☆ हॅल्युसिनेशन्स – लेखक – डॉ. पद्मनाभ केसकर ☆ परिचय – सुश्री वीणा रारावीकर ☆
पुस्तक : हॅल्युसिनेशन्स
लेखक – डॉ. पद्मनाभ केसकर
प्रकाशक – सुनिधी पब्लिशर्स, पुणे
पृष्ठ संख्या – १८८
मूल्य – ३०० रुपये
सध्याच्या काळात अनेक लोक आपला बहुतांशी वेळ आभासी दुनियेत घालवत असतात. कधी कधी त्यांना तेच जग खरे आहे असा भास होऊ लागतो. भास-आभासाच्या या खेळाचा माणूस आपल्या आयुष्यात कधी ना कधी अनुभव घेत असतो. या आभासाचा अतिरेक होतो तेव्हा त्याला हॅल्युसिनेशन्स होऊ लागते. त्यामुळे हॅल्युसिनेशन्स हे पुस्तकाचे नाव आणि मुखपृष्ठ बघून सुरवातीला या गूढ कथा आहेत असा मनात संभ्रम निर्माण होतो. लेखक डॉ. पद्माकर केसकर यांनी या भासाला छेद दिला आहे. हॅल्युसिनेशन्स हा बारा लघुकथांचा संग्रह आहे. या अभ्यासपूर्ण कथा आहेत. वैज्ञानिक, भावनिक, जीवनस्पर्शी अशा या कथा आहेत.
हॅल्युसिनेशन्स, लेखकाच्या पहिल्या कथेत पुढच्या काही कथांचा संदर्भ येतो. आणि यातून त्या कथा वाचण्याची उत्सुकता निर्माण होते.
माणसाने निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न केला तरीही तो पहिला येऊ शकत नाही. हेच सत्य द सेकंड बेस्ट या कथेतून अधोरेखीत केले आहे. मेंदूला पर्याय उपलब्ध होऊ शकतो का, याचा मागोवा त्यांनी एका श्वासाचे अंतर यात घेतला आहे.
एखाद्या अति श्रीमंत माणसाशी त्याच्या ईस्टेटीसाठी लग्न करायचे आणि नंतर त्याचा काटा काढायचा. हे कथेचे बीज जुनेपुराणेच. पण तो काटा काढताना कोणते तंत्र वापरायचे, हा एक प्रश्न. लेखकाने गोबेल या कथेत हिटलरच्या साथीदाराने शोधून काढलेल्या, युद्ध काळात वापरल्या जाणर्या तंत्राचा उपयोग अप्रतिमरित्या केला आहे.
लेखक वैद्यकीय व्यवसायात आहेत. हॉस्पिटल मधील वातावरण, रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या भाव-भावना यांच्याशी लेखकाचा जवळून परिचय आहे. एखादा रुग्ण अगदी काही तासाचा सोबती असेल तर डॉक्टर कसे वागतील आणि त्याचबरोबर रुग्णाच्या जवळचे नातेवाईक कसे वागतात, याचा अनुभव त्यांनी सहजपणे रेखाटला आहे. याचा प्रत्यय बिंब-प्रतिबिंब या कथेत येतो.
तर त्यांच्याच व्यवसायातील धोका त्यांनी संडे इव्हिनिंग या कथेत अतिशय भावुकपणे मांडला आहे.
यातील बहुतांशी कथा मानवी जीवन – मृत्यू मधील संघर्ष संबंधीत आहेत. तरीही प्रत्येक कथेत एक वेगळा विचार आहे. एक कथा राजकीय तर एक मानवी स्वप्नांवर. तर भास- आभासाच्या या खेळात शेवटची पाहुणा पाऊस ही कथा एक वेगळीच वळण घेते आणि मनाला हुरहूर लावते.
लघुकथा अर्थात प्रत्येक कथा साधारणपणे १२ ते १५ पानांची आहे. त्यामुळे एकावेळी एक कथा सहजपणे वाचून होते आणि संपूर्ण पुस्तक वाचून कधी संपते हे समजत नाही. प्रत्येक कथेचा शेवट उत्कंठावर्धक आहे. सर्व कथा प्रथमपुरुषी एकवचनात लिहिल्या आहेत, हे विशेष. तसेच या कथांमध्ये केलेले ग्रीष्म ऋतुमधील उन्हाळ्याचे, शिशिरातील पानगळीचे अथवा न थंडीतील धुक्याचे वर्णन यामुळे अतिशय योग्य वातावरण निर्मिती होते.
या पुस्तकातील काही कथा लेखकाने त्यांच्या महाविद्यालयीन काळापासून म्हणजे साधारण ९० च्या दशकात लिहिलेल्या आहेत. वेगाने बदलत जाणार्या तंत्रज्ञानाने माणसाची जीवनशैली बदलून टाकली आहे. तरी पण आजही या कथा वाचताना तितक्याच ताज्या – टवटवीत, नवीन वाटतात. यातील काही पारितोषक विजेत्या कथा आहेत.
एक मनस्वी कलाकार, लेखक डॉ. सलील कुलकर्णी यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. तर डॉ. अच्युत गोडबोले आणि निरंजन घाटे यांनी त्याची पाठराखण केली आहे. यातील रेखाचित्रे अतिशय समर्पक आणि कथेला उठाव आणणारी आहेत.
तरुणांपासून जेष्ठ लोकांपर्यंत सर्व वाचकांना खिळवून ठेवेल अशा या कथा आहेत. सुनिधी पब्लिशर्सने प्रकाशित केलेला हा कथासंग्रह वाचकांच्या पसंतीस नक्की उतरेल, यात शंका नाही.
परिचय : वीणा रारावीकर
दक्षिण मुंबई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “देवालय – एक शोध परिक्रमा” – लेखिका : सुश्री सुनीला सोवनी ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : देवालय – एक शोध परिक्रमा
लेखिका : सुनीला सोवनी
प्रकाशक : परममित्र पब्लिकेशन्स
पृष्ठे : २१६
मूल्य: २५०₹
अयोध्येतील श्रीरामलल्लाची मूर्ती घडविणारा मूर्तिकार अरुण योगीराज प्राणप्रतिष्ठेनंतर म्हणू लागला “ही मूर्ती मी घडवलेली नाही ” त्याच्या या आश्चर्यकारक उद्गारा मागचे रहस्य काय असावे ? त्यावेळी श्रीरामाची झलक अनुभवणाऱ्या प्रत्येकाचे भान हरपले, डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले ते कशामुळे ?
केरळमधील शबरीमला येथील स्वामी अय्यप्पा मंदिरात विशिष्ट वयातील महिलांना परंपरेने प्रवेश नाकारला तो का ?आणि तिरुअनंतपुरम पासून 16 कि. मी. वरील माता भगवती मंदिर परिसरात प्रतिवर्षी ओणमच्या दिवशी महिला भक्तांची विश्वविक्रमी गर्दी होते ती तरी का ?
भगवान विष्णुच्या विठ्ठलरुपी भेटीसाठी आतुरलेले वारकरी “माऊली माऊली “असा धावा करीत पंढरीची वाट तुडवतात मात्र असा ” माऊली” चा मान त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर आदी ज्योतिर्लिंगांना का नाही दिला जात ?
तिरूमला पर्वतावरील बालाजी सुद्धा विष्णूचेच रूप.. मात्र तो “धनदाता”म्हणून विख्यात! तर या डोंगरा जवळचेच कालहस्ती मंदिर “सर्वबाधा निवारक” म्हणून प्रसिद्ध हा भेद कशामुळे ?
महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली किंवा बनशंकरी, शांतादुर्गा, कामाख्या अशी कित्येक शक्तीदेवतेचीच नावे नी तिचीच देवालये, परंतु प्रत्येकाची महती वेगळी, आराधना वेगळ्या, फलश्रृती सुध्दा वेगळी असे का असते ?
भल्या मोठ्या पिंपळाखालच्या पारावरील एवढ्याशा दिवटीच्या प्रकाशातला मारुतराय घाबरलेल्या मनात जशी आश्वासकता निर्माण करतो तशी आश्वासकता नेत्रदीपक रचनेने समृध्द वेरूळचे कैलास मंदिर किंवा कोणार्कचे सूर्य मंदिर का नाही करू शकत ?
देव- देवालयांच्या संस्कृतीने नटलेल्या अशा आपल्या देशात प्रत्येक देऊळ वेगळे दिसते, वेगळे भासते पण वेगळे असत नाही. ते कसे ?
कुठल्याही मंदिराच्या गाभाऱ्यात अनुभवता येणारी शांतता, प्रसन्नता दुसऱ्या एखाद्या भव्य- दिव्य.. डोळे दिपवणाऱ्या वास्तूरचनेमध्ये अनुभवता येईलच याची खात्री देता येत नाही. असे का व्हावे ?
दक्षिणेतील मंदिराभोवतीची गोपुरे किंवा दिपमाळा कोणाला साद घालतात ? देवळाचे गर्भगृह लहान व अंधारे का असते ? मनात येईल त्या मोकळ्या जागेवर मंदिर का नाही बांधत? मंदिरातून पूजा- अर्चा, होम- हवन सारखे का चालू असते ?
विभिन्न संप्रदाय नी मंदिरे यांचा परस्परसंबंध काय ?
मुळात देवालये निर्माण का केली जातात? मूर्तीची प्राणप्रतिष्ठा का होते ? योगशास्त्रात वर्णिलेली कुंडलिनी शक्ती नी देवालये यांचा परस्परसंबंध असतो तो काय ?
अशा कित्येक प्रश्नांचा वेध घेत उत्तरे देणारी अर्थात मंदिर चे रहस्य उलगडणारी ही ” देवालय – एक शोध परिक्रमा “
मंदिर दर्शन हा देखल्या देवा दंडवत असा वरवरचा किंवा मार्गदर्शकाने दिलेल्या दृष्टीमुळे तात्पुरते अचंबित होण्याचा किंवा मंदिर प्रवेशावरून तावातावाने भांडण्याचा विषय नसून येथल्या प्रत्येक निर्माण प्रक्रियेमागे, कृतीमागे महाप्रचंड अर्थ आहे. ‘देवालय’ म्हणजेच परमेश्वराचे घर साकारण्याची ती एक अशी प्रक्रिया आहे की, ज्यायोगे परमेश्वरी शक्तीचे भक्तामध्ये जागरण घडून येईल, भक्ताचे रूपांतर होऊन भक्त आणि भगवंत एकरूप होतील. परमेश्वरी कृपाप्रसादाने भक्ताचा भगवंत व्हावा, त्याचे परमकल्याण व्हावे यासाठी केलेला तो फार मोठा यत्न आहे.
जीवमात्राला सुखी-आनंदी जीवन जगता यावे यासाठी जगभरात अक्षरशः शेकडो पंथ, संप्रदाय, वाद-विचारधारा, राज्यव्यवस्था, धर्मव्यवस्था जन्माला आल्या आणि बहुतेक जण अधिकांच्या अधिकतम सुखापर्यंत जाऊन पोहोचले. भारतातही अनेक मार्ग जन्माला आले, मात्र या सर्वांनी सर्वव्यापी ईश्वराचे (एकाच एका चैतन्यशक्तीचे) दर्शन घेतले व त्यांनी सर्वांच्या परमसुखाचा -चिआनंदाचा ध्यास घेतला. अनुभूतीच्या बळावर परमकल्याण साधणे हेच प्रत्येक मार्गाचे वैशिष्ट्य ठरले आहे. त्यातलाच एक मार्ग म्हणजे ‘सगुण भक्ती’च्या माध्यमातून समस्त उत्कर्ष घडविणारा भक्तिमार्ग होय आणि त्या भावआराधनेचे साधन केंद्र म्हणजे मंदिर होय.
‘देवालय’ शोध परिक्रमेचे संकलन मुख्यतः तीन भागात वर्णिले आहे. पहिला भाग बाह्य सृष्टीवर म्हणजेच मंदिराच्या अंगोपांगाचे वर्णन करणारा. त्याचे अंतरंग उलगडून सांगणारा आहे. एखाद्या नितांत सुंदर, भव्य, अत्याधुनिक वास्तूच्या रचनेने आपण प्रभावित झालो तरी तिला प्रार्थनास्थळ किंवा देवालय अशी उपमा देत नाही. मात्र शिखर, गोपुरे, दीपमाळा, शंखनाद असे काही दिसू, ऐकू येऊ लागले की आपण जाणतो की इथे परमेश्वराचे निवासस्थान आहे. प्रारंभिक भागात देव-देवालयांची परंपरा, त्यांच्या प्रमुख शैली, साकारलेल्या मंदिर रचनेमागचा अर्थ, प्रत्येक स्थानाचे महत्त्व, त्या वैशिष्ट्यपूर्व रचनेमागचा खोलवर विचार यात मांडला आहे.
दुसऱ्या भागात कुठल्याही भेदभावनेशिवाय हजारो मंदिरांमधून सर्वांना मुक्त प्रवेश असला, तरी एखाद्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश का नाकारला जातो अथवा एखादे मंदिर स्त्रियांना कृपा आशीर्वाद देण्यासाठी सिद्ध कसे असते, हे ज्या चैतन्य शक्तीवर अवलंबून असते, अशा मंदिर -निर्माण शास्त्राची म्हणजेच आगमे वा तंत्रे यांची माहिती देण्यात आली आहे. आज देशभरातील मंदिरे ज्या संप्रदाय व त्याच्याशी निगडित श्रद्धा -आगमांमधून निर्माण करण्यात आली आहेत, अशा प्रमुख संप्रदायांची संक्षिप्त ओळख, संबंधित प्रधान देवतेविषयीच्या भावना यात आढळतील. त्याचप्रमाणे मंदिर वास्तू अंतर्गत चैतन्यशक्तीची जागृती ज्या तंत्र, मंत्र, यंत्र, मूर्तीद्वारे विकसित आणि प्रवाहित ठेवले जाते, त्या प्रत्येक घटकांचे कार्य शब्दबद्ध केले आहे. याच भागात योगशास्त्राची विशेषतः कुंडलिनी जागृती संबंधाने माहिती दिली आहे. तंत्रशास्त्रांनी सुप्तावस्थेतील कुंडलिनी शक्तीला जागे करून पिंड-ब्रह्मांड शक्तीचे ऐक्य घडविणे हेच साध्य ठरविलेले असते. हेच लक्ष्य ठेवून मंदिरशास्त्र विकसित झाले आहे.
‘ब्रह्म’ सर्ग या तिसऱ्या भागात परमपुरुष हेच अधिष्ठान, त्याच्या अंतर्गत विभिन्न देवतांची कार्ये, पिंड-ब्रह्मांड संबंध, साधक साधनेतील शूचिता, पाळावयाची पथ्ये, प्राणप्रतिष्ठा व चैतन्यजागृती, चैतन्यशक्तीचा कुंडलिनी शक्ती जागरणावर होणारे परिणाम, भक्तिमार्गातील ईश-शरणता अशा अनिवार्य बाबींचा ऊहापोह करीत अंततः देवालयातील प्राणप्रतिष्ठित वैशिष्ट्यपूर्ण चैतन्यशक्ती अर्थात ईश सिद्ध पीठ जीवाशिवाचे ऐक्य घडविण्यासाठी सहायक ठरणारे ‘योग मंदिर’ म्हणून सदैव कार्यरत कसे राहते याचे वर्णन करीत ही परिक्रमा पूर्णत्वास जाते.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “मी… गांधारी” — लेखक : श्री सुधाकर शुक्ल ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
पुस्तक: मी… गांधारी
लेखक: श्री सुधाकर शुक्ल
प्रकाशक: काॅन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
गांधारी… महाभारतातील एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे गांधारी! धृतराष्ट्राच्या सहवासात असून सुद्धा गांधारीने स्वतःच्या जीवनात धर्माला महत्त्व दिलं होतं! ती प्रज्ञावंत, पतिव्रता व सत्यप्रिय जशी होती तशीच ती धर्मनिष्ठ ही होती. पातिव्रत्याच्या सामर्थ्यावर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांना शाप देण्याचे सामर्थ्य जिला प्राप्त झालं होतं ती पांडवांना शाप देऊन नष्ट करू शकली असती, पण तिने ते केले नाही. आधारमाला विरोध म्हणून गांधारीने धृतराष्ट्राशीही संघर्ष केला पण त्यातील अपयशी ठरली ही तिच्या जीवनाचे शोकांतिकाच आहे. धृतराष्ट्र हा जसा पुत्र मोहाने आंधळा झाला होता तशीच गांधारीही पुत्र प्रेमाने आंधळी झाली होती. पण धृतराष्ट्राजवळ विवेकाचा अभाव होता तर गांधारीचा विवेक जागृत होता. जिथे धर्म असतो तिथं विजय असतो हे मानणारी गांधारी पुत्राच्या यशाला विरोध करते हे विशेष होय. गांधारी ही नुसती एक स्त्री नव्हती तर शतपुत्रांची माता होती. पुत्रां बद्दलचे प्रेम असल्यामुळे तिने कुंती पुत्रांना विरोध केला. युध्दात कौरवांच्या विनाशा नंतर प्राप्त झालेल्या राजसत्तेचा त्याग करून गांधारीची सेवा करण्यासाठी कुंती वनवासात जाते हे तर अपूर्वच होतें. अधर्माशी प्रतिकार करताना स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाशी सतत संघर्ष करावा लागला आणि त्यातूनच गांधारीची प्रतिमा उठून दिसली!
गांधारी ही एक थोर प्रतिव्रता होती, तशीच ती तेजाचे प्रतीक होती. पातिव्रत्याच्या सामर्थ्यावर गांधारीला अलौकिक शक्ती प्राप्त झाली होती. पतीव्रतेचे व्रत म्हणजे एक कठोर तप होते. ते गांधारीने मनाने कधीच भंगू दिले नाही. अधर्माशी संघर्ष करूनही पति वरची निष्ठा तिने अभंग ठेवली, त्यामुळे तिच्या वाणीतून उमटणारा शब्द वरदान किंवा शाप होऊ शकत होता. याच सामर्थ्यावर भगवान श्रीकृष्णांना तिने कठोर शाप दिला. न्याय, नीती आणि धर्म यावर अढळ श्रद्धा ठेवणारी गांधारी तितकीच विशाल अंत:करणाची होती. पांडवांचा पक्ष तिने प्रत्यक्ष कधीच स्वीकारला नसला तरी पांडवाच्या ठिकाणी असलेल्या धर्माचा विजय व्हावा ही तिच्या मनाची साक्ष सर्वांना चकित करणारी अशीच आहे!
पांडवाच्या समवेत विदुर वानप्रस्थाश्रमासाठी जाण्यास निघणार होते तेव्हा त्यांनी गांधारीची भेट घेतली. आणि तिचा निरोप घेण्याचे ठरवले. विदुर गांधारीला म्हणाले की, ‘आज पर्यंत मी अधर्माची सोबत करत आलो. मी एक त्यांचा धाकटा भाऊ म्हणून हे करत आलो. कुरुकुलातील एक घटक या नात्याने कुरुकुलाचे हित पाहणे माझे कर्तव्य होते, म्हणून ते मी केले. कौरव पांडवांच्या मध्ये संघर्ष होऊ नये म्हणून मी प्रयत्न केले. त्यात मी अपयशी ठरलो. त्यामुळे आता मी पांडवांबरोबर वनवासाला जाणे योग्य ठरेल. ‘ गांधारीने विदुराला समजावून दिले की, कुरुकुलाने आज पर्यंत स्त्रीची प्रतिष्ठा जपली नाही उलट स्त्रीची विटंबनाच केली! गांधारी तत्त्वज्ञ होती, हुशार होती. ती जाणून होती की कौरव आणि पांडवांनी आपल्या प्रतिष्ठेसाठी द्रौपदीला पणाला लावले.. आणि त्यावेळी आपण काहीही बोलू शकलो नाही, प्रतिकार करायला आपण दुबळे ठरलो, या गोष्टीची गांधारीला खंत वाटत होती. डोळ्यावर बांधलेल्या पट्टीमुळे गांधारी स्वतःच्या पतीशी एकरूप झाली, पण त्यामुळेच ती हस्तिनापूर आणि कुरुकुल यामध्ये घडत असलेल्या संघर्षाला डोळसपणे सामोरी जाऊ शकली नाही!
गांधारीने आपले जीवन पती पुरतेच सीमित ठेवले पण त्यामुळे पुढे होणाऱ्या भीषण संघर्षाला तिला सामोरे जावे लागले. धर्माचे रक्षण करणारी प्रखरबुद्धी असूनही त्या शस्त्राचा उपयोग तिने केला नाही..
एक क्षत्रिय कन्या होती परंतु अधर्माच्या विळख्यात ती सापडली गेली, त्यातून ती बाहेर पडू शकली नाही.
गांधारी ने धृतराष्ट्राला समजावण्याचा प्रयत्न ही केला. , पण आता वेळ गेली होती.
गांधारीला पांडवांच्या बद्दल आदर होता. कारण पांडवांच्या मनात शत्रुत्वाची भावना तात्पुरती आहे आणि विश्वाचा जो आधार धर्म आहे तो युधिष्ठिर मानतो! यावर तिचा विश्वास होता. दुर्योधनाने द्यूताच्या वेळी जी वागणूक दाखवली होती त्याबद्दल गांधारीलाही खूप वाईट वाटत होते. महाभारताच्या शेवटी राजमहाल सोडून सर्वजण बाहेर पडले तेव्हा त्यांच्याबरोबर गांधारीही बाहेर पडली. कुंतीबद्दल तिने प्रेम व्यक्त केले. कुरुक्षेत्रा जवळून जाताना गांधारीने झालेल्या सर्व घटनांबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला, तेव्हा विदुराने तिची समजूत घातली, ‘गांधारी, पश्चात्ताप हा व्यर्थच असतो आणि पश्चातापानंतर येणारे ज्ञान निरुपयोगी असते.
‘शेवटी पश्चात्ताप दग्ध होऊन गांधारीने महर्षी व्यासांच्या आश्रमात धृतराष्ट्र, विदुर आणि कुंती यांच्यासह प्रवेश केला..
गांधारी ही महाभारतातील एक महत्त्वाची व्यक्तिरेखा होऊन गेली..
सुप्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी ताई गझला लिहू लागल्या. पखाल या त्यांचा बासष्ट गझलांचा संग्रह.
पखाल, एक चामड्याची पिशवी. त्या पिशवीतून जेव्हा शेतमळ्यांना, बागेला पाणी घातले गेले की रोपे, लता, वेली कशा अगदी टवटवीत दिसायला लागतात. धरित्री हिरवीगार होऊन मन कसे अगदी प्रसन्न होते. या ठिकाणी संजीवनीताईंच्या एकेक शेरांनी ही पखाल भरलेली आहे आणि त्यातून एक एक शेर जसे बाहेर पडतात तशी वाचकांची मने अल्हादित झाल्याशिवाय राहत नाहीत. गदिमांच्या भावसाहित्यावर डॉक्टरेट पदवी घेतलेल्या सौ संजीवनी ताई किती संवेदनक्षम आहेत ते वाचकांना त्यांच्या या बासष्ट गझलातून जाणवल्याशिवाय राहणार नाही.
पखाली ही या पुस्तकातील चौतीसावी गझल. गझलेच्या मतल्यात त्या म्हणतात,
या वाहता पखाली सारी हयात गेली
काही बरीच वर्षे ही खेळण्यात गेली
.. मतला वाचताक्षणीच आपल्या लक्षात येते की ही रूपकात्मक गझल आहे. या ठिकाणी पखाल
ही प्रपंचाचा भार वाहणारी आहे. हा संसाराचा पसारा मांडला खरा पण उभे आयुष्य तो पसारा समेटण्यातच गेले याचे कुठेतरी गझलकाराला मनातून शल्य आहे. या जीव घेण्यास्पर्धेत फक्त धावणेच शिल्लक आहे, सर्व उमेद त्यातच खर्च झाली. सुरुवातीला अशा प्रकारे ही गझल नकारात्मक वाटत असली तरी गझलकाराचे मन मात्र सकारात्मकच आहे. त्या म्हणतात,
ना हार मानली मी ना धीर सोडलेला
काही पळे परंतु साधावयात गेली
.. जीवनातील अनंत अडचणींशी सामना करतच पुढे जायचे, काही काळ खर्च झाला तरी हरकत नाही, हा फार मोठा संदेश त्यांनी समाजाला दिला आहे. लहानपणापासून प्रत्येकावर जे संस्कार झाले असतात, तेच अखेर जीवनाच्या वाटेवर कामी येतात हेच खरे.
डॉ. संजीवनी ताईंचा अध्यात्माचा सखोल अभ्यास आहे. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, मनाचे श्लोक वगैरे धार्मिक ग्रंथांवर त्या अगदी सहज सुलभ असे भाष्य करतात. त्यामुळे त्यांच्या एक एक गझला वाचताना ही गोष्ट सहज लक्षात येते की समाजातील, आयुष्यातील विविध विषयांवर लिहिताना या गझलांना अध्यात्मिक बैठक आहे. या *पखाली*त ही शेवटच्या शेरात त्या ईश्वराशी संवाद साधतातच.
कोsहम् ही अशीच एक आध्यात्मिक गझल. माणसाचे मन घोड्यासारखे पळते आणि भौतिकाची ओढ सुटत नाही हे शाश्वत सत्य त्या या गझलेतून मांडतात.
ब्रह्म तो मी अंश त्याचा थांब आहे माहिती
तोच मी हे जाणतो पण जीव चळतो सारखा
.. या एका शेरातून माणसाची कळतं पण वळत नाही ही अवस्था त्या किती सार्थ शब्दातून सांगून जातात. मोहना रे, मर्म, रस्ते, शोधते त्याला, सखया, प्रेम गझलेचे, अशा कितीतरी गझला अध्यात्म या सदरात मांडता येतील. समर्पण ही अशीच संपूर्ण आध्यात्मिक गझल आहे असे म्हणावे लागेल. अध्यात्माला वाहून घेण्यातच नरदेहाचे सार्थक आहे हा फार महत्त्वाचा उपदेश संजीवनी ताई वाचकांना करतात.
विषयांचे बाहुल्य आणि विविधता ही या गझल संग्रहाची खासियत आहे असे मी म्हणेन.
प्रियकर- प्रेयसी, पती- पत्नी यांचे प्रेम, समाजाचे सुंदर/ भेसुर चित्र, गतस्मृती, शब्द, विविध भावना, माणसा माणसातील नातेसंबंध, निसर्ग, आयुष्यात घडणाऱ्या नानाविध घडामोडी, जीवनाशी निगडित प्रत्येकच गोष्ट त्यांच्या या गझलातून वाचावयास मिळते आणि वाचल्यावर वाचकही परांगमुख होतो असा माझा अनुभव आहे.
कुंपण चरते आहे’ ही गझल वाचली की खरंच पटतं, आपल्याला आयुष्यात इतकी माणसं भेटतात आणि इतके अनुभव येतात, की कोण कसे आहे, कुणावर कसा विश्वास ठेवावा हा प्रश्नच पडतो. त्या म्हणतात…..
कसा धरावा बरे भरवसा आणि कुणाचा कोणी
अहो बघा तर कुंपण येथे चर चर चरते आहे
… या ठिकाणी कुंपण शेत खाते या म्हणीची आठवण येते.
का वय पहावे – कोणतीही गोष्ट करण्यासाठी वयाचे बंधन पाळणे नको हा फार मोलाचा संदेश या गझलेत मिळतो. पावसात भिजण्यासाठी, फुलण्यासाठी, सुरांच्या संगतीत झुलण्यासाठी, लुटुपुटूचे रुसण्यासाठी आणि शेवटी नश्वर देहाचा त्याग करण्यासाठी का वय पहावे? असा सवाल त्या वाचकांना विचारतात.
रस्ते ही अशीच एक वेगळी गझल! रस्त्यांच्या माध्यमातून स्थितप्रज्ञतेचे महत्व गझलकारा वाचकांना सांगतात…..
किती कष्टती किती साहती परोपकारी रस्ते
निर्वीकारी स्थितप्रज्ञ मज संत वाटती रस्ते
समाजातील घातक प्रवृत्तीनी गझलकारा संजीवनी ताई विचलित झाल्या आहेत. आपल्या मुलांचं परदेश गमन, आतंकी हल्ले, विकृत नराधम वृत्ती यांना कैसे थोपवावे हा महाविकट प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा आहे, त्याचप्रमाणे आजच्या परिस्थितीत सगळ्याच गोष्टींचे एक प्रकारचे*अनामिक भय* मनाला ग्रासले आहे. दागिने घालण्याचे, कुणाला काही सांगायचे, बाजारातून काही विकत आणायचे, अगदी साध्या सुध्या गोष्टींचे भय वाटत असते. त्या म्हणतात,
तुम्हासारखा पोटी यावा पुत्र वाटते
राजे तुमचे नाव द्यायचे वाटतसे भय
. खरोखरीच विचार करण्यास लावणारा असाच हा शेर आहे.
‘ अतर्क्य ‘ ही सुद्धा समाजाचे भेसुर चित्र दर्शविणारी गझल म्हणता येईल.
* आयुष्याच्या मैफलीत मी रमते सखया*
* संसाराला जरी ओढता दमते सखया*
* समरस होणे पर दुःखाशी स्वभाव माझा*
* देह झिजविणे दुसऱ्यासाठी गमते सखया*
संसारात पती, मुलांसोबत रममाण झालेली ही स्त्री असली तरी *अविरत चिंतन तुझेच करते मनी मानसी*
* तुलाच भजण्या केवळ वाणी श्रमते सखया*
कुठेतरी ईश्वर भजनात, नामस्मरणात रमणारी ही स्त्री आहे. म्हणजे पुन्हा अध्यात्म कुठेतरी डोकावतेच आहे.
‘हिंदोळा’ या गझलेतून मात्र एका सामान्य संसारी स्त्रीची मनोवृत्ती स्पष्ट दिसून येते.
दिले झोकुनी संसाराच्या रगाड्यातची
स्वातंत्र्याच्या कल्पनेत मम दुमत राहिले
.. स्त्री कितीही स्वतंत्र झाली, तरी कुठेतरी ती बंधनात अडकलेली आहेच हे त्रिकालाबाधित सत्य या शेरातून दिसते. याच विषयावरील आयुष्य दावणीला या गझलेला विसरून चालणार नाही.
निसर्गाचा होत असलेला ऱ्हास आणि त्याचे दुःख ‘वसुंधरा’ या गझलेत व्यक्त झाले आहे.
शेवटचा शेर– – *माय मी असे तुझी नको करू व्यथीत रे*
काळजी मात्र तुझीच बोलली वसुंधरा काळजाला भिडणारा आहे. आईला कितीही त्रास दिला तरी ती तिच्या लेकराच्या भल्याचाच अहोरात्र विचार करीत असते आणि त्यासाठी स्वतःला कष्टवित असते. वसुंधरा ही अशीच आपली माय आहे आणि माणसाने तिचा कितीही ऱ्हास केला तरी तिला माणसाचीच काळजी वाटते. क्या बात है!
कृष्ण गोकुळ सोडून द्वारकेला जाताना राधेच्या मनाची विकलावस्था ‘राधा’ या गझलेत गझलकाराने मांडली आहे. ही जरी गझल असली तरी कवितेकडे झुकणारी गझल आहे, म्हणून अधिक भावते यात शंका नाही.
‘श्रावण’ ही गझलसुद्धा एक निसर्ग कविताच वाटते. श्रावण महिन्याच्या पावसातल्या सरींनी वातावरणातला अल्हाद, बहरलेल्या वृक्ष लता, सण वारांचा उत्साह या सर्व गोष्टी या काव्यमय गझलेला चैतन्यमय करतात.
खरंतर या संग्रहातील प्रत्येकच गझल वाचून विचार करण्यास लावणारी आहे. परंतु सर्व बासष्ट गझलांवर भाष्य करणे उचित होणार नाही. वास्तविक माझ्या मते यातील एकेका गझलेचे स्वतंत्रपणे रसग्रहण झाले पाहिजे, इतक्या या गझला परिपक्व अशा आहेत.
अगदी नवख्या वाचकालाही सहज समजेल की ही गझलकारा सामान्य नसून एक अनुभव संपन्न दीर्घ आयुष्य जगलेली अशी स्त्री आहे.
गझलाच्या तांत्रिकते विषयी काय बोलावे? प्रत्येकच गझलेची जमीन, गझलियत ही
अगदी जोरकस आहे, म्हणूनच गझल वाचल्यावर वाचकाला विचार करण्यास प्रवृत्त करणारी आहे. या गझलातील आनंदकंद, भुजंगप्रयात, मंजूघोषा, देवप्रिया, राधा वगैरे गणवृत्ते आणि अनलज्वाला, हरी भगिनी, वनहरिणी यासारखी मात्रावृत्ते अगदी योग्य पद्धतीने वापरली असल्यामुळे सर्व रचना लयबद्ध झाल्या आहेत. गझलातील कमाल, जहाल, धमाल, गुलाल, मशाल, किंवा हिरे, नुरे, भरे, यासारख्या स्वरकवाफी यातून गझलकाराची भाषा समृद्धी दिसून येते.
‘अभिजात’ ही एक वेगळी गझल म्हणता येईल. भाषेतील अक्षरांचे किती उपकार जीवनात आहेत याची जाणीव करून देणारी ही गझल आहे. अलवार अक्षरांची गीते, दमदार अक्षरांचे लेख, अलवार, दमदार, सरकार, दरबार, उपकार, फिटणार – अशा या अतिशय जोरदार कवाफी म्हणता येतील.
घडवेन अक्षरांचे अभिजात छान लेणे
तरीही न मात्र देणे फिटणार अक्षरांचे
– आईचे उपकार कधीही न फिटणारे असतात, तद्वतच हे मातृभाषेचे उपकार आहेत.
मुसलसल आणि गैर मुसलसल असे दोनही प्रकारचे गझल या संग्रहात वाचावयास मिळतात.
डॉ. संजीवनी ताईंचा हा गझल संग्रह 101% वाचकांच्या पसंतीस उतरणार यात शंकाच नाही. अधिकाधिक वाचकांनी तो अवश्य वाचावा ही विनंती.
या पखालीच्या घवघवीत यशासाठी आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी डाॅ. संजीवनीताईंना माझ्या भरभरून मनःपूर्वक शुभेच्छा!
परिचय : अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “शब्दरंगी रंगतांना” – लेखक : श्री अरविंद लिमये ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक : शब्दरंगी रंगताना
लेखक : श्री. अरविंद लिमये
९८२३७३८२८८
प्रकाशक : अमित प्रकाशन, गोखलेनगर, पुणे,
फोन : ०२०-२५६६०५६६
मूल्य : रु. ३८०/-
श्री. अरविंद लिमये
☆ ‘शब्दरंगी रंगताना’……. अर्थात शब्दांचा शोभादर्शक !☆
श्री. अरविंद लिमये यांचा ‘शब्दरंगी रंगताना.. ‘ हा नुकताच प्रकाशित झालेला लेखसंग्रह!. श्री लिमये यांनी आत्तापर्यंत अनेक कथा, एकांकिका, नाटके, बालनाट्ये लिहून विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सादर करून पुरस्कारही मिळविले आहेत. त्यामुळे त्यांचा हा
लेखसंग्रह नाट्यसृष्टीशी संबंधित असेल किं इतर विविध विषयांवर? .. ही उत्सुकता होतीच. प्रत्यक्ष पुस्तकाचे वाचन केल्यानंतर असे लक्षात येते की विविध विषय न हाताळता एकाच विषयावरील विविध लेख हेच या संग्रहाचं वैशिष्ठ्य आहे! शिवाय विषयही अगदी अनोखा आहे, ‘मराठी भाषेतील शब्द!’
शब्दांच्या अंतरंगात शिरून त्या शब्दांच्या विविध अर्थरंगी छटा, तसेच एकाच शब्दाशी साम्य दाखवणारे दुसरे शब्द, कांही वेळेला साम्य दिसणारे परंतु त्यांचा अर्थ पहाता साम्य नसणारे शब्द, अशा अनेक अंगाने त्या शब्दांचा घेतलेला हा वेध! शब्दांच्या दुनियेत शिरून, स्वतः त्याचा आस्वाद घेऊन वाचकांनाही शब्दांचे अंतरंग उलगडून दाखवणारा हा लेखसंग्रह म्हणजे, एक शोभादर्शकच आहे असंच मला वाटतं! शोभादर्शक हातात आल्यानंतर आपण त्यातून आरपार पहाण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या अंतरंगात दिसणाऱ्या विविध चित्राकृती आपल्याला मोहित करतात. तो शोभादर्शक थोडा थोडा फिरवून निरनिराळ्या कोनातून दिसणाऱ्या सुबक, रंगीत चित्रकृती पहाण्यात आपण गुंग होऊन जातो. हे सगळं पहाताना, अनुभवताना वेळ कसा गेला तेच समजत नाही. भाषेचा दर्शक हातात आल्यानंतर त्यातून शब्दांचे अंतरंग उलगडून दाखवताना परावर्तित होणारे विविध रंग, त्या शब्दरंगातल्या विविध छटा उलगडून दाखवाव्यात आणि त्यात रंगून जाताना वाचकालाही खिळवून ठेवावं असे सामर्थ्य या
लेखांमधे प्रत्ययास येते. प्रत्येक शब्दरंगातलं हे वैविध्य अनुभवायचे असेल तर या लेखसंग्रहाच्या अंतरंगात वाचकांनी आवर्जून शिरायलाच हवे!
‘शब्द’ हे संवादाचे अतिशय प्रभावी माध्यम आहे. पण हे शब्द तयार कसे होतात? त्यातील एखाद्या अक्षरामुळे त्याचे अर्थ कसे बदलतात? हे समजून घेणे लेखक श्री. लिमये यांना खूप गंमतीचे आणि आनंददायी वाटते. त्यामुळेच शब्दांच्या या भांडाराकडे आणि जीवनाकडेही उघड्या डोळ्यांनी पहातातानाच हे कसे बघावे हे वाचकालाही ते शिकवतात. शब्दांची उत्पत्ती, साम्य, विरोधाभास हे सगळं समजावून सांगताना मानवी स्वभावाचे विश्लेषणही त्यांच्या लेखातून सहजपणे झाले आहे.
पहिल्या लेखातच त्यांनी ‘स्वभाव’ या शब्दाविषयी लिहिले आहे. या शब्दातला भाव मानवी स्वभावाशी कसा निगडित आहे याचा मागोवा घेता घेता मानवी मनातील सुप्त शक्तीची जाणीव करून देऊन स्वभाव बदलताही येऊ शकतो हे अतिशय मुद्देसूदपणे त्यांनी पटवून दिले आहे. हा लेख म्हणजे ‘स्वभावाला औषध आहे’ यांचे प्रत्यंतर देतो.
अशा एकूण सत्तेचाळीस लेखांचा हा संग्रह. प्रत्येक लेखात अभ्यासलेत एक दोन मुख्य शब्द न् त्याच्या अनुषंगाने येणारे इतरही अनेक शब्द. असा प्रत्येक लेख म्हणजे जणू अलगद उघडले गेलेले शब्दांचे भांडारच! उदाहरणार्थ ‘ताल ‘ हा शब्द. या एका शब्दाबरोबरच ताळ, ताळा, ताळतंत्र, ताळेबंद, रीत या शब्दातून विपरीत, रीतसर, रीतीभाती.. असे अनेक शब्द आपल्यासमोर येऊन उभे रहातात. एकमेकांच्या जवळ असणाऱ्या अशा शब्दांच्या अंतरंगात शिरून अर्थ समजून घेतला तर रीतीरिवाज बंधनकारक वाटणार नाहीत अशा निष्कर्षाशी वाचक सहमत होतोच.
दुसऱ्या एका लेखात ते काळजी, प्रेम आणि भीती या तीन शब्दांची व्याप्ती समजावून देतात. सकारात्मक आणि नकारात्मक भावना माणसाचे व्यक्तिमत्व घडवत असतात. या अनुषंगानेच आलेले अशा भावनांपैकी काळजी, प्रेम आणि भीती या भावना माणसाच्या मनाची आणि व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी करतात याचे विश्लेषण आवर्जून वाचायलाच हवे. मृत्यूविषयी त्यांनी काढलेले उद्गार अत्यंत काव्यात्म आहेत.
‘जन्माइतकाच मृत्यूही सुंदर असू शकतो. किंबहुना तो शेवट नसतोच. तर ते एक वळण असते. तो पूर्णविराम नसतो तर स्वल्पविराम असतो. आपलं अस्तित्व नाहीसं होणार नसतंच. कारण ती कात टाकून परत नवीन जोमाने जगणं सुरू करण्यासाठी आवश्यक अशी एक पायरी असते. ” असे शब्द जेव्हा त्यांच्या लेखणीतून उतरतात तेव्हा त्यांच्या चिंतनशील मनाचे दर्शन घडते.
एखाद्या मोठ्या फुलाची एक एक पाकळी निरखून पहावी त्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक शब्द व त्यातील अक्षर यांचे अत्यंत बारकाईने निरीक्षण केलेले आहे. ‘काटेकोर’ या शब्दाविषयी लिहिताना हा शब्द अनेक
व्यक्तीविशेष कसे ठळक करतो हे ते सांगतात. काटेकोरपणा, अट्टाहास, अंकुश, शिस्त या सर्व शब्दांची जवळीक स्पष्ट करताना निसर्गाकडूनही कसे शिकता येईल हेही विशद करतात. ‘नैसर्गिक शिस्तीकडे दुर्लक्ष करून ज्या क्षणापासून माणूस भौतिक सुखामागे धावू लागला तीच त्याला अधोगतीकडे नेणारी पहिली पावले होती’ हे पटवून देतानाच, निसर्गाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले नाही तर माणसाचे काही खरे नाही असा इशाराही ते देऊन ठेवतात.
अशा किती शब्दांविषयी लिहावे? ‘संकल्प’ या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे, इच्छा आणि निर्धार या शब्दांशी तो कसा जोडला गेला आहे हेही ते दाखवून देतात. संकल्प करणे पण तो तडीस न जाणे हे आता सर्वांच्याच बाबतीत नेहमीचे होऊन बसले आहे. त्यामुळे संकल्प आणि सिद्धी हे दोन शब्द वापरून गुळगुळीत झाले आहेत. परंतु संकल्प या शब्दाचा नेमका अर्थ, संदर्भ आणि व्याप्ती काय आहे हे सांगणारा हा लेख. संकल्प हा शब्द इच्छा आणि निर्धार या शब्दांशी जोडलेला आहे. इच्छा म्हणजे उत्कट इच्छा आणि संकल्प म्हणजे दृढसंकल्प! हे दोन्ही एकत्र आले तरच संकल्पसिद्धी होऊ शकते. मनातील इच्छा या सकारात्मक न् नकारात्मकही असू शकतात. नकारात्मक इच्छा मनातून काढून टाकण्यासाठीसुध्दा दृढ संकल्पाची कशी आवश्यकता आहे हे ते सहजपणे सांगून जातात.
स्वीकारणे या शब्दाचे असंख्य कंगोरे पहाताना त्यातील सकारात्मक आणि नकारात्मक छटा उलगडल्या जातात. मानवी गुणवैशिष्ठ्यांची ओळख करून देणाऱ्या आपल्या भाषेतील म्हणी, स्मृती या शब्दाचे भूतकाळाशी असलेले नाते, सोबत, समतोल, सजगता या शब्दामधला समान असा ‘स’, हक्क आणि जबाबदारी यांचे परस्पर नाते, किरण या शब्दाची विविध रंगरूपे, अर्थ या शब्दाचा उहापोह करताना त्यातील परस्परभिन्न असे दोन अर्थ उलगडून दाखवण्याचे त्यांचे कसब, परखड आणि अहंकारी यातील फरक, वाण, वसा, व्रत या शब्दांचा परस्परांशी असलेला संबंध, उंबरा या शब्दातून व्यक्त होणारा सांस्कृतिक आणि व्यावहारिक विचार, हाव आणि हव्यास, दार आणि दरवाजा अशा शब्दांमधील साम्य आणि भेद समजावून देताना त्यांनी दिलेल्या छोट्या छोट्या उदाहरणांमुळे हे लेखन मनाला भिडते. याशिवाय विविधरंग-रुपे असलेली माया, बिनचूक, दृष्टी, तर्क, भूमिका, दातृत्व अशा अनेक शब्दांची नव्याने ओळख होते. ‘ हरवू पाहणारा थारा ‘ या लेखात ‘वळचण ‘या शब्दाविषयी लिहिताना पुन्हा एकदा त्यांच्या लालित्यपूर्ण शैलीचा प्रत्यय येतो. ते लिहितात, ‘अतिशय शांत जलाशयावर अचानक एखादा खडा पडताच तरंग उमटत रहातात. वळचण या शब्दाचा मनाला स्पर्श होताच असंच होतं. कधीही सहजासहजी डोके वर न काढता मनाच्या वळचणीला अंग चोरून पडून राहिलेल्या जुन्या काळातल्या कितीतरी आठवणी त्या स्पर्शाने जाग्या होत मनात त्या जलाशयावर उमटणाऱ्या तरंगासारख्याच झुलत रहातात. ‘ हे शब्द आपल्या मनाला स्पर्श करून जातात.
शब्दांचे अंतरंग असे उलगडत जाताना मनातील विचारांचे तरंग नकळतपणे त्यांच्या लेखणीतून उतरु लागतात. म्हणूनच ‘ वसुधैव कुटुंबकम् ‘ या संकल्पनेविषयी ते सविस्तरपणे लिहितात.
मानवाच्या उत्क्रांतीनंतर प्रगतीच्या एका विशिष्ट टप्प्यावर कुटुंब ही संस्था अस्तित्वात आली. कुटुंबव्यवस्था ही काळाची गरज ठरली. एकत्र कुटुंबपद्धती ही भारतीय समाजाने जगाला दिलेली वैशिष्ठ्यपूर्ण देणगी आहे. एकत्र कुटुंबपद्धतीचे फायदे आणि तोटे हे सर्वांना ज्ञात आहेत. सामाजिक बदलाबरोबर एकत्र कुटुंबपद्धती ही सुद्धा क्षीण होऊ लागली. परंतु कुटुंब हे पहिले संस्कार केंद्र आहे हे विसरून चालणार नाही. ‘वसुधैव कुटुंबकम् ‘ ही सुद्धा भारताने जगासमोर मांडलेली एक संकल्पना आहे. केवळ स्वतःचा स्वार्थ न साधता संपूर्ण जग हेच माझे कुटुंब आहे अशी कल्पना यातून व्यक्त होते. परंतु हे साकार करण्यासाठी प्रथम कुटुंब ही संस्था भक्कम असावी लागते. कारण प्रथम कुटुंब, मग समाज, मग देश आणि सर्व देशांचे मिळून एक कुटुंब असा हा प्रवास पूर्ण होईल.
‘अर्थ’ या शब्दाचे अंतरंग उलगडताना लेखक म्हणतात,
‘ एखादं बी जमिनीत पेरावं तसा एखादा शब्दही पेरता यावा, त्याला पालवी फुटावी आणि त्याच्या छोट्या छोट्या डहाळ्यांवर असंख्य शब्दफुले उमलावीत. ” खरं सांगायचं तर लेखकाची ही कल्पना, ही इच्छा, हे स्वप्न नकळत त्याच्याचकडून पूर्ण झालेले आहे. कारण गेली अनेक वर्षे मनाच्या केलेल्या मशागतीमुळे शब्दांची पेरणी कशी होते, ते कसे रुजतात आणि शब्दफुलांचे पीक कसे जोमाने वाढते याचे त्यांचा ‘शब्दरंगी रंगताना’ हा लेखसंग्रह हेच मूर्तरूप आहे असे मला वाटते. असेच शब्दांचे मळे फुलवणारे लेखन त्यांच्या हातून सातत्याने घडावे व रसिकांना वाचायला मिळावे हीच सदिच्छा!
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड” – लेखक: श्री अरविंद परांजपे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड
लेखक: अरविंद परांजपे
पृष्ठे: २४८
मूल्य : २९९₹
उच्चशिक्षित व्यक्तींचेही शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीविषयी अज्ञान असते. त्यामुळे योग्य माहिती देऊन गुंतवणूकदारांच्या चिंता दूर करण्याचे उद्दिष्ट असलेले हे पुस्तक जणू ज्ञानाचा खजिना आहे. अज्ञान तसेच विश्वासू व्यक्तींच्या अभावामुळे बरेच लोक गुंतवणुकीच्या मार्गापासून दूर राहतात. हे पुस्तक केवळ या आव्हानांचा सामना करत नाही तर योग्य माहितीद्वारे वाचकांना गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास देऊ शकते.
गेल्या १०-१५ वर्षांत म्युच्युअल फंड हे शेअर बाजारातील गुंतवणुकीचे पारदर्शक आणि विश्वासार्ह साधन म्हणून उदयास आले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दीर्घकालीन वाढीचे प्रतिबिंब असलेल्या आणि तज्ज्ञांनी निवडलेल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याची संधी ते उपलब्ध करून देतात दुदैवाने, अज्ञानामुळे बरेच लोक अजूनही मुदत ठेवी, रिअल इस्टेट किंवा सोने यांसारख्या पारंपरिक गुंतवणुकीच्या पर्यायांना प्राधान्य देतात. हे पर्यायही बरोबर असले तरी ते काही दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करू शकत नाहीत. अरविंद परांजपे यांच्या या पुस्तकात योग्य रीतीने ॲसेट ॲलोकेशन करून वैविध्यपूर्ण गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये म्युच्युअल फंडांचा समावेश कसा करता येईल, याचे गोष्टीरूपात सुंदर विवेचन करण्यात आले आहे.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच अर्थनियोजनाचे महत्त्व ठसवले आहे. त्यानंतर म्युच्युअल फंड संकल्पनेची माहिती देऊन गुंतवणुकीत त्यांचा समावेश करण्याचा पाया घातला आहे. सेबीची भूमिका, योजनांचे प्रकार, एनएव्ही, पोर्टफोलिओ, मानसिकता यांसारख्या विविध पैलूंवर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. गुंतवणूकदार आणि त्यांचे प्रश्न हाताळण्याच्या त्यांच्या चार दशकांच्या अनुभवाने पुस्तकाची मांडणी सहजसोपी झाली आहे. यामुळे वाचकांच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीविषयीच्या शंका दूर होतात आणि विश्वास निर्माण होण्यास मदत होते.
आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातच गुंतवणूक सुरू केल्याने होणारे फायदे, दीर्घकालीन दृष्टिकोन, महागाईचा गुंतवणुकीच्या परताव्यावर होणारा परिणाम या महत्त्वाच्या संकल्पनाही या पुस्तकात स्पष्ट केल्या आहेत. एसआयपी आणि एसडब्ल्यूपीसारखी साधने कमाईच्या वर्षांमध्ये संपत्ती जमा करण्यासाठी आणि निवृत्तीदरम्यान मासिक उत्पन्न मिळविण्यासाठी कसे उपयोगी होतात तेही यात दिले आहे. या संकल्पना रोजच्या जीवनातील उदाहरणे घेऊन आकर्षक पद्धतीने समजावून सांगितल्या आहेत.
हे पुस्तक गुंतवणुकीच्या निर्णयांमध्ये स्पष्टता आणते आणि अनावश्यक ताण टाळण्यास मदत करते. आर्थिक नियोजन या विषयाचा आपल्या शिक्षणात समावेश नसल्याने आणि अर्थसाक्षरताही कमी असल्याने किशोरवयीन मुलांसाठी, नवदांपत्यांसाठी आणि वाढदिवस, कार्यालयीन बढती, निवृत्ती समारंभ अशा विशेष प्रसंगी हे पुस्तक एक उत्कृष्ट भेट ठरते. यामुळे वाचकांना खर्च, बचत आणि गुंतवणुकीचे योग्य प्रमाण समजण्यास मदत होईल. अर्थनियोजन करून आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यापासून ते आपली गुंतवणूक सुरू करू शकतील.
आर्थिक स्वातंत्र्य असले तर मनाजोगत्या गोष्टी करता येतात आणि सातत्य ठेवून गुंतवणूक केली तर ते मिळवणे प्रत्येकाला शय आहे. त्यासाठी लागणारे अर्थनियोजन कसे करावे आणि म्युच्युअल फंडाचे सोपे; तरीही परिणामकारक साधन वापरून आपली आर्थिक स्वप्नं कशी साकार करावीत, हे या पुस्तकातून समजते. बहुविध गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या तज्ज्ञ लेखकाने सोप्या भाषेतून लिहिलेले हे पुस्तक गुंतवणुकीचा वाटाड्या बनून तुमची वाट सुकर करेल.
आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याकरता म्युच्युअल फंडाचे तंत्र कसे समजून घ्यावे आणि प्रगतिपथावरील भारतीय अर्थव्यवस्थेच्या साहाय्याने सर्व वयाच्या गुंतवणूकदारांनी धनवृद्धी कशी करावी, हे संवादातून समजावणारे पुस्तक!
अरविंद परांजपे यांच्या गुंतवणूक सल्लासेवा क्षेत्रातल्या दीर्घ अनुभवांचे प्रतिबिंब त्यांच्या या पुस्तकात उमटले आहे. अशा या मार्गदर्शक पुस्तकाचा वाचकांनी जरूर लाभ घ्यावा.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “इमोशनल इन्टेलिजन्स” – लेखक : डॅनियल गोलमन – अनुवाद : डॉ. कमलेश सोमण ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : इमोशनलइन्टेलिजन्स
लेखक : डॅनियल गोलमन
अनुवाद : डॉ. कमलेश सोमण
पृष्ठ: २५५
मूल्य: रु. २९९ /-
व्यक्तिमत्त्वाची परिपूर्ण जाणीव करुन देणारे पुस्तक – – –
सातत्याने धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये आपल्यापैकी प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या आव्हानांना सामोरा जात असतो. शारीरिक, मानसिक, बौद्धिक स्तरावर संघर्ष करत असतो. त्या-त्या वेळची परिस्थती पाहून आपण निर्णय घेतो. मग ते शिक्षण, करिअर, जीवनातील अनेक प्रश्न असतील, त्यांना सामोरे जाताना अनेकदा आपण संवेदनाहिन होउन जातो. मात्र, या संवेदना म्हणजे भावना आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असतात या स्व भावनांची ओळख झाल्यास जीवन सुसह्य आणि आनंदी कसे होउ सकते, हे इमोशनल इन्टेलिजन्स या पुस्तकातून प्रभावीने मांडले आहे.
स्व भावनांची यथायोग्य जाणीव होणं, स्वतःची व इतरांचीही आंतरिक मनस्थिती ओळखता येऊन भावभावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता, म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय, अशी व्याख्या लेखकाने आपल्या अभ्यासाच्या अनुभवावर केली आहे. स्वतःच्या भावनांवर आणि त्यांच्या अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवता येणं, आपल्या जवळील व्यक्तींसोबत सुसंवाद साधता येणं, स्वयं प्रेरणेतून व जीवनात ठरविलेल्या उद्दिष्टांनुसार कार्य करणं, वागण्यात व स्वभावात लवचीकपणा असणं व सर्व गुणात्मक मिश्रणाला भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात. विचार न कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता भावनिक बुद्धिमत्ता होय.
सर्वप्रथम चाल्स रॉबर्ट डार्विन याने भावनिक बुद्धिमत्तेबद्दल आपले विचार मांडले. निरोगी, समतोल व्यक्तीमत्वाशिवाय संतुलन येत नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भावनिकता बदलत बदलत जाते. मुले, प्रौढ, महिला, वृद्ध या सर्वांमध्ये भावनांचे दोन घटक महत्त्वाचे असतात, ते म्हणजे भावनिक स्थैर्य, भावनिक परिपक्वता. भावना ही मानवी मनाची व्यमिश्र अवस्था आहे. तिचे शारीरिक व मानसिक असे दोन पैलू आहेत. तर्कनिष्ठ निर्णयांसाठी भावना आवश्यक असतात. त्याचबरोबर संगतीची ताकद प्रचंड असते. तिला कधीच कमी लेखू नका. आपण ज्यांच्या संगती मध्ये दिवस घालवतो, त्यांच्या वागण्याच्या प्रतिमा भावनिक संसर्गामुळे आपल्या मज्जापेशी वर उतरतात. त्यातून आपल्या व्यक्तीमत्त्वाला आकार मिळत असतो, अशा भावनिक बुद्धीमत्तेविषयी अनेक वस्तुनिष्ठ तथ्ये या पुस्तकात मांडली आहेत. त्यातून अनेकांना आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात.
निकोप नातेसंबंध ही जीवनातील एक सुंदर आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. ते जोपासण्यासाठीही तरल भावनांची आवश्यकता असते. भावनाविवश असणेही चुकीचे आहे. ते कमकुवतपणाचे, अविवेकाचे, संयमाच्या अभावाचे, निराशेकडे जाण्याचे लक्षण आहे. याकडे लेखकाने लक्ष वेधले आहे. या पुस्तकातील काही भाग मुलांसाठी तर काही भाग मोठ्यांसाठी आहे. कुटुंबव्यवस्था आणि वाढते घटस्फोट या विषयांवर लेखकाने आपले निष्कर्ष साध्या, सोप्या शब्दांत मांडले आहेत.
केवळ बुद्धीवादी माणसाशी संवाद साधणं अशक्य असतं. एखाद्या बुद्धीवादी व्यक्तीशी बोलताना अनेक अडथळे येतात. त्यामुळे प्रत्येकवेळी बुद्धीला हृदयाच्या सेवेत गुंतवले पाहिजे, हा मानसशास्त्र म्हणून लेखकाने मांडलेला विचार खरोखरच मौल्यवान आहे. मेंदूची मनाची जोपासना आपल्याला करता आली पाहिजे. जीवनाच्या अंत्यंबाह्य सर्व अंग उपंगांची एकात्मता साधता आली पाहिजे. त्यातूनच व्यक्तीमत्त्वाच्या सौंदर्याच्या शोध लागतो. भावनिक कौशल्ये नेमकी काय आहेत, बोधात्मक आणि वर्तनात्मक कौशल्ये काय आहेत? याविषयीचे सखोल विवेचन या पुस्तकात केले आहे. केवळ पुस्तक वाचून आपल्यामध्ये बदल घडेलच असे नाही. पण, त्याविषयाचे ज्ञान असल्याने कुठेतरी आपल्या अजाणत्या मनात असल्यास त्याचा आपल्याला उपयोग नक्कीच होतो. त्यादृष्टीने हे पुस्तक अभ्यासले पाहिजे. पुस्तकामध्ये काही ठिकाणी केवळ उपदेशात्मक विचार मांडले आहेत. एखाद्या ते कंटाळवाणे वाटू शकते. त्याच्या जोडीला काही उदाहरणे किंवा ते गोष्टीरुपात मांडले गेले असते तर, अधिक प्रभावी झाले असते असे वाटून जाते. मात्र, तरीही स्व-मदत गटातील हे इमोशनल इन्टेलिजन्स या विषयाला वाहिलेले एकमेव पुस्तक अनेक गोष्टी तुम्हाला शिकवते.
शेवटी, महत्त्वाचे काय? तर, भावनाशून्य असणे हे जितके नुकसानकारक आहे, त्याप्रमाणे भावनातिरेक आणि भावनांचा कल्लोळ तुम्हाला चुकीच्या विचार किंवा कृतीच्या दरीतही ढकलू शकतो. त्याचा परिणाम बरा-वाईट परिणाम संपूर्ण आयुष्यावर होतो. त्यामुळे इमोशनल इन्टेलिजन्स जाणून घेणे आणि त्याचे नीति-नियम समजून घेणे महत्त्वाचे ठरते. लेखक असे मानतो, की प्रत्येक मनुष्य हा परिपूर्ण आणि प्रगल्भच असतो. केवळ त्याला त्याची जाणीव होणे आवश्यक असते. त्यादृष्टीने दिशा दाखवणारे हे पुस्तक व्यक्तीमत्त्वाची उंची आणि खोली वाढविण्यासाठी निश्चितच सर्व वयोगटातील प्रत्येकाला मार्गदर्शक ठरणारे आहे, यात शंका नाही !
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
नामवंत कवी आणि गीतकार यांची माहिती देणारे अतिशय सुंदर पुस्तक!
अनुक्रमणिका वाचतानाच भा. रा. तांबे, बालकवी ठोंबरे, कवी अनिल, बा.भ. बोरकर, कुसुमाग्रज, वा.रा.कांत, इंदिरा संत, विंदा ,अशी नामावली वाचत गेले आणि खूप छान काही वाचायला मिळणार अशी खात्रीच झाली!
प्रत्येक कवी कवयित्रींच्या काव्याबरोबरच त्यांची इतरही माहिती या पुस्तकात वाचायला मिळते काव्य कसे सुचलं, केव्हा सुचलं ह्या गोष्टी सुद्धा त्यामध्ये दिल्या आहेत.
अनुक्रमणिकेच्या पुढील भागात शांता शेळके, पाडगावकर, सुरेश भट, आरती प्रभू, कवी ग्रेस, जगदीश खेबुडकर ,शांताराम नांदगावकर ,कवी ग्रेस,सुधीर मोघे, ना.धो. महानोर अशा कवीं बद्दल आणि त्यांच्या गीतांबद्दल वाचायला मिळणे म्हणजे एक मेजवानीच आहे .या पुस्तकात अशी २० व्यक्तिचित्रणे वर्णन केली आहेत. आपल्या काव्य- कवितांच्या साम्राज्यातील हे सर्व माणिक मोतीच आहेत!
‘जन पळभर म्हणतील हाय हाय..’ हे अतिशय भावपूर्ण गीत तर गदिमांचे ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे गीत कसे जन्माला आले याचे लेखिकेने वर्णन केले आहे. शांता शेळके यांचे ‘ऋतू हिरवा, कवी ग्रेस यांचे ‘भय इथले संपत नाही,’ जगदीश खेबुडकर यांचे ‘देहाची तिजोरी’ सर्वच गाणी मनाला भुलवणारी आणि गेय आवडणारी अर्थपूर्ण अशी गाणी!
गाण्यांचे अर्थ खूपच छान उलगडून दाखवले आहेत. ज्यांना काव्याची आवड आहे त्यांना अगदी भुरळ घालणारे असे हे पुस्तक आहे. जयश्रीताई दानवे यांनी लिहिलेली ही कवींच्या काव्याबद्दलची परीक्षणे अतिशय सुंदर आहेत!
पुस्तकातील भाषा अर्थ प्रवाही भावप्रवाही अशी आहे त्यात वापरलेले शब्द तरल भाव दाखवणारे असे आहेत. कवीच्या, लेखकाच्या मनातील अभिप्रेत अर्थ त्याच्या कवितेत उतरतो तेव्हा तो लेखक किंवा कवी शब्द- यात्रीच असतो!
असे हे पुस्तक वाचणे सर्वांनी जरूर वाचावे असे मला वाटते.
परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
वारजे, पुणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ असा हा राजहंस – लेखक : श्री व्यंकटेश श्रीपाद राजहंस ☆ परिचय : सुश्री त्रिशला शहा ☆
पुस्तक : “ असा हा राजहंस “
लेखक : व्यंकटेश श्रीपाद राजहंस
प्रकाशक : अनुबंध प्रकाशन, पुणे.
किंमत : रु. ३२५ / –
‘ रतीचे जया रुप लावण्य लाभे
कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे
सुधेसारखा साद, स्वर्गीय गाणे
असा बालगंधर्व आता न होणे ‘
— शब्दप्रभू गदिमा यांचे हे शब्द सार्थ ठरवणारा, संगीत नाटकाला आभाळाची उंची देणारा, आपल्या स्वर्गीय गाण्याने रसिकांना रिझवणारा एक अव्दितीय कलाकार म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस.
अशा या स्वर्गीय आवाजाची आणि अभिनयाची दैवी देणगी लाभलेल्या बालगंधर्व यांचे जीवनचरित्र मांडणारे असा हा राजहंस हे पुस्तक. आणि ते लिहीलयं कुणी तर बालगंधर्व यांचे धाकटे बंधू व्यंकटेश श्रीपाद राजहंस यांनी. बालगंधर्वांच्या नाटकांच्या दौऱ्यामधे त्यांच्या पाठीशी सावलीप्रमाणे रहाणारे हे व्यंकटेश उर्फ बापू.
खरतरं आपल्या वडिलांच्यापासून ते नारायण राजहंस उर्फ नाना यांचा आणि इतर भावंडाबद्दल बापूंनी लिहीलेल्या या आठवणींचे बाड, बापूंची मुलगी निलांबरी बोरकर यांच्याकडे बापूंनी सुपूर्द केले आणि निलांबरी बोरकर यांनी ते सुमती दसनुरकर यांच्याकडे सुमतीताईंच्या मागणीवरुन दिले कारण बालगंधर्वांवर पुस्तक लिहीण्याचा त्यांचा मानस होता. अशा रितीने झालेल्या या लिखाणाच्या प्रवासातून आपल्यापुढे साक्षात राजहंस घराण्याचा इतिहास उलगडत जातो.
श्रीपाद राजहंसांना शंकर, नारायण आणि व्यंकटेश ही तीन मुले आणि वेणूताई ही मुलगी. अन्नपुर्णाबाईंच्या आणि त्यांच्या सासर माहेरच्या सुसंस्कारित वातावरणात वाढलेली ही मुले. श्रीपाद राजहंस यांची नोकरी मालेगांवी असल्याने आणि त्यांचे नातेवाईक म्हाळस दांपत्याला पुत्रसुख नसल्यामुळे लहानपणापासूनच शंकर व नारायण या दोन मुलांचे संगोपन आणि शिक्षण जळगाव येथे झाले. नारायण याची गाण्याची आवड लक्षात घेऊन श्री. म्हाळस यांनी त्याला पेटी व तानपुरा आणून देऊन एका गायन शिक्षकाची नेमणूक केली. गायनाचे उपजत जाण असलेल्या आणि गुरुवर्यांकडून मिळालेल्या तालमीतून नारायणाचे गाणे बहरतच होते. अनेक मान्यवर मंडळींसमोर गायन करण्याची संधी नारायणला मिळाली. अनेक दिग्गजांकडून शाबासकी मिळवणाऱ्या नारायणचे गाणे खुद्द लोकमान्य टिळकांनी ऐकले, 13 वर्षाच्या नारायणने टिळकांसमोरच्या बैठकीत खट, आसावरी रागातून अनेक चीजा सादर करुन श्रोत्यांना अगदी मंत्रमुग्ध केले, हे पाहून ऐकूनच लो. टिळकांनी ‘ अरे हा तर बालगंधर्व अशी उपाधी नारायणला दिली तो दिवस होता ९ एप्रिल १९०२. याच दिवसापासून नारायण राजहंस हा बालगंधर्व म्हणून ओळखला जाऊ लागला.
यानंतरचा बालगंधर्वांचा सांगितिक प्रवास म्हणजे एक सुवर्णकाळच ठरला. किर्लोस्कर नाटक कंपनीमधे प्रवेश करुन त्यांनी संगीत नाटक मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्याकाळात नाटकातील स्त्री भूमिका पुरुषच करीत असत, या संधीचे बालगंधर्वांनी अक्षरशः सोने केले. सौभद्र, शारदा, शाकुंतल, मानापमान, स्वयंवर, संशयकल्लोळ, एकच प्याला, मत्स्यगंधा अशा अनेक नाटकातील सुभद्रा, भामीनी, शारदा, सिंधू, रेवती, द्रौपदी, रुक्मिणी अशा अनेक स्त्रीभुमिका आपल्या अभिनयाने आणि गायनाने अजरामर केल्या. संगीत रंगभूमीला बालगंधर्वांमुळे सोन्याचे दिवस आले.
बालगंधर्वांच्या या नाट्यप्रवासात व्यंकटेश उर्फ बापू या धाकट्या भावाने त्यांना खूप मोलाची साथ दिली, खरतर ते स्वतः ही गायन आणि अभिनय उत्तम करायचे पण आपल्या मोठ्या बंधूप्रेमाखातर त्यांनी फार थोड्या नाटकातून भुमिका केल्या. लहान असून मोठ्या भावाचे तेच लाड पुरवायचे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही बरे वाईट प्रसंग येतातच, तसे बालगंधर्वांच्या वाट्यालाही आलेच. गोहरबाईच्या रंगभूमी पदार्पणामुळे काही वेळा व्यथित होण्याचे प्रसंग दोघांच्याही वाट्याला आले, वाढत्या वयामुळे उद्भवणाऱ्या तब्येतीच्या तक्रारीमुळे नाटक सोडून काही दिवस बालगंधर्व बापूंसमवेत त्यांच्या मुळ गावी नागठाण्यातही राहिले. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर असे अनेक नाटकांचे दौरे केले असले तरी बालगंधर्वांनी आपल्या नाटकाचा, अभिनयाचा पहिला नाट्यप्रयोग सौभद्र या नाटकाद्वारे मिरज मधे केला. हे खूप उल्लेखनीय आहे.
वयाच्या ८८ व्यावर्षी संपूर्ण राजहंस कुटूंबातील व्यक्ती, नाट्यक्षेत्र, गायनक्षेत्र, अनेक गावातील रहाण्याचे अनेक प्रसंग, बरे वाईट अनुभव, सांपत्तिक स्थिती, वडिलोपार्जित गावे, नातेसंबंध या साऱ्यांबद्दलच्या आठवणी लिहून काढणं म्हणजे मेंदूला ताण दिल्यासारखेच पण सुमती दसनुरकरकरांच्या प्रेमळ आग्रहाने बापूंनी हे आत्मचरित्रपर लेखन केलं. आणि बापूंच्या कन्या निलांबरीताईंनी ते लेखिका सुमतीबाई आणि संपादिका डॉ. माधवी वैद्य यांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचविले.
बालगंधर्वांवर अनेक पुस्तकांतून बरेच वाचले, ऐकले असले तरी त्यांचा खरा इतिहास या आत्मचरित्रातून वाचकांपर्यंत पोहोचला यात शंकाच नाही, अतिशय सुरेख आणि वाचनीय असे हे पुस्तक आहे, वाचकांनी नक्कीच वाचावे.
परिचय : सुश्री त्रिशला शहा
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पुस्तक : हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते स्वामी विवेकानंद
लेखिका : सौ. अंजली दिलीप गोखले.
मो. नंबर : ८४८२९३९०११ (+91 84829 39011)
प्रकाशक : विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग, पुणे
पृष्ठ्संख्या : ३५६.
मूल्य. रु. ४००/-
कर्नल शरदचंद्र पाटील
या पुस्तकाचे मुखपृष्ठ इतके आकर्षक आहे की, पाहताक्षणीच पुस्तक हातात घेऊन पाहण्याची इच्छा होते. हिंदुत्वाचा भगवा ध्वज, त्यावर सर्व विश्वाचा – विशेषत: अमेरिका, यूरोप आणि आफ्रिकेचा नकाशा, ध्वजाच्या कडांचे ज्वाळांमध्ये रूपांतर, समोर (त्यांच्या पारंपरिक भगव्या वेषामधील) स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या पाठीमागे त्यांचा जयजयकार करणारा हजारो लोकांचा समूह आणि हे सर्व काळ्या अंधारातून वर आलेले! वा! मुखपृष्ठावरूनच पुस्तकाचे प्रयोजन लक्षात येते. मलपृष्ठावर मोजक्या दहा ओळीत स्वामीजींचे जीवनकार्य मांडलेले. त्या ओळी अशा आहेत :
… स्वामीजींच्या आईने भगवान शंकराकडे ज्या, जशा सुपुत्राची मागणी प्रार्थनेने केली होती, तसेच होते स्वामीजी…
… त्यांच्यातले सद्गुण ओळखून वडिलांनी जसे मार्गदर्शन केले, तसेच घडले स्वामीजी…
… सद्गुरू रामकृष्ण परमहंसांनी आपल्या पट्ट्शिष्याला ओळखून, त्याला प्रेमाने आपलेसे करून, आपल्या ज्ञानाची ओंजळ पुरती रिकामी करून त्याला जशी झळाळी दिली, तसे तेज:पुंज बनले स्वामीजी…
… आपल्या गुरुदेवांच्या इच्छेप्रमाणे आयुष्यात फक्त त्यांची इच्छापूर्ती करण्यासाठी झटले स्वामीजी…
आपल्या मातृभूमीबरोबर सगळ्या जगाच्याच हितासाठी झटले स्वामीजी…
… ‘हे विश्वची माझे घर’ म्हणत ज्ञानदेवांचे पसायदान आचरणात आणून आपल्या आयुष्याची अक्षरश: आहुती दिली ती स्वामीजींनी…
स्वामीजींचा संपूर्ण जीवनपट अगदी तपशीलवारपणे २८ प्रकरणांमध्ये लेखिकेने मांडला आहे. १२ जानेवारी १८६३ रोजी, म्हणजे मकरसंक्रांतीच्या पहाटे विश्वनाथ दत्त आणि भुवनेश्वरी देवी या दांपत्याच्या जीवनात स्वामीजींचा जन्म झाला. जणु हिंदू धर्मावर आलेले मळभ दूर करण्यासाठी, धर्माच्या संकल्पनेत आणि आचरणात आमूलाग्र बदल घडविण्यासाठीच नरेंद्र या बाळाचा जन्म झाला होता.
नरेंद्र उर्फ बिले याला लहानपणापासूनच ध्यान धारणेची आवड होती. तो एकपाठी होता, मैदानी खेळात प्रवीण होता, संगीतामध्ये आणि गाण्यामध्ये त्याला रुचि होती आणि वाचनाची तसेच निरीक्षणाची त्याला आवड होती. कॉलेजमध्ये एकदा प्राचार्य वर्ड्स्वर्थची कविता शिकवत होते. ते म्हणाले – “मनाची विशुद्धता आणि एखाद्या लक्ष्यावरील पूर्णत्व यामुळे दिव्य अनुभूती येऊ शकते. अशी दिव्य अनुभूती घेतलेला एकच महापुरुष मी पाहिलेला आहे आणि तो महापुरुष म्हणजे दक्षिणेश्वराचे पुजारी रामकृष्ण परमहंस. तेच नाव नरेंद्रच्या मोठ्या चुलतभावाने मोथ्या आदराने घेतले. त्यामुळे त्याच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आणि तो रामकृष्ण परमहंसांचे दर्शन घ्यायला दक्षिणेश्वरला गेला. तिथून पुढे नरेंद्र आणि रामकृष्ण परमहंस यांचा संपर्क वाढतच गेला. त्याची परिणति स्वामीजी हे रामकृष्णांचे पट्ट्शिष्य बनण्यात झाली.
स्वामीजी पाच वर्षे श्री रामकृष्ण परमहंस यांच्या सानिध्यात राहिले. गुरुंनी त्यांना वेदान्तासह सर्व ज्ञान प्रदान केले. गुरूंच्या महानिर्वाणानंतर सर्व शिष्यांनी एक मठ स्थापन केला. त्यानंतर स्वामीजींनी अनेक टप्प्यांमध्ये भारतयात्रा केली. स्वामीजी जिथे जात तिथे लोकांना आपलेसे करत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची, बोलण्याची सर्वांवर छाप पडे. या भारत यात्रेची सांगता कन्याकुमारीला झाली, जिथे समुद्रातील एका खडकावर स्वामीजी पोहत पोहत गेले आणि तेथे त्यांनी सलग तीन दिवस ध्यान केले.
त्यांच्या अनुयायांनी पैसे गोळा केले, खेतरीच्या राजाने वित्तसहाय्य केले आणि स्वामीजी शिकागोच्या सर्व धर्म परिषदेला जाऊ शकले. त्यांच्या भाषणाची सुरवात त्यांनी ‘लेडिज अॅण्ड जंटलमेन’ या शब्दांनी न करता ‘माय ब्रदर्स अॅण्ड सिस्टर्स ऑफ अमेरिका’ या शब्दांनी केले आणि त्या शब्दांनी इतिहास घडवला. फक्त एका धर्मपरिषदेला गेलेले स्वामीजी तब्बल दोन वर्षे अमेरिका आणि इंग्लंड इथे राहिले. त्यांनी हिंदू धर्माविषयी सर्व लोकांच्या सर्व शंका दूर केल्या, अनेक शिष्य मिळवले आणि भारत भूमी चा उद्धार करण्याच्या दिशेने ठोस पावले टाकली.
भारतात परतल्यावर त्यांनी बेलूरच्या मठाची स्थापना केली हिंदू धर्मियांचे कर्म कांड कमी कसे करता येईल ते पाहिले, शेकडो व्याख्याने दिली (त्यातल्या अनेकांचे नंतर शिष्यांनी पुस्तकांमध्ये रूपांतर केले) आणि देशात जागृती निर्माण केली. त्यांची प्रकृती साथ देत नव्हती तरी त्यांनी देशभर धर्मजागृतीचे कार्य सुरूच ठेवले. शेवटी ४ जुलै १९०२ रोजी स्वामीजींनी महासमाधी घेतली.
मी इथे अगदी संक्षिप्तपणे लिहिले आहे. पण लेखिकेने स्वामीजींच्या कार्याचे अगदी तपशीलवार वर्णन केले आहे. लेखिकेने स्वत: स्वामीजींच्या कार्याचे जे विश्लेषण केले आहे, ते सुद्धा अतिशय सखोलपणे केलेले आहे. उदा. स्वामीजींचे शिक्षणाविषयीचे विचार मांडताना लेखिका म्हणते – स्वामीजींच्या मते परकीय नियंत्रण नसलेल्या पद्धतीने आपल्याच ज्ञानाच्या विभिन्न शाखांच्या अध्ययनाची आज आपल्याला जरूर आहे. आजच्या तरुणांनी असे शिक्षण घेतले पाहिजे, की ज्यायोगे उद्योगधंद्याची वाढ होईल आते फक्त नोकरीच्या मागे न लागता आपली उपजीविका करू शकतील आणि आपल्या आपत्तींना तोंड देण्यास समर्थ होतील. (योगायोगाने अगदी हेच विचार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले आहेत.)
पुढे एके ठिकाणी लेखिका म्हणते – आत्तापर्यंत स्वामीजींबद्दल हिंदू धर्म, योग, तत्त्वज्ञान, वेद, वेदान्त, अध्यात्म, परमार्थ, भारतभ्रमण, गरिबांबद्दल असलेली कणव, शिष्यांवरचे प्रेम, आपुलकी, गुरुदेव व कालीमाता यांच्या बद्दलचा आदर, ओढ, भक्ती, अमेरिका – इंग्लंडमध्ये केलेला वेदांचा प्रसार, प्रचार, मठ स्थापना, प्रवचने असेच सगळे समजून घेत आलोय. पण स्वामीजी गीतकार, संगीतकार, गायन – वादन यामध्येही तेवढेच तरबेज होते, होते हे वाचून फक्त आणि फक्त थक्क व्हायला होते. एकाच व्यक्तीत एवढे गुण? केवळ अशक्य वाटते. पण त्यांच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नव्हतीच. सर्वगुणसंपन्न या शब्दाचा खरा अर्थबोध विवेकानंदांना समजून घेताना होतो.
आणखी एके ठिकाणी लेखिका म्हणते – स्वामी विवेकानंद जन्माला आले भारतामध्ये – पूर्वेकडे. त्यांचे कार्यक्षेत्र ठरले पश्चिमेकडे. पूर्व आणि पश्चिम, भारत आणि जग, हिंदू संस्कृती, ख्रिस्ती धर्म, इस्लाम या सगळ्यांचा वेध त्यांनी घेतला. इतिहास, विज्ञान, तत्त्वज्ञान या सगळ्यांचेच त्यांना समान सर्वार्थ आकलन होते.
स्वामीजींनी भ्याडपणाला कधीही थारा दिला नाही. ते नेहमी म्हणायचे की गृहस्थाश्रमी माणसाने नेहमी अन्यायाचा सबल प्रतिकार केला पाहिजे. त्यासाठी शक्तिवान असले पाहिजे. स्वामीजींनी कधीही मांसाहार त्याज्य मानला नाही.
पुस्तक परिचयामध्ये प्रत्येक गोष्ट लिहिता येत नाही (नाहीतर तेच एक पुस्तक बनेल). पण शेवटी इतकेच सांगू इच्छितो की, हे पुस्तक अतिशय चांगले आहे. पूर्णपणे व्याकरण दोषविरहित आहे. सोप्या, समजणार्या भाषेत आहे. माझ्यामते हे पुस्तक प्रत्येक मराठी घरात असलेच पाहिजे. (मला नक्की ठाऊक नाही; पण लेखिकेशी संपर्क केल्यास कदाचित सवलतीच्या दरात पुस्तक मिळू शकेल.)
परिचय : कर्नल शरदचंद्र पाटील (शरद)
प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈