मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ऑपरेशन ईश्वर!” “ऑपरेशन ईश्वर!” – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “ऑपरेशन ईश्वर!” – भाग – २  ☆ श्री संभाजी बबन गायके

‘ऑपरेशन ईश्वर ! ‘ 

            ’भारतीय सैन्यावरची अनुभवसिद्ध ‘ईश्वर’कृपा !

(दहा जवान होते..त्यांतील पाच जण त्या जागी विविध ठिकाणी पेरून बसवले आणि इतरांसोबत रोड ओपनिंग चे काम करावे असे ठरले. रात्र झाली…उजाडले….सोबत आणलेल्या पुरी-भाजी खाऊन जवान ताजेतवाने झाले!) 

इथून पुढे – – – 

आणि…नेमके ईश्वरसिंग ज्या बाजूला बसले होते त्याच रस्त्याने काल अतिरेक्यांना रस्ता दाखवायला गेलेला तो सी.आर.पी.एफ.जवान खाली उतरताना दिसला. त्याने अतिरेकी वर चढून गेल्यानंतर खाली दरीत असलेल्या भागात असलेल्या एका धार्मिक स्थळाजवळ असलेल्या झाडीत लपून बसलेत!

आता वरून खाली गेलो तर ते खालून गोळीबार करतील….त्यासाठी त्यांच्यापासून मागच्या बाजूला असलेल्या डोंगरावर पाठीमागच्या बाजूने चढून तिथून खाली येणे…ही योजना झाली! एक तुकडी घेऊन जायचे ठरले….आणि ते अतिरेकी निसटून जाऊ नयेत म्हणून दोन रस्त्यांत काही सैनिक तैनात केले! 

पथक काही मीटर्स वर चढले…आणि वरून खाली उतरू लागले! बरेच खाली आले तरी अतिरेकी नजरेस पडेनात….ईश्वरसिंग यांचे सोबत एकूण चार लोक होते…..बाकीचे तिघे त्यांनी मशीन गन देऊन एका उंच जागी थांबवून ठेवले होते..गरज पडली तर फायर सपोर्ट देण्यासाठी. 

दहा-वीस मीटर्स खाली उतरताच सर्वांत पुढे असलेल्या नेमबाज सैनिकाला एका झाडाच्या जवळ दोन पहारेकरी उभे असलेले दिसले…त्यांची तोंडे विरुद्ध दिशेला होती…त्या दोघांत बरेच अंतर होते. ईश्वर सिंग साहेबांनी पुढच्या सैनिकाला हळूच सांगितले….वो दूर वाला मैं उडाता हूं…तू यह नजदीकवाला ले ले! आणि दोघांनीही एकेका गोळीत ते दोघे यमसदनी धाडले….तिसरा समोर आला….त्यालाही या दोघांना सोबत म्हणून वर पाठवले! बाकीचे सात मागे पळाले…..आणि एका कपारीत लपून ईश्वर सिंग साहेबांच्या पथकावर गोळीबार करू लागले…पण त्यांना नेम साधता येत नव्हता! ….आर.एल.अर्थात rocket launcher गन! ईश्वरसिंग साहेबांनी मेसेज देऊन आर.एल.मागवली…त्यांचे वरिष्ठ अधिकारी ते हत्यार घेऊन तिथवर पोहोचले! पण तोवर अतिरेक्यांचा गोळीबार थांबला होता. वरिष्ठ म्हणाले….बाकीचे पळून गेले असतील…त्यावर अनुभवी ईश्वर सिंग म्हणाले….त्यांचे रस्ते अडवून ठेवले आहेत मी…..बाकीचे सात इथंच कुठं तरी लपून बसलेत. त्यावर ते साहेब आणि ईश्वर साहेब आणखी तीन चार जवान घेऊन संभाव्य जागेला वळसा घालून जवळ गेले! तीन अतिरेकी मरून पडलेले. त्यांची एक रायफल ईश्वर सिंग साहेबांनी सोबत आलेल्या सी.आर.पी.एफ.वाल्या सैनिकाच्या हाती दिली! आता दोन वेगवेगळे गट बनवून त्या जागेला घेरण्याचा प्रयत्न करण्याचे ठरले. वरिष्ठ अधिकारी दोन-तीन सैनिक घेऊन एका बाजूने तर ईश्वर सिंग एका बाजूने निघाले. तेवढ्यात त्या वरिष्ठ साहेबांच्या दिशेने जबरदस्त गोळीबार झाला! हा तर PIKA मशीनगनचा फायर..ईश्वरसिंग साहेबांनी अनुभवाने जाणले! मिनिटाला शेकडो गोळ्या डागणारे हत्यार…पण वरिष्ठ साहेब त्यातून बचावले…..परंतु काहीवेळाने आणखी पुढे सरकताच त्यांच्यावर चायना मेड हातगोळा पडला आणि ते दोन साथीदारांसह जखमी झाले! हाती घेतलेली मोहीम तर फसल्यासारखीच होती. आणखी मोठ्या साहेबांना मेसेज करून हेलीकॉप्टरची मागणी केली…पण त्या भागात हेलीकॉप्टर नेणे धोक्याचे होते. उच्च अधिका-यांनी रस्ते मार्गाने वैद्यकीय मदत पाठवण्याचा निर्णय घेतला! दुर्दैवाने सोबत आलेला सी.आर.पी.एफ.वाला सैनिक PIKA फायरमध्ये सापडला आणि कामी आला! कवर फायर घेत ईश्वर सिंग यांनी दोन जखमी आणि त्या हुतात्मा सैनिकाचा मृतदेह तिथून खाली पाठवण्यात यश मिळवले!  

ईश्वर सिंग म्हणाले…साहेब…मी मोहीम अर्धवट सोडून येऊ इच्छित नाही! आणि त्यांनी परत जाऊन नवीन योजना आखली! तोवर त्यांचे सर्वांत वरिष्ठ साहेब तिथे पोहोचले….त्यांनी सोबत एक सैन्य पथक आणले होतेच. त्यांनी ईश्वर सिंग यांना त्यांच्या जागेवरून मागे येण्याची सूचना दिली. अतिरेकी लपल्याची जागा आणि मी यात फारसे अंतर नाही….मी जर मागे फिरलो…तर ते आम्हांला सहज उडवू शकतील…त्यामुळे मी इथंच थांबून कारवाई करीत राहणार आहे! तोवर आपल्याकडील तीन सैनिक हुतात्मा झाले होते…..साहेब म्हणाले….मागे या..आपल्याला आणखी नुकसान नको आहे! त्यावर ईश्वर सिंग यांनी आपला निर्धार असून आता कोणाला काहीही होऊ देणार नाही,असे सांगितले! 

ईश्वर सिंग पुन्हा कामाला लागले…..तिकडून PIKAचा जबरदस्त फायर सुरु झाला…जोवर पिका शांत होत नाही तोवर काहीही करण्यासारखं नव्हतं! पण एवढ्यात PIKA शांत झाली…तिच्यातल्या गोळ्यांचा पट्टा संपला…गोळ्यांचे पट्टे असलेली पिशवी अतिरेक्यांनी शेजारच्याच खडकावर ठेवली होती…..PIKAवाल्याने ते पिशवी घेण्याच्या प्रयत्नात ती पिशवी खाली पडली….ती घेण्यासाठी तो थोडा पुढे वाकला….ईश्वर सिंग साहेबांनी निशाणा साधला…..फौजेत आल्यापासून ईश्वर सिंग फायरींग स्पर्धेत कधीच दुस-या क्रमांकावर राहिलेले नव्हते…कायम नंबर एक. तो अतिरेक्याचे डोके केवळ एखाद दोन सेकंदासाठी दिसले असेल….तितका वेळ तर खूप होता….हेड शॉट अचूक! आतापर्यंत दहापैकी चार झालेले होते…दुस-याच मिनिटाला पाचवाही घेतला…..साहेबांना सांगितले….पाच झाला स्कोर. साहेब म्हणाले…आता पुरे झाले…मागे फिरा! नाही साहेब….आणखी पाच आहेत..त्यांना संपवूनच येणार! 

गोळ्या पुरवून पुरवून वापरा असा आदेश ईश्वर सिंग यांनी सैनिकांना दिला….आता गवतात लपलेले पाच जण उरले होते….गवत जरासे जरी हलले तरी फायर करा…साहेब म्हणाले……काही मिनिटांमध्ये त्या गवतात पाच मृतदेह मिळून आले…..दहाचा हिशेब लागला होता! 

नायब सुबेदार ईश्वर सिंग यांनी आपले शब्द खरे करून दाखवले होते…आयुष्यभर सैन्यात कमावलेला सारा अनुभव वापरला…..प्रसंगी वरिष्ठ अधिका-यांकडे हट्ट धरला…स्वत:चा जीव धोक्यात टाकला…पण हाती आलेले दहा अतिरेकी अजिबात हातचे जाऊ दिले नाहीत! त्या अतिरेक्यांचे मृतदेह तिथून वर आणायचे आदेश मिळाले…पण ईश्वर सिंग म्हणाले….हे काम यावेळी अशक्य आहे…जवान कमी आहेत. शेर किसने मारा? जिसने कान,पूंछ काट ली….या चालीवर मी त्यांची शस्त्रे घेऊन वरती येतो! त्यानुसार त्यांनी केलेही! 

दुसरे दिवशी गावक-यांना हाताशी घेत, दहा चारपाई खाटा घेतल्या..त्यावरून ते मृतदेह जागेवरून उचलून आणले. त्यांचे POST MORTEM केले गेले आणि व्यवस्थित दफन विधीही आपल्या लष्कराने करवून घेतला..अगदी त्यांच्या धार्मिक पध्दतीनुसार! वरिष्ठ अधिका-यांनी या मोहिमेला ऑपरेशन ईश्वर असेच दिले होते त्यांच्या पातळीवर! एका सैनिकासाठी तर हा मोठाच पुरस्कार होता! आणि पुढे लवकरच भारताचे तत्कालीन राष्ट्रपती महोदय डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम साहेब यांच्या शुभहस्ते कीर्ती चक्र दिले गेले! अगदी सैनिक होण्यासाठीच जन्माला आलेले ईश्वर सिंग यांनी त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत अतिशय जबरदस्त सैन्य सेवा बजावली. हे सैनिकच भारतीय सैन्याची खरे सामर्थ्य आहेत…त्या सर्वांना मन:पूर्वक नमस्कार….वंदन.

(MONKS AND WARRIORS आणि तत्सम online platforms/ youtube channels वर ईश्वर सिंग साहेबांच्या मुलाखती नुकत्याच प्रसिद्ध झाल्या. त्यात साहेबांची कामगिरी सविस्तरपणे समजावून घेण्यासारखी आहे. ही पेजेस हिंदी,इंग्लिश मध्ये असल्याने मराठी वाचक त्यापासून वंचित राहतो…म्हणून मी हा उपक्रम हाती घेतला आहे. COPYRIGHT ISSUES आहेतच. पण ही माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे गेली पाहिजे…ही यामागची भावना आहे. जयहिंद.) 

 समाप्त –  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रील आणि लाईक्स… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

उषा नाईक

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ रील आणि लाईक्स… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. उषा नाईक ☆

‘स्नेहा’ (वय २८) ही एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Influencer) होती. तिचे इन्स्टाग्रामवर २ मिलियन फॉलोअर्स होते.

#स्त्रीशक्ती

तिचं आयुष्य म्हणजे फक्त कॅमेरा, रिंग लाईट आणि फिल्टर होतं.

तिचा ६ वर्षांचा मुलगा, ‘आर्यन’, अनेकदा तिच्या व्हिडिओमध्ये दिसायचा. लोक कमेंट करायचे, “So cute! Best Mom-Son duo!”

पण कॅमेरा बंद झाला की स्नेहाचं रूप वेगळं असायचं.

 

त्या दिवशी रविवार होता.

स्नेहा बेडरूममध्ये मेकअप करून तयार झाली होती. तिला “मदर्स डे स्पेशल” (Mother’s Day Special) रील बनवायची होती.

थीम होती – ‘आईचं प्रेम: जगातील सर्वात सुरक्षित जागा.’

बाजूच्या हॉलमध्ये आर्यन खेळत होता. तो एकटाच होता, कारण बाबा बिजनेस ट्रिपवर गेले होते.

 

आर्यन धावत बेडरूममध्ये आला. त्याच्या हातात एक तुटलेलं खेळणं होतं.

“मम्मा… मम्मा… हे बघ ना. हे तुटलं. मला भीती वाटतेय, ते सोफ्याखाली गेलंय.”

स्नेहा रिंग लाईट सेट करत होती. ती चिडली.

“आर्यन! तुला कितीदा सांगितलंय मी शूट करतेय? मध्ये मध्ये नको येऊ.

जा बाहेर खेळ. मी १० मिनिटात येते.

मला मूड खराब नकोय माझा. गेट आऊट!”

 

तिने आर्यनला रागाने हॉलमध्ये ढकललं आणि बेडरूमचा दरवाजा आतून ‘लॉक’ केला. जेणेकरून आर्यनचा आवाज व्हिडिओमध्ये येऊ नये.

बिचारा आर्यन रडवेला झाला. तो हॉलमध्ये एकटाच खेळू लागला.

 

रेकॉर्डिंग सुरू झालं.

बेडरूममध्ये स्नेहा कॅमेरासमोर अतिशय भावूक होऊन ॲक्टिंग करत होती.

बॅकग्राउंडला एक इमोशनल गाणं वाजत होतं… “तुझसे नाराज नहीं जिंदगी…”

स्नेहा ओठांची हालचाल (Lip-sync) करत होती. डोळ्यातून खोटे अश्रू काढत होती.

कॅप्शन होतं: “माझ्या मुलासाठी मी काहीही करू शकते. तोच माझा श्वास आहे.”

 

ती १०-१५ मिनिटं त्या बंद खोलीत रील बनवण्यात मग्न होती. तिने ५-६ रिटेक (Retakes) घेतले.

बाहेर हॉलमध्ये काय चाललंय, याचा तिला थांगपत्ता नव्हता.

 

इकडे हॉलमध्ये, आर्यन खेळता खेळता ‘स्टोर रूम’ कडे गेला.

तिथे एक जुनी, मोठी ‘लाकडी पेटी’ (Antique Trunk) ठेवली होती, जी स्नेहाने ‘व्हिंटेज शूट’ साठी आणली होती.

त्या पेटीचं झाकण उघडं होतं.

आर्यनला लपाछपी खेळायची हुक्की आली. त्याला वाटलं, “मी यात लपतो, मम्मा आली की तिला ‘धप्पा’ करेन.”

तो त्या मोठ्या पेटीत उतरला.

तो आत बसला… आणि चुकून त्याचा हात झाकणाला लागला.

त्या जुन्या पेटीचं जड झाकण “धडाम!” करून खाली पडलं.

त्या पेटीला बाहेरून ‘ऑटो-लॉक’ (Self-locking latch) होतं. ते जुन्या पद्धतीचं होतं.

झाकण पडताच कडी अडकली. पेटी लॉक झाली.

 

आर्यन अंधारात घाबरला.

तो ओरडू लागला. “मम्मा! मम्मा! दार उघड! मी अडकलोय!”

तो पेटीवर हाताने बुक्क्या मारत होता. “धड… धड… धड…”

त्या पेटीत हवा जायला जागा नव्हती. ऑक्सिजन कमी होऊ लागला.

त्याचा श्वास गुदमरू लागला.

तो जीवाच्या आकांताने ओरडत होता… “मम्मा… वाचव… मम्मा…”

 

पण बेडरूममध्ये?

स्नेहाच्या कानात ‘एअरपॉड्स’ (Airpods) होते. ती गाण्यात मग्न होती.

आणि तसंही तिने दरवाजा साऊंडप्रूफ केला होता.

तिने आपलं ‘परफेक्ट रील’ बनवलं. ते एडिट केलं. फिल्टर लावला आणि ‘पोस्ट’ केलं.

काही मिनिटातच लाईक्सचा पाऊस पडू लागला.

“Wow Sneha! You are truly a great mother!” अशा हजारो कमेंट्स आल्या.

 

स्नेहा खुश झाली.

ती रुमबाहेर आली. “आर्यन? कुठेय माझा बाळ?”

हॉल शांत होता.

तिला वाटलं तो लपला असेल किंवा झोपला असेल.

तिने पूर्ण घर शोधलं. किचन, बाल्कनी, सोफ्याखाली.

आर्यन कुठेच नव्हता.

ती घाबरली. तिने सोसायटीच्या वॉचमनला फोन केला.

“माझा मुलगा खाली आलाय का?”

वॉचमन म्हणाला, “नाही मॅडम. कोणीच नाही आलं.”

 

स्नेहाची अवस्था वेड्यासारखी झाली.

ती रडत रडत पुन्हा घरात आली.

अचानक तिची नजर त्या ‘स्टोर रूम’ कडे गेली.

तिथे ती जुनी पेटी ठेवली होती.

ती पेटी तिला थोडी हलल्यासारखी वाटली नाही, पण तिला तिथे संशयास्पद शांतता जाणवली.

ती धावत गेली. तिने पेटी उघडण्याचा प्रयत्न केला. ती लॉक होती.

तिच्या काळजात धस्स झालं.

तिने कसं तरी करून, स्क्रू ड्रायव्हरने ती कडी तोडली आणि झाकण उघडलं.

 

आणि…

स्नेहाने जी किंकाळी फोडली, ती पूर्ण इमारतीने ऐकली.

आत आर्यन पडला होता.

त्याचं शरीर निळं पडलं होतं.

त्याचे डोळे उघडे होते… आणि चेहऱ्यावर एक भयानक भीती होती.

तो मम्माला हाक मारत मारत गुदमरून गेला होता.

त्याच्या हाताची नखं पेटीच्या आतल्या बाजूला ओरबाडून तुटली होती.

 

स्नेहा त्याला हलवू लागली. “आर्यन! उठ ना बाळा! मम्मा आली बघ! उठ ना!”

ती त्याला हॉस्पिटलला घेऊन गेली.

डॉक्टरांनी चेक केलं आणि मान हलवली.

“I am sorry. He is gone. मृत्यू होऊन किमान २० मिनिटं झाली आहेत. गुदमरून जीव गेलाय (Asphyxia).”

 

पोलिस आले. त्यांनी अपघाती मृत्यूची नोंद केली.

स्नेहा आकांताने रडत होती. तिचं आयुष्य संपलं होतं.

पोलिस इन्स्पेक्टर ‘जाधव’ तपासासाठी घरी आले.

त्यांना शंका होती की नक्की त्यावेळी काय घडलं?

त्यांनी स्नेहाचा मोबाईल जप्त केला.

 

इन्स्पेक्टरने गॅलरी उघडली.

त्यात तो ‘शेवटचा व्हिडिओ’ (Raw Footage) होता, जो स्नेहाने एडिट करण्याआधी रेकॉर्ड केला होता.

या व्हिडिओमध्ये गाणं नव्हतं. फक्त स्नेहाची ॲक्टिंग आणि आजूबाजूचा आवाज (Ambient Sound) होता.

 

इन्स्पेक्टरने हेडफोन लावले आणि तो व्हिडिओ प्ले केला.

व्हिडिओमध्ये स्नेहा हसत होती, रडल्याचं नाटक करत होती.

पण…

व्हिडिओच्या बॅकग्राउंडला, अतिशय बारीक पण स्पष्ट आवाज रेकॉर्ड झाला होता.

 

“धड… धड… धड…” (पेटीवर मारल्याचा आवाज).

आणि एका लहान मुलाचा गुदमरलेला, क्षीण आवाज…

“मम्मा… मम्मा… वाचव… मम्मा…”

 

स्नेहा कॅमेरासमोर ॲक्टिंग करत होती, “माझ्या मुलासाठी मी जीव देऊ शकते…”

आणि त्याच क्षणी, बॅकग्राउंडला तिचा मुलगा खरोखर जीव देत होता.

तिच्या कॅमेऱ्याने त्याच्या मृत्यूचा आवाज रेकॉर्ड केला होता, जो तिने ‘एअरपॉड्स’ आणि ‘लाईक्स’ च्या नादात ऐकला नाही.

 

जेव्हा पोलिसांनी स्नेहाला तो ऑडिओ ऐकवला…

स्नेहाने स्वतःचं डोकं भिंतीवर आपटून घेतलं.

“मी मारलं! माझ्या रीलने त्याला मारलं!

मी जगाला दाखवायला ‘प्रेम’ करत होते, पण माझा बाळ शेजारच्या खोलीत मरत होता!”

 

आज स्नेहा मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे.

ती कोणाशीच बोलत नाही.

ती फक्त भिंतीवर बोटं फिरवते, जणू काही ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करतेय.

आणि अधून मधून ओरडते… “कट! कट! रिटेक घ्या! माझा आर्यन परत येईल!” पण आयुष्यात ‘रिटेक’ नसतात.

 

सोशल मीडियाच्या आभासी जगात आपण इतके हरवलोय की, वास्तवातल्या आपल्या माणसांच्या हाका आपल्याला ऐकू येत नाहीत. मोबाईलचा स्क्रीन बाजूला ठेवा आणि आपल्या मुलांकडे बघा. कारण ‘लाईक्स’ (Likes) लाख मिळतील, पण गेलेला ‘जीव’ पुन्हा मिळणार नाही. मुलांसाठी ‘परफेक्ट आई’ सोशल मीडियावर नाही, तर घरात बना.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :  उषा नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १० … ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १० ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अभंगातून समजलेले संत तुकाराम

गाथेतील एकेक अभंगांचे वाचन करत असताना संत तुकारामांचे पांडुरंगाशी असलेले भक्तीचे नाते आपल्याला हळु. हळू उलगडत चालले आहे. हे भक्तीचे नाते कायम तसेच राहावे एवढेच त्यांचे देवाकडे मागणे आहे. म्हणून ते म्हणतात, “अनेक जन्मात माझे आचरण चांगले नव्हते. म्हणून हे देवा मला तुमच्या पायांचा वियोग झाला. मात्र या जन्मात काहीतरी चांगले कर्म माझ्या हातून घडले असावे, आणि म्हणूनच तुमची माझी भेट झाली. आता तुम्ही कृपा करा. मी अपराधी, दुराचारी आहे. संसाराच्या तापाने त्रस्त झालो आहे. माझ्या अंतरंगातील काम, क्रोध, कल्पना विक्षेप यामुळे मी तुमच्या पर्यंत पोहोचत नाही असे झाले आहे. इकडे संसार धड नाही, तिकडे परमार्थात गती नाही, अशी माझी कुचंबणा झाली आहे मी निरुपयोगी ठरलो आहे”

 हा न तोसा ठाव झाला पांडुरंगा/

 नयेची उपेगा काय करू/

 आपुलिया नावा धावुनिया धावे/ लवकर यावे तुका म्हणे//

 अशा परिस्थितीत हे पतितपावना, तुझे नाव सार्थ कर आणि माझ्याकरता धावत ये.

 आता या अभंगात तुकाराम बुवा काय म्हणतात?

 कारे तुम्ही ठेवा बहुतानिमित्ते/

 माझीया संचिते वोढवले/

 भक्ती प्रेम गोडी बैसली जिव्हारी/

 आनंद अंतरी येणे झाला/

 पुसले पडळ तिमिर विठ्ठले/

 जगती भरले ब्रह्मानंदे//

 तुका म्हणे केलो कामने वेगळा/

 आवडी गोपाळा असे वरी//

तुकाराम लोकांना सांगत आहेत की जन हो, मी संसाराचा त्याग केला म्हणून तुम्ही माझ्यावर आरोप करता, पण खरं सांगायचं तर हेच माझं संचित आहे. माझ्या अंतःकरणातील विठूच्या प्रेमामुळे माझ्या दृष्टीतील अज्ञानाचा अंधार दूर झाला आहे, आणि मला सर्व जग ब्रह्मानंदाने भरलेले दिसत आहे. मी कामनाशून्य होऊन माझ्या मनात फक्त एका कृष्णाची प्रीती आहे.

या ठिकाणी संत तुकारामांची देह बुद्धी पूर्णतया  विनाश पावली आहे.

 आमुची विश्रांती/ तुमचे चरण कमळापती/

 हेचि एक जाणे/ काया वाचा आणि मने/

 नीच जना लोका/ तळील पायरीस तुका//

या ठिकाणी तुकाराम महाराज स्वतःस सर्वांहून नीच म्हणजे खालच्या पातळीवरचा असे संबोधित आहेत. देवा, तुमच्या चरणांवर अनेक भक्त लोटांगण घालतात, त्या सर्व भक्तात मी खालच्या तळाच्या पायरीवर आहे.

खरा भक्त हा नेहमी लीन असतो, विनम्र असतो हेच आपल्याला तुकारामांचे रूप या अभंगात पहावयास मिळते.

 संत प्रवृत्तीचे तुकाराम महाराज कसे होते यासंबंधी अधिक माहिती या खालील अभंगातून आपल्याला मिळते.

  होईल तो भोग/ भोगीन आपुला/

 न घालीन विठ्ठला/ भार तुज//

 तुम्हा पासाव हे / इच्छितसे दान/

 अंतरीचे ध्यान/ मुखी नाम//

 नये काकुळती/ गर्भवासासाठी/

 न धरी हे पोटी/ भय काही//

 तुका म्हणे मज/ उदंड एवढे/

 नाचेन मी पुढे/ मायबापा//

“विठ्ठला, प्रारब्धाने मला जे भोग भोगायचे असतील, ते मी आनंदाने भोगीन. तुझ्यावर त्याचा जराही भार टाकणार नाही. मला तुझ्याकडून हेच दान हवे आहे. तुझे ध्यान माझ्या अंतरंगात सदैव राहो आणि तुझे नाम माझ्या मुखी अखंड राहो. मला गर्भवासाचे भय नाही.

अनेक जन्म मला मिळाले तरी हरकत नाही, फक्त माझी एकच मागणी तू पूर्ण केलीस तर तुझ्यापुढे मी प्रेमभराने सदैव नाचत राहीन. “

सदैव भगवंताची भक्ती आणि प्रीती अंतरंगात राहावी एवढी एकच इच्छा तुकाराम त्यांच्या अनेक अभंगांतून वेळोवेळी व्यक्त करतात. परमेश्वराच्या दर्शनासाठी कितीही जन्म घेण्याची त्यांची तयारी आहे. ते देवाकडे मोक्षाची याचना करत नाहीत.

कधी कधी तुकाराम महाराज लहान होऊन आपल्या मायबापांकडे बाल हट्ट करतात.

 भोगलो मी आता/ आपुल्या स्वभावे/

 कृपा करून देवे/आस्वासीजे//

मी सांसारिक नित्य कर्म करून फार थकलो आहे, तेव्हा कृपा करून तुम्ही मला असे आश्वासन द्या की,

 देऊनी आलिंगन/ प्रीतीच्या पडीभरे/

 अंगेही दातारे/ निववावी//

 उदार अंतकरणाने हे देवा, तुम्ही मला आलिंगन देऊन माझ्या थकलेल्या शरीराला शांत कराल.

 अमृताची दृष्टी/ घालूनिया वरी/

 शीतळ हा करी/ जीव माझा//

 तुमच्या अमृतरुपी कृपादृष्टीचा वर्षाव करून माझ्या जीवाची तळमळ शांत कराल.

 घेई उचलोनी /पुसे तहानभूक/

 पुसी माझे मुख/ पितांबरे//

माझी तहानभूक जाणून मला कडेवर उचलून घ्याल, आणि माझे मुख आपल्या पितांबराने स्वच्छ कराल.

 बैसोनिया माझी धरी हनुवटी/

 ओवाळूनी दिठी करुनी सांडी//

  तुका म्हणे बापा अहो विश्वंभरा/

 आता कृपा करा ऐसी काही//

मला आपल्या मांडीवर घेऊन माझी हनवटी धराल, माझी दृष्ट काढाल, अशा प्रकारे विश्वंभरा तुम्ही माझ्यावर कृपा कराल. मला असे आश्वासन द्या.

काय हा तुकारामांचा बालहट्ट! भक्ताचे व देवाचे नाते कसे अधिकाराचे होऊ शकते हे आपल्याला या अभंगातून अगदी सहज समजते.

सतत पांडुरंगाचा धावा केल्याने तुकाराम महाराजांना पंढरीच्या विठोबाचे आता दर्शन घडलेले आहे आणि त्यामुळे धन्यता पावलेले तुकाराम ब्रह्मानंद अवस्थेत बेधुंद होऊन गात आहेत.

 पावलो पंढरी वैकुंठ भुवन/

 धन्य आजी दिन सोनियाचा//

 पावलो पंढरी आनंद गजरे/

 वाजतील तुरे शंखभेरी//

पावलो पंढरी क्षेम आळिंगणी/

 संत या सज्जनी निवविलो//

 पावलो पंढरी पार नाही सुखा/

 भेटला हा सखा मायबाप//

 पावलो पंढरी येरझार खुंटली/

 माऊली वोळली प्रेम पान्हा//

 पावलो पंढरी आपुले माहेर/

 नाही संसार तुका म्हणे//

भू वरचे वैकुंठ म्हणजे पंढरपूर, या ठिकाणी तुकाराम महाराज येऊन पोहोचले आहेत आणि त्यांचा दिवस धन्य धन्य झाला आहे. पंढरीत संत जनांनी त्यांना प्रेमाने आलिंगन दिल्यामुळे त्यांचे सर्व श्रम निमाले आहेत. मायबाप पांडुरंगाच्या भेटीने त्यांच्या आनंदाला पारावार नाही. आता जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्यांची कायमची सुटका झाली आहे. विठाईच्या प्रेम पान्ह्याने त्यांना आता संसाराचे बंधन राहिले नाही. या ठिकाणी परमेश्वराशी ते संपूर्णपणे एकरूप झाले आहेत.

 जय जय विठ्ठल/ श्री हरी विठ्ठल/

 विठ्ठल विठ्ठल/ पांडुरंग//

 क्रमशः… १०  

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # तू नाही म्हणू नकोस… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # तू नाही म्हणू नकोस… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

#तू नाही म्हणू नकोस.. #

होकार तुझा ऐकण्यासाठी कान माझे आसुसलेले आपल्या त्या पहिल्या भेटी पासूनचे…

चांदण्याचा गालीचा अंथरून बसला चंद्र केव्हाचा अन शालू कितीएक बदलून गेले रात्रीचे…

कुंतलांच्या चुकार बटांनी ओढून धरला तलम पडदा नयनासमोरी रोखण्या रस्ता तुझ्या भावपूर्ण नजरेचा…

तरीही मौनात दडलेला होकार तो तुझेच भावविभोर बोलके डोळे विसरून नाही गेले तेच सांगायचा…

काय पाहशी मजला तू अशी भावुक नजरेने.. तुझ्या अंतरीच्या खळबळलेल्या लाटांची गाज अधरावरी धडकते…

नकाराचा विकल शब्द झुंजत राही अधर विलगण्यास… परी असमर्थ ठरले थरथर ती ओठांची थोपविण्यास..

सांगायचं काय तुला समजले आहे मला एकही शब्द न बोलता. ,. लपविण्याचा तू केलास कितीही आटापिटा तरीही चेहरा तुझा सारं काही बोलून गेला…

मनात जे आहे बोल एकदा मोकळेपणाने..

अडचणींच्या कोंदणात दडलेल्या होकाराला बोलतेस का जाहीरपणे…

अमुर्त नात्याला मुर्त रूप देण्याचा अवधी जवळी आला.. एक होकार तुझा ऐकण्यासाठी जीव आतुरला…

माझ्या तनमनाला दिठी बसावी तुझ्या होकाराची मिठी.. हिच आहे मनीची आस…

विलंब लाविलास होकार देण्यास तरी माझी त्याला ना नाही..

नाही सांगितलसं तरीही मी समजून घेईन… असतात काही गोष्टी बऱ्याच अडचणींच्या मुक्तपणे बोलता येत नसताना.. होकार देण्याची अडचण तुझी मला समजली.. पण पण माझीही एक हळवी

अट इतकीच कि तू मला कधीच नाही म्हणू नकोस हं!

##

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ ‘राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह..’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

☆ क्षण सृजनाचा ☆ ‘राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह..’ ☆ श्री दिवाकर बुरसे

प्रतिवर्षी ४ ते १० मार्च या काळात ‘राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह’ देशभर साजरा केला जातो. औद्योगिक क्षेत्रात याचे विशेष महत्व आहे. या वर्षीच्या- आजच्या ४मार्चला सुरू होत असलेल्या – सुरक्षितता सप्ताहानिमित्त वाचकांना एका कवितेची अल्पशी भेट आणि सर्वांना सुरक्षित जीवन लाभावे ही ईश्वरचरणी ‘यंत्रदासा’ची मनोमन प्रार्थना.

☆ तुझा तूच त्राता ☆

पहा मानवा, यंत्रक्रांतीमुळे आज

मानेवरी बैसली जोखडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।धृ।।

 *

जसा लागला शोध चक्रा-गतीचा

जगाने गती घेतली केवढी

कुणाला नसे थांबण्या वेळ आता

मढ्यांना इथे स्वस्थता तेवढी!

अशा जीवघेण्या प्रवाहातुनीही

तुला जायचे पैलतीराकडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।१।।

 *

किती वादळी वेग हे वाहनांचे

तयातून जाणेच आहे सुखे

वितीचे तुझे पोट! जे जाळण्याला

पडे खेळणे अग्निसंगे इथे

तरी पाळ सारे इशारे दिलेले

जराही नको वागणे वाकडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।२।।

 *

पहा, वाहते गोगलीशंख पाठी

ढके वादळी उंटनाका सुखे

अती दक्षतेने चले सूरवंट

मधूमक्षिकांची पहा कौतुके

वनी अस्वलेभाकऱ्या साठवीती

मनू का असे हीन त्यांच्या पुढे?

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।३।।

 *

तुझा तूच त्राता, नसे अन्य कोणी

मनी जाण हे सत्य जे सांगतो

अती दक्षतेने सदा वागतो जो

तयाचीच चिंता हरी वाहतो!

न घे काळजी देह, यंत्रा-धनाची

असा जीव देवा कदा नावडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।४।।

🙏🏽

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सगळंच काही वाईट नसतं…” ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “सगळंच काही वाईट नसतं…” ☆ शीला पतकी 

काल परवा माझ्याकडे संस्थेत कार्यरत असणाऱ्या एका महिलेचा फोन आला. त्यानी माझ्याकडे क्लार्क म्हणून संस्थेचा सगळा पसारा सांभाळला होता. बाई अत्यंत हुशार, बोलक्या, बुद्धीने काम करणाऱ्या आणि संस्थेबद्दल खूप अस्था! आता त्या पुणे मुक्कामी असतात.

त्यांचा मुलगा आहे तितकाच हुशार बारावीला बोर्डात आला आता अमेरिकेमध्ये आहे. बाई आणि त्यांचे मिस्टर यांची वर्षातन एकदा अमेरिका वारी असते. त्यांनी परवा सांगितलेला अनुभव…

 – – त्या म्हणाल्या, ” बाई मी मुंबई एअरपोर्टवर गेले.. तिकीट कलेक्ट करण्याच्या रांगेत उभारलो पासपोर्ट चेकिंगला दिले आणि चेक करणारा माणसाने आम्हाला सांगितले की जरा बाजूला येऊन थांबा… “त्या म्हणाल्या, ” माझ्या काळजाचा ठोका चुकला आता काय झाले? “साधी मध्यमवर्गीय माणसं असं काहीतरी झालं की घाबरणारच ना! त्या म्हणाल्या, पाच मिनिट माझा जीव वर खाली झाला त्या पस्तीस वर्षाच्या माणसाने आम्हाला बाजूला थांबून घेतले व पलीकडच्या रूम मध्ये नेऊन त्याने विचारले की आपण कुठे राहत होता त्यावर बाई म्हणाल्या मी सोलापुरात होते. तो म्हणाला मी तुम्हाला कुठेतरी पाहिले…? बाईंचा जीव थोडासा भांड्यात पडला…! त्या म्हणाल्या मी मोदीत राहत होते. तुम्हाला नाही मी तिथे नाही पाहिले मग त्या म्हणाल्या मी सेवा सदन संस्थेमध्ये बऱ्याचदा गेलेली आहे… कारण त्या आमच्या शाळेचे भांडार चालवत होत्या.. नाही माझा सेवा सदनशी काही संबंध नाही. मग त्या म्हणाल्या मी तडवळकर ट्रस्टमध्ये काम करत होते. मग बरोबर तिथेच मी तुम्हाला पाहिले तुम्ही पानसरे मॅडम आमचा फॉर्म तुम्ही भरला होता.

– – आणि मग तो भरभरून बोलू लागला. ” बाई तडवळकर ट्रस्ट मध्ये माझी दहावी झाली म्हणून आज मी या ठिकाणी आहे नाहीतर माझे काय झाले असते माहिती नाही आज मी या ठिकाणी मॅनेजर म्हणून काम करीत आहे माझ्या आयुष्याला एक चांगली कलाटणी मिळाली ती केवळ नापासांच्या शाळेमुळे शिकलो आज मी 10 कर्मचाऱ्या ंवरती काम करतो तुम्हाला भेटून मला खूप आनंद वाटला, सगळ्या पहिल्या गोष्टी आठवल्या खरंतर मला तुम्हाला चहा वगैरे देण्याची इच्छा आहे परंतु मला एवढा वेळ देता येत नाही” त्याने त्यांची तिकिटे पासपोर्ट वगैरे लगेच दिले.

बाईना इतका आनंद झाला.. की तडवळकर ट्रस्टचे विद्यार्थी आज यशस्वीरित्या आयुष्यामध्ये काहीतरी करत आहेत नापास मुलांना शिकवून काय करायचे? ते काय दिवे लावणार? अशा गोष्टी आमच्या कानावर यायच्या पण त्याकडे आम्ही सगळेच जण दुर्लक्ष करीत असू लोक म्हणायचे सुद्धा व नापास झालेले कुठे पास होत असतात का? पण आम्ही नेटाने ते काम 35 वर्षे चालू ठेवले आणि मग त्याची अशी सुमधुर फळ कुठे कुठे चाखायला मिळतात छान वाटतं आनंद होतो त्यांनी हा किस्सा माझ्याबरोबर शेअर केला आणि तो मी अभिमानाने तुमच्यासमोर मांडत आहे.

– – सगळंच वाईट नसतं सगळंच कधी संपत नसतं आपला विश्वास चांगुलपणावर हवा आणि त्या दिशेने काम करत राहायचं! देणार तो आहे तो काहीतरी चांगली फळे देतोच यावर श्रद्धा ठेवायची…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र क्र. ४८ आणि ४९. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र क्र. ४८ आणि ४९. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्ती सूत्र क्र. ४८ आणि ४९.

भक्तीसूत्र ४८…

यः कर्मफलं त्यजति, कर्माणि संन्यस्यति, ततो निर्द्ंवद्वो भवति ॥४८॥

अर्थ : जो कर्मफलाचा त्याग करतो, सर्व कर्मांचाही त्याग करतो, त्यामुळे तो द्वंद्वरहित होतो, अर्थात मायेच्या पलिकडे जातो.

विवेचनमागील सूत्रात जो योगक्षेमाचाही त्याग करतो, जो निर्मम होतो, संगांचा त्याग करतो तो मायेतून तरून जातो असे सांगितले, या सूत्रात आणखी तीन साधने सांगतात. प्रथम कर्मफलत्याग सांगितला आहे. या साधनाचा मागील साधनाशी संबंध आहे. मानवप्राणी हा या जगात येतो तो कर्ता म्हणून येतो. कर्तृत्वाबरोबर येणारा दुसरा धर्म म्हणजे कर्मफलाचे भोक्तृत्व हा आहे. कोणीही जे कर्म करत असतो ते निष्फळ जावे म्हणून करीत नाही तर त्याचे फळ भोगावयास मिळावे याच हेतूने करीत असतो. यासच फलासक्ती म्हणतात. अशा आसक्तीने मानव कर्मे करतो. जर फल न मिळेल अथवा त्या फलाची आसक्ती नसेल तर कर्मे करण्याकडे प्रवृत्ती होणे कठीण आहे, हे जरी खरे आहे तरी जीव जो कर्मात अडकतो तो या फलासक्तीमुळेच. मी कर्ता हा अभिमान म्हणून मीच या कर्माचे फळ भोगावे ही आसक्ती, यासच कर्माचा बंध म्हणतात, असे श्रीज्ञानेश्वर महाराज सांगतात.

“तैसा कर्तृत्वाचा मदु । आणि कर्मफळाचा आस्वादु । या दोहींचें नांव बंधु । कर्माचा कीं ॥”

(ज्ञान. १८. २०५)

या फलासक्तीतूनच पुढे रागद्वेषादी विकार, अनुकूल-प्रतिकूल भावना, इत्यादी निर्माण होतात. त्यातल्या त्यात संसारी माणसाची सकाम कर्माकडे विशेष प्रवृत्ती होते ती आणखीही बंधनाला कारण होते. मनुष्याला जन्ममरण प्रवाहात वाहत जावे लागते त्याचे कारणही हे कर्मफळच आहे. याचा परिणाम असा होतो की मनुष्य असो वा साधक जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून पडतो. आणि मिळणाऱ्या प्रत्येक नव्या जन्मात पुढील जन्माची बेगमी करतो.

माउली म्हणतात,

वृत्ती{ऐ}सें मन धरिती । मना{ऐ}सी क्रिया करिती । केलिया ऐसी वरीती । मरोनि देहें ॥

(ज्ञान. १७. ५८)

ज्याला मायेतून तरून जावयाचे आहे त्याला फलासक्ती ठेवता येणार नाही. कारण तोही एक मायापरिणामच आहे. म्हणून विवेकी साधक हळूहळू मायेच्या जाळ्यातून सुटण्याकरिता एक एक बंध तोडून टाकण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यातच ‘कर्मफलंत्यजति’ याचा अंतर्भाव होतो.

कर्माचे चार प्रकार आहेत. नित्य, नैमित्तिक, काम्य व प्रायश्चित्त. त्यांत साधकाने काम्य कर्मे करू नये असे सांगितले जाते. ज्ञात-अज्ञात पातकक्षालनाकरिता प्रायश्चित्त कर्मे करावीत व नित्यनैमित्तिक कर्मे न केली तर प्रत्यवाय आहे, म्हणून ती टाकू नयेत. अशा प्रकारे जर कर्मे करील तर तो कर्मत्यागीच मानला जाईल. मात्र ती कर्मे निरहंकार वृत्तीने कर्तृत्वमद व फलाशा टाकून करावीत. प्रारब्धाने आलेली किंवा आपली विहित कर्मे अवश्य करावीत. त्यांचा त्याग करणे उचित नाही असे माउली म्हणतात.

“जे उचित कर्म सांडिती । मग नैष्कर्म्य होऊं पाहती ।परी कर्मेंद्रियप्रवृत्ती । निरोधुनी ॥ तयां कर्मत्यागु न घडे । जें कर्तव्य मनीं सांपडे ।वरी नटती तें फुडें । दरिद्र जाण ॥”

(ज्ञा. ३. ६४/६५)

तीन प्रकारचा कर्मत्याग गीतेमध्ये सांगितला आहे.

१. वेद, ईश्वर, परलोक यावर विश्वास न ठेवणारा तमोगुणी पुरुष अविवेकाने जो विहित कर्माचा त्याग करतो तो तमोगुणी त्याग होतो.

२. शरीराला फार कष्ट होतात, दुःख होते या भीतीने जो कर्मत्याग केला जातो त्यास राजस त्याग म्हणतात

३. जो मनुष्य/साधक आपल्या वाट्याला आलेले विहित कर्म कर्तृत्वमद व फलास्वादाची अभिलाषा टाकून करतो त्यास सात्त्विक त्याग म्हणतात.

कर्मत्यागाचे एक सोपे सूत्र सांगता येईल. एखाद्या कंपनीत मनुष्य नोकरी करत असतो. तेथील अधिकारी जे काम त्याला सांगतो, त्यानुसार तो मनुष्य ते काम करीत असतो. त्या कामातून होणाऱ्या लाभहानीकडे त्याचे फार लक्ष नसते. सांगितलेल्या कामात आपल्याकडून छोटीशीही चूक होऊ नये याची दक्षता तो मनुष्य घेत असतो. ते काम त्याने चोख केले की मालक/अधिकारी त्याला मासिक पगार देतो. आणि त्या व्यवसायात त्या मालकाला नफा झाला तर तो दिवाळीला भेटवस्तू (बोनस) पण देत असतो. इथे आपण भगवंताला आपले मालक करावे, त्याच्याकडे नोकरी करावी असे करता आले तर आपले काम अधिक सोपे होईल असे वाटते. संसारातील लाभ हानी स्वाभाविकपणे भगवंताची होईल. आपण त्यातून अलिप्त होऊ शकू. थोडक्यात मनुष्याने भगवंताच्या हातचे उपकरण बनून जावे. त्याला म्हणावं तू ठेवशील तसा राहीन, पण तुझाच बनून राहीन. एकदा कर्तेपण भगवंताकडे दिले (अगदी मनापासून) की लाभहानी हा विषयच रहात नाही. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात की प्रपंच दाई सारखा करावा आणि परमार्थ आई सारखा करावा.

मायेच्या कचाट्यातून सुटण्यासाठी आणिक एक त्याग करावा लागतो, त्याचा विचार पुढील सूत्रात पाहू.

जय जय रघुवीर समर्थ 

 – – 

भक्तिसूत्र ४९

वेदानपि संन्यसति, केवलमविच्छिन्नानुरागं लभते ॥ ४९ ॥

अर्थ : जो वेदांनी सांगितलेल्या विधिनिषेधात्मक कर्मसमूहाचा त्याग करतो त्याला भगवंताच्या उत्तरोत्तर वाढ शुद्ध, अखंड, एकरस प्रेमाचा लाभ होतो. अर्थात, तो मायेपासून मुक्त होतो.

विवेचनमागील सूत्रात कर्मफले व ती प्राप्त होण्याकरिता केली जाणारी विहित कर्मे यांचाही तो भक्त त्याग करतो असे सांगितले आहे.

वेद हे अपौरुषेय आहेत. वेदांचे प्रामुख्याने चार अंगे आहेत. पहिले अंग आहे संहिता. दुसरे अंग आहे ब्राह्मण ग्रंथ आणि तिसरे आहे आरण्यके. चौथे आहे वेदांत.

संहितेमध्ये वेदकालीन देवतांचे मंत्र आले आहेत. ब्राह्मण ग्रंथात विविध यज्ञाबद्दल माहिती आलेली आहे तर तिसऱ्या भागात अर्थात आरण्यकात भगवंतासंबंधी चिंतन करून जे अनुभव घेतले, त्याचा उहापोह इथे आढळतो. चौथे आहे वेदांत, यात उपनिषदे येतात. या चारी अंगाचा अभ्यास अनेकांनी केला, पण वेदांचा अभ्यास केला, सर्व वेद तोंडपाठ केले म्हणून त्यांंना भगवंताची प्राप्ती झाली असे होत नाही. तर त्यातील मर्म लक्षात घेतले पाहिजे. श्रीसद्गुरू गोंदवलेकर महाराज सांगतात की साधकांमध्ये एक दुर्गुण अवश्य येतो. त्याला परमार्थ छान बडबडता येतो. एक उदा. पाहू. चार धाम यात्रेला जाण्यासाठी एक जण रेल्वेचे तिकीट काढायला गेला. त्याने तिकीट काढले. त्या तिकीट देणाऱ्या माणसाने त्या मनुष्याला चार धाम यात्रेचे संपूर्ण वर्णन करून सांगितले. तसेच कुठे काय करावे? कुठे खरेदी करावी? कोणते हॉटेल स्वस्त आहे? धर्मशाळा कुठे आहेत? ते सर्व सांगितले. या मनुष्याने त्या तिकीट देणाऱ्या मनुष्याला सहज प्रश्न केला की तुम्ही बरेच वेळा यात्रा केलेली दिसते. तर तो तिकीट विकणारा म्हणाला मी एकदाही यात्रा केली नाही. लोकांनी सांगितलेल्या माहितीवरून मी हे सर्व तुम्हाला सांगू शकलो. नुसती माहिती झाली म्हणून उपयोग होत नाही.

वेदांचा, अभ्यास करून मनुष्य नुसती पोपटपंची करणार असेल, तर त्याचा काय उपयोग? त्यात अनुभूती असणे अत्यंत महत्वाचे. इथे तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो.

“वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा। येरांनी वाहावा भार माथां।”

संत तुकाराम महाराजांचा आणखी एक अभंग आहे.

“वेद अनंत अनंत बोलिला । अर्थ इतुकाचि साधिला ॥१॥ विठोबासी शरण जावें । निजनिष्ठे नाम गावें ॥२॥ सकळशास्त्रांचा विचार । अंतीं इतुकाचि निर्धार ॥३॥ अठरापुराणीं सिद्धांत । तुका ह्मणे हाचि होत ॥४॥”

कोणतेही तत्व नुसते पाठ करणे अपेक्षित नाही. तर त्याची अनुभूती घेतलेली असावी. तरच ते आपल्याला कळले असे होते. बाळ नीट चालायला शिकेपर्यंत पांगुळगाडा वापरतो. याच नियमाप्रमाणे ज्ञान प्राप्त करेपर्यंत ‘पांगुळगाडा’ वापरणे अपेक्षित आहे. आणि थोडे अधिक मोठे झाल्यावर त्या ‘पांगुळगाड्या’चा अभिमान न धरता त्याचा त्याग करणे अधिक उचित आहे. 

राग म्हणजे प्रेम. राग म्हणजे रंग. अनु म्हणजे मागे जाणे, अथवा… ला शोभणे. भक्ताचे भगवंतावरील प्रेम वाढत जाते, तेव्हा त्याला प्रेमाचा रंग लागला असे म्हटले जाते. भक्त मिरेला कृष्ण भक्तीचा रंग लागला होता, असे म्हटले जाते. साधकाचे असेच व्हावे. *या प्रेमाला अनुराग असे म्हणतात. भिंतीला रंग लागला की आधीचे रंग संपूर्णपणे नष्ट होत असतात. अर्थात त्या साधकाच्या वासना निर्बीज होत असतात. 

संत तुकाराम महाराज म्हणतात,

“प्रेम देवाचें देणें । देहभाव जाय जेणें । न धरावी मनें । शुद्धी देशकाळाची ॥१॥ मुक्त लज्जाविरहित । भाग्यवंत हरीभक्ती । जाले वोसंडत । नामकीर्तीपवाडे ॥२॥ जोडी जाली अविनाश । जन्मोनि जाले हरीचे दास । त्यांस नव्हे गर्भवास । परब्रह्मीं सौरस ॥३॥ हे चि वाहाती संकल्प । पुण्यप्रसंगाचे जप । तुका म्हणे पाप । गांवीं नाहीं हरीजना ॥४॥”

(अभंग क्रमांक ११५६, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

असे प्रेम प्रत्येकाला लाभावे अशी सद्गुरूचरणी प्रार्थना.

जय जय रघुवीर समर्थ 

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. ४८ आणि ४९.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ऑपरेशन ईश्वर!” “ऑपरेशन ईश्वर!” – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “ऑपरेशन ईश्वर!” – भाग – १  ☆ श्री संभाजी बबन गायके

नायब सुबेदार ईश्वर सिंग 

‘ऑपरेशन ईश्वर! ‘

’भारतीय सैन्यावरची अनुभवसिद्ध ‘ईश्वर’कृपा!

“साब, आप परमिश्शन दें या मत दें… मैं तो जा रहा हूं उप्पर! आप भी पिच्चेछेसे आ जावो क्यूआर्टी लेक्कर! ये तीन तो हमने खतम कर दिये हैं… ओर सात मिलीटेन्ट हैं! ”

नायब सुबेदार ईश्वर सिंग यांनी हे शब्द असे काही उच्चारले की, त्यांच्यापेक्षा अधिकाराने मोठ्या पण वयाने लहान असलेल्या त्यांच्या साहेबांना त्यांचा तो हट्ट मान्य करावाच लागला!

वयाच्या अठराव्या वर्षात असताना सैन्यात शिपाई म्हणून भरती झालेला हा हरियानवी छोरा जणू आईच्या पोटातूनच सैन्यविद्या शिकून आलेला असावा! खाशी हरियानवी भरभक्कम शरीरयष्टी आणि थेट, रोखठोक परखड बोली. ताठ चाल आणि तिखट नजर… आणि जिद्दी पण निर्मळ स्वभाव! भारतीय फौजेची वर्दी परिधान करून नीडरपणे देशरक्षण करताना सेवेची पंधरा वर्षे अत्यंत धामधुमीत व्यतीत केलेला हा रांगडा गडी, शिपाई-लान्स नायक-नायक-हवालदार अशा पाया-या चढत चढत ‘नायब सुबेदार’ पदापर्यंत पोहोचला होता. पण एका वाक्यात सांगता येणारी ही वाटचाल अतिशय खडतर होती. ऑपरेशन ब्लू स्टार, भारतीय शांतीसेनेच्या श्रीलंकेतील ‘ऑपरेशन पवन’मध्ये अचूक निशानेबाज म्हणून ईश्वरसिंग यांनी उत्तम कामगिरी बजावली होती. नागालॅंडमध्ये ते तेथील बंडखोरांशी लढून आलेले होते, पुढे सियाचीन ग्लेशियरवर त्यांनी यशस्वी पहारा दिला, एन. एस. जी. नॅशनल सिक्युरीटी गार्ड मध्ये त्यांनी एक नव्हे, दोन नव्हे तर तीनदा प्रोबेशन पूर्ण केले, यात सर्वोत्तम नेमबाज (best firer) म्हणून विशेष पारितोषिक पटकावले होते. (सेनेच्या विविध विभागातून निवडून निवडून घेतलेल्या एकूण प्रशिक्षणार्थी सैनिकांपैकी सुमारे ५० ते ८०% सैनिक प्रशिक्षण कालावधी पूर्ण करू शकत नाहीत… इतके हे प्रशिक्षण कठीण असते… एक प्रोबेशन पूर्ण करणे ही सुद्धा फार मोठी कामगिरी मानली जाते! ) तर ५, पॅराशूट रेजिमेंटमध्येही एक टर्म पूर्ण केली होती. कारगिल लढाईत शौर्य गाजवले होते… आणि हो… प्रत्येक शूर सैनिकाच्या सैनिकी जीवनातील अविभाज्य भाग म्हणजे जम्मू-कश्मीरमधील सेवा… ती ही घडली! “जिंदगी भर हमने फायरींग ही की है साब! ” असं जेंव्हा ईश्वर सिंग म्हणतात तेंव्हा त्यात जराशीही अतिशयोक्ती नसते… अचूक निशाणेबाजी हा त्यांच्या डाव्या हाताचा मळ जणू!

इतका प्रदीर्घ अनुभव घेतलेला सैनिक म्हणजे जणू कच्च्या लोहाचे पोलादात रुपांतर. अशा सैनिकास लष्करी भाषेत battle-hardened अशी संज्ञा आहे! आणि हे सैनिक सैन्याचा खड्गहस्त असतात! जनरल गिल साहेब, ब्रिगेडीअर करीअप्पा साहेब, मेजर युद्धवीर साहेब, कर्नल अभय साहेब इत्यादी मोठे लष्करी अधिकारी ईश्वर सिंग यांच्याबद्दल गौरवोद्गार काढतात ते काही उगीच नव्हे!

२००१… ऑपरेशन रक्षक सुरु होते. कारगिलमधील उंचावरील काही टेकड्या ताब्यात घेण्याची मोहिम आखण्यात आली होती. ईश्वर सिंग यांची पलटण यावेळी नुकतीच सियाचीन मधून परतली होती. त्यांना या मोहिमेत घेण्यात आले. परंतु अमेरिकेत ९ सप्टेंबरचा अतिरेकी हल्ला झाला आणि त्यामुळे बहुदा ही योजना स्थगित करण्यात आली. मग या पलटणीच्या प्रमुखांनी काश्मीर खो-यात परत जाण्याऐवजी राजौरी ते पुंछ मार्ग सुरक्षित करण्यासाठीची जबाबदारी मागितली.. आणि त्यांना एल. के. जी. अर्थात लोअर कृष्णा घाटी भागात सेनेचा मार्ग सुरक्षित करण्यासाठी रोड ओपनिंग पार्टीमध्ये काम करण्याचे कार्य सोपवले.

एका एका गटाला पाच पाच किलोमीटर्सचे काम विभागून देण्यात आले होते. ईश्वरसिंग यांच्या पुढे सुबेदार साहेबांचा एक गट कार्यरत होता. त्यांचे काम संपले की तिथून पुढे नायब सुबेदार ईश्वर सिंग साहेब यांच्या गटाला काम करायचे होते आणि निरोप येण्याच्या प्रतीक्षेत असतानाच त्यांच्या एका वरिष्ठाकडे, जे गुप्तवार्ता विभागात कार्यरत होते, त्यांच्याकडे एक स्थानिक माणूस आला. जिथे सुबेदार साहेबांचा गट काम करीत पोहोचला होता तिथल्या एका मोठ्या वळणावर एक नाला होता. त्या नाल्याच्या वरच्या बाजूला त्या व्यक्तीच्या भावाचे घर होते, आणि त्या घरात रात्रीपासून दहा पाकिस्तानी अतिरेकी जबरदस्तीने घुसून बसले होते. त्यांच्याकडे सहा एके-४७, एक पिका गन, दोन पिस्टलस आणि इतर काही दारुगोळा होता.

त्या भावाचा मुलगा सी. आर. पी. एफ. मधून सुट्टीवर आलेला असून त्याच्याकडे हत्यार नसल्याने त्याचाही नाईलाज झाला होता. त्या अतिरेक्यांकडे मोठी आधुनिक शस्त्रेही आहेत! ही खबर ईश्वर सिंग यांना दिली गेली… मग काय… साहेबांचे बाहू फुराफुरले! एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने अतिरेकी हाती लागण्याची शक्यता होती… ही संधी सोडता कामा नये! पण त्यांनी खबर घेऊन आलेल्या त्या माणसाची उलटतपासणी घेतली… कारण दोनच दिवसांपूर्वी त्या भागात एक मोठे अधिकारी शोध घेऊन रिकाम्या हाती परतले होते… पण त्या माणसाने शपथेवर सांगितले की खबर पक्की आहे! यावर ईश्वर सिंग यांनी त्यांचे वरिष्ठ अधिका-याला परवानगी विचारली… आणि मी पुढे जातो… तुमच्याकडचे वीस जवान घेऊन तुम्ही मागून मदतीला या! असेही सांगायला ते विसरले नाहीत!

आणि मग दहा जवान सोबत घेऊन ईश्वर सिंग निघाले… त्या खबर देणा-या माणसाला सोबत घेतले होतेच… त्या घरापासून हे पथक काही मीटर्सवर असताना त्यांनी वर पाहिले तर एका झाडाजवळ एक व्यक्ती अंगावर घोंगडी पांघरून उभी होती… त्या अतिरेक्यांनी त्याच घरातल्या वृद्ध व्यक्तीला दमदाटी करून पहा-यावर उभे केले होते! आता ते अतिरेकी तिथून निश्चित पळून वरच्या बाजूला जाणार हे ईश्वर सिंग साहेबांनी ताडले. यांनी दुस-या बाजूने अधिक वर जाऊन वरून खाली खाली येत अतिरेक्यांचा शोध घेण्याची योजना आखली. काही वेळातच ते त्या घराजवळ पोहोचले… तर त्या घरात फक्त एक महिला आणि ती वृद्ध व्यक्ती होती. घरात पाकिस्तानातील कराची येथे बनलेली बिस्कुटसची पाकिटे दिसली… यावरून ते निश्चित पाकिस्तानीच होते, याची खात्री पटली. ईश्वर सिंग यांनी ती पाकिटे आणि त्यांच्या काही चीजवस्तू पुरावा म्हणून जप्त केल्या. तोवर त्यांचे वरिष्ठ अधिकारी वीस सैनिकांचे पथक घेऊन तिथवर पोहोचले! आता काही योजना आखणे गरजेचे होते. घरातल्या महिलेने सांगितले की अतिरेकी तिच्या नव-याला, जो सी. आर. पी. एफ. मधून सुट्टीवर घरी आला होता, त्याला वाटाड्या म्हणून जबरदस्तीने सोबत घेऊन गेले आहेत. पथक त्या दिशेने चालू लागले. काही अंतर जाताच समोरच्या एका उतारावरून एक व्यक्ती आणि तिच्यासोबत एक लहान मुलगी खाली उतरताना दिसली. साहेबांनी त्या व्यक्तीला ती दहा माणसं पाहिली का? असे विचारताच त्या व्यक्तीने काहीही सांगितले नाही.. पण त्या लहानग्या मुलीने मात्र लगेच सांगितले… आणि दिशाही दाखवली! ती व्यक्ती म्हणजे त्या भागात राहणारे एक शासकीय सेवेत असलेले शिक्षक होते!

आता पुढे जाऊन शोध घेण्यात फार अर्थ नव्हता, म्हणून हे पथक विश्रांतीसाठी थांबले. सोबतच्या वरिष्ठ अधिका-याने त्यांच्या त्या भागातल्या इतर पथकांना ही खबर दिली. त्यानुसार त्या वरच्या भागात ठिकठिकाणी शोध पथके रवाना करण्यात आली. ईश्वर सिंग यांना काही गप्प बसवेना. ते म्हणाले… आता इथवर आलोच आहे आणि आर. ओ. पी. चे कामही करायचेच होते तर इथून पुढे ते काम करून येतो. दहा जवान होते.. त्यांतील पाच जण त्या जागी विविध ठिकाणी पेरून बसवले आणि इतरांसोबत रोड ओपनिंग चे काम करावे असे ठरले. रात्र झाली… उजाडले… सोबत आणलेल्या पुरी-भाजी खाऊन जवान ताजेतवाने झाले!

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मान्यतेचे व्यसन” – लेखक  : अज्ञात  ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “मान्यतेचे व्यसन” – लेखक  : अज्ञात ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

Validation Addiction — मान्यतेचं व्यसन

ती नवीन साडी नेसली.

फोटो काढला. स्टेटस टाकलं.

दर ५ मिनिटांनी फोन उघडून बघते..

किती views? किती replies?

 

त्याने नवीन प्रोजेक्ट पूर्ण केला.

घरी येऊन शांत बसला.

पण ऑफिसमध्ये कोणी “well done” म्हटलं नाही म्हणून रात्रभर त्याचा mood off.

 

लहान मुलगा चित्र काढतो.

आई म्हणते, “छान आहे. ”

तो लगेच विचारतो — “खरंच? की फक्त बोलतेस? ”

 

ही सगळी एकच गोष्ट आहे —

Validation Addiction.

 

Validation म्हणजे काय?

इतरांनी आपल्याला मान्यता देणं.

आपण चांगले आहोत, सुंदर आहोत, यशस्वी आहोत —

हे बाहेरून ऐकायची गरज.

 

मान्यता हवी असणं नैसर्गिक आहे.

पण जेव्हा आपली किंमत फक्त वारंवार इतरांच्या शब्दांवर अवलंबून होते —

तेव्हा ती सवय व्यसन बनते.

 

आजची पिढी दुखावलेली नाही…

ती approval वर जगायला शिकली आहे.

 

Like कमी आले तर mood off.

Partner ने appreciate केलं नाही तर insecurity.

Boss ने कौतुक केलं नाही तर self-doubt.

 

आपण इतके बाहेरच्या टाळ्यांवर अवलंबून झालो आहोत की आतला आवाज ऐकणं विसरलो आहोत.

 

Validation Addiction ची मोठी समस्या काय?

ती आपल्याला कायम भुकेलं ठेवते.

 

आज १० लोकांनी कौतुक केलं तर छान वाटतं.

उद्या ८ लोकांनी केलं तर कमी वाटतं.

परवा ५ लोकांनी केलं तर दुःख होतं.

 

कारण व्यसन वाढत जातं.

 

मानसिक आरोग्यासाठी सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे —

स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या प्रतिक्रियेत शोधणं.

 

जर तुमचा आत्मविश्वास

like, comment, appreciation, promotion

यावर उभा असेल —

तर तो कायम हलणार.

 

खरी ताकद कुठे आहे?

Self-validation मध्ये.

 

स्वतःला विचारणं —

मी माझ्या मूल्यांनुसार वागलो का?

मी माझ्या परीने प्रामाणिक प्रयत्न केला का?

मी स्वतःच्या नजरेत ठीक आहे का?

 

जर उत्तर “हो” असेल,

तर बाहेरचं कौतुक बोनस आहे…

गरज नाही.

 

Validation Addiction मध्ये माणूस लोकांना खूश ठेवतो.

Self-respect मध्ये माणूस स्वतःशी प्रामाणिक राहतो.

 

आज depression चं एक मोठं मूळ म्हणजे आपण स्वतःला स्वतः मान्यता देत नाही. आपण स्वतःला टाळ्या देत नाही.

आपण स्वतःला “मी पुरेसा आहे” असं म्हणत नाही.

 

लक्षात ठेवा —

जगाचं approval बदलत राहील.

तुमची किंमत बदलत नाही.

 

मनाची मोठी सवय म्हणजे —

टाळ्यांची वाट पाहू नका…

स्वतःला शांतपणे मान्यता द्या.

 

कारण जेव्हा आत्मसन्मान आतून उभा राहतो,

तेव्हा बाहेरच्या टाळ्या फक्त आवाज असतात.

 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ९४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ९४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- सगळं सुरळीत पार पडणार हेच मी गृहीत धरलं होतं आणि ते गृहितच असं चुकीचं ठरू पहात होतं. त्यामुळेच सहजसाध्य वाटणारंच आता अप्राप्य होऊन बसलं. म्हणूनच माझी चलबिचल सुरू झाली आपल्या हक्काचं कांहीतरी नाकारलं जात असल्याची रुखरुख माझं मन पोखरू लागली.

 अखेर काय निष्पन्न होणार हे नेहमीप्रमाणे ‘तो’च तर ठरवणार होता!)

मी स्वतःचीच अशी समजूत घातली खरी पण तरीही त्या रात्री अंथरुणाला पाठ टेकली तेव्हा पुन्हा हेच सगळे विचार मनात गर्दी करू लागले.

“आपण नंतर बोलू यावर, ठरवू काय करायचं ते.. “असं वखरेसाहेब म्हणाले होते. पण ठरवू म्हणजे कधी? अर्ज करायची मुदत तर एक एक दिवस संपत चालली होती. आणि ‘ठरवू काय ते’ म्हणजे काय? त्यांनीच ठरवायचं कां? की मी? मीच जर ठरवायचं असेल तर मी ते ठरवलं होतंच ना? पण हायर मॅनेजमेंटला फक्त

अनप्रॉडक्टिव्ह स्टाफच कमी करायचा होता म्हणे. पण उर्वरित स्टाफपैकी ज्यांचे हितसंबंध अडचणीत येतील ते लिटिगेशन्स सुरू करण्याची शक्यता गृहित धरून सदर योजनेच्या नियमावलीत ही योजना सर्वांसाठीच खुली ठेवली गेली होती. हायर ऑथाॅरिटीज् कडून त्यामुळेच सर्व झोनल व रीजनल हेडस् ना बँकेतील संपूर्ण कारकीर्द चांगली असणाऱ्या स्टाफ मेंबर्सना सदर योजनेचा लाभ घेण्यापासून परावृत्त करण्याच्या तोंडी तरीही स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या होत्या!!

अशा सगळ्या पार्श्वभूमीवर सदर योजनेचा लाभ घेणे कायद्यानुसार मला शक्य असूनही, वखरेसाहेबांना दुखवून कांही करण्याची माझी इच्छा नव्हती. पूर्ण विचारांती मला जाणवले ते हेच की आपल्याला या संधीचा लाभ घेता येणार नाही या विचाराने नव्हे, तर वखरे साहेबांना दुखवून तो लाभ मला घ्यावा लागेल या शक्यतेचा मला त्रास होतोय. हे जाणवलं आणि मन थोडं शांत झालं. आपण फार घाई गडबड न करता एक-दोन दिवस वाट बघून, त्यांचा कल पाहून त्यांच्याशी बोलू. आपली नेमकी बाजू त्यांना पटवून देऊ. पुढं काय करायचं ते ते वेळ येईल तेव्हा ठरवू असा विचार केला आणि मी निश्चिंत झालो.

याबाबतचे विचार आणि चलबिचल वखरेसाहेबांच्या मनातही होतीच हे मला दुसऱ्या दिवशी बँकेत गेल्यानंतर लगेचच जाणवलं. कारण मी कांही कामानिमित्त त्यांच्या केबिनमधे गेलो तेव्हा माझं नेमकं काय काम आहे हे जाणून न घेता त्यांनी मी या विषयाबद्दलच बोलायला आलोय हे गृहितच धरलं असावं तसं मला विचारलं,

” मग काय ठरलं तुमचं? “

प्रश्न अनपेक्षित होता. त्यामुळे पटकन् मला काय बोलावं सुचेना. पण तरीही मला हा निर्णय घेण्यामागची कांहीतरी वेगळीच खोटी कारणं पुढे करणं किंवा अगदी हिशोबीपणाने बोलून माझ्या निर्णयाचं समर्थन करणं नको होतं. मला या निर्णयापर्यंत येण्यामागची माझी खरी भूमिका अतिशय मोकळेपणाने त्यांना सांगायची होती आणि त्यासाठी हीच वेळ योग्य आहे हे लक्षात आलं. तरीही, त्यांनी मला विचारलं म्हणून लगेच उतावीळपणाने कांही बोलण्यापेक्षा मला थोडं थांबावंसं वाटलं म्हणून मी म्हंटलं,…

“आपण नंतर सविस्तर बोलू असं म्हणाला होतात ना तसं आत्ता तुम्ही बिझी असाल तर एक-दोन दिवसांनी हवंतर बोलूया कां? “

” तसं तर कामं कधीच संपणार नाहीयत. केव्हातरी बोलायला हवंच. बसा. आधी तुम्ही कशासाठी आला होतात ते काम आवरू, मग बोलू. ” ते मनापासून म्हणाले.

” ते महत्त्वाचं असलं तरी तसं खूप अर्जंट नाहीय. आॅडिट रिपोर्टवरील क्वेरीजच्या रिप्लायचा ड्राफ्ट मी बनवलाय. तो दाखवायला आलो होतो. तुम्ही एकदा बघून घेतलात तर… “

मी पुढे केलेली फाईल त्यांनी हातात घेतली आणि टेबलवर बाजूला ठेवून दिली.

” ते मी नंतर वाचून बघतो. मग? काय ठरलं तुमचं? ” त्यांनी थेट विषयालाच हात घातला.

“या स्वेच्छानिवृत्ती योजनेकडे मी मला उमेदीच्या वयात मिळणारं १० वर्षांचं ‘बोनस लाईफ’ म्हणून बघतो. ” मी सांगू लागलो. या निर्णय प्रोसेसमधे माझ्या मनात येऊन गेलेले उलटसुलट विचारच निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी स्वत:शीच एकदा तपासून पहावेत तशा प्रामाणिकपणाने मी बोलत राहिलो. माझं आर्थिक नियोजन, इतकी वर्षं मला मनासारखे जोपासता न आलेले माझे आवडते छंद, करायची तीव्र इच्छा असूनही केवळ वेळेअभावी करता न आलेल्या आणि दहा वर्षानंतर कदाचित सगळी उमेद/उत्साह संपून गेल्यानंतर इतक्या असोशीने पुढे कधी करता यायची शक्यताच नसलेल्या अशा कितीतरी गोष्टी, सगळं त्यांना अगदी मोकळेपणानं सांगून टाकलं.

“घरी बोललायत हे सगळं? “

” नाही. कारण बायको आणि मुलगा दोघांनाही हे सगळं माहिती आहे. आर्थिक नियोजनाबद्दल मात्र मी त्यांच्याशी मोकळेपणाने बोललोय. संपूर्ण घरखर्च आणि संसारातल्या माझ्या इतरही सगळ्याच जबाबदाऱ्या या स्वेच्छानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या अतिरिक्त आर्थिक लाभातूनच व्यवस्थित मॅनेज होऊ शकतायत याचीही त्यांना कल्पना दिलीय. माझा मुलगा हुशार आहे. तो सी. ए. ची तयारी करतोय. इंजीनियरिंग किंवा मेडिकलला न गेल्यामुळे त्याच्या शिक्षणाचा खर्च तसा कांहीच नाहीय. उलट त्याने ‘स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यानंतर तुम्ही पैसे कमावण्यासाठी दुसरीकडे कुठेही नोकरी करायची नाही’ अशी अटच घातलीय. या निवृत्तीमुळे मला न मिळू शकणारी एकच गोष्ट म्हणजे एरवी मिळण्याची शक्यता असलेली पुढची प्रमोशन्स! पण त्याचा हव्यास मला यापूर्वीही कधी नव्हताच. आजपर्यंत त्या त्या वेळी मला सगळं मिळत गेलंय आणि जे मिळालं त्यात मला समाधान आहे. एरवीही यापुढच्या उच्चाधिकार पदांपासून मिळणारं समाधान किती फसवं आहे याचा अनुभव आपल्यापैकी सर्वजण घेत आहोतच ना साहेब? त्यापेक्षा स्वेच्छानिवृत्ती नंतर मी आधी सांगितलेल्या सर्व गोष्टींमधून मला मिळणारं समाधान माझ्यासाठी अधिक मोलाचं असेल. “

वखरेसाहेब शांतपणे ऐकत होते.

” हे खरंतर योग्यच आहे, पण एम्. डीं च्या सूचनांचं काय करायचं? ते ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत असणं शक्यच नाही.. ” त्यांच्या बोलण्यातली असहायता मलाही अस्वस्थ करून गेली.

” एक मार्ग आहे सर.. ” मी म्हणालो आणि अगदी ऐनवेळी आपल्याला हे नेमकं सुचलंच कसं याचं मलाच आश्चर्य वाटू लागलं.

“कोणता मार्ग? ” त्यांनी उत्सुकतेने विचारलं.

“मी सर्क्युलरनुसार योग्य मुदतीत माझा अर्ज सबमिट करतो. त्याखेरीज बँकेचं हित लक्षात घेऊन माझा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज

मॅनेजमेंटने नाकारला, तर मी बँकेचा निर्णय विनातक्रार स्वीकारेन आणि त्याविरुद्ध कोणतीही लिटिगेशन्स सुरू करणार नाही असं लेखी आश्वासनही मी तुमच्याकडे देऊन ठेवीन. “

“त्याने काय होईल? “

“मॅनेजमेंटला लिटिगेशन्सचीच भीती आहे ना? माझ्याबाबतीत तरी ती रहाणार नाही. आणि त्याचा मला फायदा एकच. उद्या माझ्यापुढे कशी वेळ येईल आज सांगता येणार नाही. कोणत्याही प्रकारचे मतभेद निर्माण झाले तर तेव्हाचे माझे वरिष्ठ “तुम्हाला बँकेने बाहेर पडायचा मार्ग खुला करून दिला होता ना? जबाबदाऱ्या झेपणार नव्हत्या तर तेव्हाच बाहेर पडायला हवं होतंत” असं मला म्हणाले तर मला मिळालेलं स्वेच्छानिवृत्ती नाकारल्याचं पत्र एखाद्या ‘सन्मानपूर्वक सर्टिफिकेट’ सारखं मी त्यांना दाखवू तरी शकेन. साहेब, इथे काही दिवसांपूर्वीच झालेल्या तुमच्या केबिनमधल्या एम्. डी. मीटिंग मधली, तुमचा कांहीही दोष नसताना तुम्हाला दिली गेलेली अपमानास्पद वागणूक आणि त्यावेळी तुमची झालेली मनोवस्था मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली तेव्हाच आपण जसजसे वर जाऊ तसतशी तिथली हवाही कशी विरळ होत जाणाराय याचं प्रत्यंतर आपल्यापैकी सर्वांना आलेलं आहेच. आणि आज तेच मला योग्य दिशा दाखवून गेलंय. ही स्वेच्छानिवृत्ती त्यामुळेच मला आयुष्यात फक्त एकदाच उपलब्ध होणारी अमूल्य संधी वाटतेय एवढंच. “

वखरेसाहेब मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. माझं बोलणं संपलं तसं ते भानावर आले. समोरच्या ग्लासमधलं घोटभर पाणी पिऊन ते शांतपणे म्हणाले,

” खरं आहे तुमचं. माझ्याकडून तुम्हाला कोणतीच अडचण निर्माण होणार नाही. आणि ते लेखी पत्र वगैरे द्यायचीही कांही गरज नाहीय. वरून कुणी कांही विचारलंच तर त्यांना काय सांगायचं ते मी बघेन. यू गो अहेड.. “

अतिशय अनपेक्षितपणे माझ्या डोक्यावरचं ओझं त्यांनी किती अलगद उतरवून घेतलं होतं! त्यांचे आभार मानून मी जायला वळणार एवढयांत त्यांनी मला थांबवलं.

“लिमये, माझ्या घरच्या जबाबदाऱ्या अजून पूर्ण व्हायच्यात. त्या झाल्या असत्या तर आज मीही हाच निर्णय घेतला असता. सोs… यू आर आॅन राईट ट्रॅक. आॅल द बेस्ट. एंजाॅय अॅण्ड बी हॅप्पी…! “

त्याचं बोलणं हे माझ्यासाठी सदिच्छाच नव्हत्या फक्त तर त्यांच्या तोंडून ‘तो’ च देत असावा असा शभाशीर्वादही होता…!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares