नात्यांची वीण ही रेशमाच्या धाग्यासारखी असते, जितकी मऊ आणि सुंदर, तितकीच नाजूक.
… आयुष्य जगत असताना अनेक माणसे भेटतात, काही मनात कायमचे घर करतात, तर काही जीवाभावाचे सोबती बनतात. पण कधी कधी काळाच्या ओघात किंवा परिस्थितीच्या फेऱ्यात हीच हवीहवीशी वाटणारी नाती अचानक दुरावतात. एखादा छोटासा गैरसमज, बोलता बोलता तोंडातून गेलेला एखादा चुकीचा शब्द किंवा केवळ एका क्षणाचा राग, वर्षानुवर्षांच्या प्रेमावर मिठाचा खडा टाकतो आणि सुरू होतो एक न संपणारा अबोला. खरे तर अशा वेळी मनाच्या एका कोपऱ्यात दोघांनाही एकमेकांची ओढ असते. जुन्या आठवणी आठवून मन भरून येतं, साध्या साध्या गोष्टींतून एकमेकांची उणीव भासते, पण संवाद मात्र खुंटलेला असतो. या दुराव्याचं सर्वात मोठं कारण असतं ‘अहंकार ‘म्हणजेच इगो. मी का वाकू? मी का आधी बोलू? मी वयाने मोठा आहे तर त्यानेच आधी यायला हवं, किंवा मी लहान असूनही मला सन्मान मिळाला नाही, अशा विचारांचे काहूर मनात माजलेले असते.
मोठेपण आणि लहानपण या तराजूत जेव्हा आपण नात्याला तोलतो, तेव्हा नात्याचं वजन आपोआप कमी व्हायला लागतं. आपण हे विसरतो की, नाते टिकवण्यासाठी कोणाचे तरी वयाने मोठे असण्यापेक्षा मनाचे मोठे असणे जास्त महत्त्वाचे असते.
कोणतेही नाते पुन्हा पूर्ववत करायचे असेल, तर अहंकाराची भिंत पाडावीच लागते. समोरचा माणूस आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, याचा विचार केला की इगोची किंमत शून्य होऊन जाते. चूक कोणाचीही असो, पण जर ते नाते आपल्यासाठी अनमोल असेल, तर पुढाकार घेण्यात कसलीच लाज वाटायला नको. कधी कधी ‘सॉरी’ म्हणण्याने आपण लहान होत नाही, उलट ज्याला आपल्या सुखापेक्षा समोरच्या व्यक्तीची साथ जास्त महत्त्वाची वाटते, तोच खरा मोठा असतो.
अबोला हा नात्यातला सर्वात मोठा शत्रू आहे, तो केवळ अंतर वाढवतो. त्याऐवजी समोरासमोर बसून, मनमोकळेपणाने बोलल्यास मोठमोठे डोंगरही विरघळून जातात. नाती ही जपून ठेवायच्या वस्तू नसून ती जगण्याची अनुभूती आहे.
– – आयुष्याचा प्रवास तसा छोटा आहे, त्यात रुसवे-फुगवे आणि अहंकार घेऊन चालण्यापेक्षा प्रेमाची शिदोरी सोबत असलेली केव्हाही चांगली. जर तुम्हाला वाटत असेल की एखादं नातं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, तर मग उशीर करू नका. ‘मोठा ‘ किंवा ‘छोटा ‘हा विचार बाजूला ठेवा आणि मनाच्या मोठेपणाने संवादाचा हात पुढे करा. कारण गेलेली वेळ आणि तुटलेली माणसं पुन्हा मिळवणं कठीण असतं. एखाद्याला गमावून पश्चात्ताप करण्यापेक्षा, स्वतःचा इगो बाजूला सारून त्या नात्याला पुन्हा एकदा फुलायला मदत करणं, हेच खऱ्या समृद्ध आयुष्याचं लक्षण आहे.
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २३ आणि २४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. २३ – – –
न बोले मना राघवेवीण काही ।
जनी वाऊगे बोलता सुख नाही ।
घडीने घडी काळ आयुष्य नेतो ।
देहांती तुला कोण सोडू पाहतो ।।२३।।
अर्थ : हे मना, एका राघवाशिवाय म्हणजेच भगवंताच्या नामाशिवाय दुसरे काही बोलू नकोस. तू इतर व्यर्थ बडबड केलीस तर तुला जे पारमार्थिक सुख अपेक्षित आहे ते मिळणार नाही. काळ क्षणाक्षणाला आपले आयुष्य कमी करीत असतो. जर या काळात परमेश्वराचे नामस्मरण करणे राहून गेले, तर अंतकाळी तुला कोणीही वाचवू शकणार नाही.
विवेचन : मागील श्लोकात समर्थांनी आपल्या हितासाठी श्रीरामाचे नाव चित्तामध्ये दृढ धारण करावे असा उपदेश केला. या श्लोकात त्याच विचाराचा विस्तार करत ते आपल्या मनाला बजावतात की हे मना, एका रामाशिवाय तू दुसरे काही बोलू नकोस. कारण इतर गोष्टी बोलण्यात खरे सुख नाही. काळ कोणासाठीही थांबत नाही. तो कोणाचाही अपवाद करत नाही. क्षणाक्षणाला तो आपले आयुष्य कमी करीत असतो आणि एक दिवस असा येतो की अंतिम क्षणी तो आपल्यालाही सोडत नाही.
समर्थांना आपल्या कल्याणाची किती तळमळ आहे हे या श्लोकातून जाणवते. आपले जीवन म्हणजे परमेश्वराकडून मिळालेली एक अमूल्य भेट आहे. पण या जीवनामध्ये ज्याने आपल्याला ही सुंदर देणगी दिली त्या परमेश्वरालाच आपण विसरतो आणि निरर्थक बोलण्यात आपले आयुष्य वाया घालवतो.
बोलण्यात आपली मोठी शक्ती खर्च होत असते. अनेकदा बोलण्यामुळे जेवढा शीण येतो, तेवढा एखादे श्रमाचे काम केल्यामुळेही येत नाही. एखादा वक्ता जर दोन-तीन तास सतत बोलत राहिला तर त्याला किती थकवा येतो हे त्यालाच ठाऊक असते. शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना आणि प्राध्यापकांनाही हा अनुभव वारंवार येत असतो.
परंतु समाजात आपण पाहतो की बरीच मंडळी व्यर्थ बोलण्यात वेळ घालवतात. चौकात उभे राहून गप्पा मारणारी तरुणांची टोळकी, कट्ट्यावर बसणारे लोक, कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र जमलेली मंडळी या सगळ्यांच्या चर्चांना कोणताही विषय चालतो. एकदा बोलायला सुरुवात झाली की कोणत्याही विषयावर अखंड बोलत राहणे ही सवय बनते. यात वेळेचा आणि शक्तीचाही अपव्यय होतो.
अति बोलण्याची सवय वृद्धापकाळात त्रासदायक ठरू शकते. अशा वेळी घरातील लोकांनाही ती माणसे नकोशी वाटू लागतात. बोलायला कोणी नसते आणि त्यामुळे मनात निरर्थक दुःख साचत जाते. म्हणून वेळीच सावध होणे आवश्यक आहे. आजच्या काळात टीव्हीवरील चर्चा, भडक बातम्या किंवा निरर्थक वादविवाद यांकडे लक्ष देण्यातही आपला बराच वेळ खर्च होतो. परंतु साधकाच्या दृष्टीने त्यातून फारसे काही निष्पन्न होत नाही.
आपले खरे हीत साधायचे असेल तर भगवंताच्या नामाशिवाय दुसरा मार्ग नाही. त्या नामाला विसरून आपण कितीही इतर गोष्टी बोलत राहिलो, तरी ती व्यर्थ बडबडच ठरते. त्यामुळे खरे सुख मिळत नाही. येथे सुख म्हणजे परमेश्वर प्राप्तीच्या किंवा आत्मसाक्षात्काराच्या दृष्टीने होणारी आपली वाटचाल असे म्हणता येईल.
नाम घेण्याची सवय जर आयुष्यभर अंगवळणी पडली नाही, तर अंतकाळी ते सहजपणे आपल्या मुखात येणार नाही. संतांना माणसाचे कल्याण व्हावे याची प्रचंड तळमळ असते. म्हणूनच संत गोंदवलेकर महाराज देखील आपल्या प्रवचनांमध्ये वारंवार सांगतात की तुम्ही रामनाम घ्या.
समर्थ रामदासांचाही कळकळीचा हाच संदेश आहे. जीवनाचा एकही क्षण व्यर्थ घालवू नका; भगवंताचे नामस्मरण करा.
स्वसंवाद ::
वेळ, शक्ती आणि आयुष्य वाया घालवणाऱ्या व्यर्थ चर्चांपासून मी स्वतःला दूर ठेवू शकतो का?
माझ्या दैनंदिन जीवनात भगवंताचे नामस्मरण कितपत आहे?
आयुष्याचा प्रत्येक क्षण अमूल्य आहे याची जाणीव ठेवून मी तो अधिक अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करतो का?
– – – –
श्लोक क्र. २४ – –
रघूनायकावीण वाया शिणावे ।
जनासारिखे व्यर्थ का वोसणावे ॥
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे ।
अहंता मनी पापिणी ते नसो दे |२४|
अर्थ:हे मना, एका रामाला सोडून केलेली सगळी कामे व्यर्थ आहेत. भगवंताला विन्मुख झालेल्या सामान्य माणसांप्रमाणे व्यर्थ बडबड (वोसणावे) करू नये. त्या बाष्कळ बडबडी ऐवजी भगवंताचे नाव मुखात असू दे. अहंकार हा अध्यात्मामध्ये फार मोठा शत्रू आहे. त्याला मनात थारा देऊ नकोस.
विवेचन: समर्थांना मानव जातीच्या कल्याणासाठी वाटणारी तळमळ ही एखाद्या मातेसारखी आहे. आपल्या मुलाचे कल्याण व्हावे म्हणून ती त्याला जरी आवडत नसले तरी एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत असते. त्याचप्रमाणे समर्थ मागील श्लोकातीलच गोष्ट या ठिकाणी पुढे विस्तारून सांगतात. आधीच्या श्लोकात मनाला राघवाशिवाय काही बोलू नकोस कारण व्यर्थ बोलण्यामध्ये सुख नाही असे त्यांनी सांगितले आहे. या श्लोकात हीच गोष्ट ते वेगळ्या शब्दात आपल्याला सांगतात.
भगवंताच्या नामामध्ये अपार सामर्थ्य आहे. शिणलेल्या मनाला शक्ती देण्याचे, उभारी देण्याचे सामर्थ्य त्यात आहे. आपण जर खऱ्या सुखाचा शोध घेत असू तर भगवंताच्या नामाइतके सुख कशातच नाही. अन्य सुखे तात्पुरती आहेत आणि अंतिमतः दुःख देणारीच आहेत हेच समर्थ या श्लोकातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आपल्या जिभेवर नेहमी भगवंताचे नाम असावे असे त्यांचे सांगणे आहे.
शब्द किंवा भाषा बोलणे हे माणसाचे वैशिष्ट्य आहे. भाषेच्या माध्यमातून आपण आपले विचार व्यक्त करतो. शब्दांमध्ये किंवा भाषेमध्ये केवढी शक्ती असते हे जेव्हा आपण अधिकारी व्यक्तींच्या साहित्याचे वाचन करतो किंवा त्यांचे बोल ऐकतो तेव्हा लक्षात येते. बोलण्याला वाचाशक्ती असेही आपण म्हणतो. हे सरस्वतीचे वरदान आहे. पण सर्वसामान्य लोक बऱ्याच वेळा वायफळ बोलण्यात ही शक्ती व्यर्थ घालवत असतात.
पण ज्यांना साधना मार्गावर वाटचाल करायची आहे, भगवंत जोडायचा आहे, त्यांना अशी बाष्कळ बडबड करून चालणार नाही. आपल्या वाचेने त्यांनी भगवंताचे नाम घ्यायला हवे तशी सवय करायला हवी. उठत बसता, कार्य करता, सदा घेता देता… भगवंताचे नाम मुखात यायला हवे. मी जर साधक आहे आणि भगवंत प्राप्ती हे माझे ध्येय आहे असे जर आपण मनाशी ठरविले असेल तर जनांमध्ये मिसळताना सामान्य माणसांसारखी बडबड करून मला भागणार नाही. तसे केले तर मी माझ्या वाचेची शक्ती व्यर्थ घालवली असा त्याचा अर्थ होईल.
सुरुवातीला लोक मला नावे ठेवतील. माझी चेष्टा किंवा टिंगलटवाळी करतील पण मला भगवंत प्राप्तीसाठी ती सुद्धा सोसता आली पाहिजे. काही दिवसांनी लोकांना हे लक्षात येईल की ही व्यक्ती आपल्यासारखी नाही. ती साधक आहे. मग ते तुमच्याशी आदराने व्यवहार करतील. समर्थ या सगळ्या परिस्थितीतून गेले आहेत. ही परिस्थिती त्यांनी अनुभवली आहे आणि त्यातूनच त्यांचे हे अनुभवाचे बोल आले आहेत.
समाजात मिसळताना आपल्याला लोकांनी नावे ठेवू नये किंवा आपण कुठे कमी पडू नये म्हणून आपण त्यांच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करतो. बरेचदा आपण जसे नसतो तसे दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी विद्वान आहे, ज्ञानी आहे मला फार कळते अशा प्रकारचे मुखवटे धारण करतो. हा मुखवटा लोकांना दाखवण्यासाठी जरी असला तरी त्यातूनच अहंकार जन्म पावतो. अहंकार हे पापाचे मूळ आहे. रावणाला स्वतःच्या शक्तीचा, सामर्थ्याचा केवढा अहंकार झाला होता! जगामध्ये माझ्यासारखा कोणी नाही, मला कोणी हरवू शकत नाही हा त्याचा अहंकार त्याचे विनाशाला कारणीभूत ठरला. अहंकारातून अनेक नको असलेल्या गोष्टी घडतात. म्हणून समर्थ अहंतेला पापिणी असे म्हणतात.
म्हणून, हे मना, वाणीमध्ये भगवंताचे नाम ठेव आणि मनातून अहंकार दूर ठेव. यातच तुझे खरे कल्याण आहे.
स्वसंवाद ::
माझ्या बोलण्यात भगवंताचे नाम कितपत आहे आणि व्यर्थ बडबड किती आहे?
भगवंताचे नाम घेण्याची सवय मी स्वतःला लावतो आहे का?
माझ्या मनात अहंकाराची छटा आहे का? ती ओळखून मी कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे का?
केवळ हिंदीच नव्हे तर भारतातील विविध भाषेत गाणी गाऊन अवघ्या भारतीयाच्या मनावर राज्य करणारे दोन गायक म्हणजे किशोर कुमार आणि आशा भोसले! स्वतःच्या हिमतीवर त्यांनी स्वतःचे साम्राज्य उभे केले.
मात्र सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अगदी वाईट अपमान सहन करावे लागले.
त्यातला एक जीवघेणा प्रसंग आज सांगतो.
*
झालं असं की, एका सिनेमाच्या गाण्याचे रेकॉर्डिंग होते त्यासाठी किशोरदा आणि आशा ताईंना बोलावलेलं होतं. गाण्याच्या साउंड रेकॉर्डिगसाठी त्याकाळातले अत्यंत फेमस आणि टॉपचे समजले जाणारे रॉबिन चॅटर्जी होते. आणि हा तो काळ होता जेव्हा किशोरदा आणि आशाताई स्ट्रगल करत होत्या.
त्यात समोर रॉबिन याना पाहून हे दोघेही थोड्या दडपणाखाली आले.
मात्र हिंमत करून दोघांनी माईकसमोर येऊन गायला सुरु केलं.
मुखड्याच्या दोन ओळी गाऊन होत आहेत नाहीत तोवर रॉबिनजी यांनी “स्टॉप” स्टॉप म्हणत रेकॉर्डिंग थांबवलं.
आणि सिनेमाच्या दिग्दर्शक / निर्मात्यांना म्हणाले,
“ये कौन लोग लेके आये गाने के लिये? इन्हे तो कुछ भी नही आता… आवाज अच्छी नही है… गाने की आवाज है कहा इनकी? जाओ जाकर गीता को बुलाओ”
*
वरच्या पट्टीतले त्यांचे हे बोलणे ऐकून सगळेच सुन्न झाले. आशाताई अन किशोरदावर काय आभाळ कोसळले असेल… कल्पना करवत नाही.
*
शांतपणे ते दोघे तिथून बाहेर पडले. डोळ्यात गच्च गहिवर आणि हृदयात मात्र अपमानच आगडोंब उसळलेला!
तिथून जवळच महालक्ष्मी स्टेशन होते. तिथं जाऊन रिकाम्या बाकड्यावर ते दोघे बसले.
दोघेही सुन्न… थोड्या वेळाने किशोरदा म्हणाले, “भूक लगी है, कुछ देखता हू”
आणि असं म्हणून ते भल्या मध्यरात्री त्या स्टेशनवर असलेल्या एका स्टॉल वर गेले तिथं बटाटेवडे होते तेही शिळे… तेच घेऊन किशोरदा आले. आणि या दोघांनी शांतपणे ते वडे खाताना किशोरदा म्हणाले, “आशा… हमको निकाल दिया”
त्यावर नेहमीच पॉजिटीव्ह विचार करणाऱ्या आशाताई म्हणाल्या, “नही… दादा… आप की जो आवाज है उसे कोई रोक नही सकता, “
आणि मग शिळा वडा खाऊन… पाणी पिऊन दोघांनी घरची वाट धरली.
*
यानंतर चार वर्षानंतर या दोघांचे अनेक सिनेमे (गाणी) हिट झाली. दोघांचेही नाव झाले. किशोरदा तर गायक प्लस हिरो असे डबल फेमस झाले.
आणि एका सिनेमाच्या गाण्यासाठी पुन्हा हीच जोडी “त्याच” स्टुडिओत एकत्र आली आणि योगायोग पहा… त्याचेही साउंड रेकॉर्डिस्ट तेच रॉबिनदा होते ज्यांनी याना रिजेक्ट केलं होत.
त्यांना तिथे पाहताच किशोरदा आशाताईंना म्हणाले “आशा… वो देखो व्हिलन बैठा है… वो अगर इधर रेकॉर्डिस्ट है तो मै गाना नही गाऊंगा… “
त्यावर आशाताई दादाला म्हणाल्या, “दादा, ऐसे नही करते… आज हमारा नाम है तो क्या हुआ? किसी के पेट पे पैर नही देते.
किशोरदा म्हणाले, तुम्हे याद है… उसने हमारे साथ क्या किया था?
*आशाताई म्हणाल्या, “याद है… लेकिन अपना वख्त खराब था… आज अपना है तो गुरुर किस बात का? “*
*
आणि अशा रीतीने ते गाणे रेकॉर्ड झाले.
गोष्ट इथं संपलीय!
डॉ. डीडी क्लास : एखादा माणूस मोठा का होतो? तर जमलं तर त्याच्या तळपायाकडे पहा… किती भेगाळले असतात अशा लोकांचे पाय… अपमान, उपासमार, अवहेलना… हे सगळे काटे पायात रुतलेले असतात आणि तरी हि मंडळी शांतपणे ते काटे बाजूला ठेवून पुढे चालत असतात. त्या काट्याला भांडत बसत नाहीत की त्याची जिरवण्यासाठी काही करत नाहीत. ते काम नियतीवर सोडावे आपण असं मला वाटत. कारण कर्मा काय अन नियती काय… ज्याचे त्याचे हिशोब चुकते करत असते त्यासाठी आपण आपला वेळ का घालवावा? आपण आपल्या कामात राहून आपल्या कामातूनच जगाला उत्तर द्यावे… हेच जास्त बेस्ट! तसे तुम्हालाही जमावे… (कारण आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे “रॉबिन चॅटर्जी” आलेले असतात.) त्यांना वळसा मारून पुढं जावं! येणारा काळ त्यांना बरोबर उत्तर देतो… रिलॅक्स मंडळी!
☆ प्रस्थान… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆
☆
माझ्या घरासमोर एका बंगल्याचे काम नुकतेच सुरू झाले होते. सिमेंट, लाकडं, विटा येऊन पडत होत्या. एक दिवस एक मजूर बाई, तिचा नवरा आणि तिच्या हातात दोन महिन्याचे बाळ यांच्यासह आली. तिच्या मागे एक हडकुळे ३ वर्षाचे पोर ओढल्यागत चालत होते. आल्या आल्या बाईने बंगल्याच्या आवारात दोन लाकडी खांबांना जुनी साडी बांधली आणि त्या झोळीत ते पोर झोपवले. मोठ्या पोराच्या हातात वाळलेल्या भाकरीचा तुकडा दिला. बाई कामाला लागली. जागा साफ करून तिने नवऱ्याच्या मदतीने लाकडी खांबावर पत्रे टाकून झोपडी तयार केली. शेजारी बंगल्याचे बांधकाम वेगाने सुरू झाले. ती दोघे नवरा-बायको इतर मजुरांसह दिवसभर काम करत.
जाता येता मी त्या परिवाराशी बोलत असे. कधी चॉकलेट-बिस्किटे, नाश्ता देत असे. सिमेंट रेती विटांचे काम सुरू होते. बघता-बघता बंगला उभा राहिला. तिचे फाटक्या कपड्याच्या झोळीत झोपणारे पोरही ऊन्हातान्हात दगड-वाळूत खेळू लागले. पुढे पावसाळा सुरू झाला, तशी तिची रवानगी बंगल्यातल्या अर्धवट बांधलेल्या खोलीत झाली. मी तिला, तिच्या नव-याला कधी आरामात बसलेले बघितले नाही. बंगला बांधणारा कंत्राटदार दोन-चार दिवसांत कधीतरी यायचा. मालक तर महिन्या-दोन महिन्यांनी उगवायचा. एरव्ही ही दोघे दिवसरात्र मेहनत करत. दिवसभर ती मुंगीसारखी सतत काम करत असे. सगळ्यांची अस्सल मातीशी बांधिलकी. मुलं दगडामातीत ऊन- थंडी- पाऊस झेलत खेळायची. पण कधी आजारी पडली नाहीत.
आमच्या बोलण्यात माणूस गप्प असायचा. ती मात्र मोठ्या हौशीने घराच्या बांधकामाविषयी, झालेल्या कामाविषयी सांगायची. हळुहळू बंगला पूर्ण झाला. मग प्लास्टर. लवकरच बंगल्याला आतबाहेर सुंदर रंग दिला गेला. बंगला छान सजू लागला.
एक दिवस मी सहज खिडकीबाहेर पाहत होतो. त्या घरासमोर ट्रक आला. त्यात कुदळ, फावडे, टोपल्या असे सामान होते. ड्रायव्हर त्या बाईशी बोलला. तिने लगेच टोपलीत मुलाला ठेवले, मोठ्या मुलाला ट्रकमध्ये उभे केले, तीही नव-यासह ट्रकमध्ये चढली. ट्रक निघाला! जेव्हा तो ट्रक आमच्या घराजवळून जाऊ लागला तेव्हा मी धावतच जाऊन तो थांबवला. तिच्या डोळ्यात पाणी होते. ट्रकच्या आवाजात ऐकू येणार नाही, असं वाटून ती ओरडून म्हणाली, ‘दादा, आमचा मुक्काम संपला. येते जी मी! ‘ मला तो धक्का होता. मी ओरडूनच विचारले, ‘का हो, असे अचानक चाललात? ‘ तिचे हसून उत्तर आले, ‘मालकाचा निरोप आलाय. नव्या साईटीवर काम सुरू होणार आहे. आता तिथे बघायला नको का? ‘ तिने मायेने हात हलवला. आणि ट्रक दिसेनासा झाला.
मी सुन्न होऊन बघतच राहिलो…
एखाद्या सुगरण पक्षिणीने गवताची एकेक काडी गोळा करून खोपा विणावा, तसे तिने जीव ओतून घर बनविले. तिला कधी आपलेही घर असावे असे वाटत नसेल का? कसे यांचे जीवन? यांनी राबराबून दुसऱ्यांचे इमले उभारायचे. ऊन्हा-तान्हात पोरं वाढवायची. घर पूर्ण झाल्यावर सारे सोडून निघून जायचे! जवळजवळ वर्षभर ती बाई ज्या घरात राहिली, तिचा संसार फुलला, जे घर तिने इतक्या कष्टाने उभे केले, ते सगळे किती सहज सोडून ती चालली होती. कसला मोह नाही, लोभ नाही, तक्रार नाही. आनंदी चेहऱ्याने निरलसपणे तो साधाभोळा जीव निघाला. कुठल्यातरी अज्ञात साईटीवर पुन्हा कुणा दुसऱ्याचे घर बांधायला.
मनात विचार आला…
जीवन यांना आपल्यापेक्षा जास्त चांगले कळलेले नाही का?
तसे पाहिले तर आपल्या सगळ्यांना एक दिवस असेच जायचे नाही का?
जे मिळविले, निगुतीने सजविले, ते तसेच सोडून जावे लागणार नाही का?
त्या ‘वरच्या मालकाचा’ निरोप आला की आपल्यालाही दुसऱ्या साईटवर नव्या कामाला जावे लागेल. कोण थांबू शकते? अगदी एक क्षण, एक श्वासतरी जास्त मिळतो का कुणाला?
सर्वांना जावेच लागते की! पण दुसऱ्याचे घर बांधून, सजवून त्यांचे विश्व अधिक सुंदर करून इतके निरिच्छपणे, निरलसपणे, नि:संगपणे जाणे आपल्याला जमणार आहे का?
एकदा अवश्य विचार करून पहावा…
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
… हं हं हं! उगाच चोची आ वासून उघडू नका… मी जे चोचीत धरून आणलयं ते तुमच्यासाठी नाही… ती पुढच्या दिवसांची बेगमी करून ठेवायची आहे… तुम्ही आता काही लहान राहिलात नाही की घरट्यात बसवून तुम्हाला जेवायला नि खायला चोचीने भरवायला पाहिजे… जरा घरट्याबाहेर पडून बघा… स्वत:च्या पंखाच्या ताकदीचा अदमास घ्या… आकाश पंखावर तोलता येतयं का पहा… बाहेरच्या वातावरणात विचरून पहा म्हणजे तुम्हाला कळेल… कि अन्न शोधणं म्हणजे किती दिव्य असते ते… त्यात हे युध्याचे दिवस सुरू झाले आहेत… इंधन तुटवडा निर्माण झाला असल्याने माणसांचा लोंढा आता जंगलातली तशीच रस्यावरची झाडं सरपणासाठी तोडायला लागला… म्हणजे आपल्या घरट्यावरच गदा आली आहे… आधी भक्कम नि सुरक्षित निवाऱ्याची सोय बघायला हवी.. आणि त्यानंतर आपलं अन्न शोधायाला बाहेर पडणं गरजेचं आहे.. जंगलच आता ओकंबोकं झाल्यानं तिथं मिळाणाऱ्या आपल्या अन्नाची पुरी वासलात लागलीय… तिथं इतर भुकेजलेली गिधाडं, डोमकावळे तर दबा धरूनच बसलेत. आपल्यासारख्या दुर्बळ पक्षी इकडे फिरकला तर त्याचाच चट्टामट्टा कधी करतोय याकडे काकदृष्टीने टेहळणी करत बसलेत… शहरात पूर्वी रस्त्यावर राजरोसपणे उघड्यावर अन्न टाकून देत होते ते देखील आता बंद झाले आहे… काही तुरळक हाॅटेल उघडी दिसतात आणि त्यात मुंग्या च्या रांगा लागतात तश्या त्या माणसांच्या रांगा लागून त्यांचे अन्न घेताना दिसतात… एक एक शित आता तिथं फार मोलाचं ठरत असल्याने अन्न वाया घालवत नाहीत.. त्यामुळे तो ही अन्न मिळविण्याचा मार्ग आता जवळपास बंद होत आलाय… आधीच प्रदूषणामुळे हवा दूषित झालीच आहे. त्यात या युद्धाची भर पडल्याने ते दारूगोळा नि रासायनिक धूरांची भर पडल्याने जगायला आवश्यक असा प्राणवायू सुध्दा संपत आला आहे… कडक उन्हाळा तर चांगलेच भाजून काढतोय.. पाण्याचे पाणवठे कोरडे ठाक पडले असल्याने पिण्याचे पाणी पण मिळणे दुर्लभ झाले आहे… पाणी नाही, अन्न नाही, निवारा नाही… अश्या स्थितीत आपलं जगणं मुश्किल होऊन बसलयं… जिथं माणसांनाच त्यांच्या जगण्याची चिंता लागून राहिलीय तिथं ते आपल्या सारख्या छोट्या पक्ष्यांचा विचार तरी कसा बरे करतील… सहानुभूती आता नावालाही सापडत नाही… भूतदयेचं थडगंच बांधले गेलयं… बरं स्थलांतर करून प्रश्न सुटेल असे काही वाटत नाही… कारण हे साधं युद्ध दिसत नसून जागतिक युद्ध सुरू झालयं असचं वाटतयं आणि त्याची व्याप्ती ही हळूहळू दिवसागणिक अधिक विस्तार पावून अधिकाधिक युध्दाची तीव्रता वाढत जाणारी आहे… एक प्रकारे तिसरं महायुद्ध सादृश्य असं त्याचं रूप दिसू लागलयं…
तेव्हा तुम्ही सगळ्यांनी जबाबदारी ओळखून सगळ्या जीवनावश्यक गोष्टींची बचत करत चला… जितकं बाहेरून अन्न व इतर गोष्टी आणता येतील त्या आणून त्याचा उद्यासाठी संग्रह करत चला… युध्द कधी थांबेल याची शाश्वती देता येत नाही… आणि आज मिळणाऱ्या बऱ्याच गोष्टी उद्या बाजारात मिळतीलच याची खात्री नाही… तेव्हा एक से भले दो.. दो भले तीन और तीन से भले चार कार्याला जुंपून घेऊया… तरच उद्याचं जिणं जगता येईल… अन्यथा…
आपल्या स्वार्थासाठी तिकडे माणसांनी माणसांशी युध्द सुरू केलेय… त्याची त्यात आहूती ही पडत आहेच.. पण त्या युद्धाची नाहक झळ मात्र आपल्याला सुध्दा बसल्यामुळे आपलंही जगणं धोक्यात आलं आहे… “
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १५ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
गाथेतून दिसणारे संत तुकाराम
भक्ती (३)
तुकारामांचे मन प्रपंचात, संसारात मुळीच रमत नाही. पांडुरंगाच्या भेटीची त्यांना तळमळ लागून राहिली आहे, म्हणूनच ते एकसारखे म्हणतात,
भेटी लागी जीवा लागलीसे आस
पाही रात्रंदिस वाट तुझी
परमेश्वर प्राप्तीच्या वेडाने
कन्या सासुरासी जाये। मागे परतुनी पाहे।
तैसे झाले माझ्या जीवा ।केव्हा भेटसी केशवा।।
जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. ।
तुकारामांची अवस्था पाण्याबाहेर तडफडणाऱ्या मासोळी सारखी झाली आहे. पांडुरंगाची कृपादृष्टी मिळवण्यासाठी आता काय करावे
हा एकच विचार त्यांच्या मनात रात्रंदिवस घोळत आहे.
ते पांडुरंगाला साद घालतात आणि म्हणतात,
तान्हेल्याची धनी फिटे गंगा नव्हे उणी।
माझे मनोरथसिद्धी पाव भावे कृपानिधी।।
तू तो उदारांचा राणा माझी अल्पशी ।
कृपादृष्टी पाहे तुका म्हणे होई साहे ।
एखाद्या तहानलेल्या माणसाने गंगेतले पाणी पिऊन त्याचे समाधान झाले, तरी गंगेचे पाणी काही कमी होत नाही. माणूस मात्र तृप्त होतो. त्याचप्रमाणे हे कृपेच्या सागरा माझ्या मनातल्या इच्छा, माझे सर्व मनोरथ तूच पूर्ण करू शकतोस.
तुम्ही माझ्याकडे कृपादृष्टीने पहावे एवढीच माझी अल्पशी इच्छा आहे. माझ्या साधनेत मला मदत करा.
भक्ती मार्ग हा परमेश्वरा प्रती जाण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. बहुतेक सर्व साधुसंत याच मार्गाने गेले आहेत, कारण या मार्गात कुठेही आड वळणे नाहीत. भक्ती मार्गाची ही वाट अगदी स्वच्छ आहे.
संत तुकारामही याच मार्गाने जात आहेत.
ते साधकांना सांगतात,
नव्हतो सावचित्त तेणे अंतरले हित।
पडिला नामाचा विसर वाढविला संसार।।
लटक्याचे पुरी गेलो वाहूनिया दूरी।
तुका म्हणे नाव आम्हा सापडला भाव।।
ते स्वतः विषयी सांगतात की हरी चिंतनाविषयी सावध नव्हतो, म्हणून विघ्ने आली. हरी नामाचा विसर पडला आणि संसार वाढवत बसलो. मायेच्या पुरात पुरता अडकलो. परंतु आता जागा झालो आहे. हरिभक्तीची नौका सापडली आहे.
तेव्हा आता काय उणे आम्हा विठोबाचे पायी
नाही ऐसे काही तेथे एक
तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी
फुकाची लुटावी भांडारे ती
पांडुरंगाच्या गावाला मोक्षाची भांडारे भरलेली आहेत आणि भक्तांना ती अगदी मोफत आता लुटता येतात.
तुकाराम महाराज या मायामोहातून, प्रपंचातून मुक्त होऊन पांडुरंगाशी एकरूप होण्यासाठी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणावर माथा ठेवण्यासाठी आतुर झाले आहेत. अतिशय व्याकुळ झाले आहेत. ते म्हणतात, ” पांडुरंगा तू मला फक्त भेट दे”. त्यासाठी…
नलगे हे तुझे ब्रह्मज्ञान। गोजिरे सगुण रूप पुरे।।
लागला उशिर।पतित पावन ।विसरूनी वचन। गेलास या।।
जाळूनी संसार। बसला अंगणी ।तुझे नाही मनी ।मानसी हे।।
तुका म्हणे नको राग रागेजू विठ्ठला। उठी पावतात देई मला भेटी आता।।
या अभंगातूनही विठ्ठलाच्या भेटीची तुकाराम महाराजांना लागलेली तळमळच दिसून येते. या अभंगात वापरलेला रागेजू हा शब्द मला विशेष लक्षणीय वाटला. लहान मूल जसे लडिवाळपणे त्याच्या मातेकडे काही हट्ट करते, त्याचप्रमाणे तुकाराम महाराज या माऊलीला रागावू नकोस असे मोठ्या लडिवाळपणे सांगत आहेत.
संसारातून तुकाराम महाराजांना पूर्ण विरक्ती आलेली आहे. पंचेंद्रियांवर ताबा मिळवलेला आहे, आणि ते पांडुरंगाला म्हणतात,
संसार हा तीही केला पाठमोरा
नाही द्रव्यदारा जया चित्ती
शुभाशुभ नाही हर्षामर्श अंगी
जनार्दन जगी होऊनी ठेला
तुका म्हणे दिला देह एकसरे
जयासी दुसरे नाही मग
त्यांना आता मान मरातब काही नको. त्यात त्यांना थोडेही सुख वाटत नाही. गोड अन्न सुद्धा त्यांना विष समान वाटत आहे. कोणी त्यांची स्तुती केली तर त्यांचा जीव कासावीस होतो.
ते म्हणतात,
नको मृगजळा होऊ मज
तुका म्हणे आता करी माझे हित
काढावे जळत्या आगीतून.
हा संसार म्हणजे त्यांना जळती आग वाटत आहे.
तुकाराम महाराजांच्या प्रत्येक शब्दातून त्यांची विठ्ठल भक्तीची आणि विठ्ठलाच्या भेटीची तळमळ दिसून येते
“तुमचा सगळा प्रोग्रॅम आधी पाठवा. ते वाचून मग ठरवतो. ” असा एक उद्धट फोन महिन्याभरापूर्वी आला. सहसा असले फोन आले की, मी किंवा पूर्वा उत्तरं देण्याच्या भानगडीत पडत नाही. ओळख पाळख नसणारा माणूस ‘मीच भारी’ अशा स्वरात अन् तोऱ्यात बोलायला लागला की, आम्ही पुढं काही बोलत नाही. त्यामुळं, आम्ही प्रतिसाद दिला नाही.
दोन दिवसांनी पुन्हा तोच फोन..
” तुम्ही पाठवला नाहीत प्रोग्रॅम.. मी पाठवा असं म्हटलं होतं तुम्हाला. ” समोरुन अरेरावी..
” पण मी ‘पाठवतो’ असं म्हटलं नव्हतं तुम्हाला. ” मी शांतपणे म्हटलं.
” तुम्ही पाठवा. ”
” आम्ही प्रोग्रॅम जाहीर करत नाही. तो आदल्या दिवशीच सांगितला जातो आणि केवळ नोंदणी केलेल्यांनाच. ”
” असं का बरं? ”
” गेली एकोणीस वर्षं आमची हीच पद्धत आहे. आम्ही प्रवासाचे डिटेल्स जाहीर करत नाही. ”
” असं असेल तर मला माझ्या मुलाला पाठवण्यात इंटरेस्ट नाही. ” समोरुन जोरात आवाज.
” ठीक” मी म्हटलं अन् फोन ठेवून दिला.
तीन चार दिवस उलटून गेले. पुन्हा एकदा तोच फोन..
” मला माहिती पाठवा.. “
मी फोन ठेवून दिला. पुढचे काही दिवस वेगवेगळ्या फोन नंबर्स वरुन तो माणूस फोन करत राहिला. मी आमच्या नियमानुसार अनुभूती चा प्रोग्रॅम दिला नाही.
एके दिवशी माझ्या एका मित्राचा मला फोन आला.
” अनुभूतीच्या जागा भरल्या का रे? ”
” नाही अजून. का रे? ”
” अरे, एकजण तुला फोन करतायत. तू त्यांना कुठले कुठले गड किल्ले आहेत, याची माहिती दिली नाहीस, अशी त्यांची तक्रार आहे. तू त्यांना माहिती दे ना. ”
” अनुभूतीचे काही नियम आहेत रे. आम्ही प्रोग्रॅम आदल्या दिवशीच सांगतो. आणि तोही पूर्ण सांगत नाही. उद्या कुठं जायचं आहे तेवढंच सांगतो. संपूर्ण प्रोग्रॅम जाहीर केला जात नाही. ” मी सांगितलं.
” पण असं का? ”
” अनुभूती चा अर्थ काय? अनुभूती म्हणजे आपलं आयुष्य अधिक समृद्ध करणारा विलक्षण अनुभव. तोच तर या कार्यक्रमाचा प्राण आहे. आपण सगळी ठिकाणं सांगून टाकली की, लोक गूगल सर्च करतात, युट्यूब वर शोधून पाहतात. सगळी उत्सुकता, अप्रूप, आनंद घालवून टाकतात. मग त्या कार्यक्रमाचा उद्देशच साध्य होत नाही. “
” अरे, पण त्यातले अनेक किल्ले त्यांनी आधीच पाहिले असतील तर? मग त्यांना तेच तेच पाहावं लागणार नाही का? ”
” हे बघ. मी आठ वर्षांचा असताना पहिल्यांदा रायगडावर गेलो. आज ३२ वर्षं झाली, मी जवळपास चारशे हून जास्त वेळा तिथं जातोय. पण अजूनही असं वाटतं की, प्रत्येक वेळी तो गड मला वेगवेगळा दिसतो. ”
” पण तुला आवड आहे म्हणून तू सारखा सारखा तिथं जातोस. लोकांना तशी आवड नसेल आणि फक्त दहा दिवस काहीतरी ॲक्टिव्हिटी म्हणून पाठवायची इच्छा असेल तर? ”
“अनुभूती त्यांच्यासाठी नाहीच मुळी. कारण हा इतिहास, समाज, संस्कृती, परंपरा, ज्ञान, आपला वारसा यांच्याशी मुलांना नातं जोडायला शिकवणारा कार्यक्रम आहे. तो टाईमपास प्रोग्रॅम नाही. म्हणूनच असा विद्यार्थी आणि असे पालक आम्ही आमच्या गटात घेतच नाही. माझ्याहीपेक्षा जास्त पॉश कॅम्प्स आयोजित करणारे कितीतरी तज्ञ लोक आहेत. त्यांनी अगदी अवश्य तिकडं नाव नोंदवावं. पण माजुरडे पालक आणि विद्यार्थी आम्हाला नकोत. ”
” पण त्यांना त्यांच्या मुलाला तुझ्याच प्रोग्रॅमला पाठवायचं आहे. तुझा प्रोग्रॅम वेगळा असतो अन् मुलांना खूप शिकायला मिळतं, असं त्यांना अनेकांनी सांगितलं म्हणूनच त्यांना इंटरेस्ट आहे. ”
” मग त्यांनी आमचे नियम पाळायला हवेत. तेही कोणतीही तक्रार न करता. तू त्यांना हे स्पष्ट सांग आणि या विषयात अजिबात मध्यस्थी करु नकोस. ” असं सांगून मी विषय थांबवला.
काही वर्षांपूर्वी अनुभूती च्या प्रवासातच एका पालकांचा मला फोन आला होता. त्यांची मुलगी आमच्या सोबत होती. आणि “दहा दिवसांत एकदाही फोन करायचा नाही” अशीच अट सगळ्या पालकांना घातली होती. आम्ही कोल्हापुरात होतो. मला फोन आला.
” सर, तुम्ही कोल्हापुरात आहात ना… तिथल्या *** नावाच्या हॉटेलात बेस्ट नॉनव्हेज मिळतं. ”
“पण आपण अनुभूती मध्ये जेवण पूर्णतः शाकाहारीच असतं. हे आधीच स्पष्ट सांगितलेलं आहे. “
” सर, माझा एक जवळचा मित्र कोल्हापुरातच राहतो. तो तिला घ्यायला येईल आणि नॉनव्हेज जेवण करवून पुन्हा आणून सोडेल. तुम्ही सगळे तुमचं तुमचं व्हेज जेवण करा. ” मुलीचे वडील म्हणाले.
” तसं जमणार नाही. ” मी.
” आता कोल्हापूर मध्ये जाऊन नॉनव्हेज खायचं नाही, असं कसं चालेल? ”
” तुम्ही नॉनव्हेज खाऊ घालण्यासाठी तिला खास कोल्हापूर ला घेऊन जा. आत्ता मी इथून तिला कुणाहीसोबत सोडणार नाही आणि पुन्हा अशा गोष्टींसाठी मला फोन करु नका. ” ठणकावून सांगितल्यावर पुन्हा असा फोन आला नाही.
असाच आणखी एक प्रसंग. आम्ही सिंहगड – तोरणा असा ट्रेक करुन खाली उतरलो आणि विश्रांतीसाठी थांबलो. भल्या पहाटे माझा एक मित्र तिथं कार मधून पोर्टेबल शेगडी आणि आप्प्यांचं पीठ घेऊन आला. तीन शेगड्या होत्या. आणि आम्ही सगळे जण सेल्फ कुकिंग पद्धतीनं आपापले आप्पे करुन घेऊन मनसोक्त ताव मारत होतो. पण आमच्यात एक मुलगी होती.
“मला आप्पे नकोत. आमच्याकडे सारखेच केले जातात. तुम्ही खा, मी खात नाही. ” आम्ही सगळ्यांनी दोन तीन वेळा आग्रह करुन पाहिला, नंतर विषय सोडून दिला.
नाश्ता करुन आम्ही राजगड कडे रवाना झालो आणि माझ्या विशेष आवडीची गुंजवणे मावळाची वाट धरली. ती वाट खरोखरच घाम फोडणारी आहे. शारीरिक क्षमतेची परीक्षा पाहणारी आहे. शेवटचा टप्पा आणखीनच आव्हानात्मक आहे. कारण तो दरवाजाच तशा कठीण ठिकाणी आहे. झालं.. हट्टानं
रिकाम्या पोटी बसलेल्या बाईसाहेब गुंजवण्याच्या जंगलातच फतकल मारुन खाली बसल्या. अंगातलं बळ संपलं होतं. पोटात भूक उसळ्या मारत होती. डोकं लागलं दुखायला. निम्मे जण वाट काढत वरती वरती सरकत होते. ते सगळे होते तिथं थांबले. ग्लुकोन डी आणि लिंबाचं सरबत पाजत पाजत तिला हळूहळू वरती आणलं. गुंजवणे दरवाज्याच्या उंबऱ्याशी बसूनच ती जेवली अन् मग अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर तिच्या अंगात त्राण आलं.
पण ह्या अर्धवट ज्ञानी हट्टी उद्योगामुळे अडीच तीन तासांचं खोबरं झालं. संजीवनी माची सोडून द्यावी लागली..! स्वतःचंच म्हणणं खरं करण्याची सवय अनेक मुलामुलींना असते आणि आयुष्यात अनेक ठिकाणी महागात पडते ती अशी…
फुटाणे, शेंगदाणे खाण्याची सवय आता “जुनाट” ह्या प्रकारात समाविष्ट झाली आहे. पेरीपेरी, फ्रेंच फ्राईज हे प्रकार आता रुढ झाले आहेत. मुलं पेरुची जेली खातील, पण पेरु खाणार नाहीत. जामुन शॉट घेतील, पण जांभळं खाणार नाहीत. मसाला पापड खातील, पण भाताचे सांडगे किंवा कोंड्याच्या पापड्या खाणार नाहीत. त्यांना लाह्यांचा काला माहितीच नसतो.
भल्या पहाटे गडावर चढून जावं. सकाळच्या उन्हात गड फिरावा. न्याहारी करण्यासाठी लाह्या, राजगिरा किंवा पोहे सोबत घ्यावेत. तिखट मिठाच्या डब्या असाव्यात. एका डबीत शेंगदाण्याचा कूट घ्यावा. बचकभर हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे असावेत. गड फिरुन झाल्यावर एखाद्या देवडीशी किंवा गडावरच्या देवळात बसावं. धोपटी उघडून सगळं साहित्य बाहेर काढावं. आजूबाजूला फिरुन दोन दगड शोधावेत. टाक्याच्या पाण्यानं स्वच्छ धुवून पुसून घ्यावेत. दगडावर दोन तीन मिरच्या अन् बोटभर आलं चांगलं ठेचून घ्यावं. लाह्यांवर पाण्याचा सपका मारावा. मग त्यात कूट, मिरच्या, आलं, तिखट, मीठ घालून एकत्र करुन घ्यावं. गडावरच्या गडकरणी भगिनींकडून सुगडातलं घट्ट कवडीचं दही घ्यावं. अन् दह्यात सगळं कालवून ताक घालून झकास काला तयार करावा. पोटभर खावा. वरुन पुन्हा दही, ताक रिचवून तृप्त मनानं ढेकर द्यावी. तिथंच पथारी पसरून दोन तास ताणून द्यावी. ह्यातलं सुख आपल्या मुलांना ठाऊकच नाही.
गडावर जाऊन तिथं फ्रूटीसारखी बाटलीबंद कोल्ड्रिंक्स पिऊन लोकांना नेमकं काय मिळतं हे मला आजतागायत समजलेलं नाही. लोक तिथंही पिझ्झा बर्गर मिळेल का हे शोधतात. आईस्क्रीम शोधतात. पण लिंबाचं सरबत त्यांना महाग वाटतं. वास्तविक पाहता, गडभ्रमंती करणाऱ्याच्या सोबत दोन चार लिंबं, दोन चार कांदे बटाटे असायलाच हवेत. थंडगार शिळ्या भाताचा डबा सोबत असला तरीही उत्तम. म्हणजे गडावरुन दही ताक मिळवून दहीभात ताकभात करुन खाता येतो. हे सगळं आपल्या मुलांनी आवर्जून अनुभवायला हवं. मनगटी घड्याळाशी असलेला संबंध जरा कमी करुन सूर्याच्या घड्याळानुसार जगायला हवं. म्हणजे मग नव्या जगाची ओळख व्हायला लागते. आणि हेच जग अत्यंत श्रीमंत, समृद्ध, निकोप आणि सर्वतोपरी उत्कृष्ट असल्याची अनुभूती येते.
आपल्या पूर्वजांची ज्ञानसमृद्धता किती उच्च दर्जाची होती, याचा परिचय आताच्या पिढीला होणं आवश्यक आहे. पुरातन लेण्या, मंदिरांवरची शिल्पकला, कोरीवकाम, योग्य दगडाची निवड, बांधकामाचा भक्कमपणा, पुष्करण्या, बारवा, पाण्याची टाकी, जिवंत झऱ्यांचा शोध ही केवळ भटकंती नव्हे. ही आपल्या पूर्वजांच्या अफाट बुद्धिमत्तेची आणि कर्तृत्वाची जिवंत साक्ष आहे. ते वैभवच आपलं भूषण आहे. दऱ्याडोंगरांत, निबीड अरण्यात वसलेली देवस्थानं पाहणं, त्यांचा अभ्यास करणं आणि तिथली शांत प्रसन्नता अनुभवणं ह्यात जो आनंद आहे तो “मॉलोमॉल” भटकण्यात अन् प्ले स्टेशन खेळण्यात नाही, हे आपल्या मुलांना योग्य वयातच शिकवायला हवं. त्यांच्या करिअरमधला राष्ट्रीय प्रवेश परीक्षांचा स्कोअर जितका महत्वाचा आहे, तितकाच त्यांचा व्यक्तिमत्व विकाससुद्धा महत्वाचा आहे. त्यांची नाळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेशी घट्ट जोडली जाणं हे फार फार गरजेचं आहे. तरच हा वारसा जपणारे हात अन् त्याविषयीच्या संवेदना जागृत ठेवणारी मनं तयार होतील.
बलोपासना, मनोपासना, ज्ञानोपासना आणि राष्ट्रोपासना या चारही उपासना आपल्या मुलांनी नित्यनेमाने केल्या तर त्यासारखा व्यक्तिमत्व विकासाचा दुसरा उत्तम मार्ग नाही. ही उपासनेची चतु:सुत्री जितकी घट्ट रुजेल तितके आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्वाचे वटवृक्ष तयार होतील आणि गगनाला भिडतील. उत्तमतेचं अन् चारित्र्याचं अधिष्ठान ज्याच्या आयुष्यात असतं, त्याचं भवितव्य उज्ज्वलच असतं.
ह्याच विचारानं “अनुभूती” ची सुरुवात आम्ही २१ वर्षांपूर्वी केली. यंदा सुद्धा १३ दिवसांची ही विलक्षण प्रेरणा देणारी आणि नवं आयुष्य जगायला शिकवणारी “अनुभूती” ९ मे ते २१ मे, २०२५ या कालावधीत आहे. दहा किल्ले आहेत, तीन जंगल ट्रेक आहेत, विविध पुरातन मंदिरं आहेत, समुद्रावर मनसोक्त खेळणं आहे, ऐन रत्नागिरीत आमराईतला अस्सल हापूस आंब्याचा आस्वाद घेण्याचा अनुभव आहे आणि अर्थातच रात्रीच्या अंधारात गड चढून जाण्याचा थरारक अनुभव तर आहेच…!
– – – आपल्या मुलांना घडवण्यासाठी हे करायलाच हवं ना…
पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात, सासवडपासून वीस आणि पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर वसलेलं माळशिरस (भुलेश्वर) हे माझं मूळ गाव. सुमारे पाच हजार लोकसंख्येचं, तालुक्यातल्या मोठ्या कृषिक्षेत्रांपैकी एक असलेलं हे गाव शांत, सुसंस्कृत आणि सलोख्याचं उत्तम उदाहरण आहे.
गावात हिंदू-मुस्लीम, सवर्ण-दलित असले कोणतेही ताणतणाव नाहीत. गावगुंडगिरी किंवा दहशतीचा मागमूसही नाही. ग्रामस्थ परस्परांचा आदर राखत, सण-उत्सव, जत्रा एकत्र साजऱ्या करतात. ग्रामदैवत श्री भुलेश्वर यांच्यावर सर्वांची नितांत श्रद्धा आहे.
किंचित इतिहास
भुलेश्वर मंदिर यादवकालीन असून गावातली बहुतेक कुटुंबं शतकानुशतकं इथं नांदत आहेत. ते सगळे ‘यादव’ असून देवगिरीच्या यादवांची ते रयत आहेत. इथल्या बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती हाच आहे. इतिहास, परंपरा आणि श्रम यांचं सुंदर नातं इथं आजही जाणवतं
गावाची रचना
गावाची रचना पारंपरिक पद्धतीची आहे. मंदिरं, वेशी, मुख्य मार्ग, बाजारपेठ, शाळा, स्मशानभूमी — सगळं नियोजनबद्ध आणि परस्परपूरक आहे. ओढा ही गावाची नैसर्गिक पश्चिम सीमा असून त्यानं गावाला एक वेगळी ओळख दिली आहे.
ब्राह्मण परिवार आणि आमची भूमिका
गावात पाच ब्राह्मण कुटुंबं आहेत. त्यापैकी बुरसे आणि काळे हे ग्रामोपाध्याय. पंचक्रोशीतले सर्व धार्मिक विधी, संस्कार, लग्नकार्य, इ. कार्यं करून देणे ही जबाबदारी परंपरेनं आमच्याकडे या दोन कुटुंबांची.
आमच्या बुरसे कुटुंबाची ओळख केवळ उपाध्येपणापुरती नाही, तर कीर्तन, साहित्य, संगीत, वक्तृत्व अशा ललितकलांशी घट्ट नातं असलेली आहे. नारदीय कीर्तनाची परंपरा आमच्या घराण्यात पिढ्यान्पिढ्या जपली गेली आहे. त्यामुळं ललितकला, शब्द, स्वर, भाव हे आमच्या रक्तातच आहेत.
भटमळा — आमची ओळख
गावाच्या पश्चिमेला ओढ्यालगत आमची वडिलोपार्जित सुमारे सात-आठ एकर जमीन, जिला ‘भटमळा’ म्हणून ओळखतात. इथली गोड्या पाण्याची विहीर एकेकाळी अर्ध्या गावाची तहान भागवत असे. दुष्काळातही ती क्वचितच आटत नसे.
कृतज्ञतेतून जन्मलेली शाळा
माझे वडील स्व. धुंडिराज लक्ष्मण बुरसे (आप्पा) यांनी एक विचार मांडला —
“ज्या गावानं आपल्याला गेली तेराशे वर्षं, पिढ्यान्पिढ्या आश्रय दिला, त्या गावाचं ऋण कसं मानायचं? त्या ऋणातून उतराई कसे व्हायचं? ”
यातूनच सुमारे पस्तीस – चाळीस वर्षांपूर्वी भटमळा आणि विहीर, गावातल्या ‘भुलेश्वर विद्यालया’ला दान करण्याचा निर्णय झाला.
आमच्या या कृतीनं प्रेरित होऊन इतर दोन ब्राह्मण कुटुंबांनीही त्यांच्या मालकीची मंदिरं आणि जागा शाळेसाठी दिल्या. गावानं श्रमदान केलं, शासनाचं साहाय्य मिळालं आणि पाहता पाहता चौथीपर्यंतची शाळा दहावीपर्यंतच्या माध्यमिक विद्यालयात रूपांतरित झाली!
आज ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणकशाळा, क्रीडांगण, सभागृह अशा सर्व सुविधा इथं उपलब्ध आहेत. पंचक्रोशीतली शेकडो मुलंमुली याचा लाभ घेत आहेत.
लेकरं आणि पाखरं
पूर्वी श्रमदानातून रोपलेले विविध वृक्ष आता ‘प्रौढ’ झाले आहेत. सारा परिसर हिरवागार झाला आहे.
वर्गांमधून मुलांचा आणि झाडांवरून पाखरांचा चिवचिवाट ऐकताना मन समाधानानं भरून येतं.
पुरंदर जलउपसा योजनेमुळं गावाचं स्वरूप झपाट्यानं बदललंय. पारंपरिक तृणधान्यांची जागा ऊस, भाजीपाला, फळशेती यांनी घेतलीय. रासायनिक खतं, कीटकनाशकं वाढली. उत्पादन वाढलं, पैसा आला — पण निसर्ग मात्र अस्वस्थ झाला, मागे पडला!
आज गावातलां शेतकरी स्वतःच्या जेवणासाठी लागणारं धान्य स्वतः न पिकवता विकत घेतो.
गावात पाणी आहे, पण अन्नसाखळी विस्कळीत झालीय.
पर्यावरणाची हाक
कीटक, फुलपाखरं, सरपटणारे जीव नाहीसे झाले.
त्यांच्यावर अवलंबून असलेली रानपाखरं, साप, ससे, हरणं उपाशी राहू लागलीयेत.
पर्यावरणाचा समतोल ढासळू लागलाय.
माझा निर्णय
या पार्श्वभूमीवर मी ठरवलं —
माझ्या शेतातली चार-सहा एकर जागा जाणीवपूर्वक अविकसित ठेवायची.
केवळ पारंपरिक तृणधान्यं
अरंकरित, गावरान बियाणं
रासायनिक खतं व औषधं नाही
पिकांची राखण नाही
पाखरांना, प्राण्यांना मोकळा वावर करू द्यायचा
त्यांना हवं तेवढं खाऊ द्यायचं,
उरेल ते माझं.
अशी पाखरे येती
विस्थापित झालेली, दूर गेलेली हरणं, ससे, पाखरांचे थवे सुगीच्या दिवसांत परत येतात.
किलबिलाट-किचकिचाट, उड्या-सुरकांड्या, धुडगूस – दंगा — सगळं सुरू होतं.
रानजिवांची पोटं तट्ट फुगतात.
त्यांच्या मुखातून
उरलेलं धान्य मला वर्षभर पुरतं.
असेन मी, नसेन मी
गावाजवळ विमानतळ होतोय. रिंगरोड, बुलेट ट्रेन धावणार आहेत. विकासाचा रेटा थांबणार नाहीये.
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ६४ आणि ६५ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
।। श्री नारद उवाच ।।
भक्ति सूत्र –६४
अभिमानदम्भादिकं त्याज्यम् ||६४||
अर्थ : अभिमान म्हणजे गर्व, ढोंग, कपट, यांसारख्या दुर्गुणांचा त्याग करावा.
विवेचन: अभिमान हा भल्याभल्या साधकांना पथभ्रष्ट करतो असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. याची अनेक उदाहरणे आपल्या सर्वांना ठाऊक आहेत. अभिमान आणि स्वाभिमान हे जोडशब्द आहेत. त्यातील सीमारेषा अत्यंत सूक्ष्म आहे. ती नीट समजून घेतली तर मनुष्यात आमूलाग्र बदल घडेल. अभिमान कोणाला नसतो ? , जसा तो श्रीमंताला असतो तसा तो भिकाऱ्याला देखील असतो. समजा एखाद्या भिकाऱ्याला एका घरात भीक मिळाली नाही तर तो लगेच सांगतो, तुमचं शेवटचं घर नाहीए, मी इतरत्रही भीक मागेन. असा अभिमान काय कामाचा ? हिरण्यकश्यपूला मारायला भगवंत नरसिंह अवतारात प्रगट झाले. साक्षात भगवंत समोर असतानाही हिरण्यकश्यपूचे हात नमस्कारासाठी जोडले न जाता ते देवाला मारण्यासाठी शस्त्राकडे गेले. यावरून आपल्याला अभिमान काय ‘चीज’ आहे हे लक्षात येऊ शकते. आपल्या घरात दुधाचे पातेले असते, त्याला आतील बाजूने दुधातील तुपाचा तवंग चिकटलेला असतो. घरातील माताभगिनी त्यात गरम पाणी ओतून ठेवतात म्हणजे तूप पाण्यात विरघळून जाते आणि नंतर ते पातेले घासून स्वच्छ करण्यात येते. इतके करूनही जर ते पातेले नीट घासले गेले नाही आणि त्यात पुन्हा दूध घेतले गेले तर तेही नासतें. मानवी मनाचे असेच आहे. अभिमान मनुष्याच्या मनाला असाच चिकटून असतो. सर्व सद्गुरू मातृहृदयी असतात. ते आपल्या मनाचे पातेले लख्ख व्हावे, आपली देहबुद्धी, आपला अभिमान नष्ट व्हावा म्हणून प्रयत्न करीत असतात. मनुष्याने ह्या नश्वर जगात अलिप्त व्हावे असे त्यांना वाटत असते म्हणून ते अभिमानाचा समूळ नाश करण्याचा प्रेमळ सल्ला साधकाला देतात.
मनुष्याची वाटचाल तीन प्रकारे होत असते. देहाकडून देहाकडे, देहाकडून मनुष्यत्त्वाकडे आणि देहाकडून देवत्वाकडे. यापैकी पहिली वाटचाल आपसूक होत असते. दुसरीसाठी काही प्रयत्न करावे लागतात तर तिसरी स्थिती प्राप्त होण्यासाठी मात्र अनेक आणि अथक प्रयत्नांची गरज असते. श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज यांचे एक वचन आहे, *”मनुष्य म्हणून जन्माला आलेला माणूस, माणूस म्हणून मेला तरी बरा! “* साधक, मुमुक्षु, सिद्ध या तर खूप पुढच्या गोष्टी राहिल्या. श्री महाराज असे का म्हणाले असतील ? यावर चिंतन करताना असे लक्षात आले की दैनंदिन व्यवहार करताना मी दिवसभरात मनुष्य असल्याचे दाखवून देतो, थोडक्यात मी दिवसभर माणसा सारखा वागतो का ? थोडा सूक्ष्म विचार केला तर असे लक्षात येईल, मनुष्य अनेक प्राण्यांसारखा वागत असतो. उदा. स्वार्थासाठी तो मांजरीसारखा लोचट होतो, कुत्र्यासारखा तो लोकांवर भुंकत असतो (डाफरतो! ), कधी तो गरीब गाय, वासरू असतो तर कधी गोगलगाय, तर कधीकधी तो गाढवासारखा सुखदुःखांची ओझी वाहत असतो. थोडक्यात दिवसभरात मनुष्य आपल्या कृतीतून स्वतःमधील ‘अनेक’ प्राण्यांची ओळख स्वतःच स्वत:ला आणि जगाला करून देत असतो. दिवसभरात तो फार कमी वेळ ‘मनुष्य’ म्हणून वागत असतो. श्रीदासबोधातील ‘पढतमूर्ख समास’ सुद्धा अशा लोकांसाठीच लिहिला गेला असावा, असे म्हणायला हा उत्तम आधार आहे. श्रीसमर्थ आपल्याला सांगत आहेत की ‘मनुष्य ते मनुष्य’ प्रवास होण्यासाठी मनुष्याच्या अंगी अतिलीनता असणे अनिवार्य आहे. अतिलीन होणे म्हणजे ‘मी’ चा पूर्णपणे ऱ्हास होणे. आंब्याचे झाड फळांनी डवरले की नकळत झुकते तशी महान मंडळी कायम अतिलीन असतात. स्वतः ‘सद्गुरू’ असूनही श्री गोंदवलेकर महाराज स्वतःला रामाचा ‘दीनदास’ म्हणायचे. समर्थ तर स्वतःला रामदास म्हणायचे. विश्वमाऊली झालेले श्री ज्ञानेश्वर महाराज स्वतःला *”येऱ्हवी तरी मी मुर्खु”* (ज्ञाने. १. ७६) असे संबोधतात.
शरणागती खूप महत्वाची आणि अत्यावश्यक आहे. कार्यालयात अधिकाऱ्यांपुढे स्वार्थासाठी लीन (खरेतर हाजीहाजी करणे) आणि भगवंता पुढे लीन होणे यात मूलभूत फरक आहे, तो वाचकांनी नीट समजून घ्यावा. संत जरी असे अतीलीन होऊन वागत असले, सामान्य मनुष्य मात्र तसा नसतो. त्याला जात्याच अहंकार असतो आणि वाढत्या वयागणिक आणि इतर गोष्टींमुळे तो कमी न होता, त्यात सतत वाढ होत असते. म्हणून अहंकार ते लीनता हा प्रवास कठीणच असतो. हा प्रवास करणे म्हणजे मनाला बांध घालणे, मनावर नियंत्रण मिळविणे. मनुष्याकडे व्युत्पत्ती, विद्वता जरूर असावी, पण ती विसरता आली पाहिजे, नव्हे विसरता आलीच पाहिजे. मी म्हणजे कोणी विशेष आहे असे न वाटता आपण जगातील सर्व वस्तुमात्रांसारखेच एक आहोत असे वाटून खऱ्या अर्थाने नम्र होता आले पाहिजे. सद्गुरुंना शरण गेल्याने अंगी लीनता येऊ शकते. साधना करताना आपली सर्व कर्मे जर भगवंतांस किंवा आपल्या सद्गुरूंना अर्पण करता आली तर अंगी लीनता बाणायला अधिक गती येते. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे लिनतेकडील प्रवास साधकाला जमू लागला याचा अर्थ साधकाची प्रगती योग्य गतीने चालू आहे. समर्थांना अपेक्षित असलेली लीनता ही दिखाऊ, नाटकी नक्कीच नसावी. ती सर्वभावें आणि स्वभावतः असावी. सर्वभावें (कोणत्याही भावात) म्हणजे मनापासून स्वीकारलेली लीनता आणि स्वभावे म्हणणे सहजभावाने कोणताही अभिनिवेश न बाळगता. समर्थ काही दुर्गुणांच्या अति नको असे म्हणतात पण लीनतेच्या बाबतीत मात्र अति हवे असे आग्रहाने सांगतात. लीनतेचे वागणे सर्वांना आवडते.
आज ‘चार’ पुस्तके शिकलेला मनुष्य स्वतःला ‘शहाणा’ समजू लागतो आणि स्वतःच्या (काही कारणांमुळे) कमी शिकलेल्या आईबाबांना अडाणी’ समजतो. इतकेच नव्हे तर हाच मनुष्य स्वार्थासाठी अनेक ठिकाणी लाचारी करताना दिसत असतो. म्हणून समर्थ सांगतात की अतिलीनता ही दिखाऊ असू नये तर ती पोटातून असावी, फक्त ओठातून असू नये. कारण दिखाऊपण फार काळ टिकत नाही. एक वचन आहे, *’आपण सर्वांना सर्वकाळी मूर्ख बनवू शकत नाही’*, काही जणांना काही वेळा मूर्ख बनवू शकतो. एकदा का दिखाऊपणाचा मुखवटा उतरला की मग त्या मनुष्याचे आयुष्य विराण बनते. साधन करता करता मनुष्य आपले सर्व कर्म परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा लीनता त्याच्या अंगी मुरू लागते. मनुष्याच्या अंगी खरी लीनता असेल तर ती संत-सज्जनांना आनंद देते.
या सूत्राचे सार एक ओळीत सांगायचे झाल्यास पुढील प्रमाणे सांगता येईल.
जनीं निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे।
(मनाचे श्लोक 2)
जय जय रघुवीर समर्थ
=============
भक्ति सूत्र –६५
“तदर्पिताखिलाचार: सन् कामक्रोधाभिमानादिकं तस्मिन्नेव करणियम् ||६५||”
अर्थ: आपले सर्व आचार, व्यवहार भगवंताला अर्पण करूनही काम, क्रोध, अभिमान इत्यादि विकार उद्भवले तर तेही भगवतांच्या ठिकाणी समर्पित करावे.
विवेचन: आपण सध्या नारद भक्ति सूत्रे अभ्यासत आहोत. पारमार्थिक मार्गाने जाताना चूक झाली तर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. तिथे काठावर उत्तीर्ण, गुणाची जोड देऊन उत्तीर्ण, अमक्याचा मुलगा, तमक्याचा मुलगा असे तिथे चालत नाही. हजारो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषी छोट्याश्या कामनेचे बळी ठरून साधनाभ्रष्ट झाल्याची उदाहरणे इतिहासात आढळतात. हे सर्व सांगण्याचे कारण असे की जप करायला सुरुवात केली, नाम घ्यायला सुरुवात केली, एखाद्या सत्संगात अमुक एक साधना ऐकली आणि ती करण्यास सुरुवात केली की मनुष्याला आज आता ताबडतोप अनुभूती हवी असते. अहो, जिथे पदवीधर होण्यासाठी आयुष्याची पंधरा वर्षे खर्च करावी लागतात, तिथे भगवतांची प्राप्ती साधना करून होईल असे म्हणणे किती सयुक्तिक आहे याचा प्रत्येक साधकाने विचार करायला हवा.
मनुष्याची वाटचाल सामान्यपणे तीन प्रकारे होत असते. देहाकडून देहाकडे, देहाकडून मनुष्यत्त्वाकडे आणि देहाकडून देवत्वाकडे. यापैकी पहिली वाटचाल आपसूक होत असते. दुसरीसाठी काही प्रयत्न करावे लागतात तर तिसरी स्थिती प्राप्त होण्यासाठी मात्र अनेक आणि अथक प्रयत्नांची गरज असते. श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज यांचे एक वचन आहे, “मनुष्य म्हणून जन्माला आलेला मनुष्य मनुष्य म्हणून मेला तरी बरा! “
मनुष्याला मनुष्य म्हणून घडण्याच्या मागे अनेक विकार विघ्न आणीत असतात. विकारांचा विचार आपण विस्तृतपणे मागील लेखांत पाहिला आहे. या विकारांवर विजय मिळवणे निव्वळ अवघड आहे. एकतर सध्या विकारांची संख्या हनुमानाच्या शेपटीसारखी वाढत आहे आणि मनुष्याची निश्चयशक्ती मात्र कमकुवत होत आहे, त्यामुळे मनुष्याला खूप कष्ट करण्याची गरज आहे.
यावर एक उपाय नारद महाशय सांगतात, की हे सर्व विकार भगवंताच्या चरणी अर्पण करावेत. त्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे प्रत्येक गोष्ट भगवंताला सांगून करावी. प्रत्येक इच्छा देवाला सांगावी, प्राप्ती झाली तर त्याचा प्रसाद म्हणून स्वीकारावी आणि प्राप्ती झाली नाही तर त्याची इच्छा नाही असे म्हणून ती इच्छा आपल्या मनातून काढून टाकावी. थोडक्यात आपले विकार देवाला अर्पण करावेत. अशी स्थिती अनेक साधकांना अनुभवावी लागते. यातून संतांची देखील सुटका नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात,
“काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठलीं । आवडी धरिली पायांसवें ॥१॥ आतां कोण पाहे मागें परतोनि । गेले हारपोनि देहभाव ॥ध्रु. ॥”
☆ “याति कुळ माझे गेले हारपोनी!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
– सौरभ सिंह शेखावत – दीपेंद्र सिंग सेंगर
१७, मराठा लाईट इन्फंट्री मध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झालेले झालेला हा तरणाबांड अधिकारी जीवनात आणखी काहीतरी मोठं करू इच्छित होता. सैनिक झालोच आहोत तर प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग अनुभवणे गरजेचे आहे! म्हणून जिथं हे सर्व अनुभवयला मिळेल ते दल म्हणजे स्पेशल फोर्स! … आणि सुदैवाने तशी संधी लाभली. कर्नल क्लिमेंट सम्यूएल साहेबांनी परवानगी दिली.
नहान, हिमाचल प्रदेश येथे असलेल्या स्पेशल फोर्सेस ट्रेनिंग स्कूल या प्रशिक्षण केंद्रात सेकंड लेफ्टनंट साहेबांचा आजचा पहिलाच दिवस. प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी आलेले अधिकारी कितीही मोठे असोत… त्यांचे खरे बॉस म्हणजे मैदानावर प्रशिक्षण देणारे एन. सी. ओ. अर्थात नॉन कमिशन्ड ऑफिसर्स… जे शिपाई पदावरून प्रगती करीत करीत, अनुभव गाठीला बांधत बांधत इथवर पोहोचलेले असतात आणि अर्थातच वयाने ज्येष्ठ असतात!
सेकंड लेफ्टनंट साहेब राजस्थानी आणि प्रशिक्षण देणारे एन. सी. ओ. साहेब उस्ताद हवालदार हनुमान राम राजस्थानीच. त्यांनी लेफ्टनंट साहेबांना विचारलं… तुमचं नाव? त्यावर साहेबांनी नाव सांगितलं. लगेच दुसरा प्रश्न आला… ”धर्म, जात? ” खरं तर नावावरून त्या एन. सी. ओ. साहेबांनी लेफ्टनंट साहेबांची जात ओळखली असावी, असं वाटणं साहजिकच होतं… पण तरीही ते विचारत आहेत.. म्हणून साहेबांनी सांगितलं… हिंदू राजपूत!
त्यावर एन. सी. ओ. साहेबांनी म्हटलं… ” ते पाण्याचं डबकं दिसतंय ना.. ते पवित्र पाणी आहे… त्यात एक बुडी मारून पवित्र होऊन या! ” आणि जाताना पळत नाही जायचं… रोलिंग करत म्हणजे जमिनीवर कोलांट्या उड्या मारत जायचं… जा! ”
“कमाल आहे! आल्या आल्या ही शिक्षा? ” साहेबांनी मनातल्या मनात म्हटलं आणि ते त्या डबक्याकडे गेले. काळं, घाण पाणी… त्यात ग्रीस सारखं काहीतरी तरंगते आहे. वास तर भयानक! पण आज्ञा पाळायला तर पाहिजेच… सेकंड. लेफ्टनंट साहेबांनी डुबकी मारली आणि पुन्हा रोलिंग करीत येऊन एन. सी. ओ. साहेबांसमोर सावधान स्थितीत उभे राहिले! एन. सी. ओ. साहेबांनी पुन्हा जात, धर्म विचारला! … या साहेबांना वाटले की आधीच्या वेळी त्यांना नाव, जात नीटसे ऐकू गेले नसावे… त्यांनी पुन्हा सांगितले… सर, मी राजपूत जातीचा आहे!
यावर एन. सी. ओ. साहेबांनी पुन्हा एक डुबकी मारून यायला सांगितले… साहेबांनी पुन्हा तसं केलं.. असं दोन, तीन वेळा झाल्यावर मात्र साहेबांनी मानत विचार केला… आणि सभोवार पाहिलं! प्रशिक्षण केंद्राच्या भिंतीवर लिहिलं होतं… ’कमांडो कंट्री सर्व विथ प्राईड’
आता मात्र त्यांनी बरोबर उत्तर दिलं, ”उस्ताद, माझा धर्म स्पेशल फोर्सेस, माझी जात स्पेशल फोर्सेस! ”
यावर उस्ताद गोड हसले आणि म्हणाले, ”मी म्हटलं होतं ना… ते पाणी पवित्र आहे… डुबक्या मारल्या की आपोआप ज्ञान प्राप्त होतं! ”
उस्ताद पुढं म्हणाले, ”तुमचे सैनिक ज्या जातीचे तीच तुमची जात आणि धर्म. तुम्ही भारतीय सैन्यातील विविध रेजिमेंटस, बटालियन्स मध्ये नेतृत्व करायला जाणार आहात. तुमच्या अखत्यारीत असलेल्या सैनिकांची जी जात असेल, त्यांच्या ज्या पूजा पद्धती असतील, आहार पद्धती असतील, धार्मिक पध्दती असतील… त्याच तुमच्याही असतील. त्यांच्याशी एकरूप झाल्याशिवाय तुम्हांला त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी करून घेता येणारच नाही! ”
एका अनुभवी प्रशिक्षकांनी दिलेली ही शिकवण त्यावेळी सेकंड लेफ्टनंट असलेले सौरभ सिंग शेखावत कधीच विसरले नाहीत! इथे त्यांना आणखी एक शिकवण मिळाली… सोबत्याला कधीही मागे एकटे सोडायचे नाही… भले त्यासाठी प्राणांची आहुती द्यावी लागली तरी बेहत्तर! सैनिक नेहमी जोडीजोडीने कामगिरी करतात. सहकारी जखमी झाला तर त्याला सुरक्षित स्थळी पोहोचवण्याची जबाबदारी साथीदाराचीच असते.
शेखावत साहेब हे सर्व नेतृत्वगुण शिकत शिकत पुढे जात होते. स्पेशल फोर्सेसमधील प्रशिक्षणादरम्यान त्यांची शस्त्रे कायम सज्ज स्थितीमध्ये असतात… म्हणजे फायर करण्यासाठी तयार असतात!
बरेच दिवस उलटून गेले होते… पण शेखावत साहेबांना प्रत्यक्ष शत्रूवर फायर करण्याची संधी काही मिळत नव्हती… आणि ते तर त्याचसाठी स्पेशल फोर्सेसमध्ये आले होते. त्यांचे प्रोबेशन संपले तरी तसं काही घडेना. एकेदिवशी ते आसाम भागातल्या एका रेल्वे स्टेशनजवळ तैनात असतानाच त्यांना त्यांचे सिनिअर ऑफिसर दीपेंद्रसिंग सेंगर साहेबांचा मेसेज आला… आपली टीम घेऊन ताबडतोब मी सांगतो त्या ठिकाणी पोहोचा… मी पुढे निघतो आहे! ”
सेंगर साहेबांना एक पक्की खबर मिळाली होती… ULFA (United Liberation Front of Asom) या सशस्त्र अतिरेकी संघटनेचे आठ-दहा अतिरेकी एका घरात थांबल्याचे आणि लवकरच ते तिथून निसटून जाण्याच्या तयारीत आहेत. सेंगर साहेबांनी ज्या व्यक्तीने ती खबर आणली होती, त्याला ताबडतोब त्यांच्या वाहनात बसवले आणि ते निघाले… जसे होते तसे. म्हणजे त्यावेळी सेंगर साहेब अर्धी विजार, टी-शर्ट आणि पायांत साध्या रबरी स्लीपर्स अशा वेशात होते… पण अतिरेकी पळून जातील म्हणून घाई होती! आणि अतिरेक्यांना संशय येऊ नये म्हणून त्यांनी लष्करी वाहन न घेता एक खाजगी वाहन वापरण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी खबरी माणसाला बजावलं होतं… त्या घराच्या आधी चार पाचशे मीटर्सवर गाडी थांबवायला सांग… आम्ही तिथून पुढे पायी जाऊन कारवाई करू! परंतू तो माणूस इतका गडबडून गेलेला होता की… त्याने सेंगर साहेबांना थेट त्या अतिरेक्यांच्या घरासमोरच नेले! घराच्या अंगणात, खुर्च्यांवर दहा-बारा जण छान चहा-नास्ता करीत बसलेले दिसले. आता एक क्षणही गमावून चालणार नव्हते. सेंगर साहेब वाहनातून तसेच खाली उतरले आणि थेट त्या अतिरेक्यांच्या दिशेने निघाले… त्यांचा वेश पाहून त्या अतिरेक्यांना सुरुवातीला अजिबात संशय आला नाही. सेंगर साहेबांनी खांद्यावर लटकवलेली रायफल झटक्यात काढली आणि गोळीबार सुरु केला. पहा-यावर उभ्या असलेल्या अतिरेक्याला उडवले! आता अतिरेकी सावध झाले… त्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले! अगदी दोन, तीन मीटर्सवरून गोळीबार झाला. अतिरेकी तिथून पळाले…!
शेखावत साहेब सेंगर साहेबांच्या वाहनापासून पाचशे मीटर्सचे अंतर मुद्दाम ठेवून लष्करी वाहनातून चाललेले होते. त्यांनी गोळीबाराचा आवाज ऐकला आणि वाहनाचा वेग वाढवला… तो त्यांच्याच दिशेने सात-आठ अतिरेकी पळत येताना दिसले. आधी समजेना हे लोक स्थानिक गावकरी आहेत की कोण ते! शेखावत साहेबांच्या समवेत असलेल्या जवानांची सुद्धा प्रत्यक्ष शत्रूवर गोळीबार करण्याची ही पहिलीच वेळ होती… शेखावत साहेबांनी ओरडून या जवानांना सावध केले आणि त्या सर्वांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा शत्रूवर गोळ्या झाडल्या!
शेखावत साहेब तिथून घटनास्थळी पोहोचले… सेंगर साहेब रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांच्या पोटातून एके-४७ रायफलच्या सात-आठ गोळ्या आरपार निघून गेलेल्या होत्या… जवळून गोळीबार झाल्याने तसं झालं होतं. स्पेशल फोर्सेसच्या सैनिकांना, अधिका-यांना उच्च दर्जाचे वैद्यकीय प्रशिक्षणही दिले जाते. शेखावत साहेबांनी सेंगर साहेबांवर आवश्यक ते उपचार केले… पुढे त्यांना उपचारांसाठी हलवण्याची सर्व व्यवस्था अगदी त्वरेने केली. आधी चार चाकी वाहन, पुढे लष्कराचे हेलीकॉप्टर असा प्रवास सेंगर साहेबांनी प्रचंड वेदना सहन करीत पूर्ण केला. पंधरा तास शस्त्रक्रिया चालली. इंग्लीश भाषेत To “have guts” means to possess courage, bravery, and determination when facing danger, difficulty, or uncertainty. It signifies having the audacity, grit, or willpower to take risks. अर्थात धोका पत्कारण्यासाठी अंगी धमक असणे. यातील guts या शब्दाचा दुसरा अर्थ आहे… आतडे! सेंगर साहेबांना सेनेचे डॉक्टर gut शब्दाचा श्लेष साधत म्हणाले… ”You have lots of guts… so we cut some it! ” कठीण परिस्थितीत सुद्धा विनोद बुद्धी शाबूत ठेवणारे सैनिक आणि डॉक्टर्स भारतीय सैन्यातच आढळतात! सेंगर साहेबांच्या आतड्याचा मोठा भाग कापून काढण्यात आला. आणि हे आतडे नैसर्गिक शरीरधर्म साधण्यासाठी बाहेर काढून पिशव्यांना जोडण्यात आले!
धर्मनिरपेक्ष भारतीय सैन्याला वंदन. आणि ह्या परंपरा जीवाचे मोल देऊन पाळणा-या सैनिक, अधिका-यांना दंडवत. ज्ञानेश्वर माऊली एका अभंगात म्हणतात… याति कूळ माझे गेले हारपोनि… माजी जात, माझे कूळ मी विसरून गेलो आहे… श्रीरंगावाचून आनु नेणे! अर्थात श्रीरंग श्रीकृष्ण यांच्याशिवाय मला दुसरे काहीही ठाऊक नाही! भारतीय सैनिकांची हीच मनोवृत्ती आहे. त्यामुळेच जातीय, धार्मिक कट्टरतावाद जोपासत भारतावर चालून येणा-या शत्रूला आपले सैनिक भारी पडतात! जय हिंद. जय हिंद की सेना.