☆ # माझं गं ते लेकरू… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर☆
आता माझ्यापासून जरा देखील तुला दूर ठेवणार नाही समजलं…
त्या शहराच्या कचऱ्याच्या कोंडाळ्यात तुला पडलेला.. पाहीला…
छे.. छे.. तुला तिथे कुणी टाकून दिला होता…
कदाचित तुझा कंटाळा आला असावा वा तुझ्यापेक्षा अधिक चांगला टेडी त्यांनी घरी आणला असणार. मग तुला अडगळीत ठेवण्यापेक्षा… तुला तिथून काढून तुझ्या रिकाम्या जागेवरच त्या नव्याला बसवले असणार… अशीच असते दुष्ट निर्दयी दुनियेची रीत बरं का माझ्या लेकरा…
मी तुला त्या कचऱ्याच्या कोंडाळ्यात उदासपणे पडलेला पाहून माझं मातेचं मन द्रवलं बघं… मला राहवलं नाही आणि तो कचरा तिथून हलवण्याच्या आधीच मी तुला तिथून उचललं… माझ्यातल्या मातृत्वाचा पान्हा वाहू लागला… तुला बघितलं हातात घेतलं आणि खरं सांगायचं तर तिथंच तुला छातीशी कवटाळून घेतलं… होय तू माझा आहेस आणि मी तुझी माय आहे… तिथं दुसरं कुणी येऊन माझ्यापासून तुला हिसकावून घेऊन नये याची मी खबरदारी घेत राहिले…
किती सुंदर आणि गुबगुबीत लेकरू माझं… हो आता ते माझ्या कुशीत आहे म्हणजे माझचं झालं नाही का..
कसं काय दगडाचं काळीज असतं एकेकाचं.. या निरागस, निष्पाप लेकराला असं उघड्यावर आणि असल्या घाणेरड्या उकिरड्यावर टाकायचं धाडस कसं होतं म्हणते मी… त्या लेकराचा काय दोष आहे बरं त्यातं…
माझ्या दृष्टीला ते पडलं म्हणून बरं झालं अन्यथा जरा जरी उशीर झाला असता तर कुत्र्या मांजरांनी, कावळ्या गिधाडांनी त्याचे लचकेच तोडले असते….
पण नियतीची लिला अजब असतेच हेच खरे… आता हेच बघाना गेली कित्येक वर्षे मला मातृत्वाची इच्छा होती… पण नियतीने माझ्या नशिबी वांझपणाचा शिक्का कायमचा कोरला असल्याने मला ते सुख कधीच मिळणारं नव्हतं… पण म्हणून काही माझ्या मध्ये असलेलं मातृहदयाची अमृतमय भावना अंत:करणात वसलेली होती तिचं काय.. तिला सारखं वाटायचं आपण असं प्रकट कधी होणार, कधी उफाळून येणार याच्या प्रतिक्षेत होती… मी इतरांच्या लेकरांवर खूप खूप माया, प्रेम भरभरून केले अगदी समरसून स्वताचं असल्यासारखे… पण शेवटी ते दुसऱ्याचं आहे उपरं आहे याच्या मर्यादा आल्या नि माझं मनं व्यथित व्हायचं.. आपली कुस उजवली नाही, वांझोटी म्हणून हेटाळणी झाली… एका स्त्रीच्या अंतकरणाच्या नि तिच्या जगण्याच्या चिंध्या चिंध्या केल्या… काही तिची म्हणणाऱ्या घरातल्या माणसांकडून नि त्या ढोंगी, मतलबी समाजाकडून… माझं अपत्यहिनाचं दुख त्यांनी समजून घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही… आणि या उदासीन, नैराश्याच्या वेळी मला तू दिसलास… मला माझ्या जीवनाची नवी वाट गवसली..
मी तुला आता चांगलं पालनपोषण करीन… तुझ्यावर माझ्यात इतके दिवस दडलेला मातृत्व नि वात्सल्याचा मायेचा झऱ्यात आकंठ बुडवून ठेवेन… तुला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालयं बघ माझं…. तुझ्यासाठी आता कितीतरी कष्ट उचलण्याचं बळं आलयं बघ माझ्यात… आता तू आणि मी.. मी आणि तू बस्स मला आता इतर जगाची जरूरी नाही… तू मिळालास आणि माझ्या स्वप्नांची परिपूर्तता झाली….
इतरांना काय म्हणायचं ते खुशाल म्हणोत… या वेडीला खेळण्यातील निर्जीव टेडीला आपलं लेकरू समजून आपल्या मातृत्वाची हौस भागवतेय कशी बघा…
हो हो आहेच मी वेडी… एका वांझ असलेल्या स्त्री ला मातृहदय नसते असं का बरं तुम्हाला वाटत… आणि हे एक निर्जीव खेळणं आहे याची कल्पना मला नसावी इतकी ही मी वेडी नाही… पण म्हणून काही सलणारं सत्य जीवनभर कवटाळून बसण्यापेक्षा जे दिसतयं त्या समोर तरी त्यावर भरभरून आपल्या मातृत्वाचा, मायेचा वात्सल्याचा झरा असा झरझर वाहू दिला तरी या माझ्या वैराण वाळवंटी जिवनात आभासी का होईना पण आनंदाची हिरवळ नाही का फुलणार! …
☆ “१ मे : जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन” ☆ श्री जगदीश काबरे ☆
१ मे हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची मुळे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेतील कामगार चळवळीत रुजलेली आहेत. तेव्हाच्या औद्योगिक क्रांतीच्या लाटेत कारखानदार आणि भांडवलदार वर्गाने कामगारांना अक्षरशः यंत्राप्रमाणे राबवले होते. दिवसाचे चौदा ते सोळा तास काम, अत्यल्प वेतन, असुरक्षित कामाची परिस्थिती आणि बालमजुरी हे त्या काळाचे भयाण वास्तव होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील ‘अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर’ने १८८४ साली एक ऐतिहासिक ठराव केला. त्यानुसार १ मे १८८६ पासून आठ तासांचा कामाचा दिवस लागू करण्याची मागणी केली गेली. या मागणीसाठी शिकागो शहरात हजारो कामगार रस्त्यावर उतरले. ४ मे १८८६ रोजी हेमार्केट चौकात एक प्रचंड मोठी सभा भरली होती. त्या वेळी अज्ञात व्यक्तीने बॉम्बस्फोट केला, पोलिसांनी गोळीबार केला, आणि अनेक कामगार तसेच पोलीस अधिकारी ठार झाले. या घटनेला ‘हेमार्केट हत्याकांड’ असे म्हणतात. या घटनेनंतर जगभरातील कामगार चळवळींना एक तीव्र आवेग मिळाला आणि कामगारांच्या हक्कांसाठीचा लढा अधिक व्यापक झाला. १८८९ साली पॅरिस येथे भरलेल्या ‘दुसऱ्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदे’त १ मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून जगभरातील कामगार संघटना, डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी आणि समाजवादी चळवळींनी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यास सुरुवात केली. या दिवशी कामगारांचे मोर्चे निघतात, सभा होतात, त्यांच्या हक्कांची चर्चा होते आणि शोषणमुक्त समाजाचे स्वप्न अधिक बळकट केले जाते.
भारतात कामगार दिनाची सुरुवात १ मे १९२३ रोजी मद्रास (आताचे चेन्नई) येथे झाली. ‘लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तान’चे नेते मलयापुरम सिंगारवेलू चेट्टियार यांनी पहिल्यांदा या दिवसाचा उत्सव भारतात आयोजित केला. त्यानंतर हळूहळू देशभर कामगार दिन साजरा होऊ लागला. महाराष्ट्रात तर हा दिवस अधिकच विशेष आहे. कारण याच दिवशी १९६० साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
स्वातंत्र्यानंतर भारताची भाषिक आधारावर प्रांतरचना करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. लोकांची मागणी होती की समभाषिक लोकांचे एकच राज्य असावे, म्हणजे प्रशासन, शिक्षण आणि न्याय यंत्रणा आपापल्या मातृभाषेत राबवता येतील. या मागणीसाठी देशभर चळवळी सुरू होत्या. आंध्र प्रांताने वेगळ्या तेलुगू राज्यासाठी आंदोलन केले आणि पोट्टी श्रीरामुलू यांच्या बलिदानानंतर १९५३ साली आंध्रप्रदेश स्थापन झाले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डिसेंबर १९५३ मध्ये न्यायाधीश फझल अली यांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्य पुनर्रचना आयोग’ स्थापन केला. या आयोगाने १९५५ मध्ये आपला अहवाल सादर केला. मात्र या अहवालात मुंबई शहराच्या बाबतीत एक अत्यंत वादग्रस्त शिफारस केली गेली. मुंबई हा केंद्रशासित प्रदेश असावा, किंवा मराठी व गुजराती या दोन्ही भाषिकांचे एकत्र ‘द्विभाषिक राज्य’ असावे, असे सुचवण्यात आले. या शिफारशीमागे अनेक राजकीय आणि आर्थिक कारणे होती. त्या काळी मुंबई हे आजच्यासारखेच देशाचे सर्वात मोठे औद्योगिक आणि व्यापारी केंद्र होते. गुजराती भांडवलदार, व्यापारी आणि उद्योजकांचे मुंबईवर मोठे वर्चस्व होते. केंद्रातील काही नेते मुंबई गुजरातला जोडण्याच्या बाजूने होते. मोरारजी देसाई, जे स्वतः गुजरातचे होते, ते तत्कालीन प्रभावशाली नेते होते आणि त्यांनी द्विभाषिक राज्याचा आग्रह धरला. मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असेही जाहीर वक्तव्य केले गेले होते. हा निर्णय मराठी जनतेला अत्यंत अन्यायकारक वाटला आणि त्यातूनच संयुक्त महाराष्ट्र चळवळीला ऊर्जा मिळाली.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ हे केवळ एक राजकीय आंदोलन नव्हते. ती एक व्यापक सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक अस्मितेची लढाई होती. या चळवळीने महाराष्ट्रातील विविध जाती, वर्ग, समाजगट, कामगार, शेतकरी, विद्यार्थी, साहित्यिक, पत्रकार आणि सामान्य नागरिक यांना एकत्र आणले. मराठी माणसाच्या हृदयात खोलवर रुजलेल्या मातृभाषेच्या आणि मातृभूमीच्या प्रेमाने हे सारे एकत्र आले होते. १९५५-५६ या काळात ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ची स्थापना झाली. या समितीमध्ये डाव्या पक्षांच्या कम्युनिस्टापासून ते उजव्या विचारसरणीच्या जनसंघापर्यंत विविध विचारसरणींचे पक्ष सामील झाले. शेतकरी कामगार पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष, हिंदू महासभा, हे सारे एकत्र आले होते. एरवी एकमेकांशी वैचारिकदृष्ट्या विरोध करणाऱ्या या पक्षांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी हातात हात मिळवले. हे या चळवळीचे एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. या चळवळीला मराठी साहित्यिक आणि कलाकारांचीही साथ होती. आचार्य अत्रे यांनी आपल्या ‘मराठा’ या वृत्तपत्रातून अत्यंत तेजस्वी आणि प्रखरपणे या चळवळीची बाजू मांडली. त्यांच्या लेखांनी, वक्तृत्वाने आणि व्यंगचित्रांनी जनमत प्रचंड प्रमाणात ढवळले गेले. एस. एम. जोशी, श्रीपाद अमृत डांगे, प्रबोधनकार ठाकरे असे अनेक दिग्गज नेते या लढ्याचे आधारस्तंभ बनले. ही चळवळ मराठी समाजाच्या सामूहिक जागृतीचे प्रतीक होती. ग्रामीण महाराष्ट्रापासून ते मुंबईच्या गिरणगावातील कामगारापर्यंत, आणि पुण्याच्या विद्यापीठातून ते विदर्भाच्या शेतकऱ्यापर्यंत सर्वांची या चळवळीशी नाळ जोडली गेली होती. हे एक खालून वर उठलेले, जनसामान्यांनी उभे केलेले ‘लोकसत्ताक’ आंदोलन होते.
१९५५ ते १९६० या कालखंडात संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी मुंबईत अनेक आंदोलने झाली. जनआंदोलन आणि सरकारी दडपशाही यांचा संघर्ष टोकाला पोहोचला होता. या काळात पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. या गोळीबारात १०५ निरपराध मराठी नागरिक शहीद झाले. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. कारण नंतर त्यांच्या रक्ताने महाराष्ट्राचा नकाशा लिहिला गेला. हे हुतात्मे कोण होते? कामगार, तरुण, विद्यार्थी असलेली ती सामान्य माणसे होती. ते रस्त्यावर उतरले होते, कारण त्यांना आपल्या मातृभाषेचा, आपल्या मुंबईचा आणि आपल्या महाराष्ट्राचा अभिमान होता. मुंबईतील फ्लोरा फाउंटन जवळ असलेल्या हुतात्मा चौकाचे नाव या शहीदांच्या स्मृतीस वाहिले गेले आहे. दरवर्षी १ मे रोजी या चौकात हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली जाते आणि महाराष्ट्र त्यांचे ऋण मानतो. या बलिदानांनी केंद्र सरकारलाही हादरवले. जनतेच्या रोषाची तीव्रता लक्षात घेऊन, आणि या आंदोलनाची व्यापकता पाहून, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आपली भूमिका बदलली. द्विभाषिक राज्याची कल्पना सोडून मुंबईसह महाराष्ट्र आणि स्वतंत्र गुजरात या दोन राज्यांची निर्मिती करण्याचा निर्णय झाला; आणि १ मे १९६० हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी दिवस उगवला. याच दिवशी ‘महाराष्ट्र राज्य पुनर्रचना कायदा १९६०’ अंमलात आला आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याचा जन्म झाला. कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विविध भागांतील मराठी भाषिकांचे एक राज्य झाले. ही केवळ एक प्रशासकीय घटना नव्हती, तर ते मराठी माणसाच्या दीर्घ संघर्षाचे फलित होते.
याच दिवशी जागतिक कामगार दिन असणे हा तर ऐतिहासिकदृष्ट्या अर्थपूर्ण योगायोग आहे. कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही एका अर्थाने कामगार वर्गाचीच चळवळ होती. मुंबईच्या गिरण्यांमध्ये राबणारा मराठी कामगार, कापड गिरण्यांतील मजूर, बंदरावर काम करणारे मजूर, हे या आंदोलनाचा कणा होते. त्यांच्या घामाने आणि रक्ताने महाराष्ट्र उभा राहिला. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यांनी या नव्या राज्याचा पाया घालण्याचे महत्त्वाचे कार्य केले. नव्या महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणे, विकासाची दिशा ठरवणे आणि विविध जातींना एकत्र बांधणे हे त्यांच्यापुढील मोठे आव्हान होते. महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य असले तरी मुंबईमुळे ते देशाचे आर्थिक केंद्रही राहिले आहे.
महाराष्ट्राची निर्मिती झाली खरी, परंतु ती अपूर्ण होती. बेळगाव, धारवाड, विजापूर, कारवार आदी भागातील मराठी भाषिक प्रदेश कर्नाटकात समाविष्ट केले गेले. हा महाराष्ट्रावरील एक मोठा अन्याय होता आणि आजही हा प्रश्न सुटलेला नाही. बेळगाव शहरात मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे, तरीही ते कर्नाटकात आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ५ जून १९६० रोजी चार सदस्यांची एक समिती नेमण्यात आली. या समितीने ‘पाटसकर फॉर्मुला’ वापरण्याची शिफारस केली. या फॉर्मुल्यानुसार गाव हा घटक मानून, ज्या गावात ५०% पेक्षा जास्त एका भाषेचे लोक राहतात, ते गाव त्या भाषिक राज्याला द्यावे, असे ठरले. मात्र हा फॉर्मुला अमलात आणण्यात अपयश आले. पुढे १९६६ साली माजी सरन्यायाधीश मेहेरचंद महाजन यांची एकसदस्य आयोग नेमण्यात आला. महाजन आयोगाने आपला अहवाल सादर केला ज्यात निपाणी, खानापूर यांसह २६४ गावे महाराष्ट्राला आणि अक्कलकोटसह २२७ गावे कर्नाटकाला देण्याची शिफारस केली. मात्र या आयोगाने बेळगाव महाराष्ट्राला देण्याची शिफारस केली नाही. हे महाराष्ट्राला मान्य नव्हते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने महाजन आयोगाच्या शिफारसी एकमुखाने फेटाळून लावल्या. बेळगावचा प्रश्न आजही तीव्र आहे. ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’ या संघटनेने या लढ्याचे नेतृत्व केले आहे आणि आजही करत आहे. संयुक्त महाराष्ट्राची मोहीम यशस्वी झाल्यानंतर ही समिती थोडी मोडकळीस आली असली तरी ती अजूनही आपले काम करत आहे. बेळगावमध्ये मराठी शाळा, मराठी संस्कृती आणि मराठी अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी हे कार्यकर्ते अथक परिश्रम करत आहेत. सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न विविध याचिकांद्वारे गेला आहे. केंद्र सरकारने वेळोवेळी मध्यस्थी करण्याचे प्रयत्न केले. परंतु कर्नाटक सरकार बेळगाव सोडण्यास तयार नाही. कर्नाटकाने तर बेळगावचे नाव ‘बेलगावी’ असे कन्नड पद्धतीने बदलले आणि तेथे कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन भरवण्यास सुरुवात केली. या सगळ्यामुळे मराठी मनात संताप आहे.
महाराष्ट्र आज देशातील औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्यांपैकी एक अव्वल दर्जाचे राज्य आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. माहिती तंत्रज्ञान, वित्त, मनोरंजन, उत्पादन उद्योग या क्षेत्रांत महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. पण या विकासासोबतच मराठी माणसाचे, सामान्य कामगाराचे, शेतकऱ्याचे जीवनमान कसे उंचावेल हा प्रश्न अजूनही समोर उभा आहे. कामगार दिनाच्या निमित्ताने आज हे विचारणे अत्यंत आवश्यक आहे की, ज्या कामगारांनी या राज्यासाठी लढा दिला, ज्यांच्या खांद्यावर मुंबईची आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था उभी आहे, ते कामगार आज किती सुरक्षित आहेत? गिरण्या बंद पडल्या, कामगारांच्या वस्त्या उद्ध्वस्त झाल्या, रोजगाराच्या संधी कमी झाल्या. या प्रश्नांची उत्तरे शोधणे हे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने औचित्यपूर्ण ठरणारे आहे.
त्या काळी मुंबईतील कापड गिरण्यांमध्ये लाखो मराठी कामगार काम करत होते. ते मूळचे कोकणातून, देशावरून आलेले होते. त्यांनी मुंबई घडवली होती. पण मुंबईत त्यांची गणना ‘परके’ म्हणून होत होती. मुंबई महाराष्ट्राला मिळावी ही त्यांची मागणी केवळ भावनिक नव्हती, तर ती त्यांच्या अस्तित्वाचीही मागणी होती. आपल्या कामाच्या ठिकाणावर आपल्या भाषेत बोलण्याचा, आपल्या संस्कृतीत राहण्याचा हक्क मागणे हे चुकीचे कसे म्हणता येईल? कार्ल मार्क्सने सांगितले होते की कामगार वर्गाला मातृभूमी नसते, परंतु भारताच्या संदर्भात हे सूत्र पुरेसे नाही. येथे भाषा, संस्कृती आणि प्रांत यांचा प्रश्न फक्त वर्गीय प्रश्नाशी गुंफलेला नाही. मराठी कामगाराला त्याची मराठी भाषा, त्याची महाराष्ट्रीय संस्कृती यांच्याशी जोडलेले राहणे आवश्यक होते. या दोन्ही संघर्षांचा — वर्गसंघर्ष आणि अस्मितासंघर्ष — यांचा मिलाफ म्हणजेच १ मे. आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, डांगे हे नेते एकाच वेळी कामगार हक्कांचे पुरस्कर्ते आणि मराठी अस्मितेचे रक्षक होते. त्यांच्या दृष्टीत या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी नव्हत्या, तर त्या एकमेकांच्या पूरक होत्या. शोषणमुक्त समाजात भाषिक न्याय असतो, आणि भाषिक न्यायाच्या समाजात वर्गीय शोषण असता कामा नये, हेच सूत्र होते.
आज महाराष्ट्र दिनाचा उत्सव साजरा करताना आपण काही प्रश्नांना सामोरे जाणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या, मराठी माध्यमाच्या शाळांची घसरण, रोजगाराचे प्रश्न, ग्रामीण-शहरी विषमता, भाषेचे राजभाषा म्हणून स्थान काय आहे, हे सारे प्रश्न अनुत्तरित आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हे एक मोठे यश आहे. पण हा दर्जा कागदावर राहू नये. मराठी शाळा, मराठी विद्यापीठे, मराठी साहित्य संस्था यांना बळ देणे, मराठी तंत्रज्ञान विकसित करणे, हे सरकार आणि समाज दोघांचेही कर्तव्य आहे. ज्या हुतात्म्यांनी महाराष्ट्रासाठी प्राण दिले, त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मराठी समाजाने सतर्क आणि संघटित राहणे गरजेचे आहे. त्याचवेळी बेळगाव आणि सीमाभागातील मराठी जनतेशी एकजूट राखणे हे देखील महाराष्ट्राचे कर्तव्य आहे. त्यांची भाषा, त्यांची संस्कृती, त्यांची शिक्षणाची व्यवस्था जोपासणे, त्यांच्या न्यायासाठी लढा देत राहणे हे संयुक्त महाराष्ट्राची अपूर्ण मागणी पूर्ण करण्याचाच एक भाग आहे.
एवंच संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा भारतीय लोकशाहीतील एक उज्ज्वल अध्याय आहे. सामान्य माणसांनी संघटित होऊन, बलिदान देऊन, एका अन्यायाविरुद्ध यशस्वी लढा दिला, हे या चळवळीचे सार आहे. हे स्मरण आपल्याला सांगते की लोकशाहीत जागरूक नागरिकांचे सामूहिक बल हे सर्वात मोठे शस्त्र आहे. म्हणूनच प्रत्येक मराठी माणसाने — विशेषतः तरुण पिढीने — या दिवसाचे महत्त्व जाणले पाहिजे. हुतात्म्यांचे स्मरण करणे म्हणजे केवळ श्रद्धांजली वहाणे नव्हे; तर एक जबाबदारी स्वीकारणे आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि न्यायपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी कायम जागरूक आणि सक्रिय राहणे हेच खरे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे फलित असायला हवे.
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १८ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
सत्संग- सज्जन प्रशंसा (२)
महाराजांना संतांच्या रूपात प्रत्यक्ष पांडुरंग दिसतो. त्यांचे म्हणणे असे आहे की, गृहस्थाने देवाची पूजा करत असताना जर घरी कोणी संत मंडळी आली तर पूजा बाजूला ठेवून संतांची यथासांग पूजा करावी. प्रथम त्यांचा आदर करावा मग पूजा करण्यास घेतलेला देव शाळीग्राम असो, नाहीतर प्रत्यक्ष विष्णूची मूर्ती असो. मूर्ती पूजेच्या ऐवजी देवस्वरूप असणाऱ्या संतांचे पूजन हा धर्म आहे.
धन्य ते संसारी/ दयावंत जे अंतरी/
येथे उपकारासाठी/ आले घर ज्या वैकुंठी//
लटिके वचन/ नाही देही उदासीन/
मधुरा वाणी होटी / तुका म्हणे वाव पोटी//
संत गण, सज्जन, म्हणजे कसे असतात याचे वर्णन वरील अभंगात तुकाराम महाराज करतात. या लोकांच्या अंतःकरणात दया असते, म्हणून ते धन्य आहेत. कोणा परक्याला ठेच लागली तरी संतवृत्तीच्या माणसांच्या डोळ्यात टचकन पाणी येते. यांचे वास्तविक वैकुंठ हेच निवासस्थान आहे, परंतु केवळ परोपकार बुद्धीने ही माणसे लोकांमध्ये येतात. ते कधीही खोटे बोलत नाहीत, खोटी वचने देत नाहीत, त्यांची वाणी नेहमी मधुर आणि रसाळच असते. लोकांचे गुणदोष सामावून घेण्याइतके त्यांचे मन मोठे असते. त्यांची वृत्ती क्षमाशील असते. दुसऱ्याचे सुख तेच त्यांचे सुख. स्वतःच्या देहासंबंधी ते पूर्णतः उदासीन असतात.
अशा संतांचा संग लागणे, यासाठी प्रारब्ध ही अनुकूल असावे लागते, सर्वांनाच संत संगतीचा लाभ होतोच असे नाही.
जेथे जावे तेथे कपाळ सरिसे/
लाभ तो विशेष संत संगे//
पूर्वपुण्य जरी होती सानकूळ/
अंतराय मूळ नुपजे तेथे//
भाग्य तरी नव्हे/ धन पुत्र दारा/
निकट वास बरा/ संतापाई//
तुका म्हणे हेचि करावी मिरासी/
बळी संतांपाशी द्यावा जीव//
महाराज देवाजवळ एकच मागणे मागतात की देवा, मला संतांची संगती लाभू दे. त्यांचा असा विश्वास आहे की दैव अनुकूल नसले, तरी संतांच्या सहवासात ते अनुकूल करता येईल. कारण चांगल्या संगतीचा परिणाम चांगलाच होणार. पत्नी, पुत्र,द्रव्य, एकूणच हा एक संसार म्हणजेच भाग्य असा सर्वसामान्यांचा विश्वास असतो,
परंतु महाराजांच्या मते संतांच्या चरणाशी आपण कायम राहावे, त्यांची सेवा करावी, त्यांच्यापाशी जीवही अर्पण करावा, तरच सद्गती लाभेल. दोऱ्यात ओवलेल्या सुगंधी फुलांच्या गंधाने दोराही सुगंधित होतो.
संत, सज्जन, ज्ञानी माणसांइतके महान कोणी नाही हे तुकाराम महाराज त्यांच्या अनेक अभंगांतून सतत सांगत आहेत. त्याच आशयाच्या या अभंगाचा आपण थोडा विचार करू.
परमार्थी तो न म्हणावा आपुला/
सलगी धाकूला हेळू नये/
थोडाची स्फुल्लिंग बहुत दावाग्नी/
वाढता इंधनी वाढविला/
पितियाने तैसा वंदावा कुमर/
जयाचे अंतर देव वसे/
तुका म्हणे शिरी वहावे खापर/
माजी असे सार नवनीत//
जो कोणी परमार्थी असेल, ब्रह्मनिष्ठ असेल, तो वयाने लहान असला तरी त्याची अवहेलना करू नये. तू लहान आहेस, तुला काय कळतंय असे बोलणे साफ चुकीचे आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून गीतेचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारे ज्ञानेश्वर महाराज यांना आपण माऊली म्हणून का बरे वंदन करतो? या ठिकाणी तुकाराम महाराजांनी अगदी योग्य असे दृष्टांत दिले आहेत.
ते म्हणतात की अग्नीची ठिणगी लहान असली तरी लाकडाच्या योगाने मोठ्या अग्नीचे स्वरूप धारण करते. तशी परमार्थाची स्थिती आहे. ज्याच्या अंतःकरणात नित्य देवाची वस्ती असते अशा मुलाला पित्यानेही नमस्कार करावा. लोण्याचे भांडे मातीचे असले तरी डोक्यावरून वाहून नेतात, त्याचप्रमाणे ज्ञानी, वयाने लहान असला किंवा हलक्या कुळातला असला तरी तो वंदनीय आहे. सावता, माळी होता, चोखा, महार होता, नामदेव, शिंपी होता, गोरा, कुंभार होता, परंतु हे सर्व वृत्तीने संत होते, महात्मे होते, म्हणूनच वंदनीय आहेत.
देहरूपी मलीन झालेली चादर कोणत्याही साबणाने स्वच्छ करता येत नाही. संतांच्या सहवासात राहून त्यांच्या वचनानुसार वर्तन करणे हा एकच मलीनता नष्ट करण्याचा उपाय आहे, हे जाणून अत्यंत नम्रतेने तुकाराम महाराज या संत सज्जनांना उद्देशून म्हणतात…….
पाळीतो वचन/ परी बहु भिते मन/
करितो पायांशी सलगी/ नये बैसो अंग संगी//
जोडोनिया कर/ उभे असावे समोर/
तुका म्हणे संत/ तुम्ही मी बहु पतीत//
मी तुमच्या वचनाप्रमाणे जरी वागत असलो, तरी मला फार भीती वाटते, कारण माझी ती योग्यताच नाही. तुमच्या पंगतीत मी बसू शकत नाही, म्हणून तुमच्या पायाशीच मी बरा. तुमच्यासमोर हात जोडून उभे राहावे हीच माझी योग्यता आहे. अहो संत सज्जन हो, तुम्ही खरोखरच फार थोर आहात, आणि मी पापी आहे. विनम्र बुद्धी असली तरच माणूस मोठा होऊ शकतो हे तुकारामांना या अभंगातून सांगायचे आहे.
संत महिमा इतका मोठा आहे, की तुकाराम महाराज म्हणतात, संतांवर माझा सर्व भार टाकून मी निश्चिंत झालो आहे. संतांनीच मला विठ्ठलाच्या स्वाधीन केले.
घालुनिया भार राहीलो निश्चिंती/
मिरविले संती विठोबासी//
लावूनिया हाता कुरवाळिला माथा/
सांगितले चिंता/ न करावी//
कटी कर समचरण साजिरे/
राहिला मी बरे तीरी उभा//
खुंटले सायास आणिक या जीवा/
धरीले केशवा पाय तुझे//
तुज वाटे आता ते करी अनंता/
तुका म्हणे संता लाज माझी//|
संतांनी( विठ्ठलाने) माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, मला कुरवाळले, माझ्या सर्व चिंता दूर केल्या. मला भयमुक्त केले. कमरेवर हात आणि समचरण ठेवून तो माझा विठू भीमेच्या तीरावर उभा आहे. त्याचे पाय धरल्यामुळे माझे सर्व कष्ट नाहीसे झाले. हे अनंता, तुझ्या इच्छेप्रमाणे तू मला जसे ठेवशील तसा मी राहीन कारण माझी लाज राखणारे संतच आहेत.
संतांची संगती आयुष्यात फार महत्त्वाची आहे. संत हेच गुरु आहेत, संत हेच सन्मार्गदर्शक आहेत. गाथेतील अभंगांतून वर्णिलेला संत महिमा, गाथा वाचताना जागोजागी दिसून येतो. मी घडविले ते एक विहंगावलोकन!
☆ “वेगळी सकाळ आणि नव्या मैत्रिणी…” – भाग – १ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
रोज सकाळी ४० ते ४५ मिनिटे फिरणे यासारखा सुंदर आणि सोपा व्यायाम नाही. फिरतांना छोटीशी पथ्य पाळायची असतात, आणि, ती म्हणजे, फिरतांना हातात मोबाईल नाही आणि घरगुती गप्पा नाहीत. फिरतांना भेटणाऱ्यांना हाय – हॅलो करत चालत राहिलो, तर चेहेरा आनंदित राहतो, आणि मन पण प्रसन्न राहते.
आणि एखादी वेगळी सकाळ अशी पण घडते – –
खरंतर सकाळ ही रोजचं वेगळी असते, पण, आजची सकाळ जरा हटके, म्हणजे वेगळ्यातली वेगळी होती – –
आम्ही सकाळी साधारण ७ – ७. १५ ला बाहेर पडतो. ही वेळ ऑफिसची असल्यामुळे, रस्त्यावर निरनिराळ्या ठिकाणी कंपन्यांच्या बसचे पिक – अप पॉईंट्स आहेत. काही ठिकाणी कॅब चे पिक – अप पॉईंट्स आहेत. त्यामुळे फिरण्याच्या पूर्ण रस्त्यावर, या वेळेला, फुटपाथवर थोड्या थोड्या अंतरावर मुले – मुली – स्त्री – पुरुष ग्रुपनी गाडीची वाट बघत उभे असतात.
काही ठिकाणी २ -३ जण असतात, तर काही ठिकाणी ६ – ७ जण असतात. रोजचे द्रुश्य म्हणजे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. एकतर ही मंडळी फोनवर बोलत असते किंवा चॅट करत असते. काहींच्या कानाला मशीन लावलेले असते. सकाळी सकाळी भेट होते आहे, तर एकमेकांना हाय – हॅलो करणे, एकमेकांची विचारपूस करणे, काही गप्पा मारणे, हा प्रकार कधीच बघायला मिळत नाही.
आज बायकोला सकाळी एका लग्नाला जायचे होते, म्हणून मी नेहेमीच्या वेळेलाच, पण एकटाच फिरायला बाहेर पडलो.
मृत्युंजय मंदिराच्या जवळच, एका स्टॉप जवळ, दोन मुली उभ्या होत्या आणि चक्क मोठमोठयांनी हसत गप्पा मारत होत्या. एकीच्याही हातात मोबाईल नव्हता. दोघींच्या हातात बाजूच्या चहाच्या स्टॉल वरून घेतलेल्या चहाचे ग्लास होते. मुलींनाच असे नाही, पण कुणालाही असे मनमोकळं हसतांना बघितलं, की प्रसन्न वाटतं, मस्त वाटतं.
रस्त्यानी जातांना, असं काही वेगळं दिसलं, की आपोआपच आपली पावलं तिथे थांबतात. माझं पण असंच झालं. या रस्त्यानी मी इतके दिवस फिरतो आहे, पण मोबाईल नसणारी आणि एकमेकांशी बोलणारी माणसं, मी पहिल्यांदाच बघत होतो. आणि ती पण विथ स्माइलींग फेस! काय कारण असेल? ही माझी जिज्ञासा जागी झाली.
कारण समजण्याकरता, त्यांनाच विचारणे, हा एकच पर्याय होता.
मी : मॅडम, एक विचारू का?
(त्यांची नावे समजेपर्यंत आपण त्यांना मेघना आणि मनवा म्हणूया)
मेघना : विचारा काका, काहीही विचारा, आम्ही आज एकदम खुश आहोत
मी माझी शंका त्यांना विचारली
मनवा : काका, तुम्हाला आश्चर्य वाटणं साहजिक आहे. आज आम्ही एकमेकींना मोबाईल शिवाय बघतो, तेव्हा आम्हाला पण आश्चर्य वाटतं.
मेघना : काका, आज ड्राय-डे आहे
मी : महाराष्ट्रात ड्राय-डे कुठे पाळतात? आणि आता तर सकाळ आहे
मेघना : आमच्या ड्राय-डे चा दारूशी काहीही संबंध नाही. ड्राय-डे ला दारू नसते, आमच्या ड्राय-डे ला मोबाईल नसतो. मृत्युंजय मंदिराजवळ आमचा स्टॉप आहे, श्री शंकराचा वार सोमवार, म्हणून सोमवारी आमचा ड्राय-डे असतो. आज मोबाईलची जागा, हातात नसून आमच्या पर्स मध्ये असते. आणि वापर फक्त आलेला फोन घेण्याकरता किंवा काही फोन करण्याकरता.
मी : वा! काय मस्त आयडिया आहे! तुम्हाला ही कल्पना आली कशी?
मनवा : काका, नुकतेच, आम्ही दोघी युरोपमध्ये स्वीडनला होतो, तीन महिने. तिथे आम्हाला खूप शिकायला मिळाले. ही कल्पना पण त्यातूनच मिळाली. आमच्या ड्राय-डे बद्दल विचारणारे तुम्ही पहिलेच आहात. तुम्हाला ऐकायचे असेल, तर, आमच्या बरोबर चहा घ्यावा लागेल. मी काही उत्तर द्यायच्या आत, तिनी बाजूच्या चहावाल्यांना खूण केली, आणि माझ्या हातात चहाचा ग्लास आला.
मी : मॅडम, तुमची बस किती वाजता आहे? नाहीतर बोलण्याच्या नादात – —
मेघना : कॅब आलेली आहे. ही काय आमची कार उभी आहे. आमचं फ्लेक्सी टायमिंग असतं, उशिरा गेलो, तर तेवढं नंतर थांबायचं! नो प्रॉब्लेम.
आता, ड्राय-डे ची कल्पना कशी आली – – -? त्याचं असं झालं – –
स्वीडनमध्ये टू व्हीलर किंवा फोर व्हीलर चालवणारा एकही जण, आम्हाला मोबाईलवर बोलतांना दिसला नाही. आम्हालाही तुमच्यासारखचं आश्चर्य वाटलं. दुसऱ्याच दिवशी, आम्ही तिथल्या एकाला गाठलं, जसं शंका विचारायला तुम्ही आम्हाला गाठलं. तिथे सगळ्यांनाच इंग्रजी येतं.
मी : मॅडम, थोडा फरक आहे. मी दोघींना गाठलं, आणि तुम्ही दोघींनी एकाला गाठलं. त्यांनी पण तुम्हाला चहा ऑफर केला होता का? बरं, गाठल्यावर पुढे काय झालं?
त्या दोघी मला भूतकाळात घेऊन गेल्या ——
मेघना : आम्ही त्यांना विचारलं, की, इथे कोणीच गाडी चालवतांना मोबाईल वर बोलतांना दिसत नाही. पोलीस पकडतात का? दंड जास्त असतो का? लायसन्स जप्त करतात का?
परदेशी माणूस : अहो, गाडी चालवतांना मोबाईल वापरणे, स्वतः करताच धोकादायक असते, हे आम्हाला समजतं नाही का? ते पोलीसानी कशाला सांगायला पाहिजे! उन्हाळ्यात आपण डोक्यावर टोपी घेतो, पावसाळ्यात छत्री घेतो. छत्री नाही घेतली, तर पोलिसांनी आपल्याला पकडायला पाहिजे कां? मॅडम, पाऊस पडतोय, तुम्ही छत्री नाही घेतली – भिजल्यामुळे तुम्हाला ताप येईल – सर्दी होईल. द्या १० युरो दंड.
मी टू व्हीलर चालवतांना हेल्मेट घातले नाही, आणि काही कारणामुळे, रस्त्यावर गाडी घसरून पडलो, तर माझं डोकं फुटल्याशिवाय राहणार नाही, हे मला नक्कीच समजतं. त्यामुळे माझ्या सुरक्षिततेकरता मी हेल्मेट घालतोच. याच्या करता नियम आणि पोलीस कशाला पाहिजेत? कार चालवतांना आम्ही सीट बेल्ट लावतोच, त्याचं कारण हेच. अर्थात ज्याला मानेचा त्रास असेल, वयस्कर माणसांना हेल्मेट मुळे त्रास होत असेल, तर ते हेल्मेट वापरत नाहीत. हेल्मेट हे व्ययक्तिक सुरक्षिततेकरताच आहे..
मनवा : अहो, पण कार चालवणारे मोबाईल वर का बोलत नाहीत? अपघात झाला तर त्यांना काहीच होणार नसते! चालणाऱ्याचे बारा वाजतात! मग, याकरता काही नियम आहे का? दंड आहे का?
परदेशी माणूस : मॅडम, नियम आला, की, बघायला यंत्रणा आली. दंड आला, की, गैरव्यवहार आला. आणि मॅडम, समजा, माझ्या कारनी, ‘अ ‘, ‘ब’, ‘क ‘, ‘ड’, लोकांना धडक दिली, तर, मला काहीच होणार नाही, हे बरोबर आहे. आता, इतर कुणी असेच ४ -५ लोकांना उडवले आणि त्या ‘अ ‘, ‘ब’, ‘क ‘, ‘ड’, मध्ये माझे आई – वडील असले तर? बायको असू शकते! मुले असू शकतात! मित्र असू शकतात! अशी दुसऱ्यांनी दिलेली धडक मला आवडेल का? नक्कीच नाही. मग, मी दिलेली धडक इतर कुणाला आवडेल का? तर नाही.
‘इस हाथ दे – उस हाथ ले’. व्हेरी सिम्पल. म्हणून गाडी चालवतांना ‘नो मोबाईल’.
☆ परि तुझ्यावाचुनि करमेना… भाग – १ ☆ उज्ज्वला केळकर ☆
माझी एक सख्खी मैत्रीण म्हणजे शुभदा साने. तशा आमच्या प्रत्यक्ष गाठीभेटी कमी होतात. पण आठवड्यातून एकदोनदा तरी फोन होतोच. दिलखुलास गप्पागोष्टी होतात. जून-जुलै च्या दरम्यान फोनमधून हमखास विचारणा असते, ‘कुठली कुठली बोलावणी आली…? काय काय झालं? ’… बोलावणी म्हणजे दिवाळी अंकांची बोलावणी… साहित्य पाठवण्याविषयीचं पत्र आणि काय काय झालं, म्हणजे, काय काय लिहून झालं वगैरे… वगैरे… आम्हा मैत्रिणीत सगळ्यांत जास्त आणि सगळ्यात आधी बोलावणी तिला येतात. त्यामुळे हा काळ तिच्या दृष्टीने खुशीचा तसाच व्यस्ततेचाही असतो.
यंदा मात्र थोडंसं वेगळं घडलं. वेगळं म्हणजे काय? तर जूनअखेर अखेरच मला ‘मेहता ग्रंथजगत’ कडून पत्र आलं. फोनवर तसं तिला सांगितलं. ती म्हणाली, ‘हो का? कशावर लिहायचंय? ’ मी म्हटलं, ‘माझा सहचर’… पत्र वाचल्यावर एकदम शाळेच्या दिवसांची आठवण झाली. म्हणजे शाळेत नाही का आपण निबंध लिहीत होतो? ‘माझी आई’, ‘माझी मैत्रीण, दादा, ताई, आजी-आजोबा इ. इ. ’ माझं वाक्य पुरं होण्यापूर्वीच ती म्हणाली, ‘माझा मोत्या… ’ आणि खिदळायला लागली. मग लगेच म्हणाली, ‘गंमत केली ग! पण त्याचा एक गुण आहेच तुझ्या मिस्टरांमध्ये… ’ मी जरा विचारात पडले. म्हणजे माझ्यावरचं त्यांचं वसा वसा ओरडणं तिच्यापर्यंत पोचलं की काय? तशी मी सूज्ञपणे आणि संयमाने मैत्रिणीसमोर युध्दाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करत असते. तरी पण संगोवांगी तिच्यापर्यंत पोचलं की काय? पण ती गुण म्हणाली… की बदलत्या काळात अनेक बदलांप्रमाणे ‘गुण’ या शब्दाचाही अर्थ बदललाय? क्षणभरात एवढं सगळं माझ्या डोक्यात भिरभरून गेलं. एवढ्यात ती पुढे म्हणाली, ‘आज्ञाधारकपणा… तुमचे मिस्टर खूपच ऐकतात बाई तुमचं… आमच्याकडे नाही बाई असं… ’ मला वाटतं, प्रत्येक नव-याला शेजा-याची बायको जास्त देखणी वाटते, तसं प्रत्येक बाईला दुसरीचा नवरा जास्त शहाणा, समंजस, समतोल विचारांचा, मुख्य म्हणजे तिच्या मुठीत रहाणारा वाटतो. निदान माझा सहचर असा आहे, याबद्दल माझ्या सगळ्या मैत्रिणींची शंभर टक्के खात्री आहे आणि तसं काही नसलं, तरी तसंच आहे, हे इतरांना पटवून देणं माझ्या सहचराला छानच जमतं. म्हणजे, तुलना केलीच तर सृजनाची प्रतिभा माझ्यापेक्षा त्याच्याकडे जास्त आहे. आता ते फक्त लिखाणातून नाही, तर बोलण्यातून, वाणीतून जास्त प्रसवतं एवढंच!
त्यानंतर एकदा आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र जमलो होतो. साहित्यकलेपासून राजकारण… क्रीडेपर्यंत सगळ्या विषयांना पालाण घालून झाल्यावर गप्पांना खरा रंग भरला, तो आमच्या यांना.. आमच्या घरात… आमची मुलं… असं नि तसं सुरू झाल्यावर, आता माझ्या सगळ्याच मैत्रिणींना वाटतं, आमचे हे म्हणजे सद्गुणांचा पुतळा… मग मी म्हणून टाकलं,
‘आमच्या सुखी आणि समृध्द सहजीवनाचं मधुर पक्व फळ
चाखत माखत खातोय आम्ही गेली कित्येक वर्षं…’
‘याचं रहस्य?’ एकीने लगेच टोकलं. म्हटलं,
‘रहस्य कसलं त्यात? आमच्या घरात नेहमीच घडतं माझ्या इच्छेप्रमाणे…’
‘तेच तर आम्ही म्हणतो…’
सगळ्यांनी एकदमच गिल्ला केला.
‘थांबा… थांबा… पुरतं ऐकून घ्या…’
मी त्यांना थांबवत म्हणते.
‘आमच्या घरात नेहमीच घडत माझ्या इच्छेप्रमाणे
जेव्हा एकमत असेल तेव्हा
आणि घडतं त्यांच्या इच्छेप्रमाणे
दुमत असेल तेव्हा…’
क्षणभर त्या गोंधळल्याच. ‘बंडल मारू नका’ त्या एकदमच म्हणाल्या. ‘शप्पथ! ’ मी म्हटलं. हे हे आत्ता म्हटलं ना, ते सुध्दा त्यांचंच म्हणणं आहे. मी आपली कवितेच्या फॉर्ममध्ये त्याची मांडणी केली, एवढंच!
विद्येचे माहेरघर असलेल्या आणि साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं केंद्रबिंदू असलेल्या पुण्यनगरीतून १९६५ साली, लग्न होऊन मी माधवनगरला आले. गाव सांगलीपासून तीन-चार मैलावर, पण वहातूक व्यवस्था फारशी नव्हती. अधूनमधून येणा-या महामंडळाच्या बसेस किंवा मग टांगे. टू व्हिलर म्हणजे सायकलीच प्रामुख्याने. घराघरात स्कूटर्स दिसायचा काळ अद्याप खूपच दूर होता. त्यामुळे सांगलीला होत असलेल्या कार्यक्रमांचा मला फारसा उपयोग नसे.
घर मोठं होतं. बारा पंधरा माणसं नित्याचीच. येणं जाणंही खूप असे. घरात माणसांचा तसाच कामाचाही खूपच धबडगा असे. गृहस्थाश्रमाच्या रहाटगाडग्यात उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त काम आणि कामच असे. मन-बुध्दीला, विचार, कल्पनाशक्तीला तसा विश्रामच असे. ‘माय स्पेस’ किंवा ‘माझा अवकाश’ याबद्दल आज जे सातत्यानं बोललं जातं, तो मला त्यावेळी बिंदूतसुध्दा मिळत नव्हता. नाही म्हणायला, गावात ब-यापैकी असलेले वाचनालय आणि महिला मंडळ हे हिरवळीचे तुकडे होते. ‘वंदना’ हे वार्षिक हस्तलिखित मंडळातर्फे निघत असे. त्याचं संपादन, महिला मंडळासाठी बसवायचे कार्यक्रम यातून थोडीफार कल्पनाशक्तीला चालना मिळायची.
मला आठवतंय, मी माझी पहिली कथा ‘वंदना’ हस्तलिखितासाठी लिहिली होती. पण ते सारं कधीमधी. रोजच्या जीवनात माझ्या शिक्षणाशी संबंधित असं काहीच नव्हतं. यामुळे होणारी माझी घुसमट यांच्या लक्षात आली. (आमचा काळ हा, हे अहो… जाहोचा! इकडून तिकडून पुढे एक पाऊल पडलेलं. सर्रास ‘अरे तुरे… चा काळ यायला अजून वीस-पंचवीस तरी वर्षं लागणार होती.) लग्नानंतर दुस-या वर्षी मला बी. एड्. ला जाणार का? म्हणून विचारलं. त्या वेळी शिक्षकी पेशाविषयी आस्था वा आकर्षण म्हणून नव्हे, तर स्वयंपाकघर-माजघर, उंबरठा-अंगण या परिघाबाहेर पाऊल टाकायची संधी मिळणार, म्हणून मी ‘होय’ म्हणून टाकलं. सकाळी कॉलेज, दुपारी पाठ, एवढं सोडून उरलेल्या वेळात घरकाम, त्यामुळे खूप फरफट झाली. पण मजाही खूप वाटली. शारीरिक ओढाताण झाली, तरी मन प्रसन्न, टवटवित राहिलं. कॉलेजमधील विविध कार्यक्रम, पाठाची तयारी यात कल्पकतेला खूप वाव मिळायचा. त्यावेळी जरी मी घराबाहेर पडण्याची संधी एवढ्याच दृष्टीने बी. एड्. कडे पाहिलं असलं, तरी पुढच्या आयुष्यात मला त्याचा खूप फायदा झाला आणि ते करायला सुचवलं होतं माझ्या सहचराने.
मानवाच्या आयुष्यात ज्ञान आणि अनुभव हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत.
‘केवळ पुस्तक वाचून, शिकून आपण ज्ञानी होऊ शकतो, पण त्या ज्ञानाचा खरा अर्थ कळण्यासाठी अनुभवाची गरज असते.’
– – या वाक्यातील गाभा हाच आहे की, शब्द समजणे आणि त्यांचा अर्थ जाणणे यात फरक असतो.
ज्ञानी व्यक्ती शब्दांचे अर्थ, त्यामागील विचार आणि सिद्धांत समजू शकते. ती अनेक गोष्टी वाचते, ऐकते आणि शिकते. परंतु, अनुभवाशिवाय हे ज्ञान काहीसे अपूर्ण राहते. कारण प्रत्यक्ष आयुष्यात जेव्हा आपण एखादी गोष्ट अनुभवतो, तेव्हाच त्या शब्दांना खरी खोली आणि अर्थ प्राप्त होतो.
– – उदाहरणार्थ;दुःख हा शब्द प्रत्येकाला माहित असतो. पण ज्याने खरोखर दुःख अनुभवले आहे, त्यालाच त्या शब्दाचा खरा अर्थ कळतो. तसेच आनंद, प्रेम, संघर्ष हे शब्दही अनुभवातूनच अधिक स्पष्ट होतात. त्यामुळे अनुभव हे ज्ञानाला पूर्णत्व देतात.
आजच्या काळात अनेक लोक माहितीच्या आधारे स्वतःला ज्ञानी समजतात. पण जीवनातील चढ-उतार, संकटे आणि संघर्ष यांचा अनुभव घेतल्याशिवाय त्या ज्ञानाला खरी किंमत मिळत नाही. अनुभव आपल्याला अधिक संयमी, समजूतदार आणि प्रगल्भ बनवतो. म्हणूनच, आयुष्यात केवळ ज्ञान मिळवण्यावर भर न देता अनुभव घेण्यालाही तितकेच महत्त्व द्यायला हवे. कारण ज्ञान आपल्याला मार्ग दाखवते, पण अनुभव आपल्याला चालायला शिकवतो. आणि या दोन्हींच्या संगमातूनच खरे शहाणपण निर्माण होते.
✦ भगवान बुद्ध : ज्ञान, करुणा आणि मध्यममार्गाचा तेजस्वी दीप… ✦ श्री दिवाकर बुरसे ☆
(भगवान बुद्ध जयंती विशेष)
प्रस्तावना
उद्या १ मे २०२६, शुक्रवार — वैशाख पौर्णिमा. हा दिवस केवळ चंद्राच्या पूर्णतेचा नाही, तर मानवजातीच्या अंतःकरणात प्रकटलेल्या अपूर्व प्रकाशाचा आहे. याच दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला, याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि याच दिवशी त्यांनी महापरिनिर्वाण प्राप्त केले, अशी श्रद्धा जगभरच्या बौद्ध परंपरेत रूजलेली आहे . म्हणूनच बुद्ध पौर्णिमा ही करुणा, प्रज्ञा आणि निर्वैरतेचा पवित्र उत्सव मानली जाते.
लुंबिनीचा दिव्य जन्म
इ. स. पू. ५६३ मध्ये नेपाळमधील लुंबिनी वनात क्षत्रिय शाक्य वंशात सिद्धार्थ गौतमांचा जन्म झाला. राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांच्या पोटी जन्मलेल्या या बालकाच्या ठायी पुढे जगाला जागृत करणारा बुद्ध पुरुष दडलेला होता. राजसुख, वैभव, सौंदर्य आणि स्नेह यांच्या कुशीत वाढलेला हा राजपुत्र जन्मतःच विलक्षण तेजस्वी होता.
दुःखदर्शनाची जागृती
संसाराच्या राजमार्गावरून फिरताना सिद्धार्थांच्या दृष्टीस चार दृश्ये पडली — जर्जर वृद्ध, रोगाने गांजलेला मनुष्य, मृतदेह आणि संन्यासी. त्या चार दृश्यांनी त्यांच्या जीवनाची दिशा बदलली. सुखाच्या मोहर्यांआड दडलेले दुःख प्रथमच स्पष्ट झाले. राजवैभवाचा त्याग करून वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला; हाच त्यांचा महाभिनिष्क्रमणाचा क्षण.
साधनेचा पथ आणि बुद्धत्व
कठोर तपश्चर्या, उपवास, मौन आणि ध्यान यांच्या वणव्यातून त्यांनी सत्याचा शोध घेतला. पण अतिरेकी काया-क्लेशाने मुक्ती मिळत नाही, हे उमगल्यावर त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला. बोधगया येथे निरंजना नदीकाठी पिंपळाच्या छायेत ध्यानस्थ होत त्यांनी अंतःप्रकाशाचा अनुभव घेतला आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले. त्या क्षणी मानवी वेदनेचा अर्थही उलगडला आणि तिच्या निरासाचा मार्गही दिसला.
धम्मचक्राचा पहिला सूर्य
ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धांनी सारनाथ येथे पाच भिक्षूंना पहिले प्रवचन दिले. तो केवळ उपदेश नव्हता; तो धम्मचक्राचा पहिला फिरता प्रकाश होता. त्या प्रवचनातून संसार, दुःख, कारण, निरोध आणि मार्ग यांचा उलगडा झाला. पुढे बुद्धांचा सारा धम्मप्रवास चार आर्यसत्ये आणि अष्टांगिक मार्गाभोवती फुलत गेला.
बुद्धांचे करुणामय व्यक्तिमत्त्व
बुद्धांचे व्यक्तिमत्त्व केवळ प्रभावी नव्हते, तर अंतर्मनाला शांती देणारे होते. त्यांची मुद्रा स्थिर, त्यांची वाणी गंभीर, त्यांचे नेत्र करुणेने ओथंबलेले आणि त्यांचा सहवास मनात नवी प्रसन्नता निर्माण करणारा होता. ते जिथे जात, तिथे भय निवळे, अहंकार मावळे आणि मनात प्रशांत तेज उमटे. त्यांच्यातील सौंदर्य हे देहाचे नसून चेतनेचे होते; म्हणूनच त्यांचा प्रभाव काळाच्या पलीकडे पोहोचला.
धम्माचा गाभा
बुद्धांचा संदेश अत्यंत साधा, पण अत्यंत गहिरा होता — दुःख आहे, दुःखाचे कारण आहे, दुःखाचा निरोध शक्य आहे, आणि त्या निरोधाचा मार्गही आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, सम्यक दृष्टि, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी — या सर्वांतून त्यांच्या धम्माची उंची आणि शिस्त प्रकट होते.
संघ, परिषदा आणि परंपरा
बुद्धधर्माचा पाया संघशिस्तीवर उभा होता. प्रवेश, आचरण, उपसंपदा, पवज्जा, पत्तिमोक्ख, पवारणा आणि गणतंत्रात्मक संघव्यवस्था यांमधून हा धम्म अधिक संघटित, अधिक शिस्तबद्ध होत गेला. बुद्धांच्या महानिर्वाणानंतर धम्मपरिषदांनी त्यांच्या शिकवणीचे संकलन केले. पुढे हीनयान, महायान आणि वज्रयान हे प्रवाह निर्माण झाले; त्रिरत्न — बुद्ध, धम्म, संघ — हीच श्रद्धेची अमूल्य त्रयी राहिली.
महानिर्वाणाचा क्षण
कुशीनगर येथे वयाच्या ऐंशीव्या वर्षी भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाण प्राप्त केले. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यातही त्यांनी शिष्यमंडळींना धम्मावर दृढ राहण्याचा उपदेश दिला. त्यांच्या निधनातही विलक्षण शांतता होती; जणू एक दीपक विझला नाही, तर अधिक व्यापक प्रकाशात विलीन झाला.
अमर वारसा
बुद्धांनी दिलेला संदेश आजही मानवतेला नवा मार्ग दाखवतो. क्रोध, लोभ, मोह, द्वेष यांच्या धुक्यात अडलेल्या जगाला त्यांचे जीवन चिरंतन दिशा देत राहते. त्यांनी सांगितलेला मध्यम मार्ग, करुणेची भाषा आणि अंतःशुद्धीचा आग्रह — हेच त्यांच्या जीवनाचे खरे वैभव आहे. बुद्ध पौर्णिमा म्हणजे त्या दिव्य जीवनाचा, त्या करुणामय दृष्टिचा आणि त्या जागृत प्रकाशाचा उत्सव.
रक्त उपलब्ध होत नाही तोवर शस्त्रक्रिया करणे अशक्य होतं. आज तिसरा दिवस. नऊ वर्षांच्या संतोषची प्रकृती आता अत्यंत नाजूक अवस्थेत पोहोचली होती.
संतोष पटेल चे वडील बांधकाम कारागीर तर आई शेतमजूर. मोठ्या बहिणीच्या लग्नात आई-वडिलांनी जमा केलेली पुंजी खर्ची पडलेली. छोट्या संतोषच्या शारीरिक तक्रारींकडे लक्ष द्यायला पोट भरण्याच्या लढाईत गुंतलेल्या वडिलांना फुरसत नव्हती. ते लोकांची घरं उभारून देत, पण स्वत:ला एक साधं छप्पर मिळवू शकलेले नव्हते निम्मं आयुष्य संपलं तरी. बांधकाम नसेल तेंव्हा विहिरी खोदून देण्याचं जोखमीचं काम करावं लागायचं…. अनेकदा विहिरी ढासळत, पण सुदैवाने डोक्यावर दगड नाही पडला. हात-पाय तर किती तरी वेळा जायबंदी झाले त्याची गणना नाही. आई शेतमजुरी करायची. आणि या दोघांनी मिळून जरा बरी कमाई केली की घरात तांदूळ यायचा. अन्यथा पुढचे दिवस गव्हाची भरड, आणि ती संपली की ज्वारीच्या कण्या… यावर गुजराण करावी! मजुरी आणि अर्धा एकर कोरडवाहू जमीन यापेक्षा जास्त नाही देऊ शकत!
संतोष अभ्यासात हुशार होता, पण आळस करी. मग आई त्याला झाडाला बांधून चोप देई… म्हणे…. या गरीबीतून बाहेर पडायचे असेल तर एकच मार्ग आहे…. शिक्षणाचा!
पोरगं आठवीच्या परीक्षेत जिल्ह्यात पहिलं आलं तेंव्हा आई-वडिलांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९२% मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तरीही पुढील शिक्षणाच्या खर्चाचा प्रश्न होताच. मग बांधकामावर विटा वाहणे आणि अशी अन्य कामे करून संतोष थोडाफार हातभार लावत होताच.
पुढे इंजीनियरींगसाठी भोपाळमध्ये आल्यावर भाजीवाल्याने मोफत दिलेल्या भाजीवर दिवस काढले. कुणीतरी मार्केटिंग मध्ये खूप पैसे आहेत, असे सांगितल्यावर तिकडे मोर्चा वळवला… आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. यावर आईने अशी काही खरडपट्टी काढली की विचारता सोय नाही! त्या माऊलीने गरिबीशी पैंज लावली होती….. मी नाही जिंकू शकले…. माझा मुलगा जिंकून दाखवेल तुझ्या विरोधातली लढाई!
— आईच्या शब्दांनी पुन्हा मार्गावर आणले खरे पण नोकरी काही मिळेना. वडील म्हणाले… घरी येऊन जनावरं सांभाळ, शेतात लक्ष घाल. बांधकामे तर मिळतात मला अजूनही…. मदतीला आलास तर चांगला रोजगार मिळेल!
गाव गाठलं. योगायोगानं वन विभागात रखवालदाराची तात्पुरती नोकरी मिळाली….. आणि तिथे अभ्यासाला वाव होता. जंगलातली शांतता आणि साहेब लोकांच्या निवासस्थानाबाहेरच्या दिव्यांचा प्रकाश…. मार्ग सापडला. मध्य प्रदेश पब्लिक सर्विस कमिशनची (MPPSC) ची परीक्षा दिली… एकट्याने अभ्यास करून. केवळ चार गुणांनी पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला… आणि मग आणखी नेट लावत, पंधरा महिन्यांनी झालेल्या त्याच परीक्षेत राज्यात २२ वा क्रमांक पटकावत DEPUTY SUPERINTENDENT OF POLICE पदाला गवसणी घातली! पहिल्या प्रयत्नात अपयश मिळाल्या दिवसापासून दाढी न करण्याची शपथ घेतली होती….. पंधरा महिने वाढलेली दाढी लाल दिव्याच्या गाडीत बसण्याआधी काढली…. जिद्दच होती तशी.
लग्न केलं ते पारंपारिक पद्धतीने. नव्या नवरीची वरात सायकल रिक्षातून काढली होती. एका डी. एस. पी. अधिका-याचे असे लग्न लोकांनी पहिल्यांदाच पाहिले असावे.
आपण सोसलेल्या गरिबीच्या झळा इतरांना बसू नयेत यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले. विविध माध्यमांमधून नवोदित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, व्यवसाय मार्गदर्शनासाठी साहाय्य मिळवून द्यायला सुरुवात केली. सोशल मिडीयाचा अत्यंत प्रभावी वापर करीत संवाद वाढवत नेला. आज हजारो विद्यार्थी संतोष कुमार पटेल यांच्याशी जोडले गेलेले दिसतात! पडत्या काळात मदतीचा हात दिलेल्या लोकांना शोधून त्यांचे हात हातात घेऊन धन्यवाद देणारा हा अधिकारी… याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत!
नऊ वर्षांचा संतोष…. वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही, शहरात जायला पैसा नाही… मग गावातल्या झाडपाल्यावाल्या बाबांच्या आश्रयाला जाणे आलेच. शरीराच्या वरवरच्या जखमांवर झाडपाला उपयुक्त असतो, हे जरी खरे असले तरी त्यापेक्षा मोठ्या व्याधीने शरीर ग्रासले की मृत्यू ठरलेला. संतोष असाच मरणासन्न अवस्थेत पोहोचल्यावर कुणाकडून तरी उधार उसनवारी करीत त्याला मोठ्या रुग्णालयात आणले होते. शस्त्रक्रिया करायची ठरले.. पण रक्त द्यावे लागणार होते. १९९९ चा तो काळ. त्यावेळी त्या भागात रक्तदान करणे म्हणजे स्वत:ला कमजोर करून घेणे, असा समज होता. त्यामुळे रक्तदान करायला कुणी सहजासहजी तयार होत नसे. संतोषची शस्त्रक्रिया त्यामुळेच वेळेमध्ये होऊ शकली नाही. एक एक दिवस उलटत होता!
संतोष दाखल असलेला WARD तिस-या मजल्यावर होता. संतोषचे वडील सुपारी चघळत असत. असेच चिंतागती बसलेले असताना त्यांनी तोंडातील सुपारी वरून खाली टाकली…. ते नेमके खाली असलेल्या एका सफाई कर्मचा-याने पाहिले. मोठ्या तिरीमिरीतच तो कर्मचारी संतोषच्या वडिलांची खबर घेण्यास वर आला…. त्याने तोंडाचा पट्टा सोडलाच होता… पण संतोषचे वडील शांत उभे राहून दिलगिरी व्यक्त करीत होते. डोळ्यांत आसवे होती. त्या सहृदय कर्मचा-यास वाईट वाटले. त्याने परिस्थिती समजावून घेतली आणि “मी देतो रक्त! ” म्हणून रक्तदान करायला तो तयार झाला…. काहीही अपेक्षा न ठेवता. योगायोगाने त्याचा रक्तगट जुळला आणि संतोषचा जीव बचावला! सख्खे खानदान उपयोगात आले नाही पण हे खूनदान (रक्तदान) करायला अनोळखी माणूस आला…. संतू मास्टर त्याचे नाव! परिस्थितीने दोन गरीब कुटुंबांना रक्ताच्या नात्यात बांधले ते कायमचे.
संतोष पटेल साहेबांचे वडील अधून मधून संतू मास्टर यांच्या घरी जाऊन येत असत. नंतर त्यांचा संपर्क कमी झाला असावा. कारण दोघांची राहण्याची ठिकाणे दूर दूर होती. दिवस पुढे निघून गेले. मोठ्या होत गेलेल्या संतोषकुमार पटेल साहेबांना हे रक्ताचे काका आठवणीत होते. जीवनाच्या धकाधकीत काही गोष्टी मागे पडतात.
पुढे सतना स्टेशनमध्ये साहेबांचे काही काम निघाले आणि त्यांना लहानपणीची ती रक्तदानाची कथा आठवली. त्यांनी त्या रक्तदात्याचे घर शोधण्याचे ठरवले. तीन तास शोधाशोध केल्यावर एका अत्यंत गरीब वस्तीत संतू मास्टर रहात असत…. असे समजले. दोनच महिन्यांपूर्वी एका शाळेत सफाई करताना त्यांना सर्पदंश झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू ओढवला होता!
डी. एस. पी. साहेब साध्या वेशात आपल्या सहकारी कर्मचा-यांसह संतू मास्टर यांच्या घरी पोहोचले. त्यांचा मुलगा मजुरीसाठी बाहेरगावी गेलेला आहे. संतू यांच्या दोन मुली आणि थोरल्या मुलीच्या दोन लहानग्या मुलीसुद्धा होत्या घरात. मोठ्या मुलीच्या चेह-यावरून साहेबांनी तीच संतू मास्टर यांची मुलगी हे ताडले. तिच्या पायांना स्पर्श केला… हातावर काही पैसे ठेवले… आशीर्वाद मागितला. म्हणाले…. ‘ मी तुमचा भाऊच आहे…. तुमच्या वडिलांची भेट नाही होऊ शकली. पण त्यांचेच रक्त माझ्या शरीरात वाहते आहे. आयुष्यात काहीही गरज पडली तर तुम्हांला आणखी एक भाऊ आहे, हे लक्षात ठेवा. ‘.. असं म्हणत साहेबांनी त्या लहानग्या मुलींच्याही पायांना स्पर्श करीत आशीर्वाद घेतले! संतू मास्टर यांच्या धाकट्या मुलीच्या लग्नात कन्यादानाची जबाबदारी सुद्धा घेतली!
मागे एकदा बालाघाट दौ-यावर असताना त्यांनी एका वृद्धाश्रमाला भेट दिली होती. साहेबांच्या पत्नीचा वाढदिवस त्यांनी त्या वृद्धाश्रमात साजरा करण्याचे ठरवले होते. तेथील पूरन सिंग ठाकूर नावाच्या एका वृद्धाने पटेल साहेबांना खास पोलिसी पद्धतीने SALUTE केल्यावर पटेल साहेबांनी त्या वृद्धाची चौकशी केली. तर ते साहाय्यक फौजदार निघाले. पत्नीच्या निधनानंतर विमनस्क अवस्थेत त्यांनी घरदार सोडले, लहान मुलाला सोडून ते भटकत हिंडू लागले होते… व्यसने, आजार आणि मानसिक विकार यांनी ग्रासले गेल्याने त्यांना स्वत:बद्दल फार काही सांगता येत नव्हते… आणि त्यांनी घरदार सोडून चाळीस वर्षे उलटून गेली होती. पटेल साहेबांनी त्यांच्या पद्धतीने संवाद साधत तीन गोष्टी जाणून घेतल्या… त्या साहेबांच्या गावाची साधारण माहिती… आणि ते नोकरीत असताना फुटबॉल खेळत असत. या एवढ्या माहितीवरून पटेल साहेबांनी एक रील प्रसारित केला, त्यांच्या पोलिस खात्यातील मित्रांच्या मदतीने पूरन सिंग यांच्या मुलाचा शोध घेतला…. आणि त्यांना त्यांच्या घरी पोहोचवले! अशा अनेक कहाण्या आहेत… या प्रामाणिक आणि माणुसकीची जाण असलेल्या पोलिस अधिका-याच्या!
वर्दीला मान आहे, सन्मान आहे आणि भीतीयुक्त आदरही. या पदावर पोहोचणारे कुठून तिथे पोहोचलेले असतात ते कुणास ठाऊक? पण जे आपली पाळेमुळे विसरून जातात त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची? अनेकजण तर मागे वळून पहात नाहीत. पण संतोष कुमार पटेल, D. S. P. पोलिस विभाग, मध्यप्रदेश यांच्यासारखेही हिरे असतात. पन्ना जिल्ह्यात जन्मलेला हा हिरा म्हणूनच अधिक चमकदार भासतो.
गांव का डीएसपी नावाने श्री. संतोष कुमार पटेल एक फेसबुक पेज चालवतात. याद्वारे विविध विषयांवर विडीओज बनवतात आणि प्रसारित करतात. तरुणांना मार्गदर्शन, समुपदेशन करतात!
— — सकारात्मक गोष्टीही घडत असतात समाजात… त्या आपल्या दृष्टीस पडाव्यात म्हणून ही कहाणी सांगितली. तुम्हांलाही असे काही ठाऊक असल्यास लिहा.