार सतावतो.

देशास समर्पित सर्वच हुतात्मे, महान व्यक्तिमत्त्वे आणि देशभक्तांकडे पाहिले की वाटते,ही जाज्वल्यता ,प्रखर तेज आमच्याकडे का नाही? या प्रश्नाचे उत्तर खोलवर विचार केल्यावर सापडले.आम्ही खूप खुजे अन स्वार्थी आहोत,त्याग,संयम अन साधना या गोष्टी आमच्या आसपासही नाहीत.भारत माझा देश आहे…ही प्रतिज्ञा नुसतीच म्हणतो खरेच माझे माझ्या देशावर प्रेम आहे? आहे तर मग ही बेसुमार वृक्षतोड,वाळू उपसा,नद्या तलावावरील अतिक्रमणे,भ्रष्टाचार,लाच,हिंसाचार कुठून आले? काय स्वतंत्र देशाचे स्वप्न तुम्ही असे पाहिले होते? आणि आज तुम्ही असतात तर हे सहन केले असते? की कडक शासन करून फासावर लटकावले असते? तुमच्या जहाल विचारांची आज देशाला गरज आहे आणि म्हणून तुम्ही हवे होतात. आजची सरकारे तुम्ही कधीच उधळून लावली असतात आणि ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असं सारखंच खडसावले असते !

जनजागृती करण्यासाठी आणि सामाजिक ऐक्यासाठी तुम्ही  गणेशोत्सव सार्वजनिक केला पण आज त्याचे रूप हिडीस,विकृत,ओंगळ झालेय. देवाचा मालकी हक्क अन कोपऱ्या कोपऱ्यात स्वतंत्र गणेश मंडळे,देणग्या,राजकारण अन टोकाच्या अस्मितेने,अहं भावनेने ही एकी कधीच बेचिराख झालीय ! 

आम्हाला थोरामोठ्यांनी केलेल्या बलीदानाविषयी,त्यागाविषयी कृतद्न्यता नाही,प्रेम आदर तर नाहीच नाही कारण आजचे शिक्षण फक्त पैसे कसे मिळवायचे अन ऐश आरामात कसे रहायचे? याचे शिक्षण तासून,घासून देते असे गुळगुळीत गोटे मग पुढच्या पिढीला अजून गुळगुळीत बनवून घरंगळत जायला भाग पाडतात,माणूस म्हणून कसे जगायचे? देशप्रेम,राष्ट्रवाद या गोष्टी त्यांच्यासाठी मूर्खपणा आहे,यातून काय मिळणार? हाच वयवहार ते शिकत आलेत.

केवळ जयंती,पुण्यतिथी करून का कुणी मोठे झालेय? त्यासाठी आदर्श तत्वे अंगी बाणवायला हवीत अन आचरणातही आणायला हवीत पण खरे दुःख तर इथेच आहे आजच्या पिढीपुढे आदर्शच नाहीत ! मनोरंजनाचे आकडे करोडो च्या घरात असतात अन उपाशी माणसाच्या भुकेला भाकरीचा गोल सापडत नाही,ही प्रचंड लोकसंख्या का वाढली? याचे उत्तर आहे,प्रत्येकाला देशापेक्षा स्वहित अन स्वार्थ महत्त्वाचा वाटतो.

तंत्रज्ञानाने देश जवळ आले, पाश्चात्त्य देशातील नको ते आम्ही स्वीकारले पण त्यांच्या देशप्रेम,स्वच्छता,शिस्त याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.

देशातील स्वातंत्र्याचा असा स्वैराचार तुम्हाला खपला असता? नाही ना? तुम्ही हाकलून लावले असते अशा कृतघ्ननाना ! 

म्हणूनच तुम्ही हवे आहात पुन्हा एकदा देश प्रेमाचा धडा शिकवायला अन सार्वजनिक गणेशोत्सव बंद करायला,देशास वळण लावायला अन मूळ सुजलाम,सुफलाम रूप द्यायला !

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अशिक्षित डॉक्टर.. ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ अशिक्षित डॉक्टर.. सर्जन मिस्टर हॅमिल्टन ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

अशिक्षित_डॉक्टर.. सर्जन मिस्टर हॅमिल्टन

एक केपटाउनचा अशिक्षित माणूस. जो एकही इंग्रजी शब्द वाचू किंवा लिहू शकत नव्हता.

ज्याने आयुष्यात कधी शाळेचा चेहरा पाहिला नव्हता.

त्याला मानद मास्टर ऑफ मेडिसिन देऊन सन्मानित करण्यात आले.

केपटाऊन मेडिकल युनिव्हर्सिटी जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

असे म्हटले जाते की जगातील पहिले बायपास ऑपरेशन या विद्यापीठात झाले.

2003 मध्ये——एका सकाळी जगप्रसिद्ध सर्जन प्राध्यापक डेव्हिड डेंट यांनी विद्यापीठाच्या सभागृहात घोषणा केली.—- “आज आम्ही सर्वात जास्त शस्त्रक्रिया करणाऱ्या माणसाला वैद्यकशास्त्रातील मानद पदवी देत आहोत “

——या घोषणेने हॅमिल्टन चे नाव जाहीर केले आणि संपूर्ण सभागृह उभे राहिले.  

हॅमिल्टन सर्वांना शुभेच्छा या विद्यापीठाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे स्वागत होते.

हॅमिल्टनचा जन्म केपटाऊनमधील दुर्गम गावात सनीतानी येथे झाला.  

त्याचे आईवडील मेंढपाळ होते. लहानपणी त्यांनी शेळीचे कातडे घातले आणि दिवसभर अनवाणी डोंगरांवर फिरले.  वडील आजारी पडल्यानंतर हॅमिल्टन केपटाऊनला आले.

त्यावेळी विद्यापीठाचे बांधकाम चालू होते.  तो विद्यापीठात मजूर म्हणून रुजू झाला.  

त्याने तेथे अनेक वर्षे काम केले. दिवसभराच्या कामानंतर तो, जे काही पैसे मिळेल ते घरी पाठवायचा आणि तो स्वत: मोकळ्या मैदानात झोपायचा. त्यानंतर त्याला टेनिस कोर्टचे मैदानात  देखभाल कामगार म्हणून नियुक्त करण्यात आले.  हे काम करता करता तीन वर्षे निघून गेली.

मग— त्याच्या आयुष्याला एक विचित्र वळण लागले आणि तो वैद्यकीय शास्त्रातील अशा टप्प्यावर पोहचला, ज्याला अजून कोणी पोहोचले नव्हते.—-

 –ती सोनेरी सकाळ होती. प्रोफेसर रॉबर्ट जॉयस जिराफांवर संशोधन करत होते.  

त्यांनी ऑपरेटिंग टेबलवर बेशुद्ध जिराफ ठेवला. पण ऑपरेशन सुरू होताच जिराफने डोके हलवले.  जिराफची मान घट्ट पकडण्यासाठी त्यांना एका बळकट माणसाची गरज होती.  

प्राध्यापक  थिएटरमधून बाहेर आले. लॉनवर एक मजबूत निरोगी तरुण काम करीत आहे, हे पाहून प्राध्यापकाने त्याला बोलावले आणि जिराफ पकडण्याचे आदेश दिले. ऑपरेशन आठ तास चालले.

ऑपरेशन दरम्यान, डॉक्टरांनी चहा आणि कॉफीचा ब्रेक घेतला. तर हॅमिल्टन जिराफची मान पकडून उभा होता. ऑपरेशन संपल्यावर हॅमिल्टन शांतपणे निघून गेला.

दुसऱ्या दिवशी प्राध्यापकाने पुन्हा हॅमिल्टनला बोलावले.  तो आला आणि जिराफची मान पकडून उभा राहिला.  त्यानंतर ती त्याची रोजची दिनचर्या बनली. हॅमिल्टनने अनेक महिने दुप्पट काम केले आणि कधीही जास्त पैसे मागितले नाहीत आणि तक्रार केली नाही. प्राध्यापक रॉबर्ट जॉयस त्याच्या चिकाटी आणि प्रामाणिकपणामुळे प्रभावित झाले आणि हॅमिल्टनला टेनिस कोर्टमधून ‘ लॅब असिस्टंट ‘ म्हणून बढती मिळाली.  

आता त्याने विद्यापीठाच्या ऑपरेटिंग थिएटरमध्ये शल्यचिकित्सकांना मदत करण्यास सुरुवात केली.  ही प्रक्रिया वर्षानुवर्षे चालू राहिली.

1958 मध्ये त्यांच्या आयुष्यात आणखी एक वळण आले.– या वर्षी डॉ.ख्रिश्चन बर्नार्ड विद्यापीठात आले आणि हृदय प्रत्यारोपणाचे ऑपरेशन सुरू केले. हॅमिल्टन त्यांचे सहाय्यक बनले.

या ऑपरेशन दरम्यान ते सहाय्यक ते अतिरिक्त सर्जन बनले. आता डॉक्टर ऑपरेशन करायचे आणि ऑपरेशन नंतर हॅमिल्टनला शिवणकामाचे काम देण्यात आले.  त्याने उत्तम टाके केले.  

त्याची बोटे स्वच्छ आणि तीक्ष्ण होती.  तो दिवसाला पन्नास लोकांना शिलाई करायचा.  

ऑपरेटिंग थिएटरमध्ये काम करत असताना त्याला शल्य चिकित्सकांपेक्षा मानवी शरीर अधिक समजले.  म्हणून वरिष्ठ डॉक्टरांनी त्याला शिकवण्याची जबाबदारी सोपवली.

त्यांनी आता कनिष्ठ डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे तंत्र शिकवायला सुरुवात केली.  तो हळूहळू विद्यापीठातील सर्वात महत्वाचा व्यक्ती बनला.  ते वैद्यकीय शास्त्राच्या अटींपासून अपरिचित होते. परंतु सर्वात कुशल सर्जन असल्याचे सिद्ध झाले.

त्यांच्या आयुष्यात तिसरा टर्निंग पॉईंट 1970 साली आला, जेंव्हा या वर्षी यकृतावर संशोधन सुरू झाले आणि त्यांनी शस्त्रक्रियेदरम्यान यकृताची धमनी ओळखली, ज्यामुळे यकृत प्रत्यारोपण सुलभ झाले. त्याच्या निरीक्षणांनी वैद्यकीय विज्ञानातील महान माणसांना आश्चर्यचकित केले.

आज जेव्हा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात एखाद्या व्यक्तीचे यकृताचे ऑपरेशन होते आणि रुग्ण त्याचे डोळे उघडतो, नव्या आशेने पुन्हा जिवंत होतो, तेव्हा या यशस्वी ऑपरेशनचे श्रेय थेट “हॅमिल्टन” ला जाते.

हॅमिल्टनने प्रामाणिकपणा आणि चिकाटीने हे स्थान मिळवले.  ते केपटाऊन विद्यापीठाशी 50 वर्षे संबंधित होते.  त्या 50 वर्षात त्यांनी कधी सुट्टी घेतली नाही.

हा माणूस  रात्री तीन वाजता घरातून निघायचा, विद्यापीठाकडे 14 मैल चालत जायचा आणि अगदी ठीक सहा वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश करायचा.  लोक त्यांची घड्याळे त्यांच्या वेळेनुसार दुरुस्त करत असत.

त्याला हा सन्मान मिळाला, जो वैद्यकीय शास्त्रात कोणालाही मिळाला नाही.

वैद्यकीय इतिहासाचे ते पहिले निरक्षर शिक्षक होते.—-

आपल्या आयुष्यात 30,000 शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देणारे ते पहिले निरक्षर सर्जन होते.

2005 मध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यांना विद्यापीठात पुरण्यात आले.

यानंतर—— 

पदवी मिळाल्यानंतर त्याच्या थडग्याला भेट देणे, 

छायाचित्र काढणे आणि नंतर त्यांच्या सेवेच्या कामावर जाणे, हे विद्यापीठाने शल्य चिकित्सकांना अनिवार्य केले.

“तुम्हाला माहित आहे का की त्याला हे पद कसे मिळाले?”

“फक्तहो.”

ज्या दिवशी त्याला जिराफची मान पकडण्यासाठी ऑपरेटिंग थिएटरमध्ये बोलावण्यात आले होते, 

जर —–त्याने त्या दिवशी नकार दिला असता, जर तो म्हणाला असता, ‘मी मैदान देखभाल कामगार आहे, माझे काम जिराफची मान पकडणे नाही ”   तर… विचार करा !

तेथे फक्त एक “होय” आणि अतिरिक्त आठ तासांची मेहनत होती ज्यामुळे त्याच्यासाठी यशाची दारे उघडली गेली आणि तो सर्जन झाला.

“जेव्हा आपल्याकडे काम शोधावे लागते, तेव्हा आपल्यापैकी बरेच जण आपले संपूर्ण आयुष्य नोकरीच्या शोधात घालवतात”

‘जगातील प्रत्येक नोकरीचा एक निकष आहे आणि नोकऱ्या फक्त त्या लोकांसाठी उपलब्ध आहेत जे निकष पूर्ण करतात. जर आपल्याला काम करायचे असेल, तर आपण काही मिनिटांत जगातील कोणतेही काम सुरू करू शकतो आणि कोणतीही शक्ती देखील आपल्याला रोखणार नाही.’

—-हॅमिल्टनला हे रहस्य सापडले होते, त्याने नोकरीऐवजी काम करण्याला महत्त्व दिले.  

अशा प्रकारे त्याने वैद्यकीय विज्ञानाचा इतिहास बदलला.

कल्पना करा, जर त्याने सर्जनच्या नोकरीसाठी अर्ज केला असता तर तो सर्जन बनू शकला असता का? कधीही नाही.– पण,त्याने जिराफची मान पकडली आणि सर्जन झाला.

बेरोजगार लोक अपयशी ठरतात कारण आम्ही फक्त नोकरी शोधतो, काम नाही.  

ज्या दिवशी आपण हॅमिल्टन प्रमाणे काम करायला सुरुवात करू, आपण यशस्वी आणि महान मानव बनू.

धन्वंतरीना समर्पित…

संग्राहक – श्री सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – पोपट ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? पोपट ! ??

सूर्य मावळतीकडे कलला होता. आता अंधार पडायला सुरवात झाली होती.

सगळीकडे शांतता… आजूबाजूला कोणतेही आवाज ऐकू येत नव्हते. वाटेवर पावसाचं पाणी साचल्यामुळे चालताना पायाचा ‘पचक पचक’ असा आवाज तेवढा येत होता….

गण्याला आज घरी जायला जास्तच उशीर झाला होता, त्यात हा पाऊस. पण रस्ता पायखलाचा होता म्हणून ठीक, पण या पावसामुळे आधीच गावच्या रस्त्याला असलेले मिणमिणते दिवे गुल झाले होते. अजून घर येण्यासाठी त्याला भरपूर रस्ता कापायचा होता. आता चांगलाच अंधार पडला होता आणि अमावस्या असल्यामुळे तो जास्तच गडद आणि भीतीदायक वाटत होता. त्यातल्या त्यात त्या अंधारात त्याला हातातल्या मोबाईल मधल्या विजेरीचा काय तो आधार वाटत होता !

तसा गण्या धीट गडी, पण या अमावस्येच्या किर्र रात्री त्याला नको नको ते आवाज येत असल्याचे भास व्हायला लागले. रस्त्यातले ते नेहमीचे पिंपळाच्या पाराचे वळण आले. गण्या मनांत खरंच घाबरला आणि मोठ मोठ्या आवाजात रामरक्षा म्हणू लागला. त्यात बहुतेक मोबाईलची बॅटरी डाउन झाल्यामुळे मोबाईलची विजेरी पण फडफडायला लागली आणि पाराचे वळण येण्या आधीच तिने अखेरचा श्वास घेतला व गण्याच्या डोळयांपुढे काळोख पसरला. तेवढ्यात पारा खालून त्याला कोणीतरी हसल्याचा आवाज आला. तो आवाज ऐकताच मागे वळून न बघता गण्या घराकडे तिरासारखा धावत सुटला. तो थोडा धावला असेल नसेल तोच पुन्हा एकदा त्या हसण्याचा आवाज त्याच्या कानी पडला, त्या बरोबर गण्या अंगातली होती नव्हती ती शक्ती एकवटून पुन्हा घराच्या दिशेने जोरात धावत सुटला. थोडं पुढे आल्यावर गण्या धीर एकवटून रस्त्यात थांबला व त्या आवाजाचा कानोसा घ्यायचा त्याने पुन्हा प्रयत्न केला. पण आता तो आवाज काही त्याच्या कानी पडला नाही. आता घर पण टप्प्यात आलं होतं त्यामुळे त्याच्या जीवात जीव आला.

घरी आल्या आल्या काहीच न बोलता हात पाय धुवून तो जेवायला बसला. जेवताना पण गप्प गप्प ! शेवटी बायकोने न राहून विचारलंच “आज जेवणात काही कमी जास्त झालंय का?” “नाही” “मग आज एकदम गप्प गप्प, कुणाशी भांडण वगैरे?” बायकोला त्या आवाजबद्दल सांगावे का नाही या विचारात त्याच्या तोंडून “काही नाही गं, थोडी कणकण वाटत्ये, म्हणून…” “अगं बाई, मग असं करा जेवण करून, मी काढा करते तो प्या आणि झोपा बघू, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल.” “बरं” इतकंच म्हणून गण्यान जेवण आटोपत घेतलं आणि तो पलंगावर आडवा झाला. पण निद्रादेवी काही प्रसन्न व्हायचं लक्षण दिसेना. त्यात पुन्हा त्याच्या कानात तो मगाचा हसण्याचा आवाज येत राहिला. कोण हसत असेल? त्या पारावर भूत खेत असल्याच्या वावड्या त्याने लहानपणा पासून ऐकल्या होत्या. त्यात आजची अमावस्येची रात्र, विचार कर करून त्याच्या डोक्याचा भुगा झाला.  तेवढ्यात बायको काढा घेऊन आली. गाण्याने निमूटपणे काढा घेतला आणि डोक्यावर परत पांघरूण घेऊन निद्रादेवीची आराधना करू लागला. पण तो हसण्याचा आवाज काही त्याची पाठ सोडत नव्हता. विचार कर करून शेवटी त्याचा मेंदू थकला आणि पहाटे पहाटे कधीतरी त्याचा डोळा लागला.

सकाळी गण्या नेहमी प्रमाणे आवरून शाळेला निघाला. आज पावसाचा मागमूस नव्हता, लख्ख ऊन पडले होते. पण कालचा हसण्याचा आवाज काही त्याच्या मनातून जात नव्हता. रस्त्यातला नेहमीचा पिंपळाचा पार आला आणि आज शाळेचा रस्ता बदलावा का, या विचारात असतांनाच त्याचे लक्ष पाराकडे गेले. पारा जवळ म्हादू काहीतरी शोधत असल्याचे त्याला दिसले. गण्याने पुढे होतं “म्हादबा सकाळी सकाळी काय शोधताय पारा जवळ?” “नमस्कार मास्तर. काल पासून मोबाईल हरवला आहे माझा.” “अहो मग घरी शोधा ना, इथे पाराजवळ कशाला….” “मास्तर, काल रात्री घरी मुलाच्या मोबाईल वरून कॉल करून बघितला, बेल वाजत्ये पण घरात कुठेच नाही मिळाला.” “पण मग तो पारा जवळ शोधायच कारण काय?” “मास्तर, आता वय झालं, काल आम्ही मित्र मंडळी इथंच पारावर गप्पा मारत होतो, तेवढ्यात पाऊस यायला लागला. माझ्याकडे छत्री नव्हती” “मग?” “मग मी माझा मोबाईल इथेच कुठे तरी ठेवला, पण तो नक्की कुठे ठेवला हे आठवत नाही बघा.” “अस्स ! मी काही मदत करू का तुम्हाला मोबाईल शोधायला?” “मास्तर तुमच्याकडे मोबाईल आहे ना?” “हो आहे ना” असं म्हणून गण्याने खिशात हात घालून आपला मोबाईल काढला. “हां, मास्तर आता एक काम करा.” “बोला म्हादबा.” “तुमच्या मोबाईल वरून मला फोन लावा बघू.” गण्याने म्हादबाने सांगितलेल्या नंबर वर फोन लावला आणि पिंपळाच्या झाडाच्या ढोलीतून कुणीतरी कालच्या सारखं हसल्याचा आवाज गण्याला आला ! त्या बरोबर “मिळाला, मिळाला” असं आनंदाने ओरडत म्हादबा त्या ढोली जवळ गेला आणि त्याने आतून आपला मोबाईल काढून गण्याला दाखवला, जो अजून जोर जोरात काल रात्री सारखं हसतच होता ! आणि ते हसणं ऐकून गण्या पण कधी हसायला लागला ते त्याच त्यालाच कळलं नाही !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares