मराठी साहित्य – विविधा ☆ एका जमलेल्या कटिंगची कहाणी ☆ श्री विनय माधव गोखले

श्री विनय माधव गोखले

? विविधा ?

☆ एका जमलेल्या कटिंगची कहाणी ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

दुकानात माझे आगमन झाल्यावर प्रसन्नपणे “या, बसा!” असे म्हणून त्याने एका बैठकीकडे निर्देश केला.

त्या आलिशान लोखंडी खुर्चीत माझी स्थापना केल्यावर एक पांढरेशुभ्र वस्त्र माझ्याभोवती आच्छादून गळ्याभोवती नाडीची एक हलकीशी गाठ मारून टाकली. थंडीच्या सुरूवातीला सारसबागेच्या तळ्यातील गणपतीला जसे स्वेटर परिधान करतात अगदी तसे…

नंतर ‘शुध्दोदक स्नान’ म्हणून डोक्यावर प्लास्टिकच्या पिचकारीतून फवारले.

ह्या सोपस्कारानंतर रेडिओ सुरू केला. त्यावर लता दीदींची, आशाताई, किशोरदा, मुकेशजी, रफीसाहेबांची गाणी लागत होती. मला ती सर्व गणपतीची, दुर्गेची, शंकराची, हनुमानाची, पांडुरंगाची आरती म्हटल्याप्रमाणे भासू लागली. त्याजोडीनेच त्याच्या कर्मपूजेला प्रारंभ झाला…

डोक्याशी “कटकट” “कटकट” करीत होता तो… पण ती सुखद वाटत होती. जणू काही कंगवा आणि कात्री ह्यांचे माझ्या डोक्याच्या मैदानावर द्वितालात केश-स्केटिंग चालले होते.

कधी ‘शिरगडा’च्या बालेकिल्यावरील गवताची टोके उडवली जात होते तर कधी तिन्ही उतारांवरील गवत कापले जात होते. कपाळावर केस पुढे ओढून कात्रीने समलांबीचा एक ‘साधना-कट’ मारून दिला. सरतेशेवटी कानामागील घळीमध्ये पाण्याचे बोट फिरवून वस्तर्‍याने अर्धकमानाकृती कोरण्याचे काम करणे चालू केले. तिथे वस्तर्‍याचा होणारा “खर्र खर्र” आवाज काळीज चिरल्याइतका स्पष्टपणे ऐकू येत होता. मानेवरील गवत वस्तर्‍याने हटवून गडाच्या पायथ्याशी वाहनतळासाठी जागा मोकळी केली. थोड्या वेळाने सर्व आवाज थांबले आणि मी भानावर आलो.

नंतर एखाद्या ‘घटम्’ वर ताल धरावा तसे त्याने डोक्याला बोटाने हलका मसाज करून दिला. फारच बरे वाटले.

तत्पश्चात त्याने मऊ ब्रशने गवताच्या सीमेवर पावडरची पखरण केली व एक खरखरीत ब्रश फिरवून तण काढून टाकावे तसे जमिनीला चिकटलेले सुट्टे गवत बाजूस काढले. नंतर जमीन नांगरटावी तसा माझा चौफेर भांग पाडून दिला.

पांढर्‍या वस्त्रावरील काळ्या गवतामध्ये बराच पांढरा-राखाडी रंग जमल्याचे पाहून मनात क्षणभर चिंतेचे काळे ढग दाटून आले. पण क्षणभरंच…

पांढर्‍या वस्त्राच्या नाडीची गाठ सोडून त्यावर जमलेले सर्व ‘निर्माल्य’ त्याने जमिनीवर हलकेच झटकून टाकले आणि नंतर केरसुणीने गोळा करून बादलीत माझ्या नजरेआड केले.

एकंदरीतच त्याने गवत मध्यम कापल्याचे आरशात पाहिल्यावर मला बरे वाटले. गेल्या वेळेस त्याने माझी मुंज करण्याचाच घाट घातला होता…असो.

“पुनरागमनाय च।” असा मनातल्या मनात विचार करून पुन्हा एकदा स्वत:ला आरशात निरखून मी माझे आसन हलवले. त्याच्या सलूनमध्ये कुठे “ग्राहको देवो भव।” किंवा “ग्राहक हाच देव।” असा संदेश चिकटवला आहे का ते मी शोधले पण नव्हता. त्याला दहा रुपये जास्त द्यावे असाही सुविचार मनात डोकावला.

तेवढ्यात त्याने मला नको तो प्रश्न विचारलाच… “अंकल, बाल कलर करवाने है क्या? अच्छे दिखेंगे…”😡😡

त्याने सांगितले तेवढेच पैसे चुकते करून घरी आलो. दोन बादल्या पाणी डोक्यावर ओतल्यावर ‘शिरगडा’स थंडावा पोहोचला.

उन्हाळ्यात थंड पाण्यासारखे आरोग्यदायी दुसरे काहीच नाही, तुम्ही सुध्दा अनुभव घ्या!😄

 

© विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पारावरचा चहा… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ पारावरचा चहा… ☆ डॉ. ज्योती गोडबोले  ☆ 

त्या सगळ्या मैत्रिणी आता निवृत्त झालेल्या। सगळ्या जबाबदार्यातून म्हटले,तर मुक्त झालेल्या। अशीच, ग्रुप मधील उत्साही मनू एकदा म्हणाली, “अग ऐकाना। मला एक मस्त आयडिया सुचलीय। आपण एरवी भेटतो तेव्हा घाईघाई ने भेटतो, निवांत गप्पा होतच नाहीत मी परवा माझ्या नवऱ्या बरोबर अशीच गेले होते तेव्हा एका ठिकाणी मस्त चहा प्यायला. गम्मत म्हणजे, त्या चहा वाल्याने समोर असलेल्या, मोठ्या झाडालाच पार बांधलाय. गुळगुळीत. आणि त्यावर बसवून तो चहा देतो. इतकी मजा वाटली ग. तर आपण निदान  महिन्याने तरी जमूया का.”  सीमा म्हणाली “हो, मला चालेल.”

सगळ्या तयार झाल्या. मनु अगदी आनंदून गेली नवरा म्हणाला, “मनु, आपण जातो ते ठीक, तुझ्या म्हाताऱ्या कसल्या यायला.”

मनु खट्टू झाली. “बघूया आता, ठरवले तर आहे.”

ठरवलेल्या तारखेला, 10 च्या दहा सख्या हजर होत्या. त्यांना त्या पाराची खूप गम्मत वाटली. हॉटेल सारखे बंधन नव्हते तिथे की मागे माणसे खोळंबून उभी आहेत. खूप गप्पा मारल्या आणि निवांत घरी गेल्या. मनु म्हणाली, “बघ बघ प्राची, चेष्टा केलीस ना, पण बघ. सगळ्या ग माझ्या सख्या आल्या न चुकता.” पुस्तकातले डोके वरही न काढता प्राची म्हणाली, “मासाहेबा, जरा रुको तो. आगे आगे देखो, होता है क्या.”

मनूने तिच्या पाठीत धपका घातला म्हणाली, “बाई, नको ग बोलू असे.जमलोय तर जमू दे की.”

प्राची,म्हणाली, “उगीच चिडू नको ग. मागच्या अनुभवावरून म्हणतेय मी.”

नवरा म्हणाला “प्राची आपल्या आई इतका उत्साह नसतो कोणाला. ही जाते जीवाची धडपड करत आणि त्या म्हाताऱ्या सतरा कारणे सांगतील बघ. गप बसा तुम्ही बाप लेक. काही सांगितले, की केलीच चेष्टा. मी सांगायलाच नको होते.”

मनु आत निघून गेली. पुढच्या वेळीही पारावर दहाचा आकडा जमला. मनूला धन्य धन्य झाले. गप्पा झाल्या आणि  निघताना,मनीषा म्हणाली, “ए, सॉरी ग.मला पुढच्या वेळी जमणार नाही यायला का ग मनीषा? आता काय झाले.”

“अग काय होणार। सूनबाई ची deadline आहे बाई.”

मला म्हणाल्या, “बंटी कडे बघाल ना जरा? कसली येणार मी आता मग.”

“काय आई साहेब. गप्पशा. आज कोरम फुल नव्हता वाटते.” प्राचीने विचारलेच.

मनू चिडचिड करत म्हणाली, “ होता,, होता ग बाई. पण पुढच्या वेळी,मनीषा मावशीला जमणार नाही म्हणे.

“अग, देवयानी म्हणाली, सुद्धा. फारच करते हो, ही मनीषा. काय मेलं महिन्यातून एकदा भेटतो, तेही जमू नये का. असो. चला, मी आज भेळ देते सगळ्यांना.”

“किस खुशीमे ग देवी?”

“काही नाही ग. आता जून आलाच. अमेरिकेची हाक आली लेकीची नोकरी, आणि तिच्या पोरांना समर हॉलिडेज. मग काय. आहोतच की आम्ही. विहिणबाईंची आईआजारी आहे मग त्यांना जमत नाहीये. आमचे हे. लगेच उडी मारून तयार.”

“जाऊ ग देवी आपण. तुला का नको असते ग यायला?”

देवी म्हणाली “याना काय होतंय बोलायला। तिकडे गेलो की, नुसते सोफ्यावरबसायचे 24 तास तो, tv आणि मला हुकूम. कामाने कम्बरडे मोडून ग जाते माझे एवंच काय तर, मीही जून पासून रजा बर.”

मनू गप्पच बसली. प्राची आणि नवरा घरीच होते. प्राची म्हणाली, “आज ही मेंबर गळाला वाटते.” आई जवळ येऊन बसली, आणि म्हणाली आई, “कम ऑन. चीअर अप.”

“असे होणारच मॉम. तू का चेहरा पाडून बसतेस. तुझ्या परीने तू खूप केलेस ना ग प्रयत्न सगळ्या जुन्या मैत्रिणी एकत्र याव्या, सुखदुःखाच्या गोष्टी share कराव्या. पण मॉम, लोकांच्या priorities वेगळ्या असतात तुझ्या इतके sincere आणि हृदय गुंतवणारे लोक फार कमी असतात मॉम. म्हणून तुला त्याचा त्रास होतो ग. दे सोडून. इतके दिवस भेटलात, हसलात, मजा केलीत, हेच बोनस म्हण .”

“हे बोलतेय ती प्राचीच का?” मनूने डोळे उघडून नीट बघितले। इतकी कधी समजूतदार आणि mature झाली आपली मुलगी? बॉयकट उडवत,विटक्या  जीन्स  घालणारी, भन्नाट कार चालवणारी, पण लग्नाचे नाव काढले तर खवळून उठणारी, मोठ्या पगाराची नोकरी करणारी आपली मुलगी, इतकी प्रगल्भ आहे? मनूच्या डोळ्यातच पाणी आलं. प्राची म्हणाली, “आई,चल मस्त मूड मध्ये ये तुला एक surprise आहे .छान साडी नेसून तयार हो ग.”

“आणखी काय धक्के देतेय प्राची”, म्हणतमनु साडी नेसून तयार झाली. बेल वाजल्यावर प्राचीने दार उघडले. एक स्मार्ट रुबाबदार तरुण उभा होता.

“आई बाबा, हा निनाद ग माझ्या ऑफिस मध्ये बॉस आहे माझा. तुला आठवतं का ग. मागे म्हणाली होतीस, की आज चहा च्या पारावर एक बाई माझी चौकशी करत होत्या?त्या याचीच आई बर का. मी तुला सोडायला नव्हते का आले, कार ने तेव्हा त्यांनी मला बघितले. या खुळ्या ला तोपर्यंत मला विचारावेसे वाटले नाही. पण याच्या आईनेच माझी माहिती तुझ्या कडून काढली। आधी नुसताच बॉस होता. मागे  निनाद च्या आई उभ्या होत्या. मनु ला अगदी गोंधळल्या सारखे झाले.

“अहो, आत याना. प्राचीच्या आई, प्राचीने आम्हाला तुमच्या चहाच्या पारा बद्दलसगळे  सांगितले आहे बर का. कट्ट्या वरचे तुमचे सभासद कमी होईनात का पण पारावरच्या चहाने तुम्हाला जावई तर झकास मिळवून दिला की नाही।“

मनू ला या सगळ्या योगाचे  अतिशय आश्चर्य वाटले। निनाद च्या आई म्हणाल्या “अहो त्या दिवशी मी आणि हे असेच त्या पारावर चहा प्यायला आलो होतो. तर ही मुलगी तुम्हाला सोडताना दिसली म्हणून पुढच्या वेळी मी मुद्दाम तुमच्या कडून माहिती काढली. आणि केवळ योगायोगानेच निनादच्याच ऑफिस मध्ये ही काम करते, हे समजले. मग काय, निनाद ला विचारले. आणि तो हसत हिला विचारायला तयार झाला. घाबरत होता कसे विचारायचे. ही बिनधास्त आहे फार म्हणून. तर, असा तुमचा चहाचा पार, आपल्या दोघांना पावला म्हणायचा. निनाद प्राची, या रविवारी, आपण सगळ्यांनीच जायचे हं पारावर।” सगळ्यांच्या हसण्याने घर नुसते दणाणून गेले मनूचे।

©️ डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवा तुझे खूप खूप आभार! ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ देवा तुझे खूप खूप आभार! ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

🕉️देवा तुझे खूप खूप आभार!

👏हे ईश्वरा!!👏…..

कोणताही अर्ज केला नव्हता की कुणाचीही शिफारस नव्हती,…..

असे कोणतेही असामान्य कर्त्तृत्व ही नाही तरीही अखंडपणे तू माझे हे हृदय चालवत आहेस…..

चोवीस तास जिभेवर नियमित अभिषेक करत आहेस…..

मला माहीत नाही खाल्लेले न थकता पचवून सातत्यपूर्ण कोणतीही तक्रार न करता चालणारे कोणते यंत्र तू फिट करुन दिले आहेस..,..

पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत विना अडथळा संदेश वहन करणारी प्रणाली कोणत्या अदृष्य शक्तीने चालते आहे काही समजत नाही…..

मी मात्र ती कशी चालते हे सांगून खोटा अहं पोसतो आहे…..

लोखंडाहून टणक हाडांमध्ये  तयार होणारे रक्त कोणते जगावेगळे आर्किटेक्चर आहे याचा मला मागमूसही नाही……

हजार हजार मेगापिक्सल वाले दोन दोन कॅमेरे अहोरात्र सगळी दृश्ये टिपत आहे…..

दहा दहा हजार टेस्ट करणारा जीभ नावाचा टेस्टर,…..

अगणित संवेदनांची जाणीव करुन देणारी त्वचा नावाची सेन्सर प्रणाली,…..

वेगवेगळया फ्रिक्वेंसीची आवाज निर्मिती करणारी स्वरप्रणाली आणि त्या फ्रिक्वेंसीचे कोडींग डीकोडींग करणारे कान नावाचे यंत्र,…..

पंच्याऐंशी टक्के पाण्याने भरलेला शरीर रुपी टँकर हजारो छिद्रे असतानाही कुठेही लिक होत नाही…..

अद्भूत,…..

अविश्वसनीय,…….

अनाकलनीय……

अशा शरीर रुपी मशीन मध्ये कायम मी आहे याची जाणीव करुन देणारा अहं देवा तू असा काही फिट बसविला आहे की आणखी काय मागाव? मी……

आता आणखी काही हवंय अशी मागणी सुद्धा शरम वाटायला भाग पाडते……

आजच्या दिवशी एव्हढेच म्हणावेसे वाटते मी या शरीराच्या साहाय्याने तुझ्या प्रेम-सुखाची प्राप्ती करावी! यासाठीच्या तुझ्या या जीवा शिवाच्या खेळाचा निखळ, निस्वार्थी आनंदाचा वाटेकरी राहीन अशी सद्बुद्धी मला दे……

तूच हे सर्व सांभाळतो आहे याची जाणीव मला सदैव राहू दे……

देवा तुझे मनापासून मरेपर्यंत खूप खूप आभार……..

🕉️

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वसंतोत्सव… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ वसंतोत्सव… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

‘कोकीळ कुहू कुहू बोले’ गाण्याचे बोल रेडिओवरून कानावर पडताच वसंत ऋतुची चाहूल मनाला लागली! फाल्गुनातील रंगपंचमीचा रंग उधळत होळीच्या सणाची सांगता होते आणि वेध लागतात ते वसंताचे! सूर्याच्या दाहक किरणांनी सृष्टी पोळली जात असतानाच वसंताचे होणारे आगमन नकळत सृष्टीतील नव्या बदलाची जाणीव करून देते.  संध्याकाळी येणारी थंड वाऱ्याची झुळूक वसंताचा निरोप आपल्याला देते! सुकलेल्या झाडांना पालवी येण्याचे दिवस जवळ येतात. पिवळी, करड्या रंगाची, वाळलेली पाने जमिनीवर उतरतात.जणू ती आपल्या आसनावरून- जागेवरून- पायउतार होतात आणि नव्याला जागा करून देतात.कॅशिया, गुलमोहरा सारखी रंगांचे सौंदर्य दाखवणारी झाडे आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर केशरी, जांभळे पिसारे फुलवून उभी असतात. त्याच वेळी आंब्याचा मोहर आपला सुगंध पसरवीत असतो!

आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक ऋतुचे स्वागत आपण सणाने  करतो. वसंत ऋतु येतो तेव्हा चैत्रगौरीचा उत्सव सुरू होतो.

पूर्वी अंगणात चैत्रांगण घातले जाई.या चैत्रांगणातून चंद्र, सूर्य, गाई, झोका, कैरी … अशा विविध प्रतीकांची रांगोळी काढली जाई. निसर्गाप्रती कृतज्ञता दाखवण्याचा हा उत्सव असतो. चैत्री पाडव्या नंतर येणाऱ्या पहिल्या तीजेला चैत्र गौरीची

स्थापना करतात. देवीचा उत्सव म्हणून तिला पानाफुलांची सजावट करून झोक्यावर बसवतात. रुचकर कैरीची डाळ, कैरीचं पन्हं आणि खरबूज, कलिंगडासारखी थंड फळे देवीसमोर ठेवली जातात. या सर्व गोष्टींचा एकत्रित आनंद घेता यावा म्हणून चैत्रागौरीचे हळदी कुंकू केले जाते. अक्षय तृतीये पर्यंत हा सण साजरा केला जातो. हळदीकुंकू सारख्या समारंभात सुगंधित गुलाब पाणी शिंपडून, अत्तर, गुलाब देऊन सुवासिनी वसंताचे स्वागत करतात.

काही ठिकाणी ‘वसंत व्याख्यानमाला’चे कार्यक्रम चालू असतात. अशा व्याख्यानमालां मुळे लोकांना नवीन ज्ञान आणि मनोरंजन मिळत असते. याच काळात गायनाचे कार्यक्रम होत राहतात. कोणत्याही ऋतूत, सण साजरे

करून माणूस  आनंद शोधत असतो. आणि त्यानिमित्ताने निसर्गाची जवळीक साधली जाते!

पंजाब, उत्तर प्रदेश यासारख्या  भागात या दिवसात कलिंगड, खरबुजे यासारखी फळे ही थंड म्हणून खाल्ली जातात.फ्रीजच्या पाण्यापेक्षा माठातील  पाणी अधिक चांगले असते. त्यात वाळा, मोगरा टाकला की पाण्याला एक प्रकारचा सुगंधही येतो.

आपल्या महाराष्ट्रात कोकम, लिंबू, कैरी,वाळा,खस यांची सरबते थंडाव्यासाठी आपण वापरतो. निसर्गाने दिलेले नैसर्गिक पदार्थ या उन्हाळ्याच्या काळात वापरणे हे शरीराला हितकर असते. पुढे येणाऱ्या वर्षा ऋतूत कोणतेही त्रास होऊ नयेत म्हणून शरीराला सज्ज ठेवण्याचे काम नैसर्गिक विटामिन ‘सी’ घेण्यामुळे  होत असते!

वसंत ऋतुची खासियत यातच आहे की, हा ऋतू नवीन सृजनाची  सुरुवात करून देतो. वसंतोत्सवामुळे नवचैतन्य दिसते. शिशिर आणि हेमंत ऋतूत थंड, निद्रिस्त झालेले वातावरण वसंत ऋतूच्या आगमनाने चैतन्यमय बनते आणि तोच निसर्गाचा खरा ‘वसंतोत्सव’ असतो !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! लग्नातला सुट ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

💃 लग्नातला सुट !😅

“पंत गुडमॉर्निंग !”

“गुडमॉर्निंग, गुडमॉर्निंग मोऱ्या, कसा आहेस ?”

“मी बरा आहे, पण तुमचा मूड एकदम खास दिसतोय आज मला !”

“खास म्हणजे काय बुवा, नेहमी सारखा तर आहे.”

“नाही पण नेहमी पेक्षा आज तुम्ही जास्त आनंदी दिसताय, काकू माहेरी वगैरे गेल्या की काय?”

“मोऱ्या उगाच अकलेचे दिवे पाजळु नकोस, अरे बायको माहेरी जाणार याचा आनंद तुझ्या सारख्या लग्नाला दोन वर्ष झालेल्या नवऱ्यांना होतो ! आमच्या लग्नाला तब्बल  चाळीस वर्ष झाली आहेत !”

“ते ठीक आहे पंत, मला फक्त तुम्ही एव्हढे खूष का ते सांगा, म्हणजे मी घरी जायला मोकळा.”

“मोऱ्या परवा लग्नाला गेलो होतो केळकरच्या मुलीच्या, तर….!”

“त्यात एवढा आनंद साजरा करण्या सारखं काय ?”

“तुला सांगतो असं लग्न मी माझ्या अख्या आयुष्यात अटेंड केलेले नाही मोऱ्या आणि या पुढे तशी शक्यताही नाही !”

“ते तर सांगाच, पण ते कोपऱ्यात स्पेस सूट सारखं काय पडलंय पंत ? तुमचा मुलगा नासा मध्ये काम करतो म्हणून काय US वरून स्पेस सूट मागवाल की काय ?”

“तेव्हढी अक्कल देवाने दिल्ये मला आणि तो स्पेस सूट नाही पण जवळ जवळ…. “

“तसंच काहीतरी आहे, पण ते काय आहे ते तुम्हीच…. “

“तेच तर सांगतोय तुला, पण मला बोलू तर देशील का नाही मोऱ्या ?”

“सॉरी, सॉरी पंत बोला !”

“अरे मी तुला मगाशीच म्हटलं ना, की परवा केळकरच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो तिथे….. “

“हे सूट वाटत होते की काय पंत ?”

“मोऱ्या आता एक काम कर, आमचा  पेपर आणला असशील तर तो दे आणि चालायला लाग !”

“पंत खरंच सॉरी, आता नाही तुम्हाला अडवत, बोला तुम्ही.”

“अरे असं बघ सध्या कोरोनाची साथ चालू आहे, त्यात लग्नाचा मुहूर्त, सगळी तयारी वर्ष सहा मिहिन्यापासून चालू होती केळकराची आणि त्यात हा नेमका कोरोना तडफडला.”

“हो ना !”

“पण केळकर डगमगला नाही. त्यानं मुलाकडच्या लोकांना ठणकावून सांगितल, लग्न ठरल्या प्रमाणे होणार म्हणजे होणारच.”

“आणि लग्न ठरल्या प्रमाणे झालं, हे कळलं, पण त्या स्पेस सूटच कोडं काय ते तरी सांगाल का आता ?”

“तू म्हणतोयस तसा हा स्पेस सूट वगैरे काही नाही, पण कोरोना पासून रक्षण करायला हा हॉस्पिटलमधे डॉक्टर लोक वापरतात तसलाच आहे हा PPE सूट आहे !”

“अस्स, मग तो तुमच्यकडे कसा आला, तुम्ही तर साधे भोंदू वैदूही नाही !”

“मी रागवत नाही म्हणून उगाच फालतू विनोद नकोयत, अरे हा मला परवाच्या केळकराच्या लग्नात मिळाला.”

“तुमचे एकवीसचे पाकीट कितीतरी पटीने वसूल झाले म्हणायचे पंत !”

“ते सोड, पण मला एकट्यालाच नाही तर लग्नाला आलेल्या सगळ्याच वऱ्हाडी मंडळीना हा PPE सुट मिळाला !”

“काय सांगता काय पंत ? पण हा सूट प्रत्येकाला देण्यामागच कारण काय ?”

“अरे आजकाल कोरोनाचा सगळ्यांनी धसका घेतला आहे ना, त्यापासून बचाव नको का व्हायला मोऱ्या.”

“अहो पंत पण त्यासाठी साधं हॅन्ड सॅनिटायझर पण चाललं असतं की !”

“अरे त्याच्या पण प्रत्येकाला एक एक डझन बाटल्या दिल्या केळकराने, आहेस कुठे ?”

“केळकरांची खरच कमाल आहे म्हणायची. पण पंत सगळेच वऱ्हाडी सूट घालून आले असतील तर त्यांनी एकमेकांना कसं काय बुवा ओळखल?”

” मोऱ्या तो सूट नीट बघितलास तर तुला कळेल, की माझ्या नावाची नेम प्लेट आहे त्या वर.”

“हां, आत्ता दिसली मला ती. पण मग एकमेकांशी बोलतांना काही… “

“काहीच प्रॉब्लेम आला नाही, त्या सूटच्या आत तोंडा जवळ एक छोटा माईक बसवला आहे आणि काना जवळ इयर फोन!”

“अरे व्वा, पण सध्या जमाव बंदी आहे आणि लग्न म्हटलं की 500-600 लोक आले असणारच लग्नाला !”

“तेच तर सांगतोय ना मोऱ्या, केळकर म्हणजे बड खटलं !  पठयाने एका हॉटेल मधल्या शंभर रूम बुक केल्या होत्या.”

“म्हणजे अख्ख हॉटेलच म्हणा की.”

“तसंच काहीस आणि एका एका रूम मधे सूट घालून फक्त पाच पाच लोक, म्हणजे जमावबंदी… “

“मोडायचा प्रश्नच नाही. पण मग लग्न कसं काय अटेंड केल लोकांनी, वेगवेगळ्या शंभर रूम मधे बसून ?”

“अरे प्रत्येक रूम मधे टीव्ही असतो हे विसरलास की काय ?”

“ओके, ओके, म्हणजे सगळ्या वऱ्हाड्यांनी वेगवेगळ्या रूम मधे बसून आपापल्या रूम मधल्या टीव्हीवर लग्न… “

“सोहळा याची देही याची डोळा पहिला, कळलं !”

“अच्छा, पण मग नवरा नवरीवर अक्षता टाकायचा प्रश्नच आला नसेल ना ?”

“वेडा आहेस का तू ? अरे प्रत्येक रूम मधे दोन पेट्या ठेवल्या होत्या, इयर फोनवर भटजींच सावधान ऐकू आले की, एका पेटीतल्या अक्षता दुसऱ्या पेटीत टाकायच्या मग ती पेटी……”

“कळलं, नंतर सगळ्या पेट्या एकत्र करून नवरा नवरीच्या रूमवर पोचवणार, ते ठीक, पण मग तुम्ही तुमच एकवीसच अहेराच पाकीट कसं काय दिलंत ?”

“अरे त्यासाठी देवळात जशी दानपेटी असते, तशी स्लिटवाली पेटी होती, त्यात प्रत्येकाने आपापली अहेराची पाकीट…. “

“टाकायची मग पुढचे सारे सोपस्कार अक्षतांच्या पेट्यां प्रमाणे, बरोबर ना ?”

“आता तुला कळायला लागलं आहे थोडं थोडं.”

“पण पंत तुम्ही सर्व लग्न समारंभ, एकवीसचे पाकीट देवून ज्यासाठी अटेंड करता त्या उदरभरणाची काय सोय होती ते नाही सांगितलत !”

“केळकराने ती सोय काय झकास केली होती मोऱ्या, खरच हुशार आहे पठया.”

“तेच तर विचारतो आहे की… “

“अरे त्या PPE सुटला पोटाच्या जागी दोन खण आहेत.  एका खणा मध्ये लंच प्याक केला होता, दोन दोन स्वीट्स सकट आणि दुसऱ्यामधे मिनरल वॉटरची बाटली, आता बोल !”

“हो पण जेवण कुठे आणि कसं करायच तो सगळा सूट घालून ?”

“वेडा आहेस का तू ? अरे लग्न लागलं आणि सगळे वऱ्हाडी आपल्याला घरी जाऊनच जेवले !”

“हो, तेही बरोबरच म्हणा, उगाच एकमेकांच्या संपर्कात यायला नकोत कोणी ! बरं मी निघतो आता पंत, ऑफिसला जायला उशीर होतोय.”

“थांब मोऱ्या, त्या सूटचा आता मी रिटायर असल्यामुळे काहीच उपयोग नाही, म्हणून तो सूट उचल आणि घरी घेऊन जा आणि ऑफिसला जाताना नक्की घाल, कारण मुंबईची लाईफ लाईन अजून तरी चालू आहे !”

“थँक्स पंत, पण मी एवढा अप्पलपोटा नाही.”

“यात कसला आला आहे अप्पलपोटेपणा ?”

“कसला म्हणजे, मी सूट घालून ट्रेन मधून प्रवास करायचा आणि बायकोने मात्र… “

“अरे तिच्यासाठी पण एक सूट आहे माझ्याकडे.”

“तो कसा काय ?”

“अरे मगाशी मी तुला काय म्हटलं मोऱ्या, सगळ्या वऱ्हाडी मंडळींना एक एक सूट दिला म्हणून.”

“हो मग त्याच काय ?”

“अरे मोऱ्या ही पण त्या लग्नाला आली होती ना, तेव्हा तिला पण एक सूट मिळाला आहे, तो तुझ्या बायकोला दे ऑफिसला जातांना, मग तर झालं !”

“धन्य आहे तुमची पंत !”

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

२५-०३-२०२२

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ होली है…! …अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? विविधा ?

☆होली है…! …अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

होली है.

आज सकाळीच दारावर टक टक  झाली. बघतो तर काय ? देव, आपले थाळी भर रंग घेऊ उभा. अजिंक्य देव,रमेश देव नव्हे,साक्षात देव, देवळातला.

तो म्हणाला चल बाहेर ये, रंग लावायला आलोय. आणि तो “होळीसाठी खास”  जुना  टी  शर्ट घालून येऊ नको. साक्षात देव आलाय. चांगल्या कपड्यात ये. मी छान झब्बा  घालून आलो. तो ओरडला होली  है .एक एक रंग माझ्या तोंडाला फासत तो त्या रंगाचं महत्व सांगत होता.

पहिलाच रंग त्याने फासला निळा. तो म्हणाला हा रंग आकाशाचा. आकाशा सारखं सर्वावर मायेचं पांघरूण घाल पण त्याचवेळी त्याच्यासारखा तटस्थ रहा. कधीतरी धुकं बनून त्यांच्यात आलास तरी धुक्यासारखा   पटकन विरून जा. होली है.

दुसरा रंग निसर्गाचा. वेडा निसर्ग. नुसता देतच सुटलाय. घेण्याचं नाव नाही. माणसाने त्याच्या लाकडाची कुर्हाड करून त्याच्यावरच चालवली तरीही देतो आहे. माणूस हाताने  फुलं चुरगाळतोय तरीही ती सुगंध देतायत. माणूस आग लावून मधाचं पोळं काढतोय तरी मध माशा गोळा  करतायत. तसाच देत राहा देत राहा. देत राहा

होली  है.

तिसरा रंग लाल तेजाचा. ज्ञानाचा. ज्ञानॆवं तू कैवल्यम. ज्ञान म्हणजेच मी. अथांग पसरलेला. द्याल तितका अनेक पटीने वाढणारा. ज्ञान म्हणजे ज्योत, आयुष्य म्हणजे तेल,माणूस म्हणजे पणती. तेल संपेपर्यंत ज्योत पेटती राहू दे. होली है.

हा रंग केसरीया,त्यागाचा. गीतेच्या अठराव्या अध्यायाचा. देशासाठी, समाजासाठी, निसर्गासाठी,आई, वडील, बायको, मुले, विद्यार्थी, यांच्यासाठी  त्याग करणाऱ्या सर्वांचा. कुठलाही त्याग मोठा नाही कुठला लहान नाही, सर्व एक सारखे, श्वासा सारखे – होली है.

हा गुलाबी रंग, निष्पाप मुलांच्या गालाचा, त्यांच्या हसण्याचा. सुख दुःखात हा रंग कायम चेहर्यावर राहू दे.ते सर्वात मोठं पेन  किलर आहे. जेव्हा दैव, नशीब  सोबत  नसत तेव्हा हसू असतं. ते तुमच्या बाजूने त्यांच्याशी लढतं….

 होली  है.

आणि हा रंग चंदेरी. मी ओरडलो, ए देवा, हा नाही लावायचा, हा ऑइल पेंट असतो, बरेच दिवस जात नाही, मागच्या वर्षी मी खोबरेल तेल लावून काढला.

तो म्हणाला अरे वेड्या हाच तर पक्का रंग आहे, आशेचा. मी म्हटलं चंदेरी ? आशा ? काय बोलतोयस ?

तो म्हणाला, आशेचा रंग आयुष्यात सर्वात जास्त टिकतो. किंवा  तो आहे म्हणून आयुष्य आहे. आशा संपली कि तुम्ही संपलात, आयुष्य संपलं.

 तुम्हीच म्हणता ना ?एव्हरी क्लाऊड हॅज अ सिल्वर लायनिंग !!

त्याने शेवटी तोच रंग माझ्या तोंडाला जास्त फासला आणि ओरडत निघून गेला…..  होली है!

– अनामिक

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘बाई,बाई’… ☆ सुश्री दीप्ती लेले ☆

?विविधा ?

 ☆ ‘बाई,बाई’… ☆ सुश्री दीप्ती लेले ☆ 

बाई ऽऽ केवढा हा पाऊस सतत कोसळतोय…. बाईऽऽ आणि या विजांची तर आता भीती वाटते”… ही ‘बाई’ कोण बरं? नेहमी हा प्रश्न पडतो मला… या बाईचा पत्ता एकदा शोधून काढायला हवा. गोंधळात पडलात ना? मला असं म्हणायचं आहे की,  तुम्हीच बघा हं… लहान मुलगी असू दे,  तरुणी असू दे किंवा अगदी आजीबाई असू दे,  ‘बाई’ हा शब्द प्रत्येक बाईच्या तोंडी असतोच …आता हेच बघा ना, मी काय म्हटलं, “बाई केवढा हा पाऊस!”  म्हणजे भीती वाटली तरी ‘बाई’ असं म्हटलं जातं आणि “अगंबाई थांबला वाटतं हा पाऊस” असा आनंद झाला तरी ‘बाई’ हा शब्द येतो, म्हणून मी विचारलं ही बाई कोण? 8 मार्च हा जागतिक महिला दिन आणि अशावेळी बाई या शब्दाची थोडीशी गंमत… पाऊस कोसळत असताना आपल्या प्रियकराच्या आठवणीने काळजीनं नायिका काय म्हणते ऐकलं आहेत ना गाणं,  “झिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे पाणीच पाणी चहूकडे गं ‘बाई’ गेला मोहन कुणीकडे”

मोठ्या वयाच्या बायका असं “बाई” असं म्हणतात का… तर नाही एखादी छोटीशी चिमुरडी सुद्धा गाण्यातून काय सांगून जाते

“तुझी नी माझी गंमत वहिनी

ऐक सांगते कानात

आपण दोघी बांधूया ग

दादाचं घर ‘ बाई’ उन्हात”

दादाची तक्रार करताना सुद्धा ‘बाई !’ ‘बाई’ शब्दाचा उगम शोधायला गेलो तर काही मिळत नाही. बहुतेक प्रत्येक बाईच्या तोंडी उपजत, नकळतच हा शब्द येत असावा. खूप वर्षांपूर्वी नागपंचमीच्या सणानिमित्त म्हटली जाणारी एक ओवी एका पुस्तकात वाचायला मिळाली… “पंचमीचा सण बाई दणादणा आला मुराळी भाऊ आला बाई जाते मी माहेराला… सासुबाई आत्याबाई तुमच्या लेकाला जेऊ घाला दही साखर भाकरीला मी तर निघाले माहेराला…” बघितलं सख्यांनो बाई हा शब्द किती वेळा आणि किती सहज या ओळीं मध्ये आलाय… अगदी हे गाणं सुद्धा आपण ऐकलं असेलच कबिराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम ….

सख्यांनो लहानपणी खेळलेला भोंडला आठवतोय?

 खिरापत ओळखणं, पाटावरचा हत्ती,  भोवती धरलेला फेर, भोंडल्याची गाणी… अगदी मजा असायची… त्या गाण्यांमध्ये दडलेला हा बाई शब्द हळूच या गाण्यातून कसा डोकावतो बघा… अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारीतं… म्हणजे बघा माहेरची आठवण काढून भावूक झालं म्हणून बाई आणि सासरची तक्रार करताना राग आला म्हणूनही बाईच… “कठीण कठीण कठीण किती पुरुष हृदय बाई”  आपल्याला या नाट्यपदांची सुद्धा आठवण येते ….असा हा शब्द बाई …कवी आणि गीतकार मग ते पुरुष असले तरी त्यांना सुद्धा बाई शब्द कवितेत, गाण्यात वापरल्याशिवाय राहवलं नाही. केदार शिंदे सारख्या दिग्दर्शकांनं सुद्धा सिनेमाचा  विषय बाईच्या मनातले ओळखता येतं, ऐकू येतं.. असा ठरवला आणि सिनेमाचं नाव ठेवलं “अगंबाई अरेच्या!!”

अगदी ग दि माडगूळकर यांना सुद्धा आपल्या गाण्यांमध्ये , गीतांमध्ये हा बाई शब्द वापरावासा वाटला आणि गाणं तयार झालं

ऐन दुपारी यमुनातीरी खोडी कुणी काढली… गं बाई माझी करंगळी मोडली…

आपल्या मराठी भाषेवर संत आणि धार्मिक वाड़मयाचा पगडा होता आणि अजूनही आहे. पूर्वी भावना व्यक्त करताना कवीला देवाधिकांचा आधार घ्यायला लागायचा असा एक काळ होता. राधाकृष्णा शिवाय या  प्रेम या विषयाला हात घालणं थोडंसं गैर समजलं जायचं. त्यामुळे पूर्वी स्त्रीच्या केशसंभार याविषयी लिहिताना सुद्धा कवी म्हणतात,

कसा गं बाई केला कोणी ग बाई केला राधे तुझा सैल अंबाडा…

हे लिहिता लिहिता अजून एका गाण्याची आठवण झाली ती म्हणजे

“नाही खर्चली कवडी दमडी नाही वेचला दाम बाई मी विकत घेतला शाम”

काय करणार… रेडिओवर RJ म्हणून पंधरा वर्ष आणि त्याहून अधिक असं काम केल्यामुळे कोणताही लेख लिहिताना, काहीही बोलत असताना गाणी आणि बोलणं याची सांगड आपोआप घातली जाते. गाणी आठवायला लागतात भराभर …. आपण रिमिक्सचा जमाना बघितला,  बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला हे गाणं रीमिक्स झालं आणि तरुणाईला आवडलं …भांगडा पाॅपवर ठेका धरणारी तरुणाई हळूहळू मराठी गाणी सुद्धा ऐकायला लागली …अर्थात ही किती चांगली गोष्ट नाही का!

आपण बघितलं की कितीही आपण माॅडर्न झालो, इंग्रजी भाषा शिकलो, तरी “अगबाई” (अर्थात OMG सारख्या अनेक इतर शब्दांनी किंवा मोबाईलच्या शॉर्ट शब्दांनी हळूहळू ती जागा काबीज केली आहे)  च्या जागी दुसरा कोणताही शब्द पटकन वापरला जात नाही.

 एक छोटीशी आठवण इथे सांगावीशी वाटते आम्ही 10- 12 वर्षांपूर्वी कोकणातल्या एका छोट्याशा घरी गेलो होतो… आमच्या नातेवाईकांकडे…..तेव्हा नुकतेच डिजिटल कॅमेरा नवीन आलेले होते त्या कॅमेराच्या स्क्रिनवर चित्र दिसतं ही गोष्ट नवीन होती.  आम्ही त्या घरातल्या आमच्या छोटुकली चा नाच आणि तिचं गाणं जेव्हा त्याच्यावरती रेकॉर्ड केलं आणि तो स्क्रीन तिने बघितला मात्र… आणि तिने एका विशिष्ट कोकणी स्वरात एक हात कमरेवरती आणि दुसरा हात गालावरती  ठेवून “अग्गेऽऽ बाऽयऽऽ” असं कोकणी विशिष्ट स्वरात म्हटलं तेव्हा आमचे आम्हाला इतकं मस्त वाटलं आणि हसूच आलं.

आपल्या लहानपणी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असताना आपल्याला, दांडेकर बाई, कुलकर्णी बाई, देशपांडे बाई अशी आपल्या शिक्षकांना बाई म्हणण्याची पद्धत होती… अर्थात मध्यंतरीच्या काळात बाई या शब्दाला काही चा वेगळा अर्थ सुद्धा प्राप्त झालेला होता पण तरीही बाई म्हटल्यानंतर मला तरी अजूनही शाळेतल्या बाईच आठवतात.

जुन्या मराठी चित्रपटातले सुप्रसिद्ध व्हिलन निळू फुले यांचा ‘बाई वाड्यावर या’ हा डायलॉग तर इतका प्रसिद्ध झाला की अजूनही आजच्या मोबाईल व्हाट्सअप च्या जमान्यात त्याचे अनेक मिम्स तयार होतात…. मराठी किंवा हिंदी मालिकातून एक बाई दुसर्‍या बाईला कशी छळते, कट कारस्थान करते हे हल्ली भरभरून दाखवलं जातं… प्रत्यक्षात असं होतही असेल मला माहित नाही मुंबईसारख्या ठिकाणी ट्रेनमधून प्रवास करताना एकमेकींशी कचाकचा भांडणाऱ्या बायका प्रसंगाला बायकाच बायकांची मदत करतात हे ही मी डोळ्यांनी पाहिलं आहे….. काय घ्यायचं, काय सोडायचं, कोणाशी कसं वागायचं, नाती कशी जपायची, संवाद कसा साधायचा… घराचं घरपण टिकवायचं नोकरी घर मुलं नातेवाईक या सगळ्यांचा बॅलन्स कसा ठेवायचा या सगळ्या गोष्टी  बायकांना छान जमतात…

असो हे बाई पुराण आता इथेच थांबवते…. वर्षभर बायकांच्या बडबडी वर …त्यांचं शॉपिंग …त्यांची बुद्धिमत्ता याच्यावरती फुटकळ विनोद करणारे आता हा आठवडा मात्र बाईचं कर्तृत्व, तिचा सन्मान,  women empowerment … यावर भरभरून बोलतील, लेख लिहितील, कार्यक्रमांचे आयोजन करतील… पण आपल्या सर्वसामान्य बायकांच्या आयुष्यात मात्र त्याचा काडीमात्रही फरक पडणार नाही…. आपण आपली रोजची कामं, कर्तव्य पार पाडत राहणार आणि अधून मधून आपल्या मैत्रिणींसोबत, आपल्या घरच्यांसोबत आपल्या आयुष्याचा आनंद घेत राहणार…. बरं सगळ्या बायकांना… महिला दिनाच्या शुभेच्छा बरं का!!!

 

© सुश्री दीप्ती सचिन लेले

deeptilele81@gmail.com

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बार्बरीक – (महाभारतातील अनभिज्ञ योद्धा) ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

?विविधा ?

 ☆ बार्बरीक – (महाभारतातील अनभिज्ञ योद्धा) ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

रामायण महाभारत ही अजरामर महाकाव्ये! आजही महाभारताचा विचार केला तर, गीतेचा उपदेश… श्रीकृष्णाचे चरित्र… कौरवांची कारस्थानं… पांडवांनी दिलेले प्रत्युत्तर… द्रौपदीचं वस्त्रहरण… ते हाणून पाडणारा श्रीकृष्ण …भीष्माची प्रतिज्ञा… अठरा दिवस चाललेले महायुद्ध ….या आणि अशा कितीतरी गोष्टी डोळ्यासमोर येतात. त्यामुळे त्या सर्वांचा समावेश असलेलं महाभारत हा अभ्यासाचा विषय आहे असं वाटू लागतं.

महाभारत ही अतिशय चित्रविचित्र गोष्टींनी भरलेली कुरु वंशाची कहाणी आहे. त्यात त्याग आहे ….प्रेम आहे…. सुड आहे… भांडण आहे… भाऊबंदकी आहे… धर्म आहे… आणि अधर्म ही आहे.

या कहाणीत अनेक कथानके, उपकथानके…. बहुसंख्य लोक कथा जोडल्या गेल्याआहेत. कर्णाची दुर्योधनाशी असलेली अभंग मैत्री, कर्णाचं दानशूर असणं, अर्जुनाचं शौर्य, भीमाचा पराक्रम, हे सगळं जगासमोर आलेलं आहे. पण त्याच बरोबर काही लोक पराक्रमी असून ही कधीच लोकांना माहित झालेले नाहीत .अशाच एका अनभिज्ञ पराक्रमी वीर योध्याचं नाव आहे बार्बरीक ….घटोत्कच पुत्र.. बार्बरीक… आणि त्याची ज्ञात असलेली ही कथा!

बार्बरीकानं श्री कृष्णाच्या सल्ल्यानुसार महीसागर संगमावरील गुप्त देवी चण्डिकेला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तप केले होते व तेथे तंत्र मार्गाने साधना करणाऱ्या विजय नावाच्या मुनींना गुरु मानून त्याने त्यांनाही सहाय्य केले होते.महाजिव्हा  राक्षसी ,रेपलेंद्र ,पलाशी इत्यादी राक्षसांचा जे त्यांच्या साधनेत विघ्न आणत होते त्यांचा त्याने बिमोड केला होता. त्याचा सेवाभाव पराक्रमआणि भक्ती मुळे प्रसन्न होऊनचंडीकादेवीने त्याला वरदान म्हणून तीन अमोघ बाण दिले होते.त्यातला पहिला बाण सोडून ज्याचा वेध घ्यायचा ते कितीही मोठे सैन्यबळ असले तरी त्याने लक्ष्य साधता यायचे. दुसऱ्या बाणाने ते बांधले जायचे.व तिसऱ्या बाणाने ते पूर्णपणे नष्ट व्हायचे.शिवाय या बाणांचा पुनःप्रयोगही करता यायचा.

बार्बरीक हा अर्जुनाच्या तोडीचा धनुर्विद्यापटू होता. त्याला जेव्हा महाभारताच्या युद्धाची वार्ता कळली तेव्हा युद्धभूमीवर मधेच असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली उभा राहून बार्बरीकानं घोषणा केली की जो पक्ष हरणार असेल मी त्याच्या बाजूने लढणार .

त्याच्या वीरतेची परीक्षा घेण्यासाठी कृष्णाने त्याला सांगितले की केवळ तीन बाण मारून या पिंपळाची सगळी पाने तोडून दाखव. बार्बरीकाने आपल्या बाणांचा प्रयोग सुरू केला. पहिल्या बाणाने लक्षवेध केला.दुसरा बाण सर्व पानांना बांधू लागला आणि तिसरा बाण पिंपळाचे एकन्एक पान चिरत चालला होता. त्याच वेळी एक पान कृष्णाच्या पायापाशी पडले. ते कृष्णाने हळूच पायाखाली घेतले.

बार्बरीकाच्या तिसऱ्या बाणाने  साऱ्या पानांना कापून टाकले व शेवटचे पान जे कृष्णाच्या पायाखाली होते तेथे येऊन तो थांबला.

बार्बरीक म्हणाला,”प्रभू, तुमचा पाय बाजूला घ्या. मी बाणाला पिंपळाची सर्व पाने कापायची आज्ञा दिली आहे, तुमचा पाय नाही .”

कृष्ण थक्क झाला. पण त्याला आपले वचन आठवले- ‘यतो धर्मस्ततो जयः ‘कौरवांनी आपल्या वागण्यातून, व्यवहारातून अनेक वेळा दाखवून दिले होते की ते कपटी आणि अधर्मी वृत्तीचे द्योतक आहेत… आणि या युद्धात पांडवांचा… पर्यायाने…. धर्माचा जय होणे अत्यावश्यक आहे.

पण बार्बरीक  जर हारणाऱ्या कौरवांच्या बाजूने लढला तर ही गोष्ट शक्य होणार नाही. हे लक्षात येताच कृष्णाने आपली कूटनीती  वापरली.

तो दुसर्‍या दिवशी सकाळी ब्राह्मणाचा वेष धारण करून बार्बरीकाच्या शिबिरात गेला. बार्बरीकानं विचारलं,” हे ब्राह्मणदेवा तुम्हाला काय हवे आहे?” ब्राह्मणाच्या रुपातील कृष्ण म्हणाला,” मला हवं आहे ते तू देऊ शकणार नाहीस.” त्याच्या जाळ्यात बार्बरीक बरोबर अडकला. कृष्णाने त्याच्याकडे त्याचे मस्तक मागितले आणि आपल्या वडिलांच्या- घटोत्कचाच्या- बाजूने यशश्री मिळावी म्हणून बार्बरीकाने आपले मस्तक कृष्णाला अर्पण केले.

त्याच्या या बलिदानाने कृष्ण पण हेलावून गेला आणि त्याने त्याला वरदान दिले की यानंतर कलियुगात त्याच्याबरोबर बार्बरीकाची पूजा केली जाईल .

ज्या ठिकाणी कृष्णाने बार्बरीकाचे मस्तक ठेवले त्या जागेचे नाव ‘खाटू’ असे असून राजस्थानमधले हे मुख्य मंदिर आहे ….आणि तेथे बार्बरीकाची पूजा होते. खाटू श्याम… असं त्या देवाचं नाव आहे.  राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश अशा विविध प्रांतात तो पूजला जातो.

नेपाळमध्ये किरात राज, यालांबर अथवा आकाश भैरव म्हणून याची आराधना केली जाते.

अशी ही बार्बरीकाची कथा! कदाचित ही लोककथा पणअसेल पण खाटू श्याम या नावाने तो जनमानसातअमर झालेला आहे. आणि पूजला ही जात आहे.

*  समाप्त *

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रश्न ?? # 3 ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रश्न ?? # 3 ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

  1. नाती का जपायची ?

रेशमाच्या धाग्याचा गुंता सोडवून पहा एकदा…

 

  1. आठवणींची एक गंमत आहे.

त्याच्यात गुंतून राहिलात तर नवीन निर्माण नाही होत !!

 

  1. माणूस देवाला म्हणाला “माझा तुझ्यावर विश्वासच नाही.”

देव म्हणाला “वा !!  श्रद्धेच्या खूप जवळ पोहोचला आहेस तू. प्रयत्न सुरु ठेव.”

 

  1. गवई एकदा तानपुऱ्याला म्हणाला,”तू नसलास तर कसं होईल माझं?”

तानपुरा म्हणाला ,”अरे वेड्या ! माझी गरज लागू नये हेच तर ध्येय आहे.”

 

  1. विठुमाऊली एकदा एकादशीला दमून खाली बसली. मी विचारलं,”काय झालं ?”

विठुराय म्हणाले, “पुंडलिकाचा गजर करतात लेकाचे पण मायपित्यांना एकटं सोडून अजून माझ्याच पायाशी येऊन झोंबतात वेडे कुठले. !”

 

  1. एकटं वाटलं म्हणून समुद्रावर गेलो एकदा. त्याला विचारलं “कसा एकटा राहतोस वर्षानुवर्ष ?”

तो म्हणाला “एकटा कुठला, मीच माझ्यात रमावं म्हणून ईश्वराने लाटा दिल्या आहेत ना मला.”

मी विचारलं “माझं काय?”

तो हसून म्हणाला

 “नामस्मरण आणि माझ्या लाटांमध्ये काहीच साम्य दिसत नाही का तुला?”

 

संग्राहिका : सुश्री मंजिरी गोरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्याला द्यावे उत्तर….गुरू ठाकूर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ आयुष्याला द्यावे उत्तर….गुरू ठाकूर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

संध्याकाळी सहजच चॅनल सर्फिंग करत होतो. डिस्कव्हरी चॅनलवर जीवघेण्या अपघातातून वाचलेल्या नंतर आलेल्या अपंगत्वावर जिद्दीने मात करून पुन्हा यशाचे शिखर गाठणाऱ्या काही मंडळींवर ती डॉक्युमेंटरी होती… त्यात काही पाय गमावलेले, हात गमावलेले किंवा अन्य एखादा अवयव गामावलेले, तरीही कृत्रिम अवयव लावून पुन्हा तीच कला सादर करणारेही होते. मग त्यात काही नर्तक होते, चित्रकार होते, मॅरेथॉन धावणारे होते, ते सारं पाहून थक्क झालो आणि त्याचबरोबर माझ्यातला कवी गलबलला … आणि त्या क्षणी एक कविता कागदावर उतरली. ते शब्द होते ….

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर

नजर रोखूनी नजरेमध्ये

आयुष्याला द्यावे उत्तर …

त्या साऱ्या मंडळींची जिद्द, त्यांचा तो बाणा पाहून ते शब्द आले होते. ती संपूर्ण डॉक्युमेंटरी पाहून होईपर्यंत कविताही पूर्ण झाली होती.

नेमका दोन चार दिवसांनी मला ‘ इंद्रधनू पुरस्कार ‘ जाहीर झाला. ठाण्यातल्या एका मोठ्या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे यांच्या हस्ते तो पुरस्कार मला देण्यात आला. त्या पुरस्काराला उत्तर देताना मी नुकतीच लिहिलेली ती कविता सादर केली. लोकांची छान दाद मिळली. कार्यक्रम संपताच शं. ना. नवरे मंचावर आले आणि मला म्हणाले, ‘ एक गोष्ट मागितली तर मिळेल का ?’ मी म्हटलं, ‘ बोला काय आज्ञा आहे ?’ तर म्हणाले, ‘ आत्ता जी कविता ऐकवलीत, तीच हवी आहे. काय शब्द लिहीले आहेत हो ! अप्रतिम ! जीवनावर याहून उत्तम भाष्य मी याआधी कधीच ऐकलं नव्हतं.’ माझ्याकरता ही मोठी दाद होती. मग लगेच एका कागदावर उतरवून ती त्यांच्या हवाली केली आणि म्हटलं, ‘ आज पहिल्यांदाच सादर केली ही कविता …’ ते म्हणाले, ‘ का ? अहो, ही कविता तुम्ही सादर करणं गरजेचं आहे. हे शब्द जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. तेव्हा ही सादर करत चला यापुढे..’

माझ्या आजवरच्या लोकप्रिय गाण्यांच्या जन्मकथा उलगडणाऱ्या माझ्या ‘ कसे गीत झाले ‘ या कार्यक्रमातही ती कविता मी आवर्जून सादर करतो आणि रसिकही या कवितेला भरभरून दाद देतात.

परवाच्या कार्यक्रमात मात्र निवेदिका गायिका योगिता चितळे हिने ठरल्याप्रमाणे त्या कवितेच्या संदर्भातला प्रश्न मला विचारला. कविता सुरू करणार तोच मी गोंधळलो. ‘ नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ‘ कसं म्हणू ? कारण कार्यक्रम अंधशाळेत होता. माझ्या प्रत्येक शब्दाला दाद देणारे ते रसिक दृष्टीहीन होते. त्यांच्या भावना दुखावल्या तर ?

मी भलतीच कविता म्हटली. योगिताचा गोंधळ उडाला होता. मी ती कविता विसरतोय, असं वाटून ती दर दोन गाण्यांनंतर त्या कवितेचा विषय काढत होती. अन मी भलतीच कविता म्हणून वेळ मारून नेत होतो. अखेर संधी पाहून मी हळूच तिच्या कानात माझा मुद्दा सांगितला. तिलाही तो पटला. हुशारीने सावरून घेत ती म्हणाली, ‘ आता वळूया कार्यक्रमाच्या शेवटच्या गीताकडे !’ इतक्यात एक अंध विद्यार्थिनी उठली आणि तिने फर्माईश केली, ‘ गुरू ठाकुरांना विनंती आहे की, त्यांनी त्यांची ‘ नजर रोखूनी नजरेमध्ये ‘ ही आयुष्यावरची कविता सादर करावी. मला फक्त दोनच ओळी पाठ आहेत. खूप प्रोत्साहन देतात. मला पूर्ण कविता ऐकायची आहे.’ माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. क्षणाचाही अवलंब न करता मी सुरुवात केली …

पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना

हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना

संकटासही ठणकावूनी सांगावे ये आता बेहत्तर

नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ………!!

असे जगावे

 

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर

नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

 

नको गुलामी नक्षत्रांची भिती आंधळी ता-यांची

आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची

असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर

नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

 

पाय असावे जमीनीवरती कवेत अंबर घेताना

हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना

संकटासही ठणकावुनी सांगावे ये आता बेहत्तर

नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

 

करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना

गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट घेताना

स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर

नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

 – श्री गुरू ठाकूर

संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares