मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतीय सैन्याचा निडर चेहरा! – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “भारतीय सैन्याचा निडर चेहरा!” – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके

एकेका हातात पंधरा पंधरा किलो वजनाची संहारक स्फोटके हातात घेऊन दुश्मनावर निर्णायक प्रहार करण्यासाठी पुढे निघालेल्या त्या तरुण, देखण्या आणि बहाद्दर सैन्याधिका-याच्या डोळ्यांसमोर त्याची जन्मदात्री उभी राहिली… कारण मोहिम जोखमीची होती… जिवंत माघारी येता येईलच याची शाश्वती दिसत नव्हती! चांगल्या पगाराची, सुरक्षित आणि विशेषत: कुटुंबात रमू देईल अशी सरकारी नोकरी सोडून जेंव्हा तो फौजेत निघाला होता तेंव्हा… आईसाहेबांनी फर्मावले होते… ”हाती शस्त्र धरीत प्रत्यक्ष रणांगणावर सैन्याचे नेतृत्व करणार असशील तरच भारतीय सैन्याधिका-याची वर्दी परिधान कर! ” 

मध्यरात्र उलटून गेलेली… तरीही नेमकी त्यावेळी आई जागी होती… तिने लेकाचा फोन दुस-याच घंटेला उचलला. त्याचा फोन अशा अवेळी? पोरगं काहीतरी सांगत होतं… आणि तिला काहीही ऐकू येत नव्हतं… अत्याधुनिक रायफली गोळ्या डागताना खूप मोठा आवाज करतात… तो धमाका ऐकून तिच्या कानठळ्या बसल्या… काहीतरी अघटित होत असावं… तिचं काळीज थिजून गेलं… आणि फोनचा रिसीव्हर तिच्या हातातून गळून पडला! आता त्याचा पुन्हा फोन येईपर्यंत देवाचा धावा करीत बसावं… तिच्या मनानं तिची समजूत काढली!

 “आई, मी कदाचित जिवंत परतू शकणार नाही… पण तुला अभिमान वाटेल अशी कामगिरी करूनच दाखवेन… तुझी शपथ! ” हे त्याचे शब्द आईपर्यंत पोहोचेपर्यंत हवेत विरून गेले… गोळीबाराचा, दारूगोळ्याचा वास त्या हवेत भरून राहिला होता! साहेबांनी आपला मोबाईल फोन खिशात ठेवला आणि ते पुढे सरसावले.

 सैनिक माता असलेल्या या मातोश्रींच्या सूनबाई सुद्धा तिकडं फौजेत कर्तव्यावर तैनात होत्या. केरळातल्या अलापुझा जिल्ह्यातल्या मुथूकुलम नावाच्या निसर्गसुंदर अशा छोट्या गावात राजलक्ष्मी वेणूप्रसाद नायर, लेकाच्या फोनची वाट पाहण्याशिवाय करू तरी काय शकणार होत्या? ऋषी लहानपणापासून देशाला सर्वस्व मानणारा युवक. अभ्यासात अव्वल होताच आणि साहसीसुद्धा. मनात आणले असते तर साऊथ चित्रपटांचा नायक सहजी झाला असता. पण त्याही पेक्षा तो सामाजिक कार्यकर्ता अधिक होता. आश्वासक शब्दांनी लोकांशी संवाद साधण्यात त्याचा हात धरू शकेल असा मुलगा गावात नव्हता. उच्च श्रेणीत इलेक्ट्रिकल इंजिनियर झाल्यावर केरळ वीज मंडळात साहाय्यक अभियंता ही नोकरी हात जोडून उभी होती. पण या नोकरीत आयुष्य घालवण्यासाठी ऋषी जन्माला आलेले नव्हते… हे काळाने सिद्ध केले. हुतात्म्यांच्या कथा त्यांच्या मनात रुंजी घालीत असत… फौजेचा गणवेश त्यांना खुणावत असे. हाती बंदूक घेऊन आपण शत्रूवर तुटून पडलो आहोत, अशी स्वप्ने त्यांना दिवसा पडायची… राष्ट्रगीत गायले जाऊ लागले की ते रोमांचित होत असत! त्यांच्यात एक शूर सैनिक लपला होता… आणि त्याला या नागरी जीवनात अडकून पडल्यासारखे झाले होते! केरळ विद्युत मंडळात नोकरीला लागून एकच वर्ष झालेले असताना ऋषी यांनी विशेष परीक्षा देऊन एअर इंडियामध्ये नोकरी मिळवली. पण या नोकरीत ते रमणारे नव्हते… त्यांना शस्त्र, युद्ध खुणावत राहिले. शेवटी हजारो तरुणांमधून ऋषी इंडियन मिलिटरी अकादमी, देहराडून येथील सैन्याधिकारी प्रशिक्षण तुकडीसाठी निवडले गेले. शास्त्र आणि अभियांत्रिकीमध्ये कमालीचे स्वारस्य असलेल्या ऋषी यांना भारतीय सैन्याने नेतृत्वगुणांनी संपन्न केले… एका कोवळ्या तरुणाचे कणखर सैनिकात रुपांतर झाले होते. २०१० मध्ये ऋषी नायर मेकनाईझ्ड इन्फंट्री मध्ये रुजू झाले. भारतासारख्या वैविध्यपूर्ण सीमा आणि शत्रू अन्य कोणत्याही देशाला लाभलेले नाहीत. त्यामुळे प्रत्येक अधिका-याला, प्रत्येक सैनिकाला देशभर फिरवून आणले तरच गरजेच्या प्रसंगी अनुभवाचा उपयोग होऊ शकतो. सेना ऋषी साहेबांना असाच अनुभव देत गेली. चीन सीमेवर गेली कित्येक वर्षे मोठा सशस्त्र संघर्ष झालेला नाही. पाकिस्तान सीमेवरून समोरासमोर लढत नाही. ऋषी साहेबांसारख्या सळसळत्या रक्ताच्या सैनिकाला त्याची तलवार आजमावून पाहण्याची संधी मिळावी तरी कशी? ते संयुक्त राष्ट्र संघाच्या आफ्रिकी देशांतल्या शांतीसेनेमध्ये सेवा करून आले होते. परंतु प्रत्यक्ष मैदानात मर्दुमकी गाजवण्याची संधी त्यांना लाभली नव्हती! ते सैन्यात येण्याआधी कारगिल होऊन गेले होते… आणि काश्मिरात त्यांना पाठवण्यात आलेले नव्हते!

परंतु कश्मीरने त्यांना जणू बोलावून घेतले… कारण भारतीय सैन्याची काश्मिरात गेली कित्येक दशके ‘रात्रं-दिन आम्हां युद्धाचा प्रसंग’.. अशी स्थिती आहे. हजारो अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी शेकडो सैनिकांनी आपले प्राण अर्पण केलेले आहेत. अगदी उदाहरणच द्यायचे झाल्यास २००४ ते २०१४ या दशकात २०९३ निष्पाप नागरिकांचा बळी घेणा-या ४०४३ अतिरेक्यांना मारण्यासाठी सैनिक, अधिकारी, पोलिस, विविध संरक्षण दलांचे मिळून १०६७ जण धारातीर्थी पडले होते. काश्मिरात भारतीय सैन्य अखंडपणे युद्ध लढत आहे…! आणि हे समोरासमोरचे थेट युद्ध नव्हे! नव्या युद्धास्थितीला सामोरे जाण्यासाठी खास जम्मू-कश्मीरसाठी १९९० मध्ये तत्कालीन चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल एस. एफ. रॉड्रीक्स यांच्या नेतृत्वात आरपार कारवाई करणा-या आर. आर. अर्थात राष्ट्रीय रायफल्स या विशेष दलाची स्थापना करण्यात आली. लेफ्ट. जनरल पी. सी. मनकोटिया साहेब या दलाचे प्रथम डिरेक्टर जनरल होते. भारतीय सैन्याच्या विविध विभागांतून या दलात निवडक सैनिक, अधिकारी बोलावून घेतले जातात. पाकिस्तानी घुसखोर अतिरेकी, स्थानिक अतिरेकी यांच्या कारवाया रोखणे हे प्रामुख्याने कर्तव्य असलेली राष्ट्रीय रायफल्स स्थानिक जनतेमध्ये विकासात्मक कार्यक्रमसुद्धा हाती घेते. काश्मिरी जनतेला भारतीय संघराज्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सेना करते… म्हणूनच काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहे!

त्यावेळी मेजर असलेले ऋषी राजलक्ष्मी यांनी राष्ट्रीय रायफल्सकडून २०१५ मध्ये आलेले बोलावणे आनंदाने स्वीकारले. काश्मिरातील त्राल नावाच्या भागात अतिरेक्यांनी उच्छाद मांडला होता. मेजर ऋषी यांनी या काळात येथे कंपनी कमांडर असताना अतिरेक्यांशी शस्त्राने लढण्यासोबतच स्थानिक जनतेशी प्रेमाचे नाते जोडण्यात चांगले यश मिळवायला आरंभ केला होता. शत्रूला शस्त्राने जिंकणे जेवढे महत्वाचे तेवढेच स्थानिक जनतेचे मन जिंकून घेणेही महत्त्वाचे आहे.. हे त्यांनी जाणले. अतिरेकीविरोधी मोहिमांत ऋषी साहेब हिरीरीने सहभागी होत… त्यांना शत्रूच्या रक्ताची चटक लागली होती… त्यांचे एक वरिष्ठ अधिकारी कर्नल विक्रम कड्यान त्यांना म्हणत… ”कधी तरी तुला भीती वाटू दे.. एकदा तरी स्वत:च्या जीवाची काळजी कर! ” २०१५ मध्येच मेजर ऋषी इंडियन नर्सिंग सर्विसेसमध्ये श्रीनगर बेस आर्मी हॉस्पिटल येथे कार्यरत असलेल्या मेजर अनुपमा यांचेशी विवाहबद्ध झाले! मेजर साहेब स्थानिक तरुणांशी, विशेषता: लहान मुलांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध ठेवून होते. पाकिस्तानी अपप्रचाराला बळी पडून ही नवी पिढी चुकीच्या मार्गाला जाणार नाही यासाठी मेजरसाहेब सतत प्रयत्नशील असत. याच भागात बु-हाण वानी नावाचा तरुण अतिरेकी कुप्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला होता. सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्याने शेकडो काश्मिरी युवक पाकिस्तानी हिजबुल मुजाहिदीन या पाकिस्तानी अतिरेकी संघटनेच्या जाळ्यात ओढले होते. भारतीय सैन्याने या बु-हाण वानीला ८ जुलै २०१६ रोजी त्राल पासून साठ किलोमीटर्स अंतरावर असलेल्या कोकरनाग येथे यमसदनी धाडल्यावर काश्मिरात मोठा गहजब उडाला होता. परंतु मेजर ऋषी यांच्या कार्यक्षेत्रात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही… कारण त्यांनी स्थानिक जनतेची विविध मार्गांनी मने जिंकून घेतली होती… स्थानिक लोक मेजर ऋषी यांना खान साहब म्हणून संबोधू लागले होते! चार मार्च, २०१७. शनिवार होता. त्राल मध्ये भारतीय सेनेचा स्थानिक नागरीकांसाठी मोफत वैद्यकीय उपचार उपक्रम सुरु होता. वैद्यकीय शिबिरासाठी सुमारे हजारभर रुग्ण जमा झाले होते. दुपारचे तीन वाजले होते. शिबिरात मेजरसाहेब लोकांशी संवाद साधत असताना त्यांना त्यांचे कमांडिंग ऑफिसर कर्नल नीरज पांडे साहेबांचा तातडीचा संदेश आला… आकीब मौलवी हाफू गावात लपला आहे! बुऱ्हान वानीची जागा घेऊ पाहणारा, पाकिस्तानी सैन्याने प्रशिक्षित केलेला कमांडो, अनेक वर्षांपासून भारतीय सैन्याला हवा असणारा आणि प्रत्येक वेळी निसटून पळून जाण्यात यशस्वी झालेला आकीब मौलवी! याला आता सोडायचा नाही… मेजर ऋषी साहेबांनी निश्चय केला. अगदी काही मिनिटांतच त्यांनी आपली क्विक रिस्पॉन्स टीम सज्ज केली… आणि तेथून तीस किलोमीटर्स अंतरावर असलेल्या हाफू गावाकडे कूच केले…!

या प्रवासादरम्यान विविध घटकांशी संपर्क साधला जाऊन हाफू गावाभोवती सी. आर. पी. एफ. (सेंट्रल रिजर्व पोलिस फोर्स) आणि जम्मू-काश्मीर पोलिस यांनी मोहिमेचे क्षेत्ररक्षण लावले! स्थानिक लोकांना भारतीय सैन्याची ही हालचाल समजली… त्यांनी आकीबच्या समर्थनार्थ मोठा जमाव आणला… दगडफेक सुरु केली. मेजर ऋषी तिथे पोहोचताच त्यांने एका सैनिकाला सोबतीला घेऊन गावातील घरांत शोध सुरु केला… अर्धा तास झाला तरी कुणी हाती लागेना. पोलिसांनी दगडफेक करणा-या जमावाला कसेबसे रोखून धरले होते. तेथून काही अंतरावर असलेल्या एका घराबाहेर चार-पाच माणसांचा एक गट उभा होता… मेजरसाहेब थेट त्यांच्यापर्यंत पोहोचले… त्यातील एकानेही तोंड उघडले नाही… परंतु त्यातील एकाचे डोळे एका विशिष्ट घराकडे एकदा वळालेले मेजरसाहेबांनी चाणाक्षपणे टिपले… त्याच डोळ्यांनी मेजरसाहेबांच्या नजरेला नजर दिली… सावज त्या घरात लपले होते तर! साहेबांनी त्वरीत धाव घेतली… निवडक साथीदार सोबतीला घेतले… त्या घराभोवती फास आवळायला सुरुवात केली. त्या दुमजली घराच्या सीमाभिंतीपाठी आपल्या जवानांनी आपापल्या जागा घेतल्या!

भारतीय सैन्याच्या नीतीनुसार मेजर ऋषी साहेबांनी आकीबला ‘शरण ये.. अभय देतो’ असे आवाहन केले… या आवाहनाला आकीबच्या रायफलने दुस-या मजल्यावरून गोळीबाराने आव्हान दिले… त्या घरातून एकाच वेळी दोन रायफल्स धडाडू लागल्या! आकीब एकटा नव्हता… पाकिस्तानी जैश-ए-मोहम्मदचा सैफुल्ला उर्फ उसामा सुद्धा होता.. आज दोन शिकारी गवसणार होत्या! आता सी. आर. पी. एफ. , जम्मू-काश्मीर पोलिस आणि राष्ट्रीय रायफल्स यांनी त्या घरावर नेम धरले… तीन तास गोळीबार सुरु होता! ते दोघे शस्त्रसज्ज होते.. आधुनिक रायफली आणि भरपूर गोळाबारूद! ही मोहीम दिवसाउजेडी संपली तर बरे… त्या घरावर छोट्या तोफांनी मारा करणे शक्य होते.. मात्र परिसरातील इतर घरांचे नुकसान, नागरीकांच्या जीविताला धोका नको म्हणून आर्टीलरी फायरचा पर्याय निवडला गेला नाही. त्याऐवजी त्या घरात स्फोटके लावून ते उडवून लावण्याची योजना आखली गेली. मेजर ऋषी साहेबांनी फोनवरून सीओ साहेबांची परवानगी मिळवली आणि पंधरा किलोचे एक स्फोटक हातात घेऊन ते त्या घराकडे निघाले… इतर सैनिक त्यांना कवरिंग फायर देऊ लागले… साहेबांचा जीवाभावाचा साथीदार लान्स नायक आवेश कुमार साहेबांसोबत होता… त्या घरावर अधून मधून एक एक फैर झाडत आवेश कुमार पुढे सरकत होते… सायंकाळचे साडेसहा वाजले होते… अंधार झाल्यावर मोहीम आणखी किचकट व्हायची शक्यता होती.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जीन्समध्ये पदर कुठून आणाल? ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “जीन्समध्ये पदर कुठून आणाल?” –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित 

शाळेत गुरूजींनी सांगितलं होतं — “आईच्या पदरावर निबंध लिहा… ”

मग एक विद्यार्थ्यानं लिहिलं…

“आईच्या पदरावर… ”

 

आदरणीय गुरुजी,

“आईचा पदर” ही तिच्या मातृत्वाची, तिच्या गरिमेची एक सुंदर छाया होती.

.. आईचा पदर चुलीवरून गरम भांडी उतरवण्यासाठी उपयोगी यायचा.

.. आईचा पदर मुलांचे घाम, अश्रू पुसण्यासाठी, घाण झालेले कान, तोंड साफ करण्यासाठी वापरायचा.

.. मुलं जेवून झाली की, आईच्या पदराने तोंड पुसण्यात एक वेगळाच आनंद असायचा.

.. कधी डोळ्यात काही गेले की, आई पदराचं छोटं गोळं करून त्यावर फुंकर मारून डोळ्यावर ठेवायची,

आणि जादूसारखं दुखणं थांबायचं.

 

.. आईच्या कुशीत झोपणाऱ्या मुलांसाठी तिची कुशी गादीसारखी आणि आईचा पदर चादरीसारखा असायचा.

.. कोणी अनोळखी पाहुणा घरी आला, तर मुलं आईच्या पदरामागे लपायची.

.. मुलांना जेव्हा लाज वाटायची, तेव्हा ते आपलं चेहेरं आईच्या पदराने झाकायचे.

.. जेव्हा बाहेर कुठे जायचं असे, मुलं आईचा पदर घट्ट धरून ठेवायची. तोच पदर त्यांना वाट दाखवायचा –

.. तेव्हा वाटायचं की, आईचा पदर हातात आहे म्हणजे सारं विश्व आपल्या हातात आहे.

.. थंडीमध्ये आई आपल्या पदराने मुलांना चारही बाजूंनी लपेटून उब द्यायची.

.. आणि… पावसात आईचा पदरच छत्री बनायचा.

.. आईचा पदर कधी अंग पुसण्यासाठी वापरला जायचा,

.. कधी झाडावरून पडलेली फुलं किंवा जाबूक गोळा करण्यासाठी.

.. कधी अनाज, दान, प्रसाद बांधून आणण्यासाठी…

.. आईचा पदर घरात वस्तूंवरची धूळ साफ करण्यासाठीही उपयोगी पडायचा.

.. कधी काही हरवलं की, आई पदराला गाठ मारायची आणि म्हणायची — “सापडेल… ”

आणि खरंच, ती वस्तू सापडायची.

 

आईचा पदर म्हणजे…

.. एक चालतं-फिरतं बँक लॉकर —

.. कधी कधी मुलांच्या नशिबाने त्या बँकेतून एखादी चॉकलेटची नाणीही मिळायची.

.. आईचा पदर काही जादूच होती… अशी जादू जी आजची पिढी कधीच समजू शकणार नाही.

– – – आता जीन्स घालणाऱ्या “Mom” पदर कुठून आणतील…?

साडी घालणाऱ्या त्या आईंच्या पदराला समर्पित…

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ८९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ८९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- जी. एम्. मॅडमनी त्या लंच मिटिंगमधे बोलण्याच्या ओघात बॅंकिंग इंडस्ट्रीत येऊ घातलेल्या, आणि आमच्यासारख्या प्रत्येक स्टाफचं आयुष्य सावरू किंवा विस्कळीतही करू शकणाऱ्या अनपेक्षित अशा प्रचंड वादळाचं सूतोवाचही केलं. प्रथमदर्शनी त्यातलं गांभीर्य आणि त्याचं महत्त्व मला लगेचच जाणवलं नव्हतं, पण…)

मिटिंग संपवून जी. एम्. मॅडमनी सर्वांचा निरोप घेऊन कोल्हापूरला प्रयाण केलं. त्या गेल्या तेव्हा एरवी सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला असता, पण आज तसं झालं नाही. या सहामाही मधील आमच्या झोनमधल्या दोन रिजन्सच्या राहिलेल्या त्यांच्या मीटिंगसाठी त्या नियोजित टूर प्रोग्रॅमनुसार कोल्हापूर व गोवा रिजनल आॅफिस व्हिजीटसाठी जाणार होत्या. पुणे आॅन द वे असल्यामुळे त्यांनी थेट प्रवास न करता पुण्यात थोडावेळ हाॅल्ट घेऊन झोनल ऑफिसला मिटिंग घेऊन सर्वांना भेटून जायचं ठरवलेलं होतं! याची अर्थात आम्हा कुणालाच पूर्वकल्पना नसल्यामुळे मॅडम व्हिजिटला येणार याचं नाही म्हटलं तरी थोडं दडपण होतंच! ऐरणीवर असलेल्या सर्व विषयांबाबत थेट डी. जी. एम्. वखरे साहेबांशी तासभर सविस्तर चर्चा करून, त्यांना स्पेसिफिक असाईन्मेंटस् देऊन मॅडमनी त्यांची महत्त्वाची कामं हातावेगळी केली होती. त्यामुळे अनपेक्षितपणे मॅडमची ही व्हिजिट आणि नंतरची आम्हा सर्वांबरोबर ची लंच मीटिंगसुद्धा खूपच खेळीमेळीत झाली. एरवी त्यांच्या यापूर्वीच्या मिटिंग्जमधे प्रत्येकाच्या कु़ंडल्यांचा व्यवस्थित अभ्यास करून येणाऱ्या त्या सगळी हत्यारं परजून आक्रमक आविर्भावातच प्रवेश करायच्या. पण आज मात्र नेहमीचा त्यांचा दरारा अतिशय हळवा होऊन गेल्यासारखं त्यांचं हे वेगळं रूप आम्हाला दिलासा देणारं ठरलं होतं! या मिटिंगमधे सर्वांना कैचीत पकडायला टपलेले कोणतेही अनपेक्षित अवघड प्रश्न न विचारता त्यांच्या गप्पांच्या ओघात सेंट्रल-आॅफिस पातळीवर होऊ घातलेल्या बँकिंग इंडस्ट्रीमधील अनेक मूलभूत बदलांचा विषय निघाला आणि त्याविषयी बोलताना त्या ‘ती’ बातमी सांगून त्याबाबतच सविस्तर बोलत राहिल्या. ती बातमी होतीच तशी. किंबहुना

लंच मिटिंग आयोजित करण्यामागेही हेच कम्युनिकेशन करायचा त्यांचा उद्देश असणार होता नक्कीच. त्यांनी सांगितलेली ती बातमी आम्हा कुणालाच खरी वाटू नये अशीच होती! त्या बातमीनुसार सर्वच राष्ट्रीयकृत बॅंकांमधील स्टाफ जवळजवळ २० ते २५ टक्के कमी करण्याची सरकारची योजना होती म्हणे. आधीच प्रत्येक ब्रॅंचमधे स्टाफ शाॅर्टेज असताना आहे त्यातला स्टाफ इतक्या प्रमाणात कमी केला तर राहिलेल्या स्टाफने घाण्याला जुंपून घ्यायचं कां? हा प्रश्न सगळं ऐकताना प्रत्येकाच्याच मनात निर्माण झाला होता, पण तो थेट मॅडमना विचारण्याचं धाडस मात्र कुणालाच झालं नव्हतं..!

अर्थात यासंबंधीचं सर्क्युलर सर्वच राष्ट्रीयकृत बँकांच्या केंद्रीय कार्यालयाकडून लवकरच बाहेर पडणार असलं तरी ते कधी येईल? किंवा खरंच येईल कां? ही अनिश्चितता होतीच. तरीही असं कांहीतरी होऊ शकतं हा विचारच आम्हा सर्वांसाठी अतिशय धक्कादायक होता! माझ्या उद्या सकाळी होऊ घातलेल्या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभाच्या पार्श्वभूमीवर या विषयात अडकून पडण्याइतकी स्वस्थता मला जाणवली नव्हती हे खरं, पण त्याचा विचार मात्र नकळत मनात पेरला गेला होताच. कारण स्टाफ मॅटर म्हणून हा विषय माझ्याच अखत्यारीतला असल्याने होणारे सर्व बदल व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून मलाही मॅनेज करायला लागणार होतेच. तरीही जे होईल ते तेव्हाचं तेव्हा पाहू असं म्हणत मी त्या विचाराकडे दुर्लक्षच केलं! मात्र ऑफिसमधे पोचेपर्यंतच्या परतीच्या वाटेत कधीही येऊ शकणारं ते सर्क्युलर हाच इतरांच्या गप्पांचा विषय असल्याने नाही म्हटलं तरी माझ्या मनात चलबिचल सुरू झालीच होती. खरंतर ते सर्क्युलर आल्याशिवाय विविध नियम, अटी याबाबतचं नेमकं चित्र स्पष्ट होणार नव्हतं. त्यामुळे कांही न बोलता आपण अलिप्त रहायचं असंच मी ठरवलं. मात्र आपण ठरवतो ते कितीही महत्त्वाचं आणि टाळता न येणारं असलं तरी ते तसंच घडतं असं नाही याचा प्रत्यय मी केबिनमधे जाताच मला आला!

असं काही घडेल हे माझ्या ध्यानीमनीही नव्हतं. केबिनमधे पाऊल टाकताच माझ्या लक्षात आलं की माझ्या टेबलवर आज आलेल्या इनवर्ड मेलचा गठ्ठा माझीच वाट पहातोय. तो तसाच ड्राॅवरमधे ठेवून जाणं शक्यच नव्हतं. कारण ती सगळी कागदपत्रं नजरेखालून घालून निदान त्यातल्या महत्त्वाच्या मॅटर्स साॅर्ट करून ठेवणं तरी अत्यावश्यकच होतंच. त्यातली पत्रं आणि सर्कुलर्स असे दोन गठ्ठे शिपायाने नेहमीप्रमाणे करून ठेवलेले होतेच. पत्रे फारशी महत्त्वाची नव्हती. सर्क्युलर नंबर्स आणि त्यांचे विषय डायरीत नोट करून ठेवायचे. पाच दहा मिनिटात हे काम आवरून ड्राॅवर लाॅक करायचा न् घरी जायचं असं ठरवून मी सर्क्युलरचा गठ्ठा पुढे ओढला. पहिल्या दोन-तीन सर्क्युलर्सच्या नोंदी करून पुढचं सर्क्युलर हातात घेतलं आणि ते पहाताच नजरेला चटका बसावा तसंच झालं! ते ‘तेच’ सर्क्युलर होतं ज्याचा नुकत्याच झालेल्या लंच मीटिंगमधे मॅडमनी आमच्याशी बोलण्याच्या ओघात आवर्जून उल्लेख केलेला होता! ते सात-आठ पानी सर्क्युलर लगेच पूर्णपणे वाचणं मला शक्यच नव्हतं. शिवाय त्यात मला कांही वैयक्तिक इंटरेस्ट नसल्याने ते आत्ताच वाचत बसायची इच्छाही नव्हती. माझं सगळं लक्ष लागलेलं होतं ते ताबडतोब घरी जाण्याकडे! तरीही ते तसंच ड्राॅवरमधे ठेवून जाणं मला योग्य वाटेना. मी इंटरकॉमवरून वखरे साहेबांना आजच्या मेलमधेच ते सर्क्युलर आलेलं असल्याची कल्पना दिली. साहेबांनी ते सर्क्युलर घेऊन मला ताबडतोब केबिनमधे यायला सांगितलं. आता मात्र माझी सुटका नव्हतीच. मी घाईघाईने त्यांच्या केबिनमधे पोचणार त्यापूर्वीच आमच्या झोनल ऑफिस मधले सगळे फोन्स खणखणू लागले होते! आमच्यासारखंच सगळ्या ब्रॅंचेस आणि अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसेसमधेही हे सर्क्युलर पोचलेलं असल्याने या बातमीची झळ आगीच्या लोळासारखी सर्वदूर सर्वांनाच चटके देत राहिलेली होती! विषय माझ्या डिपार्टमेंटशी संबंधित असल्याने आज नाही तरी सोमवारी ऑफिसमधे आल्यानंतर माझा फोनही दिवसभर असाच खणखणणार होता. मनातले उद्याच्या प्रकाशन समारंभाच्या संदर्भातले सगळे विचार त्या क्षणीच गोठून गेले! तरीही जणू त्यातूनच सावरण्यासाठी वखरेसाहेबच अचानक माझ्या मदतीला आले…

“हे सगळे व्याप सुरू होण्यापूर्वी आजच मी नागपूरला घरी जाऊन येतो. परवा दिवशी सोमवारी आपण यावर सविस्तर बोलू. तुमच्या उद्याच्या कार्यक्रमाला मात्र यामुळे मी नसणाराय. तुम्हालाही लगेच निघायला हवंय ना? या सर्क्युलरची एक कॉपी तुम्ही सोबत घरी घेऊन जा. सोमवारी येताना ते वाचून त्याचा व्यवस्थित अभ्यास करून या. एक काॅपी मी बरोबर नेतो. ” वखरे साहेब शांतपणे म्हणाले. त्यांच्या या स्थितप्रज्ञतेची गरज खरंतर त्याक्षणी मलाही होतीच! त्यांनी जे सांगितलं त्यात नाकारण्यासारखं कांही नव्हतंच. किंबहुना तेच माझ्यासाठीही सोयीचंच होतं!

पण तरीही घरी जाताना सोबत घेतलेल्या त्या सर्क्युलरच्या एवढ्याशा एनव्हलपचं ओझंही मला मणामणाचं वाटू लागलं! कारण उद्याच्या माझ्या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभाचा आनंद या सर्क्युलरच्या विचाराची लागण झाल्यासारखा आधीच मलूल होऊन गेला होता..!!

पण घडणार होतं वेगळंच! एखादी नको असणारी गोष्टसुद्धा अकल्पितपणे वरदान ठरावी ना तसंच कांहीसं…!!

माझ्या आयुष्यांत असं सगळं उलटसुलट घडवत होता ते ‘तो’च! ते तसंच घडणं माझ्या हिताचंच असणार होतं पण ते त्या मन:स्थितीत मला मात्र जाणवलं नव्हतं एवढंच!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ५ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ५ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

चंद्रशेखर गोखले यांची एक चारोळी आहे.

*”घर दोघांचे असते, ते दोघांनी सावरायचे असते, एकाने पसरले तर दुसऱ्याचे आवरायचे असते…!! “*

सध्या मुलामुलींची वाढती वये आणि त्यांचे विवाहसंबंधीचे त्याचे आधुनिक विचार आपल्याला विचार करायला लावतात…

कोणताच विचार वाईट नसतो, जोपर्यंत तो आचरणात येत नाही, अर्थात त्याचे बरेवाईट परिणाम आपल्याला कळत नाहीत…

पारंपरिक विवाहपद्धतीतील सर्व दोष आधुनिक विवाह पद्धतीमुळे पूर्णपणे नष्ट झाले असे म्हणता येत नाही. सध्या तरुण पिढी नवनवीन प्रयोग करून पहात आहे. विवाह संस्था कधी अस्तित्वात आली हे सांगणे अवघड आहे. पण आज जसे त्याबद्दल नवनवीन प्रयोग होत आहेत, मागील काळात अनेक वेळा झाले असतील असे म्हणायला संधी आहे. कारण येणाऱ्या पुढील पिढीस मागील गोष्टी रुचत नसतात, त्यामुळे आपण ज्याला पारंपरिक विवाह पद्धती म्हणतो, ती अशा अनेक स्थित्यंतरातून हा स्थितीत आपल्या हाती आली असेल, पहा हा तर्क रुचतोय का?

सध्याच्या काळात विवाह करण्याच्या वेळी उपवर मुलामुलींच्या असलेल्या अपेक्षा पाहिल्या की या मुलांना पैशाशी लग्न करायचे आहे की ब्लॉकशी, त्या संबंधित मुलाशी लग्न करायचे आहे की त्याच्या स्टेटसशी, मुलीशी लग्न करायचे आहे की ती कमवून घरी आणणाऱ्या पैशाशी? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात…! एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ते योग्य असतीलही, पण वेळा काळ पाहून विवेकाने शक्य ती तडजोड केल्याशिवाय विवाह होऊच शकणार नाहीत. पूर्वी सुद्धा लोकं अशा तडजोडी करीतच होते…

माझी एक विनंती आहे. विवाह करताना मुलगा अथवा मुलगी कोणीही असो, दोघांनी आपलं वय, आपली एकूण कुवत, आपल्या घरातील एकूण वातावरण, आपला स्वभाव, आपली समज, याचा विचार करून आपल्याला अनुरूप असण्यापेक्षा, आपल्या स्वभावाला, संस्कारांना आणि भावी आयुष्याला अनुकूल ठरेल असा जोडीदार निवडण्याचा प्रयत्न करावा…

एक भारतात घडलेली सत्य घटना सांगतो…

*एका तरुणाने पण जिंकून राजकन्येला वरले. आणि आपल्या घरी घेऊन आला. जगात नाव असलेल्या घराण्यात मुलगी नांदायला आली. काही दिवस गेले न गेले, त्याचा राज्याभिषेक ठरला, पण लक्ष्मी नारायणाची जोडी असतानाही त्या दोघांना वनवासात जावे लागले, ज्या मुलीने कधीही दुःख नावाचा प्रकार अनुभवला नव्हता, तिला जंगलातून अनवाणी चालावे लागले, कायम मौल्यवान वस्त्रे, अलंकार परिधान करणाऱ्या राजकन्येला वल्कले परिधान करावी लागली… *

*आपल्या सर्वांच्या मनात असलेल्या प्रभू श्रीराम आणि सीता माते बद्दलच बोलत आहे… *

*अहो, जिथे रामाला वनवास चुकला नाही, तर आपल्या सारख्या सामान्य जनांचे काय होणार…? *

त्यामुळे मनुष्याने आपल्याला चांगला जोडीदार. चांगली सून, चांगला जावई मिळण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न जरूर करावेत, अतिरेकी अट्टाहास करू नये. याउलट, विवेकाने योग्य वयात, अनुकूल जोडीदार पाहून विवाह करावा, बाकीच्या *वेताळांना* आपल्या मनात शिरू देऊ नये…!!

पहा पटतंय ना?

– लेख क्र. पाचवा 

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “aftereffects – तिळगुळ घ्या गोड बोला…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “aftereffects – तिळगुळ घ्या गोड बोला…” ☆ श्री सुधीर करंदीकर

साईड इफेक्टस् हा शब्द आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. कुठल्यातरी ऍलोपॅथिक औषधाशी आपली सगळ्यांची मैत्री ही असतेच असते आणि त्यामुळे त्यांचे साईड इफेक्ट पण आपण सहन करत असतो.

त्याचप्रमाणे काही गोष्टींचे आफ्टर इफेक्टस् हे पण खूप छान असतात, असा अनुभव कधी घेतला आहे का? मला असा अनुभव आज आला.

काल आपण सगळ्यांनीच संक्रांत सण आनंदात साजरा केला, तिळगुळ घ्या गोड बोला याची भरपूर देवाण-घेवाण झाली.

आजचा माझा अनुभव –

नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला बाहेर पडलो. रस्त्यात बऱ्याच जणांचे / जणींचे हात हलवून नमस्कार नेहमीच होत असतात. आज चक्क सगळेजण थोडा वेळ थांबून आणि अतिशय गोड बोलून चौकशी करत होते. आज सगळेजण चक्क एवढे गोड का बोलत आहेत हे काही लक्षात येईना.

नेहमीप्रमाणे सकाळी बऱ्याच जणांशी फोनवर बोलणे झाले, गप्पा झाल्या. आज चक्क सगळे इतके गोड बोलत होते, कि, विश्वासच बसत नव्हता.

घरामध्ये सकाळी चहा देताना आणि नाश्ता देताना बायकोच्या बोलण्यात पण एक छानच गोडपणा जाणवत होता.

आज सगळेजण इतके गोड का बोलत आहेत, यावर विचार करत होतो आणि पटकन ट्यूब पेटली.

काल संक्रांत सणाला मी सगळ्यांना तिळगुळ घ्या गोड बोला- आज गोड बोला आणि रोजच गोड बोला, अशा शुभेच्छा दिल्या होत्या. फोन वरती ओळखीच्यांना ई तिळगुळ देऊन अशाच शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचाच हा परिणाम असणार हे नक्की.

मी वर बघून संक्रांत देवीला नमस्कार केला आणि प्रार्थना केली – सगळ्यांच्या एकमेकांशी बोलण्यात वागण्यात असाच गोडवा आणि गोडपणा पूर्ण वर्षभर म्हणजे पुढच्या संक्रांत सणापर्यंत राहो, आणि हा गोडवा मनापासून असावा, असे तुझे आशीर्वाद सगळीकडे असू देत…

आणि मी पण सगळ्यांकडून तिळगुळ घेतला आहे, तेव्हा मी पण नक्कीच पूर्ण वर्षभर सगळ्यांशी गोडच बोलणार, आणि अगदी मनापासून गोड बोलणार.

आणि चक्क संक्रांत देवीने ‘तथास्तु’ असा आशीर्वाद दिला.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ८ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ८ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

रविंद्रनाथांचे पिता व वडील बंधूंचा वेद, उपनिषदांचा अभ्यास होता. त्यामधील संकल्पनांचा पुरस्कार (एकेश्वरवाद, अद्वैतवाद, निर्गुण उपासना) त्यांनी ब्राम्होसमाजाची जडणघडण होतांना केला कारण राजा राम मोहन रॉय यांच्याबरोबर रविंद्रनाथांच्या वडिलांनीच ब्राम्हो समाजाची स्थापना केली होती. वडिलांच्या निधनानंतर, रविंद्रनाथांचे वडील बंधू ब्राम्हो समाजाचे अध्वर्यू बनले.

रविंद्रनाथांचाही वेद व उपनिषदांचा अभ्यास होता व सुरवातीच्या काळात त्यांच्यावर ब्राम्हो समाजाच्या तत्वज्ञानाचा प्रभावही होता. मात्र ब्राम्हो समाजाच्या विभाजनानंतर हा प्रभाव हळूहळू कमी होत गेला. संत तुकारामांच्या अभंगांनी ते एवढे प्रभावित झाले होते की त्यांनी त्यांच्या कांही अभंगांचे बंगाली भाषेत रूपांतर केलं. आणि आपल्याला चांगलच ठाऊक आहे की संत तुकाराम सगुणोपासक होते. यावरून असं सिद्ध होतं की टागोर सगुण उपासनेच्या विरोधात तरी नव्हते.

‘ऋग्वेदी’ या टोपणनावाने लेखन करणारे पु ल देशपांडेंचे आजोबा (आईचे वडील) श्री. वामन मंगेश दुभाषी यांनी रविंद्रनाथांच्या हयातीतच गीतांजलीचं अभंग रूपात भाषांतर केलेलं आहे. टागोरांनी ऋग्वेदींना पाठविलेल्या आपल्या संदेशात स्पष्टपणे म्हटलं आहे की ऋग्वेदींनी माझ्या कवितांचं यथार्थ भाषांतर करून माझे विचार मराठी वाचकांपर्यंत पोचविले आहेत. ऋग्वेदींनी तर आपल्या अभंगांत परमेश्वराला उद्देशून हरी, नारायणा, अनंता, विश्वनाथा म्हटलं आहे. कुठे त्याच्या मुरलीचा उल्लेख आहे तर कुठे त्याच्या भासमान सगुण रूपाचा संदर्भ आहे. पूजन, अर्चन यांचा उल्लेख तर अनेक ठिकाणी आहे. पूजाअर्चा तर सगुण रूपाचीच होते ना!

ऋग्वेदींच्या अभंग गीतांजलीत असे उल्लेख आहेत की परमेश्वर भक्तांना विविध रूपात भेटतो, तसेच तो विविध नावांनी ओळखला जातो. मात्र टागोरांच्या इंग्रजी गीतांजलीत असे उल्लेख नाहीत कदाचित् मूळ बंगालीत ते असावेत. कारण ऋग्वेदींनी मूळ बंगाली व इंग्रजी अशा दोन्ही भाषांतील कवितांचा अभ्यास करून मग हे भाषांतर केले आहे. कदाचित भाषांतराच्या इंग्रजी भाषेच्या संस्कृतीच्या संदर्भात असे उल्लेख गैरलागू ठरले असते म्हणून ते इंग्रजी गीतांजलीत आले नसावेत. पण आपण सामान्य मराठी वाचक तर परमात्म्याला राम, कृष्ण, विठ्ठल अशा विविध रूपातच ओळखतो व हीच रूपं आपल्याला जवळची, ओळखीची वाटतात. म्हणून आम्ही आमच्या भावानुवादात परमेश्वराच्या या रूपांचा संदर्भ जागोजागी वापरला आहे.

—–

☆ गीत : २२ ☆

In the deep shadows of rainy July, with secret steps, thou walkest, silent as night, eluding all watchers.

To-day the morning has closed its eyes, heedless of the insistent calls of the loud east wind, and a thick veil has been drawn over the ever – wakeful blue sky.

The woodlands have hushed their songs, and doors are all shut at every house. Thou art the solitary wayfarer in this deserted street. Oh my only friend, my best beloved, the gates are open in my house — do not pass by like a dream.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: २२ ☆

*

आषाढातील संध्याकाळी

हळुच उतरते नीरव रजनी

वर्षा ऋतूतील रिमझिम वेळी

तव पदरव, मी अधीर नयनी॥

सजग निळ्या, आतुर आभाळी

पांघरुन शामल, मेघांची दुलई

अशा शांत, निद्रिस्त सकाळी

लगबग कसली ऐकू न येई॥

 *

सुस्तावलेले आसमंत सारे

परांत चोची पक्षी घालती

घर दरवाजे पण बंदच सारे

झाडे झुडपे गीत न गाती॥

 *

एकच तू मम सखा प्रियतम

फिरसी एकटा निर्जन वाटेवर

जाशील निसटुनी तू स्वप्नासम

म्हणुनि उघडले द्वार नि अंतर॥

 *

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत: २३ ☆

Art thou abroad on this stormy night on the journey of love, my friend? The sky groans like one in despair

It have no sleep to-night. Ever and again I open my door and look out on the darkness, my friend!

I can see nothing before me. I wonder where lies thy path!

By what dim shore of the ink-black river, by what far edge of the frowning forest, through what mazy depth of gloom art thou threading thy course to come to me, my friend?

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: २३ ☆

*

रात्र वादळी अन् अंधारी

उदास नभ हे कण्हत उरी

नीज न ये मज ऐशा काळी

नेत्र पाहती तुझी वाटुली॥

प्रेमरथावर स्वार होउनि

येशील वाटे अंधारातुनि

पाही राजसा मी दाराशी

येई उदासी, तू नच दिसशी॥

 *

कुठुनि? कशी? वाट कोणती?

काळोखाच्या नदी जवळ ती?

की उपवनीच्या फुलाफुलातून?

की दुःखाच्या चक्रव्यूहातून?

शोध शोधिले वाट दिसेना

तव भेटीची आस मिटेना

शोधी तू मार्गा, ये मजपाशी

सखया, लवकरी ये दाराशी॥

* 

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत : २४ ☆

If the day is done, if birds sing no more, if the wind has flagged tired, then draw the veil of darkness thick upon me, even as thou hast wrapt the earth with the coverlet of sleep and tenderly closed the petals of the drooping lotus at the dusk.

From the traveller, whose sack of provisions is empty

before the voyage is ended, whose garment is torn and dust-layden, whose strength is exhausted, remove shame and poverty, and renew his life like a flower under the cover of thy kindly night.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: २४ ☆

*

जरी दिवस तो असेल सरला

पक्षी कोटरी असे परतला

वारा शिणुनी, दमुनी बसला

मिटल्या कमली, भृंग गुंतला

 *

निसर्ग निद्रेच्या अधीन झाला

दे अंधाराची गोधडी मजला

 *

संचित सरले, प्रवास उरला

धोतर फाटे, सदरा मळला

 *

प्राणांमध्ये त्राण न उरला

असा प्रवासी शरण तुजला

 *

प्रवाशाची त्या लाज राखण्या

दारिद्र्य तयाचे दूर करण्या

 *

पुनर्जन्म जणु त्याला देण्या

मिटली कमले पुन्हा उमलण्या

 *

येई लवकरी दीनानाथा,

अंगुलीवरी गिरीराज तोलण्या

*

– क्रमशः भाग आठवा 

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्याचे देखील असेच आहे का?… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ आयुष्याचे देखील असेच आहे का?… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

गरम गरम भुईमुगाच्या शेंगाची कढई समोर आणून ठेवतो.

कढईभोवती बसून शेंगा फोडून खायला सुरूवात करतो…

… अशातच शेंगा फोडत असताना एखाद्या शेंगेतील शेंगदाणा हातातून खाली पडतो.

आणि खालच्या टरफलांमध्ये गायब होतो.

… आपण मग तो बोटाने शोधायला सुरूवात करतो.

– – अगदी अर्धा ते एक मिनिटाची ही क्रिया,

… पण शेजारी कढईभर शेंगा असूनही त्या एका शेंगदाण्याला आपण शोधत बसतो…

थोडेसे तरी वैतागतो…

… या नादात जवळ बसलेली व्यक्ती शेंगा जास्त संपवते…

 

– – – आयुष्याचे देखील असेच आहे का? …

|| पाटीभर ‘आनंद’ शेजारी असूनही, आपण वाटीभर आनंदासाठी झुरतो…

पाटीकडे लवकर कधी लक्ष जातच नाही… आणि जेव्हा पाटीकडे वळतो तेव्हा…

ती रिकामी झाल्याचे दिसून येते…

 

|| आयुष्य खूप सुंदर आहे… त्याला अनुभवा…

|| गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेलं आयुष्य भरभरून जगा…

नेहमी आनंदी राहा – – – 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ त्या ‘मुलांच्या’ गंधकोषी… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ त्या ‘मुलांच्या’ गंधकोषी.. ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

काही वर्षांपूर्वी मी अमरावतीच्या शाश्वत स्कूल या शाळेला भेट देण्यासाठी गेलो होतो. तिथे गेल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांच्या टेबलवर एक बोर्ड होता. त्यावर लिहिले होते Every child is unique. ‘ तारे जमीपर ‘ हा चित्रपट आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल. त्यातील ईशान अवस्थी आठवतो का ? त्याला जेव्हा होस्टेलमध्ये दाखल केले जाते तेव्हा तो अतिशय दुःखी होतो आणि कोणाशीही बोलत नाही कारण तो आपल्या घरापासून आणि आईपासून तुटतो. या ईशानला डिस्लेक्सिया नावाची एक व्याधी आहे. तो b आणि d, 6 आणि 9 यासारख्या गोष्टींमध्ये फरक करू शकत नाही. पण ही व्याधी बुद्धिमत्तेशी संबंधित नाही. अशा मुलांना समजून घेणे जरुरीचे असते. या चित्रपटातील शिक्षकाचे काम आमिर खान या गुणी नटाने केले आहे. तो त्या मुलाला समजून घेतो आणि त्याच्यातील सुप्त गुणांना वाव देतो. त्याला असे आढळून येते की ईशान हा चित्रकलेमध्ये अतिशय प्रगती करू शकेल आणि तो त्याच्या त्या गुणांना प्रोत्साहन देतो. आणि होतेही तसेच. पुढे जी चित्रकला स्पर्धा घेतले जाते, त्यात ईशानच्या चित्राला प्रथम पारितोषिक मिळते. या चित्रपटातील हर बच्चा खास होत आहे हे वाक्य म्हणजे वरील Every child is unique हीच गोष्ट ध्वनीत करते.

पण आम्ही मुलांना शिकवताना नेमकी हीच गोष्ट विसरतो. सगळ्या मुलांना जणू एकाच साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतो. पण ही मुले वेगवेगळी आहेत, त्यांना प्रत्येकाला वेगळे व्यक्तिमत्व आहे, त्यांची आवड निवड वेगळी असू शकते या गोष्टी आम्ही दुर्लक्षित करतो किंवा सोयीस्कर विसरतो. आम्हाला हवी असते सतत ए ग्रेड किंवा 90% च्या पुढे परीक्षेतील गुण. आम्ही त्यांना रेसचे घोडे बनवतो. पण या सगळ्या खटाटोपात आम्ही त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रोत्साहन देत नाही. त्यांचे बालपण या सगळ्यात खुरटते. या फुलांना नीट उमलायला आम्ही वावच देत नाही ही आजची शोकांतिका आहे.

पक्षी छान उडू शकतात, मासे छान पोहू शकतात, हरणे धावू शकतात. पण हरणांना उडायला सांगता येणार नाही, पक्षांना पोहायला सांगता येणार नाही किंवा माशांना धावायला सांगता येणार नाही कारण प्रत्येकाचे गुणवैशिष्ट्य वेगळे आहे. हीच गोष्ट मुलांच्या बाबतीत सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवी. एखादा मुलगा उत्तम खेळाडू होऊ शकतो, एखादा उत्तम चित्रकार होऊ शकतो, एखाद्याला गाण्याचे अंग असते. अशा विविध प्रकारच्या क्षमता प्रत्येक मुलाच्या अंगी असू शकतात. एकाच मुलाकडून सर्व गोष्टींची अपेक्षा आपण करू शकत नाही. ज्या परमेश्वराने किंवा निसर्गाने आपल्याला घडवले आहे किंवा जन्म दिला आहे त्याची सुद्धा तशी अपेक्षा नाही.

रवींद्रनाथ टागोर हे थोर शिक्षणतज्ज्ञ होते आणि महान कवी, साहित्यिक. पण त्यांना शिक्षणाची पारंपारिक चौकट मान्य नव्हती. त्यांना स्वतःला देखील लहानपणी शिकताना अशा प्रकारच्या शिक्षणात रस वाटत नव्हता. म्हणूनच तर मोठेपणी त्यांनी त्यांच्या स्वप्नातल्या शाळेची म्हणजेच शांतीनिकेतनची निर्मिती केली. या शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आवडीनुसार शिकण्यासाठी वाव दिला गेला. त्यांच्या मते शिकणं हा आयुष्याचा ‘ उत्सव ‘ व्हावा. त्यांचे हात सर्जनशील व्हावेत. पु ल देशपांडे यांच्यासारखा महान लेखक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती रवींद्रनाथांच्या या शिक्षण पद्धतीने भारावून गेली. त्यांनी रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनात अनेक दिवस मुक्काम करून त्यांची शिक्षण पद्धती समजावून घेतली आणि ती वंगचित्रे, रवींद्रनाथ : तीन व्याख्याने यासारख्या पुस्तकातून आपल्यासमोर मांडली.

मुलांना केवळ पुस्तकातील किडे न बनवता त्यांना जीवनाचा सर्व बाजूंनी आनंद घेता यावा अशी दृष्टी विकसित करणे आवश्यक आहे. त्यांच्यात प्रेम आणि नैतिक मूल्ये रुजतील असे वातावरण आपण त्यांना उपलब्ध करून द्यायला हवे. त्यासाठी त्यांच्या स्तरावर जाऊन त्यांना समजून घेतील आणि समजून देतील अशा शिक्षकांची आवश्यकता आहे. म्हणून क्रीडांगणे मुलांच्या गजबजाटाने फुलली पाहिजेत, वाचनालयात मुलांची गर्दी हवी, वर्गामध्ये कठोर शिस्तीच्या ऐवजी हसत खेळत शिकता यायला हवे. अनावश्यक विषयांचे आणि पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हायला हवे. मुलांना शाळेत जाणे ही आनंदाची गोष्ट वाटली पाहिजे ती शिक्षा वाटता कामा नये. हे उगवते तारे आहेत, उमलती फुले आहेत ती कोमेजून जाता कामा नये याची दक्षता आपणच घ्यायला हवी. ही मुले म्हणजे आपले भविष्य आहे. यात पालकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आज मुलांना खेळण्यासाठी घरामध्ये भावंडं नाहीत, आजीआजोबा नाहीत. अशा वेळी आई वडिलांनी मुलांसाठी वेळ काढणे आणि त्यांना समजून घेणे, प्रसंगी त्यांच्यामध्ये खेळणे आवश्यक आहे.

वर्षातून केवळ एक दिवस बालदिन साजरा करून भागणार नाही. मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य, त्यांच्या जीवनातील आनंद कायम राहायला हवा. त्या कळ्या आपल्या पूर्ण शक्तीनिशी उमलायला हव्या. त्या फुलांच्या गंधकोषी असे एक सुंदर गाणे आहे. त्यात कवीला फुलांच्या गंधकोषात परमेश्वराचाच वास आहे असे सुचवायचे आहे. त्यात एका अक्षराचा बदल करून त्या मुलांच्या गंधकोषी असे म्हणता येईल. त्यातही त्या परमेश्वराचा वास आहे. फक्त ही फुले आम्हाला नीट फुलवता आली पाहिजेत. म्हणजे त्यांचा सुगंध दूरवर पोहोचू शकेल.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… – थरारक पर्यटन – भाग – ७५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… – थरारक पर्यटन – भाग – ७४  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

थरारक पर्यटन

मला नेहमी असं वाटतं की एखादा प्रवासी किंवा एखादा खेळाडू यांच्या मानसिकतेत साम्य आहे. दोघेही खिलाडू वृत्तीचे असतात, परिस्थितीशी जुळवून घेणारे असतात, कठीण परिस्थितीचं दोघांनाही भान असतं, अडचणींवर मात करण्याची क्षमता त्यांच्यात आपोआपच बळावते, माघार घेण्याची वृत्ती त्यांच्यात अभावाने जाणवते.

ग्रुप बरोबर केलेल्या अनेक टूर्समधून मी हा अनुभव घेतला आहे. सत्तरी उलटून गेलेली, ऐंशीच्या उंबरठ्यावर असलेली माणसे अगदी हौसेने उंच चढणी चढतात, कितीतरी किलोमीटर चालण्याची त्यांची तयारी असते. नव्या प्रदेशातील अनोळखी खाद्य संस्कृतीही अगदी आनंदी वृत्तीने, खिलाडू वृत्तीने स्वीकारतात, उगीच”खाण्याचे हाल होत आहेत” वगैरे कुरकुर करत बसत नाहीत. या संदर्भात मला एका हास्यास्पद प्रसंगाची आठवण येते.

तेव्हा आम्ही इटलीत फिरत होतो. इटालियन पिझ्झा हा जगप्रसिद्ध. मूळात “पिझ्झा” हे इटालियन लोकांचेच खाणं. तेव्हा इटलीत आलोय तर इटालियन क्यूझीनची चव का घेऊ नये? आमच्या ग्रुप कंडक्टरने आम्हाला इटालियन रेस्टॉरंट मध्ये नेलं आणि सगळ्यांसाठी “पिझ्झा” ची ऑर्डर दिली. आमच्याबरोबर एक वृद्ध गुजराती महिला होती. मुख्य म्हणजे ती एकटीच या टूर बरोबर आली होती. तिच्याबरोबर घरचे, अथवा स्नेही कुणीच नव्हते आणि तिच्याशी गप्पा करतानाच समजले की, ” ती नेहमीच एकटीच प्रवास करते. ” सिंगल ट्रॅव्हलर. तिचं म्हणणं, “टूर मध्ये सोबत मिळतेच आता नाही का तू भेटलीस मला. ” त्या संवादानंतर मी हळूच स्वतःलाही जरा तपासून पाहिलं, “आपल्याला जमेल का असे एकटीनेच फिरायला. मूळात आवडेल का? ” उत्तर अर्थातच “कोण जाणे! ” असंच आलं.

तर सांगत होते सगळ्यांच्या टेबलवर छान रंगीबेरंगी टोमॅटो, बेल पेपर्स, आॉलीव्ह्ज, भरपूर चीज वगैरेंनी सजवलेले पिझ्झा आले. “वा! वा! साक्षात इटालियन पिझ्झा! ”

त्या वृद्ध महिलेनेही तो खाण्यासाठी कापायला सुरुवात केली. तो इतका चिवट होता की तिने थोडासा सुरीवर जोर लावल्याबरोबर एखाद्या विटी सारखा टणकन् उडून दुसऱ्या टेबलवर जाऊन पडला. मला हे आठववून लिहिताना आताही खूपच हसू येत आहे.

“जो मारो पिझ्झा क्याथी गयो! ”

ती मजेत बोलत होती. थोड्याफार प्रकाराने सगळ्यांच्याच बाबतीत हा चिवट पिझ्झा खायचा कसा हा प्रश्नच होता. काहीजण ग्रुप कंडक्टरकडे तक्रारही करू लागले पण ही वृद्ध गुजराती महिला मात्र अगदी शांत होती.

“एटलो सु थयो. बद्धानी सामळो. मारे पास खाकरो छेना! ” आणि खरोखरच तिने तिच्या हॅन्डबॅगमधून खाकरे काढले आणि सर्वांना वाटले. इटलीत इटालियन पिझ्झा रेस्टॉरंट मध्ये आम्ही सर्वांनी ते भारतीय गुजराती कुरकुरीत खाकरे मस्त एन्जॉय केले.

प्रवासात असे अनेक अनुभव येतात. मजेचे, अडचणीचे, त्रासाचे अनेक प्रकारचे.

ओहायो स्टेटमध्ये कोलंबस या गावात राहत असताना तिथून दोनतीन तासावर असलेल्या एरी लेकवरच्या बेटावर जायचा ज्योतिका- साकेतने बेत केला. त्या दिवसाचं हवामान, वादळ वाऱ्यांविषयीचे सावध इशारे वगैरे दोघांनी काटेकोरपणे चेक केल्यानंतरच आम्ही चौघं ‘पुटीन बे’ला जायला निघालो. तिथे एक दिवस आम्ही मुक्कामही करणार होतो. तसं बुकिंगही साकेतने केलेलं होतं. समुद्रच वाटावा इतका विस्तीर्ण आणि अथांग असा तो तलाव होता. दूरवर अनेक उंच इमारती होत्या. तलावात प्रवासी, व्यापारी जहाजंही होती. प्रत्यक्ष बेटावर जाण्यासाठी आम्हाला एक क्रूज करावी लागली. गाडी किनार्‍यावरच्या कारपार्कमध्ये ठेवली आणि रात्री बेटावरच मुक्काम करणार असल्यामुळे लागणारे सामान तेवढं बरोबर घेतलं.

बेटावर पोहोचलो. चारी बाजूला असलेलं निळंशार पाणी बघून तर आमचा जीव अपार सुखावला. बेटावर फिरण्यासाठी आम्ही एक गोल्फ कार्टही घेतली. त्या उघड्या कार्ट मधून बेटावर फिरण्याची मजा वर्णनातीत होती. आम्ही मस्त गप्पा करत, गाणी गात, आजूबाजूची झाडं, घरं पाहत होतो आणि काय आश्चर्य! निसर्ग किती लहरी असतो! मानवी अंदाजावर छुपेपणाने तो कधी हल्ला करेल हे कोणी सांगायचं? एकाएकी जोरदार वादळ वारे सुरू झाले. आकाश काळोखलं आणि अक्षरश: चेंडू एवढ्या गारा आम्हाला झोडपू लागल्या. आमच्या अंगावर ‘हुडी’ होत्या तरीही गारांचा मारा आणि पावसामुळे निर्माण झालेली थंडी असह्यच होती. त्यातच आमची कार्टही बंद पडली. साकेतची अत्यंत लाडकी स्पोर्ट कॅप वाऱ्याबरोबर उडून गेली म्हणून तो अधिकच वैतागला होता. त्यातून आम्हा ज्येष्ठांची जबाबदारी! प्रसंग बाका होता. पुटीन बेवर सगळ्याच प्रवाशांची प्रचंड धावपळ चाललेली होती पण आम्हा चौघांचे हाल दारुण होते. आम्ही या वादळी पावसात भिजत रस्त्यावर होतो. तिथे जवळच एक टुमदार बंगला होता पण बंगल्याची दारं खिडक्या बंद होत्या. मनुष्यवावर तिथे जाणवतच नव्हता. क्षणभर माझ्या मनात आलं या क्षणी आपण भारतात असतो तर अशाच बंगल्याचे दार नक्की आपल्यासाठी उघडलं गेलं असतं. भिजणाऱ्या आम्हाला आत घेतलं असतं. पुसायला त्यांनी पंचे दिले असते. गरम चहाही मिळाला असता. उगीच नाही भारताला “अतिथ्यशील देश” म्हणतात. मी कोणत्या विचारात गुंग झाले हे ज्योतिकाने ओळखले असावे. ती लगेच म्हणाली, ” मम्मी त्या घराकडे अशी एकटक नजर लावून बघू नकोस. अमेरिकेत कुठल्याही कारणाने कुणालाही अरेस्ट करतात बरं का? ”

मी “भारतीय” असल्याचा अभिमान मात्र मला त्या क्षणी नक्कीच जाणवला.

पण तेवढ्यात एक अमेरिकन यंग कपल आमच्या जवळ येऊन थांबलं आणि ते त्यांच्या कार्ट मधून उतरले आणि त्यांनी त्यांची कार्ट आम्हाला देऊ केली आणि “आम्ही तुमची बंद पडलेली कार्ट रेंटल शॉप मध्ये घेऊन येऊ, डोन्ट वरी फोक्स, बी रिलॅक्स्ड” असं म्हणत आम्हाला अगदी गोड हसत त्यांनी ‘बाय’ केलं. आमच्या ‘थँक्स’ ला अगदी शालीनतेने “यु आर वेलकम मेन. ” असंही म्हटलं.

बेधुंद पावसात, गारांच्या तडाख्यात भिजण्यातला त्यांचा रोमान्स बघून कुठेतरी मनाला खरोखरच गुदगुल्या झाल्या.

एक क्षण तक्रारीचा तर दुसरा क्षण असा आपुलकीचा. त्या दुसऱ्या क्षणांनी अमेरिकन, भारतीय वगैरे लेबलं तोडून टाकली. उगीच दुभाजक असलेल्या भींती मनातल्या मनातच कोसळल्या. शेवटी निसर्गाच्या या महान पटांगणात माणूस हा फक्त माणूसच असतो. कुठल्याही राष्ट्रीयत्त्वाचा, धर्माचा शिक्का नसलेला. हा थरारक, नाट्यमय आणि नंतरचा मनुष्यपणाचा अविस्मरणीय अनुभव प्रवासात नेहमीच घेतला.

– क्रमशः भाग ७४..

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मरण : एक चिंतन… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ मरण : एक चिंतन… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

मरण हा शब्द उच्चारला तरी मनुष्याला भीती वाटते. मरणाची भीती का वाटतं असावी? याचा विचार करताना असे जाणवले की मरणानंतर आपण कुठे जाणार हे माहित नाही, तसेच आज जे मी मिळवलं (? ) आहे, (त्यात स्थावर, जंगम मालमत्ता आणि आप्तस्वकीय सर्वच आले…) ते मला सोडून जावं लागेल…

विरह मनुष्याला सहन होत नाही… , त्याला सतत वाटतं असते की जे मी मिळवलं आहे ते कायम टिकेल…

*उगवलेला सूर्य देखील संध्याकाळ झालीं की अस्ताला जातो, तिथे या मर्त्य मानवाची काय कथा…? *

– – मनुष्याला मरणानंतर आपले काय होणार याची भिती असते असे मानले तर जन्म होण्या आधी हा कुठे होता? म्हणजे ते सुद्धा त्याला माहित नव्हतेच…

थोडक्यात हा प्रवास आहे…

*अज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणारा… *

मग, आज आपल्याला ज्ञात काय आहे? तर मी जिवंत आहे…

– – सर्व संतांनी सांगितले आहे की *”उपजे ते नासे”*, मग अशावेळी मनुष्य म्हणून माझं आद्य कर्तव्य काय असेल?

तर *त्यावर सर्व संत एकच गोष्ट सांगतात की स्व ची ओळख करून घे… *

८४ लक्ष योनींमध्ये फक्त मानवाला हा अधिकार आहे…

इथे तुला मानवाचा देह भाड्याने मिळाला आहे…!! त्याचं अखंड स्मरण ठेवणे हे भाडं ठरलं आहे…! आईच्या गर्भातून बाहेर पडतानां मनुष्य भगवंताला वचन देतो की मी तुझे सतत स्मरण ठेवीन, पण नंतर इथल्या मोहमायेला भुलून तो देवाला पूर्णपणे विसरतो…

मरण म्हणजे देवाची भेट आहे… , तेव्हा तो मनुष्याला विचारतो की शंभर वर्ष तू या देहात राहिलास, पण भाडं काही दिले नाहीस…?

– – मग या जन्माचे भाडं चुकविण्यासाठी देव त्याला पुन्हा अन्य योनीत जन्म देतो, मग हे चक्र अव्याहत सुरू राहते…

*”पुनरपि जननं पुनरपि मरणं* 

*पुनरपि जननी जठरे शयनं”*

समर्थ रामदास आपल्याला सांगतात – – 

*मरणाचे स्मरण असावे।* 

*हरिभक्तीस सादर व्हावे।* 

*मरोन कीर्तीस उरवावे।* 

*येणे प्रकारे।।*

(दा. १२- १०-१३)

श्री गोंदवलेकर महाराज सांगतात की मनुष्याचा पुढील क्षणाचा भरवसा नाही…

*एखादा मनुष्य झोपला आणि सकाळी उठलाच नाही तर तो मेलेला आहे असे म्हणावे लागते… *

– – म्हणून मृत्यू कधी येईल हे कोणाला माहीत नाही… , म्हणून प्रत्येकाने अगदी आतापासून नामस्मरण करायला अर्थात आपले भाडं चुकतं करायला सुरुवात करू…

*कर्जाचा EMI भरला की कर्ज घेणाऱ्याला आनंद होतो, चला एक हफ्ता कमी झाला असे त्याला वाटतं असते. तसे नाम घेतले की आपला भाड्याचा हप्ता फिटायला सुरुवात झाली असे वाटले पाहिजे… *

*हळूहळू मनुष्य अखंड नाम घेऊ लागेल, मग त्याचे कर्ज कधी फिटले, भाडं देऊन कधी संपले हे आपल्याला कळणार नाही… पुढे पुढे अशी वेळ येऊ शकेल की आपण घेतलेल्या नामाचे देवावर कर्ज होईल आणि ते फेडायला तो आपल्या दारी येईल… (जसे श्रीखंडया बनून भगवंताने नाथांच्या घरी पाणी भरले, पांडवांच्या घरी उष्टी काढली…)*

– – त्यासाठी मरणाचे भय गेले पाहिजे, त्यासाठी सर्व संतांनी सांगितलेला सोपा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण!!!  

श्रीराम जयराम जयजयराम!!

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares