मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ विष्णू सहस्त्र नामाची सुरस माहिती ☆ प्रस्तुती – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

?इंद्रधनुष्य? 

☆ विष्णू सहस्त्र नामाची सुरस माहिती ☆ प्रस्तुती – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

पूर्वी एकदा १९४० किंवा ५० च्या दशकात कोणीतरी महापेरियार कांची धर्माचार्य चंद्रशेखर सरस्वती ह्यांची मुलाखत घेत होते. ते सद्गृहस्थ मुलाखत ध्वनिमुद्रित करीत असताना टेप रेकॉर्डरचा वापर करीत होते.  तेव्हा पेरियार ह्यांनी प्रश्नार्थक पवित्रा घेत विचारले, ” कोणाला सर्वात जुन्या टेपरेकॉर्डरविषयी माहिती आहे कां ???”

ह्या नंतर त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, “विष्णू सहस्त्र नाम आपल्या पर्यंत कसे आले ???

कुणीतरी म्हणाले, ” पितामह भीष्म ह्यांच्यामुळे ते आपल्याला प्राप्त होऊ शकले”, ह्या वर सर्वांचे एकमत झाले.

त्यावर महापेरियार ह्यांनी पुढचा प्रश्न केला, ” युद्धभूमीवर सगळ्यांनी भीष्म ह्यांना विष्णू सहस्त्रनाम म्हणताना ऐकले तेव्हा ते कोणी टिपून घेतले ???”

पुन्हा एकदा शांतता पसरली. तेव्हा महापेरियार ह्यांनी स्पष्ट केले, ” जेव्हा भीष्म कृष्णस्तुतीपर विष्णू सहस्त्रनाम म्हणत होते, तेव्हा कृष्ण, व्यास ह्यांच्यासमवेत सर्वजण त्यांच्याकडे पहात होते. जेव्हा त्यांनी १००० विष्णूनामे म्हणून पूर्ण केली, तेव्हा सर्वजण त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पहातच राहिले. सर्वात पहिले युधिष्ठिर भानावर येऊन ह्यावर संमिश्र प्रतिक्रिया देते झाले, ” पितामह ह्यांनी वासुदेवाची उत्कृष्ठ अशी रमणीय १००० नावे पठण केली, आपण सर्वजण फक्त ऐकतच राहिलो.  पण कोणी ती टिपून घेतली नाहीत. आता त्याचा क्रम पण आपण गमावला”. तेव्हा सगळेजण कृष्णाकडे मोठ्या आशेने वळून मदतीची याचना करु लागले. नेहमीप्रमाणे कृष्ण म्हणाला,

” मलासुद्धा तुम्हा सर्वांप्रमाणे ऐकलेली रचना आवडली.  पण आपण काय करू शकतो ???”

तेव्हा सर्वजण अमूल्य अश्या रचनेच्या पुनर्प्राप्तीसाठी कृष्णाची आर्जवं करु लागले.  तेव्हा वासुदेव उदगारले, ” हे फक्त सहदेव पुनर्प्राप्त करू शकेल आणि व्यास ते टिपून घेतील.” सर्वजण, सहदेव हे कार्य कश्याप्रकारे करु शकेल ??? हे जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले, तेव्हा कृष्णाने उत्तर दिले, ” आपल्या सर्वांमध्ये सहदेवाने एकट्याने सूत स्फटिक धारण केले आहे. जर त्याने शिवाची प्रार्थना केली आणि ध्यान केलं, तर तो स्फटिकाला ध्वनीलहरींमध्ये रुपांतरीत करु शकेल, आणि व्यास ते टिपून घेऊ शकतील”.

तेव्हा सहदेव आणि व्यास, जिथे त्यांनी भीष्म पितामहांना सहस्त्र नाम म्हणताना ऐकले होते, त्याच ठिकाणी खाली बसले. सहदेवाने स्फटिकाच्यामार्फत ध्वनीलहरींद्वारे सहस्त्रनाम प्राप्त करण्यासाठी शिवाचे ध्यान आणि प्रार्थनेला सुरवात केली.

स्फटिकाची प्राकृतिक रचना शांत वातावरणामध्ये ध्वनी हस्तगत करू शकेल अशी असते. जो श्वेतांबर आणि स्फटिकासमान आहे, अशा शिवाचे उचित असे ध्यान केल्यास ह्या ध्वनीलहरी पुनर्प्राप्त होऊ शकतात .

अश्याप्रकारे विश्वातील सर्वात पहिल्या “ स्फटिक ” टेपरेकॉर्डरमार्फत रचना ऐकून व्यासांनी ती

टिपून आपल्यापर्यन्त विस्मयकारक असे विष्णू सहस्त्रनाम पोहोचवले– हे जेव्हा महापेरियार ह्यांनी स्पष्ट केले तेव्हा सर्वजण स्तंभित होऊन ऐकतच राहिले..

आपण आज वापरतोय त्या हार्डडिस्क, मेमरी कार्ड मध्ये स्फटिकाचाच वापर होतोय, याचेशी तंतोतंत जुळणारी ही माहिती आहे. Quartz stone or SiO2 or silicon म्हणजेच स्फटिक…

साभार

ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ।।

प्रस्तुती : श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चारिका वारी … आतंरिक नाते ☆ सौ. सावित्री जगदाळे

सौ. सावित्री जगदाळे

? मनमंजुषेतून ?

☆ चारिका वारी … आतंरिक नाते ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆

गौतम बुद्धांनी संघाला चारिका करण्याचा उपदेश केला. “भिक्खुंनो, बहुजनांच्या हितासाठी ,सुखा- -साठी, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी आणि देवमनुष्याचे साफल्य, हित, सुख यांसाठी तुम्ही चालत रहा. “— “ सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम ”—-(लेखक आ.ह.साळुंखे )– या पुस्तकातील हा उतारा वाचला आणि मला  वारीची सुरुवात का झाली असेल याचा थोडासा अंदाज आला. नेहमी वाटायचं “का सुरू केली असेल ही वारी ?”

आपल्याकडे तीर्थयात्रा करणे तसे होतेच. पुण्यप्राप्ती व्हावी म्हणून, मोक्ष प्राप्ती व्हावी म्हणून तीर्थ यात्रा करायचे. पण ठराविकच  काळ किंवा तोच मार्ग असं काही नसतं. वारीला मात्र ठराविक काळ, ठराविक मार्ग, ठराविक मुक्काम, सगळं काही ठरलेलं असतं.  (वारीचं  व्यवस्थापन जबरदस्त असते. अतिशय शिस्तबद्ध , काटेकोर असते.)  सगळ्यांनी एकत्र पायी जाणं, असं का असावं असं नेहमी वाटायचं.

तुकोबांची पालखी देहूवरून अगदी अलीकडच्या काळात का निघत असेल ??  वाटतं तुकारामांनी हा मनातला विचार नारायणाला तर सांगितला नसेल ??? त्यांची इच्छापूर्ती करण्यासाठी नारायणाने देहूवरून इतर वारीबरोबर तुकोबांची वारी सुरू केली असावी . तशी वारी कधी सुरु झाली याचा स्पष्ट , ठाम काळ सांगता येणार नाही . नामदेव , ज्ञानेश्वरांच्याही आधी वारी असावी असं अभ्यासकांचं मत आहे . देहू वरून मात्र तुकोबानंतर नारायणाने तुकोबांची पालखी पंढरपूरला वारीबरोबर नेण्यास सुरवात केली असावी. कारण तुकोबांचे विचार बुद्धासारखेच होते, आहेत.  बहुजन हिताय, बहुजन सुखाय या उद्देशाने चारिका करा. चालण्यामुळे लोकांना धर्म सांगता येतो. त्यांचं कल्याण करता येते. म्हणून एका दिशेला एकजणाने जाऊन लोकांच्या कल्याणासाठी उपदेश करावा. भिक्खुंनी चारिका करावी असं त्यांनी सांगितले. स्वतःही चार दशकांहून अधिक काळ त्यांनी चारिका केली. वारकरी संप्रदायाचे विचार, आचार बघितले तर बुद्धाच्या विचारांचा हा आधुनिक अवतार वाटतो. ठाम मत मांडण्यासाठी माझा तेवढा अभ्यास नाही. इतरांनी लिहिले आहे तेच मांडण्याचा हा प्रयत्न.

विठ्ठल हा बुद्धाचा अवतार आहे असं संतांच्या अनेक  अभंगातून रामचंद्र ढेरे  वगैरेंनी दाखवले आहे.

बुद्ध धम्म जेव्हा भारताबाहेर घालवून दिला, तेव्हा सगळाच्यासगळा जाणे शक्य नसते. काही अंश राहतो, उरतो. सुप्त अवस्थेत, गुप्तपणे कुठेतरी वाढ विस्तार, विकास होत राहतो. उजळ माथ्याने नसेल वावरत पण वेष बदलून धम्म टिकवून ठेवण्याचा प्रयत्न झाला नसेल कशावरून….

चारिकाबद्दल वाचल्यावर तर खात्रीच वाटली. लोकांचे कल्याण करायचे असेल तर चालले पाहिजे. हे असे विचार तुकोबा घरात, मुलांजवळ  बोलत असणार. जिवंतपणी ते साध्य झालं नाही की मागे राहणारे त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक कष्ट घेतात. तसंच हे वारीचे असावे. असं माझे वैयक्तिक मत आहे..

॥ ॥ ॥

© सौ. सावित्री जगदाळे

संपर्क – १००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी अनुभवलेला धर्म ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ मी अनुभवलेला धर्म ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

काही वर्षांपूर्वी गडकोट मोहीमेसाठी गेलो होतो. जाताना धर्माच्या घोषणा देत, जयजयकार करत गेलो होतो. मनात आपल्याच धर्माचा उन्माद टचटचून भरला होता. बरोबर मित्र होतेच, पुण्याजवळ रात्री  मुक्काम होता, आम्ही उघड्यावरच झोपलो होतो. काही मित्रांना थंडी सोसवत नव्हती. ते एका इमारतीच्या आडोश्याला झोपण्यासाठी गेले.  पण त्या इमारतीतल्या सुशिक्षित व स्वधर्मीय लोकांनी हाकलून लावले. दुसऱ्या  दिवशी परत आमची पायपीट सूरू झाली. दुसरा मुक्काम सिंहगडाच्या आणि रायगडाच्या मध्ये असणाऱ्या  एका जंगलात पडला. आदिवासी पाड्यात आम्ही थांबलो होतो. एका आदिवासी बांधवाने चक्क आम्हाला झोपडीत जागा दिली. झोपडी छोटीशीच पण त्याचे मन आभाळासारखे वाटले. त्याच्या त्या झोपडीसमोर कालचा बंगला खूपच खुजा वाटत होता. चालून चालून थकलो होतो, सकाळपासून चालत होतो. तहान खूप लागली होती, जवळ पाणी नव्हते.  त्या बांधवाकडे पाणी मागितले.  पण पाणी थोडे अन आम्ही 25 जण– शेवटी त्या सदगृहस्थाने आमच्यासाठी रात्रीचे पाणी आणून दिले. पाणी दरीतून आणावे लागत होते, त्यात मटका छोटाच.  पण तरीही तो माणूस हेलपाटे मारत होता. अखेर मी त्या सदगृहस्थास म्हंटले,

 ” मामा राहू द्या, नका त्रास घेवू “.  यावर तो आदिवासी म्हणाला– “बाळा माझ्या दारात तू परत कशाला येशील ? माझा तेवढाच धर्म “– तो जे बोलला ते अविस्मरणीय होते, त्याच्या त्या वाक्याने माझ्या डोक्यातला धर्माचा माज, उन्माद झटक्यात उतरला. रात्रभर झोप लागली नाही. मन स्वत:ला प्रश्न विचारत होते, अस्वस्थ होतो. हा आदिवासी म्हणतो तो धर्म कोणता? आम्ही ज्याच्या घोषणा देतोय तो कोणता ? काल बंगल्याच्या आडोश्याला झोपल्यावर हाकलून देणाऱ्याचा  धर्म कोणता ? मन प्रश्नांनी भरून गेले होते. नक्की खरा धर्म कोणता ? आम्ही ज्याचा जयजयकार करत होतो तो की हा आदिवासी म्हणतो तो? जशी रात्र उतरत होती तसा मनातला धर्माचा माज उतरत होता. मन शांत होत होते. त्या दिवशी खरा धर्म गवसला होता. हातातली पोळी कुत्र्याने पळवल्यावर त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेवून पळणारे संत नामदेव आणि तो आदिवासी दोघे सारखेेच वाटत होते. कुत्र्यात  देव शोधणारे नामदेव अन माणसात धर्म शोधणारा तो आदिवासी सारखेच भासत होते. ठार अडाणी असणारा आदिवासी धर्म जगत होता, आम्ही केवळ घोषणा देत होतो. आमचे मस्तक दुसऱ्या  धर्माविषयी तिरस्काराने भरले होते. मस्तकातला धार्मिक उन्माद दुसऱ्या  धर्माच्या माणसाला माणूस मानायला तयार नव्हता.  ते शत्रू  वाटत होते.  पण त्या माणसाने डोळ्यावरची झापडं काढली. त्याने धर्म शिकवला. धर्म अनुभवला. एका आदिवासी माणसाला जे कळते ते आम्हाला कळत नाही. स्वत:लाच स्वत:ची लाज वाटली. तो माणूस आजही तसाच डोळ्यासमोर दिसतो. खूप काहीतरी गवसल्याचा आनंद तेव्हा मनात दाटला होता. 

—-हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन ही केवळ लेबलं आहेत. माणसाला माणसाचा शत्रू बनवणारा, परस्परांच्या जीवावर उठणारा कोणताही धर्म, धर्म असू शकतो काय ?

संग्रहित…. ! 

 

प्रस्तुती : श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पानिपत -हृदय द्रावक शोकांतिका – भाग – 3 ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

?इंद्रधनुष्य? 

☆ पानिपत -हृदय द्रावक शोकांतिका – भाग – 3 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

(श्री. विश्वास पाटील यांच्या “ पानिपत “ या गाजलेल्या कादंबरीचा परामर्श ) 

(तेव्हा होळकरांच्याच मेहेरबानीवर पदरी असलेल्या कॅडम्याड पथकाने हुल्लडबाजी केली,  आणि ‘ मराठे हरले,’ असा कांगावा सुरू केला.) इथून पुढे —–

कुणाचा कुणाला मेळ लागेना. आपले कोण आणि परके कोण कळेना. सैन्य बिथरले आणि याच संधीचा गैरफायदा गिलच्यानी उचलला. त्यांच्यात चैतन्य संचारले. गोलाईचा व्यूह मोडू नका, ठरल्याप्रमाणे सर्व होऊ दे, अन्यथा फुकट मनुष्यहानी होईल, म्हणून इब्राहिम गारदी आणि इतरजण ओरडू लागले.  पण अगोदरच भुकेकंगाल आणि मरगळलेल्या सैनिकांना काही सुचत नव्हते. मारू किंवा मरू म्हणत ते बेछूट ,अंदाधुंदीने पुढे सरकून व्यूहातून बाहेर पडले.  यातच विंचूरकर आणि होळकरांसारखे जुने जाणते नेतेही होते. गिलच्यानी सपासप मुडदे पाडायला सुरुवात केली आणि मराठ्यांची दाणादाण उडाली. विश्वासराव आणि यशवंतराव पवारांसारख्या  शूरवीरांची प्राणाहुती पडली. जनकोजीला कैद केले आणि जीव मुठीत धरून सैन्य रणांगण सोडून पळू लागले.  त्यातच होळकर आणि विंचूरकर सुद्धा ! भाऊसाहेबही त्वेषाने लढत होते,पळणाऱ्या सैन्याला कळकळीने आव्हान करत होते.  मात्र कोणी कुणाचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. मराठ्यांची अशी दाणादाण दारुण अवस्था बघून गिलच्याना चेव चढला आणि निम्मे अर्धे सैनिक त्यांनी कापून काढले. तोफा,गोळ्या,आरोळ्याने रणांगणाने अक्राळविक्राळ रूप धारण केले. रक्त,मांसाचा चिखल झाला. पानिपत थरारले. दशदिशा भयकंपीत झाल्या. शेवटी भाऊसाहेबही धारातीर्थी पडले आणि उरलेसुरले सैन्यही जिवाच्या आकांताने सैरावैरा पळू लागले. गिलच्यानी त्यांना ताणून मारले. जिवाच्या भयाने रात्री -अपरात्री लपत छपत रस्ता कापणाऱ्या चार दोन टोळक्यांना देखील पाठलाग करून कापून काढले. काही स्त्रियांचे अवघ्या एक दोन रुपयात लिलाव झाले.

महाभारतानंतर प्रचंड भयंकर रणसंग्राम पानिपतचा झाला. महाराष्ट्रातील अठरा पगड जातीतील प्रत्येक उंबऱ्यातील एक एक तरुण पानिपत मध्ये गाडला गेला.

इतके दिवस माती आणि झाडपाला खाऊन विजयाच्या आशेने जिवंत राहिलेले सैन्य अर्ध्या -एक दिवसात खलास झाले. न भूतो न भविष्यती नरसंहार व पशुसंहार झाला. इब्राहिमला हालहाल करून मारले. भाऊसाहेबांच्या मृतदेहाची विटंबना झाली. समशेरबहाद्दर जखमी अवस्थेत बेशुद्ध होऊन रानोमाळ घोडा नेईल तिकडे चालला आणि वाटेतच मरण पावला.

अब्दाली जिंकला तरीही मराठ्यांच्या चिवट झुंजीने आणि पराक्रमाच्या शर्थीने तो आश्चर्यचकित झाला. नजीब आनंदाने बेहोष झाला. मराठे हरूनही जिंकले आणि अब्दाली जिंकूनही हरला. परत कधीच भारतावर आक्रमण करायचे धाडस त्याने केले नाही. वृद्ध जानूने पार्वतीबाईना (भाऊसाहेबांच्या पत्नी) पाठीशी बांधून शत्रूचा डोळा चुकवत महाराष्ट्रात सुखरूप पोहचवले.

पानिपतची माती मराठ्यांची शौर्यगाथा अभिमानाने गाईल. इतिहास होळकर विंचूरकरना माफ करणार नाही.  त्याचबरोबर छोट्या छोट्या चुकाही किती महाभयंकर परिणाम भोगायला लावतात याचे वास्तव हृदयद्रावक उदाहरण पानिपतचा इतिहास सांगेल. इब्राहिम ,समशेरबहाद्दर,जनकोजी शिंदे, विश्वासराव, भाऊसाहेब, यशवंतराव पवार, गंगोबातात्या, यासारख्या तेजस्वी पराक्रमी पुरुषांचे बलिदान इतिहास कधीच विसरणार  नाही.

महाराष्ट्राच्या हृदयात पानिपतच्या प्रचंड जीवितहानीच्या, मानहानीच्या व पराभवाच्या जखमा कायमच भळभळत रहातील.

मराठी माणूस नेहमीच पानिपतचे पारिपत्य आठवून हळहळत राहील आणि मराठयांच्या बलिदानाशी कृतज्ञ राहील. मराठी मातीशी इमान सांगणाऱ्या प्रत्येकाने पानिपतचा इतिहास व शौर्यगाथा मनात जिवंत ठेवायला हवी…

कादंबरीचे नाव :– पानिपत

लेखक:– विश्वास पाटील

राजहंस प्रकाशन,पुणे 

समाप्त 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ काळजी हवीच… पण..! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ काळजी हवीच… पण..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

काळजातून उमटते ती काळजी.ती वाटत असते. दडपणापोटी निर्माण होते तीही काळजीच.पण ती नकारात्मक छटा असणारी.मनाला लागून रहाणारी आणि मग हळूहळू मन:स्वास्थ्यच पोखरु लागणारी.काळजातली काळजी त्या त्या प्रश्नाचं उत्तर शोधून ते प्रश्न निर्माण करणाऱ्या कारणांचं निराकरण करण्यासाठी आवश्यकच असते आणि मदतरुपही ठरते.पोखरणारी काळजी मात्र उत्तरंच दिसू नयेत इतका मनातला अंधार वाढवत रहाते आणि त्या अंधारात स्वत: मात्र ठाण मांडून बसून रहाते.या उलट काळजातली काळजी स्वत:च प्रकाश होऊन मनातली रुखरुख कमी करणाऱ्या प्रकाशवाटेचा मार्ग दाखवते.

काळजी निर्माण करणारी कारणं असंख्य आणि त्या कारणांचे प्रकारही वेगवेगळे.इथे समतोल मनाने परिस्थितीचा विचार करुन योग्य निर्णय घेणे आणि ते अंमलात आणणे या प्रोसेसमधे ‘वाटणारी काळजी’ सहाय्यभूत ठरते,आणि ‘पोखरणारी काळजी’ अडसर निर्माण करते.त्यामुळे कितीही बिकट परिस्थिती असली,तरी काळजी करण्यात वेळेचा अपव्यय न करता काळजीपूर्वक निर्णय घेणेच हितावह ठरते.

काळजी वाटायला लावणारी अनेक कारणे बऱ्याचदा अपरिहार्य असतात.वृध्दांच्या बाबतीत आणि विशेषत: त्यांच्या एकाकी वृध्दापकाळात निर्माण होणारे प्रश्न काळजी इतकेच विवंचना वाढवणारेच असतात. अशावेळी नेमका प्रश्न समजून घेऊन एखादा सक्रिय आपुलकीचा, प्रेमाचा,आधाराचा स्पर्शही त्या प्रश्नांची तिव्रता कितीतरी पटीने कमी करु शकतो.त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सपोर्ट सिस्टीमचा आपणही एक भाग होण्यासाठी आवश्यक आहे फक्त थोडी माणूसकी आणि सहृदयता.

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चाचरता संस्कार नि ओशाळलेली शिस्त!…भाग 2- अपर्णा देशपांडे ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? मनमंजुषेतून ?

☆ चाचरता संस्कार नि ओशाळलेली शिस्त!…भाग 2- अपर्णा देशपांडे ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

(उंच टाचेच्या बुटांचा टॉक टॉक आवाज करत बाहेर पडल्या.) इथून पुढे —-

संध्याला राहावलंच नाही. स्वयंपाकघरात काम करणाऱ्या आपल्या बहिणीकडे जाऊन तिनं विचारलं, ‘‘तू  शानूला सांगितला नव्हतास का आजचा आपला प्लॅन?’’

‘‘ताई, सांगितलं होतं गं. सगळ्यांबरोबर तू असायलाच हवीस, असंही म्हटलं होतं. पण हल्ली मुलींना त्यांच्या प्रोग्रॅममध्ये अडवलेलं आवडत नाही. ‘आमच्या मैत्रिणींच्या गेट टुगेदरचं काय?’ असं म्हणाली.’’

‘‘तू नक्की आईच आहेस ना तिची? घरातल्या कार्यक्रमांसाठी आपण घरी असलंच पाहिजे, शेवटी सगळी आपली माणसं आहेत, हे ठणकावून सांगायची हिंमत होत नाही का तुझी? की  मुलांसमोर आपली ‘इमेज’ सांभाळायच्या नादात संस्कार आणि शिस्त गुंडाळून ठेवलीय माळ्यावर? तिच्या बाहेर जाण्याला माझा विरोध नाहीये. दोन कार्यक्रमांचं वेगवेगळ्या दिवशी नियोजन करणं, इतकं साधं आहे ना हे! तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मुलांशी बोला ना घडाघडा.’’ संध्याचं म्हणणं बहिणीला पटलं होतं, पण… हा ‘पण’च फार अवघड होता.

——————————————————————————————————–

‘‘पप्पा, आनंदाची बातमी आहे. आम्ही नवीन ‘एस.यू.व्ही.’ घेतली काल. येतो दुपारी दाखवायला.’’ मनोजरावांचा जावई शंतनू फोनवर सांगत होता. त्यांनी जावयाचं अभिनंदन तर केलं, पण नंतर चिंतेत पडले. नुकताच नव्वद लाख रुपयांचा फ्लॅट घेतलाय, घरात दोन स्कूटर आणि चक्क दोन कारही आहेत. मग पुन्हा ही गाडी का घेतली असावी? त्याच्या आईवडिलांशी किंवा आपल्याशी न बोलता इतका मोठा खर्च?

‘‘तुम्ही का त्रास करून घेताय? तो जावई आहे, त्यांचा त्यांचा संसार आहे. आपण नको बाई बोलायला!’’ सासूबाई बोलल्याच.

‘‘मुलगी-जावई काय फक्त कौतुक करवून घ्यायलाच आहेत का? मुलासारखं मानतो ना आपण त्याला? ढळढळीत दिसतंय की अवाजवी खर्च चुकीचे आहेत. मग हक्कानं आपलं मत सांगायला नको? गरज जेव्हा लालसेचं रूप घेते ना, तेव्हा अनिर्बंध वर्तणुकीला प्रारंभ होतो बघ. फ्लॅटसाठी दहा लाख ज्या हक्कानं दिले आपण त्यांना, त्याच हक्कानं त्यांच्याशी बोलायला हवं. नको तिथे मूग गिळून बसल्यावर त्यांचं चुकतंय हे त्यांना कोण ऐकवणार?’’ मनोजराव म्हणाले.

तनया असो, शानू असो किंवा मनोजरावांचे जावई आणि मुलगी… घरातील मोठ्या मंडळींना आता आपण बोलावं की नाही, असं वाटणं चुकीचं नाही का? जीव तोडून प्रेम करणाऱ्या ज्येष्ठांची जीभ शिस्त आणि संस्कारांच्या बाबतीत अडखळणं, हे बेलगाम जीवनशैलीला खतपाणी घालणारं आहे.

लग्नानंतर मुलांच्या संसारात ढवळाढवळ करायची नसते… अगदी मान्य! पण समोरचा चुकतोय हे दिसत असूनही न बोलणं हा अतिरेक ठरेल. ही वेळ येऊच नये, म्हणून उधळणाऱ्या घोड्यांचे लगाम त्याआधीच आवळले गेले पाहिजेत.

मुलीनं एखाद्या विशिष्ट पार्टीला जाणं अजिबात पटत नसताना आईचं तिला नकार देताना चाचरणं वाईट नाहीये का? ठोंब्या मुलांना ‘बाब्या’ बनवत लोळत पडू देणं आणि बापानं त्यांची कामं करणंही वाईटच. खर्चाला दिलेल्या पैशांचा हिशेब विचारताना वडिलांची जीभ अडखळणंही वाईट. ‘मी तुझ्यावर मुळीच अविश्वास दाखवत नाहीये, पण तू या रकमेचा कसा विनियोग केलास ते मला सांग,’ असंही म्हणता येतं की! ‘पहिला मोबाइल उत्तम चालतोय ना, मग दुसऱ्या मोबाइलचा विषय आता अजिबात काढायचा नाही. त्यापेक्षा हवा तर एखादा ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग लाव, मी पैसे देतो.’ हे कमावत्या मुलाला सांगताना वडिलांना अवघडल्यासारखं वाटणं चुकीचं. ‘मैत्रिणीशी फोनवर नंतर बोल. आधी मला या कामात मदत कर,’ हे सांगायला आईनं का कचरावं? करोनामुळे निदान स्वच्छतेच्या बाबतीत बरीच जागरूकता आलीय. नाहीतर महाविद्यालयातून आलेली मुलं न चुकता आल्याबरोबर हातपाय धूत होती का? जर उत्तर ‘नाही’ असेल तर त्याला जबाबदार कोण? नुकतंच शाळेतून आलेलं पोर आल्या आल्या मित्राला फोन करून आजचा गृहपाठ विचारत असे, तर ‘सोन्या, तुझं शाळेत बाईंच्या बोलण्याकडे लक्ष नसतं का? अजिबात असं मित्राला फोनवर विचारायचं नाही. वर्गात नीट लक्ष द्यायचं,’ हे आई-बाबा सांगत नसतील तर ते चुकीचंच नाही का? 

मुलं आपलं ऐकत नाहीयेत किंवा आपल्याला अजिबात न विचारता निर्णय घेत आहेत, हे जेव्हा पहिल्यांदा जाणवतं, तेव्हाच त्यांच्याशी निवांत बोलण्याची गरज असते. ‘तू हे करायचं नाही म्हणजे नाही!’ असं बिनबुडाचं वाक्य फेकल्यास मुलं तात्त्विक मुद्द्यांवर वाद घालून पालकांना नक्कीच निरुत्तर करू शकतात. त्यासाठी त्यांना समजेल, रुचेल, अशा पद्धतीनं समजावून सांगणं गरजेचं आहे. पूर्वी मुलांना सांभाळणं किती सोपं होतं नाही? वडिलांची नुसती चाहूल लागली तरी असतील नसतील तिथून येऊन पुस्तक हातात घेऊन बसत. ‘तोंड वर करून’ बोलायची हिम्मत नसायची (अर्थात त्यामुळे फार कमी घरांमध्ये पितापुत्रात मैत्रीचे संबंध होते हेही मान्य करावं लागेल). पूर्वी मिळतंय त्यात हवी तेवढी मजामस्ती चालायची, पण अवाजवी मागण्यांना थारा नसे. करंजी-लाडूला लज्जत होती! कष्टाची किंमत होती. नात्यांची कदर होती. दिनचर्येला आकार होता. ‘नाही’चा आदरयुक्त धाक होता.  पण आज मैत्रीचे संबंध राखताना तो ‘बडगा’, पालकांचा वाटणारा एक प्रकारचा धाक मिळमिळीत झालाय असं नाही वाटत?

आपल्याच मुलांशी वागताना आपण अत्यंत सुधारलेल्या, नवीन विचारांचे पालक आहोत, मुलांना संपूर्ण मोकळीक देणारे आहोत, त्यांना स्वतंत्र विचारांचे पंख देणारे आहोत, मग आता काही गोष्टींना विरोध केल्यास आपलं दुटप्पीपण उघडं पडेल, अशी भीती वाटते का पालकांना? मग वाटू देत की! पण जिथे हस्तक्षेपाची गरज आहे तिथे बोललंच पाहिजे.

आजच्या मुलांच्या वागण्यातला सगळा समतोल बिघडलाय असं जर वाटत असेल, तर नक्कीच त्याला कारणीभूत आहे पालकांचा चाचरता संस्कार आणि परिणामी ओशाळलेली शिस्त! तुम्हाला काय वाटतं?

समाप्त 

ले: अपर्णा देशपांडे  

प्रस्तुती :  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! धूर, उग्र वास आणि डिवोर्स ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? धूर, उग्र वास आणि डिवोर्स ! ??

“पंत हा तुमचा पेपर !”

“अगं सुनबाई आज तू कशी काय आलीस, नेहमी मोरू येतो पेपर द्यायला !”

“पंत मीच यांना म्हटलं, आज मी पेपर देऊन येते.”

“बरं बरं, पण त्या मागे काही खास कारण असणारच तुझं, होय ना ?”

“बरोब्बर ओळखलत पंत, नेहमी तुम्ही यांना सल्ले देता नां, आज मला तुमचा सल्ला हवाय.”

“अगं मी कसले सल्ले देणार, काहीतरी अनुभवाच्या जोरावर बोलतो इतकंच ! बरं पण मला सांग मोरू बरा आहे ना?”

“त्यांना काय धाड भरल्ये ? मी पेपर नेवून देते म्हटल्यावर परत डोक्यावर पांघरूण घेऊन आडवे झालेत!”

“असू दे गं, दमला असेल तो!”

“त्यांना दमायला काय झालय, सगळे नवीन शौक व्यवस्थित चालू आहेत त्यांचे घरातल्या घरात, गुपचूप !”

“मोऱ्याचे कसले नवीन शौक ? मला काही कळेल असं बोलशील का जरा ?”

“पंत, मला नक्की खात्री आहे, यांना पण त्या कोण आर्यन का फार्यन सारख, बॉलिवूडला लागलेलं नको ते व्यसन लागलंय!”

“काय बोलतेस काय तू ? मोऱ्या आणि ड्रग्जच्या आहारी ?”

“हो नां, म्हणून तर मला डिवोर्स हवाय यांच्या पासून आणि तो कसा मिळवायचा हेच विचारायला मी तुमचा पेपर परत करायच्या निमित्ताने तुम्हाला भेटायला आले !”

“अगं अशी घायकुतीला येऊ नकोस, मला जरा नीट सांगशील का, तुला असं वाटलंच कसं की मोऱ्या ड्रग्जच्या आहारी गेलाय म्हणून ?”

“अहो पंत, तुम्हाला म्हूणन सांगते, कोणाला सांगू नका, हे हल्ली अंघोळ करून बाहेर आले, की रोज बेडरूम मधे जातात आणि आतून कडी लावून अर्ध्या पाऊण तासाने बाहेर येतात !”

“यावरून तू डायरेक्ट मोऱ्या ड्रग्ज घेतो या निष्कर्षांवर येवून, एकदम डिवोर्सची भाषा करायला लागलीस ?”

“पंत एवढच नाही, हे बाहेर आले की बेडरूम मधून एक उग्र वास आणि धूर जाणवतो मला !”

“मग त्याला तू विचारलंस का नाही, हा धूर आणि उग्र वास कसला येतोय म्हणून ?”

“विचारलं ना मी पंत, मी सोडते की काय त्यांना !”

“मग काय म्हणाला मोऱ्या ?”

“मला म्हणाले, सध्या मी सर्दीने हैराण झालोय आणि त्यावर एक घरगुती उपाय करतोय म्हणून !”

“अगं मग तसंच असेल ना, उगाच तू त्याला ड्रग्जच व्यसन लागलंय….”

“पण पंत, तो उपाय माझ्यासमोर करायला काय हरकत आहे यांना ? बेडरूम मधे बसून कडया लावून कशाला करायचा ? ते काही नाही मला डिवोर्स पाहिजे म्हणजे पाहिजे!”

“ठीक आहे, ठीक आहे, तुला डिवोर्स हवाय ना, मी तुला मदत करीन, तू काही काळजी करू नकोस, ok !”

“पंत मला वाटलंच होतं तुम्ही मला मदत कराल म्हणून.”

“हो, पण त्याच्या आधी मला सांग, मोऱ्याला पगार किती मिळतो महिन्याला ?”

“तसं बघा, सगळं हप्ते, टॅक्स जाऊन तीस एक हजार मिळतो !”

“आणि तो सगळा तो तुझ्या हातात आणून देतो की त्याच्या जवळच ठेवतो ?”

“अहो हे पगार झाल्या झाल्या लगेच माझ्या हातात देतात मी तो देवा समोर ठेवून नंतर माझ्याकडेच ठेवते बघा पंत !”

“आणि मोऱ्याला खर्चाला….”

“ते मागतात तसे मी त्यांना देते की !”

“मग आता तू निश्चिन्त मनाने घरी जा, कसलीच काळजी करू नकोस !”

“पण पंत माझ्या डिवोर्सच काय ?”

“अगं तुझ्या मोऱ्याला मी अर्ध्या चड्डीत असल्या पासून ओळखतोय! त्याला सुपारीच्या खांडाच पण व्यसन नाही आणि आज एकदम तू ड्रग्ज…”

“पण पंत माणूस बदलतो मोठा झाल्यावर वाईट संगतीत, तसं काहीस…”

“अगं एक लक्षात घे, मोऱ्याचा पाच वर्षाचा पगार एकत्र केलास तरी त्यातून पाच ग्राम पण ड्रग्ज येणार नाहीत !”

“काय सांगताय पंत, तुम्हाला कसं कळलं ?”

“अगं पेपर मधे बातम्यातून कळते ना त्या ड्रग्जची किंमत, त्यामुळे तू डोक्यातून मोऱ्याच्या ड्रग्जच्या व्यसनाचं खूळ काढून टाक ! ती सगळी बड्या मशहूर पैशाने सगळी भौतिक सुख विकत घेणाऱ्या धेंडांची  व्यसन ! आपण निम्न मध्यमवर्गीय, महिन्याची तीस तारीख गाठता गाठता काय काय दिव्य करायला लागतात ते आपल्यालाच ठाऊक !”

“ते सगळं बरोबर पंत, पण मग त्या धुराच आणि उग्र वासाच काय ?”

“अगं कोकणातली ना तू, मग तुला सर्दी वरचा घरगुती उपाय माहित नाही ?”

“खरंच नाही माहित पंत !”

“अगं तो दीड शहाणा बेडरूम मध्ये ओव्याची धूम्रनलिका ओढत असणार, दुसरं काय !”

“धूम्रनलिका म्हणजे ?”

“अगं ओव्याची सिगरेट बनवून ओढत असणार आणि त्याचाच तुला उग्र वास आला असणार आणि धूर दिसला असणार, कळलं !”

“अग्गो बाई, किती वेंधळी मी, उगाच सुतावरून स्वर्ग गाठायला गेले ! धन्यवाद हं पंत, आज तुम्ही माझे डोळे उघडलेत ! आता मी या जन्मात डिवोर्सची भाषा करणार नाही ! येते पंत, नमस्कार करते !”

“अखंड सौभाग्यवती भव !”

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

२५-१०-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मेंदू वापरा, नाहीतर विसरा…भाग 2 ☆ सुश्री मंगला जोगळेकर

?  विविधा  ?

☆ मेंदू वापरा, नाहीतर विसरा…भाग 1 ☆ सुश्री मंगला जोगळेकर ☆

(इतर काही बारीकसारीककाम करतानाही असे व्यायाम करता येऊ शकतात.)पासून पुढे

या दोघांनी सुचवलेले काही व्यायाम –

– आज रात्री उजव्या हातानं दात घासण्याऐवजी ते डाव्या हातानं घासून बघा. त्यानंतर तुम्हाला असं जाणवेल, की मेंदूला या क्रियेकडे लक्ष द्यावं लागलं, कारण हे काहीतरी रोजच्यापेक्षा वेगळं होतं, नवीन होतं.

– हातानं जेवण्याऐवजी कधी काट्यानं/चॉपस्टिक्स वापरून जेवा.

– जेवणात कधी न चाखलेल्या पदार्थाचा समावेश करा आणि त्यांचा आस्वाद घ्या.

– रोजच्या रस्त्यावर चालायला न जाता वेगळ्या मार्गानं जा.

– कुणाच्या घरी किंवा इतर कु ठे जाऊन आल्यावर त्या ठिकाणी जाण्याचा नकाशा कागदावर तयार करा.

– मनातल्या मनात छोटेमोठे गुणाकार, भागाकार करा. शक्यतो कॅल्क्युलेटर न वापरता हिशेब करा.

– टी.व्ही.वर बघत असलेल्या मालिके ची गोष्ट आपल्या शब्दात लिहा. गोष्टीचा पुढील भाग आपल्या शब्दात आधीच मांडा.

या सगळ्यातून मेंदू जागृत होऊन त्या क्रियेकडे लक्ष दिलं जाईल आणि त्यामुळे लक्षात राहाणंही आपोआप होईल. वर सांगितल्याप्रमाणे दर वेळी मेंदूचे व्यायाम आपल्याला न पचणारे, न रुचणारे करण्याची काहीच आवश्यकता नसते. ते आवडीचे असले तरच ते करावेसे वाटतील. जितक्या वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकत जाऊ तितका मेंदू आपल्याला साथ देत जाईल, याचाही तुम्हाला अनुभव येईल. अर्थातच शिकण्याचं महत्त्व आपल्याला पटून त्यामध्ये आपलं मन घालायला पाहिजे हे साहजिकच आहे. तरीही कुठल्याही व्यायामांमुळे मेंदू विचाराधीन राहिला का? ताजंतवानं वाटलं का? हे मात्र जाणीवपूर्वक बघायला हवं.

एकाच प्रकारचे व्यायाम सदोदित करणाऱ्यांच्या मेंदूला पुरेसा व्यायाम मिळेलच असं नाही. उदा. जे शब्दकोडं तुम्ही दहा, पंधरा मिनिटांत सहज सोडवू शकाल, जे सोडवणं तुमच्या हातचा मळ असेल, त्यातून तुम्हाला झालाच तर अत्यल्प फायदा होईल. त्यामुळे एकाच वर्तमानपत्रातील शब्दकोडं पुरेसं आव्हानात्मक नसेल, तर दुसऱ्या वर्तमानपत्रातील कोडं सोडवा. ‘कोडीमास्टरां’ना कोडी सोडवण्याऐवजी स्वत:ची कोडी तयार करून एक वेगळंच आव्हान मिळेल. एकाच प्रकारची कोडी सतत सोडवण्याऐवजी वेगवेगळ्या प्रकारची कोडी सोडवणं केव्हाही चांगलं. त्यामुळे मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना वेगवेगळी आव्हानं मिळतील. ‘सुडोकू’तून मिळणारं आव्हान शब्दकोड्याहून वेगळं असेल, तर बुद्धिबळातून, ब्रिज खेळण्यातून मिळणारं आव्हान आणखी वेगळं असेल. हल्ली वेगवेगळ्या कोड्यांसाठीची अ‍ॅप्स मोफत उपलब्ध असतात. त्यांचाही उपयोग करता येईल.

मेंदूला वेगवेगळे व्यायाम देऊन स्मरणशक्तीवर्धन करणाऱ्या ‘वेब पोर्टल्स’ची सुरुवात होऊन अमेरिकेत आता एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. याची सुरुवात विविध रुग्णालयांनी केलेल्या स्मरणवर्धन कार्यक्रमांतून झाली असं म्हणता येईल. ब्रेन एरोबिक्स, ब्रेन जिम अशा विविध कार्यक्रमांमधून स्मरणशक्तीच्या विषयाबाबत जागृती वाढण्याचं मोठं काम तिथे झालं आहे. परंतु आपल्याकडे हा विषय नवीन होता. आपली पार्श्वभूमी लक्षात घेऊन सगळ्यांना आवडतील, रुचतील असे मेंदूचे व्यायाम घ्यावेत अशी कल्पना मनात रुजली. डिमेंशियाला शक्य तेवढं दूर ठेवायला हवं हे उद्दिष्ट त्यापाठीमागे होतं. या विचारानं पुणे येथे २०१४ मध्ये राज्यातील बहुधा पहिला ‘मेमरी क्लब’ चालू करण्याची संधी मिळाली. आज पुण्यात बऱ्याच ठिकाणी असे क्लब सुरू आहेत. नाशिकमध्येही ते सुरु झाले आहेत. मेमरी क्लब्समध्ये आठवड्यातून एकदा एकत्र जमून मेंदूसाठी आनंददायी व्यायाम (एक्सरसाइज) घेतले जातात.

टाळेबंदीच्या काळात या क्लब्सनी व्हॉट्सअ‍ॅपवरून आपलं काम चालू ठेवलं. त्यावरून स्फूर्ती घेऊन असे अनेक ‘व्हॉट्सअ‍ॅप मेमरी क्लब’ स्थापन झाले. आज महाराष्ट्राच्या विविध भागांतील जवळपास २,००० व्यक्ती अशा क्लब्सशी जोडल्या गेल्या आहेत. क्लबमुळे होणारे अनेक फायदे सभासद नमूद करतात. त्यामधील प्रमुख फायदे असे आहेत- आत्मविश्वास वाढतो, मनामधील नको ते विचार बंद होतात, मेंदूला सतत खाद्य मिळतं, नावीन्यपूर्ण गोष्टी करण्याचा आनंद मिळतो, नवीन शिकणं होतं, नवीन ओळखी होतात, इत्यादी. बरेच सदस्य आपल्या ऐंशी वर्षांवरील पालकांनाही हे एक्सरसाइज सोडवण्यात सहभागी करून घेताना दिसतात. यातील काही जण तब्येत बरी नसतानाही एक्सरसाइज सोडवण्याचा आनंद घेतात. सहलीला गेल्यावर, घरात जेवणाच्या टेबलावर एक्सरसाइजच्या चर्चा रंगतात, असंही दिसतं.

हे क्लब्स वाढण्याचं एकमेव कारण म्हणजे ते चालवण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला. केवळ त्यांच्याच सहकार्यावर क्लब्सचं काम चालू आहे. खरंतर मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी सुरू झालेली ही एक चळवळ आहे. या पुढाकारातून ‘एक्सरसाइजेस’चं तयार झालेलं वैविध्य केवळ अनोखं म्हणायला हवं. अर्थात हे काम पुढे जायचं तर उत्साही मंडळींची कार्यकर्ते आणि सदस्य म्हणून आवश्यकता आहेच. मेंदूला कायम ‘फॉर्मात’ ठेवण्यासाठी त्याला नियमित खाद्य देणं अतिशय महत्त्वाचं आहे. वर्षभरात महिनाभर व्यायाम केला तर जसा शरीराला व्यायामाचा फायदा होणार नाही, तसंच वर्षभरातून चार आठवडे मेंदूला व्यायाम देऊनही तो पुरेसा होणार नाही. चार-आठ दिवसांत मेंदूला ‘सुपर पॉवरफुल’ करणारी पुस्तकं, गोळ्या आणि इतर कार्यक्रमांचा फोलपणा यावरुन लक्षात यावा. मेंदूचं कुतूहल वाढवून त्याला जागृत ठेवणं हा नित्यक्रमाचाच भाग व्हायला हवा.

मग करायची का सुरुवात? आजच्या मेंदूच्या अभ्यासासाठी काही सोपे प्रश्न खाली देते आहे. ते जरूर सोडवून पाहा.

‘च’ आणि ‘क’ ही दोन्ही अक्षरं असलेले शब्द लिहा. (उदा. चूक, चकवा)

आकाश, आभाळ या शब्दांशी नातं सांगणारे किती शब्द तुम्ही सांगू शकाल?

‘प्यार’ हा शब्द असलेल्या किती हिंदी चित्रपटांची नावं तुम्हाला आठवतात?

तुमचा आवडता एक खेळ, गोष्ट, वस्तू यांपैकी कशाचीही तुमच्या परदेशातील नातीला तुम्ही कशी ओळख करून द्याल?

तुम्हाला आठवतेय का लहानपणी वापरात असलेली जुन्या कपड्यांमधून बेतलेली पिशवी? बाहेर जाताना ती पटकन  खिशात कोंबली तर कधीही तिचा वापर करता यायचा. आता आधुनिक वातावरणात पिशवी हा शब्दही हद्दपार झाला आणि तिची ‘डिझाइनर बॅग’ झाली. या पिशवीचा पूर्वीपासून आतापर्यंतचा प्रवास शब्दांत टिपा; नाहीतर तिचं स्थित्यंतर चित्रांमध्ये पकडा. शाळेतल्या निबंधांचे विषय असायचे तसं ‘पिशवीचं आत्मवृत्त’चं जणू!

घरात वा मित्रमंडळींमध्ये असे प्रश्न तुम्हीच तयार करूनही एकमेकांना सोडवायला सांगू शकाल. अंतिमत: मेंदू तल्लख राहाणं हाच आपला उद्देश आहे. आणि त्यासाठी प्रयत्न करणं तुमच्याच हातात आहे.

© सुश्री मंगला जोगळेकर

 ≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चाचरता संस्कार नि ओशाळलेली शिस्त!…भाग 1- अपर्णा देशपांडे ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? मनमंजुषेतून ?

☆ चाचरता संस्कार नि ओशाळलेली शिस्त!…भाग 1- अपर्णा देशपांडे ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

आईवडिलांनी मुलांचे मित्र व्हावं, असं म्हणता म्हणता आई-वडील म्हणूनच त्यांच्या असण्यात जो आदरयुक्त धाक असतो, तो हरवला. मुलांना मोकळीक देणं, घरात खुलं वातावरण असणं योग्यच. पण त्याचा अर्थ असा नाही, की मुलांची एखादी गोष्ट खटकल्यावर पालकांनी आपली नापसंतीही व्यक्त करू नये. मुलांशी नेमकं  कसं वागावं याविषयी पालकांमध्ये जास्त गोंधळ आहे? की त्यांचं वागणं दुटप्पी आहे? पालकांनी यावर गंभीरपणे विचार करायला हवाय…

उंच स्टुलावर चढून भिंतीवरचं कोळ्याचं जाळं काढणाऱ्या आपल्या नवऱ्याकडे बघून शोभाताई ओरडल्या, ‘‘अहो, काय करताय हे? खाली उतरा आधी! तरुण पोरं आहेत घरात. त्यांना सांगू ना! उगाच पडलात बिडलात, हाड मोडलं, तर केवढ्याला पडेल ते?’’

‘‘अगं होतंय तोवर करायचं! पोरांना कशाला सांगतेस लगेच? दिवाळी आलीय तोंडावर. आणि तू शंभर वेळा ओरडशील तेव्हा कुठे मुलं ऐकतील कदाचित. वर्षही संपेल तोपर्यंत!’’ नाइलाजानं खाली उतरत, हात झटकत शरदराव म्हणाले.

नवऱ्याचे हे शब्द दिवसभर शोभाताईंच्या मनात घुमत राहिले. त्या विचार करू लागल्या, खरंच, हे असंच होतं हल्ली. मुलं पटकन ऐकत नाहीत, मग आपणच काम हातावेगळं करून टाकू म्हणत पालकच सगळी कामं उरकतात. मुलांपर्यंत जातच नाहीत. परवाचीच गोष्ट- मुलांना सांगितलं होतं, ‘आज मुंबईहून मामा येणार आहेत. उद्या  सकाळी लवकर उठून तयार राहा. त्यांना एका ठिकाणी नेऊन सोडायचं आहे.’ पण मुलं रात्री जागत बसली आणि सकाळी वेळेवर उठलीच नाहीत. शेवटी शरदरावांनीच गाडी काढली. कडक शिस्तीच्या मामांसमोर आपल्यालाच ओशाळल्यासारखं झालं होतं. आणि शिस्तीचं म्हणावं, तर मामाच का, आपले आईवडीलसुद्धा किती शिस्तीचे होते! पहाटे उठणं, रात्री लवकर झोपणं, संध्याकाळी हात-पाय धुवून देवासमोर पसायदान म्हणणं, अशा गोष्टी अंगी भिनलेल्या सहजप्रवृत्ती म्हणून आपण करत होतो. कधी चांगल्या सवयी लागल्या हे समजलंच नाही. पाढे पाठ केल्याशिवाय जेवणाचं ताट मिळत नसे लहानपणी. आपण किती शिस्तीत वाढलो नाही? आपल्या पालकांनी घालून दिलेले नियम आणि शिस्तच आज स्थिर आयुष्य जगण्यास कारणीभूत आहे…’ हा विचार आला आणि शोभाताई चमकल्या. आपण आपल्या मुलांसाठी त्यांच्या आयुष्यभराच्या पुंजीत नेमकं कोणतं दान टाकणार आहोत? आपण त्यांना योग्य ती शिस्त लावण्यात कमी पडतोय का? या विचारानं त्या अस्वस्थ झाल्या.

‘‘मॉम, आम्ही या वीकेंडला विकीच्या फार्महाऊसवर जातोय. शनिवारी दुपारीच निघू.’’ तनयानं सरळ आपला कार्यक्रम जाहीर केला. आईची परवानगी नाही मागितली. आईला अर्थातच ते खटकलं. आज निदान आपली मुलं न लपवता, सांगून सगळं करतात हे जरी योग्य वाटत असलं, तरी मुलीनं असं कुणाच्या फार्महाऊसवर जाणं आपल्याला अजिबात पटलेलं नाहीये, हे चेहऱ्यावर न जाणवू देता मीनाताईंनी विचारायला सुरुवात के ली, ‘‘मुक्कामी का जाताय? कोण कोण आहे? सकाळी जाऊन संध्याकाळी परत येणं नाही जमणार का? मुली किती आहेत? ’’

‘‘आता तूपण प्रियाच्या आईसारखे ‘ऑर्थोडॉक्स’ प्रश्न विचारणार आहेस का? आमचं ठरलंय गं सगळं. सांगते रात्री क्लासवरून आल्यावर.’’ हे बोलत तिनं स्कूटर सुरू केली आणि आई काही बोलण्याआधीच वेगात निघूनही गेली.

लहानपणापासूनच मनाप्रमाणे वागण्याची मोकळीक दिल्यानं आता नेमक्या कोणत्या शब्दांत मुलीला ‘जाऊ नकोस’ म्हणावं याचा विचार करत मीनाताई तिथेच उभ्या होत्या. ‘हल्ली हे असं का होतंय? का आपण पटकन तनयाला विरोध नाही केला? मुलांना फटकारताना आपली जीभ का चाचरते? ती दुरावतील किंवा दुखावली जातील, असं वाटून आपण गप्प बसतो का? आपणच घेतलेल्या सुधारणावादी भूमिकेमुळे आता आपण अचानक जुन्या मतांचे वाटू अशी भीती आपल्याला वाटते का? बदललेल्या जगण्याशी हातमिळवणी करताना आपणच ओढून घेतलेल्या नव्या कातड्याखाली आपले संस्कार गाडले जात आहेत. हे बरोबर नाही. वागण्यातील कृत्रिमता कधीच मनाला भिडत नसते. आता लेक घरी आली की कडक शब्दात तिला ‘नाही’ म्हणायचं. काय महाभारत व्हायचंय ते होऊ देत.’ असा विचार करत मीनाताई घरात आल्या तर खऱ्या, पण आपल्या कडक शब्दांची धार केव्हाच बोथट झाली आहे, हे जाणवून त्यांना खूप अगतिक वाटत होतं.

मीनाताईंच्या आईनं त्यांना वेळोवेळी जाणीव दिली होती, ‘‘मीने, पोरांना वेळच्या वेळी ठामपणे नाही म्हणायची सवय लाव तू! लहानपणीच थोडं नियमात बसवावं. पाक घट्ट झालेले लाडूही वळत नाहीत गं! मग ही तर स्वतंत्र विचारांची पोरं आहेत. नको तिथे ढील दिली की पतंगही भरकटतोच.’’ आईनं सल्ला दिला होता, पण मीनाताईंना वाटायचं, की जुन्या काळातल्या शिस्तीचे नियम आज कसे लागू होतील? मुलांशी मित्रत्वानं वागायचं, तर थोडं त्यांच्या कलानं घ्यावंच लागतं. पण आता वाटतंय, की  कोणत्या विषयात किती कलानं घ्यावं, याचं गणित जरासं बिघडलंच.

संध्यासमोर तिची भाची बाहेर जाण्याची तयारी करत होती. खरंतर त्या दिवशी घरात सगळ्या मावस-मामे भावंडांचा मेळावा होता, काही भाचेमंडळीही येणार होती. ‘‘शानू, तू बाहेर निघालीस? आज सगळे येत आहेत ना घरी?’’ संध्यानं विचारलं.

‘‘हो गं मावशी, पण आमच्या इंजिनीअरिंगच्या फ्रेंड्सचं ‘जी.टी.’ (गेट टुगेदर) आहे आज. मी येईन रात्री अकरापर्यंत.’’

‘‘अगं, तुझ्या घरी जमतायत ना सगळे? महिनाभर आधीच ठरलं होतं ना हे?’’ आवाजात शक्य तितकं मार्दव आणत मावशीनं विचारलं.

‘‘चिल मावशी ! धिस इझ लाईफ.’’ ओठांवरून लिपस्टिक फिरवत शानूबाई बोलल्या आणि पर्स उचलून उंच टाचेच्या बुटांचा टॉक टॉक आवाज करत बाहेर पडल्या. 

 क्रमशः….

ले: अपर्णा देशपांडे  

प्रस्तुती :  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पानिपत -हृदय द्रावक शोकांतिका – भाग – 2 ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

?इंद्रधनुष्य? 

☆ पानिपत -हृदय द्रावक शोकांतिका – भाग – 2 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

(श्री. विश्वास पाटील यांच्या “ पानिपत “ या गाजलेल्या कादंबरीचा परामर्श ) 

(पण प्रचंड नामुष्की, मानहानीही पत्करावी लागली ) इथून पुढे —–

खरेतर दत्ताजी शिंदेच्या पराभवापासूनच पानिपतच्या युद्धाची ठिणगी पडली आणि हा हा म्हणत तिने उग्र वणव्याचे रौद्र अक्राळविक्राळ रूप धारण करत लाखो बळी घेतले. कोणतेही युद्ध जिंकायला प्राणांची बाजी लावणारे शूरवीर लढवय्ये हवेतच, पण युद्धनीतीही तितकीच महत्वाची असतेच.  युद्धभूमीची आणि आसपासच्या भौगोलिक परिस्थिती आणि हवामानाची सुद्धा बिनचूक माहिती हवी असते. शत्रूच्या शस्त्रास्त्राच्या तोडीची हत्यारे हवीत, ती चालवणारे प्रशिक्षित सैनिकही हवेत. आणीबाणीच्या प्रसंगी अचूक निर्णय क्षमता हवी. दत्ताजी शिंदेंच्या बाबतीत हेच झाले. गिलच्यांच्या फौजांकडे आधुनिक बंदुका होत्या. याउलट मराठी फौजेकडे पारंपारिक हत्यारे होती. काटेरी दाट जंगलात गिलचे लपून बसायचे आणि गोळ्यांचा मारा करायचे. बोचरी थंडी आणि परका मुलुख, त्यात महिनाभर तळ देऊन बसलेल्या सैनिकांना ऐनवेळी कुठून रसदच मिळाली नाही. तरीही उपाशी पोटी ‘करू वा मरू’ म्हणत चिवटपणे झुंज देत दत्ताजीने प्राणांची बाजी लावली. दत्ताजीचे मुंडके छाटून तलवारीवर लटकवण्यात आले. लपून जीव वाचलेले मूठभर सैनिक सैरावैरा धावले.

पानिपतचा खरा सूत्रधार खलनायक नजीबखान साधा वजीर, पण त्याने मराठ्यांचा कायमचा बिमोड करून, दिल्लीचे तख्त बादशहाच्या अमलाखाली आणून, स्वतःस एखादी बक्षिसी मिळवायच्या स्वार्थी महत्त्वाकांक्षी इच्छेला कोणी भीक घालणार नाही म्हणून त्याला ‘जिहादचा’ रंग देऊन स्वतःची इच्छा तृप्त केली. त्यासाठी त्याने अफगाणहून अब्दालीला बोलवले. खरे तर मराठ्यांच्या मेहेरबानीवर जगलेला तो एक अस्तनीतला निखारा आणि विषारी सापाचे पिलू होते. बऱ्याच सरदारांना त्याची कुरापतखोर वृत्ती माहीत झाली आणि या जहरी सापाला वेळीच ठेचायचे ठरवले.  पण मल्हारराव होळकरांसारख्या जुन्या जाणत्या नेत्याने सतत अभय देऊन हा साप मोठा केला आणि एके दिवशी उपकारकर्त्यालाच तो डसला. नुसता डसलाच नाही, तर त्याने विषारी गरळ ओकून मराठेशाही गिळंकृत केली आणि मराठी सत्तेचं पानिपत केलं.

दिल्ली काबीज केल्यानंतर खरे तर अब्दालीला भिडायचे असे पक्के झाल्यावर मोर्चेबांधणीस सुरुवात केली. त्यासाठी रसद आणि वेगवेगळ्या सरदारांना पाठिंब्यासाठी, हातमिळवणीसाठी विनंती केली.  पण नजीबने शुजाउद्दौलासारख्या नेत्याविरुद्ध अब्दालीचे कान भरून जिहादची शपथ घालून, अब्दालीला मिळण्यास भाग पाडले. जाटासारख्या नेत्यांना कधी गोड बोलून तर कधी धमकी देऊन, तर कुणाला पदांची आमिषे दाखवून मराठयांना मदत वा कुमक मिळू दिली नाही. रसदीचे ओघ मधेच अडवले, लुटले गेले. महत्वाचे पत्रव्यवहार मध्येच अडवून स्वारांना मारले गेले. अशा तऱ्हेने मराठ्यांचे नाक तोंड दाबून त्यांना गुदमरायला लावले. त्यातच लढणारे कमी आणि हौसे नवसे गवसे, बायका मुले ,यात्रेकरू, खायला कहार आणि धरणीला भार अश्या लुंग्यासुंग्यांची फौज भाऊसाहेबांच्या पदरी जास्त होती.( जे शिवरायांनी त्यांच्या कारकिर्दीत कधीच केले नाही) त्यामुळं तातडीचे निर्णय भाऊसाहेबाना घेणे अवघड झाले. बऱ्याचदा महत्वाचे निर्णय घेतल्यावर जेरे-जोशीसारख्या पंचांगकर्त्यांनी मुहूर्त, वेळ वगैरेची प्रतिकुलता दाखवून भिववले. युद्धात महत्त्वाचे निर्णय मुहूर्त बघून घेत नसतात, तर सभोवतालची परिस्थिती पाहून घ्यायचे असतात. संधी साधून डाव टाकायचा असतो. त्यातच जेष्ठ श्रेष्ठत्वाचे अंतर्गत वाद,  यामुळं भाऊसाहेबाना विवश केले. कोणतेच निर्णय त्यांना ठोसपणे घेता येईनात. एकीकडे उपासमार आणि एकीकडे सगळीकडूनच जखडलेपणा,अन्नधान्य- चारा टंचाई, हे कमी की काय म्हणून निसर्गाची प्रतिकुलता ! यमुनेला दुथडी भरून आलेला पूर.  पानिपतच्या पराभवाचे हे जणू संकेत होते. कुंजपुऱ्याचा पाडाव आणि त्यातून मिळालेले थोडेसे धन ही एक बाब दिलासा देणारी आणि मराठ्यांचा उत्साह वाढवणारी होती. पण एवढ्या प्रचंड समुदायास आणि जनावरांस जगवणे मुश्किल होते. जनावरे मरू लागली माणसे उपासमारीने विव्हळू लागली.  त्यांचे हाल पाहून भाऊसाहेबांचे मन तडफडू लागले. जवळचे सोने नाणे सर्व विकून झाले. सड्या फौजा कुणीकडून कशाही माळरानाने, आडवाटेने तुकड्या तुकड्याने बाहेर पडून शत्रूवर तुटून पडल्या असत्या, पण बायका मुलांसह असल्यामुळे कुठलाच ठोस निर्णय घेता येईना आणि मार्ग निघेना. म्हणून शेवटी करू वा मरू म्हणून गिलच्याला तोंड देतच दिल्ली गाठू असा निर्णय झाला. त्यासाठी ‘गोलाई’ची व्यूहरचना करण्यात आली. कारण पानिपतच्या त्या उघड्या विस्तीर्ण मैदानावर गनिमी कावा उपयोगी नव्हता. पण इब्राहिम गारदीच्या व्यूहरचनेला विंचूरकर आणि मल्हारराव होळकरांसारख्या जेष्ठ श्रेष्ठ नेत्यांचा विरोध तर होताच, पण कालच्या मिसरूड फुटलेल्यांचे आम्ही ऐकायचे? ही ’अहं श्रेष्ठवादी ‘ असूया देखील ! एकीकडे नजीबसारख्या विषारी पिल्लाला मानसपुत्र मानून त्याला सहानुभूती देणारे होळकर, इब्राहिम गारदीच्या प्रामाणिकपणावर मात्र साशंक होते. आतून धुमसत होते. खरे तर कुंजपुरा इब्राहिम गारदीच्या व्यूहरचनेने आणि तिथल्या भूप्रदेशाच्या त्याच्या अचूक माहितीमुळेच जिंकला होता. म्हणूनच गोलाईच्या व्यूहाने गिलच्याला कापत कापत पुढे सहज जाऊ अशी अटकळ आणि खात्रीही होती.  पण युद्धाला जसे तोंड फुटले आणि मराठ्यांच्या बाजूने विजयश्रीचा कौल पडू लागला, तेव्हा होळकरांच्याच मेहेरबानीवर पदरी असलेल्या कॅडम्याड पथकाने हुल्लडबाजी केली,  आणि ‘ मराठे हरले,’ असा कांगावा सुरू केला.

क्रमशः……

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares